श्री प्रल्हाद महाराज बडवे वृंदावन(vrundavan)
श्री विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातून पायऱ्या उतरून खाली लाकडी सभामंडपाकडे येताना डाव्या बाजूला महान विठ्ठल भक्त प्रल्हाद महाराज बडवे यांचे वृंदावन आहे. प्रल्हाद महाराजांची समाधी वाळवंटात असून मंदिराच्या दक्षिण दरवाजासमोर त्यांचे स्मृती मंदिर सुद्धा आहे. विठ्ठल मंदिरात सुद्धा त्यांचे स्मृती वृंदावन बांधण्यात आले आहे.
प्रल्हाद महाराज बडवे संक्षिप्त चरित्र (pralhad badve)
प्रल्हाद महाराज हे बडवे कुळातील थोर सत्पुरुष तुकोबांच्या समकालीन होवून गेले. शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाचे निमंत्रण प्रल्हाद महाराजांना होते. शिवछ्त्रपतींच्या राज्याभिषेकाला आलेल्या गागा भट्टांना वारकरी तत्वज्ञान कळावे म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर माउलींनी लिहिलेल्या अमृतानुभवाचे संस्कृत भाषांतर केले. याशिवाय त्यांनी पांडुरंग महात्म्य व अन्य साहित्यरचना केली आहे. इ.स. १६९५ ते १६९९ या काळात औरंगजेबाची छावणी मंगळवेढा येथे होती . त्याकाळात मंदिराला व देवाला उपद्रव होऊ नये म्हणून प्रल्हाद महाराज बडवे यांनी देवाची मूर्ती देगावच्या पाटलांकडे ठेवली होती. पुढे छावणी हलवल्यावर मूर्ती पुन्हा आणून पंढरपूरात देवाची स्थापना केली.
प्रल्हाद महाराजांच्या जीवनातील एक कथा खूप बोधप्रद आहे. पंढरपूर सोडून प्रल्हाद महाराज एकदा काशी यात्रेला जाणार होते. त्या दृष्टीने सर्व तयारी करण्यात आली पण श्री पांडुरंगानेच त्यांना दृष्टांत देऊन काशीस न जाण्याचे सुचवले. देवाने त्यांना मंदिरातच काशीदर्शन करविले. सर्व तीर्थ व क्षेत्र पांडुरंगाच्या पायाशी आहेत याची प्रल्हाद महाराजांना अनुभूती आली. प्रल्हाद महाराज बडवे यांचे वास्तव्य विठ्ठल मंदिराच्या जवळच होते. काकड आरतीपासून शेजारती पर्यंत देवाच्या सर्व उपचारांना ते मंदिरात उपस्थित रहात. एके दिवशी पहाटे काकड्यासाठी नेहमीपेक्षा लवकरच मंदिरात आले असता त्यांना श्री पांडुरंग वीटेवर ज्ञानोबा तुकाराम भजन करत आहेत असे दिसले. ज्ञानोबा तुकाराम हे भजन संप्रदायात रुढ करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.
प्रल्हाद महाराज बडवे पुण्यतिथी उत्सव(pralhad_maharaj_badve)
माघ वद्य एकादशीला प्रल्हाद महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मंदिरात साजरा केला जातो. यादिवशी देवाला याकाळात होणार पांढरा पोशाख होतो. उत्सवानिमित्त दागिने घातले जातात.