हा दीनवत्सल महाराज – संत जनाबाई अभंग – ३१९
हा दीनवत्सल महाराज ।
जनासवें काय काज ॥१॥
तुझी नाहीं केली सेवा ।
दुःख वाटे माझ्या जिवा ॥२॥
रात्रंदिवस मजपाशीं ।
दळूं कांडूं तूं लागसी ॥३॥
जें जें दुःख झालें मला ।
तें तें सोसिलें विठ्ठला ॥४॥
क्षमा कीजे पंढरिराया ।
दासी जनी लागे पायां ॥५॥