सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

संत तुकाराम गाथा १४ (य)

संत तुकाराम गाथा १४ अनुक्रमणिका नुसार

य 

४०७९
यत्न आतां तुम्ही करा । मज दातारा सत्तेनें ॥१॥
विश्वास तो पायांवरी । ठेवुनि हरी राहिलों ॥ध्रु.॥
जाणत चि दुजें नाहीं । आणीक कांहीं प्रकार ॥२॥
तुका म्हणे शरण आलों । नेणें बोलों विनवितां ॥३॥


८०३
यथार्थ वाद सांडूनि उपचार । बोलती ते अघोर भोगितील ॥१॥
चोरा धरितां सांगे कुठोऱ्याचें नांव । दोघांचे ही पाव हात जाती ॥२॥
तुका म्हणे असे पुराणीं निवाड । माझी हे बडबड नव्हे कांहीं ॥३॥


१८५२
यथार्थवादें तुज न वर्णवे कदा । बोलतों ते निंदा करितों तुझी ।
वेदश्रुति तुज नेणती कोणी । चोवीस ठेंगणीं धांडोळितां ॥१॥
आतां मज क्षमा करावें देवा । सलगी ते केशवा बोलियेलों ॥ध्रु.॥
सगुण कीं साकार निर्गुण कीं निराकार । न कळे हा पार वेदां श्रुतीं ।
तो आह्मी भावें केलासी लहान । ठेवूनियां नांवें पाचारितों ॥२॥
सहस्रमुखें शेष सीणला स्तवितां । पार न कळतां ब्रह्मा ठेला ।
तेथें माझी देहबुद्धी तें काई । थोर मी अन्यायी तुका म्हणे ॥३॥


५६६
यथाविधि पूजा करी । सामोग्री तोंवरी हे नाहीं ॥१॥
आतां माझा सर्व भार । तूं दातार चालविसी ॥ध्रु.॥
मंगळ तें तुम्ही जाणां । नारायणा काय तें ॥२॥
तुका म्हणे समर्पीला । तुज विठ्ठला देहभाव ॥३॥


२२४९
यम सांगे दूतां तुम्हां नाहीं तेथें सत्ता । जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊं तया गांवां नामधारकाच्या शिवां । सुदर्शन येवा घरटी फिरे भोंवती ॥ध्रु.॥
चक्र गदा घेउनी हरी उभा असे त्यांचे द्वारीं । लक्ष्मी कामारी रिद्धिसिद्धीसहित ॥२॥
ते बळयाशिरोमणी हरीभक्ती ये मेदिनी । तुका म्हणे कानीं यम सांगे दूतांचे ॥३॥


२०६६
यमपुरी त्यांणीं वसविली जाणा । उच्छेद भजना विधी केला ॥१॥
अवघड कोणी न करी सांगतां । सुलभ बहुतां गोड वाटे ॥ध्रु.॥
काय ते नेणते होते मागें ॠषी । आधार लोकांसी ग्रंथ केले ॥२॥
द्रव्य दारा कोणें स्थापियेलें धन । पिंडाचें पाळण विषयभोग ॥३॥
तुका म्हणे दोहीं ठायीं हा फजित । पावे यमदूतजना हातीं ॥४॥


३६९६
यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि ॥१॥
हाल मांडा हाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥
नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥२॥
तुका म्हणे कान्हो तिळतांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥३॥


३६७८
यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करूं आजी ।
अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हामाजी देतों ॥१॥
म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें ।
खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरी ॥ध्रु.॥
एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिकचि वाटे ।
म्हणती गोड झालें । म्हणती गोड झालें । आणिक देई धालें । नाहीं पोट आमुचे ॥२॥
हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ।
देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥३॥
म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या ।
अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥४॥
एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरी । म्हणे पुरे आतां ।
येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥५॥
आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे ।
वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥६॥
करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे ।
एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥७॥
नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखें चि हरी ।
म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥८॥
गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहों ठेलें ।
देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग झालों आम्ही ॥९॥
म्हणती कैसें करावें । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया ।
सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिक ची होंट । मटमटां वाजती ॥१०॥
आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी ।
म्हणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष या कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥११॥
धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें ।
मानवले गडी । एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥१२॥
तुझा संग बरवा । नित्य आम्हां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें ।
तंव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया ॥१३॥
आजि झाला आनंदु । न वर्णावे ब्रम्हानंदु । चाले परमानंदु । सवें आम्हांसहित ।
तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यांसरी ॥१४॥


१७४४
यज्ञनिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥१॥
नव्हे ते भक्ती परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥
आशा धरूनि फळाची । तीर्थी व्रतीं मुक्ती कैंचि ॥२॥
तुका म्हणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥३॥


७५०
यज्ञ भूतांच्या पाळणा । भेद कार्य कारणा । पावावया उपासना । ब्रम्हस्थानीं प्रस्थान ॥१॥
एक परी पडिलें भागीं । फळ बीजाचिये अंगीं । धन्य तोचि जगीं । आदि अंत सांभाळी ॥ध्रु.॥
आवश्यक तो शेवट । येर अवघी खटपट । चालों जाणे वाट । ऐसा विरळा एखादा ॥२॥
तुका होवोनि निराळा । क्षराअक्षरावेगळा । पाहे निगमकळा । बोले विठ्ठलप्रसादें ॥३॥


या यां

१४८
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥
फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥
ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥२॥
तुका म्हणे त्याचें अन्न । मद्यपानाचे समान ॥३॥


१३५३
याचा तंव हाचि मोळा । देखिला डोळा उदंड॥१॥
नेदी मग फिरों मागें । अंगा अंग संचरे ॥ध्रु.॥
कां गा याची नेणां खोडी । जीभा जोडी करितसे ॥२॥
पांघरे तें बहु काळें । घोंगडें ही ठायींचें ॥३॥
अंगीं वसे चि ना लाज । न म्हणे भाज कोणाची ॥४॥
सर्वसाक्षी अबोल्यानें । दुश्चित कोणें नसावें ॥५॥
तुका म्हणे धरिला हातीं । मग निश्चिंतीं हरीनें ॥६॥


९८४
या चि नांवें दोष । राहे अंतरीं किल्मिष ॥१॥
मना अंगीं पुण्य पाप । शुभ उत्तम संकल्प ॥ध्रु.॥
बिजाऐसीं फळें । उत्तम कां अमंगळें ॥२॥
तुका म्हणे चित्त । शुद्ध करावें हे हित ॥३॥


२०७०
याचिया आधारें राहिलों निश्चिंत । ठेवूनियां चित्त पायीं सुखें ॥१॥
माझें सुखदुःख जाणे हित फार । घातलासे भार पांडुरंगा ॥ध्रु.॥
कृपेचीं पोसणीं ठायींचीं अंकिलीं । म्हणऊनि लागली यास चिंता ॥२॥
मन राखे हातीं घेऊनियां काठी । इंद्रियें तापटीं फांकों नेदी ॥३॥
तुका म्हणे यासी अवघड नाहीं । शरणागता कांहीं रक्षावया ॥४॥


८४०
या चि हाका तुझे द्वारीं । सदा देखों ऋणकरी ॥१॥
सदा करिसी खंड दंड । देवा बहु गा तूं लंड ॥ध्रु.॥
सुखें गोविसी भोजना । लपवूनियां आपणां ॥२॥
एकें एक बुझाविसी । तुका म्हणे ठक होसी ॥३॥


२७९६
याची कोठें लागली चट । बहु तट जालेंसे ॥१॥
देवपिसीं देवपिसीं । मजऐसीं जग म्हणे ॥ध्रु.॥
एकांताचें बाहेर आलें । लपविलें झांकेना ॥२॥
तुका म्हणे याचे भेटी । झाली तुटी आपल्यांसी ॥३॥


१३५२
याची सवे लागली जीवा । गोडी हेवा संगाचा ॥१॥
परतें न सरवे दुरी । क्षण हरीपासूनि ॥ध्रु.॥
जालें तरी काय तंट । आतां चट न संडे ॥२॥
तुका म्हणे चक्रचाळे । वेड बळें लाविलें॥३॥


७६२
याजसाठी केला होता आटाहास्य । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥
आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥
कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥


३७५
याजसाठीं वनांतरा । जातों सांडुनियां घरा ॥१॥
माझें दिठावेल प्रेम । बुद्धी होईल निष्काम ॥ध्रु.॥
अद्वैताची वाणी । नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥
तुका म्हणे अहंब्रम्ह । आड येऊं नेदीं भ्रम ॥३॥


२०५
याजसाठीं भक्ति । जगीं रूढवावया ख्याति ॥१॥
नाहीं तरी कोठें दुजें । आहे बोलाया सहजें ॥ध्रु.॥
गौरव यासाठी । स्वामिसेवेची कसोटी ॥२॥
तुका म्हणे अळंकारा । देवभक्त लोकीं खरा ॥३॥


६७६
यातिहीन मज काय तो अभिमान । मानी तुज जन नारायणा ॥१॥
काय सुख मज तयाची हे खंती । आपुलाला घेती गुणभाव ॥ध्रु.॥
द्रव्यामुळें माथां वाहियेली चिंधी । होन जनामधीं होता गांठी ॥२॥
तुका म्हणे जन वंदितो वेगळा । मजसी दुर्बळा काय चाड ॥३॥


७६७
याति शूद्र वैश केला वेवसाव । आधी तो हा देव कुळपूज्य ॥१॥
नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्न तुह्मीं संतीं ॥ध्रु.॥
संवसारें जालों अतिदुःखें दुखी । मायबाप सेखीं कर्मलिया ॥२॥
दुष्काळें आटिलें द्रव्यें नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली ॥३॥
लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देख तुटी येतां ॥४॥
देवाचें देऊळ होतें तें भंगलें । चित्तासी जें आलें करावेंसें ॥५॥
आरंभीं कीर्तन करीं एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं ॥६॥
कांहीं पाठ केलीं संतांचीं उत्तरें। विश्वासें आदरें करोनियां ॥७॥
गाती पुढें त्यांचें धरावें धृपद । भावें चित्त शुद्ध करोनियां ॥८॥
संताचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली ॥९॥
टाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनी ॥१०॥
वचन मानिलें नाहीं सुहृदांची । समूळ प्रपंचें वीट आला ॥११॥
सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥१२॥
मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ मनी ॥१३॥
यावरि या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे ॥१४॥
निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखविलें ॥१५॥
बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान ॥१६॥
विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे ॥१७॥
आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे ॥१८॥
भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें ॥१९॥
तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगें ॥२०॥


८३३
याती मतिहीन रूपें लीन दीन । आणीक अवगुण जाणोनियां ॥१॥
केला त्या विठ्ठलें माझा अंगीकार । ऐसा हा विचार जाणोनियां ॥ध्रु.॥
जें कांहीं करितों तें माझे स्वहित । आली हे प्रचित कळों चित्ता ॥२॥
जालें सुख जीवा आनंद अपार । परमानंदें भार घेतला माझा ॥३॥
तुका म्हणे यासी नामाचा अभिमान। म्हणोनि शरण तारी बळें ॥४॥


३७४०
या रे करूं गाई । जमा निजलेती काई । बोभाटानें आई । घरा गेल्या मारील ॥१॥
घाला घाला रे फुकारे । ज्याची तेणें चि मोहरे । एवढें चि पुरे । केलियानें सावध ॥ध्रु.॥
नेणोनियां खेळा । समय समयाच्या वेळा । दुश्चिताजवळा । मिळालेति दुश्चित ॥२॥
तुका म्हणे शीक । न धरितां लागे भीक । धरा सकळीक । मनेरी धांवा वळतियां ॥३॥


३७११
या रे गडे हो धरूं घाई जाणतां ही नेणतां । नाम गाऊं टाळी वाहूं अपुलिया हिता ॥१॥
फावलें तें घ्यारे आतां प्रेमदाता पांडुरंग । आजि दिवस सोनियाचा वोडवला रंग ॥ध्रु.॥
हिंडती रानोरान भुजंग ते कांट्यावन । सुख तयांहून आम्हां गातां नाचतां रे ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हादिकां सांवळें दुर्लभ सुखा । आजि येथें आलें फुका नाम मुखा कीर्तनीं ॥३॥


३०९४
या रे नाचों अवघेजण । भावें आनंदे करून ॥१॥
गाऊं पंढरीचा राणा । क्षेम देऊन संतजना ॥ध्रु.॥
सुख फुका साठी । साधे हरीनाम बोभाटीं ॥२॥
प्रेमासाठी तो उदार । देतां नाहीं सानाथोर ॥३॥
पापें पळालीं बापुडीं । काळ झाला देशधडी ॥४॥
तुका म्हणे धन्य काळ । आजि प्रेमाचा सुकाळ ॥४॥


१६२२
या रे हरीदासानो जिंकों कळिकाळा । आमुचिया बळा पुढें किती बापुडें ॥१॥
रंग सुरंग घमंडी नाना छंदें । हास्यविनोदें नामाचि आवडी ॥ध्रु.॥
येणें तेणें प्रकारें बहुतां सुख जोडे । पूजन तें घडे नारायणा अंतरीं ॥२॥
वांकडएा माना बोल बोलावे आर्ष । येईल तो त्यांस छंद पढीयें गोविंदा ॥३॥
आपुलालें आवडी एकापुढें एक नटा । नाहीं थोर मोठा लहान या प्रसंगीं ॥४॥
तुका म्हणे येथें प्रेम भंगूं नये कोणीं । देव भक्त दोन्ही निवडितां पातक॥५॥


३६८८
याल तरी या रे लागें । अवघे माझ्या मागें मागें ॥१॥
आजि देतों पोटभरी । पुरे म्हणाल तोंवरी ॥ध्रु.॥
हळू हळू चाला । कोणी कोणाशीं न बोला ॥२॥
तुका म्हणे सांडा घाटे । तेणें नका भरूं पोटें ॥३॥


३०४६
यालागीं आवडी म्हणा राम कृष्ण । जोडा नारायण सर्वकाळ ॥१॥
सोपें हें साधन लाभ येतो घरा । वाचेसी उच्चारा राम हरी ॥ध्रु.॥
न लगती कष्ट न लगे सायास । करावा अभ्यास विठ्ठलाचा ॥२॥
न लगे तप तीर्थ करणें महादान । केल्या एक मन जोडे हरी ॥३॥
तुका म्हणे कांहीं न वेचितां धन । डोले नारायण नामासाठी ॥४॥


३५७८
यावरी न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होईल पुढें ॥१॥
करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ध्रु.॥
जोंवरी हे डोळां देखें वारकरी । तों हें भरोवरी करी चित्त ॥२॥
आस वाढविते बुद्धीचे तरंग । मनाचे ही वेग वावडती ॥३॥
तुका म्हणे तेव्हां होतील निश्चळ । इंद्रियें सकळ निरोपानें ॥४॥


१७५८
यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥१॥
घ्यावी उच्छिष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥
भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥२॥
तुका म्हणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥३॥


२३०
यासी कोणी म्हणे निंदेचीं उत्तरें । नागवला खरें तोचि एक ॥१॥
आड वाटे जातां लावी नीट सोई । धर्मनीत ते ही ऐसी आहे ॥ध्रु.॥
नाइकता सुखें करावें ताडण । पाप नाहीं पुण्य असे फार ॥२॥
जन्म व्याधि फार चुकतील दुःखें । खंडावा हा सुखें मान त्याचा ॥३॥
तुका म्हणे निंब दिधल्यावांचून । अंतरींचा शीण कैसा जाय ॥४॥


३८७८
यांसि समाचार सांगतों सकळा । चलावें गोकुळा म्हणे देव ॥१॥
देव राखे तया आडलिया काळें । देव सुखफळें देतो दासां ॥२॥
दासां दुःख देखों नेदी आपुलिया । निवारी आलिया न कळतां ॥३॥
नाहीं मेघ येतां जातां देखियेला । धारीं वरुषला शिळांचिये ॥४॥
एवढें भक्तांचें सांकडें अनंता । होय निवारिता तुका म्हणे ॥५॥


३६७९
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥१॥
वाहिला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त झालें चंचळ ॥ध्रु.॥
उरलें तें सांडा काम नका करूं गोवी । हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥
निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥३॥
कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन झालें उदास ॥४॥
एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥५॥


यु ये यो

७१
युक्ताहार न लगे आणिक साधनें । अल्प नारायणें दाखविलें ॥१॥
कलियुगामाजी करावें कीर्तन । तेणें नारायण देईल भेटी ॥ध्रु.॥
न लगे लौकिक सांडावा वेव्हार । घ्यावें वनांतर भस्म दंड ॥२॥
तुका म्हणे मज आणिक उपाव । दिसती ते वाव नामेंविण ॥३॥


१३४३
युक्ती तंव झाल्या कुंठीत सकळा । उरली हे कळा जीवनाची ॥१॥
संतचरणीं भावें ठेविलें मस्तक । जोडोनि हस्तक राहिलोंसें ॥ध्रु.॥
जाणपणें नेणें कांहींचि प्रकार । साक्षी तें अंतर अंतरासी ॥२॥
तुका म्हणे तुम्ही केलें अभयदान । जेणें समाधान राहिलोसे ॥३॥


१४८२
येईल तुझ्या नामा । लाज म्हणू पुरुषोत्तमा ॥१॥
धीर राहिलों धरूनि । त्रास उपजला मनीं ॥ध्रु.॥
जगा कथा नांव । निराशेनें नुपजे भाव ॥२॥
तुम्ही साक्षी कीं गा । तुका म्हणे पांडुरंगा ॥३॥


३७४२
येईल तें घेइन भागा । नव्हे जोगा दुसरिया ॥१॥
आवडी ते तुम्ही जाणा । बहु गुणांसारिखी ॥ध्रु.॥
मज घेती डांगवरी । सवें हरी नसलिया ॥२॥
तुका म्हणे राबवा देवा । करीन सेवा सांगितली ॥३॥


७१२
येई गा विठ्ठला येई गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥१॥
पडियेलों वनीं थोर चिंतवनी । उशीर कां अझूनि लावियेला ॥ध्रु.॥
काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥२॥
तुका म्हणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥३॥


१५४२
येई गां तूं मायबापा पंढरीच्या राया । तुजविण सीन वाटे क्षीण जाली काय ॥१॥
याती हीन मती हीन कर्म हीन माझे । सर्व लज्जा सांडोनिया शरण आलो तुज ॥ध्रु.॥
दिनानाथ दीनबंधू नामतुझे साजे । पतितपावन नामऐसी ब्रीदावळी गाजे ॥२॥
विटेवरी उभा नीट कटावरी कर । तुका म्हणे हेचि आम्हां ध्यान निरंतर ॥३॥


२१८७
येई वो येई वो येई धांवोनियां । विलंब कां वायां लाविला कृपाळे ॥१॥
विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके । कोठें गुंतलीस अगे विश्वव्यापके ॥ध्रु.॥
न करीं न करीं न करीं आतां अळस अव्हेरु । व्हावया प्रकट कैंचें दूरि अंतरु ॥२॥
नेघें नेघें नेघें माझी वाचा विसांवा । तुका म्हणे हांवा हांवा हांवा साधावा ॥३॥


३०३८
येउनी जाउनी पाहें तुजकडे । पडिल्या सांकडें नारायणा ॥१॥
आणीक कोणाचा मज नाहीं आधार । तुजवरी भार जीवें भावें ॥ध्रु.॥
निष्ठुर अथवा होई तूं कृपाळ । तुज सर्वकाळ विसरेंना ॥२॥
आपुलें वचन राहावें सांभाळून । तुम्हां आम्हां जाण पडिपाड ॥३॥
ज्याच्या वचनासी अंतर पडेल । बोल तो होईंल तयाकडे ॥४॥
तुम्हां आम्हां तैसें नाहीं म्हणे तुका । होशील तूं सखा जीवलगा ॥५॥


१०३
येऊं द्या जी कांहीं वेसकरास । आंतून बाहेर वोजेचा घास ॥१॥
जों यावें तों हात चि रिता नाहीं । कधीं तरीं कांहीं द्यावें घ्यावें ॥२॥
तुका म्हणे उद्यां लावीन मनेरा । जे हे दारोदारां भोंवतीं फिरा ॥३॥


१३४७
येऊनि नरदेहा विचारावें सार । धरावा पैं धीर भजनमार्गा ॥१॥
चंचळ चत्तिासी ठेवूनियां ठायीं । संतांचिये पायीं लीन व्हावें ॥ध्रु.॥
भावाचा पैं हात धरावा नश्चियें । तेणें भवभय देशधडी ॥२॥
नामापरतें जगीं साधन सोपें नाहीं । आवडीनें गाई सर्वकाळ ॥३॥
तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा । ऐसा नश्चियाचा मेरु जाला ॥४॥


२२६४
येऊनि नरदेहा झांकितील डोळे । बळें चि अंधळे होती लोक ॥१॥
उजडासरसी न चलती वाट । पुढील बोभाट जाणोनियां ॥ध्रु.॥
बहु फेरे आले सोसोनि वोळसा । पुढें नाहीं ऐसा लाभ मग ॥२॥
तुका म्हणे जाऊं सादावीत वाट । भेटे तरी भेटो कोणी तरी ॥३॥


१२५३
येउनि संसारीं । मी तों एक जाणें हरी ॥१॥
नेणें आणिक कांहीं धंदा । नित्य ध्यातसें गोविंदा ॥ध्रु.॥
कामक्रोधलोभस्वार्थ। अवघा माझा पंढरिनाथ ॥२॥
तुका म्हणे एक । धणी विठ्ठल मी सेवक ॥३॥


६८०
येगा येगा पांडुरंगा । घेई उचलुनि वोसंगा ॥१॥
ऐसी असोनियां वेसी । दिसतों मी परदेसी ॥ध्रु.॥
उगवूनि गोवा । सोडवूनि न्यावें देवा ॥२॥
तुज आड कांहीं । बळ करी ऐसें नाहीं ॥३॥
तुका म्हणे हृषीकेशी । काय उशीर लाविलासी ॥४॥


१५३०
येणें जाणें तरी । राहे देव कृपा करी ॥१॥
ऐसें तंव पुण्य नाहीं । पाहातां माझे गांठी कांहीं ॥ध्रु.॥
भय निवारिता कोण । वेगळा अनंता ॥२॥
तुका म्हणे वारे भोग । वारी तरी पांडुरंग ॥३॥


` २८५१
येणें झाला तुमचे पोतडीचा झाडा । केलासी उघडा पांडुरंगा ॥१॥
भरूनियां घरीं राहिलों वाखती । आपुली निश्चिंती आपुल्यापें ॥ध्रु.॥
आतां काय उरी उरली ते सांगा । आणिलेति जगाचिये साक्षी ॥२॥
तुका म्हणे कोठें पाहोंजासी आतां । माझी झाली सत्ता तुम्हांवरी ॥३॥


१३२९
येणें पांगें पायांपाशीं । निश्चयेंसी राहेन ॥१॥
सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥ध्रु.॥
बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आम्हां ॥२॥
तुका म्हणे नव्हें क्षण । पायांविण वेगळा ॥३॥


१०५१
येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरीकथा ॥१॥
आम्ही भूमीवरी एक दैवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥
तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥२॥
न चळे हा मंत्र न म्हणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥३॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसांवा । सांठवीला हांवा हृदयांत ॥४॥


१५७१
येणें मार्गे आले । त्यांचें निसंतान केलें ॥१॥
ऐसी अवघड वाट । कोणा सांगावा बोभाट ॥ध्रु.॥
नागविल्या थाटी । उरों नेदी च लंगोटी ॥२॥
तुका म्हणे चोर । तो हा उभा कटिकर ॥३॥


२३३०
येणें मुखें तुझे वर्णी गुण नाम । तें चि मज प्रेम देई देवा ॥१॥
डोळे भरूनियां पाहें तुझें मुख । तें चि मज सुख देई देवा ॥ध्रु.॥
कान भरोनियां ऐकें तुझी कीर्ती । ते मज विश्रांती देई देवा ॥२॥
वाहें रंगीं टाळी नाचेन उदास । हें देई हातांस पायां सुख॥३॥
तुका म्हणे माझा सकळ देहभाव । आणीक नको ठाव चिंतूं यासी ॥४॥


२९४५
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥
आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥
विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडे चि बोल फोस वांझे ॥२॥
तुका म्हणे आलों निर्वाणाचे वरी । राहों नेदीं उरी नारायणा ॥३॥


३५६५
येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी ॥१॥
घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥
पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें ॥२॥
तुका म्हणे येती । जाइन सामोरा पुढती ॥३॥


१७५
येथीचिया अलंकारें । काय खरें पूजन ॥१॥
वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥
येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥
तुका म्हणे वैष्णव जन । माझे गण समुदाय ॥३॥


२२५७
येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥
किती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥
अवघे दिवस गेले कामा । हीं जन्मा खंडण ॥२॥
तुका म्हणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥३॥


३०२
येथील हा ठसा । गेला पडोनियां ऐसा ॥१॥
घरीं देवाचा अबोला । त्याची ते चि सवे त्याला ॥ध्रु॥. नाहीं पाहावें लागत । एकाएकीं च ते रित ॥२॥
तुका म्हणे जन । तयामध्यें येवढें भिन्न ॥३॥


३६१६
येथीलिया अनुभवें । कळों जीवें हें येतसे ॥१॥
दोहीं ठायीं एक जीव । माझी कींव त्या अंगीं ॥ध्रु.॥
भूक भुके चि खाउनि धाय । नाहीं हाय अन्नाची ॥२॥
तुका म्हणे सुख झालें । अंतर धालें त्यागुणें ॥३॥


९२६
येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥
उंची देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥
आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥२॥
तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥३॥


३३७२
येथे आड कांहीं न साहे आणीक । प्रमाण तें एक हें चि झालें ॥१॥
गाऊं नाचु टाळी वाहू गीत छंदें । डोलावूं विनोदें अंग तेणें ॥ध्रु.॥
मथुनियां सार काढिलें बाहेरी । उपाधि ते येरी निवडिल्या ॥२॥
तुका म्हणे जना लाविली शिराणी । सेवितां हे धणी होत नाहीं ॥३॥


९६२
येथें दुसरी न सरे आटी । देवा भेटी जावया ॥१॥
तोचि ध्यावा एक चित्त । करूनि रितें कलेवर ॥ध्रु.॥
षडउर्मी हृदयांत । यांचा अंत पुरवूनि ॥२॥
तुका म्हणे खुंटे आस । तेथें वास करी तो ॥३॥


५१२
येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥
विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे भंग ॥ध्रु.॥
वाहोनियां भार कुंथसील ओंझे । नव्हे तें चि माझें थीता त्याग ॥२॥
तुका म्हणे कैसी नाहीं त्याची लाज । संतीं केशीराज साधियेला ॥३॥


१६५५
येथें बोलोनियां काय । व्हावा गुरू तरि जाय ॥१॥
मज न साहे वांकडें । ये विठ्ठलकथेपुढें ॥ध्रु.॥
ऐकोनि मरसी कथा। जंव आहेसि तुं जीता ॥२॥
हुरमतीची चाड । तेणें न करावी बडबड ॥३॥
पुसेल कोणी त्यास । जा रे करीं उपदेश ॥४॥
आम्ही विठ्ठलाचे वीर । फोडूं कळिकाळाचें शीर ॥५॥
घेऊं पुढती जन्म । वाणूं कीर्ती मुखें नाम ॥६॥
तुका म्हणे मुक्ती । नाहीं आस च ये चित्ती ॥७॥


३८८५
ये दशे चरित्र केलें नारायणें । रांगतां गोधनें राखिताहे ॥१॥
हें सोंग सारिलें या रूपें अनंतें । पुढें हि बहु तें करणें आहे ॥२॥
आहे तुका म्हणे धर्म संस्थापणें । केला नारायणें अवतार ॥३॥


३७९३
ये रे कृष्णा खुणाविती खेळों भातुकें । मिळालिया बाळा एके ठायीं कवतुकें ।
कळों नेदी माया त्यासचि ते ठाउकें । खेळतोंसें दावी लक्षलक्षापें मुकें ॥१॥
अखंडित चटे त्यांनीं लावियेला कान्हा । आवडे तया ते वाहाती संकल्प मना ।
काया वाचा मनें रूपीं गुंतल्या वासना । एकांताचें सुख जाती घेवोनियां राणा ॥ध्रु.॥
अवघियांचा जाणें झाला मेळासा हरी । मिळोनियां जावें तेथें तया भीतरी ।
कळों नेदी घरिच्या करी गोवूनी चोरी । हातोहातीं नेती परेपरत्या दुरी ॥२॥
आनंदें निर्भर आपणाशीं आपण । क्रीडतील बाळा त्यजिलें पारिखें जन ।
एकाएकीं तेथें नाहीं दुसरें भिन्न । तुका म्हणे एका नारायणा वांचून ॥३॥


१०७५
ये हरी मज कृपा देई दान । नासी तिमिर दाखवी चरण । आर्त पुरवावे भेटी देऊन । नको उपेक्षुं आलिया शरण ॥१॥
काम क्रोध अहंकार नको देही । आशा तृष्णा माया लज्जा चिंता काही । वास पंढरीचा जन्म सदा देई । आणिक दुजे मागणे तुज नाही ॥ध्रु.॥
नाम अखंड हृदयी राही वाणी । नको पडो विसर क्षण जागृती स्वप्नी । संत समागम ऐसा दे लाऊनि । आणीक दुजे काहीं नेणें तुज वाचुनी ॥२॥
पंथ पुरींचा रवी सुत पुरे आतां । आड करावा भवसिंधू ऐसा नव्हता । नाही अडथळा त्रेकोल्या माजी सरता । विनवी तुकया बंधू चरणी ठेउनी माथा ॥३॥


४२९
योग तप या चि नांवें । गिळत व्हावें अभिमानें ॥१॥
करणें तें हें चि करा । सत्यें बरा व्यापार ॥ध्रु.॥
तरि खंडे येरझार। निघे भार देहाचा ॥२॥
तुका म्हणे मानामान । हें बंधन नसावें ॥३॥


५६
योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥
अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥
मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥२॥
तुका म्हणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥३॥


८६७
योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ती सोहळा मान ॥१॥
येरयेरांवरी जायांचें उसणें । भाग्यस्थळीं देणें झाडावेसीं ॥ध्रु.॥
केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काव्हवितो ॥२॥
तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *