सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा ऑडिओ आणि विडिओ सहित 

(ओव्या १ ते १०४)

(ओव्या १०५ ते २०१)

(ओव्या २०२ ते २९३)

(ओव्या २९४ ते ३७९)

(ओव्या ३८० ते ४३३)


वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार


विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा ।
तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥ १ ॥
ज्या तुझी योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रगट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी गणपति) त्या सद्गुरो, तुला नमस्कार असो. ॥१७-१॥

त्रिगुणत्रिपुरीं वेढिला । जीवत्वदुर्गीं आडिला ।
तो आत्मशंभूनें सोडविला । तुझिया स्मृती ॥ २ ॥
(पूर्वी त्रिपुरासुराचा वध करून देवांस मुक्त करण्याचे वेळी शंकरास गणपतीची स्तुती करावी लागली. तो प्रसंग मनात आणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) सत्व, रज, तमरूपी तीन शहरांनी वेढलेला व जीवभावरूपी किल्ल्यात अडकलेला जो आपला आत्मा, तो शिवाने गुरुरूपी तू जो गणेश त्या तुझे स्मरण करून सोडवला. ॥१७-२॥

म्हणौनि शिवेंसीं कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा ।
तर्‍ही हळु मायाजळा- । माजीं तारूनि ॥ ३ ॥
म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस. तरी पण (मुमुक्षु जीवांना) मायारूपी जळातून तारतोस, म्हणून तू (भोपळ्यासारखा) हलका आहेस. ॥१७-३॥

जे तुझ्याविखीं मूढ । तयांलागीं तूं वक्रतुंड ।
ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ॥ ४ ॥
जे तुझ्यावीषयी अज्ञानी आहेत, त्यांचेपासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस आणि ज्ञानवानांना तर तू नेहेमी सन्मुखच आहेस. ॥१७-४॥

दैविकी दिठी पाहतां सानी । तर्‍ही मीलनोन्मीलनीं ।
उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी ॥ ५ ॥
आपली दृष्टी (डोळे) पाहिली तर बारीक आहे, तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात (ज्ञानाच्या संकोच व व्कासात) (जगाचे) उत्पत्ति व प्रलय हे दोन्ही आपण सहज करता. ॥१७-५॥

प्रवृत्तिकर्णाच्या चाळीं । उठली मदगंधानिळीं ।
पूजीजसी नीलोत्पलीं । जीवभृंगांच्या ॥ ६ ॥
प्रवृत्तिरूपी कानाच्या हालण्याने जो गंडस्थळातून वाहणार्‍या मदाच्या सुवासाने युक्त असलेला वारा सुटला, त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर जमा झाले. त्या जीवभ्रमररूपी निळ्या कमळांनी तू पूजिला गेला आहेस. ॥१७-६॥

पाठीं निवृत्तिकर्णताळें । आहाळली ते पूजा विधुळे ।
तेव्हां मिरविसी मोकळें । आंगाचें लेणें ॥ ७ ॥
नंतर निवृत्तिरूपी कानाच्या हलण्याने ती बांधलेली पूजा उधळून जाते, तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस. ॥१७-७॥

वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु ।
तो तांडवमिसें कळासु । दाविसी तूं ॥ ८ ॥
माया हीच कोणी तुझी स्त्री तिची नृत्यक्रीडा हाच जगद्रूपी आभास, त्यातील कौशल्य (मायेचे आपल्या नृत्यक्रीडेत जगदाभास दाखवणे हे) तू आपल्या द्वारे दाखवतोस. (तुझ्या आश्रयाने असणारी जी माया, तिची जगदाभासरूपी नृत्यक्रीडा तू आपल्या अस्तित्वावर दाखवतोस). ॥१७-८॥

हें असो विस्मो दातारा । तूं होसी जयाचा सोयरा ।
सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो ॥ ९ ॥
हे श्रीगुरो, हे राहू द्या. आश्चर्य हे आहे की तू ज्याचा सोयरा होतोस, तो सोयरेपणाच्या व्यवहाराला मुकतोच. (म्हणजे तू ज्याच्यावर प्रेम करतोस, त्याला सर्वत्र आत्मप्रतीती होत असल्यामुळे त्याची आपपरभावना नाहीशी होते) ॥१७-९॥

फेडितां बंधनाचा ठावो । तूं जगद्‍बंधु ऐसा भावो ।
धरूं वोळगे उवावो । तुझाचि आंगीं ॥ १० ॥
तू (अहंकारादि संसार) बंधनाचा ठावठिकाणा नाहीसा करणारा आहेस, म्हणून जगद्बंधु या नावाचा अभिप्राय तुझ्याच ठिकाणी प्रशस्तपणे लागतो. (जगद्बंधु हे नाव तुला यथार्थपणे शोभते). ॥१७-१०॥

तंव दुजयाचेनि नांवें तया । देहही नुरेचि पैं देवराया ।
जेणें तूं आपणपयां । केलासि दुजा ॥ ११ ॥
हे देवराया (देहदृष्ट्या) दुसरा जो तू, त्या तुला ज्याने आपले रूप मानले त्याला द्वैताच्या नावाने स्वत:चा देहही (वेगळा) उरत नाहीच. (म्हणजे जो तुला आपला आत्मा समजला, त्याला आपल्या सहवर्तमान संपूर्ण जगत आत्मरूप दिसते). ॥१७-११॥

तूंतें करूनि पुढें । जे उपायें घेती दवडे ।
तयां ठासी बहुवें पाडें । मागांचि तूं ॥ १२ ॥
तुला विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनद्वारा जे धावा घेतात, त्यांना तू पुष्कळ प्रमाणात मागेच रहातोस. ॥१७-१२॥

जो ध्यानें सूये मानसीं । तयालागीं नाहीं तूं त्याचे देशीं ।
ध्यानही विसरे तेणेंसीं । वालभ तुज ॥ १३ ॥
जो ध्यानाच्या योगाने तुला मनात आणू पहातो, त्याच्याकरिता (त्याच्या ध्यानाचा विषय होईल असा) तू त्याच्या देशात (वृत्तीत) नाहीस व जो ऐक्यबोधात तुझे ध्यानही विसरतो, त्यावर तुझे प्रेम असते. ॥१७-१३॥

तूतें सिद्धचि जो नेणे । तो नांदे सर्वज्ञपणें ।
वेदांही येवढें बोलणें । नेघसी कानीं ॥ १४ ॥
जो तुला सिद्धच (कृतीने प्राप्त होण्याजोगा नाही) असा जाणत नाही (उलट जो शब्दादि साधनांनी तुझे आकलन करण्याचा प्रयत्न करतो) तोच सर्व जाणणारा म्हणून मिरवतो. त्या शब्दज्ञानाच्या शब्दरूप साधनाने (हे श्रीगुरो), तुमची सिद्धी कशी होणार ? कारण सर्वज्ञ म्हणून गाजवलेल्या शब्दराशिरूप वेदाने केलेले आपले वर्णन जेथे आपल्या कानापर्यंत येण्याची पंचाईत पडते, तेथे त्याचा काय पाड ? ॥१७-१४॥

मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तोत्रीं कें बांधों हाव ।
दिसती तेतुली माव । भजों काई ॥ १५ ॥
महाराज, मौन हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नाव आहे. असे असल्याकारणाने मी स्तुति करण्याची उत्कट इच्छा कोठे बाळगू ? जे तुझे स्वरूप मला दृश्यत्वेकरून दिसत आहे ते सर्व मिथ्या आहे, तर मग मी भजन कशाचे करावे ? ॥१७-१५॥

दैविकें सेवकु हों पाहों । तरी भेदितां द्रोहोचि लाहों ।
म्हणौनि आतां कांहीं नोहों । तुजलागीं जी ॥ १६ ॥
हे देवा, जर मी तुमचा सेवक होऊ पाहीन तर (तुमच्या एकरस स्वरूपात सेव्य व सेवक असा) भेद उत्पन्न केल्यामुळे मला तुमचा द्रोह केल्याचे पातक लागेल. म्हणून महाराज, तुमच्या संबंधाने मी स्वत: काहीच होत नाही. (तुमच्याहून कोणच्याच प्रकाराने वेगळा रहात नाही). ॥१७-१६॥

जैं सर्वथा सर्वही नोहिजे । तैं अद्वया तूतें लाहिजे ।
हें जाणें मी वर्म तुझें । आराध्य लिंगा ॥ १७ ॥
जेव्हा सर्वप्रकारे सर्वही न व्हावे (म्हणजे जेव्हा कशाची अहंता घेऊ नये) तेव्हा अद्वितीय जो तू त्या तुझी प्राप्ती होते. हे आराध्यमूर्ते, हे तुझे वर्म मी जाणत आहे. ॥१७-१७॥

तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण ।
तैसें नमन माझें जाण । बहु काय बोलों ॥ १८ ॥
तर फार काय सांगू ? जसे मीठ वेगळेपणाने न उरून पाण्याला भजते (म्हणजे पाण्याशी तद्रूप होऊन रहाते) तसे माझे नमन आहे असे समजा. ॥१७-१८॥

आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे ।
कां दशीं दीपसंगें । दीपुचि होय ॥ १९ ॥
आता रित्या घागरीने समुद्रात प्रवेश केल्यावर ती उचंबळत भरून निघते, अथवा वात दिव्याच्या संगतीने दिवाच होते, ॥१७-१९॥
तैसा तुझिया प्रणितीं । मी पूर्णु जाहलों श्रीनिवृत्ती ।
आतां आणीन व्यक्तीं । गीतार्थु तो ॥ २० ॥
त्याप्रमाणे हे निवृत्तिनाथा, तुम्हाला नमस्कार करून मी पूर्ण झालो. आता मी तो गीतेचा अर्थ प्रगट करीन. ॥१७-२०॥
तरी षोडशाध्यायशेखीं । तिये समाप्तीच्या श्लोकीं ।
जो ऐसा निर्णयो निष्टंकीं । ठेविला देवें ॥ २१ ॥
तर सोळाव्या अध्यायाच्या अखेरीस ज्या समाप्तीच्या शेवटच्या श्लोकात जो असा सिद्धांत देवाने निश्चयात्मक रीतीने स्थापित केला ॥१७-२१॥
जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था ।
शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥ २२ ॥
तो हा की अर्जुना, कृत्य व अकृत्य यांची रीति आचरणात आणण्यास तुला एक शास्त्रच पूर्णापणे प्रमाण मानले पाहिजे. ॥१७-२२॥
तेथ अर्जुन मानसें । म्हणे हें ऐसें कैसें ।
जे शास्त्रेंवीण नसे । सुटिका कर्मा ॥ २३ ॥
तेव्हा अर्जुन मनामधे असे म्हणाला की (देवाचे सांगणे हे असे कसे ? की शास्त्राशिवाय कर्म करण्याला मोकळीक नाही ? ॥१७-२३॥
तरी तक्षकाची फडे । ठाकोनि कैं तो मणि काढे ।
कैं नाकींचा केशु जोडे । सिंहाचिये ? ॥ २४ ॥
तर तक्षक नावाच्या नागाजवळ जाऊन त्याच्या फणीतील मणि कसा काढायचा व सिंहाच्या नाकातील केस कोठे मिळावायचा ? ॥१७-२४॥
मग तेणें तो वोंविजे । तरीच लेणें पाविजे ।
एर्‍हवीं काय असिजे । रिक्तकंठीं ? ॥ २५ ॥
मग त्या केसात तो मणि ओवावा तरच दागिना प्राप्त करून घ्यावा नाहीतर काय मोकळ्या गळ्याने रहावे ? ॥१७-२५॥
तैसी शास्त्रांची मोकळी । यां कैं कोण पां वेंटाळी ।
एकवाक्यतेच्या फळीं । पैसिजे कैं ? ॥ २६ ॥
त्याप्रमाणे शास्त्राचा जो मतभेद याला कोण कधी आकलन करेल ? व एकवाक्यतेच्या फळात केव्हा प्रवेश होईल ? ॥१७-२६॥
जालयाही एकवाक्यता । कां लाभें वेळु अनुष्ठितां ।
कैंचा पैसारु जीविता । येतुलालिया ॥ २७ ॥
जरी एकवाक्यता झाली तरी याप्रमाणे वागण्यास (आचरण करण्यास) वेळ कसा मिळेल ? एवढ्याला (शास्त्रांची एकवाक्यता करणे व त्याप्रमाणे कर्माचरण करण्याला) आयुष्याचा विस्तार कोठला ? ॥१७-२७॥
आणि शास्त्रें अर्थें देशें काळें । या चहूंही जें एकफळे ।
तो उपावो कें मिळे । आघवयांसी ? ॥ २८ ॥
आणि शास्त्रांचे ज्ञान, लागणारी द्रव्यादी सामुग्री, सांगितलेले ठिकाण व योग्य काल या चार साधनांचा एकत्र योग येऊन, जे कृत्य पार पडणार, ते तर क्वचितच घडणार. (कारण) सर्वांना हा असला योग कोठून साधणार ? ॥१७-२८॥
म्हणौनि शास्त्राचें घडतें । नोहें प्रकारें बहुतें ।
तरी मुर्खा मुमुक्षां येथें । काय गति पां ? ॥ २९ ॥
म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सर्व घडून येणे हे पुष्कळ अंशी असंभवनीयच आहे. असे आहे तर मग अशा स्थितीत अज्ञानी मुमुक्षु लोकांना कोणता मार्ग आहे ? ॥१७-२९॥
हा पुसावया अभिप्रावो । जो अर्जुन करी प्रस्तावो ।
तो सतराविया ठावो । अध्याया येथ ॥ ३० ॥
हा अभिप्राय विचारण्याकरता अर्जुन जी प्रस्तावना करतो, तो येथे सतराव्या अध्यायाचा प्रसंग होय. ॥१७-३०॥
तरी सर्वविषयीं वितृष्णु । जो सकळकळीं प्रवीणु ।
कृष्णाही नवल कृष्णु । अर्जुनत्वें जो ॥ ३१ ॥
तर सर्व विषयांच्या ठिकाणी जो अर्जुन निरीच्छ व जो सकल कलांमधे प्रवीण, आणि (आश्चर्यरूप) श्रीकृष्ण खरा, परंतु त्यासही आश्चर्य देणारा अर्जुनरूपी जो हा एक दुसरा कृष्णच आहे. ॥१७-३१॥
शौर्या जोडला आधारु । जो सोमवंशाचा शृंगारु ।
सुखादि उपकारु । जयाची लीला ॥ ३२ ॥
जो अर्जुन शूरत्वास आधार प्राप्त झाला आहे, जो अर्जुन चंद्रवंशाचे भूषण आहे, दुसर्‍यास सुख देणे वगैरे उपकार करणे ही ज्याची लीला आहे ॥१७-३२॥
जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु ।
सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ॥ ३३ ॥
जो अर्जुन बुद्धीचा प्रियपती आहे, जो ब्रह्मज्ञानाची विसाव्याची जागा आहे आणि जो देवाच्या मनोधर्माप्रमाणे वागणारा सोबती आहे ॥१७-३३॥
अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥ १ ॥
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जे शास्त्रविधीचे (तो माहीत नाही म्हणून) उल्लंघन करून (केवळ) श्रद्धेने युक्त होत्साते पूजनादि करतात त्यांची गती कोणती होते ? सात्विक राजस की तामस ? ॥१७-१॥
तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा । इंद्रियां फांवलिया ब्रह्मा ।
तुझां बोलु आम्हा । साकांक्षु पैं जी ॥ ३४ ॥
तो अर्जुन म्हणाला, तमालवृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्णा, हे आमच्या इंद्रियांच्या अनुभवाला आलेल्या ब्रह्मरूप कृष्णा, तुझे बोलणे आम्हाला संशययुक्त वाटते. ॥१७-३४॥
जें शास्त्रेंवांचूनि आणिकें । प्राणिया स्वमोक्षु न देखे ।
ऐसें कां कैंपखें । बोलिलासी ॥ ३५ ॥
कारण की शास्त्रावाचून दुसर्‍या कोणत्याही उपायाने प्राण्याला आपल्या मोक्षाचे दर्शनही होणार नाही असे शास्त्राचा पक्षपात करून तू काय म्हणून बोललास ? ॥१७-३५॥
तरी न मिळेचि तो देशु । नव्हेचि काळा अवकाशु ।
जो करवी शास्त्राभ्यासु । तोही दुरी ॥ ३६ ॥
तर शास्त्राप्रमाणे कर्माचरण करण्याला योग्य म्हणून सांगितलेले असे स्थळच मिळत नाही व शास्त्राचा अभ्यास करविणारा जो गुरु तोही दूर असतो, (त्याचाही योग होत नाही). ॥१७-३६॥
आणि अभ्यासीं विरजिया । होती जिया सामुग्रिया ।
त्याही नाहीं आपैतिया । तिये वेळीं ॥ ३७ ॥
आणि ज्या सामुग्र्यांची अभ्यासाला मदत होते त्या सामुग्र्या देखील अभ्यास करण्याच्या वेळेला अनुकूल नसतात. ॥१७-३७॥
उजू नोहेचि प्राचीन । नेदीचि प्रज्ञा संवाहन ।
ऐसें ठेलें आपादन । शास्त्राचें जया ॥ ३८ ॥
ज्यांना पूर्वकर्म अनुकूल नाहीत, ज्यांना बुद्धि साह्य देत नाहीच , ह्याप्रमाणे ज्यांना शास्त्रांचे संपादन दूर राहिले, ॥१७-३८॥
किंबहुना शास्त्रविखीं । एकही न लाहातीचि नखी ।
म्हणौनि उखिविखी । सांडिली जिहीं ॥ ३९ ॥
फार काय सांगावे ? शास्त्राभ्यासाविषयी टेकण्याला एकही आधार मिळत नाहीच, म्हणून ज्यांनी शास्त्रांची वाटाघाट टाकली, ॥१७-३९॥
परी निर्धारूनि शास्त्रें । अर्थानुष्ठानें पवित्रें ।
नांदताति परत्रें । साचारें जे ॥ ४० ॥
परंतु शास्त्रांचा (विचाराने) निश्चय करून व शास्त्रांच्या अर्थाप्रमाणे पवित्र आचरण करून, परमलोकात जे खरोखर नांदत आहेत ॥१७-४०॥
तयां{ऐ}सें आम्हीं होआवें । ऐसी चाड बांधोनि जीवें ।
घेती तयांचें मागावे । आचरावया ॥ ४१ ॥
त्यांच्यासारखे आम्ही व्हावे, अशी जीवाशी इच्छा बाळगून तसे आचरण करण्याकरता जे त्यांचे कित्ते घेतात. ॥१७-४१॥
धड्याचिया आखरां । तळीं बाळ लिहे दातारा ।
कां पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले ॥ ४२ ॥
अहो महाराज, धड्यातील अक्षरे पाहून त्याखाली तसे हुबेहूब मूल लिहिते, अथवा डोळसास पुढे करून जसा आंधळा त्याच्या धोरणाने चालतो ॥१७-४२॥
तैसें सर्वशास्त्रनिपुण । तयाचें जें आचरण ।
तेंचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे ॥ ४३ ॥
त्याप्रमाणे जे सर्व शास्त्रात निपुण असतात त्यांचे आचरण असते तेच (आचरण) आपल्या श्रद्धेला जे प्रमाण मानतात (त्यांच्यावर श्रद्धा ठेऊन जे वागतात). ॥१७-४३॥
मग शिवादिकें पूजनें । भूम्यादिकें महादानें ।
आग्निहोत्रादि यजनें । करिती जे श्रद्धा ॥ ४४ ॥
मग शिवादिक देवांच्या पूजा, भूमिदानादिक मोठी दाने व अग्निहोत्रादिक यज्ञ जे श्रद्धेने करतात, ॥१७-४४॥
तयां सत्त्वरजतमां-/ । माजीं कोण पुरुषोत्तमा ।
गति होय ते आम्हां । सांगिजो जी ॥ ४५ ॥
त्यांना हे पुरुषोत्तमा, सत्व, रज, तम यापैकी कोणती गती प्राप्त होते ? ते आम्हाला सांगा. ॥१७-४५॥
तंव वैकुंठपीठींचें लिंग । जो निगमपद्माचा पराग ।
जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ॥ ४६ ॥
तेव्हा जो (श्रीकृष्ण) वैकुंठस्थानाचे आराध्यदैवत आहे व जो कृष्ण वेदरूपी कमलातील पराग आहे, व ज्याच्या अंगच्या छायेने (ज्याच्या आश्रित मायेने) हे जग जगते, ॥१७-४६॥
काळ सावियाचि वाढु । लोकोत्तर प्रौढु ।
आद्वितीय गूढु । आनंदघनु ॥ ४७ ॥
स्वभावत:च असलेली काळाच्या ठिकाणची प्रबलता व (जगात आढळून येणारे) लोकोत्तरता व प्रौढपणा, अद्वैतत्व, गूढता आणि आनंदघनता हे गुण) ॥१७-४७॥
इयें श्लाघिजती जेणें बिकें । तें जयाचें आंगीं असिकें ।
तो श्रीकृष्ण स्वमुखें । बोलत असे ॥ ४८ ॥
त्या गुणांचा जो बोलबाला आहे, तो ज्याच्या जोरावर आलेला आहे, ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे आहे, तो श्रीकृष्णप्रभु आपल्या तोंडाने सांगत आहे. ॥१७-४८॥
श्री भगवानुवाच
त्रिविध भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।
सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां श्रृणु ॥ २ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, प्राण्यांची ती स्वाभाविक श्रद्धा तीन प्रकारची असते. सात्विक, राजस व तामस. ती ऐक. ॥१७-२॥
म्हणे पार्था तुझा अतिसो । हेंही आम्ही जाणतसों ।
जे शास्त्राभ्यासाचा आडसो । मानितोसि कीं ॥ ४९ ॥
देव म्हणातात, अर्जुना, तुझा आग्रह आम्ही जाणत आहो असे समज. तू शास्त्राभ्यासाची अडचण मानत आहेस ना ? ॥१७-४९॥
नुसधियाची श्रद्धा । झोंबों पाहसी परमपदा ।
तरी तैसें हें प्रबुद्धा । सोहोपें नोहे ॥ ५० ॥
नुसत्या (हव्या त्या) श्रद्धेने परमपदाला घेण्यास पहातोस. तर चतुर अर्जुना हे तसे सोपे नाही. ॥१७-५०॥
श्रद्धा म्हणितलियासाठीं । पातेजों नये किरीटी ।
काय द्विजु अंत्यजघृष्टीं । अंत्यजु नोहे ? ॥ ५१ ॥
अर्जुना, श्रद्धा म्हणून म्हटले की तेवढ्यावरच केवळ श्रद्धेनेच कार्यभाग होईल असा विश्वास धरू नये. (कारण की ती श्रद्धा कोणच्या प्रकारची असेल ते सांगता येत नाही). महाराच्या संसर्गाने ब्राह्मणही महार होत नाही काय ? ॥१७-५१॥
गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें ।
तें घेऊं नये कांहीं केलें । विचारीं पां ॥ ५२ ॥
गंगेचे पाणी जरी असले तरी ते दारूच्या भांड्यात आले तर ते घेता येईल काय ? विचार कर बरे. ॥१७-५२॥
चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु ।
तैं हातीं धरितां जाळूं । न शके काई ? ॥ ५३ ॥
चंदन हा स्वभावत:च थंड आहे, परंतु त्य़ाचा अग्नीशी संबंध झाला असता, तो हाती धरला तर जाळू शकणार नाही काय ? ॥१७-५३॥
कां किडाचिये आटतिये पुटीं । पडिलें सोळें किरीटी ।
घेतलें चोखासाठीं । नागवीना ? ॥ ५४ ॥
अथवा अर्जुना, हिणकस सोने आटवीत असलेल्या मुशीत उत्तम सोने पडले असता त्याचा हिणकसाशी संयोग झाल्यामुळे ते हिणकस होईल, असे असता ते सोने उत्तम आहे अशा समजुतीने घेतले तर त्यापासून नुकसान होणार नाही काय ? ॥१७-५४॥
तैसें श्रद्धेचें दळवाडें । अंगें कीर चोखडें ।
परी प्राणियांच्या पडे । विभागीं जैं ॥ ५५ ॥
त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप स्वभावत: शुद्ध आहे, परंतु ज्यावेळी ती प्राण्यांच्या वाटणीस येते ॥१७-५५॥
ते प्राणिये तंव स्वभावें । आनादिमायाप्रभावें ।
त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ॥ ५६ ॥
तेव्हा प्राणी तर स्वभावत: अनादि असलेल्या मायेच्या सामर्थ्याने सर्व त्रिगुणाचेच बनलेले आहेत. ॥१७-५६॥
तेथही दोन गुण खांचती । मग एक धरी उन्नती ।
तैं तैसियाचि होती वृत्ती । जीवांचिया ॥ ५७ ॥
त्या त्रिगुणात देखील दोन गुण दबतात (कमी होतात) व मग एक वाढतो, त्या वेळेला जीवांच्या वृत्ती तशा वाढत्या गुणासारख्या होतात. ॥१७-५७॥
वृत्ती{ऐ}सें मन धरिती । मना{ऐ}सी क्रिया करिती ।
केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥ ५८ ॥
ते जीव अंत:करणाच्या स्थितिप्रमाणे संकल्प करतात, संकल्पाप्रमाणे कर्मे करतात आणि मेल्यावर केलेल्या कर्माप्रमाणे देह स्वीकारतात. ॥१७-५८॥
बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये ।
ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ॥ ५९ ॥
बीज नाहीसे होऊन त्याचे झाड बनते, झाड नाहीसे होऊन त्याचा बीजात समावेश होतो, हा क्रम कोट्यावधी कल्पे चालला तरी झाडाची जात नष्ट होत नाही. ॥१७-५९॥
तियापरीं यियें अपारें । होत जात जन्मांतरें ।
परी त्रिगुणत्व न व्यभिचरें । प्राणियांचें ॥ ६० ॥
त्याप्रमाणे ही असंख्य जन्मांतरे होत जात असता प्राण्यांचे त्रिगुणत्व बदलत नाही. ॥१७-६०॥
म्हणूनि प्राणियांच्या पैकीं । पडिली श्रद्धा अवलोकीं ।
ते होय गुणासारिखी । तिहीं ययां ॥ ६१ ॥
म्हणून प्राण्यांच्या वाट्याला आलेली जी श्रद्धा, ती या तीन गुणांसारखी होते, असे समज, ॥१७-६१॥
विपायें वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हां ज्ञानासी करी साद ।
परी एका दोघे वोखद । येर आहाती ॥ ६२ ॥
कदाचित जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो, तेव्हा तो ज्ञानाला हाक मारतो (ज्ञानाची इच्छा करतो). परंतु एकाला (शुद्ध सत्वगुणाला) इतर दोघे (रज, तम विरुद्ध आहेत. ॥१७-६२॥
सत्त्वाचेनि आंगलगें । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे ।
तंव रज तम उगे । कां पां राहाती ? ॥ ६३ ॥
सत्वाच्या संबधाने ती श्रद्धा मोक्षरूप फलापर्यंत जाते, तेव्हा रज, तम स्वस्थ का बरे रहातील ? ॥१७-६३॥
मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशें जाये ।
तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ॥ ६४ ॥
सत्वाचे बल नाहीसे करून जेव्हा रजोगुण आकाशात जातो, (अतिशय वाढतो) तेव्हा तीच श्रद्धा कर्मकेरसुणी होते. (त्याची वृत्ती ही कर्मरूपी केर सरसकट झाडणारी केरसुणी होते). ॥१७-६४॥
मग तमाची उठी आगी । तेव्हां तेचि श्रद्धा भंगी ।
हों लागे भोगालागीं । भलतेया ॥ ६५ ॥
मग तमाची जेव्हा आग उठते ( जेव्हा तमोगुण अतिशय वाढतो, तेव्हा त्याच श्रद्धेचा प्रकार भलत्याच भोगाकरता होऊ लागतो. (निषिद्ध विषयवासनेकडे त्या श्रद्धेची प्रवृत्ति होते). ॥१७-६५॥
सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।
श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यछ्रद्धः स एव सः ॥ ३ ॥
हे अर्जुना, प्रत्येकाची श्रद्धा (त्याच्या त्याच्या) सत्वानुरूप (सत्वादिसंस्कारांप्रमाणे) असते. मनुष्यप्राणी हा श्रद्धमय असतो, ज्याची ज्यावर श्रद्धा असते तसा तो बनत असतो. ॥१७-३॥
एवं सत्त्वरजतमा-/ । वेगळी श्रद्धा सुवर्मा ।
नाहीं गा जीवग्रामा-/ । माजीं यया ॥ ६६ ॥
हे चांगले वर्म जाणाणार्‍या अर्जुना, याप्रमाणे या जीवसमुदायामधे सत्व, रज व तम या तीन गुणांविरहित श्रद्धा नाही. ॥१७-६६॥
म्हणौनि श्रद्धा स्वाभाविक । असे पैं त्रिगुणात्मक ।
रजतमसात्त्विक । भेदीं इहीं ॥ ६७ ॥
ठिकाणी म्हणून स्वाभाविक रीतीने राजसी, तामसी व सात्विक या प्राण्यांच्या तीन प्रकारांमुळे श्रद्धा ही तीन गुणांच्या रूपांची बनली आहे. ॥१७-६७॥
जैसें जीवनचि उदक । परी विषीं होय मारक ।
कां मिरयामाजीं तीख । उंसीं गोड ॥ ६८ ॥
ज्याप्रमाणे पाणी हे स्वभावत: जगवणारेच आहे परंतु विषाशीयुक्त झाले असता ते मारक होते अथवा मिर्‍याशी युक्त झाले असता तिखट होते ऊसाशी युक्त झाले असता ते गोड होते. ॥१७-६८॥
तैसा बहुवसें तमें । जो सदाचि होय निमे ।
तेथ श्रद्धा परीणमे । तेंचि होऊनि ॥ ६९ ॥
त्याप्रमाणे तमाच्या आधिक्यात जो नेहेमीच जन्मतो व मरतो, त्याच्या श्रद्धा ते तमोगुणच होऊन परिणामाला पावते. ॥१७-६९॥
मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी ।
तेवीं श्रद्धा तामसी । सिनी नाहीं ॥ ७० ॥
मग काजळ आणि शाई यामधे (रंगात) जसा फरक दिसत नाही, त्याप्रमाणे तामसी श्रद्धा ही (तमोगुणाहून वेगळी नाही. ॥१७-७०॥
तैसीच राजसीं जीवीं । रजोमय जाणावी ।
सात्त्विकीं आघवीं । सत्त्वाचीच ॥ ७१ ॥
त्याप्रमाणे श्रद्धा ही रजोगुणी अंत:करणात रजोगुणाच्या रूपाने असते अशी समजावी व सत्वगुणयुक्त अंत:करणामधे ती सर्व सत्वाचीच असते. ॥१७-७१॥
ऐसेनि हा सकळु । जगडंबरु निखिळु ।
श्रद्धेचाचि केवळु । वोतला असे ॥ ७२ ॥
अशा तर्‍हेने हे सर्व जग केवळ सर्व श्र्द्धेचेच ओतलेले आहे. ॥१७-७२॥
परी गुणत्रयवशें । त्रिविधपणाचें लासें ।
श्रद्धे जें उठिलें असे । तें वोळख तूं ॥ ७३ ॥
परंतु हे जगडंबर (सर्वप्राणी) तीन गुणांच्या आधीन असल्याकारणाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमधेही तीन प्रकारचे चिन्ह उत्पन्न झाले आहे. असे तू समज. ॥१७-७३॥
तरी जाणिजे झाड फुलें । कां मानस जाणिजे बोलें ।
भोगें जाणिजे केलें । पूर्वजन्मींचें ॥ ७४ ॥
तर झाड जसे फलावरून ओळाखता येते अथवा बोलण्यावरून जसे मन जाणता येते, अथवा या जन्मातील सुखदु:खाच्या भोगावरून जसे मागील जन्मात केलेले कर्म ओळखता येते ॥१७-७४॥
तैसीं जिहीं चिन्हीं । श्रद्धेचीं रूपें तीन्हीं ।
देखिजती ते वानी । अवधारीं पां ॥ ७५ ॥
त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची तिन्ही रूपे समजली जातात तो प्रकार ऐक. ॥१७-७५॥
यजन्ते सात्त्विका देवान् यक्षरक्षांसि राजसाः ।
प्रेतान् भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥ ४ ॥
सात्विक श्रद्धेने युक्त असे मनुष्य देवांची उपासना करता, राजस श्रद्धेने घडलेले यक्षराक्षसांची उपासना करतात आणि तामसी श्रद्धेने वललेले मनुष्य प्रेते व भूते यांची उपासना करतात. ॥१७-४॥
तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा ।
तयां बहुतकरूनि मेधा । स्वर्गीं आथी ॥ ७६ ॥
तर सात्विक श्रद्धेने ज्यांचा पिंड बनलेला आहे त्यांची बुद्धि बहुतकरून स्वर्गाच्या ठिकाणी (स्वर्गप्राप्तीकडे) असते. ॥१७-७६॥
ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती ।
किंबहुना पडती । देवलोकीं ॥ ७७ ॥
ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात, यज्ञक्रियेत निष्णात होतात. फार काय सांगावे ? ते देवलोकी जातात. ॥१७-७७॥
आणि श्रद्धा राजसा । घडले जे वीरेशा ।
ते भजती राक्षसां । खेचरां हन ॥ ७८ ॥
हे वीरश्रेष्ठा अर्जुना, आणि जे राजसी श्रद्धेने बनलेले आहेत ते राक्षस व यक्ष यांचे भजन करतात. ॥१७-७८॥
श्रद्धां जे कां तामसी । ते मी सांगेन तुजपाशीं ।
जे कां केवळ पापराशी । आतिकर्कशी निर्दयत्वें ॥ ७९ ॥
तामसी श्रद्धा जी केवळ अनेक पापांनी भरलेली आहे व जी निर्दयपणे फार कठोर आहे, ती मी तुला सांगतो. ॥१७-७९॥
जीववधें साधूनि बळी । भूतप्रेतकुळें मैळीं ।
स्मशानीं संध्याकाळीं । पूजिती जे ॥ ८० ॥
जीवांच्या वधाने बळी सिद्ध करून ते (तामसी श्रद्धावान लोक) स्मशानामधे संध्याकाळी भुते व प्रेते यांचे अमंगल समुदाय पूजतात. ॥१७-८०॥
ते तमोगुणाचें सार । काढूनि निर्मिले नर ।
जाण तामसियेचें घर । श्रद्धेचें तें ॥ ८१ ॥
ते पुरुष तमोगुणाचा अर्क काढून बनवलेले आहेत, आणि तामसी श्रद्धेचे घर आहेत, असे समज. ॥१७-८१॥
ऐसी इहीं तिहीं लिंगीं । त्रिविध श्रद्धा जगीं ।
पैं हें ययालागीं । सांगतु असें ॥ ८२ ॥
याप्रमाणे जगामधे या तीन लक्षणांनी तीन प्रकारची श्रद्धा होते पण मी हे एवढ्याकरता सांगत आहे की ॥१७-८२॥
जे हे सात्त्विक श्रद्धा । जतन करावी प्रबुद्धा ।
येरी दोनी विरुद्धा । सांडाविया ॥ ८३ ॥
जी ही सात्विक श्रद्धा आहे ती शहाण्या अर्जुना, जतन करावी व दुसर्‍या दोन विरुद्ध (अकल्याणकारक) आहेत त्या टाकाव्यात. ॥१७-८३॥
हे सात्त्विकमति जया । निर्वाहती होय धनंजया ।
बागुल नोहे तया । कैवल्य तें ॥ ८४ ॥
अर्जुना या सात्विक बुद्धीची ज्यांच्याकडून जोपासना होईल त्याला मोक्षाचा काहीच बाऊ नाही. ॥१७-८४॥
तो न पढो कां ब्रह्मसूत्र । नालोढो सर्व शास्त्र ।
सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाच्या हातीं ॥ ८५ ॥
तो व्यासांची ब्रह्मसूत्रे शिकेना का ? तो सर्व शास्त्रांचे परिशीलन करेना का ? स्वतंत्र बुद्धीने स्थापलेले नवीन सिद्धांत त्याचे स्वाधीन नसेनात का ? ॥१७-८५॥
परी श्रुतिस्मृतींचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त ।
अनुष्ठानें जगा देत । वडील जे हे ॥ ८६ ॥
परंतु जे जे थोर थोर पुरुष श्रुतिस्मृतीचे अर्थ आपणच मूर्तिमंत होऊन आपल्या आचरणाने (त्या अर्थाप्रमाणे वागून) ते अर्थ जगास देतात. ॥१७-८६॥
तयांचीं आचरती पाउलें । पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले ।
तो तेंचि फळ ठेविलें । ऐसें लाहे ॥ ८७ ॥
त्यांची आचरणरूपी पाऊले पाहून मग जो कोणी आपले पाऊल ठेऊन सात्विक श्रद्धेने चालतो त्याला तेच फळ अगदी ठेवल्यासारखे प्राप्त होते. ॥१७-८७॥
पैं एक दीपु लावी सायासें । आणिक तेथें लाऊं बैसें ।
तरी तो काय प्रकाशें । वंचिजे गा ? ॥ ८८ ॥
अर्जुना, एकाने मोठ्या श्रमाने प्रथम दिवा लावला आणि त्या दिव्यावर दुसरा कोणी आपला दिवा लावावयास लागला, तर तो आयता दिवा लावणारा पुरुष पहिल्या दिव्याच्या प्रकाशाकडून फासवला जाईल काय ? (श्रम करून पेटवलेल्या दिव्यावर दुसरा दिवा काही श्रमावाचून लाऊन घेतला तर तोही काही कमी प्रकाश देणार नाही). ॥१७-८८॥
कां येकें मोल अपार । वेंचोनि केलें धवळार ।
तो सुरवाडु वस्तीकर । न भोगी काई ? ॥ ८९ ॥
अथवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांढले असता त्या घरात काही वेळ रहाणारा वाटसरू त्या घराचे सुख भोगित नाही काय ? ॥१७-८९॥
हें असो जो तळें करी । तें तयाचीच तृषा हरी ।
कीं सुआरासीचि अन्न घरीं । येरां नोहे ? ॥ ९० ॥
हे राहू दे, जो तळे बांधतो, त्याचीच तहान ते तळे नाहीशी करते काय ? अथवा स्वयंपाक्यास घरात अन्न मिळाते, दुसर्‍याला मिळत नाही काय ? ॥१७-९०॥
बहुत काय बोलों पैं गा । येका गौतमासीचि गंगा ।
येरां समस्तां काय जगां । वोहोळ जाली ? ॥ ९१ ॥
अर्जुना, फार काय सांगू ? (त्रिंबकेश्वरी गौतमाने आणलेली गंगा म्हणजे गोदावरी ही) एका गौतमालाच गंगा व इतर सर्व जगाला ती ओढा झाली आहे का ? ॥१७-९१॥
म्हणौनि आपुलियापरी । शास्त्र अनुष्ठीती कुसरी ।
जाणे तयांते श्रद्धाळु जो वरी । तो मूर्खुही तरे ॥ ९२ ॥
म्हणून आपल्या अधिकारानुरूप शास्राप्रमाणे अनुष्ठान करण्याचे चातुर्य जो जाणतो, त्याला जो आपल्या श्रद्धेने वरतो (त्याचा आचरणाचा कित्ता जो वळवतो) तो मूर्ख देखील तरतो. ॥१७-९२॥
अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।
दंभाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥ ५ ॥
जे लोक दंभ व अहंकार यांनी युक्त होऊन अभिलाष, आसक्ति यांच्या आग्रहाच्या जोरावर शास्त्राला संमत नसलेले घोर तप आचरतात – ॥१७-५॥
ना शास्त्राचेनि कीर नांवें । खाकरोंही नेणती जीवें ।
परी शास्त्रज्ञांही शिवें । टेंकों नेदिती ॥ ९३ ॥
अथवा शास्त्राच्या नावाने जे खरोखर अंत:करणापासून आरंभही करण्याचे जाणत नाहीत, इतकेच नाही परंतु शास्त्रज्ञाला आपल्या गावाच्या हद्दीवरही टेकू देत नाहीत ॥१७-९३॥
वडिलांचिया क्रिया । देखोनि वाती वांकुलिया ।
पंडितां डाकुलिया । वाजविती ॥ ९४ ॥
वडिलांच्या क्रिया पाहून जे वेडावून दाखवतात व पंडिताला चुटक्या वाजवतात (म्हणजे त्यांचा तिरस्कार करतात). ॥१७-९४॥
आपलेनीचि आटोपें । धनित्वाचेनि दर्पें ।
साचचि पाखंडाचीं तपें । आदरिती ॥ ९५ ॥
आपल्याच अभिमानाने व श्रीमंतीच्या गर्वाने पाखंड्यांची तपे खरोखरच स्वीकारतात (शास्त्रबाह्य आचारांचा अंगीकार करतात). ॥१७-९५॥
आपुलिया पुढिलांचिया । आंगीं घालूनि कातिया ।
रक्तमांसा प्रणीतया । भर भरु ॥ ९६ ॥
आपल्या व दुसर्‍याच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्तमांसाने प्रणतिपत्रे भरभरून ॥१७-९६॥
रिचविती जळतकुंडीं । लाविती चेड्याच्या तोंडीं ।
नवसियां देती उंडी । बाळकांची ॥ ९७ ॥
ती (रक्तमांसाने भरेलेली पात्रे) जळत्या अग्नीत ओततात व चेड्याच्या तोंडाला लावतात आणि नवस केलेल्या देवतांना मुलांचा बळी देतात. ॥१७-९७॥
आग्रहाचिया उजरिया । क्षुद्र देवतां वरीया ।
अन्नत्यागें सातरीया । ठाकती एक ॥ ९८ ॥
(म्हसोबा इत्यादिक क्षुद्र देवता श्रेष्ठ आहेत अशा आग्रहाच्या आधिक्याने कोणी लोक सात्रीच्या सात्री (सात दिवस) अन्नत्याग करून रहातत. ॥१७-९८॥
अगा आत्मपरपीडा । बीज तमक्षेत्रीं सुहाडा ।
पेरिती मग पुढां । तेंचि पिके ॥ ९९ ॥
हे सूज्ञा अर्जुना, आपल्या तमोगुणी अंत:करणरूपी क्षेत्रामधे आपल्यास त्रास व दुसर्‍यास त्रास देणे रूपी बी पेरतात. मग पुढे त्या ठिकाणी तेच पिकते. ॥१७-९९॥
बाहु नाहीं आपुलिया । आणि नावेतेंही धनंजया ।
न धरी होय तया । समुद्रीं जैसें ॥ १०० ॥
अर्जुना समुद्रातून तरून जाण्यास समर्थ असे आपल्याला हात नाहीत आणि नावेचा सुद्धा आश्रय करीत नाही, त्याची समुद्रात जशी दुर्दशा होते ॥१७-१००॥
कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पाय खोळां ।
तो रोगिया जेवीं जिव्हाळा । सवता होय ॥ १०१ ॥
अथवा ज्याप्रमाणे जो रोगी वैद्याचा द्वेष करतो व औषधाला लाथेने उडवितो, तो रोगी यातनांपासून मोकळा होईल काय ? ॥१७-१०१॥
नाना पडिकराचेनि सळें । काढी आपुलेचि डोळे ।
तें वानवसां आंधळें । जैसें ठाके ॥ १०२ ॥
अथवा डोळासाच्या द्वेषाने, जो आपले डोळे काढतो, तो आंधळा जसा माजघरात पडून रहातो, ॥१७-१०२॥
तैसें तयां आसुरां होये । निंदूनि शास्त्रांची सोये ।
सैंघ धांवताती मोहें । आडवीं जे कां ॥ १०३ ॥
त्याप्रमाणे शास्त्राचे वळण धिक्कारून अविचाराने सारखे अरण्यात धावतात, त्या असुरांची स्थिती वरील उदाहरणाप्रमाणे होते. ॥१७-१०३॥
कामु करवी तें करिती । क्रोधु मारवी ते मारिती ।
किंबहुना मातें पुरिती । दुःखाचा गुंडां ॥ १०४ ॥
काम जे करवील ते करतात, क्रोध ज्याला मारवील त्याला मारतात. फार काय सांगावे ? मला दु:खरूपी दगडात पुरतात. ॥१७-१०४॥

कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।
मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्ध्यासुरनिश्चयान् ॥ ६ ॥
जे शरीरामधे असलेल्या भूतांच्या समुदायाला कृश करतात आणि शरीरामधे असलेल्या मला दु:ख देतात, ते अविवेकी आसुरी बुद्धीचे लोक आहेत असे जाण ॥१७-६॥
आपुलां परावां देहीं । दुःख देती जें जें कांहीं ।
मज आत्मया तेतुलाही । होय शीणु ॥ १०५ ॥
जे जे काही दु:ख ते आपल्या अथवा परक्याच्या देहाला देतात तेवढे सर्व दु:ख मला आत्म्याला होते. ॥१७-१०५॥
पैं वाचेचेनिही पालवें । पापियां तयां नातळावें ।
परी पडिलें सांगावें । त्यजावया ॥ १०६ ॥
वाचेच्या पदारानेही त्या पाप्यांना स्पर्श करू नये. परंतु त्यांचा त्याग करण्याकरता आम्हाला त्याजविषयी बोलावे लागले. ॥१७-१०६॥
प्रेत बाहिरें घालिजे । कां अंत्यजु संभाषणीं त्यजिजे ।
हें असो हातें क्षाळिजे । कश्मलातें ? ॥ १०७ ॥
प्रेताला स्पर्श करू नये, परंतु त्यास बाहेर काढण्याकरता जसा स्पर्श करावा लागतो अथवा (अंत्यजाशी बोलू नये, परंतु) अंत्यजाचा त्याग करण्याकरता (दूर हो म्हणून) बोलावे लागते, हे राहू द्या, विष्ठेला हात लाऊ नये, परंतु शौचाच्या वेळी हाताने मळाला धुतले पाहिजे ॥१७-१०७॥
तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा ।
तयांतें सांडावया तैसा । अनुवादु हा ॥ १०८ ॥
त्या प्रसंगी शुद्ध होण्याची इच्छा असते, म्हणून तो दोषकारक संसर्ग जसा मानता येत नाही, त्याप्रमाणे त्या आसुरी लोकांचा त्याग करण्याकरता हे त्यांच्या विषयी बोलणे आहे. ॥१७-१०८॥
परी अर्जुना तूं तयांतें । देखसी तैं स्मर हो मातें ।
जे आन प्रायश्चित्त येथें । मानेल ना ॥ १०९ ॥
परंतु अर्जुना, तू जेव्हा त्या आसुरी लोकांना पहाशील तेव्हा माझे स्मरण कर हो. कारण त्या कामी दुसरे प्रायश्चित्त चालणार नाही. ॥१७-१०९॥
म्हणौनि जे श्रद्धा सात्त्विकी । पुढती तेचि पैं येकी ।
जतन करावी निकी । सर्वांपरी ॥ ११० ॥
म्हणून सात्विक श्रद्धा जी आहे तीच एक सर्व प्रकाराने चांगली जतन करावी, हे मी पुन्हा सांगतो. ॥१७-११०॥
तरी धरावा तैसा संगु । जेणें पोखे सात्त्विक लागु ।
सत्त्ववृद्धीचा भागु । आहारु घेपें ॥ १११ ॥
ज्या योगाने सात्विक संबंधाचे (वृत्तीचे) पोषण होईल, तशी संगती धरावी आणि ज्या योगाने सत्वाचा उत्कर्ष होईल असाच आहार घ्यावा. ॥१७-१११॥
एर्‍हवीं तरी पाहीं । स्वभाववृद्धीच्या ठाईं ।
आहारावांचूनि नाहीं । बळी हेतु ॥ ११२ ॥
वास्तविक पहा स्वभाव वाढण्याचे (बनण्याचे) कामी आहाराशिवाय दुसरे जोरदार कारण नाही. ॥१७-११२॥
प्रत्यक्ष पाहें पां वीरा । जो सावध घे मदिरा ।
तो होऊनि ठाके माजिरा । तियेचि क्षणीं ॥ ११३ ॥
अर्जुना प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर असलेला पुरुष दारु पितो तेव्हा त्याच क्षणी तो उन्मत्त होऊन रहातो. ॥१७-११३॥
कां जो साविया अन्नरसु सेवी । तो व्यापिजे वातश्लेष्मस्वभावीं ।
काय ज्वरु जालिया निववी । पयादिक ? ॥ ११४ ॥
अथवा जो आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे अन्नाचे सेवन करतो तो त्या अन्नपाण्याला वातकारक, कफकारक, स्वभावाने व्यापला जातो (अथवा) एखाद्याला ताप आल्यावर दूध वगैरे त्याला शांत करील काय ? ॥१७-११४॥
नातरी अमृत जयापरी । घेतलिया मरण वारी ।
कां आपुलिया{ऐ}सें करी । जैसें विष ॥ ११५ ॥
अथवा ज्याप्रमाणे अमृत सेवन केले असता ते मरणाला टाळते अथवा विष (हे सेवन केले असता) आपल्यासारखे करते, (मारते), ॥१७-११५॥
तेवीं जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु ।
आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे ॥ ११६ ॥
त्याचप्रमाणे जसा आहार घ्यावा तसा देहातील रक्तमांसादि धातूंचा आकार बनतो आणि त्या रक्तादि धातूंप्रमाणे अंत:करणाचा स्वभाव जास्त जास्त पुष्ट होतो. ॥१७-११६॥
जैसें भांडियाचेनि तापें । आंतुलें उदकही तापे ।
तैसी धातुवशें आटोपे । चित्तवृत्ती ॥ ११७ ॥
ज्याप्रमाने भांड्याच्या तापण्याने आतले पाणीही तापते, त्याप्रमाणे आहाराच्या योगाने धातूच्या वश असल्यामुळे चित्तवृत्ती व्यापली जाते. ॥१७-११७॥
म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे । तैं सत्त्वाची वाढी पाविजे ।
राजसा तामसा होईजे । येरी रसीं ॥ ११८ ॥
म्हणून सात्विक रस सेवन करावेत, तेव्हा सत्वाची (सत्वगुणाची) वृद्धि होते व इतर रसांनी रजोगुणाची व तमोगुणाची वृद्धि होते, ॥१७-११८॥
तरी सात्त्विक कोण आहारु । राजसा तामसा कायी आकारु ।
हें सांगों करीं आदरु । आकर्णनीं ॥ ११९ ॥
तर सात्विक आहार कोणाता, राजस व तामस आहाराचे स्वरूप काय ते सांगतो. तू चांगले लक्षपूर्वक ऐक. ॥१७-११९॥
आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।
यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिम शृणु ॥ ७ ॥
प्राणिमात्रांना प्रिय असणारा आहार सुद्धा तीन प्रकारचा असतो. यज्ञ, तप, तसेच दान ही देखील तीन प्रकारची असतात. त्यांचा हा भेद ऐक. ॥१७-७॥
आणि एकसरें आहारा । कैसेनि तिनी मोहरा ।
जालिया तेही वीरा । रोकडें दाऊं ॥ १२० ॥
आणि आहाराचे एकदम तीन प्रकार कशाने झाले तेही अर्जुना आताच दाखवू. ॥१७-१२०॥
तरी जेवणाराचिया रुची । निष्पत्ति कीं बोनियांची ।
आणि जेवितां तंव गुणांची । दासी येथ ॥ १२१ ॥
तरी जेवणाराच्या रुचिप्रमाणे अन्न तयार केले जाते आणि या जगात जेवणारा तीन गुणांचा गुलाम झालेला असतो. ॥१७-१२१॥
जे जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता ।
पावोनियां त्रिविधता । चेष्टे त्रिधा ॥ १२२ ॥
कारण की कर्ता, भोक्ता जो जीव, तो तीन गुणांमुळे स्वभावत: तीन प्रकारचा होऊन तीन प्रकारची कर्मे करतो. ॥१७-१२२॥
म्हणौनि त्रिविधु आहारु । यज्ञुही त्रिप्रकारु ।
तप दान हन व्यापारु । त्रिविधचि ते ॥ १२३ ॥
म्हणून आहार तीन प्रकारचा आहे व यज्ञही तीन प्रकारचे आहेत आणि दानतपादि च्यापारही तीन प्रकारचे आहेत. ॥१७-१२३॥
पैं आहार लक्षण पहिले? । सांगों जें म्हणितलें ।
तें आईक गा भलें । रूप करूं ॥ १२४ ॥
परंतु प्रथम आहाराचे लक्षण सांगतो म्हणून जे म्हटले, त्याची चांगली स्पष्टता करतो, ऐक ॥१७-१२४॥
आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिवर्धनाः ।
रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥ ८ ॥
आयुष्य, सत्व, बल, आरोग्य, सुख व प्रीती यांची वृद्धि करणारे (अंगानेच) सुरस, स्निग्ध, शरीरामधे बहुत काळ रहाणारे, मनास आनंददायक असे आहार सत्ववृत्तीच्या लोकांना प्रिय असतात. ॥१७-८॥
तरी सत्त्वगुणाकडे । जें दैवें भोक्ता पडे ।
तैं मधुरीं रसीं वाढे । मेचु तया ॥ १२५ ॥
तर जेव्हा प्रारब्धयोगाने भोक्ता (जेवणारा जीव) सत्वगुणाच्या उत्कर्षात पडतो, तेव्हा मधुर पदार्थांच्या ठिकाणी त्याची आवड वाढते. ॥१७-१२५॥
आंगेंचि द्रव्यें सुरसें । जे आंगेंचि पदार्थ गोडसे ।
आंगेंचि स्नेहें बहुवसें । सुपक्वें जियें ॥ १२६ ॥
जे पदार्थ स्वभावत:च गोड असतात, जे पदार्थ स्वभावत:च स्निग्ध असतात व जे पदार्थ चांगले परिपक्व असतात ॥१७-१२६॥
आकारें नव्हती डगळें । स्पर्शें अति मवाळें ।
जिभेलागीं स्नेहाळें । स्वादें जियें ॥ १२७ ॥
आकाराने मोठे व बेढब असत नाहीत आणि स्पर्शाला अति मऊ आणि जिभेला आवडणारे आणि जे चवदार असतात ॥१७-१२७॥
रसें गाढीं वरी ढिलीं । द्रवभावीं आथिलीं ।
ठायें ठावो सांडिलीं । अग्नितापें ॥ १२८ ॥
रसाने अतिशय भरलेले, शिवाय त्याची साल पोकळ असलेले, ओलेपणाने संपन्न आणि खरोखर अग्नीच्या उष्नतेपासून सुटलेले ॥१७-१२८॥
आंगें सानें परीणामें थोरु । जैसें गुरुमुखींचें अक्षरु ।
तैशी अल्पीं जिहीं अपारु । तृप्ति राहे ॥ १२९ ॥
ज्याप्रमाणे गुरूने केलेल्या उपदेशाचे शब्द (महावाक्य) दिसण्यात थोडकेच असतात, परंतु तेच आपला पराक्रम मात्र मोठा करून दाखवतात, त्याप्रमाणे जो आहार दिसावयास अगदी थोडा असतो, परंतु सेवनाने कल्पनेबाहेर पूर्ण तृप्ति देतो. ॥१७-१२९॥
आणि मुखीं जैसीं गोडें । तैसीचिहि ते आंतुलेकडे ।
तिये अन्नीं प्रीति वाढे । सात्त्विकांसी ॥ १३० ॥
आणि जे पदार्थ जसे तोंडाला गोड लागतात, तसेच आत (परिणामी) हितकर असतात, त्या अन्नाच्या ठिकाणी सत्वगुणी लोकांचे प्रेम वाढते. ॥१७-१३०॥
एवं गुणलक्षण । सात्त्विक भोज्य जाण ।
आयुष्याचें त्राण । नीच नवें हें ॥ १३१ ॥
याप्रमाणे सात्विक आहार असे गुण असलेल्या लक्षणांचा असतो, आणि हे नित्य नवे आयुष्याचे रक्षण आहे असे समज. ॥१७-१३१॥
येणें सात्त्विक रसें । जंव देहीं मेहो वरीषे ।
तंव आयुष्यनदी उससे । दिहाचि दिहा ॥ १३२ ॥
जेव्हा हा सात्विक आहाररूपी मेघ देहात वर्षाव करतो तेव्हा आयुष्यरूपी नदी दिवसेंदिवस वाढत जाते. ॥१७-१३२॥
सत्त्वाचिये कीर पाळती । कारण हाचि सुमती ।
दिवसाचिये उन्नती । भानु जैसा ॥ १३३ ॥
बुद्धिमंता अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करण्याला सूर्य हा कारण आहे, ॥१७-१३३॥
आणि शरीरा हन मानसा । बळाचा पैं कुवासा ।
हा आहारु तरी दशा । कैंची रोगां ॥ १३४ ॥
आणि शरीराला अथवा मनाला सामर्थ्य पुरवणारा असा हा आहार जर असेल तर रोगांना अस्तित्व कोठले ? ॥१७-१३४॥
हा सात्त्विकु होय भोग्यु । तैं भोगावया आरोग्यु ।
शरीरासी भाग्यु । उदयलें जाणो ॥ १३५ ॥
हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येईल, तेव्हा आरोग्य भोगण्याला शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो. ॥१७-१३५॥
आणि सुखाचें घेणें देणें । निकें उवाया ये येणें ।
हें असो वाढे साजणें । आनंदेंसीं ॥ १३६ ॥
आणि या सात्विक आहाराने सुखाच्या देवघेवीचा व्यवहार चांगला भरभराटीला येतो. हे राहू दे, (एवढेच काय पण) त्याचे आनंदाशी सख्य वाढते. ॥१७-१३६॥
ऐसा सात्त्विकु आहारु । परीणमला थोरु ।
करी हा उपकारु । सबाह्यासी ॥ १३७ ॥
वर सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार चांगला परिणत झाला (मानवला) असता हा आत मनास व बाहेर शरीरास मोठा उपयोग करतो. ॥१७-१३७॥
आतां राजसासि प्रीती । जिहीं रसीं आथी ।
करूं तयाही व्यक्ती । प्रसंगें गा ॥ १३८ ॥
आता रजोगुणी मनुष्याला ज्या रसांची प्रीति आहे, त्याचीही अर्जुना, प्रसंगानुसार स्पष्टता करतो. ॥१७-१३८॥
कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।
आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥ ९ ॥
कडू, आंबट, खारट, अति उष्ण, तीक्ष्ण, रूक्ष, दाह करणारे, असे आहार रजोवृत्तीच्या लोकांना इष्ट असतात. हे दु:ख, शोक व रोग प्राप्त करून देणारे आहेत. ॥१७-९॥
तरी मारें उणें काळकुट । तेणें मानें जें कडुवट ।
कां चुनियाहूनि दासट । आम्ल हन ॥ १३९ ॥
तर प्राणहरण करण्याविषयी मात्र काय तो कमीपणा, नाहीपेक्षा काळकूट विषाप्रमाणे जे कडू असते अथवा आंबटपणामधे जे चुन्यापेक्षा (जिभेला) जास्त चटका देणारे असते, ॥१७-१३९॥
कणिकीतें जैसें पाणी । तैसेंचि मीठ बांधया आणी ।
तेतुलीच मेळवणी । रसांतरांची ॥ १४० ॥
कणकेचा गोळा करण्यास जितके पाणी लागते तितकेच त्यात मीठ घालतो व इतर पदार्थांचेही मिठाशी तितक्याप्रमाणात मिश्रण करतो. (म्हणजे कणकेत जितके मीठ तितकेच इतर रसातही घालतो). ॥१७-१४०॥
ऐसें खारट अपाडें । राजसा तया आवडे ।
ऊन्हाचेनि मिषें तोंडें । आगीचि गिळी ॥ १४१ ॥
असे अतिशय खारट त्य़ा रजोगुण्याला आवडते व पदार्थ इतके ऊन ऊन खातो की त्या कढत पदार्थांच्या रूपाने तो अग्नीच तोंडाने गिळत आहे असे वाटते. ॥१७-१४१॥
वाफेचिया सिगे । वातीही लाविल्या लागे ।
तैसें उन्ह मागे । राजसु तो ॥ ११४२ ॥
कढत पदार्थांच्या वाफेच्या टोकावर लावली असता वात देखील पेटेल, असे कढत पदार्थ तो रजोगुणी मनुष्य मागतो. ॥१७-१४२॥
वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे ।
तैसें तीख तो खाये । जें घायेविण रुपे ॥ १४३ ॥
भयंकर वावटळीस मागे टाकील असे (किंवा) पहारीचा घाव लागला असता जसे रुपते तसे घावावाचून रुपणारे झणझणीत असे तिखट तो खातो. ॥१७-१४३॥
आणि राखेहूनि कोरडें । आंत बाहेरी येके पाडें ।
तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ॥ १४४ ॥
जे तोंडीलावणे आत व बाहेर राखेपेक्षा कोरडे असते, ते त्याला फार आवडते. ॥१७-१४४॥
परस्परें दांतां । आदळु होय खातां ।
तो गा तोंडीं घेतां । तोषों लागे ॥ १४५ ॥
जो पदार्थ खात असता एकमेकांवर दात आदळतील, तो पदार्थ तोंडात घेतांना त्यास संतोष होऊ लागतो. ॥१७-१४५॥
आधींच द्रव्यें चुरमुरीं । वरी परवडिजती मोहरी ।
जियें घेतां होती धुवारी । नाकेंतोंडें ॥ १४६ ॥
पदार्थ मूळचेच झणझणीत असून शिवाय मोहोरी लाऊन त्याचे अनेक प्रकार केले जातात, ते असे की जे सेवन केले असता नाकातोंडातून वाफा चालतात. ॥१७-१४६॥
हें असो उगें आगीतें । म्हणे तैसें राइतें ।
पढियें प्राणापरौतें । राजसासि गा ॥ १४७ ॥
हे राहू दे, अर्जुना, अग्नीला ‘गप्प बैस’ असे म्हणेल तसे तिखट रायते रजोगुण्याला प्राणापेक्षा जास्त आवडते. ॥१७-१४७॥
ऐसा न पुरोनि तोंडा । जिभा केला वेडा ।
अन्नमिषें अग्नि भडभडां । पोटीं भरी ॥ १४८ ॥
या प्रमाणे तोंडाला पुरेसे न होऊन तो जिभेने वेडा केलेला रजोगुणी पुरुष अन्नाच्या निमित्ताने पोटात प्रज्वलित अग्नीच भरतो. ॥१७-१४८॥
तैसाचि लवंगा सुंठे । मग भुईं गा सेजे खाटे ।
पाणियाचें न सुटे । तोंडोनि पात्र ॥ १४९ ॥
त्या सरसाच त्याच्या अंगाचा दाह होऊ लागतो. मग भुईवर अथवा अंथरुणावर त्यास चैन पडत नाही ॥१७-१४९॥
ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले ।
ते चेववावया घातलें । माजवण पोटीं ॥ १५० ॥
रजोगुणाने खाल्लेले ते पदार्थ हे जेवण नव्हे, तर शरीरात रोगरूपी निवांत निजलेले साप जागे करण्याकरता उत्तेजक पदार्थच पोटात घालणे होय. ॥१७-१५०॥
तैसें एकमेकां सळें । रोग उठती एके वेळे ।
ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखें ॥ १५१ ॥
त्याप्रमाणे एकमेकांच्या स्पर्धेने एकदम रोग उठतात (उत्पन्न होतात). अशा रीतीने रजोगुणी आहाराचे केवळ दु:खरूप फळ प्राप्त होते ॥१७-१५१॥
एवं राजसा आहारा । रूप केलें धनुर्धरा ।
परीणामाचाहि विसुरा । सांगितला ॥ १५२ ॥
अर्जुना, याप्रमाणे राजस आहाराचे वर्णन केले व त्या आहाराच्या परिणामाचा विचार सांगितला. ॥१७-१५२॥
आतां तया तामसा । आवडे आहारु जैसा ।
तेंही सांगों चिळसा । झणें तुम्ही ॥ १५३ ॥
आता त्या तमोगुणी पुरुषाला जसा आहार आवडतो तेही सांगतो, कदाचित तुमच्या मनाला त्याची किळस येईल पण किळस घेऊ नका. ॥१७-१५३॥
तरी कुहिलें उष्टें खातां । न मनिजे तेणें अनहिता ।
जैसें कां उपहिता । म्हैसी खाय ॥ १५४ ॥
तर कुजलेले, अथवा उष्टे खात असतांना त्यामुळे आपले अनहित होईल असे तो मानीत नाही. जशी म्हैस (कुजलेले उष्टे न म्हणता) आंबोण खाते (तसे) तो खातो. ॥१७-१५४॥
यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।
उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम् ॥ १० ॥
ज्याला (तयार होऊन) प्रहराहून अधिक वेळ झाला आहे, अथवा जे अर्धवट शिजवलेले आहे, ज्यामधील रस गेला आहे, दुर्गंधयुक्त आदल्या दिवसाचे, उष्टे आणि सदोष, असे भोजन तमोवृत्तीच्या लोकांना प्रिय असते. ॥१७-१०॥
निपजलें अन्न तैसें । दुपाहरीं कां येरें दिवसें ।
अतिकरें तैं तामसें । घेईजे तें ॥ १५५ ॥
त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न दोन प्रहरी अथवा तो दिवस गेल्यावर दुसरे दिवशी तमोगुणी पुरुष खातो. ॥१७-१५५॥
नातरी अर्ध उकडिलें । कां निपट करपोनि गेलें ।
तैसेंही खाय चुकलें । रसा जें येवों ॥ १५६ ॥
अथवा अर्धवट शिजलेले किंवा पारच करपून गेलेले आणि ज्यात गोडी आलेली नाही. तसेही पदार्थ तमोगुणी खातो. ॥१७-१५६॥
जया कां आथि पूर्ण निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती ।
तें अन्न ऐसी प्रतीती । तामसा नाहीं ॥ १५७ ॥
जे अन्न शिजवून तयार झालेले असते व ज्या अन्नात गोडी चांगली आलेली आहे, ते अन्न आहे असा तमोगुणी पुरुषाचा अनुभव नाही, (म्हणजे अशा अन्नाला तो अन्न समजत नाही). ॥१७-१५७॥
ऐसेनि कहीं विपायें । सदन्ना वरपडा होये ।
तरी घाणी सुटे तंव राहे । व्याघ्रु जैसा ॥ १५८ ॥
असे असूनही जर कदाचित चांगल्या पक्वान्नाचा त्याला योग झाला तर त्या अन्नास घाण सुटेपर्यंत वाघाप्रमाणे थांबून रहातो. (म्हणजे त्या अन्नास घाण सुटेपर्यंत खात नाही). ॥१७-१५८॥
कां बहुवें दिवशीं वोलांडिलें । स्वादपणें सांडिलें ।
शुष्क अथवा सडलें । गाभिणेंही हो ॥ १५९ ॥
जे अन्न तयार होऊन पुष्कळ दिवस झाले आहेत, ज्याचा रुचकरपणा निघून गेला आहे, जे वाळलेले अथवा, सडलेले आहे अथवा जे अन्न फदफदले असून त्यात किडेही पडलेले असोत, ॥१७-१५९॥
तेंही बाळाचे हातवरी । चिवडिलें जैसी राडी करी ।
का सवें बैसोनि नारी । गोतांबील करी ॥ १६० ॥
व तसे घाण सुटलेले अन्न तेही मुलाच्या हाताने चिवडून जशी काही राड करतो, अथवा बायकोबरोबर बसून गोतांबिल करतो (म्हणजे तिच्या बरोबर परिवारासह एका ताटात जेवतो). ॥१७-१६०॥
ऐसेनि कश्मळें जैं खाय । तैं तया सुखभोजन ऐसें होय ।
परी येणेंही न धाय । पापिया तो ॥ १६१ ॥
अशा घाणेरडेपणाने जेव्हा तो खातो, तेव्हा त्याला सुखाचे असे भोजन होते. परंतु तो पापी एवढ्यानेही समाधान पावत नाही ॥१७-१६१॥
मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा ।
जया का सदोखा । कुद्रव्यासी ॥ १६२ ॥
मग चमत्कार पहा ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांना निषेधाचा शिंतोडा असतो (ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांचा शास्त्रांनी सेवन करण्यास योग्य नाहीत असा निषेध केलेला असतो), ॥१७-१६२॥
तया अपेयांच्या पानीं । अखाद्यांच्या भोजनीं ।
वाढविजे उतान्ही । तामसें तेणें ॥ १६३ ॥
त्या पिण्यास अयोग्य अशा पदार्थांच्या पिण्याच्या ठिकाणी व खाण्यास योग्य नाहीत अशा पदार्थांच्या खाण्यात त्या तामसी पुरुषाकडून उत्कट हाव वाढवली जाते. ॥१७-१६३॥
एवं तामस जेवणारा । ऐसैसी मेचु हे वीरा ।
तयाचें फल दुसरां । क्षणीं नाहीं ॥ १६४ ॥
हे वीरा अर्जुना, तमोगुणी जेवणाराला अशी अशी आवड असते. त्याचे फल दुसर्‍या क्षणी मिळत नाही (तर त्याच क्षणात ताबडतोप मिळते). ॥१७-१६४॥
जे जेव्हांचि हें अपवित्र । शिवे तयाचें वक्त्र ।
तेव्हांचि पापा पात्र । जाला तो कीं ॥ १६५ ॥
कारण की त्याचे तोंड जेव्हा या अपवित्र अन्नाला शिवते तेव्हाच तो पापाला पात्र झाला. ॥१७-१६५॥
यावरतें जें जेवीं । ते जेविती वोज न म्हणावी ।
पोटभरती जाणावी । यातना ते ॥ १६६ ॥
याशिवाय आणखी तो जे जेवतो, ती जेवण्याची रीत म्हणू नये तर ते जेवण ही पोट भरणारी यातना (दु:ख) समजावी. ॥१७-१६६॥
शिरच्छेदें काय होये । का आगीं रिघतां कैसें आहे ।
हें जाणावें काई पाहें । परी साहातुचि असे ॥ १६७ ॥
शिरच्छेदाने काय होते अथवा अग्नीत प्रवेश केला असता कसे असते, या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव का घ्यावा लागतो ? विचार कर. परंतु तमोगुणी पुरुष तसले परिणाम सहन करतो. ॥१७-१६७॥
म्हणौनि तामसा अन्ना । परीणामु गा सिनाना ।
न सांगोंचि गा अर्जुना । देवो म्हणे ॥ १६८ ॥
म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम वेगळा सांगण्याची जरुरी नाही. (कारण तामस अन्न खाण्यात जे दु:ख होते, तोच त्याचा परिणाम होय) असे देव म्हणाले. ॥१७-१६८॥
आतां ययावरी । आहाराचिया परी ।
यज्ञुही अवधारीं । त्रिधा असे ॥ १६९ ॥
आता यानंतर आहाराप्रमाणे यज्ञही तीन प्रकारचा आहे ऐक.॥१७-१६९॥
परी तिहींमाजीं प्रथम । सात्त्विक यज्ञाचें वर्म ।
आईक पां सुमहिम -। शिरोमणी ॥ १७० ॥
हे चांगल्या सुकीर्तिवंतांमधे श्रेष्ठ अर्जुना, पण आता या तिहींमधे पहिल्याप्रथम सात्विक यज्ञाचे रहस्य सांगतो ऐक. ॥१७-१७०॥
अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ॥
यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥ ११ ॥
फलाकांक्षा न धरणारांकडून, विधीला अनुसरून असलेला व यज्ञ करणे हे कर्तव्य आहे, म्हणून समाधानयुक्त मनाने जो यज्ञ केला जातो, तो सात्विक यज्ञ होय. ॥१७-११॥
तरी एकु प्रियोत्तमु-/ । वांचोनि वाढों नेदी कामु ।
जैसा का मनोधर्मु । पतिव्रतेचा ॥ १७१ ॥
तर ज्याप्रमाणे पतिव्रतेच्या मनाचा संकल्प एक नवर्‍याशिवाय इतर ठिकाणी काम वाढू देत नाही ॥१७-१७१॥
नाना सिंधूतें ठाकोनि गंगा । पुढारां न करीचि रिगा ।
का आत्मा देखोनि उगा । वेदु ठेला ॥ १७२ ॥
अथवा समुद्राला मिळाल्यावर गंगा पुढे धाव घेतच नाही, अथवा आत्म्याला पाहून वेद स्तब्ध राहिला. ॥१७-१७२॥
तैसें जे आपुल्या स्वहितीं । वेंचूनियां चित्तवृत्ती ।
नुरवितीचि अहंकृती । फळालागीं ॥ १७३ ॥
त्याप्रमाणे जे लोक आपल्या हिताच्या ठिकाणी चित्तवृत्ती खर्च करून कर्माच्या फळाच्या प्राप्तीविषयी कर्तेपणाचा अहंकार शिल्लक राहू देत नाहीत १७-१७३॥
पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरों नेणेंचि जळ ।
जिरालें गां केवळ । तयाच्याचि आंगीं ॥ १७४ ॥
झाडाच्या मुळाशी पोहोचल्यावर मग पाणी जसे मागे सरणे जाणतच नाही, तर केवळ त्याच्याच ठिकाणी जिरते. ॥१७-१७४॥
तैसें मनें देहीं । यजननिश्चयाच्या ठायीं ।
हारपोनि जें कांहीं । वांछितीना ॥ १७५ ॥
त्याप्रमाणे देह व मन ह्या दोहोंनी यज्ञनिश्चयाचे ठिकाणी गढून जाऊन जे काही इच्छित नाहीत ॥१७-१७५॥
तिहीं फळवांच्छात्यागीं । स्वधर्मावांचूनि विरागीं ।
कीजे तो यज्ञु सर्वांगीं । अळंकृतु ॥ १७६ ॥
फलाचा अभिलाष टाकून आपल्या धर्मशिवाय इतर बाबींची आसक्ती सोडून सर्व अंगांनी परिपूर्ण अशा ज्या यज्ञाचे ते आचरण करतात ॥१७-१७६॥
परी आरिसा आपणपें । डोळां जैसें घेपें ।
कां तळहातींचें दीपें । रत्‍न पाहिजे ॥ १७७ ॥
परंतु आरशात जसे आपण आपल्याला डोळ्याकडून पाहिले जाते अथवा अंधारात तळहातावर असलेले रत्न जसे दिव्याने पाहावे ॥१७-१७७॥
नाना उदितें दिवाकरें । गमावा मार्गु दिठी भरे ।
तैसा वेदु निर्धारें । देखोनियां ॥ १७८ ॥
अथवा सूर्य उगवला असता त्यायोगाने आपल्याला जाण्याचा मार्ग जसा दृष्टीच्या आटोक्यात येतो, त्याप्रमाणे वेदाच्या सहाय्याने निश्चित करून ॥१७-१७८॥
तियें कुंडें मंडप वेदी । आणीकही संभारसमृद्धी ।
ते मेळवणी जैसी विधी । आपणपां केली ॥ १७९ ॥
ती कुंडे व मंडप आणि वेदी आणखीही साहित्याची विपुलता, यांची जमवाजमव जणूकाय शास्त्राने आपण स्वत:च केली आहे त्याप्रमाणे तो करतो. (म्हणजे यज्ञाचे सर्व साहित्य शास्त्राप्रमाणे बिनचूक जमवतो). ॥१७-१७९॥
सकळावयव उचितें । लेणीं पातलीं जैसीं आंगातें ।
तैसे पदार्थ जेथिंचे तेथें । विनियोगुनी ॥ १८० ॥
अंगावर सर्व अवयवांचे ठिकाणी जसे त्या त्या अवयवांना योग्य असे अलंकार घातलेले असावेत, त्याप्रमाणे जेथे जो पदार्थ पाहिजे तेथे तो पदार्थ व्यवस्थेने योजून ॥१७-१८०॥
काय वानूं बहुतीं बोलीं । जैसी सर्वाभरणीं भरली ।
ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषें ॥ १८१ ॥
फार शब्दांनी काय वर्णन करू ? जसे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञाविद्याच यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष मूर्तिमंत आली आहे. ॥१७-१८१॥
तैसा सांगोपांगु । निफजे जो यागु ।
नुठऊनियां लागु । महत्त्वाचा ॥ १८२ ॥
त्याप्रमाणे तो यज्ञ अंगे व उपांगे यासहित मोठेपणाच्या संबंधास डोके वर काढू न देता केला जातो. ॥१७-१८२॥
प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडीं कीजे तुळसीचा ।
परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाहीं ॥ १८३ ॥
तुळशीच्या झाडाचे तर उत्तम प्रकारचे संरक्षण केले जाते, परंतु त्या संरक्षण करण्यात फळांचा फुलांचा अथवा छायेच्या हेतूचा संबंध नसतो ॥१७-१८३॥
किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती निर्माण ।
होय तो यागु जाण । सात्त्विकु गा ॥ १८४ ॥
अर्जुना फार काय सांगावे ? फळाशेशिवाय अशा युक्तीने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ आहे असे समज. ॥१७-१८४॥
अभिसन्धाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् ।
इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥ १२ ॥
हे भरतश्रेष्ठा, (क्रियेने वरच्या सारखाच) पण फलाचा उद्देश धरून व दांभिकपणे जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ जाण. ॥१७-१२॥
आतां यज्ञु कीर वीरेशा । करी पैं याचि{ऐ}सा ।
परी श्राद्धालागीं जैसा । अवंतिला रावो ॥ १८५ ॥
अर्जुना, आता (रजोगुणी पुरुष) खरोखरच याच्याच (सत्वगुणाच्या यज्ञा) सारखा यज्ञ करतो, परंतु (फलेच्छेने वगैरे) करतो. जसे श्राद्धाच्या दिवशी राजाला भोजनाला आमंत्रण द्यावे ॥१७-१८५॥
जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये ।
आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ॥ १८६ ॥
जर राजा घराला आला तर त्यापासून फार उपयोग होईल. तो असा की आपली कीर्तीही होईल आणि श्रद्धही रहाणार नाही. ॥१७-१८६॥
तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका ।
दीक्षितु होईन मान्यु लोकां । घडेल यागु ॥ १८७ ॥
त्याचप्रमाणे विचार मनात धरून तो रजोगुणी पुरुष म्हणतो की मला संपूर्ण स्वर्गप्राप्ती होईल व मी दीक्षित म्हणून लोकांना मान्य होईन आणि यज्ञही घडेल. ॥१७-१८७॥
ऐसी केवळ फळालागीं । महत्त्व फोकारावया जगीं ।
पार्था निष्पत्ति जे यागीं । राजस पैं ते ॥ १८८ ॥
अर्जुना, अशा तर्‍हेने केवळ फळाकरताच व आपले महत्व जगात प्रसिद्ध होण्याकरता जो यज्ञ करणे तो राजस यज्ञ होय. ॥१७-१८८॥
विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।
श्रद्दाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥ १३ ॥
शास्त्रविधीला सोडून असलेला, ज्यामधे ब्राह्मणांना अन्न दिले जात नाही असा मंत्रहीन, दक्षिणाविरहित, श्रद्धाविरहित अशा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. ॥१७-१३॥
आणि पशुपक्षिविवाहीं । जोशी कामापरौता नाहीं ।
तैसा तामसा यज्ञा पाहीं । आग्रहोचि मूळ ॥ १८९ ॥
पशुपक्ष्यांच्या लग्नामधे जसा विषयवासनेपेक्षा दुसरा जोशी नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाला आग्रहच मूळ आहे. ॥१७-१८९॥
वारया वाट न वाहे । कीं मरण मुहूर्त पाहे ।
निषिद्धांसीं बिहे । आगी जरी ॥ १९० ॥
जर कोणताही एखादा मार्ग वार्‍याकडून चालवला जाणार नाही, अथवा मरण जर येण्यास मुहूर्त पाहील किंवा अग्नि जर निषिद्ध पदार्थास (जाळण्यास) भिईल ॥१७-१९०॥
तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा ।
म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु ॥ १९१ ॥
तर तमोगुणी पुरुषाच्या आचरणाला वेदविधीचा धरबंध असेल. म्हणून अर्जुना, तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वैर असतो. (तो कसा ? तर पुढे सांगतात) ॥१७-१९१॥
नाहीं विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड ।
अन्नजातां न सुये तोंड । मासिये जेवीं ॥ १९२ ॥
येथे विधीची पर्वा नसते. त्याच्याकडे मंत्र वगैरे येत नाहीत. (म्हणजे त्याला ऋग्वेदादि मंत्रांची व त्यातील स्वरवर्णांची जरूर लागत नाही). ज्याप्रमाणे माशीच्या तोंडाकडून अन्नमात्र सुटत नाही (त्याप्रमाणे तमोगणी पुरुष शास्त्रदृष्ट्या विहित निषिद्ध हे न पहाता स्वैर वागतो). ॥१७-१९२॥
वैराचा बोधु ब्राह्मणा । तेथ कें रिगेल दक्षिणा ।
अग्नि जाला वाउधाणा । वरपडा जैसा ॥ १९३ ॥
ब्राह्मणसंबंधाने जेथे ब्राह्मण हा शत्रु अशी समजूत असते तेथे दक्षिणेचा विचार कोठून होणार ? वाहुटळ (वारा) सुटली असता त्यास अग्नीचे सहाय्य मिळावे (त्याप्रमाणे त्या यज्ञात विधि, मंत्र, ब्राह्मण, दक्षिणा वगैरेंचा अभाव एकत्र होतो). ॥१७-१९३॥
तैसें वायांचि सर्वस्व वेंचे । मुख न देखती श्रद्धेचें ।
नागविलें निपुत्रिकाचें । जैसें घर ॥ १९४ ॥
जसे निपुत्रिकाचे घर नागवले जाते, त्याप्रमाणे श्रद्धेचे तोंड न पहाता सर्वही व्यर्थच खर्च होते. ॥१७-१९४॥
ऐसा जो यज्ञाभासु । तया नाम यागु तामसु ।
आइकें म्हणे निवासु । श्रियेचा तो ॥ १९५ ॥
असा जो यज्ञाचा नुसता देखावा असतो, त्याला तामस यज्ञ म्हणावे. अर्जुना हे ऐक, असे तो लक्ष्मीचे निवासस्थान श्रीकृष्ण म्हणाला. ॥१७-१९५॥
आता गंगेचें एक पाणी । परी नेलें आनानीं वाहणीं ।
एक मळीं एक आणी । शुद्धत्व जैसें ॥ १९६ ॥
आता गंगेचे एकच पाणी परंतु ते निरनिराळ्या मार्गांनी गेले असता ते एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देते व एका मार्गाने पवित्रत्व उत्पन्न करणारे होते. ॥१७-१९६॥
तैसें तिहीं गुणीं तप । येथ जाहलें आहे त्रिरूप ।
तें एक केलें दे पाप । उद्धरी एक ॥ १९७ ॥
त्याप्रमाणे या जगात तीन गुणींच्या योगाने तप तीन स्वरूपाचे झाले आहे. ते तप एक प्रकारचे केले असता पाप देते आणि दुसर्‍या प्रकारे केले असता उद्धरते. ॥१७-१९७॥
तरी तेंचि तिहीं भेदीं । कैसेनि पां म्हणौनि सुबुद्धी ।
जाणों पाहासी तरी आधीं । तपचि जाण ॥ १९८ ॥
हे बुद्धिमान अर्जुना, ते तपच तीन भेदांनी कसे झाले आहे म्हणून जाणू पहाशील तर आधी तपच काय आहे ते समजून घे. ॥१७-१९८॥
येथ तप म्हणजे काई । तें स्वरूप दाऊं पाहीं ।
मग भेदिलें गुणीं तिहीं । तें पाठीं बोलों ॥ १९९ ॥
या जगात तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला दाखवू, पहा. नंतर तीन गुणांनी ते तीन प्रकारचे झाले आहे ते मागाहून सांगू. ॥१७-१९९॥
तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक ।
शारीर मानसिक । शाब्द गा ॥ २०० ॥
तर शुद्ध तप तेही शारीरिक, मानसिक व वाचिक असे तीन प्रकारचे आहे, ऐक. ॥१७-२००॥
आतां गा तिहीं माझारीं । शारीर तंव अवधारीं ।
तरी शंभु कां श्रीहरी । पढियंता होय ॥ २०१ ॥
आता या तिहींपैकी शारीरिक तप ऐक. तर (त्या तप करणाराला) शंकर अथवा विष्णु यापैकी जो देव आवडत असेल तो – ॥१७-२०१॥

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ॥
ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥ १४ ॥
देव, ब्राह्मण, आईबाप, व गुरु यांचे पूजन, शुद्धता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीर तप असे म्हणतात. ॥१७-१४॥
तया प्रिया देवतालया । यात्रादिकें करावया ।
आठही पाहार जैसें पायां । उळिग घापे ॥ २०२ ॥
त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्रादिक करण्याकरता आठही प्रहर जसा पायाला भोवरा बांधला आहे ॥१७-२०२॥
देवांगणमिरवणियां । अंगोपचार पुरवणियां ।
करावया म्हणियां । शोभती हात ॥ २०३ ॥
देवाचे अंगण (झाडून, सारवून, रांगोळी घालून वगैरे) सुशोभित करण्याकरता देवाच्या पुजेला जे उपचार लागतील ते पुरवण्याकरता (शास्त्रांनी सांगितलेल्या) आज्ञेप्रमाणे करण्याकरता त्याचे हात शोभतात. ॥१७-२०३॥
लिंग कां प्रतिमा दिठी । देखतखेंवों अंगेष्टी ।
लोटिजे कां काठी । पडली जैसी ॥ २०४ ॥
लिंग अथवा प्रतिमा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर काठी ज्याप्रमाणे पडावी त्याप्रमाणे शरीररूप काठी टाकतो. ॥१७-२०४॥
आणि विधिविनयादिकीं । गुणीं वडील जे लोकीं ।
तया ब्राह्मणाची निकी । पाइकी कीजे ॥ २०५ ॥
आणि शास्त्रोक्त आचरण व नम्रता आदिकरून गुणांनी लोकात जे श्रेष्ठ असतील, त्या ब्राह्मणांची चांगली सेवा करतो. ॥१७-२०५॥
अथवा प्रवासें कां पीडा । का शिणले जे सांकडां ।
ते जीव सुरवाडा । आणिजती ॥ २०६ ॥
अथवा प्रवासाने किंवा पीडेने अथवा संकटाने जे शिणलेले असतील, त्या जीवांना सुख प्राप्त करून देतो. ॥१७-२०६॥
सकल तीर्थांचिये धुरे । जियें कां मातापितरें ।
तयां सेवेसी कीर शरीरें । लोण कीजे ॥ २०७ ॥
सर्व तीर्थांमधे श्रेष्ठ जे आईबाप, त्यांच्या सेवेवरून शरीराला खरोखर ओवाळून टाकतो. ॥१७-२०७॥
आणि संसारा{ऐ}सा दारुणु । जो भेटलाचि हरी शीणु ।
तो ज्ञानदानीं सकरुणु । भजिजे गुरु ॥ २०८ ॥
आणि जो भेटल्याबरोबर संसारासारखे भयंकर दु:ख नाहीसे करतो त्या ज्ञानदान करणार्‍या व दयावान अशा गुरूला भाजतो. ॥१७-२०८॥
आणि स्वधर्माचा आगिठां । देह जाड्याचिया किटा ।
आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे ॥ २०९ ॥
आणि अर्जुना, स्वधर्मरूपी अग्नीमधे देह अहंकाररूपी जो मळ, त्याला वारंवार स्वधर्माचरण करणे, हीच कोणी पुटे (आंच) देऊन तो नाहीसा करतो. ॥१७-२०९॥
वस्तु भूतमात्रीं नमिजे । परोपकारीं भजिजे ।
स्त्रीविषयीं नियमिजे । नांवें नांवें ॥ २१० ॥
भूतमात्रामधे ब्रह्म जाणून तेथे त्यास नमन करतो. परोपकार करण्यात तत्पर असतो व स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करतो. (तो असा की) ॥१७-२१०॥
जन्मतेनि प्रसंगे । स्त्रीदेह शिवणें आंगें ।
तेथूनि जन्म आघवें । सोंवळें कीजे ॥ २११ ॥
जन्माच्या प्रसंगी मात्र स्त्रीदेहाला अंगाने स्पर्श झाला, तेथून पुढे तो सर्व जन्म सोवळा करतो. ॥१७-२११॥
भुतमात्राचेनि नांवें । तृणही नासुडावें ।
किंबहुना सांडावे । छेद भेद ॥ २१२ ॥
भूतमात्रांच्या नावाने गवताच्या काडीसही (तीत जीव आहे म्हणून) हिसका देत नाही, फार काय सांगावे ? तोडमोड करणे टाकून देतो. ॥१७-२१२॥
ऐसैसी जैं शरीरीं । रहाटीची पडे उजरी ।
तैं शारीर तप घुमरी । आलें जाण ॥ २१३ ॥
अशा अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा शरीरात उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरास आले असे समज. ॥१७-२१३॥
पार्था समस्तही हें करणें । देहाचेनि प्रधानपणें ।
म्हणौनि ययातें मी म्हणें । शारीर तप ॥ २१४ ॥
अर्जुना, हे सर्व करणे मुख्यत्वेकरून देहाच्या आधारावर आहे. म्हणून मी याला शारीरिक तप असे म्हणतो. ॥१७-२१४॥
एवं शारीर जें तप । तयाचें दाविलें रूप ।
आतां आइक निष्पाप । वाङ्मय तें ॥ २१५ ॥
याप्रमाणे जे शारीरिक तप आहे, त्याचे स्पष्टीकरण केले. आता पापरहित असे जे वाचिक तप ते ऐक. ॥१७-२१५॥
अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।
स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥ १५ ॥
जेणेकरून उद्वेग होणार नाही (एवढेच नाही तर ऐकणाराचे कल्याण होईल) असे सत्य, प्रिय आणि हितकर वाक्य, स्वाध्याचा (वेदाचा अथवा नामाचा) अभ्यास, यांना वाङ्मय तप असे म्हणतात. ॥१७-१५॥
तरी लोहाचें आंग तुक । न तोडितांचि कनक ।
केलें जैसें देख । परीसें तेणें ॥ २१६ ॥
तरी लोखंडाचा आकार व वजन ही मुळीच कमी होऊ न देता जसे त्या लोखंडास परिसाने सोने केले, पहा. ॥१७-२१६॥
तैसें न दुखवितां सेजे । जावळिया सुख निपजे ।
ऐसें साधुत्व कां देखिजे । बोलणां जिये ॥ २१७ ॥
त्याप्रमाणे जे बोलणे ऐकणार्‍याच्या जवळ असलेल्या जोडीदाराला दु:ख न देता, सुख होईल असा चांगलेपणा ज्या बोलण्यात दृष्टीस पडतो, ॥१७-२१७॥
पाणी मुदल झाडा जाये । तृण ते प्रसंगेंचि जियें ।
तैसें एका बोलिलें होये । सर्वांहि हित ॥ २१८ ॥
पाणी मुख्य झाडाला जाते आणि पाटाच्या काठावर असणारे गवत सहजच जगते. त्याप्रमाणे कोणा एकाला उद्देशून बोलले असता त्या बोलण्यात सर्वांचेच हित होते ॥१७-२१८॥
जोडे अमृताची सुरसरी । तैं प्राणांतें अमर करी ।
स्नानें पाप ताप वारी । गोडीही दे ॥ २१९ ॥
जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा ती प्राणांना अमर करते व स्नानाने पाप व ताप नाहीसे करते, आणि (तिचे अमृत प्यायले असता) गोडीही देते. ॥१७-२१९॥
तैसा अविवेकुही फिटे । आपुलें अनादित्व भेटे ।
आइकतां रुचि न विटे । पीयुषीं जैसी ॥ २२० ॥
त्याप्रमाणे अज्ञान नाहीसे होते, आपला अनादिपणा पुन: प्राप्त होतो व ज्याप्रमाणे अमृताचे कितीही सेवन केले तरी त्याचा वीट येत नाही. ॥१७-२२०॥
जरी कोणी करी पुसणें । तरी होआवें ऐसें बोलणें ।
नातरी अवर्तणें । निगमु का नाम ॥ २२१ ॥
जर कोणी विचारले तर असे बोलण्याचा प्रघात असावा, नाही तर वेद अथवा भगवन्नाम यांचे वाचेने आवर्तन (पुन: पुन: पठण) चाललेले असावे. ॥१७-२२१॥
ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठीजती वाग्भुवनीं ।
केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा ॥ २२२ ॥
ऋग्वेदादि तिन्ही वेद वाचारूपी मंदिरामधे (तोंडात) स्थापन केले जातात. (फार काय सांगावे ?) मुखामधे जशी काय वेदशाळाच स्थापन केली आहे. ॥१७-२२२॥
नातरी एकाधें नांव । तेंचि शैव का वैष्णव ।
वाचे वसे तें वाग्भव । तप जाणावें ॥ २२३ ॥
अथवा एखादे नाव, तेच शिवाचे असो वा विष्णूचे असो, वाचेत रहावे, ते वाचेपासून होणारे तप समजावे. ॥१७-२२३॥
आतां तप जें मानसिक । तेंही सांगों आइक ।
म्हणे लोकनाथनायक । नायकु तो ॥ २२४ ॥
आता जे मानसिक तप आहे तेही सांगू, ऐक. असे लोकनाथांच्या नायकांचे (इंद्रादिक देवांचे) स्वामी श्रीकृष्ण म्हणाले. ॥१७-२२४॥
मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।
भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥ १६ ॥
मनाची प्रसन्नता, शांत स्वभाव, मौनवृत्ती, आत्मसंयम, कल्पनाविरहित अशी अंत:करणाची शुद्ध स्थिती, याला मानस तप असे म्हणतात. ॥१६-१६॥
तरी सरोवर तरंगीं । सांडिलें आकाश मेघीं ।
का चंदनाचें उरगीं । उद्यान जैसें ॥ २२५ ॥
तर लाटांनी सरोवर टाकले असता अथवा मेघांनी आकाश टाकले असता अथवा चंदनाच्या बागेचा सर्पांनी त्याग केला असता ॥१७-२२५॥
नाना कळावैषम्यें चंद्रु । कां सांडिला आधीं नरेंद्रु ।
नातरी क्षीरसमुद्रु । मंदराचळें ॥ २२६ ॥
अथवा कलांच्या कमीजास्त होण्याने जसे चंद्रास टाकावे, अथवा मानसिक चिंतेने जसे राजास टाकावे अथवा क्षीरसमुद्र जसा मंदराचलाने टाकावा ॥१७-२२६॥
तैसीं नाना विकल्पजाळें । सांडुनि गेलिया सकळें ।
मन राहे का केवळें । स्वरूपें जें ॥ २२७ ॥
त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयाच्या सर्व समुदायांनी मनाला सोडल्यावर जे मन केवळ स्वरूपस्थितीने रहाते. ॥१७-२२७॥
तपनेंवीण प्रकाशु । जाड्येंवीण रसीं रसु ।
पोकळीवीण अवकाशु । होय जैसा ॥ २२८ ॥
उष्णतेशिवाय जसा प्रकाश असावा अथवा जडत्वाशिवाय जसा अन्नाच्या ठिकाणी रस असावा आणि पोकळीशिवाय जसा अवकाश असावा ॥१७-२२८॥
तैसी आपली सोय देखे । आणि आपलिया स्वभावा मुके ।
हिंवली जैसी आंगिकें । हिवों नेदी निजांग ॥ २२९ ॥
त्याप्रमाणे (मनाने) आपले विश्रांतिस्थान (जो आत्मा त्यास) पाहिल्यावर मन आपल्या स्वभावास (चंचलतेस अथवा संकल्प विकल्प करण्यास) मुकते. ते कसे ? तर जशी थंडी आपल्या अंगच्या थंडीने आपले अंग कापू देत नाही तसे. ॥१७-२२९॥
तैसें न चलतें कळंकेंवीण । शशिबिंब जैसें परीपूर्ण ।
तैसें चोखी शृंगारपण । मनाचें जें ॥ २३० ॥
ज्याप्रमाणे न चालणारे म्हणजे अचल व कलंकरहित म्हणजे स्वच्छ असे चंद्राचे बिंब, नित्य परिपूर्ण असावे, तितक्या शुद्धपणाने (व निश्चलपणाने मनाची जी शोभा असते ॥१७-२३०॥
बुजाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांप कांप ।
तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची ॥ २३१ ॥
वैराग्याचे ओरखाडे नाहीसे झाले व मनाची अस्वस्थता नाहीशी झाली व त्या मनाचे ठिकाणी आत्मज्ञानास योग्य अशी शुद्ध भूमिका तयार झाली ॥१७-२३१॥
म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावें जें वक्त्र ।
तें वाचेचेंही सूत्र । हातीं न धरी ॥ २३२ ॥
म्हणून शास्त्राचा विचार करण्याकरता ज्या तोंडाचा उपयोग करावा, ते तोंड वाचेचेही सूत्र हाती धरीत नाही. (बोलतच नाही). ॥१७-२३२॥
तें स्वलाभ लाभलेपणें । मन मनपणाही धरूं नेणें ।
शिवतलें जैसें लवणें । आपुलें निज ॥ २३३ ॥
ज्याप्रमाणे मिठाने आपले मूळचे स्वरूप जे पाणी त्यास स्पर्श केल्याबरोबर (ते मीठ जलरूप होते). त्याप्रमाणे आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मन आपला मनपणाही धरू जाणत नाही. (म्हणजे संकल्प करण्याचे टाकून आत्म्याशी तद्रूप होते). ॥१७-२३३॥
तेथ कें उठिती ते भाव । जिहीं इंद्रियमार्गीं धांव ।
घेऊनि ठाकावे गांव । विषयांचे ते ॥ २३४ ॥
तशा मनाच्या ठिकाणी त्या कल्पना कोठे उत्पन्न होतील की ज्या कल्पनांनी इंद्रियमार्गांनी धाव घेऊन विषयरूपी त्या गावात येऊन प्राप्त व्हावे ? ॥१७-२३४॥
म्हणौनि तिये मानसीं । भावशुद्धिचि असे अपैसी ।
रोमशुचि जैसी । तळहातासी ॥ २३५ ॥
म्हणून ज्याप्रमाणे तळहाताला केसरहितपणा, ही निर्मळता स्वभावत:च आहे, त्याप्रमाणे त्या मनामधे स्वभावत:च भावशुद्धि असते. ॥१७-२३५॥
काय बहु बोलों अर्जुना । जैं हे दशा ये मना ।
तैं मनोतपाभिधाना । पात्र होय ती ॥ २३६ ॥
अर्जुना फार काय सांगावे ? जेव्हा मनाला (वर सांगितलेली स्थिती प्राप्त होते तेव्हा ती स्थिती ‘मानस तप’ या नावाला प्राप्त होते. ॥१७-२३६॥
परी ते असो हें जाण । मानस तपाचें लक्षण ।
देवो म्हणे संपूर्ण । सांगितलें ॥ २३७ ॥
परंतु ते असू दे, हे मनाच्या तपाचे लक्षण तुला संपूर्ण सांगितले, असे समज. असे देव म्हणाले. ॥१७-२३७॥
एवं देहवाचाचित्तें । जें पातलें त्रिविधत्वातें ।
तें सामान्य तप तूतें । परीसविलें गा ॥ २३८ ॥
म्हणून अर्जुना, कायावाचामनाने जे त्रिविधत्वाला प्राप्त झाले आहे ते सामान्य तप तुला ऐकवले. ॥१७-२३८॥
आतां गुणत्रयसंगें । हेंचि विशेषीं त्रिविधीं रिगे ।
तेंही आइक चांगें । प्रज्ञाबळें ॥ २३९ ॥
आता तीन गुणांच्या संगतीने हेच सामान्य तप विशेषेकरून तीन प्रकारात शिरते. याच सामान्य तपाचे तीन प्रकार होतात. तेही बुद्धी स्थिर ठेऊन चांगले ऐक. ॥१७-२३९॥
श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।
अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥ १७ ॥
ते तीन प्रकारचे तप (जर) फालाची आकांक्षा न धरणारांनी आणि पूर्ण सत्वशुद्धीने युक्त अशा मनुष्यांनी अत्यंत श्रद्धेने आचरले तर त्याला सात्विक तप असे म्हणतात. ॥१७-१७॥
तरी हेंचि तप त्रिविधा । जें दाविलें तुज प्रबुद्धा ।
तेंचि करीं पूर्णश्रद्धा । सांडूनि फळ ॥ २४० ॥
तर हे प्रबुद्ध अर्जुना, हेच सामान्य तप जे तुला तीन प्रकारांनी सांगितले तेच पूर्ण श्रद्धेने व फलाशा टाकून ॥१७-२४०॥
जैं पुरतिया सत्त्वशुद्धी । आचरिजे आस्तिक्यबुद्धी ।
तैं तयातेंचि गा प्रबुद्धी । सात्त्विक म्हणिपे ॥ २४१ ॥
जेव्हा पूर्ण अंत:करण शुद्धीने व आस्तिक्यबुद्धीने आचरले जाते तेव्हा त्यालाच बुद्धिमान लोकांकडून सात्विक तप म्हटले जाते. ॥१७-२४१॥
सत्कारमानपूजार्थं तपो दंभेन चैव यत् ।
क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवं ॥ १८ ॥
सत्कार, मान, पूजा, यांच्याकरता आणि दांभिकपणे जे तप करतात, त्याला या लोकी राजस तप म्हणतात. ते चंचल व अनित्य आहे. ॥१७-१८॥
नातरी तपस्थापनेलागीं । दुजेपण मांडूनि जगीं ।
महत्त्वाच्या शृंगीं । बैसावया ॥ २४२ ॥
अथवा तपाच्या स्थापनेकरता जगात द्वैतभाव उत्पन्न करून मोठेपणाचे शिखरावर बसण्याकरता ॥१७-२४२॥
त्रिभुवनींचिया सन्माना । न वचावें ठाया आना ।
धुरेचिया आसना । भोजनालागीं ॥ २४३ ॥
त्रिभुवनाच्या सन्मानाने (आपल्या शिवाय) दुसर्‍या ठिकाणी जाऊ नये व जेवणाच्या पंक्तीत पहिला पाट मिळावा म्हणून ॥१७-२४३॥
विश्वाचिया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा ।
विश्वें आपलिया यात्रा । कराविया यावें ॥ २४४ ॥
विश्वाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे व सगळे जग आपली यात्रा (आपले दर्शन) करण्यास यावे म्हणून ॥१७-२४४॥
लोकांचिया विविधा पूजा । आश्रयो न धरावया दुजा ।
भोग भोगावे वोजा । महत्त्वाचिया ॥ २४५ ॥
लोकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या पूजांनी (आपल्याशिवाय) दुसरा आश्रय न धरावा, महत्वाच्या पांधरुणाखाली (आपल्याला) भोग भोगण्यास (मिळावे म्हणून) ॥१७-२४५॥
अंग बोल माखूनि तपें । विकावया आपणपें ।
अंगहीन पडपे । जियापरी ॥ २४६ ॥
ज्याप्रमाणे वेश्या आपले शरीर विकण्याकरता शृंगार करते, त्याप्रमाणे तो आपणास विकण्याकरता (लोकात आपली प्रतिष्ठा वाढवण्याकरता) आपले शरीर व बोलणे तपाने माखतो. (म्हणजे आपल्या शरीर चेष्टेने वेशाने अथवा बोलण्याने आपण तपी आहोत असे लोकांना भासवतो). ॥१७-२४६॥
हें असो धनमानीं आस । वाढौनी तप कीजे सायास ।
तैं तेंचि तप राजस । बोलिजे गा ॥ २४७ ॥
हे राहू दे. धनाच्या ठिकाणी व मानाच्या ठिकाणी आशा वाढवून जे आयासयुक्त (कष्टाने भरलेले) तप केले जाते त्या तपाला अर्जुना, राजस तप म्हणावे. ॥१७-२४७॥
परी पहुरणी जें दुहिलें । तैं तें गुरूं न दुभेचि व्यालें ।
का उभें शेत चारिलें । पिकावया नुरे ॥ २४८ ॥
परंतु पहुरणी नावाच्या किड्याने गाभण गुराचे थान चोखले असता ते गुरु व्यायल्यावर दूध देत नाही, अथवा शेतात पीक उभे असता ते जनावराकडून चारले जात नाही. ॥१७-२४८॥
तैसें फोकारितां तप । कीजे जें साक्षेप ।
तें फळीं तंव सोप । निःशेष जाय ॥ २४९ ॥
त्याप्रमाणे जे तप कष्ट करून केले जाते, त्या तपाची प्रसिद्धी केली असता ते तप फळाच्या संबंधाने पूर्ण निष्फळ होते. ॥१७-२४९॥
ऐसें निर्फळ देखोनि करितां । माझारीं सांडी पंडुसुता ।
म्हणौनि नाहीं स्थिरता । तपा तया ॥ २५० ॥
अशाप्रकारे ते फळ निष्फळ आहे असे पाहून ते तप करीत असतांना मध्येच ते टाकतो, म्हणून अर्जुना, त्या तपाला स्थिरता नाही. ॥१७-२५०॥
एर्‍हवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी ।
तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे ? ॥ २५१ ॥
सहज विचार करून पाहिले तर जो अकाली आलेला मेघ (आपल्या दाट फळीने) सर्व आकाश भारून टाकतो व जो मेघ आपल्या गर्जनेने ब्र्ह्मांड फोडतो. तो अकाली मेघ घटकाभर तरी टिकतो काय ? ॥१७-२५१॥
तैसें राजस तप जें होये । तें फळीं कीर वांझ जाये ।
परी आचरणींही नोहे । निर्वाहतें गा ॥ २५२ ॥
त्याप्रमाणे राजस तप जे आहे ते फलाच्या बाबतीत तर व्यर्थ जातेच परंतु अर्जुना, ते आचरणात सुद्धा शेवटपर्यंत टिकणारे नसते. ॥१७-२५२॥
आतां तेंचि तप पुढती । तामसाचिये रीती ।
पैं परत्रा आणि कीर्ती । मुकोनि कीजे ॥ २५३ ॥
आता तेच (म्हणजे सामान्य तप) जेव्हा तमोगुणाच्या रीतीने केले जाते तेव्हा ऐहिक कीर्ति व परलोकप्राप्ती यास अंतरून ते केले जाते. ॥१७-२५३॥
मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।
परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥ १९ ॥
मूर्खापणाचा हट्ट घेऊन बसणारा स्वत:ला पीडा देऊन जे तप करतो, अथवा दुसर्‍या मनुष्याच्या नाशाकरता जे तप करतो त्याला तामस (तप) असे म्हणतात. ॥१७-१९॥
केवळ मूर्खपणाचा वारा । जीवीं घेऊनि धनुर्धरा ।
नाम ठेविजे शरीरा । वैरियाचें ॥ २५४ ॥
अर्जुना, केवळ मूर्खापणाचा संचार अंत:करणात घेऊन शरीराला शत्रुसारखे समजले जाते. ॥१७-२५४॥
पंचाग्नीची दडगी । खोलवीजती शरीरालागीं ।
का इंधन कीजे हें आगी । आंतु लावी ॥ २५५ ॥
व पंचाग्नीच्या ज्वाळा शरीराला लावल्या जातात, अथवा शरीराला सरपण समजून अग्नीत (पंचाग्नीत) ते लावले जाते. ॥१७-२५५॥
माथां जाळिजती गुगुळु । पाठीं घालिजती गळु ।
आंग जाळिती इंगळु । जळतभीतां ॥ २५६ ॥
मस्तकावर गुग्गूळ जाळले जातात व पाठीत गळ घातले जातात आणि पहाताच भीती वाटेल अशा रखरखित निखार्‍यांनी अंग जाळतात. ॥१७-२५६॥
दवडोनि श्वासोच्छ्वास । कीजती वायांचि उपवास ।
कां घेपती धूमाचें घांस । अधोमुखें ॥ २५७ ॥
श्वासोच्छ्वास वाया दवडले जातात आणि व्यर्थच उपाय केले जातात. अथवा झाडाला टांगून घेऊन खाली तोंड करून धुराचे घास घेतले जातात. ॥१७-२५७॥
हिमोदकें आकंठें । खडकें सेविजती तटें ।
जितया मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ ॥ २५८ ॥
(थंडीच्या दिवसात) गळ्यापर्यंत थंड पाण्यात उभे रहातात. खडकावर किंवा नदीच्या काठावर बसतात व ज्या तपात आपल्या अंगाचे जिवंतपणी मांसाचे लचके तोडतात. ॥१७-२५८॥
ऐसी नानापरी हे काया । घाय सूतां पैं धनंजया ।
तप कीजे नाशावया । पुढिलातें ॥ २५९ ॥
अर्जुना, अशा नाना प्रकारांनी या शरीरावर घाव घालून जे तप करतात ॥१७-२५९॥
आंगभारें सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा ।
कां आड जालियातें रगडा । करी जैसा ॥ २६० ॥
पर्वतावरून अंगाच्या वजनाने सु्टलेला दगड आपण स्वत: फुटून तुकडे तुकडे होतो शिवाय जे काही आपल्या आड येईल त्याचा जसा चुराडा करतो ॥१७-२६०॥
तेवीं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया ।
जिणावया शिराणिया । कीजती गा ॥ २६१ ॥
याप्रमाणे आपल्याला त्रास घेऊन सुखात असलेल्या प्राण्यांना जिंकण्याच्या इच्छेने जी तपे केली जातात ॥१७-२६१॥
किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी ।
तप निफजे तें किरीटी । तामस होय ॥ २६२ ॥
फार काय सांगावे ? ही दु:खाची वाईट रीत अंगीकारून अर्जुना जे तप उत्पन्न होते ते तामस होय. ॥१७-२६२॥
एवं सत्त्वादिकांच्या आंगीं । पाडिलें तप तिहीं भागीं ।
जालें तेंही तुज चांगी । दाविलें व्यक्ती ॥ २६३ ॥
याप्रमाणे सत्वादि तीन गुणात पडलेले तप तीन प्रकारचे झाले, ते देखील तुला चांगले स्पष्ट दाखवले. ॥१७-२६३॥
आतां बोलतां प्रसंगा । आलें म्हणौनि पैं गा ।
करूं रूप दानलिंगा । त्रिविधा तया ॥ २६४ ॥
आता बोलतांना प्रसंगात आले म्हणून त्या तीन प्रकारच्या दानांच्या लक्षणांचे स्वरूप सांगू. ॥१७-२६४॥
येथ गुणाचेनि बोलें । दानही त्रिविध असे जालें ।
तेंचि आइक पहिलें । सात्त्विक ऐसें ॥ २६५ ॥
आता गुण म्हटले की त्याने दानही तीन प्रकारचे झाले आहे. त्यापैकी पहिले सात्विक दान असे आहे. ॥१७-२६५॥
दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ॥
देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥ २० ॥
(स्वधर्माने मिळवलेल्या पैशातून) दान करणे, कर्तव्य आहे अशा बुद्धीने जे दान ज्याच्या पासून परत उपकाराची अपेक्षा नाही अशाला योग्य ठिकाण, काळ व रात्र पाहून दिले जाते त्या दानाला सात्विक दान म्हणतात. ॥१७-२०॥
तरी स्वधर्मा आंतौतें । जें जें मिळे आपणयातें ।
तें तें दीजे बहुतें । सन्मानयोगें ॥ २६६ ॥
तरी स्वधर्माचरणाने जे जे आपणास मिळालेले असेल, ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे. ॥१७-२६६॥
जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु ।
तैसाचि दानाचा हा लागु । देखतसें ॥ २६७ ॥
(पेरण्याकरता) चांगले बीज प्राप्त झाले असता जशी चांगल्या जमिनीच्या वाफशाच्या उणीव पडते, तसा हा सात्विक दानाचा योग दिसतो. (अभिप्राय असा की पेरणी करण्याला जसे चांगले बी, योग्य काळ व उत्तम शेत व वापसा यांचा एकदम योग होणे दुर्मिळ असते, त्याप्रमाणे सात्विक दानाला योग्य देश, योग्य काल, योग्य पात्र व योग्य द्रव्य यांचा एकदम योग होणे हे दुर्मिळ असते). ॥१७-२६७॥
अनर्घ्य रत्‍न हातां चढे । तैं भांगाराची वोढी पडे ।
दोनी जालीं तरी न जोडे । लेतें आंग ॥ २६८ ॥
मौल्यवान रत्न हाती येते तेव्हा सोन्याची टंचाई पडते. (रत्न व सोने) दोन्ही प्राप्त झाली तर घालणारे अंग (दागिना ज्या अवयवावर घालावयाचा तो शरीराचा अवयव उदाहरणार्थ नाक वगैरे) चांगले मिळत नाही. ॥१७-२६८॥
परी सण सुहृद संपत्ती । हे तिन्ही येकीं मिळती ।
जे भाग्य धरी उन्नती । आपुल्याविषयीं ॥ २६९ ॥
परंतु आपल्या भाग्याची ऊर्जित अवस्था झाली असता सण, इष्ट मित्र व ऐश्वर्य या तिहींचा एकत्र योग होतो. ॥१७-२६९॥
तैसें निफजावया दान । जैं सत्त्वासि ये संवाहन ।
तैं देश काळ भाजन । द्रव्यही मिळे ॥ २७० ॥
ज्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे दान घडवून आणण्याविषयी जेव्हा सत्वगुणास उत्तेजन येते, तेव्हा देश, काल, पात्र व द्रव्य अशा चार योग्य गोष्टींचा संगम होतो. ॥१७-२७०॥
तरी आधीं तंव प्रयत्‍नेंसीं । होआवें कुरुक्षेत्र का काशी ।
नातरी तुके जो इहींसीं । तो देशुही हो ॥ २७१ ॥
तरी प्रथम तर प्रयत्न करून कुरुक्षेत्र अथवा काशी हे स्थळ असावे, अथवा यांच्या बरोबरीला येईल तो देश (स्थळ) असला तरी चालेल, ॥१७-२७१॥
तेथ रविचंद्रराहुमेळु । होतां पाहे पुण्यकाळु ।
का तयासारिखा निर्मळु । आनुही जाला ॥ २७२ ॥
तशा त्या पवित्र स्थळी सूर्य किंवा चंद्र आणि राहू व केतु यांचा योग (सूर्यग्रहण व चंद्रग्रहण) येतो, तो (दानाला) पवित्र काळ असतो. अथवा तशा सारखा इतर पवित्र काळही असला तरी चालेल. ॥१७-२७२॥
तैशा काळीं तिये देशीं । होआवी पात्र संपत्ती ऐसी ।
मूर्ति आहे धरिली जैसी । शुचित्वेंचि कां ॥ २७३ ॥
तशा काळी त्या स्थळी दानाला असे उत्कृष्ट पात्र असावे की जणु काय (त्या पात्राच्या रूपाने) मूर्तिमंत पवित्रपणाच अवतरला आहे. ॥१७-२७३॥
आचाराचें मूळपीळ । वेदांची उतारपेठ ।
तैसें द्विजरत्‍न चोखट । पावोनियां ॥ २७४ ॥
सदाचरणाची मूळ जागा व वेदातील सर्व प्रकारचा माल उतरण्याची जागा (वेदाध्ययन केलेला) असा अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता ॥१७-२७४॥
मग तयाच्या ठाईं वित्ता । निवर्तवावी स्वसत्ता ।
परी प्रियापुढें कांता । रिगे जैसी ॥ २७५ ॥
मग त्याच्या ठिकाणी (द्रव्य) अर्पण करून त्या द्रव्यावरील आपली सत्ता काढावी, परंतु पतीसमोर जशी आपले स्वामित्व त्यास देऊन पत्नी येते ॥१७-२७५॥
का जयाचें ठेविलें तया । देऊनि होईजे उतराइया ।
नाना हडपें विडा राया । दिधला जैसा ॥ २७६ ॥
अथवा ज्याचे (द्रव्य वगैरे) ठेवलेले असते, ते त्यास परत देऊन जसे उतराई व्हावे अथवा विडा देणार्‍या हुजर्‍याने जसा राजास विडा द्यावा ॥१७-२७६॥
तैसेनि निष्कामें जीवें । भूम्यादिक अर्पावें ।
किंबहुना हांवे । नेदावें उठों ॥ २७७ ॥
तशा निष्काम अंत:करणाने जमीन वगैरे अर्पण करावी. फार काय सांगावे ? फालेच्छेला बिलकूल डोके वर काढू देऊ नये. ॥१७-२७७॥
आणि दान जया द्यावें । तयातें ऐसेया पाहावें ।
जया घेतलें नुमचवे । कायसेंनही ॥ २७८ ॥
आणि ज्याला दान द्यावे तो असा पहावा की ज्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही प्रकारे फेड करता येणार नाही ॥१७-२७८॥
साद घातलिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा ।
का पाहिला आरसा । येरीकडे ॥ २७९ ॥
आकाशाला हाक मारली असता जसे आकाश प्रतिध्वनि देत नाही अथवा आरसा मागच्या बाजूला पाहिला असता तो प्रतिबिंब दाखवीत नाही ॥१७-२७९॥
नातरी उदकाचिये भूमिके । आफळिलेनि कंदुकें ।
उधळौनि कवतिकें । न येईजे हाता ॥ २८० ॥
पाण्याच्या सपाटीवर हापटलेला चेंडू उशी देऊन जसा आपण होऊन हाताशी येत नाही. ॥१७-२८०॥
नाना वसो घातला चारू । माथां तुरंबिला बुरू ।
न करी प्रत्युपकारू । जियापरी ॥ २८१ ॥
अथवा पोळ जर चरावयास सोडला अथवा कृतघ्न मनुष्याचे मस्तक (प्रेमाने) हुंगले (त्यावर कितीही प्रेम केले) तर तो ज्याप्रमाणे प्रेमाचा मोबदला करीत नाही ॥१७-२८१॥
तैसें दिधलें दातयाचें । जो कोणेही आंगें नुमचे ।
अर्पिलया साम्य तयाचें । कीजे पैं गा ॥ २८२ ॥
त्याप्रमाणे जो दान घेणारा, दात्याने दिलेल्या दानाचा कोणत्याही प्रकारे मोबदला करू शकणार नाही, त्यास दान अर्पण केल्यावर, दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये. ॥१७-२८२॥
ऐसिया जें सामग्रिया । दान निफजे वीरराया ।
तें सात्त्विक दानवर्या । सर्वांही जाण ॥ २८३ ॥
हे वीरराजा अर्जुना, अशा सामुग्रीने जे दान उत्पन्न होते ते सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे समज. ॥१७-२८३॥
आणि तोचि देशु काळु । घडे तैसाचि पात्रमेळु ।
दानभागुही निर्मळु । न्यायगतु ॥ २८४ ॥
आणि (रजोगुणी दानाच्या बाबतीत) तोच (सत्वगुणी दानासारखा) देश व काल आणि सत्पात्र वगैरेंचा योग जुळतो आणि तसाच निर्मळ व न्यायाने मिळालेले असे दानभाग, यांचा एकत्र योग आलेला असतो. ॥१७-२८४॥
यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।
दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥ २१ ॥
जे दान (पूर्वी झालेल्या अथवा पुढे होणार्‍या) उपकाराचा मोबदला म्हणूण अथवा फलाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने दिले जाते, त्या दानाला राजस दान म्हणतात. ॥१७-२१॥
परी मनीं धरूनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें ।
का पेंव करूनि आइतें । पेरूं जाइजे ॥ २८५ ॥
परंतु दुभत्याची आशा धरून ज्याप्रमाणे गाईला पोसावे किंवा दाणे साठवण्याकरता अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरावयास जावे ॥१७-२८५॥
नाना दिठी घालुनि आहेरा । अवंतुं जाइजे सोयिरा ।
का वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ॥ २८६ ॥
अथवा अहेराच्या प्राप्तीवर लक्ष ठेऊन सोयर्‍या धायर्‍यास जसे आमंत्रण करण्यास जावे अथवा ओवसा करणारीचे घरी जसे वाण पाठवावे ॥१७-२८६॥
पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचें काज कीजे ।
पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी ॥ २८७ ॥
आधी व्याजाचे पैसे गाठीला बांधून मग दुसर्‍याचे काम जसे करावे अथवा पूजा (द्रव्य) घेऊन मग जसे रोग्यास औषध द्यावे, ॥१७-२८७॥
तैसें जया जें दान देणें । तो तेणेंचि गा जीवनें ।
पुढती भुंजावा भावें येणें । दीजे जें का ॥ २८८ ॥
असे ज्याचे दान देणे असते आणि आपण जे दान केले आहे तेवढ्याच साधनाने तो दान घेणारा पुन्हा आपल्या उपयोगी पडावा अशा भावनेने जेव्हा दान दिले जाते ॥१७-२८८॥
अथवा कोणी वाटे जातां । घेतलें उमचों न शकता ।
मिळे जैं पंडुसुता । द्विजोत्तमु ॥ २८९ ॥
अथवा अर्जुना, कोणी एका वाटेने जाणारा की जो घेतलेल्या दानाचा मोबदला करू शकणार नाही, असा चांगला ब्राह्मण जर मिळाला; ॥१७-२८९॥
तरी कवड्या एकासाठीं । अशेषां गोत्रांचींच किरीटी ।
सर्व प्रायश्चित्तें सुयें मुठीं । तयाचिये ॥ २९० ॥
तर एका पैशाच्या दानाबद्दल अर्जुना, गोत्राच्या (कुटुंबाच्या संपूर्ण माणसांच्या) सर्व प्रायश्चित्ताचे उदक त्याचा हातावर सोडतो. ॥१७-२९०॥
तेवींचि पारलौकिकें । फळें वांछिजती अनेकें ।
आणि दीजे तरी भुके । येकाही नोहे ॥ २९१ ॥
त्याचप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा करतो आणि दिलेले तर (ते इतके थोडे असते की) ते (एका वेळेच्या) भुकेलाही पुरत नाही. ॥१७-२९१॥
तेंही ब्राह्मणु नेवो सरे । कीं हाणिचेनि शिणें झांसुरें ।
सर्वस्व जैसें चोरें । नागऊनि नेलें ॥ २९२ ॥
ते अल्पदान देखील तो ब्राह्मण घेऊन गेला की नुकसानीच्या शीणाने तो राजस दान करणारा मनात झुरतो. जणु काय चोराने त्याचे सर्वस्व लुटून नेले. ॥१७-२९२॥
बहु काय सांगों सुमती । जें दीजे या मनोवृत्ती ।
तें दान गा त्रिजगतीं । राजस पैं ॥ २९३ ॥
हे सुमति अर्जुना, फार काय सांगू ? अशा संकल्पाने जे दिले जाते ते दान ह्या जगातील राजस दान होय. ॥१७-२९३॥

अदेशकाले यद्दनमपात्रेभ्यश्च दीयते ।
असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥ २२ ॥
अयोग्य ठिकाणी, अयोग्य काली, अपात्र मनुष्यांना जे सत्काररहित व अवहेलनापूर्वक दान दिले जाते, त्याला तामस दान असे म्हणतात. ॥१७-२२॥
मग म्लेंच्छांचे वसौटें । दांगाणे हन कैकटे ।
का शिबिरें चोहटे । नगरींचे ते ॥ २९४ ॥
मग म्लेंच्छांच्या राहाण्याच्या ठिकाणी, अरण्यात धर्मकृत्यास अयोग्य ठरलेल्या देशात अथवा छावणीत अथवा शहराच्या चव्हाट्यावर, ॥१७-२९४॥
तेही ठाईं मिळणी । समयो सांजवेळु कां रजनी ।
तेव्हां उदार होणें धनीं । चोरियेच्या ॥ २९५ ॥
तशात त्या ठिकाणी तिन्हीसांजा अथवा रात्रीची वेळ प्राप्त झाली असता त्या प्रसंगी चोरून आणलेल्या द्रव्यावर उदार होणे ॥१७-२९५॥
पात्रें भाट नागारी । सामान्य स्त्रिया का जुवारी ।
जिये मूर्तिमंते भुररीं । भुले तया ॥ २९६ ॥
(तेथे दान देण्यास योग्य कोण ?) तर भाट, गारुडी, वेश्या, जुगार खेळणारे लोक वगैरे मूर्तिम्ंत भूलच आहेत, त्यांना भुलतो. ॥१७-२९६॥
रूपानृत्याची पुरवणी । ते पुढां डोळेभारणी ।
गीत भाटीव तो श्रवणीं । कर्णजपु ॥ २९७ ॥
त्यात रूपाची व नृत्याची भर पुढे असता, ती डोळ्याला भूल पाडते व भाटांचे (स्तुतिपाठकांचे) गाणे हा कानात कर्णजप असतो, ॥१७-२९७॥
तयाहीवरी अळुमाळु । जैं घे फुलागंधाचा गुगुळु ।
तंव भ्रमाचा तो वेताळु । अवतरे तैसा ॥ २९८ ॥
त्यात आणखी जेव्हा थोडासा फुलांचा व चंदनादि द्रव्यांचा वासरूपी गुगुळाचा धूप घेतो तेव्हा तो तमोगुणी जसा वेताळ प्रगट व्हावा तसा जणुकाय भ्रमाचा वेताळच प्रगट होतो. ॥१७-२९८॥
तेथ विभांडूनियां जग । आणिले पदार्थ अनेग ।
तेणें घालूं लागे मातंग । गवादी जैसी ॥ २९९ ॥
तेव्हा मग लोकांना लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्या योगाने मांगांना अन्नछत्र घालतो, ॥१७-२९९॥
एवं ऐसेनि जें देणें । तें तामस दान मी म्हणें ।
आणि घडे दैवगुणें । आणिकही ऐक ॥ ३०० ॥
अशा प्रकारे जे जे दान करतात, ते तामस दान असे मी म्हणतो. आणि आणखीही दैववशात एकदा (सुयोग) घडून आला ॥१७-३००॥
विपायें घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे ।
तैसे तामसां पर्व जोडे । पुण्यदेशीं ॥ ३०१ ॥
तर लाकडे कोरणार्‍या घुणा नामक किड्याकडून कोरण्याच्या क्रियेत जसे क्वचितच अक्षर कोरले जावे किंवा टाळी वाजवतांना ती मधे जसा कावळा क्वचितच सापडावा त्याप्रमाणे तमोगुणी मनुष्याला पुण्यस्थळी पर्वकालाचा योग क्वचितच सापडावा. ॥१७-३०१॥
तेथ देखोनि तो आथिला । योग्यु मागोंही आला ।
तोही दर्पा चढला । भांबावें जरी ॥ ३०२ ॥
त्यावेळी तो तमोगुणी पुरुष संपन्न आहे असे पाहून योग्य (सत्पात्र) असा ब्राह्मण मागावयास आला व हा (तमोगुणी दाता) तशात अभिमानाच्या अतिरेकामुळे भांबावलेला (गुंग) असलाच (आणि त्याच्या मनात त्या ब्राह्मणाला काही द्यावे असे आलेच ॥१७-३०२॥
तरी श्रद्धा न धरी जिवीं । तया माथाही न खालवी ।
स्वयें न करी ना करवी । अर्घ्यादिक ॥ ३०३ ॥
तर अंत:करणात श्रद्धा धरीत नाही, त्याला मस्तक खाली लववून नमस्कारही करीत नाही अगर दुसर्‍याकडून करवीत नाही. ॥१७-३०३॥
आलिया न घली बैसों । तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो ।
हा अप्रसंगु कीर असो । तामसीं नरीं ॥ ३०४ ॥
जेथे आलेल्या सत्पात्र ब्राह्मणाला बसावयास आसन घालत नाही, तेथे गंध, अक्षता वगैरे अर्पण करणे, हा अधिकपणा कोठचा ? हे सर्व प्रकार त्या तामस पुरुषाच्या ठिकाणी खरोखर असंभवनीयच होत. ॥१७-३०४॥
पैं बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु ।
तूं करणें याचा बहुतु । प्रयोगु तेथ ॥ ३०५ ॥
ज्याप्रमाणे काही तरी थोडेसे देऊन सावकाराची रवानगी करावी, त्याप्रमाणे सत्पात्र ब्राह्मणाच्या हातावर अल्प दान देऊन, त्याची बोळवणूक करून फसवतो. त्या तमोगुणाच्या ठिकाणी अरे तुरे म्हणण्याची रीत फार असते. ॥१७-३०५॥
आणि जया जें दे किरीटी । तयातें उमाणी तयासाठीं ।
मग कुबोलें कां लोटी । अवज्ञेच्या ॥ ३०६ ॥
आणि अर्जुना, ज्याला जे देतो तेवढ्यावर त्याला मोजतो, (म्हणजे येवढेच तुला देण्याची योग्यता आहे असे त्या दान घेणारास म्हणतो) आणि नंतर वाईट शब्द बोलून अथवा अपमान करून त्यास लाऊन देतो. ॥१७-३०६॥
हें बहु असो यापरी । मोल वेंचणें जें अवधारीं ।
तया नांव चराचरीं । तामस दान ॥ ३०७ ॥
हे फार बोलणे राहू दे. या प्रकाराने जे द्रव्य खर्च करणे, त्याला चराचरात ‘तामस दान’ असे म्हणतात. ॥१७-३०७॥
ऐशीं आपुलाला चिन्हीं । अळंकृतें तिन्हीं ।
दानें दाविलीं अभिधानीं । रजतमाचिया ॥ ३०८ ॥
याप्रमाणे आपापल्या लक्षणांनी सुशोभित (युक्त) अशी तिन्ही दाने तुला दाखवली. (सांगितली, परंतु) या रजोगुणी व तमोगुणी दानाकडे (ती टाळण्याकरता) तू लक्ष दे. ॥१७-३०८॥
तेथ मी जाणत असें । विपायें तूं गा ऐसें ।
कल्पिसील मानसें । विचक्षणा ॥ ३०९ ॥
हे बुद्धिमान अर्जुना, मी हे जाणत आहे की येथे तू कदाचित मनाने अशा तर्‍हेची कल्पना करशील की ॥१७-३०९॥
जें भवबंधमोचक । येकलें कर्म सात्त्विक ।
तरी कां वेखासी सदोख । येर बोलावीं ? ॥ ३१० ॥
एकटे सात्विक कर्म संसारपाशापासून सोडवणारे आहे. असे जर आहे तर संसारपाशापासून सोडवण्याच्या कामी विरुद्ध जे इतर दोषयुक्त रज व तम, यांचे वर्णन कशाला करावे ? ॥१७-३१०॥
परी नोसंतितां विवसी । भेटी नाहीं निधीसी ।
का धूं न साहतां जैसी । वाती न लगे ॥ ३११ ॥
परंतु ज्याप्रमाणे पिशाचाला दूर केल्याशिवाय पुरलेले द्रव्य हाती येत नाही, अथवा धूर सहन केला नाही तर जसा दिवा लागणार नाही, ॥१७-३११॥
तैसें शुद्धसत्त्वाआड । आहे रजतमाचें कवाड ।
तें भेदणे यातें कीड । म्हणावें कां ? ॥ ३१२ ॥
त्याप्रमाणे शुद्ध सत्वगुणाच्या आड रजोगुण व तमोगुण यांचा पडदा आहे. तो नाहीसा करण्याला अर्जुना वाईट का म्हणावे ? ॥१७-३१२॥
आम्ही श्रद्धादि दानांत । जें समस्तही क्रियाजात ।
सांगितलें कां व्याप्त । तिहीं गुणीं ॥ ३१३ ॥
श्रद्धेपासून आरंभा करून अखेर दानापर्यंत सर्व क्रियामात्र तिन्ही गुणांनी व्याप्त आहेत, म्हणून जे आम्ही सांगितले ॥१७-३१३॥
तेथ भरंवसेनि तिन्ही । न सांगोंचि ऐसें मानीं ।
परी सत्त्व दावावया दोन्ही । बोलिलों येरें ॥ ३१४ ॥
तेथे खरोखरच तीन गुण सांगण्याचा आमचा इरादा नव्हता. परंतु सत्वगुणाचे स्वरूप स्पष्ट समजावण्याकरता दुसरे रजोगुण व तमोगुण हे दोन आम्ही बोललो असे समज. ॥१७-३१४॥ज
जें दोहींमाजीं तिजें असे । तें दोन्ही सांडितांचि दिसे ।
अहोरात्रत्यागें जैसें । संध्यारूप ॥ ३१५ ॥
ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता या दोहोमधील असणार्‍या संध्याकालाचे रूप दिसते, त्याप्रमाणे दोन्हीमधे जे तिसरे आहे ते दोन्हीचा त्याग केला असता दिसते. ॥१७-३१५॥
तैसें रजतमविनाशें । तिजें जें उत्तम दिसे ।
तें सत्त्व हें आपैसें । फावासि ये ॥ ३१६ ॥
त्याप्रमाणे रज व तमाच्या नाशाने तिसरे उत्तम जे दृष्टोत्पत्तीस येते, तो सत्वगुण होय हे आपोआपच कळून येते. ॥१७-३१६॥
एवं दाखवावया सत्त्व तुज । निरूपिलें तम रज ।
तें सांडूनि सत्त्वें काज । साधीं आपुलें ॥ ३१७ ॥
याप्रमाने तुला सत्वगुण स्पष्ट समजण्याकरता रजोगुण व तमोगुण यांचे वर्णन केले. त्या रजतमांचा त्याग करून सत्वगुणाच्या योगाने तू आपले काम साधून घे. ॥१७-३१७॥
सत्त्वेंचि येणें चोखाळें । करीं यज्ञादिकें सकळें ।
पावसी तैं करतळें । आपुलें निज ॥ ३१८ ॥
त्या शुद्ध सत्वगुणानेच याज्ञादिक सर्व क्रिया कर, म्हणजे त्या योगाने तुला ते स्वरूप तळहातावर घेतलेल्या पदार्थासारखे प्राप्त होईल. ॥१७-३१८॥
सूर्यें दाविलें सांतें । काय एक न दिसे तेथें ।
तेवीं सत्त्वें केलें फळातें । काय नेदी ? ॥ ३१९ ॥
सूर्याने प्रकशित केले असता या जगात काय एक दिसणार नाही ? त्याप्रमाणे सत्वगुणाने केलेले कर्म कोणत्या फळाला देणार नाही ? ॥१७-३१९॥
हे कीर आवडतांविखीं । शक्ति सत्त्वीं आथी निकी ।
परी मोक्षेंसी एकीं । मिसळणें जें ॥ ३२० ॥
खरोखर वाटेल ते फळ प्राप्त करून देण्याच्या बाबतीत सात्विक कर्माची पद्धति चांगली आहे. परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ॥१७-३२०॥
तें एक आनचि आहे । तयाचा सावावो जैं लाहे ।
तैं मोक्षाचाही होये । गांवीं सरतें ॥ ३२१ ॥
ते निराळेच आहे. त्याचे साह्य जेव्हा सात्विक कर्माला मिळते तेव्हा त्या सात्विक कर्माचा मोक्षाच्या गावात देखील प्रवेश होतो. ॥१७-३२१॥
पैं भांगार जर्‍हीं पंधरें । तर्‍ही राजावळींचीं अक्षरें ।
लाहें तैंचि सरे । जियापरी ॥ ३२२ ॥
सोने पंधराच्या दराचे (शंभर नंबरी) असले तरी त्यास जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात, तेव्हाच ते ज्या प्रमाणे चालते, (त्याची किंमत होते), ॥१७-३२२॥
स्वच्छें शीतळें सुगंधें । जळें होती सुखप्रदें ।
परी पवित्रत्व संबंधें । तीर्थाचेनि ॥ ३२३ ॥
स्वच्छ, थंड व सुगंधी असे पाण्याचे प्रकार सुख देणारे असतात, परंतु त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थाच्या संबंधाने येतो. ॥१७-३२३॥
नयी हो कां भलतैसी थोरी । परी गंगा जैं अंगीकारी ।
तैंचि तिये सागरीं । प्रवेशु गा ॥ ३२४ ॥
नदी वाटेल तितकी मोठी का असेना ? परंतु गंगा जेव्हा तिचा अंगिकार करील तेव्हाच अर्जुना, तिचा समुद्रात प्रवेश होईल. ॥१७-३२४॥
तैसें सात्त्विका कर्मां किरीटी । येतां मोक्षाचिये भेटी ।
न पडे आडकाठी । तें वेगळें आहे ॥ ३२५ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, सात्विक कर्माला मोक्षाच्या भेटीला येत असतांना ज्याच्या योगाने विघ्न येत नाही ते वेगळेच आहे. ॥१७-३२५॥
हा बोलु आइकतखेवीं । अर्जुना आधि न माये जीवीं ।
म्हणे देवें कृपा करावी । सांगावें तें ॥ ३२६ ॥
हे देवाचे बोलणे ऐकताक्षणीच अर्जुनाच्या अंत:करणात उत्कंठा मावेना व तो म्हणाला, देवांनी कृपाकरून ते मला सांगावे. ॥१७-३२६॥
तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक तयाची व्यक्ती ।
जेणें सात्त्विक तें मुक्ती- । रत्‍न देखे ॥ ३२७ ॥
तेव्हा सर्व कृपाळुवांचे सार्वभौम राजे, श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, ज्याच्या योगाने त्या सात्विक कर्माच्या आटोक्यात ते मोक्षरूपी रत्न येते ते ऐक. ॥१७-३२७॥
ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।
ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥ २३ ॥
ॐ तत् सत् असा तीन प्रकारचा ब्रह्माचा नामनिर्देश श्रुतीने सांगितला आहे. या नामाच्या योगाने पूर्वी (प्रजापतीने) ब्राह्मण, वेद आणि यज्ञ निर्माण केले आहेत. ॥१७-२३॥
तरी अनादि परब्रह्म । जें जगदादि विश्रामधाम ।
तयाचें एक नाम । त्रिधा पैं असे ॥ ३२८ ॥
तरी जे परब्रह्म आरंभरहित असून जगाचे उत्पत्तिस्थान व विश्रांतिस्थान आहे त्याचे एक नाव तीन प्रकारचे आहे. ॥१७-३२८॥
तें कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती-/ ।
माजी वोळखावया श्रुती । खूण केली ॥ ३२९ ॥
परंतु अविद्यासमुदायरूपी रात्रीत सापडलेल्या जीवांनी ब्रह्मास ओळखावे, एवढ्यासाठी श्रुतींनी त्या परब्रह्मास जी खूण केली ते त्या ब्रह्माचे नाव होय. ॥१७-३२९॥
उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं ।
ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी ॥ ३३० ॥
नुकतेच जन्मास आलेले मूल आपल्याबरोबर नाव घेऊन येत नाही, (परंतु त्या मुलाला) ठेवलेल्या नावाने हाक मारली असता ते ओ देत उठते. ॥१७-३३०॥
कष्टले संसारशीणें । जे देवों येती गार्‍हाणें ।
तयां ओ दे नांवें जेणें । तो संकेतु हा ॥ ३३१ ॥
संसारदु:खाने शिणलेले जीव ब्रह्माकडे आपले दु:ख निवेदन करण्याकरता येतात, त्या जीवांना ज्या नावाने ब्रह्म ओ देत उठते, तो हा संकेत (नामरूपी खूण) होय. ॥१७-३३१॥
ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैततत्त्वें तो भेटावा ।
ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदें बापें ॥ ३३२ ॥
जीवाचा व ब्रह्माचा फार काळापासून अबोला आहे, तो नाहीसा व्हावा व ते ब्रह्म अद्वैतपणे (जीवास) भेटावे, म्हणून वेदरूपी बापाने सर्व जीवाची दया मनात घेऊन हा नाममंत्र शोधून काढला. ॥१७-३३२॥
मग दाविलेनि जेणें एकें । ब्रह्म आळविलें कवतिकें ।
मागां असत ठाके । पुढां उभें ॥ ३३३ ॥
मग वेदाने दाखवलेल्या ज्या एका नामाने ब्रह्मास हाक मारली असता ते ब्रह्म (वृत्तीच्या) मागे असूनही (वृत्तीच्या) पुढे उभे रहाते ॥१७-३३३॥
परी निगमाचळशिखरीं । उपनिषदार्थनगरीं ।
आहाति जे ब्रह्माच्या येकाहारीं । तयांसीच कळे ॥ ३३४ ॥
परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदाच्या अर्थरूपी शरहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत त्यांनाच हे नाममाहात्म्य कळते. ॥१७-३३४॥
हेंही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती ।
ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥ ३३५ ॥
हे देखील राहू दे, ब्रह्मदेवामधे जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे, ती ज्या एका नामाच्या आवर्तनाने आली आहे, ॥१७-३३५॥
पैं सृष्टीचिया उपक्रमा-/ पूर्वीं गा वीरोत्तमा ।
वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥ ३३६ ॥
परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे वीरोत्तमा अर्जुना, ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता, ॥१७-३३६॥
मज ईश्वरातें नोळखे । ना सृष्टिही करूं न शके ।
तो थोरु केला एकें । नामें जेणें ॥ ३३७ ॥
मला ईश्वराला तो ओळखत नव्हता अथवा सृष्टी करण्याचे सामर्थ्यही नव्हते, तो ज्या एका नामाने समर्थ केला ॥१७-३३७॥
जयाचा अर्थु जीवीं ध्यातां । जें वर्णत्रयचि जपतां ।
विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥ ३३८ ॥
त्या नामाच्या अर्थाचे अंत:करणात चिंतन केल्यामुळे आणि ज्या नामाच्या त्या शब्दांचा (ॐ, तत्, सत्) जप केल्यामुळे त्याला (ब्रह्मदेवाला) सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली ॥१७-३३८॥
तेधवां रचिलें ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन ।
यज्ञा ऐसें वर्तन । जीविकें केलें ॥ ३३९ ॥
तेव्हा त्याने ब्राह्मण लोक उत्पन्न केले व त्यांना आचरणाची पद्धत शिकवणारे वेद दिले आणि यज्ञासारखा धंदा (कर्म) उदरनिर्वाहार्थ उत्पन्न केला. ॥१७-३३९॥
पाठीं नेणों किती येर । स्रजिले लोक अपार ।
जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्हीं भुवनें ॥ ३४० ॥
नंतर किती असंख्य लोक (ब्रह्मदेवाने) उत्पन्न केले हे कळत नाही, (व त्या उत्पन्न केलेल्या लोकांना) तिन्ही भुवने हे ब्रह्मदेवाने दिलेले इनाम झाले. ॥१७-३४०॥
ऐसें नाममंत्रें जेणें । धातया अढंच करणें ।
तयाचें स्वरूप आइक म्हणे । श्रीकांतु तो ॥ ३४१ ॥
असे ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला थोर केले, त्याचे स्वरूप तू ऐक, असे लक्ष्मीचा भर्ता श्रीकृष्ण म्हणाला. ॥१७-३४१॥
तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा ।
आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ॥ ३४२ ॥
तरी सर्व मंत्रांचा राजा तो ‘ॐ’ ते त्या नावातील पहिले अक्षर समजा, ‘तत्’ हे दुसरे अक्षर होय व ‘सत्’ हे तिसरे अक्षर आहे. ॥१७-३४२॥
एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हें त्रिप्रकारु ।
हें फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचें ॥ ३४३ ॥
याप्रमाने ‘ॐ तत् सत्’ या रूपाने ब्रह्माचे हे नाम तीन झाले आहे. ह्या सुंदर फुलाचा वास उपनिषदे घेतात. म्हणजे उपनिषदांनी याचा चांगला विचार केला आहे. ॥१७-३४३॥
येणेंसीं गा होऊनि एक । जैं कर्म चाले सात्त्विक ।
तैं कैवल्यातें पाइक । घरींचें करी ॥ ३४४ ॥
जेव्हा सात्विक कर्म या नामाशी मिळून चालते (म्हणजे जेव्हा सात्विक कर्म या ब्रह्मनामाच्या विनियोगासहित होते) तेव्हा ते सात्विक कर्म मोक्षाला घरचा चाकर करते. ॥१७-३४४॥
परी कापुराचें थळींव । आणून देईल दैव ।
लेवों जाणणेंचि आडव । तेथ असे बापा ॥ ३४५ ॥
कापुराचे दागिने दैव आणून देईल परंतु बाबा ते दागिने अंगावर कसे घालावे हे समजण्याचीच अडचण आहे. ॥१७-३४५॥
तैसें आदरिजेल सत्कर्म । उच्चरिजेल ब्रह्मनाम ।
परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचें ॥ ३४६ ॥
याप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रह्मनामही उच्चारले जाईल, परंतु विनियोगाचे रहस्य जर समजले जाणार नाही ॥१७-३४६॥
तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी ।
मानूं नेणतां परवडी । मुद्दल तुटे ॥ ३४७ ॥
तर साधूंचे समुदाय आपण होऊन घरी आले असताही त्यांचा आदरसत्कार कसा करावा हे न समजून जर गैररीतीने त्यांच्याशी वर्तन केले, तर पुण्यक्षय होतो. ॥१७-३४७॥
कां ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट ।
घालूनि बांधिली मोट । गळा जेवीं ॥ ३४८ ॥
अथवा चांगला एक श्रृंगार करण्याकरता सोन्याचे व जडावाचे दागिने एके ठिकाणी गोळा करून त्याची गाठोडी जशी गळ्यात अडकवावी ॥१७-३४८॥
तैसें तोंडीं ब्रह्मनाम । हातीं तें सात्त्विक कर्म ।
विनियोगेंवीण काम । विफळ होय ॥ ३४९ ॥
त्याप्रमाणे मुखाने ब्रह्मनामाचा उच्चार करतो आणि हाताने सात्विक कर्म करतो (परंतु) योजनेच्या हातवटीशिवाय ते कर्म निष्फळ होते. ॥१७-३४९॥
अगा अन्न आणि भूक । पासीं असे परी देख ।
जेऊं नेणतां बालक । लंघनचि कीं ॥ ३५० ॥
विचार कर. अर्जुना, जवळ अन्नही तयार आहे आणि भूक देखील लागली आहे, तरी तान्ह्या मुलाला जेवावे कसे, हे कळत नसल्याने जसा उपवासच घडेल ॥१७-३५०॥
का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा ।
हातवटी नेणतां वीरा । प्रकाशु नोहे ॥ ३५१ ॥
अथवा अर्जुना, तेल वात व अग्नि ही एकत्र आली असता जर दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश होणार नाही, ॥१७-३५१॥
तैसे वेळे कृत्य पावे । तेथिंचा मंत्रुही आठवे ।
परी व्यर्थ तें आघवें । विनियोगेंवीण ॥ ३५२ ॥
त्याप्रमाणे वेळेवर योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला व त्या कर्मसंबंधाचा मंत्रही आठवला, परंतु ते सर्व विनियोगावाचून व्यर्थ आहे. ॥१७-३५२॥
म्हणौनि वर्णत्रयात्मक । जे हें परब्रह्मनाम एक ।
विनियोगु तूं आइक । आतां याचा ॥ ३५३ ॥
म्हणून तीन शब्दांचे जे हे एक परब्रह्माचे नाव आहे, या ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करावा ते तू ऐक. ॥१७-३५३॥
तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥ २४ ॥
म्हणून नेहेमी ब्रह्मवाद्यांच्या (मोक्षार्थी मनुष्याच्या) शास्त्राला अनुसरून होणार्‍या यज्ञ, दान, तप इत्यादि क्रिया ॐ अक्षराचा उच्चार करून सुरू होत असतात. ॥१७-२४॥
तरी या नामींचीं अक्षरें तिन्हीं । कर्मा आदिमध्यनिदानीं ।
प्रयोजावीं पैं स्थानीं । इहीं तिन्हीं ॥ ३५४ ॥
तरी या नामाची जी तीन अक्षरे आहेत, ती कर्माच्या आरंभी मधे व शेवटी या तीन ठिकाणी योजावी. ॥१७-३५४॥
हेंचि एकी हातवटी । घेउनि हन किरीटी ।
आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये ॥ ३५५ ॥
अर्जुना हीच एक हातवटी घेऊन ब्रह्मवेत्ते ब्रह्मसाक्षात्काराला प्राप्त झाले. ॥१७-३५५॥
ब्रह्मेंसीं होआवया एकी । ते न वंचती यज्ञादिकीं ।
जे चावळलें वोळखीं । शास्त्रांचिया ॥ ३५६ ॥
शास्त्राला जाणून जे बोलतात, ते आपले ब्रह्माशी ऐक्य होण्याकरता, यज्ञादिक कर्मांचा त्याग करत नाहीत. ॥१७-३५६॥
तो आदि तंव ओंकारु । ध्यानें करिती गोचरु ।
पाठीं आणिती उच्चारु । वाचेही तो ॥ ३५७ ॥
ते पुरुष कर्माच्या आरंभी तर ध्यानाने ॐअकार सिद्ध करतात. ॥१७-३५७॥
तेणें ध्यानें प्रकटें । प्रणवोच्चारें स्पष्टें ।
लागती मग वाटे । क्रियांचिये ॥ ३५८ ॥
त्या ध्यानाने ॐकार सिद्ध झाल्यावर व नंतर ॐकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माच्या आचरणाला लागतात. ॥१७-३५८॥
आंधारीं अभंगु दिवा । आडवीं समर्थु बोळावा ।
तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभीं ॥ ३५९ ॥
अंधारामधे जसा केव्हाही न विझणारा दिवा अथवा अरण्यातून बरोबर पोहोचविण्याला जसा सामर्थ्यवान सोबती असावा त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी ॐकार समजावा. (कर्मारंभी ॐकाराची योजना केली असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडते). ॥१७-३५९॥
उचितदेवोद्देशे । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें ।
द्विजद्वारां हन हुताशें । यजिती पैं ते ॥ ३६० ॥
धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या योग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा अथवा अग्नीद्वारा यज्ञ करतात. ॥१७-३६०॥
आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपीं हवनीं ।
यजिती पैं विधानीं । फुडे हौनी ॥ ३६१ ॥
आहवनियादी अग्नीत त्यागात्मक हवनाने यज्ञ करतात, परंतु विधानात निष्णात होऊन करतात. ॥१७-३६१॥
किंबहुना नाना याग । निष्पत्तीचे घेउनि अंग ।
करिती नावडतेया त्याग । उपाधीचा ॥ ३६२ ॥
फार काय सांगावे ? अनेक यज्ञ चांगल्या तर्‍हेने पार पाडून ज्या ज्या उपाधींचा (देहाहंकाराचा वगैरे) आपल्यास उपसर्ग होत असेल, त्यांचा त्याग करतात. ॥१७-३६२॥
कां न्यायें जोडला पवित्रीं । भूम्यादिकीं स्वतंत्रीं ।
देशकाळशुद्ध पात्रीं । देती दानें ॥ ३६३ ॥
अथवा न्यायाने (धर्माने) मिळवलेल्या व पवित्र अशा आपल्या मालकीच्या जमिनी वगैरे मालमत्तेचे शुद्ध अशा देशकाल व पात्राचे ठिकाणी दान देतात. ॥१७-३६३॥
अथवा एकांतरां कृच्छ्रीं । चांद्रायणें मासोपवासीं ।
शोषोनि गा धातुराशी । करिती तपें ॥ ३६४ ॥
अथवा अर्जुना, एकांतराने, कृच्छ्राने, चांद्रायणाने अथवा मासोपवासाने शरीरशोषण करून तप करतात ॥१७-३६४॥
एवं यज्ञदानतपें । जियें गाजती बंधरूपें ।
तिहींच होय सोपें । मोक्षाचें तयां ॥ ३६५ ॥
याप्रमाणे यज्ञ, दान, तपे ही बंधरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी परंतु त्यांच्या आरंभी प्रणवोच्चार केला असता तीच यज्ञादिक कर्मे त्या करणार्‍याला मोक्ष सोपा करून देतात. ॥१७-३६५॥
स्थळीं नावा जिया दाटिजे । जळीं तियांचि जेवीं तरीजे ।
तेवीं बंधकीं कर्मीं सुटिजे । नामें येणें ॥ ३६६ ॥
जमिनीवर ज्या नावेचे (होडी) ओझे वाटते, त्याच नावेच्या योगाने पाण्यात चांगले तरता येते. त्याप्रमाणे बांधणारी कर्मे करूनच, त्या नामाच्या योगाने सुटका होते. (म्हणजे मोक्ष मिळतो). ॥१७-३६६॥
परी हें असो ऐसिया । या यज्ञदानादि क्रिया ।
ओंकारें सावायिलिया । प्रवर्तती ॥ ३६७ ॥
परंतु आता हे राहू दे. अशा तर्‍हेने या यज्ञदानादिक क्रिया ॐकाराच्या सहाय्याने चालू होतात. ॥१७-३६७॥
तिया मोटकिया जेथ फळीं । रिगों पाहाती निहाळीं ।
प्रयोजिती तिये काळीं । तच्छब्दु तो ॥ ३६८ ॥
त्या क्रिया जेव्हा फळामधे अल्पसा प्रवेश करू पहातात, तेव्हा पहा की (त्या कर्मफलाचे ठिकाणी) ते पुरुष ‘तत्’ शब्दाचा विनियोग करतात. म्हणजे तत् शब्दाने बोधित होणारे जे ब्रह्म त्याला फळासह कर्म अर्पण करतात). ॥१७-३६८॥
तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः ।
दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥ २५ ॥
मोक्षाची इच्छा करणारे, फलाची अपेक्षा न धरता यज्ञ, तप आणि दान यांच्या विविध क्रिया ‘तत्’ अक्षाराचा उच्चार करून करीत असतात. (फलाचे ठिकाणी तत् शब्दाचा विनियोग करतात.) ॥१७-२५॥
जें सर्वांही जगापरौतें । जें एक सर्वही देखतें ।
तें तच्छब्दें बोलिजे तें । पैल वस्तु ॥ ३६९ ॥
जी वस्तु सर्वही जगापलीकडे आहे, जी एक वस्तु सर्वांचाही द्रष्टा आहे आणि जी सर्वांच्या पलीकडे आहे ती वस्तु तत् शब्दाने सांगितली जाते. ॥१७-३६९॥
तें सर्वादिकत्वें चित्तीं । तद्रूप ध्यावूनियां सुमती ।
उच्चारेंही व्यक्ती । आणिती पुढती ॥ ३७० ॥
हे बुद्धिमान अर्जुना, ते तत् नामाचे ब्रह्म सर्वांच्या आरंभीचे आहे असे याचे चित्तात ध्यान करून मग उच्चारानेही स्पष्टतेस आणतात. (तत् असा स्पष्ट उच्चार करतात).॥१७-३७०॥
म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया । फळेंसीं क्रिया इयां ।
तेंचि होतु आम्हां भोगावया । कांहींचि नुरो ॥ ३७१ ॥
आणि ते म्हणतात की या सर्व यज्ञादिक क्रिया फळासह त्या ‘तत्’ स्वरूप ब्रह्मालाच होवोत (अर्पण असोत). आम्हाला भोगायला काही उरू नये. ॥१७-३७१॥
ऐसेनि तदात्मकें ब्रह्में । तेथ उगाणूनि कर्में ।
आंग झाडिती न ममें । येणें बोलें ॥ ३७२ ॥
याप्रमाणे तत् शब्दात्मक ब्रह्माने (तत् असा ब्रह्मनामाचा उच्चार करून व तेथे (तत् शब्दाने दर्शविलेल्या ब्रह्माचे ठिकाणी) कर्मे अर्पण करून ‘न मम’ (माझी नाही) या शब्दाने अंग झाडतात. आपला व कर्माचा संबंध तोडतात). ॥१७-३७२॥
आतां ओंकारें आदरिलें । तत्कारें समर्पिलें ।
इया रिती जया आलें । ब्रह्मत्व कर्मा ॥ ३७३ ॥
आता ॐकाराच्या विनियोगाने ज्या कर्माचा आरंभ झाला आहे व तत् शब्दाच्या विनियोगाने जे ब्रह्माचे ठिकाणी अर्पण केले आहे, अशा प्रकारे ज्या कर्माला ब्रह्मत्व आले आहे. ॥१७-३७३॥
तें कर्म कीर ब्रह्माकारें । जालें तेणेंही न सरे ।
जे करी तेणेंसी दुसरें । आहे म्हणौनि ॥ ३७४ ॥
ते कर्म ब्रह्मरूप झाले खरे, परंतु तेवढ्याने संपत नाही. कारण ब्रह्मरूप झालेले कर्म व कर्ता यात भेद रहातो. म्हणून (कारण कर्ता, आपल्याला ब्रह्माहून वेगळा समजतो म्हणून). ॥१७-३७४॥
मीठ आंगें जळीं विरे । परी क्षारता वेगळी उरे ।
तैसें कर्म ब्रह्माकारें । गमे तें द्वैत ॥ ३७५ ॥
मीठ अंगाने पाण्यात विरते, परंतु मिठाचा खारटपणा पाण्याहून वेगळा रहातो, त्याप्रमाणे कर्म जरी ब्रह्माकार झाले तरी कर्ता वेगळा उरतो हे द्वैत भासते. ॥१७-३७५॥
आणि दुजे जंव जंव घडे । तंव तंव संसारभय जोडे ।
हें देवो आपुलेनि तोंडें । बोलती वेद ॥ ३७६ ॥
आणि जसजसे द्वैत उत्पन्न होते तसतसे संसारभय प्राप्त होते, देव आपल्या तोंडाने व वेदाच्या द्वारा हे बोलत आहेत. ॥१७-३७६॥
म्हणौनि परत्वें ब्रह्म असे । तें आत्मत्वें परीयवसे ।
सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें ॥ ३७७ ॥
म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे, ते आत्मत्वाने अनुभवास येईल ही उणीव काढण्याचे उद्देशाने देवाने ‘सत्’ शब्द ठेवला आहे. ॥१७-३७७॥
तरी ओंकार तत्कारीं । कर्म केलें जें ब्रह्मशरीरीं ।
जें प्रशस्तादि बोलवरी । वाखाणिलें ॥ ३७८ ॥
तर ॐकार व तत्कार यांच्या विनियोगाने जे कर्म शरीरात ब्रह्मरूप केलेले आहे व ज्या कर्माची प्रशस्त (श्रेष्ठ) वगैरे शब्दांनी स्तुती केली आहे ॥१७-३७८॥
प्रशस्तकर्मीं तिये । सच्छब्दा विनियोगु आहे ।
तोचि आइका होये । तैसा सांगों ॥ ३७९ ॥
त्या प्रशस्त कर्माचे ठिकाणी सत् शब्दाचा विनियोग आहे तोच ऐका. तो आहे तसा सांगतो. ॥१७-३७९॥

सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।
प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥ २६ ॥
(कर्ता) सद्रूप (ब्रह्मरूप) होण्याकरता व (व्यंगसहित कर्म) अव्यंग होण्याकरता सत् अक्षराचा उपयोग करतात. तसेच हे पार्था (ॐकारतत्कारांनी युक्त अशा) प्रशस्त कर्माचे ठिकाणी सत् शब्दाचा उपयोग करतात. ॥१७-२६॥
तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें ।
दाविजे अव्यंगवाणें । सत्तेचें रूप ॥ ३८० ॥
तर या ‘सत्’ शब्दाने असत् पदार्थमात्राचा निरास करून, सत्तेचे (ब्रह्माचे) निर्दोष स्वरूप दाखवले जाते. ॥१७-३८०॥
जें सत् तेंचि काळें देशें । होऊं नेणेचि अनारिसे ।
आपणपां आपण असे । अखंडित ॥ ३८१ ॥
ज्या सत्तेचे स्वरूप देशाने अथवा कालाने बदलणे जाणत नाही व जी सत्ता आपण आपल्या ठिकाणी अखंडित आहे ॥१७-३८१॥
हें दिसतें जेतुलें आहे । तें असतपणें जें नोहे ।
देखतां रूपीं सोये । लाभे जयाची ॥ ३८२ ॥
हे जेवढे साकार जगत् दिसत आहे तेवढे असत् असल्याकारणाने जी ब्रह्मवस्तु, ते जगत् नाही असे पाहिल्याबरोबर (अनुभवल्याबरोबर) ज्या ब्रह्मवस्तूच्या स्वरूपाचा आश्रय मिळतो ॥१७-३८२॥
तेणेंसीं प्रशस्त तें कर्म । जें जालें सर्वात्मक ब्रह्म ।
देखिजे करूनि सम । ऐक्यबोधें ॥ ३८३ ॥
सर्वात्मक ब्रह्म झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे त्या सत् संज्ञक ब्रह्माशी ऐक्य करून त्यास आपल्यासह अद्वैत अनुभवाने पहावे. ॥१७-३८३॥
तरी ओंकार तत्कारें । जें कर्म दाविलें ब्रह्माकारें ।
तें गिळूनि होईजे एकसरें । सन्मात्रचि ॥ ३८४ ॥
तर ॐकार व तत्कार यांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप झाल्याचे दाखवले ते गिळून (ते कर्म ब्रह्मस्वरूप झाले खरे, पण ते कृत्य करणारा मी वेगळा आहे, ही भावना नाहीशी करून) एकदम ब्रह्ममात्रच व्हावे. ॥१७-३८४॥
ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु ।
जाणा म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणें हो ॥ ३८५ ॥
असा हा सत् शब्दाचा अंतरंग विनियोग समज, असे श्रीकृष्ण म्हणतात. अहो मी (ज्ञानदेव असे म्हणत नाही). ॥१७-३८५॥
ना मीचि जरी हो म्हणें । तरी श्रीरंगीं दुजें हेंचि उणें ।
म्हणौनि हें बोलणें । देवाचेंचि ॥ ३८६ ॥
अथवा ‘असे माझे म्हणणे आहे’ असे जर मी म्हटले असते तर भगवंताहून मी वेगळा आहे असे होऊन त्याचे स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता व (भगवत्स्वरूपाचे ठिकाणी द्वैत उत्पन्न करणे) हाच कमीपणा आला असता. ॥१७-३८६॥
आतां आणिकीही परी । सच्छब्दु हा अवधारीं ।
सात्त्विक कर्मा करी । उपकारु जो ॥ ३८७ ॥
आता हा सत् शब्द आणखीही एक प्रकाराने, जो सात्विक कर्मावर उपकार करतो तो ऐक. ॥१७-३८७॥
तरी सत्कर्में चांगें । चालिलीं अधिकारबगें ।
परी एकाधें कां आंगें । हिणावती जैं ॥ ३८८ ॥
तर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली असली, तरीपण जेव्हा ती एखाद्या अंगाने कमी पडतात ॥१७-३८८॥
तैं उणें एकें अवयवें । शरीर ठाके आघवें ।
कां अंगहीन भांडावें । रथाची गती ॥ ३८९ ॥
तर ज्याप्रमाणे एक अवयव कमी असल्याने सर्व शरीर (शरीराचे सर्व व्यापार) थांबते अथवा चाक वगैरे एखाद्या अवयव नसलेल्या रथाची गती बंद पडते, ॥१७-३८९॥
तैसें एकेंचि गुणेंवीण । सतचि परी असतपण ।
कर्म धरी गा जाण । जिये वेळे ॥ ३९० ॥
त्याप्रमाणे असे समज की ज्या वेळेला एकच गुण (एखादे अंग) नसल्याकारणाने सत्कर्मच असत्कर्मपणा धारण करते. ॥१७-३९०॥
तेव्हां ओंकार तत्कारीं । सावायिला हा चांगी परी ।
सच्छब्दु कर्मा करी । जीर्णोद्धारु ॥ ३९१ ॥
तेव्हा ॐकार व तत्कार यांनी चांगल्या प्रकारे साह्य केलेला हा सत् शब्द कर्माचा जीर्णोद्धार करतो. ॥१७-३९१॥
तें असतपण फेडी । आणी सद्‍भावाचिये रूढी ।
निजसत्त्वाचिये प्रौढी । सच्छब्दु हा ॥ ३९२ ॥
हा सत् शब्द आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असत्पण नाहीसे करतो व त्या कर्माला सत्पणाच्या व्यवहाराला आणतो. ॥१७-३९२॥
दिव्यौषध जैसें रोगिया । कां सावावो ये भंगलिया ।
सच्छब्दु कर्मा व्यंगलिया । तैसा जाण ॥ ३९३ ॥
रोग्याला जशी दिव्यौषधी मिळाली (असता तो जसा निरोगी होतो) अथवा धैर्य खचलेल्या मनुष्याला जसे साह्य मिळाले असता त्यास पुन्हा धैर्य येते त्याप्रमाणे न्यून झालेल्या कर्माला सत् शब्द (पूर्ण करणारा) आहे असे समज. ॥१७-३९३॥
अथवा कांहीं प्रमादें । कर्म आपुलिये मर्यादे ।
चुकोनि पडे निषिद्धे । वाटे हन ॥ ३९४ ॥
अथवा काही चुकीने कर्म आपली मर्यादा सोडून निषिद्ध वाटेला पडले, ॥१७-३९४॥
चालतयाही मार्गु सांडे । पारखियाचि अखरें पडे ।
राहाटीमाजीं न घडे । काइ काइ ? ॥ ३९५ ॥
एखाद्या वाटेने नेहेमी चालणारा मनुष्यही ती वाट चुकतो, परीक्षकाच्या पदरात (नजरचुकीने) अखरे (म्हणजे खोटे) पडते, व्यवहारामधे काय घडत नाही ? (व्यवहारात कोणती चूक घडत नाही ? ॥१७-३९५॥
म्हणौनि तैसी कर्मा । राभस्यें सांडे सीमा ।
असाधुत्वाचिया दुर्नामा । येवों पाहे जें ॥ ३९६ ॥
म्हणून त्याप्रमाणे अविचाराने कर्माची मर्याद सुटते व ते कर्म जेव्हा दुष्कर्माच्या वाईट नावाला येऊ पहाते, ॥१७-३९६॥
तेथ गा हा सच्छब्दु । येरां दोहींपरीस प्रबुद्धु ।
प्रयोजिला करी साधु । कर्मातें यया ॥ ३९७ ॥
अर्जुना तेथे हा सत् शब्द जो इतर दोन (ॐकार व तत्कार) पेक्षा प्रौढ आहे तो योजला असता त्या कर्माला सत्कर्मत्व आणतो. ॥१७-३९७॥
लोहा परीसाची घृष्टी । वोहळा गंगेची भेटी ।
कां मृता जैसी वृष्टी । पीयूषाची ॥ ३९८ ॥
लोखंडाला जसे परिसाचे घासणे, ओढ्याला कशी गंगेची भेट अथवा मेलेल्याला जसा अमृताचा वर्षाव, ॥१७-३९८॥
पैं असाधुकर्मा तैसा । सच्छब्दुप्रयोगु वीरेशा ।
हें असो गौरवुचि ऐसा । नामाचा यया ॥ ३९९ ॥
हे वीरेशा अर्जुना, सत् शब्दाचा प्रयोग (विनियोग) वाईट कर्माला तसा आहे. ॥१७-३९९॥
घेऊनि येथिंचें वर्म । जैं विचारिसी हें नाम ।
तैं केवळ हेंचि ब्रह्म । जाणसी तूं ॥ ४०० ॥
वर सांगितलेल्या ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म लक्षात घेऊन जेव्हां तूं या ब्रह्मनामाचा विचार करशील, तेव्हां केवळ हे नामच ब्रह्म आहे असे तुला कळेल. ॥१७-४००॥
पाहें पां ॐतत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे ।
जेथूनि कां हें प्रकाशे । दृश्यजात ॥ ४०१ ॥
हे पहा, ज्याचेकडून हे सर्व दृश्यमात्र प्रकाशले जाते, त्या ठिकाणी ‘ॐ तत् सत्’ हे बोलणे ( हा नामोच्चार) नेते. ॥१७-४०१॥
तें तंव निर्विशिष्ट । परब्रह्म चोखट ।
तयाचें हें आंतुवट । व्यंजक नाम ॥ ४०२ ॥
ते ठिकाण तर निधर्म व शुद्ध असे परब्रह्म आहे, पण (ॐ तत् सत्) हे त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखवणारे नाम आहे. ॥१७-४०२॥
परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा ।
या नामानामी आश्रयो तैसा । अभेदु असे ॥ ४०३ ॥
आकाश या नावाला आकाश हाच जसा एक आधार आहे, (कारण दोघे एकच आहेत), त्याप्रमाणे ‘ॐ तत् सत्’ या नामाला व नामीला (ब्रह्माला) आश्रय अभेद आहे. (म्हणजे ॐ तत् सत् या नावाचा व परब्रह्म वस्तूचा अभेद आहे. ॥१७-४०३॥
उदयिला आकाशीं । रवीचि रवीतें प्रकाशी ।
हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्मचि करी ॥ ४०४ ॥
आकाशात उगवलेला सूर्यच जसा सूर्याला प्रकाशतो त्याप्रमाणे ‘ॐ तत् सत्’ या नामाचा उच्चार ब्रह्माला प्रकाशित करतो. ॥१७-४०४॥
म्हणौनि त्र्यक्षर हें नाम । नव्हे जाण केवळ ब्रह्म ।
ययालागीं कर्म । जें जें कीजे ॥ ४०५ ॥
म्हणून हे तीन अक्षरी नाम हे नाव नव्हे तर केवळ ब्रह्म आहे, असे समज. एवढ्याकरता जे जे कर्म करावे ॥१७-४०५॥
यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।
कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥ २७ ॥
यज्ञ, तप व दान यांच्यातील न्यूनता जाऊन संपूर्णता प्राप्त होणे यालाही सत् म्हणतात, त्याच्याकरता केलेल्या व म्हणून तद्रूप बनलेल्या कर्मालाही सत् असे म्हणतात. ॥१७-२७॥
तें याग अथवा दानें । तपादिकेंही गहनें ।
तियें निफजतु कां न्यूनें । होऊनि ठातु ॥ ४०६ ॥
ती कर्मे यज्ञ असोत, दाने असोत अथवा कठिण तापादिक असोत व ती पूर्ण अथवा अपुरी होऊन राहोत. ॥१७-४०६॥
परी परीसाचा वरकली । नाहीं चोखाकिडाची बोली ।
तैसी ब्रह्मीं अर्पितां केलीं । ब्रह्मचि होती ॥ ४०७ ॥
परंतु परिसाच्या कसोटीवर जशी चांगले वाईट सोने ही भाषा नाही, त्याप्रमाणे (या नामाच्या विनियोगाने) केलेली कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केली असता ब्रह्मच होतात. ॥१७-४०७॥
उणिया पुरियाची परी । नुरेचि तेथ अवधारीं ।
निवडूं न येती सागरीं । जैसिया नदी ॥ ४०८ ॥
ज्याप्रमाणे समुद्रात लहानमोठ्या नद्या वेगळेपणाने ओळखता येत नाहीत, त्याप्रमाणे नामाच्या विनियोगाने ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलेल्या कर्मात न्यून कर्मे व सांग कर्मे असा हा प्रकार रहात नाही असे समज. ॥१७-४०८॥
एवं पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची हे शक्ती ।
सांगितली उपपत्ती । डोळसा गा ॥ ४०९ ॥
हे डोळस अर्जुना, याप्रमाणे तुला ब्रह्मनामाच्या सामर्थ्याचा विचार सांगितला. ॥१७-४०९॥
आणि येकेकाही अक्षरा । वेगळवेगळा वीरा ।
विनियोगु नागरा । बोलिलों रीती ॥ ४१० ॥
हे वीरा अर्जुना, आणि एका एका अक्षराची वेगवेगळी योजना (कर्माच्या ठिकाणी कोठे न कशी करावयाची ही) चांगल्या रीतीने मी सांगितली. ॥१७-४१०॥
एवं ऐसें सुमहिम । म्हणौनि हें ब्रह्मनाम ।
आतां जाणितलें कीं सुवर्म । राया तुवां ? ॥ ४११ ॥
आता याप्रमाणे असे चांगले माहात्म्य असलेले जे ब्रह्मनाम आहे, म्हणून मर्मज्ञ राजा अर्जुना, तू हे ब्रह्मनाम जाणलेस काय ? ॥१७-४११॥
तरी येथूनि याचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा ।
जयाचें जालें बंधा । उरों नेदी ॥ ४१२ ॥
तर या नामाविषयीच तुझी श्रद्धा नेहेमी विस्तारलेली असू दे. (कारण) या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म, जन्ममरणरूपी बंधाला उरू देत नाही. ॥१७-४१२॥
जिये कर्मीं हा प्रयोगु । अनुष्ठिजे सद्विनियोगु ।
तेथ अनुष्ठिला सांगु । वेदुचि तो ॥ ४१३ ॥
ज्या कर्मामधे (या नामाचा) सद्विनियोगासह प्रयोग अनुष्ठिला जातो तेथे संपूर्ण वेदच अनुष्ठिला असे समजा. ॥१७-४१३॥
अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।
असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥ २८ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
हे पार्था, अश्रद्धेने केलेले हवन, दिलेले दान, आचरलेले तप व केलेले कर्म जे असेल, त्याला असत् असे म्हणतात. मरण पावल्यावर (म्हणजे परलोकी) त्याचे फल मिळत नाही व इहलोकीही नाही. ॥१७-२८॥
ना सांडूनि हे सोये । मोडूनि श्रद्धेची बाहे ।
दुराग्रहाची त्राये । वाढऊनियां ॥ ४१४ ॥
अथवा नामाचा हा मार्ग टाकून, श्रद्धेचा आधार नाहीसा करून व दुराग्रहाचे बल वाढवून ॥१७-४१४॥
मग अश्वमेध कोडी कीजे । रत्‍नें भरोनि पृथ्वी दीजे ।
एकांगुष्ठींही तपिजे । तपसाहस्रीं ॥ ४१५ ॥
मग कोट्यावधि अश्वमेध केले, रत्नांनी भरून पृथ्वीचे दान दिले अथवा एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्षे तपश्चर्या केली ॥१७-४१५॥
जळाशयाचेनि नांवें । समुद्रही कीजती नवे ।
परी किंबहुना आघवें । वृथाचि तें ॥ ४१६ ॥
तलाव म्हणून समुद्र जरी नवे बनवले, परंतु फार काय सांगावे ते सर्व व्यर्थच आहे. ॥१७-४१६॥
खडकावरी वर्षले । जैसें भस्मीं हवन केलें ।
कां खेंव दिधलें । साउलिये ॥ ४१७ ॥
ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत जसा होम करावा, अथवा सावलीला जसे आलिंगन द्यावे ॥१७-४१७॥
नातरी जैसें चडकणा । गगना हाणितलें अर्जुना ।
तैसा समारंभु सुना । गेलाचि तो ॥ ४१८ ॥
अथवा अर्जुना, आकाशाला चापटीने मारावे, त्याप्रमाणे तो खटाटोप व्यर्थ गेला. ॥१७-४१८॥
घाणां गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे ।
तैसें दरिद्र तेवढें । ठेलेंचि आंगीं ॥ ४१९ ॥
घाण्यामधे गोटे गाळले असता ज्याप्रमाणे तेल अथवा पेंड काहीच प्राप्त होत नाही, परंतु स्वत:स दारिद्र्य तेवढे रहातेच, ॥१७-४१९॥
गांठीं बांधली खापरी । येथ अथवा पैलतीरीं ।
न सरोनि जैसी मारी । उपवासीं गा ॥ ४२० ॥
पदरात बांधलेली खापरखुंटी नदीच्या अलिकडल्या तीरावरील गावात अथवा पलीकडल्या तीरावरील गावात (पैसा म्हणून) न चालल्या कारणाने उपाशी मारते ॥१७-४२०॥
तैसें कर्मजातें तेणें । नाहीं ऐहिकीचें भोगणें ।
तेथ परत्र तें कवणें । अपेक्षावें ॥ ४२१ ॥
त्याप्रमाणे नामाच्या श्रद्धेशिवाय केलेल्या सर्व कर्मांनी ऐहिक भोग मिळत नाहीत, तेथे परलोकाची कोणी आशा करावी ? ॥१७-४२१॥
म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा । सांडूनि कीजे जो धांदा ।
हें असो सिणु नुसधा । दृष्टादृष्टीं तो ॥ ४२२ ॥
म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जी खटपट करावयाची ती राहू दे. कारण तो इहपरलोकी नुसता शीण आहे. ॥१७-४२२॥
ऐसें कलुषकरिकेसरी । त्रितापतिमिरतमारी ।
श्रीवर वीर नरहरी । बोलिलें तेणें ॥ ४२३ ॥
पापरूपी हत्तीचे (नाश करणारे) सिंह त्रिविधतापरूपी अंध:काराचे सूर्य, वीरांमधे श्रेष्ठ असे जे श्रीनरहरि (श्रीकृष्ण), ते असे बोलले. ॥१७-४२३॥
तेथ निजानंदा बहुवसा-/। माजीं अर्जुन तो सहसा ।
हरपला चंद्रु जैसा । चांदिणेनि ॥ ४२४ ॥
चंद्र जसा चांदण्याने झाकला जातो म्हणजे तद्रूप होतो तसा तो अर्जुन त्यावेळी अतिशय स्वानंदात एकदम तद्रूप झाला. ॥१७-४२४॥
अहो संग्रामु हा वाणिया । मापें नाराचांचिया आणिया ।
सूनि माप घे मवणिया । जीवितेंसी ॥ ४२५ ॥
अहो ध्तराष्ट्र राजा, युद्ध हा वाणी, बाणांची अग्रे हीच कोणी मापे, ती घालून तो जीवितासह मांसाचे माप घेतो (मांसाची मोजणी करतो.) ॥१७-४२५॥
ऐसिया समयीं कर्कशें । भोगीजत स्वानंदराज्य कैसें ।
आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाईं ॥ ४२६ ॥
पहा. आज (अर्जुनाशिवाय) दुसर्‍या ठिकाणी असा भाग्योदय नाही. ॥१७-४२६॥
संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझों ये रिपूचिया ।
आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ ॥ ४२७ ॥
संजय म्हणतो, हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, शत्रूच्या गुणांना पाहून संतोष होतो आणि हा अर्जुन तर यावेळी आमच्या सुखाचा (आम्हाला आत्मसुख देणारा) गुरूही आहे. ॥१७-४२७॥
हा न पुसता हे गोठी । तरी देवो कां सोडिते गांठी ।
तरी कैसेंनि आम्हां भेटी । परमार्थेंसीं ॥ ४२८ ॥
हा अर्जुन जर ही गोष्ट न विचारता, तर देवांनी आत्मज्ञानाच्या गाठोड्याची गाठ कशी सोडली असती ? आणि मग परमार्थाचा आम्हाला लाभ कशाने झाला असता ? ॥१७-४२८॥
होतों अज्ञानाच्या आंधारां । वोसंतीत जन्मवाहरा ।
तों आत्मप्रकाशमंदिरा-/। आंतु आणिलें ॥ ४२९ ॥
अज्ञानाच्या अंधारात जन्म (मरण) रूपी रस्ता (आपण) काढीत होतो, तो आपणाला आत्मप्रकाशरूपी मंदिरात आणले. ॥१७-४२९॥
एवढा आम्हां तुम्हां थोरु । केला येणें उपकारु ।
म्हणौनि हा व्याससहोदरु । गुरुत्वें होय ॥ ४३० ॥
या अर्जुनाने तुम्हा आम्हावर एवढ मोठा उपकार केला आहे, म्हणून गुरूच्या नात्यानेही (अर्जुन) व्यासाचा भाऊच आहे. ॥१७-४३०॥
तेवींचि संजयो म्हणे चित्तीं । हा अतिशयो या नृपती ।
खुपेल म्हणौनि किती । बोलत असों ॥ ४३१ ॥
त्याचप्रमाणे संजय आपल्या मनात म्हणतो, हा अतिप्रसंग ह्या धृतराष्ट्राच्या वर्मी लागेल म्हणून आपण किती बोलत आहोत ! (बोललो हे फार झाले). ॥१७-४३१॥
ऐसी हे बोली सांडिली । मग येरीचि गोठी आदरिली ।
जे पार्थें कां पुसिली । श्रीकृष्णातें ॥ ४३२ ॥
असे हे अर्जुनाच्या गुणवर्णनाचे भाषण (संजयाने) पुरे केले आणि मग अर्जुनाने जी गोष्ट श्रीकृष्ननाथाला विचारली होती, ती तिसरीच गोष्ट बोलण्यास आरंभ केला. ॥१७-४३२॥
याचें जैसें कां करणें । तैसें मीही करीन बोलणें ।
ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥ ४३३ ॥
संजयाने अर्जुनाचे गुणवर्णन करण्याचे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा आरंभ केला तसे व्याख्यान मीही करीन, ते श्रोत्यांनी ऐकावे, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥१७-४३३॥शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref:satsangdhara 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *