संत तुकडोजी भजन

संत तुकडोजी भजन

संत तुकडोजी भजन – १ ते २०० पूर्ण वीडियो सहित 

भजन – १
तुझे सगुण रूप ध्यावे । माधवा ! केशवा ! ध्यावे तुला जीवभावे ॥धृ॥
मोरमुकुट साजिरा, धरुनी कटासी करा । पीतांबर पिवळा, विटेवरी लक्ष द्यावे ॥१॥
मूर्ती दिसे सावळी, शोभे तुळशी गळी । लागे मना आवडी, वाटे सदा नाम गावे ॥२॥
नको कुणी साधना, तूची असो मन्मना । तुकड्याची ही भावना, संती सदा टिकवावे ॥३॥

 हे पण वाचा: ग्रामगीता

भजन – २
करुणाघना ! दीनपावना ! कुलभूषणा ! दे दर्शना ॥धृ॥
तुजवीण त्राता न कुणी आम्हाला, सुख दे मना । दे० ॥१॥
भवसागरी दुःख नी भय भारी, सुध ना मना । दे० ॥२॥
गति तुकड्याची वाहो स्वरूपी, पदि याचना । दे० ॥३॥

भजन – ३
सावळी मूर्ति ही गोजिरी । पाहताना मनासी हरी ॥धृ॥
अति कोमल चरणांगुले, सिंहासनि शोभति चांगले । गळा वैजयंती साजिरी । पाहताना० ॥१॥
कटि पीतांबर साजिरा, शिरि मोर-पिसांचा तुरा । वाजवितो मधुर बासरी । पाहताना० ॥२॥
दास तुकड्या म्हणे ध्यान हे, आमुच्या जीविचे प्राण हे । मुक्ति लाभे, जपा अंतरी । पाहताना० ॥३॥

भजन – ४
किति शांत उदात्तहि मूर्ति तुझी । मनि लावितसे अति वेड मला ॥धृ॥
पद-कमलावर तुळशि-दले ही, शोभति उटिया पद-युगुला ॥१॥
वक्षस्थळावर माळ विराजे, कटि पीतांबर हा कसला ॥२॥
मोरमुकुट हा अति झळके शिरि, अधरि धरी पावा अपुला ॥३॥
तुकड्यादास म्हने मज शेवटि, देशिल ना प्रभु ! भेट खुला ॥४॥

भजन – ५
वाजवी प्रभु ! गोड वेणू वाजवी । मोहिनी या बंसिची हृदयास लागू दे चवी ॥धृ॥
चित्त हे झुरते सदा, ती मधुर बंसी ऎकण्या। काढ हा पट आडवा, मन लागु दे रुप पाहण्या॥१॥
श्यामसुंदर कटि पितांबर, मूर्ति चिमणी साजिरी । कुंजवनिच्या गोपिकांना, तारिशी तू निर्भरी ॥२॥
दास तुकड्या प्रेमयोगी, बंसरी द्या मागता । ना हवे मग दुसरे मज, गंधही त्या स्वर्गिचा ॥३॥

भजन – ६
राहु दे, मन हे तुझ्या पदि राहु दे । भेद सगळे जाउ दे, तव रूप निर्मळ पाहु दे ॥धृ॥
आस नाही दुसरी, हा जन्म सगळा वाहता । होउ दे सेवा प्रभू ! या नश्वरा देहे अता ॥१॥
कोण नेइल संपदा ही, अंतकाळी बांधुनी ? राहतिल हे जगि सारे, विषयसुख दिसते जनी ॥२॥
दास तुकड्या वांच्छितो, विसरू नको गरिबा हरी ! दीन आम्ही तव पायिची, या बालकासी सावरी ॥३॥

भजन – ७
भगवंता ! लक्ष्मीकांता ! तारि बालका ॥धृ॥
मोहविकारे जीव थरारे, कोणि ना सखा । संसारी दुःख भारी, कावला फुका ॥१॥
तुझिये स्वरूपी चित्त वसू दे, घेउ दे सुखा । मन रंगो नाम गाता, न घे आणिका ॥२॥
मरणी मरू दे पाहता तुलाचि, नाहि पारखा । तुकड्याचि हाक घ्या हो, विसरू नका ॥३॥

भजन – ८
कुणि दत्त पाहिला का माझा ? अवधूत पाहिला का माझा ? ॥धृ॥
दंड-कमंडसु त्रिशूल हाती, औदुंबर-तटि वास करी । पायी खडावा भस्म तनुवरि, भक्तांच्या धावे काजा ॥१॥
कोल्हापुर ला मागत भिक्षा, वास करी माहुरधामा । स्नान करी जान्हवी तटाकी, योगिराज सद्गुरुराजा ॥२॥
जपता भावे प्रसन्न होई, फळ देई झणि धावुनिया । तुकड्यादासा आस तयाची, पुरविल तो अमुच्या काजा ॥३॥

भजन – ९
भाललोचना ! रे गड्या ! भेटि देइ आज । उध्दरिली महानंदा कृपेने सहज ॥धृ॥
उपमन्यु बाळासाठी केला दुग्धसिंधू । हलाहल प्राशूनिया राखियली लाज ॥१॥
ऎसी वेदग्रंथ कीर्ति वर्णिती अनंत । ऋषिमहंतांचे तुवा पुरविलेसि काज ॥२॥
घेउनि त्रिशूल डमरू, नंदिस्वार होत । अर्धांगि सती पार्वती, गणपती सिध्दिराज ॥३॥
भूत डाकिणी पिशाच, घेउनी सहीत । तुकड्या म्हणे कैलासी, उभारिला ध्वज ॥४॥

भजन – १०
त्या प्रीय शंकराला, जिव पाहण्या भुकेला । कैलासिच्या शिवाला, कुणि भेटवा अम्हाला ॥धृ॥
नरमुंड-माळधारी, विष-सर्प ते शरीरी । अवधूत वेषवाला, जिव पाहण्या भुकेला ॥१॥
व्याघ्रासनी विराजे, लल्लाटे चंद्र साजे । डमरू-त्रिशूलवाला, जिव पाहण्या भुकेला ॥२॥
शोभे जटेत गंगा, राही पिवोनि भंगा । अलमस्त बैलवाला, जिव पाहण्या भुकेला ॥३॥
नाचे पिशाच्च संगे, जो भिल्लिणीशि रंगे । वश होय भाविकाला, जिव पाहण्या भुकेला ॥४॥
करि शंख, नाद रुंजे, मुखि राम-राम गुंजे । क्षणि जाळिले मदाला, जिवे पाहण्या भुकेला ॥५॥
तुकड्या तयास ध्यायी, ध्यानी दिसो सदाही । हा हेत पुरविण्याला, जिव पाहण्या भुकेला ॥६॥

भजन – ११
येइ रे भोळिया ! भेट झडकरी । पाहु दे डोळिया मूर्ति गोजिरी ॥धृ॥
कुंजविहारी ! गिरिवरधारी ! मनमोहन ! राधा-मनहारी ! ॥भोळिया ! ० ॥१॥
या भवधारी, मन दुःखारी । तुजविण कोण दुजा कैवारी ? ॥॥भोळिया ! ० ॥२॥
मधुर बासरी, ऎकवि तारी । तुकड्यादासा आज निवारी ॥भोळिया ! ० ॥३॥

भजन – १२
बोलु काय ? बोलवेन , आपुलिया दोषा । तूचि सर्व-साक्षी आदी, अनादी परेशा ! ॥धृ॥
त्रिविध तापांचा संग, न पाहावे डोळा । रिपु क्लेश त्रास देती, वाढवोनि ज्वाळा ॥१॥
आसक्ति गुंतवी, तुझ्या सोडुनिया प्रेमा । कर्म-धर्म नष्ट होती, ढासळिता नेमा ॥२॥
ऎसिया चिंतनी वेळ, जातसे निधाना ! लाज वाटे सांगताचि, तुज घनश्यामा ! ॥३॥
करि कृपा त्रास टाळी, जाचणी यमाची । तुकड्यादास ठाव देई, मागणे ते हेची ॥४॥

भजन – १३
असं वेड लावशिल कधी ? मी विसरिन माझी सुधी ॥धृ॥
तुज वाचुनि कवणा रुसू ? गे माय ! कुणाला पुसू ? ॥१॥
‘हा देह मी’ म्हणता भला, स्वात्मता न उरली मला ॥२॥
संशयी वृत्ति पाहुनी, अग ! लाज वाटते मनी ॥३॥
नच विरे गर्व बापुडा, सोडिचना अपुला धडा ॥४॥
जाणीव वाढली जरी, तरि अंधपणा वावरी ॥५॥
तुकड्यास ठाव दे अता, नच भासो देहात्मता ॥६॥

भजन – १४
सुखशांति या जगि ना दिसे । जन हे पिसे, फिरे वायसे ॥धृ॥
अति थोर राजा, जयाचा अगाजा ! धरि लोभ तोही, मनासी रुसे, दुःख-सायसे ॥१॥
रमे रम्य लोकी, मुखासी विलोकी । झुरे अंतरीही,’करावे कसे ?’ दुःख-सायसे ॥२॥
गडी तुकड्याचा, कुणी ना कुणाचा । झरा स्वारथाचा, मुळाशी वसे, दुःख-सायसे ॥३॥

भजन – १५
समाधान हे विषयी नसे । पाहता दिसे, कळे सायसे ॥धृ॥
विचारी मना रे ! त्यजी सर्व वारे । धरी संत-पाया, सुख देतसे, कळे सायसे ॥१॥
सुखी कोण झाला ? जगी या निवाला ? न राजा दिसे बा ! प्रजाही नसे, कळे सायसे ॥२॥
गडी तुकड्याचा, हरी हा सुखाचा । धरा भाव याचा, सुखी व्हा असे, कळे सायसे ॥३॥

भजन – १६
पाहतोसि अंत काय, नंद-नंदना रे ! ॥धृ॥
दीन अम्ही घाबरलो, भवचक्री सापडलो । ‘सुख’ म्हणुनी गडबडलो, ऎक वंचना रे ॥१॥
पाहुनि जनि सृष्टि-खेळ, नटलो बहु करुनि मेळ । खोवियली ऎसी वेळ, कोणि ना सखा रे ! ॥२॥
सोसियले दुःख किती, परि येईना सुमती । अंतकाळि काय गती, होइल गिरिधारे ! ॥३॥
बुध्दि दे अम्हास अता, लागू तव नाम पथा । होउ नकोसी परता, देइ दर्शना रे ! ॥४॥
वेळ गेलिया निघून, काय पाहशी दुरून ? । तुकड्या म्हणे जीवप्राण, दान देइ बारे ! ॥५॥

भजन – १७
या या रे सकळ गडी ! ‘कृष्ण कृष्ण’ गाऊ ॥धृ॥
कुंजवनी यमुनेतिरि, वाट पाहतो श्रीहरि । जाउ धावु पाहु तया, रंगि रंग लावू ॥१॥
बहु जमले धेनुपाळ, वाटतसे दिव्य माळ । कापतसे दुरुनि काळ, त्या रुपास पाहू ॥२॥
मोरमुकुट सुंदरसा, कटि पीतांबर सरसा । बंसरिच्या नाद-रसा, तल्लिन मनि राहू ॥३॥
रामरंग अमित संग, प्रभुची महिमा अभंग । तुकड्या म्हणे देहभाव, कृष्ण-पदी वाहू ॥४॥

भजन – १८
सद्गुरुचे गूण-नाम, गाइ मनोभावे ॥धृ०॥
संसारी सर्व मिळे, व्यवहारी सर्व कळे । परि गुरुगम्यचि विरळे, नाहि जगा ठावे ॥१॥
सागर उतरेल पार, वायुगमनीहि फार । गुरुची महिमा अपार, नाहि कुणा पावे ॥२॥
अमृत मंथने निघेल, जीव मस्त हा बनेल । गुरु-ज्ञानविण कुणी, शेवटी न धावे ॥३॥
तुकड्याची एक आस, सद्गुरूचि पुरवि खास । करुनी भवदुःख-नाश, अंतकाळि पावे ॥४॥

भजन – १९
आवडिचा मोहन हा, सोडु नये वाटे ॥धृ॥
जीवभाव तोचि अम्हा, धनिकासी जेवी जमा । विसरताचि एक क्षण, अंगि येति काटे ॥१॥
नेत्रि सगुण रूप सदा, वाटे सुख शांति-सुधा । त्याविण ना गात जरा, क्षण न एक कंठे ॥२॥
मधुर ध्वनि बंसरिचा, नाश करी षड्‍ -अरिचा । बाग फुले या उरिचा, निर्मळ जल दाटे ॥३॥
तुकड्याचा देव एक, परि हा नटतो अनेक । त्या पदि मन हे निशंक, कमलामृत चाटे ॥४॥

भजन – २०
सावळा मुरारी, अमुच्या रंगि रंगला । विसरुनी न जाऊ आम्ही, संग हा भला ॥धृ॥
जाउ जिथे पाही तेथे, आपणाची मागे येते । विसरिना कधी आम्हाते, मोहिला भला ॥१॥
नेत्र मिटोनिया बसता, भासतसे हसता हसता । खेळ खेळता नि निजता, सोडिना मला ॥२॥
सृष्टिसुखा पहाया जात, मार्गि लावितो हा चित्ता । भासवितो अपुली सत्ता, दावितो कली ॥३॥
नाठविता आठव देई, आठविता जवळी राही । देउनिया तुकड्या ग्वाही, सांगतो खुला ॥४॥

भजन – २१
अखिल विश्व मंदिर माझ्या आत्ममूर्तिचे । खेळ हे निसर्गे त्याच्या कार्य-पूर्तिचे ॥धृ॥
वाहती नदी-सागर हे, स्नान घालण्या तयासी । पृथ्वी हेच सिंहासन त्या चक्रवर्तिचे ॥माझ्या०॥१॥
वसंतबाग फुलला फलला, हार अर्पिण्या तयासी । सुंगधित चंदनकाष्ठे, गंध हे पुजे ॥माझ्या०॥२॥
पृथ्वी अन्न शिजले जे जे, भोग द्यावयास यासी । जळति द्रव्य-धातू सगळे, हवन होतसे ॥माझ्या०॥३॥
सूर्यचंद्र नंदादिप हे, जळति ज्योत द्यावयासी । पवन मंद वाहे सुखवी, हृदय हे तिचे ॥माझ्या०॥४॥
निर्विकल्प चिद्‍ आत्मा हा, भोगुनी अभोक्ता राही । दास सांगतो तुकड्या हे भाव स्फूर्तिचे ॥माझ्या०॥५॥

भजन – २२
भोग हा चुकेना कोणा, देव-दानवा । सृष्टि भोग भोगी देही, मागचा नवा ॥धृ॥
संत-साधु योगी-मौनी, प्राक्तना चुकविना कोणी । मृत्युपरी पावे ग्लानी, दुःख या जिवा ॥कोणा०॥१॥
ब्रह्मनिष्ठ नारद स्वामी, भोग-भ्रसे रतला कामी । आपणची स्त्रीच्या उर्मी, प्रसवला भवा ॥कोणा०॥२॥
पुत्री विधात्याने धरली, पितृ-भावना ही हरली । भिल्लिणिची प्रीती स्फुरली, भोळिया शिवा ॥कोणा०॥३॥
सुख-दुःख दैवे पावे, सकळ शास्त्रियांसी ठावे । सांगतसे तुकड्या भावे, येई अनुभवा ॥कोणा०॥४॥

भजन – २३
व्हा उभे धर्म-रक्षणा, धैर्य हे कां सोडता ? । गर्जु द्या वीर-गर्जना, मार्ग हा कां मोडता? ॥धृ॥
(अंतरा) चमकु द्या रक्त वीरांचे । उघडु द्या कर्ण शूरांचे । फोडु द्या भंड क्रूरांचे । द्या प्राण रणी खोचुनी, हात हे कां जोडता ? ॥१॥
(अंतरा) श्रीकृष्ण आमुचा ईश । सांगतो हाचि संदेश । ठाऊके आर्य-पुत्रास । लागेल पाप नैकता, वचन हे कां खोडता ? ॥२॥
(अंतरा) गाईचे वाचवा प्राण । अबलासी द्या जिवदान । राखा वडिलांचा मान । चला उठा उठा तरुण हो ! वेळ ही का दवडिता ? ॥३॥ (अंतरा) आळवा प्रभूसी ध्यानी । मागा यश या संग्रामी । घ्या उडी उधळवा उर्मी । तुकड्याचि आस ही पुरी, होउ द्या का तोडता ? ॥४॥

भजन – २४
किती बघशि अंत आमुचा ? श्रीहरी ! ये धावुनी । सुख नाहि जगी तुजविना, भाव हा घे पाहुनी ॥धृ॥
(अंतरा) जग नाशिवंत हे चळले । मेंढरावाणि खळबळले । हे जया ज्ञानिया कळले । नच राहि जरा तुजबिना, दया मनि घे निरखुनी ॥१॥ (अंतरा) हा विषय विषासम भासे । लागलो तुझ्या अम्हि कासे । नच त्रास कुणाचा सोसे । या अशा लेकरा करी, सख्या घे ये उचलुनी ॥२॥ (अंतरा) कोवळे मनाचे आम्ही । संस्कारजन्य अति कामी । लागलो अता तव नामी । तुकड्यादास भेट दे हरी ! चित्त झुरते गाउनी ॥३॥

भजन – २५
प्रभु ! बोल बोल अनमोल, प्रेम तू का सोडला ? । विपरीत असा हा काळ, भारता का ओढला ? ॥धृ॥
(अंतरा) शेतीत पिके ना होती । ऋतु काळवेळ ना बघती । दुःखद विघ्ने कोसळती । हे सर्व दिसुनिया असे, बघवते हे का तुला ? ॥१॥
(अंतरा) अन्नान्न भरतभू झाली । कांचने होति ओतियली । ती वेळ कुठे रे ! गेली ? । रुसलासि अम्हावरि काय, कृपा कर का ओढला ? ॥२॥ (अंतरा) अति शूर धुरंधर होते । प्राणापरि जपसी त्याते । ते भक्त तुझे का होते ? । लेकरा विसरुनी अता, मार्ग हा का मोडला ? ॥३॥
(अंतरा) देवळे स्मशाने झाली । अबलांची इभ्रत गेली । दास्यात भरतभू पडली । तुज कसे शोभते हरी ! ब्रीद-पथ का सोडला ? ॥४॥
(अंतरा) गर्जती पुराणि ज्ञाते । ‘राखील प्रभू आम्हाते’ । किती वेळ ? सांग तरि बा ! ते । तुकड्याची हाक घे आता, प्रेम अधि का जोडला ? ॥५॥

भजन – २६
क्षण एक धरीना धीर, कसे मन हे बावरे । करु काय सुचेना काहि, जरा तरि ना आवरे ॥धृ॥
(अंतरा) जरि योग-याग बहु केले । मन-पवन समाधी नेले । वनि निर्जनि घर बांधियले । तरि व्यर्थ तयांची कास, खास विषयी हावरे ॥१॥ (अंतरा) जगि तीर्थधामही नाना । दरिकंदरि ऋषिच्या स्थाना । जी मोहविती शरिरांना । ना राहि जरा टिकुनिया, कुसंगाने पाझरे ॥२॥
(अंतरा) अति पंथ-मतांतर लोकी । परि आस पुरेना एकी । जळजळती एकामेकी । नच शांति वृत्तिला येइ, करी हृदया कावरे ॥३॥
(अंतरा) सत्‍ संग सुगम यासाठी । व्हावया वृत्ति उफराटी । परि बोध पाहिजे गाठी । विश्वास असा तुकड्यास,’अनुभवा दे भाव’ रे ! ॥४॥

भजन – २७
हरिभजनाची नुरली जागा, स्वतंत्रतेच्या परी । उलटली परवशता ही पुरी ॥ गुलामगिरिच्या कर्कशा बेड्या, पडल्या पायी करी । धडकले परधर्माचे अरी ॥ तन-मन-धन हे नेति हरुनिया, हसवुनि अस्वलिपरी । लावती आग घरीचे घरी । (अंतरा) ‘हिंदु’चा नाश व्हावया चिंतिती मनी । अति दुर्बल केला देश चहुबाजुनी । वाटतो धाक हा गिळतिल कोण्या क्षणी । रक्षणकर्ता कोणिच नुरला, या पुढती कुणितरी । सखा हा भारत चिंता करी ॥१॥
गजांत-लक्ष्मी डुलली जेथे, सौभाग्याच्या गुणे । न होते काहि कुणाला उणे । सौख्य नांदले अखंड जेथे, ‘रामराज्य’ दणदणे । खेळले सैनिक निर्भयपणे ॥ तपोबलाच्या आत्मिय ऊर्मी, भक्त-उरी सणसणे । भोगिले वैभव भारत-भुने । (अंतरा) उतरला राहु आणि केतू हा अवकली । अन्नान्नदशा ही भारतभू पावली । ही परवशतेच्या भरी दुःखि जाहली । असा हिंदुनो ! वीर तुम्ही, कुणि गर्जा या अवसरी । सखा हा भारत चिंता करी ॥२॥
काय वाचता पुराण पोथ्या, राम-रावणी कथा । त्यातुनी काय काय ऎकता ? ॥ गेला रावण निघुनी आता, सोय काय चिंतिता ? । दुसरा झाला हा मागुता ॥ सुर-असुरांचा झगडा नेहमी, चालतसे भोवता । रहावे सावध अपुल्या हिता । (अंतरा) सांगतो राम हा उपासकांच्या प्रती । ‘व्हा उभे धर्मरक्षणा, त्यजा दुर्मती’ । यश येइल तेव्हा हिंदूंच्या भोवती । करा करा तातडी मिळोनी, वेळ नसे ही बरी । सखा हा भारत चिंता करी ॥३॥
मारुतिच्या अंकिल्या मुलांनो ! आर्याच्या बंधुनो ! । सिंधुच्या मर्यादित बिंदुनो ! ॥ कंसारीच्या गोपाळांनो ! नंद-नंद-कंदुनो ! । लाडक्या देवांच्या हिंदुनो ! ॥ शूर वीर श्रीछत्रपती शिवरायाच्या बिंदुनो ! । उभी व्हा तरुणांनो ! बंधुनो ! ॥ (अंतरा) हा धर्म-ध्वज घ्या करी, जपा मिळुनिया । कमवाच आपुला हक्क ‘हक्क’ म्हणुनिया । आळवा अंतरी देवदेवतासि या । तुकड्यादास म्हणे तोडा ही, गळफासाची सुरी । सखा हा भारत चिंता करी ॥४॥

भजन – २८
बोल बोल बा ! बोल भारता ! चिंतातुर का असा ? हाल-बेहाल तुझी लालसा ॥धृ॥
स्वातंत्र्याच्या उन्नत शिखरी निर्भय सेना तुझी । सोडुनी आज दशा का अशी ? ॥ वेदांताची उंच गर्जना, भार ऋषींचे तसे । सोडुनी वन-वन का फिरतसे ? ॥ भारतमय श्रृंगार तुझा तो काय कुठे लोपला ? बावरा फिरशी का एकला ? ॥ (अंतरा) तव मुकुत भक्त-हिरकणे विखुरले कसे ? । तव हृदय-कवच पंडीतहि जागी नसे । कर-कमालीची तरवार वीर ना दिसे । धैर्य-तेज-विजयता लीपलो, प्रसंग दुर्दैवसा । सांग बा ! प्राप्त जाहला कसा ? ॥१॥
तुझ्या कीर्तीची ध्वजा पहाता आयुष्यही ना पुरे । गंज-अधिगंज पुराणे भरे ॥ रत्नजडित किति कनक रुप्याचे जडाव तव साजिरे । गजावर लक्ष्मि भरार्‍या करे ॥ सदा सुखी आनंदित जनता, वीर वृध्द-लेकुरे । खेळती सिंह जसे वनि फिरे ॥ (अंतरा) श्रीमंत-संत आणि राव-रंक एकसे । नच भेद कुणाला तयी कधी गमतसे । अधिकारान्वघि ते आरुढले, समरसे । अघोर संकट दिसे अचानक, जशी उतरली नशा । नसातुनि रंग दिसे भलतिसा ॥२॥
कष्ट करीता ढोरासम ही पिके न शेती जरा । द्रव्य व्यसनात होतसे चुरा ॥ विषयांधासम फिरती तरुणहि, तरुणी दुसर्‍या घरा । शांति ना मना तयांच्या जरा ॥ ऋतु काळ ना बघे, कधी जल, उष्ण वाढती मधे । वाहती वेळ-अवेळी नदे ॥ (अंतरा) काय ही दुर्दशा आली ग्रहणे जशी । निर्जली निर्फली दुर्बल झाली कृषी । ती गजांतलक्ष्मी पळे, गमे परकिसी । चिन्ह दिसेना बरे, ऊठ तरि सावध होई कसा । कळेना काय ? स्वस्थ तू असा ॥३॥
निरिक्षुनी पाहता तुजकडे दिसशी वेड्यापरी । कोण हे ओढिति तुज बाहेरी ? ॥ परिस्थितीच्या लाल धुरंधर ज्वाला भवतालुनी । पोहोचल्या पेट घेत आतुनी ॥ निसर्ग वन साजिरे, धैर्य-बलवीर वृक्ष कडकडे । अग्निने जागि जळोनी पडे ॥ (अंतरा) कुणि शांतविता नाहीच तुझ्या बाजुला । हे पुत्र असुनिया करिती अरि-गलबला । ओढती आप आपुल्याकडॆ तुजला । काळ वेळ ही अशी पातली, पाहतो का प्रभु असा ? । पुढे तरि देइल का भरवसा ? ॥४॥
भयाण ऎशा कठिण प्रसंगी साथ कोण दे तुला ? बोल हा आठवतो का खुला ? ॥ राहु-केतुच्या कचाटियातुनि बंध तोडुनी तुझे । कोण उचलतील बा ! हे वझे ? ॥ अर्धोन्मिलितापरी प्राण तव, छिन्न-भिन्न गमतसे । कोण तव यश घेइल सायसे ? ॥ (अंतरा) दे हाक रामकृष्णासम व्हाया उभे । तुझि सत्य हाक ही कळेल त्यांच्या सभे धावतील ओढाया असुरांच्या जिभे । तुकड्यादास म्हणे पाहवेना, अम्हा त्रास हा असा । मिळो स्वातंत्र्य पुन्हा जगदिशा ! ॥५॥

भजन – २९
राष्ट्र-सुखाची कळकळ निर्मळ वाहताना अंतरी । नसू दे स्वार्थ सख्या ! तिळभरी ॥धृ॥ पर सुखदुःखे मान आपुली, निष्कामी हो उनी । कार्य कर न्याय-नीती सेवुनी ॥ सद्‍ धर्माच्या तत्त्व-तंतुला तोडु नको धावुनी । रुढीला नाचु नको घेउनी ॥ (अंतरा) राष्ट्रीय बंधु-भावना रमू दे जगी । वाढवी प्रेम आपुल्य-पराच्या मधी । जातिंचे कडक निर्बंध ढिले कर अधी । स्वैरपणे रंगु दे वीर स्वातंत्र्य धराया करी । लावि ही ध्वजा दिगंतावरी ॥१॥
तत्त्व शोधल्याविणा कुणाची करू नको खंडणा । अधिकसा मांडु नको फड दुणा । निसर्ग-जग हा बाग प्रभुचा, रमवी मनि भावना । दुःखवू नको कुणाच्या मना । फुले फळे ही सुंदर निघतिल, कोण जाणतो खुणा ? सुगंधे रुंजू दे मन्मना ॥ (अंतरा) वाहु दे लाट ही जोराची आतुनी । ‘कुणी उठा उठा हो ! या पुढती धाउनी । करु राष्ट्र-धर्म-हा जागा अपुल्यातुनी’ । ऎक्यपणाचे बाहु उभारुनि करू गर्जना बरी । होउ दे तरुण-वृत्ति बावरी ॥२॥
वेळ अवेळहि पाहुनि वर्तन ठेवावे आपुले । कर्म आचरोनि समयी भले ॥ देश सुखी व्हावया पाहिजे कार्य-क्रम चांगले । पाहिजे सदा मनी शोधिले ॥ पूर्वज अमुचे कार्यप्रसंगी कसे कसे वर्तले । चलावे थोरांच्या पाउले ॥ (अंतरा) ही याद असू दे, विसरु नको चालता । जरि काळ आडवा आला कर पालथा । सोड ही आता तरि भोळिव निर्जीवता । तुकड्यादास म्हणे घे कानी, तोड उरीची सुरी । पडु दे प्राण प्रसंगावरी ॥३॥

भजन – ३०
श्रीकृष्णाच्या मुखोग्दताचा आठव होता मना । उसळती वीर-बोध-भावना ॥धृ॥
सळसळता तै लाट वृत्तिची गीता-वाणीतुनी । निघाला ज्ञानांकुर गर्जुनी ॥ रणांगणावरि कठिण प्रसंगी, बोध करी वेधुनी । ‘उभा हो पार्थ सख्या !’ म्हणउनी ॥ (अंतरा) ‘हो जागा कर्तव्याला, घे गांडिवा । उजळवी जगी या विजयश्रीचा दिवा । दाखवी जगाला नीतिमार्ग हा नवा । धर्म-रक्षणा करावयासी तूच सख्या ! शाहणा । भिउ नको लढण्या समरांगणा’॥१॥
‘अन्यायाला सहन करूनी जगणे नाही बरे । मरावे धर्म रक्षुनी खरे ॥ पूर्वजांचिया कुळा पहा हा, कलंक नाही बरा । करावा नाश लढोनि पुरा ॥ क्षत्रिय-धर्मा शोभे जैसी रीत धरावी उरा । फिरु नये रणांगणाहुनि घरा’ । (अंतरा) विश्वासुनि सांगे कृष्ण आपुल्यापरी । ठसविता शब्द हे विजय होय भुवरी । या करा तातडी वेळ नसे ही बरी । उभा ठाकला वीर कुरुक्षेत्रात, करी गर्जना । वाजती रण-वाद्ये दणदणा ॥२॥
भारतभूच्या तरुणासाठी बोध देउनी सखे । जाहले जय घेउनि पारखे ॥ सांभाळाया इतिहासासी नित्य जपा सारिखे । विरु नका होउनि हृदयी फिके ॥ कर्तव्याची ज्योत जागती सदा असु द्या मनी । बोध घ्या गीताजयंतीतुनी ॥ (अंतरा) धन्य तो दिवस जै कृष्ण बोधि अर्जुना । थरथरा कापती शत्रुंच्या भावना । पुण्यात्मे करिती पुष्पवृष्टि त्या क्षणा । तोचि दिवस आजिचा गडे हो ! स्मरण व्हावया जना । धरा हृदयाशि नंद-नंदना ॥३॥
शरिरे कितिदा तरी गळाली, बोध गळेना कधी । नाहि त्या नाशक कुणि औषधि । धन वडिलांचे सांभाळाया अधिकारा घ्या अधी । बोध द्या तरुणा हृदयामधी ॥ उठ उठा रे गोपाळांनो ! करा संघ आपुला । प्रार्थुया परमेशा-पाउला ॥ (अंतरा) हा सोडुनि पळता बोध व्हाल पातकी । पूर्वजा दुःख बहु, पाहुनिय घातकी । अनुभवा आणता सर्वचि होती सुखी । तुकड्यादास म्हणे जागे व्हा, विसरु नका हो खुणा । रंगवा रणांगणी जीवना ॥४॥

भजन – ३१
चला गडे हो ! चला पंढरी, भाव धरुनिया मनी । विठोबा भेट देइ धावुनी ॥धृ॥
पुंडलिकाने करुनि कमाई, देव आणिला जगी । पहाया चला घेउनी सगी ॥ संसाराच्या सरोवरी ते, सौख्य न मिळते कुणा । विचारा विचारा करुनी मना ॥ (अंतरा) मनपणा सोडुनी हो उनिया मोकळे । देहभाव सगळा ओसंडावा बळे । मग रूप पहावे विटेवरी सावळे । आनंदाची नुरते सीमा, पहा पहा पर्वणी । निघा हो निघा अहंतेतुनी ॥१॥
वाटे भू-वैकुंठ उतरले, चंद्रभागेच्या तिरी । न दुसरे स्थान असे भूवरी ॥ सुकृत ज्यांचे उदया येई, ते जन वारी करी । विसरती भव-भय दुरच्या दुरी ॥ चहु मार्गांनी ‘विठ्ठल विठ्ठल’ ध्वनी उठे अंबरी । वाटतो प्रेमभाव अंतरी ॥ (अंतरा) कडिकोट किले मजबूत बांधल्या गढ्या । निर्भये भक्तजन मार्गि घालत उड्या । नाचती लोळती घेउनिया सोंगड्या । काळ जाइना फुका, लाजतो यम पाहुनि दूरूनी । भक्ति जे करिती हृदयातुनी ॥२॥
आषाढी-कार्तिकीस येती, अफाट जन भक्तिने । रंगती हरुनि भेद उन्मने॥ दिंडी-पताका, मृदुंग-वीणे, असंख्यसे वाजती । कुंठते कर्णि ऎकता मती ॥ धो धो कर्णे, टाळ-झांजरी, आणिक वाद्ये किती । गर्जती भक्त मुखे अगणिती ॥ (अंतरा) पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ऎकता । ती अफाट सेना डोळ्याने पाहता । पालख्या पादुका क्षणही सहवासिता । देहभाव हरतसे, काय मी सांगु पुढे काहणी ? पहा रे ! पहा एकदा कुणी ॥३॥
करुनि कृपा श्रीज्ञानदेव बोलले ग्रंथिच्या खुणा । जयांनी तुटति जीव-यातना ॥ सुलभ व्हावया मार्ग तुकोबा अभंग वदती जना । अभंगी लागे मन चिंतना ॥ एकनाथ एक नाथ आमुचा उदार होउनि मना । प्रगटवी गुप्त-गुह्य भावना ॥ (अंतरा) वसविली अशी ही पावन-भू भूवरी । सुख संतांचे माहेर खरी पंढरी । मी बघता झालो देहिच वेड्यापरी । तुकड्यादास म्हणे नरदेही घ्या सार्थक करवुनी । वेळ ही दवडु नका हो कुणी ॥४॥

भजन – ३२
अशुध्द शेतीवरी पिकेना सुंदर फल रे गड्या ! । शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥धृ॥
वर-वर घेउनि पिके, बुडविले शेत कसे त्वा अरे ? । अता का घेशि कर्म-नांव रे ? ॥ वाढविले शेतात वृक्ष बहु, काम जयांचे नसे । उडविले पैसे, खाली खिसे ॥ पूर्वपुण्य तव उदय पावुनी शेत मिळाले बरे । हरे जरि करशिल सुखहाव रे ! ॥ (अंतरा) श्रीमंत संत तो धनी जगी धरवरी । जा शरण तयाला चरण धरी वरवरी । घे मत त्याचे मग शेत पिके भरपुरी । विवेकशस्त्रा घेउनि हाती, वृक्ष तोडि शुर गड्या ! । शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥१॥
धर नांगर, ज्ञानाग्नि चक्षुने जाळि अज्ञ-वृक्षया । पालवी-खोड मुळासह तया । बैल कामक्रोधादि जुंपुनी, माया-जू धर वरी । साफ कर देह-शेत अंतरी ॥ असत्य दिसते सत्य जये, ते फेकि विषय बाहिरी । फळे मग ब्रह्म पीक भूवरी । (अंतरा) हो धन्य सुखे खाउनी फळे निर्मल । फलरूप दिसे मग शेत कुणी पाहिल । पाहुनि करी जग तुझेचि हे राहिल । ब्रह्मफलाच्या रुपे दिसे तनु-शेती चांगुल गड्या ! । शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥२॥
देह-शेत हे अशुध्द जाणुनि, शुध्द करी रे ! तया । धरी सत्संग स्वच्छ व्हावया ॥ पुण्यपिके ही संस्कारे तू शेतीवरि कमविली । नष्ट कर्मात स्पष्ट गमविली ॥ विषय वृक्ष हे पाच जाण रे ! कुबुध्दि-जलि वाढले । शस्त्र लावुनि न ते काढले ॥ (अंतरा) शेतिने बध्दपण आले गा ! तुजवरी । मारिती श्रृंग कामादि बैल गुरगुरी । होउनी स्वार तुजवरी दिली नोकरी । घेइ तुती श्रीगुरुनामाची, मारि तयासी गड्या ! शरण तो मग येईल तुकड्या ॥३॥

भजन – ३३
विरह न साहे सख्या ! तुझा हा, भेट एकदा तरी । पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥धृ॥
व्याकुळ हे जिव-प्राण आमुचे, घ्याया तव दर्शना । येउ दे दया जरा तरि मना ॥ अगम्य महिमा तुझी वर्णिली, पूर्ण करी कामना । भेट रे ! भेट पतितपावना ! ॥ (अंतरा) फेक हा मोहमायापट जडभूमिचा । मालवी घनांधःकार भेद उर्मिचा । झळकवी दिवा झळझळीत ज्ञानाग्निचा । जीवभाव हा निरसुनि माझा, अंतःकरण मंदिरी । पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥१॥
सप्तचक्ररत्नांकित ज्याच्या भ्रमती दारावरी । वायु अजपाजप अक्षय करी ॥ वृत्ति-अंकुरी ज्ञानवृक्ष हा खुलवुनि पल्लव-फुला । तुझ्या दर्शना धाव घे भला ॥ (अंतरा) नच वेळ करी तू हरी ! भेट एकदा । ना कधी तुला मग विसरिन मी सर्वदा । इच्छा पुरविच ही, दावि आपुल्या पदा । तुकड्यादासा तुजविण हे जग, फोल दिसे भूवरी । पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥२॥

भजन – ३४
हरिभजनाची रुची जयाच्या हृदय-कमली लागली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥धृ॥
अभ्यासाने वाढत वाढत अंतरंगि पोहोचली । नशा अलमस्त उरी दाटली ॥ काय करावे, काय त्यजावे, बुध्दि हे विसरली । फकिरी शरिरावर धावली ॥ (अंतरा) बेतुफान लाटा चढती नयनावरी । कुणि द्या अंजनही ना उतरे बाहिरी । करि गुंग धुंद, डुलविते शरीरा पुरी । मन-वृत्ती ही वेडिच झाली, हरिच्या पदि लागली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥१॥
इंद्रिय-वृत्त्या भोगावाचुनि, तृप्त होत चालल्या । प्रवाही वाहति सुखाच्या खुल्या ॥ असो नसो कपडा अंगावरि चिंध्या अति शोभल्या । जरीला लाजविती चांगुल्या ॥ बिन कवडीची कंबर कैसी उदात्तशी शोभली । अधिक श्रीमंतीहुनि वाढली ॥ (अंतरा) नच बास घरी पण बादशाहि भेटली । चौखूट जहागिरि विश्वाची लाधली । प्रतिबंध-बंधने सगळी झाली खुली । स्वतंत्रतेची गढी मिळाली, अमरबुटी लाधली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥२॥
शास्त्र-पुराणे-वेदादिक हे, सुत्र बोलु लागले । वाचल्याविण उभे जाहले ॥ सृष्टि सुखाची सुंदर शोभा त्या भवती शोभली । जनांची जीव-वेली गुंफली ॥ अखिल जनाची मोहिनी माया खूष तयावर भली । मागण्या आज्ञा उभि जाहली ॥ (अंतरा) ही अमरबुटी पावली ‘हरी’ बोलता । विसरली भेदवृत्ती विषयांची लता । किति गोड वाटते अनुभव हा पाहता । तुकड्यादास म्हणे जिववृत्ती शीवरूप पावली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥३॥

भजन – ३५
पंढरपुरच्या बादशहाचे सज्ज शिपाईगडी । निघाले दरबारी तातडी ॥धृ॥
बादशहाचे हुकुम पावता पेश व्हावया पुढी । घालती निर्भयमार्गी उडी ॥ आर्त होउनी निघती वाटे, भेटाया धडपडी । अंतरी बाहेरी आवडी ॥ (अंतरा) घरकाम कशाचे ? काहि सुचेना तया । चढविती आपुल्या निर्मळ पोषाखिया । खांदि पताका झळकत भगव्या, जाति मिळुनि सोंगडी । निघाले दरबारी तातडी ॥१॥
अफाट सैनिक जमले मार्गी शस्त्र घेउनी भले । टाळ आणि मृदंग, तंबुरि खुले ॥ ‘विठ्ठल’ नामे करित गर्जना अंतरंगि रंगले । नाचती घडि घडि सुख चांगले ॥ धो-धो वाद्यहि रणवाद्यासम समरांगणि गर्जले । विठुचे सैनिक येती खुले ॥ (अंतरा) पालख्या-पताका घड्या-चौघड्या किती । कोंदला नाद बहु, टाळ-वाद्य अगणिती । भेरिया नगारे मृदंगही वाजती । असंख्य गर्दी, अपुर्व शोभा, धन्य धन्य ती घडी । निघाले दरबारी तातडी ॥२॥
गजबजली चौफेर पंढरी, सैन्यभार लोटला । ध्वनी-प्रतीध्वनी एक ऊठला ॥ मस्त हत्तिसम थै-थै नाचत सैनिक येती पुढे । ‘जय जय ज्ञानदेव’ कडकडे ॥ ‘ज्ञानदेव सोपान निवृत्ती मुक्ताई’ चे धडे । गर्जती ‘तुकाराम’ चौघडे ॥ (अंतरा) नच रीघ उरे पै-पाय मुंगि जावया । जन असंख्य येती सैनिक हे पहावया । दणदणे विठूचे महाद्वार नादि या । वाटे की वैकुंठ उतरले मृत्युलोकिच्या थडी । निघाले दरबारी तातडी ॥३॥ पंढरपुरचे निर्मळ दैवत आहे आमुच्या घरी । वाडविलास त्याचि चाकरी ॥ आजे-पणजे वारिच करिता पंढरीस अर्पिले । विठूच्या दरबारी ठेविले ॥ खांदि पताका, हाति टाळ आणि गळा माळ तुळशिची । मुखी नामावलि पंढरिची ॥ (अंतरा) भाग्याचे आम्हा पंढरपुर भेटले । आषाढिस जाता हे सोहळे पाहिले । मन उन्मत्त झाले मस्त डोलु लागले । तुकड्यादास म्हणे साधा तरि, एकवेळ ती घडी । निघाले दरबारी तातडी ॥४॥

भजन – ३६
चल ऊठ हरी ! तव झोप द्वाड ही आम्हा ! करु ना दे कामाधामा ॥धृ॥ तू निजला रे ! नीजरूप घेवोनी, टेकती असूर निशानी । कुणि कोणाला ना पुसती अभिमानी. निती सोडलि ज्यांनी त्यांनी । ऋषि गोंधळले मठी मंदिरी रानी. त्रासले कामदेवानी । (अंतरा) मातामरि सुटल्या गावा । खंडोबा भैरवबाबा । काँलरा प्लेग वाघावा । उघड रे हरी ! नेत्र जरा घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥१॥ बघ लोकांची दैना ही अति भारी, अन्नान्नि मरति नरनारी। दुःखद विघ्ने कोसळताती सारी, जनता ही जर्जर भारी । बहु चोरांची दाटी, डाके-मारी, नाटके तमाशे द्वारी । (अंतरा) पेटती अग्निच्या ज्वाला । धरणिकंप होतो भू-ला । अति पूर नदी-नाल्याला । पहा पहा जरा मधुसुदन विश्रामा ! करु ना दे कामा धामा ॥२॥ तव गोधन रे ! असुरांनी कापाचे, तुज नेत्रि कसे हे बघवे ? । तव भारतभू पारतंत्र्य गाठावे, शोभते कसे हे बरवे ? । (अंतरा) निंदक भक्ता छळताती । कोणि ना कुणाला पुसती । ऋतु काळवेळ ना बघती । ना सोसवते दुःख सख्या घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥३॥ करि पावन रे ! जीव दशे हे पडले, पाहण्या तुला जे अडले । रुप दाखिव रे ! ध्यान जयांचे नडले, तव प्रेम अंतरी जडले । योगींद्र मुनी सनकादिक हे आले, दर्शनार्थ उत्सुक झाले । (अंतरा) चल ऊठ येइ सामोरी । मिटवि या तमाची थोरी । सुखवि ह्या भक्त नरनारी । दे तुकड्याला तव पद-पंकज-प्रेमा, करु ना दे कामा धामा ॥४॥

भजन – ३७
असुरासी मानवबाणा, पुरवील आस ही कोणा ! वाटते ? ॥ ज्या दया-मया मुळि काही, उपजली जराशी नाही । क्षणभरी ॥ इतिहास मागचा ऎसा, वाचुनी पहा थोडासा । बंधुनो ! ॥ (अंतरा) जे दुष्ट, मनाचे भ्रष्ट , राहती स्पष्ट । दया ना त्यांना, दया ना त्यांना । सोडतील कैचे प्राणा, आपुल्या ? ॥१॥
मानवी बुध्दिचे पाश, होतील क्षणि तरि नाश । खात्रिने ॥ होईल त्रास थोडासा, परि दयार्द्रता गुण साचा । मानवी ॥ क्रोधे जरि मनि जळजळला, तरि सारासारे वळला । शूर तो ॥ (अंतरा) परि क्रूर, न होई दूर, त्रास दे फार । गांजिती नाना, गांजिती नाना । पाहती लवविण्या माना, आमुच्या ॥२॥
भस्मासुर जव बल दावी, तव युक्ति प्रभुस शोधावी । लागली ॥ घाबरले शंकर भोळे, पळती त्या रानोमाळे । पाहुनी ॥ मदमत्त हत्तिसम झाला, मरणास्तव बुध्दि त्याला । फावली ॥ (अंतरा) विष्णुनी, वेष घेउनी, बनुनी मोहिनी । गर्वि असुरांना, गर्वि असुरांना । जाळिले त्याचि हातांना, लावुनी ॥३॥
हा आजवरीचा खेळ, मग मिळेल कैचा मेळ । आमुचा ? ॥ यासाठी एकचि आहे, सुचतो मज तो सदुपाय । अंतरी ॥ दैवि-शक्ति प्रगट करावी, अभ्यासे हृदयी ल्यावी । आपुल्या ॥ (अंतरा) मग राम, पुरवि हे काम, देइ आराम । भक्त लोकांना, भक्त लोकांना । मानवा मिळे जिवदाना, निश्चये ॥४॥
धर्माची इभ्रत जावी, मंदिरे स्मशाने व्हावी । पाहता ॥ अबलासि क्रूर भेटावे, सति-सेव दुजाकरि जावे । पाहता ॥ गाइचे रक्त वघळावे, नेत्रांनी आम्हि बघावे । पाहता ॥ (अंतरा) हे कसे, शोभते असे ? दुःख मरणसे । दया हो प्राणा, दया हो प्राणा । का दया तुम्हा यावी ना, बंधुनो ! ॥५॥
या उठा उठा सगळेची, आळवा प्रभू-हृदयासी । गर्जुनी ॥ तो सखा आमुचा आहे, संकष्टी भक्ता राहे । रक्षुनी ॥ ‘धावुनी ये’ ब्रिद हे त्याचे. पाहिजे आर्त जीवांचे । सर्वही ॥ (अंतरा) मग चक्र, धरी करि शक्र, चिरोनी नक्र । पाडि असुरांना, पाडि असुरांना । हा त्या देवाचा बाणा, सर्वथा ॥६॥
चाहुल द्या लागू कानी, सांगू त्या प्रभुसि कहाणी । आपुली ॥ अपराधाविण मनुजांना, मारणे शास्त्र हे कोणा । सांगते ? ॥ ‘आपुले हक्क मिळवावे, न्याये’ हे कथिले देवे । अजवरी ॥ (अंतरा) मग पाश, कसा आम्हास, बनवितो दास । प्रभु असताना, प्रभु असताना ? तुकड्याची वार्ता कानी, घ्या जरा ॥७॥

भजन – ३८
भारत-तरुणांच्या कानी, ऎकवा हाक जोरानी । बंधुनो ! ॥धृ॥
सांगा मम कहाणी त्यांना, चुकवा देशाची दैना । आमुच्या ॥ सोपले तुम्हावर त्यांनी, शिव छत्रपति राजांनी । शेवटी ॥ (अंतरा) या उठा निर्भये दटा, भूमि चोर्‍हाटा । धरा गाठोनि, धरा गाठोनी । धरि राहु नका रे ! कोणी बंधुनो ! ॥१॥
रक्त हे देशभक्तीचे, उसळवा वीर-शक्तीचे । आपुल्या ॥ घ्या करा संघ निर्माण, धर्माकरिता द्या प्राण । अर्पुनी ॥ ज्वानीच्या कर्तव्याला, द्या ज्योत चेतवा ज्वाला । धावुनी ॥ (अंतरा) फडकवा, रंग भगवा, करोनी नवा । दिवा लावोनि, दिवा लावोनी । या या रे ! पुढती कोणी, तरुण हो ! ॥२॥
‘दीनावर हल्ला करणे, हे पाप घोर’ थोराने । वर्णिले ॥ ‘दुष्टासी दंडण देणे, हे पुण्यमयाचे लेणे’ । वर्णिले ॥ हे ज्ञान सांगते गीता, मग का ऎसे रे ! भीता ? तरुण हो ! ॥ (अंतरा) घ्या मनी, उठा जागुनी, प्रभू तो धनी । जिवी चिंतोनि, जिवी चिंतोनी । तुकड्याची वार्ता कानी । घ्या जरा ॥३॥

भजन – ३९
व्हा पवित्र अपुल्या देही, याविण मार्ग कुणि नाही । शांतिचा ॥धृ॥
आचरा तसेची लोकी, होउनी मनी निःशंके । सर्वही ॥ स्वच्छता घराची ठेवा, शेजार तसाची करवा । आपुला ॥ कैचणे उकिरडे काढा, मळ होइल हृदयी गाढा । त्यासवे ॥ जा दिशेस दुर गावाच्या, ना बसा जवळ कोणाच्या । खंडरी ॥ (अंतरा) आपुल्या परीच लोक हे, समजणूक हे, धरुनि रहा हि, धरुनि रहा ही ॥ याविणा० ॥१॥
पावित्र्य आचरे अंगी, तो भक्त म्हणा सत्‍ संगी। रंगला ॥ तो थोर म्हणा वृत्तीचा, पावित्र्याचि आश्रम ज्याचा । वर्तनी ॥ स्वच्छ खादि अंगी घाली, हाताने कष्टुनि केली । जाणुनी ॥ गायिसी मनोभावाने, पाळितो स्वतः अंगाने । लक्षुनी ॥ (अंतरा) घरि सडा, पडे धडधडा, बनुनि निर्भिडा, झाडि मार्गाहि झाडि मार्गाहि, मज गमे मिळत स्वर्गाही, त्यागुणे ॥२॥
पावित्र्य रूप देवाचे, पावित्र्य अंग दासाचे । सर्वया ॥ तुळसी-वृंदावन दारी, भरि रांगोळी जरदारी । चमजती ॥ घर आजुबाजुनी साफ, ना जरा काटि आणि कुंप । सडविले ॥ अरुणोदय होण्यापूर्वी. कामे आटोपी सर्वी । आपुली ॥ (अंतरा) धन्य तो, घरधनी भला, दिसतसे मला, मनी ममताहि, मनी ममताहि, ज्या मत्सर तिळही नाही, अंतरी ॥३॥
बघताच पहाटे कोणी, आटपली स्नाने ज्यांनी । आपुली ॥ गीतापाठासी बसला, घालितो नमन सूर्याला । दंडसे ॥ धरि पुत्र-पौत्र सर्वांना, शिकवीत आपुला बाणा । बोधुनी ॥ अहो ! करा आचरा ऎसे, तरी भक्त बना देवाचे । निश्चये ॥ (अंतरा) ना तरी, बोलणे परी, न घरी आचरी, थोर तो नाहि, थोर तो नाही, ज्या शुध्द भावना काही, ना वसे ॥४॥
तुकड्याची ऎका वार्ता, हा प्रसंग कानी पडता । आचरा ॥ आचरा नि दुसर्‍या सांगा, सकळ गावि ऎसे वागा । बापहो ! ॥ तरि वाट मिळे शांतीची, खुंटेल रीत भ्रांतीची यामुळे ॥ घ्या कर्म आपुले हाता, व्हा तयार गावाकरिता । आपुल्या ॥ (अंतरा) सांगुनी, सतत वर्तुनी, प्रेम देउनी, बना हो ! ग्वाहि, बना हो ! ग्वाही, तरि देव सुखाला देई, आमुच्या ॥५॥

भजन – ४०
हा खेळ प्रभूच्या घरचा, मिटवाया हात कुणाचा । ये पुढे ? ॥धृ॥
ही निसर्ग बागहि त्याची, तोडाया छाति कुणाची । ये पुढे ? ॥ मोलाविण अग्नि-पाणी, देतो या लोकी कोणी । ये पुढे ? ॥ (अंतरा) हा नसे, नसे परि दिसे, भास व्यर्थसे, खेळ मायेचा, जाणता कोणहो याचा ? ये पुढे ॥१॥
स्तंभावीण रचना केली, गवसली बुध्दिची खोली । कोणत्या ? । पाण्यावर रचले भूला, साधते काय मनुजाला । कोणत्या ? ॥ रवि-चंद्र-तारका अधर, जडविता आलि का कोर । कोणत्या ? ॥ (अंतरा) सागरा, ऊत ये पुरा, ऊर्मिसी झरा । वाहतो कैचा ? पाहणारा ‘साक्षी’ याचा । ये पुढे ॥२॥
कोण या-मुळाशी आहे ? हे बघता खाली हाय । जाणते ॥ हा जड-चैतन्य विवाद, जाणती योगि संवाद । जाणते ॥ ‘एकाच शक्तिची वेली, गुंफलि’ ही जाणे बोली । जाणते ॥ (अंतरा) तो हरी, निराळा दुरी, दिसेना वरी । परी सर्वांचा, भेद हा जाणता त्याचा । ये पुढे ॥३॥
एकाच जिवाने केली, परि भिन्न-भिन्नता झाली । लोकि या ॥ कुणि सूर-असूर बनावे, कुणि खावे, कोणि द्यावे । लोकि या ॥ कुणि सुखी दुःखि कुणि भोगी, कुणि राहति जन्मी रोगी । लोकि या ॥ (अंतरा) ह्या खुणा, जाणि तो म्हणा, खरा शाहणा । पुत्र सद्गुरुचा, तुकड्यास प्रेम हा त्याचा । ये पुढे ॥४॥

भजन – ४१
पाहतात तरी का कोणी ? तुझि दैना केविलवाणी । गायिगे ! ॥धृ॥
गेला तव रक्षक आता, श्रीकृष्ण जगाचा त्राता । गायिगे ! ॥ श्री दत्त गुप्त ते झाले, मज वाटे तुजवर रुसले । गायिगे ! ॥ (अंतरा) शिव हरे, लाविले पुरे, नेत्र साजिरे, बैसले ध्यानी, तुझि हाक घेइना कोणी । गायिगे ! ॥१॥
उरले हे हिंदूधर्मी, कृषिप्रधान देशी कर्मी । गायिगे ! ॥ त्यांचिया बुध्दिची गाणी, सांगतो ऎक गार्‍हाणी । गायिगे ! ॥ अति स्वार्थ तयांना झाला, धर्माचा आदर गेला । गायिगे ! ॥ (अंतरा) सुर्मती, तुला काढती, बाजारी किती, विकती हौसेनी, कटि खोचति रुपये नाणी । गायिगे ! ॥२॥
नच जरुर तुझी लोकाला, वाटते असेची मजला । गायिगे ! ॥ मग दूध कशाला देशी ? पुत्रासम सेवा करिशी । गायिगे ! ॥ किती गोड तुझा हा पान्हा, पाजशी दुष्ट लोकांना । गायिगे ! ॥ (अंतरा) किति प्रेम, तुझे हे नेम, अंतरी क्षेम, क्रोध ना आणी, नच उदार तुजसा कोणी । गायिगे ! ॥३॥
किति सुंदर गोर्‍हे देशी, जुंपण्या अम्हा शेतीसी । गायिगे ! ॥ नच काहि मनी आणोनी, पुरविशी दही-दुध-लोणी । गायिगे ! ॥ दुष्टांना आणि सुष्टांना, अपुल्यांना अणि परक्यांना । गायिगे ! ॥ (अंतरा) ही कीव. घेति जरि देवम चुके तव भेव, प्रार्थितो चरणी, तुकड्या हा करुणा-वाणी । गायिगे ! ॥४॥

भजन – ४२
बघु नको अशी डोळ्यांनी, अग गायी ! केविलवाणी । मजकडे ॥ वाटते दुःख अति भारी, नेताति तुला हे वैरी हाकुनी । द्रव्याचा अपव्यय करुनी, पापांच्या राशी भरुनी । नेति हे ॥ (अंतरा) ना दया, जरासी मया, तया पापिया, उपजली ध्यानी, ठेवती सुरी तव मानी । गायिगे ! ॥१॥
जा सांग सुखे देवासी, “हिंदुची बुध्दि का ऎसी । घातली ? ॥ मी दूध देतसे यांना, तरि विकती माझ्या प्राणा” । सांग हे ॥ वत्सास जुंपती शेती, अणि माझी ऎशि फजीती । सांगहे ॥ (अंतरा) “अति उंच, हिंदुचा धर्म, परी हे कर्म, सोडुनी वर्म, पळति अडरानी । नुरला मम त्राता कोणी । सांग हे ॥२॥”
“गोपाळ कशाचे हिंदू, गो-काळाचा त्या छंदू । लागला ॥ मौजेने विकती मजला, अति स्वार्थ तयांना झाला । आवडी ॥ मज तोडतील जे काळी, मी देइन शाप उमाळी । हिंदुना ॥” (अंतरा) ‘घ्या चला, विका आईला, रिकामी तिला, म्हणोनी कोणी, आवडेल का ही गाणी । आमुची ? ॥३॥
मज क्रूर समज तू आता, तरि काय करू मी माता ! सांग हे ॥ नच द्रव्य आमुच्या पाशी, घेतो तरि जोरच यासी । पाहिजे ॥ मनि तळमळ अतिशय वाटे, तव काळ कसा गे ! कंठे ? दुःख हे ॥ (अंतरा) करु काय, नाहि उपाय कष्टतो माय ! सांगतो कानी, तुकड्याची ऎका कोणी विनवणी ॥४॥

भजन – ४३
किति गोड तुझी गुणनाथा, वाटते मधुर भगवंता ! अंतरी ॥धृ॥
जे भजति तुला जिवभावे, ते पुन्हा जन्मि ना याचे करिशि तू ॥ काय हे मीच सांगावे ? श्रुति-शास्त्र पुराणा ठावे । सर्व हे ॥ प्रत्यक्ष पाहता यावे, मग प्रमाण कैचे द्यावे । त्याजला ? ॥ (अंतरा) जे धीर, करिति मन स्थिर, देउनी शीर । रंगती गाता, रंगती गाता । ठेविशी वरद त्या माथा । श्रीहरी ! ॥१॥
जे तुझी समजुनी झाले, ते कळिकाळा ना भ्याले । सर्वथा ॥ सुखदुःख तयावरि आले, हसुनिया सहन ते केले । सर्वही ॥ गिरिपरी विघ्न कोसळले, तिळमात्र न मनि हळहळले ! भक्त ते ॥ (अंतरा) द्रौपदी, न भ्याली कधी, सभेच्या मधी । वस्त्र ओढिता, वस्त्र ओढिता । धांवला घेउनी हाता । अंबरे ॥२॥
प्रल्हाद भक्त देवाचा, ऎकिला चौघडा त्याच्या । कीर्तिचा ॥ केला बहु छळ देहाचा, परि सोडि न जप नामाचा । तिळभरी ॥ विष-अग्नि-व्याघ्र सर्पाचा, करविला कडे लोटाचा । यत्नही ॥ (अंतरा) किति प्रेम ? ‘न सोडी नाम, जाउ द्या प्राण’ । तारिशि त्या हसता हसता । धावुनी ॥३॥
सम स्थान भक्त वैर्‍यासी, ही उदारता कोणासी । गवसली ? ॥ यशोदेसि ती पुतनेसी, भक्तासी ती कंसासी । दाविशी ॥ घेऊनि माग वेळेसी, भक्तांच्या वचना देशी । पुरवुनी ॥ (अंतरा) ती कणी, गोड मानुनी, पिशी धावुनी । विदुरा-हाता, विदुरा-हाता । निर्मळ प्रेमाचा दाता । तू हरी ! ॥४॥
पांडवा साह्य देउनी, फिरशी तु रानो-रानी । त्यासवे ॥ किति दासाची तुज प्रीती, खाजविशी घोडे हाती । आपुल्या ॥ बहु दीन सुदामा भक्त, बसवी कांचन-महालात । आवडी ॥ (अंतरा) अम्हि दीन, तुझ्या पदि लीन, गाउ तव गुण । लक्ष्मीकांता ! लक्ष्मीकांता ! । तुकड्यासी घे पदि आता । उचलुनी ॥५॥

भजन – ४४
वाढवू नका हो वृत्ती, ‘मी कर्ता’ अथवा ‘भोक्ता’ ॥धृ॥
सर्व हे कार्य देवाचे, सर्वस्वी त्याची सत्ता । मी केले काहिच नोहे सर्व हा हरी करवीता । (अंतरा) हा अनुभव सकळा ठायी । येतसे पदोपदि पाही । जीव हा आमुचा ग्वाही । मग व्यर्थ कशाची चिंता, वाहता आपुल्या माथा ? ॥१॥
आलिया प्रसंगे व्हावे, सावधान कार्यासाठी । भिउ नये कुणा तिळमात्र, इच्छितो हेचि जगजेठी । नीति-न्याय-बुध्दी अपुली, लावावी कार्यासाठी । (अंतरा) अन्याय न पहावा डोळा । गमवूच नये ती वेळा । फिरु नये भिऊनी काळा । हेचि ज्ञान देते गीता, अणि धर्मही सांगे चित्ता ॥२॥
जव अधर्म झाला लोकी, कोणी न कुणाला मानी । साधु संत छळले गेले, अन्याय नसोनी कोणी । कंसाच्या सत्तेखाली, पापांच्या झाल्या गोणी । (अंतरा) ना धर्म राहिला लोकी । साधूजन पडले धाकी । राक्षसी वृत्तिच्या हाकी । गडबडली सारी जनता, नच उरला वाटे त्राता ॥३॥
ऎकताच प्रभुने वार्ता, दुःख हे न बघवे त्यासी । भक्तांचा छळ पहावेना, ब्रीदाची लाज तयासी । ना चैन पडे क्षण एक, गडबडले वैकुंठासी । (अंतरा) गरुडास सोडुनी आले । वैकुंठ दुरावुनि ठेले । देह-भाव विसरुनि गेले । देवकिच्या उदरा येता, जाहला जगाचा त्राता ॥४॥
लीलेने गोपाळासी, पुरविले प्रेम देवाने । प्रेमाची करुनी मोहनी, पाडिली गोपिंना त्याने । होते जे कइ अवतारी, फेडाया आला उसणे । (अंतरा) मर्दुनी असुर प्राण्यांना । भुलविला गर्वमय बाणा । शिर उचलूच ना दे कोणा । दाखवी मालकी त्राता, आमुची या जगती सत्ता ॥५॥
मानवी बुध्दिला धरुनी, खेळता समाजो खेळा । शिकविले राजकारण ते, जिव-भावे त्या पांचाळा । रणक्षेत्र पुन्हा गाजविले, उठवोनी अग्नि-ज्वाला । (अंतरा) श्रीकृष्णाच्या भक्तांनो ! । भरती हिंदुवीरांने ! । संतांनो नी लोकांनो ! । तुकड्याची ऎका वार्ता, का प्रसंग सोडुनि पळता ? ॥६॥

भजन – ४५
श्रीहरी भेटवा कोणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥धृ॥
त्या पहाया नेत्र भुकेने, कर्ण हे तीक्ष्ण किति झाले । जिव जरा उरी ना मानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥१॥
ह्या सुंदर वृक्षाखाली, मी पाहिन तो वनमाळी । सांगेन जिवाचि कहाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥२॥
ह्या झुळझुळ ओढ्याकाठी, मज दिसेल तो जगजेठी । धावुनि मी केविलवाणी, त्या बसविन हृदयस्थानी ॥३॥
ह्या सुरम्य गुंजातळुनी, मी गाइन हरिला गाणी । तुकड्या म्हणे पूजिन ध्यानी, त्या बसविन हृदयस्थानी ॥४॥

भजन – ४६
अवकळा अशी का आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥धृ॥
किति धनिक तुझे कुल होते, तुज भानचि याचे नव्हते । ही विघ्ने कुठुनी आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥१॥
तव गोत ऋषींनी भरले, क्षत्रिये द्वार रक्षीले । का अघटित चिंता व्याली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥२॥
अति कलावान तव स्नेही, ज्या पहातचि परके राही । भिक्षेची वेळ ही आली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥३॥
या एकचि कारण झाले, तव घरी ऎक्य ना उरले । घरभेदी दिवटी व्याली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥४॥
तुकड्याची भोळी वाणी, घेशिल का थोडी कानी ? । तू दुजा भीक ना घाली, भारता ! तुझ्या देहाला ? ॥५॥

भजन – ४७
पावना सख्या श्रीरामा ! मनमोहन मेघश्यामा ! ॥धृ॥
मशि भेट एकदा वाटे, हा जीव जरा ना कंठे । ये मुनिजन-मन-विश्रामा ! मनमोहन मेघश्यामा ! ॥१॥
नर-जन्माचे सार्थक हे, तव रूप पाहणे सुख हे । मग कोणि न येति कामा, मनमोहन मेघश्यामा ! ॥२॥
अनुभवी सांगतो ऎसे, तू जीवाचा सुखराशी । तुकड्याचा पुरवी प्रेमा, मनमोहन मेधश्यामा ! ॥३॥

भजन – ४८
रामतीर्थ अति रम्य ठिकाणी, गेलो मिळुनिया । रामेश्वर लिंगाचे दर्शन, झाले नेत्रा या ॥धृ॥
अती पुरातन भव्य स्थान हे, हेमाडी बांधी । नखशिखांत कोरुनी बसविला, सामोरी नंदी ॥१॥
सुंदर मनकर्णिका जलाने, भरली अति गोड । गमे जणू ही काशिच दुसरी, कोरियला पहाड ॥२॥
रूप मनोहर सांळुकेवरि, रामेश्वर लिंग । वेद-गर्जना, धार जलाची चालतसे चांग ॥३॥
सदा सोवळा हा शिए भोळा, अलंकार यासी । काशीमध्ये भस्म लावतो, उलट रीत इथची ॥४॥
उष्ण जले अभ्यंग स्नाने, बघली मी त्याची । अति श्रृंगार चढे अंगावर, शोभा बहु साची ॥५॥
घननन घननन वाजति घंटे, गर्जतसे भेरी । द्वारि चौघडा वाजंत्रेही, वाजे अति प्यारी ॥६॥
तल्लिन मन झाले बघताना, कृतार्थ जिव झाला । तुकड्यादास म्हणे दर्शनि हा, तारी सकलाला ॥७॥

भजन – ४९
अनुभव-योगी सद्गुरु माझा, एकांती बोले । स्वप्नसुखाला पाहुनि का रे ! ब्रिद खोबिशि अपुले ॥धृ॥
शोधि गड्यारे ! सत्य वस्तुला, हो सावध आता । मायावी हे त्रिगुण जाणुनि, नच जा या पंथा ॥१॥
चिन्मयरूपा पाहि स्वरूपा, कां भुलला बापा ! सहजासनि बैसुनी सोडवी, चौर्‍यांशी खेपा ॥२॥
चवथा देह शोधुनी पाही, नवलाचे नवल । अधो-ऊर्ध्व त्या शुन्य-महाशून्यात असे बाळ ॥३॥
नाद-बिंदु साधुनी, ध्वनीला अंतर्गत ठेवी । ध्यानी ध्याता साक्षी होशी, मग अमृत सेवी ॥४॥
नसे पाच मुद्रांची थोरी, अंत नसे रंगा । तुकड्यादास म्हणे स्वानंदी, पावे भव भंगा ॥५॥

भजन – ५०
आपत्ती पासुनी काढि गे ! माय विठाबाई ! । जाइल वाया ही नरकाया, वेळ बरी नाही ॥धृ॥
बाळपणापासुनी व्यर्थ ही, तनु गेली वाया । कोठवरी दुःखाचे डोंगर, सोसु शरिरी या ? ॥१॥
‘हे माझे ते माझे’ म्हणता, नच निवती डोळे । विषयसुखाच्या गरळी माते ! रात-दिवस खेळे ॥२॥
सुख नाही क्षण-मात्र जिवाला, गति श्वानावाणी । पोटाच्या कारणे धडपडी, सुकरवत जाणी ॥३॥
भले पसरले अधोर वन हे, पडलो त्या माजी। काम-क्रोध-मद-मत्सर श्वापद, शरिरांतरि गाजी ॥४॥
ऎसि ऎकिली मात दयाळे ! तूचि दया करिशी । भक्तकामकल्पद्रुम जाणुनि, आलो तुजपाशी ॥५॥
तुकड्याला दे ठाव, पार कर नाव अभाग्याची । न तरी गेले ब्रिद हे वाया, तुला लाज याची ॥६॥

भजन – ५१
कधी भेटशिल माय दयाळे ! दीन अभाग्यासी ? बहु त्रासलो मन आवरता, ने अपुल्या पाशी ॥धृ॥
बहिर्सग हा भोवति पाहता, भय वाटे भारी । धीर न धरवे पहाडी राहता, चोरांची नगरी ॥१॥
भयाभीत हो उनी, नेत्र धावती तुझ्या पायी । या षड्‍ रिपुचा मेळा पाहता, घाबरलो आई ! ॥२॥
नाहि योग-साधना समजली, वर नेऊ प्राणा । शिकावयाची नुरली इच्छा, सोडुनिया चरणा ॥३॥
भक्त-काम कल्पद्रुम तू गे ! घे करुणा माते ! । तुकड्यादासा प्रेम दावुनी, ने अपुल्या पंथे ॥४॥

भजन – ५२
का धरिशी मनि कोप दयाळा ! वद गिरिजा-रमणा ! । नको दुरावू दीन अभाग्या, घे अपुल्या चरणा ॥धृ॥
तात-मात-गणगीत तुझ्याविण, कोणि नसे वाली । का लोटियशी निष्ठुर हो उनि, कृपणा वनमाली ! ॥१॥
सोडुनिया तव चरण दयाळा । जाउ कुठे रानी ? । निर्बळासि भय दावुनि म्हणशी ‘मजला नच मानी ‘ ॥२॥
नको मला हा प्रपंच-भारा, तुझ्या मायिकांचा । येउनिया दे भेट कृपाळा ! निश्चय अंतरिचा ॥३॥
भक्त-काम-कल्पद्रूम म्हणविशि, वेद-मुखेकरुनी । तुकड्याची ही आशा पुरवी, भव ने हा हरुनी ॥४॥

भजन – ५३
सदा तुझ्या चिंतनी रहावे, वाटे गुरुराया ! । प्रारब्धाचा भोग चुकेना, भ्रमवी अवनी या ॥धृ॥
‘सखा सहोदर पाहु कुठे तरि ? ‘ म्हणतो जिव माझा । जे भेटति ते स्वार्थी लोभी, कोणि न ये काजा ॥१॥
महाकाळ विक्राळ काम हा, भोवति घे घिरट्या । संतसंग किति करू कळेना, पळहि न ये वाट्या ॥२॥
जिकडे तिकडे ‘मी मोठा, मी मोठा’ ही वाणी । भक्तिवर्म ते न दिसे कोठे, दुःखाची खाणी ॥३॥
तुकड्यादासा तुझा भरवसा, मग कोणी नाही । राख राख रे ब्रीद दयाळा ! आलो तव पायी ॥४॥

भजन – ५४
सोडशील का माया माझी ? श्रीपंढरीराया ! । कोण लाज राखिल ? देह हा जाइल गा ! वाया ॥धृ॥
काम-क्रोध मद-मत्सर सारे, जमले वळवाया । भक्ति-आड येऊनि, भाव तो नेती ओढुनिया ॥१॥
मन चंचल, कधि स्थिर राहिना, पहाते फसवाया । बुध्दीने वेष्टिला जीव हा, काय सांगु सखया ! ॥२॥
तूच गड्यारे ! गडी कोण मग येई ताराया ? । सगे-सोयरे पळती सारे, जमले ओढाया ॥३॥
तुकड्यादासा तुझा भरवसा, कोणी मग नाही । पुरा जाणला विचार याचा, ने अपुल्या पायी ॥४॥

भजन – ५५
रक्षि रक्षि सद्गुरूमाय ! मज कोणि दुजा नाही । जाइल वाया तुजविण काया, फसलो भवडोही ॥धृ॥
त्रैतापाचा अग्नि लागला, पडलो त्यामाजी । काम-क्रोध-मद-मत्सर वैरी, खाती मज आजी ॥१॥
स्पर्श-रूप-गंधादिक जमले, शरिरी भय भारी । त्या माजी मन चंचल झाले, बुडवी भवधारी ॥२॥
आयुष्याची दोरी, यमाजी-उंदिर तोड करी । झुरणी पडले वय हे सारे, ये सखये ! तारी ॥३॥
ऎशा या पाशातुनि सुटका, कशि होइल माते ! । तुकड्यादासा मुक्त करी, ने पदपंकजपंथे ॥४॥

भजन – ५६
आपत्काली धैर्य नसावे, ब्रीद कसे तुमचे ? । साच बोलुनी साचचि करशी, वाटे मज साचे ॥धृ॥
श्रृती-वेद बहु शास्त्रे वर्णिती ‘भक्ती प्रिय तुजला’ । ‘याविण काहीच न रुचे आणिक’, सत्य बोल मजला ॥१॥
राख राख प्रभु ! लाज आज रे ! घे पोटी पापी । तुकड्यादास म्हणे मी उरलो, पायी संतापी ॥२॥

भजन – ५७
दवडु नको रे ! रत्न गवसले, दगडाचे पोटी । पाहि दगड शोधुनी, लाव संधान तनूकाठी ॥धृ॥
शरिराचे शरिरात शोधुनी, आत शरिर पाही । आंतर शरिरी नेत्र प्रगटती, किति देऊ ग्वाही ॥१॥
तोचि नेत्र पाहता उमेचा, वर शंकर धाला । त्रैलोक्याचे जहर प्राशिता, भय नाही त्याला ॥२॥
नेत्राचे बिंदुले शोधता, हरपे मन-दृष्टी । जोवरि न मिळे नेत्रि ‘नेत्रिया’ तोवरी तू कष्टी ॥३॥
सोड पाश हा धर्म-कर्म-संस्कार खटाटोपी । पाहि गड्या ! ‘डोळ्याचा डोळा’ प्रगट दिसे आपी ॥४॥
धन्य धन्य ते गुरूराज, वैभवी स्वरूपाचे । तुकड्यादासा दिला ठाव, नित तत्-स्वरुपी नाचे ॥५॥

भजन – ५८
हो जागा, का निजला सखया ! अज्ञानामाजी ? । विसरुनिया संधान आपुले, केला भव राजी ॥धृ॥
सुख नाही, सुख नाही बापा ! या झोपेमाजी । लावुनि घेशी खटपट मागे. मग करिशी हाजी ॥१॥
नरजन्माची वेळ गमवुनी, का बनशी पाजी ? । समज अता तरि, सत्संगाने अनुभव घे आजी ॥२॥
आत्मस्वरूपी स्थिर होउनी, सोडी जग-लाजी । अंतर्मुख कर वृत्ति आपुली, धर निश्चय आजी ॥३॥
तुकड्यादास म्हणे का फिरशी ? धरि गुरुचरणा जी ! सत् चित् रुप सोडुनी राहशी, चोरांच्या शेजी ॥४॥

भजन – ५९
ठेवु कुणावर भार ? कन्हैया ! कोण करिल उपकार ? कन्हैया ॥धृ॥
स्वार्थलोभि ही जनता सारी, मज तारक कोणी न मुरारी ! ॥ जीव कसा जगणार ? कन्हैया ! ॥१॥
जिकडे पहावे तिकडे माया, मोहविकारे जळते काया । भक्ति कशी घडणार ? कन्हैया ! ॥२॥
तुकड्यादास म्हणे दिन आम्ही, लावी देह सख्या ! तव कामी । मज तुचि उध्दरणार कन्हैया ! ॥३॥

भजन – ६०
सोडु नको मज तू गिरिधारी ! दूर करो ही जनता सारी ॥धृ॥
जन म्हणोत मज ‘वेडा झाला’, तरि न दुःख मम होइ मनाला । परि न तुझी मर्जी हो न्यारी ॥१॥
म्हणतिल मज जरि ‘ठेवु उपाशी, परि तू रमशिल ना मजपाशी ? । तोडु नको अंतरिची तारी ॥२॥
पाहो मज वैर्‍यापरि कोणि, तरि त्याची तिळ न धरी ग्लानी । तुकड्याचे भय दुःख निवारी ॥३॥

भजन – ६१
ये बोल बोल रे कन्हैया ! बोल एकदा । अंतरिचा भेद सख्या ! खोल एकदा ॥धृ॥
तुज भेटण्यास माझा, जीव भुकेला । दुःख हे अती विरहे, सांगु कुणाला ? । मनी डोल डोल रे कन्हैया ! बोल एकदा ॥१॥
कोणि ना तुझ्याविण या, प्रेमि जिवाचा । न्याहाळुनि पहा अमुच्या, भाव मनाचा । बोल एकदा तरि ते ! बोल एकदा ॥२॥
संसार तुझ्या नामे, सोडला हरी ! । सौभाग्य तुझे ल्यावे, ही आस अंतरी । तुकड्याची हाक घे कन्हैया ! बोल एकदा ॥३॥

भजन – ६२
हस एकदा तरी हस रे ! कुंजविहारी ! । त्या गोजिर्‍या रुपाची मज लागु दे तारी ॥धृ॥
कंठात वैजयंती, कानात कुंडले ती । शिरी मोरमुकुट झळके, किति केस कुरळ देती । किति गोड नेत्र हे, अधरी सुरस बांसरी ॥१॥
बघताचि तुझी वाट जिव हा, वेड्यापरी । बेचैन सदा राही, मन वृत्ति बावरी । दिसलास तसा बोल सख्या ! एकदा तरी ॥२॥
मन बावरे अता हे तव ध्यान सोडि ना । बस जन्मजन्मिचीही, ती हरलि कल्पना । तुकड्यास पदी घे आपुल्या, आस कर पुरी ॥३॥

भजन – ६३
मन बावरे तुझ्या विरहे, काही सुचेना । जिव घाबरी अती भ्रमरा-परिस, बसेना ॥धृ॥
‘असशी कुठे तू हरी ?’ ही चिंतना अती । ‘कुणि भेटवील का ?’ म्हणुनी भटकते मती ॥१॥
काशी नि द्वारका करुनी, तीर्थ फिरुनी । चारीहि धाम हे पहाता, ना दिसे कुणी । मनि शांति ना जरा दिसते, नेत्र फसेना ॥२॥
कुणि संत, साधुही वदती, जवळची हरी । पहा ज्ञान-दिवा लावुनिया, हृदय-मंदिरी । नच मार्ग मिळे हा दृढ या, व्हावया मना ॥३॥
ये भेटे सख्या ! पतितासी, रुक्मिणी-वरा ! तू सर्वसाक्षि हे कळले, तुजचि श्रीधरा ! तुकड्याची आस ही पुरवी, देइ दर्शना ॥४॥

भजन – ६४
कुणि सांगिता पता हरिच्या, गावि जावया । मन बावरे सदा फिरते, त्यासि पहावया ॥धृ॥
म्हणताति संतही देती, मार्ग दावुनी । इतुका करा उपकार, तया भेटवा कुणी । अर्पीन तुम्हापायि तनू, भेट घ्यावया ॥१॥
रानी वनी कुणी फिरती, लाभण्या रुपा । दरी-खोरी कुणी फिरती, लाभण्या रुपा । परि दूर हरि हा न दिसे, कष्ट करुनिया ॥२॥
कुणि सांगती जनी हरि हा, येई धावुनी । परि भक्त पाहिजे त्यासी, प्रेमभावनी । तुकड्यासि दया द्या इतुकी, लाभावा तया ॥३॥

भजन – ६५
हरी आठवा मनी अपुल्या, भाव धरोनी । सोडूचि नका त्यासि कधी, जागृति, स्वप्नी ॥धृ॥
संसार भूल सारी, हा भ्रमचि ओसरा । हरि ठेवितसे या जीवा, वागु द्या बरा । सुख-दुःख सोसवोनि सदा, ध्यास घ्या मनी ॥१॥
ध्यानि धरा हरी नयनी, अंतरंगि या । रमवा सदा तयासी जिवी, आळवोनिया । तुकड्या म्हणे मिळे प्रभु हा, येइ धावुनी ॥२॥

भजन – ६६
हरिभक्त लाडका हरिचा, ना दुजा कुणी । त्या मुक्त कराया येई, वैकुंठ सोडुनी ॥धृ॥
प्रल्हाद रक्षिला प्रभुने, वधुनि कश्यपू । दे मोक्ष गजेंद्रालागी, हटवुनी रिपु । पुरवीर चीर द्रौपदीला, रूप घेउनी ॥१॥
धरि लाज पांडवांचीहि रक्षिले तया । ध्रुव बाळ भक्ति करिता, त्या देत आश्रया । तुकड्या म्हणे हरी ध्या हो ! भक्ति करूनी ॥२॥

भजन – ६७
आवडली भक्ति आम्हा, हरिचीया पायिची । त्याविण ना सुख वाटे, या देहा अन्यची ॥धृ॥
तुटकीशी झोपडी ही गमते महालापरी । जव नांदे भक्ति-भावे, माझा तो श्रीहरी ॥१॥
कुंपण आणि बोरिबारी, गमतो हा बागची । तुळशीची दाट झाडी, शोभा ही स्वर्गिची ॥२॥
अम्हि हरिचे म्हणविताना, बहुमाना पावतो । ऎश्वर्य फोल सारे, त्याविण ते समजतो ॥३॥
जरि न मिळे अन्न खाया, ल्यायासी चिंधुडी । तुकड्याची रंगि रंगो, हरि-भक्ति चौघडी ॥४॥

भजन – ६८
मंजुळ हा नाद आला, हरिचीया बंसिचा । मनि गमले शोध घ्याया, आला तो आमुचा ॥धृ॥
त्या कळते सर्वभावे, अंतरिच्या ह्या खुणा । लपवोनी काय चाले, भानूच्या भानुना ॥१॥
तो दिसतो हा उभा या नेत्रांचे आतुनी । नाचतसे पाहुनीया, नामाची मोहनी ॥२॥
घन कांती फाकलीसे, निल अंगीचा झगा । मुकुटाचे तेज शोभे, किरणांना या बघा ॥३॥
अति जवळी येउनीया, हासतसे श्रीहरी । तुकड्याचा भाव प्रेमे, उसळी घे श्रीहरी ॥४॥

भजन – ६९
गुरु-बोधावाचुनीया, पथ नाही भुक्तिचा । बोधाने सुलभ होई, पथ प्रभुच्या भक्तिचा ॥धृ॥
विण भक्ती ज्ञान नोहे, प्रभुचीया सृष्टीचे । विण ज्ञाने व्यर्थ होते, कळणे हे व्यष्टीचे ॥१॥
जरि कळले देह-धर्मे, कळणेची ते नव्हे । जरि वळले एकपोटा, वळणेची हे नव्हे ॥२॥
म्हणुनीया संत गाती, गुरु-भक्ती सर्वदा । तुकड्याची हाक तेची, गुरु शोधावा सुदा ॥३॥

भजन – ७०
सुख दिसले डोळियाने, सांगो मी त्या खुणा । मज वाटे सुख नाही, हरी-भक्तीच्या विना ॥धृ॥
जरि द्रव्या साचवीले, परि चिंता पावते । भीतीने पाठि-पोटी, नच शांती लाभते ॥१॥
जरि घरचे भाग्य लाभे, स्त्री-सुखही मोहके । तरि मृत्यूच्या भयाने, दुःख होते दाहके ॥२॥
जरि स्त्री-धन दोन्हि लाभे, सौख्याच्या वाटणी । परि पुत्र ना तयासी, झुरती त्यावाचुनी ॥३॥
जगतीची वैभवे ही, लंगडी बा ! नाशती । तुकड्याची हाक घ्या ही, प्रभु-स्मरणी द्या मती ॥४॥

भजन – ७१
येशिल ना शेवती तू, गुरुराया ! धावुनी । जव नेती ओढुनीया, मम प्राणा काढुनी ॥धृ॥
मरण्याचे संकटाला, नच कोणी आपुले । देशिल ना साथ तै तू, शिरि धरुनी कर भले ॥१॥
जन म्हणती-‘लवकरी या, काढा ना आतुनी’ । मग रचती ना चिता या, देहासी निजवुनी ॥२॥
कुणि म्हणती-‘ठीक झाले, काळाने ओढला’ । म्हणशील ना-‘मीच नेला, माझा हा तान्हुला’ ॥३॥
तुकड्याची प्रेम-भक्ती, भोळी चहुबाजुंनी । परि अंती ध्यान लागो, तव स्मरणी रंगुनी ॥४॥

भजन – ७२
श्रीहरिच्या प्रेमळांनो ! घ्या पदरी बालका । जरि पापी भ्रष्ट कर्मी, अज्ञानी होइ का ॥धृ॥
प्रभु तुमच्या ओळखीने, दीनासी भेटतो । तुमचीया एक बोले, कार्यासी कष्टतो ॥१॥
अति चिंता लागलीसे, जिवाभावापासुनी । प्रभु भेटो, रूप दावो, ही आशा मन्मनी ॥२॥
नच डोळे त्याविना हे, राहताती शांतसे । तुकड्याची हाक घ्या हो ! मज काही ना सुचे ॥३॥

भजन – ७३
मंजुळ हा नाद आला, कोठोनी बंसिचा । पहायासी कृष्ण ! झाला जिव वेडा आमुचा ॥धृ॥
कुणि सांगा मार्गियांनो ! दिसला तो का कुणा ? त्याविण या लोकि झालो, दुबळासा मी सुना ॥१॥
दचकोनी उठविताना, स्वप्नचिसा भेटला । झणि पाहो परि न भासे, ऎसा का करि भला ? ॥२॥
अजुनी ना विसरला तो, खेळवणे आपुले । अम्हि दुःखी बहुत त्याने, का ना हे जाणले ? ॥३॥
मज वाटे भेट द्याया, लपुनी तो येतसे । तुकड्याची हाक कानी, लांबुनिया घेतसे ॥४॥

भजन – ७४
रमशील ना हरी ! तू भक्तिच्या सुमंदिरी । तुज कमल-दली, नेत्रांजलि, न्हाणि अंतरी ॥धृ॥
ही भाव-भक्तिची सुमने, माळ वाहि मी । बहु सत्वशील वृत्ति तुझ्या, पाऊली धरी ॥१॥
पद-पूजना करूनि, दीप ‘सोहं’ जाळुनी । तुज वरुनि फिरविताच ‘मी-तू’ भाव हा हरी ॥२॥
हे उरु न देइ देह-धर्म, आपुलेपणा । तुकड्याचि हाक घे सख्या ! ही आस कर पुरी ॥३॥

भजन – ७५
मशि बोल तरी बोल जरा, रुक्मिणी-वरा ! मन रंगु दे पदरी घे सख्या ! दीन-उध्दरा ! ॥धृ॥
भव-दुःख हे अती कठीण, पार ना मिळे । तव भक्तिसुखे चित्त सख्या ! सुखवु दे वरा ॥१॥
अति ज्वाल षडविकार महा, अग्निच्य परी । मज ओढतील क्षण न तुझी, दृष्टि श्रीधरा ! ॥२॥
जनि पाहता तुझ्याविणे, नच शांति ये जिवा । बघु सांग तरी काय कुठे, कुणाचिया घरा ? ॥३॥
नच तीर्थ शांति दे, न मंदिरे, मढी कुणी । तुकड्याचि हाक घेइ, भेटि देइ पामरा ॥४॥

भजन – ७६
गुरु येउनी मज भेटला, नि ‘भक्ति कर’ म्हणे । ‘विसरूच नको श्रीहरी, अति प्रेम धर’ म्हणे ॥धृ॥
‘अति लीन वाग लोकि या, परलोक साधण्या । जे दुष्ट लोक त्यांची, संगतीच हर’ म्हणे ॥१॥
‘नच एक क्षणही खोवी, निंदनी कुणाचिया । मन शुध्द करी, द्रोह-कपट सर्व हर’ म्हणे ॥२॥
‘दिसताति सर्व जीव, प्रेम भरुनि पाहि त्या । प्रभुची सखा जनी-वनी हा, भाव धर’ म्हणे ॥३॥
‘नीती नि न्याय ठेवुनी, संसारि वाग तू’ । तुकड्यास सदा ‘सत्यप्राप्ति, हाचि वर’ म्हणे ॥४॥

भजन – ७७
कुणि येउनि मज वेड तुझे, लाविले हरी ! । नव्हतीच अशी मोहनी, तुझी मनावरी ॥धृ॥
काम-धाम नाठवते, मार्गि चालता । पाहु कुठे तुजसि ? गमे, अंतरी वरी ॥१॥
बोलता कुणाशि याद ये, तुझी झणीं । वेडियापरीच पाहती, मला तरी ॥२॥
झोप नाहि नेत्रि, जाग नाहि जागता । कार्य साधता न कार्य, वाटते करी ॥३॥
रंग एकसा, निशेपरीच वाटतो । तुकड्याची वेळ ही, अशीच राखजो तरी ॥४॥

भजन – ७८
मज वेडिया पहाताच, तुम्हा वेड लागु द्या । बिघडा असेच भक्तिसी नि वृत्ति जागु द्या ॥धृ॥
हे ऎकता जसे मनी तसेच राहु द्या । मग वागुनी जनी, वनी, जिवासि रंगु द्या ॥१॥
मजहुनि अधीक थोर थोर, जन्म पावु द्या । जरि आज भासती तरी, अधीक वाढु द्या ॥२॥
हरिभक्त होउ द्या नि पाप-मुक्त होउ द्या । मज लोपवोनि अधिक तेज, लोकि सेवु द्या ॥३॥
तुकड्याचि आस येवढीच पूर्ण होउ द्या । मिटवोनि द्रोह-बुध्दि, लोकि प्रेम वाहु द्या ॥४॥

भजन – ७९
नवल वानु मी किती गुरुचे ? नवल वानु० ॥धृ॥ दुःसंगाने भ्रमलो आम्ही, त्यांनी दिली सुमती ॥१॥
अंधाराते दावुनि बोधे, लावि प्रकाशा-पथी ॥२॥
जग हे भ्रमबाजारी भुलले, विसले तव निश्चिती ॥३॥
तुकड्यादास म्हणे निज ओळख, दावित सत्संगती ॥४॥

भजन – ८०
कर आपुला गुरु सगा, गड्या रे ! कर अपुला० ॥धृ॥
सद्गुरुज्ञानाविण सुख नाही, का भ्रमलासी उगा ? ॥१॥
चलतीचे जगि सगे-सोयरे, शेवटि देतिल दगा ॥२॥
गुरु-भजनाचे अंजन घालुनि, दुर कर माया-ढगा ॥३॥
तुकड्यादास म्हणे नित नेमे, विसरु नको लक्ष्य गा ॥४॥

भजन – ८१
सद्गुरु अपुला सखा, गडे हो ! सद्गुरु अपुला० ॥धृ॥
निर्मोही, निर्भयी निरंतर, मार्ग दावि भाविका ॥१॥
अजर, अमर हा आत्मा साक्षी, होउ न दे पारखा ॥२॥
निज स्वरुपाचा बोध दावुनी, दूर करी यम-दुखा ॥३॥
तुकड्यादास म्हणे या या रे ! तिळभरि विसरू नका ॥४॥

भजन – ८२
मशि बोल सख्या घननीळा रे ! ॥धृ॥
तव बोले मन उन्मत होते, लागे निजरुपि डोळा रे ! ॥१॥
निर्मळ रुप तव विमल सुदर्शन, दूर करी कळिकळा रे ! ॥२॥
मोरमुकुट पीतांबर शोभे, गळा वैजयंति माळा रे ! ॥३॥
तुकड्यादास म्हणे तव बोले, नाशे विषय-उमाळा रे ! ॥४॥

भजन – ८३
मी पाहि तसा रुप धरशिल ना ? मज पावन तू हरि करशिल ना ? मी पाहता तुज तू दिसशिल ना ? मी हासता तू हरि ! हसशिल ना ? (अंतरा) सुंदर वनि वेलांच्या तळुनी । झुळझुळ नदि वाहे वळवळुनी । गर्द तरू हिरवळले मिळुनी । अधरि बंसि तू धरशिल ना ? ध्वनि मधुर कर्णि तू भरशिल ना ? ॥१॥
(अंतरा) मयुर-पिसारा मुकुटावरती । कांबळ खांदी, उरि वैजंती। कुंडल-शोभा झळके खुलती । मन्मंदिरि तू स्थिरशिल ना ? ह्या प्रेम-सुखी उध्दरशिल ना ? ॥२॥
(अंतरा) एकांताच्या हृदयाकाशी । मी पाहिन तव श्याम रुपासी । आळवीन तुज मग हृषिकेशी ! देह-भाव मग हरशिल ना ? मज तव स्वरुपी लिन करशिल ना ? ॥३॥
(अंतरा) नित्य असा मी करि अभ्यासा । स्फूर्ति सदा देशिल ना दासा ? । नाकरि हरि ! मम आस हताशा । कृपा-हस्त शिरि धरशिल ना ? हा तुकड्या अपुला करशिल ना ? ॥४॥

भजन – ८४
कुणि भावबळे आणा हरिला । कुणि प्रेमबळे आणा हरिला ॥धृ॥
ना कळतो तो यम-नियमांनी, ना कळतो तप साधुनिया । ना कळतो वनि जप करण्याने, भक्तीने वश होय भला ॥१॥
कठिण मार्ग हा असाध्य बहुता, योग-याग-विधि-प्रणवाचा । साध्य होय प्रभु गोड गाउनी, जैसा द्रौपदिला झाला ॥२॥
कृत-त्रेता-द्वापारी बघता, कठिण मार्ग वेदे वदला । ‘कलीयुगी प्रभु नाम-बळाने, वश होई’ संती कथिला ॥३॥
तुकड्यादास म्हणे आला हरि, भारतभू ही बघण्याला । म्हणा ‘धर्म हा जात लया, प्रभु ! का ऎसा निष्ठुर झाला ?’ ॥४॥

भजन – ८५
हरिनाम मधुर मनि गाइ सदा । गुरुवचनी निर्भय राहि सदा ॥धृ॥
सोडुनिय ही विषय-चिंतना, माया-मोह-विकाराची । सद्‍ विचार मनि वाहि सदा, गुरु-वचनी० ॥१॥
‘अखिल जगाचा चालक तो प्रभु’, भाव असा दृढ ठेवुनिया । ममतेने जग पाहि सदा, गुरु-वचनी० ॥२॥
असत्यता ही नष्ट करोनी, नीतीने संसार करी । जन-सेवा-श्रम साहि सदा, गुरु-वचनी० ॥३॥
तुकड्यादास म्हणे, इहपर घे गोड करुनिया या देही । आत्म्याची घे ग्वाही सद, गुरु-वचनी० ॥४॥

भजन – ८६
मन चौर्‍यांशी फिरवीते हे । मन मोक्ष-सुखाला नेते हे ॥धृ॥
ऎक गड्या ! मन पवित्र कर हे, संतसमागम करुनीया । नाहि तरी जाशिल वाया, मन विषय-चिंतना देते हे ॥१॥
सद्ग्रंथांचे पठन करी, अभ्यास करी मन स्थिरण्याला । चिंतावा मुरलीवाला, मन अनन्यभक्ती घेते हे ॥२॥
तुकड्यादास म्हणे ही वेळा, मिळते काय पुन्हा बापा ! । चुकवी चौर्‍यांशी खेपा, मन जे करशी ते देते हे ॥३॥

भजन – ८७
श्रीगुरुराज धरि हृदयी, भय हरेल या संसाराचे ॥धृ॥
भ्रम-बाजारी जीव धडपडे, काहि कळेना मार्ग तया । सत्-संगतिचा लाभ मिळे जव, होइ ज्ञान उध्दाराचे ॥१॥
कठिण प्रसंगचि ओढवती तव, वाढत चिंतारोग सदा । ज्ञान होय जव श्रीगुरु-बोधे, पाश जळति कुविचारांचे ॥२॥
अन्य नसे कुणि मार्ग जगी या, मोक्षपदाला जायासी । सत्संगतिने कळते, वळते, पट उघडति हरि-द्वाराचे ॥३॥
तुकड्यादास म्हणे निर्भय हो, जाउनिया गुरु-चरणाशी । ओळख ‘मी तो कोण, कोठचा ?’, मार्ग कळति सुविचारांचे ॥४॥

भजन – ८८
श्रीहरि-ध्यान धरि हृदयी, जा जिवा ! सुखद हा मार्ग तुला ॥धृ॥
सांगति संत-महंत सदा हे, शास्त्र-पुराण-श्रृती-वचने । ‘नामजपाविण शांति न लाभे. धर धावुनिया पदयुगुला’ ॥१॥
योगयागविधि कठिण तपस्या, साधति काय कुणास अता ? । चंचल मन हे फिरतचि राहे, भृंग जसा घे मोद फुला ॥२॥
तुकड्यादास म्हणे हो पावन, नामस्मरण करुनि भावे । वेळ पुन्हा ही न मिळे ऎसी, साधुनि घे हा जन्म भला ॥३॥

भजन – ८९
हरिगुण गात राहि मना ! जा चुकेल भव-संकट सारे ॥धृ॥
विषय सेविता कोण निवाला ? सांग तरी जगतात असा । राव, रंक जग सोडुनि गेले, कीर्ति न ती तिळमात्र उरे ॥१॥
भक्ति ‘सुखाविण शांति न पावे’, अनुभव गाती संत असे । जा सद्गुरुला पूस गड्या ! मग मन बोधे जागीच मुरे ॥२॥
तुकड्यादास म्हणे सावध हो, शोध करी हृदयी अपुल्या । नरजन्माची दुर्लभ वेळा, दवडु नको विषयी बा रे ! ॥३॥

भजन – ९०
स्मर हरिनाम मनि मनुजा ! याविणा न गति कवणासि मिळे ॥धृ॥
दुर्लभ हा नरदेह सुखास्तव, अवचित तुज दिधला देवे । नश्वर सुख घेता गमाविशि मग, यमदंडा पाठीच फळे ॥१॥
सार्थक घे करुनी नरदेही, वेळ पुन्हा ऎसी नाही । चाख गुरूबोधामृत हृदयी, सुख तुझे तुजलाचि कळे ॥२॥
तुकड्यादास म्हणे समजी गुज ! वर्म कळुनि घे गुरु-वचने । वाग तयासी जगति गड्या ! मग देव सखा होऊनि वळे ॥३॥

भजन – ९१
धरी निर्धार गुरु वचनी, भय हरेल या संसाराचे ॥धृ॥
ज्ञानामृत अंजन त्या नेत्री, नाशे पडळचि मोहाचे । षडविकार अंतरिचे नासुनि, प्रेम मिळे परमार्थाचे ॥१॥
गुरु-वचनी विश्वास धरूनी, किति तरले, तरती जगती । देव-ऋषी गुरुच्याचि प्रसादे, भव तरले निर्भयि साचे ॥२॥
तुकड्यादास म्हणे गुरुज्ञाने, प्रभुचे रुप हृदयीच मिळे । जळेल तम-अज्ञान मतीचे, मन रंगी हरिच्या नाचे ॥३॥

भजन – ९२
झणि आला हा घनश्याम, गमे हा भास जिवा ॥धृ॥
झुणु झुणु वाजति भूवरी पर्णे, कोकिळ गाती हर्षभराने । मयुर नाचती अति प्रेमाने, मन घेइल हे विश्राम । गमे हा० ॥१॥
नीलवर्ण आकाशी उठला, वाटे हरि गरुडावरि आला । झू-झू ध्वनि कर्णी आदळला, वाटली बंसिची तान । गमे हा० ॥२॥
किरण मंद पिंगटसे उठले, मंद मंद वायू हा चाले । झिलमिल पाणी सुरू जाहले, झाले इंद्रिय एकतान । गमे हा० ॥३॥
गर्व तरूवर हलती सगळे, ऎकति पशु काननिचे चाळे । तुकड्यादास म्हणे गोपाळे, उरि भेटतसे बेफाम । गमे हा० ॥४॥

भजन – ९३
मना वाटे, हरी ध्यावा कि गुरुचे पाय वंदावे ? । कोण ते श्रेष्ठ जाणोनी, शरण आधी कुणा जावे ? ॥धृ॥
प्रभू हा बोलिला शास्त्री, ‘शरण जा माझिया भक्ता’ । देव आणि भक्त हे दोघे द्वैत हे केवि मानावे ? ॥१॥
भिन्न मानू नये त्यांना, जये प्रभु दाविला सत्ते । धन्यता संतसेवेची, किती उपकार वानावे ? ॥२॥
देव मानी तया भक्ता, भक्त देवा सदा ध्याती । कळेना गुह्य हे त्यांचे, कुणा सरसावुनी घ्यावे ? ॥३॥
निभविली आस तुकड्याची, गुरूने देव दावोनी । तया मी श्रेष्ठ मानावे, मने हे घेतले भावे ॥४॥

भजन – ९४
प्रपंचहि का असा व्हावा ? जिथे हरिचे नसे नाम । कृपाळू श्रीहरीने हो ! दिले नरकायि शुभ काम ॥धृ॥
मनाची धाव ती सगळी विषय-भोगतची लोळे । कुठे करतील तप भोळे ? नसे एका मुखी ‘राम’ ॥१॥
मनी घरदार हे खळे, म्हणे ‘कोठे गडी सगळे ?’ । सदा धन-संपत्ती लोळे, पहाया वाढला नेम ॥२॥
‘मला हे द्या, मला हे द्या, मला द्या सर्व घरदार । बुडविले यातची थोर, कशाचा तो पुढे श्याम ? ॥३॥
प्रपंच लावुनी आस, स्व-घरचा सोडला ध्यास । म्हणे तुकड्या तया नाश, कधी ना भेटतो राम ॥४॥

भजन – ९५
चला हो ! पंढरी जाऊ, जिवाच्या जिवलगा पाहू । भीवरे स्नान करुनीया, संत-पद-धूळ शिरि लावू ॥धृ॥
बोधरुप तुळशिच्या माळी, श्रवण-मणि चंदनहि भाळी । करू मननाचिया चिपळी, निजध्यासे हरी गाऊ ॥१॥
आत्मरुप-देव बघताना, हरे मन-भावना नाना । प्रकाशे ज्ञानदिप सदना, सोहळा डोळिया दावू ॥२॥
विठू सर्वत्र घनदाट, पंढरी विश्विची पेठ । दुजा नाहीच वैकुंठ, सदा येथेचि दृढ राहू ॥३॥
न मरणे, जन्मणे आम्हा, न भेदाभेदही कामा । म्हणे तुकड्या घनश्यामा-पदांबुजि शीर हे वाहू ॥४॥

भजन – ९६
काळ प्रभु-चिंतनी जावा, जिवाला वाटते ऎसे । दुःख हे मोहपाशाचे, अता तिळमात्र ना सोसे ॥धृ॥
क्षणक्षण काळ हा टपला, लिहाया कर्म जे केले । चुकेना भोग कोणाला, करू जैसे भरू तैसे ॥१॥
स्वार्थि हे लोक अवघेची, न कोणी साथ दे अंती । न कामी देह-इंद्रिय हे, न लागू याचिये कासे ॥२॥
सखा जो पंढरी-राणा, जिवाचा एक कनवाळू । भजू त्यासी मनोभावे, यथामति जाणतो जैसे ॥३॥
म्हणे तुकड्या जगाची ही, उपाधी घात करणारी । कळो आले अता सगळे, न कोणी यात संतोषे ॥४॥

भजन – ९७
मना रे ! नाम जप हरिचे, सुखाचे घोस लाभाया । भटकशी कां विषय-मार्गी ? अधिकसे दुःख भोगाया ॥धृ॥
कुणी सत् प्रेम धरुनीया, हरीच्या ध्यानि रत होती । मिळे साम्राज्य मोक्षाचे, परी ना सोडि हरि-पाया ॥१॥
भक्तिच्या सुख-स्वातंत्र्यी, मोक्षही तुच्छ संतासी । अनुभवा घेउनी पाहे, भजुनिया पंढरीराया ॥२॥
म्हणे तुकड्या ऊठ वेगे, साध सत्संगती आधी । प्राप्त कर मार्ग प्रेमाचा. दुरावुनि संशयी माया ॥३॥

भजन – ९८
कुणाचा धाक बाळगुनी, आपुला धर्मे त्यजता का ? । नीति ही सोडुनी सारी, प्राण परक्यासी विकता का ? ॥धृ॥
आठवा बाळ अज्ञानी, गुरु गोविंदसिंहाचे । पुरवि भिंतीमधी त्यांना, न सोडी धर्म तरि ते का ? ॥१॥
सोडता धर्म जरी संभा , न उंचचि राहती डोकी । मर्द हा मरती गळ फासे, न दुसर्‍यासी म्हणे ‘काका’ ॥२॥
धर्म तो शिकवितो सकळा, अमर हा अंतरी आत्मा । मराया का भिता ऎसे ? ना तरी देह राहिल का ? ॥३॥
बाळगा धाक देवाचा, जरी पापे करी कोणी । आपुल्या सुखस्वातंत्र्या, म्हणे तुकड्या विसरता का ? ॥४॥

भजन – ९९
कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का अम्हावरती ? सुखी नच तिळभरी जनता, विपत्तीची अती भरती ॥धृ॥
न कोणी वीर हे धजती, रक्षण्या दीन लोकांसी । लूटती चोर मनमाने, न त्यांना ये दया खंती ॥१॥
मने नास्तीक ही झाली, प्रभूची यादही गेली । बोलती आपुल्या बोली, अभिमाने सुख फिरती ॥२॥
मिळेना अन्न कोणाला, कुणी धन सांचुनी ठेवी । प्रेम स्वार्थाविना कोठे, कुणाचे ना कुणावरती ॥३॥
न साधू बोध दे कोणा, मौन धरि बघुनि पापासी । तो तुकड्यादास सांगतसे, तुझ्याविण ना मिटे भ्रांती ॥४॥

भजन – १००
हरीच्या नाम-स्मरणाने, हरीचे तेज ये अंगी । मनाची दुष्टना नाशे, रमे मनही हरी-रंगी ॥धृ॥
मान-अभिमान टाकोनी, कुणी हरिनाम घे वाचे । तयासह नाचतो हसतो, हरी करि दास्य निःसंगी ॥१॥
हरीसी जाणुनी कोणी, हरीचे ध्यान धरि चित्ती । प्रकाशे तेज हृदयी त्या, लखलखे ब्रह्म सत्संगी ॥२॥
हरी म्हणता हरी होतो, हरी-रुपि साठुनी जातो । तो तुकड्यादास सांगतसे, तयाचे सुख ना भंगी ॥३॥

भजन – १०१
कठिण ही वेळ प्रभुराया ! आणली का अम्हावरती ? सुखी नच तिळभरी जनता, विपत्तीची अती भरती ॥धृ॥
न कोणी वेर हे धजती, रक्षण्या दीन लोकांसी । लूटती चोर मनमाने, न त्यांना ये दया खंती ॥१॥
मने नास्तीक ही झाली, प्रभूची यादही गेली । बोलती आपुल्या बोली, अभिमाने सुखे फिरती ॥२॥
संतही सांगती ऎसे, पुराणे गर्जती ऎसे । अनुभवा सांगती ऎसे, धडपडी व्यर्थ का धरिशी ? ॥३॥
धरी सत्संगती जाई, मने मनि उन्मनी लावी । तो तुकड्यादास दे ग्वाही, सुखी मग तू स्वये होशी ॥४॥

भजन – १०२
उणा पाहशील दुसर्‍याला, उणीवेने उणा होशी । समजशी पूर्णता सगळी, अमर सुख अनुभवा घेशी ॥धृ॥
न जग हे तिळ उणीवेचे, असे भरले सुखत्वाचे । प्रभू नटुनीच जग साचे, पाहतो मौज ही खाशी ॥१॥
कुठे तो वृक्ष होऊनी, पाहतो शांतता अपुली । कुथे नदिच्या प्रवाही हा, राहुनी तृप्ति दे त्यासी ॥२॥
कुठे होऊनिया राजा, प्रजेला सूख दे सगळ्या । कुथे होऊनि अतिदीन, मागतो भीक जनतेसी ॥३॥
सर्व हा देवची नटला, जाणुनी अनुभवा घेणे । तो तुकड्यादास सांगतसे, भागवति रीत ही ऎसी ॥४॥

भजन – १०३
नसावा लोभ दुष्टांचा, मित्र जरि जाहला अपुला । असावा प्रेम थोरांचा, वैरि जरि भासला अपुला ॥धृ॥
कुणि अति प्रेम दावोनी, कापताती गळा वेळी । फसे हा जीव त्या योगे, नासतो जन्म हा अपुला ॥१॥
कुणी अति वैरही दावी, आपुले सार्थकासाठी । परी तो वेळ साधोनी, कामी ये थोर तो आपुला ॥२॥
धरावा संग ऎशाचा, जिवासी सत्यता लाभे । म्हणे तुकड्या हरी-भजने, सुसंगी मोक्ष हा अपुला ॥३॥

भजन – १०४
धर्म कसला गुलामांना ? खेळ हा पोरखेळांचा ॥धृ॥ आज जी देवळे बघतो, उद्या त्या मसजिदी होती । कधी त्या चर्चची बनती, न उरला नेमची त्यांचा ॥१॥
दुजाच्या सांगणी वागे, कशाची भक्ति मग जागे ? न साधे धर्म या योगे, कळे हा भावची साचा ॥२॥
तुम्ही बोला तसे वागू, परी अम्हि धर्मची सांगू । देह हा जाहला पंगू, न उरला लेश शक्तीचा ॥३॥
न एका निश्चयी लागे, फिरे दुजियाचिया मागे । तो तुकड्यादास हे सांगे, बिघडला मार्गची त्याचा ॥४॥

भजन – १०५
शिकविते ज्ञान का गीता, बना हो सर्व संन्यासी ? । सोडुनी धर्म हे सारे, घरामधि झोप घ्या खाशी ॥धृ॥
वाहवा ! अर्थ करणारे, आणि लोकांसि वदणारे । भ्याडपण लावुनी सारे, राष्ट्र हे लावले फाशी ॥१॥
वीरांना भक्ति लावूनी, टाळ देऊनिया हाती । पिटविले टाळके त्यांचे, बनवुनी दास आणि दासी ॥२॥
अर्थ या भक्ति-ज्ञानाचा, असा नाहीच कोठेही । मेलियापरि जगी रहावे, वाढवोनी उरी खासी ॥३॥
गिता हे सांगते सर्वा, ‘लढा अन्याय-प्रतिकारा, । ‘प्रभू हा साथ दे सर्वा, धर्म हा श्रेष्ठ सर्वासी’ ॥४॥
म्हणे तुकड्या ‘अहंकारा न धरता मर्द व्हा सारे । गाजवा धर्म सत्याचा, जगाचा भारतीयासी’ ॥५॥

भजन – १०६
कठिण मन का हरी ! केले, नसे का तुज दया थोडी ? तुझ्याविण अखिल या जगती, कोण आम्हासि रे ! जोडी ? ॥धृ॥
अशाश्वत दृश्य हे सगळे, कधी दिसते, कधी नसते । राहते नी किती जाते, साथ हा घाट मम सोडी ॥१॥
स्वार्थि या लोकिचे गाणे, प्रेमही स्वार्थिचे जाणे । कळेना कोण हे जीणे ? कुठे वाढे, कुठे मोडी ? ॥२॥
अनुभवे पाहता जगती, न काही सत्यसे दिसते । प्रभू ! तूची खरा असशी, म्हणुनि ही गर्जना फोडी ॥३॥
पदरि घे दास-तुकड्याला, उरु न दे देह-भावाला । रंग तव लाव जीवाला, देह तुजवरुनि कुरवंडी ॥४॥

भजन – १०७
टिकेना मोह कोणाचा, मनी का लोभ हा धरिशी । उगिच पापे करुनिया ही, जिवाला कष्टमय करिशी ॥धृ॥
किती राजे, महाराजे, होउनी जाति नी येती । न कोणी साथ दे काही, तूच का या भ्रमी मरशी ? ॥१॥
कांचनाची पुरी शोभे, रत्नमय रावणाची ती । ढसळता रीत कर्माची, न उरली कौडि ही सरशी ॥२॥
अती लोभे, अती पापे, कंस हा मातला होता । प्रभु धावोनिया त्याची, राख केली गृहासरसी ॥३॥
अरे ! जे शोभते तेची, करावे जीव-उध्दारा । सांगतो दास तुकड्या हा, प्रभू स्मर सत्य तू सरशी ॥४॥

भजन – १०८
भुलु नका हो ! चमत्कारा, जगी ही थापची सारी । लूटती भोंदु अपणाते, दावुनी थोरवी भारी ॥धृ॥
संत जरि पुत्र हे देती, न मरते लोक पृथ्वीचे । निकामी स्वार्थि जन भलत्या, रडोनी सांगती थोरी ॥१॥
कावरे लोभि जे असती, भ्रष्ट होती तयाच्याने । न सुचते ज्ञान हे त्यांना, मिरविती भोंदुची थोरी ॥२॥
ठेवुनी साक्ष ‘ज्ञानोबा’, म्हणे ती भीत चालविली । कळेना वर्म संतांचे, वाहती मार्गि काटेरी ॥३॥
चमत्कारेच संतांची, परिक्षा होत जरि असती । गारुडी काय ना करिती ? लावती बाग आंबेरी ॥४॥
संत तोची जगी जाणा, जयाचे विषय हरि झाले । म्हणे तुकड्या निजज्ञाने, बोधुनिया जना तारी ॥५॥

भजन – १०९
अहो ! पळता कुठे आता ? घराशी आग ही आली । लागला ज्वाळ हृदयाला, वेळही कायशी उरली ? ॥धृ॥
गमे हा मार्ग हिंदुंचा, बिघडला लोपता झाला । पाहती तोंड दुसर्‍याचे, सोडुनी नीति ही अपुली ॥१॥
कुणी त्या चर्चला जाती, कुणी पुजताती पीराला । आपुली सोडुनी नीती, हिंदुची भ्रष्ट मति झाली ॥२॥
न यांना धर्मही कळतो, समाजी देह ना वळतो । न ठावे राजकारण ते, गती अधरापरी झाली ॥३॥
कारणही व्हावया ऎसे, एकची वाटते मजला । पारतंत्र्यी भरत-भू ही, आपुली माउली पडली ॥४॥
करा हो एकमेकांना. संघटित प्रेम लावूनी । जागवा राष्ट्र-भक्ती ही, म्हणे तुकड्या त्यजा भूली ॥५॥

भजन – ११०
सुखाचा दिवस तै आला, कि जेव्हा भिन्नता गेली । बुध्दिच्या पूर्ण भावाची, विलिनता रामरुपि झाली ॥धृ॥
न अपुली वाटली काया, न जनता जिवपणे स्फुरली । रामराय विश्वची सारे कि, प्रभु-माया खरी नटली ॥१॥
निसर्गे बागही फुलली, निसर्गानेच सुखि झाली ॥२॥
न काही कामना उरली, धर्मे-कर्मे उठाठेवी । म्हणे तुकड्या गार जैसी, जली दिसली तशी मुरली ॥३॥

भजन – १११
मराठे शूर-वीरांनो ! निकामा स्वस्थ का बसला ? धैर्यबल खोवुनी सगळे, भिकारी दास कां झाला ? ॥धृ॥
बघा इतिहास थोडासा, आपुल्या वाडवडिलांचा । शिवाजी ‘शिवबा’ म्हणवताना, रायगडि छत्रपति झाला ॥१॥
कधी शिवला न भीतीला, रंगला राजनीतीला । म्हणे ‘दंडीन दुष्टाला, वाकविन थोर जरि असला’ ॥२॥
गर्जला सिंह जणु धावे, मिळविला तोरणा किल्ला । राष्ट्रीचे दास्य खंडुनी, सुखी केले जना सकला ॥३॥
शोभते का तुम्हा ऎसे, तयाचे वंश म्हणवोनी ? । प्राण द्या राष्ट्र-सेवेला, भितीने भ्याड का झाला ? ॥४॥
अहो ! मरणे अणी जगणे, दोन्हिही सारखे अपणा । ती तुकड्यादास सांगतसे, चमकुनी प्राण द्या अपुला ॥५॥

भजन – ११२
कसा हरि ! स्वस्थ तू आता ? वेळ ही काय उरलीसे ? । राहिला धर्म किती ऎसा, तुला का याद नुरलीसे ? ॥धृ॥
जनाची वृत्ति बहिरोनी, पुरी नास्तीकता आली । न कुणि पुसताति कोणाला, प्रेम-मायाच हरलीसे ॥१॥
न साधू लक्ष दे धर्मा, न पंडित सांगती वर्मा । स्वार्थता भासते सगळी, दयेची वाट सरलीसे ॥२॥
अशी ही अवदशा आता, कोठवरि ठेविशी देवा ! । हाक घे दास तुकड्याची, वासना हीच धरलीसे ॥३॥

भजन – ११३
प्रभू ! हा खेळ दुनियेचा, कशाला सांग केलासी ? ॥धृ॥
कुणाला भाग्य देवोनी, बसविले मंचकावरती । कुणी किति कष्ट जरि केले, तरी राहतात उपवासी ॥१॥
कुणाला झोपडी नाही, रहाया तिळभरी कोठे । तया मुल-बाळ बहु देशी, मजा बहु लांबुनी बघशी ॥२॥
कुणी करताति नवसाला, करोडो द्रव्य देवोनी । न देशी पुत्र एखादा, असा का भेद तुजपाशी ? ॥३॥
कुठे हे दे, कुठे ते दे, न देशी सर्व कोणाला । सुखास्तव झुरती सारे, कळेना मार्ग कोणासी ॥४॥
म्हणे तुकड्या तुझी लीला, पहाता वेद मौनावे । दीन अम्हि काय सांगावे, तुझी माया असे कैसी ? ॥५॥

भजन – ११४
जगाचा मोह ना सोडी, कसा होशील रे ! साधू ? ॥धृ॥ बहु लोकेषणा मागे, न मिळतो वेळ ध्यानासी । खोवुनी वेळ ही ऎसी, कसा होशील रे ! साधू ? ॥१॥
इंद्रिये स्वैर चहू देशी, विषय भोगावयासाठी । लावुनी पाश हा पाठी, कसा होशील रे ! साधू ? ॥२॥
फसविती वासना सगळ्या, जगाच्या सौख्य-मोहाने । न वृत्ती स्थीर करिशी तू, कसा होशील रे ! साधू ? ॥३॥
म्हणे तुकड्या गृहस्थी हो, करी संसार नीतीने । जराशा पोट-भीतीने, कसा होशील रे ! साधू ? ॥४॥

भजन – ११५
मना रे ! ध्यास धर हरिचा, विसरुनी लक्ष्य विषयाचे ॥धृ॥
प्रपंची कोण सुखि झाला ? न दिसला, एकिला ऎसा । जयाने राम वश केला, वंदिती पाय जन त्याचे ॥१॥
विषय हे नाडिती देहा, नि आयूही फुकी धाडी । प्रभु-सुख घे जीवी धरुनी, न भय मग जन्म-मरणाचे ॥२॥
म्हणे तुकड्या धरी नेमा, स्मराया श्रीहरी-नामा । नामची नेइ निजधामा, न इतरे कोणि कामाचे ॥३॥

भजन – ११६
फोल ते संत आम्हासी, वागण्यावीण जे ज्ञानी । मुखे करि ब्रह्म-चर्चेला, पळे इंद्रीय अडरानी ॥धृ॥
‘तयाविधि-नेम-ना’ म्हणती, जरी चालोत ते कुरिती । शक्य हे होईना संता- ‘कधी करतील मनमानी’ ॥१॥
तयांना कर्म ना उरले, तरी ते जगति का उरले ? । भोगण्या भोग देहाचा, होतसे पाप का कळुनी ? ॥२॥
जगाच्या पाप-पुण्याची, जरी ना कल्पना त्यांना । खाति आणि राहती कैसे, चटुरे माल खावोनी ? ॥३॥
बुडविला धर्मची त्यांनी, भोंदुना वाव देवोनी । संत ना राहती ऎसे, सारिही ढोंगमय करणी ॥४॥
संत ते मानतो आम्ही, राहती संगती तैसे । तो तुकड्यादास सांगतसे, न इतरा ठाव द्या कोणी ॥५॥

भजन -११७
उभा का मंदिरी रामा ! पहा बाहेर येवोनी । गर्जती भक्त तव दारी, जरा तरि ऎक बा ! कर्णी ॥धृ॥
दुष्ट संहारण्याकरिता, तुझा अवतार तो होता । अता का जानकीनाथा ! दिसेना भूवरी कोणी ? ॥१॥
कितीतरि त्रास भक्तांना, कुणाला हाल बघवेना । मिळेना अन्न पोटाला, किती मरती दुखे प्राणी ॥२॥
ऊठ घे चाप धर हाती, असुर मर्दावयासाठी । राख बा ! लाज भक्तांची, न तुजविण दान दे कोणी ॥३॥
सांग हनुमंत ताताला, कि ‘वर दे आपुल्या भक्ता । पाहशी अंत किती आता ? धरी तुकड्या सदा चरणी ॥४॥

भजन – ११८
निरशुनी बघ जरा देवा ! गती अमुच्या समाजाची । भारता भीक दे काही, बिघडली रीत रक्ताची ॥धृ॥
कुणाचा मान ना उरला, विषयरस धुंदसा भरला । कुणी दाता नसे उरला, हाव बहु धाव स्वार्थाची ॥१॥
प्रेम निष्कामि ना कोठे, भक्तिचे ये तनू काटे । जाति पापाचिया वाटे, ढसळली चाल लोकांची ॥२॥
साधुचे कोणि ना ऎकी, भोंदुपण वाढले लोकी । उसळली वृत्ती असुरांची, भाविकासी बहू जाची ॥३॥
म्हणे तुकड्या कली आला, निशाणी टेकला झाला । संति आधीच गौरविला, तशी झाली खुशी यांची ॥४॥

भजन – ११९
सुदिन हा संत-सेवेचा, सुभाग्ये लाभला आम्हा । मिळाली दर्शने काशी, निमाली वृत्तिची सीमा ॥धृ॥
सदा फुलबाग बोधाचा, दिसे फुलला मुखावाटे । रंगले ज्ञान-वन सारे, पसरला भृंगमय प्रेमा ॥१॥
निसर्गे शांतिची ज्योती, सदा झळके तया दारी । शिपायी कडक वैराग्ये, अखंडित साधिती कामा ॥२॥
स्तुती-निंदा उभ्या भिंती, दिसे बाहेरच्या मार्गी । घासती बोचती अंगा, जावया साधुच्या धामा ॥३॥
लीन तुकड्या तया पायी, दर्शने भ्रांतिही जाई । जन्म-मृत्यू नसे काही, विसरती भेद-भय नेमा ॥४॥

भजन – १२०
उठा रे आर्य पुत्रांनो ! चला सांगू प्रभुपाशी । प्रभु का कोपला ऎसा ? जरा ना सौख्य आम्हासी ॥धृ॥
उडाली भूमिची सीमा, पिकेना तिळभरी शेती । खर्च ही ना निघे काही, राहती लोक उपवासी ॥१॥
सदाचा त्रास हा देहा, गुलामी सान थाराला । नृपाचा धाक बहु मोठा, गांजितो फार जनतेसी ॥२॥
विषारी चित्त जनतेचे, पसरले वैर-वन सारे । निघाले वक्ष पापांचे, फळांच्या वाढल्या राशी ॥३॥
गुप्त हे जाहले साधू, भोंदुचा भार बहु झाला । नीतिशास्त्री-पुराणांची, फजिती वाढली खाशी ॥४॥
जगाला सौख्य तरि द्यावे, नाहि तरि मृत्यु अर्पावे । हाल हे नावरे आता, भारताची गती कैसी ? ॥५॥
म्हणे तुकड्या चला गाऊ, आपुली खास ही दैना । ‘सखा तो तारि भक्तासी’, पुराणे गर्जती ऎसी ॥६॥

भजन – १२१
हिंदभुच्या लेकरांनो, स्वस्थ का बसता असे ? । भारताचे ग्रहण हे, नेत्री तुम्हा बघवे कसे ॥धृ॥
मार्ग काढा उन्नतीचा, या पुढे सरसावुनी । भेद-भावा सोडुनी, घ्या प्रेम-ऎक्याचे पिसे ॥१॥
जीर्ण ज्या चाली-रिती, डोळे मिटवुनी ना करा । वेळ ही पाहोनिया, कर्तव्य शोधा सायसे ॥२॥
आचरा सुविचार-वृत्ती, अनुभवाला घेउनी । अंध-श्रध्दा सोडुनी, व्यवहार साधा धाडसे ॥३॥
राहु द्या सत्प्रेम चित्ती, श्रीहरीसी गावया । नांदु द्या विजयी ध्वजा, द्या प्राण समरी वीरसे ॥४॥
दास तुकड्या सांगतो, काढा घरातुनी आळसा । काव्य बनवा आपुले, स्वातंत्र्य जे लाभे तसे ॥५॥

भजन – १२२
हिंदभूच्या भाविकांनो ! आत्मबल मिळवा अता । भ्याड वृत्ती सोडुनी, हृदयी धरा बुध्दीमत्ता ॥धृ॥
हात जोडुनी का असे हो ! ‘धर्म धर्म’ चि बोलता ? । बोलणे हे सोडुनी, दावा स्वधर्माची सत्ता ॥१॥
अंतःकरणे मोकलोनी, एक व्हा एकी करा । संप्रदाय नि पंथ हे, विसरूनी घ्या कर्तव्यता ॥२॥
देव सर्वांचा सखा, आम्ही तयाची लेकरे । भेद मग का कोरडा ? जाळा जशी जळते चिता ॥३॥
दिव्य ज्योती चमकु द्या, भानू जसा रविमंडळी । अर्जुनासम वीर व्हा, हा वेळ ना दवडा रिता ॥४॥
दास तुकड्या सांगतो, ही वेळ जाता आळसे । रूढि ग्रासिल आपुली, जाईल ही स्वातंत्र्यता ॥५॥

भजन – १२३
वाहते किति सौम्य तू, तुज शांतता कोणी दिली ? । द्रोह ना तव अंतरी, गंभीर वृत्ती शोभली ॥धृ॥
कोटियांचे पाप वाहता, शीण ना तुजसी जरा । मुक्त करिशी पूर्वजाते, स्वर्गिची जणु माउली ॥१॥
शुध्द किति तव प्रेम गंगे ! ना कुणासी मागशी । जगविशी हे विश्व सारे, सोडुनी झरणे खुली ॥२॥
भाग्य किति तरी थोर त्यांचे, जे तुझ्या तटि राहती । ईश्वराच्या पूजना, जणु तूच त्यांची वाटुली ॥३॥
निर्मिली वेली-जुळे, तट साजिरा करवूनिया । शालु हा जणु नेसुनी, प्रिय भक्त पाहण्या चालली ॥४॥
दास तुकड्या चिंतितो, तुज भेटण्यासी एकदा । उघडुनी पट भेट दे गे ! धन्यता मज लाधली ॥५॥

भजन – १२४
भाविकाच्या भक्तिचा, नच पंथ कोणी पाहिला । प्रेम हा निरपेक्ष त्याचा, सर्वदेशी राहिला ॥धृ॥
विश्वव्यापी देव त्याचा , बाहिरी अणि अंतरी । पूजना हे कार्य त्याचे, देह त्यासचि वाहिला ॥१॥
सर्व पंथही होत त्याचे, शुध्द जे राहती जगी । ना दुजा कधि भाव त्याचा, ‘मी भला, माझा भला’ ॥२॥
रंजल्यासी गांजल्यासी, ‘आपुले’ म्हणवूनिया । कष्टतो सुख द्यावया, करि प्राण खर्चहि आपुला ॥३॥
अखिल जग हे मंदिरासम, मानुनी सेवा करी । तुकड्या म्हणे तो धन्य साधू, जो जगी या गाइला ॥४॥

भजन – १२५
विश्वव्यापी प्रेम शिकण्या, न्याल का मजला कुणी ? । दाखवा तरि ठाव तो, बहु आवडे माझ्या मनी ॥धृ॥
कोणि ना परका दिसो, मज तीनलोकी पाहता । द्रोहता ही नष्ट हो, वर द्याल का मजला कुणी ? ॥१॥
जो दिसे तो आपुलाची, पाहता अणि राहता । भेद हा जाई लया, स्थळ दाखवा ऎसे गुणी ॥२॥
धर्म कोणीही असो, वा देश कोणीही असो । शुध्द प्रेमा एक होवो, हो धनी या निर्धनी ॥३॥
दास तुकड्या सांगतो, मज त्याविणा नच चैनही । भेटवा या पामरा, जिव बावरा झाला मनी ॥४॥

भजन – १२६
भारता ! बलवान व्हाया, वाचवी जिव गायिचे ॥धृ॥
लोभ हा सोडी वृथा, का मांस विकसी तू तिचे ? । चाटुनी नख-पाउला, सुख पावशी का दूरचे ? ॥१॥
भारताचे पुज्य जे, अवतार कृष्णादीक हे । सांगती का हे तुम्हा ? ‘घ्या प्राण अपुल्या आईचे’ ॥२॥
याद ही ठेवा मनी, या भारताच्या बंधुनो ! । पुण्य हे फळले अम्हा, त्या अजवरी निज मायिचे ॥३॥
दास तुकड्या सांगतो, विसरू नका हो गायिला । घ्या दूध, निर्भय होउनी, मिळवा अमरपद स्थायिचे ॥४॥

भजन – १२७
भारती रहवासियांनो ! वाचवा जिव गायिचा ॥धृ॥
सांगतो इतिहास ऎसा, भारताच्या ग्रंथिचा । ‘बहुमोल आम्हा गाय हे, जणु प्राणची मम आईचा’ ॥१॥
देश हा कृषि-उद्यमाचा, भोवताली वेष्टिला । धान्य बहु पिकती फळे, हा भाग त्या गो-मायिचा ॥२॥
कष्ट साहुनि देतसे, दहि-दूध-लोणी ही जशी । पुत्र देउनि आपुला, वाहवीतसे भर शेतिचा ॥३॥
दास तुकड्या सांगतो, शोधोनि पाहावे बुध्दिने । जीव का वधता तिचा ? हा घात निश्चयि आमुचा ॥४॥

भजन – १२८
चला हो ! चला पंढरीला । विठ्ठल राजा वाट पाहतो, जिवा तारण्याला ॥धृ॥
कुणीही भाविक जरि गेला । शांतवि त्याच्या जिवा, देउनी अमर धाम त्याला ॥१॥
सुखावे सगुण रूप बनला । उभा विटॆवरि, कटावरी कर, बघतो दासाला ॥२॥
भीवरेतिरी वास केला । भक्त-जनांच्या-भक्ति-सुखाने, तिथेच स्थिर झाला ॥३॥
पुंडलिक-सेवा बघण्याला । आला तै पासुनी हरी हा, मूळ गाव भुलला ॥४॥
रंगला भाविक-भजनाला । ज्ञानोबाचे सुरस काव्य हे, आवडले त्याला ॥५॥
पाहुनि भक्ती गहिवरला । नामासंगे हरी कीर्तनी, देवपणा भुलला ॥६॥
नाचतो थै-थै रंगाला । संत तुकाचे प्रेम पाहुनी, राखी शेतीला ॥७॥
जनीच्या वेचत शेणीला । गोरोबाची घडवित मडकी, अती हर्ष त्याला ॥८॥
किती सांगू हरिची लीला ? भक्त-काम-कल्पद्रुम भक्तासाठी महार झाला ॥९॥
खजाना नेइ बेदरीला। दासासाठी त्या यवनाच्या जात सलामीला ॥१०॥
प्रीय हा एकनाथ त्याला । घेउनिया रुप तया घरी वाहतो कावडीला ॥११॥
भक्त चोखोबा प्रिय झाला । ओढू लागे ढोर तयासी, नाहि जात याला ॥१२॥
असा हा ठेवा भक्ताला । न सांगताची करितो कामे, ठावुक सकलाला ॥१३॥
जवळ हा आहे पंढरीला । उठा उठा रे ! चला पहाया या आषाढीला ॥१४॥
मेळ संतांचा बहु जमला । धो-धो वाद्ये कर्ण-तुतारी, सैन्यभार आला ॥१५॥
जणू या मृत्यू-लोकाला । तुकड्यादास म्हणे वैकुंठचि, ठाव खरा गमला ॥१६॥

भजन – १२९
करा रे ! कृष्ण गडी अपुला । मिटे न मैत्री जन्म-जन्मि ही, देह जरी गळला ॥धृ॥
फुकाचे नाम जपा त्याचे । धन-संपत्तिस वाण न राहे, लक्ष्मि घरी नाचे ॥१॥
लावता चित्त तया पायी । अखंड अमृत-झरा जिवाला पावे लवलाही ॥२॥
धरिता ध्यान सगुण त्याचे । विश्व ब्रह्म हे कृष्णचि जिकडे तिकडे जगि भासे ॥३॥
देह अर्पिता तया चरणी । वैकुंठाचे राज्य मिळे, करिती जन मनधरणी ॥४॥
जरासे देता अति भेटे । तुकड्यादास म्हणे कानी घ्या, लक्षि धरा नेटे ॥५॥

भजन – १३०
पुनित हा देह करू आपुला । बहु कष्टाने बहु पुण्याने प्राप्त अहो ! झाला ॥धृ॥
खोविता देहाची वेळा । कोटी धन वेचता मिळेना दुरावोनि काळा ॥१॥
अमोलिक देहाची संधी । हरि नामाने पुनित करू या, लागू प्रभु-छंदी ॥२॥
चला रे ! चला उठा वेगे । संत-महंतहि अनुभवि गेले, जाऊ त्या मार्गे ॥३॥
म्हणे तुकड्या या भक्तीने । संत तुकोबा साधुनि गेला देवाच्या धामे ॥४॥

भजन – १३१
सुखकर कर सत्संगा मनुजा ! पावन हा नरदेह करूनी, सहज करी भवभंगा मनुजा ! ॥धृ॥
सुख-दुःखे ही किति भोगावी ? शांति नसे संसारी मनुजा । विमल सुखा दे माउली ही, देइल भक्तिसुरंगा मनुजा ! ॥१॥
‘सत्संगाविण मार्ग न लाभे’, श्रुति स्मृतिचे हे कोड मनुजा ! । तुकड्यादास म्हणे सुखी हो, त्यागुनि सकळ कुसंगा मनुजा ! ॥२॥

भजन – १३२
जिवलग गुरुविण कोणि न मनुजा ! जग हे स्वार्थ-सुखाचे सगळे, शेवटि साथि न येई मनुजा ! ॥धृ॥
धनद्रव्यावर नाती टपती, द्रव्य जाय मग झुकुनि न बघती । सकळ जगाची ऎसी रीती, हीन-दिना कुणि जाणि न मनुजा ! ॥१॥
देह साजरा तोवरि कांता, रोगि होय मग घेई माथा । सांग सांग मग कोण अनाथा ? पाजिल तिळभर पाणि न मनुजा ! ॥२॥
दीनाचा एक सदगुरु दाता, दावुनि बोध देतसे संथा । तुकड्यादास म्हणे भ्रम आता, सोडी गुरुविण मानि न मनुजा ! ॥३॥

भजन – १३३
साधुनि घे काहि जरा, कीर्ति व्हावया ॥धृ॥
नाहितरी जाशि फुका, कोणी नच देइ रुका । खाशिल यमद्वारि धका, नाहि त्या दया ॥१॥
अखिल विश्व हे अचाट, कठिण जन्म-मृत्यु-घाट । काम-क्रोध यांचि वाट, दाविते भया ॥२॥
शरण जाइ संत-पदा, करुनि घेइ बोध सदा । चुकवुनि घे आपदा ही, मुक्ति घ्यावया ॥३॥
तुकड्याची हाक ऎक, नाहितरी होय शोक । पावशील लोकि दुःख, थोर कष्ट या ॥४॥

भजन – १३४
अवचित हा संत-संग, लाभल अम्हा ॥धृ॥
पावन हा देह होय, क्षणभरि जरि बोध लाहे । उघडुनि घे कर्ण जरा, सोडुनी भ्रमा ॥१॥
दूर प्रभू राहतसे, पाप-पुण्य पाहतसे । कर्म-फळा देत तसे, करुनिया जमा ॥२॥
चुकविति हे कर्मबंध, लावुनिया कृष्ण छंद । दुर्दैवहि होत मंद, दाविती सिमा ॥३॥
तुकड्याची मात ऎक, घे गुरुचे बोध-सौख्य । तोडी भव-क्लेश दुःख, पुण्य-पथ क्रमा ॥४॥

भजन – १३५
जाइल हा नरदेह गड्या ! मग काय पुढे करशील मजा ? ॥धृ॥
चार दिवस हे हौसेचे, समजोनि राहशी अंतरी तू । अति दुःख पुढे यम देइ जिवा, मग कोण तुला देईल रजा ? ॥१॥
करशील जसे भरशील तसे, चुकते न कसे कोणीही असे । तुकड्यादास म्हणे काय अम्हा करणे ? हुशियार रहा भरशील सजा ॥२॥

भजन – १३६
‘झणि हासति काय मला जन हे’, ही लाज मनी तिळमात्र नको ॥धृ॥
कार्य करा प्रभुला स्मरुनी, निःस्वार्थपणी प्रियता धरुनी । मग वानो कुणि निंदाहि कुणी, अभिमान मनी तिळमात्र नको ॥१॥
हे विश्व मकान खरे अपुले. समजोनि करी मग जीव-दया । अति क्रूर असूर असेल कुणी, वधण्यासि दया तिळमात्र नको ॥२॥
निर्माण करा प्रभुची, प्रभु देइल मोक्ष ययाचि मता । तुकड्या म्हणे काय अरे ! बघता ? घ्या कार्य करी अजि, वेळ नको ॥३॥

भजन – १३७
रमला हरि कुंजवनी सखये ! हुरहुर जिवा अति वाटतसे ॥धृ॥
किति वेळ असा राहील तिथे ? सांगा तरि जाउनिया हरिला । कुणि मोहिल काय झणी सगुणा ? अग ! दुःख असे उरि दाटतसे ॥१॥
किति गोड तयाची बंसि सये ! पशुपक्षि-जिवा रमवी विपिनी । मनमोहन-बंसि हरील कुणी, मम चित्त कसे होईल पिसे ॥२॥
शिरि मोर-पिसारा सुंदरसा, योगी बघती हृदयात जसा । कुणि काढिल काय हळूंच असा ? नेत्रातचि ते रुप साठतसे ॥३॥
चल जाउ झणी बघण्या मिळुनी, दहापाच जणी अति एकहुनी । तुकड्या म्हणे भाग्य खुलेल गडे, हरिच्या विरहे जिव फाटतसे ॥४॥

भजन – १३८
विपरीत हवा दिसते नयनी, हरि काय करील मना न कळे ॥धृ॥
नच रीत उचीत कुणा करवे, धरवे न ऋषी-वचना हृदयी । अति कामभरे नच नेम उरे, श्रृतिशास्त्र, तया मदने न कळे ॥१॥
करि त्याज्य न राज्य कुचाल जनी, हसताति मनी दुरुनी झुरुनी । ‘बिघडले कधी ही भारतभू ?’ परके जनही द्विविधा घुसळे ॥२॥
ऋतु चालति चाल कुचाल अती, नच पृथ्वि पिके उरती पुरती । मरतो कइ , अन्न मिळे न पुरे, नरनारि न लुगडी-वस्त्र मिळे ॥३॥
रुसल्या मरिमाय जरा कुलरा, वरि प्लेग-काँलरा भिति न ज्वरा । नच सुख जिवा इकडे तिकडे, मन घाबरले अति, धीर ढळे ॥४॥
नच धर्म न कम सुसंगतिही, वळती जन हे विषयी अतिही । तुकड्या म्हणे स्वाधिन हे हरिचे, कळते प्रभुला कळणे सगळे ॥५॥

भजन – १३९
हरिनाम जपा मन लावुनिय, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥धृ॥
अति दुर्जन हे रिपु दूर करा, जे काम-क्रोध मद-लोभ अती । गुरुपायि चला हृदये नमुनी, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥१॥
रोज करा अभ्यास सदा, जी वेळ मिळे जो काळ मिळे । अति प्रेमभरे विरहे प्रभु गा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥२॥
सत्य सदा वदनी वदणे, समजा सम सर्व जिवा प्रभुच्या । अति निर्मळ गोड रहा जगती, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥३॥
‘मान असो अपमान असो, निति-धर्म न सांडुनि जाउ कुठे’ । तुकड्या म्हणे निश्चय घ्या ऎसा, मग मोक्षसुखा किति वेळ अशी ? ॥४॥

भजन – १४०
कुणि काहि म्हणो न म्हणो जन हे, नच साधु ढळे हरिच्याभजना ॥धृ॥
वाहताति कुणि फल, पुष्प शिरी, कुणि भावबळे घरि ने अपुल्या । कुणि निंदिती मार्गि, शिव्या वदनी, सुखदुःख न होय जराहि मना ॥१॥
कुणि देति किती, कुणि नेति किती, कुणी खाति किती, गणतीच नसे । कधि लाडु पुरी, कधि भूक उरी, कळणा-घुगरी हरि देत तना ॥२॥
कुणि मान कराया नेत सभे, कुणि प्राण हराया नेत गिरी । समतोल तयाची वृत्ति सदा, नच द्वेष-प्रीती कुजना-सुजना ॥३॥
शित-उष्ण असो वा वृष्टि असो, जनलोक असो वा कानन हो । मरणी जननी नच खेद जिवा, सदनीहि जसा तैसाचि रणा ॥४॥
नच रंग कधी विसरे अपुला, आनंदस्वरूप अनादि सदा । पदि लीन तया तुकड्या नमुनी, ज्याच्या न कळे कवणास खुणा ॥५॥

भजन – १४१
नटला हरि सुंदर विश्व कसा, मन मोहुनि ने बघता जिव हे ॥धृ॥
कुणि पंख सुरम्य दिसे म्हणुनी, मज दावित काननि या नटुनी । कुणि गोड स्वरे रव काढुनिया, मन रंगविती क्षण या ध्वनिनी ॥१॥
कुणि क्रूर मुखाते फाडुनिया, मनज दाखविती भय काननि या । कुणि दीन गरीब अम्ही म्हणुनी, पळती ‘भ्या भ्या’ हे वदुनीया ॥२॥
कुणि रम्य तुरंब फाकुनिया, वन साजविती मन लाजविती । कुणि सुंदर रंग सुगंध भरे, फुलवोनि फुले मजसी दिसती ॥३॥
अति सुंदर बाग दिसे असली, हरि ! जाण तुवा रचली सजली । तुकड्याची मती-गति कुंठुनिया, पहाता पाहणेपणिही बसली ॥४॥

भजन – १४२
रमले मन पंढरीराज पदी, न सुटेचि अता हा मोह जिवा ॥धृ॥
किती निर्मल कोमल पाउल रे, पाहताचि तनूचि सुध भुलते । डुलते जणु रूप विटे खुलते, फुलते फलते उरि रंग नवा ॥१॥
कटि साजे पितांबर सुंदरसा, जरदार जसा कनकासरिसा । शोभे जणु कौस्तुभ चंद्र जसा, फुलला उरि मंजरि-हार नवा ॥२॥
मकरकृति कुंडल हालतसे, शिरि रत्नमुकुट वरि मोर-पिसे । बघताचि विटेवर ध्यान असे, मन सोडुनि दे बहिरंग हवा ॥३॥
जणु सगुणरुपे परब्रह्मचि हे, पहायास सदा जिव ये अणि ये । तुकड्या म्हणे वाटे सोडु नये, तमनाशक हा किति गोड दिवा ॥४॥

भजन – १४३
गुरुराज कृपाकर ठेवुनिया, अजि ! चारितसे निजज्ञान-फळे ॥धृ॥
सत्वगुणी करवूनि भुमी, श्रध्दा-बिज पेरितसे मधुनी । सत्संग-जलाने ओलवुनी, तो बोध-तरूवर लावि बळे ॥१॥
शांति-दया अति कोमलसे, फुटती तरुसी त्या पल्लव हे । शाखा अष्टादिक भाव जया, संलग्न अती रमताति जुळे ॥२॥
भक्ति-फुलांचा भार बहू बहरावरि चित्त रमे भ्रमरू । आनंद मृदु पवनी डुलतो, सुख देत सदा तरु प्रेमबळे ॥३॥
ज्ञान-फळे अति गोड रुचे, रस सेवु मुखाविण त्या तरुचे । तुकड्या म्हणे घ्या रे ! ज्यास रुचे, या या पुढती, व्हा मुक्त बळे ॥४॥

भजन – १४४
चला पंढरी, पंढरी पहायासी । विटेवर उभा हृषिकेशी ॥धृ॥
कटेवरि कर, कर ठेवूनिया, वाट पाहतो म्हणतो ‘या या’ । दया ये तया, सर्व जिवाची या, कष्टतो भक्तांच्या कार्या ॥१॥
दासि जनीच्या, गोवरिया वेची, शेती राखतो सावताची । रसिद नेउनी, बेदरि दामाजीची, मडकी घडवित गोराची ॥२॥
सोडि वैकुंठ, वैकुंठ मूळपीठ, धरिली मृत्युलोकि वाट । भीवरे तिरी, बसवुनीया पेठ, उघडले दुकान चौहाट ॥३॥
खरेदी केली, पुंडलीके सारी, घेतला विकतचि गिरिधारी । भक्तिभावाने, काय त्याचि थोरी, आपण तरुनि दुजा तारी ॥४॥
अती आनंद, आनंद वर्णवेना, भक्त नाचति मिळुनि नाना । टाळ-तंबुरे, मृदंग-ध्वनि ताना, मारती रंगुनिया ध्याना ॥५॥
दास तुकड्याची मति कुंठित झाली, पाहता विठ्ठल वनमाळी । बघा एकदा, येउनिया जन्मा, करा सार्थक रे ! गा नामा ॥६॥

भजन – १४५
येउ दे दया, दया माय गंगे ! दाटला कंठ चंद्रभागे ॥धृ॥
नसे अधिकार, तव गुण गायासी, कितिक मम अंत सखे ! पाहशी ? जन्म लाधला, लाधला असे पापी, दूर झालो गे ! तव, तापी ! ॥१॥
झरा प्रेमाचा, प्रपंच-ध्वनि रतला, गुंग आसक्तपणी सुतला । दृष्टि सामोरी, सामोरी करि माते ! घेइ दासासी निज हाते ॥२॥
कुणावर घालू, ओझे शरिराचे ?, कोण भागिदार दैवाचे ? । प्रसवली कशी, उदरी आम्हाते ? घेइ गे ! पदरी मज माते ! ॥३॥
दृष्टि फिरवूनी, जाळि कटाक्षासी, चाखवी निज-आनंदासी । दास तुकड्या हा, जगपाशे श्रमला, संग निःसंग भवी गमला ॥४॥

भजन – १४६
धन्य जाहलो, सदगुरुचे चरणी । दाविली अघटित निज करणी ॥धृ॥
अजब ते घर, सुंदर साजाचे, दिसतसे औट हात साचे । तयाचे मधी, जगचालक नाचे, स्वरुप का बोलु अता वाचे । मुखे वदवेना, श्रमली वेदवाणी । दाविली अघटित ० ॥१॥
रत्न लाविले, आत दिव्य सात, तयांचा उजेड चकचकित । सदा झगमगे, न बोलवे मात, डुलतसे अजपा दिनरात । स्मरण स्फुरणाचे, आवाज घुमघुमित, त्रिवेणीसंगम झुरझुरत । सप्त हौदांचे, लहरावे पाणी । दाविली अघटित ० ॥२॥
बंद ठेविले, ते दसवे द्वार, नऊ खिडक्या त्या चौफेर । आत नांदती, स्त्रिया तिथे चार, तयांचे नावी घरदार । मनाजी गडी, करी कारभार, सदा पाहतसे व्यवहार । धनी सर्वांचा, एकविसा वरुनी । दाविली अघटित ० ॥३॥
गुंग जाहला, तया पुढे ज्ञानी, वृत्तिशून्यत्व अंगि बाणी । तेज फाकले, नच मावे नयनी, संशय विरले सर्व मनी । दंग होतसे, निज स्वरुपी प्राणी, सद्गुरु आडकुजी-ध्यानी । दास तो तुकड्या, सहज समाधानी । दाविली अघटित ० ॥४॥

भजन – १४७
किति सांगती, संत तुला बोध । सुटेना अजुनि कामक्रोध ॥धृ॥
काय तुज ठाव, असेल संतांचा ? अवेळी जाशिल रे ! साचा । शेवटी कुणी, साथ-संगतीचा, नसे कर शोध अंतरीचा । समज मानसी, कोण तू कवणाचा ? , सुसेवक होई संतांचा । कृपा घेउनी, तोडिशि ना नाद । सुटेना अजुनि ० ॥१॥
उदरिं नवमास, त्रासहि सोसोनी, अचानक पडला या भुवनी । स्मरण ते वेळी, केले स्थिर ध्यानी, अता का होशी अभिमानी ? जन्म पावला, झाला वयमानी, ‘बाळपण खेळण्यास’ मानी । विषय सेविता, किति झाला बध्द । सुटेना अजुनि ० ॥२॥
पुरा मायेत, होउनिया दंग, सेविली विषयांची भांग । सुचेना काही, दुःखाचा रंग, धरिला वृध्दपणी संग । श्वास लागला, पुत्र म्हणे ‘रोग ?, मांडिले बुडग्याने ढोंग’ । काढि येथुनी, न तोडिशी बंध । सुटेना अजुनि ० ॥३॥
जगी मानती, तुच्छ तुला प्राण्या ! न होशी हुशार तरि शहाण्या ! मूर्ख बनतोसी, का खोट्या नाण्या, अजुनि ‘अविनाश’ पाहि प्राण्या ! स्वरुप विसरला, अंतरला कान्हा, अजर अमृत रे ! निज पान्हा । दास तुकड्या हा, म्हणे होइ शुध्द । सुटेना अजुनि ० ॥४॥

भजन – १४८
भटकला, कितिक भटक्शी ?, न झाली खुशी विषय-भोगाची ? । रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥धृ॥
हे अजब वाटते पिसे, तुला रे ! नसे, हौस तरण्याची । मग ओरडशी जव येइल फेरि यमाची ॥ ना कुणी येइ रक्षण्या, समज शाहण्या ! गतिच देहाची । तुज कशी नसे रे ! बुध्दी अपरोक्षाची ? ॥ वरि-वरी दावितो ज्ञान, असे अज्ञान, गोष्ट अंतरिची । रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥१॥
बहु फिरत फिरत येउनी, पावला झणी, तनू मनुजाची । धाडिली विचारा करिता-करिता साची ॥ वाचुनी बहूत पुरण, धरी अज्ञान, होत तू वाची । ना अनुभव ऎसा सर्व जनी बघलाचि ॥ रे ! जाण पशूपक्षि जे, ययानी किजे, धाव पुढच्याची । परि नसे फिकिर त्या खाण्याची दिवसाची ॥ जाहला नीच त्याहुनी, समज रे ! मनी, गोष्ट स्वहिताची। रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥२॥
सांगती संत ते बोध, तुला ये क्रोध, दुही सुजनाची । कर विचार आता, करि भक्ती ईशाची ॥ नवमास उदरि साहुनी, त्रासली मनी, जननि ते तुमची । का केली अपकीर्ति हो ! तिच्या नावाची ? ॥ तो तुकड्या सांगे सार, नसे आधार, स्थिति सर्वांची । रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥३॥

भजन – १४९
बा ! प्रपंच-वन हे दाट, सुचेना वाट, चढाया घाट, तुझा श्रीहरी ! कर दया, आवरी माया अजुनी तरी ॥धृ॥
वनि मद-मत्सर जंबुके, अवेळी भुके, करिति गर्जना । कधि बा ! धरती हे ? भिववुन सोडिति मना ॥ वासना-वीज कडकडे, घडी-घडी उडे, विषय-अंधारी । मार्गात लागते ठेच जिवाला भारी ॥१॥
कधि काम-व्याघ्र खळबळे, क्रोधे जळफळे, आरळी मारी । धाव रे धाव ! करु कायच वाटे हरी ! ॥ आशा-तृष्णा ह्या नद्या, न वाहति सुद्या, ओढिती धारी । टाकताचि पाउल पुढे फजीती सारी ॥२॥
करु काय ? सांग सदुपाय, वाटतो पाय कठिण देवाचे । पाश हे कधी तुटतील पापि जीवाचे ? ॥ तुकड्यादास ठाव दे अता, नसे तारिता, तुझ्याविण कोणी । दे प्रकाश मज या भयाण काननस्थानी ॥३॥

भजन – १५०
श्रीहरी ! कोठवरि आता फिरविसी वाया ? जाहलो श्रमी बहु, नका दावु ती माया ॥ श्रीहरी ! ॥धृ॥
राहुनी प्रपंची जिवा नसे सुख काही । करिताचि कष्ट बहु शिणलो, या भव-डोही ॥ श्रीहरी ! ॥ पाहुनी द्रव्य-सुत-दार वैभवा ऎशा । भटकला जीव हा, न सुटे घरची आशा ॥ श्रीहरी ! ॥ मागता भीक श्वानासम पोटासाठी । हे हीन कर्म मारिते, आडवी काठी ॥ श्रीहरी ! ॥ (अंतरा) नच द्रव्य कधी घेउनी पाहिले डोळा । कष्टला जीव मम सर्व सोशिता ज्वाळा । घरधनी कशाचा घरचा बाइल-साळा । हा नर-जन्माचा, काळ लोटला वाया ॥ जाहलो श्रमी ० ॥१॥
कुणि बरे पाहिना, जावे दुसर्‍या दारा । काय सांगु वैभव ऎशा या परिवारा ? ॥ श्रीहरी ! ॥ तरि तुझे नाव मम न ये मुखी भगवंता ! । श्रीगुरु-कृपेने आठवला गुणवंता ! ॥ श्रीहरी ! ॥ आठवता ऎसे वाटे मज ते काळी । ‘फेडील पांग हा येउनिया वनमाळी’ ॥ श्रीहरी ! ॥ (अंतरा) ते मधुर बोल ऎकवशिल श्रवणी कधी । येउ दे दया मम, शांतवि अपुल्या मधी । ऎश्वर्य जाउ दे, मज घे अपुल्या पदी । तुकड्यादास ठाव दे श्रीसद्गुरुच्या पाया ॥ जाहलो श्रमी ० ॥२॥

भजन – १५१
पावो सदा यशाला, हा आर्य-धर्म माझा । वदवो प्रभू अम्हाला, ‘हा आर्य-धर्म माझा’ ॥धृ॥
सुत वायुचा प्रगटता, भानूसि छाव घाली । भूषवी अमीत भूला, हा आर्य-धर्म माझा ॥१॥
श्रीकृष्ण देवकीचा, कंसास ठार मारी । दावी रणात लीला, हा आर्य-धर्म माझा ॥२॥
श्रीराम दशरथाचा, सुखवी वनी ऋषींना। करि ठार रावणाला, हा आर्य-धर्म माझा ॥३॥
शिवराय क्षत्रियाचा, करि नाश दुर्जनांचा । कर्कश दिसे रणाला, हा आर्य-धर्म माझा ॥४॥
ऋषि रामदास झाले, शुक नामदेव आले । बहु बोधवी जनाला, हा आर्य-धर्म झाला ॥५॥
गुरु ज्ञानराज माझे, महाराष्ट्र-संत गाजे । प्रभु-मार्ग दे जनाला, हा आर्य-धर्म माझा ॥६॥
बाणोनी त्याग अंगी, निज राजमार्ग सांगी । विसरे कधी न त्याला, हा आर्य-धर्म माझा ॥७॥
या आदि-अंत नाही, हा सर्व काळ राही । श्रृतिसंमती निमाला, हा आर्य-धर्म माझा ॥८॥
नांदो सदा सुखाने, जयमाळ घालुनीया । भगवे निशानवाला, हा आर्य-धर्म माझा ॥९॥
सेवेस चित्त लागो, तुकड्याहि आस वाही । पुरवो प्रभू ! प्रणाला, हा आर्य-धर्म माझा ॥१०॥

भजन – १५२
सत्संगि चित्त लावी, विसरू नको नरा रे ! । व्यसनास त्यागुनीया, सत्संग साध जा रे ! ॥धृ॥
कोणि न येति साथी, जग सर्व हे फुकाचे । गुरु-संत मार्ग दावी, घे बोध निर्मळा रे ! ॥१॥
सुत-दार चालतीचे, पडतीस येति मागे । कवडी न देति कोणी, मग रामची सखा रे ! ॥२॥
हा देह नष्ट वेड्या ! टाकोनि जाय जीवा । मग सांग काय नेशी ? अपुल्यासवे गड्या रे ! ॥३॥
तुकड्या म्हणे समज हे, गुरुच्या कृपाप्रसादे । हो साक्षि या जगाचा, तरि मुक्त होशि बा रे ! ॥४॥

भजन – १५३
शिव भूपतीस माझा, सांगा निरोप जा जा ॥धृ॥
महाराष्ट्र धैर्यशाली, करवा पुन्हा विशाली । तुमची प्रथा बुडाली, या या पुन्हा समाजा ॥१॥
तरवार ती भवानी, नेली दुजे लुटोनी । अडवावया न कोणी, धावोनि घ्या तिला जा ॥२॥
भगवे निशाण तुमचे, जाते कि काय गमते । बघवे न ते अम्हाते, ताटस्थ त्यासि राजा ॥३॥
विरवृत्ति नष्ट झाली, भेकाड वृत्ति आली । क्षत्रियता निमाली, अति बोलकाचि वाजा ॥४॥
तुकड्या म्हणे हि वाणी, कैलास भेदवोनी । जागोनि शूलपाणी, धाडो तुम्हास काजा ॥५॥

भजन – १५४
प्रभुची सखा जगाचा, मग अन्य कोणि नाही । तारील तोच आम्हा, भव-सिंधुच्या प्रवाही ॥धृ॥
प्रल्हाद बाळ कष्टी, हरिनाम नित्य घेता । प्रभु धावुनि तयासी, उचलोनि हाति घेई ॥१॥
ध्रुव हट्ट हा धरूनी, करि काननी तपस्या । प्रभु भेट दे तयासी, देतात ग्रंथ ग्वाही ॥२॥
अति दुःख द्रौपदीसी, त्या कौरवी सभेसी । हरि वस्त्र देइ लाखो, पुरवीत याचना ही ॥३॥
तुकड्या म्हणे गड्या रे ! विसरू नका तयाला । ध्याता तया पदासी, प्रभु सौख्य दे सदाही ॥४॥

भजन – १५५
मन हे चकोर अमुचे, तू चंद्र भाविकाचा ॥धृ॥
तव बोध वृत्तिला हो, मन हे तुलाच पाहो । मुख नाम-गुण गावो, हा प्रेम या जिवाचा ॥१॥
नच लालसा कुणाची, राज्यादिका धनाची । एक आस दर्शनाची, हा नेम या मनाचा ॥२॥
नेत्री तुला पहावे, पाहतेपणी रहावे । तुकड्याची हाक घ्या ही, हा भाव अंतरीचा ॥३॥

भजन – १५६
नर-जन्म खोवुनीया, मग पावशी अपाया ॥धृ॥
स्वातंत्र्य यात पावे, कर्तव्य साधण्याला । जाताचि वेळ वाया, मग काळ ये धराया ॥१॥
साथी न कोणि येई, जिव जातसे दुखाने । चौर्‍यांशि भोगताना, बहु कष्टि होत काया ॥२॥
अति गर्भवास जीवा, ना शांतिचा सुगावा । घेता नये विसावा, अन्यत्र जन्मुनीया ॥३॥
तुकड्या म्हणे गड्या रे ! समजोनि पाय टाकी । ‘करशील तेचि भरशी’, ही याद ठेवुनीया ॥४॥

भजन – १५७
राहता नये जगी या, भोळीव दाखवोनी ! ॥धृ॥
अति क्रूर षड् विकारे, जिव घाबरे थरारे । संसार हा बिकटची, वाटे तरे न कोणी ॥१॥
जनलोक त्रास देती, नच संत-संग साधे । व्यसनात रमविण्याला, बहु संगि ये दुरूनी ॥२॥
वैराग्य अंगि येता, पळती दुरी उरीचे । खाती लुटोनि सगळे, अति प्रेम दाखवोनी ॥३॥
तुकड्या म्हणे रहावे, जग लावुनि जगी या । आसक्ति तोडुनिया, सत्कर्म हे करोनी ॥४॥

भजन – १५८
सुख-दुःख भोग सारे, चुकती न हे कुणाला । हो संत देव साधू , राजा किंवा प्रजेला ॥धृ॥
केले तसे भरावे, मनि शांत होत जावे । प्रभु-नाम गात जावे, समजावुनी मनाला ॥१॥
एक वेळ तूप-मांडा, एक वेळ भूस-कोंडा । देऊनि राहि पिंडा, जो भोग दैवि आला ॥२॥
कधि शाल-जोडि अंगी, कधि भूषणेहि जंगी । कधि अंग डोकि नंगी, सांगो तरी कुणाला ? ॥३॥
तुकड्या म्हणे ‘करावे, तैसेचि हे भरावे’ । प्रभुला समर्पुनीया, सेवु सुखे तयाला ॥४॥

भजन – १५९
गंगे ! तुझ्या तिराला, मन हे निवांत राही ॥धृ॥
किति शांत धार वाहे ? पाणी अथाह राहे । पापी जलात न्हाये, घे सौख्य तो सदाही ॥१॥
वाद्ये अनंत वाजे, किति चौघडे नगारे । बहु भक्त येति भोळे, शोभा अगम्य पाही ॥२॥
पितरास स्वर्गि न्याया, जणुं नाव तू तयांची । देवोनि अस्थिका ही, जन ठेवतात ग्वाही ॥३॥
योगी-मुनी तिराशी, धरुनी बसे समाधी । तुकड्या म्हणे तुझ्या या, तिरि मोक्षची सदाही ॥४॥

भजन – १६०
योगी करी समाधी, रंगोनि अंतरंगी ॥धृ॥
साधोनि कुंभकाला, ब्रह्मांड-शोध घेती । राहती निवांत तेथे, त्रिकुटी सदा निसंगी ॥१॥
षड्चक्र-भेद पावे, तनु-अंतरंगि जाता । जिव हा सदा सुखावे, स्वरुपी तया अभंगी ॥२॥
मन उन्मनी स्थिरावे, भ्रम-भेद हा विरोनी । अमृत-कुंड पावे, अति गोड-गोड गुंगी ॥३॥
अति स्वर्गतुल्य शोभा, पावे तनूत योगी । तुकड्या म्हणे बघा हे, मग जन्ममरण भंगी ॥४॥

भजन – १६१
हरिनाम हे फुकाचे, जप मानवा ! तु वाचे । तुटतील बंध सारे, भव-पाश या जिवाचे ॥धृ॥
मन लावुनी विचारी, धरि एकनिष्ठ तारी । निष्काम गा मुरारी, अति हर्षे देव नाचे ॥१॥
नच जाइ पुण्यधामा, बस रे ! करीत कामा । कामात लक्ष रामा-वरि, ठेव अंतरीचे ॥२॥
सोडूनि कल्पना ही, निंदा-स्तुती जगाची । रंगोनि एकभावे, सुख घे हरी-पदाचे ॥३॥
तुकड्या म्हणे हि वेळा, साधूनि घे फुकाची । अनमोल जन्म जाता, मग मार त्या यमाचे ॥४॥

भजन – १६२
सुख येइ घरा, अति कष्ट करा कष्टाविण शांति न होइ नरा ॥धृ॥
कष्टचि करता संत निमाले, तरले या भवदुःखपुरा ॥१॥
कष्टे राज्यहि पावे सुगमे, आळस हा अति दुर करा ॥२॥
कष्टे धर्म, कर्म, व्रत होते, कष्टचि नेई आत्म-पुरा ॥३॥
तुकड्यादास म्हणे, ज्या कष्टी, नारायण हो तेचि वरा ॥४॥

भजन – १६३
चल ऊठ अता, चल ऊठ अता, बघ भानु करी उपदेश मुला ! ॥धृ॥
तापुनि कष्टि करी देहाला, द्यायासी सुख जनतेला ॥१॥
कष्टचि हे सुख देति मनाला, ज्या कष्टे जन-लाभ भला ॥२॥
लाज घेउनी का बसलासी ? जाशिल शेवटि दुःखि खुला ॥३॥
तुकड्यादास म्हणे गुज समजी, करि सेवा जगव्यापि खुला ॥४॥

भजन – १६४
कुणि शत्रु कुणाचा नाहि गड्या ! कुणि मित्र कुणाचा नाहि गड्या ! ॥धृ॥
सर्व असे हे अपुल्या हाती, अपुली कर्मे ग्वाहि गड्या ! ॥१॥
आपण दुसर्‍या दुसरे आपणा, वागु तसे जग राहि गड्या ! ॥२॥
आपण लोभी जगही फसवे, ठगा-ठगाची डाइ गड्या ! ॥३॥
तुकड्यादास म्हणे निर्मळ हो, जग हे ईश्वर पाहि गड्या ! ॥४॥

भजन – १६५
अति व्याकुळ हे मन, शांति नसे, करु काय कसे ? न सुचे हरि रे ॥धृ॥
जप-तप नाना करुनी, श्रमलो, चंचल मन हे नावरि रे ! ॥१॥
तिर्थी धोंडापाणी पुजिले, पक्ष्यासम फेरे करि रे ! ॥२॥
दान-पुण्य योगहि ते केले, वाढे अभिमानचि उरि रे ! ॥३॥
तुकड्यादास म्हणे ज्ञानाविण, सुख नसे दुसरे तरि रे ! ॥४॥

भजन – १६६
किति सुंदर चंद्र मनोहर हा, गमतो जणु राजा तार्‍यांचा ॥धृ॥
सुख देत किती नभ-मंडळ हे, जिव मोहुनि नेत विकार्‍यांचा ॥१॥
या सृष्टिवरी तरी तेच गती, प्रभु शोभत आश्रय जीवांचा ॥२॥
जे भक्त तया भजती नमती, जिव प्राणचि तो या सर्वांचा ॥३॥
तुकड्यादास म्हणे जग सारे, घेत प्रकाश तया हरिचा ॥४॥

भजन – १६७
अभिमान खरा अति दुःखद हा, कधि जाउ नयेचि तया वाटे ॥धृ॥
क्षण एक न राहि, धरी लिनता, क्षण एकचि येति तया काटे ॥१॥
नसताचि कुळी अति होत बळी, विषयास धरी अपुल्या लाटे ॥२॥
धनद्रव्य मिळे तरि काय पहा, मग दीन जना दुरुनी दाटे ॥३॥
तुकड्या म्हणे तोचि खरा नर हो ! अभिमान न ज्या क्षणमात्र उठे ॥४॥

भजन – १६८
मन संयम तो अति दृढचि करा, मग काहि कुणाला नाहि कमी ॥धृ॥
धिर देउनिया उतरा रणिहो, मग मृत्यु जरी ये शीर नमी ॥१॥
संसार भयानक डोंगर हा, परि संयमियासि न दुःख कमी ॥२॥
जग हे पलटो उलटो सगळे, तरि चित्त नसो तिळमात्र भ्रमी ॥३॥
संयम घ्या तुकड्यादास म्हणे, मग जन्मवरी नच व्हाल श्रमी ॥४॥

भजन – १६९
श्रम घेउनिया भ्रम जात नसे, मग काय असे जन हे करिती ? ॥धृ॥
मन लावुनिया संसार करी, परि दुःख अती शरिरी भरती ॥१॥
अति द्रव्य कमावुनि आणुनिया, मग चोरांचे घरटे भरती ॥२॥
सुत-दारि अतिशय मोहुनिया, मग शेवटि आपणची मरती ॥३॥
तुकड्या म्हणे एक न लाभ मिळे, मग कष्ट करोनी काय गती ? ॥४॥

भजन – १७०
हरि गात चला, हरि गात चला, हा मार्ग भला सकळास खुला ॥धृ॥
सुख दुःख सहा मनि शांत रहा, निजज्ञानरुपी मनसोक्त डुला ॥१॥
संसार पिसे आत्मास नसे, हा भास मुळापासून भुला ॥२॥
आनंदि रहा प्रभु-छंदि रहा, भव-वैभव हे मनि तुच्छ तुला ॥३॥
तुकड्यास रुचे पदची हरिचे, मनि ध्यास चला मग मोक्ष खुला ॥४॥

भजन – १७१
विसरु नका हरि-नामा, विसरु नका हरि-नामा । गडे हो ! ॥धृ॥
सुंदर तनु ही दिधली ज्याने, लावियले जग-कामा ॥१॥
गर्भवासि पोसुनिया पिंडा, जिववी देउनि प्रेमा ॥२॥
बाहेरी निघता दुध देउनि, जगवी देह विरामा ॥३॥
तुकड्यादास म्हणे हरि गा रे ! नेइल तो निज-धामा ॥४॥

भजन – १७२
रमवा मन हरि-रंगी, रमवा मन हरि-रंगी । गडे हो ! ॥धृ॥
विषयसुखाची सोडुनी आशा, मस्त रहा सत्संगी ॥१॥
सुख दुःखासी मारुनि लाथा, निर्भय व्हा भवभंगी ॥२॥
कोणि न येती जन सांगाती, येइल राम प्रसंगी ॥३॥
तुकड्यादास म्हणे हरि गा रे ! तोडुनि माया ढंगी ॥४॥

भजन – १७३
संत-समागम साधा, संत-समागम साधा । गडे हो ! ॥धृ॥
सकल सुखाचा आगर तोची, तोडा ही भव-बाधा ॥१॥
क्षणिक सुखाशी रत होउनिया, का धरता उन्मादा ? ॥२॥
सत्संगाविण ज्ञान न पावे, तोडा हा जग-फंदा ॥३॥
तुकड्यादास म्हणे अनुभव घ्या, चाखा निर्मल स्वादा ॥४॥

भजन – १७४
भक्ति करा निष्कामी, भक्ति करा निष्कामी । हरिची ॥धृ॥
मागु नका त्या नाशिवंत सुख, तो नेइल निजधामी ॥१॥
प्रारब्धाने सर्व मिळे हे, स्थीर रहा प्रभु-नामी ॥२॥
धन्य मानुनी असले त्या स्थिती, रहा हरीच्या कामी ॥३॥
तुकड्यादास म्हणे हे करिता, होइल जीव अरामी ॥४॥

भजन – १७५
धरशिलना हरि ! हाती ? चुकविशिना जगप्रीती । अमुची ? ॥धृ॥
आयुष्याचे जीवनकलही, हटविशिना भ्रम-भीती ? चुक ० ॥१॥
कठिण दिसे हा मोह-पसारा, तरविशिना जिव नीती ? चुक ० ॥२॥
आशापाश नि लोभविकारा, हरविशिना या क्षीती ? चुक ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे शेवटि तरि, रमविशिना पदि वृत्ती ? चुक ० ॥४॥

भजन – १७६
करशिलना कर खाली ? धरशिलना वनमाली । पदरी ? ॥धृ॥
दुस्तर हा भव-सागर वाटे, तुजविण कोणि न वाली । ध ० ॥१॥
काम-क्रोध अति क्रूर श्वापदे, बहुत अनावर झाली । ध ० ॥२॥
आश्रये तुझिया काळ निभवला, अजवरि वेळहि गेली । ध ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे शेवट हा, तुझिया स्वरुपी घाली । ध ० ॥४॥

भजन – १७७
येशिलना गुरुराया ! येशिलना गुरुराया ! मनि या ? ॥धृ॥
सत्य ज्ञान तू, ज्योति-स्वरूपचि, तुज अर्पिन ही काया ॥१॥
स्थापिन तुजला हृदयमंदिरी, चित्त लाविन गुण गाया ॥२॥
लक्षि ठेवुनी बोध-वचन तव, मग वळविन तशि काया ॥३॥
तुकड्यादास म्हणे घे करुणा, उध्दरि मज दीना या ॥४॥

भजन – १७८
कृष्ण मनी रमला हा, कृष्ण मनी रमला हा, अमुचा ॥धृ॥
रूप सावळे अति सुंदर हे, जीव तिथे नमला हा ॥१॥
मोर-मुकुट कुंडल अति साजे, भावरुपी गमला हा ॥२॥
वाजवि अधरी मंजुळ पावा, ध्वनि कर्णी घुमला हा ॥३॥
तुकड्यादास म्हणे अति मोहक, मार्ग जीव क्रमला हा ॥४॥

भजन – १७९
नश्वर या जगडोही, कोणि न सुख तिळ घेई । कळले ॥धृ॥
‘माझे माझे’ म्हणता म्हणता, प्राण फुकाचा जाई । कोणि ० ॥१॥
धडपड करिता ढोरासमही, जागिच अती राही । कोणि ० ॥२॥
साथि न येई देहहि अपुला, धन-दारा सुत-व्याही । कोणि ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे हरिवाचुनि, शांति जिवा न जराही । कोणि ० ॥४॥

भजन – १८०
जिव पक्ष्यासम झाला, थार न कुणि दे याला हरि रे ! ॥धृ॥
जिकडे जावे तिकडे भ्यावे, निर्भय सुख न मनाला । थार ० ॥१॥
सकल जगत हे स्वार्थे भरले, दूर करी गरिबाला । थार ० ॥२॥
अपुले म्हणुनी परके होती, कसची नाति तयाला ? थार ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे पदरी घे, देउनि नाम अम्हाला । थार ० ॥४॥

भजन – १८१
रमशिलना या देही ? सावळिये गुरु आई ! अमुचे ॥धृ॥
न्हाणिन तुजला अश्रु-जलाने, वाहिन भाव-फुले ही । सा ० ॥१॥
बसविन सिंहासनि हृदयाच्या, सोहं दीपक-छायी । सा ० ॥२॥
जीवभाव तुज अर्पण करुनी, देह तुझ्या पदि वाही । सा ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे वर दे हा, न उरो भेद कुठेही । सा ० ॥४॥

भजन – १८२
निरखुनि वाट चला रे ! निरखुनि वाट चला रे ! गडे हो ! ॥धृ॥
‘जे जे द्यावे ते ते घ्यावे’ हीच हरीचि कला रे ! ॥१॥
‘दुसर्‍या सुख द्या आपण सुख घ्या’, नियम असे हे सारे ॥२॥
वधता दुसर्‍या आपण मरतो, टाळा ऎसि बला रे ! ॥३॥
तुकड्यादास म्हणे सुविचारे, पावे मोक्ष भला रे ! ॥४॥

भजन – १८३
कष्ट करा हरि भेटे, कष्ट करा हरि भेटे । गडे हो ! ॥धृ॥
दीन जनांची सेवा साधा, सोडा व्यसने खोटे ॥१॥
प्राण खर्चि द्या धर्माकरिता, घेउनि हाती नरोटे ॥२॥
मान जगाचा समुळचि त्यागा, वाहु नका त्या लाटे ॥३॥
तुकड्यादास म्हणे गा हरिला, मग भव-भय हे खुंटे ॥४॥

भजन – १८४
साक्षि असा जगती या, साक्षि असा जगती या । गडे हो ! ॥धृ॥
मायेचा हा सकल पसारा, भ्रमवु नका मन वाया ॥१॥
जड देहाचा बंध जिवासी, आत्मा अमर सदा या ॥२॥
सुख-दुःखे ही लिंगतनूसी, आशेची पडछाया ॥३॥
तुकड्यादास म्हणे निर्भय व्हा, धरुनी गुरुच्या पाया ॥४॥

भजन – १८५
कधि भेटशि यदुराया ! कधि भेटशि यदुराया ! सखया ! ॥धृ॥
संसाराचा पाश कठिण हा, मोहविते मन काया ॥१॥
क्षणिक तनूचा नाहि भरवसा, जाइल वैभव वाया ॥२॥
आवड ही सम अंतरि वाहे, ठेवु देह तव पाया ॥३॥
तुकड्यादास म्हणे करुणा कर, लावि मती गुण गाया ॥४॥

भजन – १८६
भक्ति अम्हाला देई, भक्ति अम्हाला देई । हरिची ॥धृ॥
आणिक नलगे धन-सुत-दारा, मान जगाचा काही ॥१॥
खाउनिया कळणा अणि कोंडा, रंगवु देह सदाही ॥२॥
राहु कुठेही दरी-कंदरी, वृक्ष-वेलिच्या छायी ॥३॥
तुकड्यादास म्हणे ही पुरवी, आशा श्रीगुरुआई ! ॥४॥

भजन – १८७
प्रेमळ हरिची गीता, प्रेमळ हरिची गीता । गा रे ! ॥धृ॥
कष्ट हराया संसाराचे, साधुनि घ्या या हीता ॥१॥
हरिस्मरणाचा महिमा जाणे, तोचि तरे भव रीता ॥२॥
संसारी जणु संजिवनी ही, मनुजा ! साध उचीता ॥३॥
तुकड्यादास म्हणे मन लावी, मिळचि अंति भगवंता ॥४॥

भजन – १८८
निववाना, दिना या जिवा देवा ! घडवाया अपुली सेवा ॥धृ॥
जन्म हा मग येइ कैसा, नाहि तिळभरही भरवसा । घ्या करुणा प्रभु ! न्या चरणांबुजि, काय अवघड घनश्यामा ! ॥१॥
कठिण गमे हा मोह-पसारा, भवसागर ही बिकटचि धारा । तुकड्यादासा तुझा आसरा, तारा अथवा जगि या मारा । थोडि तरि कृपा का हो द्याना ? ॥ निववाना ० ॥२॥

भजन – १८९
नलगे मज आणिक काही, सद्गुरुआई भेटवा ॥धृ॥ नच मनी धनाची आशा, नच मानपान-आकांक्षा । हा अवघा व्यर्थ तमाशा, आशा-पाशा सोडवा ॥१॥
नच पुत्र-पौत्र ते काही, घरदार नको मज तेही । मी सन्मुख गुरुच्या राही, सुख द्या ऎसे या जिवा ॥२॥
जरि राज्य मिळे भू सारी, तरि सुख नसे संसारी । भवि सोडवुनी निर्धारी, लावा हृदयी या दिवा ॥३॥
हे क्षणिक सौख्य मिळवावे, मग अंती व्यर्थ मरावे । तुकड्याला भय हे ठावे, दुस्तर पाशा तोडवा ॥४॥

भजन – १९०
कोणा म्हणशिल ‘घ्या कैवार’, जेव्हा पाहशि यमाचे द्वार ?॥धृ॥
येइल कोण आडवा बाप ? चुकविल काय तुझा रे ! ताप ? । करिशी काय असा व्यवहार ? जेव्हा ० ॥१॥
येतिल काय आई-गणगोत ? दावाया कर्तव्य-सुज्योत । करिशी काय व्यर्थ हा प्यार, जेव्हा ० ॥२॥
चोरी करुनी पाळी लोक, त्यातुनि भोगतील का एक ? । पहा वाल्मीकऋषी-उद्गार, जेव्हा ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे रे ! शोध, घेई सत्संगाचा बोध । नश्वर हे सगळे जाणार, जेव्हा ० ॥४॥

भजन – १९१
गडे हो ! वेळ अशी गमवाल, शेवटी चौर्‍यांशी भोगाल ॥धृ॥
दुनिया दिसते रंग-रंगीली, जीव-जिवांनी छान छबीली । व्यर्थची पाहुनिया भाळाल, शेवटी ० ॥१॥
ज्वानी अंगी काढी जोर, पळती जसे काननी ढोर । त्यापरि कोंडवाडिया जाल, शेवटी ० ॥२॥
जैसे करणे तैसे भरणे ? न चुके कोणाच्या दैवाने ? । वाजविल अंती यम तो गाल, शेवटी ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे त्या कामा, सोडुनि भजा हरी घनश्यामा ! । नाही तरी कुणाचे न्याल ? शेवटी ० ॥४॥

भजन – १९२
जग हे गुणकर्माची खाण, मिळेना दुसर्‍याला मुळि मान ॥धृ॥
ज्याने द्यावे त्याने घ्यावे, अपुल्या दैवे लेणे ल्यावे । नाही तरी व्यर्थ हा प्राण । मिळेना ० ॥१॥
कोणी ढोंगी पुढती येती, शेवटी मोठी होय फजीती । जन फेकी निंदेची घाण । मिळेना ० ॥२॥
दिसती पाय पाळण्या आंत, परिते दाविति अपुली जात । लपेना देउनियाही दान । मिळेना ० ॥३॥
तुकड्यादास म्हणे सर्वांसी, सादर व्हावे सत्कर्मासी । तेव्हा धाडिती दे विमान । मिळेना ० ॥४॥

भजन – १९३
काननी या नदीच्या तटी, कोणि केली तृणाची कुटी ? ॥धृ॥
बाग वसंत-ऋतुचा नवा, जैसा शालू दिसे हिरवा । वृक्ष-वेली डुले गोमटी, रम्य वाटे मुळांच्या लटी ॥१॥
भृंग गुंजार करिती वनी, कोकिळा गातसे रागिणी । श्यामता बादलांची उठी, मयुर पिंजारती पंखुटी ॥२॥
मंद पवने टपकती फुले, खेळती वानरांची पिले । धावताती निराच्या तटी, मारुनिया उड्या कोल्हटी ॥३॥
पुष्पि गुंजारती भोंगुळे, शुभ्रवर्णी निळे पीवळे । शोभती वृक्षियांच्या पटी, उडति पक्षी-कुळे गोमटी ॥४॥
मागे शीला किती भव्य ह्या, व्याघ्र सापादिकासी पहा । धावती अस्वला रानटी, गर्जती जंबुके धाकुटी ॥५॥
रम्य त्या डोंगराच्या दर्‍या, चरति रोही हरिणी सांबर्‍या । वाहताति झरणे चोरटी, भवति कंदामुळांच्य गुटी ॥६॥
मधि सिंहासने साजिरी, कोण बसताति यांच्या वरी ? । जणुं स्वर्गाचि ही चौपटी, प्रेम लागे किती या मठी ॥७॥
सृष्टिसौंदर्ये ही ओतली, रम्य-भू भोवती शोभली । साठवावी गमे संपुटी, साधुनिया तपस्या तटी ॥८॥
दास तुकड्या मनी गुंगला, पाहता रंगि या रंगला । मुक्ति लाभो इथे शेवटी, नाम-स्मरणी न होवो तुटी ॥९॥

भजन – १९४
खेळे खेळे हरी कुंजनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥धृ॥
भोळि राधा हरी पाहता, वेडि झाली बंसी ऎकता । रंगवी आत्म-रंगातुनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥१॥
जात होती यमुनेतिरी, गोरसाते धरोनी शिरी । माठ फोडी हरी धावुनी, राधिकेच्या मना मोहुनी ॥२॥
दास तुकड्या म्हणे ही लीला, देव गोकुळासी खेळला । उध्दरील्या सख्या गौळणी, राधिकेच्या मना मोहुनी ॥३॥

भजन – १९५
दैव-गती ही न्यारी, बुध्दी काय करील बिचारी ? ॥धृ॥ दानशूर हरिश्चंद्र वाहतो, पाणी डोंबा-द्वारी । श्रीकृष्णासम साह्य असोनी, पांडव फिरति भिकारी ॥ बुध्दी ० ॥१॥
सती दौपदी दैवगतीने, ओढि सभेमाझारी । रामचंद्र प्रभु चौदा वर्षे, भ्रमति पहाडी खोरी ॥ बुध्दी ० ॥२॥
कर्मगतीच्या अवघड मार्गे, वाहति सकल नर-नारी । तुकड्यादास म्हणे होणारे, न चुके देव-असुरी ॥बुध्दी ० ॥३॥

भजन – १९६
जगचालक जगदीशा ! ऎकी करुणा-वाणि परेशा ! ॥धृ॥
विश्व तुझी रचना ही सारी, सुंदर सकल गुणेशा ! । अलंकारकृति नवी विलसते, भिन्न जीवाची ईशा ! ॥ ऎकी ०॥१॥
मोहविते नयनाला निर्मळ, सुरस सरस ही नीशा । तेजवितो जगताला भानू, जिववी जीव हमेशा ॥ ऎकी ०॥२॥
निसर्ग करितो कार्य सुशोभित, ज्या त्या देश-विदेशा । सकल कला ही तुझिया सत्ते, चालतसे सर्वेशा ! ॥ ऎकी ०॥३॥
तुकड्यादास म्हणे हा निश्चय, गति पुराणि नरेशा ! । ऎसे असता भारत-भूची, का सोडियली आशा ? ॥ ऎकी ०॥४॥

भजन – १९७
ओरडुनी सांगावे ? देवा ! काय तुम्हा नच ठावे ? ॥धृ॥
तारुण्याचे कठिण प्रसंगी, मन चोहिकडे धावे । जप-तप-साधन काय करी हे ? चित्त भ्रमे बहिरावे ॥ देवा ! ॥१॥
संत-समागम पुराण-पोथी, जरी ऎकण्या जावे । निद्रा डाकिण बळेच निजवी, हृदया बोध न पावे ॥ देवा ! ॥२॥
तुकड्यादास म्हणे अम्हि ऎसे, साथि कुणाला घ्यावे ? तुझ्या कृपेविण सर्व शीण हा, वदलो सत्य स्वभावे ॥ देवा ! ॥३॥

भजन – १९८
पावन करि यदुराया ! दीना येइ अता ताराया ॥धृ॥
कठिण संकटे भारतभूवर, किति सांगावे सदया ! । माप होइन गणती करिता, तूच जाणता सखया ! ॥ दीना ०॥१॥
जिकडे तिकडे अधर्म झाला, कलि आला बुडवाया । नीति नेम तो कोणि न जाणे, भ्रष्ट जनांची काया ॥ दीना ०॥२॥
जिवा जिवाशी द्रोह मोह अति, मरती स्वार्थ कराया ? । आपण बुडुनी दुसर्‍या बुडवी, पापाचरणी वाया ॥ दीना ०॥३॥
तुकड्यादास म्हणे तुजवाचुनि, कोण उध्दरिल काया । आवर हा प्रभु ! तुझा तमाशा, अती कठिण तव माया ॥ दीना ० ॥४॥

भजन – १९९
अवघड घाट भवाचा, चढता होतो थाट जिवाचा ॥धृ॥
कर्म-नदीची धार उफाळे, लाटसमूह मनाचा । कामक्रोध-मद-मत्सर मासे, करिती नाश तनाचा ॥ चढता ॥१॥
विषय-भोवरा गरगर फिरवी, धाक न ठेवि कुणाचा । जरा भटकता आडमार्गि कुणि, सररर ओढति खाचा ॥ चढता ॥२॥
तुकड्यादास म्हणे तो तरला, होइल भक्त गुरुचा । नाहि तरी चौर्‍यांशी भ्रमणे, घात करी नेमाचा ॥ चढता ॥३॥

भजन – २००
काय कुणाचे नेशी ? अंती तूच गती भोगियशी ॥धृ॥
सांगति संत गोड उपदेशा, दूर तया टाळियशी । अनुभव आल्या वेळ नुरे मग, जाशिल कोणापाशी ? ॥ अंती ०॥१॥
संसाराचे वीष गोड हे, वाटे क्षणि अपुल्यासी । हताश होशिल या भोगाने, दुःखरूप मग होशी ॥ अंती ०॥२॥
स्त्री-पुत्रादिक पाहति मौजा, लावि सगाई खासी । लीन इंद्रिये होतिल जेव्हा, पळतिल दूर घरासी ॥ अंती ०॥३॥
साध साध रे ! काहि तरी, ही वेळ काय खोवियशी ? । तुकड्यादास म्हणे प्रभुराया, घे धरुनी हृदयाशी ॥ अंती ०॥४॥तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

ref: abhangwani 

1 thought on “संत तुकडोजी भजन”

  1. फार सुंदर भजन पाठवले त्या बद्दल सर्वांचे अभिनंदन जय गुरु .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *