सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय बारावा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चवथा

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चवथा आरंभ

(ओव्या १ ते ५९)

(ओव्या ६० ते ११८)

(ओव्या ११९ ते १७५)

(ओव्या १७६ते २५५)


वरील ऑडिओ मधील आवाज सौ. मनीषा भास्कर अभ्यंकर यांचा आहे, त्यांनी हे ऑडिओ टाकायची परवानगी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार


 

आजि श्रवणेंद्रियां पाहलें । जें येणें गीतानिधान देखिलें ।
आतां स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥१॥
आज श्रवणेंद्रियांना सुकाळ झाला, कारण गीतेसारखा ठेवा पहावयास मिळाला. जसे काही स्वप्नच खरे व्हावे तसे आता झाले आहे. ॥१॥

आधींचि विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी ।
आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥२॥
अगोदरच ही विचाराची कथा, त्यात तिचे प्रतिपादन जगात श्रेष्ठ असे श्रीकृष्ण करीत असून भक्तांमधे श्रेष्ठ असणारा अर्जुन ते ऐकत आहे. ॥२॥

जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळु आणि सुस्वादु ।
तैसा भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥३॥
ज्याप्रमाणे पंचमस्वर व सुवास किंवा सुवास व उत्तम रुचि यांच्या गोड मिलाफाचा योग यावा (त्याप्रमाणे) या कथेतील चर्चेचा योग मोठ्या बहारीचा जमला आहे. ॥३॥

कैसी आगळिक दैवाची । जे गंगा जोडली अमृताची ।
हो कां जपतपें श्रोतयांचीं । फळा आलीं ॥४॥
काय दैवाचा जोर आहे पहा ! कारण या जोरामुळे ही अमृताची गंगाच लाभली म्हणावयाची, किंवा श्रोत्यांची जपतपादी अनुष्ठाने या कथेच्या रूपाने फळास आली आहेत. ॥४॥

आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचें घर रिघावें ।
मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥५॥
आता एकूण एक इंद्रियांनी श्रवणेंद्रियांचा आश्रय करावा आणि मग गीता नावाच्या या संवादाचे सुख भोगावे. ॥५॥

हा अतिसो अतिप्रसंगें । सांडूनि कथाचि ते सांगें ।
जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥६॥
हा अप्रासंगिक पाल्हाळ पुरे कर व कृष्ण व अर्जुन हे दोघे जे काही बोलत होते ती हकिकत सांग. असे श्रोते म्हणाले. ॥६॥

ते वेळीं संजयो रायातें म्हणे । अर्जुनु अधिष्ठिला दैवगुणें ।
जे अतिप्रीति श्रीनारायणें । बोलतु असे ॥७॥
ज्ञानदेव सांगतात की त्यावेळी संजय धृतराष्ट्राला म्हणाला – खरोखर भाग्यानेच अर्जुनाचा आश्रय केला. असे म्हटले पाहिजे. कारण प्रत्यक्ष श्रीकृष्ण त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलत आहेत ॥७॥

जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगेचि माते देवकीसी ।
जें न संगेचि बंधु बळिभद्रासी तें गुह्य अर्जुनेंशीं बोलत ॥८॥
आपला बाप वसुदेव याला जे सांगितले नाही, आपली आई देवकी हिला जे सांगितले नाही, आपला भाऊ बळिभद्र यालाही जे सांगितले नाही ते रहस्य श्रीकृष्ण अर्जुनाजवळ बोलत आहे. ॥८॥

देवी लक्ष्मीयेवढी जवळिक । परी तेही न देखे या प्रेमाचें सुख ।
आजि कृष्णस्नेहाचें बिक । यातेंचि आथी ॥९॥
देवी लक्ष्मी एवढी जवळ असणारी पण या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही. कृष्णाच्या प्रेमाचे फळ यालाच आज लाभत आहे ॥९॥

सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या होतिया कीर बहुवसा ।
परी त्याही येणें मानें यशा । येतीचिना ॥१०॥
सनकादिकांच्या (परमात्मसुखाबद्दलच्या) आशा खरोखर खूपच बळावल्या होत्या, पण त्याही इतक्या प्रमाणात यशाला आल्याच नाहीत. ॥१०॥

या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसें निरुपम ।
कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥११॥
त्या जगदीश्वराचे प्रेम येथे (या अर्जुनावर) अगदी निरुपम दिसत आहे. या पार्थाने कसे उत्कृष्ट पुण्य केले आहे बरे ! ॥११॥

हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती ।
मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥१२॥
पहा, त्या अर्जुनाच्या प्रीतीमुळे हा कृष्ण वास्तविक निराकार असून साकार झाला, त्या अर्जुनाची देवाशी एकरूपता मला चांगलीच पटते. ॥१२॥

एऱ्हवीं हा योगियां नाडळे । वेदार्थासी नाकळे ।
जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥१३॥
नाहीतर हा योग्यांना सापडत नाही, वेदांच्या अर्थाला सापडत नाही, ध्यानाचीही येथे नजर पोचत नाही. ॥१३॥

तो हा निजस्वरूप । अनादि निष्कंप ।
परी कवणें मानें सकृप । जाहला आहे ॥१४॥
अशी जी आत्मस्थिती, तद्रूप असणारा हा श्रीकृष्ण मूळाचाच अचल आहे पण आज या अर्जुनावर किती कृपावंत झाला आहे ! ॥१४॥

हा त्रैलोक्यपटाची घडी । आकारची पैलथडी ।
कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥१५॥
हा त्रैलोक्यरूप वस्त्राची घडी असून आकाराच्या पलीकडचा आहे, पण या अर्जुनाच्या प्रेमाने कसा आटोपशीर झाला आहे. ॥१५॥

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ॥१६॥
मग देव म्हणाला. अरे अर्जुना, हाच निष्काम-कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला, परंतु ती गोष्ट फार दिवसांची आहे. ॥१६॥

मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी ।
निरूपिली बरवी । मनूप्रती ॥१७॥
मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनूला उत्तमप्रकारे सांगितली. ॥१७॥

मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ।
ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥१८॥
वैवस्वत मनूने याचे स्वत: आचरण केले आणि मग आपला मुलगा जो इक्ष्वाकु त्याला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे. ॥१८॥

मग आणिकही या योगातें । राजर्षि जाहले जाणते ।
परी तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोण्ही ॥१९॥
मग आणखीही या निष्काम-कर्मयोगाला जणणारे राजर्षी पुढे होऊन गेले. पण तेव्हापासून आता हल्ली हा निष्काम कर्मयोग कोणालाही ठाउक नाही. ॥१९॥

जे प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु ।
म्हणौनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥२०॥
कारण प्राण्यांचा सगळा भर विषयवासनेवर पडला आहे. व त्यांचा सगळा जीव काय तो या देहावर आहे, म्हणून त्यांना आत्मज्ञानाचा विसर पडला. ॥२०॥

अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखची परमावधि ।
जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥२१॥
आत्मबोधाची आस्था बाळगणारी बुद्धी आड मार्गाला लागल्यामुळे लोकांना विषयसुख आत्यंतिक सुख वाटू लागले व देहादिक प्रपंच हा प्राणाप्रमाणे प्रिय वाटू लागला. ॥२१॥

एरव्हीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाउवें काय करावीं ।
सांगें जात्यंधा रवी । काय आथी ? ॥२२॥
नाही तर दिगंबरांच्या गावी उंची वस्त्रे काय करावयाची आहेत ? जन्मांधाला सूर्य काय उपयोगाचा ? सांग बरे. ॥२२॥

कां बहिरयांच्या आस्थानीं । कवण गीतातें मानीं ।
कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजें ? ॥२३॥
किंवा बहिर्‍याच्या सभेत गाण्याला कोण किंमत देणार ? किंवा कोल्ह्यांच्या मनात चांदण्यांबद्दल प्रेम कधी उत्पन्न होईल काय ? ॥२३॥

पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते ।
ते काउळे केवीं चंद्रातें । वोळखती ? ॥२४॥
चंद्राचा उदय होण्याच्या अगोदरच ज्यांचे असलेले डोळे फुटतात निरुपयोगी होतात ते कावळे चंद्राला कसे बरे ओळखणार ? ॥२४॥

तैसी वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाष नेणती ।
ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्वरातें ? ॥२५॥
त्याप्रमाणे वैराग्य नगराच्या शिवेचेही ज्यांनी कधी दर्शन घेतले नाही, विवेक कशाला म्हणतात ते ज्यांना माहीत नाही, त्या मूर्खांना माझी प्राप्ती कशी बरे होईल ? ॥२५॥

कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला ।
म्हणौनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥२६॥
हा मोह इतका कसा बरे वाढला कोण जाणे ? त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ गेला. आणि म्हणून या लोकातला हा निष्काम कर्मयोग बुडाला. ॥२६॥

तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता ।
सांगितला आम्हीं तत्त्वतां । भ्रांति न करीं ॥२७॥
तोच हा योग अर्जुना, आम्ही तुला आज खरोखर सांगितला, याविषयी संशय ठेऊ नकोस. ॥२७॥

हें जीवींचें निज गुज । परी केवीं राखों तुज ।
जे पढियेसी तूं मज । म्हणौनियां ॥२८॥
हा योग म्हणजे माझ्या जीवाची अगदी गुप्त गोष्ट आहे. पण ती तुझ्यापासून कशी चोरून ठेऊ ? कारण तू माझा अगदी लाडका आहेस. ॥२८॥

तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा ।
मैत्रियेचि चित्कळा । धनुर्धरा ॥२९॥
अर्जुना तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा व सख्याची जीवनकला आहेस. ॥२९॥

तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ? ।
जऱ्ही संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही ॥३०॥
अर्जुना, तू निकटसंबंधाचे ठिकाण आहेस. (तुझा व माझा संबंध अगदी निकटचा आहे.) यावेळी तुझी फसवणूक कशी करावी ? जरी आम्ही युद्धाला सज्ज झालो आहो ॥३०॥

तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें ।
परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥३१॥
तरी क्षणभर ते बाजूला ठेऊन या गडबडीचाही विचार मनात न आणता, प्रथम तुझे अज्ञान घालवून टाकले पाहिजे. ॥३१॥

तंव अर्जुन म्हणे श्रीहरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी ।
एथ विस्मयो काय अवधारीं । कृपानिधी ॥३२॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, कृपानिधे श्रीकृष्णा, पहा बरे, आई आपल्या मुलावर ममता करते यात नवल ते काय ? ॥३२॥

तूं संसारश्रांतांची साउली । अनाथ जीवांची माउली ।
आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥३३॥
संसारतापाने थकलेल्याची तू सावली आहेस. अनाथ जीवांची आई आहेस. आम्हाला तर केवळ तुझ्या कृपेनेच जन्मास घातले आहे. ॥३३॥

देवा पांगुळ एकादें विजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे ।
हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥३४॥
देवा आईने एखाद्या पांगळ्या मुलाला जन्म दिला तर जन्मापासून त्याचा त्रास तिला काढावा लागतो. (तोच प्रकार येथे आहे). या तुझ्या गोष्टी तुझ्यासमोर काय बोलाव्यात ? ॥३४॥

आतां पुसेन जें मी कांहीं । तेथ निकें चित्त देईं ।
तेवींचि देवें कोपावें ना कांहीं । बोला एका ॥३५॥
आता मी जे काही विचारीन त्याकडे चांगले चित्त दे. त्याचप्रमाणे देवा, माझ्या या एका बोलाचा मुळीच राग धरू नकोस. ॥३५॥

तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता ।
ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥३६॥
अनंता, पूर्वीची गोष्ट म्हणून जी तू मला सांगितलीस, ती क्षणभर माझ्या मनाला पटतच नाही. ॥३६॥

जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाउवें नाहीं ।
तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ? ॥३७॥
पहा तो विवस्वत म्हणजे कोण हे वाडवडिलांना सुद्धा ठाउक नाही, तर तू त्याला उपदेश केलास हे कसे बरे शक्य आहे ? ॥३७॥

तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव श्रीकृष्ण सांपेचा ।
म्हणौनि गा इये मातुचा । विसंवादु ॥३८॥
तो तर फार पूर्वीच्या काळचा असे ऐकतो, आणि तू श्रीकृष्ण तर आजच्या काळचा, म्हणून हे देवा तुझे बोलणे विसंगत आहे. ॥३८॥

तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांहींचि नेणिजे ।
हें लटिकें केवीं म्हणिजे । एकिहेळां ? ॥३९॥
तसेच देवा, तुझे चरित्र मला कसे काय कळणार ? तेव्हा हे एकदम खोटे तरी कसे म्हणावे ? ॥३९॥

परि हेचि मातु आघवी । मी परियेसें ऐशी सांगावी ।
जे तुवांचि रवी केवीं । पाही उपदेशु केला ॥४०॥
पण तू या सूर्याला उपदेश कसा केलास ? हीच सगळी हकिकत मला पटेल अशी सांग. ॥४०॥

तंव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता ।
तैं आम्हीं नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥४१॥
त्यावर श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना जेव्हा तो विवस्वान होता तेव्हा आम्ही नव्हतो अशी जर तुझ्या चित्ताला भ्रांती झाली आहे ॥४१॥

तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हासी ।
बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपुलीं तूं ॥४२॥
तरी अरे, तुला हे माहीत नाही की आतापर्यंत तुमचे व आमचे कितीतरी जन्म होऊन गेलेले आहेत. पण तुला त्या जन्मांची आठवण नाही. ॥४२॥

मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें ।
तें समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥४३॥
ज्या ज्या वेळी जे जे रूप घेऊन आम्ही अवतरलो ते ते सगळे जन्म अर्जुना मला आठवतात. ॥४३॥

म्हणौनि हें आघवें । मागील मज आठवें ।
मी अजुही परि संभवें । प्रकृतियोगें ॥४४॥
म्हणून मला मागचे सगळे आठवते. मी जन्मरहित आहे, पण मायेच्या योगाने जन्म घेतो. ॥४४॥

माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे ।
तें प्रतिबिंबें मायावशें । माझ्याचि ठायीं ॥४५॥
माझा अविनाशपणा तर नाहीसा होत नाही पण जन्माला येणे व जाणे ही जी एक क्रिया माझ्या संबंधाने दिसते ती माझ्या ठिकाणी मायेच्या योगाने भासते. ॥४५॥

माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे ।
तेही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एऱ्हवीं नाहीं ॥४६॥
माझे स्वातंत्र्य तर बिघडतच नाही, परंतु मी कर्माधीन आहे असे जे दिसते ते भ्रांत बुद्धी असली तरच दिसते, एरवी दिसत नाही. ॥४६॥

कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें ।
एऱ्हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ? ॥४७॥
किंवा एकाच वस्तूची दोन रूपे दिसतात, पण ती केवळ आरशाच्या योगाने दिसतात. एरवी त्या मूळ वस्तूचा विचार केला तर तिला दुसरे रूप आहे काय ? ॥४७॥

तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं ।
तैं साकारपणें नट नटीं । कार्यालागीं ॥४८॥
तसा अर्जुना मी निराकारच आहे, पण मायेचा जेव्हा आश्रय करतो तेव्हा काही विशेष कार्यासाठी मी सगुणरूपाच्या वेषाने नटतो. ॥४८॥

जें धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें ।
ऐसा ओघु हा स्वभावें । आद्यु असे ॥४९॥
कारण की जेवढे म्हणून धर्म आहेत तेवढ्या सर्वांचे प्रत्येक युगात मी रक्षण करावे असा क्रम स्वभावत:च चालत आलेला आहे. ॥४९॥

म्हणौनि अजत्व परतें ठेवीं । मी अव्यक्तपणही नाठवीं ।
जे वेळीं धर्मातें अभिभवी । अधर्मु हा ॥५०॥
म्हणून ज्या वेळेला अधर्म हा धर्माचा पराभव करतो त्या वेळेला मी आपला जन्मरहितपणा बाजूस ठेवतो व आपले अव्यक्तपणही मनात आणत नाही. ॥५०॥

ते वेळीं आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें ।
मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ॥५१॥
त्यावेळी स्वजनांच्या (भक्तांच्या) कैवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो. आणि मग अज्ञानरूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो. ॥५१॥

अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवीं गुढी । सुखाची उभवीं ॥५२॥
अधर्माची हद्द तोडून टाकतो. दोषांच्या सनदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारवितो. ॥५२॥

दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानु गिंवशीं ।
धर्मासीं नीतीशीं । शेंस भरीं ॥५३॥
दैत्यांच्या कुळाचा नाश करतो, साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो. आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो. ॥५३॥

मी अविवेकाची काजळी । फेडूनि विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥५४॥
मी विवेकदीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो. त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते. ॥५४॥

सत्सुखें विश्व कोंदे । धर्मुचि जगीं नांदें ।
भक्तां निघती दोंदे । सात्त्विकाचीं ॥५५॥
तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते, फक्त धर्मच जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात. ॥५५॥

तै पापांचा अचळु फिटे । पुण्याची पहांट फुटे ।
जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥५६॥
ज्यावेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रगट होते त्य़ावेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रात:काळ होतो. ॥५६॥

ऐसेया काजालागीं । अवतरें मी युगीं युगीं ।
परि हेंचि वोळखें जो जगीं । तो विवेकिया ॥५७॥
अशा या कामाकरता मी प्रत्येक युगात अवतार घेतो, परंतु हेच तत्व जो ओळखतो, तो या जगात खरा विचारी होय. ॥५७॥

माझें अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें ।
हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥५८॥
मी अजत्व कायम ठेऊन जन्मतो, क्रियाशून्य असूनही कर्मे करतो, हे माझे अलिप्तपण जो जणतो तोच श्रेष्ठप्रतीचा मुक्त होय. ॥५८॥

तो चालिला संगें न चळे । देहींचा देहा नाकळे ।
मग पंचत्वीं तंव मिळे । माझ्याचि रूपीं ॥५९॥
तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकारवृत्तीने वागत नाही, देहधारी असूनही देहभावाला वश होत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो. ॥५९॥

एऱ्हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती ।
वाटा कें वेळीं न वचती । क्रोधाचिया ॥६०॥
एरवी आपल्या किंवा दुसर्‍या बद्दल जे शोक करीत नाहीत, ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत ॥६०॥

सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले ।
कीं आत्मबोधें तोषले । वीतराग जे ॥६१॥
माझ्या भावनेने जे नेहेमी संपन्न असतात, माझ्याच सेवेकरता ज्यांचे जिणे असते, आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयांवरील प्रीती नष्ट झालेली असते ॥६१॥

जे तपोतेजाचिया राशी । कीं एकायतन ज्ञानासी ।
जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥६२॥
जे तपाच्या तेजाचे पुंज असतात, किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात, जे तीर्थांना पवित्रता देणारे, फार काय, जे मूर्तिमंत तीर्थच असतात ॥६२॥

ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले ।
जे मज तयां उरले । पदर नाहीं ॥६३॥
ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात, ते मीच होऊन रहातात, कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदाच उरत नाही. ॥६३॥

सांगैं पितळेची गंधिकाळिक । जैं फिटली होय निःशेख ।
तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाइजे ? ॥६४॥
सांग बरे कलंक (कळकवण्याचा गुण) व काळिमा (काळसरपणा) हे दोन पितळेचे गुण जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग आणखी सोने प्राप्त करून घेण्याची जरुर आहे काय ? ॥६४॥

तैसे यमनियमीं कडसले । जे तपोज्ञानें चोखाळले ।
मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ? ॥६५॥
त्याचप्रमाणे यमनियमांच्या कसास जे उतरले, तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले, ते मद्रूप झाले यात संशय कसला ? ॥६५॥

एऱ्हवीं तरी पाहीं । जे जैसे माझ्या ठायीं ।
भजती तयां मीही । तैसाचि भजें ॥६६॥
दुसरे असे पहा की जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी तसेच उलट (त्याचप्रमाणात) प्रेम करतो. ॥६६॥

देखैं मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनशीळ ।
जाहलें असे केवळ । माझ्याचि ठायीं ॥६७॥
हे पहा, जेवढे म्हणून मनुष्यप्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो. ॥६७॥

परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासी आले ।
तेणेंचि त्या कल्पिलें । अनेकत्व ॥६८॥
पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते. ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते, त्यामुळे ते मी जो एक, त्या माझ्या ठिकाणी अनेकत्वाची कल्पना करतात. ॥६८॥

म्हणौनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती ।
देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥६९॥
म्हणून जेथे वास्तविक अभेद म्हणजे भेदशून्यता आहे तेथे त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते भेद पहातात. जो नामरहित आहे त्याला ते नाव देतात. वास्तविक जो चर्चेचा विषयच होऊ शकत नाही त्याला ते देव किंवा देवी म्हणतात. ॥६९॥

जे सर्वत्र सदा सम । तेथ विभाग अधमोत्तम ।
मतिवशें संभ्रम । विवंचिती ॥७०॥
भेदबुद्धीला वश होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहेमी वास्तविक सारखा आहे, त्याच्या ठिकाणी ते चांगला, वाईट असे भेद पाडतात. ॥७०॥

मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें ।
मानिलीं देवतांतरें । उपासिती ॥७१॥
मग नाना प्रकारचे हेतु मनात धरून आपण मानलेल्या निरनिराळ्या देवतांची विधीपूर्वक उपासना करतात. ॥७१॥

तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावती समस्त ।
परी तें कर्मफळ निश्चित । वोळख तूं ॥७२॥
अशा रीतीने जे जे (त्यांच्या) मनात असते ते ते सगळे त्यांना प्राप्त होते. पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू परंतप अर्जुना, निश्चयाने समज. ॥७२॥

वांचून देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक ।
एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥७३॥
एरवी चांगला विचार करून पाहिले तर फल देणारे किंवा घेणारे दुसरे खात्रीने कोणीही नाही, या मनुष्यलोकांमध्ये फक्त कर्मच फल देणारे आहे. ॥७३॥

जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तें वांचूनि आन न निपजे ।
कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥७४॥
ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे त्यावाचून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही किंवा आरशात जे पहावे तेच त्यांना त्यात दिसते ॥७४॥

नातरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलू किरीटी ।
पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥७५॥
किंवा अर्जुना, ज्याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याशी आपणच बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनीचे रूप घेऊन तसाच उमटतो ॥७५॥

तैसा समस्तां यां भजना । मी साक्षिभूतु पैं अर्जुना ।
एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥७६॥
त्याप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवल साक्षी आहे. येथे ज्याच्या त्याच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होते. ॥७६॥

आतां याचिपरी जाण । चाऱ्ही हे वर्ण ।
सृजिलें म्यां गुण- । कर्मविभागें ॥७७॥
आता याप्रमाणे तू असे लक्षात घे की हे ब्राह्मणादि चार वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागाच्या अनुरोधाने उत्पन्न केले आहेत. ॥७७॥

जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें ।
कर्में तदनुसारें । विवंचिली ॥७८॥
ही व्यवस्था माझ्यामुळॆच रूढ झाली आहे. परंतु ही मी केलेली नाही. अरे अर्जुना, हे ज्याने तत्वत: ओळखले तो कर्मबंधापासून मुक्त झाला.॥७८॥

एथ एकचि हे धनुष्यपाणी । परी जाहले गा चहूं वर्णीं ।
ऐसी गुणकर्मकडसणी । केली सहजें ॥७९॥
कारण की निरनिराळे स्वभावधर्म व गुण यांच्या धोरणाने त्या चारही वर्णांच्या कर्मांची मी योजना केली आहे. ॥७९॥

म्हणौनि आइकें पार्था । हे वर्णभेदसंस्था ।
मीं कर्ता नव्हें सर्वथा । याचिलागीं ॥८०॥
अर्जुना हे सर्व मनुष्य वस्तुत: एकच खरे, परंतु चार वर्णात त्यांची विभागणी झाली. या प्रमाणे ही निवड स्वभावत: गुणकर्मांमुळे केलेली आहे. ॥८०॥

हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें ।
ऐसें जेणें जाणितलें । तो सुटला गा ॥८१॥
म्हणून अर्जुना, ऐक. ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा कर्ता मी मुळीच नाही ॥८१॥

मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशिया जाणोनि मातें ।
कर्में केलीं समस्तें । धनुर्धरा ॥८२॥
अर्जुना पूर्वी जे मुमुक्षू होऊन गेले त्यांनी मी असाच आहे हे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले. ॥८२॥

परि तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतींचि पेरिलीं ।
तैशीं कर्मेंचि परि तयां जाहलीं । मोक्षहेतु ॥८३॥
परंतु भाजलेले बी जरी पेरले तरी उगवत नाही, त्याप्रमाणे त्यांची ती कर्मे खरी, पण त्यांना कर्मबंधनातून सोडवायला तीच कारण झाली. ॥८३॥

एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना ।
आपुलिये चाडें सज्ञाना । योग्यु नोहे ॥८४॥
याबाबतीत अर्जुना, आणखी एक गोष्ट महत्वाची आहे. हा कर्माकर्मांचा विचार जाणत्या पुरुषालादेखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही. ॥८४॥

कर्म म्हणिपे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण ।
ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ॥८५॥
कर्म कशाला म्हणावे, अथवा अकर्माचे लक्षण काय याचा विचार करता करता शहाणे सुद्धा घोटाळ्यात पडतात. ॥८५॥

जैसें कां कुडें नाणें । खऱ्याचेनि सारखेपणें ।
डोळ्यांचेंहि देखणें । संशयीं घाली ॥८६॥
ज्याप्रमाणे खोटे नाणे हुबेहूब खर्‍यासारखेच असल्यामुळे सराफाच्याही नजरेला संशयात घालते ॥८६॥

तैसें नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहाती कर्में ।
जे दुजी सृष्टी मनोधर्में । करूं सकती ॥८७॥
तसे केवळ मनाच्या संकल्पमात्रेकरून प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ज्यांना आहे ते ज्याला भ्रमाने नैष्कर्म्य असे समजतात ते वास्तविक कर्म असून कर्माच्या पाशात सापडतात. ॥८७॥

वांचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी ।
म्हणौनि आतां तेंचि परियेसीं । सांगेन तुज ॥८८॥
याबाबतीत चांगले चांगले दूरदर्शीही देखील मूढ बनतात. तेथे बिचार्‍या मूर्खांची काय कथा ? म्हणून आता तीच गोष्ट (कर्माकर्मविवेक) तुला सांगतो ऐक. ॥८८॥

तरी कर्म म्हणजे स्वभावें । जेणें विश्वाकारु संभवे ।
तें सम्यक् आधीं जाणावें । लागे एथ ॥८९॥
तर ज्याच्या योगाने स्वभावत: (आपोआप) हे विश्व आकाराला येते, तेच कर्म होय. या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिल्याने करून घेतले पाहिजे. ॥८९॥

मग वर्णाश्रमासि उचित । जें विशेष कर्म विहित ।
तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसी ॥९०॥
मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदात सांगितले आहे त्याची देखील त्याच्या उपयुक्ततेसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे. ॥९०॥

पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें ।
येतुलेनि कांहीं न गुंफे । आपैसेंचि ॥९१॥
त्यानंतर ज्याला निषिद्ध (कर्म) म्हणतात त्याचेही स्वरूप ओळखणे जरुर आहे. या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असता गुंतत नाही (कर्माने बद्ध होत नाही.) ॥९१॥

एऱ्हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन ।
परी तें असो आइकें चिन्ह । प्राप्तांचें गा ॥९२॥
एरवी हे सर्व जग कर्माच्या आधीन आहे असा याचा या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे. पण अर्जुना ते असो. आता कृतकृत्य पुरुषाचे लक्षण ऐक. ॥९२॥

जो सकळकर्मीं वर्ततां । देखैं आपुली नैष्कर्म्यता ।
कर्मसंगें निराशता । फळाचिया ॥९३॥
सर्व कर्मांचे आचरण करीत असताही आपण खरोखर कर्म करीत नाही हे जो जाणतो व कर्मांबरोबर त्यांच्या फलाची आशा धरत नाही ॥९३॥

आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं ।
ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगीं । बोधला असे ॥९४॥
आणि कर्तव्य करण्याला जगात दुसरेपणाने काहीच नसते अशा नैष्कर्म्यतेचा चांगला बोध ज्याला झालेला असतो ॥९४॥

तरी क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा ।
तरी तो इही चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥९५॥
तरी जो सर्व कर्मसमुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करतांना दिसतो तोच या लक्षणांवरून ज्ञानी आहे असे जाणावे. ॥९५॥

जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे ।
तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहें ॥९६॥
ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो, तो जरी आपण पाण्यात आहो असे पहात असतो तरी त्याला नि:संशय खरे ज्ञान असते की आपण वेगळे आहो. पाण्यात नाही. ॥९६॥

अथवा नावें हन जो रिगे । तो थडियेचें रुख जातां देखे वेगें ।
तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥९७॥
अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनार्‍यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते. पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो. ॥९७॥

तैसें सर्व कर्मीं असणें । ते फुडें मानूनि वायाणें ।
मग आपणया जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥९८॥
त्याप्रमाणे सर्व कर्माचे आचरण तो करीत असतो, पण ते कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे, असे मानून मग आपण कर्मरहित आहो हे तो जाणतो. ॥९८॥

आणि उदोअस्तुचेनि प्रमाणें । जैसें न चालतां सूर्याचें चालणें ।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणें । कर्मींचि असतां ॥९९॥
आणि सूर्य उदय व अस्त पावतो, या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो, पण वास्तविक तो चालत नाही, त्याप्रमाणे तो कर्माचरण करीत असताही आपले नैष्कर्म्य जाणतो. ॥९९॥

तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे ।
जैसें जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥१००॥
ज्याप्रमाणे पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्यात बुडाले असे होत नाही, त्याप्रमाणे तो दिसण्यात सामान्य माणसासारखा दिसतो पण त्याच्या ठिकाणी मनुष्यव नसते. (मनुष्याचे सामान्य गुण नसतात.) ॥१००॥

तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केलें ।
न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥१०१॥
त्याने विश्व पाहिले नसतांनाही ते पाहिल्याप्रमाणेच आहे. काही न करताही सर्वकाही केल्याप्रमाणेच आहे व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत. ॥१०१॥

एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला ।
हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ॥१०२॥
एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे. फार कशाला ? तो स्वत: विश्वरूपच झालेला असतो असे समज. ॥१०२॥

जया पुरुषाच्या ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं ।
परी फलापेक्षा कहीं । संचरेना ॥१०३॥
ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर कंटाळा नसतो पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करत नाही ॥१०३॥

आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिलें सिद्धी नेईन ।
येणें संकल्पेंहीं जयाचें मन । विटाळेना ॥१०४॥
आणि हे कर्म मी करीन, अथवा आरंभलेले मी पुरे करीन ह्या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही ॥१०४॥

ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिलीं कर्में अशेखें ।
तो परब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥१०५॥
ज्ञानरूपी अग्नीच्या द्वारा ज्याने सर्व कर्मे जाळून टाकली आहेत, तो मनुष्याचे रूप घेतलेलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज. ॥१०५॥

जो शरीरीं उदासु । फळभोगीं निरासु ।
नित्यता उल्हासु । होऊनि असे ॥१०६॥
तो शरीराविषयी उदास असतो, फलाचा उपभोग घेण्याविषयी निरिच्छ असतो व नेहेमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो. ॥१०६॥

जो संतोषाचा गाभारा । आत्मबोधाचिये वोगरां ।
पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां ॥१०७॥
अर्जुना, तो संतोषाच्या गाभार्‍यात जेवीत असता आत्मबोधाच्या पक्वान्नाला पुरे असे कधी म्हणतच नाही. ॥१०७॥

कैसी अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी ।
सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेंसीं ॥१०८॥
अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन टाकून नित्य वाढणार्‍या आवडीने परमानंदाची रुचि तो कितीतरी घेत असतो, ॥१०८॥

म्हणौनि अवसरें जें जें पावे । कीं तेणेंचि तो सुखावे ।
जया आपुलें आणि परावें । दोन्ही नाहीं ॥१०९॥
म्हणून वेळेवर जे जे मिळेल, त्यातच तो संतुष्ट असतो. त्याला आपले व परके ही दोन्ही नाहीत. ॥१०९॥

तो दिठीं जें पाहे । तें आपणचि होऊनि जाये ।
आईके तें आहे । तोचि जाहला ॥११०॥
तो दृष्टीने जे पहातो ते आपणच होऊन जातो, आणि जे ऐकतो तेच तो झालेला असतो. ॥११०॥

चरणीं हन चाले । मुखें जें जें बोले ।
ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥१११॥
पायाने जे चालतो, तोंडाने जे काही बोलतो, तात्पर्य याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच स्वत: झालेला असतो. ॥१११॥

हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेंवांचूनि नाहीं ।
आतां कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥११२॥
हे असो, पहा, हे विश्वच ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही, आता त्याला कर्म ते कसले व बाधा ती काय करणार ? ॥११२॥

हा मत्सरु जेथ उपजे । तेतुलें नुरेचि जया दुजें ।
तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ? ॥११३॥
ज्या द्वैतापासून हा मत्सर उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नाही, तो निर्मत्सर आहे, हे काय शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे काय ? ॥११३॥

म्हणौनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि कर्मरहितु ।
सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥११४॥
म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, कर्म करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे ह्यात संशय नाही. ॥११४॥

तो देहसंगें तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे ।
पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥११५॥
तो देहधारी तर असतोच, पण (निर्गुण) चैतन्यासारखा दिसतो. परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येते. ॥११५॥

ऐसाहि परी कौतुकें । जरी कर्में करी यज्ञादिकें ।
तरी तियें लया जाती निःशेखें । तयाच्याचि ठायीं ॥११६॥
असे असून देखील केवळ लीलेने त्याने जरी यज्ञादिक कर्मे केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात. ॥११६॥

अकाळींचीं अभ्रें जैशीं । उर्मीवीण आकाशीं ।
हारपती आपैशीं । उदयलीं सांती ॥११७॥
आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागच्या जागी विरून जातात ॥११७॥

तैशीं विधिविधानें विहितें । जरी आचरे तो समस्तें ।
तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥११८॥
त्याचप्रमाणे वेदांनी सांगितलेल्या एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो, तरी त्याच्या ऐक्यभावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात. (त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती लय पावतात. ॥११८॥

हें हवन मी होता । कां इयें यज्ञीं हा भोक्ता ।
ऐसिया बुद्धीसि नाहीं भिन्नता । म्हणौनियां ॥११९॥
कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी, किंवा या यज्ञामधे (अमूक) हा भोक्ता अशी बुद्धीची भिन्नता त्याच्या ठिकाणी असत नाही. म्हणून (वरच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे सर्व कर्मे याच्या ठिकाणी लय पावतात. ॥११९॥

जे इष्टयज्ञ यजावे । तें हविर्मंत्रादि आघवें ।
तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ॥१२०॥
जे जे इष्ट यज्ञ करतो, त्यातील होमद्रव्ये, मंत्र इत्यादी सर्व, तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिरबुद्धी असलेला पुरुष अविनाश बुद्धीने (ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीने) पहातो. ॥१२०॥

म्हणौनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥१२१॥
म्हणून कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या प्रतीतीला आले त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय. ॥१२१॥

आतां अविवेकु कुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचें पाणिग्रहण जाहलें ।
मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ॥१२२॥
आता ज्यांचे अविचाररूप बालपण गेलेले आहे (म्हणजे ज्यांना विवेकरूप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेले आहे), ज्यांनी विरक्तीशी लग्न लावले आहे आणि मग ज्यांनी योगरूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे ॥१२२॥

जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसीं ।
गुरुवाक्य हुताशीं । हवन केलें ॥१२३॥
जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत, ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमधे मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे, ॥१२३॥

तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे ।
जेणें आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥१२४॥
ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री, जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात. अर्जुना, तेथे त्यांनी आत्मसुखाचीच इच्छा धरलेली असते. ॥१२४॥

दैवास्तव देहाचे पाळण । ऐसा निश्चयो परिपूर्ण ।
जो चिंतीना देहभरण । तो महायोगी ॥१२५॥
देहाची जोपासना प्रारब्धवशात होत आहे असा ज्याचा पूर्ण विश्वास असतो, तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वहात नाही. तो या दैवयज्ञरूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज. ॥१२५॥

आतां अवधारी सांगैन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक ।
तयांतें यज्ञचि यज्ञु देख । उपासिजे ॥१२६॥
दुसरा प्रकार आता तुला सांगतो ऐक. जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत, ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात. ॥१२६॥

एक संयमाग्निहोत्री । ते युक्तित्रयाच्या मंत्रीं ।
यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ॥१२७॥
धारणा-ध्यान-समाधिरूप संयम, हेच कोणी अग्निहोत्र, त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधादिक तीन बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात. ॥१२७॥

एकां वैराग्य रवि विवळे । तंव संयती विहार केले ।
तेथ अपावृत जाहले । इंद्रियानळ ॥१२८॥
दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयमरूप कुंडांची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो. ॥१२८॥

तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांचीं इंधनें पळिपली ।
तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ॥१२९॥
त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघते, तेव्हा कामक्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात. त्यावेळी आहवनीयादिक अग्नि असलेल्या इंद्रियरूपी पाच कुंडातून आशारूप धूर नाहीसा होतो. ॥१२९॥

मग वाक्यविधीचिया निरवडी । विषय आहुती उदंडीं ।
हवन केलें कुंडीं । इन्द्रियाग्नीच्या ॥१३०॥
मग वेदात सांगितलेल्या विधिवाक्यांच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नि असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुति देऊन यज्ञ करतात. ॥१३०॥

एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा ।
आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥१३१॥
अर्जुना वर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे क्षालन करतात, दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात. ॥१३१॥

तो उपशमें निहटिला । धैर्येंवरी दाटिला ।
गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ॥१३२॥
तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने दाबून गुरूपदेशरूपी जोर लाऊन ओढतात. ॥१३२॥

ऐसें समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें ।
जें उज्जीवन जाहलें । ज्ञानाग्नीचें ॥१३३॥
याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोप उपयोग होतो. तो हा की ज्ञानाग्नी प्रकट होतो. ॥१३३॥

पहिला ऋद्धिसिद्धींचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु ।
मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥१३४॥
प्रथम ऋद्धिसिद्धीचा मोह, हाच कोणी धूर, तो नाहीसा होतो. मग ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते. ॥१३४॥

तया मनाचें मोकळें । तेंचि पेटवण घातले ।
जें यमनियमीं हळुवारलें । आइतें होतें ॥१३५॥
यमदमांनी आयते वाळवून ठेविलेले मोकळे मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात. ॥१३५॥

तेणें सादुकुपणे ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा ।
स्नेहेंसीं नानाविधा । जाळिलिया ॥१३६॥
त्या पेटवणाच्या सहाय्याने ज्वाला प्रदीप्त होतात. मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपासह जाळतात. ॥१३६॥

तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांच्या आहुती ।
तियें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ॥१३७॥
तेथे दीक्षित म्हणजे यज्ञकर्ता पुरुष मी ब्रह्मच आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रियकर्मांच्या आहुती देतो. ॥१३७॥

पाठीं प्राणक्रियेचिये स्रुवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं ।
तेथ अवभृत समरसीं । सहजें जहालें ॥१३८॥
नंतर प्राणक्रियेच्या स्रुवेने ज्ञानाग्नीमधे पूर्ण आहुती दिल्यावर त्यावेळी ऐक्यबोध होऊन अवभृथस्नान त्याला सहजच होते. ॥१३८॥

मग आत्मबोधींचें सुख । जें संयमाग्नीचें हुतशेष ।
तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥१३९॥
संयमाग्नीत (इंद्रियादिक होमद्रव्यांचे) हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख, तोच पुरोडाश मग ते सेवन करतात. ॥१३९॥

एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं ।
या यज्ञक्रिया तरी आनानीं । परि प्राप्य तें एक ॥१४०॥
अशा या यज्ञांनी कित्येक जण आजपर्यंत या त्रिभुवनात मुक्त होऊन गेलेले आहेत. तरी त्य़ा सर्वांची फलप्राप्ती एकच आहे. ॥१४०॥

एक द्रव्युयज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रीया निपजविती ।
एक योगयागुही आहाती । जे सांगितलें ॥१४१॥
त्यापैकी काहींना ‘द्रव्ययज्ञ’ अशी संज्ञा आहे. काही यज्ञ तपरूप सामुग्रीने उत्पन्न होतात. कित्येक ‘योगयज्ञ’ म्हणून सांगितले आहेत. ॥१४१॥

एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे ।
ज्ञानें ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥१४२॥
कित्येकात शब्दांनी शब्दाचे हवन करतात, त्यास ‘वाग्यज्ञ’ असे म्हणतात. ज्यात ज्ञानाने ज्ञेय (जाणावयाची वस्तु ब्रह्म) जाणता येते, तो ‘ज्ञानयज्ञ’ होय. ॥१४२॥

हें अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडें ।
परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ॥१४३॥
अर्जुना, हे सर्व यज्ञ कठिण आहेत. कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे. परंतु ज्यांनी इंद्रिये जिंकली आहेत त्यांनाच ते करण्याची योग्यता येऊन त्यांचे आचरण घडते. ॥१४३॥

ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धि आथिले ।
म्हणौनि आपणपां तिहीं केलें । आत्महवन ॥१४४॥
ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योगसमृद्धीने संपन्न असतात. म्हणून ते आपले हवन आपल्यातच करतात (आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात). ॥१४४॥

मग अपानाग्नीचेनि मुखीं । प्राणद्रव्यें देखीं ।
हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥१४५॥
मग कोणी अभ्य़ासाने अपानरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात. पहा. ॥१४५॥

एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती ।
ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥१४६॥
कित्येक अपानवायु प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात, दुसरे कित्येक प्राण व अपान या दोहींचा निरोध करतात, त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात. ॥१४६॥

एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें ।
प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥१४७॥
किती एक (वज्रासनाच्या) मूळबंधाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणाचे प्राणांच्या ठिकाणी हवन करतात. (प्राणानेच प्राणाचा लय करतात). ॥१४७॥

ऐसें मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ ।
जिहीं यज्ञद्वारां मनोमळ । क्षाळण केले ॥१४८॥
याप्रमाणे हे सगळे यज्ञकर्ते मोक्षाची इच्छा करणारे असतात, त्यांनी यज्ञाच्या द्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात. ॥१४८॥

जया अविद्याजात जाळितां । जें उरलें निजस्वभावता ।
जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥१४९॥
त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे (स्वरूप) सहजच बाकी रहाते, जेथे (ज्या स्वरूपाज्ञानाच्या ठिकाणी) अग्नी व यज्ञकर्ता हा भेद उरतच नाही. ॥१४९॥

जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे ।
मागुतें जेथूनि वोसरें । क्रियाजात ॥१५०॥
जेथे (स्वरूपज्ञानाच्या ठिकाणी) यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुरतात व यज्ञक्रिया संपते व जेथून क्रियामार्ग मागे परतून नाहीशा होतात ॥१५०॥

विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे ।
जें द्वैतदोषसंगें । सिंपेचिना ॥१५१॥
जेथे विचाराचा प्रवेश होत नाही, जेथे कोणताही तर्क चालत नाही, जे द्वैतदोषाचे संपर्काने लिप्त होत नाही ॥१५१॥

ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट ।
तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रें ॥१५२॥
जे अनादिसिद्ध व शुद्ध आणि ज्ञानरूपी यज्ञात शिल्लक राहिलेले ब्रह्म असते, ते ज्ञानरूपी ब्रह्म ब्रह्मनिष्ठ पुरुष मी ब्रह्म आहे या मंत्राद्वारे उपभोगतात. ॥१५२॥

ऐसें शेषामृतें धाले । कीं अमर्त्यभावा आले ।
म्हणौनि ब्रह्म ते जहाले । अनायासें ॥१५३॥
याप्रमाणे यज्ञातील शेषरूपी अमृताने ते तृप्त होतात किंवा अमरस्थितीला प्राप्त होतात. म्हणून ते सहजच ब्रह्म पावतात. ॥१५३॥

येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि ।
जे योगयागु न करितीचि । जन्मले सांते ॥१५४॥
जन्माला येऊन ज्यांना संयमरूप अग्नीची सेवा घडत नाही व योग व यज्ञ ज्यांच्या हातून मुळीच होत नाही त्या इतर लोकांना विरक्ती माळ घालत नाही. ॥१५४॥

जयांचें ऐहिक धड नाहीं । तयांचे परत्र पुससी काई ।
म्हणौनि असो हे गोठी पाहीं । पंडुकुमरा ॥१५५॥
ज्यांचे ऐहिक नीट नाही त्यांच्या परलोकाची गोष्ट कशाला विचारतोस ? म्हणून अर्जुना, ती गोष्ट व्यर्थ कशाला सांगू ? ॥१५५॥

ऐसें बहुतीं परी अनेग । जे सांगितलें तुज कां याग ।
ते विस्तारूनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥१५६॥
असे पुष्कळ प्रकारचे जे अनेक यज्ञ तुला सांगितले ते वेदानेच चांगल्या विस्ताराने सांगितले आहेत. ॥१५६॥

परी तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें ।
येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ॥१५७॥
परंतु त्या विस्ताराशी आपल्याला काय करायचे आहे ? तात्पर्य असे समज की मागे सांगितलेले यज्ञादिक सर्व कर्मापासूनच उत्पन्न होतात. एवढे जाणले की आपोआपच कर्मबंधाची प्राप्ती होणार नाही. ॥१५७॥

अर्जुना वेदु जयांचें मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ ।
जया नव्हाळियेचें फळ । स्वर्गसुख ॥१५८॥
अर्जुना, वेद ज्याचे मूळ आहे, (ज्यात क्रियांचा विशेष खटाटोप आहे) व ज्यापासून अपूर्व असे स्वर्गसुखाचे फल प्राप्त होते ॥१५८॥

ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती ।
जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥१५९॥
ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण तार्‍यांच्या तेजाचा डौल जसा सूर्यापुढे चालत नाही, तशी ज्ञानयज्ञाची सर त्यांना येत नाही. ॥१५९॥

देखैं परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन ।
जे न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्री ॥१६०॥
पहा, परमात्मस्वरूप सुखाचा ठेवा हस्तगत करण्याकरता योगी लोक जे ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूप डोळ्यांमधे घालण्याला विसंबत नाहीत ॥१६०॥

जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी ।
जें भुकेलिया धणी । साधनाची ॥१६१॥
जे चालू कर्मांच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत ज्ञानाची खाण आहे. (आत्मसुखार्थ) जे भुकेले आहेत, त्यांच्या साधनांची जे तृप्ती आहे, ॥१६१॥

जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली ।
जेणें इंद्रियें विसरलीं । विषयसंगु ॥१६२॥
ज्याच्या ठिकाणी प्रवृत्ति पांगळी होते, तर्काची दृष्टी जाते, ज्याच्या योगाने इंद्रियांना विषयांचा विसर पडतो ॥१६२॥

मनाचें मनपण गेलें । जेथ बोलाचें बोलकेंपण ठेलें ।
जयामाजी सांपडलें । ज्ञेय दिसे ॥१६३॥
मनाचे मनपण नाहीसे होते, बोलाचा बोलकेपणा थांबतो, ज्यामधे ज्ञेय (जाणावयाची वस्तु-ब्रह्म) प्रत्यक्ष सापडते ॥१६३॥

जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे ।
जेथ न पाहतां सहज भेटे । आपणपें ॥१६४॥
ज्याच्या ठिकाणी वैराग्याचे दारिद्र्य दूर होते, विवेकाचा हावरेपणा खुंटतो, आणि ज्याच्या ठिकाणी न पाहता आपोआपच आत्मस्वरूप दिसते ॥१६४॥

तें ज्ञान पैं गा बरवे । जरी मनीं आथि आणावें ।
तरी संतां यां भजावें । सर्वस्वेसीं ॥१६५॥
हे अर्जुना, ते उत्तम ज्ञान जर लाभावे असे मनात असेल तर या संतास सर्वस्वेकरून त्वा भजावे. ॥१६५॥

जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा ।
तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥१६६॥
कारण ते ज्ञानाचे घर आहेत, त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे, अर्जुना, तू सेवा करून तो आपल्या स्वाधीन करून घे. ॥१६६॥

तरी तनुमनुजीवें । चरणांसीं लागावें ।
आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥१६७॥
एवढ्याकरता शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमाण सोडून त्यांची चाकरी करावी. ॥१६७॥

मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें ।
जेणें अंतःकरण बोधलें । संकल्पा नये ॥१६८॥
मग आपले जे इच्छित असेल ते त्यास विचारले असता ते सांगतात. त्या त्यांच्या उपदेशाने अंत:करण ज्ञानसंपन्न होऊन पुन: संकल्पाकडे वळत नाही. ॥१६८॥

जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निधडें ।
ब्रह्माचेनि पाडें । निःशंकु होय ॥१६९॥
त्यांच्या उपदेशरूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते. ॥१६९॥

तें वेळीं आपणपेयां सहितें । इयें अशेषेंही भूतें ।
माझ्या स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥१७०॥
त्यावेळी आपल्यासहित सर्वभूते माझ्य़ास्वरूपात निरंतर पहाशील. ॥१७० ॥

ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल ।
जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ॥१७१॥
अरे पार्था, ज्यावेळी श्रीगुरूची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञानप्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूप अंधकार नाहीसा होईल. ॥॥१७१॥

जरी कल्मषाचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु ।
व्यामोहाचा डोंगरु । होउनी अससी ॥१७२॥
तू पापांचे आगर, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा (मनाच्या घोटाळ्याचा) डोंगर जरी असलास ॥१७२॥

तऱ्ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें ।
ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ॥१७३॥
तरी ज्ञानशक्तीच्या पुढे बाबा, हे सगळे काहीच नाही. असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे. ॥१७३॥

देखैं विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कडवसा ।
तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥१७४॥
पहा, निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा जो जगताचा पसारा, तो देखील ज्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही, (विश्वाचा निरास करणे ह्याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नाही) ॥१७४॥

तया कायसे हे मनोमळु । हें बोलतांचि अति किडाळु ।
नाहीं येणें पाडें ढिसाळु । दुजें जगीं ॥१७५॥
त्या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहेत ? पण अशी तुलना करणे हेच अनुचित आहे. वास्तविक पहाता याच्या सारखे समर्थ या जगात दुसरे काही नाही. ॥१७५॥

सांगै भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली ।
तिये प्रळयींचे वाहटुळी । काय अभ्र पुरे ? ॥१७६॥
तिन्ही लोकांची राख आकाशात उडवून देणारी जी प्रलयकाळची वावटळ, तिच्यापुढे ढग काय टिकणार आहेत ? सांग बरे. ॥१७६॥

कीं पवनाचेनि कोपें । पाणियेंचि जो पळिपे ।
तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठें काई ? ॥१७७॥
अथवा वार्‍याच्या क्षोभाने जो प्रलयकाळचा अग्नी केव्ळ पाण्यानेच पेटतो, तो गवत व काष्ठे यांनी दबेल काय ? ॥१७७॥

म्हणौनि असो हें न घडे । तें विचारितांचि असंगडें ।
पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥१७८॥
असो, म्हणून असे घडणे अशक्य आहे. नुसत्या विचारानेच हे अशक्य आहे असे दिसते. एकंदरीत पहाता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. ॥१७८॥

एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें कें आहे ।
जैसें चैतन्य कां नोहे । दुसरें गा ॥१७९॥
इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे. ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य नाही, त्याप्रमाणे ज्ञानाइतके उत्तम दुसरे कोठे आहे ? ॥१७९॥

या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे ।
कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥१८०॥
या सूर्याच्या कसोटीला लावून पाहिले असता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल किंवा आकाशाला कवळू जाता जर कवळता येईल ॥१८०॥

नातरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे ।
तरी उपमा ज्ञानीं घडे । पंडुकुमरा ॥१८१॥
अथवा योग्यतेने पृथ्वीच्या तोलाचे जर काही आढळेल तरच अर्जुना या ज्ञानाला उपमा सापडेल. ॥१८१॥

म्हणौनि बहुतीं परी पाहतां । पुढतपुढती निर्धारितां ।
हें ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींची आथि ॥१८२॥
म्हणून अनेक प्रकारांनी विचार केला तरीही व पुन्हा पुन्हा निर्णय करून पाहिले असता असे दिसते की ज्ञानाची पवित्रता ही फक्त ज्ञानाच्या ठिकाणीच आहे. ॥१८२॥

जैसी अमृताची चवी निवडिजे । तरी अमृताचिसारिखी म्हणिजे ।
तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेंसींचि ॥१८३॥
अमृताची चव कशासारखी आहे हे निवडू जाता, ती अमृतासारखीच आहे, असे ज्याप्रमाणे म्हणावे लागते, त्याप्रमाणेच ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा देणे भाग आहे. ॥१८३॥

आतां यावरी जें बोलणें । तें वायांची वेळु फेडणें ।
तंव साचचि हें पार्थ म्हणे । जें बोलत असां ॥१८४॥
आता (यापेक्षा ज्ञानाच्या महतीविषयी) जास्त बोलणे म्हणजे केवळ वेळ फुकट घालवणे होय. यावर अर्जुन म्हणाला, महाराज, आपण जे बोलत अहात ते खरेच आहे. ॥१८४॥

परी तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें ।
तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥१८५॥
पण तेच ज्ञान कसे प्राप्त करून घ्यावे असे अर्जुन विचारणार तोच ते त्याचे मनोगत देवाने जाणले. ॥१८५॥

मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देईं इये गोठी ।
सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपावो तुज ॥१८६॥
मग तो म्हणाला, अर्जुना, ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय मी तुला सांगतो. आता या गोष्टीकडे नीट चित्त दे. ॥१८६॥

तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां ।
जयाच्या ठायीं इंद्रियां । मानु नाहीं ॥१८७॥
तर आत्मसुखाच्या गोडीमुळे, जो सर्व विषयांना विटलेला असतो, ज्याच्या ठिकाणी इंद्रियांना मान कसा तो मुळीच नसतो. ॥१८७॥

जो मनासीं चाड न सांगे । जो प्रकृतीचें केलें नेघे ।
जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥१८८॥
जो कशाचीही इच्छा मनात येऊ देत नाही, जो प्रकृतिकडून होणारी कर्मे (त्या कर्माचे कर्तृत्व आपल्याकडे घेत नाही, श्रद्धेच्या उपभोगाने जो सुखी झालेला असतो. ॥१८८॥

तयातेंचि गिंवसित । तें ज्ञान पावे निश्चित ।
जयामाजि अचुंबित । शांति असे ॥१८९॥
त्या ज्ञानात निर्भेळ शांतीची वसती असते, ते ज्ञान त्याला शोधीत येऊन हटकून पोचते. ॥१८९॥

तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।
मग विस्तार बहु प्रगटे । आत्मबोधाचा ॥१९०॥
ते ज्ञान अंत:करणात स्थिर बसते आनि मग शांतीचा अंकुर फुटतो. पुढे आत्मज्ञानाचा विस्तार पुष्कळच प्रगट होतो. ॥१९०॥

मग जेउती वास पाहिजे । तेउती शांतीची देखिजे ।
तेथ आपपरु नेणिजे । निर्धारितां ॥१९१॥
मग ज्या बाजूला पाहील त्या बाजूला त्याला शांतीच दिसते. त्या अमर्याद शांतीचे पैलतीर कोठे आहे ते विचार करूनही समजत नाही. ॥१९१॥

ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु ।
सांगतां असे अपारु । परि असो आतां ॥१९२॥
अशा ज्ञानरूप बीजाचा उत्तरोत्तर होत जाणारा विस्तार सांगू लागलो तर तो अपार आहे. पण ते आता राहू दे. ॥१९२॥

ऐकें जया प्राणियाच्या ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं ।
तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ॥१९३॥
ऐक, ज्या प्राण्याच्या ठिकाणी या ज्ञानाची आवड नाही, त्याच्या जिण्याला काय म्हणावे ? त्यापेक्षा मरण बरे. ॥१९३॥

शून्य जैसें कां गृह । कां चैतन्येंवीण देह ।
तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीन ॥१९४॥
जसे ओसाड घर किंवा जसा प्राणरहित देह व्यर्थ असतो त्याप्रमाणे ज्ञानहीनास जीवित हे केवळ शून्यवत् आहे. ॥१९४॥

अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परि ते चाड एकी जरी वाहे ।
तरी तेथ जिव्हाळा कांहीं आहे । प्राप्तीचा पैं ॥१९५॥
अथवा खरोखर ज्ञानाची प्राप्ती झालेली नसली, पण त्याची नुसती इच्छा जरी मनुष्याने निरंतर बाळगली तरी त्याला ज्ञानप्राप्तीची काही तरी आशा आहे. ॥१९५॥

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परि ते आस्थाही न धरीं मानसीं ।
तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥१९६॥
एरवी ज्ञानाची गोष्ट कशाला ? पण जो त्याच्या बद्दल मनात आस्थाही बाळगत नाही, तो संशयरूप अग्नीत पडला असे समज. ॥१९६॥

जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचीं आरोचकु जैं पडे ।
तैं मरण आलें असें फुडें । जाणों येकीं ॥१९७॥
अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्यावेळेला स्वभावत:च येते, त्यावेळी मरण ओढवले आहे असे उघड समजावे. ॥१९७॥

तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेसींचि माजे ।
तो संशयें अंगिकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥१९८॥
त्याप्रमाणे जो विषयसुखाने रंगून जातो व ज्ञानाविषयी जो बेपर्वा असतो, तो संशयाने घेरला जातो, यात संशय नाही. ॥१९८॥

मग संशयीं जरी पडिला । तरी निभ्रांत जाणें नासला ।
तो ऐहिकपरत्रा मुकला । सुखासि गा ॥१९९॥
अशा रीतीने जो संशयात पडला त्याचा नि:संशय घात झाला असे समज. तो इहपरलोकातील सुखाला आचवला. ॥१९९॥

जया काळज्वरु आंगीं बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे ।
आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानीं ॥२००॥
ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला शीत उष्ण काही कळत नाही. तो अग्नी आणि चांदणे ही दोन्ही सारखीच मानतो ॥२००॥

तैसें साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें ।
संशयीं तो नोळखे । हिताहित ॥२०१॥
त्याप्रमाणे खरे व खोटे, प्रतिकूल व अनुकूल, हित व अहित, ही संशयग्रस्त मनुष्याला ओळखता येत नाहीत. ॥२०१॥

हा रात्रिदिवसु पाहीं । जैसा जात्यंधा ठाउवा नाहीं ।
तैसें संशयीं असतां कांहीं । मना नये ॥२०२॥
पहा, ही रात्र आणि हा दिवस, असे जन्मांध माणसाला ज्याप्रमाणे ठाऊकसुद्धा नसते त्याप्रमाणे जोपर्यंत मनुष्य संशयग्रस्त आहे तोपर्यंत त्याच्या मनाला काहीच पटत नाही. ॥२०२॥

म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसि ॥२०३॥
म्हणून संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. ॥२०३॥

येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा ।
जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥२०४॥
एवढ्याकरता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या ह्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. ॥२०४॥

जैं अज्ञानाचें गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे ।
म्हणौनि सर्वथा मार्गु मोडे । विश्वासाचा ॥२०५॥
जेव्हा ज्ञानाचा गाढ अंधार पडतो तेव्हा हा मनात फार वाढतो. म्हणून श्रद्धेचा मार्ग अगदीच बंद पडतो. ॥२०५॥

हृदयीं हाचि न समाये । बुद्धीतें गिंवसूनि ठाये ।
तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥२०६॥
हा फक्त हृदयालाच व्यापून रहातो असे नाही तर बुद्धीलाही व्यापून टाकतो. त्यावेळी तिन्ही लोक संशयरूप होऊन जातात. ॥२०६॥

ऐसा जरी थोरावें । तरी उपायें एकें आंगवे ।
जरी हातीं होय बरवें । ज्ञानखड्ग ॥२०७॥
एवढ जरी तो वाढला तरी एका उपायाने तो जिंकता येतो. चांगले ज्ञानरूप खड्ग जर हाती असेल ॥२०७॥

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे ।
मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥२०८॥
तर त्या ज्ञानरूपी तीक्ष्ण शस्त्राने हा संपूर्ण नाश पावतो. मग मनावरील सर्व मळ नि:शेष नाहीसा होतो. ॥२०८॥

याकारणें पार्था । उठीं वेगीं वरौता ।
नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥२०९॥
एवढ्याकरता अर्जुना, अंत:करणात असलेल्या सर्व संशयांचा नाश करून लवकर उठ पाहू, ॥२०९॥

ऐसें सर्वज्ञाचा बापु । जो श्रीकृष्णु ज्ञानदीपु ।
तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥२१०॥
(संजय म्हणाला) राजा धृतराष्ट्रा ऐक. सर्व ज्ञानाचा जनक व ज्ञानाचा केवळ दीपच असा जो श्रीकृष्ण तो मोठ्या कृपाळू्पणाने याप्रमाणे अर्जुनास बोलला. ॥२१०॥

तंव या पूर्वापर बोलाचा । विचारूनि कुमरु पंडूचा ।
कैसा प्रश्नु अवसरींचा । करिता होईल ॥२११॥
पुढे या मागच्या पुढच्या बोलण्याचा विचार करून अर्जुन कसा समयोचित प्रश्न करेल ॥२११॥

ते कथेची संगति । भावाची संपत्ति ।
रसाची उन्नति । म्हणिपेल पुढा ॥२१२॥
ती संगतवार कथा, ती अर्थाची खाण, तो रसांचा उत्कर्ष, पुढे सांगण्यात येईल. ॥२१२॥

जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची वोवाळणी ।
जो सज्जनाचिये आयणी । विसांवा जगीं ॥२१३॥
ज्याच्या चांगलेपणावरून आठही रस (नऊरसांपैकी शांतरसा शिवाय इतर आठ रस) ओवाळून टाकावेत, जो या जगात सज्जनांच्या बुद्धीचे विश्रांतिस्थान आहे. ॥२१३॥

तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मऱ्हाटे बोल ।
जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ॥२१४॥
तो शांतरसच ज्यात अपूर्वतेने प्रगटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर आहेत, ते मराठी बोल ऐका. ॥२१४॥

जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।
शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥२१५॥
सूर्यबिंब जरी बचकी एवढे दिसते, तरी त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन अपुरे पडते, त्याप्रमाणे या शब्दांची व्याप्ती आहे. असे अनुभवास येईल. ॥२१५॥

नातरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा ।
बोलु व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावें ॥२१६॥
अथवा इच्छा करणार्‍यांच्या संकल्पाप्रमाणे कल्पवृक्ष फळे देतो, त्याप्रमाणे हे बोल व्यापक आहेत. म्हणून नीट लक्ष द्यावे. ॥२१६॥

हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणती स्वभावें ।
तरी निकें चित्त द्यावें । हे विनंती माझी ॥२१७॥
पण हे राहू द्या. जास्त काय सांगावे ? जे सर्वज्ञ आहेत त्यांना आपोआपच समजते. तरी नीट लक्ष द्यावे. हीच माझी विनंती आहे. ॥२१७॥

जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती ।
जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥२१८॥
ज्याप्रमाणे एखादी स्त्री रूप, गुण आणि कुल यांनी युक्त आणि शिवाय पतिव्रता असावी त्याप्रमाणे या बोलण्याच्या मर्यादेत शांतीला (शांतरसाला) अलंकारांची जोड दिलेली दिसेल. ॥२१८॥

आधींच साखर आवडे । तेचि जरी ओखदां जोडे ।
तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा ? ॥२१९॥
आधीच साखर प्रिय आणि त्यात जर ती औषध म्हणून मिळाली तर मग आनंदाने तिचे वारंवार सेवन का न करावे ? ॥२१९॥

सहजें मलयानिळु मंदु सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु ।
आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥२२०॥
मलय पर्वतावरील वारा स्वभावत:च मंद व सुगंधित असतो, त्यातच जर त्याला अमृतासारखी गोडी प्राप्त झाली व दैवयोगाने त्याच्या ठिकाणीच सुस्वर उत्पन्न होईल ॥२२० ॥

तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी ।
तेवींचि कानांकरवीं । म्हणवीं बापु माझा ॥२२१॥
तर तो आपल्या स्पर्शाने शरीर शांत करील, आपल्या गोडीने जिभेला नाचवील, त्याचप्रमाणे कानांकडून वाहवा म्हणवील. ॥२२१॥

तैसें कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासी होय पारणें ।
आणि संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥२२२॥
तसेच या कथेच्या श्रवणाने होणार आहे. एकतर कानांचे पारणे फिटेल, आणि दुसरे अनायासे संसारदु:खाचे समूळ उच्चाटन होईल. ॥२२२॥

जरी मंत्रेंचि वैरी मरे । तरी वायां कां बांधावीं कटारें ? ।
रोग जाय दूधसाखरें । तरी निंब कां पियावा ॥२२३॥
जर मंत्रप्रयोगानेच शत्रूस ठार मारता येईल तर उगीचच कट्यार कमरेस का बांधून ठेवावी ? जर दुधाने व साखरेने रोग नाहीसा होईल तर कडुलिंबाचा रस पिण्याचे कारणच काय ? ॥२२३॥

तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां ।
एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजि ॥२२४॥
त्याप्रमाणे मनाला न मारता, इंद्रियांना दु:ख न देता, येथे ऐकण्यानेच आयता मोक्ष मिळणारा आहे. ॥२२४॥

म्हणौनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका ।
ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तिदासु ॥२२५॥
म्हणून प्रसन्न मनाने हा गीतार्थ चांगला ऐका, असे निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. ॥२२५॥

2 thoughts on “सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चवथा”

  1. Rajiv Harolikar

    ४थ्या अध्यायात फक्त २२५ ओव्यांचा अर्थ आहे.
    Audio मध्ये २५५ ओव्या आहेत.
    कृपया बघा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *