दिंडी

dindi – दिंडी

dindi information marathi

एका विशिष्ट इष्टदेवतेच्या किंवा आराध्यदेवतेच्या तीर्थक्षेत्री, दरवर्षी एका विशिष्ट तिथिस होणाऱ्या उत्सवास हजर राहून तेथे त्या देवतेचे दर्शन घेऊन पुण्य पदरी पडावे म्हणून अभंग अथवा भजने गात,नामस्मरण करीत पायी जाणाऱ्या व्यक्तीसमूहास दिंडी असे म्हणतात.

ज्ञानेश्वर,तुकाराम,नामदेव इत्यादी संत पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाला आपल्या सहकाऱ्यांसह निघत असत. त्यांच्या हाती ध्वज, पताका इत्यादी असायचे. या मिरवणुकीस दिंडी असे म्हणण्यात येत असे.

कालानुरूप याचे स्वरूप बदलले आहे.आता ही दिंडी वारकऱ्यांची निघते. ते आपसात वाटेत येणाऱ्या खर्चासाठी एक ठरावीक रक्कम गोळा करतात व आपल्या गावातून पंढरीस पायी जाण्यास निघतात. या वारीचा उद्देश आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचून विठ्ठलाचे दर्शन घेणे हा असतो.त्यातील बहुतेकांच्या खांद्यावर पताका/ध्वज असतो. कपाळास टिळा, गळ्यात तुळशीची माळ व मुखाने हरिनाम म्हणत वारीतील वारकरी दिंडीतील वारकरी त्यात सामील होतो.

पंढरीची वारी ही ईश्वरी प्रेमाची एक विलक्षण अनुभूती आहे. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. पंढरपुरात वर्षात होणाऱ्या चार वाऱ्यांपैकी आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो संतांच्या-सत्पुरुषांच्या पालख्या पंढरीस येतात. या पालख्यांमध्ये अनेक दिंडया सहभागी असतात. वारी ही साधना असून दिंडी हे एक साधन आहे. या दिंडयांचा व पालख्यांचा इतिहास, परंपरा व वैशिष्टये सांगणारा, श्रीक्षेत्र पंढरपूरचे, संतसाहित्याचे उपासक व अभ्यासक विद्याधर ताठे यांचा विशेष लेख.

वारकरी संप्रदाय हा मानवी जीवनामध्ये परमेश्वरी प्रेमाची अनुभूती वारंवार घेऊन ते जीवन खऱ्या अर्थाने समृध्द व संपन्न कसे करावे याचा सुलभ राजमार्ग सांगणारा संप्रदाय आहे. हिंदू धर्माच्या निरनिराळया अवस्थांतून परिणत होत आलेला तो परिपक्व स्वरूपाचा भक्तिपंथ आहे. संत ज्ञानेश्वर-नामदेव-एकनाथ आणि संत तुकाराम यांच्या परमोच्च अनुभूतीतून व तत्त्वचिंतनातून व आचारातून वारकरी संप्रदाय समृध्द व संपन्न झालेला आहे.

महाराष्ट्रात नांदलेल्या विविध संप्रदायांमध्ये ‘वारकरी संप्रदाय’ हा एक प्रमुख व अग्रणी संप्रदाय आहे. अनेक थोर अभ्यासकांनी या संप्रदायास ‘महाराष्ट्राची सत्त्वधारा’ संबोधून गौरविलेले आहे. डॉ. मु.ग. पानसे महाराष्ट्रीय संतांबद्दल म्हणतात की, महाराष्ट्राप्रमाणे अन्यत्रही संत उदयास आले, पण महाराष्ट्रातील संतांची शिकवण वैशिष्टयपूर्ण आहे. डॉ. प्र.न. जोशी या वैशिष्टयांचा नेमका तपशील देताना म्हणतात – ‘महाराष्ट्रीय संतांच्या शिकवणीने उत्तरेकडील भावनाविवशता व विचारशैथिल्य, तसेच दक्षिणेतील कर्मठपणा व पढीकता यांचा अतिरेक टाकून भक्तिपंथांची वाढ केलेली आहे.’

दिंडी


वारी – मुख्य आचारधर्म

प्रत्येक संप्रदायाचे एक वैशिष्टय असते. तसे वारकरी संप्रदायाचे मुख्य वैशिष्टय म्हणजे ‘वारी’. या वारीवरूनच वारी करणारा म्हणून या संप्रदायास वारकरी संप्रदाय असे नाव पडले आहे. अनेक जण या संप्रदायास भक्तिपंथ, माळकरी पंथ असेही म्हणतात. ‘वारी’ ही खास वारकरी संप्रदायाची संकल्पना आहे. देशात हा शब्द व ही संकल्पना फक्त वारकरी संप्रदायातच आढळते. देशातील अन्य संप्रदायामध्ये ‘यात्रा’ असा धार्मिक शब्द आढळतो. पण ‘यात्रा’ व ‘वारी’ या शब्दात संकल्पनात्मक जमीन-अस्मानाचा फरक आहे. पंढरपूरची ‘यात्रा’ नाही, तर वारी आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त, एखाद्या फडाशी संलग्न होऊन त्या फडाच्या प्रमुखाकडून संकल्पयुक्त तुळशीची माळ गळयात घालतात आणि ठरावीक काळाने, दर वर्षी नियमितपणे विठ्ठलाच्या दर्शनास जातात. श्री विठ्ठलाच्या दर्शनास असे वारंवार जाणे म्हणजे ‘वारी’. संकल्पानुसार ठरावीक काळाने पुन्हा पुन्हा पंढरीला जाणे म्हणजे ‘पंढरीची वारी’ करणे होय!

असंख्य भाविक बालाजी दर्शनास तिरुपतीला जातात. अनेक जण काशीला, तसेच चार धाम दर्शनाला जातात. त्याला वारी म्हणत नाहीत, तर ‘तीर्थयात्रा’ म्हटले जाते. या यात्रा भाविक स्वेच्छेने -स्वत:च्या सोईने केव्हाही व कधीही करतात आणि ठरावीक काळाने वारंवार करीत नाही. जीवनात एकदा काशी यात्रा घडावी अशीच भाविक मनाची इच्छा असते. पण पंढरीची वारी ही एकदाच करण्याची नसून सातत्याने, वारंवार, जन्मभर व पिढयानपिढया करण्याची साधना आहे. ज्यांच्या घरात गेल्या अनेक पिढया ‘पंढरीची वारी’ व्रत म्हणून केली जात आहे. अशी हजारो वारकरी घराणी महाराष्ट्रात आहेत. ‘पंढरीची वारी आहे माझे घरी।’, ‘पंढरीची वारी जयाचिये कुळी।’ या अभंगरचना घरातील व कुळातील परंपरेचे दर्शन घडवितात. श्री बालाजी, श्री काशीविश्वनाथ, श्री बद्रिनाथ, श्री केदारनाथ अशा देवांना दर्शनास जाणाऱ्या भाविक-भक्तांना यात्रेकरू, यात्रिक म्हटले जाते, पण पंढरपूरला नियमित विठ्ठलदर्शनास जाणाऱ्यांना यात्रिक नव्हे, तर ‘वारकरी’ म्हटले जाते. यात्रा व वारी यामध्ये हा फरक आहे.


दिंडी व दिंडीची वैशिष्टये – सामूहिक भक्ती

सातत्य, नियमितपणा हे जसे वारीचे मुख्य वैशिष्टय आहे, तसे दुसरे वैशिष्टय म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाची वारी ही एकटयाने नव्हे, तर समूहाने करायची आहे. पंढरीची वारी ही सामूहिक भक्ती आहे. सर्व विठ्ठलभक्तांनी एकत्र जमून, अभंग गात, टाळमृदुंगाच्या गजरात वाजत गाजत नाचत आनंदाने पंढरीची वारी करण्याची पध्दत आहे. अशा प्रकारे टाळ, मृदुंगासह, हाती भगवी पताका घेऊन अभंग गात, नाचत पंढरीस जाणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहास ‘दिंडी’ म्हटले जाते.

सोपे वर्म आम्हा सांगितले संती।

टाळ दिंडी हाती घेऊनि नाचा॥

‘दिंडी’ हा वारकरी संप्रदायाच्या संघटनात्मक रचनेचा एक वैशिष्टयपूर्ण घटक आहे. एका दिंडीत किती वारकरी असावेत याविषयी काहीही दंडक नाही. 15-20 वारकऱ्यांपासून 1500-2000 वारकरी एका दिंडीत असू शकतात. पण एका दिंडीत वीणाधारक एकच वारकरी असतो. ‘एक वीणा एक दिंडी’ असे थोडक्यात म्हणता येईल. आता दिंडीची ढोबळमानाने रचना पाहू. प्रारंभी भगवी पताका धारण करणारे काही वारकरी, त्यामागे टाळ वाजविणारे टाळकरी वारकरी, मध्ये मृदुंगवादक, त्यामागे गळयात वीणा धारण करणारा वीणेकरी, त्यामागे अन्य महिला वारकरी, त्यांमध्ये काही महिला डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी होतात. अशी सर्वसाधारण एका दिंडीची रचना असते.

कुंचे पताकांचे भार । आले वैष्णव डिंगर ।भेणे पळती यम किंकर । नामे अंबर गर्जतसे ॥

आजी म्या देखिली पंढरी । नाचताती वारकरी ।भार पताकांचे करी । भीमातीरी आनंद ॥                                                           

असे वारकऱ्यांच्या दिंडीचे वर्णन संत ज्ञानदेव-तुकोबांनी केलेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज तेराव्या शतकात अशा प्रकारची वारकरी दिंडी घेऊन पायी चालत पंढरीला गेल्याचे अनेक अभंग आहेत. संत नामदेव-संत जनाबाई आणि संत तुकाराम महाराज यांनीही आपल्या अभंग साहित्यात दिंडीचे वर्णन करणारे अभंग लिहिलेले आहेत.

ते चवदाशे पताका घेऊन। पंढरीस जाण चालले।

असे संत महिपती महाराज यांनी संत तुकोबांच्या दिंडीचे वर्णन केलेले आहे. यानुसार तुकोबांच्या दिंडीत 1400पेक्षा अधिक वारकरी होते, हे स्पष्ट होते. 17व्या शतकात संत तुकोबा महाराज होऊन गेले. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात वैष्णवांची (वारकऱ्यांची) मांदियाळी केली व आळंदी-पंढरपूर दिंडी घेऊन पायी वारी केली. स्वत: ज्ञानदेवांच्याच एका अभंगातून या दिंडीचे वर्णन पाहावयास मिळते. दिंडीचा हा पहिला वाङ्मयीन पुरावा होय. संत नामदेवांच्या अभंगातही दिंडीचे वर्णन आहे. तसेच पुढे संत एकनाथ महाराजांनीसुध्दा वारीचे, दिंडीचे शब्द दर्शन घडविलेले आहे.

आषाढी कार्तिकी पंढरीची वारी।

साधन निर्धारी अन नाही॥ – संत एकनाथ

अशा प्रकारे पंढरीची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचार असून दिंडी हे वारी करण्याचे साधन आहे.


पालखी सोहळे

संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम, तेरावे शतक ते सतरावे शतक अशी 400 वर्षे आपणास वारकरी दिंडयांची परंपरा दिसून येते. संत तुकोबांनंतर त्यांचे बंधू कान्होबा व पुत्र नारायण महाराज पुढे ‘पंढरीची वारी’ करून घराण्याची परंपरा निष्ठेने व भक्तिभावाने सांभाळीत होते. नारायण महाराज यांनी पुढे संत तुकोबांच्या व संत ज्ञानेश्वरांच्या पादुका घेऊन त्या पालखीत ठेवून रथासह पंढरीची वारी सुरू केली. या पालखी समवेत अनेक दिंडया सहभागी झाल्या व त्याला पालखी सोहळयाचे स्वरूप प्राप्त झाले. अलीकडच्या काळातील पालखी सोहळयाचा हा शुभारंभ होय.

सध्या आपण पाहतो तो आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा ज्यांनी सुरू केला, ते हरिभक्तिपरायण हैबतबाबा आरफळकर (पवार). हे प्रारंभी तुकोबा महाराजांचे सुपुत्र नारायण महाराज यांच्या समवेतच पंढरपूरची वारी करीत होते. पण पुढे देहूकर घराण्यांमध्ये भाऊबंदकीचा वाद उद्भवला आणि देहूवरून निघणारा सोहळा आपसातील तंटयामुळे खंडीत झाला. या प्रसंगामुळे व्यथित झालेल्या हैबतबाबा यांनी आळंदीहून नव्याने स्वतंत्र पालखी सोहळयाचा प्रारंभ केला आणि अनेक वारकरी दिंडया या सोहळयात सहभागी झाल्या. आळंदीकर वारकरी, खंडुजीबाबा आणि वासकर यांनी भजनादी कार्याची जबाबदारी घेतली व अंकली (बेळगाव)च्या शितोळे सरदारांनी पालखीसाठी लवाजमा दिला, प्रसादाची व्यवस्था केली आणि अशा प्रकारे आळंदी-पंढरपूर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचा उपक्रम प्रारंभ झाला. प्रत्येक पालखी सोहळयावर एक स्वतंत्र लेख लिहिण्याएवढा हा विषय व्यापक आहे, पण जागेअभावी आपण प्रमुख पालख्यांची अगदी थोडक्यात माहिती घेऊ.

संत ज्ञानदेव पालखी सोहळा – आळंदी ते पंढरपूर

संत तुकोबांचा पालखी सोहळा (देहू ते पंढरपूर)

विविध संतांचे पालखी सोहळे

संत ज्ञानदेव यांची आळंदीहून निघणारी पालखी व संत तुकोबांची देहूहून निघणारी पालखी यांची वृत्तपत्रांतून व टीव्ही वाहिन्यांवर विशेष चर्चा व वृत्तांकन होते. त्या मानाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निघणाऱ्या विविध संत-महंतांच्या पालख्यांना प्रसिध्दी माध्यमे फार प्रसिध्दी देताना दिसत नाही. त्यामुळे राज्यभरातून निघणाऱ्या अन्य अनेक पालखी सोहळयांची लोकांना फारशी माहितीच नसते.

महाराष्ट्रातील गावोगावी होऊन गेलेल्या संतांच्या, सत्पुरुषांच्या नावे त्या त्या परिसरातील वारकरी एकत्र येऊन पालखी काढतात. पालखीत त्या संतांच्या, सत्पुरुषांच्या पादुका किंवा छायाचित्र ठेवले जाते आणि ती पालखी रथामध्ये ठेवून, टाळमृदंगासह वाजत गाजत पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी पायी वाटचाल करीत नेली जाते. पालखीत पादुका वा फोटो नसून प्रत्यक्ष ते संत-सत्पुरुषच आहेत व आपण त्या संतांच्या संगे पंढरीची वारी करीत आहोत, असा भाव प्रत्येक वारकऱ्याच्या मनी मानसी असतो.

महाराष्ट्राच्या कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा सर्व कानाकोपऱ्यांतून अनेक संतांच्या नावे अनेक पालख्या आषाढी वारीस पंढरपूरला येतात. या पालख्यांची संख्या नेहमी वाढत जाते. सध्या 250-300 पालख्या येतात. या पालख्यांसमवेत एकूण सुमारे 4 ते 5 लाख वारकरी पायी पंढरपूरला येत असतात आणि हे पालखी सोहळे गेली अनेक वर्षे सातत्याने येत आहेत. हे सातत्य, हा नियमितपणा म्हणजेच ‘वारी’.

महाराष्ट्रातून विविध भागातून निघणाऱ्या सर्व पालख्यांची माहिती या छोटयाशा लेखात देणे जागेअभावी शक्य नाही. प्रत्येक संतांच्या पालखी सोहळयावर एक स्वतंत्र लेख/ग्रंथ होऊ  शकतो, एवढा हा विषय व्यापक आहे. पण वाचकांना थोडक्यात पूर्ण कल्पना यावी, म्हणून काही प्रमुख पालख्यांची नावे व निघण्याचे ठिकाण खाली देत आहे.

संत मुक्ताईंचा पालखी सोहळा – संत ज्ञानदेवांची भगिनी, योगिनी संत मुक्ताई यांचा पालखी सोहळा जळगाव जिल्ह्यातील ‘मुक्ताईनगर’ येथून ज्येष्ठ शुध्द षष्ठीला निघतो. या पालखीतील वारकरी तब्बल 560 कि.मी. पायी प्रवास करतात आणि त्यासाठी त्यांना 33 दिवस लागतात. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न करता, विठ्ठलनामाच्या जयघोषात हे वारकरी पायी वाटचाल पूर्ण करतात. या पालखी सोहळयाचे हे 308वे वर्ष आहे. 308 वर्षांची ही पायी वाटचाल एक तपश्चर्याच आहे. म्हणून संत म्हणतात – ‘पंढरीची वारी जयाचिये कुळी । त्याची पायधुळी लागो मज।’

संत सोपनकाका पालखी सोहळा – ‘सोपानदेव’ हे संत ज्ञानदेवांचे धाकटे बंधू. तेराव्या शतकात त्यांनी संत ज्ञानदेवांच्या पाठोपाठ एक महिन्याने, मार्गशीर्षात सासवड (जि. पुणे) येथे समाधी घेतली. त्यांच्या नावे आषाढ वद्य द्वादशी रोजी सासवड येथील समाधी मंदिरातून पालखी निघते. ह.भ.प. गोसावीबुवा या पालखीचे संचलन करतात. या पालखीचा मार्ग संत ज्ञानदेवांच्या पालखीपेक्षा वेगळा व स्वतंत्र आहे.

सर्व पालख्यांचा मार्ग वेगवेगळा असतो. त्यायोगे वाटेतील गावागावात भक्तीजागृती होत असते. भजन, प्रवचन, कीर्तन याद्वारे या सर्व पालख्यांद्वारे संपूर्ण महाराष्ट्र नामभक्तीच्या अमृतसिंचनाने सिंचित होतो. या पालख्या म्हणजे जनप्रबोधनांच्या वाहिन्याच आहेत. भक्तिप्रचारासाठी प्रत्येक पालखीचा मार्ग वेगवेगळा असतो. त्यामुळे अनेक गावांना तो आनंद मिळतो.

 संत निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा – संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि गुरू. त्याकाळी शिष्य स्वत:चे नाव गुरूच्या नावातच समर्पित करीत असे. म्हणून संत ज्ञानदेवांनी ‘निवृत्तीदासू’या नावानेच ज्ञानेश्वरीचे लेखन केलेले आहे. श्रीगुरू संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. त्यांच्या समाधी मंदिरातून पालखी सोहळा निघतो व सातपूर-नाशिक-बेलापूर-राहुरी-करमाळामार्गे पंढरीस जातो. या पालखी सोहळयात 5-7 हजार वारकरी असतात.

संत एकनाथांचा पालखी सोहळा – औरंगाबादजवळ पैठण ही संत एकनाथांची कर्मभूमी, तेथेच त्यांची दोन मंदिरे आहेत. या मंदिरातून ज्येष्ठ वद्य 7 रोजी पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो. चनकवाडी-मुंगी-राक्षसभुवन-परांडा-अरण-करकंबमार्गे ही पालखी पंढरीला जाते. पंढरपुरात नाथ मंदिरात या पालखीचा आषाढी वारीच्या काळात मुक्काम असतो. गोपाळपूरच्या काल्याने वारीची सांगता झाल्यावर ही पालखी पैठणला परतते. परतीचा मार्ग मात्र वेगळा आहे.

श्रीगुरू जनार्दनस्वामी पालखी सोहळा – श्री जनार्दनस्वामी हे थोर साक्षात्कारी सत्पुरुष होते. ते दौलताबादच्या किल्ल्याचे किल्लेदार होते आणि संत एकनाथ महाराज यांचे गुरू होते. त्यांची पालखी दौलताबाद येथून निघते व औरंगाबाद-वांजोळी-घोघरगाव-तरटगाव-करमाळे-करकंबमार्गे वाखरी-पंढरपुरी जाते. इ.स. 1998 साली ह.भ.प. बाबूराव आनंदे यांनी या पालखी सोहळयाची सुरुवात केली, अशी नोंद आहे.

श्रीगुरू बाबाजी चैतन्यमहाराज पालखी सोहळा – श्री बाबाजी चैतन्य हे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरू होत. संत तुकोबांचा गुरू उपदेशाच्या अभंगात बाबाजी चैतन्य यांचा उल्लेख आहे. यांची पालखी ओतूर (जुन्नर-पुणे) येथून निघते. ओतूर येथे मांडवी नदीकाठी बाबाजी चैतन्यांचे मंदिर आहे. पारनेर-श्रीगोंदा-राशिन-टेंभुर्णी-अरणमार्गे ही पालखी पंढरपुरास जाते.

संत गजानन महाराज (शेगाव) पालखी सोहळा – आधुनिक संतांमध्ये अक्कलकोट स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, शिर्डीचे साईबाबा यांच्याबरोबरच गजानन महाराजांचा भाविक वर्ग खूप मोठा आहे. शेगाव संस्थान हे एक आदर्श असे संस्थान आहे. त्यांनी केलेली भक्तोपयोगी सेवा कार्ये खूपच स्तुत्य आहेत. शेगावच्या गजानन महाराजांचा पालखी सोहळा विदर्भातून पंढरीस येणारा सर्वात मोठा व भव्य असतो. शेगावमधून ज्येष्ठ शुध्द अष्टमीला हा सोहळा पंढरीकडे निघतो आणि सलग 31 दिवस पायी वाटचाल करीत पंढरीस पोहोचतो. पंढरीत शेगाव संस्थानचा भलामोठा सुरेख असा मठ आहे. तेथे ही पालखी उतरते. या पालखीसमवेत 10-12 हजार वारकरी पंढरीस येतात. यात वेगवेगळया अनेक दिंडया नसतात. सर्व वारकरी एकाच दिंडीचा भाग म्हणून चालतात. त्यामुळे या पालखी सोहळयास ‘गजानन महाराजांची दिंडी’ असे म्हटले जाते. ह.भ.प. पुरुषोत्तम पाटील यांनी या दिंडीची सुरुवात केली आहे.

याशिवाय पुढील गावातून काही संतांच्या नावे पालख्या निघतात-

सुदुंबरे येथून निघणारी संत तुकारामांचे शिष्य संत जगनाडे यांची पालखी.
सुदुंबरे येथून निघणारी संत तुकारामांचे शिष्य संत गवरशेटवाणी यांची पालखी.
देवळे मेथवडे (जि.सातारा) समर्थ रामदास स्वामींची पालखी.
पिंपळनेरहून संत निळोबाराय यांची पालखी.
मंगळवेढयाहून संत दामाजींची पालखी.
अरण (जि. सोलापूर) संत सावता माळी यांची पालखी.
मेहुणपुराहून संत चोखामेळयांचा मेहुणा संत बंका यांची पालखी.
नागपूरहून वेणीराम महाराज पालखी.
सज्जनगडहून समर्थ रामदासांची पालखी.
अमरावतीहून गोमेन यांची (कैकाडी मठ) पालखी.
नागपूरहून श्री हनुमान पालखी.
देवडीठाणाहून लिंबराज महाराज पालखी.
मूर्तजापूरहून श्री गाडगे महाराज पालखी.
ताहराबादहून श्री महिपती महाराज पालखी.

अशी पालख्यांची खूप मोठी यादी आहे. पण जागेअभावी प्रातिनिधिक स्वरूपात ही नावे दिली आहेत. पालखी सोहळयाप्रमाणे काही ठिकाणांहून मोठमोठया दिंडया पंढरपुरास येतात. नगर जिल्ह्यातील भगवानगड (पाथर्डी) येथून तसेच बीड जिल्ह्यातील नारायणगढ येथून आषाढी वारीसाठी दिंडया निघतात.अशा दिंडयांची संख्याही खूप मोठी आहे.

श्रीक्षेत्र पंढरपूर हे संतांचे माहेर आहे. पंढरपरचा पांडुरंग, श्रीविठ्ठल हा संतांच्या दृष्टीने ‘आनंदाचा कंद’ व ‘सर्व सुखाचा आगर’ आहे. अशा या भूवैकुंठ पंढरीमध्ये एका वर्षात चार प्रमुख वाऱ्या (यात्रा) होतात. या चार वाऱ्यांपैकी ‘आषाढी वारी’ ही सर्वात प्रमुख मानली जाते. आषाढ शुध्द एकादशीला ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. या दिवसाला वारकरी संप्रदायात महापर्वकाळाचे महत्त्व आहे. आषाढीनंतर ‘कार्तिकी वारी’चे महत्त्व मानले जाते. आषाढी वारीपासून पंढरपुरात चतुर्मास प्रारंभ होतो व कार्तिकवारीने चतुर्मासाची सांगता होते. कार्तिक शुध्द एकादशीला ‘प्रबोधन, देवोत्थान एकादशी’ म्हणतात. अशी प्रत्येक एकादशीला स्वतंत्र नावे असून प्रत्येक एकादशीची एक कथाही आहे.

आषाढी वारी ही मुख्य वारी असल्याने सर्व संतांच्या पालख्या या वारीस पंढरीला येतात. पंढरपुरातील अन्य कार्तिक वारी, माघ वारी व चैत्र वारी यांना पालख्या आणल्या जात नाहीत. या तीन वाऱ्यांना वारकरी दिंडया घेऊन येतात. कर्नाटक, कोकण भागातील वारकरी या चारपैकी ठरलेल्या एका वारीला नियमितपणे येतात. महाराष्ट्राबाहेरून कर्नाटक व आंध्र, तामिळनाडू येथूनही मोठया संख्येने वारकरी पंढरपूरची वारी करतात. कर्नाटकातील संत पुरंदरदास हे विठ्ठलभक्त वारकरी संत होते.

दिंडया व पालख्या सोहळयाचे पूर्वीचे स्वरूप आता पार बदलून गेलेले आहे. पूर्वी सामानासाठी बैलगाडया घेऊन वारकरी पालखीत येत होते. आता मालट्रक, मोटारगाडया, मोबाइल यांनी वारीला आधुनिक केले आहे. दिंडया, पालख्या, वारीमध्ये कालसापेक्ष आधुनिकता आली असली व बाह्यांग बदल दिसत असला, तरी वारीचे अंतरंग आजही पूर्वीप्रमाणे भक्तिभावाने चिंब भिजलेले आहे. वारीचा आत्मा आजही विठ्ठलरूपच आहे. तीर्थ विठ्ठल । क्षेत्र विठ्ठल । देव विठ्ठल । देवपूजा विठ्ठल । अशी विठ्ठलमय आहे.

आषाढी, कार्तिकी विसरू नका मज। सांगतसे गुज पांडुरंग॥

असे खुद्द देव पांडुरंगच त्यांच्या भक्तांना साद घालतो, हे वारीमागसे रहस्य आहे. म्हणून ज्ञानदेवासारखे बुध्दिभास्कर संत तत्त्वज्ञही म्हणतात की – माझी जिवाची आवडी। पंढरपुरा नेईन गुढी। रामकृष्ण हरी।


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

dindi information marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *