पुंडलिका भुलोनी आला – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 18
पुंडलिका भुलोनी आला । उभाचि ठेला अद्यापिही ।।
येति जे जे दुराचारी । दरुशने उध्दरी नरनारी ।।
सावता म्हणे वेदशृति । अखंड जयासि ते गाती ।।
मथितार्थ : या अभंगात सावता महाराज विठ्ठलाच्या अवताराविषयी सांगतात. पुंडलिकाची भक्ति पाहून देव अठ्ठावीस युगे उभा राहिला आहे आणि त्या विठ्ठलाचे दर्शन सर्व भाविक भक्त घेतात, त्यांचे गुणगान गातात तेच गुणगान वेदानेही गायले आहेत. अशा या विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपला उद्धार करून घेतात. पुंडलिकाच्या भेटीला साक्षात ईश्वर अर्थात विठ्ठल देहरूपाने आला. त्याच्याच नामसंकीर्तनात मग्न असलेल्या या भक्ताने एका विटेवर त्या परब्रह्माला अठ्ठावीस युगे तिष्ठत राहायला लावले.
तुकाराम महाराज म्हणतात “पुंडलिक भक्त राज । तेणे साधियले काज वैकुंठीचे निज । परब्रह्म आणिले ।” याच विठ्ठलाचा महिमा सर्वजण गातात, त्यांच्या भावभक्तीमध्ये भाविक रंगून जातात. अशा या विठ्ठलाच्या दर्शनाने नर-नारीचा उद्धार होतो. भक्त पुंडलिकाने भक्ती केल्यामुळे सर्व भाविक भक्तांना, संतांना विठ्ठलाचे दर्शन झाले. त्यामुळे सर्वांना पुंडलिकाच्या भक्तीची थोरवी जाणवली. जो भाविकभक्त अनन्यभावाने विठ्ठलाला शरण गेला त्याचा उद्धार झाला असे सावता महाराजांना वाटते.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.