चतुश्लोकी भागवत

चतुःश्लोकी भागवत

चतुःश्लोकी भागवत – सदगुरूवंदन 

श्रीगणेशाय नमः

। श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीकृष्णाय नमः ।

आदीं वंदू गणनायका । नरकुंजरा अलोलिका । नरगजस्वरुपें तूं एका । नमन श्रीविनायका सदगुरु ॥१॥
तुज सदभावें करितां नमन । विघ्नचि होय निर्विघ्न । यापरी तुझी कृपा पूर्ण । चैतन्यघन गणराजा ॥२॥
सालंकृतशुक्लांबरी । हंसारुढी परमेश्वरी । सदगुरुरुपें वागेश्वरी । म्यां मजमाझारीं वंदिली ॥३॥
वाच्यवाचक वदता । तिहींसी आली एकात्मता । यापरी येथें वाग्देवता । गुरुत्वें तत्त्वतां वंदिली ॥४॥
पूर्वपरंपरा पूज्यता । एकरुप एकनाथा । आह्मां सदगुरुचि कुळदेवता । एकात्मता एकवीरा ॥५॥
तिचेनी नांवें माझेंही नांव । ह्नणोनि मिरवी कवि – वैभव । तंव नामरुपा नुरेचि ठाव । हा निजानुभव कुळदेव्या ॥६॥
आतां वंदूं संतसज्जन । जे सर्वांगी चैतन्य घन । ज्यां सगुण निर्गुण समसमान । जे निजजीवन सदभावा ॥७॥
ज्यांची सदभावें ऐकतां गोष्टी । चैतन्यघन होय सृष्टी । लागे परमानंदी दृष्टी । ऐसी कृपादृष्टी साधूंची ॥८॥
आतां वंदूं श्रीजनार्दन । ज्याचें ऐकतां एक वचन । त्रैलोक्य होय आनंदघन । जें निजजीवन सच्छिष्या ॥९॥


 

चतुःश्लोकी भागवत – गुरुमहिमा

त्याचे चरणींची माती । अवचटें लागल्या स्वचित्तीं । जन्ममरणा होय शांती । चारी मुक्ती वोळगण्या ॥१०॥
तो जिकडे पाहात जाय । ते दिशा सुखरुप होय । त्याचे जेथें लागती पाय । तेथें धांवे लवलाहें परमानंदू ॥११॥
यालागी त्याचे वंदितां चरण । जीवासी वोडवे शिवपण । चरणस्पर्शे स्वानंद पूर्ण । अगाध महिमान गुरुचरणीं ॥१२॥
त्याची सदभावें जें घडे सेवा । ते जीवत्व शोधितां नमिळे जीवा । तंव शिवही मुकला शिवभावा । हा अभिनव ठेवा सेवेमाजीं ॥१३॥
तो ज्यासीं आश्वासी आपण । त्यासी हरिहर वंदिती पूर्ण । कळिकाळ घाली लोटांगण । रिघती शरण कामक्रोध ॥१४॥


चतुःश्लोकी भागवत – गुरुदास्याचें महिमान

ऋद्धिसिद्धिही अंगें आपण । त्याचे घरीचे वाहती जीवन । एवढें गुरुदास्याचें महिमान । सभाग्यजन पावती ॥१५॥
गुरुसेवेहोनी वरुता । उपाय नाहीं परमार्था । हे सत्यसत्य माझी वार्ता । वेदशस्त्रार्था संमत ॥१६॥
ते गुरुसेवेची अभिनव खूण । स्वामीसेवक न होती भिन्न । नुरवूनियां मीतूंपण । सेवका जनार्दन संतुष्टे ॥१७॥
हें वर्म जंव नये हातां । तंव सेवा न घडे गुरुभक्ता । ज्याचे हाता चढे एकात्मता । तो शिष्य सरता गुरुचरणीं ॥१८॥
दुर्घट वाटेल एकात्मता । तंव गुरुशिष्यआंतौता । एकचि परमात्मा तत्त्वतां । हे एकात्मता । स्वतःसिद्ध ॥१९॥
एकात्मता श्रीजनार्दन । नुरवूनियां मीतूंपण । शिष्याची सेवा संपूर्ण । सर्वकर्मी आपण अंगीकारी ॥२०॥


चतुःश्लोकी भागवत – आत्मनिवेदन

नुरवूनि मीतूंपणाची वार्ता । वदविताहे ग्रंथकथा । तेथें मी कविकर्ता । हे कोणें अहंता धरावी ॥२१॥
मज नाहीं ग्रंथ अहंता । ह्नणोनि श्रोत्यांचें विनविता । ते विनवणीच तत्त्वतां । अंगीं अहंता आणूं पाहे ॥२२॥
तंव माझें जें कां मीपण । तें सदगुरु झाला आपण । तरी करितांही विनवण । माझें मीपण मज नलगे ॥२३॥
माझी क्रिया कर्म कर्तव्यता । सदगुरुचि झाला तत्त्वतां । आतां माझ्या मीपणाची अहंता । मजसी सर्वथा संबंध नाहीं ॥२४॥


चतुःश्लोकी भागवत – कथासूत्र

आतां अवधारा ग्रंथकथन । कल्पादि हें पुरातन । हरिब्रह्मयांचें जुनाट ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२५॥
जेणें संतोषती ज्ञानसंपन्न । सुखें सुखरुप होती मुमुक्षुजन । तें हें हरिब्रह्मयांचें ज्ञान । तेथें अवधान श्रोतीं द्यावें ॥२६॥
जो जडमूढ होता तटस्थ । तो चौश्लोकीं जाण नेमस्त । ब्रह्मा केला ज्ञानसमर्थ । तो अगाध ज्ञानार्थं अवधारा ॥२७॥
पावोनि चतुः श्लोकीचें ज्ञान । ब्रह्मा झाला ज्ञानसंपन्न । करितां सृष्टीचें सर्जन । तिळभरी अभिमान बाधीना ॥२८॥
त्या ज्ञानाची रसाळ कथा । मर्‍हाटीया सांगेन आतां । येथें अवधान द्यावें श्रोतां । हे विनवणी संतां सलगीची ॥२९॥
पूर्ण सलगी दिधली स्वामी । ह्नणोनि निः शंक झालों आह्मी । परी जें जें बोलेन ज्ञानांग मी । तें सादर तुह्मी परिसावें ॥३०॥
ऐसे प्रार्थुनी श्रोतेजन । प्रसन्न केले साधुसज्जन । पुढील कथेचें अनुसंधान । एका जनार्दन सांगेल ॥३१॥


चतुःश्लोकी भागवत – ब्रह्मदेवाची कथा

आदिकल्पाचिये आदीं । एकार्णवजळामघी । ब्रह्मा झाला जडमूढबुद्धी । सृष्टिसर्जनविधि स्फुरेना ॥३२॥
यापरी केवळ अज्ञान । नाभिकमळीं कमळासन । विसरलां आपणा आपण । मी हें कोण स्फुरेना त्या ॥३३॥
यालागीं श्रीनारायण । द्यावया निजात्म शुद्ध ज्ञान । आपुली निजमूर्ती चिदधन । तिचे दर्शन देऊं पाहे ॥३४॥
श्रीनारायणाची दिव्य मूर्ती । देखतांची स्फुरे स्फूर्ती । तोचि इतिहास परीक्षिती । ज्ञानगर्भ स्थिती शुक सांगे ॥३५॥
अज्ञानें जीवा जीवभाव । त्यासि द्यावया निजात्म ठाव । शुक सांगे सुगम उपाव । इतिहास पहाहो हरिविरंचींचा ॥३६॥
जें श्रीमुखें श्रीभगवतें । सांगीतलें विधातयातें । संतोषोनि उत्तम वृत्तें । निजरुपातें दावोनि तेणें ॥३७॥
जीवासी दृढ देहबुद्धी । भगवंतहि देहसंबंधी । तै त्यांचे भजने मोक्षसिद्धी । नघडे त्रिशुद्धि जीवासि या ॥३८॥
ऐसी उठों पाहे आशंका । तेविषयीचे उत्तर आइका । जीवा आणि जगन्नायका । देहसमत्व देखा नघडे ॥३९॥
जाति पाहतां दोन्ही दगड । परी रत्नगार नव्हे पडिपाड । तेवीं देवाजीवा समत्व दृढ । हें केवळ मानिती मूढ न ज्ञाते ॥४०॥
धूम्र ज्वाळा पाहतां दोन्ही जन्मती एके स्थानी । तम निवारे ज्वाळांपासुनी । धूमा नमानी तम दाटे ॥४१॥
जीव ज्ञानस्वरुप सत्य ज्ञानी । परी तो झाला देहाभिमानी । ज्ञान वेंचलें विषयध्यानीं । यालागी दृढबंधनीं तो पडला ॥४२॥
आपणियाचि सारिखा देख । हरि मानी पंच भौतिक । त्या परममूर्खातें देख । आकल्प दुःखसरेना पैं ॥४३॥
ऐसेहि जे जडमूढ मूर्ख । भावार्थे झाल्या भजनोन्मुख । त्यांचें निःशेष झडे दुःख । ते निजात्मसुख पावती देखा ॥४४॥
भगवद्देह चैतन्यघन । तेथें वसेना देहाभिमान । यालागी करितां त्याचें भजन । अज्ञान जन उद्धरती ॥४५॥
आनंदोनि बोले शुकमुनी । परीक्षिती भक्तशिरोमणी । जो निजदेहीं निरशिभानी । तो मी मानी परमेश्वर ॥४६॥
जो निः शेष निरभिमान । त्याचा देह तो चैतन्यघन । त्याचे करितां भजन । जडमूढ जन उद्धरती ॥४७॥
निरभिमानाहोनी परता । ठाव नाहीं गा परमार्था । तो तैच ये आपुल्या हाता । जें अनन्यता हरिभक्त ॥४८॥
हा मुख्य भगवंत भजतां । जीवासी केवी उरे अहंता यालागीं भजनीं मुक्तता । जाण तत्त्वता परीक्षिती तूं ॥४९॥
भगवद्देहाचें श्रेष्ठपण । विशेषेंसी अतिगहन । त्या देहाचें होतां दर्शन । जडमूढ जन सज्ञान होती ॥५०॥
ऐसें निजदेहाचें लक्षण । जाणोनियां नारायण । हरावया ब्रह्मयाचें अज्ञान । निजात्मदर्शन देऊं इच्छी ॥५१॥


चतुःश्लोकी भागवत – ज्ञानप्राप्ति

न करितां भगवदभक्ती । ब्रह्मयासी नव्हे ज्ञानप्राप्ती । तेथें इतरांची कोण गती । अभजनी प्राप्ती पावावया पैं ॥५२॥
जीवाचे निरसावया अज्ञान । मुख्यत्वें असे भगवदभजन । स्वयें करिताहे चतुरानन । तेंचि निरुपण शुक सांगे ॥५३॥
केवळ चैतन्य विग्रहो । सत्यसंकल्प भगवद्देहो । त्याचे दर्शनार्थ पहाहो । तपादि उपावो हरी प्रेरी ॥५४॥


चतुःश्लोकी भागवत – भगवत्प्राप्ति

कामनारहित निष्पाप । श्रद्धापूर्वक सद्रूप । निष्कपट करितां तप । भगवत्स्वरुप तें भेटे ॥५५॥
नकरितां भगवदभजन । ब्रह्मा होऊं न शके पावन । यालागीं तपादि साधन । स्वयें निजभजन हरी प्रेरी ॥५६॥
या ब्रह्मयाची निजस्थिती । कल्पाचिये आदिप्राप्ती । कैशी होती परीक्षिती । ते मी तुजप्रती सांगेन पां ॥५७॥
इंद्रादिदेवां पूज्य तत्त्वतां । यालागीं आदिदेव विधाता । प्रजापतींचाही पिता । परमगुरुता पाहे तूं ॥५८॥
गायत्रीमंत्र उपदेशिता । हाचि झाला परंपरता । यालागीं परमगुरुता । जाणत तत्त्वतां ब्रह्मयासी ॥५९॥
ऐसा परमगुरु ज्ञाननिधी । तोहि कल्पाचिये आदीं । होऊनि ठेला मढबुद्धी । सृष्टिसर्जनविधी स्मरेना तया ॥६०॥


चतुःश्लोकी भागवत – सृष्टिरचना

एवं नाभिकमळीं कमलासन । बैसला केवळ अज्ञान । तंव हदयी झाली आठवण । मी येथें कोण कैचा पां ॥६१॥
मज कैचें हें कमलासन । येथें याचें मूळ तें कवण । तें पाहावया आपण । जळीं निमग्न स्वयें जाहला ॥६२॥
सहस्त्रवरुषें बुडी देतां । कमळमूळ नयेचि हाता । तेथें निरबुजला ये वरुता । बैसे मागुता कमळासनी ॥६३॥
विधाता विचारी चारी खाणी । चौर्‍यांसीलक्ष जीवयोनी । या चराचराची मांडणी । सृष्टी कैसेनी सृजावी हे ॥६४॥
सुर नर आणि पन्नग । उत्तममध्यमअधमभाग । कैसेनी सृजावें म्यां जग । पूर्वत्रविभाग स्फुरेना मज ॥६५॥
ऐसी स्त्रष्टा चिंता करी । निश्चळ बैसे कमळावरी । पंचभूतें हीं कवणेपरी । देही देहधारी होतील ॥६६॥
ऐसी तो चिंता करी । चित्त उगें न राहे क्षणभरी । मी कोण मजभीतरी । हें मनी निर्धारी कळेना ॥६७॥
नकळतां माझें मीपण । केवी प्रपंच होय निर्माण । ऐसें चिंतोनी अतिगहन । चतुरानन अनुतापी होत ॥६८॥


चतुःश्लोकी भागवत – भगवंताचा धांवा

कृपा करी गा अच्युता । धांवे पावे गा भगवंता । या एकार्णवाआंतोता । होई रक्षिता मज स्वामी ॥६९॥
मी अतिशयें तुझें दीन । मजवरी कृपा करी संपूर्ण । निजभावें अनन्यशरण । मनी लोटांगण घालितसे पैं ॥७०॥
ऐसी ब्रह्मयाची ती चिंता । तत्काळ कळली भगवंता । तो अंतर्यामी जाणता । करता करविता तो एक ॥७१॥


चतुःश्लोकी भागवत – हरिकृपा

जंव हरी हदयीं कृपा न करी । तंव अनुताप नुपजे शरीरीं । त्याची पूर्ण कृपा ज्यावरी । तो विषयीकांकुरीं वीतरागी ॥७२॥
विवेकाविण वैराग्य उठी । तें अपायीं घाली कडेकपाटीं । कीं वैराग्यविण विवेक उठी । तो जन्मला पोटी नपुंसक ॥७३॥
विवेकाविण वैराग्य आंधळे । वैराग्याविण विवेक पांगुळें । हें एकएका अवेगळें । झाल्याविण नकळे परमार्थ ॥७४॥
जे कृष्णकृपा पूर्ण घडे । तै विवेकवैराग्य समपाडें । हदयी वाढती वाडेंकोडें । तै ब्रह्म आतुडे तत्काळ पूर्ण ॥७५॥
वैराग्यविण जे स्थिती । त्यांतें गिळी विषयशक्ती । विवेकहीन वैराग्यस्थिती । ते जंतू पडती अंधत्वें ॥७६॥
जें कृष्णकृपा पूर्ण आकळें । तें विवेक वैराग्य एके वेळे । जें हदयी वाढे प्रांजळें । तें परब्रह्म लोळे दोंदावरी ॥७७॥
तेणें श्रीनारायणें आपण । ब्रह्मयावरी कृपा केली पूर्ण । कमळासनीं बैसोनि जाण । झाला विवेकसंपन्न वीतरागी ॥७८॥


चतुःश्लोकी भागवत – चित्तशुद्धी

त्यासी द्यावी आपुली भेटी । कृपा उपजली हरीचे पोटी । नव्हती चित्तशुद्धि गोमटी । ह्नणुनी हरिरुपी दृष्टी रिघेना ॥७९॥
जरी ह्नणाल बहुत दूरी । इंद्रियां तो व्यापारी । निजज्ञानें नांदे श्रीहरी । घडे कैशापरी प्राणिया प्राप्ती ॥८०॥
इंद्रियव्यापार ज्ञानेंहोती । तें ज्ञान वेंचलें विषयासक्तीं । या लागीं हदयस्थाची प्राप्ती । प्राणी न पावती विषयाध जे ॥८१॥
ते विषयासक्ती ज्याचीउडे । त्या नांव चित्तशुद्धि जोडे । तें हदयी हरि आतुडे । सर्व सांपडे परमात्मा मग ॥८२॥


चतुःश्लोकी भागवत – अनुतापयुक्त ब्रह्मदेव

त्या चित्तशुद्धीलागीं जाण । भावें करावें भगवदभजन । कां गुरुदास्य करितां पूर्ण । परब्रह्म जाण पायां लागे ॥८३॥
ते घडावया भगवदभक्ती । तपादिसाधन सुयुक्ती । देव सांगे ब्रह्मयाप्रती । ऐक परीक्षिती नृपवर्या ॥८४॥
एवं कमलासनीं ब्रह्मा आपण । बैसलासे अनुतापें पूर्णं । तंव एकार्णवी निकट जाण । द्वयक्षर वचन द्विवार ऐके ॥८५॥
कोण रुप कोण वर्ण । कैसेपरीचें उच्चारण । त्या अक्षरांचा अर्थ कोण । तेंही लक्षण ऐक राया ॥८६॥
तकारापासुनी पकारावरी । ऐसें ब्रह्मा साक्षात्कारी । त्याची ऐक्यता झडकरी । हो लवकरी विधात्या तुज ॥८७॥
ऐसीं तप ही अक्षरें दोन्ही । परमेष्ठी ऐके कानी । तेचि दोन्ही वेळा करुनी । तपतप हे ध्वनी परिसत ॥८८॥
जैसा परमआप्त येऊनी । हितोपदेश सांगे कानीं । तेवीं आईकोनी दोन्ही । विधाता मनीं चमत्कारला ॥८९॥
हें तपस्वियांचे निजधन । यालागीं ते तपोधन । तपोबळे ऋषिजन । प्रतिसृष्टी जाण करुं शकती ॥९०॥


चतुःश्लोकी भागवत – तपाचें महिमान

नवल तपाचें कौतुक । तापसां भिती ब्रह्मादिक । तपस्वियाचें नवल देख । दशावतारादिक विष्णूसी ॥९१॥
तपाचेनि नेटपाटी । सूर्यमंडळ तपे सृष्टी । तयाच्या बळें निजनेटीं । दर्भाग्रीं सृष्टी धरिती ऋषि ॥९२॥
तपोबळें समुद्रा क्षार केलें । यादवकुळ निर्दाळिलें । शिवाचें लिंगपतन झालें । क्षोभलेनी बोलें तपोधनी ॥९३॥
जे सत्यवादी संत सज्जन । जे वासनात्यागी अकिंचन । तप हें त्यांचें निजधन । सत्य जाण नृपनाथा ॥९४॥
तप तें परम निधान । साधकांचें निजसाधन । ब्रह्मप्राप्तीचें दिव्यांजन । ऐकोनी चतुरानन विचारी ॥९५॥
तप तप ऐसें बोलिला । तो प्रत्यक्ष नाहीं देखिला । पाहतां अदृश्य जाहला । तो पांगेला दशदिशा ॥९६॥
तप या अक्षरांचा उच्चारी । पाहतां न दिसे देहधारी । अवलोकितां दिशा चारी । वक्ता शरीरी दिसेना ॥९७॥
तप या अक्षरांचा वक्ता । नातुडे दृष्टीचिया पंथा । मग तप या वचनार्था । होय विचारिता निजहदयीं ॥९८॥


चतुःश्लोकी भागवत – तप याचा अर्थ

ह्नणे दंतौष्ठपुटेंवीण । नव्हे या अक्षराचें उच्चारण । हो कां येथें बोलिला कोण । देहधारी आन दिसेना ॥९९॥
तप या नांवाची काय स्थिती । तपें पाविजे कोण प्राप्ती । ऐसें विधाता निजचितीं । तपाची स्थिति गति विवंचीत ॥१००॥
तप ह्नणिजे परमसाधन । येणें साधे निजात्मधन । ऐकोनी ऐसें सावधान । स्वहित स्फुरण हदयी स्फुरले ॥१॥
तप ह्नणिजे माझें हित । तपें एकाग्र होय चित्त । तपे होईजे आनंदयुक्त । ऐसा निश्चितार्थ पैं केला ॥२॥
जंव नाही केले दृढ तप । तंव नटके तपवक्त्याचें रुप । आहाच कष्टतां अमूप । तेणें स्वस्वरुप भेटेना ॥३॥
ऐसा दृढ निश्चय मानुनी । विधाता बैसे कमलासनी । जैसा प्रत्यक्ष येऊनी कोण्ही । हितालागोनी बैसवी ॥४॥
एकांतीं शिष्यालागोनी । जें गुरु उपदेशित कानीं । मग तो प्रवर्ते अनुष्ठानीं । तेवीं कमलासनी विधाता ॥५॥


चतुःश्लोकी भागवत – तप म्हणजे काय

तप म्हणिजे नव्हे स्नान । तप म्हणिजे नव्हे दान । तप नव्हे शास्त्रव्याख्यान । वेदाध्ययन नव्हे तप ॥६॥
तप म्हणिजे नव्हे योग । तप म्हणिजे नव्हे याग । तप म्हणिजे वासनात्याग । जेणें तुटे लाग कामक्रोधांचा ॥७॥
शरीरशोषणा नांव तप । तें प्रारब्धभोगानुरुप । हरि हदयीं चिंतणें चिद्रूप । तप सद्रूप त्या नांव पैं ॥८॥

दंभ – लोभ – अहंकार यांना तोडतें तें तप

जेणें दंभलोभ निःशेष आटे । अहंममता समूळ तुटे । यासचि नांव तप गोमटें । मानी नेटेंपाटें विधाता ॥९॥
तीर्थोतीर्थीचिया अनुष्ठाना । क्षमा नुपजे सज्ञानधना । तेथें कोप येऊनी जाणा । करीं उगाणा तपाचा ॥१०॥

क्रोध हा तापसांचा वैरी

कोप तापसांचा वैरी । केल्या तपाची बोहरी करी । तो जंव निर्दळेना जिव्हारीं । तों तपाची थोरी मिरविती मूर्ख ॥११॥
जरी जाहला संन्यासी । तरी कामक्रोध ज्यापासीं । तो प्रपंचातें दिधला आंदणासी । मां इतरांसी कोण पुसे ॥१२॥
जेथें कामक्रोधांचें निर्दाळण । या नांव शुद्ध अनुष्ठान । हा निश्चय करुनि चतुरानन । तपासी आपण सरसावला ॥१३॥
एवं तप मानूनियां हित । बुद्धिनिश्चर्ये निश्चितार्थ । ब्रह्मा तपश्चर्या करित । एकाग्रचित्त भावार्थे ॥१४॥


चतुःश्लोकी भागवत – तप आरंभिलें

कामक्रोधनिरसनार्थ ब्रह्मदेवानें तप आरंभिलें

मनुष्याचा जो जाणिजे मास । तो देवांचा एक दिवस । ऐसी संख्या सहस्त्रवरुष । तपसायास करी ब्रह्मा ॥१५॥
ऐसी सहस्त्ररुषेंवरी । ब्रह्मया कमलासनी तप करी । त्याच्या तपाची थोरी । व्यासमुनीश्वरीं वर्णिली ॥१६॥
हे आदिकल्षींची जुनाट कथा । होय श्रीव्यासचि वक्ता । तेणें आणोनियां वेदार्था । यथार्थ वार्ता निरुपिली ॥१७॥
तीच श्रीशुकें परीक्षिती । निरुपिली कृपामूर्ती । या विंरिचीचीं तपप्राप्ती । उत्कृष्ट स्थिती अवधारा ॥१८॥

तपः प्रभावानें ब्रह्मदेव अंतर्ब्राह्य बदलला

ब्रह्मा कमलासनीं तप करी । नवल त्याचे धारिष्टाची थोरी । नानाइंद्रियविकारी । परी झाला अविकारी निजनिष्ठ ॥१९॥
शमदमांचेनी निजमेळें । जिंतिले मनपवनांचे उल्लळे । इंद्रियांचें अपार पाळे । तेणें तपोबळें आक्रमिले ॥२०॥
मन अमन पाहों आदरिलें । तंव तें चंचलत्व विसरलें । चित्त विषयचिंते मुकलें । चित्ती विषयचिंते मुकलें । चित्तीं चिंतलें चैतन्य पैं ॥२१॥
बुद्धीनें दृढबोध धरिला । तेथें अहंकार कांपिन्नला । तेणें सोहंभाव बळकावला । तेव्हां प्राण परतला दचकोनी ॥२२॥
देही दशधा धांवत होता । तो एकवटुनी आंतौता । धरुनि सोहंचा सांगाता । पश्चिमपंथा चालिला ॥२३॥
यापरी मनपवनांसी । जिंतिलेंसें निजनिष्ठेसी । तंव बहिरिद्रियांसी । दशा आपैसी बाणली ॥२४॥
डोळ्यां डोळे देखणें झालें । तेणें दृश्याचें देखणें ठेलें । श्रवण अनुहतध्वनी लागले । तंव शब्दा वरिलें निः शब्दें ॥२५॥
स्पर्शे स्पर्शावें जंव देही । तंव देही देहत्व स्फुरण नाहीं । देहींच प्रगटला विदेही । तेथे स्पर्शे कार्ड्र स्पर्शावें पै ॥२६॥
चित्कळा वोळली वोरसें । गोडी रसनेमाजी प्रवेशे । रसना लाजे विषयतोषें । सर्वांग तेणें रसे अतिगोड ॥२७॥
घ्राणी घेऊं जातां गंधासी । प्राण चालिला पश्चिमेसी । मार्गे कोण सेवी गंधासी । एवं विषयाची विरक्ति स्पष्ट ॥२८॥

मनाची गति थांबून तें निर्विषय झालें

मन इंद्रियद्वारें विषयी धांवे । त्यासी प्रत्याहार लाविला सवें । यालागीं तें जीवेंभावें । झालें निजस्वभावें निर्विषय ॥२९॥
ज्ञानेंद्रियें जिंकिली ऐसी । तें कर्मद्रियांची स्थिति कैसी । तेंही सांगेन तुजपाशीं । ऐके राजर्षि नृपवर्या ॥३०॥
जेवीं धूर जिंकिलिया रणी । कटक जिंकिले तेचिक्षणीं । तेवीं मनोजयाची बांधावणी । तोचि करणीं सर्व विजय समजे ॥३१॥
विजय बांधावा राजद्वारीं । तंव गुढिया उभविजे घरोघरी । तेवी मनोजयाची थोरी । तेंचि इंद्रियद्वारी नांदत ॥३२॥
वाचा वदली सत्यासत्य । तिसी रामनामें दिलें प्रायश्चित । वाच्यवाचक स्फुरेना तेथ । वाचा स्फुरत तच्छक्ती ॥३३॥
जें भेटोंनिघे मना मन । तैं हात मोकळे संपूर्ण । तेव्हां क्रियेमाजी अकर्तेपण । आपुलें आपण हातावरी ॥३४॥
क्रिया रतली चिच्छक्ती । तेणें ज्ञानगम्य चरणांची गती । तेव्हां गमनप्रत्यावृत्ती । समाधान स्थिती आसनस्थ ॥३५॥
यापरी जिंतूनी चरण । दिव्यसहस्त्र वरुषें जाण । द्रुढ घालूनियां आसन । प्राणापान वश्य केले ॥३६॥
मनी कामाचा अतिसाटोप । तेणें खवळला उठी कंदर्प । तें मन चिती जैं चिद्रूप । तैं कामकंदर्प असतांच नाही ॥३७॥

मन चिद्रूप झाल्यावर कामभावना संभवतच नाहीं

जेथे मन असे इंद्रिये उरलें । तेथें कंदर्पाचें चालोंशकलें । चित्त चिद्रूपध्यानी गुंतलें । तैं कांही नचले काम कंदर्पाचे ॥३८॥
देखोनी रंभेचा साटोप । शुकापोटी नुठे कंदर्प । ज्याचे हदयी नुठे कामसंकल्प । तो निर्विकल्प सर्वागीं ॥३९॥
काम तापसांचा उघड वैरी । मन जिंकोनेणे त्यातें मारी । जे गुंतले चिदाकारी । त्यांचे तोडरी अनंग रुळत ॥४०॥
गुदेंद्रियाचा स्वभाव क्षर । तंव ध्यानबळें साचार । क्षरी प्रगट होय अक्षर । क्षराक्षर नुरवुनी तेथें ॥४१॥
ज्ञानकर्मेंद्रियें दाही । अकरावें मन ते ठायी । यापरी उभयेंद्रियें पाही । जिंतूनी दृढदेही तो झाला ॥४२॥
अंतरीं निग्रहू दृढ केला । शम शब्दें तो वाखाणिला । बाहयेंद्रिया नेम केला । तो दन बोलिला शास्त्रसी ॥४३॥
हदयीचेंनी विवेकमेळें । वैराग्याचे अनुतापबळें । शमदमाचेनी निखळें । तप प्रांजळें दृढ केलें ॥४४॥
परी तैं तप जाहून कैसें । लोक प्रकाशे निजप्रकाशें एवढी महिमा आली दशे । त्रैलोक्य भासे त्या तपामाजीं ॥४५॥
ऐसा निष्ठेचा निजप्रताप । तेणें तप जाहलें सफळरुप । ब्रह्मा जाहला सत्यसंकल्प । तपवक्त्याचें रुप देखोनियां ॥४६॥
यालागी सफळदर्शन । विरिंचीचें तें तपाचरण । आच रला निजांगें जाण । ब्रह्मा आपण नेमनिष्ठा ॥४७॥
तपाचे निजनेंमेंसी कष्ट । साधिले स्वनिष्ठें चोखट । यालागी तो अतिश्रेष्ठ । जाहला वरिष्ठ तपस्व्यांमाजी ॥४८॥
देखावें तपवक्त्याचें रुप । ऐसा ब्रह्मयाचा पूर्वसंकल्प । यालागी बैकुंठपीठदीप । कृपाळू सत्यसंकल्प स्वरुप दावी ॥४९॥


चतुःश्लोकी भागवत – आत्मज्ञान

गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान नाहीं

न होतां गुरुकृपा संपूर्ण । कदा न साधे आत्मज्ञान । त्या गुरुत्वालागी नारायण । आपुलें आपण स्वरुप दावी ॥५०॥
नसेवितां सदगुरुचरण । स्रष्टयासी नव्हे ब्रह्मज्ञान । त्या गुरुत्वाचें महिमान । श्रीनारायण स्वये दावी ॥५१॥
मागे उपदेशिलें ‘ तप तप ’ । परी प्रत्यक्ष नव्हे सदगुरुरुप । गुरुकृपा नव्हतां सद्रूप । शिष्याचे विकल्प न तुटती कदा ॥५२॥
संतोषोनी सदगुरुनाथ । शिष्याचे माथां जों न ठेवी हात । तोंवरी नातुडे परमार्थ । हा निश्चितार्थ हरि जाणे ॥५३॥
यालागी श्रीनारायण । गुरुत्वें आपुलें आपण । शिष्यासी देऊनी दर्शन । स्वयें ब्रह्मज्ञान उपदेशितसे ॥५४॥
निष्ठें केली तपस्थिती । तेणें झाली सदगुरुप्राप्ती । आतां गुरुमुखें प्रजापती । आत्मज्ञानप्राप्ती पावेल पां ॥५५॥
जैं पूर्वपुण्याची निष्काम जोडी । हैं सदगुरुचरण जोडिती जोडी । गुरुचरणी आवडी गाढी । तैं पाविजे रोकडी ब्रह्मप्राप्ती ॥५६॥

गुरुविषयीं लवमात्रहि विकल्प उपयोगी नाहीं

गुरुच्या ठायी नींचपण । शिष्यें देखिले असे जाण । अणुमात्र केलिया हेळण । ब्रह्मज्ञान कदा नुपजे यालागी कृष्णकृपानिधी । निजवैभवविद्धि स्त्रष्टयासी दावी ॥५८॥
गुरुचे अगाध महिमान । दावावया श्रीनारायण । जेथें लक्ष्मी करी संमार्जन । तें वैकुंठभुवन स्वयें दावे ॥५९॥


चतुःश्लोकी भागवत – वैकुंठमहिमा

तें वैकुंठ जाण साचार । सर्व लोकां वरिष्ठवर । त्याहून परतें नाही पर । यालागीं परात्पर ह्नणती त्यातें ॥६०॥
जेथें परमात्मा नांदे स्वयंज्योती । त्या वैकुंठाची वैभवस्थिती । वर्णितां खुंटली परेची गती । यालागी ह्नणती वैकुंठ लोक ॥६१॥
ज्या लोकाचिये ठायी । क्लेशमात्र प्राणियांसी नाहीं । मोहाची वार्ता कांहीं । कोणी स्वप्नीही नदेखती ॥६२॥
नित्य देखतां हरीचे पाय । क्षुधातृषा जिरोनी जाय । तेथें मोहक्लेश कैचा राहे । आनंदे नांदताहे वैकुंठलोक ॥६३॥
ज्या वैकुंठाचें नांव घेतां । काळ पळे मागुता । तेथें कैची भयाची वार्ता । जननिर्भयता नांदे पैं ॥६४॥
ज्या लीकाचिये ठायीं । मरणाचें नांव नाहीं । जरा प्रगटे निजदेहीं । हे जन कोणी जाणेचिना ॥६५॥
ज्या लोकाचें स्तवन । सदाशिव करी आपण । इंद्रादिदेवगण । वैकुंठाचे गुण स्वयें वदती ॥६६॥
मृत्युलोकीचें मुनिगण । पावावया वैकुंठभुवन । अद्यापि करिती अनुष्ठान । भगवद्भजन निजनिष्ठा ॥६७॥
तोचि वैकुंठलोक । पांचश्लोकी श्रीशुक । वर्णितसे आत्यंतिक । ऐके त्यक्तोदक परीक्षिती ॥६८॥


चतुःश्लोकी भागवत – वैकुंठ स्थिति

ज्या लोकाची निजस्थिती । शुद्धसत्वजन वर्तती । रजतममिश्रित गती । ज्या लोकाप्रती असेना ॥६९॥
नवल ते लोकींचा ठसा । बाल्यतारुण्यवृद्धदशा । नाहीं तेथें तिन्ही वयसा । क्षय आहे कैसा हें नेणिजे ॥७०॥
तेथें समूळ माया नाहीं । मा कलिविक्रम कैंचा ते ठायी । मोहलोभादिद्वेष पाही । मायेच्याठाई वर्तती ॥७१॥
उगमीं वाकडी लागे नेटें । तेणें नदनदीपूर लोटे । तेवीं माया विषयसंघट्टें । चढणी नेटेपाटें मोहादिदशा ॥७२॥
जेथें उगम नाही मायेचा । तेथें रागदशे ठाव कैंचा । परमानंदें पूर्ण साचा । हरिप्रियांचा समूह नांदे ॥७३॥
भक्तिप्रतापें जे आथिले । यालागी ते देवदैत्यी पूजिले । मायामोहातीत जाहले । अढळ बैसले वैकुंठी ॥७४॥
देवाची माया ऋद्धिसिद्धी । दैत्यांची माया विघ्नें ब्राधीं । भक्त नढळतीच दृढबुद्धी । जिणोनी उपाधि पूज्य झाले ॥७५॥
शोधिती सत्त्व अतिसात्विकें । जे हरिभक्त हरिप्रेमाधिकें । जे झाले श्रीहरिसारिखे । त्यांचें स्वरुप सुखें शुक सांगे ॥७६॥


चतुःश्लोकी भागवत – हरिभक्तांचे स्वरुप

हरिभक्त शोभायमान । हरिचरणी आवडी गहन । नित्य नवीन प्रेमें हरिदर्शन । तेणें हरिसमान स्वयें झाले ॥७७॥
कीटकी भयें ध्यातां भृंगीसी । तद्रूपता बाणली तियेसी । मां जे जीवें भावें भजती हरीसी । ते हरिपासीं स्वयेचीं येंती ॥७८॥
भजनें पावले हरिरुपासी । ह्नणोनी झाले वैकुंठवासी । यालाईं त्यांच्या स्वरुपासी । परीक्षितीपासी शुक सांगे ॥७९॥
वैकुंठवासी भक्तजन घनश्याम राजीवलोचन । गंभीरगिरा प्रसन्नवदन । शोभायमान निजतेजें ॥८०॥
मुकुटकुंडलें मेखला । गळा आपाद रुळे वनमाळा । कासे कसिला सोनसळा । जेवीं मेघमंडळामाजी वीज ॥८१॥
आजानुबाहु भुजा चारी । बाहुअंगदे अतिसाजरी । जडितमुद्रिका बानल्या करी । वीरककणावरी मणिमुद्रा ॥८२॥
सांवळी कमलमृणालें । तैसें मस्तकीचे केश कुरले । कुंकुमांकित करचरणतळें । लाजिली प्रवाळें अधररंगें ॥८३॥
ललाटी तिलक पिंवळा । आपादलं वनमाळा । वैजयंती रुळे गळां । घनसांवळा घवघवित ॥८४॥
ज्यांची वदतां सुंदरता । तंव ते पावले हरिस्वरुपता । त्याहुनीयां सुंदरत्व आतां । बोलें बोलतां सलज्ज ॥८५॥
नवल त्यांची सुकुमारता । चंद्रकर खुपती लागतां । सेजेमाजी निजोजातां । गगनाची शून्यता सले त्यांसी ॥८६॥
त्यांचिया अंगप्रभा । लाजोनी सूर्य द्वारा पैं उभा । ज्यांचिया निजतेजशोभा । हिरण्यगर्भा प्रकाश असे ॥८७॥
ऐसें सुंदर आणि सुकुमार । निजभजनें भगवत्पर । वैकुंठवासी अपार । हरिकिंकर विमानस्थ ते ॥८८॥
पूर्णचंद्रप्रभेसमान । निजपुण्यें झळके विमान । ऐसे विमाणीं बैसोनि जाण । हरिसी आपण क्रीडती स्वयें ॥८९॥


चतुःश्लोकी भागवत – पतिव्रतांचें निवासस्थान

पतिव्रतांचें निवासस्थान

जे शुद्धसत्वेंकरुनी संपन्न । नुल्लंघत पतीचें वचन । जे निर्विकल्प पतिव्रता पूर्ण । तिसी निवासस्थान वैकुंठ ॥९०॥
जे पतिपुत्रा आणि अतीता । भोजनी न देखे भिन्नता । जे घनलोभाविण पतिव्रता । ते जाण तत्त्वतां वैकुंठवासी ॥९१॥
जे पतीतें मानी नारायण । जे कोणाचे न देखे अवगुण । जे निर्मोह पतिव्रता पूर्ण । तिसी निवासस्थानवैकुंठ ॥९२॥
ज्यांसी निवास वैकुंठस्व्थान । वर्णन । श्रीशुक सांगतसे आपण । सभाग्यपण तयांचेची ॥९३॥

पविव्रतांचें वैकुंठलोकीचे स्थान

ज्या परमपुण्यें अतिपावन । त्या स्त्रिया वैकुंठी विराजमान । सौदर्यगुणें विष्णूसमान । तेज विराजमान शोभे कैसें ॥९४॥
लावण्य स्त्रियां केवीं दिसे । तेथें स्वयें स्वरुपें लक्ष्मी वसे । तद्रपें स्त्रियां सौदर्य भासे । यापरी शोभतसे वैकुंठलोक ॥९५॥
वैकुंठ नव्हे तें शुद्धगगन । मेघस्थानी गमे विमान । तेथें विद्युल्लता स्त्रिया जाण । सौदर्ये संपूर्ण झळकती त्या ॥९६॥
इतरांठायीं लक्ष्मी असे । तें ऐश्वर्ययोगें आभासे । ते निजरुपें वैकुंठी वसे । यालागी शोभतसे वैकुंठलोक ॥९७॥
लक्ष्मीसी अतिशय लावण्य । यावया हेंचि कारण । सप्रेमें सेवी हरिचरण । यास्तव शोभमान अतिसौदर्य ॥९८॥
जेणें सुख होय निजजीवा । ऐसी गोड हे हरीची सेवा । मेळवुनी उत्तम वैभवा । रमा सद्भावा हरिचरणी ॥९९॥

सर्वांगमनोहर शृंगारवनांतील लक्ष्मीची हरिसेवा

शृंगारवाटिकेमाजी डोल्हारा । लावूनीयां सुवर्णसूत्रा । लक्ष्मी निजभावें निजवरा । नानोपचारा सप्रेम भजे ॥२००॥
शृंगारवाटिकेचें वन । वसंतें शृंगारिलें संपूर्ण । पराग उधळती पुष्पांतोन । सुवासित पूर्ण वन झालें ॥१॥
मृगमद अत्यंत शीतळ । ढाळीं झळके मलयानीळ । पंचम कूजती कोकिळ । झंकारें अळिकुळ भ्रमती तेथें ॥२॥
कुंकुमकेशरकस्तूरीरोळा । एकवटपणें कर्दम केला । सुगंध चंदन उधळला । नाना सुमनमाळा सुवासित ते ॥३॥
चंद्रकांतीचें शीतळ नीर । शुद्ध सुमनांचे विचित्र हार । हंस त्राहाटिले शेजार. । त्यावरी अरुवार शतपत्राचें ॥४॥
ऐसी देखोनी शज मनोहर । संतोषोनी पहुडला श्रीधर तेथें डोल्हारियाचा दोर । अंतः स्थिर हालवी रमा ॥५॥
येथें हरिगुणचरित्र । शुक बोलती विचित्र । हरिखें कूजताती मयूर । जेवी कवीश्वर गर्जती नामें ॥६॥
कोकिळांचे पंचमस्वर । जैसे सामगायन गंभीर । मधुर भ्रमरांचें झणत्कार । सारंगधरगुण वर्णिती पैं ॥७॥


चतुःश्लोकी भागवत – हरिगुणसंकीर्तन

ऐसें ऐकतां हरिगुण । रमा झाली स्वानंदें पूर्ण । तेही संतोषोनी आपण । अगाध त्याचे गुण गाऊं लागली ॥८॥
ऐकतां हरिनामगुणकीर्ति । ज्यासी उल्हास नुपजे चित्ती । तो परम अभाग्य त्रिजगतीं । जाण परीक्षिती निश्चित तूं ॥९॥
मी हरीचें निजअर्धांग । ह्नणें परी नदेखें अंगसंग । सांग नाहीं ह्नणती श्रीरंग ॥ व्यापुनी सर्वांगे वर्तवीमते ॥१०॥
माझें लावण्यसमर्थपण गुण । रमा आणि रमारमण । अवघे श्रीहरिनारायण । माझें व्रतें मीपण तयाचेनी ॥११॥
त्यातें मी मानीं आपुला कांत । तंव मीपण नुरे त्याआंत । मज सबाह्य श्रीभगवंत । असे वर्तत निजानंदें तो ॥१२॥
आतां त्याची कीर्ति गावी कैसी । तंव वाच्य वाचक हषीकेशी । यास्थिती करितां कीर्तनासी । कीर्तिवंतासी निजलाभ होय ॥१३॥
देवा तूं सर्वभूतनिवासी । ह्नणतां भूतमात्रा नातळासी । भूतें भूतात्मा तूंच होसी । नमो हषीकेशी परमात्मया ॥१४॥


चतुःश्लोकी भागवत – श्रीविष्णूची स्तुति

नमो आदिपुरुषा अव्यक्ता । सच्चिदानंदा गुणातीता । विश्वात्मका सदोदिता । नमो अच्युता अव्यया तुज ॥१५॥
तूं योगीजनां अगोचर । वेदशास्त्रां नकळे पार । भक्तजनासी प्रियकर । दिधला चरणादर निजसेवे त्वां ॥१६॥
हरिचरणसेवेपरता । ठाव नाही परमार्था । मिथ्या मोक्षसायुज्यता । ह्नणती लाता हरिभक्त पैं ॥१७॥
हाती जोडल्या हरिचरण । भक्तां नाही जन्ममरण । यापरता परमार्थ कोण । अभाग्य जन नमानिती हें ॥१८॥
थिजलें विघरलें तूप देख । तैसें सगुणनिर्गुंण दोन्ही एक । हे स्वयें जाणती हरिसेवक । नेणती नास्तिक वेदबाह्य जे ॥१९॥
सर्वांभूतीं वासुदेव । स्वतः सिद्ध असतां स्वयमेवः हा भेदवाद्यां नुपजे भाव । हदयस्थ देव दुणाविला स्वयें ॥२०॥
भेदवादी अभेदवादी । वंदी अथवा जो कां निंदी । तो भगवद्रूपचि त्रिशुद्धी । हें सवेंचि विधी अनन्यभक्तां ॥२१॥
भावें हरिभक्ति करितां । भेदी प्रकटे अभेदता । भक्तांसी नित्यमुक्तता । भावें भजतां हरिचरणीं ॥२२॥
ज्ञानाभ्यासी विषय त्यागिती । त्यागिती ते अतिदुःख पावती । भक्त विषय भगवंतीं अर्पिती । तेव्हांचि ते होती नित्यमुक्त ॥२३॥
ऐसें उल्हासें रमा बोले पूर्ण । माझा सदगुरु स्वये नारायण त्याचे सेवितां सदभावें चरण । स्वयें ब्रह्मज्ञान पायां लागे ॥२४॥
यापरी रमा आपण । आनंदें गाय हरीचे गुण । हेंही करावया गुणवर्णन । तो रमारमण वाचा वदवी ॥२५॥
सांडूनिया अहंमती । रमा करी साकारस्तुती । देव संतोषला निजात्मस्थिती । यालागीं श्रीपती बोलिजे त्यातें ॥२६॥
श्रियेची जे निजस्थिती । तिसी चाळविता निजात्मशक्ती । यालागीं त्यातें श्रीपती । वेदशास्त्रार्थी बोलिजे ॥२७॥
न भागतां भक्तांची आर्ती । निवारी निजांगें कृपामूर्ती । यालागी त्यातें सात्वतपती । सज्ञान बोलती सदभावें पां ॥२८॥
याज्ञिक यागहोम करितां । कल्पनेसारिखें फळदाता । यालागीं यज्ञपति तत्त्वतां । होय बोलता श्रीव्यास ॥२९॥
जग सृजुनी प्रतिपाळिता । शेखीं उदरीं सामाविता । एवढी सत्ता श्रीभगवंता । यालागीं तत्त्वतां जगत्पती होय ॥३०॥
ऐसा भक्तपती श्रीपती । यज्ञपति आणि जगत्पती । भक्तांसमान वैकुंठपती । देखे प्रजापती टवकारला ॥३१॥
मागें बोलिले भगवदभक्त । जे भजनभावें नित्यमुक्त । ते हरिलागीं प्रिय सात्वत । ब्रह्मा देखत पार्षदगण ॥३२॥


चतुःश्लोकी भागवत – पार्षदगण

वैकुंठींचे मुख्य पार्षदगण

वैकुंठी हरिभक्त पूर्ण । ब्रह्मा देखताहे आपण । त्यांची नांवें सांगूंशके कोण । मुख्य पार्षदगण ते ऐका ॥३३॥
नंद सुनंद मुख्यत्वें पूर्ण । बल आणि प्रबलार्हण । धाता विधाता निकटधन जय विजय जाण द्वारपाळ ॥३४॥
चंड प्रचंड सुशीळ । भद्र सुभद्र पुण्यशीळ । कुमुद कुमुदाक्ष सकळ । हा पार्षदमेळ श्रीहरीचा ॥३५॥
इहीं पार्षदगणांसमवेत । ब्रह्मा देखे श्रीभगवंत । त्याते भजतां निजभक्त । स्वानंदयुक्त सर्वदा तो ॥३६॥
सप्रेम सभ्दावी सात्विक । त्यांसी सदा हरी सन्मुख । तुष्टला होय प्राङ्मुख । निजानंदे सुख सर्वदा देत ॥३७॥

हरिदर्शनाचा महिमा

ज्याचे दर्शन स्वयें गोड । विसरवी अमृताची चाड । पहातयाचें पुरे कोड । दृष्टि होय गोड देखणेपणें ॥३८॥
त्या निजभक्तांचे ठायी । नाममात्र स्मरतां देही । मृत्यु रिघों नशके कांहीं । अमृतरुप पाही यापरी भक्त ॥३९॥
ज्याचें नाम निवारी जन्ममरण । त्याचे भाग्यें झालिया दर्शन । भक्तांसी तो सुप्रसन्न । प्रसन्नवदन गोविंद पैं ॥४०॥
आकर्णविशाळनयन । दोहीं प्रांतीं आरक्त पूर्ण । यालागीं तो अरुणलोचन । स्वयें चतुरानन हरि देखे ॥४१॥

ब्रह्मदेवाला भगवंत कसा दिसला ?

मागुतेनी तो कैसा भगवंत । निजभाग्यें विधाता देखत । माथां मुकुट रत्नखंचित । सुमनीं संयुक्त कबरीबंध पैं ॥४२॥
चतुर्भुज घनसांवळा । मकरकुंडलें कौस्तुभ गळां । वैजयंती वक्षः स्थळा । आपाद वनमाळा रुळत ॥४३॥
विजू शरण आली हरीसी । अस्ता जाणें खुंटलें तीसी । तैसा पीतांबर कासेसी । दिव्यतेजेंसी तळपतसे ॥४४॥
नाभीं आवर्तला आनंद । परमानंदें वाढलें दोंद । सर्वांगें सच्चिदानंद । स्वानंदकंद शोभतसे ॥४५॥
पाहतां हरीची करतळें । संध्याराग लाजिन्नला पळे । अधर आरक्तपोवळें । सुकुमार रातोत्पळें तैसे चरण ॥४६॥
चरणी तोडर गर्जती देखा । ध्वजवज्रामकुशऊर्ध्वरेखा । पाहतां पायींच्या सामुद्निका । सनकादिकां आनंद बहु ॥४७॥
पडतां पायींच्या पायवण्यासी । शंकर वोढवी मस्तकासी । तेणें शिवत्व आलें त्यासी । अद्यापि शिरीं वाहतसे ॥४८॥
त्याचिये वक्षः स्थळी वामा । वामांगी बैसलीसे रमा । तिच्या भाग्याची थोर सीमा । नवर्णवे महिमा श्रुतिशास्त्रां ॥४९॥
रमा बैसतांचि अर्धांगीं । तिच्या निजशक्ति अनेगी । उभ्या तिष्ठती निजविभागीं । आज्ञाविनियोगीं अधिकार त्या ॥५०॥


चतुःश्लोकी भागवत – सृष्टीची निर्मिती

अशा भगवंताजवळ सृष्टीच्या निर्मितीचें कार्य कसें चालतें तें ब्रह्मदेवाला दिसलें

श्रेष्ठ सिद्धासनीं आरोहण । रमासमवेत रमारमण । तेथें सृष्टीचे कार्यकारण । ब्रह्मा आपण स्वयें देखे ॥५१॥
करावया सृष्टिसर्जन । ब्रह्मा पुढें देखे नारायण । सृष्टीचें कार्यकारण । आपुलें आपण निजशक्ति दावी ॥५२॥
चारी पांच आणि सोळा । ऐसा पंचविसांचा मेळा । आज्ञाधारक हरिजवळा । विधाता डोळां स्वयें देखे ॥५३॥
त्यांची शक्ति कोण कोण । कोण कार्य कोण कारण । कैसें कैसे त्यांचें लक्षण । नामाभिधान तें ऐका ॥५४॥
प्रकृति पुरुषमहदहंकार । हा चतुः शक्तींचा प्रकार । पंचशक्तींचाहि विचार । जाण साचार महाभूतें ॥५५॥
ज्ञानकर्मेद्रियांचें लक्षण । अकरावें गणिजे पैं मन । पंचतन्मात्रा विषय जाण । यापरी संपूर्ण षोडशशक्ती ॥५६॥
या पंचविसांच्या पोटी । ब्रह्मांडेसीं उठिजे सृष्टी । त्याहि माजी त्रिगुणत्रिपुटी । अतर्क्य दृष्टी विधाता देखे ॥५७॥

भगवंत हा षडगुणयुक्त असल्यानें त्याच्या भक्तांनाहि षड्गुणांची प्राप्ति होते

षड्गुणभाग्यें भाग्यवंत । यालागीं बोलिजे भगवंत । ज्ञानवैराग्य ऐश्वर्यवंत । यशश्रीमंत औदार्यैसी ॥५८॥
हे साही गुण भगवंती । सहज स्वाभाविक असती । योगानें करितां भगवदभक्ती । षड्गुणप्राप्ती तत्प्रसादें पैं ॥५९॥
सहज षड्गुण भगवंती । योगियां आगंतुक प्राप्ती । भक्तांतें भगवंत ह्नणती । जाण निश्चित्ती या हेतू ॥६०॥
पावोनी षड्गुणप्राप्ती । भक्तांतें भगवंत ह्नणती । ऐके तयांची नामकीती । संक्षिप्तस्थिती सांगेन तुज ॥६१॥
वसिष्ठ वामदेव नारद । व्यास वाल्मीक प्रल्हाद । शुक षड्गुणी प्रसिद्ध । इत्यादि अनुवाद भगवद्रूप पैं ॥६२॥
अगाध हरीचें उदारपण । दासां देऊनियां षड्गुण । भगवद्रूपीं परिपूर्ण । त्यांसी भिन्नपणें न देखे स्वयें ॥६३॥
देउनी षड्गुणसंपत्ती । भक्त भगवद्रूप होती । त्यांची उरोंनेदो भिन्न वृत्ती । चिदात्मस्थिती निजबोधें ॥६४॥

औदार्यसिंधु भगवंत

नवल सामर्थ्यांचे औदार्य । आपणासगटं दे षड्गुणैश्वर्य । अभिन्नज्ञानें तेजवीर्य । परात्परवर्य महामहिमा ॥६५॥
मर्दुंनी भक्तांचा जीवकण । भेद निरसुनी दे षड्गुण । स्वयें स्वरुपी रमारमण । स्वानंदमयपूर्ण परमात्मा ॥६६॥

अशा षड्गुणैश्वर्यसंपन्न नारायणाच्या दर्शनानें ब्रह्मदेव आत्मानंदीं रममाण झाला

यापरी श्रीनारायण । आनंदविग्रही चिदघन । त्यातें देखोनि चतुरानन । विस्मयें पूर्णं जाहला असे ॥६७॥
घवकरी देखिला हषीकेशी । घवकरी सत्त्व दाटलें त्यासी । प्रेम नसांवरे ब्रह्मयासी । सुखोमींसी विव्हळ होत ॥६८॥
घवघवीत शामसुंदर । देखतां मनीं मना विसर । चढिला सुखाचा महापूर । त्यामाजीं संसार बुडों पाहे ॥६९॥
चित्त चिंतेसी विसरलें । अहंसोहं एक जाहले । बुद्धिबोधा खेंव पडिलें । भरितें दाटले सत्वाचे त्या ॥७०॥
निजात्मज्योती लखलखिली । तेणें हरिखें जीवदशा लाजिली । देहीं देहत्वाची स्फूर्ति गेली । विषयाची झाली पाहांट तेथे ॥७१॥
मोडिलें त्रिपुटीचें विंदान । मावळोंलागे विकारभगण । जीवाशिवा होऊं पाहे लग्न । मधुपर्क विधान शुद्धसत्वें केलें ॥७२॥
गुरुकृपा अरुणोदय होत । अज्ञानअंधावर जाय तेथ ॥ इंद्रियें विषयीं नियुक्त । ती उठूं पाहत निजबोधें ॥७३॥
कंठी अतिबाष्प दाटला । तेणें शब्दव्यवहार खुंटला । गदगदोनीरोमांचीत जाहला । सर्वांगीं चालिला स्वेद कंप ॥७४॥
अंतरीं हर्ष कोंदाटोनी । आनंदाश्रु लोटले नयनीं । स्फुदें सुखोर्मीच्या स्फुंदनी । हर्षे विव्हळोनी विधाता पै ॥७५॥
ते सत्त्वावस्था आवरोन । अंगींचा स्वेद परिमार्जूंन । ब्रह्मा सावधान होऊन । वंदी श्रीचरण नारायणाचें ॥७६॥


चतुःश्लोकी भागवत – नारायणाला नमन

अहंकारशून्य ब्रह्मदेवांचे नारायणाला नमन

जी परहंसप्रांजळे । योगवैराग्यज्ञानबळें । पाविजेती हरीचीं पादयुगुळें । तीं चरणकमळें वंदिली भावें ॥७७॥
जे वेदविवेकव्युत्पत्ती । जाणोनी सदभावें भक्ति करिती । ते भगवच्चरण पावती । ते प्रजापती वंदिता झाला ॥७८॥
हरिचरणद्वंद्वयुगुळें । वंदितांची भावबळें । निर्द्वंद्व करिती तात्काळें । ती चरणकमळें वंदिलीं ॥७९॥
हरिचरणपदद्वंद्व । वंदितां करी निर्द्वंद्व । यालागीं स्रष्टा स्वानंद । भगवत्पद स्वयें वंदी ॥८०॥
भावें वंदिता हरिचरण । जगाचा स्रष्टा झाला आपण । नकरवे ह्नणे सृष्टिसर्जंन । त्या जगाचें दर्शन विधाता देखे ॥८१॥
न रचितां भूतभौतिककोटी । स्रष्टा देखे सकळ सृष्टी । यालागीं विश्वदृकदृष्टी । ब्रह्मयाची नामाटी सत्यत्वा आली ॥८२॥
करितां हरिचरणीं नमन । विश्वद्रष्टा झाला आपण । विश्वदृक नामाभिधान । ब्रह्मयासी जाण याहेतू ॥८३॥
ब्रह्मा सद्भावें आपण । साष्टांग घाली लोटांगण । तो भाव देखोनी नारायण । स्वानंदें पूर्णं संतुष्टला ॥८४॥

ब्रह्मदेवाची पूर्णावस्था पाहून नारायणाचें त्याला आश्वासन

येऊनी ब्रह्मयाजवळी । कृपें अवलोकी वनमाळी । संतुष्ट होउनी त्याकाळीं । ह्नणें याची झाली परिपक्वदशा ॥८५॥
एवं करावया सृष्टिसर्जन । स्रष्टयासी स्वाधिकारीं पूर्णं । स्थापावया श्रीनारायण । आइका निजाश्वासन बोले तें ॥८६॥

भगवंताची वाणी म्हणजे दिव्यामृतधाराच ती !

ब्रह्मयाच्या प्रीती पावला । प्रियवंतापरिस प्रिय मानला । प्रीतीकरुनि करी धरिला । प्रियकर झाला परमेष्ठी ॥८७॥
जो शब्द बोलिला निःशद्वाचा । वाचिक विश्वतोमुखाचा । ज्याचेनी प्रकाशती चारी वाचा । तो वेदवाचा बोलता झाला ॥८८॥
तो शब्दांचें निजजीवन । ज्याचेनी वाचा दैदीप्यमान । तो स्वयें होऊनि भगवान । हास्यवदन करुनि बोलत ॥८९॥

श्रीभगवानुवाच

लहरी लोटली चित्सागरा । आनंदाचा सुटला झरा । सुख मेध गर्जे गंभीरगिरा । ऐशिया वरा रमाधव बोले ॥२९०॥
परमानंदाची आली भरणी । निजसुखाची उघडली खाणी । तेवीं मृदुमंजुळमधुरवाणी । सारंगपाणी बोलतसे ॥९१॥
तो स्वमुखें ह्नणे ब्रह्मयासी । सृष्टिसर्जनसामर्थ्यासी । तप केलें माझे आज्ञेसीं । तेणें मी संतोषी बहुत झालों ॥९२॥
जेवीं कां निजबाळ तान्हें । नाचोंलागे मातेच्यानी वचनें । तें देखोनियां पां नाचणें । सुखावें मनें माउली जैशी ॥९३॥
तेंवी ‘ तप ’ माझें वचन । ऐकोनी केलें अनुष्ठान । तेणें अनुष्ठानें मी आपण । जाणिजे संपूर्ण संतोषलों ॥९४॥जो मी तुझेनी तर्पें संतोषलों । प्रत्यक्ष तुजसी भेटलों । तो मी हदयस्थ दूर केलों । दुः प्राप्य जाहलों कूटयोगियां ॥९५॥

माझी प्राप्ति कोणाला होत नाही ?

जें विषय कल्पूनि चित्तीं । नाना तपें आचरती । त्यांसी नव्हे माझी प्राप्ती । जाण निश्चिती कूटयोगी ते ॥९६॥
ज्यां कनककांता आवडे चित्तीं । ज्यांसी लोकेषणेची आसक्ती । त्यांसी नव्हे माझी प्राप्ती । ते जाण निश्चिती कूटयोगी ॥९७॥
जो जग मानी अज्ञान । तेथें मी एकचि सज्ञान । तो कूट योगी संपूर्ण । कल्पांताही जाण नपवे मातें ॥९८॥
कूटऐसें देहातें ह्नणती । त्या देहाची ज्या आसक्ती । त्यासी कदा नव्हे माझी प्राप्ती । ते जाण निश्चितीं कूटयोगी ॥९९॥


चतुःश्लोकी भागवत – ब्रह्मदेवाला वर

नारायण ब्रह्मदेवाला वर देण्यास उद्युक्त

ऐसी कूटयोगियांची स्थिती । देव सांगतसे प्रजापती । तपें तुष्टला लक्ष्मीपती । होत वरदमूर्ती विधातया ॥३००॥
संतोषें श्रीनारायण । ब्रह्मयासी ह्नने आपण । जें अभीष्ट वांछी तुझें मन । तो वर संपूर्ण माग वेगी ॥१॥
वरांमाजीं वरिष्ठ । तुज जो वाटेल श्रेष्ठ । मागतां अतिउत्कृष्ट । तोही उदभट वर देईन मी ॥२॥

नाममहिमा

तंवचि प्राणी पावती श्रम । तंवचि देखती द्वंद्वविषम । तंवचि भोगिती मरणजन्म । जंव श्रद्धें हरिनाम नये वाचें ॥३॥
तंवचि द्वंद्वद्वेषखोडी । तंवचि विषयाची गोडी । तंवचि पापाची तया कोडी । जंव नाम अवघडी नये वाचें ॥४॥
तंवचि भवभय लागे पाठी । तंवचि मदमोह महाहटी । तंवचि अविद्या हे लाठी । जव मातें निजदृष्टि देखिलें नाही ॥५॥
तंवचि कामक्रोधाची गोष्टी । तंवचि कल्पना नांदे पोटीं । तंवचि अहंतेची दृढ गांठी । जंव मातें दृष्टी देखिलें नाहीं ॥६॥
सकळ आश्रमांची अवधी । प्राणियास दर्शनसिद्धि । मज देखिलिया त्रिशुद्धी । आ धव्याधि बांधूं नशके ॥७॥
माझें नाम नाशी दुःखकोटी । त्या मज देखिलिया निजदृष्टीं । संसार पळे उठाउठी । आश्रमाची गोष्ट उरे कोठें ॥८॥

नारायण उवाच

तुझिया परमहिताकारणें । माझी इच्छा वैकुंठ दावणें । यालागीं म्यां तुजकारणे । एकांती सांगें जाणे तई दीक्षा ॥९॥
परी त्या तपाचें तपासधन । भलें केलें तुवां अनुष्ठान । यालाग्रीं मी जाहलो प्रसन्न । वैकुंठदर्शन तुज देऊनी ॥३१०॥
कर्तव्याचें निजःकारण । तुज नकरवे सृष्टिसर्जन । त्या काळीं म्यां आपण । तप तप जाण उपदेशिलें ॥११॥
नकरवे सृष्टिसर्जन । कर्मनोहें तूं अतिअज्ञान । तेव्हांचि म्यां कृपपेनें तप तप संपूर्ण उपदेशिले ॥१२॥


चतुःश्लोकी भागवत – तपस्सामर्थ्य

तपस्सामर्थ्य

त्या तपाची जाण महादीप्ती । तपामाजीं परमशक्ती । तपें उपजे ज्ञानस्थिती । जाण निश्चिती विधात्या ॥१३॥
साधुनी अंतरंग तप । तपें पूर्णज्ञानस्वरुप । तपें होइजे सद्रूप । तपें निष्पाप झालासी तूं ॥१४॥
अस्तित्व निश्चयें पूर्ण । नित्य वाहे अंतः करण । यानांव गा तप जाण । शरीरशोषण नव्हे तप ॥१५॥
यापरी तप ज्ञानस्वरुप । ऐकें त्या तपाचा प्रताप । तपोबळें मी चिद्रुप । सृष्टी अमूप घडीं मोडी ॥१६॥
ज्ञानतपाची पाहा थोरी । तेणें तपेम मी श्रीहरी । सृष्टि सृजीं पाळीं संहारी । अंगींच्या अंगावरी अलिप्तणे ॥१७॥
ऐसें तपाचें वीर्य पूर्ण । नेणती देहाभिमान । यालागी त्यांसी तपाचरण । दुस्तर जाण परमेष्ठी ॥१८॥
ज्यासी विषयवासना संताप । त्यानीं नकळे तपाचें निजरुप । तें तूं आचरोनियां तप । होऊनि मातें आप पावलासी पैं ॥१९॥
ऐसें बोलिला नारायण । तेणें हरिखला चतुरानन । पाहोनियां हरीचे वंदन । काय आपण बोलत ॥३२०॥

ब्रह्मोवाच

ब्रह्मदेवाकडून नारायणस्तुति व निजज्ञानप्राप्तीची अपेक्षा

तूं सर्वभूतां अधिष्ठान् । भूतहदयस्थ सज्ञान । तुझेंनि बुद्धीसी जाणपण । तुझेंनि चेतन इंद्रियवर्ग ॥२१॥
तूं कर्माक्षक्ष तत्त्वतां । तेथें तूंचि कर्ता करविता । तरी ऐके माझी अवस्था । तुज मी अच्युता सांगेन ॥२२॥
ऐसा स्वामी विश्वनाथ । तूं अनाथांचा निजनाथ । मज करावें जी सनाथ । ऐसें प्रार्थित उचपतप्यमान ॥२३॥
कां ह्नणसी उपतप्यमान । मी केवळ जाहलों अज्ञान । त्या मजवरी कृपा करुन । निजगुहयज्ञान सांगावें पैं ॥२४॥
कोणतें ह्नणसी गुहयज्ञान । तुझें सूक्ष्मस्वरुप निर्गुंण । आणि स्थूल तेंही तूंचि आपण । हें अभेद निजज्ञान सांगिजे मज ॥२५॥
मी जडमूढ अतिदिन । तुझें नाम हें दीनोद्धरण । माझें समूळ निरसे अज्ञान । ऐसें गुहयज्ञान उपदेशी ॥२६॥
स्थूलसूक्ष्म तुझेंचि रुप । रुपीं वतोंनी तूं अरुप । हें तुझें ज्ञान निर्विकल्प । कृपानुरुप मज सांगे ॥२७॥
तूं चिन्मात्र मायायोगें । नहोऊनि जग होसी अंगें । ब्रह्मा विष्णु रुद्रादि वेगें । रुपें अनेगें तूं धरिसी ॥२८॥
नमोडतां सोनेपण । जेवीं लेणें होय सुवर्ण । तेवी सोडुनी पूर्णपण । जग संपूर्ण तूं होसी ॥२९॥
आपआपणावरी पाहे । उत्पत्ति स्थिती दाविसी लय । हे नानाशक्तिसमृदाय । सद्रॄपें स्वयें तूंचि होसी ॥३३०॥
ऐसें अलिप्तपणें क्रीडन । स्वयें क्रीडसी तूं आपण । त्या क्रीडनाचें लक्षण । ऐक सावधान दृष्टांतें येणें ॥३१॥
सकळसंकल्प तुझ्या पोटीं । तुज जंव सृष्टीची इच्छा उठी । तंव ब्रह्मांडांचिया कोटी । चराचर दाटी स्वेच्छें दाटे ॥३२॥
ऐसें संकल्पितसृष्टीसी । भूतभौतिकें तूंचि होसी । नानाअवताचरित्रेंसी । तुजमाजीं क्रीडसी तूंचि देवा ॥३३॥
जैसी कांतणी स्वेच्छेकरी । तंतु काढी मुखाबाहेरी । त्यावरीच स्वयें क्रीडा करी । परतोनी निजउदरीं सामावी ते ॥३४॥
तये कांतणीपरी ऐसी । तुझी क्रिया हषीकेशी । कल्पादि खेळ हा मांडिसी । खेळोनी ग्रासिसी कल्पांती तूं ॥३५॥
हात नमाखोनी विश्व रचिसी । अमायिकत्वें विश्व पाळिसी । ना नासितां हें सहारिसी । ऐसा होसी सत्संकल्प तूं ॥३६॥
ऐसा गुह्यज्ञाननिजठेवा । कृपा करुनियां मज द्यावा । येच विषयी हो माधवा । मज करावा पूर्णानुग्रह ॥३७॥
वर मागावया आज्ञा दिधली । यालागीं हे सलगी केली । सत्य करावी ते वरदबोली । सांभाळी आपुली भाक स्वामी ॥३८॥
मूळी वरं वरय भद्रं ते । ऐसें बोलिलें वर दहस्तें । तें सत्य करावें श्रीअनंतें । गौरवी मातें निजगुह्यज्ञातें ॥३९॥
वरदेश वदोनी जरी नदेसी । तरी काय करावें हषीकेशी । समर्थी वळावें निजभाकेसी । हेंचि आह्मांसी भांडवल पा ॥३४०॥
तूं सत्यसंकल्प भगवंत । तुझें वाक्य मिथ्या नव्हे येथ । येणें गुणें भावार्थ निश्चित । गुह्यज्ञानार्थ आह्मां सांगे ॥४१॥
भगवंता तूं ऐसे ह्नणसी । म्यां सृजूं सांगितलें सृष्टीसी । तें करुं काय भ्यालासी । यालागीं पुससी तत्त्वज्ञान ॥४२॥
किंवा सृष्टी सृजूं उद्वेगला । यालागीं गुह्यज्ञान पुसोंलागला । ह्नणसि आज्ञाउल्लंघू केला । येणें नसांडिला सृष्टिक्रम पैं ॥४३॥
तुवां सृष्टी सृजूं सांगीतली । तें अनालस्यें मीं रचियेली । परी निर्विघ्न पाहिजे निपजली । यालागीं वांछिली ज्ञानकृपा तुझी ॥४४॥
की देवां तूं ऐसें मानिसी । सृष्टी करीन ते ह्नणसी । आणि पुनः पुन्हा कां पुससी । गुह्यज्ञानांसी अत्यादर ॥४५॥

निजज्ञानामुळें देहाभिमान होणार नाहीं

तुझें पावोनी गुह्यज्ञान । सृष्टी रचीन मी निर्विघ्न । नपावतां तुझें ज्ञान पूर्ण । मानाभिमान मज बाधी ॥४६॥
तूं जवळी असतां नारायण । बाधूं नशके मानाभिमान । सृष्टी सृजतां तुज विसरेन । तेव्हां मानाभिमान बाधी कीं ॥४७॥
ह्नणसि कां होईल विस्मरण । अतर्क्य तुझें मायाविंदान । तें वाढवील देहाभिमान । तुझी आठवण नुरवुनी पैं ॥४८॥
जैसी दीपासी काजळी । तैसी तुझी माया तुजजवळी देहाभिमानें सदां सकळी । मजही झांकोळीं विषयासक्ती ॥४९॥
जे विषयाची अतिआसक्ती । तेचि मायेची दृढप्राप्ती । ते समूळ निरसे विषयासक्ती । ऐसी ज्ञानस्थिती उपदेशी ॥३५०॥
काजळी आली दीपापासी । तेंचि आलेपन दीपप्रकाशीं । तेवीं त्वन्माया तुजपासी । बांधी जगासी विषयासक्ती ॥५१॥
आतांचि मी स्वयें आपण । झालों होतों जडमूढदीन । तुवां उपदेशिलें तपसाधन । तेव्हां तुझें दर्शन मज जाहलें ॥५२॥
‘ तपतप ’ ह्नणतांही मजपासीं । त्या तुज न देखें मीं हषीकेशी । अभिमानें भुलविलीं ऐसीं । तुज हदयस्थासी न देखती ॥५३॥
ऐसा बाधक देहाभिमान । तो मायायोगें सबळ पूर्ण । ते मायेचें होय निर्दाळण । तैसें गुह्यज्ञान मज सांगे ॥५४॥
कर्माकर्मी तुझें स्मरण । असावें गा समसमान । करितां सृष्टिसर्जन । नबाधी अभिमान तेंचि सांगे ॥५५॥
अहंमद कां होईल म्हणसी । तुवां मज अहंकारियासी । सखा मानोनि सख्यासी । ऐसिये स्थितीसी आणिलें त्वां ॥५६॥
म्या प्रजासृष्टि करावी । तेथें माझी श्रद्धा रिघावी । यालागीं केली स्वभावी । निजगौरवीं मानेल पैं ॥५७॥
ऐसियावरी सृष्टि करितां । अहं स्वतंत्र प्रजा करिता । ऐसी माझे उत्कट अहंता । अंगीं तत्त्वतां वाढेल कीं ॥५८॥
श्रेष्ठापासुनी सन्मान । तोचि इतरांसी हदयाभिमान । तेणें धाकें कांपलें मन । तुज गुह्यज्ञान यालागींख पुसें ॥५९॥
तुझे आज्ञे उल्लंध नघडावा । यालागीं सृष्टिक्रम म्यां सृजावा । तोचि मानितां तुझी सेवा । अभिमान नीचनवा मजमाजी उठी ॥३६०॥
अभिमान यावयाचे काय कारण । सृजितां अधमोत्तमयोनीजन । मी सृष्टिकरिता तुजसमानं । अवश्य अभिमान येईल स्वामी ॥६१॥
वृत्ति करुनियां अविकळ । सृजितां भूतजात सकळ । तोचि अभिमानाचा जन्मकाळ । हें मज समूळ कळे देवा ॥६२॥
तो अभिमान मज न यावा । यालागीं प्रार्थितसें तुज देवा । आश्वासी पां ज्ञानगौरवा । श्रीवासुदेवा निजजनका ॥६३॥

स्तुतीनें नारायण संतुष्ट झाला

ऐकोनी ब्रह्मयाची विनवण । परम संतोषला नारायण । त्यासी द्यावया निजज्ञान । स्वानंदपूर्ण तुष्टला असे ॥६४॥
कोण्हाचें न लागतां मन । अनुष्ठित गुह्यज्ञान । ते द्यावया श्रीनारायण । स्वानंदें पूर्ण संतुष्टला ॥६५॥
करितां नानाकर्माचरण । निजांगीं नलागे कर्तेपण । ऐसें अलिप्तनिजज्ञान । द्यावया श्रीनारायण संतुष्टला ॥६६॥
देखोनी तेव्हां ब्रह्मयासी । अतिस्नेह भगवंतासी । निजज्ञानधन देतसे त्यासी । जन्मला कुशी ह्नणवूनियां ॥६७॥
जैसा दिपला हरिणा पुढें । पाहोंविसरला आणिकेकडे । तैसा आवडीच्यानि पडिपाडें । ब्रह्मयाकडे हरि पाहे ॥६८॥
कां चुंबकांचिया वाटा । लोह भंवे न लागतां झटा । तैसें झालें हो वैकुंठा । जिकडे पाहे स्रष्टा तिकडे देव ॥६९॥
जेवीं आदित्याची फुलझाडें । नित्य सन्मुख सूर्याकडे । तेवीं आवडीचेनि पडिपाडें । चतुर्मुखापुढें सन्मुख देखे ॥३७०॥
उफराटी हे चाली कैशी । शौरी भुलला श्रष्टयासी । येणें आवडलेपणें त्यासी । गुह्यज्ञानासी सांगेल पां ॥७१॥
सांगावया त्या गुह्यज्ञानवाव । स्वयें तुष्टला श्रीवासुदेव । येणें विरिंचीचा जीवभाव । स्वये स्वयमेव चमत्काराला ॥७२॥
पुढिले निरोपणीं आवडी । स्रष्टा उठिला धडफुडी । अवधानाची परवडी । निजनिवाडी थोरावली पैं ॥७३॥
देहावेगळें अंतः करण । करुनि निवडिलें अवधान । श्रवणीं एकाग्रता पूर्ण । स्वयें संपूर्ण सरसावला ॥७४॥
अष्ठदळें जैसी कमळे । तैसे टवकारिले आठही डोळे । चारीमुखें एकेवेळें । सप्रेममेळें लांचावलीं ॥७५॥
श्रीगुरुश्रीहरी तुष्टमान । देखोनि उठावले ते नयन । श्रवणापूर्वी आपण । दृश्यभेदाविण निजज्ञान सेवूं ॥७६॥
श्रवणीं ऐसें तें शुभाक्षर । आह्मीच सेऊं साचार । ऐसा दृष्टीचा चमत्कार । देखणेपणें द्वार श्रवणाचें व्यापी ॥७७॥
घ्राण म्हणे मी सवेगें । सुगंधवृत्तीसी धांवेन वेगें । श्रवणनयनांपुढें लगबगें । उभे स्वानंदयोगें सुखेसी पैं ॥७८॥
ऐकोनी सदगुरुच्या गुह्यज्ञाना । रसना विसरे विषयवासना । न चाखतां सदगुरुह्यज्ञाना । ब्रह्मरस रसना सेवं द्यावे ॥७९॥
स्पर्श पांगला शरीरपांगें । देहबुद्धीसी घालूनि मागें । स्पर्शावया लागवेगें । मी रिघेन सर्वांगें श्रीरंगसंगीं ॥३८०॥
धन्य धन्य श्रीगुरुसप्रेमज्ञान । बाहयांसी येतसे स्फुरण । खेंव द्यावया आपण । भुजाहि सच्चिद्धन आलिंगू पाहती ॥८१॥
ऐसा इंद्रियाचा विवाद । ऐकोनि शब्द जाहला निःशब्द । मौनें सेवावया परमानंद । हरिनामाचा छंद सर्वांगी गर्जे ॥८२॥
ऐसा सर्वांगीं परिपुरता । सर्वांगें जाहला धडौता । यापरी देखोनि विधाता । कळलें भगवंता परमार्थी ॥८३॥
श्रवणीं जें पडेल वचन । तें तत्काळचि होईल आपण । यालागीं निजगुह्यज्ञान । श्रीनारायण उपदेशी ॥८४॥


चतुःश्लोकी भागवत – ज्ञानाची व्याख्या

ज्ञान देण्याला अधिकारी कोण

ऐसा पुरता जो असेल । त्यासि सदगुरुज्ञान गवसेल । येर्‍हवीं आहाच बोलतां बोल । वाचेचें फोल करावें नलगे ॥८५॥
यालागीं श्रद्धाळू सात्विक । गुरुसेवेचा नीच सेवक । गुरु आज्ञेचा पाइक । तोचि निष्टंक ज्ञानार्थी ॥८६॥
जो वीतरागी सविवेक । जो सद्भावें विश्वासिक । जो लोकेषणें रहित रंक । तो निष्टंक ज्ञानार्थी ॥८७॥
विकल्पशून्य ज्यांचें मन । वासनारहित निजभजन । तो मुमुक्षांमाजी चिद्रत्न । अधिकारी पूर्ण ब्रह्मज्ञाना ॥८८॥
ऐशीं विवात्याची पूर्ण लक्षणें । निर्धारुनि श्रीनारायणें । त्यासि पूर्णब्रह्मनिरुपणें । ज्ञानार्थ परिसणें सावधान श्रोती ॥८९॥
हें कल्पादीचें जुनाट ज्ञान । वक्ता स्वयें श्रीनारायण । एका विनवी जनार्दन । श्रोतीं अवधान मज दीजे ॥३९०॥
जो ॐकाराचा तरुवरु । स्वानंद सुखाचा सागरु । सत्यसंकल्प सर्वेश्वरु । तो परात्परु स्वमुखें बोले ॥९१॥

ज्ञानाची व्याख्या

शास्त्रव्युत्पत्ती व्याख्यान । जालिया वेदांत श्रवण । त्यावरी उठी जें जाणपण । त्यानांव ज्ञान शास्त्रोक्त ॥९२॥
विषयवासनेविण । वृत्तीसी जें विवेकस्फुरण । त्यानांव बोलिजे ज्ञान । सत्य जाण स्वयंभू ॥९३॥
चिद्रूपें वृत्तीचें स्फुरण । तें जाणिवें नाकळे ज्ञान । तेंचि स्वयें होइजे आपण । त्यानांव विज्ञान विधातया ॥९४॥
हदयी जें आत्मपण । तें स्वयें होईजे आपण । जेथें हारपे देहाचें स्फुरण । तें सत्य विज्ञान विधातया ॥९५॥
जळी मीनलिया लवण । सर्वांगे विरे संपूर्ण । जळीचें हारपे क्षारपण । यापरी विज्ञान वस्तुत्वाचें ॥९६॥
देहीचें जाऊनि अहंपण । ‘ ब्रह्माहमस्मि स्फुरे स्फुरण । ते स्फूर्तिही विरे संपूर्ण । त्यानांव विज्ञान पूर्णत्वाचे ॥९७॥

ज्ञानप्राप्तीसाठीं अत्यावश्यक असणार्‍या भक्तीचीं लक्षणें

हे पावावया पूर्णप्राप्ती । भावें करावी भगवद्भक्ती । ते भक्तीची निजस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥९८॥
भगवद्भाव सर्वाभूती । यानांव मुख्य माझी भक्ती । हेंचि भजन ज्यासि अनहंकृती । विज्ञानप्राप्ती ते त्यासी ॥९९॥
हे भक्ती करी जो निजांगें । विज्ञान त्याच्या पायां लागे । ते भक्ती उपजे नेणें योगें । ते भक्तिचि अंगे हरी सांगे ॥४००॥
माझें नाम माझें स्मरण । माझी कथा माझें कीर्तन । माझ्या चरित्रांचें पठण । गुणवर्णन नित्य माझें ॥१॥
माझा जप माझें ध्यान । माझी पूजा माझें स्तवन । नित्य करितां माझें चिंतन । विषयध्यान विसरले ॥२॥
भक्तांचें विषयसेवन । तेंही करिती मदर्पण । यानांव भक्तीचीं अंगें जाण । स्वयें नारायण विधीसी सांगे ॥३॥
ज्ञान विज्ञान उत्तमभक्ती । सांग सांगेन तुजप्रती । कृपेनें तुष्टला कृपामूर्ती । धन्य प्रजापती निजभाग्यें ॥४॥
जगाचें गुह्य मी आपण । त्या गुह्याचें गुह्य संपूर्ण । पूर्ण गौप्याचें गुप्तघन । तुज मी सांगेन स्वयंभू ॥५॥
ऐसें गोप्याचें जें अति गोप्य । कोणा नाहीं सांगितलें अद्याप । माझें निजानंदनिजरुप । तुज मी सुखरुप सांगेन ॥६॥
कृपेनें तुष्टला जनार्दन । जीवीं जीव घालूं पाहे आपण । आकळावया ज्ञान विज्ञान । अनुग्रहपूर्ण आवडी करी ॥७॥
आवडीं सदगुरुनाथू । जंव मस्तकी न ठेवी हातू । तोंवरी शिष्याचा निजस्वार्थू । पूर्ण परमार्थू सिद्धी नपवे ॥८॥
यालागीं श्रीनारायण । वरदहस्ते संपूर्ण । अनुग्रही चतुरानन । तेंचि निरुपण श्रीशुक सांगे ॥९॥

नारायण म्हणाले ” माझ्या अनुग्रहानें तूं माझ्यासारखाच हो “

मी जेवढा जैसा तैसा । जग नहोऊनि जगत्वाऐंसा । ऐसा स्वरुपतेचा पूर्ण ठसा । तुज प्राप्त हो हे दशा अनुग्रहें माझ्या ॥४१०॥
सत्वगुणेंवीण सत्वस्थिती । जेणें करी धरी हरी त्रिजगती । परी आंगीं नलागे अहंकृती । हा भाव प्रजापती प्राप्त हो तुज ॥११॥
मी सगुण निर्गुण रुपें धरीं । परी न विकारें रुपाकारी । ये स्वरुपतेची निजथोरी । प्राप्त हो झडकरी विधात्या तुज ॥१२॥
रुपी असोनि अरुपता । गुणी वर्तोनि गुणातीतता । हे मदनुग्रहें पूर्णावस्था । पावसी तत्त्वतां परमेष्ठी तूं ॥१३॥
जेवी जळी असोनि गगन । बोलें हो नजाणे आपण । तेवीं माझें कर्माचरण । अकर्तात्मता पूर्ण परमात्मयोगें ॥१४॥
सृष्टिस्रजनालागी तत्त्वतां । सकळ कर्मी अकर्तात्मता । मदनुग्रहें पावसी विधाता । ह्नणोनि माथां ठेविला हात ॥१५॥
कृपा पद्महस्त ठेवितां माथां । ब्रह्मावबोध पावे विधाता । करस्पर्शे निवाला विधाता । तें सुख सांगतां सांगतां नुरे ॥१६॥
एवं स्वयंभू ऐशिया परी । संबोधूनि केला ब्रह्माधिकारी । हे जाणोनि आपली थोरी । पूर्णत्वाचा करी प्रबोध त्यासी ॥१७॥
सदगुरुनें अनुग्रहिल्यापाठीं । शिंष्याची स्वरुपी प्रवेशे दृष्टी । हें पुरुषोत्तम जाणोनि पोटीं । करसंपुटीं आश्वासिला ॥१८॥
विष्णुविरिचीसंवादकथन । कल्पादीचें जुनाट ज्ञान । तेथें श्रोती द्यावें अवधान । आनंदघन वोळला ॥१९॥
साचचि ब्रह्मा जन्मला पोटीं । यालागीं हरीशी कळवळ मोठी । गुह्यज्ञानाची गोड गोष्टी । उठाउठी हरी सांगें ॥४२०॥
पुत्र जाहला ब्रह्माधिकारी । येणें उल्हासे श्रीहरी । जें गुह्यज्ञान असे जिव्हारी । तें काढूनि बाहेरी सांगे तयासी ॥२१॥
विधात्यासि विचारितां । स्वयें देवचि माता पिता । तो उभयस्नेहो एकात्मता । निजगुह्य तत्त्वतां सांगेल त्यासी ॥२२॥
श्रीहरीस पुत्रस्नेह अमुप । त्यासि दाटूनि सांगे ‘ तप तप ’ । आपलें दाखवूनि निजरुप । ज्ञान निर्विकल्प आदरें सांगें ॥२३॥
पित्यानें जोडिलें जें वित्त । पुत्र अधिकारी होय तेथ । यालागी गुह्यज्ञान समस्त । देईल निश्चित विधातयासी ॥२४॥


चतुःश्लोकी भागवत – आत्मज्ञान

आत्मज्ञान चार श्लोकांत नारायणानें शब्दबद्ध केलें.

इतरासी ज्ञान सांगतां । अमूप वाढेल ग्रंथकथा । पुत्रस्नेहें कळवळोनि आतां । चौंश्लोकीं निजात्मता उपदेशी देवो ॥२५॥
यालागीं श्रोते सज्जन । धांवा पावा सावधान । कल्पादी जें पुरातन । अनादि ज्ञान हरी सांगें ॥२६॥
ज्ञानधन नारायण । देऊरिघे पुत्राकारणें । एका जनार्दनाचे तानें । विभागी परी नेणें वांटा मागों ॥२७॥
यालागीं श्रीजनार्दनें । मर्‍हाटी वाटा मजकारणें । दीधला ज्ञानें समसमानें । माउली जाणे कदां तान्हें न करी ॥२८॥

तें श्रीनाथांनी मराठींत रुपांतरित केलें

यालागीं संस्कृताचा ज्ञानार्थू । मर्‍हाटियामाजीं सांगतू । निडारिला घमघमितू । असे नांदतू परमानंदें ॥२९॥
पहातां चारी श्लोक नेमस्त । तेणें हाता चढे परमार्थ । थोडेनि जीडे निजस्वार्थ । संसाराचें खत समूळ फाटे ॥४३०॥
विषयाचें धरणें उठी । अहंकाराची विरे गांठी । हे चतुः श्लोकींची गोष्टी । सर्वथा धाकुटी ह्नणों नये ॥३१॥
हें चतुःश्लोकी भागवत । स्रष्टयाशी सांगे श्रीभगवंत । तेथें श्रोती व्हावें दत्तचित्त । श्रवणे परमार्थ जिवासी जोडे ॥३२॥
पुढील ज्ञान सांगावयासी । अनुग्रहिले विधातयासी । मग उल्हासें हषीकेशी । काय त्यापाशीं बोलत ॥३३॥

पूर्णबोधाचा ज्ञानोपदेश

जें समस्तज्ञानाची आदी । जें सृष्टिकर्माचेही आधीं । ते स्वरुप सांगेन त्रिशुद्धी । आइक सुबुद्धी विधातया ॥३४॥
जें निजज्ञानाचें निजमूळ । जें विज्ञानाचें परिपक्व फळ । जें स्वरुप शुद्ध केवळ । सांगेन अढळ आत्मभूतुज ॥३५॥
जें समस्त गुह्यांचें निजसार । जें प्रेमाचें निजभांडार । ज्याचा वेदशास्त्रां नकळे पार । ते परात्पर सांगेन ॥३६॥
जो आनंदाचा निजानंदू । जो बोधाचाही निजबोधू । जेंणें होय परमानंदू । तो पूर्णबोधू परियेसी विधातया ॥३७॥
जें सुखाचें परमसुख । जें अमृताचें निजपीयूष । जेणें निवारे जन्मदुःख । तें ब्रह्मतारक ऐक विधात्या ॥३८॥
जें मनें नाही देखिलें ॥ जें बुद्धीनें नाही ओळखिलें । तें निजस्वरुप आपुलें । सांगेन संचलें परमेष्ठी ॥३९॥
ज्यापूर्वी कोणी नाहीं । शेवट ठाई नपडे कांहीं । ऐसे स्वरुप जें कांहीं । तें सांगेन. पाही परमेष्ठी ॥४४०॥
मीचि एकू असुळ विसुळू । मीच एकू सकळीं सकळू । मीचि एकू सूक्ष्मस्थूळू । तें स्वरुप प्रांजळू परियेसी ॥४१॥

नारायण म्हणाले – ” सृष्टीपूर्वी मी स्वानंदस्थित होतों “

सृष्टिपूर्वी मी निजरुप । शुद्धब्रह्म निर्विकल्प । स्वानंदकंद स्वरुप । पूर्णत्वें पूर्ण अमूप मीचि स्वयें ॥४२॥
न पेरितां उंसाचीं कांडीं । रस नचाखतांही तोंडीं । जैशी आहे उंसाची गोडी । तेवीं स्वानंदस्थिती चोखडी पूर्वी माझी ॥४३॥
बोल नयेतां वाचे आंतू । बोलें न बोलतां ते मातू । ते कालींचा जैसा शद्वार्थू । तेवीं मी अच्युतू सृष्टिपूर्वी ॥४४॥
दृष्टी नरिघतां दृष्टीसी । भेटी नहोतां दृश्याती । ते देखणी स्थिती जैसी । तेवीं मी अच्युत सृष्टिपूर्वीं ॥४५॥
ननिफजतां निशाणासी । घावो नघालितां तयासी । ते त्या नादाची स्थिती जैशी । तेवीं मी हषीकेशी सृष्टिपूर्वी ॥४६॥
रसीं नयेतां रसत्वासी । रसनेनें नचाखतां त्यासी । तेच्या स्वादाची स्थिती जैशी । तेवी मी हषीकेशी सृष्टिपूर्वी ॥४७॥
स्त्रीपुरुषयोग जो बोधू । नहोतां रतीरमणसंबंधू । तेकाळीं जैसा असे आनंदू । तेवीं मी परमानंदू सृष्टिपूर्वी ॥४८॥
ननिपजतां चराचर । नहोतां धटमठादि आकार । गगन जैसें निर्विकार । तेवीं मी चिदंबर सृष्टिपूर्वी ॥४९॥
पूर्वी ह्नणावयाचें लक्षण । नसतां सत् असत् कारण । मी परमानंदें परिपूर्ण । या नांव जाण सृष्टिपूरी ॥४५०॥
सत म्हणिजे सूक्ष्ममूळ । असत् म्हणिजे नश्वरस्थूळ । या अतीत मी निर्मळ । या नांव केवळ सृष्टिपूर्वी ॥५१॥
सूक्ष्म स्थूळ माया घटी । माझ्या निजांगें जगवें उठी । माझे पूर्णत्वाचे पोटीं । भासली सृष्टी तेही मीचि ॥५२॥
सांजवेळें पडिला दोर । त्यातें म्हणती सर्प थोर । तेंवीं पूर्णब्रह्म परमेश्वर । त्या मातें संसार मानवी म्हणती ॥५३॥
भिंतीवेगळें चित्र नुठी । तेवीं मजवेगळी नदिसे सृष्टी । मी जगद्रूप जगजेठी । माझिया निजपुष्टी जगत्व जगा ॥५४॥
जगाचें जें नांवरुप । तो मी परमात्मा चित्स्वरुप । माझ्या निजांगाचें स्वरुप । तें विश्वरुप स्वयें भासे ॥५५॥
जेवीं सुवर्णाचें केलें लेंणें । तें सोन्यावेगळें होऊं नेणे ॥ तेवीं माझेनि पूर्णपणें । जगाचें नांदणें मद्रूपें नांदे ॥५६॥
गोडी तेचि साखर देख । तेवीं चिदात्मा मी तेचि हे लोक । जगासी मज वेगळिक । अणुमात्र देख असेना ॥५७॥
जेवीं सोनेंचि अलंकार । तेवीं संसार मी सर्वेश्वर । मजवेगळावेव्हार । नाहीं अणुमात्र भवभावा ॥५८॥
जेवीं तंतूवेगळा नव्हे पट । मृत्तिकेवेगळा नव्हे घट । अक्षरावेगळा नव्हे पाठ । तेवी मी चिद्रूपें प्रगट संसार भासे ॥५९॥
जो मी सृष्टिपूर्वी एकला । एकपणेंचि असें संचला । तो मी सृष्टी आकारें आकारला । परी दुजा नाहीं आला वटीं बीज जेवीं ॥४६०॥
जैशा वटाचिया पारंबिया । वटीं वटरुप निघालिया । तैसा मी संसारा यया । स्थूलसूक्ष्ममायाकारणरुपें ॥६१॥
पारंबिया नांवाच्या भिन्नता । हरवीचिना स्वस्वरुपता । तेवी स्थूलसूक्ष्म माया ह्नणतां । माझी चित्सत्ता मोडेना ॥६२॥
तेवीं जंगमस्थावरादि आकारें । अंडजस्वैदजादिसाकारें । सृष्टी भासली सृष्टयाकारें । जाण साचारें मद्रूप जग ॥६३॥
एवं मीचि मी सृष्टयाकारा । भूतभौतिकादिपसारा । विषम आकारविकारा । नाना कल्लोळ सागरामाजीं जैसे ॥६७॥
जें अद्वितीय अत्यंतिक । निर्विकल्प वस्तु एक । तेंचि केवी जालें अनेक । तदर्थीचा देख दृष्टांत दाखवूं ॥६८॥
पहातां जे गोडी उंसीं । तेचि गोडीं ओसंडे रसी । ते गोडी बांधयासी । गूळी गूळरुपें गुळासि झाली ॥६९॥
त्या स्वादाची साखर केली । तेचि गोडी नाबद जाली । ऐशी नानाकारें रुपा आली । परी गोडी ते संचली जैशी तैशी ॥४७०॥
तेवीं मी चिदूपें प्रबळ । स्वयें जालों सूक्ष्मस्थूळ । मायागुणें सृष्टी सकळ । चित्सत्ता केवळ मीचि भासें ॥७१॥
कां मृतिकेची गोकुळे केली । नानानामाकारें पूजिली । परी मृत्तिकेपणा नाही मुकली । तेवीं सृष्टी जाली मद्रूपें सकळ ॥७२॥
यापरी गा सृष्ट्याकारें । असिजे मीया श्रीधरें । तेचि सृष्टीनंतरें उरे । स्वरुप साचोकारें चिन्मात्र माझें ॥७३॥
जेवीं कां कुलालाचें चक्र । गरगरा भोवें चक्राकार । भंवोनि रहातां स्थिर । उरे पैं चक्र चक्ररुपें ॥७४॥
तेवीं नामरुप संबंध । जाऊनि भूतमौतिकभेद । अंती उरे मी परमानंद । स्वानंदकंद निजरुपें ॥७५॥
दोर भासला सर्पांकारु । सर्परुपें भासे दोरु । दोरी लोपल्या अजगरुं । अंतीं उरे दोरु दोररुपें ॥७६॥
जळींचिया जळगारा । भासती नानाकार अपारा । अंतीं विरोनियां साचारा । उरती त्या नीरा नीररुपें ॥७७॥
तेवी सृष्टीआदिमध्य अंतीं । मीच एक भासें चैतन्यमूर्ती । हें सत्य जाण प्रजापती । इतर उपपत्ती ते वावो ॥७८॥
जेवीं सुताचिये सुतगुंजे । आदिमध्यअंती नाहीं दुजे । तेवी म्यां एकले अधोक्षजें । सृष्टीचा होइजे आदिमध्यअंतू ॥७९॥
होकां ज्याचें नांव ह्नणती लुगडें । तें पाहों जातां सूतचि उघडें । तेवी जग पहातां धडफूडें । आद्यंती चोखडें निजरुप माझें ॥४८०॥
यालागीं सृष्टिआदी मीचि असें । सृष्टिरुपे मीचि भासें । अंतीं सृष्टिचेनि नाशें । म्यां उरिजे अविनाशें अच्युतानतें ॥८१॥


चतुःश्लोकी भागवत – माया

माया म्हणजे काय ?

हे माझिया स्वरुपाची स्थिती । सत्य सत्य यथानिगुती । तुवां माया पुशिली प्रजापती । तेही उपपत्ती ऐक सांगेन ॥८२॥
अथाऽऽत्ममायायोगेन । हा माताविषयिक प्रश्न । ब्रह्मेंन पुशिला आपण । तें मायेचें लक्षण सांगतां नये ॥८३॥
माया सत् ना असत् । शेखीं नव्हे सदसत् । माया मिथ्यत्वाचें मथित । जाण निश्चित विधातया ॥८४॥
सत् ह्नणों तरी जीत नसे । असत् ह्नणों तरी शस्त्रें ननासे । आधी असे पाठी नसे । ऐसें मढेंही नदिसे मायेचें डोळां ॥८५॥
माझे मायेचें निरुपण । वेद बोलो नशके आपण । लक्षितां मायेचें लक्षण । राहिलें सज्ञान आरोगूनि मुग ॥८६॥
माया वांझेचें लाडिके बाळ । माया गगनसुमनाची माळ । माया मृगजळाचें शीतळ जळ । माया तें केवळ गंधर्वनगर ॥८७॥
माया रज्जुसर्पांचें मृदु अंग । माया शुक्तिकारजताची सांग । माया आकाशीचे मर्गजलिंग । माया मत्त मातंग वोडंबरीचा ॥८८॥
माया स्वप्नीची सोनकेळी । माया आरशाची चाफकेळी । माया कमठघृताची पुतळी । माया मृगजळींची सोंवळी स्वयंपाकिण ॥८९॥
माया असत्याची निजमाये । माया बागुला प्रतिपाळी धाये । माया चित्रींची दीपप्राक्ष खाये । माया मुख्यत्वें राहे मिथ्यत्वापाशीं ॥४९०॥
ऐशिये मायेचें निरुपण । मी निरोपूं नशकें आपण । तरी तुझ्या प्रश्नालागी जाण । कांही उपलक्षण सांगेन ॥९१॥

मायेचें उपलक्षण कोणतें ?

मी परमात्मा जो आधिष्ठान । त्या मज सत्यार्थातें नदेखोन । जें जें देखिजे द्गैतभान । ते माया जाण विरिंची ॥९२॥
कनकबीज सेऊनि पुरें । तंव आपण आपणां विसरे । जें जें देखों लागे दुसरें । व्याघ्र वानरें ससे मासे ॥९३॥
तेवीं निजात्मयाचेनि विसरे । जें जें देखोंलागे दुसरें । ते माझी माया निजनिर्धारें ॥ जाण साचोकारें विधाल्या ॥९४॥
निजरुपें असतां दोरु । तो नदेखोनि ह्नणे सर्प थोरु । तेवी माझे मायेचा विकारु । नाथिला संसारु यापरी दावी ॥९५॥
गगनी चंद्र एक असे । तिमिरदृष्टिदोषें दुजा भासे । तेवी द्वैताचेनि अभासें । माया उल्हासे भवभावरुपें ॥९६॥
सूर्यउदयी जग प्रकाशें । अंधाच्या ठायी अंधकार दिसे । आत्मा न देखोनि तैसे । माया उल्हासे भवभावरुपें ॥९७॥
सूर्य जेव्हां न देखणें । तेव्हां तम वाढे प्रबळपणें । सूर्यं जे काळी देखणें । तेव्हां तमाचें जिणें नाहींचि होये ॥९८॥

माया कोठें असते व कोठें नसते ?

तेवी मज आत्म्याचें अदर्शन । तेंच मायेचें प्रबळपण । आपुल्या स्वरुपाचें विस्मरण । ते माया जाण विरिंची ॥९९॥
स्वरुप स्वयें आनंदघन । नित्यनिर्मम स्फुरण । तें स्वरुपी स्फुरे जें मीपण । तें जन्मस्थान मायेचें ॥५००॥
स्वरुपीं अभिमानाचें स्फुरण । ते माया मुख्यत्वें संपूर्णं । केवळ जें निरभिमान । तेथें माया जाण असेना ॥१॥
सत् असत् विवंचना । करितां माया नये अनुमाना । त्या मायेच्या निजलक्षणा । सांगेन चतुरानना तें ऐक ॥२॥
विषयविषयिक कल्पना । ते अविद्या जाण चतुरानना । अहमात्मैकभावना । ते जाण कमलासना सद्विद्या ॥३॥
विषयविषयिक कल्पना । त्या स्थूलमायेचे लक्षणा । निजात्मविषयी भावना । ते जाण चतुरानना मूळमाया ॥४॥
आपुली कल्पना विधातया । ते जाण मुख्यमाया । विद्याअविद्या दोन्ही या । विवंचिलिया वृत्तीच्या ॥५॥
जेथें विषयकल्पनेची वस्ती । तो आतुडला मायेचे हातीं । जो निर्विकल्प निश्चितीं । माया त्याप्रती असेना ॥६॥
जेशी छाया रुपापाशीं । नातळत वर्ते देहासरसी । ब्रह्मीं माया जाण तैशी । असे अहनिर्शी मिथ्यात्वें ॥७॥
सदा छाया सरशीं असतां । कोणी नकरी छायेची वार्ता । तेवीं जाणगा तत्त्वतां । मायेची वार्ता ब्रह्मीं नाहीं ॥८॥


चतुःश्लोकी भागवत – छाया माया

छाया व माया यांच्यांत साम्य

छाया कोठें असे कोठें नसे । धाली भुकेली ज्याची तो नपुसे । ब्रह्मीं मायेचें जाण तैसें । स्फुरणही नसे सत्यत्वें ॥९॥
माझी छाया मजसवें आहे । हेहि आठवण कवणा कल्पांतीं नोहे । यापरी ब्रह्माचे ठायी पाहे । स्फूर्तिही नसाहे मायेची ॥५१०॥

श्रीशुकउवाचः- आत्ममायामृते राजन्परस्यानुभवात्मनः ।

नघटेतार्थसंबंधः स्वप्नद्रष्टुरिवांजसा ॥१॥
बहुरुप इवाभाति मायया बहुरुपया ॥
रममाणौ गुणेष्वस्या ममाहमिति मन्यते ॥२॥
यहि वाव महिम्नि स्वे परस्मिन्कालमाययोः ।
रमेत गतसंमोहस्त्यक्त्वोदास्ते तदोभयम् ॥३॥
आत्मतत्त्वविशुध्यर्थं यदाह भगवानृतम् ॥
ब्रह्मणे दर्शयन् रुपमव्यलीकव्रतादृतः ॥४॥
सआदिदेवो जगतां परोगुरुः स्वधिष्ण्यमास्थाय सिसृक्षयेक्षत ॥
तां नाध्यगच्छदृशमत्रसंगतां प्रपंचनिर्माणविधिर्यथा भवेत् ॥५॥
स चिंतयत् द्वयक्षरमेकदांभस्युपाश्रृणोत् द्विर्गदितं वचो विभुः ।
स्पर्शेषु यत्षोडशमेकर्विशं निष्किंचनानां नृपयद्धनं विदुः ॥६॥
निशम्यतद्वक्तृदिदृक्षया दिशो विलोक्य तत्रान्यदपश्यमानः ।
स्वधिष्ण्यमास्थाय विमृश्य तद्धितं तपस्युपादिष्ट इवादधे मनः ॥७॥
दिव्यं सहस्त्राब्दममोघदर्शनो जितानिलात्मा विजितोभर्येद्रियः ॥
अतप्यतस्माखिललोकतापनं तपस्तपीयांस्तपतांसमाहितः ॥८॥
तस्मै स्वलोकं भगवान्सभाजितः संदर्शयामास परं न यत्परम् ।
व्यपेतसंक्लेशविमोहसाध्वसं स्वदृष्टवद्भिर्विबुधरैभिष्टुतम् ॥९॥
प्रवर्तते यत्र रजस्तमस्तयोः सत्त्वं च मिश्रं न च कालविक्रमः ।
न यत्र माया किमुतापरे हरेरनुवता यत्र सुरासुरार्चिताः ॥१०॥
श्यामावदाताः शतपत्रलोचनाः पिशंगवस्त्राः सुरुचः सुपेशसः ।
सर्वे चतुर्बाहव उन्मिषन्मणिप्रवेकनिष्काभरणाः सुवर्चसः ॥११॥
प्रवालवैडूर्यमृणालवर्चसः परिस्फुरत्कुंडलभौलिमालिनः ।
भ्राजिष्णुभिर्यः परितो विराजते लसद्विमानावलिभिर्महात्मनाम् ॥१२॥
विद्योतमानाः प्रमदोत्तमा द्युभिः सविद्युदभ्रावलिभिर्यथा नभः ।
श्रीर्यत्र रुपिण्यरुगाय पादयोः करोति मानं बहुधा विभूतिभिः ॥१३॥
प्रेंखं श्रिता या कुसुमाकरानुगैर्विगीयमाना प्रियकर्म गायती ।
ददर्श तत्राखिलसात्वतां पतिं श्रियः पतिं यज्ञपतिं जगत्पतिम् ॥१४॥
सुनंदनंदप्रबलार्हणादिभिः स्वपार्षदमुख्यैः परिसेवितं विभुम् ।
भृत्यप्रसादाभिमुखं दृगासवं प्रसन्नहासारुणलोचनाननम् ॥१५॥
किरीटिनं कुंडलिनं चतुर्भुजं पीतांबरं वक्षसि लक्षितं श्रिया ।
अध्यर्हणीयासनमास्थितं परं वृतं चतुः षोडशपंचशक्तिभिः ॥१६॥
युक्तं भगैः स्वैरितरत्र चाधृवैः स्व एव धामन् रममाणमीश्वरम् ।
तद्दर्शनाल्हादपरिप्लुंतांतरो हष्यत्तनुः प्रेमभराशुलोचनः ॥१७॥
ननाम पादाबुजमस्य विश्वस्रुग्यत्पारमहंस्येन पथाऽधिगम्यते ।
तं प्रीयमाणं समुपस्थितं तदा प्रजाविसर्गे निजशासनार्हणम् ॥१८॥
बभाष ईषतस्मितरोचिषा गिरा ।
प्रियः प्रियं प्रीतमनाः करे स्पृशन् ॥१९॥

श्रीभगवानुवाच

त्वयाऽहं तोषितः सम्यग्वेदर्भसिसृक्षया ।
चिरंभृतेन तपसा दुस्तोषः कूटयोगिनाम् ॥२०॥
वरं वरय भद्रं ते वरेशं माऽभिवांछितम् ।
ब्रह्मत्र्च्छ्रेयः परिश्रामः पुंसो मद्दर्शनावधिः ॥२१॥
मनीषितानुभावोऽयं मम लोकावलोकनम् ।
यदुपश्रुत्य रहसि चकर्थं परमं तपः ॥२२॥
प्रत्यादिष्टं मया तत्र त्वयि कर्मविमोहिते ।
तपो मे हदयं साक्षादात्माऽहं तपसोऽनघ ॥२३॥
स्रुजामि तपसैवेदं ग्रसामि तपसा पुनः ।
बिभर्सि तपसा विश्वं वीर्यं मे दुश्चरं तपः ॥२४॥

ब्रह्मोवाच –

भगवन् सर्वभूतानामध्यक्षोऽवस्थितो गुहाम् ।
वेद हयप्रतिरुद्धेन प्रज्ञानन चिकीर्षितम् ॥२५।
तथाऽपि नाथमानस्य नाथ नाथय नाथितम् ।
परावरे यथा रुपे जानीयां ते त्वरुपिणः ॥२६॥
यथाऽऽत्ममायायोगेन नानाशक्त्युपबृंहितम् ।
विलुंपन्विसृजन्गृण्हन्बिभ्रदात्मानमात्मना ॥२७॥
क्रीडस्यमोघसंकल्प ऊर्णनाभिर्यथोर्णुते ।
तथा तद्विषयां धेहि मनीषां मयि माधव ॥२८॥
भगवच्छिक्षितमहं करवाणि ह्यतंद्रितः ।
नेहमानः प्रजासर्गं बद्धयेयंयदनुग्रहात् ॥२९॥
यावत्सखा सख्यरिवेश ते कृतः प्रजाविसर्गे विभजामि भोजनम् ।
अविक्लवस्ते परिकर्मणि स्थितो मा मे समुन्नद्धमदोऽजमानिनः ॥३०॥
यंदघ्रिकमलद्वंद्वं द्वंद्वतापनिवारकं ॥ तारकं भवसिंधौ च श्रीगुरुं प्रणमाम्यहं ।
श्रीभगवानुवाच ॥ ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं ।
सरहस्यं तदंगं च गृहाण गदितं मया ॥१॥
यावानहं यथाभावो यद्रूपगुणकर्मकः ।
तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात् ॥२॥
अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं ।
पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम् ॥३॥
ऋतेऽथं तत्प्रतीयेत न प्रतीयेत चाऽऽत्मनि ।
तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः ॥४॥

निजछाया शस्त्रें नतुटे । पर्वतभारें कदा नदटे । काष्ठें कुटितां नकुटे । लोटितां न लोटे अणुमात्र ॥११॥
तेवीं निरसावया निजमाया । वाट नवले गा उपाया । ते उपाय येती अपाया । साधनीं माया ढळेना ॥१२॥
निजछाया तोडावया निवाडें । जें आणिजे त्यावरी छाया पडे । परी छाया तळी सांपडे । तें साधका नातुडे निजसाधनें ॥१३॥
छाया ज्याची त्यातळीं दडे । तेवीं ब्रह्मी माया समूळ उडे । माया दुजेपणें पहातां पुढें । अधिक वाढे अनिवार ॥१४॥
छाया जो धरुं पाहे पुढे । धरुं जातां अधिक वाढे । तेवीं माया साधनीं नातुडे । जाण फुडें परमेष्ठी ॥१५॥
तेवीं करावया मायानिरसन । साधन तितुकें मायिक जाण । जेणें होय मायेचें निर्दळण । तें साधका लक्षण लक्षेना ॥१६॥
लटिकपणे पहाता छाया । स्वयें लोपे लाजोनिया । तेवीं मिथ्यात्वें पाहतां माया । जाय हारपोनियां परब्रह्मी ॥१७॥
देह लक्षितां मिथ्या छाया । स्वरुप लक्षितां मिथ्या माया । हें सत्य जाण विधातया । छाया माया समान ॥१८॥


चतुःश्लोकी भागवत – मायेचा निरास

सदगुरुचरणसेवेनें मायेचा निरास होईल

एवं निजात्मप्राष्तीविण । नव्हे निजमायानिर्दळण । ते आत्मप्राप्तीलागीं जाण । सदगुरुचरण सेवावे ॥१९॥
सभ्दावें करितां गुरुभजन । गुरुभक्ताचे निजचरण । माया स्वयें वंदी आपण । माया निर्दळण गुरुदास्यें ॥५२०॥
एवं सदगुरुकृपेपुढें । माया मशक बापुडे । त्याच्या वचनार्थे सुरवाडें । मायाही रोकडें ब्रह्म होये ॥२१॥
जेवी उगवलिया सुभानु । अंधार होय प्रकाशघनु । तेवीं बोधा आलियां गुरुवचनु । माया परिपूर्ण ब्रह्म होय ॥२२॥
एवं आत्मयाचें निरुपण । उत्पत्तिस्थितिजनिधन । तुज म्या सांगितलें संपूर्ण । सत्य जाण स्वयंभू ॥२३॥
तंव श्रोते ह्नणती नवलावो । मायेचा अनिर्वाच्य भावो । तिचा साधूनी अभावो । ग्रंथान्वयो निर्वाळिला ॥२४॥
नसंडिता पदपदार्थां । मायानिरुपणाच्या अर्था । साधूनिया निश्चितार्था । यथार्थ ग्रंथा चालविलें ॥२५॥
तुझेनि मुखें श्रीजनार्दन । वक्ता जहाला संपूर्ण । हे आह्मासि पावली खुण । रसाळ निरुपण स्वानंदयुक्त ॥२६॥
बाप निरुपण सखोल । पेलत स्वानंदाचे पेल । येताति सुखाचे डोल । येकेक बोल ऐकतां ॥२७॥
येणें चतुः श्लोकींचेनि अर्थे । जें सुख जालें आमुतें । तें सुख सांगावया येथें । वाचाळपणातें वाचा विसरे ॥२८॥
चतुः श्लोकीचें गोष्टीसाठीं । वाचे पडिली वळवटी । स्वानंद नसमाये पोटीं । परमानंदें सृष्टी परिपूर्ण जाली ॥२९॥
हे ऐकोनि संतवचन । हर्षला एका जनार्दन । जेवों ऐकतां घनगर्जंन । स्वानंदपूर्ण मयूरासि उपजे ॥५३०॥
तेणें स्वानंदें पूर्ण । अभिवंदिले श्रोतेसज्जन । नमस्कारुनियां संतचरण । माझें विनवण अवधारा ॥३१॥
माझें हेंचि मनोगत । संतुष्ट व्हावे साधुसंत । यालागीं श्रीभागवत । आरंभिला ग्रंथ भावायेंसी ॥३२॥
ऐकोनियां वचनासी । साच देखोनि सद्भावासी । अतिसंतोष सज्जनांसी । रिझोनि ग्रंथार्थेसी बोलते जाले ॥३३॥


चतुःश्लोकी भागवत – ग्रंथाची स्तुति

श्रोत्यांकडून ग्रंथाची स्तुति

अगा तुझें एक एक अक्षर । क्षराक्षरातीत पर । येणें ग्रंथार्थें साचार । आम्ही अपार सुखी जालों ॥३४॥
देऊनि पदपदार्थाचा झाडा । करुनि श्लोकार्थ उघडा । बाह्यब्रह्मींचा निजनिवाडा । दाऊनि चोखडा रचिला ग्रंथू ॥३५॥
ग्रंथ स्वानुभवें रसाळ । आनंदरसें घोळिले बोल । परमानंदाचे कल्लोळ । ग्रंथार्थीं केवळ रुपासी आले ॥३६॥
ऐसे संतोषोनि सज्जन । स्वानंदें जाले तुष्टमान । तेणें सुखेंशी संपूर्ण । एकाजनार्दन ग्रंथासि वदवी ॥३७॥
स्वानंद वोसंडला ग्रंर्थीं । तेणें विराली ग्रंथार्थस्फुर्ती । दूरी ठेली श्लोकसंगती । क्षमा संतीं मज कीजे ॥३८॥
आतां पुढील निरुपण । भुतीं प्रविष्ट अप्रविष्टपण । स्वयें सांगे श्रीनारायण । सावधान अवधारा ॥३९॥

यथा महांति भूतानि भूतेषूच्चावचेष्णनु ।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्‍ ॥

जो मी परमात्मा हषीकेशी । न रिघोनि रिघालों सृष्टीसी । नातळोनि चाळीं जगासी । ते दृष्टांतेंसी स्थिती सांगों ॥५४०॥
येथें महाभूतें जैशीं । उंच्चनीय देहासरसीं । प्रवेशलीं दिसती कार्येंसी । कारणस्थितीसी अप्रविष्ट ॥४१॥
तैसा मीही याचि परिपाठीं । जगीं प्रवेशलों कर्यदृष्टी । कारणरुपें मीचि सृष्टी । मज प्रवेशावया शेवटीं ठावो कैंचा ॥४२॥
सागर पाहतां दृष्टीं । उठती कल्होळांच्या कोटी । तो सागरु कल्लोळाच्या पोटीं । केवीं उठाउठी समावे ॥४३॥
कार्यदृष्टीं पाहतां पाही । भूतें प्रवेशलीं माझ्या ठायीं । कारणत्वें भूतहदयीं । मी असोनि नाही प्रवेशलों ॥४४॥
यापरी मी सृष्टीसी । प्रवेशलों कार्यदृष्टीसी । कारणत्वें सृष्टीं मी आपैसी । मज प्रवेशासी भिन्नत्व नाहीं ॥४५॥
येथें कार्य ह्नणिजें तें कायें । औट हातामाजीं गवसूनि ठाये । मानी ‘ मी इतुकाचि आहे ’ । यानांव पाहे कार्य ह्नणिजे ॥४६॥
अद्वैती देखणें विषम । द्वैतबुद्धीचा दारुण भ्रम । सत्व मानी रुपनाम । कार्यसंभ्रम यानांवे ॥४७॥
देहांसी इंद्रियवृत्ती । चळती माझिया चिच्छक्ति । त्या मज चालकातें नेणती । हे देह अहंकृती यानांव कार्य ॥४८॥
कार्य ह्नणिजे तें ऐसे । कारण तूं ह्नणसी कैसें । जेणें मी निजात्मा दिसें । अद्वैतविन्यासें अप्रविष्ट ॥४९॥
व्याप्य मजवेगळें उरोंलाहे । मा मी व्यापकू व्यापूनि राहें । हे वार्ता मजमाजीं न साहे । जगद्रूप मी स्वयें चिदात्मा एक ॥५५०॥
कोटि घट प्रवेशतां गगनीं । गगन अप्रविष्ट घटीं प्रवेशोनी । तें जैसें स्वयें पूर्णपणीं । तेवीं मी जगीं पूर्णत्वें पूर्ण ॥५१॥
ह्नणशी तूं पूर्णत्वें एकवद । तर्‍ही पर्वत पाषाण कां स्तब्ध । वृक्षवल्ली इत्यादि मुग्ध । सज्ञानशुद्ध एक कां ह्नणसी ॥५२॥
अनेकीं एकत्व परिपूर्णं । तेचिअर्थाचें निरुपण । आतां ऐक सावधान । विरिंची तुज मी संपूर्ण सांगेन ॥५३॥
अग्नि सोज्वळ ज्वाळा दिसे । अथवा घूम्रांकित भासे । कां खदिरांगारीं उल्हासे । इत्यादि विलासें अग्नि तो येंकू ॥५४॥
आदळीं उठती खळाळ । वोघीं दिसे अतिचंचळ । डोहीं राहिलें निश्चळ । त्रिविधभेदें जळ एकचि जैसें ॥५५॥
घटमठादि महाकाश । इत्यादिभेदें एक आकाश । तेवौ विकाररुपें मी ईश । नांदें अविनाश अविकारित्वें ॥५६॥
यालाईं अप्रविष्टपणें संचलें । माझें मजवरी स्वयंभ रचिलें । जैसे अथावीं घट बुडविले । तेथें भरोनियां भरलें एकत्वें जल ॥५७॥
पोळीआंतील गव्हांशी । सबाह्याभ्यंतरी कणिक जैशी । तेवीं मी सृष्टिकार्यासी प्रवेशोनि पूर्णत्वेंसी अप्रविष्ट ॥५८॥
कार्यकारणविन्यासें । जग नांदे सावकाशें । तो जगद्रूप मीचि असें । सहज समरसें परमात्मा ॥५९॥
मजहूनि कांही वेगळे असे । मा मी जाऊंनि त्यांत प्रवेशें । अथवा नप्रवेशतु असें । सावकाशें वेगळा कीं ॥५६०॥
मेघमुखींची गार दुर्लभ । तीमाजी गोंठूनि जळथव । ते गारेतें निर्धारितां सर्व अंभ । तेवी जाणा स्वयंभ चित् स्वयें ॥६१॥
तेवीं जन तोचि जनार्दन । जनार्दंन स्वयें जन । ऐसा जनार्दन अभिन्न । जगीं प्रवेशोनि अप्रविष्ट ॥६२॥
ऐसें सावळेनि सुंदरें । बुद्धिबोध प्रबोधचंद्रें । सांगिलें ज्ञान नरेंद्रें । कृपा उपेद्रें प्रजापतीसी ॥६३॥
येथें सृष्टीची स्थिती ते ऐशी । मी जगद्रूप हषीकेशी । हेंही तूं जरी नकळे ह्नणसीं । तें प्राप्ति उपायाशी सांगेन ॥६४॥


चतुःश्लोकी भागवत – माझी प्राप्ति

मज जाणावयालागीं । अभिमानें कष्टले हठयोगीं । अहंतेनें नपावोनि माझी मार्गी । वंचले विभागी काळवंचनेच्या ॥६५॥
मज पावावयाकारणें । दाटोनि ते देहाभिमानें । स्वकर्मे शिखासूत्र त्यजणें । तें मज पावणें खुंटले त्यांचें ॥६६॥
नजिणतां कामक्रोधासी । एकाकी जाला संन्यासी । देहाभिमानें ग्रासिलें त्यासी । क्रोधलोभांसी स्वयें विकला ॥६७॥
संन्यासी स्वप्नी विषय देखे । तरी विरजाहोम केला हें लटिकें । तेणें अधोगती यथासुखें । विषयअभिलाखें आणिली घरां ॥६८॥
माझा निश्चयो नाहीं मनें । आह्मी सज्ञान ज्ञानाभिमानें । देह दंडितां पुरश्चरणें । क्रोधाचें नागवणें नागवी कामू ॥६९॥
मंत्राची बीजाक्षरें । चित्स्वरुपज्ञान गंभींरे । हें नेणोनी आपक निदसुरे । जपमाळाद्वारें भ्रमणीं पडिले ॥५७०॥
एकीं शाद्विकशास्त्रमूढीं । ज्ञातेपणाची उभविली गुडी । पडतां कामकोधांची धाडी । स्वयें चरफडी देहलोभें ॥७१॥
‘ शद्वादेवाऽपरोक्षधीः ’ । हे सत्य सच्छास्त्रोवती । शद्वी शब्दविद्या नेणती । यालागीं नपवती अपरोक्षसिद्धी ॥७२॥
सत्य कापुसाचीं वस्त्रें होतीं । परी कापूस नेणतां नागवे दिसती । तेवीं शद्वविज्ञानस्थिती । त्यां शाद्भिकां अंतीं अपरोक्ष कैचें ॥७३॥
चाटु नाना मधुररस वाढी । परी चाटु खातां नलभे गोडी । तेवीं शद्वें स्वानंदजोडी । चवी चोखडी शद्वी नाहीं ॥७४॥
या रितीं हे साधनधर्म । आचरतां नाना कर्म । माझे प्राप्तीचे निजवर्म । नेणती संभ्रम देहाभिमानी ॥७५॥
माझी पावावया निजप्राप्ती । अन्वयें करावी माझी भक्ती । व्यतिरेकें माझी स्वरुपस्थिती । सांगेन तुजप्रती गुह्य माझें ॥७६॥
तत्त्वजिज्ञासीं तत्त्वज्ञानें । अन्वयें सर्वत्र मज भजणें । व्यतिरेकें मज जाणणे । अविकारपणें तें ऐक ॥७७॥
सृष्टि आदि मी स्वयंभू असें । सृष्टिरुपें मी स्वयें आभासें । सृष्टीचे निःशेष नाशें । म्यां उरिजे अविनाशें अविकारित्वें ॥७८॥
अन्वय जाणणें जयातें । वस्तूपासोनि तत्वें समस्तें । उपजती तद्रूप निश्चितें । कार्यकारणत्वें अभिन्न ॥७९॥
श्वानारुढ खंडेरावो । सुवर्णाचा करविला पहाहो । तेथें पहातां श्वान आणि देवो । सुवर्णान्वयें अभिन्न ॥५८०॥
जेवीं तांब्याचा केला नाग । फणा पुच्छ मध्यभाग । पहातां तांबेंचि सर्वांग । तेवीं अन्वयें जग मद्रूप सर्व ॥८१॥
पेरिजे उंसाचीं पेरीं बरवीं । ते ऊंसपणें विरुढें हिरवीं । कांडोकांडीं निजस्वभावीं । वाढती आघवी ऊंसरुप ॥८२॥
तेवीं वस्तूपासोनियां जाण । माया महत्तत्व चिदघन । भूतें भौतिकें चिद्रूप पूर्ण । हें अन्वयलक्षण विरंची ॥८३॥
जेवीं घृताचिया कणिका । घृतेंशी नव्हती आणिका । तेवीं भूता आणि भौतिका । वेगळीक देखा मजसी नाहीं ॥८४॥

भगवदभक्तीनेंच माझी प्राप्ति

ऐशिया अन्वयस्थिती । भावें करितां भगवद्भक्ती । मी परमात्मा सर्वभूती । भजतां माजी प्राप्ती मद्भक्तां सुगम ॥८५॥
सर्वभूतीं भगवद्भजन । हें अंतरींचें गुह्य साधन । तो मज पढियंता संपूर्ण । जो भूतें चिदघन सदा देखे ॥८६॥
जो भूतें देखे चैतन्यघन । त्यासि मी परमात्मा आपण । जिवें करीं निंबलोण । त्याहूनि आन मज प्रिय नाहीं ॥८७॥
तो जेऊती वास पाहे । तो तो पदार्थ मी होतु जाये । तो जेथें जेथें ठेवी पाये । ते धरा मी होये धरणीधरु ॥८८॥

अन्वयभक्तीचें महिमान

अन्वयस्थितीच्या भक्तिपरतें । मज आन नाहीं पढियेतें । मजवेगळें नदेखे आपणातें । मद्रूप जगातें चिदन्वयें देखे ॥८९॥
नंद यशोदा श्रीकृष्ण । गोकुळें तीं मृत्तिका पूर्ण । तेवीं नामरुपविकारगुण । जग संपूर्ण चिन्मात्र ॥५९०॥
जें जें तत्त्व उपजे जाण । मायामहत्तत्वादि तिन्ही गुण । तें तें देखिजे चैतन्यघन । अन्वयभजन यानांव ॥९१॥
ऐशियापरी भगवद्भजन । सभाग्य पावती सज्ञान । ते भक्तिलागीं मी आपण । श्रीनारायण स्वयें विकलों ॥९२॥
ऐसें निःसीम ज्यांचें भजन । ते भक्त मजही पूज्य पूर्ण । श्रीसमवेत मीं आपण । त्यांचे श्रीचरण स्वयें वंदी ॥९३॥
माझिया भक्तांची महती । मी स्वयें जाणें श्रीपती । कां जे माझिये भक्तीची पूर्णप्राप्ती । भक्त जाणती भावार्थी ॥९४॥
ऐसिया अन्वयप्रतीतीकरी । भक्त समावले मजभीतरीं । मीही अनन्य आवडीकरी । भक्तसबाह्याभ्यंतरी स्वानंदें नांदें ॥९५॥
अन्वयें जें अवलोकन । या पदाच्या पोटीं भगवद्भजन । स्वयें बोलिला श्रीनारायण । तेंचि म्यां व्याख्यान सविस्तर केलें ॥९६॥
मागा स्वमुखें श्रीपती । बोलिला होता ब्रह्मयाप्रती । सांग सांगेन भगवद्भक्ती । तेचि ये श्लोकार्थी विशद केली ॥९७॥
तत्त्वजिज्ञासुलागीं जाण । स्वरुपप्राप्तीचें निजसाधन । देवो बोलिला भगवद्भजन । तेंचि निरुपण म्यां प्रगट केलें ॥९८॥


चतुःश्लोकी भागवत – व्यतिरेकाचें लक्षण

ऐसिया अन्यभक्ती । अतिसुगम माझी प्राप्ती । आतां व्यतिरेकाची स्थिती । ऐक प्रजापती सांगेन ॥९९॥
कारणापासोनि कार्य अभिन्न । या नांव, अन्वय जाण । कार्य मिथ्या सत्य कारण । तें व्यतिरेक लक्षण विधातया ऐक ॥६००॥
दोरा अंगीं सर्पांकारु । भासोनि निमाला भयंकरु । तो नातळतां सर्पविकारु । दोरु तो दोरु जैसा तैसा ॥१॥
तेवीं जगाची उत्पत्ति स्थिती । लय पावती प्रळयांतीं । माझिया स्वरुपाप्रती । विकारवदंती असेना ॥२॥
सुवर्णाचें अलंकार । जेवीं करविले नानाप्रकार । मोडूनि करिता एकाकार । निखळ भांगार घड मोडीरहित ॥३॥
तेवीं प्रपंचाची घडमोडी । माझिया स्वरुपी नलगे वोढी । संचली निजानंदगोडी । व्यतिरेक परवडी यानांव विधातया ॥४॥
लेणें घडितां सोनें नघडे । लेणें मोडितां सोनें नमोडे । तेवीं माझ्या स्वरुपाकडे । नपडे सांकडें प्रपंचाचें ॥५॥
स्वरुपीं स्वरुपस्थिती पाहतां । प्रपंच येक झाला होता । तो लया गेला काळसत्तां । हे कथावार्ता असेना ॥६॥
माया महत्तत्व तिन्हीगुण । भूत भौतिकादि जन्मनिधन । होतां नमोडे पूर्णपण । हें मुख्य लक्षण व्यतिरेकाचें ॥७॥
आणीकही साधारण । स्थल व्यतिरेकलक्षण । भूतीं भूतें होती लीन । सकारण तें ऐका ॥८॥
ज्याचें जेथोनि जन्मस्थान । तें भूत तेथें होय लीन । हें महाभूत परी लीन । होय सकारण महाकारणी ॥९॥
प्रथम गंधु दुसरा स्वादू । रुप स्पर्श पांचवा शब्दू । हा परस्परें उपमर्दू । होय निर्द्वद्व कारणामाजी ॥६१०॥
तें कारणही आपण । महाकारणी होय लीन । तेव्हां दुजें ना एकपण । स्वरुप परिपूर्णं पूर्णत्वें ॥११॥
त्या परिपूर्ण स्वरुपासी । प्रपंच जडला दिसे अंगेंसी । तो ठाउका नाही त्यासी । जेवीं शुक्तिकेसी रजताकारु ॥१२॥
शिंप शिंपपणें असे । भ्रांतासि तेथें रुपें दिसें । तेवीं वस्तुपणें वस्तु असे । प्रपंच भासे जड मूढां ॥१३॥
वस्तू परमानंदें शुद्ध बुद्ध । तेथें अविवेकी अतिमंद । देखती भूतभौतिकादि भेद । जेवीं कां अगाध गंधर्वनगर ॥१४॥
यापरी मिथ्या मायिक संसार । वस्तु नित्यानंद निर्विकार । हा व्यतिरेक शुद्ध सादर । जाण साचार परमेष्ठी ॥१५॥
प्रपंच एक झाला होता । हे स्वरुपी मिथ्या वार्ता । पुढें होईल मागुता । हेंही सर्वथा असेना ॥१६॥
ऐसा लक्षितां व्यतिरेक । जगीं मी एकुला एक । या एकपणचा गणक । नाहीं आणिक गणावया ॥१७॥
आहाचवाहाच विचारितां । हा व्यतिरेक न ये हातां । गुरुकृपेवीण तत्त्वतां । येथिच्या अर्था प्राप्ती नव्हिजे ॥१८॥
अन्वय माझी पूर्ण भक्ती । व्यतिरेक शुद्ध स्वरुपस्थिती । साधक जे स्वयें साधिती । त्यांसी स्वरुपप्राप्ती अविनाशी ॥१९॥
येणें अन्वयव्यतिरेकें पाही । निजात्मता ठेविल्या ठायी । तिसी प्रळयकाळें कहीं । व्ययो नाहीं विधातया ॥६२०॥
अन्वयव्यतिरेकाचें सूत्र । साधूनि साधक पवित्र । स्वयें जाले वस्तु चिन्मात्र । सर्वदा सर्वत्र अविनाश ॥२१॥
एवं अन्वयव्यतिरेकयुक्तें । साधनमहाराजपंथें । विसरोनि वेगळेपणातें । मदैक्यातें साधक येती ॥२२॥
‘ ऐक्या येती ’ हें बोलणें । बोलतां दिसे लाजिरवाणें । तें सर्वदां माझेनि पूर्णपणे । परिपूर्ण असणें स्वानंदे ॥२३॥
येणें पूर्ण परमानंदे । जीवभाव स्वयें उपमदें । लाजोनियां निमिजे भेदें । स्वानंदबोधें निजयोगी ॥२४॥
सिंधूमाजीं सैधवाचा खडा । पडोनि होय सिंधुएवढा । तेवींचि अन्वयव्यतिरेकें होडा । योगी धडफुडा मीचि होये ॥२५॥
जैसा कल्लोळ सागरीं । तैसा योगी मजमाझारीं । वर्ततांही देहाकारीं । मज बाहेरी रिघों नेणें ॥२६॥
हे ऐक्ययेती योगयुक्ती । वेदशास्त्रां संमती । तुवां अनुष्ठावी सुनिश्चिती । हें माझें हग्दती अतिगुह्य ॥२७॥
ऐसें गुह्यज्ञान पुरुषोत्तमें । निष्कामकामकल्पद्रुमें । स्वमुखें सांगिजे आत्मारामें । कृपासंभ्रमें स्वयंभूसी ॥२८॥
ह्या परमगुह्यज्ञानार्था । म्या सांगितलें निजात्ममता । येणें मतें समस्ता । सृजी मी अलिप्तता ब्रह्मांड कोटी ॥२९॥
मी अव्यक्तपणें व्यक्तीतें घरीं । मी निर्गुणपणें गुणकार्य करीं । मी निः संग येणें मतें करीं । अंगावरी जग व्यालो ॥६३०॥
नवल या मताची मातू । मी निजांगेंवीण जग होतू । अव्यक्तही व्यक्तिआंतू । न रिघोनि रिघें ॥३१॥
या मताचेनि निजनेटें । मी निजनेटें । मी नामरुपीं अवघा वेठें । परी नांवरुपाआंतुवटें । आणुमात्र नपालटें स्वरुप माझें ॥३२॥
येणें मतें मी महाशून्य जालों । शून्यस्वरुपेंसी आकारलों । अतींद्रिय इंद्रियें व्यालों । विऊनि ठेलों वांझोटा मी ॥३३॥
मी विदेहपणें देह धरी । मी अचक्षुपणें डोळे धरीं । मी अकर्ता सर्व कर्मे करी । या मतमुद्रेवरी विरिंची ॥३४॥
मज अश्रोत्रा येणें श्रवण । मज अगोत्रा येणें गोत्रपण । मज अघ्राणया येणें घ्राण । मज अचळा चळपण या मतमुद्रा ॥३५॥
मज निरसा येणें रसन । मज अभोक्त्या येणें भोजन । मज निः – शब्दा येणें गायन । मज अमना मन येणें कल्पनारहित ॥३६॥
मी अजन्मा येणें नाम घरी । या मताची थोरी माझी मीचि जाणें ॥३७॥
मज अबाहूसि येणें हस्त । मज अचरणा येणें चरण होत । मज अगम्या गमन होत । आप आपल्यांत येणें मतमुद्रा ॥३८॥
या मतयुक्तीचेंनि समसाम्यें । मी न जन्मोनिं जन्में । तिर्यग्योनी मत्स्यशूकरांदिकूर्मे । हे अवतार संभ्रमें पुराणीं वणिजे ॥३९॥
या मताचेंनि निजबळें । माया आपधाकें पळे । द्वैत निर्दाळितां या मताभिमेळें । मी अकळ आकळे या मतामाजी ॥६४०॥
नवल या मताचा परिपाकु । मी एकचि होये अनेकु । अनेकीं मी येकला येकू । हा मतविवेकू अतर्क्य ॥४१॥


चतुःश्लोकी भागवत – मताचें सामर्थ्य

या मताचें सामर्थ्य

अभिनव या मताची थोरी । मी एक विस्तारें नानापरी । परी एकपणाच्या अंगावरी । नाहीं दुसरी चीर गेली ॥४२॥
या मताचेनि महायोगें । निजले ठायीं मी जागें । जागाही निजें, निजोनि जागें । यापरी दाटुगें मत हें माझें ॥४३॥

हें मत कशानेंहि प्राप्त होत नाहीं

हें मत नातुडे अष्टांग योगें । हें मत नातुडे महायोगें । हें मत नातुडे स्वर्गभोगें । शिखात्यागे नातुडे मत ॥४४॥
हें मत नातुडे तपें । हें मत नातुडे मंत्रजपें । हें मत नातुडे दिगंबररुपें । शास्त्रपाठें आटोपें नव्हे तैसें ॥४५॥
हें मत नाटोपे वेदाध्ययनें । हें मत नाटोपे महाव्याख्यानें । हें मत नाटोपे महादानें । बैसतां धरणें नाटोपे मत ॥४६॥
हें मत नाटोपे स्वधर्माचारें । हें मत नाटोपे बहुधा विचारें । हें नाटोपे तीर्थसंभारें । मतमतांतरें नाटोपे हें ॥४७॥
हे मत नाटोपे पढणी पढतां । हें मत नाटोपे त्रिवेणीं बुडतां । हें मत नाटोपे थोरें रडतां । जाणिवा चरफडितां नाटोपे हें ॥४८॥
हे मत नाटोपे वेदविधी । हे मत नाटोपे अष्टमहासिद्धी । हे मत नातुडे नानाछंदी । हे जीवबुद्धीसी नाटोपे ॥४९॥
हे मत नाटोपे ध्येयध्यानें । हें नाटोपे दृढमौनें । हें मत नातुडे अनुष्ठानें । ज्याचें देखणें तोचि जाणें ॥६५०॥
हें मत नातुडे घराचारीं । हें नातुडे आश्रमांतरीं । हें नातुडे गिरिगव्हरीं । रिघतां कंदरीं नातुडे मत हें ॥५१॥
हें मत नातुडे सिद्धीसाठीं । हें मत नातुडे करितां गोष्टी । हे मत नातुडे कपिलपीठीं । भेददृष्टी नाटोपे ॥५२॥
हें मत नातुडे तीर्थवासी । हें नातुडे क्षेत्रसंन्यासी । हे नातुडे वैराग्यासी । कामक्रोधासी न जिंकिता ॥५३॥
हें मत नातुडें प्रयाग स्नानी । हें नातुडे महास्मशानीं । हें नातुडे गयावर्जनीं । कष्टतां त्रिभुवनी नातुडे मत ॥५४॥
हें नातुडे पृथिवी फिरतां । हें नातुडे तीर्थे करितां । हे नातुडे ध्यान धरितां । साधनीं सर्वथा नातुडे हें ॥५५॥
हें मत नातुडे कथा ऐकतां । हें नातुडे कथा करितां । हें नातुडे शास्त्रार्था । गुरुकृपेवीण हातां नये हें मत ॥५६॥

गुरुकृपेनेंच फक्त हें ‘ मत ’ लाभते

हे मत नातुडे क्षीरसागरीं । हें मत नातुडे वैकुंठशिखरीं । हे मत नातुडे सगुणसाक्षात्कारी । साम्यसमाधीवरी गुरुकृपें लाभे ॥५७॥
विवेकवैराग्य यथाविधी । विषयविरक्ती निरवधीं । सर्वत्र होय समबुद्धी । तें गुरुकृपा प्रबोधी हे मतसिद्धी माझी ॥५८॥
विवेकाचें निजनेटीं । धडधडीत वैराग्य उठी । विषयाची काढुनीं कांटी । समाधिदृष्टी समसाम्य प्रगटे ॥५९॥
ऐशी सर्वत्र समबुद्धी । या नांव परमसमाधी । ते समाधीवरी त्रिशुद्धी । माझ्या मताची सिद्धी गुरुकृपा लाभे ॥६६०॥


चतुःश्लोकी भागवत – समाधि

समाधि म्हणजे काय ?

सर्वत्र जे समसाम्यता । यानांव समाधी तत्त्वतां । परी तटस्यादि काष्ठावस्था । समाधि सर्वथा नव्हे ब्रह्मा ॥६१॥
समाधिमाजी जो तटस्थ । तो जाणावा वृत्तियुक्त । वृत्ति असतां समाधिस्थ । तें मी अनंत सत्य नमनी ॥६२॥
मूर्छित वृत्ति असतां पोटीं । समाधि ह्नणणें गोष्ट खोटी । जेथ अहं सोहं विराल्या गांठी । ते समाधि गोमटी मी मस्तकी वंदीं ॥६३॥
ज्वर असता नाडी आंत । आरोग्य स्नान तोचि घात । तेवीं वृत्ती असतां, समाधिस्थ । तो जाण निश्चित आत्मघाती ॥६४॥
सर्वभूती निजात्मता । तिसी पावोनि जाली सर्व समता । ते बोलतीचालती समाधिअवस्था । मजही सर्वथा मानिली ॥६५॥
ऐसी सर्वत्र समताबुद्धी । त्या नांव परसमाधी । ते म्यां तुज गुरुकृपें त्रिशुद्धी । यथाविधी प्रबोधिली ॥‍६६॥
या समाधीच्या समदृष्टीं । संकल्पें सृजी ब्रह्मांडकोटी । विकल्पें संहारितां शेवटी । कर्तेपण पोटी उठोंविसरे ॥६७॥
निजसमाधी समसाम्यता । देखोनि पळाली देहअहंता । तेथ मी एक सृष्टीचा कर्ता । या स्फुरणाची वार्ता स्फुतें केला हों ? ॥६८॥
सिंधुमाजी पडिलें सैधव घन । विरे तंव स्फुरे रवेपण । तें विरालिया संपूर्ण । ‘ मी झालों जीवन ’ हेंहि नराहे ॥६९॥
तेवीं मज एक होती बद्धता । आतां पावलों मुक्तता । येहिविषींची कथावार्ता । तुज सर्वथा स्फुरेना ॥६७०॥
ऐशीया पूर्णसमता । सृष्टी तुज करितां हरितां । आंगीं नलागे मोहममता । सत्य सर्वथा स्वयंभू ॥७१॥
देशकालेंस्वभावता कल्पविकल्पमहाकल्पांता । सृष्टिसर्जनाची मोहममता । तुज सर्वथा बाधीना ॥७२॥
हें मी तुज सांगों काये । अनुभव तूंचि पाहे । जें तुज पूर्णत्व प्रकाशिलें आहे । तेथें होय नव्हे रिघेना ॥७३॥


चतुःश्लोकी भागवत – अहंकारशून्य

ब्रह्मदेव अहंकारशून्य पूर्णबोधयुक्त झाला

रोग गेलियाची लक्षणें । रोगी नेणे, वैद्य जाणे । तेवीं ब्रह्मा सांडिला अभिमानें । हें नारायणें जाणितले ॥७४॥
लक्ष भेदितां धनुर्धरें । जेवी कां निविजे निजकरें । तेवीं ब्रह्मा निवटला अहंकारें । हें स्वयें श्रीधरें जाणितलें ॥७५॥
जें बोधा आले शिष्यासी । तें नसांगतां कळे श्रीगुरुसी । तेवी जाणोनियां हषीकेशी । ह्नणे ब्रह्मयासी सावधान ॥७६॥
‘ निजानुभव पाहे पूर्ण । ’ ऐसें ऐकतां सदगुरुवचन । चमत्कारला चतुरानन । देहीं देहपण विदेहत्वा आलें ॥७७॥
जीवदशा वोवांडितां । निजात्मता पावोंजातां । ते संधीं सत्वावस्था । अतिसप्रेमता वोसंडे ॥७८॥
निजात्मरुपीं पडतां दृष्टी । सुखाचा पुर लोटे पोटीं । हर्षे बाष्प दाटे कंठीं । परेंसी गोष्टी सदगदित वाचा ॥७९॥
नेत्रीं आनंदाश्रूचिया धारा । सुखोमीं कांपे थरथरां । हर्षे उचलल्या रोममुद्रा । स्वेदामृतपुरा सार्द्रत्व ॥६८०॥
अहं सोहं जाले लीन । मनें मन झालें उन्मन । चित्त जालें चैतन्यघन । जीव परिपूर्ण ब्रह्म जाला ॥८१॥
जेथें एक ना दुसरें । सन्मुख ना पाठिमोरें । जें जागें ना निदसुरें । जें सहजान्वयें खरें सदोदित ॥८२॥
जे केलें ना झालें । जें गेलें ना आलें । जें होतें ना हरपलें । संपूर्णत्वें संचलें परिपूर्ण ॥८३॥
जेथें न साहे रुपनाम । जेथें नसाहे क्रियाकर्म । जेथें न रिघे धर्माधर्म । तें पूर्णब्रह्म परमेष्ठी झाला ॥८४॥
जेथें न रिघे हेतूमातू । जेथें न रिघे दृश्य दृष्टांतु । जिचा नसे आदिअंतू । ते वस्तु सदोदितू विरंची झाला ॥८५॥
ज्याचा न लागे लागमाग । ज्यासि न लगे अवयव अंग । आंगेंवीण अव्यंग । निजवस्तु सांग स्वयंभु झाला ॥८६॥
जेथें दुःखत्वें नरिघे दुःख । सुखत्वें नरिघे सुख । जिचें हरिहरां न करवे तुक । ते वस्तु सम्यक् स्त्रष्टा झाला ॥८७॥
जेणें सुखें आनंदमय शंभू । जेणें सुखें सुखरुप झाला स्वयंभू । तें सुखरुप पावला स्वयंभू । आनंदलाभु सदगुरुकृपा ॥८८॥
भावें सदगुरुतें भजतां । स्रष्टा पावला स्वस्वरुपता । यालागीं गुरुभक्तीपरता । मार्ग परमार्था असेना ॥८९॥

परमार्थ करणार्‍या सावकानें सकलसाधनश्रेष्ठ गुरुभक्तीच केली पाहिजे

जरी साच चाड परमार्था । तरी भावें भजावें गुरुनाथा । सकल साधनांच्या माथां । जाण तत्त्वतां गुरुभक्ति ॥६९०॥
ज्याचे मुखीं गुरुचें नाम । ज्यासि गुरुसेवा नित्यकर्म । तो देहासहित परब्रह्म । त्यासि कर्माकर्म बाधीना ॥९१॥
ज्यासि स्वानंदे गुरुभक्ती । त्याच्या चरणतीर्था तीर्थे येती । वेद बंदीजन होती । सुरनर वंदिती पदरज त्याचे ॥९२॥
गुरुभक्ती नांदे ज्याचे घरीं । यम त्याची तराळकी करीं । काळ आज्ञा वाहे शिरीं । तो पूजिजे हरी परमात्मभावें ॥९३॥
गुरुभक्तीचे पवाडे । वर्णितां वेदासि मौन पडे । गुरुभक्तीवरते चढे । ऐसें चोखडे साधन नाही ॥९४॥


चतुःश्लोकी भागवत – गुरुचें लक्षण

गुरुचें लक्षण

शिष्यें करावें माझें भजन । ऐसें वांछी जरी गुरुचें मन । तो गुरुत्वां मुकला जाण । अभिमानें पूर्ण नागवला ॥९५॥
जगीं दाटुगा ज्ञानाभिमान । धनालागी विकती ज्ञान । ते जाण शिश्नोदरपरायण । तेथ अर्धक्षण ज्ञान नथारे ॥९६॥
मुख्यत्वें गुरुचे लक्षण । ज्ञान असोनि निरभिमान । सर्वांगी शांतीचें भूषण । तो सदगुरु पूर्ण परब्रह्म ॥९७॥

गुरुभक्तीनेंच ब्रह्मदेवास स्वस्वरुपाची ओळख झाली

त्या सदगुरुची निजभक्ती । सद्भावें करुनि प्रजापती । पावला स्वस्वरुपप्राप्ती । स्वानंदस्थिती निजबोधें ॥९८॥
यापरी चतुरानन । नारायणवचनें जाण । सांडूनि देहाभिमान । ब्रह्म परिपूर्ण स्वयें जाला ॥९९॥
येवढें पद प्राप्त जालें । परी न ह्नणे नवें आजि आलें । अनादिसिद्ध आपुलें । स्वतः सिद्ध संचलें रुप माझें ॥७००॥
ऐसे अनुभावाचे पूर्णोदगार । जाणोनि सुखावे उपेंद्र । जैसा देखोनियां पूर्णचंद्र । भरितें समुद्र उल्हासे ॥१॥
बालका कीजती सोहळे । तेणें माउलीचे निवती डोळे । तेवीं शिष्य निजबोध आकळे । तव सुखाचे सोहळे सदगुरुसी ॥२॥
सेवक परचक्र विभांडी । राजा हर्षाची उभवी गुडी । शिष्य स्वानंदीं दे बुडी । तेणें सुखोर्मी गाढी सदगुरुसी ॥३॥
तेणें सुखें नारायण । चारी भुजा पसरोन । आलिंगिला चतुरानन । परमानंदें पूर्ण सुखावोनी ॥४॥
आधींच प्रीती पुत्रावरी । तोही जाला ब्रह्माधिकारी । तेणें पूर्णानंदें श्रीहरी । निजहदयावरी आलिंगी ॥५॥


चतुःश्लोकी भागवत – चार श्लोक

चार श्लोकांत ब्रह्मदेवाला सुखी केलें

साचचि ब्रह्मा जन्मला पोटीं । यालागीं हरीसी कळवळ मोठो । पूर्णब्रह्म चौश्लोकांसाठीं । त्यासि उठाउठी वोपिता जाला ॥६॥
न माखतां शद्वाचें वदन । नायकतां श्रोत्राचे कान । न देखतां वृत्तीचे नयन । चौश्लोकीं चतुरानन सुखी केला ॥७॥
आतळों न देतां गगन । नलगतां सूर्यकिरण । प्राणस्पर्श न होतां जाण । चतुः श्लोकी चतुरानन सुखी केला ॥८॥
दूरीं दुरावोनि अज्ञान । जागें न होतां शहाणपण । मौनेचि जिवें जीव मारुन । चौश्लोकी चतुरानन सुखी केला ॥९॥
इशिया युक्ती नारायण । निजपुत्रालागी आपण । थोडे निरुपणॆं जाण । ब्रह्मपरिपूर्ण केला देवे ॥७१०॥

यथा महांति भूतानि भूतेषूच्चावचेष्वनु ।
प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् ॥५॥
एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनाऽऽत्मनः ।
अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात्सर्वत्र सर्वदा ॥६॥
एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना ।
भवान्कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित् ॥७॥

येथें नघडे हें निरुपण । शिष्य जालिया ब्रह्मसंपन्न । पुत्रस्नेह बापुडे कोण । त्यासि सदगुरु संपूर्ण पूज्यत्वें मानी ॥११॥
ब्रह्मसंपन्नतेपुढें । पुत्रसुख कायसें बापुडें । हे गुरुकृपा जयासी घडे । त्यासि करी रोकडें ब्रह्मपूर्ण ॥१२॥
जें बोला बुद्धी नातुडे । जें वृत्तीच्या हाता नचढे । तें द्यावया निजनिवाडें । खेवाचें धडफुडें मिस केलें ॥१३॥
हदया हदय एक झालें । ये हदयीचें ते हदयीं घातलें । यापरी न बोलतां बोलें । पूर्णत्व दिधलें प्रजापतीसी ॥१४॥

गुरु – शिष्य एक झाले

जेवीं दोन्ही दीप एक होती । प्रबळ चिच्छक्ती कोंदाटे ॥१५॥
ब्रह्मयाचें धन । ब्रह्मा परिपूर्ण ब्रह्म जाला ॥१६॥
तेथें बोध ना अबोध । स्वानंद ना निरानंद । गुरुशिष्य जाले एकवद । पूर्ण परमानंद सदोदित ॥१७॥
गुरुशिष्य जाले अभिन्न । खुंटला बोल पडिलें मौन । निः शेष विरालें मी तूंपण । अद्वय अलिंगन ऐसें पडिलें ॥१८॥
स्वरुपाचें नवलपण । अंगीं मुरालें ब्रह्मस्फुरण । निः शेष झालें विस्मरण । अव्ययज्ञान पावला विधाता ॥१९॥
यापरी श्रीनारायण । आपुलें देऊंनि पूर्णपण । पुढें करावया सृष्टिस्रजन । अकर्तात्मबोधें पूर्ण प्रबोधिला विरिंची ॥७२०॥
मुख्य बिंबी न होतां भिन्न । सूर्यापुढें प्रकाशती किरण । तेवीं नदेखोनि वेगळेपण । सुटलें अलिंगन हरिब्रह्मयांचें ॥२१॥
जळीं जळावरी वसती कल्लोळ । कल्लोळी असें सबाह्य जळ । तैसा अलिंगन मेळ । जाला वेगळ हरिब्रह्मयांचा ॥२२॥
जेवीं दीपें दीप लाविला । तेथें नकळे वडील धाकुला । तेवीं चिद्रूपें समत्वा आला । हरिरुप जाला प्रजापती ॥२३॥


चतुःश्लोकी भागवत – सृष्टिपूर्व गुह्यज्ञान

ब्रह्मदेव सृष्टी करण्यास पात्र झाला

सृष्टी न करवे सर्वथा । करितां येईल अहंता । ऐसा ब्रह्मा ह्नणत होता । तोचि यापरी तत्त्वत्तां अनुग्रहिला देवें ॥२४॥
जो सृष्टी नकरवे ह्नणत होता । तोचि आपुल्या अकर्तात्मता । सृष्टी करावयाची योग्यता । पावला विधाता पूर्णबोधें ॥२५॥

सृष्टिपूर्व गुह्यज्ञान

पुढीं सांठविले बुद्धिबळ । तेजि खेळतां विस्तारिले खेळ । तेवीं पूर्वसृष्टी सकळ । ब्रह्मा तत्काळ विस्तारी स्वयें ॥२६॥
पूर्ण पावोनि समाधान । श्रीनारायणाचें चरण । वंदिता जाला चतुरानन । उल्हासे पूर्ण पूर्णानंदबोधें ॥२७॥
हे कल्पादीची गुह्यज्ञानकथा । येणें ज्ञानसंपन्न जाला विधाता । तेचि कथा ऐकतां आतां । साधका तत्त्वतां लाभ काय ॥२८॥
सृष्टीपूर्वील कथा जीर्ण । जीर्णपणें वीर्यक्षीण । परीक्षिती तूं ऐसें न ह्नण । हे नित्य नूतन टवटवीत ॥२९॥
कल्पादीचा हा दिनकर । वृद्धपणें अतिजर्जर । याचेनी नलोटे अंधकार । ऐसा विचार मूर्खही नकरी ॥७३०॥
बहुकाळ ठेविला पुरोनी । अग्निहोत्रींचा जुना अग्नि । ह्नणोनी ठेवूं जातां वळचणीं । धडधडी तत्क्षणीं नित्य नूतनत्वें ॥३१॥
तेवीं कल्पादि हें गुह्यज्ञान । गुरुमुखें ऐकतां सावधान । साधक होती ज्ञानसंपन्न । यालागीं नित्य नूतन कथा हे ॥३२॥
स्वभूस्वयंभूगुह्यज्ञान । ऐके परिक्षिती सावधान । सुखरुप होईजे आपण । यालागीं नित्य नूतन कथा हे ॥३३॥
कथा नित्य नूतन आणि गोड । निर्दळी दैन्य दुःख दुर्वाड । साधका नित्य सुरवाड । पुरवी कोड श्रोतयाचें ॥३४॥
ऐसी नित्य नूतन सुखरुपता । हरिस्रष्टयांची ज्ञानकथा हे सृष्टीपूर्वील व्यवस्था । कैसेनी हाता आली पैं ॥३५॥


चतुःश्लोकी भागवत – जनार्दनकृपा

जनार्दनकृपेनेंच आपणांस ही कथा श्रोत्यांना सांगता आली – एकनाथ

मी नेणें वेदशास्त्रव्यवस्था । वंशीं मूर्ख ह्नणती वस्तुता । त्या मज निजभाग्यें अवचिता । अतुडला हाता गुरु लोष्ट परिस ॥३६॥
परिस सर्वथा कोठें नाहीं । जरी असला येखादे ठायीं । तो काष्ठ लोष्ट पाषाण मूर्ख मही । मज जोडला पाही चिद्रत्नाचा ॥३७॥
माझ्या अंगीं मूर्खपण । नेणें मी परिसलक्षण । त्या मज ज्ञानदाता परिपूर्ण । श्रीगुरुचरण जनार्दनाचे ॥३८॥
परिस लोहाचें करी सुवर्ण । परी लोहाचा परिस नव्हे जाण । श्रीजनार्दनाचे चरण । मी पाषाणचि पूर्ण तो मज परिस केला ॥३९॥
ऐसा महानिधि श्रीगुरुजनार्दन । तेणें मज देखोनी अतिदीन । कल्पादीचें गुह्यज्ञान । कृपा करोनी वोपिलें ॥७४०॥
एक चिन्मात्र एकाक्षर । उमाशिव हें द्वयक्षर । विठ्ठल हा त्र्यक्षर । एक पंचषडक्षर द्वादशाक्ष पैं ॥४१॥
माझा मंत्र चतुराक्षर । चतुरचित्तप्रबोधकर । ज्ञानाब्धीचा पूर्णचंद्र । आर्तचकोरअमृतांश ॥४२॥
या मंत्राचें एकाक्षर । क्षराक्षरातीत पर । स्वयें क्षरचि अक्षर । तो हा महामंत्र जनार्दन ॥४३॥
स्रष्टया उपदेशी नारायण । तोचि मजलागीं झाला जनार्दन । तेणें पूर्ण कृपा करुन । अनादिगुह्यज्ञान वोपिलें मज ॥४४॥
मज वोपिलें ह्नणों जातां । जनार्दन मजआंतौंता । तोचि ज्ञान तोचि ज्ञाता । यापरी ज्ञानार्था अर्थविलें ग्रंथी ॥४५॥
यालागीं श्रीजनार्दन । माझेनि नांवें आपण । करिता होय ग्रंथनिरुपण । तेथें झाडा घ्याया मीपण कैचें आणूं ॥४६॥
आतां तो कर्ता मी अकर्ता । हेंही बोलणें मूर्खता । याही बोला बोलता । जाणता तत्त्वतां जनार्दन ॥४७॥
जनार्दन स्वयें जाण । स्रष्टा अनुग्रहुनी संपूर्ण । अदृष्य होऊं पाहे आपण । तेंचि निरुपण श्रीशुक सांगे ॥४८॥
जो गुह्यज्ञानाचा निजसार । जो आनंदाचा अलंकार । जो योगियांचें परात्पर । तो शुकयोगींद्र स्वयें बोले ॥४९॥
तो स्वानंदे ह्नणे परिक्षिती । भगवंतें आपुली ज्ञानगती । सांगीतली प्रजापती । अन्वयस्थिती निजबोधें ॥७५०॥
सृष्टीची उत्पत्ती स्थिती शांति । ज्ञान विज्ञान अद्वयभक्ती । आपुलें मत यथास्थिती । प्रजापती उपदेशिला ॥५१॥
पितामाता भिन्न दोनी । नसोनी जन्मला नाभिस्थानीं । पाहे तूं तो आत्मयोनी । अजन्म जनी म्हणती ब्रम्हा ॥५२॥
मोह ममता अहंभावो । नसतां भूत भौतिक पहाहो । तेव्हां सृष्टि स्रजी निः संदेहो । यालागीं पितामहो ब्रम्हयासी म्हणती ॥५३॥
नाभीं जन्मला निजपोटीं । त्यासी सृजावया भूतसृष्टी । देऊनियां निजात्मपुष्टी । पूज्य परमेष्ठी सर्वासी केला ॥५४॥
असुरसुरनर आपण । वंदिती स्रष्टयाचे निजचरण । एवढें देऊनी आत्मज्ञान । अहंकृतिपूर्ण प्रतिष्ठिला ब्रह्मा ॥५५॥
जवळुनी दूर नवचतां । चतुर्मुखा सन्मुख असतां । नारायणाची निजरुपता । पाहतां पाहतां अदृश्य होय ॥५६॥
जे घृताची पुरुषाकृती । थिजोनी अभासली होती । ते विघरोनी मागुती । राहे घृतीं घृतरुपें जेवीं ॥५७॥
तेवीं स्रष्टयावरीची कृपा पूर्ण । स्वलीला सगुणनारायण । तोचि निर्गुणत्वें महाकारण । आपआपण अदृश्य जहाला ॥५८॥
जेवीं जळाचिया गार । क्षणएक भासली साकार । तोचि पाहतां आकार । विरोनियां नीर स्वभावें होय ॥५९॥
तेवीं श्रीनारायणाची मूर्ती । स्वलीला भासली होती । ते निर्गुंणाचेचिये गती । सहजस्थिती अदृश्य झाली ॥७६०॥
ब्रह्मयापुढुनी नाहीं गेला । तेथेंचि असोनी अदृश्य जाहला । आकार लोपोनी असे उरला । स्वयें संचला निर्गुणत्वें तो ॥६१॥
यापरी देव अंतर्धान । स्वयें पावला नारायण । त्यालागीं ब्रह्मा आपण । सद्भावें पूर्ण नमिता होय ॥६२॥
श्रीनारायण साकारला । तंव तो इंद्रियां विषय केला । तोचि इंद्रियातीत जाहला । या नांव पावला अंतर्धांना ॥६३॥
वस्तु असुनी परिपूर्णं । इंद्रियां विषय नव्हे जाण । यानांव सत्य अंतर्धान । सत्य सज्ञान बोलती ऋषि ॥६४॥
इंद्रियांतें नव्हे दृष्ट । त्यातें ह्नणती गा अदृष्ट । याअर्थी ते पुराणश्रेष्ठ । बोलती पाठ अंतर्धान पैं ॥६५॥
एवं हरि पावला अंतर्धान । त्यासी स्वयें चतुरानन । बद्धांजळी करी नमन । स्वानंदपूर्ण सम्यसाम्य ॥६६॥
पूर्वीं सृष्टि नकरवे ह्नणे । ते सगळी सृष्टि स्वयें होणें । बाप सदगुरुचें करणें । अगमा दावणें सुगम करुनी ॥६७॥
न माखतां हातपावो । सृष्टिसर्जनीं ब्रह्मदेवो । सदगुरुचे कृपेचा नवलावो । आलिप्तपणें पहाहो ब्रह्मांड रचवी ॥६८॥
एवं निर्विकल्प कल्पना । ब्रह्मा करी सृष्टिसर्जना । भृतभौतिकादिगुरुरचना । पूर्णस्थिती जाणा जैशीतैशी ॥६९॥
रचिले चतुर्विध भूतग्राम । चारीवर्ण चारीआश्रम । सुरनरादि अधमोत्तम । अखिलस्वधर्मकर्म विधानोक्त ॥७७०॥
स्रष्टा करी सृष्टिसर्जन । तें आपणाहुनी नदेखे भिन्न । आपणामाजीं सृष्टि संपूर्ण । आपण परिपूर्ण सृष्टीमाजीं ॥७१॥
ब्रम्हा स्वये सृजी निष्काम । तरी लोकहितार्थ यमनियम । आचरोनी स्वधर्मकर्म । दावी सुगम प्रजांसी विधी ॥७२॥


चतुःश्लोकी भागवत – प्रजापति

ब्रह्मदेवाला प्रजापति कां म्हणतात ?

जे प्रजांतें सृजूं शकती । ऐसियांचे करी हा उत्पत्ती । यालागीं ब्रह्मयातें ह्नणती । प्रजापति पति पुराणें तीं ॥७३॥
लोक ज्याच्या आज्ञें वर्तती । सर्व लोक ज्यातें भजती । यालागीं लोकपती ह्नणती । जाण निश्चिती ब्रह्मयातें ॥७४॥

लोकहितार्थ आचरण करणारा म्हणून त्याला धर्मपति असें म्हणतात

स्वधर्मकर्माची व्यत्पुत्ती । स्वधर्मकर्माची स्थितिगति । त्याचेनी वर्ते लोकांप्रती । यालागीं धर्मपती ब्रह्मयाते ह्नणिजे ॥७५॥
धर्मकर्मआचारस्थिती । प्रजा आचरुं नेणती । त्यासाठी यमनियमांची युक्ती । धाता आचारी निगुती वेदोक्तविधी ॥७६॥
पोटीं नाहीं कर्मावस्था । अथवा कर्मफळाची आस्था । तरी कर्म आचरे विधाता । लोकसंरक्षणार्थी यमनियम ॥७७॥
निजप्रजांचिया निजस्वार्था । कर्मे आचरोनी दावी धाता । स्वयें कर्म करोनि अकर्तां । लोकहितार्था यमनियम करी ॥७८॥
जें जें श्रेष्ठ आचरती । तें तें कर्म इतर करिती । यालागीं यमनियम प्रजापती । आचरे अनहंकृती लोकसंग्रहार्थ ॥७९॥
कुलालाचें वोसरे कर्म । पूर्वभ्रमें उरे चक्रभ्रम । तेवीं जीवन्मुक्तांचे देहकर्म । होतसे परमस्वभावेपैं ॥७८०॥
नदेखोनी सकामावस्था । ब्रह्मा केवळ लोकसंग्रहार्था । सकळलोकहितार्था । होय आचरता स्वधर्मकर्म ॥८१॥
सदगुरु श्रीनारायण । त्याची आज्ञा कीं हे संपूर्ण । करावें लोकसंरक्षण । यालागीं ब्रह्मा जाण यमनियम चाळी ॥८२॥
अनहंकृती स्वधर्मकर्म । ब्रह्मा आचरोनी नित्यनेम । येणें नारदाचा मनोधर्म । उत्कंठित पूर्ण परमार्थाविषयीं ॥८३॥


चतुःश्लोकी भागवत – नारद

पितृसेवेनें नारद ज्ञानी झाले

तो नारद महापवित्र । ब्रम्हयाचा मानसपुत्र । परमार्थालागीं तत्पर । सर्वस्वें सादर पितृसेवेसी ॥८४॥
तोचि आर्तीचा पूर्णचंद्र । विवेकाचा क्षीरसमुद्र । वैराग्याचा महारुद्र । आचरे नरेंद्र शमदमयुक्त ॥८५॥
पितृसेवा तोचि स्वार्थ । मानुनी सेवेसी नित्यरत । सदा सेवेचें दृढव्रत । निजपरमार्थ साधावया ॥८६॥
शमें ज्ञानेंद्रियां उपशम । दमें कर्मेद्रियां नित्यकर्म । सेवा करोनी उत्तमोत्तम । नारद परमप्रिय जाहला ॥८७॥
ज्ञानार्थी अतिउद्भट । अंतर्निग्रही एकनिष्ठ । आज्ञाधारी अतिश्रेष्ठ । परमवरिष्ठ सुशीलभावें ॥८८॥

मायानिरसनार्थ नारद ब्रह्मदेवाला उपाय विचारतात

मायानियंते ह्नणती राया त्या शिवादिकां मोहिलें माया । ते निजमाया निरसावया । नारद उपाया पुसोइच्छित ॥८९॥
माया निरसावया आपण । मायानियंता श्रीनारायण । त्यासी जाणावया संपूर्ण । अनन्यशरण निजजनकासी ॥७९०॥
पितामातागुरुत्वेंसी । ब्रह्मा पूज्य नारदासी । सद्भावें सेवितां अहर्निशीं । अतिउल्हासेंसी तुष्टोनियां ॥९१॥
नारद महाभागवत । भगवंती नित्य निरत । त्यासी ब्रह्मा प्रसन्न होत । निजबोधयुक्त स्वानंदें ॥९२॥
देखोनि नारदाची पूर्ण भक्ती । जाणोनी उत्तमोत्तमस्थिती । स्वानंदें तुष्टला प्रजापती । कृपामूर्ति निजबोधें ॥९३॥
नारदासी तुष्टला पिता । जो सकळ जगाचा प्रपिता । पूर्ण देखोनी प्रसन्नता । जाहला विनविता सप्रेमभावें ॥९४॥
तूं नातळोनि मायामोहासी । निजात्मबोधें विश्व सृजिसी । तुज प्रसन्न झाला हषीकेशी । तो प्रसाद आह्मासी कृपेनें दीजे ॥९५॥
ऐसें बोलतां चालिलें स्फुंदन । अश्रुपूर्ण झाले नयन । रोमांचित कंपायमान । सर्वांगी स्वेदकपण टवटवविन्नले ॥९६॥
हर्षे बाष्प दाटलें कंठीं । पुढारी न बोलवे गोष्टी । ते देखोनियां निजदृष्टी । स्रष्टा निजपोटीं निवाला थोर ॥९७॥
यासी पूर्णब्रह्म बोधितां । वचनें पावेल परमार्था । होय अधिकारी पुरता । ऐसें विधाता जाणों सरला ॥९८॥
मग नारदासी आपण । सद्भावें दिधलें आलिंगन । पुत्रसुखें निवाला पूर्ण । अधिकारीरत्न परमार्थीं ॥९९॥
ऐक राया परीक्षिती । जें तुवां पुसिलें मजप्रती । तेंचि नारदें प्रजापती । निजज्ञानार्थी पुसियेलें ॥८००॥


चतुःश्लोकी भागवत – भागवताची दहा लक्षणें

भागवताची दहा लक्षणें सांगून ब्रह्मदेवानें नारदाला ज्ञानी केले

निजपुत्रालागीं श्रीनारायण । कळवळोनी सांगे गुह्यज्ञान । तेंचि स्वपुत्रालागीं जाण । ब्रह्मा आपण मथितार्थ बोधी ॥१॥
ज्ञान विज्ञान भगवद्भक्ती । नारायणाची पूर्णस्थिती । कळवळोनी प्रजापती । निजपुत्राहातीं ओपिता झाला ॥२॥
तें दशलक्षण भागवत । विष्णुविरिंचीज्ञानमथित । तो ऐकतां ज्ञानमथितार्थ । ओपिला समस्त नारदोदरीं ॥३॥
तें न देखतां नयन । न माखतां निजकान । नातळतां अंतः करणमन । ओपिलें गुह्यज्ञान नारदहदयीं ॥४॥
सोडूनियां निज सुरबुद्धी । नातळतां आदिमध्यअवधीं । परिपूर्णत्वें करुनि बोधी । ज्ञानार्थसिद्धि वोपिली तया ॥५॥
जेवीं शिष्या विद्यातत्त्व देतां । गुरुसी ज्ञान वाढे अर्था । न्यूनत्व न घडे प्रबोधितां । पूर्ण चढे माथा सच्छिष्याचिया ॥६॥
तैसा उपदेश अलोलिक । उपदेशमात्रें तिन्हीलोक देख । गुरुशिष्यही होती एक । तेथें न्यूनाधिक कोणाचें कोणा ॥७॥
राया यापरी चतुरानन । उपदेशुनी गुह्यज्ञान । नारद केला ब्रम्हपूर्ण । चैतन्यघन समसाम्यरुप ॥८॥
जेणें होइजे ब्रम्हपूर्ण । तें भागवत दशलक्षण । त्या लक्षणांचें निजलक्षण । होउनी सावधान अवधारी तूं ॥९॥


चतुःश्लोकी भागवत – भागवताची दहा लक्षणें

इतर पुराणें जीं असतीं । त्यांची पांचलक्षण व्युत्पत्ति । श्रीमहाभागवताची स्थिती । जाण निश्चिती दशलक्षणें ॥८१०॥
मुख्य भागवताची व्युत्पत्ति । दशलक्षण त्याची स्थिती । ते मी सांगेन तुजप्रती । ऐके परीक्षिती नृपवर्या ॥११॥
सर्ग, विसर्गं, स्थान, पोषण, । ऊती, मन्वंतरें, ईशानुकथन । निरोध, मुक्ती, आश्रय पूर्ण । एवं दशलक्षण भागवत ॥१२॥
दशलक्षणांचें लक्षण । तुज मी सांगेन संपूर्ण । ऐक राया सावधान । लक्षणचिन्ह यथार्थ आतां ॥१३॥

प्रत्येक लक्षणाची व्याख्या

सर्ग बोलिजे संसारातें । विसर्गं म्हणिजे संहारातें । स्थान म्हणिजे वैकुंठातें । पोषण तेथें भगवद्भजन ॥१४॥
कर्म त्यानांव ऊती । चौदामनूंची व्यवस्थिती । यानांव मन्वंतरे म्हणती । दशावतारकीर्ती ईशचरित ॥१५॥
सकळ इंद्रियांच्या वृत्ती । एकाग्र यानांव निरोधस्थिती । निःशेष जेथें विरे वृत्ती । त्यानांव मुक्ती महाराया ॥१६॥
उत्पत्तिस्थितिप्रळ्यांत । ज्या स्वरुपावरी होतजात । स्वरुप अविकारी यथास्थित । त्यानांव निश्चित आश्रय राया ॥१७॥
दोराअंगीं सर्प उपजला । दोरावरी सर्प नांदला । दोरावरी सर्प निजला । तरी दोर स्पर्शला नाहीं सर्पा ॥१८॥
तेवीं वस्तूच्या ठायीं । प्रपंचाची वार्ता नाहीं । तो झाला गेला घडे कांहीं । आश्रय पाही यानांव बापा ॥१९॥
पावावया आश्रयप्राप्ती । भावें करावी भगवदभक्ती । ते भक्तीची निजस्थिती । श्रीव्यासें भागवतीं विशद केली ॥८२०॥
ते भावें करितां भगवदभक्ती । त्या भक्तीची निजस्थिती । भक्तां परमानंदप्राप्ती । परिपूर्णस्थिती ठसावे येथें ॥२१॥
ठसावली जी ब्रह्मस्थिती । ते पालटों नेणे कल्पांतीं । कर्मी अकर्तृत्वाची प्रतीती । नारद निश्चिती उपदेशिला ॥२२॥


चतुःश्लोकी भागवत – ब्रह्मज्ञानी

नारद ब्रह्मज्ञानी झाल्यामुळें ब्रह्मदेवानें आनंदानें त्याला आपली ब्रह्मवीणा दिली

तेणें उपदेशें श्रीनारद । पावला तो परमानंद । निर्दळूनियां भेदाभेद । यापरी बोध प्रबोधिला तेणें ॥२३॥
ऐसें उपदेशितां प्रजापती । श्रीभगवंताची मुख्यभक्ति । आतुडली नारदाचिये हातीं । अव्ययस्थिती परमानंद होत ॥२४॥
यापरी उपदेशिला नारद । यालागीं सर्वकर्मी ब्रह्मानंद । कोंदाटला स्वानंदकंद । परमानंद परिपूर्णपणें ॥२५॥
बोध देखोनी चतुरानना । आल्हाद जाहला चौगुणा । तेणें आल्हादेंकरुनी जाणा । आपुला ब्रह्मवीणा वोपिला तया ॥२६॥
नारदें करुनि प्रदक्षिणा । स्वानंदें लागलासे चरणां । मग वाहूनियां ब्रम्हवीणा । ब्रह्मानंदें जाणा निघाला तेसमयीं ॥२७॥
तो ब्रम्हवीणा वाजवीत । ब्रह्मपदें गीतीं गात । ब्रह्मपदीं डुल्लत डुल्लत । ब्रह्मसृष्टी विचरत ब्रह्मबोधें ॥२८॥
ब्रह्मचर्यातें पाळित । ब्रह्मबोध तिपाळित । ब्रह्मानंदें उन्मत्त । मही विचरत ब्रह्मत्वें तो ॥२९॥
तो ब्रह्मयासी संवादत । अधिकारियासी ब्रह्म देत । जग ब्रह्मरुपें देखत । यापरी विचरत त्रैलोक्य स्वयें ॥८३०॥
अठरा पुराणें व वेदविभागांचे कर्ते असूनहि आत्मसमाधान न लाभलेले व्यासमूनि सरस्वती तीरावर नारदांना भेटले
ऐसा विचरत स्वइच्छेंसी । आला सरस्वतीतीरासी । तेथें देखिलें श्रीव्यासासी । निजमानसी व्याकुळ असे ॥३१॥
ब्रह्मप्राप्तीलागीं जाण । घालूनि बैसला तो आसन । दृढ करितांही ध्यान । निजसमाधान न पावेंची ॥३२॥
श्रीव्यासें स्वर्ये आपण । केलें वेदविभागविवेचन । भारतादिअठरापुराण । इतिहास सुलक्षण व्यासें केली ॥३३॥
स्वधर्मकर्माचे लागवेग । व्यासें विभागिले सांग । स्वर्गनरकादिभोगभाग । देहविभाग विभागले व्यासें ॥३४॥
जन्ममरणादिअवस्था । व्यासें वर्णिल्या यथार्थता । ज्ञातेपणाची समर्थता । परी अंगीं सर्वथा असेना त्याचे ॥३५॥
वेदविभागी मी सज्ञान । ऐसा रावणासी अभिमान । यासी दिधलें निग्रहस्थान । श्रीव्यासें आपण ॐकारमात्रें ॥३६॥
ज्याचेनी दृष्टिस्पर्शे जाण । कौरवपांडववंशवर्धन । तो श्रीव्यासही आपण । आत्मसमाधान नपवेची ॥३७॥
ज्याचे करितां ग्रंथ पठण । ब्रह्महत्यादिदोषनिर्दळण । करितां भारतकथाकथन । निमाले ब्राह्मण उठविले अठरा ॥३८॥

सदगुरुकृपेविण सूक्ष्म अहंकार न गेलेले व्यास आत्मज्ञानी कसे होणार ?

यापरी ज्ञानसंपन्न । श्रीवेदव्यास द्वैपायन । तोही सदगुरुकृपेविण । आत्मसमाधान नपवेची ॥३९॥
मुख्य व्यासाची हे अवस्था । तेथें इतरांची कोण कथा । शाब्दिक ज्ञानाची योग्यता । तेथें अतर्क्य अहंता स्वभावें असे ॥८४०॥
अनागतभाग्यथार्थवक्ता । महाकवित्वें मी कविकर्ता । ऐशी अतिसूक्ष्म अहंता । नकळोनी स्वभावता व्यासासी असे ॥४१॥


चतुःश्लोकी भागवत – गुरुकृपा

गुरुकृपेशिवाय इतर साधनें व्यर्थ

सदगुरुकृपा न होतां पूर्ण । न तुटे सूक्ष्म ज्ञानाभिमान । नकरितां गुरुसेवा अनन्य । शिष्य समाधान कदा नपवे ॥४२॥
नधरितां सदगुरुचे चरण । नव्हतां अनन्यशरण । वृथा ज्ञान वृथा ध्यान । वृथा वाग्विलपन पांडित्य तें ॥४३॥
वृथा स्वधर्मकर्माचार । वृथा विवेक विचार । सदगुरुकृपेविण जो नर । भूमिभार जडमूढ तो ॥४४॥
सदगुरुकृपा न होतां । व्यर्थ कविता व्यर्थ कथा । व्यर्थ सज्ञानश्लाघ्यता । देहअहंता तुटेना त्याची ॥४५॥
नकरितां सदगुरुभजन । शिष्यासी नोहे समाधान । सदगुरुतोचि ब्रह्मपूर्ण । चैतन्यघन निजात्मा तो ॥४६॥
सदगुरुचे चरणींची माती । अवचटें आतुडल्या स्वहातीं । पायां लागती चार्‍ही मुक्ती । परमात्मप्राप्ती सच्छिष्या ॥४७॥
असो हें व्यासें करितां ध्यान । क्षणभरी स्थिर न राहे मन । अणुमात्र नपवे समाधान । तेणें उद्विग्नपणें अनुतापी ॥४८॥
मग ह्नणे तो कटकटां । जळो जाणीवप्रतिष्ठा । ज्ञातेपणें ठकिलों मोठा । मज मी उफराटा वंचलों कीं ॥४९॥
जाणपणाचा पहिला भ्रम । ज्ञातेपणें मी मूर्ख परम । निजहिताचें चुकलों वर्म । झालें निंद्यकर्म मज माझें ॥८५०॥
माझे देही देहस्थ मी कोण । त्या मीपणाचें मज नाहीं ज्ञान । केवीं पावेन मी समाधान । यापरी संपूर्ण अनुताप जाहला ॥५१॥
नरदेहीचें निजसाधन । साधावें निजात्मज्ञान । तें मी नसाधितां सज्ञान । अतिअज्ञान ज्ञानांध केवळ ॥५२॥


चतुःश्लोकी भागवत – नारदाचें दर्शन

अशा अनुतापी व्यासांना नारदांचें दर्शन होतें

ऐसी व्यासासी अवस्था । ज्ञानार्थी होतां अनुतापता । तेथें निजभाग्यें स्वभावतां । आला अवचिता ब्रह्मपुत्र ॥५३॥
व्यास जंव उघडी नयन । तंव पुढें देखे ब्रह्मनंदन । हर्षे निर्भर झाला पूर्ण । धांवोनी लोटांगण सदभावें घाली ॥५४॥
उपविष्ट होतां वरासन । हर्षे करी चरणवंदन । स्वानंदें चरणक्षालन । केलें पूजन ज्ञानोपचारीं ॥५५॥
पुष्पांजुळी प्रदक्षिणा । तुळसीपत्रें वाहुनी चरणां । नारदीं भगवदभावना । करुनी पूजना प्रार्थितसे ॥५६॥
व्यास ह्नणे अहो स्वामी । जगीं परमभाग्याचा मी । स्वयें कृपा केली तुह्मीं । आजि सुखसंगमीं निवालों असें ॥५७॥
ऐशी विनंती प्रीतीकरुनी । धांवोनि लागलासे चरणीं । त्यासी आदरें नारदमुनी । सन्मानुनी उठवी अत्याल्हादें ॥५८॥

नारदांची पूजा करुन व्यासांनीं आपली मनोव्यथा त्यांना सांगितली

मग बैसोनियां सावचित्त । व्यास निवेदी मनोगत । म्यां स्वयें कथिलें ज्ञानमथित । परी समाधान चित्त माझें नपवे ॥५९॥
जो मी लौकिकीं अतिसज्ञान । तो मी निजस्वार्था अतिअज्ञान । माझ्या ज्ञातेपणाचे भूषण । तेंचि दूषण मज माझें ॥८६०॥
भीतरीं मूर्ख बाहेरी ज्ञाता । हें ज्ञातेपण निजघाता । तें मी वेदशास्त्रपुराणकर्ता । निजस्वार्था अतिअंध झालों ॥६१॥
अंतरीं नाहीं सुखसमाधान । जळो जळो तें ज्ञातेपण । ऐसें नारदासी सांगोन पूर्ण । झाला अनन्यशरण श्रीव्यास तो ॥६२॥

” तुझ्या ग्रंथांतून भगवंताचे गुणसंकीर्तन नाही ” – नारद

तंव नारद ह्नणे व्यासासी । केलें अत्युत्तम ग्रंथासी । जेणें विश्रांति होय वक्तयासी । त्या ग्रंथार्थासी नोळखसी ॥६३॥
स्वधर्मकर्तव्यें व्यवहाररीती । हेंचि निरुपिलें तुवां ग्रंथीं । परी भगवंताची निजस्थिती । ती ग्रंथार्थी प्रतिपादिली नसे ॥६४॥
सच्चिदानंदप्रभावासी । नाहीं वर्णिलें श्रीवासुदेवासी । तंव विश्रांति नव्हे वाचेसी । मां वक्तयासी सुख कैचें ॥६५॥
जो जगाचें निजजीवन । जो प्रतिपाद्य श्रीजनार्दन । नाहीं वर्णिला चैतन्यघन । तंव वक्तया संपूर्णं सुख कैचें ॥६६॥
ज्याचेनी जग होय सुखरुप । तो जनार्दन सुखस्वरुप । त्याचें न वर्णितां निजस्वरुप । वक्तयासी अल्प विश्रांती नुपजे ॥६७॥

” श्रोता – वक्ता यांना परमशांति देणारा ग्रंथ कोणता तो ऐक ” – नारद

जें वक्तयासी होय निजसुख । त्रिलोकीं कोंदे हरिख । ऐसा अत्यंत अलोलिक । तुज मी अवश्यक सांगेन आतां ॥६८॥
श्रोते वक्ते सुखरुप होती । जगीं प्रगटे परमशांती । ऐसी भगवंताची निजस्थिती । ते मी तुजप्रती सांगेन पां ॥६९॥
ज्याचें स्मरतां एक नाम । निर्दाळी सकळ कर्माकर्म । त्या पुरुषोत्तमाचें निजवर्म । गुह्यज्ञान परम सांगेन व्यासा ॥८७०॥
जेथें शब्देंसी वक्ता निवे । श्रवणेंसी श्रोता विसांवे । सुखासही निजसुख फावे । अनुभवा निजानुभवें निघती दोंदें ॥७१॥
जेणें शिवाचें पुरे कोड । जें गोडाचें निजगोड । जेणें वोसरे संसारकाबाड । सुखसुरवाड सांगेन तें ॥७२॥
जेणें तुटे ज्ञानाभिमान । जेणें कोंदाटे चैतन्यघन । ऐसें जें गुह्याचें गुह्यज्ञान । तें तुज सांगेन परात्पर मी ॥७३॥
जें भावार्थे घेतां वचन । जन जनार्दना अभिन्न । श्रोता वक्ता होय आपण । तें गुह्यज्ञान अवधारी तूं ॥७४॥
कैसें व्यासाचें शुद्धमन । नारद ज्ञाता मी काय अज्ञान । ऐसा नधरीच ज्ञानाभिमान । यालागीं तुष्टमन नारद झाला ॥७५॥
जेणें जपतपाची श्रृंखळा तुटे । ध्येयध्यानाचें बिरडें फिटे । कर्माकर्माचें खत फाटे । तें वर्म गोमटे अवधारी पां ॥७६॥जेणें अहंतेचें मूळ उपडे । अविद्येचें आयुष्य खंडे । अंगें ब्रह्म होइजे रोकडें । तें ज्ञान धडफुडें अवधारी पैं ॥७७॥

गुरुकृपेनें नारदाला लाभलेली योग्यता

निजकृपें श्रीनारद । परमप्रीती अतिआल्हाद । व्यासासी वचनानुबोध । परमानंदें निववीत असे ॥७८॥
श्रीनारायणें निजानंद । परमेष्ठीसी केला बोध । तेणें ब्रह्मा पावे परमानंद । स्वानंदकंद सदोदित ॥७९॥
ऐसिया निजानुभवासी । ब्रह्मा अर्पी निजपुत्रासी । तेणें तो नारददेवर्षी । सुखस्वानंदेंसी डुल्लत असे ॥८८०॥
भुक्ति मुक्ति भगवद्भक्ती । नित्य नारदातें वोळंगती । येवढी स्वरुपाची प्राप्ती । अगाधस्थिती पावला ॥८१॥
भुक्ति नारदाचे पायीं घोळे । मुक्ति त्याचे चरणीं लोळे । भक्ति त्याचेनी धाकें पळे । करी सोवळें निजशिवातें ॥८२॥
काम नारदापुढें पळे । काळ त्याच्या तोडरीं रुळे । हरिहरांचेनी भावबळें । इंद्रादि पादकमळें वंदिती सदा ॥८३॥
सदा देवांचा आवडता । नित्य दैत्यांचा पढियंता । ज्याचे मुखींची स्वभाववार्ता । नुल्लंघ्य सर्वथा हरिहरांसी ॥८४॥
शुक्र लागे ज्याचे चरणी । बृहस्पति त्यातें मस्तकीं मानी । यापरी गा नारदमुनी । वंद्य त्रिभुवनीं सुरां असुरां ॥८५॥
नारदा रावणासी आप्तता । शेखीं रामाचा पढियंता । नारद शिवाचा आवडता । तो त्रिपुरासी तत्त्वतां एकांत चाळी ॥८६॥
श्रीकृष्णनारद एकांतविधी । त्यातें कालयवन पुसे बुद्धी । ज्यातें जरासंघ नित्य वंदी । तो कृष्णसभेमधीं आत्मत्वें पूज्य ॥८७॥
जेथें अत्यंत विषमता । तेथें नारदासी नित्य समता । तेथे समसाम्यसमानता । व्यासासी तत्त्वतां निजबोधक ॥८८॥
तो पाराशर तपतेजस । सरस्वतीतीरींचा निजहंस । परब्रह्मध्यानीं ध्यानस्थ व्यास । त्यासी करी उपदेश श्रीनारद तो ॥८९॥
ध्यानध्यातृत्वभेद । फोडोनी जो सच्चिदानंद । तोचि श्लोकार्थीचा अर्थबोध । व्यासासी श्रीनारद बोध सांगे ॥८९०॥

नारदांच्या उपदेशानें व्यासांना आत्मज्ञान

कानावचना होतां भेटी । व्यास स्वबोधेंसी स्वयें उठी । श्रीनारदाचे गोष्टीसाठीं । पडली मिठी परब्रह्मीं ॥९१॥
ज्या दादुल्याचें वचन । निर्दळुनी ध्यातें मन । ध्याता केला चैतन्यघन । हा प्रताप पूर्ण सदगुरुवचनीं ॥९२॥
तेंचि वाक्य इतर सांगती । परी तेथें नव्हे अर्थप्राप्ती । बाप सदगुरुवाक्याची ख्याती । वचनींच प्राप्ती पर ब्रह्माची ॥९३॥
हो कां वचनामाजीं आईतें । ब्रह्म बांधोनी आलें होतें । हाही अर्थ नघडे येथें । गुरुवाक्यचि निश्चितें परिपूर्ण ब्रम्ह ॥९४॥
वस्तुवेगळें वचन राहे । मां त्यामाजीं वस्तु बांधिली जाये । वस्तु वचनासी सबाह्य आहे । एवं गुरुवाक्य होय परिपूर्ण ब्रम्ह ॥९५॥
गुरुवाक्याचें अक्षर । तें क्षराक्षरातीत परमपर । यालागीं गा साचार । ब्रम्हपरात्पर सदगुरुवाक्य ॥९६॥
वचन वाक्य आणिक वक्ता । तिहींसी गुरुवाक्यें एकात्मता । यालागीं जाण पां तत्त्वतां । गुरुवाक्य वस्तुता परिपूर्ण ब्रह्म ॥९७॥
गुरुवाक्य चैतन्यघन । सदगुरु तो ब्रम्ह परिपूर्ण । हे श्रीव्यासासी बाणली खूण । आपणा आपण विसरला मग ॥९८॥
विसरला तो ध्येयध्यान । विसरला तो ज्ञेयज्ञान । विसरला तो मीतूंपण । देहीचें देहपण देहधर्म विसरे ॥९९॥
विसरला तो कर्मधर्म । विसरला तो नित्यनेम । विसरला तो जपहोम । पूर्ण परब्रम्ह कोंदाटलें ॥९००॥
नाठवे सज्ञानमंहती । नाठवे महाकवित्वाची व्युत्पत्ती । नाठवे विदेहदेहस्फूर्ती । चैतन्यस्थिती ठसावली तया ॥१॥
बाप गुरुवाक्याचा निजबोध । निःशेषें निरसला जीवभेद । पूर्ण कोंदला परमानंद । स्वानंदकंद निजबोधेंसी ॥२॥
ऐसा पावतां निजबोध । विसरला गुरुशिष्यत्वभेद । श्रीव्यास आणि श्रीनारद । झाले एकचित्तबोध निजात्मरुपें ॥३॥
यापरी श्रीभागवत । दशलक्षण अर्थयुक्त । नारदें व्यासासी यथोक्त । पूर्ण परमार्थ प्रबोधिला ॥४॥
कृपापूर्ण पौर्णिमाद्वारें । सदगुरुप्रबोधबोधचंद्रें । निजानंदें अमृतकरें । निवविलें पुरें निजशिष्यातें ॥५॥
निरसुनी अविद्याअंधार । दवडुनी अहंसोहविकार । फेडिलें मुक्तीचें भुरर । सदगुरुभास्करअरुणोदयीं ॥६॥
सूर्यकिरणाचे संघातें । अंधारचि प्रकाशाआतें । तेवीं गुरुवाक्यभास्वतें । संसार सुनिश्चितें परब्रह्म केला ॥७॥
इतर सूर्य अस्तमाना जाय । गुरुसूर्य तैसा नव्हे । जो उगवतांची पाहे । उदयास्त खाय निजांगतेजें ॥८॥
जेवीं चंद्रकरअंगसंगें । चकोर निवाला डोलोंलागे । तेवीं गुरुवाक्यसंयोगें । श्रीव्यास सर्वांगें सुखरुप जाहला ॥९॥

गुरुवाक्यानें ज्ञान प्रबुद्ध झालेल्या व्यासांनी चतुः श्लोकीचें सार दहा लक्षणांत वर्णिलें

तेणें सुखाचेनि स्वानंदें । सदगुरुकृपा पूर्ण बोधें । चतुःश्लोकींचीं अगाध पदें । दशलक्षणशुद्धें वर्णिलीं व्यासें ॥९१०॥
प्रथमस्कंधीं आरंभभाव । द्वितीयस्कंधी साधिला आव । तृतीयापासूनी नवलाव । लक्षणान्वयभाव लाविला असे ॥११॥
तृतीयस्कंधीं सर्गलक्षण । चतुर्थस्कंधीं विसर्ग जाण । पंचमस्कंधीं बोलिलें स्थान । षष्ठीं तें पोषण प्रतिपादिलें ॥१२॥
सप्तमस्कंधी बोलिली ऊती । अष्टमीं मन्वंतरांची गती । ईशानुकथनाची स्थिती । जाण निश्चिती नवमामाजीं ॥१३॥
दशमी बोलिला निरोध । एकादशी मोक्षपद । द्वादशीं आश्रय अतिशुद्ध । एवं लक्षणें विशद व्यासें केलीं ॥१४॥
जैसें वटबीज अणुमात्र । त्याचाचि होय वृक्ष थोर । तैसा चतुः श्लोकींचा विचार । श्रीव्यासें साचार विस्तारला ॥१५॥
व्यास कवि हाचि माळी । भूमिका शोधोनि वैराग्यहलीं । गुरुकृपाजीवनमेळीं । विवेकाचे आळीं वाढवी वृक्ष ॥१६॥
व्यासविंदानिया बळी । चतुः श्लोकींच्या निजमेळी । वृक्ष वाढवी समूळीं । पुष्पपल्लवफळीं सफलित ॥१७॥
पदोपदीं अतिगोड । मोक्षसुखाचे लागले घड । समूळ सगळें झाड । नित्य नूतनगोड सुस्वाद लागे ॥१८॥
नित्य नूतन याची गोडी । अवीटें विटोंनेणें चोखडी । जे सेवूं जाणती आवडी । त्यांसी बाधेना वोढी सुधैषणेची ॥१९॥
नवल या फळाची मात । त्वचा वीज नाहीं त्यांत । नमाखतां जीवाहात । नलागतां दांत सेवावें हें ॥९२०॥
हें रसनेविण रसस्वादन । सेवितां नव्हे उच्छिष्टवदन । परमानंदें तृप्त पूर्णं । गुरुभक्त सज्ञान पावती सदा ॥२१॥
एवं दशलक्षणविस्तार । द्वादशस्कंधभागवततरुवर । श्रीव्यासऋषि वदला साचार । स्वानंदनिर्भंर रस स्रवत ॥२२॥
समूळफळरुपें सदाफळ । अद्वितीय अतिरसाळ । समसाम्यसदा सरळ । समत्वें निर्मळ शाखोपशाखा ॥२३॥
शाखोपशाखाउत्पत्ति । निगमकोकिळा कूजती । आर्तभ्रमर परिभ्रमती । जिज्ञासु घालिती झेंपा फळीं ॥२४॥


चतुःश्लोकी भागवत – शुकयोगींद्र

श्रीव्यासांनीं आपला पुत्र शुकयोगींद्र यांना आपल्यासारखेंच ‘ ज्ञानी ’ केले

जंव अर्थाअर्थी चोखडी गोडी । तंव अतिशयें अतिआवडी । श्रीशुकाची पडली उडी । सर्वांगी चोखडी चाखिली चवी ॥२५॥
ऐसा देखोनी अधिकार । श्रीव्यासें निजकुमर । उपदेशिला शुकयोगींद्र । जो ज्ञाननरेंद्र योगियांचा ॥२६॥
जो ब्रह्मचर्यशिरोमणी । जो भक्तांमाजीं अग्रगणी । जो योग्यांचा मुकुटमणी । सज्ञान चरणीं लागती ज्याचे ॥२७॥
जो सुखरुपें रुपा आला । की शांतिरसाचा ओतिला । निखळ विज्ञानाचा घडला । स्वयें साकारला परब्रह्मरुप ॥२८॥
त्याच्या देहाची पाहतां शोभ । ब्रह्मज्ञानी निघाले कोंब । तो ज्ञानाचा पूर्णबिंब । स्वयें स्वयंभ पूर्णब्रह्म ॥२९॥
दशलक्षण श्रीव्यासोक्ती । चतुःश्लोकीचे अर्थप्राप्ती । श्रीशुकाची निजस्थिती । झाली निश्चितीं परब्रह्मरुप ॥३०॥
यापरी श्रीशुक्र आपण । स्वयें झाला स्वानंदघन । त्या आनंदाचें समाधान । पाहोनि पूर्ण समाधिस्थ झाला ॥३१॥
नाहीं वृत्तिधैर्यधारणा । आपेंआप सहजें जाणा । समाधी आली समाधाना । सुखरुपें पूर्णार्णवबोध झाला ॥३२॥
समाधी आणि उत्थान । दोहीं अवस्था गिळूनी जाण । शुक्र आपणिया आपण । सुखरुपें पूर्ण प्रबोध पावे ॥३३॥

दहा हजार वर्षे श्रीशुक समाधि अवस्थेंत

ते समाधीचा अवबोध । शुकासी वाटे निमिषार्ध । बाहेर लौकिक प्रसिद्ध । दशसहस्त्राब्द पुराणगणना ॥३४॥
दशसहस्त्रवर्षेपर्यत । श्रीशुक होता समाधिस्थ । ऐसी महापुराणें गर्जत । शुकासी वाटत निमिषार्ध पैं ॥३५॥
यालागीं स्वरुपीं निर्वाही । सर्वथा रीघ मना नाहीं । मुख्य काळचि जेथें नाहीं । काळगणना तेठायीं । ठसावे कोणा ॥३६॥
लवनिमिषपळेंपळ । साधूनियां समाधि त्रिकाळ । हें मायामय मृगजळ । स्वरुपीं अळुमाळ स्पर्शलें नाहीं ॥३७॥
जो सूर्यापासीं स्वयें राहे । त्यासी उदयास्त भेटों नलाहे । तेवीं स्वरुपीं जो निमग्न होये । त्यासी काळाची सोये स्वप्नीहि नलगे ॥३८॥
काळगणनाप्रसिद्धी । हे लौकिकी जाण त्रिशुद्धी । स्वस्वरुपींचा संबंधी । काळाची अवधी निः शेष नपवे ॥३९॥
जें जें आकारासी आलें । तें तें जाण काळें ग्रासिलें । काळासी ज्यानें सबाह्य व्यापिलें । तेथें काळाचेंही गेलें काळत्व सगळें ॥९४०॥
ते स्वरुपी निजनिर्वाही । शुक समाधिस्थ जाहला पाही । मां काळगणना तेठायीं । कैंची काई सांगावी पां ॥४१॥
यालागीं समाधि आणि उत्थान । हें अपक्वासीच घडे जाण । पूर्वाच्या अंगा लक्षण । अणुप्रमाण असेचिना ॥४२॥
पूर्णाची लक्षितां लक्षणें । थोटावली अवधी पुराणें । वेद ‘ नेति नेति ’ म्हणे । तेथें माझें बोलणें सरे केवीं ॥४३॥
पूर्णयोगी प्रारब्धवशें । लौकिकीं जैसा तैसा दिसे । तेही पूर्णस्थिती तो असे । कांहीं अनारिसें करी ना करवी ॥४४॥

ब्रह्मस्वरुप श्रीशुक व्युत्थानदर्शेत येतांच परीक्षितीच्या घरीं आले

यापरी शुकाची समाधि जाणा । स्वयें आली समाधाना । तैंच परीक्षितीच्या सदना । विचरतां त्रिभुवना अवचट आला ॥४५॥
बाप भाग्य परीक्षिती । ब्रह्मनिधी लागला हातीं । ब्रह्मज्ञानाची ऐसी ख्याती । घातली जगतीं ज्ञानपव्हे ॥४६॥


चतुःश्लोकी भागवत – ब्राह्मणाचें सामर्थ्य

ब्राह्मणाचें सामर्थ्य

सभाग्य कोप ब्राह्मणाच । शापे अधिकार ब्रह्माचा । मिथ्या नव्हे ब्राह्मणवाचा । पूर्ण दैवाचा परीक्षिती ॥४७॥
शमीकाचा ब्रह्मचारी पुत्र । पाठकें दिधलें शिखासूत्र । त्याचेंनि शापें ब्रह्माधिकार । जाण ब्राम्हणमात्र ब्रम्हरुपी ॥४८॥
शाप देतील जरी ब्राह्मण । तरी वंदावे त्यांचे चरण । कोपा चढल्याही ब्राह्मण । पूर्ण तरी आपण वंदावे ते ॥४९॥
ब्राह्मण करुं आलिया घाता । त्याचे चरणी ठेवावा माथा । ब्राम्हणापरती पूज्यता । आन दैवता असेनाची ॥९५०॥
ब्रम्ह ब्राम्हण समसमान । हेंही वचन दिसे गौण । ब्रम्हदाते स्वये ब्राम्हण । यालागीं पूर्ण पूज्यत्वें श्रेष्ठ ॥५१॥
जें वस्तु असे ज्याअधीन । त्या वस्तूचे करितां दान । यालागी ब्रम्हस्वामित्वें ब्राम्हण । पूज्यत्वें पूर्ण तिही लोकी ॥५२॥
ब्राह्मण ब्रम्हातें प्रतिपादिते । तें ब्रह्म होते कोणी नव्हते । ब्रम्ह ब्राह्मणाचेनी हातें । पूर्ण प्रतिष्ठेतें पावले पैं ॥५३॥
यालागीं ब्रम्ह ब्राम्हणाधीन । कदा नुल्लंघी ब्राम्हणवचन । त्यांचे मंत्रमात्रें जाण । पाषाणाही पूर्ण ब्रम्हत्व प्रगटे ॥५४॥
जैसा मातेचा मोहकोप । तैसा ब्राम्हणांचा शाप । शापें फेडूनि पराचें पाप । वस्तू चिद्रूप कोपुनी देती ॥५५॥
ब्राम्हण कोपल्या अतिक्षोभता । एवढा लाभ आतुडे हाता । त्या ब्राह्मणां सुखी करितां । त्या लाभाची वार्ता न बोलवे वेदा ॥५६॥
यालागीं भूदेव ब्राह्मण । चालतें बोलतें ब्रह्म पूर्ण । त्यांची निंदा आवज्ञा हेळण । विरुद्ध आपण नवदावें कदा ॥५७॥
त्या ब्राह्मणांच्या कोपबोला । राजा ब्रह्माधिकारी झाला । भाग्यें श्रीशुक पावला । भाग्यें आथिला परीक्षिती तो ॥५८॥


चतुःश्लोकी भागवत – राजा परीक्षित

राजा परीक्षितीची योग्यता

या परीक्षितीचा अधिकार । पाहतां दिसे अतिसुंदर । धर्माहोनी धैर्य थोर । वीर्यशौर्यधर विवेकी पैं ॥५९॥
कृष्ण असतां धर्म भ्याला । कलीभेणें पाठी पळाला । हा कलीसी ग्रासुनी ठेला । धैर्यै आथिला अधिकारी ॥९६०॥
चक्र घेऊनी निजहस्ती । ज्यासी गर्भी रक्षी श्रीपती । त्याचे अधिकाराची स्थिती । वानावी पां किती वाचाळता ॥६१॥
जेणें गर्भी रक्षिलें निजस्थितीं । त्यातें परीक्षी सर्वांभूती । यालागी नांव परीक्षिती । येथवर प्रीती हरिचरणीं ॥६२॥
अर्जुनवीर्य निर्व्यंग । सुभद्रामहीचें गर्भलिंग । तो अधिकाररत्नउपलिंग । उभयपक्षीं चांग जन्मला शुद्ध ॥६३॥
राजा आणि सविवेक । सत्त्ववृद्धि आणि सात्त्विक । ब्रह्मज्ञानालागीं त्यक्तोदक । असे अतिनेटक परमार्थी ॥६४॥

परमार्थाचा योग्य अधिकारी म्हणून या राजाला श्रीशुकांनी भागवत सांगितलें – उपदेशाची परंपरा

ऐसें देखोनी परीक्षितीसी । कृपा उपजली श्रीशुकासी । मग बैसवोनी सावकाशीं । श्रीभागवत त्यासी निरोपिलें ॥६५॥
दुजें दवडून दृश्य दृष्टी । अति गुप्ततेपरिपाठीं । हरिब्रह्मयांची गुह्यगोष्टी । बोले कर्णपुटीं अतिएकांतीं ॥६६॥
तेंचि ब्रह्मयानें नारदासी । बैसोनियां एकांतवासी । दुजें नपडतां दृष्टीसी । अतिगुप्ततेसी उपदेशिलें ॥६७॥
तेंचि नारदमहामुनीश्वरीं । अतिगुप्त सानें कुसरी । एकांतीं सरस्वतीचे तीरीं । व्यासासी करी निजबोध ॥६८॥
तेंचि श्रीव्यासें अतिनिगुती । बैसवूनियां एकांतीं । श्रीभागवत श्रीशुकाप्रती । यथार्थस्थिती उपदेशिलें ॥६९॥
एवं परंपरा उपदेशस्थिती । गुप्तरुपें जे आली होती । तेचि प्रगट जगाप्रती । शुक परीक्षिती परमार्थ सांगे ॥९७०॥
हे त्यागाची निजवोज । सप्तरात्रें साधावया काज । ब्रह्मशापें ऋषिसमाज । मेळवूंनियां सहज त्यक्तोदक जाहला ॥७१॥
ब्रह्मशापनियमावधी । अंतीं संकटविषयसंधी । तेथें पावला ब्रह्मनिधी । ज्ञानक्षीराब्धी शुकयोगींद्र ॥७२॥

श्रीशुकमुखानें भागवत श्रवण करुन परीक्षिति ब्रह्मज्ञानी झाला

मरतया अमृतपान । दुष्काळीं जेवीं मिष्टान्न । अवर्षणीं वर्षे घन । तेवीं आगमन श्रीशुकाचें ॥७३॥
भक्तिनवरत्नतारुं बुडतां । धर्मधैर्याचा स्तंभ पडतां । तो परीक्षिती शापें पीडितां । झाला रक्षिता शुकयोगींद्र ॥७४॥
तेणें बैसवुनी ऋषिवर्यपंक्ती । तारावयातें परीक्षिती । प्रगट परिसतां त्रिजगतीं । श्रीभागवतार्थी शुक वक्ता ॥७५॥
धन्य वक्ता तो श्रीशुक । श्रवणे विसरवी तान्हभूक । त्यक्तोदका झालें पूर्णसुख । कथापीयूष परमामृतें ॥७६॥
ब्रह्मशापें सर्प दंशतां । मरणभयाची कथावार्ता । विसरवुनियां नरनाथा । पूर्णपरमार्था त्यासी लावी ॥७७॥
तें हें श्रीभागवत संपूर्ण । दशलक्षणीं सुलक्षण । श्रीशुकें करवुनी श्रवण । परीक्षिती पूर्ण ब्रह्म केला ॥७८॥
जेवीं दोराचें सापपण । दोरीच मिथ्या होय जाण । तेवीं देहाचें देहपण । देहस्था मीपण जाणतां मिथ्या ॥७९॥
देह असो अथवा जावो । आह्मी पूर्णपरब्रह्म आहों । यापरी परीक्षिती पहाहो । केला निः संदेहो श्रवणमात्रें ॥९८०॥


चतुःश्लोकी भागवत – संताकडे क्षमायाचना

श्रीएकनाथ म्हणतात मीं गुरुआज्ञेनें हा ग्रंथ मराठींत रचिला

श्रीशुकपरीक्षितीसंवाद । तोचि जगाला उदबोध । जो गुरुकृपा पावे प्रबोध । पूर्ण ब्रह्मानंद स्वयें होय तो ॥८१॥
ऐसें फावलें ज्या श्रीभागवत । ते पावले ज्ञानमथितार्थं । परमानुभवीं श्रीमत्संत । संतोषावया ग्रंथ म्यां हा केला ॥८२॥
त्यांचिया चरणरजकृपा । हे बोल कळले मज पाहा पां । वांचुनी ज्ञानार्थसंकल्पा । आकळे वाग्जल्पा हें घडे केवीं ॥८३॥
माझे वाकुडेतिकुडे आर्षबोल । त्यामाजी ब्रह्मज्ञान सखोल । नित्य नवी प्रेमाची ओल । हे कृपा केवळ त्या संतांची ॥८४॥

या धाडसाबद्दल संताकडे क्षमायाचना

श्रीभागवत आणि भाषे मराठे । हें बोलणें नवल वाटे । पूर्वीं नाहीं ऐकिले कोठें । अभिनव मोठें धिटावा केला ॥८५॥
मुख्य संस्कृतचि मी नेणें । यावर प्राकृत ग्रंथ करणें । जें कांहीं बोलिलों धीटपणें । तें क्षमा करणें जनकत्वें संतीं ॥८६॥
बालकाची सरे बडबड । तेणें माउलीची निवे चाड । मज आपल्याचें तुम्हां कोड । प्राकृतही गोड मानिला ग्रंथ ॥८७॥
माझें आरुषवाणें बोलणें । कळाकुसरी कौतुक नेणें । जें बोलविलें जनार्दनें । तेंचि ग्रंथकथनें कथिलें म्यां ॥८८॥
जें बळें ओढून नेइजे तैसे । तेंचि चालुनी आले आपैसें । तेवीं मन हिरोन हषीकेशें । बळात्कारें ऐसें बोलविले पैं ॥८९॥

मी निमित्तमात्र आहे

येथें पराक्रम नाहीं माझा । हा ग्रंथ आवडला अधोक्षजा । तेणें बोलविलें ज्या निजगुजा । त्या ग्रंथार्थवोजा वोडवला ग्रंथ ॥९९०॥
तो करवी तैसा मी कर्ता । हें बोलणें अतिमुर्खता । वाच्यवाचक जनार्दन वक्ता । ग्रंथग्रंथार्था निजरुप दावी ॥९१॥
यालागीं पदपदार्थखोडी । प्रेमरहस्य ज्ञानगोडी । हे माझ्या अंगीं नलगे वोढी । ग्रंथार्थधडगोडी जनार्दन जाणे ॥९२॥
घाणा उस गाळिल्या जाणा । गुळाचा स्वामी नव्हे घाणा । तेवीं मज मुखीं गुह्यज्ञाना । वदला ज्ञातेपणा मीपण नलगे ॥९३॥
ऐसें सदगुरुनीं नवल केलें । माझें मीपण निः शेष नेलें । शेखीं माझें नांवें ग्रंथ बोलिले । प्रेम आथिलें ज्ञानार्थरसे ॥९४॥
म्हणावें सदगुरु तूं माझा । की पूर्णब्रम्हसहजनिजा । तेथें मीपणाचा उपजे फुंजा । तुजमाजी तुझा निजवास पैं ॥९५॥
वस्त्र आणि घडीपालव । स्वरुप एक वेगळें नांव । परी घडी पालव अपूर्व । वस्त्रगौरव शोभेसि आणि ॥९६॥
तेवीं गुरुब्रम्हही एकचि घडे । परी गुरुदास्यें ब्रम्ह आतुडे । गुरुवाक्यें निजनिवाडें । ब्रम्हासी जोडे प्रतिष्ठा पैं ॥९७॥
गुरु ब्रह्म अभिन्नत्वें पूर्ण । तेथें शिष्यासी नुरे भिन्नपण । तेव्हा जन तोचि जनार्दन । जनार्दनी जन अभिन्नत्वें नांदे ॥९८॥
ऐसा निजात्मा श्रीजनार्दन । अनुभवितां नहोय आन । कायावाचामनबुद्धिप्राण । इंद्रियेंहि जाण जनार्दन झाला ॥९९॥
यालागीं माझें जें कां मीपण । तें माझें अंगी नलगे जाण । माझे वाचे जें वचन । तें श्रीजन्जार्दन स्वयें झाला ॥१०००॥
यालागीं वाचा जे वावडे । तें जनार्दना अंगी जडे । सैर करतांही बडबडे । समाधीची नमोडे मौन मुद्रा ॥१॥

जनार्दन माउलीची अकारण करुणा, तिचाच हा महिमा

सैराट धांवतां पाय । श्रीजनार्दन निजमाय । पदोंपदीं कडिये घेत जाय । रितें पाऊल पाहे पडोंनेदी ॥२॥
झणी कोणाची दृष्टि लागे । यालागीं मज पुढें मागें । सर्वदा तिष्ठे सर्वागें । मीचि आचार्यसगें निर्भय सदा ॥३॥
जनार्दनजननीअंगसंगें । भय तोचि निर्भय होऊं लागे । कळिकाळ नित्य निजांगें । येउनी पायां लागे अहर्निशी ॥४॥
जनार्दनजननीचा स्नेह मोठा । चित्प्रकाश केला दिवटा । मोडेल अविद्येचा कांटा । ह्नणुनी बोधखराटा भूमिका झाडी ॥५॥
ऋद्धिसिद्धीची कुरवंडी । वोवाळुनी दुरी सांडी । निजानुभवाचें ताट मांडी । स्वानंदाचे तोंडीं ग्रास देत ॥६॥
समाधीचे पालखीं सुये । अनुहुताचा हल्लर गाये । यापरी जनार्दन निजमाये । निजीं निजविती होये निजदासा ॥७॥
पुत्र शिष्य आणि सेवक । जनार्दनासी समान देख । परी पुत्रापरिस विशेष देख शिष्यासी निजमुख स्वानंदा दिला ॥८॥
तेथें जनार्दनी एक । रंकाचेंही निजरंक । त्यांही माजी कृपापूर्वक । निजात्ममुख सुखें दिधलें ॥९॥
त्या सुखाची निजगोडी । चतुः श्लोकींच्या पदमोडीं । श्रीसंतांलागी घोंगडी । मराठीं परवडी भावें केली ॥१०१०॥
जेवी सकळा लहानें । मिळोनी कणकीचें चाखणी करणें । तेवीं श्रीभागवत मूळ केणें । म्यां वाखाणणें महाराष्ट्री ॥११॥
नवल माउलीचें कोड । बाळक नासी तें लागे गोड । तेवीं मी संतांचें लडिवाळ बोबड । माझें मराठीचें कोड चौगुण करिती ॥१२॥
बाळक स्वयें खेळगेपणें । मातेसी लावी आंवतणें । त्याचे परवडी पडिले चणे । तरी माता तृप्त होणें चौगुणें प्रीती ॥१३॥
तेवीं माझिया बोला प्राकृता । ग्रंथार्थ परिसतां साधुसंतां । सुख उपजेल सर्वथा । निजस्वभावता निजबोध ॥१४॥
जेवीं बाळक बापाजवळी । त्याचेच ग्रास त्यासी घाली । कीं तो बाळकाच्या करतळीं । सुखावला तळी मिटक्या देत ॥१५॥
तेवी चतुः श्लोकी भागवता । व्यासें काढिलें मथितार्था । तो शोधुनी म्यां आईता । वोपिला संतां निजबाळकभावें ॥१६॥

या चतुः श्लोकीची रचना कोठें व कशी झाली

तेवी चतुः श्लोकीभागवता । कैसेनी झालें हस्तगत । प्रवर्तावया कारण येथ । ऐका सुनिश्चित सांगेन मी ॥१७॥
गोदावरीउत्तरतीरीं । चौ योजनीं चंद्रगिरी । श्रीजनार्दन तेथवरी । दैवयोगें फेरी स्वभावें गेलों ॥१८॥
तो अतिदीर्घ चंद्रगिरी । तळीं चंद्रावती नगरी । स्वयें चंद्रनाम द्विजवरी । वस्ती त्याचे घरीं सहज घडली ॥१९॥
तेणें चतुः श्लोकीभागवत । वाखणिलें यथार्थ युक्त । तेणें श्रीजनार्दन अदभुत । झाला उत्पुलित स्वानंदें पैं ॥१०२०॥
तेणें स्वानंदें गर्जोन । श्रीमुखें स्वयें जनार्दन । बोलिला अतिसुखावून । हे वर्णी गुह्यज्ञान देशभाषा ॥२१॥
तैं माझी मध्यम अवस्था । नेणें संस्कृत पदपदार्था । बाप आज्ञेची सामर्थ्यता । वचनें यथार्था प्रबोध झाला ॥२२॥
वसिष्ठाचे वचनासाठीं । सूर्यमंडळीं तपे छाटी । शिळा तरती सागरपोटी । श्रीरामदृष्टिप्रतापें ॥२३॥
विश्वामित्रवाक्यें जाण । कौलिका स्वतंत्र स्वर्गस्थान । तेवीं मी एकाजनार्दन । गुरुकृपा पूर्ण ज्ञानार्थकरितां ॥२४॥

गुरु आज्ञेमुळें ग्रंथार्थ स्वयमेवच प्रकट झाला

नवल आज्ञेची सामर्थ्यता । मी करुं नरिघें जरी ग्रंथा । तो ग्रंथार्थ मज आंतौता । बळेंचि ज्ञानार्था दाटोनी दावी ॥२५॥
हें सांडूनियां ग्रंथकथनं । मज कर्मातरी रिघतां जाण । त्या कर्मामाजीं गुह्यज्ञान । ग्रंथार्थ पूर्ण प्रकटे स्वयें ॥२६॥
गुरुआज्ञा अत्यंत लाठी । ग्रंथार्थ खेळे माझे दृष्टीं । आज्ञेनें पुरविली पाठी । फाकटगोष्टीमाजींही ज्ञान ॥२७॥
नित्यकर्म करितां जाण । ग्रंथीचें दिसे गुह्यज्ञान । मागें घालूनियां संध्यास्नान । ग्रंथार्थ पूर्ण प्रकटे पुढां ॥२८॥
जागृती दिसे ग्रथार्थज्ञान । ग्रंथार्थमय जाहलें स्वप्न । सुषुप्तीमाजीं दुर्जेनवीण । हें गुह्यज्ञान कोंदाटे पैं ॥२९॥
शब्दापुढें ज्ञान धांवे । ओंवीपुढें अर्थ पावे । जें जें जीवीं विवंचावें । तें तें आघवे ग्रंथार्थ होय ॥१०३०॥
सदगुरुआज्ञा अतिशयगाढी । रितें अर्धक्षण नसोडी । ते आज्ञा गौरव परवडी । ग्रंथार्थ जोडीजोडिला ऐसा ॥३१॥
यापरी श्रीभागवत । चतुःश्लोकी ज्ञानमथित । तो हा रचितां प्राकृत ग्रंथ । गुरुआज्ञा समर्थ प्रतापतेजें ॥३२॥
एका जनार्दना शरण । भावे वंदितां सदगुरुचरण । स्वप्नीं नदिसे जन्ममरण । ब्रम्ह परिपूर्ण होइजे स्वयें ॥३३॥
स्वयें महाभागवत । चतुःश्लोकगुह्यज्ञानार्थं । परमार्थे आथिला ग्रंथ । हा निश्चितार्थं निजबोधे ॥३४॥
एवं भागवतींच्या मंथितार्था । एकला एका नव्हे कर्ता । ग्रंथग्रंथार्थ अर्थविता । अंगें तत्त्वतां जनार्दन झाला ॥३५॥
एका आणि जनार्दन । नांवें भिन्न स्वरुपें अभिन्न । यालागीं ग्रंथाचे निरुपण । पूर्णत्वें पूर्ण संपूर्ण झालें ॥१०३६॥ श्लोक ॥४५॥
इतिश्रीभागवते द्वितीयस्कंधे श्रीशुकपरीक्षितिसंवादे एकाकारटीकायां नवमोऽध्यायः । श्रीकृष्णार्पणमस्तु श्लोक ॥४५॥ ओंवीसंख्या ॥१०३६॥

श्रीशुकउवाच । संप्रदिश्यैवमजनो जनानां परमेष्ठिनम् ।
पश्यतस्तस्य तद्रूपमात्मनो न्यरुणद्धरिः ॥३८॥
अंतर्हितेंद्रियार्थाय हरये विहितांजलिः ।
सर्वभूतमयो विश्वं ससर्जेदं स पूर्ववत् ॥३९॥
प्रजापतीधर्मपतिरेकदानियमान्यमान् ।
भद्रं प्रजानामन्विछन्नातिष्ठत्स्वार्थकाम्यया ॥४०॥
तं नारदः प्रियतमो रिक्थादानामनुव्रतः ।
शुश्रूषमाणः शीलेन प्रश्रयेन दमेन च ॥४१॥
मायां विविदिषन्विष्णोर्मायेशस्य महामुनिः ।
महाभागवतो राजन्पितरं पर्यतोषयत् ॥४२॥
तुष्टं निशाम्य पितरं लोकानां प्रपितामहम् ।
देवर्षिः परिपप्रच्छ भवान्यन्माऽनुपृच्छति ॥४३॥
तस्मादिदं भागवतं पुराणं दशलक्षणम् ।
प्रोक्तं भगवता प्राह प्रीतः पुत्राय भूतकृत् ॥४४॥
नारदः प्राह मुनये सरस्वत्यास्तटे नृप ।
ध्यायते ब्रह्म परमं व्यासायामिततेजसे ॥४५॥

श्रीएकनाथमहाराजकृत चतुःश्लोकी भागवत समाप्त.


चतुःश्लोकी भागवत – भागवत सार

करी जो सृष्टीची रचना । तया न कळे ब्रह्मज्ञाना ।
तो श्रीनारायणा । शरण रिघे ॥१॥
न कळे ब्रह्मज्ञान । म्हणोनी धरितसें चरण ।
नारायण परिपूर्ण । उपदेशी ब्रह्मा ॥धृ. ॥२॥
ब्रह्मा अत्रीतें सांगत । ब्रह्मज्ञान हदयीं भरित ।
अत्रि पूर्ण कृपें स्थित । दत्तात्रया सांगतसे ॥३॥
दत्तात्रय कृपें पूर्ण । जनार्दनी पूर्ण ज्ञान ।
जगचि संपूर्णं । एकरुप तयासी ॥४॥
एकाजनार्दनीं पूर्ण । ब्रह्मज्ञानाची खूण ।
बोधोनियां संपूर्ण । मिळविलें आपणीया ॥५॥


तुमच्या शेतमालाची मोफत जाहिरात करण्या साठी कृषी क्रांती ला अवश्य भेट द्या 

ref:transliteral 

चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत चतुःश्लोकी भागवत

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *