मागता भिकारी जालों तुझे द्वारीं – संत तुकाराम महाराज अभंग – 1784
मागता भिकारी जालों तुझे द्वारीं । देई मज हरी कृपादान ॥१॥
प्रेम प्रीति नाम उचित करावें । भावें संचरावें हृदयामाजी ॥ध्रु.॥
सर्वभावें शरण आलों पांडुरंगा । कृपाळु तूं जगामाजी एक ॥२॥
तापत्रयें माझी तापविली काया । शीतळ व्हावया पाय तुझे ॥३॥
संबंधीं जनवाद पीडलों परोपरी । अंतरलों दुरी तुजसी तेणें ॥४॥
तुका म्हणे आतां तुझा शरणागता । करावें सनाथ मायबापा ॥५॥
अर्थ
हे हरी मी तुझ्या दारा मध्ये भीक मागणारा भिकारी म्हणून आलो आहे तरी तुम्ही मला कृपादान द्यावे द्यावा. प्रेम आणि प्रीतीने मी तुझे नाम उच्चार करीन असेच उचित कार्य तुम्ही करावे आणि तुम्ही प्रीतिने माझ्या हृदयामध्ये येऊन संचार करावा. हे पांडुरंगा सर्व जगामध्ये तूच एक कृपाळू आहेस त्यामुळे मी सर्वभावे तुला शरण आलो आहे देवा. देवा त्रिविध तापाने माझे संपूर्ण शरीर तापविले आहे आता त्याला शितल करण्यासाठी केवळ तुझे पायच एक उपाय म्हणून बाकी आहे. देह संबंधी आणि लौकीकाच्या मुळेच मी पदोपदी त्रासलो गेलो व त्या कारणाने तुझ्यापासून मी आंतरलो. तुकाराम महाराज म्हणतात देवा मी तुम्हाला शरण आलो आहे त्यामुळे हे मायबापा तुम्ही मला सनाथ करा माझा सांभाळ करा.
वाचा : सार्थ तुकाराम गाथा
अभंग विडिओ स्वरूपात पहा .
संत तुकाराम अँप डाउनलोड करा.