संत निळोबाराय अभंग

चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया – संत निळोबाराय अभंग – 1569

चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया । शीघ बैसोनियां ॥१॥

तंव ते तिन्ही देव बाळमूर्ती धारी । मुक्ताई खेचरी आदिमाया ॥२॥

बाळक्रीडालीळें होतीं भिंतीवरी । बैसलीं सूर्यकरीं उष्ण घेत ॥३॥

तंव ते पातले वार्तिक व्दिजवर । करिती नमस्कार विनीतता ॥४॥

सिध्द आले भेटी चांगदेव समर्थ । सांगती वृतांत साष्टांगेसी ॥५॥

ऐकोनि चांगदेव आले भेटावया । उल्हासल्या बाह्या आलिंगना ॥६॥

जावें सामोरें निवृत्तिनाथ बोलती । तंव ज्ञानदेवा चित्तीं विस्मय वाटे ॥७॥

सर्वांतरवासी स्वामी सर्वगत । नभीं नभ सतत जयापरी ॥८॥

सन्मुख विन्मुख सूर्य कोणाकडे । आज्ञेचे बागडे नाचवीत ॥९॥

जेथें जावें तेथें भरुनि उरलेती । सर्वांतरी वस्ती तुमची स्वामी ॥१०॥

मग हंसूनि तयासी म्हणती निवृत्तीनाथ । वदलासी यथार्थ सिध्दांत तूं ॥११॥

परी येथें सगुणें भेटावें । निर्गणीं तो अवघें शुन्याकार ॥१२॥

व्दैतयोग घडे निजसुखाची वृध्दी । अभेदी तो सिध्दी आपेंआप ॥१३॥

आणखी एक गुज ऐकें ज्ञानसिंधू । इंद्राचा हा बंधु मरुदगण ॥१४॥

पुत्र कश्यपाचा उदरीं दितीचा । जन्म झाला याचा पूर्वजन्मीं ॥१५॥

मातेनें याचिये मागीतला वर । व्हाव राज्यधर पुत्र माझा ॥१६॥

तोचि भोगावया आला हा वैभव । पारमार्थिक सर्व लेउनी लेणीं ॥१७॥

इंद्रादिकां पूज्य व्हावी ऐसी बुध्दि । विदयायोग रिध्दी वरेंदु हा ॥१८॥

स्वर्गवासी आला वरदें मृत्युलोका । विदयांचा आवांका सर्व अंगी ॥१९॥

चतुर्वेद वक्ता षडषास्त्रीं संपन्न । अष्टादश पुराणें मुखोदगत ॥२०॥

चतुर्वेद विदया कळा ही चौसष्टि । मंत्र सप्तकोटी विधी ज्याचे ॥२१॥

स्थान मान कळा जाणे योगसिध्दी । अष्टादषौषधी रसायनें ॥२२॥

जडया बुडवा जाणे रोगाच्या परीक्षा । पंचाक्षरी शिक्षा करीत भूतां ॥२३॥

मणी मंत्र सिध्दी तोटके वेधका । साधका बाधका विदया जाणे ॥२४॥

चतुर हरिभक्त चौदाशे वर्षांच । बहुविदया सिध्दाच्या सिध्दजनीं ॥२५॥

आर्तभूत आले भेटी लवलाहो । उचित हें आहे सामोर या ॥२६॥

णती ज्ञानदेव चलावेंजि प्राज्ञा । भिंतीशी केल आज्ञा चला म्हणे ॥२७॥

निर्जिव चाले भिंती देखे विश्वजन । धांवती ब्रम्हण पुढें सांगों ॥२८॥

तों येती चांगदेव वादयांच्या गजरीं । आरुढोनि गजावरी चवरडोली ॥२९॥

तंव सांगती वार्तिक महासिध्द आले । भिंती आळंघले चालविती ॥३०॥

ऐकूनि चांगया गलितपत्र झाला । लोटांगणी आला गडबडां ॥३१॥

घाली दंडवत उभा ठाके पाहे । भिंती चालताहे गजगती ॥३२॥

तेज सूर्यापरी चौघे भिंतीवरी । देखोनियां करी नमस्कार ॥३३॥

ऐसे शतवरी संख्या नमस्कार जाले । तंव ते पातले जवळीके ॥३४॥

विनीत चांगया देखियेली स्थिती । उतरले क्षितीं भेटावया ॥३५॥

जाली भेटी तोचि विश्रांतीचा वट । छाया घनदाट बैसावया ॥३६॥

प्रीतीच्या पडिभरें पडिलें आलिंगन । परम समाधान उभयतां ॥३७॥

आलिंगनिमिसें हदगत आपुलें । सुख निक्षेपिलें ह्रदयीं त्याच्या ॥३८॥

चांगदेवा कृपादृकष्टी अवलोकीलें । अमृताचें झालें मार्जन त्या ॥३९॥

नेणों काय केलें ह्रदयीं क्षेम देतां । विश्रवीं एकात्मता ठसावली ॥४०॥

तुटलें बिरडें पुढें जन्मावळी । मागें झाली होळी संचिताची ॥४१॥

सकळ जनयात्रा दंडाचिये परी । जैसी महीवरी पडली वस्त्रे ॥४२॥

देखोनियां भाव देव कृपामूर्ती । आलिंगन देती लहान थोरां ॥४३॥

देवासी सारिखी आले शरणागतें । दुबळी समथें उंचनिचें ॥४४॥

अनन्याचा भाव जाणती हदगत । करिती त्या सनाथ दर्शनमात्रें ॥४५॥

सकळ विश्व जन यात्रा समुदाय । आलिंगिले बाह्या पसरुनियां ॥४६॥

आनंद पिकला सिध्दाचिये भेटी अमृताचि वृष्टि अनिवार ॥४७॥

विश्रांतीसी सुख आलें जया ठाया । रुळवि त्या पायावी निढळें ॥४८॥

गर्जती आनंदे नामाच्या गजरीं । घोष तो अंबरीं न समाये ॥४९॥

नाचती नाचणी संगीत कूसरी । राग सप्तस्वरीं आळविती ॥५०॥

वाजविती वादयें करिती सोहळा । समर्पिती कळा अभ्यासिल्या ॥५१॥

सिध्दाच्या चरित्रें गर्जती पवाडे । नाचती सुरवाडे आनंदाच्या ॥५२॥

ऐसे आले अळंकापुरी इंद्रायणीतीरा । ब्रम्हानंद नरनारी लोकां ॥५३॥

म्हणती चांगदेव महा लाभ झाला । हा सद्गुरु भेटला कृपामूर्ती ॥५४॥

विधियुक्त पूजा षोडशोपचारीं । समर्पिली शिरीं पुष्पांजुळी ॥५५॥

पतित पतित तारावें पतीता । चांगा विनितता शरण आला ॥५६॥

वरदहस्त आतां मस्तकीं ठेवावा । चांगा म्हणवावा शिष्यवर्ग ॥५७॥

मग श्रीनिवृत्तीनाथें कृपेच्या सागरें । आणि ज्ञानेश्वरें सोपानदेवें ॥५८॥

निरविला चांगा मुक्ताबाईप्रती । यासी करा प्रतीत आत्मज्ञानी ॥५९॥

चांगदेवें चरणी न्यासिला मस्तक । मुक्ताबाई हस्त ठेवी माथा ॥६०॥

न कळे ब्रम्हादिकां सद्गुरुची हतवटी । कला उठाउठी निजबोध ॥६१॥

स्वरुपीं अढळ ठेली चित्तवृत्ती । इंद्रियां विश्रांति तेणें सुखें ॥६२॥

न लाविची मुद्रा कष्ट नाहीं अंगी । केला राजयोगी जिवन्मुक्त ॥६३॥

लेवविला सर्वांगी पासष्टीचा अर्थ । होऊनि कृतार्थ ठेला पायीं ॥६४॥

चांगदेव म्हणे आजिची जन्मलों । गुरुपुत्र झालों मुक्ताईचा ॥६५॥

मागील चौदाशे झाली जन्मांतरे । आजी जन्म खरें सार्थकाचें ॥६६॥

मीचि मज भासे विश्वातें वसविता । हें सद्गुरु वचनें आतां प्रतीती आलें ॥६७॥

धन्य हा सद्गुरु निवृत्ति ज्ञानेश्वरु । सोपान मुनेश्वरु मुक्ताबाई ॥६८॥

दर्शनेंचि यांच्या सवरुप साक्षात्कारु । चांगा वटेश्वरु सुखी केला ॥६९॥

मग केशवदास चांगा म्हणती ज्ञानेश्वर । तुज असो बडिवार नामाचा या ॥७०॥

हा एकोनि उत्साह सकळ प्रांतवासी । आले दर्शनासी परिवारे ॥७१॥

म्हणती सिध्द भेटी आले चांगदेव । अगणित वैभव घेऊनियां ॥७२॥

सकळ वर्ण आले पहावया चरित्र । पंचक्रोशी क्षेत्र न पुरे ठावो ॥७३॥

व्यवसायी जन आले घेऊनि सौदे माल । होईल उकल म्हणती येथें ॥७४॥

साधिले बाजार मांडिलें दुकान । पहिले तो वाण सिध्द आहे ॥७५॥

म्हणती चांगदेव करावें पूजन । दयावें निमंत्रण सर्व यात्रे ॥७६॥

त्रिलक्ष भोजनाची अइत सारिली । पूजा आरंभिली सद्गुरुची ॥७७॥

उभय तीरी दिले मंडप अपार । शोभे गंगातीर इंद्रायणी ॥७८॥

सकळ यात्रा आणि ज क्षेत्रवासी । यावें भोजनासी प्रार्थियेले ॥७९॥

नरनारीं बाळें अवघीं लहानथोरें । प्रार्थिलीं आदरें प्रसादासी ॥८०॥

भगवदभुती दयावें सर्व भुतीं अन्न ।  हेंचि मुख्य पूजन सद्गुरुचें ॥८१॥

आरभिले पाक अन्नें नानापरी । शाखा कोशिंबिरी चिरयेल्या ॥८२॥

शर्करा मिश्रीत सघृत पक्कानें । षडस दिव्यान्नें सिध्द केलीं ॥८३॥

मग षोडशोपचारें पूजेस आरंभ । वेदघोषें नभ गर्जिन्नलें ॥८४॥

सिदोपंत गिरिजाबाईचें पूजन । करुनि स्तवन बहुत केलं ॥८५॥

तुमचिये कुळीं हे विश्वाचे तारक । उपजलें बाळक महासिध्द ॥८६॥

समर्पिली पूजा वस्त्रें अळंकार । संपदा अपार वोपियेली ॥८७॥

सिध्दाचें पूजन आरंभिले वोजा । मेळवूनियां व्दिजां व्युत्पन्नांसी ॥८८॥

निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई । पूजेची नवाई विश्व देखे ॥८९॥

रत्नजडित चौक्या बैसविले वरी । अर्घ्यपादयादि उपचारी पंचामृतें ॥९०॥

शतसहस्त्र विप्र भोंवताले फेरी । अभिषेक पात्रें करीं धरिलीं व्दिजीं ॥९१॥

महारुद्र आरंभ उपन्यास । अंबर मंत्रघोषं दुमदुमीत ॥९२॥

मंगळ उतुरे नाना वादयांचा गजर । घोषें अवलोकिती चरण दृष्टी ॥९५॥

नानापरिमळ द्रव्यें गंधाक्षता माळा । जडित पदकें गळां समर्पिली ॥९५॥

सुवर्ण तंतु वस्त्रें मुकुटादि अलंकार । लेववीले परीकर चांगदेवें ॥९६॥

मुद्रिका भूषणें जडितांचि कुंडलें कटी सूत्र सुदले वाळे वाकीं ॥९७॥

नाना सुमन हार घालूनियां कंठी  । अवलोकुनी दृष्टी भरुनियां ॥९८॥

विसन्न चांगया जाणे विधी मार्ग । पूजा केली सांग उपचारेशीं ॥९९॥

पूजेचे आसनीं विराजल्या मूर्ती । झाली धुपारती आरतीया ॥१००॥

सुवर्ण दक्षिणा गौदाना दिधली । पूजा सांग केली सद्गुरुची ॥१॥

पहाती लोचनी नरनारी बाळें । आणि नाचती कल्लोळें प्रेमाचिया ॥२॥

जवादी कस्तुरी बुक्याचे धुसर । उघळती अपार देवावरी ॥३॥

नैवेदय पुष्पांजली केल्या प्रदक्षिणा । सकळां ब्राम्हणां पूजीयेले ॥४॥

हरिभक्त वैष्णव पूजिले आदरें । वादयें मंगळतुरे घोष ध्वनि ॥५॥

व्यवसायी जन यात्रा पूजीयेले क्षेत्रवासी । दिधलीं सवसिणीसीं हळदी कुंके ॥६॥

चांगदेवें मग पोटया सुंदर जानु जंघा ॥८॥

उदर त्रिवळी प्रशस्त वक्षस्थळा । शोभली निर्मळ उटी अंगी ॥९॥

सरळ भुजादंड तुळशीपत्रें माळा । नानापुष्पें गळां डोल देती ॥१०॥

हनुवटी चुबुका दंत हिरीया जाती  । दुबाही पंगति विराजली ॥११॥

नासिक सरळ उन्मलीत नेत्रकमळ । शोभल्या कळाळीं गंधाक्षता ॥१२॥

जावळ कुरळमंडीत मस्तक । पूजा ब्रम्हादिक समर्पिती ॥१३॥

मुक्ताई मुक्तरुप मुक्तीची चित्कळा । नित्य मुक्तलीळा दावी अंगी ॥१४॥

अर्ध्यापादयादिक वेदाच्या सुस्वरी चांगदेव करी ध्यान पूजा ॥१५॥

धन्य तो दिवस नैवेदय अर्पिला पुष्पांजुली केला प्रणीपाता ॥१६॥

पूजिले ब्राम्हण विधी अपचारें । हरिभक्त आदरें यथोचित्ता ॥१७॥

बैसविल्या पंगती इंद्रायणी तीरीं । पात्री नानापरी विस्तारिल्या ॥१८॥

दिव्यान्नें परवडी अन्नशुध्दी वाढिली । मंत्रे प्रोक्षीयेलीं त्रिपदेच्या ॥१९॥

सोडिला संकल्प झालों निर्विकल्प । निराशिलें पाप संदेहाचें ॥२०॥

तदर्पण केलें ज्ञानेश्वर नामें । भोजनें संभ्रमें सारियेलीं ॥२१॥

एक एक शीत व्दिजमुखीं अर्पिता । शतक्रतू भोक्ता नारायण ॥२२॥

ऐसा ये क्षेत्रींचा अदभुत महिमा । वर्णी निरुपमा चांगदेव ॥२३॥

मग समर्पिले विडे दक्षिणा उपचारीं । चांगदेव करी नमस्कार ॥२४॥

मंत्राक्षता व्दिजीं अर्पियेल्या शिरीं । राहो कल्पवरी क्षेत्र महिमा ॥२५॥

मग बैसवोनि पंगती परिवार आपुला । शेष प्रसाद घेतला चांगदेवें ॥२६॥

अदभुत सोहळा हरीचीं कीर्तनें । वांटियेलीं धनें याचकांसी ॥२७॥

सकळांसी तृप्ती याचेनि दर्शनें । करीती स्तवनें नारीनर ॥२८॥

प्रत्यक्ष पंढरी ते हे अळंकापूर । मुक्तीचें माहेर उपासका ॥२९॥

निर्विकार जन सकळ क्षेत्रवासी । पूजिती सिध्दांसि नित्यकाळ ॥३०॥

धन्य पंचक्रोशी धन्य क्षेत्रवासी । धन्य जे यात्रेसी येती लोक ॥३१॥

ऐसा चांगदेवें स्तुतीवाद केला । आणि मस्तक ठेविला चरणांवरी ॥३२॥

याचि जन्में बहुत जन्मा निवारीलें । वंदितां पाउलें सद्गुरुचीं ॥३३॥

बहुतेक विदयांचे बहु गुरु आहेती । परी ते तुळणे येती सद्गुरुचे ॥३४॥

ज्याचिया प्रसादें पावलो हा बोधू । समूळ मायाकंदू तोडियेला ॥३५॥

निजानंद पदीं स्थापिलों सतत । केला जीवन्मुक्त क्षणामाजी ॥३६॥

काय उताराई होंऊं कवण्या अर्थे । अर्पितां नाशिवंतें जीवादिकें ॥३७॥

कायावाचामनें करुनि कुरवंडी । धरी तें न सोडीं चरण याचे ॥३८॥

येणें काळें सर्व लाभाचिया कोटी । लाधलों या भेटी सिध्दाचिया ॥३९॥

सकळ विदया सहित करुनि वोवाळणी । सांडीन वरुनी जीवप्राण ॥४०॥

म्हणती चांगदेव कृतकृत्य झालों । चरणीं राहिलों मुक्ताईचे ॥४१॥

या संतचरित्र ओव्या मुक्ताफळें माळा । मिरवी जो गळां आवडीनें ॥४२॥

पुढें वाचे गाये आणीका परिसवी । लाभे तो पदवी हरिभक्तीची ॥४३॥

संतांचे चरित्र आवडी जो गाये । पढीयंता तो होये विठोबांसी ॥४४॥

आवडे श्रीहरी संत आचारित । म्हणउनी तिष्ठत हरीकथे ॥४५॥

नारद प्रल्हाद पुंडलीक नामा । प्रिय पुरुषोत्तमस जीवाहुनी ॥४६॥

गोरा परसा आतां नरहरी सावता । कूर्मा आवडता पांडुरंगा ॥४७॥

निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान मुक्ताइ्र । चांगा मिराबाई भानुदास ॥४८॥

विसोबा खेचर जाल्हान कबीर । रोहिदास वच्छरा चोखामेळा ॥४९॥

जनार्दन एका विष्णुदास तुका । वैकुंठनायका आवडते ॥५०॥

संतोबा पवार हरीभक्त अपार । हे परम प्रीतीकर विठोबाचे ॥५१॥

या सकळांची चरित्रें श्रवणें पठणें । मुक्त वाचाऋणें झाला निळा ॥५२॥

नव्हे वाचस्पती मूढ वाचक मी । परि उदयोकर्ता स्फूर्ति ज्ञानेश्वर ॥५३॥

तिहींच हा ग्रथ पावविला सिध्दी । प्रवर्तूनि बुध्दी स्फूर्ती दिली ॥५४॥

श्रोता वक्ता तूंचि आवडीच्या भोरें । ग्रंथ अत्यादरें लिहविला ॥५५॥

नेणता प्रमेय कथेच्या अन्वया । नेणों केलें काय सामर्थ्यगुणे ॥५६॥

सत्य सत्य सत्य त्रिवाचा हें सत्य । वदविता यथार्थ तुकया सिध्द ॥५८॥

उदंड राहिलें कथीं कथिता कथनीं । वाढेल म्हणउनी ग्रंथ थोर ॥५९॥

देवाचिया चित्ता आलें तोंचि पुरे । राहिल्या विस्तारें काय काज ॥६०॥

पुढातो पुढती संतां हेचि विनवणी । बैसावें श्रवणीं करुनी कृपा ॥६१॥

ऐकूनि हें संत तोषले सकळ । म्हणती तूं प्रेमळ कळों आलें ॥६२॥

हरिप्रियाची कथा सप्रेमें वदलासी । झाला हा आम्हांसी पाहुणेरु ॥६३॥

प्रासादिक वाणी आम्हांरे रुचली । अष्टांगें निवालीं श्रवणमात्रें ॥६४॥

निळा म्हणे सुखें आनंदे निवाला । चरणासि लागला धांवोनियां ॥६५॥

॥ इति श्रीचांगदेवचरित्रे सिध्ददर्शनअनुग्रहपूजादिउपचारकथनं नाम पंचमप्रकरणं समाप्तम् ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *