आदिनाथें उपदेश पार्वतीस केला - संत बहिणाबाई पाठक अभंग

भ्रतारें टाकिलें मोट बांधोनिया-संत बहिणाबाई अभंग

भ्रतारें टाकिलें मोट बांधोनिया-संत बहिणाबाई अभंग


भ्रतारें टाकिलें मोट बांधोनिया ।
न सोसी ते तया क्लेशावस्था ॥ १ ॥
चतुर्थ दिवशीं जीव टाकियेला ।
विठ्ठलें दाविला चमत्कारु ॥ २ ॥
ब्राह्मणाच्या रूपें येवोनी सांगत ।
सावधान चित्त करीं पुढें ॥ ३ ॥
अंतरीं सावध होउनी राहिलें ।
चित्त म्यां गोविलें तुकोबासी ॥ ४ ॥
वत्स गेलीयासी दिवस सातवा ।
येवोनी तुकोबा स्वप्नामाजीं ॥ ५ ॥
केले समाधान पाजिलें अमृत ।
वत्सासी करीत गाय भेटी ॥ ६ ॥
अमृता पाजोनी सांगितला मंत्र ।
जो कां हा सर्वत्र लोक जपती ॥ ७ ॥
मस्तकीं हस्तक ठेवोनिया कृपा ।
केली त्या स्वरूपा तोची जाणे ॥ ८ ॥
कृपेचा महिमा आहे तो अपार ।
वत्स बोले सार श्लोकअर्थ ॥ ९ ॥
आठवे दिवशीं सावध इंद्रियें ।
अमृतें धालिये तुकोबाच्या ॥ १० ॥
तेधवां ती गाय देखिली सन्मुख ।
निमालीसे देख वत्स कळे ॥ ११ ॥
म्हणे या वत्सातें पाजिलें अमृतु ।
तयासी तो मृत्यु कदां नोहे ॥ १२॥
अमर तें वत्स आहे मजपासीं ।
चित्त अमृतासी घेत गोडी ॥ १३ ॥
बहिणी म्हणे इतुकें वर्तलीयावरी ।
पुढेंही विस्तारीं सांगिजेल ॥ १४ ॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

भ्रतारें टाकिलें मोट बांधोनिया-संत बहिणाबाई अभंग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *