सार्थ तुकाराम गाथा 1 ते 100

संत तुकाराम गाथा १८ (स)

संत तुकाराम गाथा १८ अनुक्रमणिका नुसार

स सं

२९११
सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥
वरकड कोठें कांहीं कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥
षड्गुण ऐश्वर्य संपन्न एक । भगवंतीं जाण ॥२॥
तुका म्हणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥


१४००
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥१॥
अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥
उभय लोकीं उत्तम कीर्ती । देव चित्तीं राहिलिया ॥२॥
तुका म्हणे जीव धाय । नये हाय जवळी ॥३॥


२८
सकळ चिंतामणी शरीर । जरी जाय अहंकार आशा समूळ ॥१॥
निंदा हिंसा नाहीं कपट देहबुद्धि । निर्मळ स्फटिक जैसा ॥ध्रु.॥
मोक्षाचें तीर्थ न लगे वाराणसी । येती तयापासीं अवघीं जनें ॥२॥


३००५
सकळ तुझे पायीं मानिला विश्वास । न करीं उदास आतां मज ॥१॥
जीवीं गातां गोड आइकतां कानीं । पाहातां लोचनीं मूर्ती तुझी ॥ध्रु.॥
मन स्थिर माझें झालेंसे निश्चळि । वारिले सकळ आशापाश ॥२॥
जन्मजराव्याधि निवारिलें दुःख । वोसंडलें सुख प्रेम धरी ॥३॥
तुका म्हणे मज झाला हा निर्धार । आतां वांयां फार काय बोलों ॥४॥


११८१
सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत ॥१॥
रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥
रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥२॥
तुका लुटितां हे रंग । साह्य जाला पांडुरंग ॥३॥


५०८
सकळ धर्म मज विठोबाचें नाम । आणीक त्यां वर्म नेणें कांहीं ॥१॥
काय जाणों संतां निरविलें देवें । करिती या भावें कृपा मज ॥२॥
तुका म्हणे माझा कोण अधिकार । तो मज विचार कळों यावा ॥३॥


१४४७
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥१॥
म्हणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥
सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥२॥
तुका म्हणे सुरा । दुधा म्हणतां केवीं बरा ॥३॥


१३७४
सकळ सत्ताधारी । व्हावें ऐसें काय हरी ॥१॥
परि या कृपेच्या वोरसें । कुढावयाचें चि पिसें ॥ध्रु.॥
अंगें सर्वोत्तम । अवघा चि पूर्णकाम ॥२॥
तुका म्हणे दाता । तरि हा जीव दान देता ॥३॥


३६२४
सकळ ही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावें तुह्मीं ॥१॥
कर्मधर्में तुम्हां असावें कल्याण । घ्या माझें वचन आशीर्वाद ॥ध्रु.॥
वाढवूनि दिलों एकाचिये हातीं । सकळ निंश्चिती झाली तेथें ॥२॥
आतां मज जाणें प्राणेश्वरासवें । माझिया भावें अनुसरलों ॥३॥
वाढवितां लोभ होईल उसीर । अवघींच स्थिर करा ठायीं ॥४॥
धर्म अर्थ काम झाला एके ठायीं । मेळविला जिंहीं हाता हात ॥५॥
तुका म्हणे तुम्हांआम्हां हे चि भेटी । उरल्या त्या गोष्टी बोलावया ॥६॥


१०५५
सकिळकांचें समाधान । नव्हे देखिल्यावांचून ॥१॥
रूप दाखवीं रे आतां । सहजरभुजांच्या मंडिता ॥ध्रु.॥
शंखचक्रपद्मगदा। गरुडासहित ये गोविंदा ॥२॥
तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ॥३॥


३३४
सकळीच्या पायां माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥
अहो श्रोते वक्ते सकळ ही जन । बरें पारखुन बांधा गांठी ॥ध्रु.॥
फोडिलें भांडार धन्याचा हा माल । मी तंव हामाल भारवाही ॥२॥
तुका म्हणे चाली जाली चहूं देशी । उतरला कसीं खरा माल ॥३॥


४०८८
सकुमार मुखकमळ निजसारनिर्मळ । सावळी सुनीळ तनु भ्रमरांग कुरळ ।
झळकति दिव्य तेजें दंत माज पातळ । मिरविती मयोरपत्रें मुगुट कुंडलें माळ ॥१॥
जय देवा जगदीश्वरा । धन्य रखुमाईवरा । आरती करीन काया । ओंवाळिन सुंदरा । जय. ॥ध्रु.॥
गोजिरें ठाणमाण भुजा मंडित चारी । शोभति शंखचक्रगदापद्म मोहरी ।
हृदयीं ब्रम्हपद बाणलें शृंगारीं । गर्जति चरणीं वांकी कंठ कोकिळास्वरीं ॥२॥
घवघवित उटी अंगीं बावन चंदनांची । लल्हाटी कस्तुरिचा कास पितांबरीची ।
कटिसूत्र वरी साजिरें प्रभा वर मोतियांची। संगीत सकळ मुद्रा पाउलें कुंकुमाचीं ॥३॥
सौभाग्यसुख सागर गुणलावण्यखाणी । लाघवी दीनवत्सळ विश्व लाविलें ध्यानीं ।
आश्चर्य देव करिती ॠषि राहिले मुनि । धन्य ते प्रसवली ऐसिया नंदपत्नी ॥४॥
वर्णितां ध्यान महिमा श्रुति राहिल्या नेति । रविकोटि चंद्र तारा प्रकाशा न तुळती ।
उदार सुर गंभीर पूर्ण आनंदमूर्ती । तुकयाबंधु म्हणे स्तवूं मी काय किती ॥५॥


३१९७
संकोचतो जीव महत्वाच्या भारें । दासत्व चि बरें बहु वाटे ॥१॥
कळावी जी माझी आवडी हे संतां । देणें तरि आतां हें चि द्यावें ॥ध्रु.॥
तुमचे चरण पावविलों सेवा । म्हणउनि हेवा हाचि करीं ॥२॥
विनवुनी तुका वंदितो चरण । लेखा रजरेण चरणींचा ॥३॥


३३९६
संकोचोनि काय झालासी लहान । घेई अपोशण ब्रम्हांडाचें ॥१॥
करोनि पारणें आंचवें संसारा । उशीर उशिरा लावूं नको ॥ध्रु.॥
घरकुलीनें होता पडिला अंधार । तेणें केलें फार कासावीस ॥२॥
झुगारूनि दुरी लपविलें काखे । तुका म्हणे वाखे कौतुकाचे ॥३॥


१३६०
संगतीनें होतो पंगतीचा लाभ । अशोभीं अनुभव असिजेतें ॥१॥
जैसीं तैसीं असों पुढिलांचे सोई । धरिती हातीं पायीं आचारिये ॥ध्रु.॥
उपकारी नाहीं देखत आपदा । पुढिलांची सदा दया चित्तीं ॥२॥
तुका म्हणे तरीं सज्जनाची कीर्ती । पुरवावी आर्ती निर्बळांची ॥३॥


३१९५
संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥
याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥
एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥२॥
शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥३॥
तुका म्हणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥४॥


३८२९
संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां पेरि त्याचें ॥१॥
त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईंवरी आणिक गाईं ॥२॥
गाईं दवडुनि घालिती बाहेरी । तंव म्हणे हरी बांधा त्या ही ॥३॥
त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वांड्यातुनि ॥४॥
पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥
नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥
मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका म्हणे ॥७॥


१९०८
संचित चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥१॥
आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥
नाहीं काम हातीं । आराणूक दिसराती ॥२॥
तुका म्हणे सत्ता । पुरे पराधीन आतां ॥३॥


१२४२
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण॥१॥
नाहीं आम्हांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥
द्वैताद्वैतभावें। अवघें व्यापियेलें देवें ॥२॥
तुका म्हणे हरी । आम्हांमाजी क्रीडा करी ॥३॥


१४९२
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥
कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥
धन वित्त जोडे । देव ऐसें तों न घडे ॥२॥
तुका म्हणे आड । स्वहितासी बहु नाड ॥३॥


१७९९
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥
एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥
भाविक शब्द बोले वाणीचा । लटिका वाचा वाचाळ तो ॥२॥
परउपकार घडे तोचि भला । नाठ्याळ तयाला दया नाहीं ॥३॥
जाणीवंत तो पायरी जाणे । अधम तो नेणे खुंट जैसा ॥४॥
हित तें अनहित केलें कैसें । तुका म्हणे पिसें लागलें यासी ॥५॥


२५४८
संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥१॥
कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥
काया कुरवंडी । करुन ओंवाळून सांडी ॥२॥
तुका म्हणे भावें । हात जोडीं असो ठावें ॥३॥


१२०८
संत गाती हरीकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥
हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥
काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥
संत महंत माझी पूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥३॥
तुका म्हणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥४॥


३१५०
संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥१॥
पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥
कामक्रोधलोभ चित्तीं । वरीवरी दाविती विरक्ती ॥२॥
आशापाशीं बांधोनि चित्त । म्हणती झालों आम्ही मुक्त ॥३॥
त्यांचे लागले संगती । झाली त्यांसी ते चि गति ॥४॥
तुका म्हणे शब्दज्ञानें । जग नाडियेलें तेणें ॥५॥


३२६२
संत देखोनियां स्वयें दृष्टी टाळी । आदरें न्याहाळी परस्त्रीसी ॥१॥
वीट ये कर्णासी संतवाक्यामृता । स्त्रीशब्द ऐकतां निवे कर्ण ॥ध्रु.॥
कथेमाजी निज वाटे नित्यक्षणीं । स्त्रियेचे कीर्तनीं प्रेमें जागे ॥२॥
तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावें । स्वभावा करावें काय कोणीं ॥३॥


१६४७
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥
त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥
संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥२॥
तुका म्हणे तो नष्ट। जाणा गाढव तो स्पष्ट ॥३॥


१७४२
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥१॥
माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥
केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥२॥
तुमचे पायीं पायतान । मोचे माझे तन मन ॥३॥
तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥४॥
तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥५॥
लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥६॥
तुका म्हणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥७॥


३१७
संत मागे पाणी नेदी एक चूळ । दासीस आंघोळ ठेवी पाणी ॥१॥
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका म्हणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥


१८९१
संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥१॥
तुह्मी कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥
गोविलों थोरिवां । दुःख वाटतसे जीवा ॥२॥
तुका म्हणे माया । अवरा हे पंढरिराया ॥३॥


१११०
संत मारगीं चालती । त्यांची लागो मज माती ॥१॥
काय करावीं साधनें । काय नव्हे एक तेणें ॥ध्रु.॥
शेष घेईन उच्छिष्ट । धाय धणीवरी पोट ॥२॥
तुका म्हणे संतां पायीं । जीव ठेविला निश्चयीं ॥३॥


२६१३
संतसंगतीं न करावा वास । एखादे गुणदोष अंगा येती ॥१॥
मग तया दोषा नाहीं परिहार । होय अपहार सुकृताचा ॥२॥
तुका म्हणे नमस्कारावे दुरून । अंतरीं धरून राहें रूप ॥३॥


२१९३
संतसंगें याचा वास सर्वकाळ । संचला सकळ मूर्तीमंत ॥१॥
घालूनियां काळ अवघा बाहेरी । त्यासी च अंतरीं वास दिला ॥ध्रु.॥
आपुलेसें जिंहीं नाहीं उरों दिलें । चोजवितां भलें ऐसीं स्थळें ॥२॥
तुका म्हणे नाही झांकत परिमळ । चंदनाचें स्थळ चंदन चि ॥३॥


२२१
संतासमागम एखादिये परी । व्हावें त्याचें द्वारी श्वानयाती ॥१॥
तेथें रामनाम होईल श्रवण । घडेल भोजन उच्छिष्टाचे ॥ध्रु.॥
कामारी बटीक सेवेचा सेवक । दिन पणे रंक तेथें भले ॥२॥
तुका म्हणे सर्व सुख त्या संगती । घडेल पंगती संताचिया ॥३॥


१६००
संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥
ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥
संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥२॥
तुका म्हणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥३॥


९००
संतां आवडे तो काळाचा ही काळ । समर्थाचें बाळ जेवीं समर्थ ॥१॥
परिसतां तेथें नाहीं एकविणें । मोहें न पवे सीण ऐसें राखे ॥ध्रु.॥
केले अन्याय ते सांडवी उपचारें । न देखें दुसरें नाशा मूळ ॥२॥
तुका म्हणे मुख्य कल्पतरुछाया । काय नाहीं दया तये ठायीं ॥३॥


१५६
संताचा अतिक्रम । देवपूजा तो अधर्म ॥१॥
येती दगड तैसे वरी । मंत्रपुष्प देवा शिरीं ॥ध्रु.॥
अतीतासि गाळी । देवा नैवेद्यासी पोळी ॥२॥
तुका म्हणे देवा । ताडण भेदकांची सेवा ॥३॥


३१७८
संतांचा पढीयावो कैशापरि लाहो । नामाचा आठवो कैसा राहे ॥१॥
हे चि थोर चिंता लागली मनासी । निजतां निद्रेसी न लगे डोळा ॥ध्रु.॥
जेवितां जेवणीं न लगे गोड धड । वाटतें काबाड विषयसुख ॥२॥
ऐसिया संकटीं पाव कृपानिधी । लावीं संतपदीं प्रेमभावें ॥३॥
तुका म्हणे आम्हीं नेणों कांहीं हित । तुजविण अनाथ पांडुरंगा ॥४॥


८१८
संतांचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकांचे काम नाहीं येथें ॥१॥
बहु दुधड जरी जाली ह्मैस गाय । तरी होईल काय कामधेनु ॥२॥
तुका म्हणे अंगें व्हावें तें आपण । तरीच महिमान येईल कळों ॥३॥


८५६
संतांचिये गांवीं प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दुःखलेश ॥१॥
तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक ते चि मज ॥ध्रु.॥
संतांचिये गांवीं वरो भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥२॥
संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥३॥
संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेमसुख साठी घेती देती ॥४॥
तुका म्हणे तेथें आणिक नाहीं परी । म्हणोनि भिकारी झालों त्यांचा ॥५॥


२१७१
संतांचिया पायीं माझा विश्वास । सर्वभावें दास जालों त्यांचा ॥१॥
ते चि माझें हित करिती सकळ । जेणें हा गोपाळ कृपा करी ॥ध्रु.॥
भागलिया मज वाहतील कडे । त्यांचियाने जोडे सर्व सुख ॥२॥
तुका म्हणे शेष घेईन आवडी । वचन न मोडीं बोलिलों तें ॥३॥


५५३
संतांचीं उच्छिष्टें बोलतों उत्तरें । काय म्यां गव्हारें जाणावें हें ॥१॥
विठ्ठलाचे नाम घेता नये शुद्ध । तेथें मज बोध काय कळे ॥ध्रु.॥
करितो कवित्व बोबडा उत्तरी । झणी मजवरी कोप धरा ॥२॥
काय माझी याति नेणां हा विचार । काय मी तें फार बोलों नेणें ॥३॥
तुका म्हणे मज बोलवितो देव । अर्थ गुह्य भाव तोचि जाणे ॥४॥


१५३५
संतांची स्तुति ते दर्शनाच्या योगें । पडिल्या प्रसंगें ऐसी कीजें ॥१॥
संकल्प ते सदा स्वामीचे चि चित्तीं । फाकों नये वृत्ति अखंडित ॥ध्रु.॥
दास्यत्व तें असे एकविध नांवें । उरों नये जीवें भिन्नत्वेसी ॥२॥
निज बीजा येथें तुका अधिकारी । पाहिजे तें पेरी तये वेळी ॥३॥


२१९९
संताचे उपदेश आमुचे मस्तकीं । नाहीं मृतेलोकीं राहाणेसा ॥१॥
म्हणऊनि बहु तळमळी चित्त । येई वो धांवत पांडुरंगे ॥ध्रु.॥
उपजली चिंता लागला उसीर । होत नाहीं धीर निढळ वाटे ॥२॥
तुका म्हणे पोटीं रिघालेंसे भय । करूं आतां काय ऐसें जालें ॥३॥


१२१
संतांचे गुण दोष आणितां या मना । केलिया उगाणा सुकृताचा ॥१॥
पिळोनियां पाहे पुष्पाचा परिमळ । चिरोनि केळी केळ गाढव तो ॥ध्रु.॥
तुका म्हणे गंगे अग्नीसि विटाळ । लावी तो चांडाळ दुःख पावे ॥२॥


१९५६
संतांचे घरींचा दास मी कामारी । दारीं परोपरीं लोळतसें ॥१॥
चरणींचे रज लागती अंगांस । तेण बेताळीस उद्धरती ॥ध्रु.॥
उच्छिष्ट हें जमा करुनि पत्रावळी । घालीन कवळी मुखामाजी ॥२॥
तुका म्हणे मी आणीक विचार । नेणें हे चि सार मानीतसें ॥३॥


६८५
संतांचें सुख झालें या देवा । म्हणऊनि सेवा करी त्यांची ॥१॥
तेथें माझा काय कोण तो विचार । वर्णावया पार महिमा त्यांचा ॥ध्रु.॥
निर्गुण आकार जाला गुणवंत । घाली दंडवत पूजोनियां ॥२॥
तीर्थे त्यांची इच्छा करिती नित्यकाळ । व्हावया निर्मळ आपणांसी ॥३॥
अष्टमा सिद्धींचा कोण आला पाड । वागों नेदी आड कोणी तया ॥४॥
तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी । राहिलों चरणीं निकटवासें ॥५॥


९०१
संतांच्या धीक्कारें अमंगळ जिणें । विश्वशत्रु तेणें सांडी परि ॥१॥
कुळ आणि रूप वांयां संवसार । गेला भरतार मोकलितां ॥ध्रु.॥
मूळ राखे तया फळा काय उणें । चतुर लक्षणें राखों जाणे ॥२॥
तुका म्हणे सायास तो एके ठायीं । दीप हातीं तई अवघें बरें ॥३॥


३२०२
संतांच्या पादुका घेईन मोचे खांदीं । हातीं टाळ दिंडी नाचेन पुढें ॥१॥
भजनविधी नेणें साधन उपाय । सकळ सिद्धी पाय हरीदासांचे ॥ध्रु.॥
ध्यानगति मति आसन समाधि । हरीनाम गोविंदीं प्रेमसुख ॥२॥
नेणता निर्लज्ज नेणें नादभेद । सुखें हा गोविंद गाऊ गीतीं ॥३॥
सर्व जोडी मज गोत आणि वित्त । तुका म्हणे संतमहंतपाय ॥४॥


११२६
संतांच्या हेळणे बाटलें जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचें ॥१॥
भेसळीचें वीर्य ऐशा अनुभवें । आपुलें परावें नाहीं खळा ॥ध्रु.॥
संतांचा जो शोध करितो चांडाळ । धरावा विठाळ बहु त्याचा ॥२॥
तुका म्हणे केली प्रज्ञा या च साठी । कांहीं माझे पोटीं शंका नाहीं ॥३॥


१६१३
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ॥१॥
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ॥ध्रु.॥
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ॥२॥
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम॥३॥


३२००
संतांनीं सरता केलों तैसेपरी । चंदनीं ते बोरी व्यापियेली ॥१॥
गुण दोष याती न विचारितां कांहीं । ठाव दिला पायीं आपुलिया ॥२॥
तुका म्हणे आलें समर्थाच्या मना । तरि होय राणा रंक त्याचा ॥३॥


८५३
संतापाशीं बहु असावें मर्यादा । फलकटाचा धंदा उर फोडी ॥१॥
वासर तो भुंके गाढवाचेपरी । उडे पाठीवरी यम दंड तेणें ॥ध्रु.॥
समयो नेणें तें वेडें चाहाटळ । अवगुणाचा ओंगळ मान पावे ॥२॥
तुका म्हणे काय वांयां चाळवणी । पिटपिटघाणी हागवणेची ॥३॥


१०६७
संतांसी तों नाहीं सन्मानाची चाड । परि पडे द्वाड अव्हेरितो ॥१॥
म्हणऊनि तया न वजावें ठाया । होतसे घात या दुर्बळाचा ॥ध्रु.॥
भावहीना आड येतसे आशंका । उचितासी चुका घालावया ॥२॥
तुका म्हणे जया संकोच दर्शनें । तया ठाया जाणें अनुचित ॥३॥


१४७९
संतांसी क्षोभवी कोण्या ही प्रकारें । त्याचें नव्हें बरें उभयलोकीं ॥१॥
देवाचा तो वैरी शत्रु दावेदार । पृथ्वी ही थार नेदी तया ॥ध्रु.॥
संतांपाशीं ज्याचा नुरे चि विश्वास । त्याचे जाले दोष बळीवंत ॥२॥
तुका म्हणे क्षीर वासराच्या अंगें । किंवा धांवे लागें विषमें मारूं ॥३॥


३६२२
संतीं केला अंगीकार । त्यासी अभिमान थोर ॥१॥
कांहीं ठेविलें चरणीं । घेतीं तें चि पुरवूनि ॥ध्रु.॥
तुका पायवणी । घेऊनियां निराळा ॥२॥
नसतां कांहीं संचित । भेटी झाली अवचित ॥३॥
देव मिळोनियां भक्त । तुका केलासे सनाथ ॥४॥


२३४१
सतीचें तें घेतां वाण । बहु कठीण परिणामीं ॥१॥
जिवासाटीं गौरव वाढे । आहाच जोडे तें नव्हे ॥ध्रु.॥
जरि होय उघडी दृष्टि । तरि गोष्टी युद्धाच्या ॥२॥
तुका म्हणे अंगा येतां । तरी सत्ता धैर्याची ॥३॥


२७९८
संतोषे माउली आरुषा वचनी । वोरसोनि स्तनीं लावी बाळा ॥१॥
तैसे परिमळाचें अवघें चि गोड । पुरवितो कोड पांडुरंग ॥ध्रु.॥
सेवा करी साहे निष्ठुर उत्तरें । त्याचें वाहे मनीं तेंच बरें ॥२॥
तुका म्हणे इच्छावसे खेळ खेळें । चिंता तै सकळ कांहीं नेणें ॥३॥


२१९१
सत्ताबळें येतो मागतां विभाग । लावावया लाग निमित्य करूं ॥१॥
तुझीं ऐसीं मुखें करूं उच्चारण । बोलें नारायण सांपडवूं ॥ध्रु.॥
आसेविण नाहीं उपजत मोहो । तरि च हा गोहो न पडे फंदीं ॥२॥
तुका म्हणे आतां व्हावें याजऐसें । सरिसें सरिसें समागमें ॥३॥


१९०५
सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ॥१॥
आज्ञा वाहोनियां शिरीं । सांगितलें तें चि करीं ॥ध्रु.॥
सरलीसे धांव । न लगे वाढवावी हांव ॥२॥
आहे नाहीं त्याचें । तुका म्हणे कळे साचें॥३॥


१३५६
सत्तेचें भोजन समयीं आतुडे । सेवन ही घडे रुचिनेसी॥१॥
वर्में श्रम नेला जालें एकमय । हृदयस्थीं सोय संग झाला ॥ध्रु.॥
कोथळीस जमा पडिलें संचित । मापल्याचा वित्त नेम झाला ॥२॥
तुका म्हणे धणी ऐसा झालों आतां । करीन ते सत्ता माझी आहे ॥३॥


२७९३
सत्य आठवितां देव । जातो भेंव पळोनि ॥१॥
न लगे कांहीं करणे चिंता । धरी सत्ता सर्व तो ॥ध्रु.॥
भावें भाव राहे पायीं । देव तैं संनिध ॥२॥
तुका म्हणे कृष्णनामें । शीतळ प्रेमे सर्वांसी ॥३॥


१२१७
सत्य आम्हां मनीं । नव्हों गाबाळाचे धनी ॥१॥
ऐसें जाणा रे सकळ । भरा शुद्ध टांका मळ ॥ध्रु.॥
देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ॥२॥
तुका म्हणे बरें घडे । देशोदेशीं चाले कोडें ॥३॥


२२३१
सत्यकर्म आचरें रे । बापा सत्यकर्म आचरें रे ॥१॥
सत्यकर्म आचरें होईल हित । वाढेल दुःख असत्याचें ॥ध्रु.॥
ऊंस वाढवितां वाटली गोडी । गुळ साकर हे त्याची परवडी॥२॥
साकरेच्या आळां लाविला कांदा । सुळसानापरि वाढे दुर्गंधा ॥३॥
सत्य असत्य हें ऐसिया परी । तुका म्हणे याचा विचार करीं ॥४॥


३४५३
सत्य गुरूरायें कृपा मज केली । परी नाहीं घडली सेवा कांहीं ॥१॥
सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर ॥ध्रु.॥
भोजना मागती तूप पावशेर । पडिला विसर स्वप्नामाजी ॥२॥
कांय कळ उपजला अंतराय । म्हणोनियां काय त्वरा झाली ॥३॥
राघवचैतन्य कैशवचैतन्य । सांगितली खुण माळिकेची ॥४॥
बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरी ॥५॥
माहोशुद्ध दशमी पाहुनि गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे ॥६॥


३५७
सत्य तो आवडे । विकल्पानें भाव उडे ॥१॥
आम्ही तुमच्या कृपादानें । जाणों शुद्ध मंद सोनें ॥ध्रु.॥
आला भोग अंगा। न लवूं उसीर त्या त्यागा ॥२॥
तुका म्हणे देवा । अंजन ते तुझी सेवा ॥३॥


२७८८
सत्य त्यागा चि समान । नलगे वेचावें वचन ॥१॥
नारायणा ऐसे दास । येरयेरांची च आस ॥ध्रु.॥
मळ नाहीं चित्ता । तेथें देवाची च सत्ता ॥२॥
तुका म्हणे जाण । तें च भल्याचें वचन ॥३॥


२३४४
सत्यत्वेंशीं घेणें भक्तीचा अनुभव । स्वामीचा गौरव इच्छीतसें ॥१॥
मग तें अवीट न भंगे साचारें । पावलें विस्तारें फिरों नेणे ॥ध्रु.॥
वाणी वदे त्याचा कोणांसी विश्वास । अभयें करें दास सत्य तई ॥२॥
तुका म्हणे आधीं न करीं तांतडी । पायीं जाली जोडी तेणें शुद्ध ॥३॥


१०१३
सत्यसंकल्पाचा दाता नारायण । सर्व करी पूर्ण मनोरथ ॥१॥
येथें अळंकार शोभती सकळ । भावबळें फळ इच्छेचेंतें ॥ध्रु.॥
अंतरींचें बीज जाणे कळवळा । व्यापक सकळां ब्रम्हांडाचा ॥२॥
तुका म्हणे नाहीं चालत तांतडी । प्राप्तकाळघडी आल्याविण ॥३॥


८२७
सत्य सत्यें देतें फळ । नाहीं लागतचि बळ ॥१॥
ध्यावे देवाचे ते पाय । धीर सकळ उपाय ॥ध्रु.॥
करावी च चिंता। नाहीं लागती तत्वता ॥२॥
तुका म्हणे भावें । होते सकळ बरवें ॥३॥


३५६
सत्य साच खरें । नाम विठोबाचें बरें ॥१॥
जेणें तुटती बंधनें । उभयलोकीं कीर्ती जेणें ॥ध्रु.॥
भाव ज्याचे गांठी । त्यासी लाभ उठाउठी ॥२॥
तुका म्हणे भोळा । जिंकुं जाणे कळिकाळा ॥३॥


२८३२
सत्या माप वाढे । गबाळाची चाली खोडे ॥१॥
उत्तरे तें कळें कसी । विखरोणें सर्वदेशीं ॥ध्रु.॥
घरामध्ये राजा । नव्हे हो पट्ट पूजा ॥२॥
तुका म्हणे साचें । रूप तें दर्पणीचें ॥३॥


३३
सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥१॥
त्याचें दर्शन न व्हावें । शव असतां तो जिवे ॥ध्रु.॥
कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥२॥
नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥३॥


३२५४
सदा नामघोष करूं हरीकथा । तेणें सदा चित्ति समाधान ॥१॥
सर्वसुख ल्यालों सर्व अळंकार । आनंदें निर्भर डुल्लतसों ॥ध्रु.॥
असों ऐसा कोठें आठवचि नाहीं । देहीं च विदेही भोगूं दशा ॥२॥
तुका म्हणे आम्ही झालों अग्निरूप । लागों नेदूं पापपुण्य अंगा ॥३॥


१५
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हाचि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥


३३५९
संदेह गमला । कैसा रेडा बोलविला ॥१॥
सांगा देव कां न होती । निर्जिव चालविली भिंती ॥ध्रु.॥
कोरडे कागद । उदकी न लागती बुंद ॥२॥
नीळा म्हणे खरा । देव संत पायीं थारा ॥३॥


५९९
संदेह निरसे तरि रुचिकर । फिक्यासी आदर चवी नाहीं ॥१॥
आतां नको मज खोटयानें फटवूं । कोठें येऊं जाऊं वेळोवेळां ॥ध्रु.॥
गेला तरि काय जीवाचें सांकडें । वांचउनि पुढें काय काज ॥२॥
तुका म्हणे कशी निवडा जी बरें । केलीं तैसीं पोरें आळीपायीं ॥३॥


१९८२
संदेह बाधक आपआपणयांतें । रज्जुसर्पवत भासतसे ।
भेऊनियां काय देखिलें येणें । मारें घायेंविण लोळतसे ॥१॥
आपणें चि तारी आपण चि मारी । आपण उद्धरी आपणयां ।
शुकनिळकेन्यायें गुंतलासी काय । विचारूनि पाहें मोकिळया ॥ध्रु॥ पापपुण्य कैसे भांजिले अंक । दशकाचा एक उरविला ।
जाणोनियां काय होतोसी नेणता । शून्या ठाव रिता नाहीं नाहीं ॥२॥
दुरा दृष्टी पाहें न्याहाळूनि । मृगजला पाणी न म्हणें चाडा ।
धांवतां चि फुटे नव्हे समाधान । तुका म्हणे जाण पावे पीडा ॥३॥


५४६
सदैव तुम्हां अवघें आहे । हातपाय चालाया ॥१॥
मुखीं वाणी कानीं कीर्ती । डोळे मूर्ती देखाया ॥ध्रु.॥
अंध बहिर ठकलीं किती । मुकीं होती पांगुळें ॥२॥
घरा आगी लावुनि जागा। न पळे तो गा वांचे ना ॥३॥
तुका म्हणे जागा हिता । कांहीं आतां आपुल्या ॥४॥


२३९०
सदैव हे वारकरी । जे पंढरी देखती । पदोपदीं विठ्ठल वाचा । त्यांसी कैचा संसार ॥१॥
दोष पळाले पळाले। पैल आले हरीदास ॥ध्रु.॥
प्रेमभातें भरलें अंगीं । निर्लज्ज रंगीं नाचती । गोपीचंदनाची उटी । तुळसी कंठीं मिरवती ॥२॥
दुर्बळा या शिक्तहीना । त्या ही जना पुरता ॥तुका म्हणे देव चित्तीं । मोक्ष हातीं रोकडा ।३॥


१०३१
सद्गदित कंठ दाटो । येणें फुटो हृदय ॥१॥
चिंतनाचा एक लाहो । तुमच्या अहो विठ्ठला ॥ध्रु.॥
नेत्रीं जळ वाहो सदां । आनंदाचे रोमांच ॥२॥
तुका म्हणे कृपादान । इच्छी मन हे जोडी ॥३॥


१६७२
संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥१॥
किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥
माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥२॥
तुका म्हणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥३॥


१७४५
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां ।
न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥१॥
ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥
पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा ।
अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥२॥
अंतकाळ गणिका पक्षियाच्या छंदें । राम राम पद उच्चारिलें ।
तंव त्या दिनानाथा कृपा आली कैसी । त्यानें तियेसी वैकुंठासी नेलें ॥३॥
अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे ।
तुका म्हणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये देशे ॥४॥


२२४०
संपदा सोहळा नावडे मनाला । करी तें टकळा पंढरीचा ॥१॥
जावें पंढरिसी आवडी मनासी । कधीं एकादशी आषाढी हे ॥२॥
तुका म्हणे ऐसें आर्त ज्याचे मनीं । त्याची चक्रपाणी वाट पाहे ॥३॥


३९३४
सब संबाल म्याने लौंडे खडा केऊं गुंग । मदिरथी मता हुवा भुलि पाडी भंग ॥१॥
आपसकुं संबाल आपसकुं संबाल । मुंढे खुब राख ताल । मुथिवोहि बोला नहीं तो करूँगा हाल ॥ध्रु.॥
आवलका तो पीछें नहीं मुदल बिसर जाय । फिरते नहीं लाज रंडी गद्धी गोते खाय ॥२॥
जिन्हो खातिर इतना होता सो नहीं तुझे बेकाम । उचा जोरो लिया तुंबा तुंबा बुरा काम ॥३॥
निकल जावे चिकल जोरो मुंढे दिलदारी । जवानीकी छोड दे बात फिर एक तारी ॥४॥
कहे तुका फिसल रुका मेरेको दान देख । पक्कड धका गांडगुडघी मार चलाऊं आलेख ॥५॥


३९३३
संबाल यारा उपर तलें दोन्हो मारकी चोट । नजर करे सो ही राखे पश्वा जावे लुट ॥१॥
प्यार खुदाई प्यार खुदाई प्यार खुदाई । प्यार खुदाई रे बाबा जिकिर खुदाई ॥ध्रु.॥
उडे कुदे ढुंग नचावे आगल भुलन प्यार । लडबड खडबड कांहेकां खचलावत भार ॥२॥
कहे तुका चलो एका हम जिन्होंके सात । मिलावे तो उसे देना तो ही चढावे हात ॥३॥



समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥


३६४७
समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥१॥
कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥
प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥२॥
तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥३॥


१३७२
समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची ॥१॥
दुसऱ्याचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥
खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानलें गोमटें तुम्हांसी तें ॥२॥
तुका म्हणे तुम्हां सवें करितां वाद । होईजेतें निंद्य जनीं देवा ॥३॥


२८४९
समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥१॥
मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥
दयासिंधु तुम्हां भांडवल दया । सिंचावें आतां या कृपामृते ॥२॥
तुका म्हणे अहो पंढरिनिवासे । बहु जीव आसे लागलासे ॥३॥


१४३२
समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥
फावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं जाऊं॥ध्रु.॥
न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥२॥
तुका म्हणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥३॥


१३३७
समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥१॥
धांव पावें करीन लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥
न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥२॥
तुका म्हणे नव्हे धीर । तुम्हां स्थिर दयेनें ॥३॥


१६६१
समर्थाचें केलें । कोणां जाईल मोडिलें ॥१॥
वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥
ठेविला जो ठेवा । आपुलाला तैसा खावा ॥२॥
ज्याचें त्याचें हातीं । भुके तयाची फजिती ॥३॥
तुका म्हणे कोटी । बाळे जाले शूळ पोटी ॥४॥


३५६१
समर्थाचे पोटीं । आह्मी जन्मलों करंटीं ॥१॥
ऐसी झाली जगीं कीर्ती । तुझ्या नामाची फजिती ॥ध्रु.॥
येथें नाहीं खाया। न ये कोणी मूळ न्याया ॥२॥
तुका म्हणे जिणें । आतां खोटें जीवेपणें ॥३॥


६६१
समर्थाचें बाळ केविलवाणें दिसे । तरी कोणा हांसे जन देवा ॥१॥
अवगुणी जरी जालें तें वोंगळ । करावा सांभाळ लागे त्याचा ॥२॥
तुका म्हणे तैसा मी एक पतित । परि मुद्रांकित जालों तुझा ॥३॥
२७३६
समर्थाचें बाळ पांघरे वाकळ । हसती सकळ लोक कोणा ॥१॥
समर्थासी लाज आपुल्या नांवाची । शरण आल्यायाची लागे चिंता ॥२॥
जरी तुज कांहीं होईल उचित । तरी हा पतित तारीं तुका ॥३॥


२८८८
समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥१॥
आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥
निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे ॥२॥
तुका म्हणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥


२५०८
समर्थासी नाहीं वर्णावर्णभेद । सामुग्री ते सर्व सिद्ध घरीं ॥१॥
आदराचे ठायीं बहु च आदर । मागितलें फार ते ते वाढी ॥ध्रु.॥
न म्हणे सोइरा सुह्रद आवश्यक । राजा आणि रंक सारिखे चि ॥३॥
भाव देखे तेथें करी लडबड । जडा राखे जड निराळें चि ॥३॥
कोणी न विसंभे याचकाचा ठाव । विनवुनी देव शंका फेडी ॥४॥
तुका म्हणे पोट भरुनी उरवी । धालें ऐसें दावी अनुभवा ॥५॥


२९९८
समर्थासी लाज आपुल्या नामाची । शरण आल्याची लागे चिंता ॥१॥
न पाहे तयाचे गुण दोष अन्याय । सुख देउनि साहे दुःख त्याचें ॥ध्रु.॥
मान भलेपण नाहीं फुकासाठी । जयावरी गांठी झीज साहे ॥२॥
तुका म्हणे हें तूं सर्व जाणसी । मज अधिरासी धीर नाहीं ॥३॥


३५६४
समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥१॥
आतां भावें करूनि साचा । पायां पडिलों विठोबाच्या ॥ध्रु.॥
न कळे उचित । करूं समाधान चित्त ॥२॥
तुका म्हणे विनंती । विनविली धरा चित्तीं ॥३॥


९२३
समर्पीली वाणी । पांडुरंगीं घेते धणी ॥१॥
पूजा होते मुक्ताफळीं । रस ओविया मंगळीं ॥ध्रु.॥
धार अखंडित । ओघ चालियेला नित्य ॥२॥
पूर्णाहुति जीवें । तुका घेऊनि ठेला भावें ॥३॥


३९६६
सम सपाट वेसनकाट निःसंग झालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥
गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥
ठाव झाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥२॥
सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न झालें सुख भाव पालटला रंग ॥३॥
लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥४॥
तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रतित सवें असों एकपणें ॥५॥


३८८३
समागमें असे हरी नेणतियां । नेदी जाऊं वांयां अंकितांसि ॥१॥
अंकितां सावध केलें नारायणें । गोपाळ गोधनें सकळिकां ॥२॥
सकळही जन आले गोकुळासि । आनंद मानसीं सकळांच्या ॥३॥
सकळांचा केला अंगीकार देवें । न कळतां भावें वांचवी त्यां ॥४॥
त्यां जाला निर्धार हरी आम्हांपासीं । निवांत मानसीं निर्भर तीं ॥५॥
निर्भर हे जन गोकुळींचे लोक । केले सकळिक नारायणें ॥६॥
नारायण भय येऊं नेदी गांवा । तुका म्हणे नांवा अनुसरे त्या ॥७॥


३८७४
समाधान त्यांचीं इंद्रियें सकळ । जयां तो गोपाळ समागमें ॥१॥
गोविंदाचाझाला प्रकाश भीतरी । मग त्यां बाहेरी काय काम ॥२॥
काज काम त्यांचें सरले व्यापार । नाहीं आप पर माझें तुझें ॥३॥
माया सकळांची सकळां ही वरी । विषय तें हरी दिसों नेदी ॥४॥
दिसे तया आप परावें सारिखें । तुका म्हणे सुखें कृष्णाचिया ॥५॥


२२१४
समुद्रवळयांकित पृथ्वीचें दान । करितां समान न ये नामा ॥१॥
म्हणऊनि कोणीं न करावा आळस । म्हणा रात्रीदिवस रामराम ॥ध्रु.॥
सकळ ही शास्त्रें पठण करतां वेद । सरी नये गोविंदनाम एकें ॥२॥
सकळ ही तीर्थे प्रयागादी काशी । करितां नामाशीं तुळेति ना ॥३॥
कर्वतीं कर्मरीं देहासी दंडण । करितां समान नये नामा ॥४॥
तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार । नाम हें चि सार विठोबाचें ॥५॥


३८३४
संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥
गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिलें ॥ध्रु.॥
उतरूनि हातें धरि हनूवठी । ओवाळूनि दिठी सांडियेली ॥२॥
दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥३॥
लहान हा थोर जीवजंत भूतें । आपण दैवतें झाला देवी ॥४॥
देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरी ॥५॥
हरी तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तीसाठी ॥६॥


२४५५
सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥
न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥
घातला तो आशा। मोहोजाळें गळां फासा ॥२॥
सुखदुःखाचा तो मान । नाहीं दुःखाचा तो शीण ॥३॥
करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥४॥
लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥
तुका म्हणे याचें । नांव सोंवळें साचें ॥६॥


२४९७
सरलियाचा सोस मनीं । लाजोनियां राहिलों ॥१॥
आवडीनें बोलावितों । येथें तें तों लपावें ॥ध्रु.॥
माझें तें चि मज द्यावें । होतें भावें जोडिलें ॥२॥
तुका म्हणे विश्वंभरा । आळीकरा बुझावा ॥३॥


१०४८
सरळीं हीं नामें उच्चारावीं सदा । हरी बा गोविंदा रामकृष्णा ॥१॥
पुण्य पर्वकाळ तीर्थे ही सकळ । कथा सिंधुजळ न्हाऊं येती ॥ध्रु.॥
अवघे चि लाभ बैसलिया घरा । घेती भाव धरा एके ठायीं ॥२॥
सेळ्या मेंढएा गाई सेवा घेती ह्मैसी । कामधेनु तैसी नव्हे एक ॥३॥
तुका म्हणे सुखें पाविजे अनंता । हें वर्म जाणतां सुलभ चि ॥४॥


१४६१
सरलें आतां नाहीं । न म्हणे वेळकाळ कांहीं ॥१॥
विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥
सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठुर नाहीं राग ॥२॥
भेदाभेद नाहीं । तुका म्हणे तिच्याठायीं ॥३॥


२४४५
सरे ऐसें ज्याचें दान । त्याचे कोण उपकार ॥१॥
नको वाढूं ऐसें काचें । दे वो साच विठ्ठला ॥ध्रु.॥
रडत मागें सांडी पोर । ते काय थोर माउली ॥२॥
तुका म्हणे कीर्ती वाढे । धर्म गाढे ते ऐसे ॥३॥


६७५
सर्प भुलोन गुंतला नादा । गारुडियें फांदां घातलासे।
हिंडवुनि पोट भरी दारोदारीं । कोंडुनि पेटारी असेरया ॥१॥
तैसी परी मज जाली पांडुरंगा । गुंतलों तो मी गा सोडवी आतां ।
माझें मज कांहीं न चलेसें जालें । कृपा हे तुज न करितां ॥ध्रु.॥
आविसें मिन लावियला गळीं । भक्ष तो गिळी म्हणोनियां ।
काढूनि बाहेरी प्राण घेऊं पाहे । तेथे बापुमाये कवण रया ॥२॥
पक्षी पिलयां पातलें आशा । देखोनियां फांसा गुंते बळें ।
मरण सायासे नेणें माया धांवोनि वोसरे । जीवित्वा नास जालीं बाळें ॥३॥
गोडपणें मासी लिगाडीं गुंतली । सांपडे फडफडी अधिकाधिक ।
तुका म्हणे प्राण घेतला आशा । पंढरीनिवासा धाव घालीं ॥४॥


१२४
सर्प विंचू दिसे । धन अभाग्या कोळसे ॥१॥
आला डोळ्यांसि कवळ । तेणें मळलें उजळ ॥ध्रु.॥
अंगाचे भोंवडी । भोय झाड फिरती धोंडी ॥२॥
तुका म्हणे नाड । पाप ठाके हिता आड ॥३॥


३०२७
सर्व काळ डोळां बैसो नारायण । नयो अभिमान आड पुढे ॥१॥
धाड पडो तुझ्या थोरपणावरी । वाचे हरीहरी उच्चारीन ॥ध्रु.॥
जळो अंतरींचें सर्व जाणपण । विवादवचन अहंतेचें ॥२॥
सकळां चरणीं गळित माझा जीव । तुका म्हणे भाव एकविध ॥३॥


१०१९
सर्वकाळ माझे चित्तीं । हे चि खंती राहिली ॥१॥
बैसलें तें रूप डोळां । वेळोवेळां आठवे ॥ध्रु.॥
वेव्हाराची सरली मात । अखंडित अनुसंधान ॥२॥
तुका म्हणे वेध जाला । अंगा आला श्रीरंग ॥३॥


२१४४
सर्वथा ही खोटा संग । उपजे भंग मनासी ॥१॥
बहु रंगें भरलें जन । संपन्न चि अवगुणी ॥ध्रु.॥
सेविलिया निःकामबुद्धी। मदें शुद्धी सांडवी ॥२॥
त्रासोनियां बोले तुका । आतां लोकां दंडवत ॥३॥


१२५४
सर्वपक्षीं हरी साहेसखा जाला । ओल्या अंगणीच्या कल्पलता त्याला ॥१॥
सहजचाली चालतां पायवाटे । चिंतामणींसमान होती गोटे ॥२॥
तुका तरी सहज बोले वाणी । त्याचे घरीं वेदांत वाहे पाणी ॥३॥


१५०४
सर्व भाग्यहीन । ऐसें सांभाळिलों दीन ॥१॥
पायीं संतांचे मस्तक । असों जोडोनि हस्तक ॥ध्रु.॥
जाणें तरि सेवा । दीन दुर्बळ जी देवा ॥२॥
तुका म्हणे जीव । समर्पून भाकीं कींव ॥३॥


६८९
सर्वभावें आलों तुज चि शरण । कायावाचामनसहित देवा ॥१॥
आणीक दुसरें नये माझ्या मना । राहिली वासना तुझ्या पायीं ॥ध्रु.॥
माझिये जीवींचेकांहीं जडभारी । तुजविण वारी कोण दुजे ॥३॥
तुझे आम्ही दास आमुचा तूं ॠणी । चालत दूरूनी आलें मागें ॥३॥
तुका म्हणे आतां घेतलें धरणें । हिशोबाकारणें भेटी देई ॥४॥


८९५
सर्वरसीं मीनलें चित्त । अखंडित आनंदु ॥१॥
गोत पति विश्वंभरीं । जाला हरी सोयरा ॥ध्रु.॥
वोळखी ते एका नांवें । इतरवाव खंडणा ॥२॥
तुका म्हणे नांवें रूपें । दुसरीं पापें हारपलीं ॥३॥


५४८
सर्वविशीं माझा त्रासलासे जीव । आतां कोण भाव निवडू एक ॥१॥
संसाराची मज न साहे चि वार्ता । आणीक म्हणतां माझें कोणी ॥ध्रु.॥
देहसुख कांहीं बोलिले उपचार । विष तें आदर बंद वाटे ॥२॥
उपाधि दाटणी प्रतिष्ठा गौरव । होय माझा जीव कासावीस ॥३॥
तुका म्हणे कांहीं आणीक न साहे । आवडती पाय वैष्णवांचे ॥२॥


२३२९
सर्वविशीं आह्मीं हे चि जोडी केली । स्वीमीची साधिली चरणसेवा ॥१॥
पाहिलें चि नाहीं मागें परतोनी । जिंकिला तो क्षणीं क्षण काळ ॥ध्रु.॥
नाहीं पडों दिला विचाराचा गोवा । नाहीं पाठी हेवा येऊं दिला ॥२॥
केली लाग वेगीं अवघी चि तांतडी । भावना ते कुडी दुराविली ॥३॥
कोठें मग ऐसें होतें सावकास । जळो तया आस वेव्हाराची ॥४॥
तुका म्हणे लाभ घेतला पालवीं। आतां नाहीं गोवी कशाची ही ॥५॥


१३३१
सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥
दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥
बहु जालों खेदक्षीण । येणें सीण तो नासे ॥२॥
तुका म्हणे गंगेवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥


३४३१
सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ । तोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥
याचसाठी सांडियेले भरतार । रातलों या परपुरुषाशीं ॥२॥
तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं । औषध जें करूं फळ नव्हे ॥३॥


२२६३
सर्वसुख अधिकारी । मुखें उच्चारी हरीनाम ॥१॥
सर्वांगें तो सर्वोत्तम । मुखीं नाम हरीचें ॥ध्रु.॥
ऐशी उभारिली बाहे। वेदीं पाहें पुराणीं ॥२॥
तुका म्हणे येथें कांही । संदेह नाहीं भरवसा ॥३॥


४९६
सर्व सुखें आजी एथें चि वोळलीं । संतांचीं देखिलीं चरणांबुजें ॥१॥
सर्वकाळ होतों आठवीत मनीं । फिटली ते धणी येणें काळें ॥२॥
तुका म्हणे वाचा राहिली कुंटित । पुढें झालें चित्त समाधान ॥३॥


४०१९
सर्वसुखाचिया आशा जन्म गेला । क्षण मुक्ती यत्न नाहीं केला । हिंडतां दिशा सीण पावला । मायावेष्टिला जीव माझा ॥१॥
माझें स्वहित नेणती कोणी । कांहीं न करितां मजवांचुनी । स्वजन तंव सुखमांडणी । नेणती कोणी आदि अंत ॥ध्रु.॥
काय सांगों गर्भीची यातना । मज भोगितां नारायणा । मांस मळ मूत्र जाणा । तुज क्षणक्षणा ध्यात असें ॥२॥
मज चालतां प्रयाणकाळीं। असतां न दिसती जवळी । मृत्तिके मृत्तिका कवळी । एकले मेळीं संचिताचे ॥३॥
आतां मज ऐसें करीं गा देवा । कांहीं घडे तुझी चरणसेवा । तुका विनवीतसे केशवा । चालवीं दावा संसारें ॥४॥


२२८१
सर्वस्वाचा त्याग तो सदा सोंवळा । न लिंपे विटाळा अग्नी जैसा ॥१॥
सत्यवादी करी संसार सकळ । अलिप्त कमळ जळीं जैसें ॥ध्रु.॥
घडे ज्या उपकार भूतांची दया । आत्मिस्थति तया अंगीं वसे ॥२॥
नो बोले गुणदोष नाइके जो कानीं । वर्तोनी तो जनीं जनार्दन ॥३॥
तुका म्हणे वर्म जाणितल्याविण । पावे करितां सीण सांडीमांडी ॥४॥


३०९०
सर्वस्वाची साटी । तरिच देवासवें गांठी ॥१॥
नाहीं तरी जया तैसा । भोग भोगवील इच्छा ॥ध्रु.॥
द्यावें तें चिं घ्यावें । म्हणउनि ज्यावे जीवें ॥२॥
तुका म्हणे उरी । मागें नूरवितां बरी ॥३॥


१५५९
सर्वस्वा मुकावें तेणें हरीसी जिंकावें । अर्थ प्राण जीवें देहत्याग ॥१॥
मोह ममता माया चाड नाहीं चिंता । विषयकंदुवेथा जाळूनियां ॥ध्रु.॥
लोकलज्जा दंभ आणि अहंकार । करूनि मत्सर देशाधडी ॥२॥
शांति क्षमा दया सखिया विनउनी । मूळ चक्रपाणी धाडी त्यांसी ॥३॥
तुका म्हणे याती अक्षरें अभिमान । सांडोनिया शरण रिघें संतां ॥४॥


२३४५
सर्वात्मकपण । माझें हिरोनि नेतो कोण ॥१॥
मनीं भक्तीची आवडी । हेवा व्हावी ऐशी जोडी ॥ध्रु.॥
घेईन जन्मांतरें। हें चि करावया खरें ॥२॥
तुका म्हणे देवा । ॠणी करूनि ठेवूं सेवा॥३॥


११०५
सर्वा भूतीं द्यावें अन्न । द्रव्य पात्र विचारोन । उपतिष्ठे कारण । तेथें बीज पेरीजे ॥१॥
पुण्य करितां होय पाप । दुग्ध पाजोनि पोशिला साप । करोनि अघोर जप । दुःख विकत घेतलें ॥ध्रु.॥
भूमी पाहातां नाहीं वेगळी । माळ बरड एक काळी । उत्तम निराळी । मध्यम कनिष्ठ ॥२॥
म्हणोनि विवेकें । कांहीं करणें ते निकें । तुका म्हणे फिकें । रुची नेदी मिष्टान्न ॥३॥


२४२४
सवंग झालें सवंग झालें । घरा आलें बंदरींचे ॥१॥
आतां हेवा करु सोस । भक्तीरस बहु गोड ॥ध्रु.॥
पाउल वेचे चिंता नाहीं । आड कांहीं मग नये ॥२॥
तुका म्हणे संचिताचें । नेणें काये राहों तें ॥३॥


२५५
संसार हा तीहीं केला पाठमोरा । नाहीं द्रव्य दारा जया चित्तीं ॥१॥
शुभाशुभ नाहीं हर्षामर्ष अंगीं । जनार्दन जगीं होउनि ठेला ॥२॥
तुका म्हणे देहें दिला एकसरें । जयासि दुसरें नाहीं मग ॥३॥


२०२९
संवसारसांते आले हो आइका । तुटीचें ते नका केणें भरूं ॥१॥
लाभाचा हा काळ अवघे विचारा । पारखी ते करा साह्य येथें ॥ध्रु.॥
शृंगारिलें दिसे न कळें अंतर । गोविला पदर उगवेना ॥२॥
तुका म्हणे खोटें गुंपतां विसारें । हातिंचिया खरें हातीं घ्यावें ॥३॥


७११
संसार तो कोण देखे । आम्हां सखे हरीजन ॥१॥
काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥ध्रु.॥
स्वप्नीं ते ही नाहीं चिंता । रात्री जातां दिवस ॥२॥
तुका म्हणे ब्रम्हरसें । होय सरिसें भोजन ॥३॥


१०६८
संसारसंगें परमार्थ जोडे । ऐसें काय घडे जाणतेनो ॥१॥
हेंडग्याच्या आळां अवघीं चिपाडें । काय तेथें गोडें निवडावीं ॥ध्रु.॥
ढेकणाचे बाजे सुखाची कल्पना । मूर्खत्व वचना येऊं पाहे ॥२॥
तुका म्हणे मद्य सांडवी लंगोटी । सांगितला सेटीं विचार त्या ॥३॥


४०६८
संसारसिंधु हा दुस्तर । ल्लुंघवे उल्लंघितां पार । बहुत वाहाविलें दूर । न लगे चि तीर पैल थडी ॥१॥
किती जन्म जाला फेरा । गणित नाहीं जी दातारा । पडिलों आवती भोंवरा । बहुता थोरा वोळसिया ॥ध्रु.॥
वाढलों परी नेणती बुद्धी । नाहीं परतली धरिली शुद्धी । मग म्यां विचारावें कधीं । ऐसी संधी सांडुनिया ॥२॥
अनेक खाणीं आहार निद्रा । भयमैथुनाचा चि थारा । बाळत्व तारुण्य जरा । प्रधान पुरा भोग तेथें ॥३॥
ऐसीं उल्लंघूनि आलों स्थळें । बहु भोवंडिलों काळें । आतां हें उगवावें जाळें । उजेडा बळें दिवसाच्या ॥४॥
सांडीन या संसाराची वाट । बहु येणें भोगविले कष्ट । दावी सत्या ऐसें नष्ट । तुका म्हणे भ्रष्ट झालों देवद्रोही ॥५॥


२४१८
संसारसोहळे भोगिती सकळ । भक्तां त्याचें बळ विटोबाचें ॥१॥
भय चित्तीं धाक न मनिती मनीं । भक्तां चक्रपाणि सांभाळीत ॥ध्रु.॥
पापपुण्य त्यांचें धरूं न शके अंग । भक्तांसी श्रीरंग सर्वभावे ॥२॥
नव्हती ते मुक्त आवडे संसार । देव त्यांचा भार सर्व वाहे ॥३॥
तुका म्हणे देव भक्तां वेळाईत । भक्त ते निंश्चित त्याचियानें ॥४॥


३०८६
संसारा आलिया उठा वेग करा । शरण जा उदारा पांडुरंगा ॥१॥
देह हें देवाचें धन कुबेराचें । तेथें मनुष्याचें काय आहे ॥ध्रु.॥
देता देवविता नेता नेवविता । येथ याची सत्ता काय आहे ॥२॥
निमित्याचा धनी केला असे प्राणी । तुका म्हणे म्हणोनि व्यर्थ गेला ॥३॥
५३६
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥१॥
भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥
भिक्षाणी वेवसाव। काला करितो गाढव ॥२॥
करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी कासया निस्पृही ॥३॥
प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ॥४॥
तुका म्हणे होंई सुर । किंवा निसुर मजुर ॥५॥


२६९६
संसाराची कोण गोडी । दिली जोडी करूनि ॥१॥
निष्ठुर तूं बहु देवा । पुरे हेवा न म्हणवी ॥ध्रु.॥
पाहोनियां कर्म डोळां । निराळा तो वर्जीना ॥२॥
तुका म्हणे तुज माझें । म्हणतां ओझें फुकट ॥३॥


३६१०
संसाराचे अंगीं अवघीं च वेसनें । आम्ही या कीर्तनें शुद्ध झालों ॥१॥
आतां हें सोंवळें जालें त्रिभुवन । विषम धोऊन सांडियेलें ॥ध्रु.॥
ब्रम्हपुरीं वास करणें अखंड । न देखिजे तोंड विटाळाचें ॥२॥
तुका म्हणे आम्हां एकांताचा वास । ब्रह्मीं ब्रम्हरस सेवूं सदा ॥३॥


२७७९
संसाराचें धांवे वेठी । आवडी पोटीं केवढी ॥१॥
हागों जातां दगड सांची । अंतरीं ही संकल्प ॥ध्रु.॥
लाज तेवढी नारायणीं । वांकडी वाणी पोरांपें ॥२॥
तुका म्हणे बेशरमा । वरी श्रमा पडिभरू ॥३॥


६६
संसारच्यातापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥
बहुतां जन्मींचा झालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥२॥
वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥३॥
बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस झालों कासाविस ॥४॥
तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीनानाथा ॥५॥


२५५८
संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य केला धर्म ॥१॥
हरीभजनें हें धविळलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥ध्रु.॥
कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥२॥
तुका म्हणे सुख समाधि हरीकथा । नेणें भव्यकथा गाईल तो ॥३॥


१८१७
संसाराच्या भेणें । पळों न लाहेसें केलें ॥१॥
जेथें तेथें आपण आहे । आह्मीं करावें तें काये ॥ध्रु.॥
एकांतींसी ठाव । तिहीं लोकीं नाहीं वाव ॥२॥
गांवा जातों ऐसें । न लगे म्हणावें तें कैसें ॥३॥
स्वप्नाचीये परी । जागा राहे तंव घरीं ॥४॥
तुका म्हणे काये । तुझे घेतले म्यां आहे ॥५॥


१५६८
संसारापासूनि कैसें सोडविशी । न कळे हृषीकेशी काय जालो ।करितां न सरे अधिक वाट पाहीं । तृष्णा देशधडी केलों । भक्तीभजनभाव यांसी नाहीं ठाव । चरणीं तुझ्या अंतरलों। मागें पुढें रीग न पुरे चि पाहातां । अवघा अवघीं वेष्टिलों ॥१॥
आतां माझी लाज राखें नारायणा । हीन हीन लीन याचकाची । करितां न कळे कांहीं असतील गुण दोष । करीं होळी संचिताची ॥ध्रु.॥
इंद्रियें द्वारें मन धांवे सैरें । नांगवे करितां चि कांहीं । हात पाय कान मुख लिंगस्थान ।
नेत्र घ्राणद्वारें पाहीं । जया जैसी सोय तया तैसें होय । क्षण एक स्थिर नाहीं । करिती ताडातोडी ऐसी यांची खोडी। न चले माझें यास कांहीं ॥२॥
शरीरसंबंधु पुत्र पत्नी बंधु । धन लोभ मायावंत । जन लोकपाळ मैत्र हे सकळ ।
सोइरीं सज्जनें बहुतें । नाना कर्म डाय करिती उपाय । बुडावया घातपातें । तुका म्हणे हरी राखे भलत्या परी । आम्ही तुझीं शरणागतें ॥३॥


२३७४
सहज पावतां भगवंतीं परि हीं विकल्पें परतीं । फुकाची हे चित्तीं आठवण न धरिती ॥१॥
हरी व्यापक सर्वगत हें तंव मुख्यत्वें वेदांत । चिंतनासी चित्त असों द्यावें सावध ॥ध्रु.॥
विरजाहोम या चि नांवें देह नव्हे मी जाणावें । मग कां जी यावें वरी लागे संकल्पा ॥२॥
कामक्रोधे देह मिळण स्वाहाकारीं कैंचें पुण्य । मंत्रीं पूजियेला यज्ञाने मनमुंडण नव्हे चि ॥३॥
अनन्यभक्तीचे उपाय ते या विठोबाचे पाय । ध्याइल तो काय जाणे चुकों मारग ॥४॥
आतां सांगे तुका एक तुम्ही चुकों नका । सांडीमांडी धोका शरण रिघतां गोमटें ॥५॥


३९२२
सहज मी आंधळा गा निजनिराकार पंथें । वृत्ति हे निवृत्ति झाली जन न दिसे तेथें ।
मी माजी हारपलें ठायीं जेथींचा तेथें । अदृश्य तें चि जालें कांहीं दृश्य जें होतें ॥१॥
सुखी मी निजलों गा शून्य सारूनि तेथें । त्रिकूटशिखरीं गा दान मिळे आइतें ॥ध्रु.॥
टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा ।
न मागें मी भीक आतां हाचि झाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणें पुरविली इच्छा ॥२॥
ऊर्ध्वमुखें आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद ।
घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपीं मेळविलें नांव ठेविला भेद ॥३॥
शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागें येतील त्यांसीं ।
मागोनि आली वाट सिद्धिओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥
वर्म तें एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ते ठाव ।
म्हणोनि संग टाकी सेवीं अद्वैत भाव । तुका म्हणे हाचि संतीं मागें केला उपाव ॥५॥


२३३८
सहज लीळा मी साक्षी याचा । नये वंचूं वाचा ऐसें जालें ॥१॥
उपक्रमें वदे निशब्दाची वाणी । जे कोठें बंधनीं गुंपों नेणें ॥ध्रु.॥
तम नासी परि वेव्हारा वेगळा । रविप्रभाकळा वर्ते जन॥२॥
तुका म्हणे येथें गेला अतिशय । आतां पुन्हा नये तोंड दावूं ॥३॥


सा सां
११२०
साकरेची गोणी बैलाचिया पाठी । तयासी सेवटीं करबाडें ॥१॥
मालाचे पैं पेटे वाहाताती उंटें । तयालागीं कांटे भक्षावया ॥ध्रु.॥
वाउगा हा धंदा आशा वाढविती । बांधोनियां देती यमा हातीं ॥२॥
ज्यासी असे लाभ तोचि जाणे गोडी । येर तीं बापुडीं सिणलीं वांयां ॥३॥
तुका म्हणे शहाणा होई रे गव्हारा । चोऱ्यासीचा फेरा फिरों नको ॥४॥


१२२६
साकरेच्या योगें वर्ख । राजा कागदातें देखे ॥१॥
तैसें आम्हां मानुसपण । रामनाम केण्यागुणें ॥ध्रु.॥
फिरंगीच्या योगें करी । राजा काष्ठ हातीं धरी ॥२॥
रत्नकनका योगें लाख । कंठीं धरिती श्रीमंत लोक ॥३॥
देवा देवपाट देव्हा । †यावरी बैसे स्पष्ट॥४॥
ब्रह्मानंदयोगें तुका । पढीयंता जन लोकां ॥५॥


२३०७
साकरेचें नाम घेतां कळे गोडी । तैसी आम्हां जोडी वैष्णवांची ॥१॥
मोक्ष गांठी असे ठेविला बांधोनी । सोस तो भजनीं आवडीचा ॥ध्रु.॥
भोजनाची चिंता माय वाहे बाळा । आम्हा तरी खेळावरी चित्त ॥२॥
तुका म्हणे आम्ही देहउपकारें । गाऊं निरंतर नाचों लागों ॥३॥


२४२७
सांखिळलों प्रीती गळां । भुंके वेळा जाणोनियां॥१॥
तुमचें मी केशीराजा । सुनें या काजा पाळिलों ॥ध्रु.॥
आलें गेलें कळे वाटा । कोण निटा वाकडिया ॥२॥
तुका म्हणे आलें वारी । दुरितें दुरी नातळतां ॥३॥


१६९६
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥
सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥
अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥२॥
तुका म्हणे नाही भेद । देवा करू नये वाद ॥३॥


७६४
सांगतां दुर्लभ ज्ञानाचिया गोष्टी । अनुभव तो पोटीं कैचा घडे ॥१॥
भजनाचे सोई जगा परिहार । नेणत्यां सादर चित्त कथे ॥ध्रु.॥
नाइकवे कानीं साधन उपाय । ऐकतो गाय हरुषें गीत ॥२॥
नव्हे आराणूक जावयासी वना । वेध कामिमना हरीकथेचा ॥३॥
काळाच्या साधना कोणा अंगीं बळ । चिंतना मंगळ अष्टप्रहर ॥४॥
तुका म्हणे आम्ही खेळों भातुकुलें । विभागासी मुलें भोळीं येथें ॥५॥


४८१
सांगतां हें नये सुख । कीर्ती मुख न पुरे ॥१॥
आवडीनें सेवन करू । जीवींचें धरूं जीवीं च ॥ध्रु.॥
उपमा या देतां लाभा । काशा शोभा सारिखी ॥२॥
तुका म्हणे नुचलीं डोई । ठेविली पायीं संतांचे ॥३॥


३४३६
सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं । आमुचे नाचणीं नाचूं नका ॥१॥
जोंवरी या तुम्हां मागिलांची आस । तोंवरी उदास होऊं नका ॥२॥
तुका म्हणे काय वांयांविण धिंद । पति ना गोविंद दोन्ही नाहीं ॥३॥


२९७०
सांगतों तुम्हीसी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥१॥
करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥
कांहीं न लगे एक भाव चि कारण । तुका म्हणे आण विठ्ठलाची ॥३॥


१८४२
सांगतों या मना तें माझें नाइके । घातावरी टेंके चांडाळ हें ॥१॥
म्हणऊनि पाहे तरतें बुडतें । न ल्हाये पुरतें बळ करूं ॥ध्रु.॥
काय तें संचित न कळे पाहातां । मतिमंद चिंत्ता उपजतें ॥२॥
तुका म्हणे ऐसें बळ नाहीं अंगी । पाहोनियां वेगीं पार ठाकीं ॥३॥


३५२८
सांगा दास नव्हें तुमचा मी कैसा । ऐसें पंढरीशा विचारूनि ॥१॥
कोणासाटीं केली प्रपंचाची होळी । या पायां वेगळी मायबापा ॥ध्रु.॥
नसेल तो द्यावा सत्यत्वासी धीर । नये भाजूं हीर उफराटे ॥२॥
तुका म्हणे आम्हां आहिक्य परत्रीं । नाहीं कुळगोत्रीं तुज विन ॥३॥


१६७४
सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धि मग ॥१॥
आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥
नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥२॥
तुका म्हणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥३॥


६१३
सांगों काय नेणा देवा । बोलाची त्या आवडी ॥१॥
वांयां मज चुकुर करा । विश्वंभरा विनोदें ॥ध्रु.॥
आवडीच्या करा ऐसें। अंतर्वासें जाणतसां ॥२॥
तुका म्हणे समाधानें । होइन मनें मोकळा ॥३॥


१००७
सांगों जाणती शकुन । भूत भविष्य वर्तमान ॥१॥
त्यांचा आम्हांसी कंटाळा । पाहों नावडती डोळां ॥ध्रु.॥
रिद्धीसिद्धींचे साधक । वाचासिद्ध होती एक ॥२॥
तुका म्हणे जाती । पुण्यक्षयें अधोगती ॥३॥


२४१४
साच मज काय कळों नये देवा । काय तुझी सेवा काहे नव्हे ॥१॥
करावें तें बरें जेणें समाधान । सेवावें हें वन न बोलावें ॥ध्रु.॥
शुद्ध माझा भाव होईल तुझे पायीं । तरि च हें देई निवडूनि ॥२॥
उचित अनुचित कळों आली गोष्टी । तुझे कृपादृष्टी पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे मज पायांसवे चाड । सांगसी तें गोड आहे मज ॥४॥


३९१२
साच माझा देव्हारा । भाक ठेवा भाव खरा । त्रिगुणाचा फुलवरा । आणा विनंति सांगतों ॥१॥
माझें दैवत हें रंगीं । नाचे वैष्णवांच्या संगीं । भरलें मग अंगीं । निवाड करी दोहींचा ॥ध्रु.॥
तुझें आहे तुजपासीं । परि तूं जागा चुकलासी । निवडुनियां नासी । तुझ्या घरिच्यांनीं केली ॥२॥
आतां न पडे ठावें । वांचूनियां माझ्या देवें । अंधकार व्हावें । नासु ठाव शोधावा ॥३॥
आंधळ्यासी डोळे । देते पांगुळासी पाय । वांजा पुत्र होय । नवस पुरविते विठाई ॥४॥
उगविलीं कोडीं । मागें कित्येकाचीं बापुडीं । तुका म्हणे घडी । न लगे नवस द्या आधीं ॥५॥


३१९४
साच हा विठ्ठल साच हें करणें । संत जें वचनें बोलियेले ॥१॥
साच तें स्वहित साच ते प्रचित । साच वेद नीत सांगतील ॥२॥
तुका म्हणे घेती साच साच भावें । लटिकें वर्म ठावें नाहीं त्यांसी ॥३॥


७४५
साजे अळंकार । तरि भोगितां भ्रतार ॥१॥
व्यभिचारी चा टाकमटिका । उपहास होती लोकां ॥ध्रु.॥
शूरत्वाची वाणी । रूप मिरवे मंडणीं ॥२॥
तुका म्हणे जिणें । शर्त्ती विण लाजिरवाणें ॥३॥


३५१
सांटविला हरी । जींहीं हृदयमंदिरीं ॥१॥
त्यांची सरली येरझार । जाला सफळ व्यापार ॥ध्रु.॥
हरी आला हाता । मग कैंची भय चिंता ॥२॥
तुका म्हणे हरी । कांहीं उरों नेदी उरी ॥३॥


४६४
सांटविले वाण । पैस घातला दुकान ॥१॥
जें ज्या पाहिजे जे काळीं । आहे सिद्ध चि जवळी ॥ध्रु.॥
निवडिलें साचें । उत्तममध्यमकनिष्ठाचें ॥२॥
तुका बैसला दुकानीं । दावी मोला ऐसी वाणी ॥३॥


३८७२
सांडवले सकळांचे अभिमान । आणिले शरण लोटांगणीं ॥१॥
लोटांगणीं आले होऊनियां दीन । मग नारायण म्हणे भलें ॥२॥
भला आजि तुम्ही केला साच पण । गिरि गोवर्धन उचलिला ॥३॥
लागती चरणा सकळ ते काळीं । आम्हांमध्यें बळी तूं चि एक ॥४॥
एका तुजविण न यों आम्ही कामा । कळों कृष्णा रामा आलें आजी ॥५॥
आजिवरी आम्हां होता अभिमान । नेणतां चरणमहिमा तुझा ॥६॥
तुझा पार आम्ही नेणों नारायणा । नखीं गोवर्धना राखियेलें ॥७॥
राखियेलें गोकुळ आम्हां सकळांसि । दगडाच्या राशी वरुषतां ॥८॥
वर्णावें तें काय तुझें महिमान । धरिती चरण सकळिक ॥९॥
सकळ ही तान विसरलीं भूक । सकळ ही सुख दिलें त्यांसि ॥१०॥
त्यासि कळों आला वैकुंठनायका । तुका म्हणे लोक निर्भर ते ॥११॥


३१३७
सांडावी हे भीड अधमाचे चाळे । मद्यपीर बरळे भलत्या छंदें ॥१॥
ऐसे तंव तुम्ही नाहीं जी दिसत । कां हें अनुचित वदलेती ॥ध्रु.॥
फांटा झाला त्यासी नाहीं वोढा वारा । बेरसा चा खरा हा तो गुण ॥२॥
तुका म्हणे नाहीं ज्याच्या बापा ताळ । तो देखे विटाळ संतां अंगीं ॥३॥


२७४७
सांडियेली काया । वरी ओंवाळूनी पायां ॥१॥
शरण शरण नारायणा । मज अंगीकारा दीना ॥ध्रु.॥
आलों लोटांगणीं । रुळें तुमचे चरणीं ॥२॥
तुका म्हणे शीर । ठेवियेलें पायांवर ॥३॥


३२९९
सांडुनि सुखाचा वांटा । मुक्ति मागे तो करंटा ॥१॥
कां रे न घ्यावे हे जन्म । काय वैकुठा जाऊन ॥ध्रु.॥
येथें मिळतो दहीं भात । नाहीं वैकुंठीं ते मात ॥२॥
तुका म्हणे मुक्ती नलगे । राहेन संतांची संगे॥३॥


२२४७
सांडूनि कीर्तन न करीं आणीक काज । नाचेन निर्लज्ज तुझ्या रंगीं ॥१॥
आवडीचें आर्त पुरवीं पंढरिराया । शरण तुझ्या पायां या चि लागीं ॥ध्रु.॥
टाळी वाहूनियां विठ्ठल म्हणेन । तेणें निवारीन भवश्रम ॥२॥
तुका म्हणे देवा नुपेक्षावें आम्हां । न्यावें निजधामा आपुलिया ॥३॥


३४६८
सांडुनियां पंढरीराव । कवणातें म्हणों देव ॥१॥
बहु लाज वाटे चित्ता । आणिकांतें देव म्हणतां ॥ध्रु.॥
सांडुनियां हिरा । कोणें वेचाव्या त्या गारा ॥२॥
तुका म्हणे हरीहर । ऐसी सांडुनियां धुर ॥३॥


२४०६
सांडुनियां सर्व लौकिकाची लाज । आळवा यदुराज भक्तीभावें ॥१॥
पाहूनियां झाडें वरबडूनि पाला । खाऊनि विठ्ठला आळवावें ॥ध्रु.॥
वेंचूनियां चिंध्या भरूनियां धागा । गुंडाळूनि ढुंगा आळवावें ॥२॥
तुका म्हणे ऐसें मांडिल्या निर्वाण । तया नारायण उपेक्षीना ॥३॥


३९९०
सांडूनि वैकुंठ । उभा विटेवरी नीट ॥१॥
आला आला रे जगजेठी । भक्ता पुंडलिकाचे भेटी ॥ध्रु.॥
पैल चंद्रभागे तिरीं । कट धरूनियां करीं ॥२॥
तुकयाबंधु म्हणे अंबर । गजर होतो जयजयकार ॥३॥


१०२७
सांडोनीया दों अक्षरां । काय करूं हा पसारा ।
विधिनिषेधाचा भारा । तेणें दातारा नातुडेसी ॥१॥
म्हणोनि बोबडा उत्तरीं । वाचें जपें निरंतरीं ।
नाम तुझें हरी । भवसागरीं तारूं तें ॥ध्रु.॥
सर्वमय ऐसें वेदांचें वचन । श्रुति गर्जती पुराणें ।
नाहीं आणीक ध्यान । रे साधन मज चाड ॥२॥
शेवटीं ब्रह्मार्पण । या चि मंत्राचें कारण ।
काना मात्र वांयांविण । तुका म्हणे बिंदलीं ॥३॥


३७९१
सात पांच गौळणी आलिया मिळोनी यशोदे गाऱ्हाणें देती कैसें ।
काय व्यालीस पोर चोरटें सिरजोर जनावेगळें ची कैसें।
दहिं दुध लोणी शिंकां नुरे चि कांहीं कवाड जैशाचें तैसें ।
चाळवूनि नाशिली कन्याकुमरें आमुच्या सुनांसि लाविलें पिसें गे बाइये ॥१॥
आझुनि तरी यासि सांगें बरव्या परी । नाहीं तरी नाहीं उरी जीवेसाटी ।
मिळोनि सकळै जणी करूं वाखा । सखीं तुज मज होईल तुटी गे बाइये ॥ध्रु.॥
नेणे आपपर लौकिक वेव्हार । भलते ठायीं भलतें करी ।
पाळतुनि घरीं आम्ही नसतां । तेथें आपण संचार करी ।
सोगया चुंबन देतो आळिंगन । लोळे आमुच्या सेजाबाजावरी ।
शिंकीं कडाडा फोडी गोरसाचे डेरे धरितां न सांपडे करीं गे बाइये ॥२॥
आतां याची चाड नाहो आम्हां भीड । सांपतां कोड पुरवूं मनिचें ।
सोसिलें बहु दिस । नव्हता केला निस । म्हणुनि एकुलतें तुमचें ।
चरण खांबीं बांधेन जीवें । सरिसा जवें न चले कांहीं याचें ।
अर्थ प्राण देतां न सोडी सर्वथा । भलतें हो या जिवाचें गे बाइये ॥३॥
घेउनी जननी हातीं चक्रपाणी । देतिसे गौळणी वेळोवेळां ।
निष्ठुर वाद झणीं बोलाल सकळा । क्षोभ जाइल माझ्या बाळा ।
जेथें लागे हात वाढतें नवनीत अमृताच्या कल्लोळा ।
देखोनि तुकयास्वामी देश देहभाव विसरल्या सकळा गे बाइये ॥४॥


३२७९
सातादिवसांचा जरी झाला उपवासी । तरीं कीर्तनासी टाकुं नये ॥१॥
फुटो हा मस्तक तुटो हें शरीर । नामाचा गजर सोडूं नये ॥ध्रु.॥
शरीराचे होत दोनी ते ही भाग । परि कीर्तनाचा रंग सोडों नये ॥२॥
तुका म्हणे ऐसा नामीं झाला निर्धार । तेथें निरंतर देव वसे ॥३॥


२७२२
सांता पांचां तरीं वचनां सेवटीं । निरोप कां भेटी एक तरी ॥१॥
कां नेणें निष्ठुर केलें नारायणा । न देखें हें मना येतां कांहीं ॥२॥
तुका म्हणे ऐसा न देखें निवाड । कडू किंवा गोड फळ पोटीं ॥३॥


३९६४
सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥
या साहेबाचें झालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥
अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥२॥
म्हणे तुका वोळगों एका तोड चिंता माया । देऊंनियां उद्गार जाऊं मुळीचिया ठाया ॥३॥


१७६६
सादाविलें एका । सरें अवघियां लोकां ॥१॥
आतां आवडीचे हातीं । भेद नाहीं ये पंगती ॥ध्रु.॥
मोकळी च पोतीं । नाहीं पुसायाची गुंती ॥२॥
तुका म्हणे बरा । आहे ढसाळ वेव्हारा ॥३॥


८२८
साधक जाले कळी । गुरुगुडीची लांब नळी ॥१॥
पचीं पडे मद्यपान । भांगभुर्का हें साधन ॥ध्रु.॥
अभेदाचें पाठांतर । अति विषयीं पडिभर ॥२॥
चेल्यांचा सुकाळ । पिंड दंड भगपाळ ॥३॥
सेवा मानधन । बरे इच्छेनें संपन्न ॥४॥
सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनियां सोडी ॥५॥


११६१
साधकाची दशा उदास असावी । उपाधि नसावी अंतर्बाही ॥१॥
लोलुप्यता काय निद्रेतें जिणावें । भोजन करावें परिमित ॥ध्रु.॥
एकांती लोकांतीं स्त्रियांशीं भाषन । प्राण गेल्या जाण बोलों नये ॥२॥
तुका म्हणे ऐसा साधनीं जो राहे । तोचि ज्ञान लाहे गुरुकृपा ॥४॥


१८५१
साधन संपित्त हें चि माझें धन । सकळ चरण विठोबाचे ॥१॥
शीतळ हा पंथ माहेराची वाट । जवळी च नीट सुखरूप ॥ध्रु.॥
वैष्णवांचा संग रामगाणें गाणें । मंडित भूषण अळंकार ॥२॥
भवनदी आड नव्हतीसी जाली । कोरडी च चाली जावें पायी ॥३॥
मायबाप दोघें पाहातील वाट । ठेवूनिया कटीं कर उभी ॥४॥
तुका म्हणे केव्हां देखेन कळस । पळाली आळस निद्रा भूक ॥५॥


३१०७
साधनाचे कष्ट मोठे । भय वाटे थोर हें ॥१॥
मुखें गावें भावें गीत । सर्व हित बैसलिया ॥ध्रु.॥
दासा नव्हे कर्म दान । तन मन निश्चळि ॥२॥
तुका म्हणे आत्मनिष्ठा । भोग चेष्टा मनाची ॥३॥


७७३
साधनांच्या कळा आकार आकृति । कारण नवनीतीं मथनाचें ॥१॥
पिक्षयासी नाहीं मारगीं आडताळा । अंतराक्षी फळासी चि पावे ॥ध्रु.॥
भक्तीची जोडी ते उखत्या चि साठी । उणें पुरें तुटी तेथें नाहीं ॥२॥
तुका म्हणे आलें सांचत सांचणी । आजि जाली धणी एकसरें ॥३॥


३१९०
साधनाच्या काय कोटी । केल्या आटी होती त्या ॥१॥
देव कृपा करी जरी । होय उजरी स्वरूपीं ॥ध्रु.॥
केले होते चिंता श्रम । उपरम न होतां ॥२॥
तुका म्हणे कळों आलें । सर्व जालें आपरूप ॥३॥


१९२९
साधनें आमुचीं आज्ञेचीं धारकें । प्रमाण सेवकें स्वामिसत्ता ॥१॥
प्रकाशिलें जग आपुल्या प्रकाशें । रवि कर्मरसें अलिप्त त्या ॥ध्रु.॥
सांगणें तें तें नाहीं करणें आपण । मोलाही वचन वाढ झालें ॥२॥
तुका म्हणे आम्हां भांडवल हातीं । येरझारा खाती केवढियें ॥३॥


२८४
साधनें तरी हीं च दोन्ही । जरी कोणी साधील ॥१॥
परद्रव्य परनारी । याचा धरीं विटाळ ॥ध्रु.॥
देवभाग्यें घरा येती । संपत्ती त्या सकळा ॥२॥
तुका म्हणे तें शरीर । गृह भांडार देवाचें ॥३॥


१०५९
साधावया भक्तीकाज । नाहीं लाज हा धरीत ॥१॥
ऐसियासी शरण जावें । शक्ती जीवें न वंची ॥ध्रु.॥
भीष्मपण केला खरा । धनुर्धरा रक्षीलें ॥२॥
तुका म्हणे साक्ष हातीं । तो म्यां चित्तीं धरियेला ॥३॥


१४७७
साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी । प्रारब्ध तुटी क्रियमाण ॥१॥
मग कासयानें पुन्हा संवसार । बीजाचे अंकुर दग्ध होती ॥ध्रु.॥
जिणें दिल्हें त्यासी द्यावा पिंडदान । उत्तीर्ण चरण धरूनि व्हावें ॥२॥
तुका म्हणे निज भोगईल निजता । नाहीं होईल सत्ता दुजियाची ॥३॥


१११६
साधूच्या दर्शना लाजसी गव्हारा । वेश्येचिया घरा पुष्पें नेसी ॥१॥
वेश्या दासी मुरळी जगाची वोंवळी । ते तुज सोंवळी वाटे कैशी ॥२॥
तुका म्हणे आतां लाज धरीं बुच्या । टांचराच्या कुच्या मारा वेगीं ॥३॥


३३३६
साधुनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहावे ॥१॥
साधुनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥
असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥३॥


१२३
सांपडला संदीं । मग बळिया पडे बंदीं ॥१॥
ऐसी कोणी वाहे वेळ । हातीं काळाच्या सकळ ॥ध्रु.॥
दाता मागे दान । जाय याचका शरण ॥२॥
तुका म्हणे नेणां । काय सांगों नारायणा ॥३॥


१६८६
सांपडला हातीं । तरी जाली हे निंश्चिती ॥१॥
नाहीं धांवा घेत मन । इंद्रियांचें समाधान ॥ध्रु.॥
सांडियेला हेवा । अवघा संचिताचा ठेवा ॥२॥
तुका म्हणे काम । निरसुनियां घेतों नाम ॥३॥


२९५४
सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥१॥
लादी थींके लाजिरवाणी । हीनकामाईंची घाणी ॥ध्रु.॥
पुष्प जवळी नाका । दुर्गंधीच्या नांवें थुंका ॥२॥
तुका म्हणे किती । उपदेशहीन जाती ॥३॥


३७१९
सारा विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥१॥
बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥
कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥
एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥
राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥
पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥५॥
एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥६॥
तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥७॥


२०३०
सारावीं लिगाडें धरावा सुपंथ । जावें उसंतीत हळूहळू ॥१॥
पुढें जातियाचे उमटले माग । भांबावलें जग आडरानें ॥ध्रु.॥
वेचल्याचा पाहे वरावरी झाडा । बळाचा निधडा पुढिलिया ॥२॥
तुका म्हणे जैसी दाखवावी वाणी । ते द्यावी भरोनी शेवट तों ॥३॥


३१६२
सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥१॥
तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तराल दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥
जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हाचि नेम अहर्निशीं ॥२॥
तुका म्हणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥३॥


२६३५
सारीन तें आतां एकाचि भोजनें । वारीन मागणें वेळोवेळां ॥१॥
शेवटींचा घास गोड करीं माते । अगे कृपावंते पांडुरंगे ॥ध्रु.॥
वंचूं नये आतां कांहीं च प्रकार । धाकल्याचें थोर झाल्यावरी ॥२॥
तुका म्हणे पोटी बहु झाला वाव । कांहीं नेदीं ठावें उरों मागें ॥३॥


३४८०
सालोमालो हरीचे दास । म्हणउन केला अवघा नास ॥१॥
अवघें बचमंगळ केलें । म्हणती एकांचें आपुले ॥ध्रु.॥
मोडूनि संतांचीं वचनें । करिती आपणां भूषणें ॥२॥
तुका म्हणे कवी । जगामधीं रूढी दावी ॥३॥


३६८६
सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥
मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थोरीं घाव घालीं ॥ध्रु.॥
वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥२॥
कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥३॥
तुका म्हणे रूप उमटे सरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध झाला ॥४॥



सावध जालों सावध जालों । हरीच्या आलों जागरणा ॥१॥
तेथें वैष्णवांचे भार । जयजयकार गर्जतसे ॥ध्रु.॥
पळोनियां गेली झोप । होतें पाप आड तें ॥२॥
तुका म्हणे त्या ठाया । ओल छाया कृपेची ॥३॥


२३७८
सावधान ऐसें काय तें विचारा । आले हो संसारा सकळ ही ॥१॥
अंतीं समयाचा करणें विचार । वेचती सादर घटिका पळें ॥ध्रु.॥
मंगळ हें नोहे कन्यापुत्रादिक । राहिला लौकिक अंतरपाट ॥२॥
तुका म्हणे देव अंतरला दुरी । डोळिया अंधारी पडलीसे ॥३॥


२३५५
सांवळें रूपडें चोरटें चित्ताचें । उभें पंढरीचे विटेवरी॥१॥
डोळियांची धणी पाहातां न पुरे । तया लागीं झुरे मन माझें ॥ध्रु.॥
प्राण रिघों पाहे कुडी हे सांडुनी । श्रीमुख नयनीं न देखतां ॥३॥
चित्त मोहियेलें नंदाच्या नंदनें । तुका म्हणे येणें गरुडध्वजें ॥४॥


३११९
सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥
आणीक कांहीं इच्छा आम्हां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥
जन्मोजन्मीं ऐसें मागितलें तुज । आम्हांसी सहज द्यावें आतां ॥२॥
तुका म्हणे तुज ऐसे जी दयाळ । धुंडितां सकळ नाहीं आम्हां ॥३॥


२१०८
सावित्रीची विटंबना । रांडपण करीतसे ॥१॥
काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥
कुबेर नांव मोळी वाहे। कैसी पाहें फजिती ॥२॥
तुका म्हणे ठुणगुण देखें । उगीं मुखे का फुंदतां ॥३॥


३४३८
सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥
सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥
न व्हावी ते झाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजों आतां ॥३॥


१९७९
साहोनि टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें ॥१॥
तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥
बाण शस्त्र साहे गोळी । सुरां ठाव उंच स्थळीं ॥२॥
तुका म्हणे सती । अग्न न देखे ज्या रीती ॥३॥


९३०
साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार ख†या मोलें ॥१॥
भोगाचे सांभाळीं द्यावें कलेवर । संचिता चि थार मोडूनियां ॥ध्रु.॥
महत्वाचे ठायीं भोगावी अप्रतिष्ठा । विटवावें नष्टां पंचभूतां ॥२॥
तुका म्हणे मग कैंचा संवसार । जयाचा आदर तें चि व्हावें ॥३॥


१४५
साळंकृत कन्यादान । पृथ्वी दानाच्या समान ॥१॥
परि तें न कळे या मूढा । येईल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥
आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥२॥
सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥३॥
अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥
तुका म्हणे सोसे । दुःख आतां पुढें नासे ॥५॥


सि सिं सी
२८७९
सिकविला तैसा पढों जाणे पुसां । कैंची साच दशा तैसी अंगीं ।
स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥
कासया हा केला जिव्हे अळंकार । पायांसी अंतर दिसतसे ॥ध्रु.॥
दर्पणींचें धन हातीं ना पदरीं । डोळां दिसें परी सत्याचिये ।
आस केली तरी लाळ चि घोंटावी । ठकाठकी तेवीं दिसतसे ॥२॥
कवित्व रसाळ वदविली वाणी । साक्ष ही पुराणीं घडे ऐसी ।
तुका म्हणे गुरें राखोनि गोंवारी । माझीं म्हणे परि लाभ नाहीं ॥३॥


१९६९
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥१॥
नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥
पाणचोऱ्याचें दार । वरील दाटावें तें थोर ॥२॥
वस्व जाला राजा । मग आपुल्या त्या प्रजा ॥३॥
एक आतुडे चिंतामणी । फिटे सर्व सुखधणी ॥४॥
तुका म्हणे धांवा । आहे पंढरिये विसांवा ॥५॥


१८०४
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥
न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥
मायबापें माझीं जीवाचीं सांगाती । तीं देतील हातीं काळाचिया ॥२॥
पडताळूनि सुरी बैसली सेजारीं । यमफासा करीं घेऊनिया ॥३॥
पाठी पोटीं एकें लागलीं सरसीं । नेती नरकापाशीं ओढूनियां ॥४॥
जन साह्यभूत असे या सकळां । मी एक निराळा परदेशी ॥५॥
कोणा काकुलती नाहीं कोणे परी । तुजविण हरी कृपाळुवा ॥६॥
तुका म्हणे मज तुझाची भरवसा । म्हणऊनि आशा मोकलिली ॥७॥


३२९३
सिंदळीचे चित्त परपुरुषावारी । पति चुरमुरी रात्रंदिवस ॥१॥
ऐसे ते वोंगळी जाय हो नरका । तिच्या दोषें देखा पती जाय ॥ध्रु.॥
आपण बुडती पती बुडविती । दोन्ही कुळे नेती अधःपाता ॥२॥
तुका म्हणे तिची न करावी संगती । होईल फजिती मागें पुढें ॥३॥


२२३
सिंदळीचे सोयरे चोराचीया दया । ते ही जाणा तया संवसर्गी ॥१॥
फुकासाठी भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥
सर्प पोसूनियां दुधाचा नास । केलें थीता विष अमृताचें ॥२॥
तुका म्हणे यासी न करितां दंडण । पुढिल खंडण नव्हे दोषा ॥३॥


३०६४
सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । राहे बीज त्यास काय करी ॥१॥
अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देईल कोण काका त्याचा ॥२॥
तुका म्हणे नाहीं राखायाची चाड । तरि कां लिगाड करुनी घेतो ॥३॥


३६८५
सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥
आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥
सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुजमिळणी जीवे मिळे ॥२॥
एक कशी पाखडी दुसरी निवडी । निःशेष तिसडी ओज करी ॥३॥
सरलें कांडण पाकसद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥४॥
उद्धव अक्रूर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥५॥
तुका म्हणे मज माहेरीं आवडी । म्हणोनि तांतडी मूळ केलें ॥६॥


२६२१
सिद्धीचा दास नव्हें श्रुतीचा अंकिला । होईन विठ्ठला दास तुझा ॥१॥
सर्वकाळ सुख माझिया मानसीं । राहिलें तयासी नाश नाहीं ॥ध्रु.॥
तेणें पुण्य पाप न पाहें लोचनीं । आणिका वांचूनि पांडुरंगा ॥२॥
न करीं मी आस साधनी सायास । भक्तीप्रेमरस सांडूनियां ॥३॥
गर्भवासीं दुःख नाहीं येतां जातां । हृदयीं असतां नाम तुझें ॥४॥
तुका म्हणे तुझा होईन अंकिला । न भें मी विठ्ठला कळिकाळासी ॥५॥


३५५०
सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥
इंद्रियांची धांव होईल कुंटित । पावेल हें चित्त समाधान॥ध्रु.॥
माहेर आहेसें लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥२॥
आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटे आपणासी ॥३॥
तुका म्हणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥४॥


सु सुं
१३९४
सुकलियां कोंभा अत्यंत जळधर । तेणीची प्रकार न्याय असे ॥१॥
न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मनत्वरे लागीं ॥२॥
तुका म्हणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥३॥


२१९५
सुकाळ हा दिवसरजनी । नीत धणी नवी च ॥१॥
करुनि सेवूं नानापरी । राहे उरी गोडीनें ॥ध्रु.॥
सरे ऐसा नाहीं झरा। पंक्ती करा समवेत ॥२॥
तुका म्हणे बरवा पान्हा । कान्हाबाई माउलीचा ॥३॥


२३८०
सुख नाहीं कोठें आलिया संसारीं । वांया हांवभरी होऊं नका ॥१॥
दुःखबांदवडी आहे हा संसार । सुखाचा विचार नाहीं कोठें ॥ध्रु.॥
चवदा कल्पेंवरी आयुष्य जयाला । परी तो राहिला ताटीखालीं ॥२॥
तुका म्हणे वेगीं जाय सुटोनियां । धरूनि हृदयामाजी हरी ॥३॥


२९१२
सुख पंढरिये आलें । पुंडलिकें सांटविलें ॥१॥
घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे हिडणें ॥ध्रु.॥
विषय गुंडोनी ठेवीं पसारा । धांव घाला पंढरपुरा ॥२॥
आयुष्य वेंचे जंव आहे । तोंची धांवोनिया जाये ॥३॥
आळस न करीं या लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥४॥


६२
सुख पाहतां जवापाडें । दुःख पर्वता एवढें ॥१॥
धरीं धरीं आठवण । मानीं संताचें वचन ॥ध्रु.॥
नेलें रात्रीनें तें अर्धें । बाळपण जराव्याधें ॥२॥
तुका म्हणे पुढा । घाणा जुंती जसी मूढा ॥३॥


४०३४
सुख या संतसमागमें । नित्य दुनावे तुझिया नामें । दहन होती सकळ कर्में । सर्वकाळ प्रेमें डुलतसों ॥१॥
म्हणोनि नाहीं कांहीं चिंता । तूं चि आमुचा मातापिता । बहिणी बंधु आणि चुलता । आणिकां गोतां सर्वांठायीं ॥२॥
ऐसा हा कळला निर्धार। मा माझा तुज न पडे विसर । अससी देऊनियां धीर । बाह्य अभ्यंतर मजजवळी ॥३॥
दुःख तें कैसें नये स्वप्नासी । भुक्तीमुक्ती जाल्या कामारी दासी । त्यांचें वर्म तूं आम्हांपाशीं । सुखें राहिलासी प्रेमाचिया ॥४॥
जेथें तुझ्या कीर्तनाचा घोष । जळती पापें पळती दोष । काय तें उणें आम्हां आनंदास । सेवूं ब्रम्हरस तुका म्हणे ॥५॥


२३६९
सुखरूप ऐसें कोण दुजें सांगा । माझ्या पांडुरंगा सारिकें तें ॥१॥
न लगे हिंडणें मुंडणें ते कांहीं । साधनाची नाहीं आटाआटी ॥ध्रु.॥
चंद्रभागे स्नान विध तो हरीकथा । समाधान चित्ता सर्वकाळ ॥२॥
तुका म्हणे काला वैकुंठीं दुर्लभ । विशेष तो लाभ संतसंग ॥३॥


२९१७
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥
बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥ध्रु.॥
जरी झाला श्रम । तरी पडों नये भ्रम ॥२॥
तुका म्हणे दासां । देव सरिसासरिसा ॥३॥


२५०३
सुख वाटे परी वर्म । धर्माधर्म न कळे ॥१॥
गायें नाचें एवढें जाणें । विठ्ठल म्हणे निर्लज्ज ॥ध्रु.॥
अवघें माझें एवढें धन । साधन ही सकळ ॥२॥
तुका म्हणे पायां पडें । तुमच्या कोडें संतांच्या ॥३॥


४२६
सुखवाटे ये चि ठायी । बहु पायीं संतांचें ॥१॥
म्हणऊनि केला वास । नाहीं नास ते ठायीं ॥ध्रु.॥
न करवे हाली चाली । निवारिली चिंता हे ॥२॥
तुका म्हणे निवे तनु । रज:कणु लागती ॥३॥


१२१९
सुख सुखा भेटे । मग तोडिल्या न तुटे ॥१॥
रविरश्मिकळा । नये घालितां पैं डोळां ॥ध्रु.॥
दुरि तें जवळी । स्नेहें आकाशा कवळी ॥२॥
तुका म्हणे चित्त । माझें पायीं अखंडित॥३॥


२७१६
सुख सुखा विरजण झालें । तें मथलें नवनीत ॥१॥
हाले डोले हरुषे काया । निवती बाह्या नयन ॥ध्रु.॥
प्रबळ तो नारायण । गुणें गुण वाढला ॥२॥
तुका म्हणे भरली सीग । वरी मग वोसंडे ॥३॥


३५१२
सुख हें नावडे आम्हां कोणा बळें । नेणसी अंधळें जालीशी तूं ॥१॥
भूक तहान कैसी राहिली निश्चळ । खुंटलें चपळ मन ठायीं ॥ध्रु.॥
द्रव्य जीवाहूनि आवडे या जना । आम्हांसी पाषाणाहूनि हीन ॥२॥
सोइरे सज्जन जन आणि मन । अवघें समान काय गुणें ॥३॥
तुका म्हणे आम्हां जवळी च आहे । सुख दुःख साहे पांडुरंग ॥४॥


३३७१
सुखाची वसति झाली माझे जीवीं । तुमच्या गोसावी कृपादानें ॥१॥
रूप वेळावेळां आठवीं अंतरीं । बैसोनि जिव्हारीं राहिलें तें ॥ध्रु.॥
विसांवलें मन विठ्ठलें प्रपंचा । गोडावली वाचा येणें रसें ॥२॥
तुका म्हणे कांहीं नाठवेसें झाले । दुसरें विठ्ठलें मज आतां ॥३॥


१९६०
सुखाचें ओतलें । दिसे श्रीमुख चांगलें ॥१॥
मनेंधरिला अभिळास । मिठी घातली पायांस ॥ध्रु.॥
होतां दृष्टादृष्टी । तापगेला उठाउठी ॥२॥
तुका म्हणे जाला । लाभें लाभ दुणावला ॥३॥


१२०१
सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥
संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥
समर्थचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची॥२॥
तुका म्हणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥३॥


३३९५
सुखें खावें अन्न । त्याचें करावें चिंतन ॥१॥
त्याचें दिलें त्यासी पावे । फळ आपणासी फावे ॥ध्रु.॥
आहे हा आधार। नाम त्याचें विश्वंभर ॥२॥
नाही रिता ठाव । तुका म्हणे पसरीं भाव ॥३॥


२३०८
सुखें घेऊं जन्मांतरें । एक बरें इहलोकीं ॥१॥
पंढरीचे वारकरी । होतां थोरी जोडी हे॥ध्रु.॥
हे तो आले अनुभवा। पाहावे जीवावरूनि॥२॥
तुका म्हणे हें चि मन । इच्छादान मागतसे ॥३॥


१७०५
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥१॥
हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥
चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥२॥
तुका म्हणे कोणा । बोल ठेवितो शाहाणा ॥३॥



सुखें वोळंब दावी गोहा । माझें दुःख नेणा पाहा ॥१॥
आवडीचा मारिला वेडा । होय होय कैसा म्हणे भिडा ॥ध्रु.॥
निपट मज न चले अन्न । पायली गहूं सांजा तीन ॥२॥
गेले वारीं तुम्हीं आणिली साकर । सातदी गेली साडेदहा शेर ॥३॥
अखंड मज पोटाची व्यथा । दुधभात साकर तूप पथ्या ॥४॥
दो पाहरा मज लहरी येती । शुद्ध नाहीं पडे सुपती ॥५॥
नीज नये घाली फुलें । जवळीं न साहती मुलें ॥६॥
अंगी चंदन लावितें भाळीं । सदा शूळ माझे कपाळीं ॥७॥
हाड गळोनि आलें मास । माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ॥८॥
तुका म्हणे जिता गाढव केला । मेलियावरी नरका नेला ॥९॥


८२१
सुखें होतो कोठे घेतली सुती । बांधविला गळा आपुले हातीं ॥१॥
काय करूं बहु गुंतलों आतां । नयेचि सरतां मागें पुढें ॥ध्रु.॥
होते गांठी तें सरलें आतां । आणीक माथां ऋण जालें ॥२॥
सोंकरोलियाविण गमाविलें पिक । रांडापोरें भिके लावियेलीं ॥३॥
बहुतांचीं बहु घेतलीं घरें । न पडे पुरें कांहीं केल्या ॥४॥
तुका म्हणे काही न धरावी आस । जावे हे सर्वस्व टाकोनिया ॥५॥


२९९१
सुगरणीबाईं थिता नास केला । गुळ तो घातला भाजीमध्यें ॥१॥
क्षीरीमध्यें हिंग दुधामध्यें बोळ । थितें चि वोंगळ नाश केला ॥ध्रु.॥
हिरयाचे पेटे आणीयेल्या गारा । खांदी शिरी भारा व्यर्थ वाहे ॥२॥ दळण दळोनी भरीयेली पाळी । भरडोनि वोंगळी नास केला ॥३॥
कापुराचे सांते आणिला लसण । वागवितां सीण दुःख होय ॥४॥
रत्नाचा जोहारी रत्न चि पारखी । येर देखोदेखीं हातीं घेती ॥५॥
तुका म्हणे जरी योग घडे निका । न घडतां थुंका तोंडावरी ॥६॥


६७८
सुटायाचा कांहीं करितो उपाय । तों हे देखें पाय गोवियेले ॥१॥
ऐसिया दुःखाचे सांपडलों संदी । हारपली बुद्धी बळ माझें ॥ध्रु.॥
प्रारब्ध क्रियमाण संचिताचें । वोढत ठायींचे आलें साचें ॥२॥
विधिनिषेधाचे सांपडलों चेपे । एकें एक लोपे निवडेना ॥३॥
सारावें तें वाढे त्याचिया चि अंगें । तृष्णेचिया संगें दुःखी जालों ॥४॥
तुका म्हणे आतां करीं सोडवण । सर्वशिक्तहीन जालों देवा ॥५॥


४०८७
सुंदर अंगकांती मुखें भाळ सुरेख । बाणली उटी अंगीं टिळा साजिरा रेख ।
मस्तकीं मुगुट कानीं कुंडलां तेज फांके। आरक्त दंत हिरे कैसे शोभले निके ॥१॥
जय देवा चुतर्भुजा जया लावण्यतेजा । आरती ओवाळीन भवतारिया हा वोजा । जय. ॥ध्रु.॥
उदार जुंझार हा जया वाणिती श्रुति । परतल्या नेति म्हणती तयां न कळे गति ।
भाट हा चतुर्मुखें अनुवाद करिती । पांगलीं साही अठरा रूप न कळे गति ॥२॥
ऐकोनि रूप ऐसें तुजलागीं धुंडिती। बोडके नग्न एक निराहार इती ।
साधनें योग नाना तपें दारुण किती। सांडिलें सुख दिली संसारा शांती ॥३॥
भरूनि माजी लोकां तिहीं नांदसि एक। कामिनी मनमोहना रूप नाम अनेक ।
नासति नाममात्रें भवपातकें शोक । पाउलें वंदिताती सिद्ध आणि साधक ॥४॥
उपमा द्यावयासी दुजें काय हें तुज । त्तवासि त्तवसार मूळ जालासी बीज ।
खेळसि बाळलीळा अवतार सहज । विनवितो दास तुका कर जोडोनि तुज ॥५॥


१४
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥


३९४२
सुंदर मुख साजिरें कुंडलें मनोहर गोमटीं वो । नागर नाग खोपा केशर कस्तुरी मळवटीं वो ।
विशाळ व्यंकट नेत्र वैजयंती तळपे कंठीं वो । कास पीतांबराची चंदन सुगंध साजे उटी वो ॥१॥
अतिबरवंटा बाळा आली सुलक्षणीं गोंधळा वो । राजस तेजोराशी मिरवी शिरोमणी वेल्हाळा वो ।
कोटि रविशशिप्रभा लोपल्या सकळा वो । न कळे ब्रम्हादिकां अनुपम्य इची लीळा वो ॥ध्रु.॥
सावळी सकुमार गोरी भुजा शोभती चारी वो । सखोल वक्षस्थळ सुढाळ पदक झळके वरी वो ।
कटीं क्षुद्र घंटिका शब्द करिताती माधुरी वो । गर्जत चरणीं वाकी अभिनव संगीत नृत्य करी वो ॥२॥
अष्टांगें मंडित काय ।वर्णावी रूपठेवणी वो । शोलिव शुध्द रसाची ओतिव सुगंध लावण्यखाणी वो ।
सर्वकळासंपन्न मंजुळ बोले हास्यवदनीं वो । बहु रूपें नटली आदिशक्ति नारायणी वो ॥३॥
घटस्थापना केली पंढरपुरमहानगरीं वो । अस्मानी मंडप दिला तिन्ही ताळांवरी वो ।
आरंभिला गोंधळ इनें चंद्रभागेतिरीं वो । आली भक्तिकाजा कृष्णाबाई योगेश्वरी वो ॥४॥
तेहतिस कोटि देव चौंडा अष्ट कोटि भैरव वो । आरत्या कुरवंड्या करिती पुष्पांचा वरुषाव वो ।
नारद तुंबर गायन ब्रम्हानंद करिती गंधर्व वो। वंदी चरणरज तेथें तुकयाचा बांधव वो ॥५॥


३९४१
सुदिन सुवेळ तुझा गोंधळ वो । पंच प्राण दिवटे दोनी नेत्रांचे हिलाल वो ॥१॥
पंढरपुरनिवासे तुझे रंगी नाचत असें वो । नवस पुरवीं माझा मनिंची जाणोनियां इच्छा वो ॥ध्रु.॥
मांडिला देव्हारा तुझा त्रिभुवनामाझारी वो । चौक साधियेला नाभिकळस ठेविला वरी वो ॥२॥
बैसली देवता पुढें वैष्णवाचें गाणें वो । उद्गारे गर्जती कंठीं तुळसीचीं दर्शनें वो ॥३॥
स्वानंदाचे ताटीं धूप दीप पंचारती वो । ओवाळिली माता विठाबाई पंचभूतीं वो ॥४॥
तुझें तुज पावलें माझा नवस पुरवीं आतां वो । तुका म्हणे राखें आपुलिया शरणागता वो ॥५॥


२९०१
सुनियाचा हाचि भाव । आपुला ठाव राखावा ॥१॥
दुजियाचा येऊं वारा । नेदू घरावरी देऊं ॥ध्रु.॥
केली याचीं फाडाफाडी । तडामोडी क्षेत्राची ॥२॥
पातेजत नाहीं लोकां । देव तुका वांचूनि ॥३॥


२४२९
सुनियांची आवडी देवा । घेत सेवा नाहीं कांहीं ॥१॥
सिकविलें जवळी बैसों । जेथें असों तेथें चि ॥ध्रु.॥
नेदी दुजें बोलों करूं । गुरुगुरु न साहे ॥२॥
तुका म्हणे कृवाळितां । अंग सत्ता संगाची ॥३॥


७९२
सुरवर येती तीर्थे नित्यकाळ । पेंठ त्या निर्मळ चंद्रभागा ॥१॥
साक्षभूत नव्हे सांगितली मात । महिमा अत्यद्भुत वर्णवेना ॥ध्रु.॥
पंचक्रोशीमाजी रीग नाहीं दोषा । जळती आपैसा अघोर ते ॥२॥
निर्विषय नर चतुर्भुज नारी । अवघा घरोघरीं ब्रह्मानंदु ॥३॥
तुका म्हणे ज्यापें नाहीं पुण्यलेश । जा रे पंढरीस घेई कोटि ॥४॥


२६६३
सुराणीचीं झालों लाडिकीं एकलीं । वडील धाकुलीं आम्ही देवा ॥१॥
म्हणऊनि कांहीं न घडे अव्हेर । गोमटें उत्तर भातुकें ही ॥ध्रु.॥
कांहीं एक नाहीं वंचिलें वेगळें । मुळिचया मुळें स्थिरावलें ॥२॥
लेवविलो अंगीं आपलीं भूषणें । अळंकार लेणें सकळ ही ॥३॥
सारितां न सरे आमुप भांडार । धना अंतपार नाहीं लेखा ॥४॥
तुका म्हणे आम्ही आळवूं आवडी । म्हणऊनी जोडी दाखविली ॥५॥


२७५७
सुलभ कीर्तनें दिलें ठसावूनि । करितां धरणी उरी कोण ॥१॥
आतां न टळावें केलिया नेमासी । उदाराचा होसी हीन काय ॥ध्रु.॥
एका नेमें कोठें दुसरा पालट । पादर तो धीट म्हणती त्यासी ॥२॥
तुका म्हणे किती बोलसील उणें । एकाच वचनें खंड करीं ॥३॥


४४८
सूकरासी विष्ठा माने सावकास । मिष्टान्नाची त्यास काय गोडी ॥१॥
तेवीं अभक्तांसी आवडे पाखांड । न लगे त्यां गोड परमार्थ ॥ध्रु.॥
श्वानासी भोजन दिलें पंचामृत । तरी त्याचें चित्त हाडावरी ॥२॥
तुका म्हणे सर्पा पाजिलिया क्षीर । वमितां विखार विष जालें ॥३॥


से सै
१५३६
सेजेचा एकांत आगीपाशीं कळे । झांकिलिया डोळे अधःपात ॥१॥
राहो अथवा मग जळो अगीमधीं । निवाडु तो आधीं होऊनि गेला ॥ध्रु.॥
भेणें झडपणी नाहीं येथें दुजें । पादरधिटा ओझें हतियारें ॥२॥
तुका म्हणे मज नाहीं जो भरवसा । तोवरी सहसा निवाड तो ॥३॥


३१२४
सेट्या ना चौधरी । पांडेपण वाहे शिरीं ॥१॥
जकातीचा धंदा । तेथें पाप वसे सदा ॥२॥
गाई म्हैसी हेड । तुप विकी महा द्वाड ॥३॥
तुका म्हणे पाहीं । तेथें पुण्या रीघ नाहीं ॥४॥


८१५
सेत आलें सुगी सांभाळावे चारी कोण । पिका आलें परी केलें पाहिजे जतन ॥१॥
सोंकरीं सोंकरीं सोहंकरी विसावा तों वरी । नकोउभें आहे तों ॥ध्रु.॥
गोफणेसी गुंडा घालीं पागोऱ्याच्या नेटें । पळती हाहाकारें अवघीं पांखरांची थाटें ॥२॥
पेटवूनि आगटी राहें जागा पालटूनि । पडिलिया मानी बळ बुद्धी व्हावीं दोनी ॥३॥
खळे दानें विश्व सुखी करीं होतां रासी । सारा सारूनियां ज्यांचे भाग देई त्यासी ॥४॥
तुका म्हणे मग नाहीं आपुलें कारण । निज आलें हातां भूस सांडिलें निकण ॥५॥


८१३
सेत करा रे फुकाचें । नाम विठोबारायाचें ॥१॥
नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा ।
सरिक नाहीं रे दुसरा । धनी सारा तुझा तूं ॥ध्रु.॥
जपतप नांगरणी । न लगे आटी दुनवणी ॥२॥
कर्म कुळवणी ॥ न लगे धर्मपाळी दोन्ही ॥३॥
ज्ञानपाभारी ती फणी । न लगे करावी पेरणी ॥४॥
बीज न लगे संचिताचें । पीक पिकलें ठायींचे ॥५॥
नाहीं यमाचें चोरटें । विठ्ठल पागोऱ्याच्या नेटें ॥६॥
पीक न वजे हा भरवसा । करी उद्वेग तो पिसा ॥७॥
सराई सर्व काळ । वांयां न वजे घटिकापळ ॥८॥
प्रेम पिकलें अपार । नाहीं सांठावावया थार ॥९॥
ऐसीये जोडी जो चुकला । तुका म्हणे धिग त्याला ॥१०॥


४०२६
सेंदरीं हेंदरीं दैवतें । कोण तीं पुजी भुतेंकेतें । आपुल्या पोटा जीं रडतें । मागती शितें अवदान ॥१॥
आपुले इच्छे आणिकां पीडी । काय तें देईल बराडी । कळों ही आली तयाची जोडी । अल्प रोकडी बुद्धी अधरा ॥ध्रु.॥
दासीचा पाहुनरउखतें। धणी देईल आपुल्या हातें । करुणाभाषणउचितें । हें तों रितें सतंत शक्तीहीन ॥२॥
काय तें थिल्लरीचें पाणी । ओठ न भिजे फिटे धणी । सीण तरीं आदीं आवसानीं । क्षोभे पुरश्चरणीं दिलें फळ ॥३॥
विलेपनें बुजविती तोंड । भार खोल वाहाती उदंड । करविती आपणयां दंड । ऐसियास भांड म्हणे देव तो ॥४॥
तैसा नव्हे नारायण । जगव्यापक जनार्दनष । तुका म्हणे त्याचें करा चिंतन । वंदूं चरण येती सकळें ॥५॥


१४८७
सेवकासी आज्ञा निरोपासी काम । स्वामीचे ते धर्म स्वामी जाणे ॥१॥
मनाचिये मुळीं रहावें बैसोन । आकर्षावे गुण पायांपाशीं ॥ध्रु.॥
भेटीचे तांतडी करीतसे लाहो । ओंवाळावा देहो ऐसें वाटे ॥४॥
तुका म्हणे माझें करावें कारण । आपुलें जतन ब्रीद करा ॥३॥


१७९३
सेवकासी आज्ञा स्वामीची प्रमाण । जोंवरी हा प्राण जाय त्याचा ॥१॥
आणिकांचा धाक न धरावा मनीं । निरोपावचनीं ढळों नये ॥ध्रु.॥
समय सांभाळूनि आगळें उत्तर । द्यावें भेदी वज्र तपायरी ॥२॥
तुका म्हणे तरी म्हणवावें सेवक । खादलें तें हाक अन्न होय ॥३॥


२४९२
सेवकें करावें सांगितलें काम । सिक्याचा तो धर्म स्वामी राखे ॥१॥
काय देवा नेणों आलें गांढेपण । तुम्ही शिक्तहीन झाले दिसां ॥ध्रु.॥
विष्णुदास आम्ही निर्भर ज्याबळें । तें दिसे या काळें अव्हेरिलें ॥२॥
तुका म्हणे मूळ पाठवा लौकरी । किंवा करूं हरी काय सांगा ॥३॥


३४०४
सेवकें करावें स्वामीचें वचन । त्यासी हुंतूंपण कामा नये ॥१॥
घेईल जीव कां सारील परतें । भंगलिया चित्तें सांदी जनां ॥ध्रु.॥
खद्योतें दावावी रवी केवीं वाट । आपुलें चि नीट उसंतावें ॥२॥
तुका म्हणे तो ज्ञानाचा सागर । परि नेंदी अगर भिजों भेदें ॥३॥


१२८१
सेवट तो भला । माझा बहु गोड जाला ॥१॥
आलों निजांच्या माहेरा । भेटों रखुमाईच्या वरा ॥ध्रु.॥
परिहार जाला । अवघ्या दुःखाचा मागिल्या ॥२॥
तुका म्हणे वाणी । गेली आतां घेऊं धणी ॥३॥


२६८९
सेवट तो होती तुझियानें गोड । म्हणऊनि चाड धरीतसों ॥१॥
देऊं भोगाभोग कलिवरचा भार । साहों तुज थार त्याचमधीं ॥ध्रु.॥
तुझ्या बळें कांहीं खटपट काम । वाढवावा श्रम न लगे तो ॥२॥
तुका म्हणे आम्ही चेंपलों या भारें । तुमचें तें खरें देवपण ॥३॥


२१३५
सेवटासी जरी आलें । तरी जालें आंधळें ॥१॥
स्वहिताचा लेश नाहीं । दगडा कांहीं अंतरीं ॥ध्रु.॥
काय परिसासवें भेटी । खापरखुंटी जालिया ॥२॥
तुका म्हणे अधम जन । अवगुणें चि वाढवी ॥३॥


१०३९
सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेदकाम निवारूनि ॥१॥
न लगे हालावें चालावें बाहेरी । अवघें चि घरीं बैसलिया ॥ध्रु.॥
देवाचीं च नामें देवाचिये शिरीं । सर्व अळंकारीं समर्पावीं ॥२॥
तुका म्हणे आहे भावें चि संतोषी । वसे नामापाशीं आपुलिया ॥३॥


२०१
सेवितों हा रस वांटितों आणिकां । घ्या रे होऊं नका राणभरी ॥१॥
विटेवरी ज्याचीं पाउलें समान । तोचि एक दानशूर दाता ॥ध्रु.॥
मनाचे संकल्प पाववील सिद्धी । जरी राहे बुद्धी याचे पायीं ॥२॥
तुका म्हणे मज धाडिलें निरोपा । मारग हा सोपा सुखरूप ॥३॥


१६८७
सेवीन उच्छिष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन किडा ॥१॥
ऐसें जन्म आतां मज देई देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥
त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥२॥
तुका म्हणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥३॥


३८८७
सैन्य जन हांसे राया जालें काईं । वासपे तो ठायीं आपणासि ॥१॥
आपणा आपण जाय सतीं जैसीं । वैरभाव ज्यांसि भक्ति नाहीं ॥२॥
नाहीं याचा त्याचा भाव एकविध । म्हणउनि छंद वेगळाले ॥३॥
वेगळाल्या भावें ती तया हांसती । तयास दिसतो अवघीं हरी ॥४॥
हरीला कंसाचा जीव भाव देवें । द्वेषाचिया भावें तुका म्हणे ॥५॥


सो सों सौ
१०१२
सोंगें छंदें कांहीं । देव जोडे ऐसें नाहीं ॥१॥
सारा अवघें गाबाळ । डोळ्या आडील पडळ ॥ध्रु.॥
शुद्ध भावाविण । जो जो केला तो तो सीण ॥२॥
तुका म्हणे कळे । परि होताती अंधळे ॥३॥


३४५१
सोडवा सोडवा सोडवा अनंता । ॥१॥
तुजविण ऐसा । कोण दुजा प्राणदाता ॥ध्रु.॥
कोणा लाज नेणां ऐसें । आणिकां शरण आम्ही जातां ॥२॥
तुका म्हणे सखया । माझ्या रखुमाईच्या कांता ॥३॥


११५२
सोडिलेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥१॥
करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥
उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें ॥२॥
तुका तेथें वारी । एकी आडोनि दुसरी ॥३॥


३७०
सोडिला संसार । माया तयावरी फार ॥१॥
धांवत चाले मागें मागें । सुखदुःख साहे अंगे ॥ध्रु.॥
यानें घ्यावें नाम । तीसीकरणें त्याचें काम ॥२॥
तुका म्हणे भोळी । विठ्ठलकृपेची कोंवळी ॥३॥


८१२
सोनियांचा कळस । माजी भरिला सुरारस ॥१॥
काय करावें प्रमाण । तुम्ही सांगा संतजन ॥ध्रु.॥
मृत्तिकेचा घट । माजी अमृताचा साठ ॥२॥
तुका म्हणे हित । तें मज सांगावें त्वरित ॥३॥


१३५
सोनियाचें ताट क्षीरीनें भरिलें । भक्षावया दिलें श्वाना लागीं ॥१॥
मुक्ताफळहार खरासि घातला । कस्तुरी सुकराला चोजविली ॥ध्रु.॥
वेदपरायण बधिरा सांगे ज्ञान । तयाची ते खुण काय जाणे ॥२॥
तुका म्हणे ज्याचें तोचि एक जाणे । भक्तीचें महिमान साधु जाणे ॥३॥


५८०
सोनें दावी वरी तांबें तयापोटीं । खरियाचे साठी विकुं पाहे ॥१॥
पारखी तो जाणे तयाचे जीवींचें । निवडी दोहींचें वेगळालें ॥ध्रु.॥
क्षीरा नीरा कैसें होय एकपण । स्वादीं तोचि भिन्न भिन्न काढी ॥२॥
तुका म्हणे थीता आपणची चि खोटा । अपमान मोटा पावईल ॥३॥


३४१८
सोन्याचे पर्वत करवती पाषाण । अवघे रानोरान कल्पतरू ॥१॥
परि या दुर्लभ विठोबाचे पाय । तेथें हे उपाय न सरती ॥ध्रु.॥
अमृतें सागर भरवती गंगा । म्हणवेल उगा राहें काळा ॥२॥
भूत भविष्य कळों येईल वर्तमान । करवती प्रसन्न रिद्धीसिद्धी ॥३॥
ठान मान कळों येती योगमुद्रा । नेववेल वारा ब्रम्हांडासी ॥४॥
तुका म्हणे मोक्ष राहे आलीकडे । इतर बापुडें काय तेथें ॥५॥


१९१८
सापें ज्यासी खावें । तेणें प्राणासी मुकावें ॥१॥
काय लाधला दुर्जन । तोंडावरी थुंकी जन ॥ध्रु.॥
विंचु हाणी नांगी । अग्न लावी आणिकां अंगीं ॥२॥
तुका म्हणे जाती । नरका पाउलीं चालती ॥३॥


७३८
सोपें वर्म आम्हां सांगितलें संतीं । टाळ दिंडी हातीं घेउनि नाचा ॥१॥
समाधीचें सुख सांडा ओंवाळून । ऐसा हें कीर्तनी ब्रम्हरस ॥ध्रु.॥
पुढती घडे चढतें सेवन आगळें । भक्ती भाग्य बळें निर्भरता ॥२॥
उपजों चि नये संदेह चित्तासी । मुक्ति चारी दासी हरीदासांच्या ॥३॥
तुका म्हणे मन पावोनि विश्रांती । त्रिविध नासती ताप क्षणें ॥४॥


३२२
सोयरिया करी पाहुणेरु बरा । कांडीतो ठोमरा संतालागी ॥१॥
गाईसी देखोनि बदाबदा मारी । घोडयाची चाकरी गोड लागे ॥ध्रु.॥
फुले पाने वेश्येसी नेतसे उदंड । देऊं नेदी खांड ब्राम्हणासी ॥२॥
बाइलेच्या गोता आवडीने पोसी । मातापितयांसी दवडोनी ॥३॥
तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी । जातो यमपुरी भोगावया ॥४॥


३२३
सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें तें अंगणीं वैष्णवांच्या ॥१॥
वृंदावन सडे चौक रंग माळा । नाचे तो सोहोळा देखोनियां ॥ध्रु.॥
भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ॥२॥
नामओघ मुखीं अमृताचें सार । मस्तक पवित्र सहित रजें ॥३॥
तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना । नये हा वासना त्याची करी ॥४॥


३२४०
सोवळा तो झाला । अंगीकार देवें केला ॥१॥
येर करिती भोजन । पोट पोसाया दुर्जन ॥ध्रु.॥
चुकला हा भार । तयाची च येरझार ॥२॥
तुका म्हणे दास । झाला तया नाहीं नास ॥३॥


२९५६
सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥१॥
एकसरीं केलीं कलेवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥
संकल्पीं विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचें ॥२॥
तुका म्हणे हें तूं ब्रम्हांड चाळिता । मी कां करूं चिंता पांडुरंगा ॥३॥


३९०४
सोसियेली आटी गर्भवास फेरे । आयुधांचे भारे वागवितां ॥१॥
वाहोनि सकळ आपुलिये माथां । भार दासां चिंता वाहों नेदी ॥२॥
नेदी काळाचिये हातीं सेवकांसि । तुका म्हणे ऐसी ब्रिदावळी ॥३॥


२५९३
सोसें बहुगर्भवासीं । मेलों असों उपवासीं । नाहीं सखीं ऐसीं । तेथें कोणी भेटलीं ॥१॥
करीं करीं रे स्वहित । देह तंव हे अनित्य । नाहीं दिलें चित्त । सोडवूं मोहापासोनि ॥ध्रु.॥
पाळी तोंडींचिया घांसें । तें चि होय अनारिसें । ज्या नव्हे ऐसें । खेदी परि सोडवीना ॥२॥
तुका म्हणे धनमानें । माझ्या बाटलों मीपणें । नाहीं दिला जनें । देखों लाभें हा लाभ ॥३॥


९१६
सोसें वाढे दोष । जाला न पालटे कस ॥१॥
ऐसें बरवें वचन । करितां तो नारायण ॥ध्रु.॥
असे प्रारब्ध नेमें । श्रमुचि उरे श्रमे ॥२॥
सुख देते शांती । तुका म्हणे धरितां चित्तीं ॥३॥


१४३९
सोसें सोसें मारूं हाका । होईल चुका म्हणऊनि॥१॥
मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥
नाम मुखीं बैसला चाळा । वेळोवेळां पडताळीं ॥२॥
तुका म्हणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥३॥


४०८
सोसोनि विपत्ती । जोडी दिली तुझे हातीं ॥१॥
त्याचा हाचि उपकार । अंतीं आह्माशीं वेव्हार ॥ध्रु.॥
नामरूपा केला ठाव। तुज कोण म्हणतें देव ॥२॥
तुका म्हणे हरी । तुज ठाव दिला घरीं ॥३॥


१२६४
सोळा सहस्र होऊं येतें । भरलें रितें आह्मापै ॥१॥
ऐसे तुम्हां ठायाठाव । म्हणे देव संपादे ॥ध्रु.॥
कैची चिरामध्यें चिरे । मना बरें आलें तैं ॥२॥
तुका म्हणे पांडुरंगा । अंगसंगा भिन्न करा॥३॥


३९६५
सौरी सुर झालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं झालें सरती ॥१॥
चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥
हिंडोनि चौऱ्यांशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥२॥
लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥३॥
जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥४॥
तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी झाली जीवे साटी ॥५॥


स्त स्तु स्त्रि स्त्री स्म स्व स्वा
२६००
स्तवूनियां नरा । केला आयुष्याचा मातारा ॥१॥
नारायणचिया लोपें । घडलीं अवघीं चि पापें ॥ध्रु.॥
जीव ज्याचें दान । त्याचा खंडूनियां मान ॥२॥
तुका म्हणे वाणी । आइके त्या दोष कानीं ॥३॥


६६६
स्तुति करीं जैसा नाहीं अधिकार । न कळे विचार योग्यतेचा ॥१॥
तुमचें मी दास संतांचें दुर्बळ । करूनि सांभाळ राखा पायीं ॥ध्रु.॥
रामकृष्णहरी मंत्र उच्चारणा । आवडी चरणां विठोबाच्या ॥२॥
तुका म्हणे तुमचें सेवितों उिच्छष्ट । क्षमा करीं धीट होऊनियां ॥३॥


३३७
स्तुति करूं तरी नव्हे चि या वेदा । तेथें माझा धंदा कोणीकडे ॥१॥
परी हे वैखरी गोडावली सुखें । रसना रस मुखें इच्छीतसे ॥ध्रु.॥
रूप वर्णावया कोठें पुरे मती । रोमीं होती जाती ब्रम्हांडें हीं ॥२॥
तुका म्हणे तूं ऐसा एक साचा । ऐसी तंव वाचा जाली नाहीं ॥३॥


३५३०
स्तुती तरि करूं काय कोणापासीं । कीर्त तरि कैसी वाखाणावी ॥१॥
खोटया तंव नाहीं अनुवादाचें काम । उरला भ्रम वरी बरा ॥ध्रु.॥
म्हणवावें त्याची खुण नाहीं हातीं । अवकळा फजिती सावकाशें ॥२॥
तुका म्हणे हेंगे तुमचें माझें तोंड । होऊनिया लंड आळवितों ॥३॥


२४८३
स्तुती अथवा निंदा करावी देवाची । अधम तो वेची व्यर्थ वाणी ॥१॥
आइकोनि होती बहिर हे बोल । वेचूनि ते मोल नरका जाती ॥ध्रु.॥
इह लोकीं थुंका उडे तोंडावरी । करणें अघोरी वास लागे ॥२॥
तुका म्हणे माप वाचेऐसें निकें । भरलें नरकें निंदेसाठी ॥३॥


२३९
स्त्रियांचा तो संग नको नारायणा । काष्ठा या पाषाणामृत्तिकेच्या ॥१॥
नाठवे हा देव न घडे भजन । लांचावलें मन आवरे ना ॥ध्रु.॥
दृष्टिमुखें मरण इंद्रियाच्या द्वारें । लावण्य तें खरें दुःखमूळ ॥२॥
तुका म्हणे जरी अग्नि जाला साधु । परी पावे बाधूं संघष्टणें ॥३॥


३०७९
स्त्रिया पुत्र कळत्र हें तंव मायावंत । शेवटींचा अंत नाहीं कोणी ॥१॥
यमाचिये हातीं बांधोनियां देती । भूषणें ही घेती काढूनियां ॥२॥
ऐसिया चोरांचा कैसा हा विश्वास । धरिली तुझी कास तुका म्हणे ॥३॥


५१९
स्त्रीपुत्रादिकीं राहिला आदर । विषयीं पडिभर अतिशय ॥१॥
आतां सोडवणे धांवा नारायणा । मज हे वासना अनावर ॥ध्रु.॥
येउनियां आड ठाके लोकलाज । तों हें दिसे काज अंतरलें ॥२॥
तुका म्हणे आम्हां जेथें जेथें गोवा । तेथें तुह्मीं देवा सांभाळावें ॥३॥


२५७१
स्मरणाचे वेळे । व्हावें सावध न कळे ॥१॥
पडिलों विषयांचे ओढीं । कोणी न दिसेसें काढी ॥ध्रु.॥
भांडवल माझें । वेच जालें भूमी ओझें ॥२॥
तुका म्हणे कळे । तूं चि धावें ऐसें वेळे ॥३॥


१९४४
स्मरातां कां घडें नास । विष्णुदास यावरी ॥१॥
ऐसी सीमा जाली जगी । तरी मी वेगी अनुसरलो ॥ध्रु.॥
धरिले ते निवडे आतां । न घडे चित्ता वेगळे ॥२॥
तुका म्हणे नाश नाही । पुराणे ही गर्जती ॥३॥


१५९४
स्मशानीं आम्हां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥१॥
नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥
झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तई दान तुह्मीं केलें ॥२॥
तुका म्हणे आतां पाहे अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥३॥


३२७८
स्वप्नी ती हि कैसा न पडसी डोळा । सुंदर सावला घवघवीत ॥१॥
चतुर्भूज माळा रुळे येकावळी । कस्तुरी निढळीं रेखिलीसे ॥ध्रु.॥
शंक चक्र गदा रुळे वैजयंती । कुंडले तळपती श्रवणीं दोन्ही ॥२॥
तुका म्हणे स्वप्नी दावी आतां पाय । पांडुरंगे माया कृपावंते ॥३॥


१९४
स्वप्नीचिया गोष्टी । मज धरिलें होतें वेठी । जालिया शेवटीं । जागे लटिकें सकळ ॥१॥
वायां भाकिली करुणा । मूळ पावावया शीणा । राव रंक राणा । कैंचे स्थानावरी आहे ॥ध्रु.॥
सोसिलें तें अंगें । खरें होतें नव्हतां जागें । अनुभव ही सांगे । दुःखें डोळे उघडीले ॥२॥
तुका म्हणे संतीं । सावचित केलें अंतीं । नाहीं तरि होती । टाळी बैसोनि राहिली ॥३॥


२९४४
स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरी होऊं नये ॥१॥
आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥
बोलोनियां फेडा जीवींची काजळी । पाहेन कोमळीं चरणांबुजें ॥२॥
तुका म्हणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनियां ठेवा पडदा आतां ॥३॥


२६०४
स्वमुखे चि तुह्मीं सांगा मज सेवा । ऐसे माझे देवा मनोरथ ॥१॥
निघों आम्ही कांहीं चित्तवित्त घरें । आपुल्या उदारें जीवावरी ॥ध्रु.॥
बोल परस्परें वाढवावें सुख । पाहावें श्रीमुख डोळेभरी ॥२॥
तुका म्हणे सत्य बोलतों वचन । करुनी चरण साक्ष तुझे ॥३॥


१७७९
स्वयें पाक करी । संशय तोचि धरी । संदेहसागरीं । आणीक परी बुडती ॥१॥
जाणे विरळा एक । जालें तेथींचे हें सुख । देखिले बहुतेक । पुसतां वाट चुकले ॥ध्रु.॥
तोचि जाणे सोंवळें । शोधी विकल्पाचीं मुळें । नाचती पाल्हाळें । जे विटाळें कोंडिले ॥२॥
तोचि साधी संधी । सावध त्रिकाळ जो बुद्धी । संदेहाचा संधी। वेठी आणिक धरियेले ॥३॥
अखंड ते ध्यान । समबुद्धि समाधान । सोंग वांयांविण । ते झांकून बैसती ॥४॥
करणें जयासाठी । जो नातुडे कवणे आटी । तुका म्हणे साठी । चित्तवित्तेंवांचूनि ॥५॥


३७७१
स्वयें सुखाचे झाले अनुभव । एक एकीपाशीं सांगतील भाव ।
अवघ्यां अवघा हा कैसा नवलाव । सर्वसाक्ष तेथें चि त्याचा जीव वो ॥१॥
आपआपणाशीं करिती नवल । परि वादावाद न संडिती बोल ।
एका मेघःशामें जळधर वोल । रसीं उतावळि हृदय सखोल वो ॥ध्रु.॥
एक विषय तो सकळांचा हरी । त्याच्या आवडीनें आवडी इतरीं ।
अंध बहिर हे प्रेत लोकां चारी । त्यांची कीर्ति गाइली पुराणांतरी वो ॥२॥
स्तुति पराविया मुखें रुचिकर । प्रीतिपात्राच्या गौरवीं आदर ।
परस्परें हे सादरा सादर । योग सज्जनाच्या सुखा नाहीं पार वो ॥३॥
भक्तिवल्लभ न तुटे चराचरीं । आप्त अनाप्त हे ऐशी ठेवी उरी ।
दुरी जवळी संचिता ऐसें धरी । रंगा रंगा ऐसें होणें लागे हरी वो ॥४॥
तुका लाधला हें उच्छिष्ट भोजन । आला बाहेरी प्रेमें वोसंडून ।
पडिलें कानीं त्या जीवाचें जतन । धरियेले एकाभावें हृदयीं चरण वो ॥५॥


३३५६
स्वर्गीचे अमर इच्छिताति देवा । मृत्युलोकीं व्हावा जन्म आम्हां ॥१॥
नारायणा नामें होऊं जिवनमुक्त । कीर्तिनीं अनंत गाऊं गीती ॥ध्रु.॥
वैकुंठींचे जन सदा इच्छीतात। कइं येथें येती हरीचे दास ॥२॥
यमधर्म वाट पाहे निरंतर । जोडोनियां कर तिष्ठतसे ॥३॥
तुका म्हणे पावावया पैल पार । नामंत्र सार भाविकासि ॥४॥


१९१५
स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥१॥
तुह्मी आह्मी खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥
ध्वजा कुंचे गरुडटके । शृंगार निके करोनि ॥२॥
तुका म्हणे हें चि नीट । जवळी वाट वैकुंठा ॥३॥


२१७५
स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥
हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥
सत्य बोले मुखें । दुखवे आणिकांच्या दुःखें ॥२॥
निश्चयाचें बळ । तुका म्हणे तें च फळ ॥३॥


२८४६
स्वामीचिया सत्ता । आधीं वर्में येती हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥
कर्री कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥
मन मेळविलें मना । नाहीं अभावी शाहणा । अंतरींच्या खुणा । वरी दिल्या उमटोनि ॥२॥
पराश्रमें काळा । अवघ्या जागविल्या वेळा । देवासी निराळा । तुका क्षण न सोडी ॥३॥


१३२७
स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥१॥
काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥
धनवंत्र्याचिये अंगीं सत्ताबळ । व्याधि तो सकळ तोडावया ॥२॥
तुका म्हणे आलें मोड्यासी कोंपट । सांडोव्याची वाट विसरावी ॥३॥


३३२०
स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥१॥
करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥
कळावया वर्म । हा तों पायांचा चि धर्म ॥२॥
तुका म्हणे सिद्धी । हे चि पाववावी बुद्धी ॥३॥


३०४९
स्वामीसी संकट पडे जे गोष्टीचें । काय त्या प्रेमाचें सुख मज ॥१॥
दुःखवीना चित्त तुझें नारायणा । कांहीं च मागेना तुजपासीं ॥ध्रु.॥
रिद्धि सिद्धि मोक्ष संपित्त विलास । सोडियेली आस यांची जीवें ॥२॥
तुका म्हणे एके वेळे देई भेटी । वोरसोनि पोटीं आळिंगावें ॥३॥


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *