सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

संत तुकाराम गाथा १६ (व)

संत तुकाराम गाथा १६ अनुक्रमणिका नुसार

व वं

१००
वक्त्या आधीं मान । गंध अक्षता पूजन । श्रोता यति झाला जाण । तरी त्या नाहीं उचित ॥१॥
शीर सर्वांगा प्रमाण । यथाविधि कर चरण । धर्माचें पाळण । सकळीं सत्य करावें ॥ध्रु.॥
पट्ट पुत्र सांभाळी । पिता त्याची आज्ञा पाळी । प्रमाण सकळीं । ते मर्यादा करावी ॥२॥
वरासनीं पाषाण । तो न मानावा सामान्य । येर उपकरणें । सोनियाचीं परी नीच ॥३॥
सोनियाचा पैंजण । मुगुटमणि केला हीण । जयाचें कारण । तया ठायीं अळंकार ॥४॥
सेवका स्वामीसाठीं मान । त्याचें नाम त्याचें धन । तुका म्हणे जाण । तुम्ही संत यदर्थी ॥५॥


३३४३
वचन तें नाहीं तोडीत शरीरा । भेदते अंतरा वज्रा- ऐसें ॥१॥
कांहीं न सहावें काशा हि करणें । संदेह निधान देह बळी॥ध्रु.॥
नाहीं शब्द मुखीं लागत तिखट । नाहीं जड होत पोट तेणें ॥२॥
तुका म्हणे जरी गिळी अहंकार । तरी वसे घर नारायण॥३॥


३६४
वचनें ही नाड । न बोले तें मुकें खोड ॥१॥
दोहीं वेगळें तें हित । बोली अबोलणी नीत ॥ध्रु.॥
अंधार प्रकाशी । जाय दिवस पावे निशी ॥२॥
बीज पृथिवीच्या पोटीं । तुका म्हणे दावी दृष्टी ॥३॥


२५३७
वचनाचा अनुभव हातीं । बोलविती देव मज ॥१॥
परि हें न कळे अभाविकां । जडलोकां जिवांसी ॥ध्रु.॥
अनुश्रुत हे प्रसादिक । कृपा भीक स्वामीची ॥२॥
तुका म्हणे वरावरी । जातों तरी सांगत ॥३॥


७६६
वचनांचे मांडे दावावे प्रकार । काय त्या साचार कौतुकाचे ॥१॥
जातां घरा मागें । उरों नेणें खंती । मिळाल्या बहुतीं फांकलिया ॥ध्रु.॥
उदयीं च अस्त उदयो संपादिला । कल्पनेचा केला जागेपणें ॥२॥
जाणवूनि गेला हांडोरियां पोरां । सावध इतरां करुनी तुका ॥३॥


९७५
वचना फिरती अधम जन । नारायण तो नव्हे ॥१॥
केला असता अंगीकार । न मनी भार समर्थ ॥ध्रु.॥
संसाराचा नाहीं पांग । देव सांग सकळ ॥२॥
तुका म्हणे कीर्त वाणूं । मध्यें नाणूं संकल्प ॥३॥


१३८६
वचनें चि व्हावें आपण उदार । होईल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥
सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥
वंचिलिया काय येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥२॥
तुका म्हणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥


२२२४
वंचुनियां पिंड । भाता दान करी लंड ॥१॥
जैसी याची चाली वरी । तैसा अंतरला दुरी ॥ध्रु.॥
मेला राखे दिस । ज्यालेपणें जालें वोस ॥२॥
तुका म्हणे देवा । लोभें न पुरे चि सेवा॥३॥


१८३३
वटवट केली । न विचारितां मना आली ॥१॥
मज कराल तें क्षमा । कैसें नेणों पुरुषोत्तमा ॥ध्रु.॥
उचित न कळे । जिव्हा भलतें चि बरळे ॥२॥
तुका म्हणे कांहीं । लौकिकाची चाड नाहीं ॥३॥


३२४९
वडिलें दिलें भूमिदान । तें जो मागे अभिळासून ॥१॥
अग्रपूजेचा अधिकारी । श्रेष्ठ दंड यमा घरीं ॥ध्रु.॥
उभयकुळ समवेत । नरकी प्रवेश अद्भुत ॥२॥
तप्तलोहें भेटी । तुका म्हणे कल्पकोटी ॥३॥


४५९
वत्स पळे धेनु धांवे पाठीलागीं । प्रीतीचा तो अंगीं आयुर्भाव ॥१॥
शिकविलें काय येईल कारणा । सूत्र ओढी मना आणिकांच्या ॥ध्रु.॥
सांडिलें तें नाहीं घेत मेळवितां । म्हणऊनि लाता मागें सारी ॥२॥
तुका म्हणे आग्रह करावा न लगे । सांगतसे अंगें अनुभव ॥३॥


११४७
वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्पे संतां समर्पीशी ॥१॥
सर्वसंकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥
एकसरें चिंत्त ठेवूनियां पायीं । जालों उतराई होतों तेणें ॥२॥
तुका म्हणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥३॥


११९९
वंदिलें वंदावें जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥१॥
स्वहिताची चाड ते ऐका बोल । अवघेंचि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥
सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया पुरे कोंभ नये ॥२॥
तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥३॥


३८५
वंदीन मी भूतें । आतां अवघीं चि समस्तें ॥१॥
तुमची करीन भावना । पदोपदीं नारायणा ॥ध्रु.॥
गाळुनियां भेद । प्रमाण तो ऐसा वेद ॥२॥
तुका म्हणे मग । नव्हे दुजयाचा संग ॥३॥


६००
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥
आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंकितसे ॥ध्रु.॥
वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥२॥
तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभय करें ॥३॥


७४३
वदे साक्षत्वेंसीं वाणी । नारायणीं मिश्रित ॥१॥
न लगे कांहीं चाचपावें । जातों भावें पेरीत ॥ध्रु.॥
भांडार त्या दातियाचें। मी कैचें ये ठायीं ॥२॥
सादावीत जातो तुका । येथें एकाएकीं तो ॥३॥


३७६१
वरता वेंघोनि घातली उडी । कळंबाबुडीं यमुनेसी ॥१॥
हरी बुडाला बोंब घाला । घरचीं त्यांला ठावा नाहीं ॥ध्रु.॥
भवनदीचा न कळे पार । काळिया माजी थोर विखार ॥२॥
तुका म्हणे काय वाउग्या हाका । हातींचा गमावुनियां थिंका ॥३॥


१०७३
वरतें करोनियां तोंड । हाका मारितो प्रचंड ॥१॥
राग आळवितो नाना । गातो काय तें कळेना ॥ध्रु.॥
आशा धरोनि मनीं । कांहीं देईल म्हणऊनि ॥२॥
पोटा एका साठी । तुका म्हणे जाले कष्टी ॥३॥


३८८
वरी वरी बोला रस । कथी ज्ञान माजी फोस ॥१॥
ऐसे लटिके जे ठक । तयां येहे ना पर लोक ॥ध्रु.॥
परिस एक सांगे । अंगा धुळी हे न लगे ॥२॥
तुका म्हणे हाडें । कुत्र्या लाविलें झगडें ॥३॥


३२५५वरीवरी बोले युद्धाचिया गोष्टी । परसैन्या भेटी नाहीं झाली ॥१॥
पराव्याचे भार पाहुनियां दृष्टी । कांपतसे पोटीं थरथरां ॥ध्रु.॥
मनाचा उदार रायांचा जुंझार । फिरंगीचा मार मारीतसे ॥२॥
धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप । अंगीं अनुताप हरीनामें ॥३॥
तुका म्हणे साधु बोले खर्गधार । खोचती अंतर दुर्जनाचें ॥४॥


११७६
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥
उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥
त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥
अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥३॥
तुका म्हणे तुम्ही विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥४॥


१४९१
वर्णावे ते किती । केले पवाडे श्रीपति ॥१॥
विश्वासिया घडे लाभ । देईल तरी पद्मनाभ ॥ध्रु.॥
भाव शुद्ध तरी । सांगितलें काम करी ॥२॥
तुका म्हणे भोळा देव । परि हा नागवी संदेह ॥३॥


२७०
वर्णु महिमा ऐसी नाहीं मज वाचा । न बोलवे साचा पार तुझा ॥१॥
ठायींची हे काया ठेविली चरणीं । आतां ओवाळुनि काय सांडूं ॥ध्रु.॥
नाहीं भाव ऐसा करूं तुझी सेवा । जीव वाहूं देवा तो ही तुझा ॥२॥
मज माझें कांहीं न दिसे पाहातां । जें तुज अनंता समर्पावें ॥३॥
तुका म्हणे आतां नाहीं मज थार । तुझे उपकार फेडावया ॥४॥


११०७
वर्त्ततां वासर । काय करावें शरीर ॥१॥
ठेवा नेमून नेमून । माझें तुमचे पायीं मन ॥ध्रु.॥
नेदाविया वृत्ती । कोठें फांकों चि श्रीपती ॥२॥
तुका म्हणे भले । जन्मा येऊनियां ज्याले ॥३॥


६१२
वर्म तरि आम्हां दावा । काय देवा जाणें मी ॥१॥
बहुतां रंगीं हीन जालों । तरि आलों शरण ॥ध्रु.॥
द्याल जरि तुम्ही धीर । होईल स्थिर मन ठायीं ॥२॥
तुका म्हणे सत्ताबळें । लडिवाळें राखावीं ॥३॥


३८१७
वर्म दावी सोपें भाविकां गोपाळां । वाहे त्यांच्या गळां पाले माळा ॥१॥
मान देती आधीं मागतील डाव । देवा तें गौरव माने सुख ॥२॥
मानती ते मंत्र हमामा हुंबरी । सिंतोडिती वरी स्नान तेणें ॥३॥
वस्त्रें घोंगडिया घालुनियां तळीं । वरी वनमाळी बैसविती ॥४॥
तिंहीं लोकांसी जो दुर्लभ चिंतना । तो धांवे गोधना वळतियां ॥५॥
यांच्या वचनाचीं पुष्पें वाहे शिरीं । नैवेद्य त्यांकरीं कवळ मागे ॥६॥
त्यांचिये मुखींचें हिरोनियां घ्यावें । उच्छिष्ट तें खावें धणीवरी ॥७॥
वरी माथां गुंफे मोरपिसांवेटी । नाचे टाळी पिटी त्यांच्या छंदें ॥८॥
छंदें नाचतील जयासवें हरी । देहभाव वरी विसरलीं ॥९॥
विसरली वरी देहाची भावना । ते चि नारायणा सर्वपूजा ॥१०॥
पूजा भाविकांची न कळतां घ्यावी । न मागतां दावी निज ठाव ॥११॥
ठाव पावावया हिंडे मागें मागें । तुका म्हणे संगें भक्तांचिया ॥१२॥


३०१
वसवावें घर । देवें बरें निरंतर ॥१॥
संग आसनीं शयनीं । घडे भोजनीं गमनीं ॥ध्रु.॥
. संकल्प विकल्प । मावळोनि पुण्यपाप ॥२॥
तुका म्हणे काळ । अवघा गोविंदें सुकाळ ॥३॥


१०७१
वसनें थिल्लरीं । बेडुक सागरा धिक्कारी ॥१॥
नाहीं देखिला ना ठावा । तोंड पिटी करी हांवा ॥ध्रु.॥
फुगातें काउळें । म्हणे मी राजहंसा आगळें ॥२॥
गजाहूनि खर । म्हणे चांगला मी फार ॥३॥
मुलाम्याचें नाणें । तुका म्हणे नव्हे सोनें ॥४॥


६०
वळितें जें गाई । त्यासि फार लागे काई ॥१॥
निवे भावाच्या उत्तरीं । भलते एके धणी वरी ॥ध्रु.॥
न लगती प्रकार । कांहीं मानाचा आदर ॥२॥
सांडी थोरपणा । तुका म्हणे सवें दीना ॥३॥


३७०३
वळत्या गाई धांवे घरा । आमच्या करी येरझारा ॥१॥
नांव घेतां तो जवळी । बहु भला कान्हो बळी ॥ध्रु.॥
नेदी पडों उणें पुरें । म्हणे अवघें चि बरें ॥२॥
तुका म्हणे चित्ता । वाटे न व्हावा परता ॥३॥


वा वां
१७४०
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥१॥
एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥
विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥२॥
काळिमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥३॥
उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥४॥
तुका म्हणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥५॥


४३१
वाखर घेउनि आलें । त्यासी तरवारेणें हालें ॥१॥
नव्हे आपुलें उचित । करुनि टाकावें फजित ॥ध्रु.॥
अंगुळिया मोडी। त्यासी काय सिलें घोडीं ॥२॥
नपुंसकासाठीं । तुका म्हणे न लगे जेठी ॥३॥


२२२
वाघाचा कलभूत दिसे वाघाऐसा । परी नाहीं दशा साच अंगीं ॥१॥
बाहेरील रंग निवडी कसोटी । संघष्टणें भेटी आपेआप ॥ध्रु.॥
सिकविलें तैसें नाचावें माकडें । न चले त्यापुढें युक्ति कांहीं ॥२॥
तुका म्हणे करी लटिक्याचा सांटा । फजित तो खोटा शीघ्र होय ॥३॥


११०२
वाघें उपदेशिला कोल्हा । सुखें खाऊं द्यावें मला॥१॥
अंतीं मरसी तें न चुके । मज ही मारितोसी भुके ॥ध्रु.॥
येरू म्हणे भला भला । निवाड तुझ्या तोंडें जाला ॥२॥
देह तंव जाणार । घडेल हा परउपकार ॥३॥
येरू म्हणे मनीं । ऐसें जावें समजोनि ॥४॥
गांठी पडली ठका ठका । त्याचे वर्म जाणे तुका ॥५॥


३८७१
वाचाळ लटिके अभक्त जे खळ । आपुलें तें बळ वाखानावे ॥१॥
बळें हुंबरती सत्य त्यां न कळे । नुघडती डोळे अंधळ्यांचे ॥२॥
आसुडिल्या माना हात पाय नेटें । तंव भार बोटें उचलिला ॥३॥
लटिका चि आम्हीं सीण केला देवा । कळों आलें तेव्हां सकळांसि ॥४॥
आलें कळों तुका म्हणे अनुभवें । मग अहंभावें सांडवलीं ॥५॥


२४२३
वाचेचिया आळा कविळलें ब्रम्ह । चुकविला श्रम पृथक तो ॥१॥
सुलभ झालें सुलभ झालें । जवळी आलें पंढरिये ॥ध्रु.॥
नामरूपाचें बांधलें मोटळें । एक एका वेळे सारियेलें ॥२॥
तुका म्हणे वाटे चुकली वसती । उधार तो हातीं आणियेला ॥३॥


१७९७
वाचाचापल्ये बहु जालों कुशळ । नाहीं बीजमूळ हाता आलें ॥१॥
म्हणोनि पंढरिराया दुखी होतें मन । अंतरींचे कोण जाणे माझें ॥ध्रु.॥
पूज्य जालों अंगा आला अभिमान । पुढील कारण खोळंबलें ॥२॥
तुका म्हणे खूण न कळे चि निरुती । सांपडलों हातीं अहंकाराचे ॥३॥


२०६८
वाचे विठ्ठल नाहीं । तोचि प्रेतरूप पाहीं ॥१॥
धिग त्याचें ज्यालेपण । भार न साहे मेदिन ॥ध्रु.॥
न बैसे कीर्तनीं । गुण नाइके जो कानीं ॥२॥
जातां कांटाळे देउळा । तोचि सुना मुखकाळा ॥३॥
हरीभक्तीविण । त्याचें जळो शाहाणपण ॥४॥
तुका म्हणे तेणें । वंशा आणियेलें उणें ॥५॥


२९९
वाजतील तुरें । येणें आनंदें गजरें ॥१॥
जिंकोनियां अहंकार । पावटणी केलें शिर ॥ध्रु.॥
काळा नाहीं वाव । परिश्रमा कोठें ठाव ॥२॥
तुका म्हणे आतां । सोपें वैकुंठासी जातां ॥३॥


११९४
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥
ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥
चातक पाखरूं। त्यासी वर्षे मेघधारु ॥२॥
पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास॥३॥
तुका म्हणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥४॥


३०१७
वांझेनें दाविलें गऱ्हवार लक्षण । चिरगुटें घालून वाथयाला ॥१॥
तेवीं शब्द झनी करिती चावटी । ज्ञान पोटासाठी विकूनियां ॥ध्रु.॥
बोलाचि च कढी बोलाचा चि भात । जेवुनियां तृप्त कोण झाला ॥२॥
कागदीं लिहितां नामाची साकर । चाटितां मधुर गोडी नेदी ॥३॥
तुका म्हणे जळो जळो ते महंती । नाहीं लाज चित्तीं निसुगाला ॥४॥


२४००
वाट दावी त्याचें गेलें काय । नागवला जो वारितां जाय ॥१॥
ऐसीं मागें ठकलीं किती । सांगतां खाती विषगोळा॥ध्रु.॥
विचारोनि पाहे त्यास । न वजे जीवा नव्हे नास ॥२॥
तुका म्हणे जो रुसला जीवा । तयासी केशवा काय चाले ॥३॥


३९७०
वाट पाहें वाहे निडळीं ठेवुनियां हात । पंढरीचे वाटे दृष्टी लागलें चित्त ॥१॥
कई येतां देखें माझा मायबाप । घटिका बोटें दिवस लेखीं धरूनियां माप ॥ध्रु.॥
डावा डोळा लवे उजवी स्फुरतसे बाहे । मन उतावळि भाव सांडुनियां देहे ॥२॥
सुखसेज गोडचित्तीं न लगे आणीक । नाठवे घर दार तहान पळाली भूक ॥३॥
तुका म्हणे धन्य दिवस ऐसा तो कोण । पंढरीचे वाटे येतां मूळ देखेन ॥४॥


१६८१
वाट पाहें हरी कां नये आझूनि । निष्ठुर कां मनीं धरियेलें ॥१॥
काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥
नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥२॥
नाही कळों आलें अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥३॥
बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कुरवाळिलें ॥४॥
तुका म्हणे देई एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होईल मग ॥५॥


५७९
वाट वैकुंठीं पाहाती । भक्त कैं पां येथें येती । तयां जन्ममरणखंती । नाहीं चित्तीं परलोक ॥१॥
धन्यधन्य हरीचे दास। तयां सुलभ गर्भवास । ब्रह्मादिक करिती आस । तीर्थावास भेटीची ॥ध्रु.॥
कथाश्रवण व्हावयास । यमधर्मा थोर आस । पाहे रात्रदिवस। वाट कर जोडोनियां ॥२॥
रिद्धिसिद्धी न पाचारितां । त्या धुंडिती हरीभक्तां । मोक्ष सायोज्यता । वाट पाहे भक्तांची ॥३॥
असती जेथें उभे ठेले । सदा प्रेमसुखें धाले । आणीक ही उद्धरिले । महादोषी चांडाळ ॥४॥
सकळ करिती त्यांची आस । सर्वभावें ते उदास । धन्यभाग्य त्यांस । तुका म्हणे दरुषणें ॥५॥


५३२
वांटा घेई लवकरि । मागें अंतरसी दुरी । केली भरोवरी। सार नेती आणीक ॥१॥
ऐसीं भांमावलीं किती । काय जाणों नेणों किती । समय नेणती । माथां भार वाहोनि ॥ध्रु.॥
नाहीं सरलें तोंवरी । धांव घेई वेग करीं । घेतलें पदरीं । फावलें तें आपुलें ॥२॥
फट लंडी म्हणे तुका । एक न साहावे धका । तरि च या सुखा । मग कैसा पावसी ॥३॥


४४२
वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउलें कइं वो डोळां ॥१॥
तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी ॥२॥
कांभा मोकलिल्ये कोना निरविले । कठिन कैसे जाले हृदय तुजे ॥३॥ तुका म्हणे माझ्या असांवल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा ॥४॥


१००२
वाटे या जनाचें थोर बा आश्चर्य । न करिती विचार कां हिताचा ॥१॥
कोण दम ऐसा आहे यांचे पोटीं । येईल शेवटीं कोण कामा ॥ध्रु.॥
काय मानुनियां राहिले निंश्चिती । काय जाब देती यमदूतां ॥२॥
कां हीं विसरलीं मरण बापुडीं । काय यांसी गोडी लागलीसे ॥३॥
काय हातीं नाहीं करील तयासी । काय जालें यांसी काय जाणों ॥४॥
कां हीं नाठविती देवकीनंदना । सुटाया बंधनापासूनियां ॥५॥
काय मोल यासी लागे धन वित्त । कां हें यांचें चित्त घेत नाहीं ॥६॥
तुका म्हणे कां हीं भोगितील खाणी । कां त्या चक्रपाणी विसरती ॥७॥


८९८
वाढलियां मान न मनावी निश्चिती । भूतांचिये प्रीती भूतपण ॥१॥
म्हणऊनि मना लावावी कांचणी । इंद्रियांचे झणी ओढी भरे ॥ध्रु.॥
एका एकपणें एकाचिये अंगीं । लागे रंग रंगीं मिळलिया ॥२॥
तुका म्हणे देव निष्काम निराळा । जीवदशे चाळा चळणांचा ॥३॥


२७७७
वाढवावा पुढें आणीक प्रकार । एक चि तें फार रुचि नेदी ॥१॥
निंच नवें लेणें देह हा पवाडा । पालट रोकडा वरावरी ॥ध्रु.॥
दिसे शोभिवंत सेवेनें सेवक । स्वामीची ते लोकत्रयीं कीर्ति ॥२॥
तुका म्हणे आजी पाववा संतोष । करुनि कीर्तिघोष नाचईंन ॥३॥


२४२१
वाढविलें कां गा । तुम्ही एवढें पांडुरंगा ॥१॥
काय होती मज चाड । एवढी करावया बडबड ॥ध्रु.॥
ब्रम्हसंतर्पण । लोकीं करावें कीर्तन ॥२॥
निमित्याचा धणी । तुका म्हणे नेणे कोणी ॥३॥


२७२४
वांयां ऐसा जन्म गेला । हें विठ्ठला दुःख वाटे ॥१॥
नाहीं सरता झालों पायीं । तुम्ही जई न पुसा ॥ध्रु.॥
कां मी जीतों संवसारीं । अद्यापवरी भूमिभार ॥२॥
तुका म्हणे पंढरिनाथा । सबळ व्यथा भवरोग ॥३॥


६५१
वांयां जातों देवा । नेणें भक्ती करूं सेवा ॥१॥
आतां जोडोनियां हात । उभा राहिलों निवांत ॥ध्रु.॥
करावें तें काय । न कळें अवलोकितों पाय ॥२॥
तुका म्हणे दान । दिलें पदरीं घेईन ॥३॥


२७९१
वांयां जाय ऐसा । आतां उगवावा फांसा ॥१॥
माझें परिसावें गाऱ्हाणें । सुखदुःखाचीं वचनें ॥ध्रु.॥
हाचि आम्हां ठाव । पायीं निरोपाया भाव ॥२॥
तुका म्हणे जार । तुझा तुज देवा भार ॥३॥


३८९१
वांयां तैसे बोल हरीशीं अंतर । केले होती चार भयभेदें ॥१॥
भेदभय गेलें नोळखे आपणा । भेटी नारायणा कंसा झाली ॥२॥
झाली भेटी कंसा हरीशीं निकट । सन्मुख चि नीट येरयेरां ॥३॥
येरयेरां भेटी युद्धाच्या प्रसंगीं । त्याचें शस्त्र अंगीं हाणितलें ॥४॥
त्याचें वर्म होतें ठावें या अनंता । तुका म्हणे सत्तानायक हा ॥५॥


२४१६
वांयांविण वाढविला हा लौकिक । आणिला लटिक वाद दोघां ॥१॥
नाहीं ऐसा जाला देव माझ्या मतें । भुकेलें जेवितें काय जाणे ॥ध्रु.॥
शब्दज्ञानें गौरविली हे वैखरी । साच तें अंतरीं बिंबे चि ना ॥२॥
जालों परदेशी गेले दोन्ही ठाय । संसार ना पाय तुझे देवा ॥३॥
तुका म्हणे मागें कळों येतें ऐसें । न घेतों हें पिसें लावूनियां ॥४॥


२४३९
वारकरी पायांपाशीं । आले त्यांसी विनविलें ॥१॥
काय काय तें आइका । विसरों नका रंकासी ॥ध्रु.॥
चिंतावोनि चिंता केली । हे राहिली अवस्था ॥२॥
तुका म्हणे संसारा । रुसलों खरा यासाठीं ॥३॥


२३३२
वारंवार तुज द्यावया आठव । ऐक तो भाव माझा कैसा॥१॥
गेला मग नये फिरोन दिवस । पुडिलांची आस गणित नाहीं ॥ध्रु.॥
गुणां अवगुणांचे पडती आघात । तेणें होय चित्त कासावीस ॥२॥
कांहीं एक तुझा न देखों आधार । म्हणऊनी धीर नाहीं जीवा ॥३॥
तुका म्हणे तूं ब्रम्हांडाचा जीव । तरी कां आम्ही कींव भाकीतसों ॥४॥


२९२१
वारंवार हाचि न पडावा विसर । बसावें अंतर तुमच्या गुणीं ॥१॥
इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ध्रु.॥
लाभाचिये वोढी उताविळे मन । त्यापरि चिंतन चरणाचें ॥२॥
तुका म्हणे जीवी जीवन ओलावा । पांडुरंगे दावा शीघ्र आतां ॥३॥


२४०५
वाराणसी गया पाहिली द्वारका । परी नये तुका पंढरीच्या ॥१॥
पंढरीसी नाहीं कोणा अभिमान । पायां पडे जन एकमेका ॥२॥
तुका म्हणे जाय एकवेळ पंढरी । तयाचिये घरीं यम न ये ॥३॥


३४६४
वारितां बळें धरितां हातीं । जुलुमें जाती नरकामधीं ॥१॥
रंडीदासाप्रति कांहीं । उपदेश तो ही चालेना ॥ध्रु.॥
जन्म केला वाताहात । थोर घात येठायीं ॥२॥
तुका म्हणे पंढरीनाथा । तुझी कथा दूषीती ॥३॥


२००२
वारिलें लिगाड । बहुदिसांचें हें जाड ॥१॥
न बोलावें ऐसें केलें । काहीं वाउगें तितुलें ॥ध्रु.॥
जाला चौघांचार । गेला खंडोनि वेव्हार ॥२॥
तुका म्हणे देवा । करीन ते घ्यावी सेवा॥३॥


३८९७
वास नारायणें केला मथुरेसि । वधूनि दुष्टांसि तये ठायीं ॥१॥
ठायीं पितियाचे मानी उग्रसेना । प्रतिपाळ जनांसहित लोकां ॥२॥
लोकां दुःख नाहीं मागील आठव । देखियेला देव दृष्टी त्यांणीं ॥३॥
देखोनियां देवा विसरलीं कंसा । ठावा नाहीं ऐसा होता येथें ॥४॥
येथें दुजा कोणी नाहीं कृष्णाविणें । ऐसें वाटे मनें काया वाचा ॥५॥
काया वाचा मन कृष्णीं रत झालें । सकळां लागलें कृष्णध्यान ॥६॥
ध्यान गोविंदाचें लागलें या लोकां । निर्भर हे तुका म्हणे चित्ती ॥७॥


५८७
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥१॥
या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥
सर्वकाळ हाचि करणें विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥२॥
तुका म्हणे जों जों भजनासी वळे । अंग तों तों कळे सन्निधता ॥३॥


२०९९
वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥१॥
माझी शक्ती नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥
आम्हां ओढी काळ। तुझें क्षीण झालें बळ ॥२॥
तुका म्हणे गोडी । जीवा मातेचिया ओढी ॥३॥


१८४१
वाळूनियां जन सांडी मज दुरी । करिसील हरी ऐसें कधीं ॥१॥
आठवीन पाय धरूनि अनुताप । वाहे जळ झोंप नाहीं डोळां ॥ध्रु.॥
नावडती जीवा आणीक प्रकार । आवडी ते फार एकांताची ॥२॥
तुका म्हणे ऐसी धरितों वासना । होइप नारायणा साह्य मज ॥३॥


३४२२
वाळो जन मज म्हणोत शिंदळी । परि हा वनमाळी न विसंबें ॥१॥
सांडूनि लौकिक झालियें उदास । नाहीं भय आस जीवित्वाची ॥२॥
नाइकें वचन बोलतां या लोकां । म्हणे झाले तुका हरीरत ॥३॥


वि विं वी
३४८४
विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥
हा तो निवाड्याचा ठाव । खरा खोटा निवडो भाव ॥ध्रु.॥
गऱ्हवारे हा विधि । पोट वाढविलें चिंधीं ॥२॥
लावूं जाणे विल्हे । तुका साच आणिक कल्हे ॥३॥


३१८५
विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥१॥
कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥
शेष स्तुती प्रवर्तला । जिव्हा चिरूनि पलंग झाला ॥२॥
तुका म्हणे सत्ता । ज्याची काळाचिये माथा ॥३॥


२३११
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥१॥
केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥
मधुरा उत्तरीं । रांवा खेळे उरावरी ॥२॥
तुका म्हणे रेडा । सुखें जाती ऐशा पीडा ॥३॥


३७७०
विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥
एकांती एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥
तर्कवितर्किणी दुराविल्या दुरी । मौन त्या परिचारी आरंभिलें ॥३॥
कुशळा कवित्या कथित्या लोभिका । त्या ही येथें नका आम्हांपाशीं ॥४॥
बोलक्या वाचाळा कृष्णरता नाहीं । यां चोरोनि तींहीं खेट केली ॥५॥
भेऊनियां जना एकी सवा झाल्या । वाती विझविल्या दाटोबळें ॥६॥
कृष्णसुख नाहीं कळलें मानसीं । निंदिती त्या त्यासी कृष्णरता ॥७॥
तो नये जवळी देखोनि कोल्हाळ । म्हणउनि समेळ मेळविला ॥८॥
अंतरीं कोमळा बाहेरी निर्मळा । तल्लीन त्या बाळा कृष्णध्यानीं ॥९॥
हरीरूपीं दृष्टि कानीं त्याची गोष्टी । आळंगिती कंठीं एका एकी ॥१०॥
न साहे वियोग करिती रोदना । भ्रमिष्ट भावना देहाचिया ॥११॥
विसरल्या मागें गृह सुत पती । अवस्था याचिती गोविंदाची ॥१२॥
अवस्था लागोनि निवळ चि ठेल्या । एका एकी झाल्या कृष्णरूपा ॥१३॥
कृष्ण म्हणोवूनी देती आलिंगन । विरहताप तेणें निवारेना ॥१४॥
ताप कोण वारी गोविंदावांचूनि । साच तो नयनीं न देखतां ॥१५॥
न देखतां त्यांचा प्राण रिघों पाहे । आजि कामास ये उशिर केला ॥१६॥
रित्या ज्ञानगोष्टी तयां नावडती । आळिंगण प्रीती कृष्णाचिया ॥१७॥
मागें कांहीं आम्ही चुकलों त्याची सेवा । असेल या देवा राग आला ॥१८॥
आठविती मागें पापपुण्यदोष । परिहार एकीस एक देती ॥१९॥
अनुतापें झाल्या संतप्त त्या बाळा । टाकुनि विव्हळा धरणी अंग ॥२०॥
जाणोनि चरित्र जवळी च होता । आली त्या अनंता कृपा मग ॥२१॥
होउनी प्रगट दाखविलें रूप । तापत्रय ताप निवविले ॥२२॥
निवाल्या देखोनि कृष्णाचें श्रीमुख । शोक मोह दुःख दुरावला ॥२३॥
साच भाव त्यांचा आणुनियां मना । आळंगितो राणा वैकुंठींचा ॥२४॥
हरीअंगसंगें हरीरूप झाल्या । बोलों विसरल्या तया सुखा ॥२५॥
व्यभिचारभावें भोगिलें अनंता । वर्तोनि असतां घराचारी ॥२६॥
सकळा चोरोनि हरी जयां चित्ती । धन्य त्या नांदती तयामध्यें ॥२७॥
उणें पुरें त्यांचें पडों नेंदी कांहीं । राखे सर्वां ठायीं देव तयां ॥२८॥
न कळे लाघव ब्रम्हादिकां भाव । भक्तिभावें देव केला तैसा ॥२९॥
तुका म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार । साधिलें अपार निजसुख ॥३०॥


७९३
विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥
वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥
सौभाग्यसंपन्न हो कां वृद्ध प्रतिष्ठ । चिकरूनि सांडी पायां लागली ते विष्ठ ॥२॥
नाहीं याति कुळ फांसे ओढी तयासी । तुका म्हणे काय मुद्रासोंग जाळिसी ॥३॥


३६५
विचारा वांचून । न पावीजे समाधान ॥१॥
देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥
देवाचिये चाडे । देवा द्यावें जें जें घडे ॥२॥
तुका म्हणे होतें । बहु गोमटें उचितें ॥३॥


७ २५१५
विचारिलें आधीं आपुल्या मानसीं । वांचों येथें कैसीं कोण्या द्वारें ॥१॥
तंव जाला साह्य हृदयनिवासी । बुद्धी दिली ऐसी नास नाहीं ॥ध्रु.॥
उद्वेगाचे होतों पडिलों समुद्रीं । कोण रीती तरी पाविजेल ॥२॥
तुका म्हणे दुःखें आला आयुर्भाव । जाला बहु जीव कासावीस ॥३॥


१९७
वीट नेघे ऐसें रांधा । जेणें बाधा उपजे ना ॥१॥
तरीच तें गोड राहे । निरें पाहे स्वयंभ ॥ध्रु.॥
आणिकां गुणां पोटीं वाव । दावी भाव आपुला ॥२॥
तुका म्हणे शुद्ध जाती । ते मागुती परतेना ॥३॥


११५५
विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥
खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥
तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥२॥
तुका म्हणे देवें । पूतना शोषियेली जीवें ॥३॥


६२३
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥
गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुद्धी करुनी ठेवा ॥ध्रु.॥
विचाराचें कांहीं करारे स्वहित । पापपुण्यांतीत भांडवल ॥२॥
तुका म्हणे न लगे जावें वनांतरा । विश्व विश्वंभरा सारिखेंचि ॥३॥


७०३
विठोबा विसांविया विसांविया । पडों देई पायां ॥१॥
बहु खेद क्षीण । आलों सोसुनियां वन ॥ध्रु.॥
बहुतां काकुलती । आलों सोसिली फजिती ॥२॥
केली तुजसाठी । तुका म्हणे येवढी आटी ॥३॥


३१४०
विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरती ॥१॥
विठ्ठलविठ्ठल भावें म्हणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंची ॥ध्रु.॥
बहुत तारिले सांगों किती आतां । ऐसा कोणी दाता दुजा नाहीं ॥२॥
तुका म्हणे म्यां ही ऐकोनियां कीर्ती । धरिला एकांतीं हृदयामाजी ॥३॥


५७८
विठो सांपडावया हातीं । ठावी झाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥१॥
लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥
एकलिया भावबळें । कैं सांपडे तो काळें । वैष्णवांच्या मेळें। उभा ठाके हाकेसी ॥२॥
बांधा माझिया जीवासी । तुका म्हणे प्रेमपाशीं । न सोडीं तयासी । सर्वस्वासी उदार ॥३॥


४०१५
विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान ।
विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥
विठ्ठल कुळींचें दैवत। विठ्ठल वित्त गोत ।
विठ्ठल पुण्य पुरुषार्थ । आवडे मात विठ्ठलाची ॥२॥
विठ्ठल विस्तारला जनीं । सप्त ही पाताळें भरूनी ।
विठ्ठल व्यापक त्रिभुवनीं । विठ्ठल मुनिमानसीं ॥३॥
विठ्ठल जीवाचा जिव्हाळा। विठ्ठल कृपेचा कोंवळा ।
विठ्ठल प्रेमाचा पुतळा। लावियेलें चाळा । विश्व विठ्ठलें ॥४॥
विठ्ठल बाप माय चुलता । विठ्ठल भगिनी आणि भ्राता ।
विठ्ठलेंविण चाड नाहीं गोता । तुका म्हणे आतां नाहीं दुसरें ॥५॥


२१७९
विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा॥१॥
मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥
उभयकुळींसाक्ष। तूं चि माझा मातुळपक्ष ॥२॥
समर्पीली काया । तुका म्हणे पंढरिराया॥३॥


३९५०
विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती॥१॥
तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥
बैसोनि हरीकथेसी । होय सावध चित्तासी ॥२॥
तुका म्हणे त्याचा जन्म । सुफळ झाला भवश्रम ॥३॥


५७७
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥
अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥
तोचि शरणागतां हा विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संतांसमागमें ॥२॥
विठ्ठल गुणनिधि विठ्ठल सर्व सिद्धी। लागली समाधि विठ्ठलनामें ॥३॥
विठ्ठलाचें नाम घेतां जालें सुख। गोडावलें मुख तुका म्हणे ॥४॥


६८४
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥
विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥
विठ्ठल जागृतिस्वप्नी सुषुप्ति । आन दुजें नेणती विठ्ठलेंविण ॥२॥
भूषण अळंकार सुखाचे प्रकार । विठ्ठल निर्धार जयां नरां ॥३॥
तुका म्हणे ते ही विठ्ठल चि जाले । संकल्प मुराले दुजेपणें ॥४॥


१६४५
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥
विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥
विठ्ठल नाद विठ्ठल भेद । विठ्ठल छंद विठ्ठल ॥२॥
विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा। तुकया मुखा विठ्ठल ॥३॥


२२६९
विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥
तयासी बोलतां होईल विटाळ । नव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥
विठ्ठलनामाची नाहीं ज्या आवडी । त्याची काळ घडी लेखिताहे ॥२॥
तुका म्हणे मज विठोबाची आण। जरी प्रतिवचन करिन त्यासी ॥३॥


३९१
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥१॥
कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥
न पाहे सिदोरी । जाती कुळ न विचारी ॥२॥
तुका म्हणे भेटी । हाका देतां उठाउठीं ॥३॥


४०६९
विठ्ठल भीमातीरवासी । विठ्ठल पंढरीनिवासी । विठ्ठल पुंडलिकापासीं । कृपादानाविसीं उदार ॥१॥
विठ्ठल स्मरणा कोंवळा। विठ्ठल गौरवीं आगळा । आधार ब्रम्हांडा सकळा । विठ्ठल लीळाविग्रही ॥ध्रु.॥
उभा चि परी न मनी सीण । नाहीं उद्धरितां भिन्न । समर्थाचे घरीं एक अन्न । आर्तभूता क्षणोक्षणा सांभाळी ॥२॥
रुचीचे प्रकार। आणिताती आदरें । कोठें ही न पडे अंतर । थोरां थोर धाकुटया धाकुटा ॥३॥
करितां बळ धरितां नये । झोंबतां डोळे मनें च होय। आपुल्या उद्देशाची सोय । जाणे हृदयनिवासी ॥४॥
पान्हा तरी आल्या अंतर तेथें । तों नाहीं भरिलें रितें । करितों सेवन आइतें । तुका म्हणे चित्तें चित्त मेळवूनी ॥५॥


१०८८
विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा ॥१॥
विठ्ठल माझा गुरु विठ्ठल माझा तारूं । उतरील पारु भवनदीचा ॥ध्रु.॥
विठ्ठल माझी माता विठ्ठल माझा पिता । विठ्ठल चुलता बहिणी बंधु ॥२॥
विठ्ठल हे जन विठ्ठल माझें मन । सोईरा सज्जन विठ्ठल माझा ॥३॥
तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा । त्वरित गांवा जाइन त्याच्या ॥४॥


२०४८
विठ्ठल माझी माय । आम्हां सुखा उणें काय ॥१॥
घेतों अमृताची धनी । प्रेम वोसंडलें स्तनीं ॥ध्रु.॥
क्रीडों वैष्णवांच्या मेळीं । करूं आनंदाच्या जळीं ॥२॥
तुका म्हणे कृपावंत । ठेवीं आम्हांपाशीं चित्त ॥३॥


२०६५
विठ्ठल मुक्तीदाता । नव्हे मरो हें बोलता ॥१॥
मज न साहावें कानीं । विष उत्तर लागे मनीं ॥ध्रु.॥
हरीकथेतें धीकारी । शत्रु माझा तो वैरी ॥२॥
सुना काळतोंडा । जो या देवा म्हणे धोंडा॥३॥
अहं म्हणे ब्रम्ह । नेणे भक्तीचें तें वर्म ॥४॥
तुका म्हणे क्षण। नको तयाचें दर्शन ॥५॥


१०६४
विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा । करी पापा निर्मूळ ॥१॥
भाग्यवंता छंद मनीं । कोड कानीं ऐकती ॥ध्रु.॥
विठ्ठल हें दैवत भोळें। चाड काळें न धरावी ॥२॥
तुका म्हणे भलते याती । विठ्ठल चित्तीं तो धन्य ॥३॥


१०९३
विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥१॥
वाये टाळ टाळ्याटाळी । होईल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥
विठ्ठल आदी अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥
तुका म्हणे विठ्ठलवाणी। वदा कानीं आईका ॥३॥


२२५
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥
सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥
माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकिळकांसी ॥२॥
संत महंत सिद्ध महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥
माझिये माहेरीं सुखा काय उणें। न लगे येणें जाणें तुका म्हणे ॥४॥


४९७
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥
विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥
बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥२॥
सकळां इंद्रियां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥३॥
तुका म्हणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥४॥


१०६३
विठ्ठल हाचित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥
आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥
विठ्ठल हे वाणी। अमृत हे संजिवनी ॥२॥
रंगला या रंगें । तुका विठ्ठल सर्वांगें ॥३॥


३१९
विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव जगाचा या ॥१॥
विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥
विठ्ठला रे तुझें नाम बहु गोड । विठ्ठला रे कोड पुरविसी ॥२॥
विठ्ठला रे तुझें श्रीमुख चांगलें । विठ्ठला लागलें ध्यान मनीं ॥३॥
विठ्ठला रे वाचे बोला बहुरस । विठ्ठला रे सास घेतला जीवें ॥४॥
विठ्ठला रे शोक करीतसे तुका । विठ्ठला तूं ये कां झडकरी ॥५॥


३०२६
विठ्ठलावांचोनि ब्रम्ह जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥१॥
विठ्ठलावांचूनि ज्या ज्या उपासना । अवघा चि जाणा सम्रचि तो ॥ध्रु.॥
विठ्ठलावांचूनि सांगतील गोष्टी । वांयां ते हिंपुटी होती जाणा ॥२॥
विठ्ठलांवाचूनि जें कांहीं जाणती । तितुल्या वित्पत्ती वाउगीया ॥३॥
तुका म्हणे एक विठ्ठल चि खरा । येर तो पसारा वाउगा चि ॥४॥


१२७८
विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥१॥
कारे कृपाळू न होसी । काय जाले मज विशी ॥ध्रु.॥
जाल्या येरझारा । जन्मां बहुतांचा फेरा ॥२॥
तुका म्हणे नष्टा । अबोलण्या तुझ्या चेष्टा ॥३॥


२१३४
वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥
जळो त्याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥
अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥२॥
तुका म्हणे नरका जावें । हाचि जीवें व्यापार ॥३॥


३२२९
विद्या अल्प परि गर्वशिरोमणि । मजहुनि ज्ञानी कोणी आहे ॥१॥
अंगीं भरे ताठा कोणाते मानीना । साधूची हेळणा स्वयें करी ॥ध्रु.॥
साधूचे देहींचा मानी जो विटाळ । त्रैलोकीं चांडाळ तोचि एक ॥२॥
संतांची जो निंदा करी मुखीं जपे । खतेलें तें पाप वज्रलेप ॥३॥
तुका म्हणे ऐसे मावेचे मइंद । त्यांपाशीं गोविंद नाहीं नाहीं ॥४॥


१७४
विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥
मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥
बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥२॥
तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥३॥


३९१३
विनंति घातली अवधारीं । मज देई वो अभय करीं । पीडिलों खेचरीं । आणीक वारी नांवांची ॥१॥
रंगा येई वो । एकला रंग वोढवला । हरीनामें उठिला । गजर केला हाकारा ॥ध्रु.॥
देवांचे दैवते । तुज नमिलें आदिनाथे । ये वो कृपावंते । भोगा माझ्या धांवत ॥२॥
न लवीं आतां वेळ । आइत सारिली सकळ । तुका म्हणे कुळ । आमुचिये दैवते ॥३॥


२७९९
विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरी ॥१॥
आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥
मागें सारियेली युक्ती । कांहीं होती जवळी ते ॥२॥
निराशेची न करी आस । तुका दास माघारी ॥३॥


३५४५
विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥
धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥ध्रु.॥
जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥२॥
जैसे तैसे माझे बोल अंगीकारीं । बोबडा उत्तरीं गौरवितों ॥३॥
तुका म्हणे विटेवरी जी पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥४॥


२९८९
विनवितों चतुरा तुज विश्वंभरा । परियेसी दातारा पांडुरंगा ॥१॥
तुझे दास ऐसें जगीं वाखाणिलें । आतां नव्हे भलें मोकलितां ॥ध्रु.॥
माझे गुणदोष कोण जाणे मात । पावनपतित नाम तुझें ॥२॥
लोभ मोह माया आम्हां बांधवितां । तरि हा अनंता बोल कोणा ॥३॥
तुका म्हणे मी तों पतित चि खरा । परि आलों दातारा शरण तुज ॥४॥


१३१०
विनवितों तरी आणितोसि परी । याचकानें थोरी दातयाची ॥१॥
आमुचे ही कांहीं असों द्या उपकार । एकल्यानें थोर कैचे तुम्ही ॥ध्रु.॥
न घ्यावी जी कांहीं बहु साल सेवा । गौरव तो देवा यत्न कीजे ॥२॥
तुका म्हणे नाहीं आमुची मिरासी । असावेंसी ऐसीं दुर्बळें चि ॥३॥


२५५१
विनवितों शेवटीं । आहे तैसें माझे पोटीं ॥१॥
कंठीं राहावें राहावें । हें चि मागतसें भावें ॥ध्रु.॥
पुरली वासना । येणें होईल नारायणा ॥२॥
तुका म्हणे जो देहाडा । तोचि वर्णीन पवाडा ॥३॥


१५१६
विभ्रंशिली बुद्धि देहांती जवळी । काळाची अवकाळीं वायचाळा ॥१॥
पालटलें जैसें देंठ सांडी पान । पिकलें आपण यातपरी ॥ध्रु.॥
न मारितां हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥२॥
तुका म्हणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥३॥


३५८८
वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं ॥१॥
विसरु न पडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥ध्रु.॥
कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिकें॥२॥
निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥३॥
तुका म्हणे हित चित्तें ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥४॥


३७९२
विरहतापें फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें चि दुश्चिती ।
न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे कुळाहुनिया ती वो॥१॥
खुंटलीसी झाली येथें अवघियांची गती । आपुलीं परावीं कोण नेणें भोंवती ।
त्यांचीं नांवें बोभे अहो अहो श्रीपती । नवलाव हा येरां वाटोनियां हांसती ॥ध्रु.॥
बाहेरी च धांवे रानां न धरी च घर । न कळे बंधना झाला तेणें संचार ।
विसरूनि गेली सासुरें की माहेर । एका अवलोकी एका पडिला विसर ॥२॥
तुका म्हणे तुम्ही अवघ्या राहा निश्चळा । न ये आतां येऊं येथें सर्वथा बळा ।
त्याचा त्याच्या मुखें अवघाची निर्वाळा । बहुतां मतें येथें तर्कवाद निराळा वो॥३॥


८३८
विरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥
म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥
देहाची भावना वासनेचा संग । नावडे उबग आला यांचा ॥२॥
तुका म्हणे देव अंतरे यामुळें । आशामोहोजाळें दुःख वाढे ॥३॥


२३१८
विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥
जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥
जें जें वाटे गोड । तैसें पुरवितो कोड ॥२॥
तुका म्हणे भेटी । कांहीं पडों नेदी तुटी ॥३॥


३२८
विश्वव्यापी माया । तिणें झाकुळिलें छाया ॥१॥
सत्य गेलें भोळ्यावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥
आपुलें चि मन । करवी आपणां बंधन ॥२॥
तुका म्हणे देवा । तुम्ही कोडीं हीं उगवा ॥३॥


७८
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥१॥
ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥
निष्काम निराळा । गोपी लावियेल्या चाळा ॥२॥
तुका म्हणे आलें । रूपा अव्यक्त चांगलें ॥३॥


२६६२
विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥१॥
माझी वदवितो वाणी । जेणें धरिली धरणी ॥ध्रु.॥
जोडिलीं अक्षरें । नव्हेती बुद्धीच्या विचारे ॥२॥
नाहीं केली आटी । कांहीं मानदंभासाठी ॥३॥
कोणी भाग्यवंत । तया कळेल उचित ॥४॥
तुका म्हणे झरा । आहे मुळींचा चि खरा ॥५॥


२९६६
विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥१॥
तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा ॥ध्रु.॥
न कळे हें मज साच चाळविलें । देसी तें उगलें घेइन देवा ॥२॥
मागणें तें सरे ऐसें करीं देवा । नाहीं तरी सेवा सांगा पुढें ॥३॥
करावें कांहीं कीं पाहावें उगलें । तुका म्हणे बोलें पांडुरंगा ॥४॥


२५५९
विश्वासिया नाहीं लागत सायास । अनायासें रसा अंगा येतो ॥१॥
लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥
गौरव त्या मानी आरुषा वचनीं । भूषण ते वाणी मिरवावी ॥२॥
तुका म्हणे आहेस सकळ ही साक्षी । माझा कईपक्षी पांडुरंग ॥३॥


२९०७
विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥
जगीं जगदीश । शास्त्रें वदती सावकाश ॥ध्रु.॥
व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥२॥
जनीं जनार्दन । संत बोलती वचनें ॥३॥
सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥४॥


१२६७
विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा ॥१॥
पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥
चंदन प्रिय वासें । आवडे तें जातीऐसें ॥२॥
तुका म्हणे दाणा । कुचर मिळों नये अन्ना ॥३॥


२९०५
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥
मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्योग ॥ध्रु.॥
होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास । तेव्हां लटिके दोष । योगें अनुतापाच्या ॥२॥
तुका म्हणे आहे । बुद्धी केलियानें साहे । जवळी च पाहें । देव वाट स्मरणाची ॥३॥


२२५४
विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥१॥
म्हणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥
दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ।॥ तुका म्हणे मोकळें मन । नारायण भोगासी ॥३॥


४०२७
विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥
कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ध्रु.॥
बापुडीं होतील सेवटीं । आयुष्यासवें जालिया तुटी । भोगिले मागें पुढे ही कोटी । होईल भेटी जन्मासी ॥२॥
जंतिली घाणां बांधोनि डोळे । मागें जोडी आर तेणेंही पोळे । चालिलों किती तें न कळे । दुःखें हारंबळे भूकतान ॥३॥
एवढें जयाचें निमित्त । प्रारब्ध क्रियमाण संचित । तें हें देह मानुनि अनित्य। न करिती नित्य नामस्मरण ॥४॥
तुका म्हणे न वेंचतां मोल । तो हा यासि महाग विठ्ठल । वेंचितां फुकाचे चि बोल। केवढें खोल अभागिया ॥५॥


१५२८
विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥
शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥
अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥२॥
तुका म्हणे ग्यानगंड । देवा सुख पावो नाड ॥३॥


३२४८
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥
न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥
शिखासूत्र सोंग वरी । दुराचारी दंड पावे ॥२॥
तुका म्हणे अभिमान । नारायणा न सोसे ॥३॥


४४०
विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥१॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठ‍ुर । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥
असिपत्रीं तरुवरखैराचे विंगळ । निघतील ज्वाळ तेलपाकीं ॥२॥
तप्तभूमीवरी लोळविती पाहीं । अग्नीस्तंभ बाहीं कवळविती ॥३॥
म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे आतां योनी गर्भवास ॥४॥


३४८५
विषयीं अद्वये । त्यासी आम्हां सिवो नये ॥१॥
देव तेथुनि निराळा । असे निष्काम वेगळा ॥ध्रु.॥
वासनेची बुंथी । तेथें कैची ब्रह्मस्थिति ॥२॥
तुका म्हणे असतां देहीं । हा जमे ती तेथें नाही जमेतीं ॥३॥


१०३५
विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥
माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥ध्रु.॥
लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥२॥
तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥३॥


२१५०
विष्ठा भक्षी तया अमृत पारिखें । वोंगळसी सखें वोंगळाची ॥१॥
नये पाहों कांहीं गो†हवाडीचा अंत । झणी ठाका संत दुर्जनापें ॥ध्रु.॥
भेंसळीच्या बीजा अमंगळ गुण । उपजवी सीण दरुषणें ॥२॥
तुका म्हणे छी थूं जया घरीं धन । तेथें तें कारण कासयाचें ॥३॥


२३३४
विष्णुदासां भोग । जरी आम्हां पीडी रोग ॥१॥
तरि हें दिसे लाजिरवाणें । काय तुम्हांसी सांगणें ॥ध्रु.॥
आम्हां काळें खावें । बोलिलें तें वांयां जावें ॥२॥
तुका म्हणे दास । आम्ही भोगूं गर्भवास ॥३॥


२१
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
अइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥ध्रु.॥
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वरपूजनाचें ॥२॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ॥३॥


६४४
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥१॥
साधनें संकट सर्वांलागीं शीण । व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥ध्रु.॥
भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥२॥
तुका म्हणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥३॥


३४२६
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥
सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त झाले ॥२॥
मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिर झालें ॥३॥


८०७
वीर विठ्ठलाचे गाढे । कळिकाळ पायां पडे ॥१॥
करिती घोष जयजयकार । जळती दोषांचे डोंगर ॥ध्रु.॥
क्षमा दया शांति । बाण अभंग ते हातीं ॥२॥
तुका म्हणें बळी । ते चि एक भूमंडळीं ॥३॥


वृ वे वै
४२
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥
भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥
देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥२॥
तुका म्हणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥


२७५६
वृत्तीवरी आम्हां येणें काशासाठी । एवढी हे आटी सोसावया ॥१॥
जाणतसां परी नेणते जी देवा । भ्रम चि बरवा राखावा तो ॥ध्रु.॥
मोडूनि क्षरलों अभेदाची मूस । तुम्हां कां अळस वोडवला ॥२॥
तुका म्हणे होई लवकरि उदार । लांबणीचें फार काम नाहीं ॥३॥


२३७६
वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥
येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाहीं गुण दोष अंगा येत ॥ध्रु.॥
आकाश मंडप पृथीवी आसन । रमे तेथें मन क्रीडा करी ॥२॥
कंथाकुमंडलु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु॥३॥
हरीकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार सेवूं रुची ॥४॥
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥५॥


२११५
वेचावें तें जीवें । पूजा घडे ऐशा नावें ॥१॥
बिगारीची ते बिगारी । साक्षी अंतरींचा हरी ॥ध्रु.॥
फळ बीजाऐसें । कार्यकारणासरिसें ॥२॥
तुका म्हणे मान । लवणासारिखें लवण॥३॥


३३६२
वेठी ऐसा भाव । न करी अहाच उपाव ॥१॥
रूप ठसवी न जिवा । अवघा ये च ठायीं हेवा ॥ध्रु.॥
कृपणाचेपरि । लेखा पळनिमिषेवरी ॥२॥
तुका म्हणे असा। संनिध चि जगदीशा ॥३॥


३८६७
वेडावलीं काय करावें या काळीं । म्हणे वनमाळी गोपाळांसि ॥१॥
गोवर्धन धरूं शिरी उचलूनि । म्हणे तुम्ही कोणी भिऊं नका ॥२॥
नका सांडूं कोणी आपला आवांका । मारितां या हाका आरोळिया ॥३॥
अशंकित चित्ते वाटे त्यां खरें । धाकें च ते बरें म्हणती चला ॥४॥
चित्ती धाक परि जवळी अनंत । तुका म्हणे घात होऊं नेदी ॥५॥


२०३३
वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥
देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥
कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥२॥
लेंकरें वित पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥३॥
आपुली शुद्धी जया नाहीं । आणिकांची ते जाणे काई ॥४॥
तुका म्हणे ऐसे जन । नरका जातां राखे कोण ॥५॥


१५५६
वेडें वांकुडें गाईन । परि मी तुझा चि म्हणवीन ॥१॥
मज तारीं दिनानाथा । ब्रीदें साच करीं आता ॥ध्रु.॥
केल्या अपराधांच्या राशीं । म्हणऊनि आलों तुजपाशीं ॥२॥
तुका म्हणे मज तारीं । सांडीं ब्रीद नाहींतरी ॥३॥


२२०५
वेडिया उपचार करितां सोहळे । काय सुख कळे तयासी तें ।
अंधापुढें दीप नाचती नाचणें । भक्तीभावेंविण भक्ती तैसी ॥१॥
तिमाणें राखण ठेवियेलें सेता । घालुनियां माथां चुना तया ।
खादलें म्हणोनि सेवटीं बोंबली । ठायींची भुली कां नेणां रया ॥ध्रु.॥
मुकियापासाव सांगतां पुराण । रोगिया मिष्टान्न काई होय ।
नपुंसका काय करील पिद्मणी । रुचिविण वाणी तैसे होय॥२॥
हात पाय नाहीं करिल तो काई । वृक्षा फळ आहे अमोलिक।
हातां नये तैसा वांयां च तळमळी । भावेंविण भोळीं म्हणे तुका ॥३॥


३१५३
वेद अनंत बोलिला । अर्थ इतुलाचि शोधिला ॥१॥
विठोबासी शरण जावें । निजनिष्ठा नाम गावें ॥ध्रु.॥
सकळशास्त्रांचा विचार । अंतीं इतुलाचि निर्धार ॥२॥
अठरापुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥३॥


१९९४
वेद जया गाती । आम्हां तयाची संगति ॥१॥
नाम धरियेलें कंठीं । अवघा सांटविला पोटीं ॥ध्रु.॥
ॐकाराचें बीज । हातीं आमुचे तें निज ॥२॥
तुका म्हणे बहु मोटें । अणुरणियां धाकुटें ॥३॥


७५१
वेदपुरुष तरि नेती कां वचन । निवडूनि भिन्न दाखविलें ॥१॥
तुझीं वर्में तूं चि दावूनि अनंता । होतोसी नेणता कोण्या गुणें ॥ध्रु.॥
यज्ञाचा भोक्ता तरि कां नव्हे सांग । उणें पडतां अंग क्षोभ घडे ॥२॥
वससी तूं या भूतांचे अंतरीं । तरि कां भेद हरी दावियेला ॥३॥
तपतिर्थाटणें तुझे मूर्तीदान । तरि कां अभिमान आड येतो ॥४॥
आतां क्षमा कीजे विनवितो तुका । देऊनियां हाका उभा द्वारीं ॥५॥


९७०
वेदविहित तुम्ही आइका हो कर्में । बोलतों तीं वर्में संतांपुढे ॥१॥
चारी वर्ण जाले एकाचिये अंगीं । पापपुण्य भागीं विभागिलें ॥ध्रु.॥
प्रथम पाउलीं पावविला पंथ । आदि मध्य अंत भेद नाहीं ॥२॥
आंबे बोरी वड बाभुळा चंदन । गुणागुणें भिन्न अग्नी एक ॥३॥
तुका म्हणे मन उन्मन जों होय । तोंवरी हे सोय विधि पाळीं ॥४॥


२१२६
वेद शास्त्र नाहीं पुराण प्रमाण । तयाचें वदन नावलोका॥१॥
तार्किकाचे अंग आपणा पारिखें । माजि†यासारिखें वाईचाळे ॥ध्रु.॥
माता निंदी तया कोण तो आधार । भंगलें खापर याच नावें ॥२॥
तुका म्हणे आडराणें ज्याची चाली । तयाची ते बोली मिठेंविण ॥३॥


२१८०
वेदाचा तो अर्थ आम्हांसी च ठावा । येरांनी वाहावा भार माथां ॥१॥
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं । भार धन वाही मजुरीचें ॥ध्रु.॥
उत्पित्तपाळणसंहाराचें निज । जेणें नेलें बीज त्याचे हातीं ॥२॥
तुका म्हणे आम्हा सापडले मूळ । आपणची आले हाती ॥३॥


१७३
वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येर ॥१॥
विठोबाचें नाम सुलभ सोपेरें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥
जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥
तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या झाला मारगाचा ॥३॥


२०११
वेरझारीं जाला सीण । बहु केलें खेदक्षीण । भांडणासी दिन । आजी येथें फावला ॥१॥
आतां काय भीड भार । धरूनियां लोकांचार । बुडवूनि वेव्हार । सरोबरी करावी ॥ध्रु.॥
आलें बहुतांच्या मना । कां रे न होशी शहाणा । मुळींच्या वचना । आह्मी जागों आपुल्या ॥२॥
तुका म्हणे चौघांमधीं । तुज नेलें होतें आधीं । आतां नामधीं । उरी कांहीं राहिली ॥३॥


७८०
वेश वंदाया पुरते । कोण ब्राम्हण निरुते ॥१॥
ऐसें सांगा मजपाशीं । संतां निरवितों येविशीं ॥ध्रु.॥
असा जी प्रवीण । ग्रंथीं कळे शुद्धहीण ॥२॥
तुका म्हणे लोपें । सत्याचिया घडती पापें ॥३॥


६२६
वेशा नाहीं बोल अवगुणा दूषीले । ऐशा बोला भले झणीं क्षोभा ॥१॥
कोण नेणे अन्न जीवाचें जीवन । विषमेळवण विष होय ॥ध्रु.॥
सोनें शुद्ध नेणे कोण हा विचार । डांकें हीनवर केलें त्यासी ॥२॥
याती शुद्ध परि अधम लक्षण । वांयां गेलें तेणें सोंगें हीत ॥३॥
तुका म्हणे शूर तोचि पावे मान । आणीक मंडण भार वाही ॥४॥


३९६०
वेसन गेलें निष्काम झालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥
त्याचा वेध लागला छंद हरी गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥
जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥२॥
वेगळ्या याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥३॥
सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वाय तुंबामुंडासवें भक्ति नाचों भावा ॥४॥
म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु झालें सुख काम चुकलिया काजा ॥५॥


८८६
वेळोवेळां हें चि सांगें । दान मागें जगासि ॥१॥
विठ्ठल हे मंगळवाणी । घेऊं धणी पंगती ॥ध्रु.॥
वेचतसे पळें पळ । केलें बळ पाहिजे ॥२॥
तुका म्हणे दुश्चित नका । राहों फुका नाड हा ॥३॥


२१४
वैकुंठा जावया तपाचे सायास । करणें जीवा नाश करणे बहु॥१॥
तया पुंडलिकें केला उपकार । फेडावया भार पृथीवीचा ॥२॥
तुका म्हणे सोपी केली पायवाट । पंढरी वैकुंठ भूमीवरी ॥३॥


३३४९
वैकुंठींचा देव आणिला भूतळा । धन्य तो आगळा पुंडलीक ॥१॥
धारीष्ट धैर्याचा वरीष्ठ भक्तांचा । पवित्र पुण्याचा एकनिष्ठ ॥ध्रु.॥
पितृसेवा पुण्यें लाधला निधान । ब्रम्ह सनातन अंगसंगें ॥२॥
अंगसंगें रंगें क्रीडा करी जाणा । ज्या घरीं पाहुणा वैकुंठींचा ॥३॥
धन्य त्याची शक्ति भक्तीची हे ख्याति । तुका म्हणे मुक्ति पायीं लोळे ॥४॥


३८१६
वैकुंठीच्या लोकां दुर्लभ हरीजन । तया नारायण समागमें ॥१॥
समागम त्यांचा धरिला अनंतें । जिहीं चत्तवत्ते समर्पिलें ॥२॥
समर्थ तीं गाती हरीचे पवाडे । येर ते बापुडे रावराणे ॥३॥
रामकृष्णें केलें कौतुक गोकुळीं । गोपाळांचे मेळीं गाईं चारी ॥४॥
गाईं चारी मोहोरी पांवा वाहे पाठीं । धन्य जाळी काठी कांबळीते ॥५॥
काय गौळियांच्या होत्या पुण्यरासी । आणीक त्या म्हैसी गाईं पशु ॥६॥
सुख तें अमुप लुटिलें सकळीं । गोपिका गोपाळीं धणीवरी ॥७॥
धणीवरी त्यांसी सांगितली मात । ज्याचे जैसे आर्त तयापरी ॥८॥
परी याचि तुम्ही आइका नवल । दुर्गम जो खोल साधनासि ॥९॥
शिक लावूनियां घालिती बाहेरी । पाहाती भीतरी सवें चि तो ॥१०॥
तोंडाकडे त्यांच्या पाहे कवतुकें । शिव्या देतां सुखें हासतुसे ॥११॥
हांसतसे शिव्या देतां त्या गौळणी । मरतां जपध्यानीं न बोले तो ॥१२॥
तो जेंजें करिल तें दिसे उत्तम । तुका म्हणे वर्म दावी सोपें ॥१३॥


२०१७
वैद्य एक पंढरिराव । अंतर्भाव तो जाणे ॥१॥
रोगाऐशा द्याव्या वल्ली । जाणे जाली बाधा ते ॥ध्रु.॥
नेदी रुका वेचों मोल । पोहे बोल प्रीतीचे ॥२॥
तुका म्हणे दयावंता । सदा चिंता दीनांची ॥३॥


१८७
वैद्य वाचविती जीवा । तरी कोण ध्यातें देवा ॥१॥
काय जाणों कैसी परी । प्रारब्ध तें ठेवी उरी ॥ध्रु.॥
अंगी दैवत संचरे । मग तेणे काय उरे ॥२॥
नवसें कन्यापुत्र होती । तरि कां करणें लागे पती ॥३॥
जाणे हा विचार । स्वामी तुकयाचा दातार ॥४॥


२५६०
वैभवाचे धणी सकळां शरणागत । सत्यभावें चित्त अर्पीलें तें ॥१॥
नेदी उरों देव आपणावेगळें । भावाचिया बळें ठायाठाव ॥ध्रु.॥
जाणोनि नेणोनि अंगा आली दशा । मग होय इच्छा आपणचि ॥२॥
तुका म्हणे बरें धाकुटयाचें जिणें । माता स्तनपानें वाढविते ॥३॥


२८४८
वैरागरापाशीं रत्नाचिया खाणी । हे चि घ्यावी धणी फावेल तों ॥१॥
येथें नाहीं तर्कवितर्काची चाड । होतसे निवाड खऱ्याखोट्यां ॥ध्रु.॥
उगाच सारवा वाढिला तो ठाव । वाढितिया भाव कळतसे ॥२॥
तुका म्हणे नव्हे टांचणीचें पाणी । येथें झरवणी जैशा तैसें ॥३॥


२९४२
वैराग्याचा अंगीं झालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥
कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥
नये चि यावया पंढरीचें मूळ । न देवे चि माळ कंठींची ही ॥२॥
तुका म्हणे झालें अप्रीतीचें जिणें । लाजिर हें वाणें सेवा करी ॥३॥


१२३८
वैराग्याचें भाग्य । संतसंग हाचि लाग ॥१॥
संतकृपेचे हे दीप । करी साधका निष्पाप ॥ध्रु.॥
तोचि देवभक्त । भेदाभेद नाहीं ज्यांत ॥२॥
तुका प्रेमें नाचे गाये । गाणियांत विरोन जाय ॥३॥


२१७
वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥
नाहीं आणीक प्रमाण । तन धन तृण जन ॥ध्रु.॥
पडतां जड भारी । नेमा न टळे निर्धारीं ॥२॥
तुका म्हणे याती । हो का तयाची भलती ॥३॥


२३६५
वैष्णवमुनिविप्रांचा सन्मान । करावा आपण घेऊं नये ॥१॥
प्रभु जाला तरी संसाराचा दास । विहित तयासी यांची सेवा ॥२॥
तुका म्हणे हे आशीर्वादें बळी । जाईल तो छळी नरकायासीं ॥३॥


३३५४
वैष्णवांची याती वाणी जो आपण । भोगी तो पतन कुंभपाकीं ॥१॥
ऐशी वेदश्रुती बोलती पुराणें । नाही ती दुषणें हरीभक्तां ॥ ध्रु.॥
उंच नीच वर्ण न म्हणावा कोणी । जे कां नारायणी प्रिय झाले ॥२॥
चहुं वर्णासीहि असे अधिकार । करितां नमस्कार दोष नाही ॥३॥
जैसा शालिग्राम न म्हणावा पाषाण । होय पूज्य मान सर्वत्रासी ॥४॥
गुरु परब्रम्ह देवाचा हि देव त्यासी तो मानव म्हणुं नये ॥५॥
म्हणे रामेश्वर नामीं जे रंगलें । स्वयें तेचि झाले देवरूप ॥६॥


१९५४
वैष्णवांची कीर्ती गाइली पुराणीं । साही अठरांजणीं चहूं वेदीं ॥१॥
ऐसे कोणी दावा ग्रंथांचे वाचक । कर्मठ धार्मिक पुण्यशील ॥ध्रु.॥
आदिनाथ शंकर नारद मुनेश्वर । शुका ऐसा थोर आणिक नाहीं ॥२॥
तुका म्हणे मुगुटमणी हे भक्ती । आणीक विश्रांति आरतिया ॥३॥


१३४०
वैष्णवां संगती सुख वाटे जीवा । आणीक मी देवा कांहीं नेणें ॥१॥
गायें नाचें उडें आपुलिया छंदें । मनाच्या आनंदें आवडीनें ॥ध्रु.॥
लाज भय शंका दुराविला मान । न कळे साधन यापरतें ॥२॥
तुका म्हणे आतां आपुल्या सायासें । आम्हां जगदीशें सांभाळावें ॥३॥


१४६५
वैष्णवें चोरटीं । आलीं घरासी करंटीं ॥१॥
आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥
ज्याचे घरीं खावें ।त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥२॥
तुका म्हणे माग । नाहीं लागों देत लाग ॥३॥


वो व्य व्या व्हा
२८६९
वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥१॥
किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥
आतां कोण याचा करील आदर । जावो कलेवर विटंबोनि ॥२॥
तुका म्हणे आतां सांडि तें चि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागें ॥३॥


२४४१
वोडविलें अंग । आतां करूनि घ्यावें सांग ॥१॥
काय पूजा ते मी नेणें । जाणावें जी सर्वजाणें ॥ध्रु.॥
पोटा आलें बाळ। त्याचें जाणावें सकळ ॥२॥
तुका म्हणे हरी । वाहावें जी कडियेवरी॥३॥


८१४
वोणव्या सोंकरीं । सेत खादलें पांखरीं ॥१॥
तैसा खाऊं नको दगा । निदसुरा राहुनि जागा ॥ध्रु.॥
चोरासवें वाट । चालोनि केलें तळपट ॥२॥
डोळे झांकुनि राती । कूर्पी पडे दिवसा जोती ॥३॥
पोसी वांज गाय । तेथें कैची दुध साय ॥४॥
फुटकी सांगडी । तुका म्हणे न पवे थडी ॥५॥


३६०२
वोरसोनि येती । वत्सें धेनुवेच्या चित्तीं ॥१॥
माझा कराया सांभाळ । वोरसोनियां कृपाळ ॥ध्रु.॥
स्नेहें भूक तहान । विसरती झाले सीण ॥२॥
तुका म्हणे कौतुकें । दिलें प्रेमाचें भातुकें॥३॥


३७४१
वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला ॥१॥
घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीनें वाढावें ॥ध्रु.॥
केलें सांगितलें काम । नव्हे धर्म सत्याचा ॥२॥
तुका म्हणे नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें ॥३॥


११३२
व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी । विश्वासतिचे मनीं राघोबाचा ॥१॥
ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं ठेवियेली ॥ध्रु.॥
पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥२॥
तुका म्हणे धरा विठोबाची सोय । आणिक उपाय नेणों किती ॥३॥


२३९४
व्यापिलें सर्वत्र । बाहेरी भीतरीं अंतर ॥१॥
ऐसें गोविंदें गोविलें । बोलें न वजाये बोलिले ॥ध्रु.॥
संचिताची होळी । करूनि जीव घेतला बळी ॥२॥
तुकयाबंधु म्हणे नाहीं । आतां संसारा उरी कांहीं ॥३॥


१८२७
व्यवहार तो खोटा । आतां न वजों तुझ्या वाटा ॥१॥
एका नामा नाहीं ताळ । केली सहस्रांची माळ ॥ध्रु.॥
पाहों जाता ठायी । खेळसील लपंडायी ॥२॥
तुका म्हणे चार । बहु करितोसी फार ॥३॥


३३६५
व्यापक हा विश्वंभर । चराचर ज्याचेनी ॥१॥
पंढरिराय विटेवरी । त्याचि धरीं पाउलें ॥ध्रु.॥
अवघियांचा हाचि ठाव । देवीदेव सकळ ॥२॥
तुका म्हणें न करीं सोस । भेदें दोष उफराटे ॥३॥


८२
व्याल्याविण करी शोभनतांतडी । चार ते गधडी करीतसे ॥१॥
कासया पाल्हाळ आणिकांचे देखी । सांगतां नव्हे सुखी साखरेसि ॥ध्रु.॥
कुंथाच्या ढेकरें न देवेल पुष्टी । रूप दावी कष्टी मळिण वरी ॥२॥
तुका म्हणे अरे वाचाळ हो ऐका । अनुभवेंविण नका वाव घेऊं ॥३॥


२६७१
व्हावया भिकारी हेंचि आम्हां कारण । अंतरोनि जन व्हावें दुरी ॥१॥
संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥
तुका म्हणे दुःखें उबगला जीव । म्हणऊनी कीव भाकीं देवा ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *