ऐसे बैसला रथावरी – संत निळोबाराय अभंग – १४७
ऐसे बैसला रथावरी ।
भोंवते गोवळ चालती फेरी ।
हें देखोनियां नगर नारी ।
अत्यंत प्राण विकल त्यांचे ॥१॥
आतां कृष्णा येसील केव्हां ।
भेटसील प्राण शितळ तेव्हां ।
आठव आमुचाहि धरावा ।
तेथें पाहुणेरी गुंततां ॥२॥
ऐकोनियां त्यांचीं वचनें संतोशीजे उभयतां मनें ।
मग त्या देउनी आश्वास नें ।
आज्ञा करिती ते अक्रूरा ॥३॥
आतां रथ चालवीं वेगीं विलंब नव्हे ऐसा मार्गी ।
माता पिता गौळणी लागीं ।
रहाविलें अत्यादरें ॥४॥
मार्गी चालतां परम संतोषी ।
करिती संवाद येरेयेरांसी ।
म्हणती धरिलिया अवतारासी ।
आजि झालें सार्थक ॥५॥
होतां मामासवें भेटी ।
पडेल जिवें जीवा गांठी ।
परमानंद होईल सृष्टी ।
दृष्ट कंटक निमालिया ॥६॥
निळा म्हणे ऐसिया लाभा ।
उभयतांहि अंगीं शौर्यशोभा ।
दाटली तेणें ऐश्रवर्य शोभा ।
जातासे हें अक्रूरा जाणवलें ॥७॥