मागे बहुताचा लाग – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग – 19
मागे बहुताचा लाग। तोडिला पांग, तुम्ही देवा ।।
म्हणोनि येतो काकुळती । पुढती पुढती कीव भाकी ॥
सावता म्हणे विश्वंभरा । तुम्ही उदारा त्रिभुवनी ॥
मथितार्थ : या अभंगात सावता महाराजांना विठ्ठल दुःखी भक्ताची दुःखे दूर करणारा आहे, असा ठाम विश्वास वाटतो. कारण ते विठ्ठलाला विश्वंभर असा शब्दप्रयोग वापरतात. विश्वंभर जगाचा पालनकर्ता आहे. आपल्या ही अगोदर त्यांने अनेक दुःखी भक्तांची दुःखे दूर करून त्यांचा उद्धार केला आहे. तसाच या विठ्ठलाने आपलाही उद्धार करावा अशी विनवणी सावता महाराज या अभंगात करताना दिसतात. सावता महाराजांची उत्कटभक्ती या अभंगातून दिसून येते. सावता महाराज सांगतात, माझ्याही अगोदर जे भक्त दुःखी-कष्टी होते आणि त्यांनी भगवंताची म्हणजेच विठ्ठलाची करुणा भाकली अशा संकटाच्या वेळी मदतीची याचना भाविक भक्तानी विठ्ठलाकडे केली, त्या सर्व भक्तांची विठ्ठलाने संकटातून मुक्तता केली.
म्हणून सावता महाराजांनी विठ्ठलाला विश्वंभर असा शब्दप्रयोग वापरला आहे. स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक या तिन्ही लोकांतील भक्तांचे संरक्षण व पालनपोषण करणारा असा हा विठ्ठल आहे म्हणून सावतोबा त्यांनाच काकुळती येऊन विनंती करतात. कारण पूर्वीच्या अनुभवावरून विठ्ठल हा उदार आहे, याची त्यांना खात्री आहे. म्हणून ते विठ्ठलाला शरण गेले आहेत. सावता महाराज या अभंगामध्ये सांगतात, भक्ताच्या ठिकाणी असणाऱ्या भक्तीच्या जोरावर तो भक्त परमेश्वराला संकट समयी बोलावू शकतो .
उदाहरण द्यायचे झाले तर द्रौपदीने वस्त्रहरणावेळी कृष्णाचा धावा करताच भगवंताने या संकटातून तिची सुटका केली. भक्त प्रल्हादाला तर देवत्व प्राप्त केले. देवाचा धावा करणारा भक्त आणि त्याची भक्ती परमेश्वराला ज्ञात असल्याने तो भक्ताचा उद्धार तर करतोच त्याबरोबरच त्याचे नाव तिन्ही लोकांमध्ये अजरामर करतो. शबरीची भोळीभाबडी भक्ती प्रभू रामचंद्रानी ओळखली आणि ती भक्तीच्या महानतेनेच मोक्षाला गेली. या सगळ्या उदाहरणावरून आपल्याही लक्षात येते की आपण ही परमेश्वराची भक्ती करुन आपलाही उद्धार करुन घेतला पाहिजे .
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.