संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय – पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचें वर्णन

संत निळोबाराय – पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचें वर्णन

२९१

हा गे पहा विटे उभा । सच्चिदानदांचा हा गाभा ॥१॥

देखे सकळांचेही भाव । अध्यक्ष हें याचें नांव ॥२॥

जेथें तेथें जैसा तैसा । नव्हे न्यून पूर्ण ऐसा ॥३॥

निळा म्हणे माझया जिवीं । ठेला जडोनी तो गोसावी ॥४॥

२९२

सांगतां महिमा पंढरीचा । अपार वाचा वेदांचिये ॥१॥

सहजचि क्षेत्रा जाईन म्हणतां । धांवे सायुज्यता सामोरी ॥२॥

विठ्ठल राज देखतां दिठी । वास वैकंठी तेचि क्षणीं ॥३॥

निळा म्हणे आलिगंन । देतां समाधान जिवशिवा ॥४॥

२९३

भेटावया भक्तजनां । उभाचि राणा पंढरीचा ॥१॥

अवलोकितो दिशा चारी । येती वारकरी ज्या पंथें ॥२॥

आलियाचा राखें मान । करीं समाधान यथाविधि ॥३॥

निळा म्हणे दोषा खंड । चुकवी दंड यमाचा ॥४॥

२९४

पुंडलीक पांडुरंग । संतसंग पदयाळें ॥१॥

चंद्रभागा वाळवंट । भूवैकुंठ पंढरी ॥२॥

वेणुनाद गोपाळपुर । पुष्पावती सार संगम ॥३॥

निळा म्हणे झाला मेळा । या भूगोळा उध्दार   ॥४॥

२९५

सर्वस्वें उदार । देतां न म्हणे साने थोर ॥१॥

तें हें पंढरीये धेंडें । उभें पुंडलिकापुढें ॥२॥

अरिमित्रांसम । देणें एक निजधाम ॥३॥

निळा म्हणे नाहीं । जया आपपर कांहीं ॥४॥

२९६

ऐक्यरुपें हरिहर । उभा कटींकर विटेवरीं ॥१॥

तो म्यां देखिेयेला दिठीं । भूवैकुंठी पंढरीये ॥२॥

तुळसीमाळ वैजयंती । वेढिला संतीं मुनिवरीं ॥३॥

निळा म्हणे विश्रांती मना । झालें लोचना पारणें ॥४॥

२९७

वीटे साजिरीं पाउलें । कटीं कर विराजलें ॥१॥

तेचि आठवती मनीं । चित्त राहिलें चिंतनीं ॥२॥

तुळशीहार पदकें माळा । रुपाकृति घनसांवळा ॥३॥

निळा म्हणे वेधल्या वृत्ती । आनु कांहींचि त्या नेणती ॥४॥

२९८

विठोजी कृपेचा सागर । दीनबंधु करुणाकर ॥१॥

म्हणोनियां स्तवित संत । होऊनि याचे चरणीं रत ॥२॥

उपेक्षूनियां न सांडी कोणां । शरणातां थोरां लहानां ॥३॥

निळा म्हणे धरिलें हातीं । तया मग न सोडी कल्पांतीं ॥४॥

२९९

विठो लावण्याची राशी । जननयनासी पाहुणेरु ॥१॥

पाहतिया तटस्थ लागे । फिरोंचि मागें विसरती ॥२॥

सुघटीत अवघेंचि ठाण । भूषणा भूषण्‍ शोभवित ॥३॥

निळा म्हणे जडला जीवीं । त्रैलोक्य गोसावी विठो माझा ॥४॥

३००

सुकुमार साजिरें ठाण । धरिलें जघन दोन्ही करीं ॥१॥

विटेवरी दिव्यरुप । कोटि कंदर्प ओवाळिले ॥२॥

तुळसी माळा वैजयंती । कौस्तुभ दीप्ती पदकांची ॥३॥

निळा म्हणे हदयावरी । दिधली थोरी व्दिजपधा ॥४॥

३०१

नामचि एक जिहीं उच्चारिलें । तेहि नेले निजधामा ॥१॥

ऐसा याचा कीर्तिघोष । वर्णिती शेष निगमादिक ॥२॥

जिहीं अवलोकिला दिठीं । धन्य सृष्टीमाजीं ते ॥३॥

निळा म्हणे यात्रे येती । ते ते पावती इच्छिलें ॥४॥

३०२

न पुरे धणी गुण गातां । रुप दृष्टी अवलोकितां ॥१॥

बरवा बरवा विठ्ठल  हरी । माझें बैसला अंतरी ॥२॥

मुख लावण्याची खाणी । राही वामांगी रुक्मिणी ॥३॥

निळा म्हणे दृष्टीपुढें । दिसे कोदले रुपडें ॥४॥

३०३

धरियेला गिरी । धरियेला गिरी । सात दिवस बोटावरी ॥१॥

तो हा पुंडलिका वर । देउनियां उभा स्थिर ॥२॥

नाथिला कळिया । यमुने बुडी देउनियां ॥३॥

निळा म्हणे झाला । वत्से गोंवळ जो एकला ॥४॥

३०४

रुपीं गुंतलीं मानसें । ध्यानीं मुनिजनां ज्याचें पिसें । तेंचि हें सुंदर स्वरुप कैसें । धरिलें भक्त कैवारा ॥१॥

अंगी चंदनाची उटी । तुळशी माळाहार कंठी । बुका शोभला लल्लाटीं । रत्नें मुगुटीं झळकती ॥२॥

कर्णी कुंडलें सुढाळें । नेत्र उत्फुल्लीत जैसी कमळें । दंत हिरियचीं व्दिदळें । सोलींव तैसे झळकती ॥३॥

कंठी कौस्तुभ आणि पदकें । श्रीवत्सलांछन ह्रदयीं निकें । एकावळी त्यावरी झळके । मुक्तमोतियें वाटोळीं ॥४॥

हात ठेंवुनी कटावरी । कांसे पितांबराची परी । नाना ठसे उमटले वरी । मेखळा रत्नें बरवंटा ॥५॥

चरण सकुमार साजिरे । पाउलें अत्यंत गोजिरें । वाकी घुंगरु झणत्कारें । करिती चेइरें आनंदा ॥६॥

संतसमुदाये देवढें । गर्जतीं गुणनाम पवाडे । वैष्णव नाचतीं बागडे । ब्रम्हानंद पीकला ॥७॥

राही रुक्मिणी सत्यभामा । परिवारवेष्टित पुरुषोत्तमा । अगाध पंढरीये हा महिमा । देव विमानीं दाटलें ॥८॥

निळा म्हणे पुरला हेत । ठेविलें पायांपाशीं चित्त । सांठवुनियां हदयांत । रुप पावलों विश्रांती ॥९॥

३०५

आला स्वइच्छा पंढरपुरा । सांडूनियां क्षीरसागरा ॥१॥

पुढें देखोनियां इटे । चरण ठेविले गोमटे ॥२॥

दोन्हीं हात कटावरी । ठेवूनि परमात्मा श्रीहरी ॥३॥

निळा म्हणे जगदोध्दार । करीत उभा निरंतर ॥४॥

३०६

सुकृताचा होता सांठा । भूवैकुंठा ते आले ॥१॥

सन्मुख देव भेटे तया । लागती पायां भाग्याचे ॥२॥

न्याहाळिती दृष्टि मुख । कैवल्यसुख तुच्छ पुढें ॥३॥

निळा म्हणे ब्रम्हानंदा । झाले तत्पदा अधिकारी ॥४॥

३०७

सहज गेलो पंढरपुरा । विश्वंभरा भेटीसी ॥१॥

तो हा उभा विटेवरी । देखिला श्रीहरी जगदात्मा ॥२॥

ज्याचिये तेजें धवळलें नभ । हा जगदारंभ अंगकांति ॥३॥

निळा म्हणे ब्रम्हादिकां । व्यापक लोकां सकळां जो ॥४॥

३०८

संत येताती सनकादिक । सोहळा पाहों तो कौतुक ॥१॥

चंद्रभागे निमज्जन । परिसों हरीचें कीर्तन ॥२॥

संतसज्जनांचिया भेटी । करुं स्वानंदाची लुटी ॥३॥

निळा म्हणे पंढरपुरीं । सेवूं काला वांटिती हरि ॥४॥

३०९

वेणुनादीं लाभे काला । उणें त्याला मग काय ॥१॥

ब्रम्हानंदे कोंदे सुष्टी । शीतचि ओंठी लागतां ॥२॥

देतां पदीं पिंडदाना । पितृगणा उध्दार ॥३॥

निळा म्हणे देवचि ऋणी । एक स्नानीं पधाळा ॥४॥

३१०

राहिला उभा विटेवरी । भक्तकैवारी म्हणउनी ॥१॥

जे जे येती ज्या ज्या भावें । तें त्यां दयावें न बोलतां ॥२॥

भुक्ति मुक्ति वांटी एका । लाविल्या फुका रिध्दिसिध्दी ॥३॥

निळा म्हणे सर्वाधिकारी । प्रेमभांडारी भक्त केले ॥४॥

३११

राही रुक्मिणी सत्यभामा । पुरुषोत्तमा वामसव्य ॥१॥

पुडंलिक दृष्टी पुढें । उभे देहूडे सनकादिक ॥२॥

जय विजय महाव्दारीं । गरुड शेजारीं हनुमंत ॥३॥

निळा म्हणे भोंवते संत । कीर्तनें करीत चौफेरीं ॥४॥

३१२

पंढरिहूनी गांवा जातां । वाटे खंती पंढरिनाथा ॥१॥

आतां बोळवीत यावें । आमुच्या गांवां आम्हांसवें ॥२॥

तुम्हांलागीं प्राण फुटे । वियोगदु:खें पूर लोटे ॥३॥

निळा म्हणे पंढरीनाथा । चला गांवा आमच्या आतां ॥४॥

३१३

याचि लागीं हरी । उभा चंद्रभागेतीरीं ॥१॥

भक्तांचिये हांकेसवें । उडी घालोलियां पावे ॥२॥

नेदी पडों दिठी । काळाची त्या घाली पोटीं ॥३॥

निळा म्हणे नामावरी । सर्वस्व हा उदार हरि ॥४॥

३१४

वरी बुकीयाचे धूसर । अत्तर कस्तुरी केशर ॥१॥

तुळशी नाना सुमनमाळा । दिव्यसंबराचा सोहळा ॥२॥

पांडुरंगा ओंवाळिती । नारीनर अवलोकिती ॥३॥

निळा म्हणे दिपावळी । सोडिती चंद्रभागाजळीं ॥४॥

३१५

विटेवरी कैवल्यगाभा । राहिल्या उभा पंढरिये ॥१॥

आलियासी देतो धणी । सर्वां गुणीं संपन्न  हा ॥२॥

भुक्ति मुक्ति देतो रिध्दी । स्थापितो पदीं अधिकारियां ॥३॥

निळा म्हणे पुरवी कोड । उरोचि सांकड नेदी हा ॥४॥

३१६

वारकरी संत पंढरीसी जाती । सप्रेमें नामघोषें ॥१॥

लोटांगणी त्यांसी जाईन आवडी । ओवांळीन कुडी वरुनी पायां ॥२॥

धन्य केल वंश तारिले पातकी । डोलतां पताकी गगन शोभे ॥३॥

टाळ श्रुति वादयें मृदंगाच्या ध्वनी । क्रमिताती अवनी ब्रम्हानंदें ॥४॥

पढती ब्रिदावळी करिती जयजयकार । टाळीया अंबर सादु देत ॥५॥

निळा म्हणे माझे सखे विष्णुदास । जाती पंढरीस प्रतिवरुषीं ॥६॥

३१७

भुक्तिमुक्तीचें माहेर । वसविलें पंढरपूर ॥१॥

सुख विश्रांतीसी आलें । संतां पाचारिलें सज्जनां ॥२॥

कथा-कीर्तनें सोहळा । छबिने मेळा पताकांचा ॥३॥

निळा म्हणे पंचक्रोशी । नामें घोषी दुमदुमित ॥४॥

३१८

नाना लोक धांवोनि येती । राशी भरिती आइत्या ॥१॥

घेऊनि जातां विश्वजनां । नव्हेचि उणा माल फार ॥२॥

युगें गेलीं बहाती लोक । न सरेचि पीक वोसंडलें ॥३॥

निळा म्हणे पुंडलिकें । केलीं लोकें सभाग्य ॥४॥

३१९

नारद येऊनि पंढरियेसी । स्थळ पुंडलिकासी मागती ॥१॥

भीमापुष्पावती संगम । योजिला आश्रम तयाप्रती ॥२॥

विष्णूपदें उमटली जेथें । करविला तेथें रहिवास ॥३॥

निळा म्हणे पिंडदान । करिती सज्जन जे स्थळीं ॥४॥

३२०

ऐसा उदार देवादेवो । पंढरिरावो सुखसिंधु ॥१॥

ज्याचें देणें न सरे कधीं । कल्पावधीं पर्यंत ॥२॥

देवां दैत्यां शेषादिकां । सप्तहि लोकां मानवासी ॥३॥

निळा म्हणें ठाया ठावो । जाणें भावो अंतरींचा ॥४॥

३२१

नामसमरणेंचि श्रीहरी । दासां दुरिता दूरी करी ॥१॥

तो हा पंढरिये ठाके । गुंतोनियां भक्ताभाके ॥२॥

हरिभक्तां या उध्दरी । तत्संगें आणिकांते तारी ॥३॥

निळा म्हणे ऐशी कीर्ती । सनकादिक संत गाती ॥४॥

३२२

नामरुप नातळे ज्यासी । परात्पर ऐशी वदंती ॥१॥

तो हा आला पंढरपुरा । समाचारा भक्तांच्या ॥२॥

ओळखिला पुंडलिकें । केलें निकें पूजन ॥३॥

निळा म्हणे विटेवरी । स्थापिला तीरीं चंद्रभागे ॥४॥

३२३

पंढरिये केला वास । निज भक्तांस तारावया ॥१॥

म्हणे यारे-अवघे वर्ण । आदि ब्राम्हण करुनियां ॥२॥

जया वैकुंठासी जाणें । तया पेणें हें पंढरी ॥३॥

निळा म्हणे सुकाळ केला । भक्तां वोळला कुवासा ॥४॥

३२४

पुंडलिके पिकविलें । विश्वा पुरलें न्यावया ॥१॥

त्रैलोक्यमणि लागला हातीं । लोक ते किती नेतील ॥२॥

विश्वनिर्मिता ज्याचे व्दारीं । निरंतरी तिष्ठत ॥३॥

निळा म्हणे भाग्य त्याचें । अपार वाचे वर्णवे ॥४॥

३२५

पुंडलीक म्हणे देवा । आतां करावा वास येथें ॥१॥

असों एक जीवे प्राणें । मीतूंपणे वोसंडुनी ॥२॥

बहुत बरें म्हणती देव । ठेविले पाव विटेवरी ॥३॥

निळा म्हणे नव्हे तुटी । युगापाठीं युग जातां ॥४॥

३२६

यमुनेचा जो विहारीं । तोचि हा उभा पंढरपुरीं ॥१॥

दह्या-दुधाचा सुकाळ । कार्तिकीये पर्वकाळ ॥२॥

नवनिताचे गोळे । क्षीरामृताचे कल्लोळे ॥३॥

निळा म्हणे अंळकार । वस्त्रें मिरवी रमावर ॥४॥

३२७

आतां पाहेन वाडेंकांडें । याचें रुपढे दृष्टीभरी ॥१॥

आहे उभा ईटेवरी । न वजे पंढरी सांडूनियां ॥२॥

येती त्यांसी आलिंगन । पाववी देऊन संतोषा ॥३॥

निळा म्हणे दासांप्रती । वाटितो मुक्ति दर्शनें ॥४॥

३२८

आत्मा सकळांचा श्रीहरी । तो हा उभा पंढरपुरीं ॥१॥

म्हणेनियां देव येती । दर्शनी ऋषींच्या पंगती ॥२॥

प्रतिवर्षी उपासक । येती यात्रे सनकादिक ॥३॥

निळा म्हणे त्रैलोक्यदाता । विठो लक्ष्मीचा भर्ता ॥४॥

३२९

उमटलीं खडकावरी । पदें गोजिरीं विष्णूचीं ॥१॥

देखोनियां ते सात्विक जन । करिती पिंडदान तये पदीं ॥२॥

पंढरिये नारदाश्रमीं । भीमासंगमी पुष्पावती ॥३॥

निळा म्हणे दक्षिण गया । उध्दरावया पूर्वजा ॥४॥

३३०

उमटलीं विष्णूपदें । गयावर्जनीं जे प्रसिध्दें ॥१॥

नारद क्षेत्रीं पंढरपुरीं । अदभुत पदांची त्या थोरी ॥२॥

ऋणत्रया मुक्त जन । देतां पदीं पिंडदान ॥३॥

निळा म्हणे गोपाळपुरीं । विठ्ठल  वेणुवादन करी ॥४॥

३३१

एकंदर देवें आज्ञा केली । पुंडलिका दिधली निजभाक ॥१॥

जे जे तुझिया क्षेत्रासी येती । त्यां त्यां उत्तम गति पाठवीं ॥२॥

उत्तम अधम न म्हणे कांही । रिगमचि नाहीं दोषा येथें ॥३॥

निळा म्हणे हे पंचकोशी । जाणा वाराणसीसमान ॥४॥

३३२

ऐसा दोहीं स्थ्‍ळींचा महिमा । अगाध उपमा नाहीं त्या ॥१॥

पंचक्रोशीमाजी भार । छबिने अपार मिरवती ॥२॥

वैष्णव करिती नामघोष । नाचती उदास कीर्तनीं ॥३॥

निळा म्हणे भुक्ति मुक्ति । जोडती विरक्ति अनायासें ॥४॥

३३३

ऐसिया सुखाची मांदूस । झाली रुपस विठाई ॥१॥

मांडूनियां इटे ठाण । धरिला जघन व्दयकरीं ॥२॥

रुपाकृती मानववेष । ईशाईश जननी हे ॥३॥

निळा म्हणे भक्तांसाठीं । फिरे वाळवाटीं । उघडी हे ॥४॥

३३४

नाढळे कधींही पंढरी । नका सांगो त्याची थोरी ॥१॥

मिथ्या करिती ते चार । सोंग कथेचा विस्तार ॥२॥

नाहीं प्रेमा पांडुरंगी चित्त विषयसेवा भोगीं ॥३॥

निळा म्हणे दावी जैसें । नाहीं अंतर झालें तैसें  ॥४॥

३३५

नाहीं विश्वास जया गाठीं । न पाहती दिठीं पंढरी ते ॥१॥

अदृष्ट त्यांचे हीन झालें । न देखती पाउलें विटेवरी ॥२॥

लक्ष चौर्‍यांशीं यातना भोग । सोशिती अभंग दैन्यवाणें ॥३॥

निळा म्हणे नाडले वायां । दुर्लभ पावोनियां नरदेह ॥४॥

३३६

पुंडलिकें शेत केलें । पिकविलें अपार ॥१॥

संवगिता नावरे एका । मग सकळ लोकां हांकारी ॥२॥

या रे म्हणे बांधा मोटा । करा सांठा न्या घरा ॥३॥

निळा म्हणे कल्पवरी ।  लुटती परी सरेना ॥४॥

३३७

पुढारले विठ्ठल हरी । केली नगरी वैकुंठ ॥१॥

सुदर्शन ठेविलें तळीं । म्हणे कल्पजळीं बुडों नेदी ॥२॥

तैसेचि धरिले क्षेत्रावरी । म्हणती हे नगरी रक्षावी ॥३॥

निळा म्हणे या पुंडलिकें । यापरी लोकें उध्दरिलीं ॥४॥

३३८

भोळा माझा पंढरीनाथ । धांवें त्वरित पाचारिल्या ॥१॥

न पाहे मानप्रतिष्ठा त्याची । घेतली ज्याची सुति येणें ॥२॥

अनाथें दिनें भाविकें तें । आवडती चित्तें जीवापरी ॥३॥

निळा म्हणे पाळी लळा । अख्ंड सोहळा करुनियां ॥४॥

३३९

जो देखे एकदां तरी । हें पंढरी-वैकुंठ ॥१॥

सुती तया आली हाता । नाहीं चिंता मोक्षाची ॥२॥

याचिये मार्गी पाऊल पडे । तेव्हांचि जोडे यात्रा त्या ॥३॥

निळा म्हणे प्रत्यक्ष भेटी । ते तो लुटी निजानंदा ॥४॥

३४०

पाचारितांचि पंढरीनाथा । संचरे तत्वतां हदयांत ॥१॥

ऐसा प्रताप आणिकां अंगी । नाहीं ये युगीं विवरितां ॥२॥

संगतीं अन्यत्र दैवतें भूतें । आशा लोलिंगतें ते काय ॥३॥

निळा म्हणे जन्ममरणा । करी निवारणा एक हरि ॥४॥

३४१

करुनि चंद्रभागे स्नान । अभिवंदन पुंडलिका ॥१॥

पुजूं जाति विठोबासी । वैकुंटवासी ते होती ॥२॥

कथाश्रवण प्रदक्षणा । नाहीं गणना सुकृता त्या ॥३॥

निळा म्हणे पूर्वजेसी । होती विमानेंसी प्रविष्ट ॥४॥

३४२

महर्षी देव स्तविती ज्यातें । कृतांजुळी हातें जोडूनियां ॥१॥

तो हा उभा विटेवरी । रम्य तीरीं चंद्रभागे ॥२॥

शुक नारद गाती कीर्तनीं । ज्यातें अनुदिनीं सुस्वरें ॥३॥

निळा म्हणे ब्रम्हादिक । ज्याचिये सेवक आझेचे ॥४॥

३४३

न देखे जो पंढरीनाथ झाला हाहाभूत जन्म त्याचा ॥१॥

वायां गेला पतना नेला । नाहीं आठविला हरि म्हणून ॥२॥

कैचें तया पढंरपूर । पदरीं अपार दोषमळ ॥३॥

निळा म्हणे देईल झाडा । जाऊनी पुढां यमदंड ॥४॥

३४४

धिक् त्याचें जन्मांतर । न देखे पंढरपुर महापापी ॥१॥

अहारे कर्मा बलवत्तरा । नेला अघोर भोगावया ॥२॥

नेदीचि उपजों विश्वास मनीं । पंढरी हे नयनीं देखावया ॥३॥

निळा म्हणे संग्रह होतां । पापाचा आईता उघडता तो ॥४॥

३४५

नेमूनियां ठेविलें जेथें । वसती तेथें ते देव ॥१॥

ऐसा समर्थ पंढरीनाथ । तो हा मोहित भक्तिसुखा ॥२॥

जेणें निर्मूनि पांचहि तत्वें । राखिलीं समत्वें निजआज्ञा ॥३॥

निळा म्हणे ब्रम्हांडें भुवनें । स्वर्गे आनानें रचियलीं ॥४॥

३४६

धन्य धन्य पुंडलिका । केला तरणोपाय लोकां ॥१॥

एका दर्शनेंचि उध्दार । केलें पावन चराचर ॥२॥

चंद्रभागा पंढरपूर । भक्त आणि हरीहर ॥३॥

निळा म्हणे सुलभ केलें । भूमि वैकुंठ आणिलें ॥४॥

३४७

तळींवरी सुदर्शन । करीत छेदन महापापा ॥१॥

प्रत्यक्ष उभा देवचि भेटे । हेंही कोठें आन ठायीं ॥२॥

एकी क्षेत्र प्रदक्षणा । तुळसीपानावरीं तोखे ॥३॥

निळा म्हणे चंद्रभागे । स्नानें भंगे पाप ताप ॥४॥

३४८

पंढरिचे अनुष्ठान केलें चंद्रे । अलंकापुरी इंद्रें तपचर्या ॥१॥

तेथें इंदु निष्कलंक अंगें । तेथें आरोग्यभगें सुरेंद्रता ॥२॥

हरिहररुपें पंढरीरावो । येथें तिन्ही देवो सिध्दरुपें ॥३॥

निळा म्हणे तेथें भक्ती । येथें विरक्ती प्रगटली ॥४॥

३४९

नावडे पंढरी । कथा करी दारोदारीं ॥१॥

नको त्याचें संभाषण । वाटे भेटीसवें शीण ॥२॥

सांगे ब्रम्हज्ञान वरी नाहीं प्रेम तें अंतरी ॥३॥

निळा म्हणे पोटभरु । उगेंचि करिती गुरुगुरु ॥४॥

३५०

झाली भाग्याची उजरी । दृष्टी देखतांचि पंढरी ॥१॥

ठेविले तो कर कटीं । जेणें अवलोकिला दिठी ॥२॥

चंद्रभागे केलें स्नान । भक्तां पुंडलिकाचें दर्शन ॥३॥

निळा म्हणे वैकुंठवासी । प्राणी होईल तो निश्चयेंसी ॥४॥

३५१

तिहीं लोकीं फुटलीं हांक । वैकुंठलोकापर्यंत ॥१॥

भेटों गेला पुंडलिकांसी । हदयनिवासी जगाचा ॥२॥

दोषियां पापियां उध्दरीत । आणि हाकांरित भाविकां ॥३॥

निळा म्हणे ठेवुनी हात । कटावरी तिष्ठत विटे उभा ॥४॥

३५२

जया नावडे पंढरी । निरयवासी तो अघोरी ॥१॥

विठोबासी निंदी वाचा । यमदंड तो पावे साचा ॥२॥

नेघे विठोबाचें नाम । वृथा गेला त्याचा जन्म ॥३॥

निळा म्हणे प्रेतरुप । त्याचे पुण्य तेंचि तें पाप ॥४॥

३५३

चंद्रभागे करितां स्नान । होती पातकी पावन ॥१॥

पुंडलिकासी नमस्कार । करितां पूर्वजां उध्दार ॥२॥

वेणुनादीं काला वांटी । तुप्ती पूर्वजां वैकुंठीं ॥३॥

निळा म्हणे पिंडदान । दक्षिणगया अधिष्ठान ॥४॥

३५४

जाऊनियां भीमातटीं । नाचों वाळवंटी पंढरिये ॥१॥

होतील लाभाचिया कोटी । पहातां दृष्टी विठठला ॥२॥

भुक्ति मुक्ति आपुल्या सुखें । येती हरिखें सामोया ॥३॥

निळा म्हणे परमार्थ धणी । होईल आयणी फिटोनी ॥४॥

३५५

अगाध महिमा पंढरीचा । काय तो वाचा कवळेल ॥१॥

येती यात्रे मुक्त होती । जे या देखती विठठला ॥२॥

नलगे दुजें तपसाधन । घडतां स्नान चंद्रभागे ॥३॥

निळा म्हणे भूमीवरी । क्षेत्र हें पंढरी वैकुंठ ॥४॥

३५६

देखतांचि यातें दिठी । पळता कोटी पापांच्या ॥१॥

जेंवि उगवतांचि रवी । अंधकार न दावी मुख पुढें ॥२॥

जन्ममरणयात्रा फिटे । लाजती गोमटे अभ्यास ॥३॥

निळा म्हणे महिमा ऐसा । पंढरीनिवासा भेटतां ॥४॥

३५७

झाली कीर्तनाची दाटी । चंद्रभागे वाळुवंटीं ॥१॥

संत गर्जती आनंदें । हरिची नामें नाना छंदें ॥२॥

टाळ मृदंग झणत्कार । नामें कोंदलें अंबर ॥३॥

निळा म्हणे वैकुंठवासी । झाला सुलभ हरिभक्तांसी ॥४॥

३५८

जाईन म्हणतांचि पंढरपुरा । कळिकाळा दरारा उपजे मनीं ॥१॥

यमधर्माचिया दंडासी चुकला । आणि पूज्यमान झाला तिहीं लोकां ॥२॥

विधी म्हणे तया निषेधुची नाहीं । कर्माकर्मप्रवाही न पडेचि तो ॥३॥

निळा म्हणे तेणें आनंदवुनी सकळा । नेलें आपुल्या कुळा वैकुंठासी ॥४॥

३५९

कौलें पिकली परलोक पेंठ । हें भूवैकुंठ पंढरी ॥१॥

नाम मुद्रा खरें नाणें । घेणेंदेणें लाभवरी ॥२॥

ब्रम्हानंदे भरिलीं पोतीं । प्रेमें उथळती सीगवरी ॥३॥

निळा म्हणे जाऊं हाटा । करुं सांठा न सरेसा ॥४॥

३६०

गरुड आणि हनुमंत । पुढें सेवेंसी तिष्ठत ॥१॥

उभा वैकुंठनिवासी । देव येती दर्शनासी ॥२॥

महाद्वारीं गरुडध्वज । गगनीं झळके तेज:पुंज ॥३॥

निळा म्हणे कथा कीर्ति । संत सन्मुख नाचती ॥४॥

३६१

पुंडलिकें आणिला घरां । त्रेलोक्यसोयरा कुटुंबाळू ॥१॥

सोळा सहस्त्र आत:पुरे कन्या कुमरे दास दासी ॥२॥

गाई गोधनाचे वाडे । गोपाळ सवंगडे समवेत ॥३॥

निळा म्हणे वस्ती दाट । केली वैकुंठ पंढरी ॥४॥

३६२

कैवल्याचा गाभा । व्यापूनियां ठेला नभा ॥१॥

तो हा सगुण वेषधारी । उभा चंद्रभागे तीरीं ॥२॥

धुंडिती पुराणें । वेदश्रुती ज्याकारणें ॥३॥

निळा म्हणे अवघे देव । ज्याचे म्हणविताती अवयव ॥४॥

३६३

देवा भक्तांचा सोहळा । वाचें गाती वेळोवेळां ॥१॥

म्हणती धन्य पंढरपुर । पुंडलीक मुनीश्‍वर ॥२॥

चंद्रभागा पदयतीर्थ । वेणुनादीं जन कृतार्थ ॥३॥

निळा म्हणे पांडुरंगा । भेटी तापत्रयभंगा ॥४॥

३६४

पंढरपुरा जाऊं चला । भेटों रुक्माई विठ्ठल  ॥१॥

जन्ममरणाचें खंडन । अवलोकितां दृष्टीं चरण ॥२॥

पुंडलिका वंदूनियां लागों विठोबाच्या पायां ॥३॥

निळा म्हणे घेऊनी कडे नेतील वैकुंठा रोकडें ॥४॥

३६५

सांगतों हे मनीं धरा । हित करा आपुलें ॥१॥

जा रे पंढरीसी आधीं कृपानिधीं भेटेल ॥२॥

अवघींच सुखे अलौकिकें । देईल एके दर्शनें ॥३॥

निळा म्हणे रिध्दी सिध्दी । मुक्तिपदीं लागती ॥४॥

३६६

चिमणाचि देखिला परि हा वाड झाला । गगनहि फांकला प्रकाश वरी ॥१॥

भरोनियां दाही दिशा कोंदाटला । पाताळा वरिही गेला पदांकु याचा ॥२॥

स्वर्ग माळा अंगी लेईला सुढाळ । कान्हो चक्रचाळ पंढरीचा ॥३॥

निळा म्हणे दिसे ईटेच्या नेहटीं । परी हा व्यापुनी सुष्टीं येथें उभा ॥४॥

३६७

बरें झालें शरण गेलों । संतीं लाविलों निज सोयी ॥१॥

म्हणती पंढरीचा हाट । करी बोभाट हरीनामें ॥२॥

येईल तो वरावरी । धरील श्रीहरी हदयेंसी ॥३॥

निळा म्हणे एकचि खेपे । खंडती पापें सकळहीं ॥४॥

३६८

बोलाविल्यावांचूनि आला । उभा पाठीसी ठाकला । अवचित पुंडलिकें देखिला । मग पुजिला उपचारीं ॥१॥

म्हणे आजी हें नवल झालें । मज अनाथा सांभाळिलें । ब्रीद आपुलें साच केलें । सुयाणें घडलें स्वामीचें ॥२॥

देव म्हणती तुझिया भावा । देखोनि पावलों विसांवा । उभा राहोनि करीन सेवा । न वजें आतां येथुनी ॥३॥

पंच महापातकी येती । तेही येथें मुक्त होती । ऐसा पुरस्करुनी पुंडलिकाप्रती । वरु दिधला त्रिवाचा ॥४॥

निळा म्हणे सात्विक जन । करिती तेथें हरि-कीर्तन । तें तों ब्रम्ह सनातन । पावती वचन हें सत्य ॥५॥

३६९

भाग्याचे ते नारीनर । अवलोकिती निरंतर ॥१॥

उजळूनियां ताटीं ज्योती । वधुवरांतें आवाळिती ॥२॥

नित्य पंढरीचा वास । उपमा नाहीं त्या सुखास ॥३॥

निळा म्हणे वैकुंठवासी । नित्य हरि जयापाशीं ॥४॥

३७०

पंढरीये पांडुरंग । भोंवता संग संतांचा ॥१॥

मिळवूनियां संतमेळा । मध्यें सांवळा शोभत ॥२॥

एकला एकचि पुंडलिका । जोडी त्रैलोक्या पुरविली ॥३॥

निळा म्हणे न सरे तरी । अदयापि वरी तैसेंचि ॥४॥

३७१

सर्व काळ तुमच्या पदीं । मोक्ष मुक्ति रिध्दिसिध्दी ॥१॥

करिती भक्ताचे पाळण । जे जे ध्याती ह्रदयीं चरण ॥२॥

तुमच्या चरणातें चिंतित । वैकुंठ ते पूज्य होती ॥३॥

निळा म्हणे जगदोध्दारा । लागीं ते आले पुढरपुरा ॥४॥

३७२

अचळ धरा तैसें पीठ । पायातळीं मिरवे वीट ॥१॥

दोन्हीं पाउलें समान । जैसे योगीयाचे नयन ॥२॥

जानु जंघ ते स्वयंभ । जैसे कर्दळीचे स्तंभ ॥३॥

कसीयलें पीतवसन । झळके विधुल्लते समान ॥४॥

शेष बैसला वेटाळां । तैसा कटिबंध मेखळा ॥५॥

समुद्र खोलीये विशाळ । तैसें नाभीचें मंडळ ॥६॥

तुळसी मंजरिया गळां । जैशा सुटल्या मेघमाळा ॥७॥

दिग्गजाचे शुंडादंड । तैसे कटीं कर प्रचंड ॥८॥

पूर्णिमेचा उदो केला । तैसा मुखचंद्र शोभला ॥९॥

जैसीं नक्षत्रें झमकतीं । तैसी कुंडलें चमकतीं ॥१०॥

सूर्य मिरवे नभमंडळा । तैसा केशराचा टिळा ॥११॥

क्षीराब्धीचे चंचळ मीन । तैसें नेत्री अवलोकन ॥१२॥

जैसें मेरुचें शिखर । तैसा माथां मुगुट स्थिर ॥१३॥

इ्ंदु प्रकाशें वेढिला । तैसा क्षीरोदकें वेष्टिला ॥१४॥

तृप्तीलागीं चातकपक्षी । निळा तैसा ध्यान लक्षी ॥१५॥

३७३

महिमा याचा चतुर्मुखा । न करवेचि लेखा वर्णितां ॥१॥

सनकादिकाहि नित्य येती । पूजा करिती देवभक्ता ॥२॥

सुरवर आणि मुनिजन । संतसज्जन नित्य स्तविती ॥३॥

निळा म्हणे सकळही तीथें । होतीं कृतार्थ दर्शनें ॥४॥

३७४

चिमणें ठाण कटीं कर । मूर्ती सांवळी सकुमार ॥१॥

होय डोळियां पारणें । पाहतां दिसे राजसवाणें ॥२॥

जडोनि ठेले सनकादिक । चरणी ठेऊनियां मस्तक ॥३॥

निळा म्हणे ओवाळिती । संत:प्राणांचिया ज्योती ॥४॥

३७५

पुंडलीक पूजा करी । विधि षोडश उपचारी ॥१॥

देखोनियां त्याचा भावों । उभा वैकुंठीचा रावों ॥२॥

बुका अर्पीं तुळशीमाळा । केशर चंदनाचा टिळा ॥३॥

निळा म्हणे स्थिरावला । देखोनि भक्तांतें भुलला ॥४॥

३७६

जेणें पृथ्वीसीं धरीलें । सूर्या प्रकाश उटिलें । चंद्रबिंबीं अमृत ठेविलें । तेणें निववीत जगा तो ॥१॥

गगना पवाडू दिधला । मेरुस्तंभ उभारिला । गती पवनही उडविला । दाही दिशा फिरतसे ॥२॥

जेणें अग्नीसी दीपन । जीवनीं ठेविलें जीवन । आपोनिधी जळें पूर्ण । क्षीरें सागर भरियेला ॥३॥

नाना अन्नीं ठेविली तृप्ति । नाना परिमळ पुष्पयाती । नाना रसस्वाद फळाप्रति । एवढी युक्ती कोणाची ॥४॥

अपार चांदणे फुलोरा । जेणें शोभविलें अंबरा । पर्जन्याच्या करुनी धारा । जेणें  पिकविलें धरणीतें ॥५॥

जेणें इ्रद्रादिकां देवां । पदीं स्थापुनी वांटिल्या सेवा । जेणें मर्दुनी दैत्य दानवां । केला सांभाळ भक्तांचा ॥६॥

जो या प्राणातें चाळिता । जीवा जिवणें ज्याचिया सत्ता । मनीं संकल्पाचिया चळथा । उठवी सत्ता हे कोणा ॥७॥

जो या श्रुतीतें पढविता । परमामृमातें जीववीता । सूर्या अंजन लेवविता । अवधी सत्ता हे ज्याची ॥८॥

चराचर व्यापूनियां उरला । उभा विटेवरीं ठाकला । निळा म्हणे तेणें केला । बुध्दी माझीये प्रकाश ॥९॥

३७७

वोरसोनियां भक्तासाठीं । धांवे वैकुंठीहुनी उठाउठी । हात ठेऊनियां कटीं । उभा व्दारीं ठाकला ॥१॥

देखोनियां पुंडलिकासी । वास केला तयापाशीं । अवलोकूनियां निजभक्तांसी । परम विश्रांती पावला ॥२॥

जे जे येती दर्शनाशी ।  भुक्तिमुक्ति वांटी त्यांसी । गाती वानिती जे यासी । त्यां ने वैकुंठासी निज गजरें ॥३॥

नेघे त्यांची अतिशय सेवा । जिहीं आळविलें याचिया नांवा । धांवोनि त्यांचा करी कुडावा । आपुलिया गांवा ने त्यांसी । ॥४॥

न म्हणेचि दिवसरात्री काहीं । सदा भक्तांचिये वाहीं । निळा म्हणे त्यांच्याची देहीं । प्रगट नव्हे निराळा ॥५॥

३७८

विठ्ठल मूर्ति पाहतां दिठीं । पळती कोटी पापांच्या ॥१॥

मग तो आविर्भवे अंतरीं । दिसे बाहेरी चहूंकडे ॥२॥

दुजें येऊचिं नेदी आड । लपवी दुवाड मायाकृत ॥३॥

निळा म्हणे व्यापूनि दिशा । ठाके सरिसा दृष्टीपुढें ॥४॥

३७९

माझिये मनीं विश्रांती वाटे । देखतां गोमटे विटे चरण ॥१॥

तुळशीमाळा शोभल्या कंठी । प्रकाश मुगुटीं रत्नांचा ॥२॥

कुंडलांचे दीप्ती झळाळ । शोभलें निढळ बुक्यानें ॥३॥

निळा म्हणे अंगींचे कांति । सूर्यादि लोपती शशिमंडळें ॥४॥

३८०

योगी चिंतिती चिंतनीं । ध्यानीं मनीं रुप ज्याचें ॥१॥

तो हा अकल्पितचि आला । उभा केला पुंडलिकें ॥२॥

हतकमळीं चतुरानन । ज्यातें स्तवून पूचित ॥३॥

निळा म्हणे शिवहि चिंती । ज्यातें एकांती सर्वदा ॥४॥

३८१

भक्ता भाग्य घरां आलें । उभेंचि ठेले सन्मुख ॥१॥

म्हणे विठ्ठल  माझें नांव । सांगों गांव वैकुंठ ॥२॥

भेटावया तुम्हां आलों । निर्बुजलों वियोगें ॥३॥

निळा म्हणे पुंडलिका । भेटे सखा प्रीतीनें ॥४॥

३८२

संतसनकादिक देव । भेटावया आले सर्व ॥१॥

देवा भक्तांते पूजितीं । महिमा अदभुत तो वर्णिती ॥२॥

पावन केली पुंडलिकें । म्हणती नरनारी बाळकें ॥३॥

निळा ऐकोनियां वाणी । मिठी घालूं धांवे चरणीं ॥४॥

३८३

पाहिजे तें समयीं देणें । नेदितां उणें पडों कोठें ॥१॥

ऐसा कृपेचा सागर । रमावर श्रीविठ्ठल  ॥२॥

उपकार याचे आठवितां । न संडे चित्ता आनंद तो ॥३॥

निळा म्हणे भरोंसा झाला । संदेह फिटला मानसींचा ॥४॥

३८४

पांडुरंगा तुमची लिळा । विचित्र कळा जाणतीया ॥१॥

म्हणोनियां शरणांगत । देवहि अंकित ऋषि तुमचे ॥२॥

हत्कमळीं आराधिती । नित्य पूजिती दृढनिष्ठा ॥३॥

निळा म्हणे दर्शना येती । माना स्तविती स्तुतिवादें ॥४॥

३८५

दिव्य तेज मुसावलें । विठ्ठल चरणीं तें राहिलें ॥१॥

झालें डोळियां पारणें । तनुमना भुलवणें ॥२॥

देवा दर्शनाची शिराणी । वाणी न पुरेचि त्या वदनीं ॥३॥

निळा म्हणे चरण चुरी । रमा नित्य निंरतरी ॥४॥

३८६

ऐशी विठाई माउली । अनाथां कृपेची साउली ॥१॥

उभी असे निंरतर । ठेऊनियां कटीं कर ॥२॥

देउनी प्रेमाचें भातुकें । दासां अवलोकी कौतुके ॥३॥

निळा म्हणे महिमा इचा । वर्णिता कुंठित वेदवाचा  ॥४॥

३८७

माझा विठो नव्हेचि तैसा । उदारपणें ज्याचा ठसा ॥१॥

नामाचि एक स्मरल्यासाठी । गणिका बैसविली वैकुंठी ॥२॥

भ्रष्ट अजामेळ दोषी । स्मरतां नेला निजधामासीं ॥३॥

निळा म्हणे सुदामदेवा । देउनी स्थापिलें निजवैभवा ॥४॥

३८८

वसती पायापाशीं । रिध्दीसिध्दी मुक्ती दासी ॥१॥

तो हा उभा कटीं कर । राहीरुक्माईचा वर ॥२॥

भुक्तिमुक्ती दासी वांटी । दर्शनेंचि फुकासाठीं ॥३॥

निळा म्हणे चिंतिती मुनी । ज्यातें ध्यानीं अनुदिनीं ॥४॥

३८९

सगुण स्वरुप तुमचें हरी । शोभेलें ते विटेवरी ॥१॥

तेणें लागली टकमक । डोळियां नावडे आणिक ॥२॥

मनाबुध्दीसीही भुलीं । इंद्रियें गुंफोनि राहिलीं ॥३॥

निळा म्हणे तनुप्राण । गेलीं आपणा विसरोन ॥४॥

३९०

सुदर्शन धरिलें शिरीं । क्षेत्राभोंवतें फिरे वरी । जगदात्मा राज्य करी । पांडुरंग तेथींचे ॥१॥

शिव सांगे स्कंदाप्रती । पंचक्रोशीमाजीं वस्ती । कृमी कीटकादि जीवयाती । ते ते होती चतुर्भज ॥२॥

नरनारी तेथींचे जन । हरि सन्निध हरिची समान । नित्य करिती अवलोकन । प्रत्यक्ष रुप विष्णूचें ॥३॥

भूमंडळींचीं सकळ तीर्थे । होतीं चंद्रभागेसी सुस्नातें । माध्यान्हकाळीं येऊनि तेथें । करितीं मार्जनें नित्यानि ॥४॥

पुंडलिक मुनीश्वर । घेऊनी पूजेचें संभार । माता पिता आणि हरिहर । पूजी विठोबारायातें ॥५॥

जे जे प्राणी यात्रेसि येती । ते ते वैकुंठीचि वसती । प्रत्यक्ष श्रीहरीतें भेटती । पुन्हां न येती संसारा ॥६॥

सकळ देवांचे देवतार्चन । मुनिजनांचे ध्येय जे ध्यान । संत सनकादिकांचें जीवन । उभें असें विटेवरी ॥७॥

नाम स्मरतांचि पावन करी । दर्शनानेंचि पतीतासी उध्दरी । युगें गेलीं परी हा दुरी । नवजेचि भक्तापासुनि ॥८॥

देव भक्ततीर्थक्षेत्र । चारी सन्निध ऐसे विचित्र । पाहती याचे धन्य नेत्र । स्वयें पंचनवत्क्त्र अनुवादला ॥९॥

अगाध क्षेत्र हें पंढरपुर । सकळिक संतांचें माहेर । घर सोळा सहस्त्र अंत:पूर । सहित रुक्मिणी रहिवासली ॥१०॥

निळा म्हणे यात्रेसी येती । पुण्या त्यांचिया नाही मिती । पाउलां पाउलीं यज्ञाचि घडती । प्रत्यक्ष्‍ा भेटती परब्रम्हा ॥११॥

३९१

पाहा भूवैकुंठ पंढरी । धरिली सुदर्शनावरी ॥१॥

कैसा महिमा तो वर्णावा । जेथें वास विठ्ठल देवा ॥२॥

संतसनकादिक योगी । नित्य कीर्तन ठाकती ॥३॥

निळा म्हणे सात्विकजन । तरती पातकी पावन ॥४॥

३९२

पुष्पवतीच्या संगमीं । नारद मुनीच्या आश्रमीं ॥१॥

विष्णू आपण क्रीडा करी । उमटलि पदें गोजिरि ॥२॥

गाई गोपाळ संगती । वेणुवादनाची प्रीति ॥३॥

निळा म्हणे वाटी काला । आपण मध्यें अवघ्या मुला ॥४॥

३९३

सूर्य विटला प्रकाशासी । परि तो सांडितां नयेचि त्यासी ॥१॥

तेवीं हा पंढरीश परमात्मा । सांडूं नेणे आपला महिमा ॥२॥

अग्नि दीपना विटला । परि ते न सुटेचि कीं त्याला ॥३॥

निळा म्हणे साखरे गोडी । उदका आर्द्रता न सोडी ॥४॥

३९४

सुहास्य वदन तुटती तारें । पाउलें गोजिरीं विटेवरीं ॥१॥

कटावरीं ठेविले हात । आयुधें मंडित शंखचक्र ॥२॥

पीतांबर वेष्टीला कांसे । मेखळे ठसे जडिताचे ॥३॥

निळा म्हणे हदयावरी । पदक तमारि तेंवि झळकें ॥४॥

३९५

सर्व तीथें चहुं भागें । होती अंगे सुस्नात ॥१॥

देवा उभा म्हणोनि तीरीं । सरोवरीं महिमा हा ॥२॥

सकळतीर्था अधिष्ठान । विटे चरण शोभले ॥३॥

निळा म्हणे विठ्ठल  म्हणतां । सायुज्यता घर रिघे ॥४॥

३९६

विठ्ठल  केणें मागेंपुढें । पिकें उघडें सुरवाडिक ॥१॥

एक ते घेती देती एक । तरि हें अधिक् भरलेंसे ॥२॥

युगें गेलीं करितां माप । निगमाहि अमूप नये माना ॥३॥

निळा म्हणे भाविकांजोगें । झालें हें अनुरागें आवडीच्या ॥४॥

३९७

वेद शोधितां शिणले । मग ते मौनचि राहिलें ॥१॥

देखोनि निजात्मा निर्मळा । नेणती गोरा कीं सांवळा ॥२॥

हा हस्व दीर्घ नये माना । बाळावृध्द किंवा तरुणा ॥३॥

निळा म्हणे तो हा येथें । आला भेटों पुंडलिकातें ॥४॥

३९८

वसवूनियां चराचर । उभा नागर विटेवरी ॥१॥

सगुण रुपें भासे लोकां । परि हा नेटका निरामय ॥२॥

दैत्यांतकचि म्हणती यासी । परि हा सकळांसी भक्षक ॥३॥

भक्तांपाशी गुंतला दिसे । परि हा वसे अणुरेणीं ॥४॥

कर्ता भोक्ता वाटे सकळां । परि हा वेगळा अलिप्त ॥५॥

निळा म्हणे नयेचि मना । करितां विवंचना श्रुतिशास्त्रांसिही ॥६॥

३९९

भक्तकृपाळू माउली । कटीं कर उभी ठेली ॥१॥

मोहें पाहे मुखाकडे । भेटावया वाडें कोडें ॥२॥

परम प्रीतीचा वोरस । सदांसर्वदां उल्हास ॥३॥

निळा म्हणे सुप्रसन्न । भक्तांलागी हास्यवदन ॥४॥

४००

महर्षि सिध्द सनकादिक । संत ज्याचे उपासक ॥१॥

तो हा पुंडलिका भेटी । आला उतावेळ पोटीं ॥२॥

शिवाचिये ध्यानीं मनीं । योगी चिंचिती चिंतनी ॥३॥

निळा म्हणे रमा दासी । म्हणवी सेवूनियां चरणसी ॥४॥

४०१

ओंवाळिती विठोबासी । नित्यानित्य परमादरेसि ॥१॥

नवनिताचीं विलेपनें । पंचामृतें अभिषचनें ॥२॥

नाना उपभोग अर्पिती । नैवेदय माळा पुष्पयाती ॥३॥

निळा म्हणे नामघोषें । करिती आनंद उल्हासें ॥४॥

४०२

मूळ डाळ बीजीं अवघे शाखा पल्लव । फळीं पुष्पीं विस्तारला परि तेंचि सर्व ॥१॥

तैसा एक बीजरुप विटेवरी उभा । विश्वाकारें प्रगटला व्यापूनियां नभा ॥२॥

सर्वहि होऊनि देवो देवी आपणाचि सकळ । भूत व्यक्ति नाना वर्ण सूक्ष्म स्थूळ ॥३॥

निळां म्हणे एकाविण नाहीं दुसरें । एकीं एकपणही नुरे सेवटिलें मरे ॥४॥

४०३

उतरिला धराभार । जेणें घेऊनियां अवतार ॥१॥

तो हा भक्तें पुंडलिकें । गोंवियेला घेउनी भाकें ॥२॥

शिळीं बांधिला सागर । निर्दाळिला दशशीर ॥३॥

निळा म्हणे नारी । सोडवूनि राज्य करी ॥४॥

४०४

भक्त देखोनियां श्रीहरी । केला घरीं वास पुढें ॥१॥

म्हणे नवजे येथूनियां । युगें गेलियां कल्पकोटी ॥२॥

प्रसन्न झाले निजभक्तासी । म्हणती मुक्तीसी वांटीन येथें ॥३॥

निळा म्हणे कृपावंत । राहिले तिष्ठत मग उभे ॥४॥

४०५

उघडली सतेज खाणी । लावण्याची बरवेपणीं ॥१॥

विठो सुंदरा सुंदर । रुप नागर नागर ॥२॥

मुख अमृतकुपिका । पूर्णचंद्रउदयो लोका ॥३॥

निळा म्हणे कटीतटीं । मूर्ती साजिरी गोमटी ॥४॥

४०६

इंद्रादिकां देवां । पदीं स्थापुनी वाटी सेवा ॥१॥

तो हा येऊनि पंढरीयें । इटेवरीं उभा ठाये ॥२॥

चिंतिती चतुरानन । ईश्वराचें ध्येय जो ध्यान ॥३॥

निळा म्हणे ज्यातें गीती । सदा वेदश्रुती गाती ॥४॥

४०७

उपनिषदांच्या मतीं । ज्याच्या स्तुतिवादें घुमती ॥१॥

तो हा सुंदर नागर । इटे उभा कटींकर ॥२॥

रमा होऊनियां दासी । नित्य सेवीत चरणांसी ॥३॥

निळा म्हणे लीलाचि करी । ब्रम्हांडाच्या भरोवरी ॥४॥

४०८

उभा ठेला इटेवरीं । प्रभा दाटली अंबरीं ॥१॥

विठो कैवल्याचा गाभा । व्यापुनियां ठेला नभा ॥२॥

नेणती कुसरी । ब्रम्हादिक ज्याची थोरी ॥३॥

निळा म्हणे भक्तिसुखा । भुलोनियां आला देखा ॥४॥

४०९

एक जोडी बहुतें खाती । भाग्यवंत म्हणती जन त्यासी ॥१॥

परि त्या आणिक साहित्यासी । नव्हे तैसी जोडी याची ॥२॥

एकला एकचि पुंडलिका । जोडी त्रैलोक्या पुरविलीं ॥३॥

निळा म्हणे न सरे तरी । अदयापिवरी तैसेचि ॥४॥

४१०

मच्छ कूर्म वराह झाला । नृसिंह वामन होऊनि ठेला ॥१॥

तो हा विटे सौम्यरुप । कोटी कंदर्पाचा बाप ॥२॥

परशुराम कृतांत काळ । अयोध्यावासी नृप गोवळ ॥३॥

निळा म्हणे बौध्य कलंकी । होउनी वेगळा नाटकी ॥४॥

४११

आराधिला पुंडलिकें । जननी पुजुनियां जनकें ॥१॥

त्याच्या भावासी भुलला । भेटी धांवोनियां आला ॥२॥

सहस्त्रसोळा परिवारासीं । वस्ति केली तयापाशीं ॥३॥

निळा म्हणे पाचारिलें । देवसमुदाय आणिले ॥४॥

४१२

शोषिली पूतना । विषें भरुनी आली स्तनां ॥१॥

तो हा पुंडलिका व्दारीं । उभा परमात्मा श्रीहरी ॥२॥

कंस आणि जरासंध । जेणें मर्दिले मागध ॥३॥

निळा म्हणे फरशधारी । केली क्षत्रियां बोहरी ॥४॥

४१३

सुकाळ झाला नारीनरां । चराचरां मुक्तींचा ॥१॥

विठोबाच्या दर्शनमात्रें । ऐकतां श्रोतें गुण त्याचे ॥२॥

नित्य नवाचि उत्साह वाटे । ह्रदयीं न संडे आनंद तो ॥३॥

निळा म्हणे जगदोध्दारा । उपाय बरा योजिला हा ॥४॥

४१४

गाऊनियां आल्हर मुखें । निर्जी निजवी त्या सुखें ॥१॥

आवडी ते नीच नवीं । वस्त्रें अळंकार लेववी ॥२॥

माझे दिठावेल झणे । उतरी वरुनी निंबलोणें ॥३॥

निळा म्हणे आई । परत कृपाळू विठाई ॥४॥

४१५

भकतांलागीं पुढारला । येऊनी पुढें उभा ठेला ॥१॥

शीण भागही न विचारी । युगानुयुगीं विटेवरी ॥२॥

सोहळा आधिकें अधिक् । करीं भक्तांचे कौतुक ॥३॥

निळा म्हणे बहुमानें । संतां पूजी वांटी दानें ॥४॥

४१६

बरवी आजी हे जोडी झाली । तुमचीं पाउलें देखिलीं । अवघींच इंद्रियें निवालीं । आलिंगनीं तुमचिया ॥१॥

वदनीं आठवलें नाम । तुमचें सांपडलें प्रेम । बरवा साधला हा नेम । मनही विश्राम पावलें ॥२॥

बरवा पंढरपुरा गेलों । सत्सगें महाव्दारा पावलों । भीतरीं राउळां प्रवेशलों । बारवा भेटलों विठोबासी ॥३॥

तेणें पुरलें सर्वही काम । रुप डोळां वदनीं नाम । संतांचाही समागम । धणी धाय तो पावलों ॥४॥

निळा म्हणे सर्वांपरी । कृत्यकृत्य झालों हरी । तुमचा दास मी कामारी । ठेवा दारवंटा राखोन ॥५॥

४१७

केली कीर्ति अलोलिक । फुटली हाक त्रैलोक्यीं ॥१॥

दोषी दुराचारी जन । केले पावन दर्शनें ॥२॥

नामासाठीं मुक्ती फुका । हाही नेटका बडिवार ॥३॥

निळा म्हणे यात्रेसी येती । ते ते हाती कृतार्थ ॥४॥

४१८

पुंडलीक म्हणे हरी । राहे वरि विटे उभा ॥१॥

अवलोकिन वेळोवेळां श्रीमुख डोळां रुप तुझें ॥२॥

अलभ्य लाभ लक्ष कोटी । झाले भेटी दिली तुम्हा ॥३॥

निळा म्हणे मग पुंडलीक । करी पूर्वकविधी पूजा ॥४॥

४१९

प्रवेश राउळाभीतरीं । केला संतमुनीश्रवरीं ॥१॥

तंव तो घननीळ सांवळा । उभा विटेवरीं देखिला ॥२॥

कांसे मिरवे पीतांबर । विराजित कटीं कर ॥३॥

मुख सुहास्य चांगलें । केशर निढळी रेखिलें ॥४॥

अंग प्रत्यंगी भूषणें । दिव्यमाळा करकंकणे ॥५॥

निळा म्हणे संतभेटी । उता वेळ घली मिठी ॥६॥

४२०

भेटी गेला पुंडलिका हे सनकादिकां जाणवलें ॥१॥

मग ते धांवोनि आले । उभयतां भेटले देवभक्तां ॥२॥

करुनियां पूजाविधी । लागती पदीं स्वांनंदें ॥३॥

निळा म्हणे मंत्रांजुळी । वोपिती निढळीं दिव्य सुमनें ॥४॥

४२१

बिजापोटीं महा तरु । होता फाकंला तो थोरु ॥१॥

सविताबिंब दिसे सान । प्रकाशिलें त्रिभुचन ॥२॥

तेंवि विठ्ठल  विटेवरीं । भासे परि तो चराचरीं ॥३॥

निळा म्हणे जीवन जीवा ।  प्राण प्राण्यांचा आघवा ॥४॥

४२२

दर्शन याचें आदरें घेतां। ओपी सायुज्यता मुक्तीतें ॥१॥

न मानी कोणा साने थोर । दाता उदार जगदानी ॥२॥

शरणांगताचा आदरीं । वैषम्य अंतरी असेचिना ॥३॥

निळा म्हणे भावचि गांठीं । देखतां साठी करुं धांवे ॥४॥

४२३

गुण लावण्याची खाणी । विठोजी मुगुटमणी सकळांचा ॥१॥

जाणे अंतरींचा भाव । देवादिदेव पूजनीय ॥२॥

ब्रम्हादिक लागती पायीं । सुरपती तोहि आज्ञांकित ॥३॥

निळा म्हणे लागला भाग्यें । हातीं अनुरागें गीतीं गातां ॥४॥

४२४

तेथेंचि बैसलें । मन नुठी कांही केलें ॥१॥

विटेवरी विराजती । चरण तेचिं आठवती ॥२॥

कटीं कर तुळसीमाळा । ध्यानीं बैसला तो डोळां ॥३॥

निळा म्हणे भूकतहान । गेली विसरोनियां मन ॥४॥

४२५

गुण लावण्य संपत्ती । पांडुरंग बाळमूर्ती । सर्व सुखाची विश्रांती । चरणी लोळती महा सिध्दी ॥१॥

विटे पाउलें समान । कांसे क्षीराब्धी परिधान । हात कटावरी ठेवून । तुळशीसुमन वनमाळा ॥२॥

कटीं मेखळा कटिसूत्र । उदर नाभी तें पवित्र सांठवलें बीजमात्र । नाना लोकरचनेचें ॥३॥

ह्रदयीं श्रीवत्सलांछन । पदक एकाकळीं भूषण । मुख नासीक लोचन । निढळीं चंदन कस्तुरिक ॥४॥

मुगुटीं सूर्यप्रभा झळाळ । श्रवणीं कुंडलांचे ढाळ । नेत्रीं करुणेचे कल्लोळ । निववीत भक्तजनां ॥५॥

गरुड हनुमंत सन्मुख । मुख्य सेवेचे सेवक । विराजला पुंडलीक । चंद्रभागावाळुवंटी ॥६॥

निळा उभा कर जोडून । चरणांवरी ठेऊनियां मन । तयासी तृप्तीचें भोजन । नामसंजीवनी दिधली ॥७॥

४२६

गाय वत्सां देखतां दृष्टी । मोहें उठी पान्हा ये ॥१॥

चाटी तया देउनी धणी । भरी दुधाणी इतरांची ॥२॥

तैसाचि हा पंढरिनाथ । करीं सना‍थ निजवत्सा ॥३॥

निळा म्हणे दासासंगे । तारी जगें त्रिविध ॥४॥

४२७

ज्याचे मोक्षा मोक्षत्व देणें । मुक्तीसी स्थापणें मुक्तत्वीं ॥१॥

तो हा जगज्जनक मुरारी । उभा भीमातीरीं पंढरिये ॥२॥

जेणें शातिसी शांतीपद । दिधला आनंद आनंद ॥३॥

निळा म्हणे जेणें वेद । केला प्रबुध्द पढवूनी ॥४॥

४२८

देखतांचि विटेवरीं । समान पाउलें साजिरीं ॥१॥

माझें लांचावलें मन । नुठी बैसलें वरुन ॥२॥

न सुटे मुंगीयेसी गुळ । जेवीं भ्रमरा आमोद कमळ ॥३॥

निळा म्हणे तैसें झालें । मक्षिकें मोहळें गोविलें ॥४॥

४२९

ज्याची आस करिती लोक । देव सकळिक आणि ऋषि ॥१॥

तो हा येऊनि इटे उभा । राहिला लोभा भक्तीचिया ॥२॥

नित्य काळ सिध्द मुनी । ज्यातें चिंतनी चिंतिती ॥३॥

निळा म्हणे वैष्णव गाती । ज्यातें वर्णिती वेदशास्त्रें ॥४॥

४३०

देखतांचि ठसावलें । रुप ह्रदयीं हें चांगलें ॥१॥

विठो लावण्याची कळा । मूर्ति मदनाचा पुतळा ॥२॥

साळंकार उत्त्म लेणीं । विराजलीं बरवेपणीं ॥३॥

निळा म्हणे तनुमनदिठी । विगुंतली ते वरुनी नुठी ॥४॥

४३१

जडित मुद्रिका बाहुभूषणें । करीं कंकणे सुशोभितें ॥१॥

पितांबरे घातली कास । हेमरत्नास जिंकियलें ॥२॥

उभा ठेउनी कटावरी हात । दृष्टी न्याहाळित पुंडलिक ॥३॥

निळा म्हणे हरिघनसांवळा । कमळमाळा डोलती ॥४॥

४३२

चौदा भुवनें पोटीं । सकल तीर्थ ज्या अंगुष्ठी ॥१॥

तो हा देखियेला डोळां विठो घननीळसांवळा ॥२॥

जों जों दिसे दृश्यकार । तों तों जयाचा विस्तार ॥३॥

निळा म्हणे उत्पन्न होती । जीवे जेथें लता जाती ॥४॥

४३३

जेणें रचियेलें भूगोळा । एकवीस स्वगें लावुनी माळा ॥१॥

तो हा विटे उभा ठेला । भक्तें पुंडलिकें पूजिला ॥२॥

ज्याचे चरणींहूनि गंगा । उध्दरीत चाले जगा ॥३॥

निळा म्हणे गतिमति । माझी आहे ज्याचे हातीं ॥४॥

४३४

गोविलें इंद्रियां । पाय दिठी दावूनियां ॥१॥

ऐसा लाघवी नाटकी । चोर चैतन्य चेटकी ॥२॥

गुणीं गुणांचा वोतला । रुपाकृती उभा ठेला ॥३॥

निळा म्हणे पुंडलीकें । आणिला भुलवावया लोकें ॥४॥

४३५

देखतांचि विठ्ठल मूर्ति । झाली विश्रांति इंद्रियां ॥१॥

डोळे मुख निवाले कान । देतां आलिंगन हदयें भुजा ॥२॥

पाणी पाद टाळिया नृत्यें । वाणी त्रिसत्य कीर्तनें ॥३॥

निळा म्हणे जीवही धाला । सकळां फावला सुरवाड ॥४॥

४३६

चरणीं भागिरथी गंगा । जन्मली उध्दरी ते जगा ॥१॥

ब्रिदावळी रुळती भार । तळीं लोळती असुर ॥२॥

ध्वज वज्रांकित चिन्हें । विटेवरीं तें समानें ॥३॥

निळा  म्हणे ह्रदयीं धरिलें । सनकादिकीं पोटाळिलें ॥४॥

४३७

गुण वर्णितां भागला शेष । महिमा विशेष नाकळे तो ॥१॥

वेदहि ठकोनि ठेले मौन । पार नेणोन स्वरुपाचा ॥२॥

पुराणेंही कुंठित झालीं । अपार खोलीं नेणवे ते ॥३॥

निळा म्हणे तोचि हा येथें । आणिला समथें पुंडलिकें ॥४॥

४३८

दर्शना धांवोनियां जे येती । तयां मुक्ति वोळंगती ॥१॥

ऐसे जोडूनि ठेविलें । युगायगीं उभें केलें ॥२॥

हत्कमळी ब्रम्हदिक । ज्यातें पूजिती सनकादिक ॥३॥

निळा म्हणे कीर्तिघोष । न संडे त्रैलोक्यीं उल्हास ॥४॥

४३९

घोकउनी वेदा । जेणें आणियेले बोध ॥१॥

तो हा पंढरपुरनिवासी । नित्य उभा भक्तांपासी ॥२॥

सूर्या अंगी कांती । ज्याच्या प्रकाशाची दीप्ती ॥३॥

निळा म्हणे दिेलें । चंद्रासी अमृतेंचे भरिलें ॥४॥

४४०

मुसावलें मुसें । प्रेम भक्तांचे वोरसे ॥१॥

धरुनियां विठ्ठल रुप । विटे ठाकले विद्रूप ॥२॥

सांवळे सुंदर । कसूनियां पीतांबर ॥३॥

निळा म्हणे पदकें गळां । वैजयंती सुमनमाळा ॥४॥

४४१

तिहीं लोकां जें दुर्लभ । होतें निक्षेपिलें स्वयंभ ॥१॥

वेदराय सनकादिकीं । पोटाळूनियां एकाएकीं ॥२॥

तेंचि मुळींचे भांडवल । नांव पावलें विठ्ठल  ॥३॥

निळा म्हणे विटेवरीं । ठेविलें पुंडलिकें तें व्दारीं ॥४॥

४४२

म्हणती ज्यातें परात्पर । तो हा उभा कटीं कर ॥१॥

रुपें गोजिरा सगुण । अवलोकितां निवे मन ॥२॥

मुगुट कुंडले मेखळा । कांसे मिरवे सोनसळा ॥३॥

निळा म्हणे संतभेटी । उतावेळ सदा पोटीं ॥४॥

४४३

देखिलीं तीं विटेवरी । समान पाऊलें गोजिरीं ॥१॥

माझे राहिलीं मानसीं । सर्वकाळ अहर्निशीं ॥२॥

मुनिजनांचीं मानसें । रंगलीं जेथें सावकाशें ॥३॥

निळा म्हणे योगीजन । ज्यातें बैसले पोटाळून ॥४॥

४४४

ज्याचें करुनियां चिंतन । संत चरणी होती लीन ॥१॥

तो हा चंद्रभागे तीरीं । ठेउनी हात कटांवरी ॥२॥

उभा राहिला तिष्ठत । वाट भक्तांची पहात ॥३॥

निळा म्हणे मुनिजनां । ज्याची नित्य उपासना ॥४॥

४४५

नाना मतमतांतरें । वेद सुस्वरें स्तविती ज्या ॥१॥

तो हा येउनी पंढरिसी । भक्तांपाशी तिष्ठतु ॥२॥

जयालागीं आराधनें । योगयागांची साधनें ॥३॥

निळा म्हणे कथा कीर्ति । जया रुचे सत्संगती ॥४॥

४४६

नाना अवतार धरिले जेणें । दैत्यांसी उणें आणियेलें ॥१॥

तो हा संताचिये भारी । उभा तीरीं चंद्रभागे ॥२॥

तुळशीपत्र बुका मागे । धन वित न लगे म्हणतसे ॥३॥

निळा म्हणे अंतरीचा । भव साचा ओळखें ॥४॥

४४७

नाना तर्के विचार केला । शेखीं राहिला नेणवेचि ॥१॥

तें हें निर्गुण निराभास । झालें रुपस विटेवरीं ॥२॥

वेद पुराणें नाना शास्त्रें । शिणली वक्त्रें वनितां ॥३॥

निळा म्हणे भक्तांसाठीं । उभा कर कटीं राहिला ॥४॥

४४८

जें जें करिती तें तें वृथा । पंढरिनाथा न भजतां ॥१॥

दिसे पुढें परी तें माया । जाइल विलया क्षणमात्रें ॥२॥

पुत्र पत्नी बंधु पशु । भासे अभासु परि मिथ्या ॥३॥

निळा म्हणे वित्त गोत । नेणसी नाशवंत हें सकळ ॥४॥

४४९

जेणें आणियेली क्षिती । रसातळींहुनी वरती ॥१॥

तो हा उभा कृपावंत । ठेवुनी कटांवरीं हात ॥२॥

ज्याचे नाभीकमळींहून । जन्म पावे चतुरानन ॥३॥

निळा म्हणे कमळा नारी । ज्याचे चरणी वास करीं ॥४॥

४५०

नित्य निरामय सागरीं । मथन करुनी विचारशूरीं ॥१॥

कढिला नवनींताचा गोळा । तो हा विटेवरी सांवळा ॥२॥

जया तया लागे गोड । हरी क्षुघा अवघी चाड ॥३॥

निळा म्हणे दैवें हातीं । लागला जिहीं गाइला गीतीं ॥४॥

४५१

निरोप मागावया संत । आले राउळा समसत ॥१॥

चरणीं ठेऊनियां माथा । विनविती पंढरिनाथा ॥२॥

म्हणती कृपा असों दयावी । उपेक्षा आमपची न करावी ॥३॥

निळा म्हणे पंढरीनाथा । वियोग न साहे सर्वथा ॥४॥

४५२

नेऊनियां बळी । जेणें घातला पाताळीं ॥१॥

तो हा देवांचाहि देवो । विटे उभा ठेवूनी पावो ॥२॥

शेषाचे शयनीं । होता निद्रित अनुदिनीं ॥३॥

निळा म्हणे करी । मंथन क्षीराचे सागरीं ॥४॥

४५३

निर्गुण निरामय संचले । गुणीतीत रुपा आलें । परात्पर तें सगुण झालें । उभें ठाकलें विटेवरी ॥१॥

कोटी कंदर्पाच्या दीप्ति । विराजली अंगकांति । गुणलावण्याची संपत्ती । विठ्ठल मूर्ति गोजिरी ॥२॥

पहातांचि प्रवेशे अंतरीं । मेनीं मनातें मोहरी । चित्तीं चैतन्यातें भरी । देहभावा उरी उरों नेदी ॥३॥

जीवाचें हरुनियां जीवपण । नेदी उरो मीतूंपण । वंदितांचि याचे चरण । करी बोळवण अहंकारा ॥४॥

निळा म्हणे भक्तपती । आला पुंडलिकाचिये आर्ती । अवघीं जाणतीं नेणतीं । केली सरतीं पायांपें ॥५॥

४५४

पुजूनियां पुंडलिकें । चरण अवलोकिले निके ॥१॥

तोहि जाणतो महिमान । ह्रदयीं कवळिलें म्हणवून ॥२॥

शेष जाणे शयन झाला । पद्मे उमटलीं तो शोभला ॥३॥

निळा म्हणे कुरवाळितां । कमळा पावली अर्घांगता ॥४॥

४५५

कणचि आले हे घनदाट । कणिसें ताट नाढळे ॥१॥

लुंगी भुस नाही कोंडा । पीक बहमांडा न समाये ॥२॥

सनकादिकां आणि देवां । पुरेसें मानवां प्राणिमात्रां ॥३॥

निळा म्हणे तिहीं लोकां । पुंडलिकें केला सुकाळ ॥४॥

४५६

पांडुरंगा न पाहती । ज्ञान गाडेवर बोलती ॥१॥

त्यांचे न व्हावें दर्शन । दूवा दूषिती म्हणऊन ॥२॥

नायकावें त्यांचे बोल । विठ्ठल  कृपेंविण फोल ॥३॥

निळा म्हणे करितीं कथा । अवघी पोकळ त्यांची वृथा ॥४॥

४५७

भवसिंधु तरावया । भजावें राया पंढरीच्या ॥१॥

करील तोचि तरणोपावों । दाविल ठावे निजाचा ॥२॥

जेथें वाजतां न लगे वारा । दिशा अंबरा शिवों नेदी ॥३॥

निळा म्हणे ऐसिये घरीं । निजविल वोंवरी पर्यकीं ॥४॥

४५८

मुगुट कुंडलें वनमाळा । केशर कस्तुरीचा टिळा ॥१॥

विठो देखिला म्यां दिठीं । अंगीं चंदनाची उटी ॥२॥

जडित कंकणें मुद्रिका । कांसे पितांबर नेटका ॥३॥

कटीं मेखळा विराजे । वाकी किंकणी तोडर गाजे ॥४॥

मुखलावण्याची खाणी । जैसा चंद्र पूर्णपणीं ॥५॥

निळा म्हणे कटीं कर । अंगकाति मनोहर ॥६॥

४५९

माथां मोरपिसें कुंडलें गोमटीं । कस्तुरी लल्लाटीं रेखिली दिसे ॥१॥

ह्रदयीं निकेतन श्रीवत्सलांछन । मूर्ती विराजमान शंख चक्र ॥२॥

कटांवरी कर उभा विटेवरीं । भोंवतालें फेरी संतजन ॥३॥

निळा म्हणे तेंचि कळासलें मनीं । देखिलें लोचनी ध्यान जैसें ॥४॥

४६०

अष्टहि दिग्गज आणि दिकपाळ । थावरिले कुळाचळ निज सत्ता ॥१॥

तो हा परमात्मा श्रीहरी । येऊनि इटेवरीं ठाकला ॥२॥

जेणें सागर सप्तामृतीं । भरिले उचंबळती सर्वदा ॥३॥

निळा म्हणे ज्याचेनी रवी । नित्य नवा मिरवी प्रकाश ॥४॥

४६१

मिरवी अंगीं अवतार लेणीं । विराजित कीर्ति भूषणीं । मुगुट कंडले कोटी तरणीं । तैसे तेज बंबाळ ॥१॥

कंठी शोभ्ला कौस्तुभमणि । पदकीं चरित्र रत्नाच्या खेवणीं । बाहुभूषणें दिव्याभरणीं । जडित कंकणेसुशोभित ॥२॥

भक्तस्तवनाच्या सुमनमाळा । वेदमर्यादा कटीं मेखळा । शास्त्रे वसनें सोनसळा । पुराणें ठसे उमटले ॥३॥

शंख चक्र पद्म गदा । शोभल्या भुजा त्या सायुधा । असुरमर्दनी झळकती सदा । मोक्षदानी वैरियां ॥४॥

संतसनकादिक उदरवासी । भरला आनंद सावकासी । नाभिकमळ प्रजापतीसी । ठाव दिधला अखंड ॥५॥

लक्ष्मी अर्धागीं विराजली । चरण सेवितां निमग्न झाली । तोडर दानवांचा शिसाळीं । वामनचरणीं रुळतसे ॥६॥

गगां वामांगुष्ठिहुनी । जन्मली उध्दरावया अवनी । महादोषांची करीत धुनी । चालिली पूर्व समुद्रा ॥७॥

सकळ देवांचे समुदाये । सिध्दही येती वंदिती पाये । नारद कीर्तनीं उभा ठाये । नृत्य करी स्वानंदें ॥८॥

निळा म्हणे उदार ऐसा । भक्तचकोरा चंद्रमा जैसा । पुंडिलिकाच्या भावासारिसा । विटे उभा ठाकला ॥९॥

४६२

आरुपीं रुपाचा विस्तार । अगुणीं गुणांचा श्रृंगार । अनामीं नामांचा बडिवार । सहस्त्रावरी विराजला ॥१॥

नाहीं अवतारा मर्यादा । अपार गुणांची संपदा । केलीं चरित्रें सच्चिदानंदा । कोण वर्णितां पुरेल ॥२॥

वृध्द तरुण नव्हती मुग्ध । सूक्ष्म स्थूळ ना अगाध । तरंग सागरींचे बुदबुद । नाहीं गणना त्यां जैशीं ॥३॥

अनंतरुपा मधुसूदना । जगत्रयव्यापका जनार्दना । योगिमानसमनोरंजना । अहो निधाना सुखमूर्ति ॥४॥

मुख मंडित सुंदर कर । कटी विराजले सुकुमार । चरणीं ब्रीदाचा तोडर । रुळती असुर तया तळीं ॥५॥

संत गर्जती स्वानंदें । कीर्त करिती ब्रम्हानंदे । नित्य करिती नाना छंदें । पढती ब्रिदें सुस्वरे ॥६॥

निळा म्हणे तया सुखा । नाहीं पार नव्हे लेखा । समाधि लागे सनकादिकां । तो सोहळा देखोनी ॥७॥

४६३

ध्यान राहिलें मानसीं । सर्वकाळ दिवानिशीं ॥१॥

जेणें धरिले कटीं कर । रुपें सांवळा सुकुमार ॥२॥

न पुरे डोळियांची धणी । कीर्ति ऐकतां‍हि श्रवणीं ॥३॥

निळा म्हणे लांचावली । वृत्ति तेथेंचि गुंतली ॥४॥

४६४

अर्चूनियां पुंडलिका । विश्वाव्यापका राहविलें ॥१॥

थोर उपकार केला लोकां । भक्ता भविकां तारियेलें ॥२॥

आणूनियां वैकुंठवासी । सुगुण रुपेंसी भेटविला ॥३॥

निळा म्हणे ब्रम्हादिक । देवही सकळिक मानवलें ॥४॥

४६५

तापत्रयाचेंहि हरण । ते हे गोजिरे श्रीचरण ॥१॥

आले पुंडलिकाचिये भेटी । ठेले विटेच्या नेहटीं ॥२॥

सकळहि सामुद्रिका ओंळी । शोभती उभय पादतळीं ॥३॥

निळा म्हणे ज्यातें ध्याती । देवत्रयादि ऋषीपंगती ॥४॥

४६६

तमाळशाम रुप मंडित । कटीं मिरवत करांबुजें ॥१॥

पाहतां धणी न पुरे मना । न संडे नयना निजानंद ॥२॥

सर्वहि भूषणें सर्वांगभरी । मनोहरी सुशोभित ॥३॥

निळा म्हणे रुक्मिणी वामीं । त्रैलोक्यस्वामी श्रीविठ्ठल  ॥४॥

४६७

टाळ विणे मृदेंगेसी । येती गजरेंसी मिरवत ॥१॥

छबिने पताका गरुडटके । घेउनी हरिखें अवलोकिती ॥२॥

म्हणती जन्म सुफळ झाला । आजीं देखिला परत्पर ॥३॥

निळा म्हणे विठ्ठल  हरी । लेवूनी अंतरीं सुखावती ॥४॥


web

संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | संत निळोबाराय पंढरीमहात्म्य व पांडुरंगाचें वर्णन ।

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *