संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

नभ नभाचेनि सळें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २८

नभ नभाचेनि सळें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २८


नभ नभाचेनि सळें । क्षोभु वाहिजे काळिंदी जळें ।
सासिंनले जगाचे डोळे । तें रुप पाहावया ।
भलतैसी हांव । मना न पुरे तेथींची धांव ।
लावण्यसिंधु सिंव सांडूनि जातो गे माये ॥१॥
सुलभ परमात्मा गे माये । मन मुरोनि देखणेपणा उरी ।
याचि कारणें उभा भिवरेतीरीं । अनुपम्य जयाची थोरी गे माये ॥ध्रु०॥
काळिंदीजळाचा भोंवरा । कीं माजी वेढूनि इंदीवरा ।
माळ बांधोनियां मधुकरा । रोमांमाजी ॥२॥
सकल सिध्दिंचा मेळां । तेंवि विभूति शोभे भाळा ।
मुगुटीं रत्नकिळा । लिंग अनुपम्य गे माये ॥३॥
क्षीरसागरींचें । निवांत सुख । असो हें निमासुरें मुख ।
श्रीयेचें मनोहर देख । टवकारलें दोंभागीं ॥
पहावया ऊरंचीं शोभा । सकळ देवाची प्रभा ।
तेथें तारांगणें कैंचीं नभा । लेइला गे माये ॥४॥
कटावरी ठेवूनि हात । जनां दावी संकेत ।
भवजलाब्धीचा अंत । इतुलाची ॥
सम चरणींच्या खुणा । उभा पंढरीचा राणा ।
तो आवडे जनांमना । दुर्लभ गे माये ॥५॥
कैवल्याचा गाभा । कीं ब्रह्मविद्येचा वालभा ।
निकटपणाचिया लोभा । कैसा उभा असे ॥
देवा पायींची वीट । तेचि माये नीट ।
वरि येऊनि भीमातटी । वोळग दावी गे माये ॥६॥
नेति नेतिचेनि बिरारें । उभऊनि श्रीकरारें ।
श्रुंगाराचेनि पडिभरें । चराचरें वोळगती ॥
हा मेखळेचा मध्यमणी । उदो केला ग्रहगणीं ।
मध्य नायकु तरणी किरणीं । विरजितु गे माये ॥७॥
आमुची ह्रदयींची श्रीमूर्ति । घेऊनि विठ्ठलवेषाची बुंथी ।
आतां चाळविसी किती । बापा पालटु नेघे ॥
बाप रखुमादेविवरा विठ्ठला । त्वां मजशीं अबोला कां धरिला ।
जीवीं जीव आहे उरला । तो निघों पाहे ॥८॥

अर्थ:-
नभासारख्या निळ्या रंगाचा व यमुनेतील निळ्या पाण्यासारखा दिसणारा त्याला बघायला जगाचे डोळे आतुर आहेत.मनही तेथे धाव घेते. भलती हाव मनाला पडते तरी त्या लावण्यसिंधुचे लावण्य शिव ओलांडून समुद्रासारखी धडकत असते. असा तो सुलभ परत्मामा भीमेतटी उभा असून त्याचे देखणेपण मनात भरून उरते अशी त्याची अनुपम्य थोरवी आहे. यमुनेतील भोवऱ्यांनी त्याला वेढले असावे असे वाटते. व त्याच्या गळ्यातील पुष्पाच्या माळांवर भक्त मधुकरासारखे गुंजारव करतात.तो म्हणजे सर्व सिध्दींचा मेळा आहे. त्याने कपाळावर विभूती रेखिली आहे मुकुटावर रत्नांची प्रभा आहे व मस्तकावर शिवलिंग आहे. क्षीरसागरातील निवांतपणाचे सुख त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे व ते मुख दोन्ही बाजूस राही रखमाबाई बघत आहेत.सर्व देवांची व तारांगणाची प्रभा छातीवर घेतली आहे. संसार माझ्या कमरेइतकाच आहे असे तो कमरेवर हात ठेवून त्याची खूण जगाला दाखवत आहे. समचरणावर उभा असणारा तो पंढरीचा राणा जनमानसाला आवडतो पण भक्तीशिवाय तो दुर्लभ आहे. हा क्षोमाचा गाभा व ब्रह्मविद्येचा प्रियकर असून भक्ताच्या निकटतेसाठी उभा आहे. तो भक्ताऐक्यासाठी भीमातटी उभा राहून स्वतःची ओळख दाखवतो.हा नाही हा नाही असे सांगणाऱ्या श्रुतीवाचून दमलेल्या भक्तांना तो शृंगाराच्या शोभेने तो हात वर करून जगाला मोहित करतो.चंद्र सूर्याचे व ग्रहगणांचे त्याच्या गळ्यातील मेखळेच्या मध्यभागाच्या मण्यात आहे व तो सर्व ताऱ्यांमध्ये सूर्यासारखा शोभतो. कितीही वेष पालटून तो आम्हाला फसवायला गेला तरी ती विठ्ठलमूर्ती आमच्या ह्रद्यात आहे. हे विठ्ठला तू माझ्याशी का अबोला धरला आहेस म्हणून माझा जीव जाऊ पहात आहे असे माऊली सांगतात.


नभ नभाचेनि सळें – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग २८

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *