संत निळोबाराय अभंग

वंदूनि तुकया सद्गुरुचें चरण – संत निळोबाराय अभंग – 1580

वंदूनि तुकया सद्गुरुचें चरण । बहमानंदे गर्जोनि पूर्ण । स्वानुभवभरें हांकारुन । औषध घ्या घ्या म्हणतुसे ॥१॥

निजात्मनगरीहुनी धडफुडा । वैदय आलों गा या तुमच्या चाडा ॥ तोडीन नाना व्याधींचा झगडा । करीन रोकडा अमरा ऐसा ॥२॥

जे औषधीचेनि सुवासमेळें । व्दैतरोग उठोनि पळे । अहं  कुपिताचें पेटाळें । उमळोनियां सगळें तात्कळ पडे ॥३॥

घेतां माझीं दिव्य औषधें । सनकादिकांसि निघालीं दोंदें । महर्षि मातले ब्रम्हानंदे । जाणिजे नारदें प्रतीत हे ॥४॥

अहंविषानळें घेरला । सदाशिवही झिजणीं पडिला । त्रिविध तापें होता आहाळला । तो म्या उपचारिला निजात्मवैधें ॥५॥

देऊनि स्मरणाचें रसायण । हरिलें बध्दतेचें कठीणपण । देहातीत करुनियां जाण । ठेविला करुन पूर्वी जैसा ॥६॥

क्षराक्षरातीत वृक्षाची मुळी । ते म्यां प्रल्हादचिये हदयकमळीं । घातली होती म्हणोनि विषकल्लोळीं । वांचला अग्निज्वाळी शस्त्रघाती ॥७॥

ऐसे एकैक स्वानुभव । सांगतां नवल त्याची ठेव । कैंचा उरेल अहंभाव । जाईल ठाव सांडोनियां ॥८॥

ऐशा नानाप्रकारच्या दिव्य औषधी । देऊनि उपचारिलीं लक्षावधी । भ्रमें भ्रमलीयांचिये शुध्दी । उपाव त्रिशुध्दी मज हातीं ॥९॥

म्हणोनियां आलों गा धांवत । विश्वास पहावया दया हो हात । नाहीं नाडीलेति केला घात । फुटली घात ईतकरें अहंकारें ॥१०॥

विषय कुपथ्याचेनी भरें । त्रिविधतापें तापलेती ज्वरें । अहंममतेचें लागलें स्यारें । बध्दता थोरे देहबुध्दी ॥११॥

ममाभिमानेंसी कुंथत । भेदबुध्दिचेनि विकारें बरळत । मी माझें लटिकेंचि बोलत । पडिलेति लाळत शुध्दि नाही ॥१२॥

विधीचा न साहेचि वारा । अविधि जातसां चाचरा । तेणेंचि सन्निपात विकारा । प्रबळ शरीरा वाढली तृष्णा ॥१३॥

न चलवे ऐक्याचिया भूमिके । विपरीत ज्ञानाचे खातसे झोंके । अंधारी पडिलेती देखोनि निकें । सत्यातेंचि लटिकें मानुनी ॥१४॥

तयासी एकचि विचार । क्षणमात्रेंचि होईल उतार । घ्या माझें वचन हे साचार । व्दैत कल्पना संचार न करावा ॥१५॥

एक चमत्कारिक औषध देईन । वैराग्यवल्लीचें रसायन । वरी माझिये अभेदमात्रेसी सेवन । चिदैक्यभावें करावें ॥१६॥

सांडुनी रसनें रसाची गोडी । नित्यानित्यविवके आवडी । प्रत्यगावृत्ति धारण फुडी । निरसेल गाढी भ्रमभावना ॥१७॥

पथ्येंसी असावें निरंतर । हो नेदावा विपरीत ज्ञानाचा संचार । माझीये वचनी विश्वास धर । धरितां साचार हरेल व्यथा ॥१८॥

मागें म्यां थोराथोरांकारणें । दिधलीं होती ही रसायनें । नांवे सांगों तरी शास्त्रें पुराणें । उदडं व्याख्यानें गर्जताती ॥१९॥

अर्जुन वांचविला नाना सांकडीं । उध्दव उपचारिला काढाकाढी । शुक वामदेवादिक परवडी । ऋषींची भवभयसांकडीं निवारिली ॥२०॥

ऐसे उपचारिले बहुत जन । संख्यारहित विवक्षण । आतांही हें रसायन । सेविती ते होउनी आरोग्य ठाती ॥२१॥

निळा म्हणे वस्ताद माझा । शिरीं असतां सद्गुरुराजा । निवारीन रोग घेउनी पैजा । धरितां वोजा विश्वास मनीं ॥२२॥

यापरि सादावूनियां सकळां । जातो आपुल्या निजात्मस्थळा । रामराम करुनियां म्हणे निळा । कृपा अखंडित असों दयावी ॥२३॥


राम कृष्ण  हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *