सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा

(ओव्या १ ते १०५)

(ओव्या १०६ ते १८६)

(ओव्या १८७ ते २६४)

(ओव्या २६५ ते ३४३)

(ओव्या ३४४ ते ४४०)

(ओव्या ४४१ ते ५३५)


वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार


तरी अवधान एकलें दीजे । मग सर्वसुखासि पात्र होईजे ।
हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका ॥ १ ॥
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, – अहो श्रोते हो तर तुम्ही एकवेळ श्रवणाकडे लक्ष द्या, म्हणजे मग सर्व सुखाला पात्र व्हाल. हे माझे उघड प्रतिज्ञेचे बोलणे ऐका. ॥९-१॥

परी प्रौढी न बोलों हो जी । तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं ।
देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची ॥ २ ॥
परंतु महाराज, तुमच्या सारख्या सर्व जाणत्यांच्या सभेमधे मी हे आढ्यतेने बोलत नाही. ‘लक्ष द्यावे’ ही माझी लडिवाळपणाची विनंती आहे. ॥९-२॥

कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती ।
जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसीं ॥ ३ ॥
कारण तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणारांचे लाड पुरतात व मनोरथ करणारांचे उंच डोलारे पूर्ण होतात. (मनाने रचलेले कल्पित पदार्थही) प्रत्यक्ष प्राप्त होतात. ॥९-३॥

तुमचे या दिठिवेयाचिये वोलें । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ।
ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥ ४ ॥
तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळा टवटवित झाला. त्य़ाची ती सावली पाहून महाराज, तेथे मी भागलेला लोळत आहे. ॥९-४॥

प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणौनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वोलावो लाहों ।
येथही जरी सलगी करूं बिहों । तरी निवों कें पां ? ॥ ५ ॥
महाराज, आपण सुखरूपी अमृताचे डोह अहात, म्हणून आम्ही आपल्या इच्छेनुरूप गारवा प्राप्त करून घेतो. येथे देखील जर आम्ही लडिवाळपणा करण्यास भ्यालो तर मग आम्ही शांत कोठे व्हावे ? ॥९-५॥

नातरी बालक बोबडां बोलीं । कां वांकुडा विचुका पाउलीं ।
ते चोज करूनि माउली । रिझे जेवीं ॥ ६ ॥
अथवा लेकरु बोबडे बोलत असले, अथवा वेडेवाकडे पाऊल टाकीत असले तर त्यावरून त्याचे कौतुक करून आई जशी समाधान पावते, ॥९-६॥

तेवीं तुम्हां संतांचा पढियावो । कैसेनि तरी आम्हांवरी हो ।
या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करीत ॥ ७ ॥
त्याप्रमाणे तुम्हा संतांचे प्रेम कशाने तरी आमच्यावर व्हावे अशी आमची फार इच्छा असल्यामुळे महाराज, आम्ही सलगी करत आहोत. ॥९-७॥

वांचूनि माझिये बोलतिये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते ।
काय धड्यावरी सारस्वतें । पढों सिकिजे ॥ ८ ॥
वास्तविक पाहिले तर आपल्यासारख्या सर्वज्ञ श्रोत्यांपुढे ‘माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या म्हणजे सर्व सुखाला पात्र व्हाल’ असे बोलण्याची माझी योग्यता काय आहे ? (आपण सर्वज्ञ असल्यामुळे आपणास केव्हा कोठे लक्ष द्यावे हे सहजच कळते. तसेच आपण स्वत: सुखरूप असल्यामुळे ‘माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे सुखाला प्राप्त व्हाल’ हे माझे बोलणे धारीष्ट्याचे आहे). सरस्वतीच्या मुलाला धडा घेऊन शिकवायचे आहे काय ? (तर नाही, सरस्वतीचा मुलगा स्वभावत:च सर्व जाणतो). ॥९-८॥

अवधारा आवडे तेसणा धुंधुरु । परि महातेजीं न मिरवे काय करूं ।
अमृताचिया ताटीं वोगरूं । ऐसी रससोय कैंची ? ॥ ९ ॥
ऐका, वाटेल तेवढा जरी काजवा असला तरी सूर्याच्या प्रकाशापुढे त्याचे तेज पडत नाही, त्याला काय करावे ? अमृताच्या ताटात वाढण्यासारखे पक्वान्न कोठून असणार ? ॥९-९॥

हां हो हिमकरासी विंजणें । कीं नादापुढें आइकवणें ।
लेणियासी लेणें । हें कहीं आथी ? ॥ १० ॥
अहो शीतल किरण असलेल्या चंद्राला पंख्याने वारा घालणे किंवा नादब्रह्मापुढे गाणे करणे, किंवा स्वत: अलंकारास दागिन्याने सजवणे असे कोठे झाले आहे काय ? ॥९-१०॥

सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणें ठायीं नाहावें ? ।
हें गगनचि आडे आघवें । ऐसा पवाडु कैंचा ? ॥ ११ ॥
सांगा, सुवासाने कशाचा वास घ्यावा ? समुद्राने कोणत्या ठिकाणी स्नान करावे ? हे सर्व आकाशच ज्यामधे मावेल अशी मोठी विस्तृत वस्तु कोठून असणार ? ॥९-११॥

तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये ।
ऐसें वक्तृत्व कवणा आहे । जेणें रिझा तुम्ही ? ॥ १२ ॥
त्याप्रमाणे तुमची ऐकण्याची इच्छा तृप्त होईल आणि तुम्ही म्हणाल की ‘याला म्हणावे व्याख्यान’ व ज्या योगाने तुमचे मन रंगून जाईल असे वक्तृत्व कोणाजवळ आहे ? ॥९-१२॥

तरी विश्वप्रगटितिया गभस्ती । काय हातिवेन न कीजे आरती ? ।
कां चुळोदकें आपांपती । अर्घ्यु नेदिजे ? ॥ १३ ॥
तरी जग उजेडात आणणार्‍या सूर्याला काडवातीने ओवाळू नये काय ? ॥९-१३॥

प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितुसें भक्ती ।
म्हणौनि बोल जर्‍ही गंगावती । तर्‍ही स्वीकाराल कीं ॥ १४ ॥
महाराज, तुम्ही मूर्तिमंत शंकर अहात आणि मी दुर्बळ मनुष्य भक्तीने पूजा करत आहे. म्हणून बेलाऐवजी मी जरी निर्गुंडी वहात आहे तरी आपण बेल समजूनच तिचा स्वीकार कराल. ॥९-१४॥

बाळक बापाचिये ताटीं रिगे । आणि बापातेंचि जेवऊं लागे ।
कीं तो संतोषिलेनि वेगें । मुखचि वोढवी ॥ १५ ॥
लहान मूल बापाच्या ताटात जेवावयास बसते आणि पानात शिरून बापालाच जेवू घालावयास लागते. पण बाप न रागावता उलट आनंदाच्या भरात आपले तोंडच त्याच्यापुढे करतो. ॥९-१५॥

तैसा मीं जरी तुम्हांप्रती । चावटी करीतसें बाळमती ।
तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची असे ॥ १६ ॥
त्याप्रमाणे जरी मी तुमच्याशी बालबुद्धीने बडबड करीत आहे तरी त्यामुळे तुम्ही आनंदीच व्हावे असा ह्या प्रेमाचा स्वभाव आहे. ॥९-१६॥

आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें । तुम्हीं संत घेतले असा बहुवें ।
म्हणौनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां ॥ १७ ॥
आणि त्या आपलेपणाच्या प्रेमाने (ज्ञानोबा आमचा आहे अशा) प्रेमाने तुम्ही संत अतिशय घेरलेले आहात. म्हणून मी केलेल्या सलगीचे तुम्हाला ओझे वाटणार नाही. ॥९-१७॥

अहो तान्हयाचें लागतां झटें । तेणें अधिकचि पान्हा फुटे ।
रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि ॥ १८ ॥
अहो, गाईच्या सडाला तिच्या वासराने ढुसणी मारली तर त्या योगाने जास्तच पान्हा फुटतो, (कारण) आवडत्याच्या रागाने प्रेम दुप्पट होत असते. ॥९-१८॥

म्हणौनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैलें ।
तें चेइलें ऐसें जी जाणवलें । यालागीं बोलिलो मीं ॥ १९ ॥
म्हणून तुमचे निजलेले कृपाळूपण ते मज लेकराच्या बोलण्याने जागे झाले हे मला कळले, महाराज, याकरता ‘अवधन द्या’ असे मी बोललो. ॥९-१९॥

एर्‍हवीं चांदिणें पिकविजत आहे चेपणीं ? । कीं वारया घापत आहे वाहणी ? ।
हां हो गगनासि गंवसणी । घालिजे केवीं ? ॥ २० ॥
वास्तविक पाहिले तर चांदणे आढीत पिकवतात काय ? किंवा वार्‍याला कोणी गति दिली आहे काय ? अहो महाराज, आकाशाला गवसणी कशी घालावी ? ॥९-२०॥

आइका पाणी वोथिजावें न लगे । नवनीतीं माथुला न रिगे ।
तेवीं लाजिलें व्याख्यान निगे । देखोनि जयातें ॥ २१ ॥
ऐका ज्याप्रमाणे पाणी पातळ करावे लागत नाही, लोण्यामधे रवीचा प्रवेश होत नाही, त्याप्रमाणे ज्या संतांना पाहून माझे व्याख्यान लज्जित होऊन बाहेर निघत नाही. ॥९-२१॥

हें असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे ।
तो गीतार्थु मर्‍हाठिया बोलिजे । हा पाडु काई ? ॥ २२ ॥
हे असो, वेदांचे शब्द कुंठित झाले असता ते वेद ज्या गीतार्थरूपी बाजेवर निवांत निजतात, तो गीतार्थ मी मराठीमधे बोलावा ही माझी योग्यता आहे काय ? ॥९-२२॥

परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढति याचि येकी आशा ।
जे धिटींवा करूनि भवादृशां । पढियंतया होआवें ॥ २३ ॥
परंतु असे असूनही ही जी मला (गीतार्थ मराहीत सांगण्याची) तीव्र इच्छा झाली आहे, ती पुढच्या याच एका आशेने की धिटाई करून आपल्यासारख्यांचा मी आवडता व्हावे. ॥९-२३॥

तरि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें ।
तेणें अवधानें कीजो वाढतें । मनोरथां माझिया ॥ २४ ॥
तर आता चंद्रापेक्षाही शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढवणारे असे जे आपले लक्ष, त्य़ा लक्षाने माझ्या मनोरथांची वाढ करावी. ॥९-२४॥

कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थ सिद्धि मती पिके ।
एर्‍हवीं कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥
कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हा माझ्या बुद्धीत सर्वार्थ पूर्णपणे स्फुरतील व एरवी जर तुम्ही उदास रहाल तर अंकुरदशेला आलेले माझे ज्ञान सुकेल. ॥९-२५॥

सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा ।
तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं ॥ २६ ॥
तरी ऐका, की सहजच वक्त्याच्या वक्तृत्वाला श्रोत्यांचे लक्षरूपी खाद्य मिळेल तर वक्त्याच्या अक्षरांना प्रमेयांची दोंदे सुटातील ॥९-२६॥

अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावोचि अभिप्रायातें विये ।
भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी ॥ २७ ॥
आणखी दुसरे असे की वक्त्याच्या तोंडातून केव्हा शब्दोच्चार होईल याची अर्थ वाट पहात असतो व तेथे त्यावेळी एकापासून दुसरा असे अनेक अभिप्राय उत्पन्न होतात आणि बुद्धीवर भावाचा फुलोरा (फुलांचा बहर) होत जातो. (बुद्धीमधे अनेक अभिप्रायांच्या कल्पना स्फुरू लागतात). ॥९-२७॥

म्हणौनि संवादाचा सुवावो ढळे । तर्‍ही हृदयाकाश सारस्वतें वोळे ।
आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु ॥ २८ ॥
म्हणून उल्हासाने प्रश्नोत्तर देणे हाच कोणी अनुकूल वारा, तो सुटाला तर हृदयरूपी आकाशात शास्त्र सिद्धांतरूपी मेघ दाट येतील आणि श्रोता दुश्चित असेल तर व्याख्यानास आलेला रंग वितळून जाईल. ॥९-२८॥

अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे ।
म्हणौनि वक्ता तो वक्ता नोहे । श्रोतेनिविण ॥ २९ ॥
अहो चिंतामणी पाझरणारा आहे खरा, परंतु त्याला पाझरावयास लावण्याची युक्ती चंद्रामधेच आहे. (त्याप्रमाणे वक्ता पुष्कळ बोलेल खरा, पण त्याला बोलायला लावण्याची हातवटी श्रोत्यांमधे आहे. म्हणून लक्ष देऊन ऐकणार्‍या श्रोत्याशिवाय वक्ता हा वक्ताच नाही. ॥९-२९॥

परि आतां आमुतें गोड करावें । ऐसें तांदुळीं कायसा विनवावें ? ।
साइखडियानें काइ प्रार्थावें । सूत्रधारातें ? ॥ ३० ॥
परंतु आता आम्हाला गोड करून घ्या अशी ही तांदुळांनी खाणाराची प्रार्थना कशाकरता करावयाची ? लाकडाच्या बाहुल्यांनी सूत्रधाराची का प्रार्थना करावयाची ? ॥९-३०॥
तो काय बाहुलियांचिया काजा नाचवी ? । कीं आपुलिये जाणिवेची कळा वाढवी ।
म्हणौनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज ॥ ३१ ॥
तो सूत्रधार बाहुलीच्या कामाकरता तिला नाचवतो काय ? (तर नाही, मग) बाहुली नाचवण्याने तो आपल्या ज्ञानाचे चातुर्य वाढवतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘अवधान द्या’ अशी श्रोत्यांची विनवणी करण्याच्या उठाठेवीचे आम्हाला काय काम आहे ? ॥९-३१॥
तवं श्रीगुरू म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें ।
आतां सांगैं जें निरोपिलें । नारायणें ॥ ३२ ॥
तेव्हा श्रीगुरु निवृत्तिनाथ म्हणाले, ‘अरे, झाले तरी काय ? तुझी ही सर्व विनंती आम्हाला पावली. आता भगवंतांनी जे अर्जुनाला सांगितले, ते सांग. ॥९-३२॥
येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणौनि उल्हासें ।
अवधारा श्रीकृष्ण ऐसें । बोलते जाहले ॥ ३३ ॥ br>यावर निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव महाराज संतोषून उल्लासाने म्हणाले, जी महाराज, ऐका. श्रीकृष्ण याप्रमाणे बोलले. ॥९-३३॥
श्रीभगवानुवाच
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, अत्यंत गुह्य असे हे ब्रह्माचे ज्ञान, प्रपंचज्ञानासह, असूयारहित अशा तुला सांगतो. हे जाणल्याने तू दु:खप्रद अशा संसारापासून मुक्त होशील. ॥९-१॥
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज ।
जें हें अंतःकरणींचें गुज । जिवाचिये ॥ ३४ ॥
अथवा अर्जुना, हेच वर्म, जे माझ्या अंत:करणातील जीवाची गोष्ट आहे, ती तुला पुन्हा सांगतो. ॥९-३४॥
येणें मानें जीवाचें हिये फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें ? ।
ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥ ३५ ॥
इतक्या मानाने जिच्या आतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला का सांगावी अशी काही कल्पना तुझ्या मनात सहज जर आली असेल ॥९-३५॥
तरी परियेसी गा प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा ।
बोलिलिये गोष्टीची अवज्ञा । नेणसी करूं ॥ ३६ ॥
तर बुद्धिमान अर्जुना, ऐक. तू ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण आहेस (मूर्ति आहेस). आणि त्याचप्रमाणे सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणे तुला माहीत नाही. ॥९-३६॥
म्हणौनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलणेंही बोलावें घडो ।
परि आमुचिये जीवींचें पडो । तुझ्या जीवीं ॥ ३७ ॥
म्हणून आमचे गुप्तपण मोडले तर मोडो. शिवाय न बोलण्याची जी गोष्ट तीही बोलली जावो. पण आमच्या अंत:करणातील गुप्त गोष्ट तुझ्या मनात उतरो. ॥९-३७॥
अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड ।
म्हणौनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्यु मिळे ॥ ३८ ॥
बा अर्जुना, स्तनात खरोखर दूध असते, पण त्याची गोडी स्तनास नसते. याकरता एकनिष्ठ सेवन करणारा (आपले लेकरू) जर प्राप्त झाला तर त्या पिणार्‍याची इच्छा स्तनपान करून तृप्त होईना का ॥९-३८॥
मुडांहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें ।
तरि तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी ? ॥ ३९ ॥
कणगीतून बी काढले, आणि मग ते निर्मळ केलेल्या जमिनीत पेरले तर ते सांडण्या-लवंडण्यात गेले असे म्हणता येईल का ? ॥९-३९॥
यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती ।
पैं गा गौप्यही परी तयाप्रती । चावळिजे सुखें ॥ ४० ॥
याकरता चांगल्या मनाचा व शुद्ध बुधीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ श्रोता जर मिळाला तर त्यास आपली गुह्य गोष्ट असली तरी खुशाल सांगावी. ॥९-४०॥
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचून आणिक नाहीं ।
म्हणौनि गुज तरी तुझ्या ठायीं । लपऊं नये ॥ ४१ ॥
तर आता सध्या या गुणांनी युक्त तुझ्यावाचून दुसरा कोणी दिसत नाही, म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणी ती लपवून ठेवता येत नाही. ॥९-४१॥
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।
तरी ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ॥ ४२ ॥
आता वारंवार ‘गुह्य, गुह्य’ असे म्हटले असता तुला चमत्कारिक वाटेल. तर आता तुला सहजच प्रपंचज्ञानासहित आत्मज्ञान सांगेन. ॥९-४२॥
परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें ।
मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥ ४३ ॥
परंतु जसे खरेखोटे एकत्र मिसळले असता, ते परीक्षा करून निरनिराळे काढावे, त्याप्रमाणे स्पष्टतेने ज्ञानविज्ञान तुला सांगेन. ॥९-४३॥
कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें ।
तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥ ४४ ॥
अथवा ज्याप्रमाणे राजहंसाने आपल्या चोचीच्या चिमट्याने एकत्र मिसळलेले दूध व पाणी वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान व विज्ञान हे स्वच्छ वेगवेगळे सांगू. ॥९-४४॥
मग वारयाचिया धारसा । पडिन्नला कोंडा कां नुरेचि जैसा ।
आणि कणांचा आपैसा । राशिवा जोडे ॥ ४५ ॥
मळणी करून एकत्र मिसळलेले कण व भूस वार्‍याच्या धारेअर उफणले असता, मग जसा कोंडा उडून जाऊन धान्याची आपोआप रास जमते. ॥९-४५॥
तैसें जें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठीं ।
लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेच्या ॥ ४६ ॥
त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्याने, ते ज्ञान संसार संसाराच्या गाठी लाऊन (अनात्मतत्वाचे धर्म, अनात्मतत्वाच्या ठिकाणी ठेऊन) मोक्षरूपी लक्ष्मीच्या पटावर बसवते. ॥९-४६॥
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥
हे ज्ञान सर्व विद्याचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र, उत्कृष्ठ, प्रत्यक्ष अनुभावास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, सुखाने (अथवा सहज) आचरण करता (मिळावता) येणारे आणि क्षयरहित आहे. ॥९-२॥
जे जाणणेया आघवेयांच्या गांवीं । गुरुत्वाची आचार्य पदवी ।
जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥ ४७ ॥
जे स्वरूपज्ञान या सर्व विद्यांचे गावामधे श्रेष्ठत्वाच्या आचार्यपदावर आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व जे पवित्र गोष्टींचा राजा आहे ॥९-४७॥
आणि धर्माचें निजधाम । तेवींची उत्तमाचें उत्तम ।
पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥ ४८ ॥
आणि जे ज्ञान धर्माचे स्वत:चे रहाण्याचे घर आहे आणि त्याचप्रमाणे जे ज्ञान सर्व उत्तम पदार्थात उत्तम आहे व ज्या ज्ञानाच्या ठिकाणी प्राप्त झाले असता पुन: दुसर्‍या जन्माचे काम नाही. ॥९-४८॥
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे ।
प्रत्यक्ष फावों लागे तैसें । आपैसयाचि ॥ ४९ ॥
गुरुमुखातून ते ज्ञाना अंमळसे उगवतांना दिसते, पण ते हृदयात नित्यसिद्धच असते. तसे ते आपोआप प्रत्यक्ष अनुभवाला येऊ लागते. ॥९-४९॥
तेवींचि गा सुखाच्या पाउटीं । चढतां येइजे जयाच्या भेटी ।
मग भेटल्या कीर मिठी । भोगणेंयाही पडे ॥ ५० ॥
त्याचप्रमाणे अर्जुना, ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या पायर्‍यांनी यावयाचे असते आणि जे भेटले असता निश्चयेकरून भोगणेही संपते. ॥९-५०॥
परि भोगाचिये एलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलें सुखा भरे ।
ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥ ५१ ॥
परंतु भोगाच्या अलीकडच्या काठावर चित्त उभे राहिल्याबरोबर ते सुखाने पूर्ण भरून जाते असे ते (स्वरूपज्ञान) कष्टावाचून मिळाणारे व सोपे असून शिवाय ते श्रेष्ठ ब्रह्म आहे. ॥९-५१॥
पैं गा आणिकही एक याचें । जें हातां आलिया तरी न वचे ।
आणि अनुभवितां कांही न वेचे । वरि विटेहि ना ॥ ५२ ॥
अर्जुना, याचे आणखीही एक माहात्म्य आहे. ते असे की जे प्राप्त झाले असता कधी हातातून जात नाही आणि अनुभवले असता काही कमी होत नाही. शिवाय त्यात काही विकारही उत्पन्न होत नाहीत. ॥९-५२॥
येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका ।
ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ? ॥ ५३ ॥
या ठिकाणी तर्ककुशल अर्जुना, तू जर अशी शंका घेशील की एवढी ज्ञानासारखी वस्तु अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली ? ॥९-५३॥
जे एकोत्तरेयाचिया वाढी । जळतिये आगीं घालिती उडी ।
ते अनायासें स्वगोडी । सांडिती केवीं ? ॥ ५४ ॥
शंभराला एक व्याज मिळून एकशे एक रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीमधे (धोक्यात) उडी घालतात, असे जे लोक ते कष्टावाचून मिळणारी स्वरूपसुखाची गोडी कशी टाकतील ? ॥९-५४॥
तरी पवित्र आणि रम्य । तेवींचि सुखोपाय गम्य ।
आणि स्वसुख परम धर्म्य । वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥
तरी पवित्र व रम्य, त्याचप्रमाणे सुखोपायानेच प्राप्त होणारे व ते आपले स्वत:चेच सुख परंतु धर्माला धरून मिळणारे शिवाय ते आपल्याच ठिकाणी आपल्याला मिळते. ॥९-५५॥
ऐसा अवघाचि हा सुरवाडु आहे । तरी जना हातीं केविं उरों लाहे ।
हा शंकेचा ठावो कीर होये । परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥
याप्रमाणे हे सर्व प्रकारे सुखकर आहे तर ते लोकांच्या तडाख्यातून राहिले कसे ? ही खरोखर शंकेची जागा आहे, परंतु तू अशी शंका घेऊ नकोस. ॥९-५६॥
अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप ।
अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्युसंसारवर्त्मनि ॥ ३ ॥
हे शत्रुतापना, या (आत्मज्ञानरूपी धर्मावर श्रद्धा न ठेवणारे मनुष्य माझी प्राप्ती न होता मृत्यूने युक्त अशा संसारामधे वारंवार परत जातात. ॥९-३॥
पाहे पां दूध पवित्र आणि गोड । पासी त्वचेचिया पदराआड ।
परि तें अव्हेरूनि गोचिड । अशुद्ध काय न सेविती ? ॥ ५७ ॥
अर्जुना, पहा. दूध हे पवित्र असून शिवाय गोड आहे व ते जवळच कातडीच्या पदरापलीकडे आहे, परंतु गोचीड ते टाकून रक्तच पीत नाही काय ? ॥९-५७॥
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणूक एकेचि घरीं ।
परि परागु सेविजे भ्रमरीं । येरां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥
किंवा कमलाचा कांदा आणि बेडूक यांची वस्ती एके ठिकाणीच असते, परंतु कमलातील परिमळ दूरचे भुंगे येऊन सेवन करून जातात व जवळच असलेल्या बेडकांना केवल चिखलच शिल्लक रहातो. ॥९-५८॥
नातरी निदैवाच्या परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी ।
परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥
अथवा दुर्दैवी पुरुषाच्या घरात हजारो मोहरा पुरलेल्या आहेत परंतु तो तेथे राहून उपवास करतो किंवा दारिद्र्यात जीवित कंठितो. ॥९-५९॥
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु ।
कीं भ्रांतासी कामु । विषयावरी ॥ ६० ॥
या प्रमाणे सर्व सुखाचा बगीचा असा जो मी राम तो मी सर्वांच्या हृदयात असतांना (त्या मला न जाणून) मूर्ख लोक (सुखाकरता) विषयांचीच इच्छा करतात. ॥९-६०॥
बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा ।
तोडिला परिसु बांधिला गळां । शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥
पुष्कळसे मृगजळ डोळ्याने पाहून अर्धवट गिळलेला अमृताचा घोट थुंकून टाकावा अथवा गळ्यात बांधलेला परीस शिंपीच्या लाभाने तोडून टाकावा ॥९-६१॥
तैसी अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि बापुडीं ।
म्हणौनि जन्ममरणाची दुथडीं । डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥
त्याप्रमाण मी व माझे या गडबडीत ते दीन झालेले लोक मला येऊन मिळत नाहीत आणि म्हणूनच ते जन्म व मरण या दोन थड्या असलेल्या नदीत (संसारात) धक्के खात राहिले आहेत. ॥९-६२॥
एर्‍हवीं मी तरी कैसा । मुखाप्रति भानु कां जैसा ।
कहीं दिसे न दिसे ऐसा । वाणीचा नोहे ॥ ६३ ॥
सहज विचार करून पाहिले तर मी कसा आहे ? तर तोंडासमोर जसा सूर्य आहे तसा मी सगळ्यांना सदा समोर आहे. पण तो सूर्य केव्हा (रात्री) नसतो व केव्हा (दिवसा) दिसत नाही असा त्याच्यात कमीपणा आहे तसा माझ्यात कमीपणा नाही. ॥९-६३॥
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ॥ ४ ॥
अव्यक्तरूप अशा मी हे सर्वजग व्यापलेले आहे. सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. ॥९-४॥
माझेया विस्तारलेपणा नांवें । हें जगचि नोहे आघवें ? ।
जैसें दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥
माझा विस्तार म्हणजेच जग नाही का ? (तर होय, माझाच विस्तार आहे). ते कसे ? तर जसे दूध विरजले असता तेच स्वभावत:च दही होते. ॥९-६४॥
कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु ।
तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग ॥ ६५ ॥
अथवा बीजच झाड झाले किंवा सोनेच अलंकार बनले, त्याप्रमाणे हे जग म्हणजे माझ्या एकाचाच विस्तार आहे. ॥९-६५॥
हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें ।
तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥
हे अव्यक्तपणाने थिजलेले (संकोचित) असते, तेच मग विश्वाच्या आकाराने पातळ होते (पसरते). या रीतीने अव्यक्तरूप असलेला मी त्रैलोक्याच्या रूपाने विस्तार पावतो असे समज. ॥९-६६॥
महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें ।
परी माझ्या ठायीं बिंबतें । जैसें जळीं फेण ॥ ६७ ॥
पाण्यावर जसा फेस भासतो, त्याप्रमाणे महतत्वापासून देहापर्यंत ही सर्वही भूते माझ्या ठिकाणी भासतात. ॥९-६७॥
परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता ।
नातरी स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥
अर्जुना, पण त्या फेसाच्या आत पाहिले असता जसे पाणी दिसत नाही, अथवा स्वप्नातील अनेकपण जसे जागे झाल्यावर नसते. ॥९-६८॥
तैसीं भूतें इयें माझ्या ठायीं । बिंबती तयांमाजीं मी नाहीं ।
इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां ॥ ६९ ॥
त्याप्रमाणे ही भूते माझ्या ठिकाणी जरी भासली तरी पण त्यामधे मी नाही. हा विचार तुला आम्ही मागे (अध्याय ७ श्लोक १२ मधे) सांगितला आहे, तो लक्षात आण. ॥९-६९॥
म्हणौनि बोलिलिया बोलाचा अतिसो । न कीजे यालागीं हें असो ।
परी मज आंत पैसो । दिठी तुझी ॥ ७० ॥
येवढ्याकरता बोललेल्याच गोष्टींचा विस्तार करू नये, म्हणून हे बोलणे राहू दे, तर माझ्या स्वरूपात तुझी दृष्टी प्रवेश करो. ॥९-७०॥
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ।
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः ॥ ५ ॥
(कल्पना टाकून पाहू लागलास तर) सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थितही नाहीत असा हा माझा ऐश्वर्ययोग आहे पहा. तसेच भूतांचे धारण करणारा, तथापि अलिप्त असल्याने भूतांचे ठिकाणी स्थित नसलेला आणि ज्याचे ठिकाणी भूतांची कल्पना करता येईल अशा प्रकारचे माझे स्वरूप आहे. ॥९-५॥
आमुचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहों ।
तरी मजमाजीं भूतें हेंही वावो । जें मी सर्व म्हणौनी ॥ ७१ ॥
मायेच्या पलीकडे असणारी जी आमची शुद्धस्वरूप स्थिती, ती जर तू कल्पना टाकून पहशील तर हे सर्व प्राणी माझ्या ठिकाणी आहेत हे म्हणणे देखील व्यर्थ आहे. कारण सर्व मीच आहे म्हणून. ॥९-७१॥
एर्‍हवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे ।
म्हणौनि अखंडितचि परि झांवळे । भूतभिन्न ऐसें देखे ॥ ७२ ॥
सहज विचार केला तर कल्पनारूप संध्याकाळचे वेळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते, म्हणून माझे स्वरूप अखंड दंडायमान जरी आहे तरी परंतु ते अस्पष्ट होते व त्या ठिकाणी) भूते निरनिराळी आहेत असे दिसते. ॥९-७२॥
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरूपें ।
जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें ॥ ७३ ॥
तीच कल्पनारूप संध्याकाळ नाहीशी झाली म्हणजे त्यावेळी मी अखंडदंडायमानच स्वरूपाने आहे. ते कसे तर ज्याप्रमाणे माळेवर होणारी सर्पाची कल्पना जाताक्षणीच, माळेचे सर्पपण जाऊन तिचे मूळ स्वरूप दिसते. ॥९-७३॥
एर्‍हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेयागाडगेयाचे निघती कोंभ ? ।
परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं ॥ ७४ ॥
सहज विचार करून पाहिले तर घागरी मडकी यांचे आकार आपोआप जमिनीतून निघतात का ? तर नाही परंतु त्या घागरी व मडकी हे कुंभाराच्या बुद्धीच्या कल्पनेचेच उमटलेले आकार आहेत. ॥९-७४॥
नातरी सागरींच्या पाणी । काय तरंगाचिया आहाती खाणी ? ।
ते अवांतर करणी । वारयाची नव्हे ? ॥ ७५ ॥
अथवा समुद्राच्या पाण्यात लाटांच्या खाणी आहेत का ? पाण्याचे रूपांतर (लाटा) ही वार्‍याची करणी नाही का ? ॥९-७५॥
पाहें पां कापसाच्या पोटीं । काय कापडाची होती पेटी ? ।
तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला ॥ ७६ ॥
असे पहा की कापसाच्या पोटात कापडाचा गठ्ठा आहे का ? तो कापूस नेसणाराच्या दृष्टीने कापड झाला आहे. ॥९-७६॥
जरी सोनें लेणें हो‍उनी घडे । तरी तयाचें सोनेंपण न मोडे ।
येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥
सोन्याचे जरी अलंकार झाले तरी त्याचे सोनेपण मोडत नाही. सोन्याहून वेगळ्या आकाराचे अलंकार जे वरवर दिसतात, ते दागिने घालणाराच्या दृष्टीने आहेत. ॥९-७७॥
सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करें ।
तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें ? ॥ ७८ ॥
प्रतिध्वनीची प्रत्युत्तरे अथवा आरशामधे जे प्रतिबिंबित होते ते शब्द व रूप आपलेच की खरोखर दुसरे तेथे उत्पन्न होते ? सांग बरे. ॥९-७८॥
तैसी इये निर्मळे माझ्या स्वरूपीं । जो भूतभावना आरोपी ।
तयासी तयाच्या संकल्पीं । भूताभासु असे ॥ ७९ ॥
त्याप्रमाणे ह्या माझ्या शुद्धस्वरूपी जो भूतांच्या कल्पनेचा आरोप करतो त्याला त्याच्याच कल्पनेमधे भूतांचा भास होतो. ॥९-७९॥
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । तरि भूताभासु आधींचि सरे ।
मग स्वरूप उरे एकसरें । निखळ माझें ॥ ८० ॥
तीच कल्पना करणारी प्रकृति संपली की भूताभास मूळचाच संपलेला आहे. मग एकसारखे माझे शुद्ध स्वरूप रहाते. ॥९-८०॥
हें असो आंगीं भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी ।
तैशी आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें ॥ ८१ ॥
हे असू दे. आपण आपल्या भोवती गरगर फिरले असता अंगात भोवळ आल्यामुळे जसे भोवतालच्या भिंती नदीचा काठ वगैरे सर्व काही इकडे तिकडे फिरल्यासारखे दिसते, त्याप्रमाणे आपल्या कल्पनेने माझ्या अखंड स्वरूपी भूते भसतात. ॥९-८१॥
तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं ।
हें स्वप्नींही परि नाहीं । कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥
तीच कल्पना टाकून पाहिले असता मी प्राण्यात अथवा प्राणी माझ्यामधे असे हे स्वप्नामधे सुद्धा कल्पना करण्यासारखे नाही. ॥९-८२॥
आतां मीच एक भूतांतें धर्ता । अथवा भूतांमाजीं मी असता ।
या संकल्पसन्निपाता- । आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥
आता मी एक प्राण्यास धारण करणारा किंवा प्राण्यामधे असणारा, ही बोलणी संकल्परूप सन्निपात झालेल्या मनुष्याच्या बडबडी आहेत. ॥९-८३॥
म्हणौनि परियेसी गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा ।
जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा ॥ ८४ ॥
म्हणून आवडत्यांमधे उत्तम असणार्‍या अर्जुना, ऐक. याप्रमाणे मी विश्वसहित विश्वाचा आत्मा आहे आणि तो मी या मिथ्या भूतसमुदायाला सदा आश्रय आहे. ॥९-८४॥
रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हे तेंचि मृगजळ आभासे ।
माझ्या ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंहीं भावी ॥ ८५ ॥
सूर्यकिरणांच्या आधाराने जसे नुसते मृगजळ भासते, त्याप्रमाणे प्राणिमात्र माझ्या ठिकाणी मृगजलवत् मिथ्या समज. आणि मलाही सूर्यकिरणांप्रमाणे सत्य समज. ॥९-८५॥
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु ।
जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥ ८६ ॥
याप्रकारचा मी जग या कल्पनेला आश्रय आहे. परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाही असा आहे. तो कसा तर ज्याप्रमाणे सूर्य व सूर्याचा प्रकाश एकच आहे त्याप्रमाणे सर्व प्राणी व मी एकच आहे. ॥९-८६॥
हा आमुचा ऐश्वर्ययोगु । तुवां देखिला कीं चांगु ? ।
आतां सांगे कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ? ॥ ८७ ॥
अर्जुना हा आमचा ऐश्वर्ययोग तुला चांगला समजला ना ? आता येथे महतत्वापासून देहापर्यंतची तत्वे व मी यामधील भेदाचा संबंध आहे का ? सांग. ॥९-८७॥
यालागीं मजपासूनि भूतें । आनें नव्हती हें निरुतें ।
आणि भूतांवेगळिया मातें । कहींच न मनीं हो ! ॥ ८८ ॥
याकरता माझ्याहून सगळे प्राणी वेगळे नाहीत हे खास आणि मलाही प्राण्यांहून वेगळे मानू नकोस हो. ॥९-८८॥
यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्रगो महान् ।
तथा सर्वाणि भूतानि मत्स्थानीत्युपधारय ॥ ६ ॥
महान व सर्वत्र संचार करणारा वायु आकाशाचे ठिकाणी नित्य स्थित आहे, त्याप्रमाणे सर्व भूते माझे ठिकाणी स्थित आहेत असे जाण.॥९-६॥
पैं गगन जेवढें जैसें । पवनुहि गगनीं तेवढाचि असे ।
सहजें हालविलिया वेगळा दिसे । एर्‍हवीं गगन तेंचि तो ॥ ८९ ॥
परंतु आकाश जसे जेवढे आहे तसाच व तेवढाच वायु आकाशात आहे. सहज पंखा हलवून पाहिले तर तो वेगळा दिसतो, नाहीतर आकाश व तो एकच आहे. ॥९-८९॥
तैसें भूतजात माझ्या ठायीं । कल्पिजे तरी आभासे कांहीं ।
निर्विकल्पीं तरी नाहीं । तेथ मीचि मी आघवें ॥ ९० ॥
त्याप्रमाणे प्राणिमात्र माझ्या ठिकाणी काही कल्पिले तर भासतात व जर कल्पना केली नाही तर ते नाहीतच. त्या ठिकाणी सर्व मीच आहे. ॥९-९०॥
म्हणौनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें ।
जें कल्पनालोपें भ्रंशे । आणि कल्पनेसवें होय ॥ ९१ ॥
म्हणून प्राणिमात्राचा भास आहे आणि नाही हे कल्पनेच्या योगाने आहे कारण की भूताभास हा कल्पना नष्ट झाली की तिजबरोबर नष्ट होतो व कल्पना उत्पन्न झाली तिच्याबरोबर उत्पन्न होतो. ॥९-९१॥
तेंचि कल्पितें मुद्दल जाये । तैं असे नाहीं हें कें आहे ? ।
म्हणौनि पुढती तूं पाहे । हा ऐश्वर्ययोगु ॥ ९२ ॥
तीच मूळकल्पना जेव्हा नाहीशी होते, तेव्हा भूतांचे असणे व भूतांचे नसणे हा व्यवहार कोठून होणार ? म्हणून तू आणखी या ऐश्वर्ययोगासंबंधी पुन्हा विचार कर. ॥९-९२॥
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणेयातें कल्लोळु एक करीं ।
मग जंव पाहासी चराचरीं । तंव तूंचि आहासी ॥ ९३ ॥
अशा अनुभवाच्या समुद्रामधे तू आपल्याला एक लाट कर. मग तू चराचरात जर पहाशील तर तू एकच आहेस. ॥९-९३॥
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना ? म्हणती देवो ।
तरी आतां द्वैत स्वप्न वावो । जालें कीं ना ? ॥ ९४ ॥
देव म्हणतात, अर्जुना, या ज्ञानाची जागृति तुला आली ना ? जर आली असेल तर आता द्वैतस्वप्न मिथ्या झाले की नाही ? ॥९-९४॥
तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसी कल्पनेची झोंप ये ।
तरी अभेदबोधु जाये । जैं स्वप्नीं पडिजे ॥ ९५ ॥
तरी पुन्हा जर कदाचित बुद्धीला कल्पनेची झोप येईल तर अभेदज्ञान जाईल आणि त्यामुळे मग (कल्पनारूपी झोप लागल्यावर) तू द्वैतरूपी स्वप्नात पडशील. ॥९-९५॥
म्हणौनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्‌बोधाचेंचि आपणपें घडे ।
ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावों आतां ॥ ९६ ॥
म्हणून या कल्पनारूपी झोपेचा मार्ग मोडेल आणि आपण केवळ स्वरूपजागृतिरूपच होऊन जाऊ असे जे एक वर्म आहे ते आता तुला उघड करून दाखवतो. ॥९-९६॥
तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देईं बा धनंजया ।
पैं सर्व भूतांतें माया । करी हरी गा ॥ ९७ ॥
तरी हे धैर्यवंत अर्जुना, बाबा चांगले लक्ष दे. अरे सर्व प्राणिमात्रांना मायाच उत्पन्न करते व तीच त्यांचा नाश करते. ॥९-९७॥
सर्वभूतानि कौन्तेय प्रकृतिं यान्ति मामिकाम् ।
कल्पक्षये पुनस्तानि कल्पादौ विसृजाम्यहम् ॥ ७ ॥
हे कौन्तेया, कल्पक्षयकाली माझ्या मायेप्रत सर्व भूते जातात. त्यांना पुन्हा (दुसर्‍या) कल्पाचे आरंभी मी निर्माण करतो. ॥९-७॥
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविधा सांगितली तुजप्रती ।
एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरूपा ॥ ९८ ॥
जिला प्रकृति असे नाव आहे आणि जी तुला दोन प्रकारांनी सांगण्यात आली, एक आठ प्रकारचा भेद दाखवून स्पष्ट केली व दुसरी जीवरूपा म्हणून सांगितली. ॥९-९८॥
हा प्रकृतीविखो आघवा । तुवां मागां परिसिलासी पांडवा ।
म्हणौनि असो काई सांगावा । पुढतपुढती ॥ ९९ ॥
हा सर्व प्रकृतीचा विषय अर्जुना, तू मागे (अध्याय ७ श्लोक ४ व ५ मधे) ऐकला आहेस. म्हणून आता तो राहू दे. वारंवार कशास सांगावयास पाहिजे ? ॥९-९९॥
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाच्या अंतीं ।
सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासि येती ॥ १०० ॥
ही सर्व भूते तू महाकल्पाच्या शेवटी या माझ्या अव्यक्त प्रकृतीत ऐक्याला येतात. ॥९-१००॥
ग्रीष्माच्या अतिरसीं । सबीजें तृणें जैसीं ।
मागुती भूमीसी । सुलीनें होतीं ॥ १०१ ॥
ग्रीष्म ऋतूत प्रखर उन्हाळ्यात बीजासहित गवते ज्याप्रमाणे पुन्हा भूमीमधे चांगली लीन होतात ॥९-१०१॥
कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे ।
तेव्हां घनजात आटे । गगनींचे गगनीं ॥ १०२ ॥
अथवा वर्षाऋतूचे अवडंबर नाहीसे होते तेव्हा शरदऋतूचा गुप्तपणा नाहीसा होतो (म्हणजे शरद ऋतू लागतो) तेव्हा मेघमात्र आकाशाच्या आकाशातच नाहीसे होतात. ॥९-१०२॥
नातरी आकाशाचे खोंपे । वायु निवांतुचि लोपे ।
कां तरंगता हारपे । जळीं जेवीं ॥ १०३ ॥
अथवा आकाशाच्या घरात वायु शांतच होऊन नाहीसा होतो अथवा लाटेचा आकार पाण्यात नाहीसा होतो ॥९-१०३॥
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे ।
तैसें प्राकृत प्रकृतीं मिळे । कल्पक्षयीं ॥ १०४ ॥
अथवा जागृतिकाली स्वप्न मनातल्या मनात नाहीसे होते, त्याप्रमाणे कल्पक्षयाचे वेळी प्रकृतिपासून झालेले सर्व जग पुन: प्रकृतीत ऐक्याला पावते. ॥९-१०४॥
मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती ।
तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ती आइक ॥ १०५ ॥
नंतर पुन्हा कल्पाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात, तर याविषयीचा खरा विचार ऐक. ॥९-१०५॥

प्रकृतिं स्वामवष्टाभ्य विसृजामि पुनः पुनः ।
भूतग्राममिमं कृत्स्न्मवशं प्रकृतेर्वशात् ॥ ८ ॥
आपल्या प्रकृतीचे अवलंबन करून मी प्रकृतीच्या आधीन असलेले अस्वतंत्र असे हे सर्व भूतमात्र पुन्हा पुन्हा निर्माण करतो. ॥९-८॥
तरी हेचि प्रकृती किरीटी । मी स्वकीया सहजें अधिष्ठीं ।
तेथ तंतूसमवाय पटी । जेंवि विणावणी दिसे ॥ १०६ ॥
तर अर्जुना, या माझ्या मायेचा मी स्वभावत: अंगीकार करतो, तेव्हा सुताचा नित्य संबंध असलेल्या वस्त्रामधे ज्याप्रमाणे वीण दिसते, ॥९-१०६॥
मग तिये विणावणीचेनि आधारें । लहाना चौकडिया पटत्व भरे ।
तैसीं पंचात्मकें आकारें । प्रकृतीचि होय ॥ १०७ ॥
त्या विणीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन वस्त्र होते, तशी मायाच पंचमहाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रगट होते. ॥९-१०७॥
जैसें विरजणियाचेनि संगें । दूधचि आटेजों लागे ।
तैशी प्रकृती आंगा रिगे । सृष्टीपणाचिया ॥ १०८ ॥
ज्याप्रमाणे विरजणाच्या संबंधाने पातळ दूध दहीरूपाने घट्ट होत जाते, त्याप्रमाणे प्रकृति सृष्टिपणाच्या आकाराला येते. ॥९-१०८॥
बीज जळाची जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।
तैसें मज करणें आहे । भूतांचें हें ॥ १०९ ॥
बीजाला पाण्याचे सांनिध्य मिळाले म्हणजे ते बीजच जसे लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावते, त्याप्रमाणे मला प्राणिमात्रांचे हे करणे (उत्पन्न करणे) आहे. ॥९-१०९॥
अगा नगर हें रायें केंलें । या म्हणणया साचपण कीर आलें ।
परि निरुतें पाहतां काय सिणलें । रायाचे हात ? ॥ ११० ॥
अरे अर्जुना, नगर हे राजाने केले, या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे. पण वास्तविक पाहिले तर नगर रचण्यात राजाच्या हाताला श्रम पडले आहेत काय ? ॥९-११०॥
आणि मी प्रकृती अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे ।
मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे ॥ १११ ॥
आणि मी प्रकृतीचा अंगिकार करतो ते कसे म्हणशील तर जसा स्वप्नामधे जो असतो तोच मग जागृतावस्थेत प्रवेश करतो, त्याप्रमाणे ॥९-१११॥
तरी स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता ।
कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय ? ॥ ११२ ॥
तर अर्जुना, स्वप्नातून जागृतीत येतांना त्य़ाचे पाय दुखतात का ? अथवा स्वप्नामधे असतांना प्रवास होतो काय ? ॥९-११२॥
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं ।
मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥
या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर या भूतसृष्टीचे मला काहीएक देखील करावे लागत नाही, असाच याचा अर्थ आहे. ॥९-११३॥
जैसी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारें आपुलालिया काजा ।
तैसा प्रकृतिसंगु हा माझा । येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥
ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते, त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो. बाकी सर्व कर्तृत्व हिचे (प्रकृतीचे) असते. ॥९-११४॥
पाहे पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्रीं अपार भरतें दाटी ।
तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे ? ॥ ११५ ॥
पहा, अर्जुना, पौर्णिमेच्या भेटीने समुद्र भरतीने अफाट भरून येतो. त्य़ा भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात काय ? ॥९-११५॥
जड परि जवळिका । लोह चळे तरी चळो कां ।
तरि कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ? ॥ ११६ ॥
(लोहचुंबकाच्या) जवळपणाने अचेतन लोखंड हालते तर हलेना का ? पण जड लोखंडाला ओढून आणण्याचे श्रम चुंबकाला पडले आहेत काय ? ॥९-११६॥
किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगिकारीं ।
आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥
फार काय सांगावे ? याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृति भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करूच लागते. ॥९-११७॥
जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतीआधीन पांडवा ।
जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमी ॥ ११८ ॥
अर्जुना, हा जो सर्व प्राण्यांचा समुदाय आहे, तो प्रकृतीच्या स्वाधीन आहे. ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला आणि पानांना उत्पन्न करण्यास भूमि समर्थ आहे ॥९-११८॥
नातरी बाळादिकां वयसा । गोसावी देहसंगु जैसा ।
अथवा घनावळी आकाशा । वार्षिये जेवीं ॥ ११९ ॥
अथवा बाल्यादि अवस्थांना जसा देहसंग आधार आहे, किंवा ज्याप्रमाणे आकाशात मेघांची फळी येण्यास वर्षाऋतु आधार आहे, ॥९-११९॥
कां स्वप्नासि कारण निद्रा । तैसी प्रकृती हे नरेंद्रा ।
या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा ॥ १२० ॥
अथवा स्वप्नाला कारण जशी झोप आहे, त्याप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुषा अर्जुना, या सर्वही भूतसमुद्राची मालकीण प्रकृति आहे. ॥९-१२०॥
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा ।
हे असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥
स्थावरांना अथवा जंगमांना, मोठ्यांना वा लहानांना ते राहू द्या, सर्व भूतसमुदायास प्रकृतीच मूळ आहे. ॥९-१२१॥
म्हणौनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं ।
इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा ॥ १२२ ॥
म्हणून भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत, या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही. ॥९-१२२॥
जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रें नाहीं वाढविली ।
तेविं मातें पावोनि ठेलीं । दूरी कर्में ॥ १२३ ॥
पाण्यामधे चांदण्यांच्या वेली पसरलेल्या दिसतात त्या वेली वाढवण्याचे काम चंद्राने केले नाही त्याप्रमाणे जगाचे उत्पत्ति, स्थिति वगैरे कर्म माझ्यापासून दूर राहिले आहे. ॥९-१२३॥
न च मां तानि कर्माणि निबध्नन्ति धनंजय ।
उदासीनवदासीनमसक्तं तेषु कर्मसु ॥ ९ ॥
हे धनंजया, या (जगदुत्पत्तिसंहारात्मक) कर्माचे ठिकाणी आसक्त व उदासीनाप्रमाणे असलेल्या मला ही कर्मे बंधन करू शकत नाहीत. ॥९-९॥
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरूं सैंधवाचा घाटु ।
तेविं सकळ कर्मा मीचि शेवटु । तीं काय बांधती मातें ? ॥ १२४ ॥
आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा घाट थोपवून धरू शकत नाही, (कारण मिठाचा अंत पाण्यात होतो). त्याप्रमाणे सर्व कर्मांची समाप्ति जर माझ्या स्वरूपी होते तर ती कर्मे मला काय बांधणार ? ॥९-१२४॥
धूम्ररजांची पिंजरीं । वाजतिया वायूतें जरी होकारी ।
कां सूर्यबिंबामाझारीं । आंधारें शिरे ? ॥ १२५ ॥
धुराच्या कणांचे छत जर जोराने वहाणार्‍य़ा वार्‍यास प्रतिबंध करेल अथवा सूर्यबिंबात जर अंधार प्रवेश करील ॥९-१२५॥
हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचें ।
तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज ॥ १२६ ॥
हे राहू दे, पर्वताच्या पोटातील पदार्थ जसा पावसाच्या धारांनी झोडला जात नाही त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्ममात्र मला बांधू शकत नाही. ॥९-१२६॥
एर्‍हवीं इये प्रकृतिविकारीं । एकु मीचि असे अवधारीं ।
परि उदासीनाचिया परी । करीं ना करवीं ॥ १२७ ॥
सहज विचार करून पाहिले तर या प्रकृतीच्या विकारामधे (जगामधे) मीच एक आहे. हे लक्षात ठेव. परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वत: काही करीत नाही अथवा दुसर्‍याकडून काही करवीत नाही. ॥९-१२७॥
जैसा दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी ।
आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणें ॥ १२८ ॥
घरात ठेवलेला दिवा कोणाला तू अमूक एक काम कर असा नियम घालून देत नाही, अथवा, कोणी काम करत असेल तर त्याचे निवारण करत नाही, आणि घरामधे कोण काय काम करीत आहे तेही जाणत नाही ॥९-१२८॥
तो जैसा कां साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु ।
तैसा भूतकर्मीं अनासक्तु । मी भूतीं असें ॥ १२९ ॥
ज्याप्रमाणे तो दिवा घरात तटस्थ असून घरातील सर्व व्यापाराच्या प्रवृत्तीला कारण असतो त्याप्रमाणे सर्व भूतांमधे मी असून त्यांच्याकडून होणार्‍या कर्मांमधे मी उदासीन आहे. ॥९-१२९॥
हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगों बहुतां उपपत्ती ।
येथ एकहेळां सुभद्रापती । येतुलें जाण पां ॥ १३० ॥
हा एकच विचार पुन: पुन: अनेक युक्तिप्रयुक्तीने काय सांगू ? अर्जुना येथे आणखी एकवार एवढे समज म्हणजे झाले. ॥९-१३०॥
मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् ।
हेतुनानेन कौन्तेय जगद्विपरिवर्तते ॥ १० ॥
हे कौंतेया, माझा आश्रय मिळाला असतांना माया चराचर जगत् निर्माण करते. या कारणास्तव (म्हणजे मी जगाशी प्रत्यक्ष संबद्ध नसल्यामुळे त्रिगुणात्मिका व अविद्यारूपी मायेच्या प्रभावाने) जग पुन्हा पुन्हा उत्पन्न होते (व नाश पावते) ॥९-१०॥
जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता ।
तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें ॥ १३१ ॥
ते हे की लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्तमात्र आहे, त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्तीला मी हेतु आहे असे समज. ॥९-१३१॥
कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती ।
म्हणौनि मी हेतु हे उपपत्ती । घडे यया ॥ १३२ ॥
कारण की मी प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचरांची उत्पत्ती होते. म्हणून मी चराचरांच्या उत्पत्तीला हेतू आहे, असे युक्तीला जुळते. ॥९-१३२॥
आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें ।
जे माझ्या ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥
आता या विचाराच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूप-ऐश्वर्ययोगाला चांगले न्याहाळून पहा. (ते असे की) माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत, पण मी प्राण्यांमधे नाही. ॥९-१३३॥
अथवा भूतें ना माझ्या ठायीं । आणि भूतांमाजीं मी नाहीं ।
या खुणा तूं कहीं । चुकों नको ॥ १३४ ॥
अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत व भूतांमधे मी नाही, हे वर्म तू कधीही विसरू नकोस. ॥९-१३४॥
हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड ।
आतां इंद्रियां देऊनि कवाड । हृदयीं भोगीं ॥ १३५ ॥
ही आमची सर्वस्वी गुप्त गोष्ट आहे. परंतु तुला उघड करून सांगितली आहे. आता इंद्रियांची द्वारे बंद करून (सर्व इंद्रियवृत्ति अंतर्मुख करून) तू ह्या गुह्य विचारांचा अंत:करणात अनुभव घे. ॥९-१३५॥
हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारपण पार्था ।
न संपडे गा सर्वथा । जेविं तुषीं कणु ॥ १३६ ॥
अर्जुना, हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही, तोपर्यंत माझी खरी स्वरूपस्थिती मुळीच अनुभावास येणार नाही. (कशी तर) ज्याप्रमाणे कोंड्यात दाणा शोधला असता सापडणार नाही त्याप्रमाणे. ॥९-१३६॥
एर्‍हवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें ।
परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे ? ॥ १३७ ॥
साधारणपणे पाहिले असता तर्काच्या वाढीने (माझी स्वरूपस्थिती) खरोखर कळल्यासारखी वाटते. (पण ते खरे कळले नाही. ते कसे तर पुढील उदाहरणाने सांगतात). परंतु मृगजलाच्या ओलाव्याने जमीन भिजेल काय ? ॥९-१३७॥
जें जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।
परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांगैं ? ॥ १३८ ॥
जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे वातते. परंतु ते जाळे पाण्यातून काढून काठावर झाडले तेव्हा चंद्रबिंब कोठे आहे सांग बरे ? ॥९-१३८॥
तैसें बोलवरी वाचाबळें । वायांचि झकविजती प्रतीतीचें डोळे ।
मग साचोकारें बोधावेळे । आथि ना होइजे ॥ १३९ ॥
त्याप्रमाणे वकृत्वाच्या जोरावर कित्येक आपाल्या प्रतिपादनाने (स्वत:च्या) अनुभवाचे डोळे उगीच झाकण्यास लावतात. (आपण आपल्याला फसवतात). मग खर्‍या बोधाची वेळ आली म्हणजे बोध असताही होत नाही. ॥९-१३९॥
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ११ ॥
माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूढ, सर्व भूतांचा ईश्वर असलेल्या (पण सांप्रत) मानवदेह धारण करणार्‍या (मला मनुष्य समजून, मनुष्यधर्म माझ्यावर आरोपित करुन) माझी अवहेलना करतात. ॥९-११॥
किंबहुना भवा बिहाया । आणि साचें चाड आथि जरी मियां ।
तरि तूं गा उपपत्ती इया । जतन कीजे ॥ १४० ॥
फार काय सांगावे ? जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूपप्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितलेले विचार तुम्ही ध्यानात ठेवा. ॥९-१४०॥
एर्‍हवीं दिठी वेधली कवळें । तैं चांदणियातें म्हणे पिंवळें ।
तेंविं माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखती दोष ॥ १४१ ॥
नाहीतर ज्याप्रमाणे काविळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पहाल. ॥९-१४१॥
नातरी ज्वरें विटाळलें मुख । तें दुधातें म्हणे कडू विख ।
तेविं अमानुषा मानुष । मानिती मातें ॥ १४२ ॥
अथवा तापाने बिघडलेले तोंड दुधाला कडू विष म्हणते त्याप्रमाणे मी जो देहधर्मरहित त्या मला देहधर्मयुक्त मानाल ॥९-१४२॥
म्हणौनि पुढतपुढती धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया ।
जे इया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा ॥ १४३ ॥
म्हणून अर्जुना, पुन्हा तुला एकवार बजावतो की तू कदाचित सांगितलेल्या (स्वरूपज्जानाच्या) अभिप्रायाला विसरशील तर विसरू नकोस. कारण या स्थूलदृष्टीने पाहू तर ते पहाणे व्यर्थ जाणार आहे. ॥९-१४३॥
पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें ।
जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे ॥ १४४ ॥
ज्याप्रमाणे स्वप्नातील अमृताने अमर होता येत नाही (कारण ते पिऊनही न प्यायल्याप्रमाणे आहे), त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेऊन जे माझ्याकडे पहातात त्यांचे ते पहाणे खरोखर न पहाण्यात जमा आहे. असे समज. ॥९-१४४॥
एर्‍हवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ ।
परि तें जाणणेचि जाणणेया आड । रिगोनि ठाके ॥ १४५ ॥
एरवी मी स्थूल आहे, अशा दृष्टीने माझ्याकडे पहाणारे जे मूर्ख लोक, ते आपल्या समजुतीप्रमाणे जाणतात, हे खरे आहे. परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाचे खरे ज्ञान होण्यास प्रतिबंध करते. ॥९-१४५॥
जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठीं घातु झाला तया हंसा ।
माजीं रत्‍नबुद्धीचिया आशा । रिगोनियां ॥ १४६ ॥
ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्रांच्या प्रतिबिंबामुळे, ती रत्ने आहेत अशा समजुतीने त्या विषयी लोभ धरून व पाण्यात शिरून (ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून) जसा एखाद्या राजहंसाने आपला घात केला. ॥९-१४६॥
सांगैं गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ ।
काय सुरतरु म्हणौनि बाबुळ । सेविली करी ? ॥ १४७ ॥
अर्जुना सांग, ही गंगा आहे अशा समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोहोचलो तर त्याचे फळ काय ? अथवा कल्पवृक्ष म्हणून बाभळीचा आश्रय केला तर ती बाभळ इच्छिलेले फळ देईल काय ? ॥९-१४७॥
हार निळयाचाचि दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा ।
कां रत्‍ने म्हणौनि गारा । वेंचि जेंवीं ॥ १४८ ॥
हा नीलमण्यांचा दोन पदरी हार आहे अशा बुद्धीने तो घेण्याकरता सापाला उचलून घेण्यास तयार झाला अथवा ही रत्ने आहेत अशा समजुतीने जशा गारगोट्या वेचाव्यात ॥९-१४८॥
अथवा निधान हें प्रगटलें । म्हणौनि खदिरांगार खोळे भरिले ।
कां साउली नेणतां घातलें । कुहा सिंहें ॥ १४९ ॥
किंवा द्रव्याचा ठेवाच प्रगट झाला आहे असे समजून खैराचे निखारे आपल्या पदरात भरावेत अथवा ही आपली पडछाया आहे, असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी ॥९-१४९॥
तेवीं मी म्हणौनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची ।
तिहीं चंद्रासाठीं जेवीं जळींची । प्रतिभा धरिली ॥ १५० ॥
त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असे समजून आपल्या बुद्धीमधे माझ्याविषयीचा असा (मी देहधर्मवान आहे असा) कृतनिश्चय केला त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे. ॥९-१५०॥
तैसा कृतनिश्चयो वायां गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला ।
मग परिणाम पाहों लागला । अमृताचा ॥ १५१ ॥
तसा परमात्मा देहधारी आहे असा त्यांचा ठाम निश्चय व्यर्थ गेला. (हे कसे झाले ?) तर ज्याप्रमाणे कोणी एखाद्याने भाताची पेज पिऊन मग अमृताचा परिणाम पहावा (त्याप्रमाणे). ॥९-१५१॥
तैसें स्थूलाकारी नाशिवंतें । भरंवसा बांधोनि चित्तें ।
पाहती मज अविनाशातें । तरी कैंचा दिसें ? ॥ १५२ ॥
तसे नाशिवंत जो स्थूल आकार त्य़ा ठिकाणीच (तेच माझे खरे स्वरूप असा) आपल्या मनामधे निश्चय करून ते जर मला अविनाशाला पहातात तर त्यांना मी कसा दिसेन ? ॥९-१५२॥
अगा काई पश्चिमसमुद्राचिया तटा । निघिजत आहे पूर्विलिया वाटा ।
कां कोंडा कांडतां सुभटा । कणु आतुडे ? ॥ १५३ ॥
अर्जुना, पूर्वेच्या मार्गाला निघून कोणाला पश्चिमसमुद्राच्या किनार्‍यास पोचता येईल काय ? अथवा अर्जुना कोंडा कांडून त्यापासून दाणे प्राप्त होतील काय ? ॥९-१५३॥
तैसें विकारलें हें स्थूळ । जाणितले या मी जाणवतसें केवळ ।
काई फेण पितां जळ । सेविलें होय ? ॥ १५४ ॥
त्याप्रमाणे आकाराला आलेले हे शरीर, हेच मी, असे मला जाणले असता, माझे केवळ (खरे) स्वरूप जाणले जाईल काय ? फेस प्याल्याने पाणी प्यायल्यासारखे होईल काय ? ॥९-१५४॥
म्हणौनि मोहिलेंनि मनोधर्में । हेंचि मी मानूनि संभ्रमें ।
मग येथिंची जियें जन्मकर्में । तियें मजचि म्हणती ॥ १५५ ॥
म्हणून मोहित झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूल शरीरच मी (परमात्मा) आहे असे मानून मग या देहाची जी जन्मादि कर्मे, ती माझ्यावर लादतात. ॥९-१५५॥
येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म ।
विदेहासि देहधर्म । आरोपिती ॥ १५६ ॥
एवढ्यामुळे नाव नसलेल्या मला नांव देतात. वस्तुत: मी क्रियाशून्य असून मी क्रिया करतो असे म्हणतात व देहादि मर्यादेने रहित असलेल्या मला जन्ममरणादिक जे देहधर्म, त्यांचा संबंध लावतात. ॥९-१५६॥
मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु ।
मज विधिवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥ १५७ ॥
जो मी निराकार आहे त्या मला आकार आहे असे मानतात व देहरहित जो मी त्या मला पूजेचे उपचार अर्पण करतात. शास्त्रमर्यादेचे बंधन नसलेल्या मला आचारादिक व्यवहार लावतात. ॥९-१५७॥
मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु ।
मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी ॥ १५८ ॥
ब्राह्मणादि जातींच्या पलीकडे असणार्‍या मला एका विशिष्ट जातीचा समजतात, पाय नसतांना माझे ठिकाणी पायांची कल्पना करतात व त्याचप्रमाणे हातांच्या कल्पनेस माझ्या ठिकाणी जागा नसूनही हात या अवयवाची कल्पना करतात. ॥९-१५८॥
मज अमेया मान । सर्वगतासी स्थान ।
जैसें सेजेमाजीं वन । निदेला देखे ॥ १५९ ॥
मोजता न येण्याइतके माझे स्वरूप अमर्याद आहे. परंतु मलाही मर्यादेत घालतात. मी खरोखर सर्व ठिकाणी असूनही मला एखादे ठिकाण कल्पितात. ज्याप्रमाणे निजलेला मनुष्य स्वप्नात आपल्या अंथरुणावर अरण्य पहातो, ॥९-१५९॥
तैसें अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र ।
अगोत्रा गोत्र । अरूपा रूप ॥ १६० ॥
त्याप्रमाणे कान वगैरेंचा संबंध माझ्या ठिकाणी नसतांना कानाची कल्पना करतात, डोळ्यांचा संबंध माझ्या ठिकाणी नसतांनाही डोळे कल्पितात व कोणत्याही नात्याचा संबंध नसतांना नातेवाईकांची कल्पना करतात. मी काळा, गोरा वगैरे नसतांनाही तसल्या रूपाची माझ्या ठिकाणी कल्पना करतात ॥९-१६०॥
मज अव्यक्तासी व्यक्ती । अनार्तासी आर्ती ।
स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा ॥ १६१ ॥
मी जो अदृश्य त्या मला दृश्य असे समजतात. मी जो इच्छारहित, त्या मला इच्छा आहे असे मानतात. मी जो स्वत:सिद्ध तृप्त, त्या मला तृप्ति कल्पितात. ॥९-१६१॥
मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण ।
मज सकळ कारणा कारण । देखती ते ॥ १६२ ॥
मी वस्त्रात गुंडाळता येण्यासारखा नसून मला वस्त्र नेसवतात. शृंगाराच्या पलीकडे असतांना माझ्याकरता दागिन्यांची योजना करतात. सर्व जगाला मी उत्पन्न करणारा असून माझ्याही उत्पन्न करण्याची ते कल्पना करतात. ॥९-१६२॥
मज सहजातें करिती । स्वयंभातें प्रतिष्ठिती ।
निरंतरातें आव्हानिती । विसर्जिती गा ॥ १६३ ॥
नित्य असणारा जो मी त्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात. अर्जुना, सर्वांच्या आत्मत्वाने अखंड दंडायमान असणारा जो मी त्या मला आवाहन करतात आणि माझे विसर्जन करतात. ॥९-१६३॥
मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो कीं बाळ तरुण वृद्धु ।
मज एकरूपा संबंधु । जाणती ऐसे ॥ १६४ ॥
मी सर्वदा स्वत:सिद्ध आणि एकरूप आहे त्या मला बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था यांचा संबंध आहे असे समजतात, ॥९-१६४॥
मज अद्वैतासि दुजें । मज अकर्तयासि काजें ।
मी अभोक्ता कीं भुंजें । ऐसें म्हणती ॥ १६५ ॥
माझी अद्वैतस्थिती असतांना माझ्या मागे द्वैत लावतात व मी कर्मरहित असून कर्मे करतो असे मानतात. आणि मी जो अभोक्ता, तो मी भोग भोगतो असे मानतात, ॥९-१६५॥
मज अकुळाचें कुळ वानिती । मज नित्याचेनि निधनें शिणती ।
मज सर्वांतरातें कल्पिती । अरि मित्र गा ॥ १६६ ॥
माझे कुळरहिताचे कूळ वर्णन करतात. मी जो नित्य, त्या माझ्या मरणाने दु:खी होतात व अर्जुना, मी सर्वांच्या अंतर्यामी असणारा त्या मला शत्रु मित्र आहेत असे मानतात. ॥९-१६६॥
मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेक सुखांचा कामु ।
आघवाचि मी असे समु । कीं म्हणती एकदेशी ॥ १६७ ॥
स्वकीय आनंदात रममाण असणारा जो मी त्या मला अनेक सुखांची इच्छा आहे असे म्हणतात. मी सगळीकडे सारखा व्यापलेला असून मला एका ठिकाणी आहे दुसर्‍या ठिकाणी नाही असे म्हणतात. ॥९-१६७॥
मी आत्मा एक चराचरीं । म्हणती एकाचा कैंपक्ष करीं ।
आणि कोपोनि एकातें मारीं । हेंचि वाढविती ॥ १६८ ॥
मी स्थावरजंगमाचा एकच असा आत्मा असता मी एकाचा कैवार घेतो असे म्हणतात आणि रागावून एकाला मारतो हेच जगात प्रसिद्ध करतात. ॥९-१६८॥
किंबहुना ऐसें समस्त । जे हे मानुषधर्म प्राकृत ।
तयाचि नांव मी ऐसें विपरीत । ज्ञान तयांचें ॥ १६९ ॥
फार काय सांगावे ? असे हे जे मनुष्याचे सामान्यधर्म तेच सर्व धर्म माझ्या ठिकाणी आहेत असे त्या अज्ञानी लोकांचे विपरीत ज्ञान असते. ॥९-१६९॥
जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती ।
मग तोचि विघडलिया टाकिती । नाहीं म्हणौनि ॥ १७० ॥
जेव्हा एखादी मूर्ती आपल्यापुढे पाहतात, त्यावेळेला ती मूर्ती हाच देव आहे अशा समजुतीने तिची भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भांगली की हा परमात्मा नाही असे समजून पूजा करण्याचे थांबवतात. ॥९-१७०॥
मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें ।
म्हणौनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥ १७१ ॥
अशा अशा या प्रकारांनी आकारावरून इतर देहधार्‍यांसारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. ॥९-१७१॥
मोघाशा मोघकर्माणो मोघज्ञाना विचेतसः ।
राक्षसीमासुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रिताः ॥ १२ ॥
त्यांच्या (मुढांच्या देवतोपासनेच्या फलांच्या) इच्छा निष्फल आहेत, त्यांची कर्मे निष्फल आहेत, त्यांचे ज्ञान निष्फल आहे, ते विवेकरहित आहेत. कारण राक्षसी व तामसी (कामक्रोधादिरूपी) अशा मोहमय प्रकृतीचा त्यांनी अवलंब केला आहे. ॥९-१२॥
यालागीं जन्मलेचि ते मोघ । जैसें वार्षियेवीण मेघ ।
कां मृगजळाचे तरंग । दुरूनीचि पाहावें ॥ १७२ ॥
म्हणून त्यांचे जन्माला येणे फुकट आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्यावाचून आलेले ढग किंवा मृगजळात दिसणार्‍या लाटा ह्या गोष्टी दुरूनच दिसण्यास बर्‍या असतात, ॥९-१७२॥
अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरी वोडंबरीचे अळंकार ।
कीं गंधर्वनगरीचे आवार । आभासती कां ॥ १७३ ॥
थवा मातीचे घोडेस्वार किंवा गारुडीविद्येने केलेले दागिने किंवा आकाशात ढगांच्या आकृतीमुळे दिसणार्‍या गावांचे गांवकुस, हे ज्याप्रमाणे दिसतात मात्र, पण वास्तविक मिथ्या असतात. ॥९-१७३॥
साबरी वाढिन्नल्या सरळा । वरी फळ ना आंतु पोकळा ।
कां स्तन जाले गळां । शेळिये जैसें ॥ १७४ ॥
सरळ वाढलेल्या कांडे-निवडुंगाला वर फळ नसते व आत गाभाही नसतो, (पोकळ असतो) किंवा शेळीचे गलोल व्यर्थ असतात. ॥९-१७४॥
तैसें मूर्खाचें तया जियालें । आणि धिग् कर्म तयांचें निपजलें ।
जैसें साबरी फळ आलें । घेपे ना दीजे ॥ १७५ ॥
त्याप्रमाणे त्या अविचारी लोकांचे जीवित व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे सांवरीला आलेले फळ देवघेवीच्या उपयोगाचे नसते (त्याप्रमाणे त्यांचे कर्म व्यर्थ असते). म्हणून त्यांच्या हातून घडलेल्या कर्माला धिक्कार असो. ॥९-१७५॥
मग जें कांहीं ते पढिन्नले । तें मर्कटें नारळ तोडिले ।
कां आंधळ्या हातीं पडिलें । मोतीं जैसें ॥ १७६ ॥
मग ते अज्ञानी जे काही शिकलेले असतात ते त्यास माकडाने नारळ तोडल्यासारखे अथवा आंधळ्याच्या हातात मोती पडल्यासारखे निरूपयोगी असते. ॥९-१७६॥
किंबहुना तयांचीं शास्त्रें । जैशीं कुमारीं हातीं दिधलीं शस्त्रें ।
कां अशौच्या मंत्रें । बीजें कथिलीं ॥ १७७ ॥
फार काय सांगावे ? त्यांची जेवढी म्हणून शास्त्रे आहेत तेवढी जशी का लहान मुलीच्या हातात दिलेली शस्त्रे अथवा अशुद्ध मनुष्यास सांगितलेले बीजमंत्र (त्याप्रमाणे निरर्थक असतात). ॥९-१७७॥
तैसें ज्ञानजात तयां । आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया ।
तें आघवेंचि गेलें वायां । जें चित्तहीन ॥ १७८ ॥
त्याप्रमाणे अर्जुना, त्यांचे संपूर्ण ज्ञान व जे काही त्यांनी आचरण केले असेल, ते संपूर्ण व्यर्थ जाते. कारण की त्यांचे चित्त स्थिर नसते. ॥९-१७८॥
पैं तमोगुणाची राक्षसी । जे सद्‌बुद्धीतें ग्रासी ।
विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी जे ॥ १७९ ॥
सद्बुद्धीला गिळून टाकणारी व विचाराचा ठावठिकाणा नाहीसा करणारी व (अज्ञानरूपी) रात्रीत संचार करणारी तमोगुणारूपी राक्षसी ॥९-१७९॥
तिये प्रकृती वरपडे जाले । म्हणौनि चिंतेचेनि कपोलें गेले ।
वरि तामसीयेचिये पडिले । मुखामाजीं ॥ १८० ॥
त्या आसुरी राक्षसीच्या स्वाधीन झाले, म्हणूण ते चिंतारूपी गालाच्या द्वारे आणखी त्या तामसी राक्षसीच्या मुखात पडले गेले. ॥९-१८०॥
जेथ आशेचिये लाळे । आंतु हिंसा जीभ लोळे ।
तेवींचि असंतोषाचे चाकळे । अखंड चघळी ॥ १८१ ॥
जिच्या मुखात आशेच्या लाळेमधे हिंसारूपी जीभ लोळते व त्याचप्रमाणे जी राक्षसी संतोषरूपी चघळ नेहेमी चघळत असते (म्हणजे जी संतोष नाहीसा करते) ॥९-१८१॥
जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवें चाटीत निघे बाहेरी ।
जे प्रमादपर्वतींची दरी । सदाचि मातली ॥ १८२ ॥
जी राक्षसी अनर्थाच्या कानापर्यंत ओठांचे कांठा चाटीत बाहेर निघते व जी राक्षसी नेहेमीच प्रमादरूपी पर्वताची माजलेली भयप्रद दरी आहे. ॥९-१८२॥
जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसां ज्ञानाचा करिती रगडा ।
जे अगस्ती गवसणी मूढां । स्थूल बुद्धि ॥ १८३ ॥
जिच्या तोंडामधे द्वेषरूपी दाढा ज्ञानाचा खसखसा चुराडा करीत आहेत व जी अगस्ति ऋषीस आवरण असलेल्या कुंभाप्रमाणे स्थूलबुद्धीच्या मूर्खांना आवरण घालणारी आहे. ॥९-१८३॥
ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडीं । जे जाले गा भूतोंडीं ।
ते बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाच्या ॥ १८४ ॥
अशा आसुरी प्रकृतीच्या तोंडात जे भूताला टाकलेल्या बळीप्रमाणे पडले ते भ्रांतीच्या कुंडात बुडून गेले. ॥९-१८४॥
एवं तमाचिये पडिले गर्तें । न पविजतीचि विचाराचेनि हातें ।
हें असो ते गेले जेथें । ते शुद्धीचि नाहीं ॥ १८५ ॥
याप्रमाणे ते तमोगुणांच्या खळग्यात पडले, ते विचाराच्या हाताला लागत नाहीत. हे असो. ते अशा ठिकाणाला गेले की जेथे त्यांचा पत्ताच लागत नाही. ॥९-१८५॥
म्हणौनि असोतु इयें वायाणीं । कायशीं मूर्खांचीं बोलणीं ।
वायां वाढवितां वाणी । शिणेल हन ॥ १८६ ॥
म्हणून हे निष्फळ वर्णन राहू दे. मूर्ख लोकांची कथा कशाला ? तिच्या विस्ताराने वाचेला व्यर्थ शीण मात्र होणार आहे. ॥९-१८६॥
महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिताः ।
भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३ ॥
हे पार्था, पणा दैवी स्वभावाचा आश्रय करणारे महात्मे भूतांचे आदीकारण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्य होत्साते माझी भाक्ती करतात. ॥९-१३॥
ऐसें बोलिलें देवें । तेथ जी जी म्हणितलें पांडवें ।
आइकें जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥ १८७ ॥
श्रीकृष्ण असे म्हणाले, त्याप्रसंगी अर्जुन म्हणाला होय महाराज. (तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले) ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधुकथा ऐक. ॥९-१८७॥
तरी जयाचे चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी ।
जया निजेलियातें उपासी । वैराग्य गा ॥ १८८ ॥
ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी क्षेत्रसंन्यासी होऊन असतो व जे पुरुष निजले असता वैराग्य त्यांची उपासना करते (म्हणजे स्वप्नात सुद्धा ज्यांचे वैराग्य ढळत नाही). ॥९-१८८॥
जयाचिया आस्थेचिया सद्‌भावा । आंतु धर्म करी राणिवा ।
जयाचें मन ओलावा । विवेकासी ॥ १८९ ॥
ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेत धर्म राज्य करतो (ज्यांना अधर्माची इच्छा उत्पन्न होत नाही) व ज्यांचे मन विचारास जीवन आहे ॥९-१८९॥
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले ।
जे शांतीसी आले । पालव नवे ॥ १९० ॥
ज्यांनी ज्ञानरूपी गंगेत स्नान केलेले आहे व जे पुरुष पूर्णता जेऊन तृप्त झाले आहेत आणि जे पुरुष शांतीरूपी वेलींची कोवळी पाने आहेत ॥९-१९०॥
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ ।
जे आनंदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥ १९१ ॥
जे पुरुष परिणामाला (पूर्ण अवस्थेला) फुटलेले अंकुर आहेत, जे (सात्विक) धैर्यरूपी मांडवाचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंदरूपी समुद्रात तुडुंब भरलेले घट आहेत, ॥९-१९१॥
जया भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्यातें परौतें सर म्हणती ।
जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥ १९२ ॥
ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणातात, ज्यांच्या सहज कर्माचरणामधे नीती जगलेली दिसते ॥९-१९२॥
जे आघवांचि करणीं । लेईले शांतीचीं लेणीं ।
जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज ॥ १९३ ॥
ज्यांनी सर्व इंद्रियांचे ठिकाणी शांतीचे अलंकार धारण केले आहेत व ज्यांचे चित्त मी जो सर्वव्यापक, त्या मला आच्छादणारी खोळ झाले आहे ॥९-१९३॥
ऐसें जे महानुभाव । दैविये प्रकृतीचें दैव ।
जे जाणोनियां सर्व । स्वरूप माझें ॥ १९४ ॥
असे जे प्रशस्त अनुभावाचे पुरुष आहेत ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत, ते महात्मे हे सर्व माझेच स्वरूप आहे असे जाणून ॥९-१९४॥
मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे ।
परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाहीं ॥ १९५ ॥
मग वाढत्या प्रेमाने मला भजतात. पण त्यांची भक्ती अशी एकविध असते की ते आपल्या मनाच्या संकल्पाने देव हा एक उपास्य व मी एक उपासक निराळा आहे अशा दुसरेपणाला शिवत नाहीत. ॥९-१९५॥
ऐसें मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा ।
परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥ १९६ ॥
अर्जुना याप्रमाणे मीच होऊन ते माझी सेवा करतात. पण त्याची सेवा करण्याचा आश्चर्यकारक प्रकार सांगायचा आहे तो ऐक. ॥९-१९६॥
सततं किर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः ।
नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४ ॥
सदा माझे नामस्मरण करणारे, अष्टांगयोगमार्गाने माझ्या प्राप्तीसाठी) निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तिपूर्वक (सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार) करणारे असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासाना करतात. ॥९-१४॥
तरी कीर्तनाचेनि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ।
जें नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ १९७ ॥
तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षाने प्रायश्चित्तांची कामे नाहीशी करून टाकली, कारण की त्यांनी पापांचे नावच नाही असे केले. ॥९-१९७॥
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।
यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यम-दमास निस्तेजता आणली, तीर्थास पाप नाहीसे करणारे असे जे श्रेष्ठ पद मिळाले होते, त्या श्रेष्ठपदावरून तीर्थास उठवले व पापे करून लोक यमलोकास जात होते, पण पापे कीर्तनाने नाहीशी केल्यामुळे पापी यमलोकास जात नाहीसे झाले. ॥९-१९८॥
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणतीं काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
यमसाधन म्हणावयास लागले की निग्रह कोणाचा करावा ? (कारण ज्याचा निग्रह करावयाचा ते मग कीर्तनाच्या योगाने आत्मरूप झाले). दमसाधन म्हणू लागले, कोणत्या इंद्रियाचे दमन करावे ? (कारण कीर्तनाने सर्व इंद्रिये आत्मस्वरूपात तल्लीन झाली.) तीर्थे म्हणावयास लागली की पापच जर औषधाला राहिले नाही तर आम्ही खावे काय ? ॥९-१९९ ॥
ऐसें माझेनि नामघोषें । नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
याप्रमाणे माझ्या नामघोषाने विश्वाची दु:खे नाहीशी करतात व सर्व जगच ब्रह्मसुखाने जिकडे तिकडे कोंदून भारतात. ॥९-२००॥
ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित ।
योगेंवीण दावित । कैवल्य डोळां ॥ २०१ ॥
ते महात्मे प्राकृत सूर्याकडे पहाटेशिवाय ज्ञारूप दिवसाचा उदय करतात व स्वर्गातील प्राकृत अमृताशिवाय ते जगवतात व अष्टांगयोगाशिवाय मोक्ष डोळ्याला दाखवतात. (अनुभवाला आणून देतात). ॥९-२०१॥
परी राया रंका पाड धरूं । नेणती सानेयां थोरां कडसणी करूं ।
एकसरें आनंदाचें आवारु । होत जगा ॥ २०२ ॥
परंतु हा राजा आहे, हा रंक आहे असा योग्यताभेद ते मनात धरत नाहीत. व लहान मोठा अशी निवड करत नाहीत व जगाला एकसारखे आनंदाचे कोट होतात. ॥९-२०२॥
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें ।
ऐसें नामघोषगौरवें । धवळलें विश्व ॥ २०३ ॥
(पूर्वी असे होते की) कधी तरी एखाद्याने वैकुंठाला जावे, ते यांनी सर्व वैकुंठच केले. याप्रमाणे माझ्या नामघोषाच्या महात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केले. ॥९-२०३॥
तेजें सूर्य तैसें सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ ।
चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥ २०४ ॥
तेजाने ते महात्मे सूर्यासारखे लखलखित आहेत असे म्हणावे, परंतु सूर्याचा अस्त होतो, हा सूर्यात दोष आहे. (व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधीच अस्त होत नाही. (यांस चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र एखादे वेळेसच (फक्त पौर्णिमेलाच) पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरूपस्थितीने नेहेमीच पूर्ण असतात. ॥९-२०४॥
मेघ उदार परी वोसरे । म्हणौनि उपमेसी न पुरे ।
हे निःशंकपणें सपांखरे । पंचानन ॥ २०५ ॥
मेघ वृष्टी करण्यात उदार असतो पण तो वोसरतो म्हणून तो मेघ या (बोधाची सदैव वृष्टी करणार्‍या) महात्म्यांना उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे नि:संशयपणे कृपाळू असे सिंह आहेत. ॥९-२०५॥
जयांचे वाचेपुढां भोजें । नाम नाचत असे माझें ।
जें जन्मसहस्रीं वोळगिजे । एकवेळ यावया ॥ २०६ ॥
जे माझे नाम एक वेळ मुखात यावयास हजारो जन्म सेवा करावी लागते, ते माझे नाम ज्यांच्या वाचेपुढे नेहेमी मोठ्या प्रेमाने नाचत असते. ॥९-२०६॥
तो मी वैकुंठीं नसें । वेळु एक भानुबिंबींही न दिसें ।
वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय ॥ २०७ ॥
तो मी एकवेळ वैकुंठात नसतो, एक वेळ सूर्यबिंबातही नसतो शिवाय मी एक वेळ योग्यांची हृदये देखील उल्लंघन करून जातो. ॥९-२०७॥
परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।
जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥ २०८ ॥
परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांच्यापाशी अर्जुना, मला शोधावा, (मी तेथे सापडावयाचाच). ॥९-२०८॥
कैसे माझ्या गुणीं धाले । देशकालातें विसरले ।
कीर्तनें सुखी झाले । आपणपांचि ॥ २०९ ॥
ते महात्मे माझे गुण गाण्यात कसे तृप्त झाले आहेत की त्यायोगाने आपण कोठे आहोत व आपला काळ भजनात किती गेला याची त्यास खबरच नसते. ते कीर्तनाच्या सुखाने आपल्याच ठिकाणी आपले स्वरूप होऊन राहिले आहेत. ॥९-२०९॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।
माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती ॥ २१० ॥
ते महात्मे कृष्ण, विष्णु, हरि, गोविंद या नामांचेच केवळ कथन करतात व मध्ये मध्ये स्पष्टरीतीने पुष्कळ आत्मचर्चा करतात. ॥९-२१०॥
हे बहु असो यापरी । कीर्तित मातें अवधारीं ।
एक विचरती चराचरीं । पंडुकुमरा ॥ २११ ॥
आता हे वर्णन करणे राहू दे. अर्जुना ऐक. याप्रमाणे कितीएक माजे भक्त माझी कथा करीत करीत चराचरामधे संचार करत असतात. ॥९-२११॥
मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना ।
पंचप्राण मना । पाढाऊ घेउनी ॥ २१२ ॥
अर्जुना, मग कितीएक जे आहेत त्यांनी सहजच मोठ्या तत्परतेने पाच प्राण व मन हे वाटाडे बरोबर घेऊन ॥९-२१२॥
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली ।
वरी प्राणायामाचीं मांडिलीं । वाहातीं यंत्रें ॥ २१३ ॥
बाहेरच्या बाजूला यमनियमांचे काटेरी कुंपण लावले आणि त्या कुंपणाच्या आत मूळबंधाचा कोट तयार केला व त्या कोटावर प्राणायामरूपी चालू असलेल्या तोफा ठेवल्या. ॥९-२१३॥
तेथ उल्हाट शक्तीचेनि उजिवडें । मन पवनाचेनि सुरवाडें ।
सतरावियेचें पाणियाडें । बळियाविलें ॥ २१४ ॥
तेथे कुंडलिनीच्या प्रकाशाने व मन आणि प्राणवायु यांच्या मदतीने सतरावी जी जीवनकला हेच कोणी एक तळे, ते त्यांनी बळकावले. ॥९-२१४॥
तेव्हां प्रत्याहारें ख्याती केली । विकारांची सपिली बोहलीं ।
इंद्रियें बांधोनि आणिली । हृदयाआंतु ॥ २१५ ॥
त्यावेळी प्रत्याहाराने मोठा पराक्रम केला. (तो असा की), त्यामुळे विकारांची भाषा संपली व त्याने इंद्रियांना हृदयाच्या आत बांधून आणले. ॥९-२१५॥
तंव धारणावारु दाटिन्नले । महाभूतांतें एकवटिलें ।
मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥ २१६ ॥
तो इतक्यात धारणारूपी घोड्यांनी गर्दी केली व त्यांच्या बळाने योगी साधकांनी पृथ्वी वगैरे महाभूतांना एकत्र केले व नंतर त्यांनी संकल्पांचे चतुरंग सैन्य (मन, बुद्धि, चित्त व अहंकार) ठार केले. ॥९-२१६॥
तयावरी जैत रे जैत । म्हणौनि ध्यानाचें निशाण वाजत ।
दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥ २१७ ॥
त्यानंतर ‘जय झाला रे झाला’ म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूपऐक्याचे एक छत्र (एकसत्ता) चमकत असलेले दिसले. ॥९-२१७॥
पाठीं समाधीश्रियेचा अशेखा । आत्मानुभव राज्यसुखा ।
पट्टाभिषेकु देखा । समरसें जाहला ॥ २१८ ॥
नंतर समाधीरूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभावरूपी संपूर्ण राज्यसुख त्याचा समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला. पहा. ॥९-२१८॥
ऐसें हें गहन । अर्जुना माझें भजन ।
आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥ २१९ ॥
अर्जुना याप्रमाणे हे माझे (अष्टांगयोगाद्वारे होणारे) भजन फार कठिण आहे. आता किती एक मला दुसर्‍या प्रकाराने भजतात तो प्रकार सांगतो ऐक. ॥९-२१९॥
तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतू अंबरीं ।
तैसा मीवांचूनि चराचरीं । जाणती ना ॥ २२० ॥
तर वस्त्रामधे ज्याप्रमाणे एका पदरापासून दुसर्‍या पदारापर्यंत (येथीन ते तेथून) एक सूतच असते त्याप्रमाणे सजीव व निर्जीव पदार्थात माझ्यावाचून ते दुसर्‍यास ओळखत नाहीत. ॥९-२२०॥
आदि ब्रह्मा करूनी । शेवटीं मशक धरूनी ।
माजी समस्त हें जाणोनि । स्वरूप माझें ॥ २२१ ॥
ब्रह्मदेवापासून आरंभ करून अखेर चिलटापर्यंत मधे जे काही सर्व आहे ते माझे स्वरूप आहे हे जाणून ॥९-२२१॥
मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती ।
देखिलिये वस्तु उजू लुंटिती । मीचि म्हणौनि ॥ २२२ ॥
मग मोठे लहान याचा विचार न करता किंवा सजीव व निर्जीव हा भेद न करता, जो पदार्थ नजरेपुढे येईल त्यास मीच (परमात्माच) समजून सरळ लोटांगण घालतात. ॥९-२२२॥
आपुलें उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे ।
एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे ॥ २२३ ॥
त्यास आपले चांगलेपणाची आठवण नसते व समोर असलेले योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे काही न जाणता वस्तुमात्राला उद्देशून सरसकट नमस्कार करणेच त्यांना आवडते. ॥९-२२३॥
जैसें उंचीं उदक पडिलें । ते तळवटवरी ये उगेलें ।
तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥
उंच जागेवरून पडलेले पाणी जसे सखल जागेकडे आपोआप येऊ लागते त्याचप्रमाणे पाहिलेल्या प्राणिमात्रास नमस्कार करण्याचाच त्यांचा स्वभाव असतो. ॥९-२२४॥
कां फळलिया तरूची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा ।
तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ २२५ ॥
अथवा पहा की, फळभाराने लगटलेल्या झाडाची फांदी जशी सहजच जमिनीकडे लवते त्याप्रमाणे सर्व प्राणिमात्रांपुढे ते नम्रपणे लवतात. ॥९-२२५॥
अखंड अगर्वता होऊनि असती । तयांची विनय हेचि संपत्ती ।
जे जयजय मंत्रें अर्पिती । माझ्याचि ठायीं ॥ २२६ ॥
ते नेहेमी निरभिमान होऊन राहिलेले असतात. व नम्रपणा हीच त्यांची संपत्ती असते. ती संपत्ती ते ‘जय जय’ मंत्राने माझ्याच ठिकाणी अर्पण करतात. ॥९-२२६॥
नमितां मानापमान गळाले । म्हणौनि अवचितां मीचि जहाले ।
ऐसे निरंतर मिसळले । उपासिती ॥ २२७ ॥
नमस्कार करीत असतांना मान व अभिमान हे नाहीसे झाले म्हणून ते सहजगत्या मद्रूप झाले. याप्रमाणे माझ्या स्वरूपात मिसळून माझी निरंतर उपासना करतात. ॥९-२२७॥
अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती ।
आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें ॥ २२८ ॥
अर्जुना, तुला ही श्रेष्ठप्रतीची भक्ति सांगितली, आता ज्ञानरूप यज्ञाने माझी आराधना करतात त्या भक्तांचा प्रकार ऐक. ॥९-२२८॥
परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी ।
जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं ॥ २२९ ॥
परंतु ही भजन करण्याची रीती अर्जुना, तुला माहीत आहेच. कारण आम्ही मागे ह्या गोष्टी (अध्याय ४ श्लोक ३३०४२) तुला सांगितल्या आहेत. ॥९-२२९॥
तंव आथि जी अर्जुन म्हणे । हें दैविकिया प्रसादाचें करणें ।
तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे ? ॥ २३० ॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, होय महाराज, मी हे जाणत आहे व हे देवाच्या प्रसादाचे करणे आहे. परंतु अमृताचे भोजन मिळाल्यावर ‘पुरे आता नको’ असे म्हणावेल काय ? ॥९-२३०॥
या बोला श्रीअनंतें । लागटा देखिलें तयांतें ।
कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे ॥ २३१ ॥
अर्जुनाच्या वरील बोलण्यावरून तो हे जाणण्याविषयी उत्सुक आहे असे पाहून लागलीच अंत:करणात संतोष झाल्यामुळे श्रीकृष्ण डोलायला लागले. ॥९-२३१॥
म्हणे भलें केलें पार्था । एर्‍हवीं हा अनवसरु सर्वथा ।
परि बोलवितसे आस्था । तुझी मातें ॥ २३२ ॥
श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, फार चांगले केलेस. नाहीतर मागे एकवार सांगितले असल्यामुळे हा मुळीच बोलण्याचा प्रसंग नव्हता. परंतु तुझी कळाकळ मला बोलण्यास भाग पाडते. ॥९-२३२॥
तंव अर्जुन म्हणे हे कायी । चकोरेंवीण चांदणेंचि नाहीं ।
जगचि निवविजे हा तयाच्या ठायीं । स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥
तेव्हा अर्जुन म्हणाला (तुझी आस्था बोलविते) असे काय म्हणता ? चकोरपक्षी असला तरच चंद्र उगवतो एरवी उगवत नाही काय ? महाराज, जगाला शांत करावे हा त्याच्या (चंद्राच्या) ठिकाणी स्वभावच आहे. ॥९-२३३॥
येरें चकोरें तिये आपुलिये चाडे । चांचू करिती चंद्राकडे ।
तेवीं आम्ही विनवूं तें थोकडें । देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥
आता जे चकोर आहेत ते केवळ आपलीच शांतता व्हावी या इच्छेने चंद्राकडे चोच करतात, त्याप्रमाणे आमची विनंती ती किती थोडी आहे पण देवा आपण कृपासिंधु अहात. ॥९-२३४॥
जी मेघु आपुलिये प्रौढी । जगाची आर्ती दवडी ।
वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी ? ॥ २३५ ॥
महाराज मेघ हा आपल्या उदारपणाच्या वर्षावाने संपूर्ण जगाची पीडा घालवतो. वास्तविक पाहिले तर त्या पावसाच्या वृष्टीच्या मानाने चातकाची तहान ती केवढी ? ॥९-२३५॥
परि चुळा एकाचिया चाडे । जेवीं गंगेतेंचि ठाकणें पडे ।
तेवीं आर्त बहु कां थोडे । तरी सांगावें देवें ॥ २३६ ॥
परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणे गंगेलाच शरण जावे लागते त्याप्रमाणे आमची ऐकण्याविषयीची इच्छा फार असो अथवा थोडी असो, तरी ते देवांनाच सांगितले पाहिजे. ॥९-२३६॥
तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहला आहे ।
तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाहीं ॥ २३७ ॥
त्यावेळी श्रीकृष्ण म्हणाले, हे असू दे. तुझी आस्था पाहून जो काही आम्हास आनंद झाला आहे त्याच्यावर आता स्तुती सहन होईल असे राहिले नाही. ॥९-२३७॥
पैं परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वर्‍हाडीक करी ।
ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों ॥ २३८ ॥
तू उत्तम तर्‍हेने ऐकत आहेस तेच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचे काम करते. याप्रमाणे अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास आरंभ केला. ॥९-२३८॥
ज्ञानयज्ञेन चाप्यन्ये यजन्तो मामुपासते ।
एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५ ॥
तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी त्या माझे एकत्वाने (आपल्या स्वप्नातील पदार्थाशी जागृत झाल्यावर जागृत पुरुष जसे ऐक्य पहातो त्या अभेदज्ञानाने), वेगळेपणाने (आकारज्ञानभिन्न पण वृक्षशाखा दोन्ही एकच या अभेदज्ञानाने), व निरनिराळ्या प्रकाराने (जो आकार जेथे दिसेल, तो मीच आहे अशा अभेदज्ञानाने), ज्ञानयज्ञाने यजन करून माझी उपासना करतात. ॥९-१५॥
तरी ज्ञानयज्ञु तो एवं रूपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु ।
महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥ २३९ ॥
तर ज्ञानयज्ञ तो असा आहे. त्या ज्ञानयज्ञमधे मूळसंकल्प हा पशू बांधावयाचा खांब आहे, पंचमहाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशू आहे. ॥९-२३९॥
मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण ।
हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ॥ २४० ॥
नंतर पंचमहाभूतांचे जे शब्दस्पर्शादी विशेष गुण अथवा इंद्रिये व प्राण हीच यज्ञाची साहित्यसामुग्री असून, अज्ञान हे तूप आहे. ॥९-२४०॥
तेथ मनबुद्धीचिया कुंडा । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा ।
साम्य तेचि सुहाडा । वेदिका जाणें ॥ २४१ ॥
तेथे मन व बुद्धी या कुंडात प्रज्वलित ज्ञानरूपी अग्नि असून, हे मित्रा अर्जुना, सुखादु:खादी द्वंद्वांविषयी जी चित्ताची समता ही वेदी होय असे समज. ॥९-२४१॥
सविवेकमतिपाटव । तेचि मंत्र विद्यागौरव ।
शांति स्रुक्-स्रुव । जीवु यज्वा ॥ २४२ ॥
आत्मानात्मविचार करण्य़ाविषयीची जी बुद्धीची कुशलता, तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांति ही स्रुक्-स्रुवा नावाची यज्ञपात्रे आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे. ॥९-२४२॥
तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें ।
ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥ २४३ ॥
तो यज्ञ करणारा जीव, स्वरूपानुभवरूप पात्राने व ब्रह्मविचाररूप महामंत्राने व ज्ञानरूप अग्निहोत्रकर्माने, जीव व ईश्वर यांच्या भिन्नपणाची आहुती देऊन तो भेद नाहीसा करतो. ॥९-२४३॥
तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये ।
आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥
त्यावेळेस अज्ञानरूपी तूप सरून जाते आणि यज्ञ करणारा व यज्ञ करणे, हे थांबते. आणि जेव्हा यज्ञ करणारा जीव अवभृथ स्नानाचे वेळी, आत्मैक्यरूप पाण्याने स्नान करतो, ॥९-२४४॥
तेव्हां भूतें विषय करणें । हें वेगळालें कांहीं न म्हणे ।
आघवें एकचि ऐसें जाणें । आत्मबुद्धि ॥ २४५ ॥
तेव्हा तो यज्ञ करणारा पंचमहाभूते, शब्दादिविषय व इंद्रिये ही काही वेगळेपणाने समजत नाही. कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत असे जाणतो. ॥९-२४५॥
जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना ।
मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ? ॥ २४६ ॥
अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना ? ॥९-२४६॥
आतां सेना ते सेना नव्हे । हें मीच एक आघवें ।
ऐसें एकत्वें मानवें । विश्व तयां ॥ २४७ ॥
जागे झाल्यावर म्हणातो की स्वप्नातील सैन्य आता खरोखरीचे सैन्य नाही, तर स्वप्नामधे सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो. अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवास येते. ॥९-२४७॥
मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधें भरे ।
ऐसे भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें ॥ २४८ ॥
अशा अनुभव आल्यावर मग मी जीव आहे ही त्याची कल्पना नाहीशी होते. ब्रह्मदेवापासून तो मुंगीपर्यंत सर्व ब्रह्मरूपच आहे अशा ज्ञानाने तो परिपूर्ण होतो. याप्रमाणे ज्ञनयज्ञद्वारा या ऐक्यभावनेने माझे भजन करतात. ॥९-२४८॥
अथवा अनादि हें अनेक । जें आनासारिखें एका एक ।
आणि नामरूपादिक । तेंही विषम ॥ २४९ ॥
अथवा अनादिकालापासून हे अनेकत्व असेच आहे. कारण त्यांची नामे व रूपे सुद्धा भिन्न भिन्न आहेत. ॥९-२४९॥
म्हणौनि विश्व भिन्न । परि न भेदे तयाचें ज्ञान ।
जैसे अवयव तरि आन आन । परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥
म्हणून जरी विश्वात त्यांच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले तरी त्यायोगाने त्यांचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणे अवयव जरी निरनिराळे आहेत खरे, पण ते सर्व एकाच देहाचे आहेत. ॥९-२५०॥
कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिया तरुवरा ।
बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥ २५१ ॥
अथवा जशा लहानमोठ्या फांद्या आहेत खर्‍या, पण त्या एकाच झाडाच्या असतात व ज्याप्रमाणे अनेक किरणे खरी, परंतु ती एकाच सूर्याची असतात. ॥९-२५१॥
तेवीं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती ।
ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥ २५२ ॥
त्याप्रमाणे नावे व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव याप्रमाणे भेद असलेल्या प्राण्यात अभेद जो मी त्या मला ते जाणतात. ॥९-२५२॥
येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा ।
जे न भेदती जाणिवा । जाणते म्हणौनि ॥ २५३ ॥
अर्जुना, अशा (इंद्रियांना गोचर होणार्‍या) भेदप्रतीतीद्वारा ते चांगला (अभेद) ज्ञानयज्ञ करतात. कारण की ते पुरुष स्वरूपज्ञानी असल्याकारणाने विश्वातील भिन्न भिन्न पदार्थांच्या भिन्न भिन्न ज्ञानाने भेदाला पावत नाहीत. (त्या भिन्न भिन्न ज्ञानातून अन्वय दृष्टीने परमात्म्याला ते पहातात). ॥९-२५३॥
ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं ।
तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥
अथवा जेव्हा, ज्या ठिकाणी जे जे काही पहातात ते माझ्या स्वरूपावाचून दुसरे काही नाही, असाच त्यांचा बोध असतो. ॥९-२५४॥
पाहें पां बुडबुडा जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे ।
मग विरे अथवा राहे । तर्‍ही जळाचिमाजीं ॥ २५५ ॥
असे पहा की बुडबुडा जेथे जाईल तेथे त्याल एक पाणी मात्रच आहे मग राहिला तरी पाण्यातच अथवा नाहीसा झाला तरी पाण्यातच. ॥९-२५५॥
कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं केले ।
आणि माघौते जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥
अथवा वार्‍याने पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वीपणाहून वेगळे झाले नाहीत. आणि ते वर गेलेले कण जरी पुन्हा खाली पडले तरी ते पृथ्वीवरच पडतात. ॥९-२५६॥
तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही हो अथवा नोहावें ।
परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेले ॥ २५७ ॥
त्याप्रमाणे वाटेल तेथे, वाटेल त्या भावाने वाटेल तेही न व्हावे अथवा व्हावे, पण ते मी (परमात्मा) आहे असे सर्व जग त्यास अनुभवाने होऊन राहिलेले असते. ॥९-२५७॥
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ती । तेव्हडीचि तयांची प्रतीती ।
ऐसें बहुधाकारीं वर्तती । बहुचि हो‍उनि ॥ २५८ ॥
बा अर्जुना, ही जेवढी माझी व्याप्ती आहे तेवढाच त्यांचा अनुभव आहे. याप्रमाणे ते अनुभवाच्या अंगाने, मद्रूप होऊन, अनेक होऊन अनेक आकारांनी वावरत असतात. ॥९-२५८॥
हें भानुबिंब आवडे तया । सन्मुख जैसें धनंजया ।
तैसे ते विश्वा यया । समोर सदा ॥ २५९ ॥
अरे अर्जुना, जसे हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या सन्मुख असते, त्याप्रमाणे ते पुरुष नेहेमी या विश्वाच्या समोर असतात. ॥९-२५९॥
अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना ।
वायु जैसा गगना । सर्वांगीं असे ॥ २६० ॥
अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागील बाजू असे नाही. ज्याप्रमाणे वायु आकाशाच्या सर्व पोकळीभर आहे. ॥९-२६०॥
तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्‌भावा ।
तरी न करितां पांडवा । भजन जहालें ॥ २६१ ॥
त्याप्रमाणे जेवढा संपूर्ण मी आहे, तेच वजन त्याच्या सद्भावास असते. (म्हणजे तेवढा संपूर्ण त्याचा अनुभव असतो. असे असल्यामुळे अर्जुना, त्यांनी कृतीने जरी भजन केले नाही तरी ते सहजच होत असते. ॥९-२६१॥
एर्‍हवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहें ? ।
एथ एकें जाणणेवीण ठाये । अप्राप्तासी ॥ २६२ ॥
सहज विचार करून पाहिले तर जगातील सर्व पदार्थ मीच आहे, मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाही असे कसे म्हणावे ? असे असूनही ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाही त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेच त्यांस हे भजन घडत नाही. ॥९-२६२॥
परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते ।
उपासिती मातें । ते सांगितलें ॥ २६३ ॥
परंतु ते असू दे. अशा योग्य ज्ञानयज्ञाने यजन करणारे माझी जे उपासना करतात ते भक्त मी तुला सांगितले. ॥९-२६३॥
अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं ।
कीं नेणणें यासाठीं मूर्खीं । न पविजेचि मातें ॥ २६४ ॥
हे सर्व सर्वांच्या द्वारे सदोदित माझ्या एकट्याचे ठिकाणी सहजच अर्पण होत आहे. (म्हणजे सर्व प्राणी जे काही करतात ते सर्व मला एकट्याला अर्पण होते. कारण त्या सर्वांच्या रूपाने मीच एक आहे). पण मूर्खांनी हे न जाणल्यामुळे ( ते सहज अर्पण केलेले कर्म मला प्राप्त होत नाही. ॥९-२६४॥
अहं क्रतुरहं यज्ञः स्वधाहमहमौषधम् ।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम् ॥ १६ ॥
क्रतु, यज्ञ, स्वधा, औषधी, मंत्र, तूप, अग्नी आणि आहुति मीच आहे. ॥९-१६॥
तोचि जाणिवेचा जरी उदयो होये । तरी मुद्दल वेदु मीचि आहें ।
आणि तो विधानातें जया विये । तो क्रतुही मीचि ॥ २६५ ॥
त्याच ज्ञानाचा जर उदय होईल तर (असे लक्षात येईल) मुळात वेद मीच आहे आणि तो वेद जी जी कर्मे करावयास सांगतो त्या कर्मांचे विधानरूप क्रतु (यज्ञकर्म) देखील मीच आहे. ॥९-२६५॥
मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा ।
यज्ञु प्रकटे पांडवा । तोही मी गा ॥ २६६ ॥
मग वेदात करावयास सांगितलेल्या त्या क्रतुरूप कर्मापासून जॊ अंग व उपांग यासहित सर्व चांगली क्रिया होते, अर्जुना तो क्रियारूप यज्ञही मीच आहे. ॥९-२६६॥
स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा ।
आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥ २६७ ॥
देवांना व पितरांना द्यावयाच्या आहुतीचे अन्न व यज्ञाच्या कामी उपयोगात येणार्‍या सोमादिक अनेक वनस्पती हे मी आहे. यज्ञात उच्चारावयाचे मंत्र व यज्ञाकरता तयार केलेले द्रव्य ही देखील मीच आहे. ॥९-२६७॥
होता मी हवन कीजे । तेथ अग्नी तो स्वरूप माझें ।
आणि हुतवस्तु जें जें । तेही मीचि ॥ २६८ ॥
यज्ञ-कर्म करण्याकरता नेमलेला ब्राह्मण मी आहे व ज्यात हवन करतात तो अग्नी देखील माजेच स्वरूप आहे, आणि हवन करण्याचे जे जे द्रव्य ते देखील मीच आहे. ॥९-२६८॥
पिताहमस्य जगतो माता धाता पितामहः ।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च ॥ १७ ॥
या जगाचा पिता, माता, पालनकर्ता, पितामह मी आहे. ज्ञेयवस्तु, पवित्रवस्ति, ॐकार, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद हे सर्व मीच आहे. ॥९-१७॥
पैं जयाचेनि अंगसंगें । इये प्रकृतीस्तव अष्टांगें ।
जन्म पाविजत असे जगें । तो पिता मी गा ॥ २६९ ॥
अरे अर्जुना, ज्याच्या अंगसंगाने या अष्टांग प्रकृतीपासून जगाला जन्म प्राप्त होतो, तो जगाचा पिता मी आहे. ॥९-२६९॥
अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।
तेवीं मी चराचरीं । माताही होय ॥ २७० ॥
अर्धनारीनटेश्वराचे स्वरूपात जसा, जो पुरुष तोच स्त्री असतो त्याप्रमाणे चराचरांच्या बाबतीत माताही मीच होतो. ॥९-२७०॥
आणि जाहाले जग जेथ राहे । जेणें जीवित वाढत आहे ।
तें मी वांचूनि नोहे । आन निरुतें ॥ २७१ ॥
आणि उत्पन्न झालेले जग जेथे राहते व ज्याच्या योगाने जगाचे आयुष्य वाढत आहे, ते स्थान माझ्यावाचून खरोखर दुसरे नाही. ॥९-२७१॥
इयें प्रकृतिपुरुषें दोन्हीं । उपजलीं जयाचिया अमनमनीं ।
तो पितामह त्रिभुवनीं । विश्वाचा मी ॥ २७२ ॥
प्राकृति व पुरुष ही दोन्ही ज्याच्या, मन ह्या उपाधीने रहित असलेल्या, मूळ संकल्पात उत्पन्न झाली, तो त्रैलोक्यात विश्वाचा आजा मी आहे. ॥९-२७२॥
आणि आघवेया जाणणेयाचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा ।
वेदांचिया चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥
आणि अर्जुना, सर्व ज्ञानरूपी वाटा ज्या गावाला येऊन मिळतात व वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य (समजून घेण्याची मुख्य गोष्ट) म्हणतात ॥९-२७३॥
जेथ नानामतां बुझावणी जाहाली ।
एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।
चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जें पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥
आणि ज्या परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी वेगवेगळ्या शास्त्रकारांची मते जाऊन भिडली असता त्यांचा आपापसातील परमात्मस्वरूपाविषयीचा मतभेद नाहीसा होतो व जेथे परमात्म्याचे स्वरूप ठरवणारी शास्त्रे जाऊन पोहोचली असता त्यांची एकमेकात असलेली अनोळख दूर होते. (सर्व शास्त्रे एकाच परमात्म्याचे प्रतिपादन करतात अशा रूपाने शास्त्रांचा एकमेकांशी परिचय होतो) व चुकलेल्या ज्ञानांची ज्या परमात्मस्वरूपाचे ठिकाणी एकमेकांशी भेट होते (त्यांची एकवाक्यता होते) व ज्या परमात्म स्वरूपाला पवित्र म्हणातात (ते मी आहे). ॥९-२७४॥
पैं ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु ।
तयाचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा ॥ २७५ ॥
ब्रह्मरूपी बीजाला फुटलेला जो अंकुर व घोष (परा), ध्वनी (पश्यन्ती), नाद (मध्यमा) व आकार (वैखरी) यांचे मंदिर, असा जो ॐकार तो मी आहे. ॥९-२७५॥
जया ॐकाराचिये कुशीं । अक्षरें होतीं अ‍उमकारेंसीं ।
जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥
ज्या ॐकाराच्या पोटात अ, उ, म अशी अक्षरे होती व ती उपजताक्षणीच तिन्ही वेदांना घेऊन प्रगट झाली ॥९-२७६॥
म्हणौनि ऋग्यजुःसामु । हे तीन्ही म्हणे मी आत्मारामु ।
एवं मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥
म्हणून ऋग्वेद, यजुर्वेस व सामवेद हे तिन्ही वेद मीच आहे. याप्रमाणे वेदाची संपूर्ण परंपरा मीच आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाले. ॥९-२७७॥
गतिर्भर्ता प्रभुः साक्षी निवासः शरणं सुहृत् ।
प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजमव्ययम् ॥ १८ ॥
(प्रकृतीचे) विश्रांतिस्थान, भर्ता (पोषण करणारा), (जगाचा) नाथ, साक्षी, निवासस्थान, शरण जाण्य़ास योग्य ठिकाण (जगाचा) सुहृद, जगाची उत्पत्ति, प्रलय, स्थिति, निधान (रहाण्याचे ठिकाण) आणि जगाचे अविनाशी कारण हे सर्व मी आहे. ॥९-१८॥
हें चराचर आघवें । जिये प्रकृती आंत सांठवे ।
ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी ॥ २७८ ॥
हे स्थावर जंगमात्मक सर्व जग (महाप्रलयकाळी) ज्या मायेच्या पोटात सांठवते, ती माया श्रम पावली असता ज्या ठिकाणी विश्रांती घेते, ती परमगती मीच आहे. ॥९-२७८॥
आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्व विये ।
जो येऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी ॥ २७९ ॥
आणि ज्याच्या योगाने प्रकृति जगते, ज्याने तिचा (प्रकृतीचा) अंगीकार केला असता ती जगाला प्रसवते आणि जो ह्या प्रकृतीशी तादाम्त्य करून गुणांचा (सत्व, रज, तमांचा) भोग घेतो ॥९-२७९॥
तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा एथ पंडुसुता ।
मी गोसावी असे समस्ता । त्रैलोक्याचा ॥ २८० ॥
अरे अर्जुना, तो विश्वलक्ष्मीचा नवरा मीच आहे. या सर्व त्रैलोक्याचा धनी मी आहे. ॥९-२८०॥
आकाशें सर्वत्र वसावें । वायूनें नावभरी उगे नसावें ।
पावकें दाहावें । वर्षावें जळें ॥ २८१ ॥
आकाशाने सर्वत्र रहावे, वार्‍याने क्षणभर देखील स्वस्थ राहू नये, अग्नीने जाळावे व पाण्याने वर्षाव करावा ॥९-२८१॥
पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी ।
पृथ्वीया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥
डोंगरांनी आपले असन सोडू नये, समुद्रांनी आपली मर्यादा उल्लंघू नये, पृथ्वीने सर्व प्राण्यांचा भार वहावा, हे सर्व माझ्या आज्ञेने चालले आहे. ॥९-२८२॥
म्यां बोलिविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले ।
म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळिता ॥ २८३ ॥
मी बोलावयास लावले तर वेद बोलतो, मी चालावयास लावले तर सूर्य चालतो, मी हालचाल करावयास लावले तर जगाचा प्रवर्तक प्राण आपले काम करू शकतो. ॥९-२८३॥
मियांचि नियमिलासांता । काळु ग्रासितसे भूतां ।
इयें म्हणियागतें पंडुसुता । सकळें जयाचीं ॥ २८४ ॥
मी नियम घालून दिल्याकारणानेच मृत्यु हा प्राण्यांचा ग्रास करतो व (आतापर्यंत सांगितलेली) अर्जुना, ही सर्व मंडळी ज्याच्या आज्ञेप्रमाणे चालणारी आहेत ॥९-२८४॥
जो ऐसा समर्थु । तो मी जगाचा नाथु ।
आणि गगनाऐसा साक्षिभूतु । तोही मीचि ॥ २८५ ॥
असा जो सर्व शक्तिमान या जगाचा मालक तो मी आहे आणि आकाशासारखा सर्वात मिसळून उदासीन रहाणारा देखील मीच आहे. ॥९-२८५॥
इहीं नामरूपीं आघवा । जो भरला असे पांडवा ।
आणि नामरूपांचाही वोल्हावा । आपणचि जो ॥ २८६ ॥
या नामरूपाने जो सर्व व्यापून राहिलेला आहे आणि अर्जुना, नामरूप यांना जो आपण स्वत:च आधार आहे, ॥९-२८६॥
जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळीं आथी जळ ।
ऐसेनि वसवीतसे सकळ । तो निवासु मी ॥ २८७ ॥
पाण्याच्या जशा लाटा होतात आणि लाटात जसे पाणी असते, याप्रमाणे तेथे सर्व जगाची रचना केली जाते, ते जगाचे रहाण्याचे ठिकाण मीच आहे. (या उदाहरणाने जगाचा व आपला अभेद सुचवतात). ॥९-२८७॥
जो मज होय अनन्य शरण । त्याचें निवारी मी जन्ममरण ।
यालागीं शरणागता शरण्य । मीचि एकु ॥ २८८ ॥
जो मला एकनिष्ठेने शरण येतो, त्याचे जन्म व मरण मी दूर करतो. एवढ्याकरिता शरण आलेल्यांना शरण येण्यास योग्य असा मीच एक आहे. ॥९-२८८॥
मीचि एक अनेकपणें । वेगळालेनि प्रकृतीगुणें ।
जीत जगाचेनि प्राणें । वर्तत असें ॥ २८९ ॥
मी एक असून अनेक स्वरूपे धारण करून प्राण्यांच्या वेगवेगळ्या स्वभावधर्माप्रमाणे जिवंत असलेले जे जग त्याच्या रूपाने वागतो. ॥९-२८९॥
जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां । भलतेथ बिंबे सविता ।
तैसा ब्रह्मादि सर्वा भूतां । सुहृद तो मी ॥ २९० ॥
ज्याप्रमाणे सूर्य हा हे डबके, हा समुद्र असा भेद न पहाता वाटेल तेथे प्रतिबिंबित होतो (त्याप्रमाणे हा ब्रह्मदेव व हा कीटक आहे असा भेद न करता, मोबदल्याची अपेक्षा न ठेवता) ब्रह्मादी सर्व भूतांवर सारखा उपकार करणारा तो मीच आहे ॥९-२९०॥
मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासि वोलावा ।
सृष्टिक्षयप्रभवा । मूळ तें मी ॥ २९१ ॥
अर्जुना, या त्रैलोक्याचे जीवन मीच आहे. सृष्टीच्या नाशाला व उत्पत्तीला जे कारण ते मीच आहे. ॥९-२९१॥
बीज शाखांतें प्रसवे । मग तें रूखपण बीजीं सामावे ।
तैसें संकल्पें होय आघवें । पाठीं संकल्पीं मिळे ॥ २९२ ॥
बीजापासून फांद्या उत्पन्न होतात व मग ते सर्व वृक्षत्व त्या बीजामधेच लीन होते, त्याप्रमाणे संकल्पाच्या योगाने सर्वांची उत्पत्ती होते. आणि नंतर सर्व संकल्पातच नाहीसे होते. ॥९-२९२॥
ऐसें जगाचें बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारूपु ।
तया कल्पांतीं जेथ निक्षेपु । होय तें स्थान मी ॥ २९३ ॥
याप्रमाणे जगाचे मूळ बीज जो संकल्प जो सूक्ष्म वासनारूप असतो तो संकल्प कल्पाच्या अंती जेथे सूक्ष्म रूपाने रहातो ते स्थान मीच आहे. ॥९-२९३॥
इयें नामरूपे लोटती । वर्णव्यक्ती आटती ।
जातीचे भेद फिटती । जैं आकारू नाहीं ॥ २९४ ॥
ही नामरूपे जेव्हा नाहीशी होतात, वर्ण व व्यक्ती आटून जातात, जातींचे निरनिराळे प्रकार नाहीसे होतात आणि जेव्हा आकाशही नाहीसे होते (तात्पर्य जेव्हा सर्व जगदाकार नाहीसा होतो) ॥९-२९४॥
तैं संकल्पवासनासंस्कार । माघौतें रचावया चराचर ।
जेथ राहोनि असती अमर । तें निधान मी ॥ २९५ ॥
त्यावेळी वासनारूप संकल्पाचे संस्कार हे पुन: जगदाकार रचण्याकरता जेथे अमर होऊन असतात ते ठिकाण मी आहे. ॥९-२९५॥
तपाम्यहमहं वर्षं निगृह्णाम्युत्सृजामि च ।
अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन ॥ १९ ॥
हे अर्जुना, मी उष्णता उत्पन्न करतो, मी पर्जन्य थांबवून धरतो व पृथ्वीवर सोडतो. अमरवस्तु, मृत्यु तसेच सत् व असत् हे सर्व मीच आहे. ॥९-१९॥
मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे ।
पाठीं इंद्र होऊनि वर्षें । तैं पुढति भरे ॥ २९६ ॥
मी सूर्याच्या रूपाने प्रकाशतो, त्यावेळेला हे सर्व आटून जाते आणि मागाहून मीच इंद्र बनून ज्यावेळेला पाऊस पाडतो त्यावेळी पुन्हा आबादानी होते. ॥९-२९६॥
अग्नि काष्ठें खाये । तें काष्ठचि अग्नि होये ।
तैसें मरतें मारितें पाहें । स्वरूप माझें ॥ २९७ ॥
अग्नि लाकडे खातो, ती लाकडेच अग्नी बनतात, त्याप्रमाणे मरणारे व मारणारे हे दोन्ही माझी स्वरूपे आहेत असे समज. ॥९-२९७॥
यालागीं मृत्यूच्या भागीं जें जें । तेंही पैं रूप माझें ।
आणि न मरतें तंव सहजें । मीचि आहें ॥ २९८ ॥
याकरता मृत्यूने घेरलेले जे जे आहे ते देखील माझेच रूप आहे आणि त्याचप्रमाणे न मरणारे जे अविनाश आहे ते तर सहजच मी आहे. ॥९-२९८॥
आतां बहु बोलोनि सांगावें । तें एकिहेळां घे पां आघवें ।
तरी सतासतही जाणावें । मीचि पैं गा ॥ २९९ ॥
आता पुष्कळ बोलून काय सांगायचे ? ते सर्व एकदाच सांगतो, लक्षात ठेव. तर विनाशी आणि अविनाशी म्हणून जे पदार्थ आहेत ते मीच आहे असे समज. ॥९-२९९॥
म्हणौनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे ? ।
परि प्राणियांचें दैव कैसें । जे न देखती मातें ? ॥ ३०० ॥
म्हणून अर्जुना, जेथे मी नाही, असे कोणते ठिकाण आहे ? परंतु या प्राण्यांचे दुर्दैव कसे आहे ते पहा. की मी सर्वव्यापी असूनही ते मला कोठेच पहात नाहीत. ॥९-३००॥
तरंग पाणियेवीण सुकती । रश्मि वातीवीण न देखती ।
तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखें ॥ ३०१ ॥
लाटा य़ा जलरूप असून त्या जलाशिवाय वृक्षादिकांप्रमाणे सुकून जात आहेत, तसेच प्रकाशरूप ही सूर्यकिरणे ती दिव्याशिवाय पाहू शकत नाहीत. त्याचप्रमाणे सर्व प्राणी मद्रूप असून त्याच आपण भगवद्रूप आहोत असे वाटत नाही, हे केवढे आश्चर्य आहे ? पहा. ॥९-३०१॥
हें आंतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें ।
कीं कैसें कर्म तयां आड आलें । जें मीचि नाहीं म्हणती ? ॥ ३०२ ॥
हे सर्व जग आत-बाहेर माझ्याच रूपाने ठेचून भरलेले आहे. जग हे केवळ माझेच ओतलेले आहे, परंतु कसे दुर्दैव त्यांच्यावर ओढवले आहे की ते मीच (देवच) नाही असे म्हणतात. ॥९-३०२॥
परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयांतें कडिये काढिजे ।
ऐसे आथी काय कीजे । अप्राप्तासी ॥ ३०३ ॥
परंतु अमृताच्या आडात पडावे आणि आपण आपल्याला काठावर का काढावे ? परंतु ते ज्याला अप्राप्त आहे अशालाच असेच होते, त्याला काय करावे ? ॥९-३०३॥
ग्रासा एका अन्नासाठीं । अंधु धांवताहे किरीटी ।
आढळला चिंतामणि पायें लोटी । आंधळेपणें ॥ ३०४ ॥
अर्जुना एका घासभर अन्नाकरता एक आंधळा रस्त्याने धावत असतांना चिंतामणी रत्नाला ठेच लागून अडखळला. पण तो आंधळा होता. म्हणून त्याने तो चिंतामणी लाथेने उडवला. ॥९-३०४॥
तैसें ज्ञान जैं सांडूनि जाये । तैं ऐसी हे दशा आहे ।
म्हणौनि कीजे तें केलें नोहे । ज्ञानेंवीण ॥ ३०५ ॥
त्याप्रमाणे जेव्हा जीवाला ज्ञान सोडून जाते त्यावेळची जीवाची वरील आंधळ्यासारखी अवस्था होते. म्हणून जे काही करावे ते ते ज्ञानाशिवाय केल्यासारखे होत नाही. ॥९-३०५॥
आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती ? ।
तैसें सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंवीण ॥ ३०६ ॥
आंधळ्याला जर गरुडाचे पंख असले तर त्याला ते कोणत्या उपयोगाला पडतील ? त्याप्रमाणे ज्ञानाशिवाय सत्कर्माचरणाचे श्रम केले असता व्यर्थ जातात. ॥९-३०६॥
त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ते ।
ते पुण्यमासाद्य सुरेन्द्रलोकमश्नन्ति दिव्यान्दिवि देवभोगान् ॥ २० ॥
तीन वेद जाणणारे, (यज्ञामधे) सोमपान करणारे व तेणेकरून पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञांनी माझे यजन करून स्वर्गगति मागतात. पुण्याचे फल असा जो देवेंद्राचा लोक तो प्राप्त करून ते मग त्या स्वर्गलोकी दिव्य असे देवांचे असे भोग भोगतात. ॥९-२०॥
देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी ।
विधिमार्गां कसवटी । जे आपणचि होती ॥ ३०७ ॥
पहा अरे अर्जुना, आश्रमधर्माच्या आचरणाने विहित मार्गाला जे आपणच कसोटी होतात (ज्यांच्या आचरणावरून वागण्याचा विधी कळतो असे ज्यांचे आचरण उत्तम असते) ॥९-३०७॥
यजन करितां कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके ।
क्रिया फळेंसि उभी ठाके । पुढां जयां ॥ ३०८ ॥
ते सहज लीलेने यज्ञ करावयास लागले असता, तिन्ही वेद आपली मान डोलावतात व ज्यांच्यापुढे ती यज्ञक्रिया आपल्या फलासह मूर्तिमंत येऊन उभी रहाते. ॥९-३०८॥
ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरूप ।
तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिलें देखें ॥ ३०९ ॥
याप्रमाणे जे यज्ञात सोमरसाचे पान करणारे यज्ञकर्ते आहेत आणि जे आपण स्वत:च यज्ञमूर्ती झाले आहेत, त्यांनी यज्ञापासून होणार्‍या त्या पुण्याच्या नावाने वास्तविक पापाचा लाभ पदरात पाडला असे समज. ॥९-३०९॥
श्रुतित्रयांतें जाणोनी । शतवरी यज्ञ करुनी ।
यजिलिया मातें चुकोनी । स्वर्गा वरिती ॥ ३१० ॥
कारण की त्यांनी ऋग्वेदादी तिन्ही वेदांना जाणून शंभरपर्यंत यज्ञ करून माझे आराधन केले असता मला अजिबात विसरून ते स्वर्गच पसंत करतात. ॥९-३१०॥
जैसें कल्पतरूतळवटीं । बैसोनि झोळिये देतसे गांठी ।
मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करूं ॥ ३११ ॥
कल्पवृक्षाच्या खाली बसून अभागी पुरुष भीक मागण्याच्या झोळीला गाठी मारतो आणि मग अर्जुना तो अभागी पुरुष ज्या प्रमाणे भीक मागावयास निघतो. ॥९-३११॥
तैसे शतक्रतु यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुखातें ।
आतां पुण्य कीं हें निरुतें । पाप नोहे ? ॥ ३१२ ॥
त्याप्रमाणे शंभर यज्ञ करून त्यांनी माझे आराधन केले आणि मग ते स्वर्गांतील सुखांची इच्छा करूं लागले. आता हे पुण्य आहे का ? तर खरोखर हे पाप नव्हे काय ? ॥९.३१२॥
म्हणौनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु ।
ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती ॥ ३१३ ॥
म्हणून माझी प्राप्ती करून न घेता स्वर्गाची प्राप्ती करून घेणे हा अज्ञानी लोकांचा पुण्यमार्ग आहे. ज्ञानी लोक या मार्गाला विघ्न व नाश म्हणतात. ॥९-३१३॥
एर्‍हवीं तरी नरकींचें दुःख । पावोनि स्वर्गा नाम कीं सुख ।
वांचूनि नित्यानंद गा निर्दोख । तें स्वरूप माझें ॥ ३१४ ॥
सहज विचार करून पाहिले तर नरकाच्या दु:खाकडे दृष्टि देऊन स्वर्गाला सुख हे नाव आले आहे. वास्तविक पाहिले असता, अर्जुना, निर्दोष असा जो त्रिकालाबाधित आनंद, ते माझे स्वरूप आहे. ॥९-३१४॥
मज येतां पैं सुभटा । या द्विविधा गा आव्हांटा ।
स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया ॥ ३१५ ॥
अर्जुना माझ्याकडे येत असतांना माझ्या स्वरूपापासून भलतीकडे नेणार्‍या, स्वर्ग व नरक या दोन प्रकारच्या आडवाटा आहेत. त्या चोरांच्या आहेत. ॥९-३१५॥
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे । पापात्मकें पापें नरका जाइजे ।
मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥
पुण्यरूप पापाने (बाहेरून दिसायला पुण्य व आतून भारलेले पाप) पापरूप पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय. ॥९-३१६॥
आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दुर्‍हावें पंडुसुता ।
तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई ? ॥ ३१७ ॥
आणि अर्जुना सर्व प्राणी माझ्या स्वरूपामधे असतांना ज्या कृत्याने मी परमात्मा दुखावला जातो त्या कृत्याला पुण्य असे म्हटले तर जिव्हा झडणार नाही का ? ॥९-३१७॥
परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरि ते दीक्षित ।
यजूनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥
परंतु ह्या प्रसंगी हे आता राहू दे. अर्जुना ऐक या प्रमाणे ते यज्ञकर्ते वस्तुत: माझी आराधना करतात, पण स्वर्गातील दिव्य पदार्थांच्या भोगाची याचना करतात. ॥९-३१८॥
मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे ।
तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥ ३१९ ॥
मग मी ज्याच्यायोगाने प्राप्त होत नाही, असे जे पापरूप पुण्य आहे, त्याच्या योगाने मिळालेल्या योग्यतेने ते स्वर्गाला जातात. ॥९-३१९॥
जेथ अमरत्व हें सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।
राजधानीभुवन । अमरावती ॥ ३२० ॥
ज्या स्वर्गात न मरणेपणा हेच सिंहासन आहे, ऐरावत हत्तीसारखे वाहन आहे व राजधानीची जागा अमरावती नगर आहे. ॥९-३२०॥
जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें ।
जिये गांवीं खिल्लारें । कामधेनूंचीं ॥ ३२१ ॥
ज्या स्वर्गात अणिमा, लघिमा, इत्यादी महासिद्धींची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूंचे कळप आहेत ॥९-३२१॥
जेथ वोळगे देव पाइका । सैंघ चिंतामणीचिया भूमिका ।
विनोदवनवाटिका । सुरतरूंचिया ॥ ३२२ ॥
ज्या स्वर्गात देवसमुदाय चाकर होऊन सेवा करतो, जेथे जिकडे तिकडे चिंतामणी नावाच्या रत्नांच्या जमिनी आहेत व जेथे करमणुकीसाठी केलेले बगीचे कल्पवृक्षांचे आहेत. ॥९-३२२॥
गंधर्व गात गाणीं । जेथ रंभे ऐसिया नाचणी ।
उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥ ३२३ ॥
जेथे गंधर्वांची गाणी हीच गाणी आहेत व जेथे रंभेसारख्या सुंदर अप्सरा नाचणार्‍या आहेत आणि विलास करण्याकरता ज्या स्त्रिया आहेत त्यात मुख्य उर्वशी आहे. ॥९-३२३॥
मदन वोळगे शेजारें । जेथ चंद्र शिंपे सांबरें ।
पवना ऐसे म्हणियारे । धांवणें जेथ ॥ ३२४ ॥
जेथे शय्यागृहात मूर्तिमंत मदन सेवाचाकरी करतो, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चंद्र (आपल्या अमृतमय किरणांनी) सडासंमार्जन करतो व वार्‍यासारखा चपळ जासूद जेथे म्हटलेले काम करण्यास तयार आहे. ॥९-३२४॥
पैं बृहस्पती मुख्य आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण ।
ताटियेचे सुरगण । बहुवस जेथें ॥ ३२५ ॥
देवगुरु बृहस्पती स्वत: ज्यामधे मुख्य आहेत असे आशीर्वाद देणारे व कल्याण इच्छिणारे ब्राह्मण जेथे आहेत व जेथे पंक्तीला देवमंडळींचे समुदाय आहेत ॥९-३२५॥
लोकपाळ रांगेचे । राउत जिये पदवीचे ।
उच्चैःश्रवा खांचे । खोळणिये ॥ ३२६ ॥
ज्या ठिकाणी घोडेस्वार लोकपालांच्या (पूर्वादि दिशांचे स्वामी) बरोबरीचे आहेत, जेथे उच्चै:श्रवा नावाचा इंद्राचा घोडा पुढे चालतो, ॥९-३२६॥
हे असो बहु ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे ।
ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु ॥ ३२७ ॥
हे फार वर्णन करणे पुरे. याप्रमाणे इंद्राच्या सुखाहीसारखे ते भोग यज्ञकर्त्यांच्या पदरात जेथेपर्यंत पुण्याचा अंश असतो तेथपर्यंत भोगतात. ॥९-३२७॥
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति ।
एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥ २१ ॥
तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाले म्हणजे ते मर्त्यलोकी प्रवेश करतात. विषयांची इच्छा धरून, तीन वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्ममार्ग आचरण करणारांना या प्रकारे जाणे येणे (जन्ममृत्यु) प्राप्त होते. ॥९-२१॥
मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे ।
आणि येऊं लागती माघारे । मृत्युलोका ॥ ३२८ ॥
मग त्या पुण्याने प्राप्त झालेला दर्जा नाहीसा झाला की त्याबरोबरच यज्ञकर्त्यात असलेले इंद्राच्या ऐश्वर्याचे तेज कमी होते. आणि मग ते मृत्युलोकाला परत येऊ लागतात. ॥९-३२८॥
जैसा वेश्याभोगी कवडा वेंचे । मग दारही चेपूं नये तियेचें ।
तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ? ॥ ३२९ ॥
ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय रहात नाही. त्याप्रमाणे (पुण्याची पुंजी सरलेल्या) यज्ञकर्त्यांची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे ? ॥९-३२९॥
एवं थितिया मातें चुकले । जींहीं पुण्यें स्वर्ग कामिलें ।
तयां अमरपण तें वावों जालें । अंतीं मृत्युलोकु ॥ ३३० ॥
या प्रमाणे ज्यांनी पुण्याच्या जोरावर स्वर्गाची हाव धरली, ते नित्य जवळ असणार्‍या मला चुकले, आणि त्यांचे अमरपणाही व्यर्थ गेले. आता त्यांना (पूर्वीचा) मृत्युलोक पुन्हा प्राप्त झाला. ॥९-३३०॥
मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेच्या दाथरीं ।
उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥
आईच्या पोटरूपी गुहेत, नरकाच्या उकडीतील थरात, नऊ महिनेपर्यंत उकडून पुन: पुन: ते जन्माला येऊन मरतात. ॥९-३३१॥
अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें ।
तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥
अर्जुना स्वप्नामधे द्रव्याचा ठेवा सापडतो, पण जागे झाले असता तो सर्व नाहीसा होतो. त्याप्रमाने वेद जाणणार्‍या यज्ञकर्त्याचे स्वर्गसुख समजावे. ॥९-३३२॥
अर्जुना वेदविद जर्‍ही जाहला । तरी मातें नेणता वायां गेला ।
कणु सांडूनि उपणिला । कोंडा जैसा ॥ ३३३ ॥
ज्याप्रमाणे धान्य टाकून नुसता कोंडा उफाणावा, त्याप्रमाणे अर्जुना, मला जाणले नाही तर प्रत्यक्ष एवढा वेद तरी तो व्यर्थ होतो. ॥९-३३३॥
म्हणौनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण ।
आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥
म्हणून एक मला सोडले तर तीनही वेदांनी सांगितलेले धर्म निरर्थक ठरतात. यास्तव अर्जुना मला जाणून मग दुसरे जरी काही जाणले नाहीस तरी तू सुखी होशील. ॥९-३३४॥
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ २२ ॥
एकनिष्ठेने माझे चिंतन करणारे जे जन माझी उपासना करतात, त्या सतत (माझ्या ठिकाणी चित्ताने) युक्त असलेल्या जनांचा (सायुज्य अथवा मत्सेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा) योग (अप्राप्त वस्तूची प्राप्ती) व क्षेम (प्राप्त वस्तूचे तक्षण) मी करतो. ॥९-२२॥
पैं सर्वभावेसीं उखितें । जे वोपिलें मज चित्तें ।
जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणें ॥ ३३५ ॥
जे सर्व प्रकारच्या वृत्तींसहित चित्ताने मला उक्ते विकले गेले, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही ॥९-३३५॥
तैसा मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटेंचि नाहीं ।
मजचि नाम पाहीं । जिणेंया ठेविलें ॥ ३३६ ॥
त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना बरे वाटत नाही आणि पहा ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे (ज्यांना माझी सेवा करण्यातच आपल्या जीविताची सार्थकता वाटते). ॥९-३३६॥
ऐसे अनन्यगतिकें चित्तें । चिंतितसांतें मातें ।
जे उपासिति तयांतें । मीचि सेवीं ॥ ३३७ ॥
याप्रमाणे एकनिष्ठ चित्ताने माझे चिंतन करत असता जे माझी उपासना करतात त्यांची सेवा मीच करतो. ॥९-३३७॥
ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरले गा माझिये वाहणीं ।
तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥ ३३८ ॥
ते ज्या क्षणात एकनिष्ठ होऊन माझ्या मार्गाला लागले (मला भजावयास लागले) त्याच वेळेला त्यांच्या संबंधांच्या काळजीचा बोजा माझ्यावर येऊन पडला. ॥९-३३८॥
मग तींहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें ।
जैसी अजातपक्षाचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥
मग जे जे म्हणून त्यांस करावयाचे असते ते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवित्वाने पक्षिण जगते, ॥९-३३९॥
आपुली तहान भूक नेणें । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।
तैसें अनुसरले जे मज प्राणें । तयांचें सर्व मी करीं ॥ ३४० ॥
आपली तहानभूक काही न जाणता लहान मुलाला जे हितकर असेल ते आईलाच करणे भाग पडते, त्या मुलाप्रमाणे जे मला अंत:करणपूर्वक भजले त्यांचे काहीही करण्यास मी लाजत नाही. ॥९-३४०॥
तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड ।
कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सूयें ॥ ३४१ ॥
त्यांना जर माझ्या एकरूपतेची इच्छा असेल तर तीच त्यांची आवड मी पूर्ण करतो. किंवा ते माझ्या सेवेची मागणी करतील तर आम्हा दोघांमधे प्रेम घालतो. (म्हणजे मी माझ्याविषयीचे त्यांना प्रेम देतो). ॥९-३४१॥
ऐसा मनीं जो जो धरिती भावो । तो तो पुढां पुढां लागे तयां देवों
आणि दिधलियाचा निर्वाहो । तोही मीचि करीं ॥ ३४२ ॥
याप्रमाणे जो जो हेतु मनात धरतात तो तो मी त्यांच्या पुढे पुढे होऊन त्यांना द्यावयास लागतो, आणि दिलेल्याचे रक्षणही मीच करतो. ॥९-३४२॥
हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा ।
जयांचिया सर्वभावा । आश्रयो मी ॥ ३४३ ॥
ज्याच्या सर्व वृत्तींना मीच एक आश्रय आहे त्यांस नसलेला इच्छित पदार्थ देणे व दिलेला पदार्थ जतन करणे, हे सर्व अर्जुना, मलाच करावे लागते. ॥९-३४३॥
येऽप्यन्यदेवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधीपूर्वकम् ॥ २३ ॥
जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त (माझ्याहून) अन्य देवतांची (अन्य म्हणून) उपासना करतात ते देखील हे अर्जुना (अज्ञानामुळे) विधि सोडून (पण) माझीच पूजा करतात. ॥९-२३॥
आतां आणिकही संप्रदायें । परी मातें नेणती समवायें ।
जें अग्निइंद्रसूर्यसोमाये । म्हणौनि यजिती ॥ ३४४ ॥
आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्वत्र समान असणारा जो मी, त्या मला जाणत नाहीत व ते अग्नये, इंद्राय, सूर्याय, सोमाय स्वाहा असे म्हणून यज्ञ करतात.॥९-३४३॥
तेही कीर मातेंचि होये । कां जें हें आघवें मीचि आहें ।
परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ॥ ३४५ ॥
ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन निश्वयेकरून माझेच भजन होत असते. कारण की ह्या सर्व रूपांनी मीच एक आहे, पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा आहे. ॥९-३४५॥
पाहें पां शाखा पल्लव रुखाचें । हे काय नव्हती एकाचि बीजाचें ? ।
परी पाणी घेणें मुळाचें । तें मुळींचि घापे ॥ ३४६ ॥
अर्जुना, पहा झाडाच्या फांद्या आणि पाने, ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय ? परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळालाच घातले पाहिजे. ॥९-३४६॥
कां दहाही इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती ।
आणि इहीं सेविले विषयो जाती । एकाचि ठायीं ॥ ३४७ ॥
किंवा दहा इंद्रिये आहेत आणि जरी ती एकाच देहात आहेत आणि त्यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोक्त्याला जाऊन पोचतात. ॥९-३४७॥
तरि करोनि रससोय बरवी । कानीं केवीं भरावी ? ।
फुलें आणोनि बांधावीं । डोळां केवीं ? ॥ ३४८ ॥
असे जरी असले तरी उत्तम पक्वान्न करून कानात कसे भरावे ? फुले आणून ती डोळ्यांवर कशी बांधावी ? ॥९-३४८॥
तेथ रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा ।
तैसा मी तो यजावा । मीचि म्हणौनि ॥ ३४९ ॥
त्या ठिकाणी पक्वान्ने ही तोंडानेच खाल्ली पाहिजेत, जो वास, तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझॆ भजन माझ्या भावनेनेच करावे. ॥९-३४९॥
येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन ।
म्हणौनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें ॥ ३५० ॥
अर्जुना, दुसरे कित्येक भक्त जे मला न जाणून भजन करतात ते त्यांचे भजन व्यर्थ, भलत्यास भलते असे होते. या करता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ पाहिजे ॥९-३५०॥
अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च ।
न तु मामभिजान्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते ॥ २४ ॥
सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आणि स्वामी आहे. लोक मला सत्य स्वरुपाने जाणत नाहीत म्हणून ते घसरत असतात. ॥९-२४॥
एर्‍हवीं पाहे पां पंडुसुता । या यज्ञोपहारां समस्तां ।
मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे ? ॥ ३५१ ॥
एरवी अर्जुना, पहा की, या सर्व यज्ञातील सामुग्रीचा माझ्यावाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे ? ॥९-३५१॥
मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि ।
कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि । देवां भजले ॥ ३५२ ॥
सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञांचा शेवटही मी आहे. अशा प्रकारे या यज्ञांच्या आरंभी व अंती असणारा जो मी, त्या मला टाकून हे दुर्बुद्धिप्रधान याज्ञिक इंद्रादि देवांना भजतात. ॥९-३५२॥
गंगेचें उदक गंगें जैसें । अर्पिजे देवपितरोद्देशें ।
माझें मज देती तैसें । परि आनानीं भावी ॥ ३५३ ॥
ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण करावयास बसले म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव व पितर यांना उद्देशून पुन्हा गंगेतच टाकतात, त्याचप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात. ॥९-३५३॥
म्हणौनि ते पार्था । मातें न पवतीचि सर्वथा ।
मग मनीं वाहिली जे आस्था । तेथ आले ॥ ३५४ ॥
म्हणून अर्जुना ते मुळीच माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाहीत. तर ते ज्याची इच्छा मनात करतात त्या लोकाला जातात. ॥९-३५४॥
यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रता ।
भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥ २५ ॥
देवांची भक्ति करणारे देवत्वाप्रत जातात, पितरांची भक्ति करणारे पितृत्वाप्रत जातात. भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात आणि माझेच पूजन करणारे मद्रूप होतात. ॥९-२५॥
मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणीं ।
ते शरीर जातिये क्षणीं । देवचि जाले ॥ ३५५ ॥
मनाने, वाचेने व सर्व इंद्रियांनी ज्यांचा भजनप्रवाह इंद्रादि देवांचे मार्गाकडे आहे, त्यांचा देह पडताक्षणीच त्यांना स्वर्गात देवशरीर मिळते. ॥९-३५५॥
अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें ।
जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी ॥ ३५६ ॥
अथवा श्राद्धपक्षादी जी पितरांची व्रते आहेत ती व्रते अंत:करणपूर्वक जे पाळतात ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. ॥९-३५६॥
कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेचि जयांचि परमदैवतें ।
जिहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें ॥ ३५७ ॥
किंवा भूतखेतादि क्षुद्र देवता हीच ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत व त्यांची जारण, मारण, उच्चाटान इत्यादि तामसकर्मांनी उपासना केली आहे ॥९-३५७॥
तयां देहाची जवनिका फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली ।
एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां ॥ ३५८ ॥
त्यांचा देहरुपी पडदा दूर होतो व नंतर त्यांना भूताखेतादिकांची गती मिळते. याप्रमाणे ज्यांनी जशा हेतूने कर्मे केली असतील, ती त्यांना तशी फलद्रूप होतात, ॥९-३५८॥
मग मीचि डोळां देखिला । जिहीं कानीं मीचि ऐकिला ।
मीचि मनीं भाविला । वानिला वाचा ॥ ३५९ ॥
मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली व वाणीने माझे वर्णन केले ॥९-३५९॥
सर्वांगीं सर्वांठायीं । मीचि नमस्करिला जिहीं ।
दानपुण्यादिकें जें कांहीं । तें माझियाचि मोहरां ॥ ३६० ॥
सर्व अवयवांनी सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दान पुण्य इत्यादि जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते. ॥९-३६०॥
जिहीं मातेंचि अध्ययन केलें । जे आंतबाहेरि मियांचि धाले ।
जयांचें जीवित्व जोडलें । मजचिलागीं ॥ ३६१ ॥
ज्यांनी माझे ज्ञान करून देणार्‍या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आतबाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्याकरताच आयुष्य लाभलेले आहे, (म्हणजे जे आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरता खर्च करतात) ॥९-३६१॥
जे अहंकारु वाहत आंगीं । आम्ही हरीचे भूषावयालागीं ।
जे लोभिये एकचि जगीं । माझेनि लोभें ॥ ३६२ ॥
आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, ते जगात एक माझ्याच लोभाने लोभी झालेले आहेत ॥९-३६२॥
जे माझेनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम ।
जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक ॥ ३६३ ॥
जे माझ्याविषयीच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्याठिकाणी भुलल्यामुळे वेडे झाले आहेत, म्हणून लोकांना जाणत नाहीत ॥९-३६३॥
जयांचीं जाणती मजचि शास्त्रें । मी जोडें जयांचेनि मंत्रें ।
ऐसें जे चेष्टामात्रें । भजले मज ॥ ३६४ ॥
ज्यांची शास्त्रे तर मलाच जाणतात, जे अशा मंत्राचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते, अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले, ॥९-३६४॥
ते मरणा ऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे ।
मग मरणीं आणिकीकडे । जातील केवीं ? ॥ ३६५ ॥
त्याम्ना मरण येण्याच्या पूर्वीच माझ्या स्वरूपाशी त्याचे निश्चयेकरून ऐक्य झाले. ते मग मरणसमयी इतर गतीस कसे जातील ? ॥९-३६५॥
म्हणौनि मद्याजी जे जाहाले । ते माझियाचि सायुज्या आले ।
जिहीं उपचारमिषें दिधलें । आपणपें मज ॥ ३६६ ॥
याकरता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभव अर्पण केला आहे असे माझे भजन करणारे हे आहेत ते माझ्या सायुज्य (मोक्ष) गतीस जातात. ॥९-३६६॥
पैं अर्जुना माझे ठायीं । आपणपेंवीण सौरसु नाहीं ।
मी उपचारें कवणाही । नाकळें गा ॥ ३६७ ॥
अर्जुना, भक्ताने आपला आत्मा अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे, मी (इतर दुसर्‍या कोणत्याही) उपचारांनी कोणालाही वश होत नाही. ॥९-३६७॥
एथ जाणीव करी तोचि नेणें । आथिलेंपण मिरवी तेंचि उणें ।
आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे ॥ ३६८ ॥
येथे जो ‘मी परमात्मस्वरूप जाणले’ म्हणतो त्यास ते खास कळले नाही असे समजावे. माझ्यापुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो, तोच त्याचा कमीपणा आहे. जो ‘आम्ही कृतार्थ झालो’ असे म्हणतो तो काहीच झाला नाही असे समजावे. ॥९-३६८॥
अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी ।
ते तृणा एकासाठीं । न सरे एथ ॥ ३६९ ॥
अथवा अर्जुना, यज्ञ, दान आणि तप यांच्या योगाने मी सहज भगवद्प्राप्ती करून घेईन असा जर कोणाला गर्वाचा फुंज असेल तर त्या यज्ञ, दान, तप वगैरेंची गवताच्या काडीइतकी सुद्धा माझ्याजवळ किंमत नाही. ॥९-३६९॥
पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदांपासूनि असे आगळें ? ।
कीं शेषाहूनि तोंडाळें । बोलकें आथी ? ॥ ३७० ॥
अर्जुना, विचार कर, ज्ञानसंपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे काय ? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडांनी बोलणारा कोठे आहे काय ? ॥९-३७०॥
तोही आंथरुणातळवटीं दडे । येरु नेति नेति म्हणौनि बहुडे ।
एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले ॥ ३७१ ॥
तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो वेद तो ‘मी परमात्मा’ असा नाही, मी परमात्मा तसा नाही असे म्हणून परत फिरतो. माझ्या (परमात्मस्वरूपाचे) ठिकाणी सनकादिक अगदी वेडेपिसे झाले आहेत. ॥९-३७१॥
करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजे शूळपाणी ।
तोही अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे ॥ ३७२ ॥
तपस्व्यांची निवड करू गेले तर असा कोण तपस्वी आहे की जो महादेवाच्या पंक्तीला बसवता येईल ? तो शिव देखील अभिमान टाकून माझे चरणोदक (गंगा) मस्तकावर धारण करता झाला. ॥९-३७२॥
नातरी आथिलेपणें सरिशी । कवणी आहे लक्ष्मिये ऐसी ? ।
श्रियेसारिखिया दासी । घरीं जियेतें ॥ ३७३ ॥
अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे ? ज्या लक्ष्मीच्या घरी श्रियेसारख्या दासी आहेत ॥९-३७३॥
तिया खेळतां करिती घरकुलीं । तयां नामें अमरपुरें जरी ठेविलीं ।
तरि न होती काय बाहुलीं । इंद्रादिक तयांचीं ? ॥ ३७४ ॥
त्यांनी भातुकली खेळतांना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातील बाहुल्या होणार नाहीत काय ? ॥९-३७४॥
तिया नावडोनि जेव्हां मोडिती । तेव्हां महेंद्राचे रंक होती ।
तिया झाडा जेउते पाहती । ते कल्पवृक्ष ॥ ३७५ ॥
खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळ, घरकुले वगैरे मोडतात, तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे असले तरी ते रंक होतात. त्या ज्या झाडांकडे एवढेसे पहातात ते कल्पवृक्ष होतात. ॥९-३७५॥
ऐसिया जियेचिया जवळिका । सामर्थ्य घरींचिया पाइका ।
ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ ॥ ३७६ ॥
जिच्या घरातील संन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही. ॥९-३७६॥
मग सर्वस्वें करूनि सेवा । अभिमानु सांडूनि पांडवा ।
ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहाली ॥ ३७७ ॥
हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्य ठिकाणी असणार्‍या ऐश्वर्य-अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली, त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली. ॥९-३७७॥
म्हणौनि थोरपण पर्‍हां सांडिजे । एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।
जैं जगा धाकुटें होईजे । तैं जवळीक माझी ॥ ३७८ ॥
एवढ्याकरता आपल्या ठिकाणाचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा, शास्त्राधयन केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी. अशा प्रकारचा जगतात सर्व प्रकारे लहानपणा घ्यावा, तेव्हा माझे सांनिध्य प्राप्त होते. ॥९-३७८॥
अगा सहस्रकिरणांचिये दिठी- । पुढां चंद्रही लोपे किरीटी ।
तेथ खद्योत कां हुटहुटी । आपुलेनि तेजें ? ॥ ३७९ ॥
अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या थोड्याशा प्रकाशाचा डौल कशाला मिरवावा ? ॥९-३७९॥
तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे ।
तेथ येर प्राकृत हेंदरें । केवीं जाणों लाहे ? ॥ ३८० ॥
त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नही, आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही, त्या माझ्या परमात्म्याचे ठिकाणी सामान्य व अजागळ लोकांचा प्रवेश कसा होईल ? ॥९-३८०॥
यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळ गुणांचें लोण उतरिजे ।
संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करुनी ॥ ३८१ ॥
याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निंबलोण करावे, तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून द्यावा. ॥९-३८१॥
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तदहं भक्त्युपहृतमश्नामि प्रयतात्मनः ॥ २६ ॥
पान, फळ, फूल अथवा पाणी जो मला भक्तीने अर्पण करतो त्या शुद्धचित्त मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले ते पानफूलादि मी सेवन करतो. ॥९-२६॥
मग निस्सीमभाव उल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें ।
फळ आवडे तैसें । भलतयाचें हो ॥ ३८२ ॥
मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण कराण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल तसले भलत्याच झाडाचे का असेना ? ॥९-३८२॥
भक्तु माझियाकडे दावी । आणि मी दोन्हीं हात वोडवीं ।
मग देंठु न फेडितां सेवीं । आदरेंशी ॥ ३८३ ॥
भक्त माझ्यापुढे ते दाखवतो आणि ते घेण्य़ाकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. ॥९-३८३॥
पैं गा भक्तीचेनि नांवें । फूल एक मज द्यावें ।
तें लेखें तरि म्यां तुरंबावें । परि मुखींचि घालीं ॥ ३८४ ॥
अर्जुना भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. ॥९-३८४॥
हें असो कायसीं फुलें । पानचि एक आवडे तें जाहलें ।
तें साजुकही न हो सुकलें । भलतैसें ॥ ३८५ ॥
हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे ? वाटेल त्या झाडाचे एक पानच का होईना, मग ते ताजेच पाहिजे असे नाही, वाळलेले किंवा कसलेही असले तरी चालेल. ॥९-३८५॥
परि सर्वभावें भरलें देखें । आणि भुकेला अमृतें तोखें ।
तैसें पत्रचि परि तेणें सुखें । आरोगूं लागें ॥ ३८६ ॥
परंतु ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भारलेले आहे असे मी जाणतो आणि भुकेलेला अमृतामुळे जसा संतुष्ट होतो त्याप्रमाणे मी ते पान खाऊ लागतो. ॥९-३८६॥
अथवा ऐसेंहीं एक घडे । जे पालाही परी न जोडे ।
तरि उदकाचें तंव सांकडें । नव्हेल कीं ? ॥ ३८७ ॥
अथवा एक वेळ असेही झाले की पाला खरा, पण तोही मिळाला नाही, मग पाण्याच्या तर कोठे दुष्काळ नाही ना ? ॥९-३८७॥
तें भलतेथ निमोलें । न जोडितां आहे जोडलें ।
तेंचि सर्वस्व करूनि अर्पिलें । जेणें मज ॥ ३८८ ॥
ते पाणी वाटेल तेथे, बिनखर्चाचे व मिळवण्याचा काहीही प्रयत्न न करता स्वाभावत:च प्राप्त झालेले आहे. तेच आपले सर्व भांडवल समजून ज्याने मला अर्पण केले ॥९-३८८॥
तेणें वैकुंठांपासोनि विशाळें । मजलागीं केली राऊळें ।
कौस्तुभाहोनि निर्मळें । लेणीं दिधलीं ॥ ३८९ ॥
त्याने त्या करण्याने वैकुंठापेक्षा मोठी भव्य मंदिरे माझ्याकरता तयार केली व कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले. ॥९-३८९॥
दुधाचीं सेजारें । क्षीराब्धी ऐसीं मनोहरें ।
मजलागीं अपारें । सृजिलीं तेणें ॥ ३९० ॥
त्याने क्षीरसागरासारखी मनोवेध दुधाची अनेक शय्यागृहे मजकरता उत्पन्न केली. ॥९-३९०॥
कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु ।
मज हातीवा लाविला दिनकरु । दीपमाळे ॥ ३९१ ॥
त्याच्या त्या करण्यात कापूर, चंदन, अगरु अशा या सुगंधी पदार्थांचा मेरूएवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होते. त्याने आपल्या हाताने मजकरता सूर्याला दीपमाळेवर लावले (असे मी त्याच्या त्या भक्तीयुक्त कृत्याने समजतो) ॥९-३९१॥
गरुडासारिखीं वाहनें । मज सुरतरूंचीं उद्यानें ।
कामधेनूंचीं गोधनें । अर्पिलीं तेणें ॥ ३९२ ॥
त्याने गरुडासारखी वाहने, कल्पवृक्षांचे बगीचे व कामधेनूंचे कळप मला अर्पण केले. ॥९-३९२॥
मज अमृताहूनि सुरसें । बोनीं वोगरिली बहुवसें ।
ऐसा भक्तांचेनि उदकलेशें । परितोषें गा ॥ ३९३ ॥
मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पक्वान्ने त्याने नैवेद्यास दिली. अर्जुना, मी भक्तांच्या थेंबभर पाण्याने असा संतुष्ट होतो. ॥९-३९३॥
हें सांगावें काय किरीटी । तुवांचि देखिलें आपुलिया दिठी ।
मी सुदामाचिया सोडीं गांठीं । पव्हयांलागीं ॥ ३९४ ॥
अर्जुना, हे सांगावयास कशास पाहिजे ? तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की मी पोह्यांकरता सुदामदेवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या. ॥९-३९४॥
पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणे ।
आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया ॥ ३९५ ॥
मी एक भक्तीच ओळखतो. मग त्या ठिकाणी लहानथोर अशी निवड करीत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीला पाहुणे म्हणून हजर असतो. ॥९-३९५॥
येर पत्र पुष्प फळ । हें भजावया मिस केवळ ।
वांचूनि आमुचा लाग निष्कळ । भक्तितत्त्व ॥ ३९६ ॥
बाकी पान, फूल, फळ यांचे अर्पण करणे, ते मला भजण्याचे एक निमित्त असते. वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हटले म्हणजे भक्ताच्या ठिकाणचे शुद्ध भक्तितत्वच होय. ॥९-३९६॥
म्हणौनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धी एकी सोपारी करीं ।
तरि सहजें आपुलिया मनोमंदिरीं । न विसंबें मातें ॥ ३९७ ॥
म्हणून अर्जुना, ऐक. प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप मंदिरामधे तू मला विसरू नकोस. ॥९-३९७॥
यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।
यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥
हे कौंतेया, तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान देतोस, जे तप करतोस ते सर्व मला अर्पण कर. ॥९-२७॥
जे जे कांहीं व्यापार करिसी । कां भोग हन भोगिसी ।
अथवा यज्ञीं यजिसी । नानाविधीं ॥ ३९८ ॥
जे जे काही तू व्यवहार करशील किंवा शब्दादि विषयांचा अनुभाव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी हवन करशील ॥९-३९८॥
नातरी पात्रविशेषें दानें । कां सेवकां देसी जीवनें ।
तपादि हन साधनें । व्रतें करिसी ॥ ३९९ ॥
किंवा विशिष्ट योग्यता जाणून दाने देशील अथवा तू आपल्या नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने साधशील किंवा व्रतांचे आचरण करशील ॥९-३९९॥
तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें ।
तें भावना करोनि करावें । माझिया मोहरा ॥ ४०० ॥
(तात्पर्य) जे जे कर्म, जसे जसे तुझ्याकडून स्वभावत: घडेल (मग ते सांग असो अथवा असांग असो) ते सर्व कर्म माझ्या प्रीत्यर्थ आहे अशा समजुतीने कर. ॥९-४००॥
परि सर्वथा आपुले जीवीं । केलियाची से कांहींचि नुरवीं ।
ऐसीं धुवोनि कर्में द्यावीं । माझियां हातीं ॥ ४०१ ॥
या प्रकारे केले असता कर्मांची शुभाशुभफलरूप जी बंधने त्यापासून तू मुक्त होशील. या संन्यासरूपी म्हणजेच कर्मफलत्यागरूपी कर्मयोगाने युक्तचित्त व कर्मबंधनापासून मुक्त झालास म्हणजे माझ्या समीप येशील. ॥९-२८॥
शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।
संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८ ॥
परंतु अमूक कर्म मी केले, अशी कर्तृत्वाची आठवण मुळीच आपल्या मनामधे ठेऊ नकोस. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून (कर्तृत्व अभिमानरहित होऊन) मला अर्पण कर. ॥९-४०१॥
मग अग्निकुंडीं बीजें घातलीं । तियें अंकुरदशे जेवीं मुकलीं ।
तेवीं न फळतीचि मज अर्पिलीं । शुभाशुभें ॥ ४०२ ॥
मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामधे टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या योग्यतेला आचवते त्याप्रमाने मला अर्पण केलेली बरीवाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत. ॥९-४०२॥
अगा कर्में जैं उरावें । तैं तिहीं सुखदुःखीं फळावें ।
आणि तयातें भोगावया यावें । देहा एका ॥ ४०३ ॥
अर्जुना, ज्या वेळेला कर्मे शिल्लक रहातात, त्यावेळेला त्यांचे सुखदु:खांचे रूपाने फळ तयार होते व त्या फळाला भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो. ॥९-४०३॥
ते उगाणिलें मज कर्म । तेव्हांचि पुसिलें मरण जन्म ।
जन्मासवें श्रम । वरचिलही गेले ॥ ४०४ ॥
ते कर्म ज्या वेळेला मला अर्पण केले, त्या वेळेलाच जन्ममरण पार नाहीसे झाले. आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले. ॥९-४०४॥
म्हणौनि अर्जुना यापरी । पाहेचा वेळु नव्हेल भारी ।
हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥ ४०५ ॥
म्हणून अर्जुना, याप्रमाणे ही सोपी अनायासे कर्मरहित होण्याची युक्ती तुला दिली आहे. (तर ही एकदम अंमलात आण). ती जर उद्या अंमलात आणू म्हणशील तर फलप्राप्तीस (कर्मरहित होण्यास) तितकाच जास्त वेळ लागणार नाही काय ? ॥९-४०५॥
या देहाचिया बांदोडी न पडिजे । सुखदुःखांचियां सागरीं न बुडिजे ।
सुखें सुखरूपा घडिजे । माझियाचि आंगा ॥ ४०६ ॥
वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली असता) देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनायासे ऐक्य होते. ॥९-४०६॥
समोहं सर्वभूतेषु न मे द्वेष्यो~स्ति न प्रियः ।
ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९ ॥
मी सर्व भूतांचे ठिकाणी सम आहे. मला परका व आपला कोणी नाही. पण जे मला भक्तिपूर्वक भजतात, ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे. ॥९-२९॥
तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा ।
जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥ ४०७ ॥
भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक. जो मी सर्व प्राण्यांमधे सारखा व्यापून राहिलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही, ॥९-४०७॥
जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि ।
जे जीवें कर्में करूनि । मातें भजलें ॥ ४०८ ॥
अशा प्रकारे सर्वत्र समान असणारा जो मी त्या मला जाणून त्या ज्ञानाने जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात व मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात. ॥९-४०८॥
ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझ्या ठायीं ।
आणि मी तयांच्या हृदयीं । समग्र असे ॥ ४०९ ॥
ते देहात वागतांना दिसतात, परंतु खरोखर देहतादात्म्यात नसून माझ्या ठिकाणी चांगले रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंत:करणात संपूर्ण आहे. ॥९-४०९॥
सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे ।
आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं ॥ ४१० ॥
आपल्या विस्तारासह वडपणा ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बियांमधे असतो आणि त्याचप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते ॥९-४१०॥
तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें ।
वांचूनि आंतुवट वस्तुविचारें । मी तेचि ते ॥ ४११ ॥
तसे आमच्यात आणि भक्तात एकमेकांशी पाहता बाह्यनामरूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत. ॥९-४११॥
आतां जायांचें जैसें लेणें । आंगावरी आहाचवाणें ।
तैसें देहधरणें । उदास तयांचें ॥ ४१२ ॥
आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी घालणार्‍याच्या मनात उदासीनता असते तसे ते भक्तही देहाविषयी उदासीन असतात . ॥९-४१२॥
परिमळु निघालिया पवनापाठीं । मागें वोस फूल राहे देंठीं ।
तैसें आयुष्याचिये मुठी । केवळ देह ॥ ४१३ ॥
(जर देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का ? तर त्यांनी ठेवला नाही किंतु केवळ त्यांच्या आयुष्याने धरून ठेवला आहे. हीच गोष्ट उदाहरणाने स्पष्ट करतात). वायु आपल्याबरोबर फुलातील सर्व सुगंध घेऊन गेल्यावर मग केवळ देठाला जसे सुगंधशून्य फूल रहाते, त्याप्रमाणे भक्ताचा देह (केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ) आयुष्य धरून ठेवते. ॥९-४१३॥
येर अवष्टंभु जो आघवा । तो आरूढोनि मद्‌भावा ।
मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥ ४१४ ॥
अर्जुना, एरवी त्यांचा सर्व देहाहंकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला. ॥९-४१४॥
अपि चेत् सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ३० ॥
पूर्वी अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्यभक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच मानला पाहिजे. कारण तो योग्य मार्गाने प्रयत्न करणारा होय. ॥९-३०॥
ऐसे भजतेनि प्रेमभावें । जयां शरीरही पाठीं न पवे ।
तेणें भलतया व्हावें । जातीचिया ॥ ४१५ ॥
अशा प्रकारे प्रेमभावाने भजत असता ज्याला पुन्हा शरीरही मिळत नाही, तो मग कोणत्या का जातीचा असेना ? ॥९-४१५॥
आणि आचरण पाहतां सुभटा । तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।
परि जीवित वेंचिलें चोहटां । भक्तीचिया कीं ॥ ४१६ ॥
आणि अर्जुना त्याच्या वागणूकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे. परंतु ज्यांनी आपले (उरलेले) आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे ॥९-४१६॥
अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती ।
म्हणौनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं ॥ ४१७ ॥
अरे मरणप्रसंगी ज्या वासनेला घेऊन बुद्धी असते त्या वासनानुरूप खरोखर पुढील जन्म मिळतो. याकरता ज्याने आपला जीव अखेरीस भक्तीला अर्पण केला ॥९-४१७॥
तो आधीं जरी दुराचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं ।
जैसा बुडाला महापुरीं । न मरतु निघाला ॥ ४१८ ॥
तो पूर्वीचा पापाचरण करणारा असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे, असे समज. जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला ॥९-४१८॥
तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणौनि बुडालेपण जेवीं वायां गेलें ।
तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती ॥ ४१९ ॥
तो जिवंत कडेला लागल्यामुळे आता त्याचे बुडलेपण व्यर्थ गेले, त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही. ॥९-४१९॥
यालागीं दुष्कृती जर्‍ही जाहला । तरी अनुतापतीर्थीं न्हाला ।
न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें ॥ ४२० ॥
याकरता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चात्तापरूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला ॥९-४२०॥
तरी आतां पवित्र तयाचेंचि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ ।
जन्मलेयाचें फळ । तयासीच जोडलें ॥ ४२१ ॥
तर आता त्याचेच कूळ पवित्र आहे आणि जन्माला आल्याचे फळ त्यालाच मिळाले. ॥९-४२१॥
तो सकळही पढिन्नला । तपें तोचि तपिन्नला ।
अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें ॥ ४२२ ॥
त्याने सर्वही अध्ययन केले, त्याने तपांची आचरणे केली किंवा आसनादिक अष्टांग योगाचा अभ्यास केला. ॥९-४२२॥
हें असो बहुत पार्था । तो उतरला कर्में सर्वथा ।
जयाची अखंड गा आस्था । मजचिलागीं ॥ ४२३ ॥
अर्जुना हे फार वर्णन पुरे. ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे. अरे अर्जुना, तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला. ॥९-४२३॥
अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेची पेटी ।
मजमाजीं किरीटी । निक्षेपिलीं जेणें ॥ ४२४ ॥
हे अर्जुना, ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीच्या जी एकनिष्ठा त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये पुरून टाकली. ॥९-४२४॥
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ॥ ३१ ॥
तो अल्पकाळात धर्मात्मा होतो, त्याला शाश्वत अशी शांती प्राप्त होते. हे कौंतेया, माझा भक्त (कधीही) नाश पावत नाही. हे तू निश्चयपूर्वक जाण. ॥९-३१॥
तो आतां अवसरें मजसारिखा होईल । ऐसा हन भाव तुज जाईल ।
हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचें ? ॥ ४२५ ॥
तो भक्त आता कालांतराने मद्रूप होईल अशीही कल्पना तुझ्या अंत:करणात येईल. अगा अर्जुना, अमृतात राहाणार्‍याला मरण कसे येईल ? ॥९-४२५॥
पैं सूर्यु जो वेळु नुदैजे । तया वेळा कीं रात्रि म्हणिजे ।
तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे । तें महापाप नोहें ? ॥ ४२६ ॥
ज्यावेळेस सूर्याचा उदय झालेला नसतो, त्या कालाला रात्र असे म्हणावयाचे, तसे माझ्या भक्तीवाचून जे जे करणे ते ते महापातक नव्हे काय ? ॥९-४२६॥
म्हणौनि तयाचिया चित्ता । माझी जवळिक पंडुसुता ।
तेव्हांचि तो तत्त्वता । स्वरूप माझें ॥ ४२७ ॥
अर्जुना याकरता भक्ताच्या चित्तास माझे स्वरूपसांनिध्य ज्या वेळेस प्राप्त होते त्यावेळेसच खरोखर तो तद्रूप होतो. ॥९-४२७॥
जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे ।
तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मीचि होऊनि ठाके ॥ ४२८ ॥
ज्याप्रमाणे एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता त्यातील पहिला कोणता हे ओळखता येत नाही, त्याप्रमाणे जो सर्वभावांनी माझे भजन करतो तो मद्रूप होऊन रहातो. ॥९-४२८॥
मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती ।
किंबहुना जिती । माझेनि जीवें ॥ ४२९ ॥
मग माझी नित्य असलेली जी स्वरूपशांती, तीच त्याची स्थिती व तेज आहे. फार काय सांगावे ? माझ्या जीवाने ते जगलेले आहेत. ॥९-४२९॥
एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगों किती ।
जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा ॥ ४३० ॥
हे अर्जुना, सांगितलेली गोष्ट पुन: पुन: तीच ती किती सांगू ? माझ्या प्राप्तीची जर तुला इच्छा असेल तर माझी भक्ती क्षणभरही सोडू नकोस. ॥९-४३०॥
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । आभिजात्य झणीं श्लाघा ।
व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वहावा ? ॥ ४३१ ॥
अरे आमचे कूळ शुद्ध आहे, या अभिमानात राहू नका. तसेच आमचे कूळ श्रेष्ठ आहे असा कदाचित आनंद मानाल तर मानू नका व शास्त्राधयनाची व्यर्थ हाव का बाळगावी ? ॥९-४३१॥
कां रूपवयसा माजा । आथिलेपणें कां गाजा ? ।
एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें ॥ ४३२ ॥
उत्तम रूपाने व तारुण्याने मस्त का व्हावे ? संपन्नपणाचा डौल कशाला मिरवावा ? कारण माझ्याविषयी एक भक्ती नसेल तर जा सर्व पसारा निष्फल आहे. ॥९-४३२॥
कणेंविण सोपटें । कणसें लागलीं घनदाटें ।
काय करावें गोमटें । वोस नगर ? ॥ ४३३ ॥
धान्यावाचून पिशा असलेली कणसे दाट एकसारखी आली तरी त्यांचा काय उपयोग ? शहर चांगले आहे, पण त्यात वस्ती नसेल तर त्याचा काय उपयोग ? ॥९-४३३॥
नातरी सरोवर आटलें । रानीं दुःखिया दुःखी भेटलें ।
कां वांझ फुलीं फुललें । झाड जैसें ॥ ४३४ ॥
अथवा सरोवरातील पाणी आटले किंवा रानामधे एका दु:खी मनुष्याची आणि दुसर्‍या दु:खी मनुष्यशी गाठ पडली अथवा एखाद्या झाडाला वांझ फुलांचा बहर आला ॥९-४३४॥
तैसें सकळ तें वैभव । अथवा कुळ जाति गौरव ।
जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं ॥ ४३५ ॥
सर्व ऐश्वर्य अथवा कूळ व जाती यांचा मोठेपणा हे त्याप्रमाणे आहे. ज्याप्रमाणे एखादे शरीर सर्व अवयवांनी पूर्ण असून त्यात फक्त जीवच नसावा ॥९-४३५॥
तैसें माझिये भक्तीविण । जळो तें जियालेंपण ।
अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काईं ? ॥ ४३६ ॥
त्याप्रमाणे माझ्या भक्तीवाचून जे जगणे आहे त्याला आग लागो. अर्जुना, पृथ्वीवर दगड नाहीत काय ? ॥९-४३६॥
पैं हिंवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली ।
तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं । अभक्तांतें ॥ ४३७ ॥
हिंवराची गर्द छाया ज्याप्रमाणे सत्पुरुष टाळतात त्याप्रमाणे भक्तिहीन लोकांना चुकवून पुण्ये निघून जातात. ॥९-४३७॥
निंब निंबोळियां मोडोनि आला ।
तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला ।
तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोषांचिलागीं ॥ ४३८ ॥
निंबाच्या झाडाला झाड मोडेल इतक्या निंबोण्या आल्या तर त्या सुबत्तेचा फायदा केवल कावळ्यांनाच होतो, त्याप्रमाने भक्तिहीन मनुष्य केवळ पापाकरताच वाढलेला असतो. ॥९-४३८॥
कां षड्रस खापरीं वाढिले । वाढूनि चोहटां ठेविले ।
ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी ॥ ४३९ ॥
अथवा षड्रस अन्न खापरात वाढले आणि वाढून तो उतारा रात्री चव्हाट्यावर टाकून दिला असता ते जसे कुत्र्याच्याच उपयोगाला येते ॥९-४३९॥
तैसें भक्तिहीनाचें जिणें । जो स्वप्नींहि परि सुकृत नेणे ।
संसारदुःखासि भाणें । वोगरिलें ॥ ४४० ॥
त्याप्रमाणे अभक्त मनुष्यांचे जीवित आहे. जो स्वप्नात देखील पुण्य करावयाचे जाणत नाही, अरे, त्याने संसाराच्या दु:खांना आमंत्रणच वाढून ठेवले आहे. ॥९-४४०॥
मां हि पार्थ व्यपाश्रित्य येऽपि स्युः पापयोनयः ॥
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेऽपि यान्ति परां गतिम् ॥ ३२ ॥
हे पार्था ज्यांचा जन्म पापयोनीत झाला आहे असे, तसेच स्त्रिया, वैश्य, शूद्र हे सर्व माझा आश्रय केल्यावर उत्कृष्ट गती पावतात. ॥९-३२॥
म्हणौनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्यजहि व्हावें ।
वरि देहाचेनि नांवें । पशूचेंहि लाभो ॥ ४४१ ॥
याकरता कूळ उत्तमच असावयास पाहिजे असे नाही. जातीने नीचयोनीचा असला तरी चालेल, (अंत्यजच काय) पण देहाच्या नावाने पशूचा देह मिळाला असला तरी चालेल. (पण माझी भक्ती पाहिजे. म्हणजे कृतार्थता होईल). ॥९-४४१॥
पाहें पां सावजें हातिरूं धरिलें । तेणें तया काकुळती मातें स्मरिलें ।
कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें । पावलिया मातें ॥ ४४२ ॥
हे पहा की मगराने गजेंद्राला पाण्यात धरले असता त्य़ाच्या तडाख्यातून सुटण्याकरता त्याने मोठ्या काकुळतीने माझा धावा केला. त्या योगाने त्यास माझी प्राप्ती झाली आणि त्य़ाचा पशूपणा व्यर्थ गेला. ॥९-४४२॥
अगा नांवें घेतां वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं ।
तिये पापयोनींही किरीटी । जन्मले जे ॥ ४४३ ॥
अर्जुना, ज्या जातींच्या नावाचा उच्चार केला असता वाईट आहे, (फार काय सांगावे?) जी जात सर्व निकृष्टात निकृष्ट आहे, त्या पापरूप जातीमध्ये जे जन्मास आले आहेत ॥९-४४३॥
ते पापयोनि मूढ । मूर्ख जैसे कां दगड ।
परि माझ्यां ठायीं दृढ । सर्वभावें ॥ ४४४ ॥
ते पापजातीतील अविवेकी, दगडाप्रमाणे मूर्ख का असेनात, परंतु सर्व भावाने ज्यांची माझ्या ठिकाणी पक्की भक्ती आहे ॥९-४४४॥
जयांचिये वाचें माझे आलाप । दृष्टी भोगी माझेंचि रूप ।
जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे ॥ ४४५ ॥
ज्यांच्या तोंडात माझीच कथा आहे, ज्यांचे डोळे माझेच रूप पहाण्यात गुंतले आहेत, ज्यांचे मन माझ्याच विषयीचा विचार करते, ॥९-४४५॥
माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण ।
जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा ॥ ४६ ॥
माझे गुण ऐकण्यावाचून ज्यांचे कान रिकामे नसतात, ज्यांच्या शरीरातील प्रत्येक अवयवाला माझी कोणती ना कोणती तरी सेवा भूषण होऊन राहिली आहे, ॥९-४४६॥
जयांचे ज्ञान विषो नेणे । जाणीव मज एकातेंचि जाणे ।
जया ऐसें लाभे तरी जिणें । एर्‍हवीं मरण ॥ ४४७ ॥
ज्या भक्तांची ज्ञानवृत्ती विषयांचे ग्रहण न करता मलाच एकाला जाणते, ज्यांना याप्रमाणे (सर्व इंद्रियाच्या व्यापाराद्वारा भगवंताची सेवा करणे) मिळाले तरच जीवित्वाची सार्थकता वाटते नाहीतर जगणे मरणाप्राय वाटते. ॥९-४४७॥
ऐसा आघवाचि परी पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा ।
जियावयालागीं वोलावा । मीचि केला ॥ ४४८ ॥
याप्रमाणे अर्जुना, सर्व प्रकारांनी ज्यांनी आपल्या सर्व वृत्तींना जगण्याला मीच जीवन केलो आहे ॥९-४४८॥
ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतु कां ।
परि मजसीं तुकितां तुकां । तुटी नाहीं ॥ ४४९ ॥
ते दुष्ट जातीत देखील जन्माला आलेले असेनात का ? ते ऐकून व शिकून विद्वान झालेले नसेनात का ? परंतु त्यांची माझ्य़ाशी तुलना केली असता ते वजनात कमी भरत नाहीत. ॥९-४४९॥
पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें ।
माझें नृसिंहत्व लेणें । जयाचिये महिमें ॥ ४५० ॥
अर्जुना पहा, भक्तीच्या संपन्नतेने राक्षसांनी देवांनाही कमीपणा आणला. ज्याच्या मोठेपणाकरता मला नरसिंहरूप अलंकार धारण करावा लागला ॥९-४५०॥
तो प्रल्हादु गा मजसाठीं । घेतां बहुतें संकटे सदा किरीटी ।
कां जें मियां द्यावें ते गोष्टी । तयाचिया जोडे ॥ ४५१ ॥
अर्जुना, त्या प्रल्हादास माझ्या ऐवजी पुष्कळांनी घेतला. (माझी भक्ती करण्याऐवजी प्रल्हादाची भक्ती केली). कारण मी जे द्यावयाचे ते त्याचे वर्णन केले असता मिळते. ॥९-४५१॥
एर्‍हवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रही सरी न लाहे उपरें ।
म्हणौनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण ॥ ४५२ ॥
नाहीतर तो दैत्याचा वंश खरा, परंतु इंद्रालाही त्याच्यापेक्षा जास्त योग्यता मिळत नाही. म्हणून अर्जुना या ठिकाणी भक्तीच सरती होते जातीला काही किंमत नाही. ॥९-४५२॥
राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती ।
तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु ॥ ४५३ ॥
राजाच्या हुकुमाची अक्षरे ज्या एका चामड्यावर उमटलेली आहेत त्य़ा कातड्याच्या बदला सर्व पदार्थ प्राप्त करून घेता येतात. ॥९-४५३॥
वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे ।
तेंचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं ॥ ४५४ ॥
प्रत्यक्ष सोने, रूपे जरी असले (आणि त्याच्यावर राजाच्या हुकुमाची अक्षरे नसली) तर त्या सोन्यारूप्याची योग्य किंमत कोणी कबूल करील अथवा करणार नाही. व्यवहारात राजाच्या आज्ञेचाच जोर आहे. तीच राजाच्या हुकुमाची अक्षरे असलेला एक चामड्याचा तुकडा प्राप्त होतो तेव्हा त्याने सर्व माल विकत घेता येतो. ॥९-४५४॥
तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तैंचि सर्वज्ञता सरे ।
जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें ॥ ४५५ ॥
त्याप्रमाणे आपला उत्तमपणा त्याच वेळेला टिकेल त्याच वेळेला सर्व जाणतेपणा मान्य होईल की ज्या वेळेला मन व बुद्धी माझ्या प्रेमाने भरून जाईल. ॥९-४५५॥
म्हणौनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण ।
एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक ॥ ४५६ ॥
याकरता अरे उत्तम कुळ, जाति अगर वर्ण हे सर्व निष्फल आहेत. अर्जुना, एका माझ्या ठिकाणी अनन्य होण्यातच सार्थकता आहे. ॥९-४५६॥
तेंचि भलतेणें भावें । मन मज आंतु येतें होआवें ।
आलें तरी आघवें । मागील वावो ॥ ४५७ ॥
तेच मन वाटेल त्य़ा हेतूने का होईना पण माझ्या स्वरूपात येईल (मद्रूप होईल) असे झाले पाहिजे. आणि एकदा माझ्या स्वरूपात आले तर मागील जातिकुळ वगैरे गोष्टी निष्फळ होतात. ॥९-४५७॥
जैसें तंवचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ ।
मग होऊनि ठाकती केवळ । गंगारूप ॥ ४५८ ॥
ज्याप्रमाणे जेथपर्यंत गंगेच्या पाण्याला जाऊन मिळले नाही तेथपर्यंत नाल्या, ओढ्यांच्या पाण्याला नाले, ओढे असे म्हणतात. मग ते गंगेला येऊन मिळाल्यावर ते केवळ गंगारूपच होऊन रहातात. ॥९-४५८॥
कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे ।
जंव न घापती एकवटे । अग्नीमाजीं ॥ ४५९ ॥
किंवा खैराचे लाकूड, चंदनाचे लाकूड व इतर रायवळ लाकडे ही निवड जोपर्यंत ती एकत्र करून अग्नीमधे घातली नाहीत तोपर्यंतच होऊ शकते. ॥९-४५९॥
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया ।
जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥ ४६० ॥
त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र व अंत्यज आणि स्त्रिया ह्या जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत तेथेपर्यंतच वेगवेगळ्या असतात. ॥९-४६०॥
मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भावें होती मज मीनलें ।
जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥ ४६१ ॥
जसे समुद्रामधे मिठाचे कण घातले असता ते समुद्ररूप होऊन त्यांचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे मग जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्य़ा जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते. ॥९-४६१॥
तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे ।
जंव न येती आघवे । समुद्रामाजीं ॥ ४६२ ॥
तेथपर्यंतच (शोणभद्र व सिंधु) अशी नदांची नावे व (नर्मदा व गंगा अशी) नद्यांची नावे रहातात आणि तेथपर्यंतच पूर्वेकडे व पश्चिमेकडे वहाणारे ओघ असे भेद रहातात की जोपर्यंत ते समुद्रास येऊन मिळत नाहीत. ॥९-४६२॥
हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझे ठायीं प्रवेशे ।
येतुलें हो मग आपैसें । मीचि होणें असे ॥ ४६३ ॥
कोणत्या एका निमित्ताने हेच चित्त माझ्या स्वरूपात शिरकाव करून राहील, एवढे झाले म्हणजे मग आपोआप मद्रूप होणे निश्चित आहे. ॥९-४६३॥
अगा वरी फोडावयाचि लागीं । लोहो मिळो कां परिसाचे आंगीं ।
कां जे मिळतिये प्रसंगी । सोनेंचि होईल ॥ ४६४ ॥
अर्जुना, फोडण्याकरताच म्हणून लोखंडाचा घण परिसावर पडो,. तरीदेखील घणाचा संबंध परीसाशी येण्याच्या वेळेस तो घण सोनेच बनून जाईल. ॥९-४६४॥
पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें ।
मज मीनलिया काय माझें । स्वरूप नव्हती ? ॥ ६५ ॥
असे पहा की त्या गोपींची अंत:करणे प्रेमाच्या निमित्ताने मला येऊन मिळाली असता त्या गोपी मद्रूप झाल्या नाहीत काय ? ॥९-४६५॥
नातरी भयाचेनि मिसें । मातें न पविजेचि काय कंसें ? ।
कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं ॥ ४६६ ॥
अथवा भीतीच्या निमित्ताने कंस मला येऊन मिळाला नाही काय ? किंवा निरंतर वैर करण्याच्या जोरावर शिशुपालादिकांनी माझी प्राप्ती करून घेतली नाही काय ? ॥९-४६६॥
अगा सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां ।
कीं ममत्वें वसुदेवा- । दिकां सकळां ॥ ४६७ ॥
अरे अर्जुना, नातेपणाच्या संबंधानेच या यादवांना माझ्या स्वरूपाची प्राप्ती झाली. किंवा ममत्व ठेवल्यामुळे वसुदेवांदिक सर्वांना माझी प्राप्ती झाली. ॥९-४६७॥
नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा ।
यां भक्तीं मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा ॥ ४६८ ॥
नारदाला, ध्रुवाला, अक्रूराला, शुकाला अथवा सनत्कुमार यांना अर्जुना ज्याप्रमाणे मी भक्तीच्या योगाने प्राप्त करून घेण्याला योग्य झालो ॥९-४६८॥
तैसाचि गोपीकांसि कामें । तया कंसा भयसंभ्रमें ।
येरां घातकां मनोधर्में । शिशुपालादिकां ॥ ४६९ ॥
त्याचप्रमाणे गोपिकांस कामाने (विषयबुद्धीने), त्या कंसाला भयाच्या भ्रांतीने आणि त्या शिशुपालादिकांना त्यांच्या त्या घातक बुद्धीमुळे (मी प्राप्त झालो). ॥९-४६९॥
अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों पां भलतेनि मार्गें ।
भक्ती कां विषयविरागें । अथवा वैरें ॥ ४७० ॥
अगा अर्जुना, मी सर्व मार्गांच्या मुक्कामाचे एक ठिकाण आहे. (त्या वर सांगितलेल्या मार्गांपैकी) वाटेल त्या मार्गाने मजकडे (माझ्या स्वरूपी) येता येते. (ते वर सांगितलेले मार्ग म्हणजे) भक्तीने अथवा विषयबुद्धीने अथवा वैराग्याने अथवा वैराने. ॥९-४७०॥
म्हणौनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझ्या ठायीं ।
उपायांची नाहीं । वाणी एथ ॥ ४७१ ॥
म्हणून अर्जुना, पहा माझ्या स्वरूपात मिळावयाचे असेल तर येथे साधनाचे बंधन नाही. ॥९-४७१॥
आणि भलतिया जातीं जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें ।
परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥ ४७२ ॥
आणि वाटेल त्या जातीत जन्माला आले तरी चालेल. मग भक्ति किंवा वैर केले तरी हरकत नाही. परंतु भक्त किंवा वैरी व्हायचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे. ॥९-४७२॥
अगा कवणें एकें बोलें । माझेपण जर्‍ही जाहालें ।
तरी मी होणें आलें । हाता निरुतें ॥ ४७३ ॥
(शत्रु किंवा मित्र म्हणून) कोणात्याही का निमित्ताने होईना, जर माझ्याशी दृढ संबंध आला तर मद्रूप होणे हे खास हाती आले असे समजावे. ॥९-४७३॥
यालागीं पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना ।
मातें भजतां सदना । माझिया येती ॥ ४७४ ॥
याप्रमाणे अर्जुना, दुष्ट जातीत जन्म झालेले किंवा वैश्य, शूद्र अथवा स्त्रिया यांनी माझे भजन केले असता ते माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. ॥९-४७४॥
किं पुनर्ब्राह्मणाः पुण्या भक्ता राजर्षयस्तथा ।
अनित्यमसुखं लोकमिमं प्राप्य भजस्व माम् ॥ ३३ ॥
तर मग पुण्यकर्मी ब्राह्मण भक्त असलेले आणि ऋषींप्रमाणे आचरण करणारे राजे हे उत्कृष्ट गति पावतात यात नवल ते काय ? अनित्य व सुखहीन असा हा मर्त्यलोक प्राप्त झाला असता त्यातून मुक्त होण्याकरता माझीच भक्ती कर. ॥९-३३॥
मग वर्णांमाजीं छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार ।
मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥
मग चारही वर्णांमधे छात्रचामरांप्रमाणे सर्वांच्यावर असलेले, ज्यांना स्वर्ग हा निर्वाहाकरता दिलेला इनाम आहे व जे वेदातील मंत्ररूप विद्येचे माहेरघर आहेत, असे जे ब्राह्मण ॥९-४७५॥
जे पृथ्वीतळींचें देव । जे तपोवतार सावयव ।
सकळ तीर्थांसि दैव । उदयलें जें ॥ ४७६ ॥
जेथे (ज्या ब्राह्मणांच्या ठिकाणी) नेहेमी यज्ञांचे रहाणे असते, जे वेदांचे अभेद्य चिलखत आहेत, ज्यांच्या दृष्टिरूप मांडीवर कल्याणाची वाढ होत असते ॥९-४७६॥
जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी ।
जयांचेनि दिठीचिया उत्संगीं । मंगळ वाढे ॥ ४७७॥
जे या पृथ्वीवरील देव आहेत, जे मूर्तिमंत तपाचे अवतार आहेत, जे सर्व तीर्थांना उदयास आलेले दैवच आहेत ॥९-४७७॥
जयांचिये आस्थेचेनि वोलें । सत्कर्म पाल्हाळीं गेलें ।
संकल्पें सत्य जियालें । जियांचेनि ॥ ४७८ ॥
ज्यांच्या इच्छारूप ओलीने चांगले कर्म हाच कोणी वेल, तो विस्तार पावला आहे, ज्यांच्या संकल्पाने सत्य जिवंत राहिले आहे, ॥९-४७८॥
जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्य जाहालें ।
म्हणौनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥
ज्यांच्या आशीर्वादाने अग्नीचे आयुष्य वाढले म्हणून समुद्राने आपले पाणी त्यांच्या प्रीतीकरता दिले ॥९-४७९॥
मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं ।
मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजां ॥ ४८० ॥
मी लक्ष्मीला सारून पलीकडे केली, गळ्यातील कौस्तुभ काढून हातात घेतला व मग ज्यांच्या पायधुळीकरता छातीचा खळगा पुढे केला, ॥९-४८०॥
आझुनि पाउलाची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा ।
जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागीं ॥ ४८१ ॥
अर्जुना अजूनपर्यंत त्या पावलाची खूण मी हृदयाच्या ठिकाणी वागवीत आहे. ती का वागवतो म्हणून म्हणशील तर आपल्या षड्गुणैश्वर्यभाग्यरूप समुद्राचे रक्षण होण्याकरता. ॥९-४८१॥
जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा ।
जयांचे प्रसादीं फुकटा । जोडती सिद्धी ॥ ४८२ ॥
अर्जुना, ज्यांचा राग हा काळाग्नि नावाच्या प्रलयकाळच्या रुद्रदेवतेचे वसतीस्थान आहे व ज्यांच्या प्रसन्नतेने अष्टमहासिद्धी फुकट म्हणजे अनायासे प्राप्त होतात. ॥९-४८२॥
ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझ्या ठायीं अतिनिपुण ।
आतां मातें पावती हे कवण । समर्थावें ? ॥ ४८३ ॥
याप्रमाणे पुण्याईने पूज्य असलेले जे ब्राह्मण व जे माझ्या ठिकाणी अतिशय तत्पर आहेत ते मला मिळतात. हे काय आता निराळे सिद्ध करावयास पाहिजे का ? ॥९-४८३॥
पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळें ।
तिहीं निर्जिवींही देवांचीं निडळें । बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥
पहा, चंदनाच्या झाडावरून आलेल्या वार्‍याने स्पर्श केलेली लिंबाची झाडे जी चंदनाच्या जवळ होती ती निर्जीव असूनही त्यांनी देखील देवाच्या मस्तकावर रहाण्यास जागा मिळवली. ॥९-४८४॥
मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें ।
अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायी साच ? ॥ ४८५ ॥
मग खास चंदन ती जागा मिळवणार नाही असे मनात तरी कसे आणता येईल ? किंवा त्यास ती जागा मिळाली आहे हे सिद्ध केले तरच ते खरे ठरणार असे आहे काय ? ॥९-४८५॥
जेथ निववील ऐशिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा ।
वाहिजत असे शिरसा । निरंतर ॥ ४८६ ॥
ज्याअर्थी शंकरांनी (हालाहल विषप्राशनानंतर आग होत होती ती) थंड करील या आशेने अर्धा चंद्र मस्तकावर धारण केला आहे ॥९-४८६॥
तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा ।
तो चंदनु केवीं अवलीळा । सर्वांगीं न बैसे ? ॥ ४८७ ॥
त्याअर्थी थंड करणारा आणि पूर्ण व सुवासाने चंद्रापेक्षाही अधिक असा जो चंदन तो सहज सर्वांगाच्या ठिकाणी कसा बसणार नाही ? ॥९-४८७॥
कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें ।
तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे ? ॥ ४८८ ॥
अथवा रस्त्यावरील पाण्यांनी जिचा आश्रय केला असता ती (रथ्योदके) अनायाचेच समुद्ररूप होतात त्या गंगेला काही समुद्राशिवाय दुसरी गती आहे काय ? ॥९-४८८॥
म्हणौनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गति मति मीचि शरण्य ।
तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण । स्थितीही मीचि ॥ ४८९ ॥
म्हणून क्षत्रिय असून ऋषी झालेले असोत किंवा ब्राह्मण असोत, ज्यांच्या क्रियेला, बुद्धीला मीच आश्रयस्थान आहे, त्यांना निश्चयाने मीच परमगती आहे आणि त्यांचे असणेही मीच आहे. ॥९-४८९॥
यालागीं शतजर्जर नावें । रिगोनि केवीं निश्चिंत होआवें ।
कैसेनि उघडिया असावें । शस्त्रवर्षीं ॥ ४९० ॥
या करता शेकडो ठिकाणी खिळखिळ्या झालेल्या होडीत बसून स्वस्थ कसे रहावे ? व शस्त्रांचा वर्षाव होत असता उघड्या अंगाने कसे असावे ? ॥९-४९०॥
आंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केवीं वोडण ।
रोगें दाटला आणि उदासपण । वोखदेंसी ? ॥ ४९१ ॥
अर्जुना, अंगावर धोंडे पडत असतांना मध्ये ढाल कशी घालू नये ? रोगाने ग्रस्त झाले असतांना औषधाविषयी बेफिकीर कसे रहावे ? ॥९-४९१॥
जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केवीं पांडवा ।
तेवीं लोकां येऊनि सोपद्रवां । केवीं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥
अर्जुना जेथे चोहिकडून वणवा लागला आहे तेथून बाहेर कसे पडू नये ? त्याप्रमाणे अनेक दु:खांनी भरलेल्या या मृत्युलोकात येऊन मला कसे भजू नये बरे ? ॥९-४९२॥
अगा मातें न भजावयालागीं । कवण बळ पां आपुलिया आंगीं ।
काई घरीं कीं भोगी । निश्चिंती केलीं ? ॥ ४९३ ॥
अरे अर्जुना, माझे भजन न करण्याला असे आपल्या (प्राण्यांच्या) अंगी कोणते सामर्थ्य आहे ? हे घराच्या जोरावर का भोगाच्या जोरावर बेफिकीर झाले आहेत ? ॥९-४९३॥
नातरी विद्या कीं वयसा । ययां प्राणियांसि हा ऐसा ।
मज न भजतां भरंवसा । सुखाचा कोण ? ॥ ४९४ ॥
अथवा विद्येने अथवा तारुण्याने हे बेपर्वा होऊन बसले आहेत ? माझे भजन न करता असे बेपर्वा होऊन बसण्यासारखी या प्राण्यांना सुखाची खात्री कोणाची आहे ? ॥९-४९४॥
तरी भोग्यजात जेतुलें । तें एका देहाचिया निकिया लागलें ।
आणि एथ देह तंव असे पडिलें । काळाचिये तोंडीं ॥ ४९५ ॥
तर जेवढे विषयमात्र म्हणून आहेत, ते सर्व एका देहाच्याच बर्‍याकरता (सुखाकरता) उपयोगात आले आहेत. आणि या मृत्युलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे ॥९-४९५॥
बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले ।
तिये मृत्युलोकींचिये शेवटिलें । येणें जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥
‘बाप रे बाप’ जेथे दु:खरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे अशा त्या मृत्युलोकातील (नरदेहरूपी) शेवटच्या बाजाराच्यावेळी येणे झाले आहे. ॥९-४९६॥
आंता सुखेंसि जीविता । कैंचीं ग्राहिकी किजेल पंडुसुता ।
काय राखोंडी फुंकितां । दीपु लागे ? ॥ ४९७ ॥
आता अर्जुना, सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल ? राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे काय ? ॥९-४९७॥
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेईजे पिळुनी ।
तया नाम अमृत ठेवुनी । जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥
अर्जुना, विषाचे कांदे वाटून जो रस निघेल, तो पिळून घ्य़ावा आणि त्या रसाचे नाव अमृत ठेवून (त्याच्या सेवनाने) ज्याप्रमाणे अमर होण्याची खात्री धरावी ॥९-४९८॥
तेवीं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥
त्याप्रमाणे विषयांमधे जे सुख आहे ते निव्वळ कडेलोटीचे दु:खच आहे. परंतु काय करावे ? लोक मूर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्यावाचून त्यांचे चालतच नाही. ॥९-४९९॥
कां शीस खांडूनि आपुलें । पायींच्या खतीं बांधिलें ।
तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें ॥ ५०० ॥
किंवा आपले मस्तक तोडून ते पायास पडलेल्या जखमेवर जसे बांधावे तसे या मृत्युलोकातील सर्व व्यवहार, चाललेले आहेत. ॥९-५००॥
म्हणौनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं ।
कैंची सुखनिद्रा अंथरुणीं । इंगळांच्या ॥ ५०१ ॥
एवढ्याकरता या मृत्युलोकात सुखाची नुसती गोष्ट कोणाला आपल्या कानाने ऐकता येईल काय ? निखारे असणार्‍या अंथरुणावर आनंदाने झोप कोठून येणार ? ॥९-५०१॥
जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं ।
दुःख लेऊनि सुखाची आंगीं । सळित जगातें ॥ ५०२ ॥
ज्या लोकातील चंद्र क्षयरोगाने ग्रासलेला आहे, जेथे मावळण्यासाठीच (सूर्याचा) उदय होत असतो जेथे दु:ख हे सुखाचा पोशाख करून जगाला सारखे छळित आहे, ॥९-५०२॥
जेथ मंगळाचिया अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोहरी ।
मृत्यु उदराचिया परिवरी । गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥
जेथे मंगलकारक गोष्टीच्य़ा कोंबाबरोबरच त्यावर अमंगल गोष्टींची कीड पडते व जेथे पोटात असतांनाच मरण गर्भाला घेरते ॥९-५०३॥
जें नाहीं तयातें चिंतवी । तंव तेंचि नेइजे गंधर्वीं ।
गेलियाची कवणें गांवीं । शुद्धी न लगे ॥ ५०४ ॥
जे नाही (अप्राप्य आहे) त्याचे चिंतन करावयास (मृत्युलोकातील वस्ती) लावते. (बरे ते प्राप्त झाले) तेव्हा त्याचवेळेला ते गंधर्व (अदृश्य पुरुष) नेतात, बरे ते घेऊन कोणत्या गावाला गेले त्याचा शोधही लागत नाही ॥९-५०४॥
अगा गिंवसितां आघविया वाटी । परतलें पाऊलचि नाहीं किरीटी ।
सैंघ निमालियांचिया गोठी । तियें पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥
अगा अर्जुना, सर्व वाटांनी शोध केला तरी मृत्यूच्या मुखात गेलेल्यांचे एकही पाऊल परत फिरलेले मला दिसत नाही. व जेथील पुराणे ही सर्व मेलेल्यांच्याच गोष्टींनी भरलेली आहेत, ॥९-५०५॥
जेथिंचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी ।
कैसें नाहीं होणें अवधारीं । निपटूनियां ॥ ५०६ ॥
या मृत्युलोकाची रचना करणार्‍या ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत जेथील क्षणभंगुरतेचा प्रभाव जाऊन भिडतो. अर्जुना हे नाहीसे होणे कसे सरसकट व्यापक आहे ते ऐक. (ब्रह्मदेवापर्यंत सर्व नाश पावतात). ॥९-५०६॥
ऐसी लोकींची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक ।
तयांचिये निश्चिंतीचें कौतुक । दिसत असे ॥ ५०७ ॥
(अशा तर्‍हेची) ज्या लोकातील वागणूक आहे, त्या लोकात ज्यांनी जन्म घेतला आहे, त्या लोकांच्या बेफिकीरपणाचे मोठे नवल दिसते. कसे तर ॥९-५०७॥
पैं दृष्टादृष्टाचिये जोडी- । लागीं भांडवल न सुटे कवडी ।
जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा ॥ ५०८ ॥
अरे ज्या पासून इहपरलोकीचा लाभ होतो त्याकरता एक कवडी देखील भांडवल सुटात नाही व ज्या ठिकाणी सर्वस्वाची हानी होते तेथे कोठ्यावधी रुपये खर्च करतात. ॥९-५०८॥
जो बहुवें विषयविलासें गुंफे । तो म्हणती उवाईं पडिला सापें ।
जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥
जो पुष्कळ विषयविलासात निमग्न असतो तो सध्या सुखात आहे असे म्हणतात व जो लोभाने ग्रस्त झाला आहे त्यास या जगात ज्ञानी म्हणतात. ॥९-५०९॥
जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरौनि जाय ।
तयाचे नमस्कारिती पाय । वडील म्हणुनी ॥ ५१० ॥
ज्याचे आयुष्य थोडे उरले आहे व त्याचप्रमाणे ज्याची बल आणि बुद्धी नाहीशी झाली आहेत अशा म्हातार्‍यास वडील म्हणून नमस्कार करतात. ॥९-५१०॥
जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजे नाचती कोडें ।
आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥
जसजसे मूल बलाने वाढत जाते तसतसे आईबाप आनंदाने व कौतुकाने नाचतात. पण वरून जरी मोठे वाढतांना दिसले तरी वास्तविक पाहिले तर आतून आयुष्य सरून जात आहे, त्याची त्यांना खंतीच नाही. ॥९-५११॥
जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचेंचि ऐसें ।
कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया ॥ ५१२ ॥
जन्माल्यापासून दिवसेंदिवस ते अधिकाधिक काळाच्या तावडीत जाते असे असून आनंदाने त्याच्या वाढदिवसाचा उत्सव साजरा करतात व आनंदप्रदर्शक गुढ्याही उभारतात. ॥९-५१२॥
अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती ।
परि असतें जात न गणिती । गहिंसपणें ॥ ५१३ ॥
अरे अर्जुना, कोणी कोणाला ‘तू मर’ असे म्हटले तर ते त्य़ास सहन होत नाही आणि (त्यांच्या निवृत्तीचा उपाय न करता) मेल्यावर रडत बसतात. पण असलेले आयुष्य व्यर्थ जात आहे, ते मूर्खपणाने समजत नाहीत. ॥९-५१३॥
दर्दूर सापें गिळिजतु आहे उभा । कीं तो मासिया वेंटाळी जिभा ।
तैसें प्राणिये कवणा लोभा । वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥
बेडूक सापाकडून उभा गिळाला जात असतांना सुद्धा तो बेडूक उडत असलेल्या माशांना पकडण्याकरता जीभ बाहेर काढून वेटाळीत असतो, तशाच तर्‍हेने प्राणी कोणात्या लोभाने तृष्णा वाढवतात कोण जाणे ? ॥९-५१४॥
अहा कटकटा हें वोखटें । इये मृत्युलोकींचें उफराटें ।
एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥
अरेरे, हे वाईट आहे,. मृत्युलोकातील सर्वत्र न्याय उफराटा आहे. अर्जुना तू जरी अकस्मात जन्मला आहेस. ॥९-५१५॥
तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।
जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥ ५१६ ॥
तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग. की ज्या भक्तीच्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील. ॥९-५१६॥
मन्मना भव मद्भयक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
मामेवैष्यसि युक्त्वै वमात्मानं मत्परायणः ॥ ३४ ॥
ॐ तत्सदिति श्रीमद्भ्गकवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे
श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ ९ ॥
माझ्या ठिकाणी मन अर्पण केलेला हो, माझा भक्त हो, माझे यजन करणारा हो. सर्वत्र मला एकाला वंदन कर. अशा रीतीने मत्परायण होत्साता (माझे ठिकाणी) चित्त योजल्यावर तू माझ्याप्रतच येशील. ॥९-३४॥
तूं मन हें मीचि करीं । माझिया भजनीं प्रेम धरीं ।
सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें ॥ ५१७ ॥
तू आपले मन मद्रूप कर. माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर. आणि सर्व ठिकाणी माझेच स्वरूप आहे असे समजून मला एकाला नमस्कार कर. ॥९-५१७॥
माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख ।
मद्याजी चोख । याचि नांव ॥ ५१८ ॥
पहा, जो माझ्या वेधाने संकल्प पूर्णपणे जाळतो त्य़ालाच माझे चांगले यजन करणारा म्हणावे. ॥९-५१८॥
ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरूपा पावसी ।
हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असें ॥ ५१९ ॥
या प्रमाणे तू माझ्या योगाने संपन्न होशील तेव्हा मद्रूपास पावशील. ही माझ्या अंत:करणातील गुप्त गोष्ट तुझ्याजवळ मी सांगत आहे. ॥९-५१९॥
अगा अवघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्हीं असें ठेविलें ।
तें पावोनि सुख संचलें । होऊनि ठासी ॥ ५२० ॥
अरे, सर्वांपासून लपवून ठेवलेले असे जे आमचे सर्व भांडवल ते तुला प्राप्त होऊन तू सुखरूप होऊन रहाशील ॥९-५२०॥
ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पद्रुमें ।
बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे ॥ ५२१ ॥
भक्ताचे मनोरथ पूर्ण करणारा कल्पतरु जे मेघ:श्याम परब्रह्म श्रीकृष्ण ते असे बोलले असे संजय म्हणाला. ॥९-५२१॥
अहो ऐकिजत असें कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा ।
जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥
(ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणतात) संजय धृतराष्ट्राला म्हणाला ऐकत आहा काय ? त्यावेळेला या बोलण्याविषायी वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता स्वस्थ असलेला दिसला. ॥९-५२२॥
तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला ।
कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥ ५२३ ॥
त्या वेळी संजयाने मान डोलविली आणि (आपल्याशी) म्हणाला, ‘अहा । आज अमृताची वृष्टि झाली; परंतु हा धृतराष्ट्र येथेच असूनहि शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे.’ ५२३.
तर्‍ही दातारु हा आमुचा । म्हणौनि हें बोलतां मैळेल वाचा ।
काय कीजे ययाचा । स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥
पण हा आमचा मालक आहे, त्याच्याविषयी असे बोलले असता वाचेस दोष लागेल; काय करावे ? याचा स्वभावच असा आहे. ५२४.
परि बाप भाग्य माझें । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें ।
कैसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥
परंतु धन्य माझे भाग्य की, महामुनि वामदेवानी नगला युद्धातील वृन्तात मांगावयाच्या निमिनात माझे कसे रक्षण केले ! (म्हणजे ज्ञानपूर्ण संवादश्रवणाने जन्ममृत्युपासून माझे रक्षण केले.) ५२५.
येतुलें हें वाड सायासें । जंव बोलत असे दृढमानसें ।
तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्त्विकें केलें ॥ ५२६ ॥
मोठ्या कष्टाने मन आवरून धरून, तो संजय इतके बोलत होता तोच अष्टसात्त्विक भाव उत्पन्न होऊन, त्यांनी संजयास असे आपल्या आधीन करून घेतले की, त्यास ते अष्टसात्त्विक भाव आवरून धरवेनात. ५२६.
चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ ।
आपाद कंचुकित । रोमांच आले ॥ ५२७ ॥
चित्त चकित होऊन आटावयास लागले आणि वाचा जागचे जागी कुंठित होऊन राहिली व पायापासून मस्तकापर्यंत अंगरखा घातल्यासारखे सर्व अंगावर रोमांच आले. ५२७,
अर्धोन्मीलित डोळे । वर्षताति आनंदजळें ।
आंतुलिया सुखोर्मींचेनि बळें । बाहेरी कांपे ॥ ५२८ ॥
अर्धवट उघडलेले डोळे आनंदाचा वर्षाव करू लागले व आत होणाऱ्या सुखाच्या लाटेच्या जोरामुळे त्याचे बाहेरील शरीर कापू लागले. ५२८.
पैं आघवाचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी ।
लेइला मोतियांची कडियाळीं । आवडे तैसा ॥ ५२९ ॥
सर्व रोमांचांच्या बुडाशी निर्मळ घामाचे थेंब आले, त्यामुळे जसा एखाद्याने मोत्यांचा जाळीदार अंगरखा घालावा, तसा तो | दिसू लागला. ५२९.
ऐसा महासुखाचेनि अतिरसें । जेथ आटणी हों पाहे जीवदशे ।
तेथ निरोपिलें व्यासें । तें नेदीच हों ॥ ५३० ॥
याप्रमाणे महासुखाच्या भराने जेव्हां जीवदशेची आटणी होण्याची वेळ आली, तेव्हां व्यासांनी युद्धवृत्तांत सांगण्याची केलेली आज्ञा ती आटणी होऊ देईना. ५३०.
आणिक श्रीकृष्णाचें बोलणें । घोकरी आलें श्रवणें ।
कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला ॥ ५३१ ॥
आणि त्यावर श्रीकृष्ण व अर्जुन यांचे बोलणे घों घों अशी गर्जना करीत संजयाच्या कानावर आले व त्या बोलण्याने संजयाच्या ठिकाणी देहस्मृतीचा वाफसा केला. | (संजय देहम्मतीवर आला.) ५३१,
तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जीं ।
तेवींचि अवधारा म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें ॥ ५३२ ॥
तेव्हा डोळ्यांतील आनंदाश्रु त्याने पुसले व सर्व अंगास आलेला घाम पुसून टाकला व त्याचप्रमाणे ‘महाराज, लक्ष द्या’ असे तो धृतराष्ट्राम म्हणाला. ५३२.
आतां श्रीकृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्त्विकाचा बिवडु ।
म्हणौनि श्रोतयां होईल सुरवाडु । प्रमेय पिकाचा ॥ ५३३ ॥
आता श्रीकृष्णाची वाक्ये हीन कोणी एक उत्तम बीजे आणि त्यास संजय दीव अष्टसात्त्विक भावरूपी पिकाच्या विवाहाची जमीन मिळाली; त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल. ५३३.
अहो अळुमाळ अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचे राशीवरी बैसावें ।
बाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ ॥ ५३४ ॥
अहो, थोडकेसे लक्ष द्यावे आणि एवढ्याने आनंदाच्या राशीवर बसावे, धन्य आहे त्या कानांची की, आज त्यास भाग्याने |माळ घातली आहे ! ५३४.
म्हणौनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो ।
तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा ॥ ५३५ ॥
म्हणून (आपल्या) |विभूतींची जी स्थाने आहेत, ती सिद्धांचा राजा जो श्रीकृष्ण, तो अर्जुनास दाखवील. श्रीनिवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात, तो प्रसंग श्रोत्यांनी ऐकावा. ५३५.

शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या

ref:satsangdhara 

1 thought on “सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *