संत ज्ञानेश्वर महाराज अभंग

उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐकरे बीज – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३२

उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐकरे बीज – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३२


उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐकरे बीज ।
सांडि सांडि मायामोहो मुक्त विचरेरे सहज ।
आशा मनसा गुंफ़ो नको सोहं धरिकारे नीज ।
अखंड गुरुचरणी मोन्य धरिकारे काज ॥१॥
उपदेशी मदलसा निजकारे आधीं ।
पूर्णबोधें उमजेरे हेंचि साधी समाधी ।
लटिका हा मायामोह लक्ष लावा गोविंदीं ।
सांडि मांडि कोहंवेगीं लीन होई परमानंदीं ।
जे जो जे जो जे जो बाळा ॥२॥
चौर्‍यांशीलक्ष जीव जंतु शिणले योनी येतां जातां ।
विरळा देखों परतला जो पारुषला संपूर्णता ।
मनबुध्दि एकचित्तें दृढधरी अनंता ।
उपरति चित्तें करी सावध होई त्त्वरिता ॥३॥
जन्म हें दुर्लभ जाणा मनुष्यजन्म अगाध ।
ज्ञानध्यान बुझिजे आधीं वरी गुरुचा प्रबोध ।
तरीच साधेल तुज नाहीं तरी होसी मूढ अंध ।
नेमिलें आयुष्य वेचे कोण कोण तोडी भवबंधकंद ॥४॥
नवमास होतासि गर्भी अधोवदनें दु:खित ।
तैं होता उमजुतुज कारें येथें निश्वित ।
परतोनि पाहे वेगीं मनीं धरी अच्युत ।
तुटेल योनिपंथू मग तूं सर्वातीत ॥५॥
जंववरी माझें माझें मन न संडी तुझें ।
तंववरी मोहोपाश व्यर्थ धरणिये ओझें ।
विष्ठामूत्र जंतगर्भी म्यां वाहिलें तुझें ओझें ॥६॥
उठीं पुत्रा सावध होई मी माझे सांडि धरी ।
कोशकिटके जन्मलासि तैसें तूं बा न करी ।
आपण्या आपण होसी तुझा तूंचिरे वैरी ।
जंव नाहीं आलें काळचक्र वेगी स्मरे मुरारी ॥७॥
इंद्रियें सावध अहाति तव करी धांवा धांवी ।
मग विस्मृति पडेल बुध्दि मगन साधे हरि गोसांवी ।
सर्वघटी हरि ध्याय मनचक्षु एकभावी नारायणनामपाठ वेदशास्त्र अनुभवी ॥८॥
दिननिशीं शरीर तुझें
बाळतरुणवृध्द होय । काया हे नव्हे तुझी
सांडी सांडी ममता माया । निर्गुणरुप हरिहरु त्यासि
तूं शरण जाय । सगुणीं झोंबों नको
हरिरुपीं तल्लीन राहे ॥९॥
मृगजळ मायपूर व्यर्थ इंद्रियांचि झोंबी ।
कामना लपवी आधीं लय लावी हरिच्या बिंबी ।
चक्षें पक्षें मन गोवी बिरडें घाली निरालंबी ।
शुध्दबुध्द तत्त्व हरि एकतत्त्व नितंबी ॥
गुरुगम्य आगमाचे हेंचि तत्त्व उत्तम ।
सत्त्व रज तमीं गुंफ़ो नको मा मार्ग धरी उत्तम ।
प्राण लपवी प्राणामाजी वासनाकारी नि:ष्काम ॥१०॥
हेंची साधन योगियांचें शिवाचें मनोगत ।
उठोनियां प्रातकाळीं तनुमनध्यान नित्य ।
जागरणिं हरिकीर्तनी उध्दरसी त्त्वरित ।
नाशिवंत शरीर जाण मग तुज न घडे हित ॥११॥
क्षणां एका शरीर नासे हें तुझें तुज न कळे ।
अवचिता येईल काळ झांकतील देखणे डोळे ।
मग हें नाठवे तुज करि गुरुमेळीं निर्मळ ।
सांडी मांडी करुं नको टाकिं टाकी मनीचे सकळ ॥१२॥
व्यर्थरे राहासी येथें पडशील मोहोफ़ांसा ।
दशदिशा हरि आहे ऊर्ध्व अध महेशा ।
मही हे अंथरुण आकाश करी अवकाश ।
या परि विचिरें रे राहवें प्रमाण सरिसा ॥१३॥
तत्त्व हें एकरुप हरिविण नाहीं कोठें ।
द्वैतभाव न धरी मनीं नीटजाय वैकुंठ ॥
हा मार्ग योगियांचा संत गेले नीट वाटे ॥१४॥
सनकादिकां पंथ हाचि सेविला उपजंता ।
नारदें विचार केला मग न राहे तो निवांता ।
गोरक्ष बुझला वेगी दृढ कास हनुमंता ।
अवधूत याचि परि दत्तामाजी पूर्णता ॥१५॥
उन्मनि साधी बाळा रुप न्याहाळी नयनीं ।
नासिकीं ठेऊनि दृष्टि खेंचरी मुद्रा निर्वाणी ।
शरीर हें असों जावों याची न करी तूं करणी ।
रामकृष्ण वाचा पाठ हेंचि धरी निर्वाणी ॥१६॥
अष्टदळ ह्रदयी आहे तोचि आत्मा ये करी ।
मन बुध्दि वित्त चित्त दिसों नेदी वोहरी ।
मातापिता प्राण तुझे तो दाखविल शरीरीं ।
स्त्रीपुत्र इंद्रियद्वारा सांडी परति माघारी मन हें
कोंडी पिंडीं तंतू तुटो नेदी याचा ।
मार्ग हे जिव्हे पारुषरे हरिरामकृष्ण वाचा ।
रिकामा क्षणभरी पंथ धरी प्रेमाचा ।
आदि मध्य हरि एक तोचि ध्यायीं ह्रदयींचा ॥१७॥
श्रवण स्मरण करि काळघाली आंकणा ।
भीष्में साधिलें हरि तो पावला नारायणा ।
लक्ष्मणें धरिली वृध्दि वोळगिला रामराणा ।
निमिष्य एक न भरतां शरीर सांडिले प्राणा ॥१८॥
हित तेंचि करी बाळा हरि प्रेमें मन करी ।
सावधान चित्त आहें तंव सर्व हे दृष्ट निवारी ।
भुली पडेल अंती तुज मग नाहीं कैवारी ।
ममतेचें बिरडें फ़ेडी उठे चाले योगरीतीं ॥१९॥
म्हणे माते परियेसी कैसे उपदेशिलें ज्ञान ।
गुरु हा कोण करुं अवघे दिसें विज्ञान ।
मज याचें स्मरण झालें सोहं होतें मज ध्यान ।
कोहं हें विसरलों जालें संसारमौन्य ॥२०॥
परतले प्रेमभाव उब्दोध आला धांवया ।
कळिकाळ न दिसे दृष्टि पापपुण्य राहावया ।
सभराभरित हरि दिसेमाझें कैचें उरावया ।
तूं तव विदेही माया मदलासा मज राखावया ॥२१॥
मदलसा म्हणे पुत्रा जो उपदेश करुणा ।
ब्रह्म हे जीवी शिवीं भोगि योनी नारायणा ।
शांति क्षमा बाणली तुज कैचें उमटलें गुज ॥२२॥
हे स्थिति बाणली ज्यासी तो मी परिपूर्ण योगी ।
दया मुक्ति जाली दासी नित्य उन्मनी भोग भोगी ।
त्याचिया दर्शनें जीव तरतील वेगीं ।
उठि पुत्रा जाय पंथे जेथें जेथें सत्रावी उगी ॥२३॥
मुक्तामुक्ता अभयदान मुक्त जाला अनुभवी ।
राहिली निरलंबी रातलासे सतरावी ।
मुक्ताई मुक्त ज्ञाने मदलसा नांवानांवी ।
मुक्तलग उपदेश चांगयास दिधला पाही ॥२४॥

अर्थ:-

बाळा, ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाचे वर्म ऐक मायामोह यांचा त्याग करुन तो परमात्मा मी आहे या ज्ञानाने मुक्त होऊन, सहज वृत्तिने च राहा. आशा तृष्णादिक सोडून संसारा विषयी मौन धरुन नेहमी गुरुचरणी राहा. मदालसा उपदेश करते बाळा स्वतःचे ब्रह्मरुपाने ज्ञान करुन घेणे हाच समाधी सिद्ध कर हा मायामोह खोटा आहे. म्हणून मोह टांकून गोविंदाच्या ठिकाणी लक्ष्य लावून व कोऽहंचा त्याग करुन परमानंदरुप होऊन तेथेच विश्रांती घे. जन्ममरणाच्या फेऱ्यांत सापडून दुःख भोगणारे पुष्कळ आहेत. पण त्यातून पूर्णतेने सुटलेला क्वचितच विरळा म्हणून वैराग्याने व एकाग्र चित्ताने ताबडतोब परमात्म चिंतनाला लाग. एकंदर जन्मामध्ये मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ, ज्ञान काय ? ध्यान कोणाचे करावे? हे जाणून गुरुचा अनुग्रह होईल तर ठिक नाही तर मूर्ख ज्ञानशून्य अशा स्थितीत आयुष्य निघून गेले तर हे अज्ञान कोण निवृत्त करणार? तूं नऊ महिनेपर्यंत गर्भात खाली तोंड करुन दुःखांत होतास त्यावेळी तुला ज्ञान होते. मग येथे स्वस्थ का बसलास? संसाराकडे पाठ करुन भगवंताचे स्मरण कर म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यांतून सुटून परमात्मरुप होशील. जोपर्यंत हे माझे, ते माझे, असा व्यवहार मनापासून सुटत नाही. तोपर्यंत मोहपाश आहेच व तुझे अस्तित्व हा भूमिला फुकट भार असून विष्ठा, मूत्र, जंताने युक्त असलेल्या गर्भामध्ये मीही नऊ महिने तुझे फुकट ओझे वाहिले. असे मला दुःख होईल म्हणून सावध हो. व मी माझे टाकून दे. किडे, जंतू जसे फुकट जन्मून मरतात. तसे तूं करु नको. हा उपदेश न ऐकशील तर तुझा तूंच शत्रू होशील. म्हणून तुझ्यावर यमाचा फेरा आला नाही तोच मुरारीचे स्मरण कर. इंद्रियें कार्यक्षम आहेत. तोच परमार्थ साधून घे. नाही तर वृद्धपणी बुद्धीला भ्रम होईल. मग परमात्मप्राप्ती होणार नाही. मनाला डोळ्याला हरि हाच विषय ठेवून सर्वत्र हरिच आहे, असा नारायणनाम पाठ हा वेदशास्त्राचा अनुभव घे. दिवसेंदिवस तूझे शरीर पुढचे अवस्थेत जात आहे. इतर पदार्थ तर राहू द्या. पण हे शरीरही तुझे नाही तेव्हां याबद्दल ममत्व बुद्धि टांक. सगुणांच्या ठिकाणी खटपट न करता निर्गुण जे हरिचे स्वरुप त्यांत तूं तल्लीन हो. मृगजळाप्रमाणे असणाऱ्या संसारांत ज्यामुळे इंद्रियांच्या खटपटी चालल्या आहेत ती इच्छाच हरि स्वरुपांकडे लाव. चक्षुरादि सर्व इंद्रियांना कोठून नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त अशा एका परमात्म्याचाच आश्रय कर. सत्त्व, रज, तम गुणांत न राहता प्राणायामाचे योगाने वासनाक्षय करुन सांगितलेल्या मार्गाचा आश्रय करावा. हेच गुरूंच्या उपदेशाचे व वेदाचे उत्तम सार आहे. शरीर नाशिवंत असल्यामुळे प्रातःकाळी उठल्याबरोबर परमात्म्याचे ध्यान करावे. हेच योगाचे साधन असून शीवसूत्रात हेच सांगितले आहे. तसे केले नाहीतर तुझे कल्याण होणार नाही. शरीराचा नाश केंव्हा होईल. ते तुझे तुलाही कळत नाही. मृत्यु केव्हां येऊन झडप घालील व हे तुझे उत्तम डोळे केव्हां मिटतील याचा भरवंसा नसल्यामुळे आज करु. उद्या करु असे न म्हणता अगोदर अंतःकरण शुद्ध करुन गुरुमुखाने स्पष्ट ज्ञान करुन संसारांत राहिलास तर फुकट मोहपाशांत पडशील, पृथ्वी हेच अंथरुण, परमात्मा हे राहावयांचे ठिकाण यारितीने वेदाज्ञेप्रमाणे दाहिदिशेत हरिच व्याप्त आहे असे समज.द्वैतभावरहित एकच परमतत्त्व आहे त्यांचे ज्ञान संपादन करुन सरळ मोक्षाचा मार्ग आक्रमण कर याचमार्गाने योगी संत गेले आहेत. याचे अवलंबन न करणारे संसारांत अडकून भलत्याच वाटेला लागले. सनकादिक ऋषिनी जन्मताक्षणी हाच मार्ग स्वीकारला. नारदादिही विचार करुन याच खटपटीला लागले. यांचज्ञानाने गोरक्षनाथ समाधान पावले. मारुतीनेही रामसेवेकरिता कांस बांधली. अवधूतही या ज्ञानाने पूर्ण दत्तरुप झाला. म्हणून शरीराची काळजी न करता नित्यनामस्मरण ठेऊन, आसनावर बसून नाकांच्या शेंड्यावर दृष्टि ठेवून, खेचरी मुद्रा करुन, व परमात्मस्वरुपाचा साक्षात्कार करुन ज्ञानावस्था प्राप्त करुन घे. स्त्री, पुत्र, विषय यांचा संग टांक आई बाप हे तुझे जिवलग खरे. पण ते पुन्हा शरीरांतच घालतील. म्हणून मन, बुद्धि, चित्त यांना बाहेरचे विषय न दावितां हृदयांत अष्टदल कमलाचे ठिकाणी, आत्मा आहे. तो स्वाधीन करुन घे. जिभेचे दुसरे सर्व विषय सोडून क्षणही फुकट जाऊ न देता प्रेमाने नामस्मरण कर व मनाने परमात्मचिंतनाचा धागा तुटू न देता त्याला शरीरांचे आंत कोंडुन ठेव सर्वत्र व हृदयांत असणाऱ्या हरीचे ध्यान कर. एका क्षणांत प्राण शरीरांतून निघून जाईल. म्हणून प्रत्येक क्षणी वेदांत श्रवण किंवा नामस्मरण कर. कारण मृत्यु केव्हां घाला घालील यांचा नेम नाही. असे भीष्माने केले. व तो नारायणस्वरुप झाला. लक्ष्मणालाही याच ज्ञानांने रामराजे प्राप्त झाले. जोपर्यंत तुझी बुद्धी चांगली आहे तोच या दिसणाऱ्या संसाराचे निर्मूलन कर. नाही तर मरणकाली बुद्धि भ्रष्ट झाल्यांवर यातूंन कोणीही सोडविणार नाही.याकरिता ममत्वरूप बिरडे सोडून योगमार्गाला लाग. मुलगा म्हणतो आई ! धन्य आहे तुझ्या उपदेशरुप ज्ञानाची, मी ‘कोऽहं’ हे विसरलो. संसार कुठे गेला याचा पत्ताच नाही. आतां गुरू कोणाला करु? बोध झाल्याने अनात्मवासना निवृत्त झाली. सर्वत्र हरिच असल्याने मृत्यु दिसत नाही. पापपुण्य यांना राहावयास ठिकाणच नाही. तूही परमात्मरुप झालीस. मदालसा तूं तर मायिक असल्याने मला राहावयास ठिकाणच नाही. मदालसा म्हणते बाळा हा गुह्य उपदेश तुझ्याठिकाणी कसा उमटला शांति, क्षमा या मूर्तिमंत तुझ्या ठिकाणी दिसतात.अरे ! एकच ब्रह्म पण जन्ममरण भोगिल तर जीव, व नारायणरुप होईल तर शीव म्हणतात. स्वरुपस्थिती भोगणारा जो मी, परिपूर्ण योगी त्या माझ्या ठिकाणी दया मुक्ति त्या दासी झाल्या. आत्मस्थिती पूर्ण बाणते. त्या मार्गाने जा. त्याच्या दर्शनांने जीव मुक्त होतात. यामार्गाचा अनुभव घेणारा बद्धमुक्त याच्यापलीकडे असणाऱ्या मुक्ताअवस्था कोणाच्याही आश्रया वर असलेल्या आत्मस्वरुपात पाहातो. मदालसा या नावाने मुक्ति करिता जो उपदेश केला. तोच उपदेश मुक्ताबाईने मुक्तिकरिता चांगदेवास केला. असे माऊली सांगतात.


उपदेश ब्रह्मज्ञान पुत्रा ऐकरे बीज – संत ज्ञानेश्वर महाराज अभंग ७३२

संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड रा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *