संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग

संत जनाबाई अभंग – योगपर

संत जनाबाई अभंग – योगपर

१९७
गगन सर्वत्र तत्त्वतां । त्यासी चिखल लावू जातां ।।१।।
तैसा जाण पांडुरंग भोग भोगुनी निःसंग ॥२॥
सिद्ध सनकादिक। गणगंधर्व अनेक।।३॥
जैसी वांझेची संतती। तैसी संसार उत्पत्ती ॥४॥
तेथे कैचें धरिसी ध्यान दासी जनी ब्रह्म पूर्ण ॥ ५ ॥

१९८
काळाचिये लेख नाहीं ब्रह्मा विष्णु मुख्य ॥१॥
युगा एक लव झडे। तोही न सरे काळापुढें ॥२॥
अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्य केलें ||३॥
महीपाल स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥४॥
वर्म चुकली बापुडीं । दासी जनी विठ्ठल जोडी ||५|

हे पण वाचा: संत जनाबाईचे सर्व अभंग

१९९
रक्तवर्ण त्रिकुट स्नान श्रीहाट पाहे श्वेतवर्ण।।१।।
श्यामवर्ण तें गोलाट निळबिंदु औट पीट॥२॥
वरि भ्रमर गुंफा पाहे । दशमद्वारीं गुरु आहे ।। ३।।
नवद्वारातें भेदुनी दशमद्वारी गेली जनी ॥४॥

२००
शून्यावरी शून्य पाहे तयावरी शून्य आहे ।। १ ।।
प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचें नांव अधः शून्य ॥ २॥
ऊर्ध्वशून्य श्वेतवर्ण मध्यमशून्य श्यामवर्ण ॥ ३॥
महाशून्य वर्ण नीळ त्यांत स्वरूप केवळ ॥४॥
अनुहात घंटा श्रवणीं । ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥५॥

२०१
ज्योत पहा चमकली काय सांगूं त्याची बोली ।। १ ।।
प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥
परापश्यंती मध्यमा। वैखरेची झाली सीमा ।। ३॥
चारी वाचा कुंठित जाहाली सोहं ज्योत प्रकाशली ।।४।।
ज्योत परब्रह्मीं जाणा । जनी म्हणे निरंजना ॥ ५॥

२०२
ज्योत परब्रह्म होय खेचरी दर्पणीनें पाहे ।।१।।
इडा पिंगळा तिन्ही पाहे हृदयभुवना शा ।।२।।
हळू हळू रीघ करी सूक्ष्म हृदय अंतरीं ||३||
हृदय कमळावरी जासी जनी म्हणे मुक्त होसी ॥४॥

२०३
नाहीं आकाश घडणी। पाहा स्वरूपाची खाणी ||१||
स्वरूप हैं अगोचर। गुरु करिती गोचर ||२||
गोचर करिताती जाणा । दृष्टि दिसे निरंजना ||३||
नाहीं हात पाय त्यासी जनी म्हणे स्वरूपासी ॥४॥

२०४
माझे मनीं जें जें होतें तें तें दिधलें अनंतें ।।१।।
देह नेउनी विदेही केलें शांति देउनी मीपण नेलें ॥२॥
मूळ नेलें हें क्रोधाचें। ठाणें केलें विवेकाचें ||३||
निज पदीं दिधला ठाव । जनी म्हणे दाता देव ||४||


शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *