रामदासांची आरती

दिवटा – संत रामदास

दिवटा 

हुशार भाई हुशार । अवघीं असावें खबरदार । काळोखें पडतें फार । एकाशीं ए दिसेना ॥१॥
चोराचे कळप फिरती । अवचित दगा करिती । निजों नका जागविती । मी दिवटा साहेबाचा ॥२॥
मी हराम नव्हें साहेबाचा । नफर इतबाराचा । मज रातीं जागावयाचा । हुद्दा दिधला ॥३॥
मी सारे रात जागतों । अठरा महालांची खबर घेतों । साही नजरेनें राखतों । मनीं धरितों चहूंचे गुण ॥४॥
मी सकळिकांचें करितों बरें । परि मज मानिती अहंकारें । घोरों लागती झोंपेच्या घोरें । ते समूल नागविती ॥५॥
जे मजला मानिती । माझ्या विचारें वर्तती । तरि हरगीस्त झोला न पवती । ते नाडेनात जी ॥६॥
जे जे झोपेनें पिडले । ते ते अवघेचि नाडले । यमयातनेशीं जुडले । पाहुणेर द्यावयाकारणें ॥७॥
जे मदभरें जडले । जन्ममरणा रहाटीं जोडले । सुटिका नव्हती पाडिले । बांधोनियां जी ॥८॥
अरे जागा स्वरूपी जागा । मुक्तीचा सोहोळा भोगा । कर्म आपलें अंगा । लागोंव नेदावें ॥९॥
अरे हुशार । झोपेनें नाडले थोर थोर । म्यां जे जे केले खबरदार । ते कडेशीं पडिलेजी ॥१०॥
महादेव निजेनें भ्रमला । विषें तळमळों लागला । मग म्यां खबरदार केला । तो वांचला दों अक्षरीं ॥११॥
स्वामी कार्तिक निजेनें भ्रमला । बळोंचि परस्री भोगूं लागला । मातृगमन पडावें त्याला । तो म्यां खबरदार केला ॥१२॥
विष्णु निजेनें भ्रमला । परस्त्रीचे मोहें जोगी झाला । तो म्यां खबरदार केला । मोहो दवडिला शक्तीचा ॥१३॥
ब्रह्मा निजेनें भ्रमला । चोरांनीं समूळ नागविला । सकळ धर्म बुडविला । दुकाळ पडला मोठी जी ॥१४॥
मग म्यां खबरदार केला । तो बाबातें स्मरला । तेणें जाऊनि चोर मारविला । लेकाचें वित्त दिधलें ॥१५॥
नारद निजेनें भ्रमला । बायको होउनी साठ लेक व्याला । तो म्यां खबरदार केला । मग पावला पहिला वेष ॥१६॥
इंद्रें मानिलें नाहीं मजला । सहस्त्र भोकें पडलीं त्याला । शुक्रें डोळा फोडोनि घेतला । न मानी मजला म्हणवूनी ॥१७॥
चंद्रें नाहीं मानिलें मजला । चंद्रें नाहीं मानिलें मजला । अभिमानें सुखें निजला । तो क्षयरोगी जाहला । नाडला आपले करणीनें ॥१८॥
दक्ष निजेनें भ्रमला । मानिलें नाहीं मजला । पूर्वशिराशीं मुकला । जाहला जी तो बोकडमुखी ॥१९॥
गुरूनें नाहीं मानिलें मजला । बाईल गमवुनी बैसला । यम निजेनें व्यापिला । झाला केवळ दासीपुत्र ॥२०॥
रावण निजेनें भ्रमला । कुलक्षय करूनि शोकीं पडला । मग म्यां खबरदार केला । मग जाला रामरूपी ॥२१॥
ऐसे ऐकोनि दृष्टांत । सावध करोनी करा स्वहित । तरि आपुलें फल भोगा समस्त । मी सांगतों जी ॥२२॥
मी सांगतों उतराइ । कोणापाशीं कांहीं मागत नाहीं । परोपकारास्तव पाहीं । हुशार करितों ॥२३॥
ऐसें दिवटा जाय बोलोनि । घरटीं घाली हांक देवुनि । दास म्हणे दिवटय मानी । तोचि तरला मोहरनीं ॥२४॥
ऐसा हा दिवटा । समर्थाचा जाणावा सुभटा । जे अनुभवती संसारचोहटा । न येता समर्था ॥२५॥


दिवटा समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *