पसायदान

पसायदान

पसायदान

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥

वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥

चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥

येथ म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

मनाला थक्क करणारी निस्पृह विश्वप्रार्थना…

ज्यांच्या नावातच ज्ञान आणि ईश्वर वसलेला आहे असे संत ज्ञानेश्वर. ज्यांना सर्व भागवत भक्त “माऊली” हि प्रेममय हाक देतात. आपल्या नावाचा अर्थ आपल्या जीवनातून दाखवून देणारा हा अवलीया. माऊली तुम्हाला शिरसाष्टांग नमस्कार.

माऊली नी ज्ञानेश्वरीची सुरुवात ईश्वराच्या आद्य रुपास आणि वेदांच्या निर्मात्यास स्मरून केली. ओम नमोजी आद्या.. वेद प्रतिपाद्या…जय जय श्री संवेद्या.. तसेच ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या -(ओवी १७९४ ते १८०२)- १८ व्या अध्यायाचे समापन पसायदान या अनंतसाधारण प्रार्थनेने केले.

आपल्या सर्वाना अगदी तोंडपाठ असेल ना पसायदान.. अगदी लहानपणापासून आपण लता मंगेशकरांच्या आवाजातील सुमधुर पसायदान ऐकत आलोय किंवा शाळेतल्या प्रार्थनेमध्ये सुद्धा पसायदान चा समावेश असायचा. पण कधी आपल्याला त्याचा अर्थ सांगितला गेला नाही हे आपले दुर्दैव आहे.

मी जेव्हा याचा अर्थ वाचला तेव्हा खरे तर थक्क झालो. खरंच आयुष्यात इतके मोठे कार्य करून ज्ञानेश्वरांनी आद्य ईश्वराकडे स्वतःसाठी काही मागितलेच नाही. आपण आता या विश्वप्रार्थनेचा अर्थ पाहू…

आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें । तोषोनि मज द्यावे । पसायदान हें ॥ १ ॥

– या विश्वात्मक (विश्वाच्या कणा कणांमध्ये भरून राहिलेल्या ) माझ्या भगवंता, माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे. त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान दयावे.

जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥ २ ॥

– मग ऐक माझे मागणे. या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांच्यातल्या त्या वाईट प्रवृत्तीचा नाश कर. कारण कुठलाही मनुष्य हा कधी वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात. तू फक्त तेच काढून टाक आणि दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये वाढ कर. हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वीतलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील.

– भगवंताकडे मागणे मागताना माउलींना आपल्या वाईट म्हणवल्या जाणाऱ्या मुलाची जास्त काळजी वाटते. कारण प्रत्येक मनुष्य सत्प्रवृत्तीमधून देवत्वाकडे वाटचाल सर्व करू शकतो हा त्यांना विश्वास आहे.

दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ ३ ॥

– जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे. हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरुपी सूर्याचा उदय होवो. प्राणीमत्रांच्या मंगल इच्छा पूर्ण होवोत.

– इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू, मुस्लीम, बौध्ह इत्यादी धर्म नव्हेत तर “माणुसकी” हा धर्म प्रतीत आहे. हा धर्म जर आचरणात आणला तर प्राणीमात्रास इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल.

वर्षत सकळमंगळी । ईश्वर निष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळीं । भेटतु या भूतां ॥ ४ ॥

– या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो. सध्या “नश्वर” गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे. धन संपत्तीलाच “सुख” मानणारे लोक नकोत तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत.

चला कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणीचें गांव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ ५ ॥

-ईश्वरनिष्ठ लोक म्हणजेच संत हे कल्पतरूंचे उद्यान आहेत, चेतानारूपी चिंतामणी रुपी गाव आहेत, त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत. कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी. जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संग ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा या ओवीचा मतितार्थ.

– माउलींच्या काव्यामध्ये उपमात्मक दृष्टांत सदैव खूप सुंदर असतात. संतांना इतकी सूचक उपमा देऊन त्यांच्या कार्याचा अभिव्यक्त गौरवच केला आहे.

चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ ६ ॥

– जो मनुष्य, चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे (अंधारामध्ये सुद्धा दुसर्याला साथ देणारा) आणि रागीट स्वभाव नसणारा ज्ञानरूपी प्रकाशाचा  सूर्यच आहे. त्याला सदैव सज्जन लोकांचाच संग मिळतो व त्याचे सोयरे ही अगदी त्याच्यासारखेच होतात.

किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं । भाजिजो आदिपुरुखीं । अखंडित ॥ ७ ॥

– विश्वामध्ये (तिन्ही लोकातील) लोक सर्वसुखी होऊन अखंड या आदिपुरुषाची भक्ती करत राहोत. तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते. आणि ते न होण्याची मागणी माउली करतात.

आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टाद्दृष्ट विजयें हो । आवें जी ॥ ८ ॥

– आद्य भगवंताने जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे, त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे. आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे.

– जीवन सुखी करणे हे काही Rocket Science  नाहीये. जीवनातील कठीण प्रसंगावरचा उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला भेटतो. ग्रंथांना जीवन माना आणि जीवनच बदलून टाका.

येथ म्हणे श्रीविश्वेशरायो । हा होईल दानपसावो । येणे वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला ॥ ९ ॥

– हे विश्वेशराया… हे जगाच्या मायबापा बापा… तू जेव्हा म्हणशील ना कि हे दान दिले…..तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल…

तर असा आहे या विश्व प्रार्थनेचा गुढार्त… ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ९००० ओव्यांचे हे सार आहे… एका आदर्श समाजव्यवस्थेचे स्वप्न या जगद्माउली ने ८०० वर्षापूर्वी पाहिले. आज तागायत अखंड आषाढी वारी सुरु आहे, लाखो लोक या भक्तीसागरात बुडून सदैव आळंदी ते पंढरपूर हा भक्तीचा सेतू बांधत आहे.. ते करता करता आपण आजच्या सगळ्यात जलद माध्यमाचा म्हणजेच Internet चा वापर सत्कार्यासाठी करूया.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

ज्ञानेश्वरी (कठीण शब्दाच्या अर्थासहित)

संत तुकाराम गाथा ह(अनुक्रमानिके प्रमाणे ) अंप

2 thoughts on “पसायदान”

  1. sandeep gaddam

    Beautful and excellent efforts by the team of Sant Sahitya. How do I contribute towards this noble cause. Regards

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *