संत ज्ञानेश्वर गाथा ९०४ ते १०३८

संत ज्ञानेश्वर गाथा ९०४ ते १०३९

संत ज्ञानेश्वर गाथा ९०४ ते १०३९ विडिओ सहित  श्रीज्ञानेश्वर महाराजांची गाथा म्हणजे विठ्ठल प्राप्तीचा एक सोपा मार्ग. यात विठ्ठ्लाच्या सगुणनिर्गुण रूपाचे मोहक वर्णन केलेले आहे.


संत ज्ञानेश्वर गाथा ९०४ ते १०३९

९०४
अनुपम्य मनोहर ।
कांसे शोभे पितांबर ।
चरणीं ब्रिदाचा तोडर ।
देखिला देवो ॥१॥ योगियांची कसवटी ।
दावितसे नेत्रपुटीं ।
उभा भीवरेच्या तटीं ।
देखिला देवो ॥२॥ बापरखुमादेविवरू ।
पुंडलिका अभयकरू ।
परब्रह्म साहाकारू ।
देखिला देवो ॥३॥
अर्थ:-
उपमारहित अत्यंत मनोहर रूप ज्या श्रीविठ्ठलाचे आहे, ज्याच्या कमरेला पीतांबर शोभत आहे, भक्तोध्दाराचा निश्चय हेच ज्याच्या पायांतील तोडे आहेत, असा श्रीविठोबाराय मी पाहिला हो. ॥१॥ तो विठोबाराय म्हणजे योग्यांची कसवटी आहे, हे त्याच्या नेत्रावरूनच दिसते.असा चंद्रभागेच्या तटावर उभा राहिलेला देवाधिदेव मी पाहिला हो. ॥२॥ त्याचप्रमाणे पुंडलिकाला अभयकर देऊन त्याला सहाय्य करणारा असा श्रीविठोबाराय मी पाहिला हो. ॥३॥


९०५
साती वारी दोन्ही आपणचि होउनि ।
सुरतरुमाझारीं ओळगे ॥
तळीं त्रिभंगी मांडूनि ठाण घेऊनि मेघाचें मान ।
विजु एकी वेढून बरवे गर्जतु गे माये ॥१॥
नवलावो गे माये न्याहाळितां कैसे मनाचे नयन उमळताती ।
तीही एक दृष्टि जिव्हा लाभती तरी सुलभु देखतां बोलती गे माये ॥धृ॥
पाहो याचे पाय ।
शंभूचिया माथां माये ।
सासिन्नली चंद्रदाहे गंगेतें ॥तेथ असुरांचीं शिरें ।
येथ सकळ शरीरें ।
तोडराचेनि बडिवारें गर्जतु गे माये ॥२॥
तेज सांवळें ।
रूप लाधलें परिमळें ।
अनंगाचेनि सळें ।
कासें कासियेला ॥तो पालऊ पांढर गळें ।
होतुका जगाचे डोळे ।
दुरुनियां सुनिळें रोविले गे माये ॥३॥
उपनिषदाचा गाभा ।
माजीं सौदर्याची शोभा ।
मांडिला दो खांबा ।
तैसा दिसे देखा ।
वेगळालिया कुंभस्थळा ।
परी हातु सरळा ।
पालटु बांधिला माळा ।
मेखळामिसें गे माये ॥४॥
भलतेउती वाहे न वाहे नदी ।
जेवीं स्थिरावे अगाधीं ।
तैसी पुंजाळता हे मांदी ।
दोंदी वेदांची ॥वरिलिया वक्षस्थळा ।
नुपुरे स्थानीचा डोळा ।
मागून निघे कमळा ।
नव्हे रोमराजी ॥५॥
लावण्य उदधी वेळा ।
तेंचि पैं वैजयंती माळा ।
वरी शोभतसे सोहळा ।
साकारवेचा ।
म्हणो प्रेम सुकाळा ।
जग मेळवितु गे माये ॥६॥
भोंवतीं तारांगणें पुंजु ।
माजीं अचळ सुरिजु ।
आला वक्षस्थळा उजु ।
कैसा दिसे देखा ॥जेवणेंनि अंगें ।
उभऊनि श्रीकरायोगें ।
योगनादातटीं रंगे ।
नभु दुमदुमतवो माये ॥७॥
इंद्रधनुष्य काढिलें ।
तया तळीं बहुडलें ।
तेंचि कुरळी वेढिलें ।
समाधिसुख देखा ॥अधरीचा गुणु ।
श्रुतीगर्भी समवर्णु ।
दोही खरीं गोडी वेणु ।
जग निववीतु वो माये ॥८॥
या वेधितां कांहींच नुरे ।
रूपा आलें हेंचि खरें ।
वरीं दावितां हें माजिरें ।
गोपवेशाचें ॥तमावरी हातियेरे ।
रविकाज काईये रे ।
तैसा रखुमादेविवरें ।
वीरें घेतलें गे माये ॥९॥
अर्थ:-
छत्रधर वगैरे मंडळीसह दोन्ही बाजूने आपणच होऊन, कल्पतरूच्या झाडाखाली दिडका उभा राहून, मेघासारखी कांती असणारा भगवान श्रीकृष्ण, विजेप्रमाणे लखलखीत स्वच्छ वस्र नेसून, गर्जना करीत आहे ग बाई ! ॥१॥ त्याला पाहताना मोठा चमत्कार वाटतो; त्याला पाहताना जणूकाय मनाचे डोळे उघडून त्याच्या स्वरूपाचा स्वाद घेण्याकरिता जिव्हा झाली की काय असे वाटते; म्हणून त्याला पाहण्याला किंवा त्याच्याशी बोलण्याला, तो मोठा सुलभ झाला ग भई ! ॥धृ॥ अंगाचा दाह झाला म्हणून आपल्या मस्तकावर चंद्र व गंगा धारण केली आहे, असा शंकर, या श्रीहरीच्या पायावर मस्तक ठेवीत आहे असा दिसतो ग बाई ! तेथे असुरांची शिरे वगैरे नम्र झालेली दिसतात; पायातल्या तोड्याच्या शोभेने ते शोभतात ग बाई ! ॥२॥ ते तेजस्वी सावळें रूप ज्यात परिमळ आहे, असे आज डोळ्याला लागले ग बाई ! आणि मदनाची शोभा नाहीशी करणारा पीतांबर कासेला नेसला आहे, त्याच्या सुंदर पदराकडे सगळ्या जगाचें डोळे लागले आहेत, दुरून पाहणाराला सुंदर शामवर्णाचे रूप तेथे ठाम उभे आहे असे वाटते. ॥३॥ जो श्रीकृष्ण परमात्मा उपनिषदांचे प्रतिपाद्य गुह्य असून हल्ली गवळ्यांच्या समुदायमध्ये अत्यंत सौदर्याची शोभा होऊन, लोकांच्या डोळ्यासमोर मांडलेला आहे; त्याला ज्यांनी ज्या भावनेने पाहावे त्यास तो तसा दिसतो.ज्याचे गंडस्थळ वेगळे वेगळे असून ज्याचे हात सरळ आहेत, ज्याच्या गळ्यात पुष्कळ माळा आहेत व ज्याच्या कमरेला मेखळा आहे ॥४॥ वाटेल तशी वाहणारी नदी असली तरी अगाध समुद्राच्या ठिकाणी ज्याप्रमाणे निश्चळ होते, त्याप्रमाणे वेदाने ज्याच्या स्वरूपाचे सौंदर्य महत्वाने वर्णन केले आहे, तो याप्रमाणे स्थिररूपाने उभा आहे.ज्याच्या वक्षस्थळावरती नजर ठरत नाही, कमला म्हणजे लक्ष्मी ज्याच्यापासून मागे सरत नाही ॥५॥ ज्याच्या गळ्यातील वैजयंती माळेने सौंदर्याच्या उदधीला भरती आल्यासारखी दिसते, म्हणजे सगुण रूपाची शोभा दिसते, तो भक्तांच्या प्रेमाकरिता या सगुणाच्या थडीला येऊन सर्वांनाच प्राप्त झाला आहे आणि जगाच्या नयनाला त्याचे स्वरूपसुख मिळून सुखाचा सुकाळ झाला आहे. ॥६॥ भोवतालच्या तारांगणाच्या पुंजामध्ये जसा चंद्र शोभतो, त्याप्रमाणे भोवतालच्या शोभेपेक्षा वक्षस्थळाची शोभा कशी सुंदर दिसते पहा ! श्रीकृष्ण उजवा हात उभारून मुरली वाजवित आहे, त्या मुरलीचा नाद इतका मधुर आहे की, त्याने श्रीकृष्ण स्वतःच योगनादाच्या तटाकी रंगून जातो आणि त्या मुरलीच्या नादाने सर्व आकाश दुमदुमून जाते हो ! ॥७॥ भगवंंताचे कुरूळे केश इंद्रधनुष्याचा रंग काढूच रंगविले आहेत की काय ? किंवा त्या केसाच्या खाली समाधीसुख राहिले आहे की काय असे वाटते.पाहा ! अधरात धरलेल्या वेणूचा गुण कसा आहे तो.त्या शब्दात सर्व वर्ण व्यवस्थेने असून दोन्ही बाजूने जोड वेणू वाजवून भक्तांना शांत करीत आहे ग बाई ! ॥८॥ याच्या स्वरूपाचा वेध लागला असताना, बाकी काहीच उरत नाही.मनाला मोह उत्पन्न करणारे असे हे गोपाचे स्वरूप आहे.ज्याचे दर्शन झाले असताना स्वरूपाचा नाश होतो, त्याच्यापुढे सूर्याची काय कथा आहे ! या रीतीने रखमादेवीचा वर जो विठ्ठलवीर त्याने हा गोपवेष घेतला ग बाई ! ॥९॥ ॥जय जय ज्ञानेश्वर माऊली ॥


९०६
पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळा फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजः पुंजाळले ।
न वर्णवे तेथीची शोभा ॥१॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकू
शब्देंवीण संवादु दुजेविण अनुवादु ।
हें तंव कैसेंनि गमे ।
परेहि परतें बोलणें खुंटलें ।
वैखरी कैसेंनि सांगे ॥३॥
पाया पडुं गेलें तंव पाउलचि न दिसे ।
उभाचि स्वयंभु असे ।
समोर कीं पाठीमोरा न कळे ।
ठकचि पडिलें कैसें ॥४॥
क्षेमालागीं जीव उतावीळ माझा ।
म्हणवूनि स्फुरताती बाहो ।
क्षेम देऊं गेले तंव मीची मी एकली ।
आसावला जीव राहो ॥५॥
बाप रखुमादेविवरू ह्रदयींचा जाणुनि ।
अनुभवु सौरसु केला ।
दृष्टीचा डोळा पाहों मी गेलीये ।
तंव भीतरीं पालटु झाला ॥६॥
अर्थ:-
पांडुरंगाच्या कांतीवर दिव्य तेज झळकत आहे. जणुकाही रत्नाची प्रभाच झळकत आहे.त्याचे अगणित लावण्य व तेजपुंज रुप दिसते आहे. त्या शोभेचे वर्णन अवर्णनिय आहे. असा हा कळण्यास अवघड किंवा कर्नाटकातुन आला म्हणुन कानडा म्हंटला जाणारा विठ्ठल, त्याने माझ्या मनाचा वेध घेतला आहे.मायेची खोळ अंगावर घेऊन तो मला खुण करतो आहे व मी आळवुन हाक मारली तरी प्रतिसाद देत नाही. शब्दाविण संवाद अशक्य व दुसरा असल्याशिवाय अनुवाद शक्य नाही.पण हे त्याला कसे जमते हे मला कळत नाही. ज्याचे वर्णन करायला परेच्या आधीची वाणी अवस्था अपुरी पडेल त्याचे वर्णन ही वैखरी कशी करेल. त्याच्या पाया पडायला गेलो तर पाऊल दिसत नाही.तो सगळा स्वयंभु उभा आहे.तो समोर आहे की पाठमोरा आहे ते कळत नाही. हे सगळे अनुभव आल्यावर माझ्या मनाला ठक पडले आहे. त्याला आलिंगन देऊन क्षेम द्यावे म्हणुन मी माझ्या बाह्या स्पुरत आहेत पण मी जेंव्हा आलिंगन द्यावयास गेले तर मी एकटीच असल्याची जाणिव मला होत आहे. त्यामुळे त्याच्यासाठी माझा जीव आसावलेलाच आहे. त्याला माझ्या हृदयीचा जाणुन मी माझ्या अनुभवाने पाहावयास गेले तर तो मला हृदयात स्थापित झालेला जाणवला असे माऊली सांगतात.


९०७
देवो आहे जैसा तैसा नेणवे सहसा ।
भांबावला कैसा विश्वजनु ॥
तया रुप ना रेखा लय ना लक्षण ।
ते प्रतिमेंसी आणुन वासनारुपें ॥
देव सर्वगत निराळा अद्वैत ।
तया मुर्तीमंत ध्याई जेतु ॥
तिही देवासी आकारु जेथुनि विस्तारु ।
तो ध्वनी ओंकारु त्या आरुता ॥
तेथे नाद ना बिंदु कळा ना छंदु ।
अक्षय परमानंदु सदोदितु ॥
अवतरे तैसाच नव्हे होय तें न संभवे ।
आहे हें आघवें लाघव रया ॥
तो एकवट एकला रचला ना वेचला ।
आदि अंची संचला अनंतपणें ॥
पृथ्वी आप तेज वायु आकाश ।
हीं सकळही हारपती प्रळयांतीं ॥
तीं निरशुन्य निरुपम निरंजन निर्वाण ।
ते दशा पाषाण केवीं पावती ॥
पाहता या डोळा न दिसे काही केल्या ।
व्यापुनियां ठेला बाहिजु भीतरीं ॥
तो पदपिंडा आतीतु भावाभावविरहितु ।
बापरखुमादेवीवर विठ्ठलु हृदयांआतु रया ॥
अर्थ:-
देव जसा आहे तसा तो कळत नाही.आशी भांबावलेली अवस्था विश्वातील लोकांची झाली आहे. त्याला रुप रेखा नाही कोणतेही लक्षण सांगता येत नाही. जो तो आपल्या इच्छे प्रमाणे त्याला आकारत असतो. तो सर्वगत अद्वैत असा निराळाच आहे त्याला मूर्तीरुप मानुन लोक त्याचे ध्यान करतात.तिन्ही मुख्य देवतांचा एकत्रीत आकार हा त्याचा विस्तार आहे.तोच निराकार ओकांर ध्वनी आहे. त्याच्या ठायी नाद नाही बिंदु नाही कळा नाही छंद नाहीत त्याच्या जवळ अक्षय परमानंद आहे. जसा तो अवतरतो तसा नसतो व जे खरे स्वरुप आहे तेच ते अवतारात नसते.हे लाघव आवे त्या मायेमुळे आहे.तो एकटा आहे ना त्याला कोणी रचला ना कोणी वेचुन आणला. तो सुरवात व शेवट यांच्यात अनंतरुपाने संचला आहे.सर्व पंचमहाभूते त्याच्यात लुप्त होतात.काही नसलेली निरशुन्य अवस्था, ती निरुपम अवस्था, निरंजन अवस्था त्या दशा त्या पाषाण मूर्तीत कशा दिसतील.त्याला पाहायला गेले तर तो दिसत नाही पण तोच अंतरबाह्य व्यापून राहिला आहे. तो पदपिंडाच्या आतील भावाभावविरहित असलेला तो माझ्या हृदयात स्थापित झाला आहे असे माऊली सांगतात.


९०८
सर्वादि सर्वसाक्षी तो ।
विश्वंभर खल्विद तो गे बाई ॥
आनंदा आनंदु तो ।
प्रबोधा तो गे बाई ॥
राखुमादेविवरू तो ।
विटेवरी उभा तो गे बाई ॥
अर्थ:-
विश्वाचे पोषण करणारा तो सर्वांचा आदि आहे व तोच सर्वाला साक्षही आहे. तो आनंदाचा आनंद व ज्ञानाचे ज्ञान आहे. व तोच वीटेवर येऊन उभा असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


९०९
जरासंदुमल्लमर्दनु तो ।
गजपित्राहटणु तो गे बाई ॥
कूब्जकपान तो ।
सुदाम्या अनुसंधान तो गे बाई ॥
रखुमादेविवरु तो ।
कंसचाणुर मर्दन तो ग बाई ॥
अर्थ:-
हे जीवरुपी सखी जरासंधाला मल्ल युध्दातुन मारणारा व हत्तीला नक्रापासुन वाचवणारा तोच आहे. कुब्जेला भोग देणारा व सुदाम्याची मदत करणारा तोच आहे. कंस व चाणुर यांचे मंर्दन करणारा तो रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


९१०
कांही नव्हे तो ।
मूर्ताsमूर्त तो गे बाई ॥
सहजा सहज तो ।
सहज सुखनिधान तो गे बाई ॥
रखुमादेविवरु तो ।
पुंडलिकवरद तो गे बाई ॥
अर्थ:-
जीवरुपी सखी, तो काही नसणारा, पण मूर्त अमूर्त असणारा, तोच आहे. सुखनिधान आहे,सहज करणारा तोच आहे व तोच सहजातील सहजत्व आहे. तोच पुंडलिकाला वरदान देणारा रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.


९११
निळिये मंडळी निळवर्ण सांवळी ।
तेथें वेधलिसे बाळी ध्यान रुपा ॥
वेधु वेधला निळा पाहे घननिळा ।
विरहणी केवळा रंग रसने ॥
नीळवर्ण अंध निळवर्ण स्वयंभ ।
वेधे वेधु न लभे वैकुंठीचा ॥
ज्ञानदेव निळी हृदयीं सांवळी ।
प्रेमरसे कल्लोळी बुडी देत ॥
अर्थ:-
निलवर्ण आकाशा सारखा सावळा पण निळी झाक असलेला कृष्ण बाल्यावस्तेत पाहिल्यावर त्याच्या दर्शनाचे वेध लागले. त्या आकाशीच्या निळेपणाला पाहुन त्या घननिळाचे वेध लागलेली विरहिणी त्याचे नामस्मरण तोंडाने करु लागली. तो घननिळा व त्या निळ्यारंगात रंगलेली विरहिणी मात्र तो वैकुंठाचा निळा भेटत नाही त्याचे तिला वेध लागले आहेत. त्या निलवर्ण असलेल्याला माझ्या हृदयात त्याच निळ्यारंगाने रंगुन त्यात प्रेमरस कल्लोळ करुन बुडी दिली असे माऊली सांगतात.


९१२
निळिये सारणी वाहे मोतियाचे पाणी ।
चिंतामणी अंगणी पेरियेला ॥
कैसा हा माव करुं गोविला संसारु ।
कृष्णसंगे धुरंधरे तरलो आम्ही ॥
हिरियाची खाणी दिव्य तेज मणी ।
सांपडला अंगणी सये मज ॥
सूर्यकर रश्मी चंद्र बहुतादां वर्‍हाडा आलेसी बाळामस्मि ।
प्रकट झाल्या रश्मी जेथूनियां ॥
कल्पतरु चोखु चिंतामणी वेखु ।
मना माझी हरिखु देखियेला ॥
ज्ञानदेवी वल्ली विद्युल्लता सलिलीं ।
फळपाकें दुल्ली दुभिनल्या ॥
अर्थ:-
निळ्या मोत्यांच्या पाटातुन अंगणात पेरलेल्या चिंतामणीला पाणी दिले. त्या संसाराच्या मायेतुन आम्ही त्या कृष्णकृपेने तरलो. तो हिऱ्याच्या खाणीतील दिव्य मणी मनाच्या अंगणात सांपडला. चंद्र व सूर्य ह्यातुन प्रगट झालेल्या रश्मी त्याच्या पासुनच तयार झाल्या आहेत. कल्पतरु व चिंतामणी समान असलेला तो पाहिला की मला आनंद वाटत आहे. विद्युलतेच्या कडकडाटात होणाऱ्या वृष्टीमुळे फळ व फुले खुप येतात तसाच आनंद श्रीकृष्ण दर्शनाने होतो असे माऊली सांगतात.


९१३
नवाहुनि परतें तेंराहुनि आरुते ।
अंबरहुनि परतें काळे दिसे ॥
तेथें सातही मावळलीं पांचांहूनि परतें ।
बाहुकाळे निरुते देखिले डोळा ॥
तेथे सत्रावी दुभते योगिया पुरते ।
बहुकाळ निरुते सारासार देखा ॥
बापरखुमादेविवरू अभोक्ता भोगिला ।
काळेपणे जाला अमोलिक ॥
अर्थ:-
पाच ज्ञानेंद्रिये व मन बुध्दी चित्त व अहंकार मिळुन नऊ व दहा इंद्रिय मन बुध्दी व चित्त असे तेरा अशा नऊ व तेरा ह्याऊन वेगळे असलेले हे रुप आकाशाच्या पेक्षा काळे आहे. सप्त धातु व पंच प्राण ह्या पेक्षा निराळे असलेले असे बहु काळे असलेले वेगळे असणारे रुप मी पाहिले आहे. सतरा परमानंदाच्या कळा असलेले योगियांच्या पुरते असलेले सारासाराचे सार असलेले ते स्वरुप आहे. मी त्याच्या काळेपणा अनमोल मानुन अभोक्ता अ़सलेल्या रखुमाईच्या पतीला भोगला असे माऊली सांगतात.


९१४
आजि देखिलें रे आजि देखिले रे ॥
सबाह्य अभ्यंतरी ।
अवघा व्यापकु मुरारी ॥
दृढ विटे मन मुळी ।
विराजीत वनमाळी ॥
आजि सोनियाचा दिनु ।
वरी अमृतातें वरिषे धनु ॥
बरवा संतसमागमु ।
प्रकटला आत्मारामु ॥
बाप रखुमादेविवरू ।
कृपासिंधु करुणाकरू ॥
अर्थ:-
अंतर्बाह्य व्यापुन असलेला तो मुरारी आज मी पाहिला.त्या विटेवर दृढ उभा असलेला तो वनमाळी आहे. आज माझ्यासाठी त्यामुळे सोन्याचा दिवस आहे. तो मेघ स्वरुप होऊन आमच्यावर अमृताचा वर्षाव करतो. त्या संतसमागमालाठी तो आत्माराम प्रगट झाला आहे. तो कृपा करणारा कृपासिंधु रखुमाईचा पती व माझा पिता आहे असे माऊली सांगतात.


९१५
एक तत्व नाम दृढ धरीं मना ।
हरीसी करुणा ये‌ईल तुझी ॥१॥
तें नाम सोपें रे राम-कृष्ण गोविंद ।
वाचेसी सद्गद जपे आधीं ॥२॥
नामापरतें तत्त्व नाहीं रे अन्यथा ।
वायां आणिका पंथा जासील झणीं ॥३॥
ज्ञानदेवा मौन जप माळ अंतरी ।
धरोनी श्रीहरि जपे सदां ॥४॥
अर्थ:-
एकतत्व असणारे नाम सतत दृढतेने घेतले तर हरिला त्या जीवाची करुणा येते. ते नाम घेणे हे सहज सोपे आहे परंतु जिव्हेवर सतत ते घेतले पाहिजे. नामाशिवाय अन्य दुसरे तत्व नाही दुसरा पंथ दुसरे तत्व नाहीच. मी सतत मौनात जपमाळ अंतरात श्रीहरीचे नाम जपत असतो असे माऊली सांगतात.


९१६
सोनियाचा दिवस आजि अमृते पाहाला ।
नाम आठविता रूपी प्रकट पै झाला ॥
गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना ।
आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ॥
तनु मनु शरण विनटलो तुझ्या पायीं ।
बापरखुमादेविवरावाचूनि आनु नेणें कांहीं ॥
अर्थ:-
आजचा दिवस सोन्याचा आहे कारण नुसते नामस्मरण करायचे आठवले तर तो परमात्मा नामरुपानेच प्रगट झाला. हे गोपाळा तुझे ध्यान सतत माझ्या मनाला लागो तसे झाले तर हे जगजीवना मी क्षणभर ही नामस्मरण करताना विसंबणार नाही. रखुमाईचे पती व माझे पिता श्री विठ्ठलाखेरीज मी अन्य ठिकाणी काय वाचा मनाने विनटलो नाही असे माऊली सांगतात.


९१७
समाधि धन्य रामनामें ।
आम्हां सर्व कर्मे समे ।
कृष्ण वाचे नित्य नेमें ।
जिव्हे पाठ हरिगोविंद ॥
हेची तारक पाठांतर ।
नित्य समाधीचें घर ।
शिव शंभुसी निरंतर ।
जपमाळ सर्वथा ॥
जीवाचे जीवन श्रीहरि ।
चिंता प्राणीयाची हरी ।
अंती चतुर्भुज करी ।
सर्व श्रीहरि माझा तो ॥
ज्ञानदेव सर्वोपरी ।
यंत्र साधिलें श्रीहरि ।
वैकुंठीचा विहारी ।
हदयातरी घातला ॥
अर्थ:-
जिभेने हरिगोविंद नामाचा पाठ केल्याने त्याचा नित्यनेम लाभला व त्या रामनामाने समाधी ही लाभली. तेच पाठांतर, तेच समाधीचे घर असुन ती जपमाळ सतत शिवजी जपत होते. तो माझा हरि जीवाचे जीवन आहे तो प्राण्यांच्या चिंतेच हरण करतो व शेवटी त्याच्या सारखे चतुर्भुज करतो. त्याच हरिनामाचे यंत्र करुन ते हृदयात जपले त्यामुळे वैकुंठात विहार केला असे माऊली सांगतात.


९१८
सकळ संप्रदाय श्रीहरि ।
जो बैसोनि जप करी ।
जिव्हे महादेवाचे अंतरी ।
सर्वकाळ वसतसे ॥ रामनामें जप करी ।
तोचि तरे भवसागरीं ।
पितरांसहित निर्धारी ।
वैकुंठपुरीं पावले ॥ नित्य सत्य समाधान ।
निर्मळ करावें मन ।
नित्य तयासीे नारायण ।
वैकुंठवास करील ॥ बापरखुमादेविवर सिद्धि ।
तरुणोपाय हेचि बुद्धि ।
कृपा करील कृपानिधी ।
ऐसिया भक्तांशी जाणावें ॥
अर्थ:-
महादेवाच्या जिव्हेवर बसलेल्या रामनामाच्या जपा मुळे तेच नाम जपणाऱ्या सांप्रदायिकाला सतत वैकुंठवास मिळतो. जो सतत रामनाम जपतो तो भवसागर तरुन पितरांसह वैकुठाला जातो. जसे करणाऱ्याला नित्य सत्य, समाधान, निर्मळ मन व प्रत्यक्ष तो नारायण लाभतो व तो ही वैकुंठाला वास करतो. ते माझे पिता व रखुमाईचे पती यांचे नाम घेतल्याने सर्व सिध्दी प्राप्त होतात ती बुध्दीच त्याचा तरणोपाय बनते.तो कृपानिधी त्याच्या वर कृपा करतो असे माऊली सांगतात.


९१९
धर्म वसे जेथें ।
सर्व कार्य होय तेथें ।
पित्यासहित मनोरथे ।
सिद्धि पावेल सर्वथा ॥
धन्य धन्य पितृवत ।
धन्य धन्य धर्मकृतार्थ ।
धन्य धन्य वेदाचा मतितार्थ ।
रामकृष्ण मुखींनाम ॥
जंववरी आयुष्य आहे ।
तंववरी हरीची सोये ।
हरि हरि मुख राहे ।
तो सुखी होय अंती देखा ॥
ज्ञान ध्याने निवे संध्या ।
ज्ञान विज्ञान हाचि धंदा ।
रामकृष्ण हरि मुकुंदा ।
परमानंदा जगद्गुरू ॥
ज्ञानदेवें सुकाळ केला ।
हरि हृदयी साठविला ।
हरिपाठ हाचि साधिला ।
अनंत अनंत परवडी ॥
अर्थ:-
ज्या ठिकाणी धर्माचरण असते तेथे सर्व कार्य निर्वेध होतात पितरांच्या इच्छा पूर्ण होतात व सिध्दी ही प्राप्त होते. ज्या मुखी रामकृष्ण नाम आहे त्या पितृव्रत धर्मकार्य धन्य होते व तोच खरा वेदांचा मतितार्थ जाणतो. ज्या मुखात सतत हरि आहे असे आयुष्य जगणारा तो अंती ही सुखीच राहतो. रामकृष्ण हरि मुकुंद ह्या नामोच्चरणा बरोबर त्याची संध्यादी कर्म संपुन जातात. अशा पध्दतीने हरिपाठ करणारे हरिला हृदयात साठवतात व त्यांच्या साठी ब्रह्मविज्ञेचा सुकाळ होतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९२०
पतीतपावन श्रीहरि ।
रामकृष्ण मुरारी ।
या वाहे चराचरीं ।
तो एक स्वामी जी आमुचा ॥
धन्य धन्य आमुचे जन्म ।
मुखीं रामराम उत्तम ।
जया रामनामें प्रेम ।
तोचि तरेल सर्वथा ॥
आयुष्य जाऊं नेदी व्यर्थ ।
हरिनामी जो आर्त ।
हरिवीण नेणें आणिक पंथ ।
धन्य जन्म तयाचा ॥
ज्ञानदेवें नेम केला ।
श्रीहरि हृदय सांठविला ।
त्यांनी संसारा अबोलाआला ।
देह खचला संत संगे ॥
अर्थ:-
पतितपावन असणारा त्या श्रीहरिला रामकृष्ण ह्या नांवाने संबोधतात तेच हा चराचराचे व आमचे स्वामी आहेत. ज्याला रामानामाविषयी प्रिती आहे सतत ते रामनाम तो जपतो तोच तरुन जातो त्याचा जन्म धन्य होतो. हरिनाम सोडुन अन्य पंथात तो जात नाही त्या हरिचे नाम आयुष्याचा क्षण वाया न घालवता आर्ततेने घेतो त्याचा जन्म धन्यतेला पावतो. ज्याने हा हरिनाम नेम हृदयापासुन केला त्याचा संसाराशी अबोला झाला व त्याचा देह संतसंगात पडला असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९२१
स्वप्नींचे सुख मी पहावया गेलें ।
तंव स्वप्नी स्वप्न ठेलें येरा विस्मो गे माये ॥
काय सांगो निदसुरी कवळले संसारी ।
करिता येरझारी येणेंचि छंदे ॥
षुप्तींचे सुखजागृती जाणती ।
तरी परतोनी मागुती कासया येती ॥
परखुमादेविवरु विठ्ठलु राणे रावो ।
ऐसा जाणोनी तयाचा भावो ठाकियेला ॥
अर्थ:-
स्वप्नाचे सुख मी पाहावयास गेले तेंव्हा ते मलाच कळले. व इतरांना ते न समजल्यामुळे विस्मय वाटला. त्या स्वप्न संसारात मी गाढ निजले व जन्ममृत्युच्या येरझाऱ्यात अडकले. सुषुप्ती अवस्थेत त्या परमात्म सुखाचे भोगणे होताना ते जागृत अवस्थेत भौतिकात मिळणार नाही मग तिकडे परत कोण जाईल? माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हेच त्या नित्यसुखाचे उदार राजे आहेत अशा भावाने त्यांना मी जाणुन घेतले असे माऊली सांगतात.


९२२
वोल्हावले मन परतोनो पाही ।
तंव प्रपंच दिसे आया गेले ।
पिटुनी बाह्या वैराग्याची गुढी ।
उभऊनी म्हणे म्यां जिंकिलें ॥
पपर न दिसे शेखी ।
चरणी स्थिरावलें ।
जळतरंग लहरी ।
सरिता संगम जीवनीं ।
जीवन ऐक्य ठेलें रया ॥
तेंचि ब्रह्मज्ञान बोधिता पाहातां ।
सगुण निर्गुण आता भेदु नाहीं ।
वाउगाचि शिणसी विचारी मानसीं ।
वायां कल्पना करूनि दाही दिशी रया ॥
हणोनि तंतु ओतप्रोत होतु ।
तैसे विश्वजात ब्रह्मी असे ॥
तीं कल्पिसी भेद सगुण निर्गुण ।
तेणे कल्पने प्रत्यया नये ।
सर्वस्वे उदासीन होई तुं निश्चय ।
जाण एक सगुणींचि काय न लभे रया ॥
म्हां सगुण निर्गुण समान ।
नेणो जन्म जातक भान ।
दृश्य द्रष्टा दर्शन ।
त्रिपुटी नलगे ।
महावाक्यादि शब्द ।
तत्त्वमस्यादि बोध ।
हेही आम्हा सकळ वाउगें रया ।
बापरखुमादेविवरू विठ्ठलु चिंतितां ।
सुख सगुणींच जोड़े येणें अंगे रया ॥
अर्थ:-
समाधी ठिकाणी असलेले मन परत मागे पाहते तर तो प्रपंच दिसत नाही.मग तो दोन्ही बाह्या उभारुन वैराग्याची गुढी उभी करुन मी जिंकलो असे म्हणतो. मग सर्व प्रपंचच त्याला एकमय दिसतो त्याचे आपपरभाव निघुन जातात तो त्या सगुण चरणांवर मन स्थिर करतो जशा लहरी सागरात व नद्या संगमात एकत्व पावतात. मग तोच ब्रह्म ज्ञानाने बोधित झालेला असतो. सगुण निर्गुणाचे भेद मावळतात वेगळा विचार करुन शिणत नाही व वेगळी कल्पना त्याला दशदिशेला हिंडवत नाही.जसा कापडात तंतु ओतप्रोत असतो तसे ह्या विश्वात ब्रह्म आहे हे समजतो कल्पित भेद, सगुण निर्गुणात अडकत नाही. कल्पनेचा ही प्रत्यय करत नाही. तो प्रपंचाविषयी उदासिन होतो. हेच त्याला सगुण भक्तीत प्राप्ता का नाही होणार? दृष्य द्रष्टा द्रर्शत्व ही त्रिपुटी तेथे लोप पावते सगुण निर्गुण हे समान होतात. तत्वमस्यादी महावाक्याचा बोध उरत नाही. त्याची तिथे आम्हाला गरजच उरत नाही. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचे चिंतन केले तर सगुण निर्गुण तेच आहेत हे कळते व महासुख तेंव्हा प्राप्त होते असे माऊली सांगतात


९२३
आजी संसार सुफळ जाला गे माये ।
देखियले पाय विठोबाचे ॥
तो मज व्हावा तो मज व्हावा ।
वेळों वेळां व्हावा पांडुरंग ॥
बापरखुमादेविवरू न विसंबे सर्वथा ।
निवृत्तीने तत्त्वतां सांगितले ॥
अर्थ:-
हे जीवरुप सखे त्या श्री विठ्ठलाचे चरण दिसले व माझा संसार सुफल झाला. तो पांडुरंग मला सतत व वेळोवेळा प्राप्त व्हावा असे वाटते. त्या माझ्या पित्याला व रखुमाईच्या पतीला कधी विसरु नकोस असे निवृत्तीनाथानी मला निक्षुन सांगितले आहे असे माऊली सांगतात.


९२४
गुणे सकुमार सावळे ।
दोंदील पहाती पां निराळें ।
केवीं वोलळे गे माये ।
सुख चैतन्याची उंथी ओतली ।
ब्रह्मांदिका न कळे ज्याची थोरवी ।
तो हा गोवळीयाच्या छंदे क्रीडतु ।
साजणी नवल विंदान न कळे माव रया ॥
डोळां बैसले हृदयीं स्थिरावले ।
मन नुठी तेथून कांही केल्या ॥धृ॥
सच्चिदापदीं ।
पदाते निर्भेदी ।
निजसुखाचे आनंदी ।
माये क्रीडतुसे ॥
तो हा डोळीया भीतरी ।
बाहिजु अभ्यंतरी ।
जोडे हा उपावो किजो रया ॥
गुणाचे पैं निर्गुण ।
गंभीर सदसुखाचे उदार ।
जे प्रकाशक थोर ।
सकळ योगाचे ॥
आनंदोनी पाहें पां साचे ।
मनी मनचि मुरोनी राहे तैसें ।
बापरखुमादेविवरा विठ्ठलें ।
की मुसेमाजी अलंकार मुराले ।
श्रीगुरु निवृत्तीने दाविलें सुख रया ॥
अर्थ:-
तो सर्वगुण संपन्न, सावळा,पुष्ट सुकुमार गोकुळात कसा आला ते कळत नाही. ज्याची थोरवी ब्रह्मादिकांना कळत नाही जो सुख व चैतन्याचा ओढणी अंगावर घेऊन आला आहे. तो त्या गोवळ्यांबरोबर खेळत आहे हे नवल मला कळत नाही. ते रुप डोळियानी पाहिले व मनात घट्ट बसले त्या रुपावरुन मन परतत नाही. तो सच्चिदानंद स्वरुप असुन त्या पदाला छेद न देता. निजसुखाचा आनंद देत त्या गौळ्यांबरोबर तो खेळत आहे. तो डोळ्यात भरणारा व अंतर्मन व्यापणारा, त्याच्याशी अनुसंधान कसे करायचे हा विचार करावा. तो निर्गुण गंभीर असणारा सर्वसुखाचे आगर असणारा सर्वांना ज्ञानप्रकाश देणारा, योग्यांच्या मनात असतो. हे सर्व आनंदाने पहा तो मनात मुरोन गेला आहे जसे सोने अलंकारात मुरलेले असते. असे माझे पिता व रखुमाईचे पती यांचे सुख मला निवृत्तीनाथांनी दाखवले.असे माऊली सांगतात.


९२५
अरे मना तुं वाजंटा ।
सदा हिंडसी कर्मठा ।
वाया शिणसील रे फुकटा ।
विठ्ठल विनटा होय वेगी ॥
तुझेनि संगे नाडले बहु ।
जन्म भोगितां नित्य कोहुं ।
पूर्व विसरले ॐ हुं सोहुं ।
येणे जन्म बहुतांसी जाले ॥
सांडी सांडी हा खोटा चाळा ।
नित्य स्मरे रे गोपाळा ।
अढळ राहा रे तु जवळा ।
मेघशाम सावळ तुष्टेल ॥
न्याहाळितां परस्त्री अधिक पडसी असिपत्री ।
पाप वाढिन्नलें शास्त्री ।
जप वक्त्री रामकृष्ण ॥
बापरखमादेविवर ।
चिंती पां तुटे येरझार ।
स्थिर करीं वेगीं बिढार ।
चरणी थार विठ्ठलाचे ॥
अर्थ:-
अरे पोकळ कल्पना करणाच्या मना तुं नेहेमी कर्माच्या नादी लागत फुकट श्रम घेतोस त्यापेक्षा श्रीविठ्ठलाच्या ठिकाणी रममाण हो. तुझ्या संगतीमुळे अनेक जीव संकटात पडून कोहं उच्चारण करून अनेक जन्म भोगीत बसले. कारण पूर्व म्हणजे गर्भावस्थेमध्ये‘ ‘ॐ हुं सोऽहं तो परमात्मा मी आहे याची विस्मृति झाल्यामुळे अनेकांना जन्म मरणाचे फेरे फिरावे लागतात. म्हणून कोऽहंतेचा चाळ सोडून दे. आणि गोपाळाचे नित्य स्मरण करून निश्चित हो. म्हणजे तुझ्या हदयां असलेला भगवान तुझ्यावर संतुष्ट होईल. शास्त्रामध्ये परस्त्रीला दुष्ट बुद्धीने पाहिले तर असीपत्रावर(नरक) पडण्यासारखे पाप घडते. म्हणून ते सर्व टाकून देऊन मुखाने रामकृष्ण नामाचा जप कर. व असा जप केला तर जन्म मृत्युच्या येरझारा चुकुन तुला माझे पिता रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचे चरणी नित्य वास मिळेलअसे माऊली म्हणतात.


९२६
चहुं शून्याचा भेद कैसा पहावा देहीं ।
ब्रह्मरंध्री नि:संदेहीं निजवस्तू ॥
सांवळे सकुमार बिंदुचे अंतरी ।
अर्धमात्रे वरी विस्तारलें ॥
त्रिकुट श्रीहाट गोल्हाट तिसरें ।
औठपीठादि सारे ब्रह्मांडासी ॥
स्थूल सूक्ष्म कारणी माया ।
महाकारणाच्या ठायां रीघ करा ॥
निवृत्ति ज्ञानदेव उभयतांचे बोल ।
आकाश बुबुळीं पाहा असे ॥
अर्थ:-
या देहातच असून चारी अवस्थांचा खोटेपणा कसा ओळखावा? ब्रह्मरंधात ती ब्रह्मवस्तु कशी पाहावी. ब्रह्मरंधातील त्या सूक्ष्म बिंदूतील अर्थमात्रेत ती सांवळी सुकुमार मूर्ति आहे त्रिकूट, श्रीहाट, गोल्हाट व औटपीठ ही महाकारणातील स्थाने आहेत योगाभ्यासाने स्थूल, सूक्ष्म व कारण या मायिक देहांचा निरास करून महाकारणात प्रवेश करता येतो. माझे व निवृत्तिरायांचे शब्दही वरिल अर्थाचेच आहेत. हे विचार करून पहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९२७
औटपीठीं तेज गुजगुजीत ।
चारी देह तेथ साक्ष पाहा ॥१॥
अवस्था हे चारी संयोगचि एक ।
शुन्य जें निःशंक आत्मज्योती ॥२॥
ज्ञानदेवा बाई निवृत्ति वदवितां ।
त्याचे चरणी हिताहित झालें ॥३॥
अर्थ:-
औटपीठाच्या ठिकाणी मोहक असे तेज असते. स्थूल,सूक्ष्म, कारण व महाकारण हे चारी देह त्याठिकाणी केवळ ज्ञेयरूप आहेत. त्याठिकाणी जागृती स्वप्न, सुषुप्ती व तूर्या या चार अवस्थांचा जणू काय संयोग होतो.त्या प्रमाणे चार देहाच्या पलीकड़े निःसंशय आत्मज्योतीच आहे. ज्ञानोबाराय हे स्त्री भूमिका पत्करून जे निवृत्तीराय मजकडून हे बोलवितात. त्याचे चरणीच अहिताचे हित झाले ग बाई. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९२८
नवाचिया माझारी आऊटपीठाशेजारी ।
शून्याची ओवरी सुनिळ प्रभा ॥१॥
जीवदशामय अंगुष्ठ प्रमाण ।
तयावरी अज्ञान प्रवर्तते ॥२॥
चैतन्याची मुस त्यामाजी ओतली ।
अव्यक्त देखिली वस्तु तेथें ॥३॥
व तें मसुरे प्रमाण तया नांव महाकारण ।
गुरूमुखे खूण जाण बापा ॥४॥
ज्ञानदेव म्हण यापरतें जाण ।
नाहीं नाहीं आण निवृत्तीची ॥५॥
अर्थ:-
नवद्वारे असलेल्या या शरीरातच महाकारण स्थानातील औटपीठा शेजारी योग्यांना जेथे निलज्योती दिसते. अशी वोवरी म्हणजे महाकारण देह आहे. तसेच दुसरा अंगुष्ठमात्र आकाराचा जीवदशायुक्त लिंग देह आहे. त्याच शरीरात अज्ञानाची पुढिल कार्योत्पत्ति होते. वरिल वर्णन केलेल्या दोन्ही देहाच्याही आंत केवळ चैतन्याची बनलेली अशी जेथे ती वस्तु आहे. तिचा आकार मसुरे प्रमाणे असून त्यालाच पहिल्या चरणांत सांगीतल्याप्रमाणे महाकारण हे नाव आहे. त्याची ओळख गुरुमुखाने करुन घे. या परते जाणावयाचे असे काही नाही. असे निवृत्तीरायांची शपथ घेऊन मी सांगतो. असे माऊली सांगतात.


९२९
बहुशास्त्र जल्पणे वेद त्रिकांडपणें ।
बोलती लक्षण त्रिविधमुक्तीं ॥१॥
नानामतें उत्छुंखळे म्हणोनी जासी विकळें ययापरी ॥२॥
म्हणोनी तया वाटा जाऊं नको अव्हाटा ।
या संकल्पा फुकटा येवों नेदी ॥३॥
परतोनियां पाहीं करी आठवण ।
तूं आहेसी कोण विचारी पां ॥४॥
विचारूनी निरूते संतसंगे पंथें ।
जन्ममृत्यू तूंतें न बाधी कांहीं ॥५॥
म्हणोनी यम नियम प्राणायाम प्रत्याहार आटणी ।
वाउगाचि बांधोनि सिणसी का पां ॥६॥
ऐसें गंधधर्वपर की मृगजळाचें नीर ।
येथींचा विचार क्लेशी क्षीदक्षीण न करीं बापा ॥७॥
मतें या भ्रामकें वेश्याचेनी सुखें ।
पालट एके सोंगें जाली ॥८॥
क्षीरनिरा निवाड याचेनि नव्हे काही ।
निजगुरू पाही तो विरळा असे ॥९॥
म्हणोनी याच्या चरणी घालोनियां मिठी ।
निजपदी बैसवी शेवटीं तुज ॥१०॥
आता सांडी मांडी न करी निश्चय एक धरी ।
तूं आत्मा निर्विकारी सदोदित ॥११॥
म्हणोनि तूं सर्वगत सर्वसाक्षी सुखरूप ।
तेथें पंचभूती नातळेचि ॥१२॥
आतां न करी तूं अनुमान ज्ञान ना विज्ञान ।
स्वयें सिद्धी आपण होऊनी राहे ॥१३॥
हेचि पुढता पुढती सांगों तुज किती ।
श्रुती नेती नेती मौनावल्या ॥१४॥
निवत्तीदास म्हणे अनुभवी तो जाणे ।
येरां लाजिरवाणे टकमक ॥१५॥
अर्थ:-
कर्म,उपासना व ज्ञान यांचे प्रतिपादन करणारा जो वेद व शास्त्रे यांनी मोठ्या अट्टहासाने मुक्ती तीन प्रकारची आहे. असे सांगितले आहे. असे कोणी बरळतात. म्हणून उत्च्छंखल होऊन त्या नाना मतांच्या मागनि वेड्यासारखा जाशील या आडमागनि जाण्याचा तुमच्या मनांत संकल्प सुद्धा येऊ देऊ नको.जर अंतर्मुख दृष्टी करून तुझे स्वरूप काय, तूं कोण आहेस, याचा विचार कर.असा नीट विचार करून संतांच्या संगतीने जर वागशील तर जन्ममृत्यूची बाधा तुला होणार नाही. म्हणून यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार वगैरे अष्टांग योगाची साधने करून, प्राणाला कोडून धरून, तूं आपणाला का शीण करून घेतोस. हे जगत गंधर्वनगर अथवा मृगजळाच्या पाण्याप्रमाणे मानून, या लोकांच्या दुःखाने विनाकारण क्षीण होऊ नको. वेश्येच्या सुखाप्रमाणे भ्रामक सुख उत्पत्र करणाऱ्या या मतांनी पुष्कळाची फसगत झाली. याच्या योगाने दुधपाण्याचा म्हणजे चांगल्या वाईटाचा निवाडा होणार नाही. आत्मसुखाचा बोध करणारा गुरू विरळाच असतो. म्हणून अशा गुरूच्या पायी मिठी मार म्हणजे ते तला निजस्वरूपांवर बसवतील. विधि निषेधाचा विचार न करता तूं एक निश्चय कर तूं निर्विकार नित्य आत्मरूप आहेस. आत्मरूप तूं असल्यामुळे तूंच सर्वव्यापी, सर्वसाक्षी व सुखरूप असून पंचमहाभूताहून वेगळा आहेस.अशी तुझी खात्री होईल. आता तूं ज्ञानरूपी किंवा नाहीस याबद्दल अनुमान करीत बसू नकोस. तू स्वयंसिद्ध आत्माच अशा जाणीवेने राहा. या गोष्टी पुन्हा पुन्हा किती सांगाव्या या ब्रह्माचे वर्णन श्रुतींनाही करता आले नाही.त्यानीही ‘नेति नेति’ असे म्हणून मौन धारण केले, या गोष्टी अनुभवी पुरूषालाच कळतील लज्जायमान होऊन आश्चर्यान टकमक पाहातच राहातील. असे निवृत्तिदास माऊली सांगतात.


९३०
तैचि ज्ञानियासी होईजेल मोक्ष ।
ज्ञानेश्वर लक्ष लक्षितसे ॥१॥
पहाण्याशी मूळ विचारुनि पहा ।
मग सुखी रहा निरंजनीं ॥२॥
इवलुसा प्रपंच परी तो बद्ध कीं ।
सज्ञानी विवेकी न शिवती ॥३॥
पयाचिये कुंभीं पडे बिंदुविष ।
चतुर तयास न घेपती ॥४॥
षड्रस पक्वानें वाढिली खापरी ।
श्वान शिवे श्रोत्री स्पर्शीतीना ॥५॥
घालुनियां कडें शून्याशी बांधितां ।
त्याचिया गणिता न करवे ॥६॥
सर्वही उपाधि त्यागुनि आकार ।
राहे ज्ञानेश्वर निजरूपीं ॥७॥
अर्थ:-
जेव्हां लक्षावर लक्ष असेल तेव्हांच ज्ञानाने ज्ञानीपुरुषास मोक्षप्राप्ती होईल, तद्वत माऊलीचे लक्ष ध्येयापाशी आहे. ज्या मूळ गोष्टीकडे पहावयाचे त्याच गोष्टीकडे विचारपूर्वक लक्ष द्या. म्हणजे निर्लेप जे ब्रह्मस्वरुप त्याचे सुख अनुभवाल. प्रपंच अल्पसा वाटतो, पण तोच बंधाला कारण आहे. म्हणून जाणते व विचारी पुरुष त्यापासून दूर राहातात.दूधांत विषाचा थेंब पडला तर चतुर पुरुष ते दुध घेत नाही. तसेच षड्रस पक्वात्र खापरांत वाढले व त्याला कुत्र्याने स्पर्श केला तर याज्ञिक त्याला स्पर्श करीत नाही.शून्याची कल्पना यावी म्हणून ‘O’आकार दाखवितात म्हणून तेवढ्यावरुन शून्याचे माप करता येईल काय? सर्व आकार व उपाधिचा बाध करुन आम्ही आत्मस्वरुपच झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९३१
तेंचि ब्रह्मरूप जाणिजे निश्चळ ।
शद्ध तें निर्मळ मनाहुनी ॥१॥
स्थूळ दृष्टी करुनि जयासी लक्षितां ।
तत्त्वता भास कांहीं ॥२॥
सहज निवृत्तिदास तो उदास ।
अनुभव सौरस सांगितला ॥३॥
अर्थ:-
जे ब्रह्म स्थूल दृष्टीने पाहिले तर दिसत नाही जे मनाहून अत्यंत निर्मळ व निश्चळ आहे. तेच ब्रह्मस्वरुप होय.आम्ही ही अनुभवाची गोडी तुम्हांला सहज सांगितली. असे निवृत्तीदास माऊली सांगतात.


९३२
मन हे अवघे परब्रह्मीं ।
क्रियाकर्मधर्मी अलिप्त तें ॥१॥
देह जावो राहो संबंधचि नाहीं ।
नामरुप कांहीं न दिसे मज ॥२॥
प्राचिनानें वर्तो जाणो या शरीरी ।
जैसा वेठी करी राबताहे ॥३॥
निर्विकल्प स्थिति हेतु नाहीं आथी ।
अज्ञानाची बुंथी काढियली ॥४॥
म्हणे ज्ञानेश्वर उरी नाहीं आन ।
जाहालों तल्लीन निजरूपी ॥५॥
अर्थ:-
माझे मन परब्रह्माच्या ठिकाणी बसले आहे. क्रिया, कमें वगैरेचे ठिकाणी मुळीच नाही. देह जावो किंवा राहो त्याचा माझा मुळीच संबंध नाही. जगातील नामरूपामुळे येणारा भेद मला मुळीच दिसत नाही. ज्याप्रमाणे बिगारीस धरलेला मनुष्य सांगावे तिकडे जातो. त्याप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे या शरीराने मी वागत आहे.अज्ञानाचे आवरण काढल्यामुळे व अंतःकरणांत दुसरा कोणताही हेतु नसल्यामुळे मी निर्विकल्प स्थितीत आहे. माझ्या ठिकाणी दुसरी कसलाही वासना न राहिल्यामुळे. आत्मस्वरूपांत मी निमग्न झालो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९३३
सगुणी निर्गुण निर्गुणी सगुण ।
दोन्ही भिन्नपण नसे मुळीं ॥१॥
हेम अलंकार अलंकारी हेम ।
मृण्मयेचि धाम धाम तेंचि ॥२॥
किंचित् महत उपाधि कल्पित ।
मुळीं तें अंशीक एकमेव ॥३॥
इह तेचि पर पिंड तें ब्रह्मांड ।
ब्रह्मचि अखंड ज्ञानदेव ॥४॥
अर्थ:-
जसे सोने तेच अलंकार व अलंकार तेच सोने किंवा मातीने केलेले घर आणि माती एकच त्याप्रमाण सगुण निर्गुण यांच्यात भेट नसुन ते दोन्ही एकच आहेत. उपाधि लहान मोठी कल्पिल्यामुळे त्यांच्यात भेद दिसतो. पण उपाधिचा निरास केल्यानंतर सगुण व निर्गुण हे दोन्ही एक परमात्मस्वरुप आहे म्हणुन इहलोक असो अथवा परलोक असो. व्यष्टिरुय असो. अथवा समष्टिरुप ब्रह्मांड असो सर्वत्र एक परमात्माच भरलेला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९३४
पिंडचि ब्रह्मांड ब्रह्मांडचि पिंड ।
ब्रह्मचि अखंड ब्रह्मरुप ॥१॥
कांहीं भेद नाही किंचित् महत् ।
उपाधि कल्पित स्वाभाविक ॥२॥
अनुभव योगें दोन्हीं जाण सम ।
नाहींचि विषम अणुभरी ॥३॥
सहजचि सृष्टी जाणा हे घडली ।
सहजचि गेली शेखीं आथी ॥४॥
एकमेव सर्व म्हणे ज्ञानेश्वर ।
नाहीं भिन्न कीर ओळखतां ॥५॥
अर्थ:-
पिड ते ब्रह्मांड व ब्रह्मांड ते पिंड हे दोन्ही तात्विक दृष्टीने एकच आहेत कारण त्यांना अधिष्ठान असणारे ब्रह्म दोन्ही ठिकाणी अखंड एकरूपच आहे. पिंड ब्रह्माडांमध्ये बिलकूल भेद नाही. जर भेद दिसत असलाच तर तो उपाधिचाच होय ब्रह्माडांची उपाधि पिंडापेक्षा मोठी आहे. अनुभवाच्या दृष्टीने पाहाल तर त्यात विषमता मुळीच नाही. दोन्ही अगदी एकच आहेत. ही सृष्टी त्या अधिष्ठान ब्रह्मावर जशी मायेमुळे भासते. तशी मायेच्या बाधेने ती नाहीशी होते. सर्व काही एकमय आहे. खरोखरच दुसरी वस्तुच नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात


९३५
पाहातें पाहूं गेलों पाहणे विसरलों ।
ब्रह्मानंदें धालों देवराया ॥१॥
माझें रुप आतां काय म्यां पाहावें ।
जाहलों अवर्षे विश्व मीची ॥२॥
दुजें नाहीं नाहीं वाहतों तुझी आण ।
चौदाही भुवन एकरुप ॥३॥
तुझें माझें द्वैत तेंही उरलें नाहीं ।
मूळी मी हे कांहीं नाठवेचि ॥४॥
एकांती एक वर्ते तोचि साक्षात्कार ।
जाहला ज्ञानेश्वर तेथें लीन ॥५॥
अर्थ:-
ब्रह्म वस्तूला पाहूं गेलो असता मी त्या ब्रह्माहून वेगळा न राहता ब्रह्मानंदातच निमग्न होऊन गेलो ज्याला पाहावयाचे तेच माझे रुप असल्यामुळे पाहावयाचे काहीच उरले नाही. सर्वच ब्रह्मांड माझे रुप असल्यामुळे मला दुसरे काही दिसेनासे झाले. मला चवदाही भुवने ब्रह्मरुपच दिसू लागली. हे पंढरीनाथा तुला शपथ घेऊन सांगतो की, तुझ्या माझ्यामध्ये देवभक्तपणाही उरला नाही. या ठिकाणी मीपणा गेल्यामुळे एकच वस्तु सर्वत्र भरली आहे.असा मला साक्षात्कार झाला. मीपण तद्रूप होऊन गेलो त्यामुळेच दुसरी वस्तु असल्याची ओळख नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९३६
जयाचिये ठायीं नाहीं मीतूंपण ।
तेचि सनातन एक ज्ञानी ॥१॥
धैर्याचे मंडप तेचि स्तंभ जाले ।
कोंभ जे निघाले परिणामा ॥२॥
क्षेत्रज्ञ संन्यास घेतला श्रीहरि ।
तेथूनियां दूरी नवजेची ॥३॥
रायाची संगती घडतां निमिष ।
तरी होती वश्य अष्टसिद्धी ॥४॥
धाले तेच पूर्ण कीर ब्रह्मानंदें ।
ज्ञानेश्वर बोधे बोधीयला ॥५॥
अर्थ:-
ज्याच्याठिकाणी मी तूं हे द्वैत भान नाही. तेच मुरलेले ज्ञानी समजावे. ते धैर्यरुप मंडपाचे जणू खांबच होत. त्याच्या रुपाने जणू काय ब्रह्मालाच कोंभ फुटले म्हणावयाचे. त्या ज्ञानवानांच्या ठिकाणी श्रीहरिने क्षेत्रसंन्यास केला आहे. म्हणून त्याला त्या संतांच्या हृदयांतून बाहेर जाताच येत नाही. ज्याप्रमाणे राजाच्या क्षणभर संगतीने अष्टसिद्धीप्रमाणे सर्व लोक अनुकूल होतात. त्याप्रमाणे तेच पुरुष ब्रह्मानंदाने पूर्ण तृप्त आहेत. व तोच बोध मला निवृत्तिरायांनी दिला असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९३७
अक्षरची ब्रह्म तेंचि तें क्षरलें ।
काल्पनिक झाला अनेकत्व ॥१॥
जिवेश्वर खाणी तेथें उमटती ।
शेखी तेथे जाता मिळोनियां ॥२॥
ब्रह्म अनुपम्य संवितेशी नये ।
अनुभव सोये तरी कळे ॥३॥
पाथराची टाकी जरी होष तीख ।
नये रंध्र शलाख मुक्तिकेशी ॥४॥
सर्वाहुनी पर म्हणे ज्ञानेश्वर ।
ब्रह्मज्ञान कीर अगोचर ॥५॥
अर्थ:-
अविनाशी असणारे ब्रह्न तेच काल्पनिक असलेल्या अनेकात्वाला प्राप्त झाले. त्यात एक जीवसृष्टी व दुसरो ईशसृष्टी ही असून शेवटी विचाराने यांचा बोध झाल्यावर या दोन्ही सृष्टी एकरूप होतात. अनुभवावाचून निरुपमेय ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होऊ शकत नाही. पाथरवटाची टाकी कितीही बारीक असली तरी तिने मोत्याचा तुकडा पाडाता येत नाही.. किंवा त्यास भोक ही पाडता येत नाही. त्याप्रमाणे सूक्ष्म ज्ञानदृष्टी वाचुन ब्रह्मज्ञान होणार नाही ब्रह्मज्ञान हे अव्यक्त असून अत्यंत अगोचर आहे असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९३८
वासनेचे बीज भजोंनी टाकिलें ।
मानसासी केलें देशधडी ॥१॥
संसाराशी आगी लाविली स्वकरी ।
अहंतेशी दूरी दवडिलें ॥२॥
काम क्रोध लोभ मोह दंभ मद ।
केला याचा छेद ज्ञानशस्त्रे ॥३॥
विवेक वैराग्य बोध क्षमा शांति ।
राखिली संपत्ति दैविकीजे ॥४॥
राहे ज्ञानेश्वर एकचि एकट ।
ब्रह्मरस घोट घोटूनियां ॥५॥
अर्थ:-
आम्ही वासनेचे बीज जे अज्ञान हे भाजून टाकल्यामुळे आता संकल्प विकल्प करणाऱ्या आमच्या मनाला देशोधडीला लावले. आम्ही संसारास ज्ञानाग्नी लावून दिला व अहंकाराला दुर घालवून दिले. काम, क्रोध, लोभ मोह मद मत्सर यांचा ज्ञानरूपी शस्त्राने नाश करून टाकला. मोक्षोपयोगी असणारे विवेक, वैराग्य क्षमा शांती हे देवी संपत्तिचे गुण आम्ही आमच्या जवळ ठेवले.आम्ही ब्रह्मरसाचा भोग घेऊन एकरूप झालो.आता आम्हाला द्वैताची प्रतीती उरली नाही असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९३९
मंत्र तंत्र मंत्र सर्वही अबध्द ।
जव नाही शुध्द अंतःकरण ॥१॥
गुरुशिष्यपण हेंही मायिकत्व ।
जंव निजतत्व न ओळखी ॥२॥
प्राप्त जरी झाली अष्टसिद्धी जाण ।
मागुती बंधन दृढ होय ॥३॥
आत्मरुपावीण साधन अन्यत्र ।
भ्रमाशीच पात्र होईजे कीं ॥४॥
सर्व वृत्ति शून्य म्हणे तोचि धन्य ।
ज्ञीनदेव मान्य सर्वस्वेंशी ॥५॥
अर्थ:-
जोपर्यंत अंतःकरण शुद्ध झाल नाहा. तो पर्यंत मंत्र तंत्र व यंत्र या ज्ञानप्राप्ती करता केलेल्या खटपटी व्यर्थ आहेत. जोपर्यंत आत्मदर्शन झाले नाही तो पर्यंत गुरुशिष्यपणाही व्यर्थ आहे. योगाभ्यास करून अष्टमहासिदी प्राप्त झाल्या, तरी त्या बंधनालाच हेतु आहेत.आत्मज्ञान प्राप्तीवांचून केलेली सर्व साधने भ्रममूलकच आहेत.आत्मज्ञानाने ज्याच्या सर्व वृत्ति बाधित झाल्या तोच एक पुरुष धन्य आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९४०
नाथिलें आभाळ जेवीं कां गगनीं ।
माया मुळींहुनी तैशी जाहली ॥१॥
ब्रह्मादिक काळ व्याली हे ढिसाळ ।
आथी रजस्वला इयेपरी ॥२॥
विवर्तक जाली विस्तारिलें जग ।
नव्हे भिन्न भाग एकमेव ॥३॥
मायोपाधी तेंचि जाहलें सगुण ।
येर तें निर्गुण जैसे तैसें ॥४॥
तेंचि निरुपण तोचि सर्वेश्वर ।
म्हणे ज्ञानेश्वर राजयोगी ॥५॥
अर्थ:-
आकाशांत दिसणारे ढग जसे आकाशातच नाहीसे होतात. त्याप्रमाणे ज्ञान झाल्यावर ब्रह्मावर भासणारी माया ब्रह्मरुपच होते.ब्रह्मदेवापासून मुंगी पर्यंत काळादि एवढे मोठे जगत सामान्य स्त्रीप्रमाणे ह्याच मायेपासून निर्माण झाले. वस्तुतः ब्रह्मावर विस्तारलेल्या जगताला ती विवर्तक मिथ्या भासवण्यात कारणीभूत झाली. ती ब्रह्माहून भिन्न ही नाही व ब्रह्माशी एकमेव अभिन्नहीं नाही तेच ब्रह्म मायोपाधीमुळे सगुण झाले. त्या उपाधीचा बाध झाला की ते पूर्ववत निर्गुण आहे, तो राजयोगी भगवान श्रीकृष्ण सगुणही आहे व निर्गुणही आहे, असे वर्णन वेदशास्त्राने केले आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९४१
ऐक रे सुमना बोधीन सुज्ञान ।
मायिक बंधन तुटे जेणें ॥१॥
श्रीगुरुचे पाय हृदयीं शिवशी ।
टाकी प्रतिष्ठेशी जाणिवेचे ॥२॥
नित्यानित्य दोन्ही करीं गा विचार ।
आहे मी हे कीर विचारिजे ॥३॥
जीव शिव भेद कासयासी जाहाले ।
वळखीं वहिले तिये स्थानीं ॥४॥
मुळीं तुझें रुप हे रें अनुभवणे ।
ज्ञानदेव म्हणे ब्रह्म तूंचि ॥५॥
अर्थ:-
मना ज्याच्या योगाने मायिक पदार्थाचे बंधन तुटेल अशा तत्वड्ञान चा उपदेश मी तुला करतो तो तूं नीट ऐक. पहिली गोष्ट मी शहाणा आहे हा अभिमान सोडून तूं श्रीगुरु चरणी लीन हो. नित्य काय आहे व अनित्य काय आहे याचा विचार करून, मी कोण आहे. हे जाणण्याची प्रथम खटपट कर.कर्ता, भोक्ता तो जीव, व त्याचा साक्षी जो तो शिव असा भेद कसा झाला. वास्तविक ब्रह्मरुपांशी दोन्हीही अभिन्न आहेत. तूं मूळचा ब्रह्मरुप आहेस हे अनुभवाने हेरुन म्हणजे बारकाईने चिंतन करून पहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात


९४२
जें जें पाहुं जाय सुमनें करूनी ।
अदृश्य होऊनी तेंचि लपे ॥१॥
दुजेचि न दिसे काय आतां करूं ।
कवणा विचारूं सुखगोष्टी ॥२॥
आपणाआपण विचारिजे आथी ।
जाहली विश्रांति मीपणाशीं ॥३॥
बाहेर भीतरी एकमेंव दिसे ।
अन्यथा हें नसे गुरूसाक्षी ॥४॥
ज्ञानेश्वर हे गिळुनीयां नाम ।
ब्रह्मचि स्वयमेव सांठविलें ॥५॥
अर्थ:-
आत्मज्ञान झाल्यानंतर चांगल्या मनाने ज्या ज्या दृश्य वस्तुकडे पाहू गेले असता ती सर्व दृश्य वस्तु ब्रह्मरूप आहे असा निश्चय होऊन जातो. आतां जगतात परमात्म्यावाचून दुसरा पदार्थच मला दिसेनासा झाला. आता मी सुखाच्या गोष्टी कुणाला विचारू.त्याचा विचार आत्म्यासीच करावा असे म्हंटले तर मीपणाची हरिस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांति झाली. म्हणजे मी म्हणून विचार करणारा त्या हरिहून वेगळा नाहीच सदगरूच्या कृपेने सर्व पदार्थाच्या ठिकाणचे नामरूप नाहीसे होऊन आंत बाहेर दिसते.४ आंत, बाहेर,जिकडे, तिकडे पाहावे तिकडे मला साक्षी ब्रह्मरूपच ठसवलेले दिसते. नामरूप संपवून मला जिकडे तिकडे ब्रह्मच भरलेले दिसते असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९४३
जगामांजी श्रेष्ठ सांप्रदायी नाना ।
कीर्ति ते भुवनामाजी फार ॥१॥
आम्ही एक दिन जाणा नाथपंथी ।
नीचाहूनी अथी अती नीच ॥२॥
सर्वांचे चरण वंदितसों सदा ।
श्रेष्ठपण कदा कीरे नसे ॥३॥
नेणोंची स्वरूप धर्माधर्म कांही ।
निवृत्तीच्या पायीं लीन जाहलों ॥४॥
नाठवेचि कांहीं अन्यथा साधन ।
ज्ञानेश्वर आन उरेचिना ॥५॥
अर्थ:-
जगामध्ये श्रेष्ठ सांप्रदायाचे अनेक पंथ असून त्या सांप्रदायांचा लौकिक फार मोठा आहे. आम्ही नाथपंथी लोक अगदी कनिष्ठा पेक्षाही कनिष्ट आमच्या ठिकाणी मोठेपणाचा अभिमान केंव्हाही आला नाही. म्हणुन सर्वाना नमस्कार करतो.पापपुण्याचे स्वरूप आम्हाला कळत नाही. मात्र मी निवृत्तीरायांना शरण गेलो. या साधनावांचून दुसरे काही साधन न करता मी वेगळेपणाने राहिलोच नाही. म्हणजे तद्रुप झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९४४
घटु जें जें होय आधींच गगन ।
राहे पैं व्यापून वेगळेंची ॥१॥
मायोपाधी सृष्टि जें जें कांहीं होत ।
चैतन्य व्यापित त्याची माजीं ॥२॥
विवर्तते माया तद्विवर्त जीव ।
सृष्टि कारणत्व भोग्यपर ॥३॥
भासचतुष्टयता दोन्ही अनादि ।
जाहली उपाधि मुळीहुनी ॥४॥
गुरूकृपायोगें ज्ञानदेव खूण ।
भेदुनी निर्वाण लीन झाला ॥५॥
अर्थ:-
घट निर्माण होण्यापूर्वी आकाश अगोदरच सर्वत्र व्याप्त असतेच व घट निर्माण झाल्यावर घटामुळे घटापुरते वेगळे वाटते. म्हणजे त्याला ‘घटाकाश म्हणतो. त्याप्रमाणे मायिक सर्व पदार्थ निर्माण होण्यापूर्वी चैतन्य सर्वत्र असतेच ते या पदार्थाच्या उपाधीमुळे वेगळेपणाने भासते त्यामुळे ब्रह्माची प्रतिती ब्रह्मरूपाने न येता जगतरूपाने येते. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी माया व मायाकाय पदार्थ हे विवर्त म्हणजे अध्यस्त आहे. जीव ईश्वर भाव हे मायेमुळे आहे. त्यामुळे ईश्वराच्या ठिकाणी दिसणारी कारणता व माया कार्य पदार्थाच्या ठिकाणी दिसणार भोग्यता ही सर्व ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त आहे. माया व मायाकार्य पदार्थ हे अनादि आहेत.त्या मायेमुळे ब्रह्म साकार झाले. त्या मायेचा निरास करून आम्ही ब्रह्मस्वरूप झालो. ही खूण आम्हाला गुरूकृपेने कळली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९४५
त्यागुनी कैलास सर्वही संपत्ती ।
स्मशानांत वस्ती रूद्र करी ॥१॥
कासया कारणे ब्रह्म शोधावया ।
आलों कोठनियां माझा मीचि ॥२॥
तयाशीही पूर्ण न कळेची कांहीं ।
अद्यापि संदेही पडियले ॥३॥
हरिब्रह्मा सूर्य येरा कोण लेखी ।
नाहींच अोळखी मूळरूपीं ॥४॥
म्हणे ज्ञानदेव वस्तु परात्पर ।
गुरूकृपे कीर भेदिजेसु ॥५॥
अर्थ:-
ब्रह्माच्या शोधाकरिता प्रत्यक्ष शंकरदेखील कैलास पर्वत व सर्व ऐश्वर्य सोडुन स्मशानात राहीले.कशाकरिता राहिले? त्यांना शंका आली की मी कोण? कोठुन? व कशाकरिता येथे आलो? याचा उलगडा त्यानाही होईना म्हणून अजूनही ते संशयातच आहे. मग विष्णु, सूर्य, ब्रह्मा, वगैरेची गोष्ट कशाला विचारता? त्यांनाही स्वस्वरूपाची ओळख झाली नाही. ही सर्व व्यापक वस्तु गुरूकृपेशिवाय कळणार नाही. या अभंगातील तात्पर्य हे सर्व अज्ञानी होते असे नसून गुरूकृपेवांचून कितीही मोठा असला तरी त्यास स्वबुद्धिने ब्रह्मबोध होणार नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९४६
आत्मरूपीं नाही पाठीं आणि पोट ।
एकचि निघोट जाण रया ॥१॥
बाहीर भीतरीं एकचि तें एक ।
नसे आन देख भेद रया ॥२॥
ठेंगणे नावाड हळू ना ते जड ।
स्वयेंची अखंड पूर्ण रया ॥३॥
जाणणे नेणणे दोन्ही तेथें नाहीं ।
आहे जैसे पाहीं तेंचि रया ॥४॥
सदोदीत शुद्ध म्हणे ज्ञानेश्वर ।
नाहींच विकार कीर रया ॥५॥
अर्थ:-
आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पाठ पोट वगैरे कोणताच भेद नाही. ते निरवयव असल्यामुळे निर्विकार आहे. ते आत्मतत्त्व देहाच्या आंत किंवा बाहेर आहे असे नाही, ते सर्वव्यापी भेदरहित आहे. ते ठेंगणे, उंच, हलके, भारी नसून अखंड परिपूर्ण आहे त्याच्याठिकाणी ज्ञान, अज्ञान ही दोन्ही नसून ते नित्यशुद्ध ज्ञानरूप जसेच्या तसेच आहे. त्या वस्तुच्या ठिकाणी विकार नसुन ती सदोदित नित्य शुद्ध ज्ञानस्वरूप आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९४७
परेहुनी परी वैखरीहुनी दुरी ।
दुरीहुनी दुरी ब्रह्म आहे ॥१॥
केवीं तुज कळे सांग जीव रूपा ।
वृथा भ्रम बापा करितोसी ॥२॥
आकाशाचे फळ चित्रींच्या नराशी ।
केवीं प्राप्त त्यासी होईजेल ॥३॥
जेव्हां तूंचि ब्रह्म होऊनी राहाशी ।
तेंव्हा वळगशी सर्वगत ॥४॥
हेतु मातु भ्रांति हे तिन्ही गिळून ।
राहियला मौन ज्ञानदेव ॥५॥
अर्थ:-
ते ब्रह्म परावाणीच्या पलीकडील आहे. मग ते वैखरी वाणीने कसे सांगता येईल? ते ब्रह्म पारमार्थिक सत्तेतील असल्यामुळे प्रातिभासिक व व्यावहारिक सत्तेतील वस्तूहून ते फारच दूर आहे. ब्रह्म पारमार्थिक सत्तेतील असल्यामुळे व्यवहारिक सत्तेतील जीवत्व धारण करणारा जो तूं त्या तुला ते ब्रह्म कसे कळेल जीवत्वदशा कायम ठेऊन ब्रह्म कळावे असे जर वाटत असेल तर तूं फुकटच भ्रम का करित आहेस. आकाशाचे फळ चित्रांतील मनुष्याला खावयास द्यावे असे म्हणणे जसे मुर्खपणाचे आहे. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी जीवदशा कायम ठेवन ब्रह्म कळावे असे म्हणणे मुर्खपणाचे आहे.जेव्हां तूं स्वतः यथार्थज्ञान करून घेऊन ब्रह्मरूप होशील तेंव्हा तें सर्वव्यापक ब्रह्म तुला अनुभवाला येईल. माया व मायाकार्य पदार्थ यांची भ्रांती टाकून देऊन ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी मी मौनरूप धारण करून स्वानुभव स्थितीत राहिलो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९४८
एकचि मीपणें नागविलें घर ।
नाहींतरी संसार ब्रह्मरूप ॥१॥
प्रवृत्ति निवृत्ति दोन्ही मुळीं नाहीं ।
कल्पनेने पाहीं भ्रमताती ॥२॥
ते एक त्यागिता काय आहे वाणी ।
कैवल्याचा धनी तोचि होय ॥३॥
जन्म मृत्यू भोग भोगणे यालागीं ।
टाकोनिया संगी राहीं बापा ॥४॥
म्हणे ज्ञानदेव मग होशी मुक्त ।
नव्हेचि आसक्त सर्वथैव ॥५॥
अर्थ:-
देहाभिमानामुळे जीवाची फसवणूक झाली आहे. जीवाने विचार करून तो देहाभिमान सोडून दिला दिला तर जीवाचा संसार ब्रह्मरुपच होईल. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी वस्तुतः कर्माची प्रवृत्ति किंवा निवृत्ती या दोन्ही मुळातच नाही असे असूनही त्याची कल्पना आत्म स्वरूपांच्या ठिकाणी करून जीव भ्रमिष्ठ होतात.काय चमत्कार पहा, जर एक देहाभिमान त्यानी टाकला तर त्यांना मोक्षाची वान कसली? फार काय तोच मोक्षाचा अधिपती होईल. या करिता जन्म मृत्य इत्यादी भोगांचा जोगांचा संबंध टाकून राहा. असे केले तर कोठेही आसक्त न होता मुक्त होशील. असे माऊली ज्ञानदेव सांगतात. वै. भाईनाथ महाराज समाधी मंदिर, वेळापूर


९४९
भुलणे चालणें ईश्वराशी नाहीं ।
जैसा असे पाही तैसा असे ॥१॥
जरी भिन्नभेद तरी सर्वज्ञत्व ।
कासया समत्व नाम त्यासी ॥२॥
सूर्याशी प्रकाश सूर्यचि करीत ।
ईश्वर जाणत ईश्वराशी ॥३॥
आपुली पोकळी आकाशचि जाणे ।
ईश्वरचि लेणे जग लेई ॥४॥
सहज अभेद वस्तु अगोचर ।
म्हणे ज्ञानेश्वर तेंचि रूप ॥५॥
अर्थ:-
विसरून जाणे, चालणे, वगैरे क्रिया परमात्म्याला नाही. तो जसा आहे, तसाच आहे. जर वेगवेगळे क्रियारूप भेद त्याच्याठिकाणी असतील तर त्याला सर्वज्ञ सर्वव्यापी कसे म्हणता येईल. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रकाशन सूर्यच करतो. त्याप्रमाणे ईश्वरच ईश्वराला जाणतो. किंवा आपली पोकळी आकाशालाच कळते. त्याप्रमाणे जगद्रूप अलंकार घातलेले ईश्वराचे स्वरूप ईश्वरालाच माहित. जी अव्यक्त व भेदरहित वस्तु तेच ईश्वराचे खरे स्वरूप आहे. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९५०
कवणाची चाड आतां मज नाहीं ।
जडलों तुझ्या पायीं निश्चयेंची ॥१॥
देह जावो राहो नाहींच संदेहो ।
न करी निग्रहो कासयाचा ॥२॥
बहुत श्रमलो साधन करितां ।
विश्रांति तत्त्वता न होयची ॥३॥
तुज वांचोनियां कवणां सांगावें ।
कवणां पुसावें अनुभव सुख ॥४॥
माता पिता सखा सर्वस्व तूं कीर ।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीसी ॥५॥
अर्थ:-
मला आता कोणाची लाज उरली नाही. माझी चित्तवृत्ती तुझ्या ठिकाणी निश्चित जडली आहे. देह जावो अथवा राहो, मला त्यावर फिकीर वाटत नाही. तसेच कोणत्याच गोष्टीचा निग्रह करीत नाही.सुखप्राप्ती करता निरनिराळ्या साधनांचा उपयोग करुन थकलों. पण खरोखर कोठे विश्रांती अशी मिळालीच नाही या गोष्टी तुझ्यावांचून कोणांस सांगाव्या? व अनुभवाचे सुखही तुझ्यावाचून कोणाला विचारावे. म्हणून माऊली ज्ञानेश्वर निवृत्तीनाथास म्हणतात माझे आईबाप मित्र वगैरे तूंच आहेस. असे माऊली सांगतात.


९५१
अज्ञाना स्वरूप निज विचारितां ।
संदेह तत्वता घालिताती ॥१॥
कैंचि गा विश्रांति दुर्जनाच्या संगी ।
दाटोनियां भोगी नरकदुःख ॥२॥
विषयाकारणे जाहले गुरू शिष्य ।
अनुभव अभ्यास स्वप्नीं नाहीं ॥३॥
शब्दची करूनी बोलताती ब्रह्म ।
अंतरीचें वर्म नेणतीच ॥४॥
तयाची संगती त्यजी ज्ञानेश्वर ।
जाहला निर्विकार संतसंगें ॥५॥
अर्थ:-
अज्ञानी गुरूला शिष्याने आपल्या आत्मस्वरूपाविषयी विचारले असता तो त्याला घोटाळ्यांतच घालतो. दुर्जनाच्या संगतीने सुख होणार कोठे? अशा संगत धरून शिष्य नरकादि अनेक दुःखे मात्र भोगतो. त्यांचा तो गुरूशिष्यपणा विषयोपभोगाकरिता असतो.त्यांच्या जवळ ब्रह्मचिंतनादि अभ्यास स्वप्नातही नसतो. केवळ शब्दाने ब्रह्माचा उच्चार करितात. पण तात्त्विक ब्रह्मज्ञानाचे वर्म माहित नसते.अशा भोंदूची संगती सोडून केवळ सत्संगतीने आम्ही निर्विकार बनलो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९५२
सेवितां वारूणी देहभास लपे ।
बडबडची लपे शब्द नाना ॥१॥
ब्रह्मरस सुख जें कांहीं प्राशिती ।
तैसेची हे होती अनुभवें ॥२॥
धाल्याचे ढेकर निघती होतां सुख ।
तेवींची आत्मिक जाणिजेसु ॥३॥
सूक्ष्मी भासे जे कां तेंचि स्थूळी घडे ।
पाहतां निवाडे भेद नाहीं ॥४॥
गुरूकृपायोगें ज्ञानेश्वर चूळ ।
भरियेली समूळ न त्यागितां ॥५॥
अर्थ:-
दारु प्यायलेला देहभान विसरुन जाऊन त्यांची अर्थहिन बडबड थांबते. त्याप्रमाणे ब्रह्मरस प्यायलेले लोकही देहभान विसरुन त्यांच्या वृत्तित सहज मौन दिसते. जेवण झालेल्या मनुष्याला तृप्तीचा ढेकर येऊन जसा तो सुखी होतो. त्या प्रमाणे आत्मानुभवी पुरूष सुखी होतो. ब्रह्मस्वरूपाचा विचार केला तर जसे सुक्ष्मात सूक्ष्म असून, स्थूळातही स्थूळ आहे. स्थूळ सूक्ष्म हा उपाधीचा भेद ब्रह्मस्वरूपाचा नाही. मी गुरूकृपेच्या योगाने ब्रह्मरसाची चूळ न टाकता सर्व गिळली. असे निवृत्तीदास माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९५३
विक्षेपतां नाना उठती कल्पना ।
पासूनियां जाणा शूद्ध जावें ॥१॥
तरीच तें ज्ञान हृदयीं ठसावें ।
नातरी आघवें व्यर्थ होय ॥२॥
अमृताचें कुंभ सायासें जोडलें ।
त्यामाजी घातले विष जैसें ॥३॥
मन हे विटाळ अखंड चंचळ ।
न राहे चपळ एके ठायीं ॥४॥
ज्ञानदेव म्हणे गुरूकृपा होतां ।
लाहिजे तत्त्वता ब्रह्मसुख ॥५॥
अर्थ:-
चित्तांत अनेक प्रकारचे विक्षेप कल्पना उत्पन्न होत असतात ते सर्व टाकून देऊन चित्त शुद्ध करून घेतले पाहिजे. तरच जीवब्रह्मैक्यज्ञान अंतःकरणांत ठसावेल, नाही तर सर्व फुकट आहे. जसे कष्ट करून मिळविलेल्या अमृताने भरलेल्या घागरीत विषमिश्रण केले असता ते अमृत निरुपयोगी होते. एके ठिकाणी न राहणारे अत्यंत चपळ, चंचल असलेले अशुद्ध मन त्याचा शुद्ध परमात्म पाशा सबंध होणे विटाळ आहे. ते ब्रह्मसुख गुरूकृपा झाली म्हणजे सहज प्राप्त होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९५४
कर्मत्याग करितां पावे अधोगति ।
भोगितां ही मुक्ति पाविजेना ॥१॥ सांडणे मांडणे दोन्हीही त्यागणे ।
प्राचिनी वर्तणें निर्विकल्पें ॥२॥ सुख दुःख भोग या दोन्ही भोगितां ।
न धरिजे अहंता सर्वथैव ॥३॥ देह जीव शीव सर्वांसही साक्षी ।
ज्ञानदेव लक्षी परब्रह्म ॥४॥
अर्थ:-
आपल्या विहीत कर्माचा त्याग केला तर अधोगती प्राप्त होते. फलाशा धरून जर विहीत कर्माचरण केले तर स्वर्गादिकांची प्राप्ती होते. पण त्यापासून मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणून मी कर्म करीन किंवा कर्माचा त्याग करीन अशा दोन्ही तऱ्हेचा अभिमान टाकून प्रारब्धाने प्राप्त होणारे सुख दुःख भोग मुकाट्याने भोगावेत त्यांत अहंता मात्र मुळीच ठेऊ नये. कारणदेह जीव किंवा शीव या सर्वांचे साक्षीरूप जे ब्रह्म त्याच्याकडे आम्ही लक्ष ठेवतो असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९५५
सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित ।
माया ते कल्पित तद्विवर्त ॥१॥
शीव पूर्ण जीव भक्त अविद्यक ।
होय पूर्ण चोख आत्मज्ञानें ॥२॥
प्रपंच कल्पिक प्रकृति उपाधि ।
ईश्वरतत्त्व बुद्धि पारमार्था ॥३॥
ब्रह्म अगोचर म्हणे ज्ञानेश्वर ।
नाथिला संसार मूळी नाही ॥४॥
अर्थ:-
वेदांत सिद्धांताचे हे सार आहे की आत्मा नित्य असून, माया कल्पित आहे. व जगत त्याचा विवर्त म्हणजे मिथ्या आहे. शिव म्हणजे परिपूर्ण ईश्वर व त्याचा भक्त जीव हे दोन्ही अविद्या कार्य आहेत म्हणजे तिच्या स्थिती आधीन यांची स्थिती आहे. हे शुद्ध आत्मज्ञानाने स्पष्ट समजते. या कल्पित प्रपंचाची उपाधि प्रकृति होय व याच उपाधिमुळे परमात्म्याला ईश्वरत्व येते. व त्याच्याच प्रसादाने बुद्धि परमार्थाला योग्य होते. ब्रह्म हे ज्ञानाचा विषय नसून हे भासमान पण नष्ट होणारे जगत कधी झालेच नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९५६
सुख तेथे दुःख दुःख तेथे सुख ।
एकी ते अनेक अनेकीं एक ॥१॥
देव तेथें भक्त भक्तापाशीं देव ।
जाणा एकमेव भेद नाहीं ॥२॥
तरूतळीं छाया छाया तेथें तरू ।
शिष्याठायीं गुरू गुरू शिष्य ॥३॥
कण तेचि भूमि भूमिरूपी कण ।
भासा ठायीं गुण गुणी भास ॥४॥
गुरूकृपे खूण वस्तु साक्षात्कार ।
भेदला ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥५॥
अर्थ:-
एक परमात्माच विवर्त रूपाने जगत झाल्यामुळे एकात अनेक म्हणणे योग्य होय त्याप्रमाणे अनेक रूपाने भासणारे जगत् परमात्मरूप असल्यामुळे अनेकांत एक हे ही म्हणणे योग्य होईल जेथे सुख आहे तेथे दुःख आहेच. तसेच दुःख आहे तेथे सुख ही आहे. अविज्ञेने द्वैत मानल्यामुळे देव वेगळा मानला तर त्याचे उपासक भक्त तेथे असणारच.त्यांच्यात भेद मुळीच नसतो. झाडामुळे सावली पडत असल्यामुळे झाडा पाशी सावली व सावली पाशी झाड असणारच.शिष्यामुळे गुरुला गुरुपणा येत असल्यामुळे जिथे गुरु तेथे शिष्य असणारच.कण म्हणजे लक्षणेने पृथ्वीचे परमाणु, कणाचीच भूमी बनते. त्रिगुणात्मक माये मुळेच जगउध्दार होत असल्याने भासाचे ठिकाणी गुण व तसेच उलटे असते. अशारितीने संपुर्ण जगत व्यापून असणारी वस्तु मी आहे असे वर्म मला गुरुंच्या कृपेने अनुभवता आले. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९५७
ब्रह्मा विष्णु रूद्र सुजन स्थिति अंत ।
करिती महत जगीं तिन्हीं ॥१॥
सत्त्व रज तम गुण धरूनियां ।
उपाधि आपुलिया करिताती ॥२॥
सर्वही मायिक दिसते रचना ।
आशा कल्पना इयेपरी ॥३॥
दृश्यातीत परब्रह्म परात्पर ।
ओळखी ज्ञानेश्वर गुरूकृपा ॥४॥
अर्थ:-
ब्रह्मा, विष्णु, शंकर या तीन देवता अनुक्रमे सत्त्व, रज, व तम या त्रिगुण प्रधान उपाधि घेऊन जगत उत्पत्ति, पालन व संहार ही आपआपली महतकार्ये करतात. तरी त्याच्या स्थितीला अंत आहेच. ज्याप्रमाणे आशेच्या निरनिराळ्या कल्पना मिथ्या ठरतात. त्या प्रमाणे ब्रह्मांडाचीच रचना जर माया निर्मित आहे. तर ब्रह्मा, विष्णु, याच्या स्थितीला अंत आहे. यांत नवल काय. श्रीगुरूच्या कृपेने दृश्य जगताला अधिष्ठान असणारे जे परात्पर परब्रह्म ते मी जाणले. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९५८
कळिकेमाजी ज्योती समत्वासी आली ।
तेचि सामावली दृष्टी ब्रह्मीं ॥१॥
सिंधुमाजी जैसें सैंधव मिळाले ।
तेवी मन झालें ब्रह्मींलीन ॥२॥
वृक्ष बीजामाजीं जैसा सामावला ।
बिंदु कां आटला महींत जेवीं ॥३॥
जीव तोच शीव होऊनियां ठेला ।
शब्द तो मुराला निशब्दांमाजीं ॥४॥
आतां मी तूं कैंचा सर्व एकाकार ।
जाहला ज्ञानेश्वर स्वयं ब्रह्म ॥५॥
अर्थ:-
अंतःकरणरूपी कळीमध्ये प्रकाशमान होणारी शुद्ध ज्योती विचार दृष्टीने ब्रह्मस्वरूपांत सामावली. म्हणजे जीवात्मा व ब्रह्म दोन्ही एक रूप झाले. ज्याप्रमाणे पाण्यांत मीठ एकरूप होऊन जाते. त्याप्रमाणे मन ब्रह्मस्वरूपांत लीन झाले. ज्या प्रमाणे वृक्ष त्याच्या बीजांत लोपतो अथवा पाण्याचा थेंब जमीनीत आटून जाते त्याप्रमाणे जीवपणा शीवा मध्ये त्यांत, मिळुन गेल्यामुळे निःशब्द परमात्याच्या ठिकाणी शब्द जिरुन जातो. अशी स्थिती झाल्यानंतर मी व तूं हा भेद राहात नाही. त्यामुळे ब्रह्मच मी झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९५९
पुण्याशी जोडितां पापचि जोडिजे ।
तेंणेंचि पाविजे अधोगती ॥१॥
सोमयाग श्रेष्ठ करितां पावन ।
करावें हनन पशु तेथें ॥२॥
तेचि ते या दोष तयालागी जन्म ।
भोगिजेती कर्म पशु योनी ॥३॥
पुण्य तेथें पाप समचि वर्तती ।
रात्रंदिन आथी जियेपरी ॥४॥
पापपुण्य दोन्ही त्यागुनी निराळा ।
जाहला स्वलीला ज्ञानदेव ॥५॥
अर्थ:-
पुण्य संपादन करण्याकरिता यज्ञादिक करून तेथे पशु बळी दिल्यामुळे पाप होते. व त्या पापामुळे अधोगतीला जावे लागते. सर्वश्रेष्ठ सोमयाग करून मनुष्य पावन होतो. पण तो करण्याकरिता पशु मारावा लागतो. व त्यामुळे कर्त्याला दोष लागून त्या पापांच्या भोगा करिता पुढे पशुजन्म घ्यावा लागतो. म्हणून जसी रात्र आणि दिवस ही एकामागून एक सारखी आहेत. त्याप्रमाणे पुण्याबरोबर पापही असतेच. आम्ही पुण्य व पाप सोडून सहज स्वस्वरूपी मौजेने राहिलो आहोत.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९६०
केवळ निराभास या जगीं जाहला ।
नाहीं आन उरला भास कांहीं ॥१॥
संकल्प विकल्प असती मनाचे ।
छेदियले साचे भवभ्रम ॥२॥
वासनेचे मूळ टाकिलें खणोनी ।
जिवित्व गिळूनी शिवरूप ॥३॥
काम क्रोध लोभ दडले ते सहज ।
केले अति चोज सांगवेना ॥४॥
ज्ञानेश्वर नाम हेही गिळूनियां ।
मूळ अंती मायातीत शुद्ध ॥५॥
अर्थ:-
आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याचा प्रकाशक दुसरा कोणीही नाही. म्हणून त्याला निराभास म्हणतात. हे जगत, निराभास आत्मरूपच झाले त्यामुळे त्याच्या व्यतिरिक्त दुसरे काही भासण्याला राहिले नाही. जगत म्हणजे काय विचाराल तर ते मनकल्पित आहे. ते आत्मज्ञानाने जर दूर केल्यास संसार भ्रमाचा निरास होईल. मग जीवाचा जीवपणा जाऊन तो जीव शिवरूप होतो. असे झाल्यामुळे काम क्रोध, लोभ यांचा निरास होऊन जातो. माझी कायारूप भ्रांती नाहीसी झाल्यामुळे माझ्या ठिकाणी ज्ञानेश्वर हे नांव देखील उरले नाही म्हणजे मी शुद्ध स्वरूप झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९६१
सरिता येऊनियां चढती ब्रह्मगिरी ।
परी ज्ञानी न धरी जन्म कांहीं ॥१॥
चंदनासी होय बाभुळत्व प्राप्ती ।
परी ज्ञानी शिवती जन्म कांहीं ॥२॥
जळाला कापूर मागुता प्रकटे ।
परी ज्ञानिया न घडे जन्म कांहीं ॥३॥
वारा वागुरेसी धरूनी कोंडुंये ।
परी ज्ञानी नसये जन्म कांहीं ॥४॥
ज्ञानी ज्ञानेश्वर मिळोनियां गेला ।
मरण्या जिण्या झाला वेगळाची ॥५॥
अर्थ:-
ब्रह्मज्ञानी पुरूषाला पुनर्जन्म नसतो जर वाहात चाललेल्या नद्या उलट पर्वतांवर चढतील तर ज्ञानी पुरूषाला जन्म येईल. चंदनाच्या झाडाला जर बाभूळीचे रूप येईल जळलेला कापूर जर पुन्हा पहिल्यासारखा दिसेल अथवा वारा जर जाळ्यांत सापडेल तर ज्ञानी पुरूषाला पुन्हा जन्माला यावे लागेल तात्पर्य ब्रह्मज्ञानी पुरुषाला पुन्हा पुनर्जन्म प्राप्ती नाही. आम्ही ज्ञानवान झाल्यामुळे जन्ममरणातून मुक्त झालो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.


९६२
अग्निच्या पाठारीं पिके जरी पिक ।
तरी ज्ञानी सुखदुःख भोगितील ॥१॥
काळोखामाजी जैसे शून्य हारपे ।
मायोपाधि लोपे तया ज्ञानी ॥२॥
नक्षत्रांच्या तेजें जरी इंदु पळे ।
तरी ज्ञानी विकळे पुण्यपाप ॥३॥
बापरखुमादेविवर विठ्ठलु राया ।
घोटुनियां माया राहियला ॥४॥
अर्थ:-
जसे अग्निच्या डोंगरावरील सपाटीवर पीक येणे शक्य नाही त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानी पुरूषाला सुखदुःखाचा भोग होणे शक्य नाही. काळोखात जसे काही दिसत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी पुरूषाची मायारूप उपाधी नाहीसी होते. जर नक्षत्रांच्या तेजाने चंद्र लोपून गेला असता तर ज्ञान्याला पापपुण्य लागले असते. माझे पिता व रखुमाईचे पती हे विठुराया,तो ब्रह्मज्ञानी पुरूष मायेचा निरास करून राहिलेला असतो. त्यामुळे त्याला जन्म येणे शक्य नाही. असे माऊली सांगतात.


९६३
पुण्य जोडुनियां स्वर्गासी जाईजे ।
पापासी सेविजे अधोगती ॥१॥
दानधर्म करी भोग इहलोक ।
त्रिविधही एक रूप जाण ॥२॥
पाचच विषय त्रिभुवनीं असती ।
सर्वही भोगिती जीव शीव ॥३॥
दृश्य एक चुळे घोटुनी बैसला ।
ज्ञानदेव धाला आत्मयोगें ॥४॥
अर्थ:-
पुण्य संपादन करून जीव स्वर्गात जातो. पापाचरण करून तो नरकाला जातो. दानधर्म करून इहलोकीचे भोग भोगतो. पण तिघांचा प्रकार एकच आहे.कारण कोठल्याही लोकांत गेला तरी शब्द, स्पर्श, रूप, रस, आणि गंध हे पाचच विषय असतात. जीव या पांचाचाच भोग घेत असतो. ब्रह्मज्ञानाच्या योगाने सर्व विषयांना मी चुळीसारखा घोट भरून टाकला. म्हणजे मिथ्यात्व निश्चय केला त्यामुळे आम्ही ब्रह्मानंदात आहोत. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.


९६४
दुर्जनाच्या संगें दुर्जनत्व प्राप्ती ।
कैंचि त्या विश्रांती साधकाशी ॥१॥
सज्जन संगती करिता तेंचि रूप ।
आनंदाचा दीप बाणताती ॥२॥
दुर्जनाशी दिसे सर्व सृष्टी बद्ध ।
न दिसे कांहीं शुद्ध सर्वथैव ॥३॥
सज्जनांसी भासे विश्व पूर्ण मुक्तएकत्वी आसक्त न दिसती ॥४॥
सज्जनादुर्जनातीत जे निर्जन ।
तेथे संमर्जन ज्ञानेश्वर ॥५॥
अर्थ:-
दुर्जनांच्या संगतीने दुर्जनत्व येते. मग अशा संगतीने साधकाला विश्रांती मिळणार कशी. सज्जनाच्या संगतीने सज्जनपणा येऊन ते आनंदाची प्राप्ती करून देतात. दुर्जन मनुष्याला सर्व जग बद्धच आहे असे वाटते. त्याला जगात शुद्ध असे कांही दिसतच नाही. सज्जनाला सारे जगत मुक्त असे वाटते. ‘देखे आपुली प्रतिती जगचि मुक्त’ या माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे एकसारखे आसक्त दिसत नाही.सज्जन दुर्जनांच्या दृष्टीच्याही पलीकडे जे निर्जन त्या अवस्थेला आम्ही प्राप्त झालो.
असे माऊली ज्ञानेश्वर म्हणतात.
९६५
मायिक हे सृष्टि कल्पिक जाहली ।
अनादि घडली जाणिजेसु ॥१॥
देहभास नित्य नूतन भासती ।
शुद्ध स्वयं ज्योति जुनाटची ॥२॥
माया अविद्या दोन्ही उपाधि करूनी ।
जीवशीव दोन्ही भिन्न जाले ॥३॥
अनादि अज्ञान बंध नये यासी ।
गुरुकृपा त्यासी छेदिजे की ॥४॥
अनुभवयोगें जाणुनी ज्ञानेश्वरहा भवसागर उतरला ॥५॥
अर्थ:-
मायेने घडविलेली व जीवाच्या कल्पनेत झालेली अशी ही सृष्टी अनादी कालापासून आहे असे समज. देहभाव मात्र प्रत्येक जन्मात वेगळा व नवाच वाटतो परंतु त्यातील आत्मतत्त्व नित्य शुद्ध व जुनाटच आहे माया व अविद्या या दोन वेगळाल्या उपाधिमुळे शुद्ध ब्रह्मच जीव व शीव या रूपांनी वेगळे वाटतात. परमात्मस्वरूप असलेले जीव शीवांना वास्तव अज्ञानाचे बंधन नाही. पण मानले तर सद्गुरूकृपा संपादन करून त्याचा छेद कर. परमात्मानुभवाने मी हा भवसागर उतरून गेलो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९६६
जन्ममरणांतें नाहींच गणित ।
सूर्य जैसा होत उदय अस्त ॥१॥
वासनेच्या योगें न निमे कल्पना ।
याचि लागी नाना योनी भोगी ॥२॥
पापपुण्य दोन्ही साठवीत आहे ।
असुयेशी जाये अधउर्ध्व ॥३॥
समत्वें इहींचि जाण जन्म घरीं ।
आथी इयेपरी तिन्हींजेसु ॥४॥
त्रिभुवनाहुनि राहिला निराळा ।
ज्ञानेश्वरी लीला निरंजनीं ॥५॥
अर्थ:-
जीवांना सूर्याच्या उदयास्ताप्रमाणे किती जन्म होतात याची गणतीच नाही. कारण अनादि अनंत वासनेच्या योगाने जन्ममरणाची कल्पना नाहीसी होत नाही. म्हणून नाना योनीत जन्म घेऊन पापपुण्याचा साठा करतात. आणि प्राणाच्या सहाय्याने स्वर्ग नरकाला जातात व पापपुण्य समानतेने मनुष्य जन्म घेतात. असे जन्माचे तीन प्रकार आहेत. आम्ही गुरूकृपेने पापपुण्यातीत झाल्यामुळे स्वर्गनरक व मनुष्यजन्म याहून मुक्त झालो, आता आम्ही ब्रह्मनंदामध्ये लीला करीत राहू.असे माऊली ज्ञाऩेश्वर सांगतात.
९६७
ब्रह्म जयाचिये बोधेंचि पावत ।
ते जगीं शाश्वत गुरुमूर्ति ॥१॥
शब्दज्ञानें जया गुरू उपदेशिती ।
नाही त्यासी मुक्ति कदाकाळी ॥२॥
संसारी तरोनी शिष्यासी तारिती ।
तेचि मानिजेति गुरू एक ॥३॥
काम क्रोध लोभ जे का न शिवती ।
तेची ओळखी सद्गुरू जाण ॥४॥
ज्याशी नाही भेद ब्रह्मीं एकाकार ।
म्हणे ज्ञानेश्वर तोचि गुरू ॥५॥
अर्थ:-
ज्याच्या बोधाने ब्रह्मप्राप्ती होते. तीच जगांत सत्य गुरूमूर्ति होय. शब्दज्ञानी याला उपदेश करतात, त्याला केंव्हाही मुक्ति प्राप्त होणार नाही. आपण संसारातुन तरून जे शिष्यांनाही तारतात. अशा पुरूषालाच जाणते लोक गुरू समजतात. ज्यांना काम, क्रोध वगैरे विकार स्पर्श करू शकत नाहीत असल्या सदगुरूंना ओळखण्याची हीच खूण समज.ज्याच्या ठिकाणी भेदबुद्धि नसून सर्वत्र ब्रह्मदृष्टि असेल त्यांनाच सद्गुरू असे समजावे.असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९६८
सद्गुरूवांचूनी संसारी तारक ।
नसेचि निष्टंक आन कोण्ही ॥१॥
इंद्र चंद्र देव ब्रह्मांदी करूनी ।
संशयाची श्रेणी छेदती ना ॥२॥
उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ति ।
पुरविती आर्ती शिष्याचिया ॥३॥
वंचना करिती जन दुष्ट नष्ट ।
मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ॥४॥
ज्ञानदेव म्हणे गुरूचा मी दास ।
नेणें साधनास आन कांहीं ॥५॥
अर्थ:-
सद्गुरूवांचून संसार समुद्रातून तारून नेणारा निःसंशय दुसरा कोणी नाही.इंद्र चंद्र ब्रह्मदेव इत्यादि देव असले तरी ते शिष्याच्या ठिकाणचा संशय दूर करू शकणार नाहीत. सद्गुरू हे साक्षात् परब्रह्मच असून ते आपल्या शिष्याची ‘सदिच्छा पूर्ण करतात. असा सद्गुरूंचा अधिकार न कळल्यामुळे मूर्ख लोक त्यांची निंदा करतात. पण जाणते पुरूष मात्र त्यांना त्याचा अधिकार ओळखून वंदनच करतात. मी माझ्या सद्गुरूंचा एकनिष्ठ सेवक आहे त्यांच्या सेवेशिवाय इतर साधने करण्याचे मला माहीत नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९६९
रजापासूनियां जाहली उत्पत्ति ।
सत्त्वगुणीं स्थिति वाढविती ॥१॥
तमोगुणें करूनी पाविजे मरण ।
राहाटती त्रिगुण जगामाजीं ॥२॥
त्रिगुण त्यजुनी व्हावे निस्त्रेगुण ।
नाचरावे पुण्यपाप काहीं ॥३॥
तरीच ब्रह्मज्ञान गुरूकृपाप्राप्ती ।
जिता जिवन्मुक्ती ज्ञानेश्वर ॥४॥
अर्थ:-
ब्रह्मदेव रजोगुणाने जगाची उत्पत्ति करतो. विष्णु सत्त्वगुणाच्या योगाने स्थिति वाढवते. शंकर तमोगुणाच्या योगाने नाश करतो अशी त्रिगुणापासून जगाची राहाटी आहे. त्रिगुण टाकून देऊन त्रिगुणाच्या पलीकडे व्हावे. व त्याकरिता पापपुण्यजनक कर्माचे आचरण करू नये. अशी तुमची वागणूक झाली तरच गुरूकृपा होऊन तुम्हाला जीवंतपणीच मुक्तीच्या सुखाचा अनुभव मिळेल. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९७०
साभिमानें करुनी व्यर्थ कारे फुगशी ।
मत्त ऐसा होसी मतिमंदा ॥१॥
सर्वब्रह्मरुप हे खूण ओळखीं ।
भिन्नपण टाकीं निश्चयेंसी ॥२॥
मान अपमान तुज कांही नाहीं ।
तूं तंव विदेहीनित्य शुध्द ॥३॥
प्रारब्धानें देह भोगिता हे भोग ।
कासया रे सांग भ्रांती तुज ॥४॥
साधोनी अपरोक्ष वस्तु सर्वगत ।
ज्ञानेश्वर म्हणत राजयोंगी ॥५॥
अर्थ:-
हे मंदमति पुरुष तूं कर्तृत्व भोर्तृत्वाने उन्मत्त होऊन अहंकाराने व्यर्थ का फुगतोस त्या ऐवजी सर्व जगत ब्रह्मरुप आहे असा अव्दैत भाव प्राप्त करुन व्दैत भाव टाकून दे.मान अपमान धर्म देहाचे आहेत हा धर्म तुझा नाही तू त्या देहाहून भिन्न ब्रह्मरुप आहेस. प्रारब्धाने भोग भोगीत असताना तुला आपलेपणाचा भ्रम कशाला. सर्व व्यापकत्वाने ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान ज्याला झाले तोच राजयोगी होय असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात
९७१
जहाला इंद्र शेष तरी आम्हां काय ।
नैश्वरी तो पाहे भुललासे ॥१॥
हरिश्चंद्रादिक ब्रह्मादि करून ।
मायोपाधीन भास जाले ॥२॥
निरंजनी घेतां ययाचि पै शुद्धि ।
एकही अवधी न दिसती ॥३॥
हरिहरादिक देही सुकल्पिक ।
इतरांचा लेख कोण करी ॥४॥
गुरूकृपायोगें ब्रह्म ज्ञानेश्वर ।
तरला संसार भवसिंध ॥
अर्थ:-
इंद्राला स्वर्णाचे व शेषाला पाताळाचे राज्यभोग असले तरी आम्हाला त्याचे काय कौतुक ते क्षणभंगुर सुखातच गुरफटलेले आहेत. हरिश्चंद्र, ब्रह्मदेव वगैरे यक्ति देखील मायोपाधीने भासमात्र झालेले आहेत. शुद्ध ब्रह्माच्या दृष्टीने त्यांचे अस्तित्वच नाही. मोठ मोठे विष्णु शंकरादिक हेही जर काल्पनिकच आहेत तर इतरांची काय कथा. सद्गुरू कृपेने मी बह्मरूप आहे अशी खात्री होऊन या संसार सिंधुतून तरून गेलो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात
९७२
चौदा विद्या जरी पूर्ण अभ्यासिले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेविण ॥१॥
तीन वीस चारी कळा अनुभविले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेवीण ॥२॥
अष्टांगादि योग प्रयासें जोडले ।
व्यर्थचि जाहले ज्ञानेवीण ॥३॥
कर्मधर्मक्रिया नाना आचरले ।
व्यर्थची जाहले ज्ञानेवीण ॥४॥
ज्ञानेश्वर म्हणे ब्रह्म साधियलें ।
कीर आथीयलें ज्ञानेवीण ॥५॥
अर्थ:-
चौदा विद्या, चौसष्ट कला, अष्टांग योग व अनेक पुण्यकारक कर्माचरणे केली पण ब्रह्मज्ञान जर झाले नाही तर ते सर्व व्यर्थ आहे. एका ब्रह्मज्ञानावांचून काही जरी केले तरी ते सर्व व्यर्थ होय असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९७३
कासवाच्या परी आत्मा तो या देहीं ।
इंद्रिये जो पाही अवलोकी ॥१॥
सहज प्रकाश आहे तो करीत ।
स्वयें चेष्टवीत दीपापरी ॥२॥
जाणे येणे काही नाही आत्मयाशी ।
द्रष्टुत्व तयासी जाणिजे की ॥३॥
तद्विवर्त जीव अविद्यक मन ।
संसारबंधन’इयेचेनि ॥४॥
ज्ञानदेव म्हणे आत्मा शुद्ध बुद्ध ।
नव्हेचि पैं बद्ध कदाकाळीं ॥५॥
अर्थ:-
या देहामध्ये आत्मा कासवाप्रमाणे असल्यामुळे इंद्रियादि आपल्या अवयवांना प्रकाशित करतो.तात्त्विक प्रकाश कर्तृत्व त्याच्याकडे नाही. त्याच्या सहज प्रकाशाने देहादि व्यवहार होतात. म्हणून तो प्रकाशन करतो. असा दिव्याप्रमाणे गौण व्यवहार होतो. हा कोठे जात नाही वा कोठून येत नाही. मात्र जीवांच्या व्यवहाराचा साक्षी आहे.जीव त्याचा विवर्त आहे. व मन अविद्याकार्य याच योगाने त्या जीवाला संसार बंधन आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, असल्यामुळे याला केंव्हाही बंधन नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९७४
वेदांत सिद्धांत देतात पैं हाक ।
स्तब्ध ते जंबुक येर शास्त्रे ॥१॥
तेंचि की प्रमाण साधनानुक्रम ।
येर भवभ्रम की आथी ॥२॥
ऐकजे ती शास्त्रे पडिलीं संदेहीं ।
होय नाहीं कांही म्हणूनियां ॥३॥
वेदांतीही भिन्न जाणा पूर्वपक्ष ।
लक्षितेती अती मूर्ख ॥४॥
काय बहिर्मुख नेणतीच येर ।
म्हणे ज्ञानेश्वर राजयोगी ॥५॥
अर्थ:-
संसाररूपी हत्तीस नाश करण्याला एक वेदांतशास्त्ररूपी सिंहच पाहिजे बाकीचे शास्त्रे कोल्ह्याप्रमाणे स्वस्थ बसतात. तेच शास्त्र मुमुक्षुला फार उपयोगी पडते. बाकीच्या शास्त्रांत संसारभ्रम दूर करण्याची शक्ती नाही. वेदांताखेरीज इतर शास्त्रांचा जे अभ्यास करतात. ते लोक अधिकच संशयातच पडतात.वेदांत मतातही खंडनाकरता पूर्वपक्ष घेतलेला असतो. तो त्यांच्या मतासी विरोधी असतो.त्यातच काही लोक पूर्ण लक्ष ठेवून आपला गोंधळ करून घेतात. असे ते अतिमूर्ख समजावे. असे जे मूर्ख पुरूष असतात.त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही. असे राजयोगी माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९७५
पाहणें जें कांहीं त्यासी मुळी पाहें ।
मग सुखी राहें योगीराया ॥१॥
मी तूं द्वैत भ्रांती पहा रे काढुनी ।
आत्मा तो गिवसुनी राहे सुखें ॥२॥
अविद्या नाथिली रज्जु सर्पापरी ।
भासली विचारी अनुभवें ॥३॥
तेंव्हा हे उपाधि राहिली सौरस ।
ज्ञानदेवदास पूर्ण धाला ॥४॥
अर्थ:-
जगांतील दृश्य पदार्थांना अधिष्ठानरूपाने असणाऱ्या मूळच्या आत्मवस्तुकडे तुला पाहिले पाहिजे. अशारितीने दृश्यपदार्था वरील दृष्टि जाऊन अधिष्ठानाकडे तुझी दृष्टी आली म्हणजे मग योगीराजा तूं सुखाने खुशाल काळ घालव. आत्मज्ञान प्राप्त करून मी व तूं हे द्वैत काढून सुखाने राहा. ज्याप्रमाणे भ्रांतीने दोरीवर सर्पाचा भास होतो. त्याप्रमाणे जिला अस्तित्वच नाही अशी अविद्या आत्म्यावर भासली असे अनुभवाने समजावून घे. असे आत्मस्वरूपाचे ज्ञान झाल्यावर देहरूप उपाधिची आसक्ती नाहीशी होते व जीव ब्रह्माचे पूर्ण ऐक्य होऊन तृप्ती होते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९७६
मूक्तत्वाची भ्रांती जे कांहीं धरिती ।
तेचि बद्ध होती निश्चयेंसी ॥१॥
कल्पना इवलुशी जये ठायीं असे ।
तिये ठायीं वसे अहंकार ॥२॥
देहीं ग्रासुनिया राहती जे सुखी ।
तेचि ते पारखी आत्मतत्त्वीं ॥३॥
सर्व ब्रह्मपूर्ण तयाशीच बोध ।
तयाशीच पद कैवल्याचें ॥४॥
साक्षीरूप पहा धरिती शरीर ।
तेचि ज्ञानेश्वर पूर्ण योगी ॥५॥
अर्थ:-
ज्यांना मुक्तत्वाचा अहंकार असतो. तेच खरे बद्ध असतात. व अहंकारही ज्याच्या ठिकाणी मी मुक्त आहे अशी यत्किंचितही कल्पना असेल त्याचे ठिकाणी सिद्ध होतो. अशा देहांत असणाऱ्या अहंकाराला ग्रासून जे ब्रह्मानंदात निमग्न असतात तेच आत्मतत्त्वाची खरी पारख करणारे असतात. सर्व जगत ब्रह्म आहे असे जे पाहतात त्यांनाच यथार्थ ज्ञान होऊन विदेह कैवल्य मिळते. वरीलप्रमाणे स्वतः साक्षीरूपाने अलिप्त राहून ज्याचे सर्व शरीरव्यवहार चालतात. तेच पूर्ण योगी होय असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९७७
गगनाहूनि व्यापक वायुहूनि चालक ।अग्नीहूनी दाहक आन नसे ॥१॥
ब्रह्म परिपूर्ण तोचि सनातन ।
स्वयें आनंदघन आन नसे ॥२॥
दृश्याहूनि गोचर इहिहूनि पर ।
गुरूवीण ज्ञानेश्वर आन नसे ॥३॥
अर्थ:-
परमात्मा आकाशापेक्षाही व्यापक आहे. तसेच वायु सर्वांचा चालक आहे. पण त्या वायुचाही चालक परमात्मा आहे. अग्नीची दाहकशक्ती मोठी खरी पण ती अलस्वरूपाहून वेगळी नाही. तरी ते ब्रह्मच पूर्ण, सर्वव्यापी, अनादि व आनंदघन असून सर्व दृश्य वस्तुच्याही पलीकडे आहे. मीही ज्ञानस्वरूप जे ब्रह्मरूप सदगुरु त्यांच्याहून वेगळा नाही.असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९७८
सिंहाचे दुग्ध सायासें जोडलें ।
आणुनी पाजिल मार्जाराशी ॥१॥
अमोलिक विद्या धन झाली प्राप्ती ।
पहावया प्रतीति स्वशीस छेदी ॥२॥
अनेक दीप लाविले दीपाशीं ।
फुंकूनिया त्यासी मग सोडी ॥३॥
परीस जोडुनी घालियाली भिंती ।
शिळा घेऊनी हातीं फिरत आहे ॥४॥
अमृताचा कुंभ बळेंचिं उलंडूनी ।
कांजिये भरूनी ठेवितसे ॥५॥
अमोलिक देहीं न साधा जरी पर ।
म्हणे ज्ञानेश्वर व्यर्थ होय ॥६॥
अर्थ:-
मोठ्या प्रयासाने मिळविलेला मनुष्य देह तो परमार्थ न करता व्यर्थ घालविणे म्हणजे कष्टाने सिंहीणीचे दूध मिळवावे व ते एखांद्या मांजराला पाजावे त्याप्रमाणे आहे.किंवा एखाद्याने कष्टाने विद्या अथवा धन मिळवावे व त्या धनाचा उपभोग घेण्याऐवजी आपले शीर तोडून घ्यावे. अथवा सायासाने दिवे लावावे. व आपणच फुकून मालवून टाकावे. अथवा परीस मिळाला असता तो दगड समजून भिंत बांधण्याला त्याचा उपयोग करावा किंवा दगड म्हणून हातात घेऊन फिरावे. अमृताने भरलेली घागर लवंडून देऊन तिच्यामध्ये भाताची पेज भरून ठेवावी. या वरील गोष्टी करणेे मूर्खपणाचे आहे. मोठ्या भाग्याने प्राप्त झालेल्या मनुष्यदेहाचा जर परमात्म प्राप्ती करता उपयोग केला नाही. तर त्याचा जन्म व्यर्थ होय. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९७९
साधूचा महिमा वर्णवेना कांहीं ।
ब्रह्मादिक तेही वर्णिताती ॥१॥
त्याचिये कृपें मोक्ष जिऊनियां ।
लाधिजे प्राणिया निश्चयेंचि ॥२॥
गंगेहूनि थोर संत शुचिष्मंत ।
गंगा शुद्ध होत त्याचे संगें ॥३॥
वडवानळ शुचि परी सर्वही भक्षक ।
इंद्र पुण्यश्लोक पतन होय ॥४॥
पतीत पावन कृपाळ समर्थ ।
देताती पुरुषार्थ चारी दीना ॥५॥
बाप रखुमादेविवर विठ्ठलाच्या संगी ।
झाला पूर्ण योगी ज्ञानेश्वर ॥६॥
अर्थ:-
साधूंचा महिमा आमच्या सारख्याला वर्णन करता येत नाही हे खरे. पण तो ब्रह्मदेवादिक वर्णन करतात.त्या संतांच्या कृपेने जेवण करुन प्राण्यांना मोक्षाचा लाभ होतो. सदाचारी संतांची योग्यता गंगेहूनही अधिक आहे कारण सांधूंच्या स्पर्शानि गंगा ही पावन होते. संतांना शुोद्ध अशा वडवानळाची उपमा द्यावी तर ती कमीच ठरते. कारण वडवानल सर्व भक्षक आहे. इंद्राची उपमा द्यावी तर त्यालाही अधोगती प्राप्त होते. पतीत पावन संत मात्र होत जनांना उद्धरुन नेणारे व चारी मुक्ती देणारे असे आहेत. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांच्यामुळे व निवृत्तीच्या संगतीने मी पूर्ण योगी झालो. असे माऊली सांगतात.
९८०
मुक्ति पावावया करिजे हरिभक्ति ।
तरीच विरक्ती प्रगटेल ॥१॥
विरक्तीविषयीं होतांचि विचार ।
नित्य हे नैश्वर ओळखती ॥२॥
तेव्हां आत्मज्ञान अनुभव होय ।
अविद्यत्व जाय जीवरुप ॥३॥
शांति क्षमा दया तिष्ठती सहज ।
न दिसे दृश्य काज जगामाजीं ॥४॥
गुरुकृपा द्वारें लहिजे पैं सिद्धी ।
बोलिला त्रिशुद्धि ज्ञानेश्वर ॥५॥
अर्थ:-
मुक्ति प्राप्त करुन घेण्याची इच्छा असेल तर परमेश्वराची भक्ति करा. त्यापासून वैराग्य उत्पन्न होईल. एकदा विषयाबद्दल वैराग्य उत्पन्न झाले म्हणजे परमात्माच एक सत्य आहे. व इतर वस्तु अनित्य आहे असा जीवांचा निश्चय होईल. व असा निश्चय झाला म्हणजे जीवरुपाने असलेली अविद्या जाऊन शुद्ध आत्मस्वरुपाचा अनुभव येतो. ज्यांना आत्मज्ञान झाले अशा पुरुषांच्या ठिकाणी शांती, दया, क्षमा वगैरे गुण सहजच दिसतील. व त्यांना जगांत कर्तव्य कांही राहातच नाही. हे आत्मज्ञान गुरुकृपेने प्राप्त होणारे आहे असे निश्चित समजा. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९८१
ईश्वर तो देव छाया ते शीव ।
प्रती छाया जीव तिन्ही भेद ॥१॥
एक तेंचि सूत्र तिन्हीसी मिळुनी ।
जाणती ते ज्ञानी आत्मविद ॥२॥
जें अनिर्वचनीय तें मूळ प्रकृति ।
ब्रह्मा ऐशी शक्ति तियेचि पैं ॥३॥
ब्रह्मा विष्णु रुद्र तियेचें पैं अंग ।
मुळी सृष्टि जग गोसाविणी ॥४॥
ब्रह्म तेंचि भास आभास जाहलें ।
ज्ञानदेव बोले निवृत्तिदास ॥५॥
अर्थ:-
सर्वाधिष्ठान परमात्मा जो मुख्य देव त्याची मायेत जी छाया म्हणजे तो शीव आणि अंतःकरणांत त्या शीवाचे जे प्रतिबिंब तो जीव अस हे तीन प्रकार आहेत? आत्मसाक्षात्कारी पुरुष आहेत. ते या तीन्ही वस्तु ब्रह्मरुपच शुद्ध परमात्म्याच्या आश्रित जी अनिर्वचनीय माया तीच मूळ प्रकृति असुन तिला ब्रह्माची शक्ती असेही म्हणतात. तिच्यापासून ब्रह्म, विष्णु शंकर अशी ईश्वरास नांवे आली. म्हणजे सृष्टीची मुख्य मालकीणही ब्रह्माश्रित माया आहे. ती माया आपल्यामध्ये प्रतिबिंब घेऊन जीव व शीव दाखविते. असे निवृतीदास ज्ञानदेव सांगतात.
९८२
जळवायुवेगें हालत सविता ।
मुळी तो तत्त्वता स्थिर असे ॥१॥
माया अविद्याभास शीव तो बिंबला ।
जीवरुप ठेला होऊनियां ॥२॥
सुख दुःख भोगी जिवाचिये सत्ते ।
देहीं क्रिया वर्ते स्वाभाविक ॥३॥
अज्ञानें करुनी भुलणे जिवाशी ।
मुळीं शद्ध अंशी शीव चोख ॥४॥
जिवाशी उद्धार करावया कीर ।
म्हणे ज्ञानेश्वर जाणिजे कीं ॥५॥
अर्थ:-
वायुच्या वेगाने पाणी हलल्यामुळे त्यातील सूर्य प्रतिबिंब हलल्यासारखे वाटते. पण आकाशस्थ सूर्य स्थीरच असतो. त्याप्रमाणे माया व अविद्या यांत आत्मा प्रतिबिंबित होऊन मायेत शीव व अविद्येत तो जीव होतो. व जीवाच्या सत्तेतून नाना प्रकारची सुखदुःखे भोगीत असतो. देहाच्या स्वाभाविक क्रियेतून शीव शुद्ध असतो.अज्ञानाने जीव भ्रमिष्ट होतो. आणि शीव शुद्ध असतो.जीवाला आपला खरा उद्धार करुन घ्यावयाचा असेल तर जीवांनी जीवेश्वर स्वरुप जाणून घेतले पाहिजे असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९८३
शून्य निरसुनी दोन्ही निरखिलें ।
तेथुनी देखिलें निजवस्तु ॥१॥
स्वप्रकाशमय आत्मा सदोदित ।
सर्वत्र भरीत एकमेव ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान तिन्ही निरसुनी ।
झालो निरंजनी लीन आथी ॥३॥
अहं हे स्वरुप गिळूनियां पाहीं ।
देहींच ही स्वसंवेद्य ॥४॥
बापरखुमादेविवर विठ्ठलाचा दास ।
झाला समरस परब्रह्म ॥५॥
अर्थ:-
सत्ता स्फूरतिशून्य असलेले अहम्’आणि ‘मम’ यांचा निरास करुन निरखून पाहिले तेव्हा निजवस्तूला पाहिले. पुढे त्यांचा निरास झाल्यामुळे ब्रह्मस्वरूप कळले, तेच तेजोमय ब्रह्म आत्मा’ या संज्ञेने प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भरलेले आहे. असे ज्ञान झाले. नंतर ध्याता ध्यान व ध्येयही त्रिपुटी निरसून मी आत्मरुप बनलो. अहंकार टाकून या देहातच मी विदेह स्वरुपाने स्वसंवेद्य आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंगांचा दास जो मी, तो ब्रह्मस्वरुपासी समरस झालो. असे माऊली सांगतात.
९८४
वर्षाकाळी नदियां पूर्ण भरती ।
येऊनी मिळती सिंधुमाजीं ॥१॥
ऊष्ण काळी न्यून आटोनियां गेली ।
नाहीं खंती केली सिंधु त्यांतें ॥२॥
सुखदुःखभोग भोगितां प्राचिनी ।
अखंड सज्जनीं शांती असे ॥३॥
नाहीं तया भूती सर्व ब्रह्मएक ।
अनुभऊनी सुख भोगिताती ॥४॥
तत्त्वमसी बोध आत्मानात्म भेदले ।
दृश्य विसरले भास आधीं ॥५॥
सज्ञान चेईलें अज्ञान निदेलें ।
विपरीत केलें सुपरीत ॥६॥
द्रव आणि स्थिर मुळीं एक नीर ।
झाला ज्ञानेश्वर स्वयं ब्रह्म ॥७॥
अर्थ:-
पावसाळ्यामध्ये नद्यां आपल्या बरोबर पुष्कळ पाणी घेऊन समद्राला मिळतात. उन्हाळयांत त्या आटून गेल्यामुळे पाणी थोडे आणतात म्हणून ज्या प्रमाणे समुद्राने त्याबद्धल कधी खेद केला नाही.त्याप्रमाणे सज्जनही अखंड शांती असल्यामुळे पूर्वकर्मानुसार प्राप्त होणाऱ्या भोगाबद्दल सुखदुःख मानीत नाहीत त्याना त्याची खंती वाटत नाही. कारण आपण ब्रह्मरुप आहोत व तेच ब्रह्म सर्व भूतमात्रात भरलेले आहे. असा त्यांचा अनुभव असतो.तूं ब्रह्म आहेस या उपदेशाने झालेला बोध त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे आत्मानात्मविचाराने अनात्म्याचा नाश होऊन गेलेला असतो. म्हणजे दृश्य पदार्थ सत्यत्वाने भासतच नाहीत. त्याच्या ठिकाणी अज्ञानाची झोप जाऊन त्यांना ज्ञानाची जागृती आलेली असते. व बुध्दीचा विपरीतपणा जाऊन ते योग्य काम करु लागते.पाणी पातळ असो किंवा गारेप्रमाणे घट्ट असो. ते पाणीच असते. त्याप्रमाणे ब्रह्म कोणत्याही स्थितीत भासले तरी ते ब्रह्मच आहे. व तेच स्वयंब्रह्म मी झालो असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९८५
सर्वत्र परिपूर्ण सर्वांघटीं वसे ।
अभाग्यासी कैसें पडल आलें ॥१॥
मायेच्या भुलारें भुलले विश्वजन ।
जनी जनार्दन न देखती ॥२॥
आत्मा, आत्मीं भाविता देहीं ।
मायेच्या डोही बुडाले कैसें ॥३॥
बापरखुमादेविवर सगुणी न समाये ।
निर्गुणी दिसताहे जनवन ॥४॥
अर्थ:-
परमात्मा सर्वत्र परिपूर्ण भरलेला असून दुर्दैवी लोकांच्या दृष्टिवर पडळ आल्यामुळे त्यांना दिसत नाही. सर्व जग मायेच्या भुरळाने भुलून गेले आहे. कारण जगांत अधिष्ठानरुपाने परमात्माच आहे. हे त्यांना कळत नाही. या देहाच्या ठिकाणी कोणी आपला आत्मा म्हणजे पुरुष व आत्मी म्हणजे स्त्री समजतात आहेत. लोक मायारुप डोहांत कसे बुडाले पहा. माझे पिता व रखुमाईचे पती श्री पांडुरंग केवळ सगुण मूर्तिच नसून जन वन वगैरे सर्व जगांत अधिष्ठानरुपाने भरलेला प्रत्यक्ष निर्गुण परमात्मा दिसत आहे.
९८६
चोहटा मिष्टान्न जे काही सांडलें ।
सुनियासी झालें सुकाळ पैं ॥१॥
तैसा तो अभक्त वाढिन्नला जगीं ।
काळ तयालागीं ग्रासितसे ॥२॥
जे कां पारंगत श्रेष्ठ भागवत ।
चळचळां कापंत काळ तया ॥३॥
तयाचिया दृष्टी मोहरा न राहे ।
धाऊनियां जाय अज्ञान तीं ॥४॥
निवृत्तीदासाचा झालों निजदास ।
वंदिती तयास ब्रह्मादिक ॥५॥
अर्थ:-
चव्हाट्यावर टाकलेल्या मिष्टानाचा कुत्र्यांना सुकाळ होतो. त्याप्रमाणे जगामध्ये भगवद्भक्ती न करता वाढलेल्या पुरुषाचा ग्रास काळ करित असतो. भगवद्भक्ती पारंगत भगवद्भक्तांच्या पुढे काळ चळचळा कापत असतो. त्याच्या दृष्टीपुढे अज्ञान येऊच शकत नाही. ब्रह्मदेवादिक ज्या श्री गुरु निवृतीरायांना वंदन करतात. त्यांचा मी दास झालो असे माऊली सांगतात.
९८७
उत्तम ने परी उभविलें मनोहर ।
दीपकावीण मंदीर शोभा न पवे बापा ॥१ ॥
धृतेंवीण भोजन तांबूळेंवीण वदन ।
कंठेवीण गायन शोभा न पवे बापा ॥२॥
सुंदर आणि रमण जरी होय तरुणी ।
पुरुषावीण कामिनी शोभा न पवे बापा ॥३॥
दिधल्यावीण दाता श्रोत्यावीण वक्ता ।
वेदावीण पंडित शोभा न पवे बापा ॥४॥
ज्ञानेश्वर सांगे अनुभवीया अंगें ।
नुसता बोलें वागे शोभा न पवे बापा ॥५॥
अर्थ:-
उत्तम घरांत रात्री दिवा, जेवणांत तूप, तोंडात विडा गाणाऱ्याला आवाजाची सहाय्यता, तरुण स्त्रीला पति, दात्यास दान, वक्त्यास श्रोते, पंडितास वेदाध्ययन वगैरे गोष्टी नसतील तर त्या जशा शोभा देत नाही. निरूपयोगी ठरतात. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी सांगणाराही अनुभव नसल्यास व्यर्थ ठरतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९८८
वांझेचिये पोरा तिघे झाले लेक ।
पारधीसी देख निघाले ते ॥१॥
उर्ण तंतु दोरा जाळे केले त्याचें ।
डोहीं मृगजळाचे धरिले मच्छ ॥२॥
नेले अंधापासीं मुके बोले त्याशी ।
दिले थोट्यापाशी ठेवणे तें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे केले अविद्येचें ।
संतासी तयाचे भय नाहीं ॥४॥
अर्थ:-
संसाराची भीती अज्ञानी लोकांना असते. संसार म्हणजे वांझेच्य परिवाराप्रमाणे आहे. याबद्दल माऊली एक मजेदार दृष्टांत देतात. एक वांझेला तीन नातू होते. ते माशांची शिकार करण्याकरिता निघाले. त्यांनी कोळयांच्या तोडांतून निघालेल्या दोऱ्याचे जाळे तयार केले.व ते घेऊन मृगजळाच्या डोहांतले मासे मारुन आंधळ्याच्या पुढे नेऊन ठेवले.त्या आंधळ्याशी एक मुका बोलत होता. ते मांसे थोट्या हाताच्या मनुष्याजवळ ठेवण्याकरिता म्हणून त्याने दिले. वरील दृष्टांता प्रमाणे. अविद्याकार्य संसाराची भीती अज्ञानी लोकांनाच असते. त्याची साधु संतांना भिती मुळीच नसते.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९८९
शत अश्वमेध घडले जयाला ।
तरी ब्रह्म त्याला अगम्य हें ॥१॥
सोमयागाची हे नाहीं ज्या गणना ।
तरी आत्मखुणा अलभ्य तें ॥२॥
लक्ष अनुष्ठान त्रिभुवनीं अन्नदान ।
तरी ब्रह्मज्ञान अतर्क् हें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे शुद्ध ब्रह्मज्ञान ।
पावले हे खुण संतसंगे ॥४॥
अर्थ:-
एखाद्याने अश्वमेध यज्ञासारखे शेकडों जरी यज्ञ केले. तरी त्याला ब्रह्म अगम्यच राहील. दुसऱ्या एखांद्याकडून अगणित सोमयाग झाले असले की त्याला आत्मप्राप्ती दुर्लभच असणार. लाखों अनुष्ठाने केली त्रिभुवनाला अन्नदान केले तरी ब्रह्मज्ञान होणे कठीण. यथार्थ ब्रह्मज्ञान होण्याला एक संताची संगतीच घडली पाहिजे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९९०
पूर्वेचा हा भानु उगवेल पश्चिमे ।
परी भूमि जन्म नसे आम्हां ॥१॥
वांझेचा कुमर दिसेल प्रगट ।
न दिसे जरठ जड दष्टी ॥२॥
सिंधु येऊनियां मिळे सरितेमाजीं ।
परी आत्मकाजी क्रिया नको ॥३॥
पूर्ण ज्ञानदेवा प्राप्त आत्मरूप ।
त्रिविध हे ताप निरसती ॥४॥
अर्थ:-
पूर्वेचा सूर्य एखाद्यावेळेस पश्चिमेला उगवेल परंतु या कर्मभूमीत आम्हाला जन्म येणार नाही. कदाचित वाझेचा पुत्र प्रत्यक्ष दिसु शकेल पण वार्धक्य अथवा मंददृष्टी आम्हाला येणार नाही. कारण आम्हाला जन्म नसल्या मुळे आम्ही षड्भावविकाररहित आहोत. समुद्र गंगेस मिळणे ही अशक्य गोष्ट एखाद्या वेळेस शक्य होईल पण आत्म्याच्या ठिकाणी कोणती क्रिया होऊ शकणार नाही.आम्हाला ब्रह्मस्वरूप पूर्ण प्राप्त झाल्यामुळे आमचे त्रिविध ताप नाहीसे झाले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९९१
लक्ष चौऱ्यांशी येऊनियां प्रती ।
कोटीफेरे होती कोटी जीवा ॥१॥
परी ही मनुष्य देहत्वप्राप्ती ।
लाभ नाहीं हातीं अवचिता ॥२॥
नवमास मायेनें वाहिले उदरीं ।
तिजप्रती सोयरी आणिक नाहीं ॥३॥
कामधेनु म्हैशी आणिक दासदासी ।
धन बहु सायासीं मिळविलें ॥४॥
तुझिया धनासी नाहीं रे बाळका ।
अंतकाळी देखा एकलाची ॥५॥
हातींच्या पवित्रा कानाचिया नगा ।
धावोनियां वेगा हिरोनी घेती ॥६॥
स्तनपान देउनी मोहे प्रतिपाळी ।
तेही अंतकाळी दूरी ठेली ॥७॥
आंगीची लुगडी काढा फेडा म्हणती ।
बांधोनियां देती यमा हातीं ॥८॥
ऐसा हा संसार मायेनें वेष्टीला ।
म्हणूनि दुरावला योगेश्वरा ॥९॥
ज्ञानदेव म्हणे भली मुक्ताबाई ।
दाखविली सोयी साची असे ॥१०॥
अर्थ:-
चौऱ्यांशी लक्ष योनीमध्ये प्रत्येक योनीत कोटी कोटी वेळेला जन्माला यावे लागते या योनीमध्ये जन्ममरणाच्या फेऱ्यात फिरणारे कोट्यवधी जीव आहेत असे फेरे फिरत असतां मोठ्या भाग्याने अवचित जीवाला मनुष्य जन्माची प्राप्तो होते.या संसार फेऱ्यातून सोडविणारा दुसरा कोणीही नाही, जन्मदात्या आईने ९ महिने पोटांत वागविले व तिचे प्रेम तुझ्यावर होते. तरी तो जन्म देण्यापुरतीच उपयोगी पडणारी आहे. गायी म्हशी, नोकरचाकर धन जरी मोठ्या प्रयत्नाने मिळविले तरी ते शेवटी उपयोगी पडणारे नाही. उलट अंतकालच्या वेळी ‘तुझ्या हातातील पवित्रक, कानातील दागिने काढून घेतील. जिने तुला पाजवून लहानाचे मोठे केले तीही अंतःकाळी दूरच राहीली. अंगावरची चांगली वस्त्रे काढून घेऊन तुला यमाच्या स्वाधीन करतात. अशा हा मायिक संसारामध्ये तू गढून गेल्यामुळे तुला योगेश्वर परमात्मा दूर राहीला. त्याची तुला प्राप्ती करून घेता आली नाही. हे मुक्ताबाई त् धन्य आहे तूच आम्हाला खरी सोय दाखविली. तात्पर्य, माझ्या मुक्ताबाईला खरी सोय कळतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९९२
मृतिकेची खंती काय करतोसी ।
कोण मी नेणशी काय आहे ॥१॥
काय तुज जालें नाथिला संसार ।
कासयासी भार वाहतोसी ॥२॥
शुद्धबुद्धरूप तूंचि परिपूर्ण ।
जन्म आणि मरण तुज नाहीं ॥३॥
अविद्येच्या योगें तुज जाण भुली ।
अनुभवूनी किल्ली छेदी आतां ॥४॥
श्रीगुरूच्या कृपें म्हणे ज्ञानेश्वर ।
तरसी संसार निश्चयेंसी ॥५॥
अर्थ:-
या जड देहाविषयी खेद काय करीत बसला आहेस? मी कोण आहे? काय आहे, हे तुला कळत नाही. तुला काय अडचण वाटते? नसलेल्या संसाराची काळजी कशाला करतोस.तूं शुद्ध ज्ञानस्वरूप असून तुला जन्म मरण नाही असे तुझे पूर्ण सत्यस्वरूप आहे. पण अज्ञानाच्या योगाने तुला कशी भुल पडली आता श्रीगुरूकडून मुक्त होण्याची किल्ली म्हणजे वर्म समजून घे व संसाराचा छेद करून टाक. सदगुरूंच्या कृपेने तू संसारातून तरून जाशील.हे मी तुला खात्रीने सांगतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९९३
मी देही म्हणतां ब्रह्महत्त्या कोटी ।
येऊनियां पाठी थापटिती ॥१॥
शुद्ध ब्रह्मीं कैशी कल्पना आरोपी ।
तोचि एक पापी जगीं होय ॥२॥
नाथिलें अज्ञान करून अनंता ।
केवीं मोक्षपंथा जाईलजे पां ॥३॥
ज्ञानदेव म्हणे दिव्य मी देईन ।
सद्गुरूची आण स्वयंब्रह्म ॥४॥
अर्थ:-
मी देह आहे असे म्हटले असता लागलीच कोट्यवधी ब्रह्महत्त्या येऊन तुला शाबासकी देतील. अरे वेड्या, शुद्ध ब्रह्माच्याठिकाणी देह काय, पाप काय,इत्यादिकांचा कसला आरोप करतोस. असा आरोप करणारा तो जगात एक पापी आहे असे समज. परमात्म्याच्या ठिकाणी अज्ञान नसताना त्या परमात्म्याच्या ठिकाणी जो अज्ञान मानतो तो मोक्षमार्गाला प्राप्त कसा होईल. या सत्यगोष्टीच्या खात्री करता मी वाटेल ते दिव्य करण्यास तयार आहे. श्रीगुरूची शपथ वाहून सांगतो की जीव स्वतः ब्रह्मरूपच आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९९४
मोक्ष मेल्या पाठी आम्हांसी होईल ।
ऐसें जे म्हणतील अतिमूर्ख ॥१॥
दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश ।
झाका झाकी त्यास कासयाची ॥२॥
जंववरी देह आहे तंववरी साधन ।
करूनियां ज्ञान सिद्ध करा ॥३॥
गृह दग्ध न होतां शिंपीजे उदकशेखी तो निष्टंक काय कीजे ॥४॥
आहे मी हा कोण करावा विचार ।
म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा ॥५॥
अर्थ:-
मेल्यावर आम्हाला मोक्ष मिळणार आहे. असे मानणारे महामुर्ख आहेत. जसे दिवा मालवल्या वर प्रकाश कसा राहील व मग घरांतील झाकाझाक कशी करणार जोपर्यंत देहांत जीव आहे. तोपर्यंत प्रयत्न करून ज्ञान प्राप्त करून घेतले पाहिजे घर जळून खाक झाले नाही. तो पर्यंतच विझवण्याची खटपट केली जाहिजे ते जळून गेल्यावर पाणी मारण्याचा काय उपयोग होणार. मी कोण आहे याचा अगोदर विचार करा. म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. असे निवृत्तीनाथांचे शिष्य माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
९९५
मरण न येतां सावधान व्हा रे ।
शोधूनी पावा रे निजवस्तू ॥१॥
अंतकाळी जरी करावें साधन ।
म्हणतां नागवण आली तुम्हां ॥२॥
नाशिवंत देह मानाल शाश्वत ।
तरी यमदूत ताडितील ॥३॥
काळाचे खाजुके जाणिजे कीं काया ।
धरूं नको माया सर्वथैव ॥४॥
अमोलिक प्राप्ती होत आहे तुज ।
धरूनियां लाज हित करीं ॥५॥
मागुती न मिळे जोडलें अवचट ।
सायुज्याचा पाट बांधुनी घेईं ॥६॥
ज्ञानदेव म्हणे विचारा मी कोण ।
नातरी पाषाण होउनि राहा ॥७॥
अर्थ:-
मरण येण्यापूर्वीच सावध व्हा व आत्म स्वरूपाचा शोध करून ती वस्तू मिळवा. मरणाच्या वेळी आत्मप्राप्तीचे साधन करू असे म्हणाल तर यातच तुमची नागवण झाली आहे. हा क्षणभंगूर देह कायम टिकणारा असे मानून विसंबाल तर यमदुत केंव्हा मारतील याचा नेम नाही. हा देह म्हणजे यमाचा खाऊ आहे म्हणून त्याचा लोभ धरू नका. तुला बहुमोल वस्तु प्राप्त होणार आहे. ती प्राप्त करून, न घेतल्यास मूर्ख ठरशील याची लाज धरून हित करून घे. हा मानव देह पुन्हा सहज मिळणार नाही, मोठ्या भाग्याने प्राप्त झाला आहे. तो पर्यंत सायुज्यमुक्तिरूप पाठ बघून घे. मी कोण याचा विचार करा नाहीतर दगडा सारखे खुशाल राहा. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९९६
संसारचि नाहीं येथें या कारणे ।
नाहींच जन्मणें मरणें कैचें ॥१॥
भास तोही नासताहे कैचें निराकाश ।
सर्वी समरस परब्रह्म ॥२॥
जागृति या स्वप्न तेचि तें आलें ।
अंतरी बिंबले निश्चयेंसी ॥३॥
शार्वरी प्रकाश कांहीच नाठवे ।
अदृश्य सुईजे दृश्य जालें ॥४॥
बापरखुमादेविवर विठ्ठल तन्मय ।
ब्रह्मी ब्रह्ममय दिसे त्यासी ॥५॥
अर्थ:-
येथे म्हणजे ब्रह्मस्वरूपांच्या ठिकाणी या कारणे म्हणजे अज्ञान सत्य नसल्याने प्रतिती ला येणारा संसार व त्यातील जन्ममरण सत्य कसे असणार. जो आज भासत आहे हा संसार ही अधिष्ठानरूप ब्रह्मांत लय पावणारा आहे. मग परब्रह्म ही एकच वस्तु विश्वांत भरलेली आहे. म्हणून जागृतीत आगर स्वप्नांत तरी तिच्या वांचून दुसरे काय असणार अंतरमनांत तीच वस्तु (ब्रह्म) बिंबून राहिले आहे.रात्रीच्या प्रकाशात म्हणजे मायेच्या यथार्थ ज्ञानांत दृश्य अदृश्य होऊन काही दिसेनासे होते. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल म्हणतात जे ब्रह्मरूप झाले आहेत. त्यांना ब्रह्मात्म स्वरूपाच्या ठिकाणी सर्व ब्रह्मरूपच दिसणार असे माऊली सांगतात.
९९७
गगनीं भासले अगणीत तारें ।
तेथे मन मुरे वृत्तीसहीत ॥१॥
पर्जन्याच्या धारा भूमिवीण पडे ।
जेथें बुद्धी उडे समूळची ॥२॥
मसुरे प्रमाण सावळे अनंत ।
आव्हाकार गणिती तपामाजी ॥३॥
स्वरूपाचा पूर चिदाकाशी गेला ।
देखणा राहिला सहजची ॥४॥
ज्ञानदेव म्हणे स्वसुख रोकडें ।
निवृत्तीने पुढे दाखविलें ॥५॥
अर्थ:-
आकाशातील अनंत तारे पाहिले म्हणजे ते आकांशात कसे राहिले असे मानुन आश्चर्याने वृत्तीसहीत मन विरून जाते. पर्जन्याच्या धारांना वर कशाचाही आधार नाही.हे पाहून बुद्धी कुंठीत होते.अशा रितीने सर्वव्यापी स्वरूप ज्याचे आहे तो योगीलोकांना मसुरेच्या डाळीं प्रमाणे दिसतो. सर्व दृश्य मात्र वस्तु त्या चिदाभासाने प्रकाशित होते. ही गोष्ट कळल्यावर पाहणारा साहजिकच तटस्थ होणार. निवृत्तीनाथांनी मला ही रोकडी सुखाची गोडी दाखविली.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९९८
सुवर्णाचा चुरा शुद्ध पीत दिसे ।
वस्तु हे प्रकाशे तैशापरी ॥१॥
अगणित तारे ओतिले अचळ ।
अखंड निर्मळ ब्रह्मरुप ॥२॥
निराचिया धारा अभ्रेंवीण पडे ।
देखणा हा बुडे तयामाजीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे काय सांगू सुख ।
मागें पुढे देख निवृत्तीशी ॥४॥
अर्थ:-
सोन्याचा चुरा शुद्ध पिवळा दिसला तरी तो सोन्या सारखाच शुद्ध असणार त्याप्रमाणे आत्मवस्तु भिन्न भिन्न देहाच्या ठिकाणी अधिष्ठान रूपाने दिसली तरी तिच्या मूळ स्वरूपांत कांही फरक पडत नाही.आकांशात जे अनेक अचळ तारे दिसतात ते ही ब्रह्मपदच होत. ढग न दिसता आकाशांतून पावसाच्या धारा पडतात व पाहणारा आश्चर्याने थक्क होतो. त्यातही ब्रह्मतत्त्व आहेच. त्या ब्रह्मसुखाचे वर्णन करून काय सांगावे ते मुळीच सांगता येणार नाही. पण निवृत्तीरायांच्या कृपाप्रसादाने मागे पुढे जिकडे तिकड़े ते ब्रह्मसुखच भरले आहे. असे मला कळले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
९९९
ब्रह्मप्राप्ती पूर्ण झाली ज्या नराला।
अंतरबाह्य झाला प्रकाशची॥१॥
बाहेर भीतरी लावी जैसा दीप।
सबाह्य अमूप रूप फांके॥२॥
अग्निसंगे लोहतत्त्व थोर नेटे।
उभवतो दाटे हुताशन॥३॥
तैसा ब्रह्मीं लाहे हृदयी त्रिनेत्र।
बाह्य निरंजन अवघा झाला॥३॥
निवृत्तीचे पायीं ज्ञानदेव लीन।
जग जनार्दन निरंतर॥५॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे कंदिलात दिवा लावला म्हणजे त्याच्या आंत बाहेर सर्व प्रकाश दिसतो. त्या प्रमाणे ज्या पुरूषाला ब्रह्मप्राप्ती झाली. त्याच्या आत बाहेर ज्ञानाचे तेज दिसते. लोखंड अग्नीत ठेवून तापवले म्हणजे ते जसे अग्नीमय होते. त्या प्रमाणे ब्रह्मप्राप्तीनंतर ब्रह्मज्ञानी पुरूषाला तिसरा ज्ञाननेत्र प्राप्त होतो. व मायेचे आवरण नाहीसे होते. मी निवृत्तीच्या पायी लीन झाल्यामुळे सर्व जगत मला जनार्दनरुपच दिसू लागले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०००
सुखाची आवडी घे कां रे गोविंदी ।
चित्त हें आनंदी ठेऊनियां ॥१॥
मनाची मोहर लावा की रे नामी ।
मनोरथ कामी गुंतूं नका ॥२॥
अकळित काळ जंव आहे दूरी ।
तंव तूं श्रीहरि चिंत वेगीं ॥३॥
देहाचा दीपक जंव आहे देहीं ।
तंव तो निवडुन घेई निके ॥४॥
निवृत्ती सोपान ज्ञानदेव म्हणे ।
श्रीगुरू ही खुण बुझेतीना ॥५॥
अर्थ:-
तुम्हाला सुखाची इच्छा असेल तर परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी चित्त ठेऊन गोविंदाचे नामस्मरण करा.आपले मनोरथ पूर्ण करून घेण्याची खटपट करता मनाचा ओढा भगवन्नामोच्चाराकडे वळवा. न कळत छापा घालणारा काळ जो पर्यंत दूर आहे तो पर्यंत हरीचे चिंतन करा. जो पर्यंत देहांत जीव आहे तो पर्यंत त्या अव्यक्त परमात्म्याची ओळख करून घ्या.मला व सोपानदेवांना श्रीगुरू निवृत्तीरायांनी सांगितलेली खूण आम्ही विसरलो नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१००१
देव ते कल्पित शास्त्र तें शाब्दिक ।
पुराणें सकळीक बाष्कळिक ॥१॥
बाहुले ती जीव सूत्रे तेचि जीव ।
मिथ्याचि माव जीव झालें ॥२॥
तेथें कैंचे मुक्त मुळी नाहीं बद्ध ।
सर्वही अबध्द दिसे जे का ॥३॥
अर्कापासूनी नीर जैसें कां भासत ।
जग तैसें घडत मिथ्याचि सत्य ॥४॥
ज्ञानदेव म्हणे सावधान होणें ।
अखंड साधणे परवस्तूशी ॥५॥
अर्थ:-
ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी देवपणाची वाच्यता काल्पनिक आहे. शास्त्रे केवळ शब्दमय आहेत. पुराणामध्ये असंबद्धता आहे. कळसूत्रांच्या खेळातील, बाहुल्या व सूत्रे ही जशी परतंत्र त्याचप्रमाणे जीवही परतंत्र आहे. ज्या ठिकाणी बंधच नाही तेथे मुक्तीचा विचार कशाला तेंव्हा हा बंधमोक्षाचा शास्त्रांनी सांगितलेला व्यवहार अबद्ध नाही काय. ज्या प्रमाणे सूर्यकिरणावर मिथ्या मृगजळ भासते त्याप्रमाणे सर्व जगत् सत्य परमात्म्यावर भासते. सावधान राहून जग मिथ्यत्व निश्चय करून, परमात्मवस्तु प्राप्त करून घ्यावी. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१००२
देव नाहीं तेथें पूजी तया कोण भक्त ।
गुरुशी ठाव नाहीं कोणी शिष्याशी पुसत ॥१॥
सदोदीत ब्रह्म पूर्ण निराकार निर्गुण ।
भेदाभेद क्षीण तेथें अनुभवी हे खूण ॥२॥
आदि अंत मध्य नाही दृश्य दृष्टा दर्शन ।
सच्चिदानंदरूप वस्तु सनातन ॥३॥
एक तेचि अनेक झाले अनेकरुपी एक ।
खुण सांगे ज्ञानेश्वर जग जाणा कल्पक ॥४॥
अर्थ:-
देवच जेथे नाही मग त्याची पूजा करणारा भक्त कोण असणार? गुरुचा जर पत्ता नाही तर शिष्यांना विचारतो कोण? ब्रह्म सर्वव्यापक, निर्गुण, निराकार व सनातन असल्यामुळे त्यांत भेदाभेद मुळीच नाहीत. हे अनुभवाच्या खुणेने कळेल. ब्रह्माला आदि, मध्य व अंत हे तिन्ही नाही तसेच ते कोणाला पाहात नाही. व कोणाच्या पाहण्याचा विषयही होत नाही. अगर दर्शनही म्हणजे कोणाचे ज्ञानही नाही. म्हणजे त्रिपुटीविवर्जित आहे. ते अनादि सच्चिदानंदरुपच आहे. ते ब्रह्मतत्त्व एकच असून अनेकरूपाने प्रतीतीला येते. म्हणून जगत् काल्पनिक आहे. अशी तुम्हाला खूण सांगतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
१००३
देव देव म्हणुनी व्यर्थ का फिरशी ।
निजदेव नेणशी मुळीं कोण ॥१॥
देवा नाहीं रूप देवा नाही नांव ।
देवा नाही गांव कोठें कांहीं ॥२॥
ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा ।
अखंडित सेवा करा त्याची ॥३॥
अर्थ:-
देव, देव म्हणून निष्कारण लोक फिरत राहातात परंतु अंतर्मुख दृष्टी करुन हृदयातील देवाला कोणी ओळखत नाही. तात्त्विक पाहिले तर देवाला नाम, रुप, काही नाही. आत्मा हाच खरा देव असून त्याला ओळखून त्याची सतत सेवा करा म्हणजे त्याच्या ठिकाणी तल्लीन होऊन रहा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१००४
अमानत्व स्थिती ते अंतीं कठीण ।
येरा जन्म जाण न साधेची ॥१॥
अनपेक्ष शुचि जे का उदासिन ।
अमानत्व जाण त्यासी लाभे ॥२॥
सहज ज्ञानेश्वरी अखंड समाधी ।
ग्रासूनि उपाधि राहियला ॥३॥
अर्थ:-
भगवद्गीतेत सांगितलेली अमानित्व स्थिती प्राप्त होणे फार कठीण आहे कित्येकांना जन्मभर साधत नाही. अनपेक्षत्व, शुचित्व, उदासीनत्व इत्यादि गण ज्यांनी संपादन केले असतील त्यानांच अमानित्व प्राप्त होते. मी सर्व उपाधिचा बाध निश्चय करून ग्रास करुन टाकला. त्यामुळे मला सहज अखंड समाधी लाभली. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
१००५
आमुचिया देवा नाही नाम गुण ।
नाही स्थानमान रुपरेखा ॥१॥
नित्य निराकारीं आमचें भजन ।
अहंब्रह्म पूर्ण निजध्यासें ॥२॥
ज्ञानदेव म्हणे आमिष जोडिलें ।
निरंजनी केला वास आम्हीं ॥३॥
अर्थ:-
आमच्या देवाला नाम, गुण, स्थान, मान, रुप, रेषा कांही नाही. तो नित्य व निराकार स्वरुप आहे. त्याचे भजन अहं ब्रह्मास्मि अशा शब्दांनी आम्ही करतो. त्याची प्राप्ती निजध्यासाने होते. अहं ब्रह्मास्मि असा निजध्यास हे एक त्याच्या प्राप्तीचे निमित्त आहे. त्या योगाने आम्ही ब्रह्मस्थितीला प्राप्त झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१००६
योग तो कठिण साधितां साधेना ।
जेणे गा चिद्घना न पाविजे ॥१॥
याचीलागीं आतां सांगणे हें तुज ।
माझें निजगुज अंतरींचें ॥२॥
इंद्रिये कोंडावी आवरावें मन ।
सहज ब्रह्मज्ञान लाधलाशी ॥३॥
जेथे जेथें मन धांवोनियां जाय ।
तेथें गुरुचे पाय वसवावे ॥४॥
ज्ञानदेव म्हणे होईं तूं निर्गुण ।
कळेल तुज खूण पूर्ण तेव्हां ॥५॥
अर्थ:-
योगाभ्यास करणे फार कठीण आहे. तो साधता साधत नाही. जरी साध्य झाला तरी ज्ञानघन परमात्मा प्राप्त होईलच असे नाही. एवढ्याकरता तुला आमच्या अंतःकरणातील गुप्त गोष्ट सांगतो. ती ही की इंद्रिय निग्रह करावा, मनोनिग्रह करावा, व जेथे जेथे आपले मन जाईल. त्या त्या ठिकाणी सद्गुरुंचे पाय आहेत अशी भावना करावी. त्यामुळे ब्रह्मज्ञान तुला सहज प्राप्त होईल. तूं तुझ्या ठिकाणचे दुष्ट गुण टाकून देऊनं निर्गुण हो म्हणज तुला ब्रह्मस्वरुपाची यथार्थ खूण कळेल. म्हणजे तुला ब्रह्मज्ञान होईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१००७
कासया प्रतिष्ठा व्यर्थ मानितोसी ।
सर्वत्र धरिसी समभावें ॥१॥
आत्मयासी जगतीं अवघाची एकला ।
जगांत संचला तद्रूपें तो ॥२॥
अणुरेणु तृण काष्ठादि पाषाण ।
सर्वत्रीं समान आत्मा तोचि ॥३॥
देह उच्च नीच आत्मा सर्व सम ।
मानिती विषम मंदमती ॥४॥
भेदाभेद दोन्ही सर्व एकाकार ।
म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण योगीं ॥५॥
अर्थ:-
सर्व ठिकाणी माझा समभाव आहे. अशी प्रतिष्ठा लोकांमध्ये विनाकारण कशाला मिरवितोस. त्या ऐवजी जर सर्वव्यापक एक ब्रह्म आहे. असे जर जाणशील तर जगव्यापक परमात्माशी तूं एकरुप होशील. परमात्मा अणु, रेणु, तृण, काष्ठ, पाषाण या सर्व ठिकाणी समान भरलेला आहे. तेच तुझेही स्वरुप आहे. उंच नीचपणा आत्म्याचा नसून देहादि उपाधिचा आहे. पण मंदमती लोक ती विषमता आत्म्याची मानतात. जगातील भेदाभेद हे सर्व एक ब्रह्मरुपच आहेत.असे जाणणारा तो पूर्ण योगी समजावा. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
१००८
त्रिवेणींचे स्नान अखंडित करा ।
काशीवासीं मरा ज्ञानेवीण ॥१॥
तया नाहीं गती वस्ती निरंजनीं ।
भोगी रुद्रयोनी कर्मवसे ॥२॥
लिंगदेहभंग जंव झाला नाहीं ।
तोवरी बा पाहीं मुक्ती कैची ॥३॥
ज्ञानदेव म्हणे करावें सुमन ।
तरीच चिद्घन पाविजे तो ॥४॥
अर्थ:-
तुम्ही त्रिवेणीचे अखंडित स्नान करा, नाही तर काशीत मरा पण ज्ञाना वाचून निरंजन परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी गती होणे शक्य नाही.पवित्र त्रिवेणीचे किंवा काशीवासा सारखे पुण्य कर्म केले आहे म्हणून तो त्या पुण्यकर्माच्या योगाने रुद्रयोनी भोगेल. पण हे निश्चित आहे. जोपर्यंत दशेंद्रिय, पंचप्राण आणि सोळावे अंतःकरण मिळून जो लिंगदेह आहे त्याचा नाश झाला नाही. तोपर्यंत त्याला मुक्ति कशी मिळणार. जर अंतःकरण शुद्ध केले. तरच ज्ञानस्वरुप परमात्म्याची प्राप्ती होईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१००९
सुवर्णाचे भाडें दुधाचे आधण ।
कुसुंबा घालुनी नाश केला ॥१॥
तोडुनि चंदन कर्दळीचें वन ।
बाभुळा रक्षण बैसविलें ॥२॥
उत्तम भूमिका कमाविली पाही ।
धोत्रा लवलाही पेरियेला ॥३॥
ज्ञानदेव म्हणे ऐसें न करावें ।
शरण रिघावें सदगुरुसी ॥४॥
अर्थ:-
सोन्याच्या भांड्यात दूध तापवून त्यांत कुसुंबा टाकून ते जसे नासवून टाकावे, किंवा चंदनाचे व केळीचे वन तोडून त्याठिकाणी बाभळीची झाडे लावून त्याच्या रक्षणाकरिता रक्षक बसवावे. जमिनीची उत्तम मशागत करुन त्यात धोत्रा पेरणे अशा गोष्टी जशा मूर्खपणाच्या ठरतील त्याप्रमाणे हा महान भाग्याने प्राप्त झालेला मनुष्यजन्म केवळ विषय सेवनांत घालविला तर मूर्खपणाचाच ठरेल.असे मूर्खपणाचे कृत्य करु नये. तर मनुष्याने सद्गुरुला शरण जाऊन आपल्या जन्माचे सार्थक करुन घ्यावे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०१०
एक माझी माता दोघेजण पिता ।
मज तीन कांता दोघे सुत ॥१॥
चौघे बंधु आणि दशक बहिणी ।
कन्या झाल्या तिन्ही माझ्या पोटीं ॥२॥
बहिणी भावासंगें खेळूं पैं लागले ।
विपरीत झालें सांगूं कोणा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अघटित घडे ।
गुरुकृपा जोडे परब्रह्म ॥४॥
अर्थ:-
मला जीवत्वदशा देणारी अविद्या ही एक आहे. आत्मा व अंतःकरणात पडलले प्रतिबिंब म्हणजे चिदाभास हे दोन माझे दोन वडील आहेत. जागृति स्वप्न व सुशुप्ती ह्या या तीन बायका आहेत. प्रवृत्ति व निवृत्ति हे दोन माझी मुले आहेत. मन बुध्दी चित्त अहंकार हे माझे चार भाऊ आहेत. दहा इंद्रियांच्या दहा वृत्ति ह्या बहिणी आहेत बाल, तरुण, व वृद्ध या तीन अवस्था माझ्या मुली जेव्हा बहिण भावासंगे खेळू लागल्या तेव्हा काय विपरीत झाले कोणास ठाऊक.जीवाला ब्रह्मस्वरुपता प्राप्त होणे ही जी अघटीत गोष्ट आहे ती देखील गुरुकृपेने घडून येईल. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०११
सद्गुरुसारिखा सोयरा सज्जन ।
दाविलें निधान वैकंठीचें ॥१॥
सद्गुरु माझा जीवाचा जिवलग ।
फेडियेला पांग प्रपंचाचा ॥२॥
सद्गुरु हा अनाथ माऊली ।
कृपेची साऊली केली मज ॥३॥
ज्ञानदेव म्हणे अवचित घडलें ।
निवृत्तीनें दिधलें निजबीज ॥४॥
अर्थ:-
सद्गुरुसारखा जीवलग, सज्जन, सोयरा नाही त्या श्रीगुरुरायांनी मला वैकुंठीचे निधान जो परमात्मा तो मला दाखविले. सदगुरु माझ्या जीवाचा जीवलग असून त्यांनी मला प्रपंचातून मुक्त केले. सद्गुरु हे अनाथ जीवाची माऊली असून, ती माऊली अनाथ जीवांवर आपल्या कृपेची सावली करीत असते. आकस्मिक गोष्ट अशी घडली की श्रीगुरु निवृत्तीरायांनी माझ्यावर कृपा करुन मला ब्रह्मस्वरुपाचे ज्ञान करुन दिले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०१२
ज्ञानप्राप्ती लागीं व्हावे अति नीच ।
म्हणवी जो उच्च सिद्ध नोहे ॥२॥
अहंता समुळ करावा कीं त्याग ।
काम क्रोध मांग शिवूं नये ॥२॥
सात्त्विक वैराग्य परिपूर्ण शांति ।
दैविक संपत्ति सांडी केवीं ॥३॥
व्हावे निराभास तरीच ही प्राप्ती ।
ज्ञानेश्वरा भ्रांति कीं रे नाहीं ॥४॥
अर्थ:-
ब्रह्मज्ञान प्राप्तीकरता सद्गुरुपदी अति नम्र व्हावे लागते. गर्वाने फुगून जाऊन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केल्यास ते सिद्धीस जात नाही. याकरिता अहंकार समूळ काढावा व काम क्रोध या मांगांना तर शिवूच नये. सात्त्विक वैराग्य पूर्ण शांति व दैवि संपत्ति टाकून कसे चालेल? जगत् मिथ्या आहे. ही भ्रांती जाऊन ज्ञानाची प्राप्ती झाली असे समजावे. आमच्या ठिकाणी जगत् सत्यत्व भ्रांती राहिली नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०१३
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ।
ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥१॥
पतीतपावन मान समोहन ।
ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥२॥
ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ।
ब्रह्मसनातन विठ्ठल हा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्घन ।
ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥४॥
अर्थ:-
आमची उपास्य देवता जो श्रीविठ्ठल तो सगुण निर्गुणाहून विलक्षण ब्रह्म आहे. तसेच तो पतितपावन, मनाला मोहून टाकणारा विठल आहे. ध्याता, ध्यान व ध्येय याहून वेगळा तो अनादि सिध्द असा आहे. सच्चिदानंद स्वरुप अनादि सिद्ध जे ब्रह्म तोच आमचा श्री विठ्ठल आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात
१०१४
भ्रमरीच्या ध्यासें भ्रमरीच होय ।
कीटकत्व जाय पालटोनी ॥१॥
ब्रह्म ध्यासे स्वयें ब्रह्मचि होईजे ।
जीवत्व लोपिजे सहजची ॥२॥
किडाळ त्यजिले चोखाळचि नाहीं ।
आणि हे पाही अनादिची ॥३॥
जुनाटचि आहे जाणा सोयरिक ।
माया उपाधिक भ्रमलाशी ॥४॥
विचार करितां सर्व एकाकार ।
म्हणे ज्ञानेश्वर सत्ययोगी ॥५॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे भिंगोट्याच्या घरांत असलेली अळी भिंगोटा आपल्याला मारील या भीतीने ध्यास घेऊन भिंगोटाच बनते. त्याप्रमाणे मी ब्रह्म आहे असा ध्यास घेऊन ब्रह्म होऊन जा. म्हणजे सहज जीवपणा नष्ट होईल. हीणकट पणा गेला म्हणजे. उत्तम सोन्यावांचून दुसरे काहीच नसते. जीवब्रह्माची एकता अनादि आहे, पण मायेच्या उपाधीने जीव भ्रमिष्ट झाले आहेत. विचार करुन सर्व जीव ब्रह्मरुप आहेत. असे जो जाणतो. तोच खरा योगी असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
१०१५
वर्ण ना व्यक्ति अमुप निजतेज ।
संतांचे ते गूज आत्मरुप ॥१॥
मुक्ताचा सागर भरिंत दाहि दिशा ।
पाही जीवदशा बुडुनि जाय ॥२॥
ते खूण दाविली माझिया नयनीं ।
चिदरत्नाची खाणी उघडली ॥३॥
निवृत्तिप्रसादें ज्ञानदेव लाधला ।
सुखिया हो झाला तेणें सुखें ॥४॥
अर्थ:-
आत्मस्वरुपाला वर्ण नाही, रुप नाही पण ते अत्यंत तेजोरुप आहे ही संतांची गुह्य गोष्ट होय. ज्याच्या प्राप्तीने जीवदशा नाहीशी होऊन सर्व दिशा मुक्त पुरुषाच्या बोधाने भरुन जातात. व जीवदशा नाहीशी होते.ते आत्मस्वरुप मला दाखवून ज्ञानमय रत्नांची खाण मला उघडून दिली. हे स्वरुप मला निवृत्तीरायांच्या कृपेने प्राप्त झाले व मी त्या योगाने पूर्ण सुखी झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०१६
नेणण्याचें रुप तेंचि रे अज्ञान ।
जाणते ते ज्ञान दोन्ही मिथ्या ॥१॥
पूर्णाची ओळखी मुळीं माया नाहीं ।
कोण मी हे पाहीं शोधूनियां ॥२॥
अनुभव सुख भोगितांना भोग ।
न होता अव्यंग भाररुपें ॥३॥
बद्धमुक्त शून्य होसी निराकार ।
म्हणे ज्ञानेश्वर तत्त्वज्ञानी ॥४॥
अर्थ:-
मला काही माहीत नाही. असे म्हणणे याचे नाव अज्ञान, व मला माहित आहे असे म्हणणे म्हणजे ज्ञान पण ही दोन्ही ब्रह्मज्ञानाच्या दृष्टीने मिथ्या आहेत.ब्रह्मस्वरुपाच्या ठिकाणी माया नावांची वस्तु मुळीच नाही. हे मी कोण आहे. याचा विचार करुन पहा, म्हणजे कळेल ते समजल्यावर आत्मसुखाचा भोग होईल. पण त्या आत्मसुखाच्या भोगाला भोग असे म्हणता येणार नाही. कारण आत्मा आपल्या स्वरुप ऐश्वर्याने अव्यंग आहे.तत्त्वज्ञानाचे दृष्टीने आत्म्याच्या ठिकाणी बद्ध मुक्त हे भाव जाऊन तूं निराकार आत्मरुपच राहशील. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.
१०१७
तिही शून्यावरती नांदताहे देहीं ।
तोचि ब्रह्मांड गेही भरुनि ठेला ॥१॥
जयाचा तो भास बिंबाकार आहे ।
ते खूण लाहे गुरुपुत्रा ॥२॥
बिंबाचे तें अंग ब्रह्म ते निघोट ।
वस्तु ते अविट तेज:पुंज ॥३॥
चळेना ढळेना जैसें तैसें तेंचि ।
उपमा आणिकाची केवीं साहे ॥४॥
बहुजन्मा शेवटी फळ हे पुण्याचें ।
अभाग्याशी कैचें प्राप्त होय ॥५॥
अपार अधिष्ठानी सत्य ही अभंगी ।
जाणूनियां वेगीं जीवीं धरा ॥६॥
ज्ञानदेव म्हणे यापरता नाहीं ।
उपदेश कांही बोलावया ॥७॥
अर्थ:-
हे गुरुपुत्रा सत्त्व, रज, तम, या त्रिगुणात्मक मायेच्या पलीकडचा परमात्मा देहामध्ये नांदत आहे. व तोच परमात्मा सर्व ब्रह्मांडांमध्ये ओतप्रोत भरला आहे. हे ब्रह्मांड म्हणजे त्याचा भास आहे, हे गुरुपुत्रा ही खूण तूं जाणुन घे. बिंबरुप जे ब्रह्म, ते एकरस, अविट, तेजःपुंज असे आहे. ते व्यापक असल्यामुळे चळत नाही, व ढळत नाही. असे ते एकरुप आहे. त्याला कशाचीही उपमा नाही. त्याची प्राप्ती होणे. हे अनेक जन्माच्या पुण्याईचे फळ आहे. त्याची प्राप्ती दुर्देवी माणसाला होत नाही. अशा त-हेच्या अपार अधिष्ठानरुप परमात्मा जाणून त्याला चित्तामध्ये कायमचा धरुन ठेवा. याच्या पलीकडे तुम्हाला उपदेश करण्याचे काही शिल्लक राहिले नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०१८
दृष्टिमाजी रुप लखलखीत देखलें ।
अव्यक्त ओळखिलें तेजाकार ॥१॥
सांवळे सुंदर रुप बिंदुलें ।
मन हे मुरालें तयामाजी ॥२॥
अणुरेणु ऐसें बोलती संतजन ।
ब्रह्मांड संपूर्ण तया पोटीं ॥३॥
निवृत्तीची खूण ज्ञानदेव पावला ।
सोयरा लाधला निवृत्तिकृपें ॥४॥
अर्थ:-
तेजोमय परमेश्वरांचे जे अव्यक्त रुप ते माझ्या डोळ्यांनी मला स्पष्ट दिसले.ते अल्प बिंदरुप सुंदर स्वरुप पाहुन माझे मन तद्रप झाले. या परमेश्वराला संत अणुरेणु इतका संकोचित समजतात. पण त्यांत सर्व ब्रह्मांड सामावले आहे येवढा मोठाही समजतात. निवृत्तीनाथांच्या कृपेने मला ही ज्ञानाची खूण कळली. व त्यामुळे पांडुरंगराया मला सोयरा लाभला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०१९
सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायीं ।
तेथे बुडी देई माझ्या मना ॥१॥
आतां मी न करी भ्रांतीचे भ्रमण ।
वृत्तीसी मार्जन केलें असे ॥२॥
एकार्णव झाला तरंगु बुडाला ।
तैसा देह झाला एकरूप ॥३॥
बापरखुमादेविवरें विठ्ठलें नवल केलें ।
तारूं हरविले मृगजळी ॥४॥
अर्थ:-
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे मना, ब्रह्मरूप जे निवृत्तिनाथ त्यांच्यापायी सर्व तीर्थ असल्यामुळे तुही तेथे स्थिर हो. गुरूकृपेने वृत्ति निर्मळ होऊन आतां मी देह आहे ही भ्रांती नष्ट झाली. म्हणून सुखाकरीता इकडे तिकडे तिर्थयात्रेकरिता भटकण्याची जरूरी नाही. ज्या प्रमाणे समुद्रावरच्या लाटेला मानलेला भित्रपणा नाहीसा होऊन ती जसी समुद्ररूप होते त्याप्रमाणे या देहाचा मिथ्यात्व निश्चय होऊन मी ब्रह्मरूप आहे असे ज्ञान मला झाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल, त्यानी एक असा चमत्कार करून दाखविला की मृगजळांत मिथ्या नाव नाहीसी व्हावी याप्रमाणे माझा देहात्मभाव नाहीसा केला. असे माऊली सांगतात.
१०२०
गुरूज्ञान नाहीं ज्यासी ।
तरुणोपाय नाहीं त्याशी ।
तो नावडे ऋषीकेशी ।
व्यर्थ जन्मासी तो आला ॥१॥
देव धर्म नेणे कांहीं ।
धरी प्रपंचाची सोई ।
त्या कोठेही थार नाहीं ।
हे वेद बोलिलासे ॥२॥
कृष्णकथा जो नायके ।
रामनाम न म्हणें मुखें ।
तया सोसकोटी दुःखें ।
जन्म योनी भोगू लागेल ॥३॥
ज्ञानदेवी अभ्यास केला ।
सर्व संसार हा तारिला ।
रामकृष्णे भवपाश तोडिला ।
सर्व पितरांसहित ॥४॥
अर्थ:-
ज्या पुरूषाला गुरूंचा अधिकार कळत नाही. त्याला संसार समुद्रातून तरून जाता येणार नाही. इतकेच काय पण तो देवाला देखील आवडत नाही. त्याचा जन्म निष्फळ आहे. ज्याला देवधर्म आवडत नाहीत व प्रपंचाची कास धरून चालला आहे. त्याला ऐहिक अगर पारलौकिक कुठेही सुख मिळणार नाही.हे वेदानीच सांगितले आहे. जो कृष्णकथा ऐकत नाही मुखाने राम राम म्हणत नाही त्या पुरूषाला कोट्यवधी जन्म घेऊन नरकयोनीत दुःख भोगावे लागतील. मी श्रीगुरूचे सहाय्य घेऊन अनेक जन्मामध्ये भगवन्नामस्मरणादि अभ्यास केला म्हणून हा संसारसमुद्र तरून गेलो. मी स्वतःच तरून गेलो असे नाही तर माझ्या सर्व पूर्वजांचा संसार पाश तोडून मी त्यांना मुक्त केले. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०२१
नित्य धर्म नामपाठ ।
तेचि वैकुंठींची वाट ।
गुरूभजनी जो विनट ।
तोचि हरिभक्तु जाणावा ॥१॥
धन्य धन्य त्याचा वंश ।
धन्य तो आला जन्मास ।
तयाजवळी हृषीकेश ।
सर्वकाळ नांदतु असे ॥२॥
रामकृष्णस्मरण जप ।
तेंची तयाचें अमूप तप ।
तो वास करील कोटी कल्प ।
वैकुंठपीठ नगरीशी ॥३॥
ज्ञानदेवीं जप केला ।
हरि समाधीसी साधिला ।
हरिमंत्रे प्रोक्षिला ।
सर्व संसार निर्धारें ॥४॥
अर्थ:-
नित्य नेमाने जो नामस्मरण करतो त्याला वैकुंठप्राप्ती होते. कारण नामस्मरण ही वैकुंठाला जाण्याची वाट आहे. जो सद्गुरूंची सेवा करतो त्यास हरिभक्त म्हणतात. ज्याच्या मुखांत नेहमी हरिनाम आहे.तो स्वतः जन्मास येऊन धन्य झाला आहे तसेच त्याचे कुळही धन्य होय कारण त्याचे जवळ हषिकेश सतत नांदत असतो. रामकृष्ण नामाचा जप करणे हेच मोठे तप होय तो वैकुंठभुवनांत कोटी कल्प राहिल. मी या हरिनाम स्मरणाच्या जपाने समाधी साध्य केली. तसेच हरिमंत्राचे संसारावर प्रोक्षण करून अशुद्ध जो संसार तो शुद्ध करून टाकला. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०२२
उपजोनी नरदेहीं ।
जयाशी हरिभक्ति नाही ।
तोचि भूमिभारू पाहीं ।
व्यर्थ जन्म त्याचा गेला ॥१॥
पशुप्राणी तया जोडी ।
नेघेचि हरिनाम कावडी ।
तो कैसेंनि परथडी ।
नामेवीण पावेल ॥२॥
जिव्हा बेडुकी चावट ।
विसरली हरिनाम पाठ ।
ते चुकले चुकले वाट ।
वैकुंठीची जाण रया ॥३॥
बाप रखुमादेवि निर्धार ।
नामे तरले सचराचर ।
जो रामकृष्णीं निरंतर ।
जीवें जप करील रया ॥४॥
अर्थ:-
नरदेहांत जन्माला येऊन जो हरि भक्ति करीत नाही. तो भूमिभार असून त्याचा जन्म व्यर्थ होय. तो पशुतुल्य होय, जो हरिनाम उच्चारणार नाही. तो संसार समुद्राच्या पैलतीराला कसा जाईल? हरीनामावांचून इतर भाषण हे बेडूकाच्या ओरडण्यासारखे आहे. हरिनामपाठ जे विसरले ते वैकुंठाचा रस्ता चुकले. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल व रामकृष्ण नामाचा श्रध्देने नेहमी जप करतात ते निःसंशय तरुन जातात कारण रामनाममंत्राने संजीव निर्जीवांचा उध्दार झाला. असे माऊली सांगतात.
१०२३
रामकृष्ण जप सोपा ।
येणें हरती जन्मखेपा ।
संसारू तुटेल महापापा ।
धन्य भक्त तो घरातळीं ॥१॥
जया हरीची जपमाळी ।
तोचि पडिला सर्व सुकाळीं ।
तया भय नाहीं कदाकाळी ।
ऐसें ब्रह्मा बोलियेला ॥२॥
बापरखुमादेवी हरि ।
नामे भक्तासी अंगिकारी ।
नित्य सेवन श्रीहरि ।
तोचि हरीचा भक्त जाणावा ॥३॥
अर्थ:-
साधनामध्ये रामकृष्ण नामाचा जप करणे हे सुलभ आहे. व तो जो करील त्याच्या जन्ममरणाच्या येरझारा नाहीशा होऊन तसेच त्याची मोठी पातके नाहीशी होतात. असे भक्त भूतलावर मोठे धन्य आहेत. हरिनामाचा जप करणाऱ्याला केंव्हाही दुष्काळ नाही. तसेच कोणत्याही काळी त्याला भय नाही. या प्रमाणे ब्रह्मदेवाने सांगितले आहे.माझे पिता रखुमादेवीचे पती बाप जे श्रीविठ्ठल ते आपल्या भक्तांचा अंगीकार करतात. जे सतत हरीनामाचे चिंतन करतात तेच खरे हरीचे भक्त समजावे. असे माऊली सांगतात.
१०२४
निमिष नलगे मन वेधिता ।
येवढी तुझी स्वरूपता ॥१॥
विठोबा नेणों कैसी भेटी ।
उरणें नाहीं जीवेसाठी ॥२॥
उरलें उपाधी कारणे ।
तें त्वां नेमिलें दरूशनें ॥३॥
निवृत्तिदासा वेगळें ।
सांगावया नाही उरलें ॥४॥
अर्थ:-
हे श्रीकृष्णा, तुला पाहिल्यावर एका क्षणाचाही विलंब न होता तुझ्या स्वरूपाचा आमच्या मनाला वेध लागून जातो. एवढी तुझ्या स्वरूपाची योग्यता आहे.तुझ्या भेटीचे आश्चर्य हे आहे की तुझ्या भेटीला येणाऱ्याचा जीवभाव तूं उरू देत नाहीस. जो वेगळेपणा दिसतो तो फक्त अविद्या उपाधिमुळेच दिसतो. अशा तऱ्हेचे तुझ्या दर्शनाचे शास्त्र तूं निश्चित करून ठेवले आहेस. वरील बोध सांगण्यालादेखील मला त्या पांडुरंगरायांनी वेगळे ठेवले नाही. असे निवृतीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०२५
सांग सखिये बाई मज हे नकळे ।
कैसा हा अकळे समतेजें ॥१॥
भावदृढ धरी चित्ताची लहरी ।
प्रकृती कामारी सत्रावीची ॥२॥
येरी म्हणे वांजट झाली वो पुराणें ।
समरस जाणे कोणे घरीं ॥३॥
ज्ञानदेव म्हणे आदिमध्य समता ।
सुखें पहातां चढे हातां ॥४॥
अर्थ:-
एक सखी आपल्या मैत्रिणीस विचारते की एकरूप होऊन हा श्रीहरि आपल्या ताब्यांत कसा येईल हे मला कळत नाही. मैत्रिण उत्तर देते. श्रीहरिच्या प्राप्तीचा उपाय प्रथम दृढभाव असू दे. श्रीहरिच्या ‘कामारी’ म्हणजे आधीन असणारी जाति तिचे कार्य जे काम क्रोधांदिक ते ब्रह्मप्राप्ताच्या आड येतील. पुन्हा सखी प्रश्न करते. या गोष्टी सांगून सांगून पुराणे थकली. पण अशी एकरूपता कोणाला अनुभवावयास मिळाली आहे काय? तेव्हा दुसरी सखी उत्तर देते. ज्या सखीने जगत कोणापासून उत्पन्न झाले, कोणावर राहिले, व कोणाच्या ठिकाणी लय झाले. याचा स्वस्थचित्ताने विचार केला असेल तर तिला ब्रह्मस्वरूपाशी एकरूपता साधते. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०२६
सखीप्रती सखी आदरें करी प्रश्न ।
जीव शिव पूर्ण कैसा दिसे ॥१॥
सखी सांगे मात उभयता ब्रह्म ।
नाहीं हो विषम हरीवीण ॥२॥
सूर्यप्रकाश मही घटमठी समता ।
तैसा हा उभयतां बिंब एका ॥३॥
बापरखुमादेविवरू विठ्ठल जीवाचा ।
व्यापक शिवाचा शिवपणे ॥४॥
अर्थ:-
एक सखी, आपल्या मैत्रिणीस आदराने विचारते. कां ग जीव, पूर्ण शिव म्हणजे परमात्मा कसा दिसावा? मैत्रिण उत्तर देते की त्या दोन्ही दशा ब्रह्मरूपच आहेत हरिवांचून त्यामध्ये दुसरी विषमता काहीच नाही. ज्याप्रमाणे पृथ्वीवर घटांवर प्रकाश पाडणारा एकच सूर्य आहे. त्याप्रमाणे या देहामध्ये आत्मा एकच आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल तेच जीवपणाने जीवांत व शिवपणाने शिवांत व्यापक आहते असे माऊली सांगतात.
१०२७
सहा चार अठरा धांडोळिती ज्यांतें ।
परी नेणवे सखा तो जवळी असतां ॥१॥
सखा निजसुखाचा जवळी असतां ।
पुढे पाहतां जाले वेडे चौघेजण ॥२॥
बोलों तरी आतां मौन्य पडिलें माये ।
शब्द हा न साहे सांगों कैसें ॥३॥
चिद्रूपाचा प्रकाश तोची आनंदाचा साभास ।
गुणागुणी नाश नातळेची ॥४॥
तें गिळुनीयां द्वंद्वासहित प्रपंचभास ।
तेथ स्थुळादि ब्रह्मांडास गिळुनी ठेले ॥५॥
ऐसिया सुख वस्ती आत्मप्रभा संविती ।
प्रकाशी प्रकाश स्थिति पूर्ण ठेली ॥६॥
तेथ बिंब प्रतिबिंब भान सरलें ज्ञानविज्ञान ।
हाचि नवलाव जाण तये ठायीं ॥७॥
निवृत्तिदास म्हणे ज्याचें तो जाणे ।
आतां जें बोलणें तोचि शीण ॥८॥
अर्थ:-
सहा शास्त्रे, चार वेद, अठरा पुराणे ज्याचा शोध करीत आहेत तो परमात्माजवळच असूनही त्यांना सापडत नाही. परमात्मा जवळ असतांना चारी वेद त्याला पुढे करून पाहू गेले. तो वेडे झाले.त्याच्याबद्दल काही बोलण्याचा प्रयल करावा तर त्याचे स्वरूप शब्दांनी वर्णन करण्यासारखे नसल्यामुळे मौनच स्विकारावे लागते. कारण शब्दाने त्याचे काहीच वर्णन करता येत नाही. त्याच्या ठिकाणच्या ज्ञानाचा प्रकाश तो आनंदाचा उदय होय. त्याच्या ठिकाणी गुण लागत नसल्यामुळे त्याला गुणीपणा येत नाही. म्हणून गुणी विशेषण त्याला लागू शकत नाही. त्याचे अव्यक्तस्वरूप टांकून व्यक्त स्वरूपांकडे नजर दिली तर सुखदुःखादि द्वंद्वे ज्यांत आहेत असा प्रपंच त्याचे स्वरूपांत लय पावतो.अशारितीने जगतांत असलेले ज्ञान, तेज, आनंद ही सर्व त्याच्याच ठिकाणी स्वतःसिद्ध आहेत.आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हेच मोठे आश्चर्य आहे की त्याच्या स्वरूपात बिंब प्रतिबिंब, ज्ञान, विज्ञान वगैरे सर्व भाव मावळूनजातात. हा अनुभव ज्याचा त्याने घ्यावयाचा आहे याहून आणिक कांही बोलणे हा शीणच होय असे निवृतीदास माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०२८
अवघाची शृंगारू डोईजे दुरडी ।
डोळेची मुरडी परतोनियां ॥१॥
देखिलें स्वरूप विठ्ठल नामरूप ।
पारूषेना चित्त त्याचे चरणाहुनी ॥२॥
बापरखुमादेविवरू विठ्ठल सुखनिधी ।
अवघीची उपाधी तुटली माझी ॥३॥
अर्थ:-
दूध विकावयास जाणाऱ्या गौळणी कितीही शृंगार अंगावर घातला तरी ती इकडे तिकडे पाहात जरी चालली तरी तिचे लक्ष डोक्यावरच्या दुरडीवरच असते. त्याप्रमाणे बाहा व्यवहार करणाऱ्या पुरूषांने श्रीविठ्ठलाचे नामरूप एकदा जरी पाहीले. व ब्रह्मसुख प्रगट झाले तर त्याचे चित्त चरणाहून दुसरीकडे जाणार नाही. आनंदसागर जे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल त्यांना मी पाहिल्याबरोबर माझी देहादि सर्व उपाधि तुटून गेली. असे माऊली सांगतात.
१०२९
ऐशिया माजीं तो निज एकांती राहिला ।
विठ्ठल अनुसरला भावें एके ॥१॥
नित्य प्रळय निद्रिस्त नित्य प्रळय मृत्यु ।
कल्पांती जीव जात मायाही नाही तेथ ॥२॥
तेंचि तूं होउनी राहें विश्वाशी ।
ठायींच्या ठायीं निवसी अरे जना ॥३॥
तेथें नाहीं दुःख नाहीं तहान भूक ।
विवेकाविवेक नाहीं तेथें ॥४॥
ऐसें तें पाहोनी तये तृप्ती राहोनी ।
तेंची तूं जाणोनी होई बापा ॥५॥
बापरखुमादेविवरू विठ्ठलुगे माये ।
स्वस्वरूपी राहे तये कृपा ॥६॥
अर्थ:-
जे प्रेमाने श्रीविठ्ठलाला शरण जातात अशा पुरूषांच्या अंत करणांत परमात्मा प्रगट असतो. मृत्यूचे म्हणजे प्रलयाचे तीन प्रकार आहेत. निद्रा ही नित्यप्रलय आहे. तसे मृत्यू हा एक प्रलय आहे व कल्पांत हा एक प्रलय आहे. आणि चवथा प्रलय म्हणजे ब्रह्मज्ञान झाल्यानंतर माया व मायाकार्य पदार्थाचा अत्यंत अभावाचा निक्षय होणे हा आहे. या प्रलयामध्ये एका परमात्म्याशिवाय दुसरे कांहीच राहात नाही.स्वस्वरुपस्थिति श्रीगुरूंच्या वचनावर विश्वास ठेऊन परमात्म्याचे ज्ञान करून घेऊन त्याचे स्वरूपच होऊन राहा म्हणजे असलेल्या च स्थितीमध्ये तूं समाधानाला प्राप्त होशील. त्या स्थितिमध्ये दुःख नाही. तहान भूक नाही. विवेकाविवेकही नाही. अशा स्थितीचे ज्ञान प्राप्त करून घेऊन तूं कृतार्थ होऊन राहा. कारण तें ब्रह्म तूं जाणल्यामुळे तेच तूं होऊन जाशील. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांची कृपा संपादन करून तूं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी निवांत राहा असे माऊली सांगतात.
१०३०
नाहीं जातिकूळ तुझें म्यां पुशिलें ।
परी मन मावळलें देखोनियां ॥१॥
तुझेंची कुवाडे सांगेन तुजपुढे ।
तेणें मुक्तीची कवाडे उघडती ॥२॥
दुजापाशी सांगतां वाटे लाजिरवाणें ।
हांसतील पिसुणे प्रपंचाची ॥३॥
आतां उगवितांची भलें नुगवितां सांपडलें ।
ज्ञानदेव बोले निवृत्तीशीं ॥४॥
अर्थ:-
सगुण साकार परमेश्वरांचे दर्शन झाल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा, तुझी जात कुळ वगैरे मी काही विचारले नाही. तुला पाहून माझे मन विरघळून गेले. आतां तुझ्यापुढे तुझ्याच गोष्टी सांगेन व या कीर्तनरूप भक्तीने आमच्याकरिता मोक्षांची द्वारे सहज उघडली जातील इतर अनधिकारी माणसापुढे ही स्थिति सांगण्याची लाज वाटते. बरे त्यांना या स्थितीचे वर्णन करू गेले तर त्यांना त्याचे कांहीच महत्त्व वाटणार नाही. उलट ते ऐकून हासावयास लागतील कारण ते प्रपंच विषयकच वेडी झालेली असतात. हे निवृत्तीराया माझे पूर्वपाप फळाला न येता केवल पुण्य फलोन्मुख झाल्यामुळेच मला हे स्वरूप दिसले असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३१
अवघा सुखरूप अवघाची रूपीं ।
अवघाची आपी धरूनी ठेला ॥१॥
नाम तें अवघे उच्चारिसी वेगें ।
येर तें वाउगें कर्महीन ॥२॥
निवृत्ति गुरुप्रसादें नामी निमग्न ।
नाम म्हणतां यज्ञ कोटी रया ॥३॥
अर्थ:-
जलस्थलादि सर्व रूपवान पदार्थात परिपूर्ण असा एक आत्मा भरलेला आहे.ईश्वर नामोच्चार करशील तर तूं तद्रुप होशील. ज्यांना ही नामोच्चाराची सोपी वाट कळत नाही. ते कर्महिन समजावे. मी निवृत्तिरायांच्या कृपाप्रसादाने त्या नामस्मरणात दंग होऊन गेलो. त्या भगवंताचे एकवेळ नाम घेतले तरी कोटी यज्ञ केल्याचे पुण्य आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३२
काळे ना सावळे धवळे ना पिवळे ।
घोंगडें निराळे लाधलों मी ॥१॥
मागील रगटें झाडिलें आतां ।
पंढरीनाथा चरणाजवळीं ॥२॥
नवे नवघड हातां आलें ।
दृष्टी पाहें तंव मन हारपले ॥३॥
सहस्र फुलीवरी गोंडा थोरू ।
धडुतें दावी रखुमादेविवरू ॥४॥
अर्थ:-
जे घोंगडे काळे सावळे पांढरे पिवळे इत्यादि कसल्याही रंगाचे नसून जो निर्गुण स्वरूप आहे असे ते निर्गुण स्वरूपाचे चांगले घोंगडे मला मिळाले. त्यामुळे माझ्या जवळचे देहात्मबुद्धिचे रगटे पांडुरंगरायांच्या चरणी ठेवले.बोधाचे चांगले घोंगडे मला मिळाल्यामुळे माझे मन त्या घोंगड्याशी एकरूप होऊन गेले. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, ते सहस्र फुली म्हणजे हजारो रंगाचा चित्रविचित्र फुलांचा गोंडा असे ते धडसे घोगडे मला पांडुरंगरायाने दाखवून दिले असे माऊली सांगतात.
१०३३
पूर्वप्राप्ती दैवयोगें पंगु जालों मी अज्ञान ।
विषय बुंथी घेऊनियां त्याचें केलें पोषण ।
चालतां धर्म बापा विसरलों गुह्य ज्ञान ।
अवचटें गुरूमार्गे प्रगट ब्रह्मज्ञान ॥१॥
दाते हो वेग करा कृपाळुवा श्रीहरि ।
समता सर्व भावी शांती क्षमा निर्धारीं ।
सुटेल विषयग्रंथी विहंगम आचारी ॥२॥
शरण रिघे सद्गुरू पायां पांग फिटेल पांचाचा ।
पांगुळलें आपेंआप हा निर्धारू पैं साचा ।
मनामाजीं रूप घाली मी माजी तेथें कैंचा ।
हरपली देहबुद्धि एकाकार शिवाचा ॥३॥
निजबोधे धवळा शुद्ध यावरी आरूढ़ पैं गा ।
क्षीराब्धी बोध वाहे तेथें जाय पां वेगा ।
वासना माझी ऐसी करी परिपूर्ण गंगा ।
नित्य हे ज्ञान घेईं अद्वैत रूपलिंगा ॥४॥
पावन होशी आधी पांग फिटेल जन्माचा ।
अंधपंग विषयग्रंथी पावन होशील साचा ।
पांडुरंग होसी आधीं फळ पीक जन्माचा ।
दुष्ट बुद्धि वेगी टाकी टाहो करी नामाचा ॥५॥
ज्ञानदेव पंगुपणे पांगुळली वासना ।
मुराले ब्रह्मीं मन ज्ञेय ज्ञाता पुरातना ।
दृश्य हे लोपलें बापा परती नारायणा ।
निवृत्ति गुरू माझा लागो त्याच्या चरणा ॥६॥
अर्थ:-
पुर्वजन्मी संपादन केलेली कर्मे हेच जे दैव त्या योगाने मला अज्ञान हाच कोणी पंगुपणा आला. पुढे विषयांचा बुरखा घेऊन त्या ज्ञानाचे मी पोषण केले. जरी स्वधर्माचरणाप्रमाणे मी वागत होतो. तरी त्यामध्ये आत्मज्ञानाचा विसरच पडला. पण माझ्या पूर्व पुण्याईमुळे मला सद्गुरूंची भेट झाली.त्यामुळे त्यांच्या उपदेशाने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. तुम्ही लवकर या दयाळू, श्रीहरिला प्राप्त करून घेण्याकरिता प्रयत्न करा. प्रयत्न करीत असतां सर्व ठिकाणी एक परमात्माच भरला आहे, अशी मनामध्ये समता ठेवा. तसेच निर्धाराने शांती क्षमा मनामध्ये धारण करा, त्यामुळे चित्त व विषय यांची बसलेली गाठ सुटून जाईल. म्हणजे चित्तातील विषय दूर होतील. पक्षी जसा आकाशांमध्ये जलद भ्रमण करतो. त्याप्रमाणे तुम्ही ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करा. तो प्रयल स्वबुद्धिने न करता सद्गुरूंना अनन्यभावाने शरण जाऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे करा म्हणजे तुम्ही पंच विषयाच्या तावडीतून सुटाल असे झाले म्हणजे आपोआपच देहांतील वासना बंद पडतील.याकरिता मनामध्ये श्रीहरिचे रूप धारण करा. म्हणजे तुमच्या ठिकाणची हा मी आहे व हे माझे आहेत. अशा त-हेची जी देहमूलक अहंमम बुद्धि ती नाहीशी होऊन तुम्ही शिवरूपच व्हाल. म्हणून परमात्माबोध हाच एक शुद्ध पांढरा नंदी त्यावर बसून क्षीराब्धीमध्ये वास करणाऱ्या परमात्मरूपी लिंगाच्या भेटीला त्वरित जा म्हणजे जी परमात्मप्राप्तीची वासना ती गंगेप्रमाणे परिपूर्ण होऊन जाईल. एवढ्याकरिता सतत आत्मज्ञानाचे चिंतन करून अद्वैतरूप लिंगाची प्राप्ती करून घे. त्यामुळे अनंत जन्माच्या संकटातून तूं मुक्त होशील. तसेच तुझे अंधत्व म्हणजे ज्ञानशून्यता पंगुत्व म्हणजे पांगळेपणा हे धर्म जाऊन विषयांची ग्रंथी सुटून जाईल.आणि त्यामुळे पवित्र होऊन जाशील इतकेच काय तूं पांडुरंगस्वरूप होशील व तुझ्या जन्माचे साफल्य होईल. याकरिता दुष्ट बुद्धि टाकून देऊन हरिनामाचा मोठ्याने टाहो फोड.वरीलप्रमाणे श्रीगुरूला शरण जाऊन आम्ही आत्मज्ञान प्राप्त करून घेतले. त्यामुळे आमची वासना पांगळी झाली. त्याचबरोबर अनादि जे परब्रह्म त्याचे ठिकाणी मन व ज्ञाता ज्ञेय हे सर्व धर्म नाहीसे होऊन गेले. दृश्य जगताचा मिथ्यात्वनिश्चय झाल्यामुळे त्याचा लय नारायण स्वरूपामध्ये झाला हे ज्या श्रीगुरू निवृत्तीरायांच्या कृपेने घडले. त्यांच्या चरणाला मी अनन्यभावाने वंदन करतो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३४
पौर्णिमेच्या दिनी चंद्र अकळी जाहला ।
आमावास्ये ठेला पूर्ण कळी ॥१॥
देखिलें गे माय विचित्र विलक्षण ।
जाहलें स्वप्नभान जागृतीशी ॥२॥
मातेचिये पोटी पिता तो जन्मला ।
नवलाव जाहला काय सांगो ॥३॥
मश्यकें ओलांडीला स्वये मेरुगिरी ।
दहनाच्या पाठारी पीक जाहले ॥४॥
चंचूच्या सांडशे पक्षी घेते पाणी ।
सिंधुशी गिळुनी बैसिन्नला ।
बापरखुमादेविवर विठ्ठलची जाणे ।
परब्रह्म अनुभवणे परब्रह्म ॥५॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे चंद्र हा प्रकाशमान आहे. त्याप्रमाणे जीव मूळचा स्वप्रकाशमान आहे. जशी अमावस्येची रात्र ही अंधकाररुप आहे. त्याप्रमाणे अंधकार म्हणजे आवरणात्मक अविद्यारुपी रात्रीमध्ये जीवरुपी चंद्रकलाहीन म्हणजे स्वस्वरुपज्ञानरहित होतो. परंतु पूर्वपुण्योदयाने सद्गुरु उपदेशजन्य बोधरुपी पौर्णिमेच्या दिवसी जीवरुपी चंद्र पूर्ण कलेने ज्ञानसंपन्न होतो. व त्यामुळे त्या ज्ञानी पुरुषाला ही जागृति स्वप्नसमान प्रतितीला येते. असे हे मोठे विलक्षण झालेले मी पाहिले. जीवांची आई जी माया तिच्या पोटी ब्रह्मच, जीवांचा बाप असलेला ईश्वर जन्मला. हा नवलावा काय सांगावा? चिलटाने मेरु पर्वत ओलांडावा किंवा अग्नी पठारांवर पीक यावे त्याप्रमाणे हे आश्चर्य घडलें याचा भाव असा आहे की अहंकार हा मेरु पर्वताप्रमाणे असून त्याला ओलांडले असे होय. चिंतारुपी अग्नीचे पठार म्हणजे अंतःकरण त्यांत बोधरुपी पीक येणे ही नवलाची गोष्ट आहे. चोचीने पाणी घेण्याचे ज्या पक्षाचे काम आहे अशा पक्षाने समुद्र गिळून टाकावा तद्वत सामर्थ्यरहित अशा जीवांनी अगाध असलेल्या परमात्म्यालाआपल्यी हृदयांत साठविले. तात्त्विकदृष्ट्या माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांना जाणल्याखेरीज परब्रह्मस्वरुपचा अनुभव घेतल्यावांचून जीव ब्रह्मरुप होणार नाही. असे माऊली सांगतात.
१०३५
उगमेवीण पाणी वाहते सारणीं ।
शिंपिती माळिणी वेळोंवेळा ॥१॥
नसे माळिणीचा मळा नसे सरोवर तळे ।
नित्य वेळोंवेळो फुलतसे ॥२॥
ज्ञानदेव म्हणे ही खूण जाणा ।
षण्मास सुजाणा सूटि दिली ॥३॥
अर्थ:-
सृष्टिदृष्टीवादांतून जगताची उत्पत्ति मायेपासून झालेली आहे असा वेदांतशास्त्राचा सिद्धांत आहे. परंतु माऊली या अभंगातून या सिद्धांताचे खंडण करतात. कारण मायारुपीसरोवरांतून जगद्रूपी पाणी, अनादि प्रवाहरुपी पाटातून वाहात आहे. व कल्पनारुपी माळीण त्या पाण्याने जन्ममरणरुपी मळ्याला सिंचन करीत आहे. व तो मळा अत्यंत प्रफुल्लित झालेला आहे, असे वाटते. परंतु विचार केला तर अजातवादाच्या दृष्टिने मायारुपी सरोवर नाही. व कल्पनारुपी माळीण नाही. म्हणूनच जन्ममरणरुपी मळाही नाही. हे सूज्ञ मनुष्या तुला या कोड्याचा उलगडा करण्याविषयी सहा महिन्याची मुदत दिली आहे.असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३६
कासवीचे तूप जेवी ।
आकाश घालीपां पेवीं ।
वांझेचे बाळ खेळवी ।
रूदना करी रया ॥१॥
पाहे या नवल चोज ।
म्यां देखिलें पां मज ।
गुह्यांचें गुज ।
जाण रे मना ॥२॥
मृगजळें सागर भला ।
डोंगरे ओणवा विझविला ।
समुद्र तान्हेला ।
जीवनालागीं ॥३॥
ज्ञानदेव ऐसें म्हणें ।
कापुराची मैस घेणें ।
दुधावीण सांजवणें ।
भरलें दिसे ॥४॥
अर्थ:-
कासवीला वास्तविक दूध नसून तिची कृपादृष्टि नी आपल्या पिलांना पोसते. तद्वत् श्रीगुरूमाऊलीला दूध नसून तिचे कृपादृष्टीरुपी दूधानें परमात्मरूपी तूपाचे जेवण ती साधकाला घालते. या न्यायाने ज्याप्रमाणे कासवीचे म्हणजे सद्गुरूरुषी माऊलीचे कृपादृष्टिने परमात्मरूपी तूप त्याचे जेवण करवून पेव जसे खोल असते. त्याप्रमाणे कळण्यास अत्यंत खोल असलेला परमात्मा त्याचे ठिकाणी आकाशादि सर्व बाधीत करून अजातवादांत माया व तत्कार्य प्रपंच असणे शक्य नाही. तरीपण विवर्तवादांचे दृष्टिने तिने जगत केले म्हणजे वांझेचा बाळ असलेला प्रमाता तो परमात्मसुखाविषयी रूदन करीत असतांना त्या सद्गुरू माऊलीने परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी खेळविलेे. हे कसे आश्चर्य आहे पहा मी आपले स्वरूपाला पाहून गुह्यांचे जे गुह्य परमात्मा त्याला मनाने जाणले त्यामुळे मृगजळाप्रमाणे क्षणिक असलेल्या विषयसुखाविषयी विषयाचा बाध करून सुखाचा समुद्र केला. त्यामुळे डोंगराप्रमाणे अफाट असलेल्या परमात्मज्ञानाने जीवाला जो प्रपंचाचा वणवा लागला होता. तो विजवून टांकून जो परमात्मा त्याची त्याला तहान लागली होती. त्याला परमात्मरूपी जीवनाचा समुद्रच केला. शुद्ध कापुराचे ठिकाणी काजळी घेणे. किंवा दूधावांचून रांजण दूधाने भरणे शक्य नाही. तद्वत् शुद्ध परमात्मरूपी कापुराचे ठिकाणी जीवदशारूपी काजळी धरणे किंवा जीव मूळचा परमात्मस्वरूप असतांना परमात्मरूप होणे शक्य नाही. तो तात्त्विक दृष्टिने जीव नसुन मूळचाच परमात्मरूप आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३७
आरेवरी आर रे पिंपळावरी पार रे ।
खाली कुंभार वरी चाक भोवे ॥१॥
डंबडाळकें उंबरासी वाळकें ।
पिंपळासी काकड्या लागल्या रे ॥२॥
पैल वरले माळी कोल्हा करड काढी ।
ससा वळीतो वेठी रे ॥३॥
निवृत्तीप्रसादे ज्ञानदेव म्हणे ।
गुरुमहिमा अनुभववीण जाणती रे ॥४॥
अर्थ:-
वेदांत मतात कांहीच्या मताने माया स्वाश्रया व स्वविषया मानली आहे. तर कांहीनी जीवाश्रित मानून ब्रह्माला विषय करते असे मानलेले आहे. त्यापैकी स्वाश्रया व स्वविषया असे ज्या मतांत मानले, त्यांचे मताने परमात्मस्वरुपी एक भोवरा मानून, भोवऱ्याच्या एका भागांवर आर असते त्याप्रमाणे, परमात्म्याच्या एका भागावर मायारुपी आर मानून तिने जगतरुपी दुसरी आर ठेवली आहे. म्हणजे आरेवरी आर
असून तिच्यापेक्षाही परिच्छिन्न असलेले जगतरुपी दुसरी आर करुन परमात्मरुपी च पिंपळावर विश्रांती करिता जगतरुपी पार बांधून, कुंभाराचे चाकाप्रमाणे त्याचे भ्रमण चालू केले. तेव्हा ते जगतरुपी चाकाचे भ्रमण परमात्मरुपी कुंभाराच्या अधिष्ठानावरच चालते.डंबडाळके म्हणजे ते जगतरुपी चक्र फार मोठे असून मनाने देखील त्याचे चिंतन करता येत नाही. मनसाऽपिअचित्यरचनारुपस्य, असे श्री शंकराचार्यानी ब्रह्मसूत्र भाष्यांत म्हटले आहे. उंबरासी झाड म्हणण्यांत त्या झाडाखाली परमात्म्याचे वास्तव्य असते. व तेथे तो साधनानुष्ठानाने उपलब्धही होतो त्याप्रमाणे नरदेहरुपी उंबराचे झाड असून त्या शरीरांत परमात्म्याचे वास्तव्य असून एऱ्हवी सर्वांच्या हृदयदेशी ।
मी आमुका आहे ऐसी’ त्या शरीरांत त्याची उपलब्धी होते. वाळके ही तृप्ततेचे साधन आहेत. त्याप्रमाणे विवेक वैराग्यादि तृप्ततेचे साधने आहेत. म्हणून त्या शरीररुपी उंबराची ती वाळके आहेत. त्याच प्रमाणे पिंपळ हे परमात्म्यांचे वस्तीचे स्थान असून, उपलब्धिचेही स्थान आहे. तद्वत् नरदेह असून काकड्या ह्याही उन्हाने तापलेल्या जीवाला शांती देणाऱ्या आहेत त्याप्रमाणे नरदेहरुपी पिंपळाला लागलेल्या शांती क्षमा दया किंवा नवविधा भक्तिरुपी काकड्या संसार तापाने तापलेल्या जीवाला शांत करणाऱ्या आहेत म्हणून पिंपळाशी काकड्या लागल्यारे’ म्हणण्यास हरकत नाही.माळी या शब्दांने तत्सबंधी बागायित जमीन त्याचे वर पलीकडे माळरान असते. त्याप्रमाणे जीवरुपी माळी तत्सबंधी जे सधर्मक अंतःकरण त्यांत पापपुण्याचे पीक परंतु त्याचे पलीकडे म्हणजे जीवदशेच्या पलीकडे माळरान म्हणजे शुद्ध परमात्मा, त्या स्वरुपाचे ठिकाणी, जसा कोल्हा चतुर असतो त्याप्रमाणे चतुर जो मुमुक्ष तो तेथील’ करड’ म्हणजे पापपुण्य काढून परमात्मरुप होतो. पापपुण्यं विधूय निरंजनसाम्यमुपैति’ ससा हा मंदगतिमान असतो. त्याप्रमाणे मंद मुमुक्षु आपले मूलाबाळांवर विखुरलेले प्रेम वळवून परमात्म्याकडे लावतो. व त्या योगाने तो कृतार्थ ही होतो. या कोड्याचे रहस्य मला श्रीगुरु निवृत्तिरायांच्या कृपाप्रसादाने कळले. त्यांच्या कृपाप्रसादा वांचून अनुभव येणे शक्य नाही. व अनुभवावांचून हे जाणणे शक्य नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३८
भावाची मी सौरी जाले ।
गेले संतापाशीं ।
ज्ञानखड्ग घेउनि हातीं लिंगदेही नाशी ॥१॥
चाल माझी विठो ।
तुम्ही आम्ही भेटो ॥धृ॥
तीन माचवे पाच गाते ।
त्यावर निजले होते ।
फटफटीत उजेड खाटले पडले रिते ॥३॥
कर्म नेणे धर्म नेणे नेणे आणिक कांही ।
ज्ञानदेव म्हणे आम्हां येणे जाणें नाहीं ॥४॥
अर्थ:-
परमात्म्याविषयी मनांत भाव धारण करुन मी सौरी झाले व संतांपाशी गेले. त्यांनी दिलेले ज्ञानरुपी खड्ग हातांत धारण करुन मी माझ्या लिंगदेहाचा नाश केला. विठोबा चल, तुम्ही व आम्ही एकत्र भेटू पंचमहाभूताचें व त्रिगुणात्मक शरीररुपी माचव्यावर मी झोपले होते. व याच नादांत स्वानुभूतीचा फटफटीत उजेड पडला. व माझे खाट रिकामी झाली. व त्यामुळे ऐक्यरुपाची अवस्था झाली. आम्ही या श्रीविठ्ठलावांचून दुसरे कर्मधर्मादि कांही जाणत नाहीं व आम्हास यापुढे जन्म मरणाचा त्रासही नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
१०३९
तुझी आण वाहिन गा देवराया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥१॥
कानडिया विठोबा कानडिया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥२॥
बापरखुमादेविवरु विठ्ठलुराया ।
बहु आवडसी जीवापांसूनिया ॥३॥
अर्थ:-
हे देवराया मी तुझी शपथ घेऊन सांगतो तूं मला माझ्या जीवापेक्षाही अधिक आवडत आहेस. वास्तविक तूं भावभक्तिवांचून कळण्यास अत्यंत कठीण असा आहे. म्हणून मला मात्र श्रीविठ्ठला तूं अंतःकरणापासून म्हणजे भावभक्तिमूलक आवडत आहेस. माझे पिता व रखुमाईचे पती जे श्रीविठ्ठल मला अत्यंत जीवापासून आवडत आहेत असे माऊली सांगतात.


श्रीज्ञानेश्वरांची गाथा समाप्त
॥ पुंडलीक वरदे हरिविठ्ठल ॥शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या
ref: transliteral

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *