विकासले नयन स्फुरण आले बाही – संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग -33
विकासले नयन स्फुरण आले बाही । दाटले ह्रदयी करुणा भरित ॥
जाता मार्गी भक्त सावता तो माळी । आला तयाजळी पांडुरंग ॥
नामा ज्ञानदेव राहिले बाहेरी । मळिया भितर गेला देव ॥
तब तो समाधीस्थ झाकुनी नयन। वाचे रामकृष्ण जपे सदा ॥
माथा ठेऊनिया हात केला सावधान। दिले आलिंगन चहुभुजी ॥
चरणी ठेवोनी माथा, विनवितो सावता। बैसा पंढरीनाथा करीन पूजा ॥
मथितार्थ : या अभंगात सावता महाराजांनी देवभेटीच्या साक्षात्काराचे वर्णन केले आहे. देवाच्या दर्शनाची शुभचिन्हे सावतोबांना जाणवू लागली होती. उजवा बाहू स्फुरू लागला, उजवी पापणी फडफडू लागली. एवढ्यातच ज्ञानदेव, नामदेव यांना वाटेतच थांबवून देव सावता माळ्याच्या मळ्यात आले. त्यावेळी सावतोबा समाधी अवस्थेत होते, पण मुखाने रामकृष्ण हा मंत्राचा उच्चार चालू होता. देवाच्या चिंतनात सावतोबा मग्न होते. देवांनी येऊन त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला सावध केले. सावता महाराज भानावर येताच देवांनी त्यांना आलिंगन दिले. दोघांची उराउरी भेट झाली. तेवढ्यात नामदेव व ज्ञानदेव पाठीमागून आले. सावतोबाची कर्मनिष्ठा, भक्ती पाहून ज्ञानदेव व नामदेव चकित झाले. सावता महाराज ही सुखावले आणि ते विठ्ठलाला म्हणतात देवा मी तुम्हाला चरणांवर डोके ठेवून विनंती करतो, आता थोडी विश्रांती घ्या दमून आला असाल, मला आपले आदरातिथ्य करू द्या.
श्री.दत्तात्रय संभाजी ढगे (सर).
श्री क्षेत्र अरण
वाचा :संत सावतामाळी महाराज सार्थ अभंग
संत सावतामाळी अँप डाउनलोड करा.