श्रीगुरुप्रतिपदा

श्रीगुरुप्रतिपदा

श्रीगुरुप्रतिपदा  (shree gurupratipada)  (माघ वद्य प्रतिपदा) श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज निजनांदगमन दिवस!

नमो सदा श्रीगुरु नृसिंहसरस्वती महाराज ।।

गुरु प्रतिपदा या दिवशी श्रीनृसिंह रस्वती स्वामी महाराज र्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जातांना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या.

बहुधान्य संवत्सर माघमास ।कृष्णप्रतिपदा शुभ दिवस । बृहस्पती होता सिंहराशीस । उत्तर दिशो होता सूर्य पैं ।।
शिशिरऋतु कुंभ संक्रमण । लग्नघटिका सुलक्षण । ऐसं शुभमुहूर्ती गुरु आपण । आनंदें प्रयाण करिते जाहले ।।
मध्यें प्रवाहांत पुष्पासनीं ।बैसोनि शिष्यांस संबोधोनी । आमुचा वियोग झाला म्हणौनि । तुम्हीं मनीं खेद न मानावा ।।
त्या गाणगापूरांत । आम्हक असोंच पूर्ववत । भावना धृढ धरा मनांत । तुम्हा दृष्टांत तेथें होईल ।।
आम्ही जातो आनंद स्थानासी । तेथें पाहलों याची खूण तुम्हांसी । फुले येतील जिनसजिनसीं ।।

श्रीगुरूचरित्र अ. ५३ ओवी ३१ ते ३५

दयेची, कृपेचीच जी शुद्ध मूर्ती …धाव घेई हे मन गाणगापुरी…..!!
ध्यान मूलं गुरु मूर्ति, पूजा मूलं गुरु पादुका। मन्त्र मूलं गुरु वाक्यं, मोक्ष मूलं गुरु कृपा।।

माघ कृष्ण प्रतिपदा. या तिथीला अतीव प्रेमादराने “श्रीगुरुप्रतिपदा” असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. द्वितीय श्रीदत्तावतार भगवान श्री नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांनी याच पावन तिथीला शैल्यगमन केले होते. श्रीगुरुप्रतिदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. याच पुण्यपावन तिथीला अनेक उत्सव असतात. अशा सर्व सुयोगांमुळे श्रीगुरुप्रतिपदा ही फार विशेष पुण्य-तिथी असून सर्वच गुरु संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी होते.

आजच्या तिथीला भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आपल्या ‘निर्गुण पादुका’ स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यति पूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णातीरावरील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या ‘विमल पादुका’ स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी, श्रीगुरुद्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या ‘मनोहर पादुका’ स्थापन करून गाणगापुरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे चोवीस वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या ‘निर्गुण पादुका’ स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत, हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल.
भगवान श्रीगुरु नृसिंहसरस्वती सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात् स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात, म्हणून या तीन पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती देत आहोत.

विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत, हे कोणालाच माहीत नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्रीगुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्रीगुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल, दोष नसणा-या पादुका. श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वत: श्रीनृसिंहसरस्वती महाराज म्हणतात,

तुम्हां सहित औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी ।
पूजा करिती जे तत्परीं । मनोकामना पुरती जाणा ॥
श्रीगुरुचरित्र १९.८१ ॥

देव वाडी सोडून निघाल्यामुळे दु:खी झालेल्या चौसष्ट योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की, जे कोणी भक्त तुम्हां योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा, सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात,

कल्पवृक्षातें पूजोन । यावें आमुचें जेथ स्थान ।
पादुका ठेवितो निर्गुण । पूजा करावी मनोभावें ॥
श्रीगुरुचरित्र ५१.२१ ॥

भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्षसम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी, असे स्वत: श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी म्हणतात. श्रीक्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत, हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही. म्हणून या पादुकांना ‘निर्गुण पादुका’ म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणा-या पादुका असाच घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात.
श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की ४ प्रसाद पुष्प येतील ती मुख्य शिष्यानी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायंदेवास मिळाले होते अनेक दत्त अवतारी सत्पुरुषाना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले तेही त्यांचे वंशजांनी प्रासादिक म्हणून ठेवलेले आढळते. आपल्या दर्शनासाठी त्याचा फोटो खाली देत आहोत.
श्री नृसिंह सरस्वती महाराज यांची कृपादृष्टी आपल्यावर राहील यात संशय नाही!


श्रीगुरुप्रतिपदा माहिती समाप्त

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *