सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र

सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र

सद्गुरू सच्चिदानंद स्वामींचे चरित्र

श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेले स्वामी महाराजांना भगवान दत्तात्रयांनी दर्शन देऊन प्रासादिक पादुका व छडी दिलेली आहे तसेच पंढरपुरात संतचरणरज्यापासून वालुकामय पांडुरंगाची मूर्ती स्वामी महाराजांच्या झोळीत प्रगटली श्री पंढरीनाथ भगवंतानी दृष्टांत दिला नंतर श्रीविठ्ठल मूर्ती स्वामींकडे आली अशी सुंदर कथा चरीत्रात आलेली आहे।अनेक हस्तलिखित असेच वारकरी संप्रदायातील प्रस्थानत्रयी हस्तलिखित रावेर येथील मंदिरात बघायला मिळते .

भगवान दत्तात्रेययांनी स्वामींना माहूर येथे दर्शन दिले त्यावेळेस अलर्क ,यदु, जनार्दन व शांतीब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा प्रगट झाले दत्तात्रयांनी प्रासादिक पादुका व नाथांनी स्वामींना ज्ञानेश्वरी वर आधारित असलेल्या ज्ञानपटाचा उद्देश केला तो ज्ञानपट सुद्धा आपल्याला रावेर येथील दत्त मंदिरात बघायला मिळतो . सुमारे 200 वर्षानंतर नाथ महाराज पुन्हा या पृथ्वीतलावर दत्तात्रयान समवेत प्रगटले ही विशेष कथा स्वामींच्या चरित्रात बघावयास मिळते.

 

                                                                                                                                            

               

 


अध्याय – १

श्रीगणेशाय नमः | श्रीसद्गुरवे नमः | श्रीसरस्वत्यै नमः |
श्रीगणेशा अंबाकुमरा | विघ्ननाशना तुज नमो |
मंगलमूर्ते वक्रतुंडा | बुद्धिदाता तुज नमो ||१ ||
हंसवाहिनी तू सरस्वती | देई मजला तू मती |
येवो मज आता स्फूर्ती | श्रीसद्गुरू चरित्र लिहाया ||२ ||
हे शंकरा गंगाधरा | मदनांतक तू गौरीहरा |
नमन तुजसी महेश्वरा | कृपा करावी दासावरी ||३ ||
भाग्यलरेखा लिहसी तू | चतुरानन ब्रह्मा तू |
लेखनसवेचे भाग्य तू | लिहावेस माझ्या प्राक्तनी ||४||
राहसी तू क्षीरसागरी | तूंचि लक्ष्मीकांत श्रीहरी |
मजवरी आता कृपा करी | सद्गुरूकथा लेखन ||५||
यदु अलर्का एकनाथा | चरणी मी ठेवितो माथा |
श्रीसद्गुरूंची चरित्रकथा | लिहाया आशीष द्यावा ||६||
आता नमितो कुलदेवता | शांतवी मम चित्ता |
त्रिलोकी असे सत्ता | गुणगान लिहवी मजकडुनी ||७||
हे सच्चिदानंद स्वामी | दत्तात्रेय तू स्मर्तृगामी |
यश द्यावे मज ह्या कामी | चरित्र लेखनाच्या ||८||
श्रीसद्गुरूंची करणी | चालवावी माझी लेखणी |
गुण गाया न पुरे वाणी | श्रीसच्चिदानंद चरित्र हे ||९||
म्या मूढे चरित्र लिहावे | छे! तयांनी लिहवून घ्यावे |
मी निमित्तमात्र असावे | ही श्रीसद्गुरुंची इच्छा ||१० ||
श्रीसद्गुरू गभस्तीसम | मी तर असे काजव्यासम |
श्रीसद्गुरूकृपार्णव असीम | मी तयांतील एक मीन ||११||
श्रीसद्गुरू असती ज्ञानराशी | मी तर फक्त पापराशी |
नष्ट करिती झट्दिशी | ज्ञानशूल मारूनी ||१२ ||
चरित्र ऐका सद्गुरूंचे | कान करूनी सर्वांगाचे |
श्रीसच्चिदानंद महाराजांचे | चरणी शत शत नमन ||१३ ||
श्रीक्षेत्र माहूर नांदेड प्रांत | नजीकच्या एका ग्रामात |
लाहोरकर वंशात | दत्तात्रेय नामे एक द्विज ||१४||
लक्ष्मी असे त्याची भार्या | सुलक्षणी सुमुखी आर्या |
तिचे मन सदा देवकार्या | गुंतलेले असे नित्यनेमे ||१५ ||
दत्तात्रेयलक्ष्मी दंपती | उत्तम संसार करिती |
अन्नधान्याची नसे भ्रांती | सुरळीत चाले संसार ||१६ ||
काळा डाग जरी उमटला | शोभा न ये श्वेतवस्त्राला |
नसता फूल संसारवेलीला | संसार होई निरर्थक ||१७ ||
वंशात न होई पुत्रोदय | पतीपत्नींचा विचारविनिमय |
आता करावा काय उपाय | कोणा जावे शरण ||१८ ||
ईश्वरेच्छा बलीयसि | ती येई द्विजाच्या मानसी |
आळवावे श्रीदत्तासी | करावे अनुष्ठान ||१९ ||
माहुरगड असे बहु पवित्र | दत्ताचे तीर्थक्षेत्र |
तप करिती भक्त सत्पात्र | स्मरातृगामी दत्तप्रभू ||२ ०||
ह्याच माहूरगडावरी | जाऊन दत्त शिखरावरी |
अनुष्ठान करावे वैखरी | मनी विचार येई द्विजाच्या ||२१ ||
लक्ष्मीभार्या वदे द्विजासी | साथ द्याया मी येते तुम्हांसी |
जोडीने करु तपाचरणासी | फळ निश्चित मिळेल ||२२ ||
द्विज म्हणे हे लक्ष्मी | तू आहेस गृहलक्ष्मी |
जातो तपासी एकटाच मी | वाढव तू गृहशोभा ||२३ ||
पत्नीचा निरोप घेऊन | दत्तशिखरावरी जाऊन |
पद्मासन घालून | अनुष्ठान आरंभले दत्तविप्राने ||२४||
अनुष्ठान सुरू जाहले | बहुत दिन सरले |
दत्तविप्राने आळविले | धांव धांव दयाळा ||२५ ||
स्वप्नी विप्रास दृष्टांत होई | दत्तप्रभू दर्शन देई |
विप्रासी गहिवरून येई | लोटांगण घाली चरणी ||२६||
दत्तप्रभू वदले विप्रासी | मी प्रसन्न झालो तुजसी |
पुरे कर अनुष्ठानासी | होईल तुझी इच्छा पूर्ण ||२७||
वाढेल तुझा वंश | जन्मास येईल माझा अंश |
लाहोरकरकुलावतंस | जगी श्रेष्ठ होईल ||२८ ||
दत्ते ऐसे बोलिले वचन | पाणावले द्विजाचे नयन |
विप्र वदे धन्य जीवन | माझे जाहले आजि ||२९||
विप्रासी दत्ताज्ञा प्रमाण | केले गृहासी प्रयाण |
कथिले भार्येसी वर्तमान | श्रीदत्तकृपा जाहली ||३०||
दत्तवचनाची प्रचीती | लक्ष्मी जाहली गर्भवती |
दीप्तीमान तिची कांती | गर्भाच्या तेजाने ||३१||
लक्ष्मीसी लागले डोहाळे | असती बहु वेगळे |
मुखकमल तिचे उजळे | दत्तांश वाढे गर्भात ||३२||
कीर्तन प्रवचन श्रवण करावे | सदा दत्तभजन करावे |
दत्तासी नित्य आळवावे | ऐसे डोहाळे तिज असती ||३३||
दिव्य स्वप्न दिसत निद्रेत | सिद्धयोगी दर्शन देत |
दिव्य सुगंध पसरत | भोवताली लक्ष्मीच्या ||३४||
मिलाफ भक्ती आणि श्रद्धेचा | पाठ करी श्रीमद्भागवताचा |
लक्ष्मीच्या उपासनेचा | प्रत्यय येई लवकरी ||
नऊ मास भरले लक्ष्मीचे | वेध लागले पुत्राचे |
वायू सुटले प्रसूतीचे | आली आनंदाची वेळ ||३५ ||
तिथी भाद्रपद पौर्णिमेत | शके १७०२ असत
१८३६ असे संवत | पुत्रोदय झाला हो ||३६||
पुत्राकडे पाहता लक्ष्मीने | डोळे दीपले तेजाने |
साखर वाटली दत्तविप्राने | मंगल वाद्ये वाजू लागली ||३७ ||
सृष्टीत चैतन्य पसरले | गंधर्व किन्नर गाऊ लागले |
पर्णसंभारांनी वृक्ष सजले | जन्मताच दिव्य बालक ||३८ ||
सिद्धमुनी आणि यती | सूक्ष्मरूप घेऊन येती |
दर्शन घेऊनी आनंदित होती | ह्या दिव्य बालकाचे ||३९ ||
आसपासची मंडळी येती | दिव्य बालकासी कुरवाळिती |
दर्शनाने धन्य होती | बालक असे दत्तांश ||४० ||
ठेवावयास अभिधान | निश्चित केला बारावा दिन |
सुवासिनी करिती औक्षण | पाळण्यात घालती बालकासी ||४१ ||
गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या | दामोदर घ्या कोणी माधव घ्या |
अत्रिसुत घ्या कोणी श्रीदत्त घ्या | जोजविती बाळासी ||४२ ||
वंश हा धर्मपरायण | नांव ठेविले नारायण |
सुस्वरे गाती पाळणा | आनंदाने त्या वेळी ||४३||
जो जो जो जो रे | नारायणा | लाहोरकरकुलभूषणा ||४४||
पाहता मुखकमल | मन निर्मल | नष्ट होती पापे सकल ||४५||
अंश तू दत्ताचा | सर्व जगताचा | पालक तू सृष्टीचा ||४६||
जडमूढ ताराया | दत्तात्रेया | अवतरसी तू सदया ||४७||
आनंदे पाळणा गातो | तुज भजतो | वैभव शीर नमवितो ||४८ ||
आपुला सनातन धर्म | सांगे चार आश्रमांचे वर्म |
गृहस्थाश्रमाचे कर्म | करावे श्रद्धेने ||४९ ||
गृहस्थाश्रमी उत्तम संतती | होवो इच्छिती जे दंपती |
प्रथम अध्याय वाचा निश्चिती | मनोरथ पूर्ण होईल ||५० ||
वर्णन अवतार प्रसंगाचे | पुष्प प्रथम अध्यायाचे |
श्रीसद्गुरूंच्या चरणांचे | ध्यान सदा मज लागो ||५१||

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते प्रथमोSध्यायः


अध्याय – २

मागील अध्यायी आपण | जन्मकथा केली श्रवण |
आता पाहू बालपण | कैसे होते महाराजांचे ||१||
नारायण मूळ नाव असे | हे नाव प्रगट नसे |
भक्तांच्या मुखी वसे | दत्तबाबा हेचि नाव ||२ ||
दत्तभक्ती होती स्वामींची | सदा उपासना दत्ताची |
बालपणी केली साची | म्हणून दत्तमहाराज असे नाव ||३ ||
जशी वाढते चंद्रकला शशी | स्वामींची वाढ होय तशी |
खेळण्याची पद्धत खाशी | होती स्वामींची बालपणी ||४||
दगडाचे देव मांडूनी | तयांची पूजा करुनी |
भजन आरती गाऊनी | पूजन करिती बालस्वामी ||५||
खेळण्याची रीत असे न्यारी | तल्लीन होई स्वामींची स्वारी |
बुद्धी भक्ती त्यांची सारी | एकवटे देवापाशी ||६||
माहूर असे तीर्थक्षेत्र | रेणुकामाता परमपवित्र |
भक्तांवरी तिचे कृपाछत्र | विद्वान विप्रांचे आश्रयस्थान ||७||
विद्याभासाची अथश्री | संपादन करण्या धीश्री |
स्वामींचे पिताश्री | पाठविती तयांना विप्राकडे ||८||
विद्या केली संपादन | केले वेदांचे अध्ययन |
शास्त्रे पुराणांचे चिंतन | केले दत्तमहाराजांनी ||९||
अनेक भाषा अवगत | योग्य वेळी परभाषेत बोलत |
फारसी भाषेत संवाद साधत | जन आश्चर्य करिती ||१०||
अचानक मातृछत्र हरपले | एक संवत्सर झाले |
एकाएकी पितृछत्रही हरपले | स्वामींचे वय दहा वर्षे ||११||
संत एकनाथांचे झाले ऐसे | जन्मनक्षत्र मूळ असे |
आईवडिलांविना पोरके असे | नाथांचे बालपण ||
अशीच घटना स्वामींचे बाबतीत | आजूबाजूचे लोक म्हणत |
मूळ नक्षत्रावरी जन्म होत? | मूळावरी उठला मातापित्यांच्या ||
परि स्वामी दत्तस्वरूप होते | जन्ममृत्यू चक्रातून मुक्त होते |
आयुष्याची चिंता न भासते | कधीही दत्तस्वामींना ||
स्थितप्रज्ञ दत्तस्वामींनी | मातापित्यांचे श्राद्धकर्म करुनी |
एव्हढे लहान वय असूनी | शांततेत जीवन आरंभले ||
ज्या विप्राकडे केला अभ्यास | कलत्रासहित तयास |
बोलाविले रहावयास | स्वामींनी आपुल्या घरी ||१२ ||
कुटुंबासहित विप्र आला | स्वामींबरोबर राहू लागला |
आश्रय तयासी दिधला | स्वामींनी प्रेमाने ||१३||
सोय कशी करावी दिव्य बालकाची | हीच चिंता असे ग्रामस्थांची |
कठोर मुद्रा भासे दत्तस्वामींची | स्वामींची महती अज्ञात ||
आहे का मूळ नक्षत्रावर जन्मला? | आईवडिलांचा वियोग झाला |
काय अर्थ ऐशा जीवाला | प्रश्न पडला ग्रामस्थांना ||
शोधिली कन्या उपवर | ग्रामस्थांनी सत्वर |
घ्यावा हाती तिचा कर | विनविले स्वामींसी ||१४ ||
कष्ट घेता तुम्ही कासया | वैराग्य स्त्री असे जाया |
दत्तासी अर्पण माझी काया | वदले स्वामी ग्रामस्थांना ||१५||
घर अर्पण केले विप्रासी | त्यागिले त्या गृहासी |
केले स्वामींनी प्रस्थानासी | निःसंग होऊनिया ||१६ ||
नांदेड क्षेत्र गोदातीरासी | स्वामी आले रहावयासी |
करिती तेथे तपासी | दिव्य मुद्रा दत्तस्वामींची ||
श्वेत वस्त्र परिधान करून | कपाळी मोठे कुंकू लावून |
गोदावरी माता तेथे येऊन | वदली दत्तस्वामींसी ||
तुझे तप येईल फळाला | स्वये सद्गुरू येतील तुज भेटायला |
देतील तुजसी अनुग्रहाला |दत्तप्रभूंचा आज्ञेने ||
*एके दिनी शिष्यांसमवेत | हरिदासांचे आगमन होत |*
तेही दत्तस्वामींच्या शोधार्थ येत | अपूर्व असे ही घटना ||
एकनाथांचा संप्रदाय | आराध्य असे दत्तात्रेय |
दत्तकृपा अनुपमेय | असे हरिदासांवरी ||१८ ||
साक्षात आदिनारायण | परंपरा असे पावन |
आपण करुया अवलोकन | महान गुरुपरंपरेचे ||१९ ||
वंदुनी निज ज्ञान दायक | ब्रह्मरूप गुरु स्वये |
नासूनी अज्ञानतम हा | दाविले जग अद्वये ||
पूर्ण तत्व स्वरूप निश्चय | जेथूनी मज जाहला |
तो गुरू निज संप्रदाय | एकनाथचि वंदिला || २० ||
हंसरूपी आदिनारायण | ब्रह्मदेवा शिक्षिता |
ज्ञान हे निज अंतरी विधी | जाहला मज रक्षिता ||
ते पुढे निज गुह्य सांगुनी | अत्री ऋषी हा बोधिला |
तो गुरु निज संप्रदाय | एकनाथचि वंदिला ||
तो पुढे अवधूतरूपी | आदिनाथचि लाघवी |
दत्तरूपे अवतरोनी | संप्रदाया वाढवी ||
तेथूनी विस्तार बहु हा | साधकाप्रति दिधला |
तो गुरु निज संप्रदाय | एकनाथचि वंदिला ||
यावरी करुनी कृपा | निजज्ञान प्राप्त जनार्दना |
देऊनी अभयास करवी | कलिमलासही मर्दना ||
दुष्ट नष्ट पतित अधम | पातकी बहु तारिला |
तो गुरु निज संप्रदाय | एकनाथचि वंदिला ||
प्रेम देऊनी एकनाथा | एकरूप स्वये करी |
येऊनी सदनासि जेथे | श्रीहरी सेवा करी ||
तेथूनी मग पत्र पुष्पी वृक्ष बहु हा शोभला |
तो गुरु निज संप्रदाय | एकनाथचि वंदिला ||
एकनाथे नरहरीप्रति तत्व तेचि निवेदले |
नरहरीने कृष्णदासा | निजमुखे मग शिक्षिले |
कृष्णदास प्रसादवर | विश्वंभराप्रति दिधला |
तो गुरु निज संप्रदाय | एकनाथचि वंदिला || २५||
तेथूनी नारायणे निज | हित बरवे साधिले |
तेचि ज्ञान अगाध | उद्धवराज यासि अर्पिले ||
यापरी निजदास तारुनी | मार्ग जगी स्थापिला |
तो गुरु निज संप्रदाय | एकनाथचि वंदिला ||
मुक्त पदवीप्राप्त राजाराम | तो मनी आठवा |
जीवशिव वियोग नासुनी | आत्मरुपी भेटवा ||
पूर्णप्राप्त गुरुकृपा | हरिदास वर हा लाधला |
तो गुरु निज संप्रदाय | एकनाथचि वंदिला ||
हरिदासे श्रीदत्तस्वामी तत्व तेचि निवेदिले |
माधवासी दास पदवी | देऊनी रावेरासी स्थापिले |
नासूनी भव आपदा | वरी मुक्ती दे शेषाद्रीला |
तो गुरु निज संप्रदाय | एकनाथचि वंदिला ||
जो करील गुरुपरंपराष्टक पठन | इष्ट देवतेचे होईल दर्शन |
प्रतिष्ठान नगरीत देवकिनंदन | राहिला नाथांघरी सेवेत ||
अशी गुरुशिष्यपरंपरा थोर | सेवाया आला मुरलीधर |
संकटे टळतील घोर | गुरुपरंपराष्टक पठणाने ||
स्वामींवरती गुरुकृपा झाली | वृत्ती स्वस्वरूपी मिळाली |
समाधी अवस्था अनुभवली | स्वामींनी त्या समयी ||
श्रीसद्गुरू हरदास | आज्ञापिती स्वामींस |
करावे दक्षिणयात्रेस | आता तुम्ही निश्चये ||३०||
श्रीसद्गुरुआज्ञा प्रमाण | यात्रेसाठी प्रयाण |
स्वामींनी केले तीर्थाटन | एक वर्ष कालावधी ||
स्वामी जाती उत्तरेस | पाहती केदारनाथास |
नमस्कार करिती बद्रिनारायणास | हिमालयातील वास्तव |
अत्यंत थंड वारे वाहती | अंगारवरी फक्त कौपिन असती |
*दिशा हेच वस्त्र पांघरती | महायोगी दत्तस्वामी ||
दिनभर असे अनशन | फक्त करिती जलपान |
न घेती एकही अन्नकण | महातपस्वी दत्तस्वामी ||
झाडे असती घनदाट | अतिशय कठीण वाट |
परिस्थिती असे बहु बिकट | हिंस्र श्वापदांची संचार ||
ऐसे कठीण प्रसंग | परि स्वामी दत्तनामी दंग |
दिसे फक्त भक्तीरंग | दत्तस्वामींच्या मुखावरी ||
दत्तस्वामी हिमालयात | अनेक चमत्कार पाहत |
सिद्धयोग्यांची दर्शने होत | विविध गुहेत दत्तस्वामींना ||
हजारो वर्षांपासून | समाधीत राहून |
सिद्ध बसले ध्यान लावून | दत्तस्वामी पाहती तयांना ||
जमिनीपासून अधांतरी | सिद्ध बैसती आसनावरी |
काही राहती वृक्षांभीतरी | अगम्य असती ह्या गोष्टी ||
दत्तस्वामींचेसुद्धा दर्शन | ह्यातील काही सिद्ध घेऊन |
साक्षात दत्तात्रेयांसी पाहून | नतमस्तक होती ||
दत्तस्वामी साक्षात दत्तात्रेय | जैसी पात्रता तैसे दर्शन होय |
तीर्थयात्रा हिमालय | करुनी स्वामी येती स्वस्थळी ||
माहूरक्षेत्री पुनरागमन | मनी आले करावे दत्तध्यान |
रेणुकामातेचे घेऊन दर्शन | केले सर्व तीर्थस्थान
दत्तशिखरावरी एकांतस्थान | बैसले घालून स्थिरासन |
सुरू झाले दत्ताचे ध्यान | मंत्र अष्टाक्षरी जपोनी ||
श्रीसद्गुरू हरिदास | ह्यांनी दिलेल्या दत्त मंत्रास |
श्रद्धेने करिता ध्यानास | श्रीदत्तगुरु भेटतील ||
परंपरा संत एकनाथांची | जाणीव सामर्थ्याची |
आवर्तने मंत्रजपाची | करिती स्वामी एकांती || ३ ५||
जिथे अनुष्ठान करिती | हिंस्र पशू फिरती |
घनदाट झाडे असती | चहूबाजूंनी तेथे ||
दत्तशिखरावरी जाण्यास | पाऊलवाट नसे खास |
संतांचा असे निवास | भरती परंपरेतील तेथे ||
बारा वर्षे केले तप | व्यत्यय आणिती ताप आप |
दत्तगुरुंच्या समीप | ध्यानी असती स्वामी ||
दत्तगुरू विचार करिती | केव्हढी शिष्याची भक्ती |
प्रगट व्हावे ह्याच्या पुढती | परंपरा घेऊनी आपली ||
परंपरेतील सिद्धांस | घेऊ दे शिष्याच्या दर्शनास |
ओळख होईल जनांस | सिद्ध परंपरेची त्या वेळी || ४०||
आणि तो उगवला सुदिन | प्रगटले अत्रिनंदन |
रूप मलंगाचे घेऊन | स्वामींपुढती तेधवा ||
स्वामींच्या मस्तकावरी | हातातील छडी ठेऊनी बरी |
म्हणती वत्सा उघड तरी | तुझे नेत्र आता ||
ध्यान पावले भंग | उजळले स्वामींचे अंतरंग |
रोमांचित झाले अंग | मलंग दत्तप्रभूंसी पाहुनी ||
श्वेत अश्व विशाल असे | त्या अश्वात विश्वरूप असे |
ब्रह्मांड सामावलेले दिसे | स्वामींना त्या अश्वामध्ये ||
त्या अश्वाच्या पुढती | जनार्दनस्वामी उभे असती |
केशरी श्वेत पताका त्यांचे हाती | एकनाथही दिसती तेथे || ४५ ||
यदु अलर्क मागुती | मलंग स्वामींसी सेविती |
तयांसी चवऱ्या ढाळिती | ऐसे दृश्य पाहती स्वामी ||
जैसे निळोबांस्तव तुकोबा आले | शबरीगृही श्रीराम पातले |
तैसे स्वामींसाठी नाथ आले | कलियुगात सदेह पुनश्च ||
मलंगप्रभू वदले स्वामींसी | काय हवे आता तुजसी |
स्वामी वदले द्यावे पादुकांसी | पुनीत करावे दत्तराया ||
छडी अन् प्रसाद पादुका | मलंगप्रभू देती विवेका |
ठेऊनी पादुका मस्तका | आनंदभरित होती स्वामी ||
नाथ महाराज सांगती | परंपरेची देती माहिती |
ज्ञानपटाची महती वर्णिती | ज्ञानेश्वरी असे आधार || ५० ||
स्वामी करिती स्तुती | आत्मानंद पावती |
स्वस्वरूपी लीन होती | स्तुतीपर पद म्हणती ||

|| पद ||
दत्त माझे गुरू मलंग अवतार | दाविती मजला पैलतीर |
मज पामरासी दर्शन देती | होऊनी आरूढ अश्वावरती ||
अलर्क यदु अन् जनार्दन | संत एकनाथ देती दर्शन ||
प्रसाद पादुका पवित्र ही छडी | भवबंधनाचे पाश तोडी ||

|| ओवी ||

सर्वांच्या चरणावरती | स्वामी मस्तक ठेविती |
त्यानंतर अंतर्धान पावती | परंपरेसहीत मलंगप्रभू ||
हा अध्याय जो वाचेल | दत्तासी तो आवडेल |
श्रीसद्गुरुंची कृपा होईल | करितो वैभव नमन ||५३||

इति श्रीसद्गुरूसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते द्वितीयोSध्यायः


अध्याय – ३

मागील अध्यायी वाचले | एकनाथांनी वर्णन केले |
ज्ञानपटाचे मर्म सांगितले | उलगडून स्वामींना ||
मुक्ताई सोपानदेवासी | ज्ञानपट दिधला खेळण्यासी |
ज्ञानेश्वरांनी केले निर्माणासी | फक्त ज्ञानी लोकांसाठी ||
माऊलींनी नाथांसी समजाविला | नाथांनी स्वामींसी कथिला |
स्वामींनी हुबेहुब रेखाटिला | ज्ञानपट असे पवित्र ||
ज्ञानपट सापशिडीचा खेळ | भगवद्भजनी ठेवा वेळ |
पाप पुण्याचा जमावा मेळ | ऐसा हा पट आगळा ||
अंगी असती सद्गुण | पुण्याची शिडी चढून |
पवित्र लोकी जाऊन | पुण्यात्मा घेई विसावा ||
अंगी असती अवगुण | सर्प टाकी गिळून |
नरकलोकी जाऊन | यातना भोगी जीवात्मा ||
मनी उपजे दया | प्राप्त होतो जनलोक तया |
यज्ञ आवडी बहु जया | स्वर्गलोकी जातो जीवात्मा ||
तपश्चर्या ज्याची असे | तपोलोक प्राप्त होतसे |
सदा धर्माने जो वागतसे | जाई तो इंद्रलोकी ||
वैराग्याने मन तप्त | इंद्रलोक होतो प्राप्त |
परमार्थाने जीवन व्याप्त | गुरुपद मिळते जीवासी ||
भक्ती असे सर्वश्रेष्ठ | प्राप्त होतसे वैकुंठ |
सुधर्म जो करी वरिष्ठ | सायुज्यपद प्राप्त होय ||
मनी असे ज्याच्या कपट | नरक प्राप्त होई दुर्घट
प्राप्त सर्पयोनी सरपट | पापवासना धरिता मनी ||
हिंसा करिता निशिदिनी | प्राप्त कीटकयोनी |
परदारा भोगता झणि | दुर्गती प्राप्त होतसे ||
ज्याने ब्रह्मद्वेष केला | त्याचा कुलक्षय झाला |
कुंभपाक नरक मिळाला | धरिली द्रव्य अभिलाषा ||
क्रोध अतिहानीकारक | जीवात्म्यासी मृत्यूलोक |
निंदा करिता असुरलोक | प्राप्त होई जीवासी ||
ज्ञानपटाचे ऐसे वर्णन | सावध व्हावे श्रोतेजन |
शास्त्रसंमत असावे वर्तन | पुण्यसाठा करावा ||
ज्ञानपटाचे ज्ञान व्हावे | गुरुभक्ती करा शुद्ध भावे |
स्वामी गादीपुरूष चौदावे | दत्त नाथ परंपरेतील ||
स्वामींमुळे सर्व वैष्णवांसी | ठेवा प्राप्त झाला निश्चयेसी |
अभिमानास्पद कार्यासी | केले श्रीदत्तस्वामींनी ||
मागील अध्यायी श्रोतेजन | वर्णिले दत्त दर्शन |
झाले स्वामींलागून | परंपरेसहित हे अवघे ||
स्वामींच्या आले मनास | जावे आता तीर्थयात्रेस |
स्वामी निघाले उत्तरेस | बद्रिकाश्रमी राहिले ||
केदारनाथासी पाहिले | विश्वेश्वरासी वंदिले |
लाहोर येथे वास्तव्य केले | सहा मास स्वामींनी ||
होता काळ मोगलाईचा | छळ होई साधुसंतांचा |
वेश घेऊनी फकिराचा | फिरती स्वामी तये वेळी ||
कफनी अंगावर असे | लंगोटी कटेवर दिसे |
हाती झोळी घेतसे | कमालुद्दीन ऐसे नाव सांगती ||
लोक समजती मुसलमान | न करिती अवमान |
स्वामींच्या मुखी असे नाम | दत्त दत्त ऐसे नित्य ||
स्वामींची उत्तरयात्रा संपली | स्वारी दक्षिणेकडे निघाली |
नर्मदा नदी दिसली | परिक्रमा करावे मनी आले ||
स्वामींनी केले नर्मदास्नान | केले तिला सादर वंदन |
सद्गदित झाले तयांचे मन | सुरू केली परिक्रमा ||

||श्लोक ||

यानि कानि च पापानि जन्मान्तर कृतानि च |
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे ||

||ओवी ||

परिक्रमा अवघड असे | हिंस्र श्वापदांची भीती असे |
चोर लुटूनी नेतसे | परिक्रमावासींना ||
कडुलिंबाचा पाला खाऊन | नर्मदाजल पिऊन |
आले परिक्रमा करुन | मनदेहशुद्धीस्तव ||
श्रीदत्तप्रभूंचा संदेश आला | पुनश्च जावे परिक्रमेला |
सिद्ध झाले परिक्रमेला | स्वामी दत्ताज्ञेप्रमाणे ||
गोमूत्र सेवन करून | नर्मदाजल पिऊन |
द्वितीय परिक्रमा करुन | आले पुन्हा स्वामी ||
दत्तसंकेतानुसार | परिक्रमेसी निघाले सत्वर |
अनेक संकटे आली घोर | परिक्रमा मार्गात ||
एके ठिकाणी दलदल असे | पाय चिखलात रुतलासे |
देह खोलखोल जातसे | दलदलीत स्वामींचा ||
प्रयत्न केले पुष्कळ | परंतु ठरले निष्फळ |
नर्मदामैय्या केवळ | वाचवू शकेल स्वामींना ||
स्वामी नर्मदेचा धावा करिती | आर्ततेने साद घालिती |
माते तुझ्यावीण सद्गती | कोण देईल आता ||
मी येथेच रहावे ऐसे | माते तुला वाटते का कसे |
तुझी इच्छा असेल तसे | होईल आता निश्चित ||
तू माय मी लेकरु | तू गाय मी तव वासरू |
माझी नाव ने पैलपारु | मज दूर नको करु ||
अचानक दिव्य प्रभा दिसे | नर्मदामैय्या प्रगट होतसे |
दलदलीतून बाहेर काढीतसे | वदे ती जा बाळा जा ||
पाहूनी मैय्याचे रूप | स्वामींसी वाटे अप्रूप |
आनंद झालासे अमूप | नर्मदास्तुती करिती स्वामी ||
अगणित तीर्थे पृथ्वीवरती पवित्र तीर्थ नर्मदा
जडमूढजन सुखविसी माते नष्ट तयांच्या आपदा ||१||
प्रलयंकारी राहसी स्थिर वर्णितसे स्कंध पुराण
अठरा पुराणांमध्ये श्रेष्ठ असे तुझे नर्मदापुराण
अथर्ववेदासम पावित्र्य तुझे पुण्यसाठा दर्शनमात्रे
तुझ्याच दोन्ही तटांवरती साठ हजार तीर्थक्षेत्रे
षड्गुणैश्वर्य देसी माते जे करिती तुझी परिक्रमा
भक्तिभावे शरण येता उद्धरिसी तू दुष्टाधमा
अमृतासम असे तुझे जल हे करावे नर्मदास्नान
संत सत्पुरुष स्तविती तुजसी मी बालक आहे सान
अधिदैविक अधिभौतिक आणिक आध्यात्मिक त्रिताप
झडकरी तुझ्या जलस्पर्शाने सर्व निवती आपोआप
गोकुळाचे पालन करी जैसा अमुचा कृष्णकन्हैय्या
सांभाळिसी तू शरणागतासी तू अमुची नर्मदामैय्या
पुनीत झालो तुझ्या दर्शने नमितो मी दास दत्ता
नर्मदास्तवन गाईल जो नर सुखवी तू त्याच्या चित्ता ||८||
तिसऱ्या परिक्रमेत | नर्मदा दर्शन देत |
स्वामी कृतकृत्य होत | पावले ते समाधान ||
तीन गाकर बनवत | एक गाईसी अन् एक विप्रासी देत |
एक स्वतः सेवन करित | तिसऱ्या परिक्रमेत स्वामी ||
नर्मदा परिक्रमा केल्यावरी | स्वामी आले इंदौरी |
तेथे एका टेकडीवरी | वास्तव केले तयांनी ||
स्वामींचे तेज अद्भुत | विशाल नेत्र असत |
जटा दाढी वाढत | स्वामी तल्लीन दत्त नामात ||
गोरगरीब दर्शना येत | आपुली व्यथा सांगत |
स्वामी दुःखे निवारत | भक्तांची सर्वदा ||
तुकोजीराव होळकर | राजा असे इंदौर |
असे प्रीती स्वामींवर | मेणा पाठविती स्वामींसी ||
स्वामी बैसले मेण्यात | होळकरी राजवाड्यात |
तुकोजीराव पूजा करत | षोडशोपचारे स्वामींची ||
विपुल दिले धनधान्य | सेवा मम करावी मान्य |
होई माझे कुळ धन्य | प्रार्थना केली तुकोजींनी ||
स्वामी स्वीकार न करत | गोरगरिबांना वाटून देत |
स्वतः निःसंग राहत | तुकोजींना दुःख होई ||
तुकोजीरावांची विनंती | गावांचे इनाम देती |
देवांचा नैवेद्य होऊ दे म्हणती | तुकोजीराव स्वामींना ||
स्वामी म्हणती तुकोजीसी | अरे कासया दान करिसी |
नको अत्रिनंदनासी | तुझे सर्व वैभव ||
एकाएकी तेथून निघत | येती खांडवा ग्रामात |
असे ते मध्यप्रदेशात | पद्मकुंडी राहिले स्वामी ||
किर्र झाडी एकांत | हिंस्र पशूंचा आकांत |
परि स्वामी असती ध्यानांत | सदा दत्तप्रभूंच्या ||
बजाज आडनाव एक नारी | होती बहुत म्हातारी |
घाली तेथे येरझारी | दुरुन पाही स्वामींना ||
आजानुबाहू स्वामी असती | दाढीजटा शिरी वाढती |
डोळे टपोरे असती | स्वामींचे रूप तेजस्वी ||
तेथे ही वृद्ध नारी | लाकडे, गोवऱ्या गोळा करी |
निशिदिनी नमस्कार करी | श्रद्धेने ती स्वामींना ||
‘चल रंडे भाग यहाँ से’ | स्वामी ओरडत ऐसे |
दगड भिरकावून देतसे | तिच्या दिशेने स्वामी ||
तरीही ती वृद्ध नारी | नित्य नमस्कार करी |
मस्तक ठेवी चरणांवरी | एके दिनी स्वामींच्या ||
वदे ती स्वामींसी | द्यावे मज आशीर्वादासी |
यावे मम गृहासी | स्वामी म्हणती ‘तथास्तू’||
स्वामींची झाले आगमन | वृद्धेने केले त्यांचे पूजन |
लाडू केले मूग घालून | अर्पण केले स्वामींना ||
स्वामींनी हा लाडू फोडून | दिला सर्वदूर भिरकावून |
त्या दिवसापासून | दारिद्र्य गेले वृद्धेचे ||
वृद्ध स्त्रीची परिस्थिती सुधारत | खांडवा मुंबई बाजारात |
एका खांबाची स्थापना करवून घेत | स्वामींच्या हस्ते ती वृद्धा ||
तेथे बांधले मोठे घर | वाढला बजाज परिवार |
करिती दिवाळी सणवार | पूजा खांबाची अद्यापि ||
स्वामींनी दिली श्रीमंती | ऐशा लीला करिती |
विठुमंदिरी निवास करिती | खांडवा येथे स्वामी ||
हे बुद्धीच्या दातारा | नमन श्रीसद्गुरूवरा |
गोड मानूनी कृपा करा | तिसरा अध्याय अर्पण || ५९ ||

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते तृतीयोSध्यायः


अध्याय – ४

मागील अध्यायी कथिले | स्वामी विठुमंदिरी बैसले |
खांडवा गाव असे भले | मध्यप्रदेश प्रांतातील ||
सदा दत्तनामाचा जप | स्वामींचे असे ऊग्र तप |
अष्टसिद्धी तयांच्या समीप | हात जोडोनी उभ्या ||
त्या विठ्ठल मंदिरी | विठ्ठल रुक्मिणी मूर्ती गोजिरी |
चाळ बांधून पायावरी | स्वामी करिती विठुस्तुती ||
तो पाहूनी पांडुरंग | स्वामी होती भजनी दंग |
सहज मुखी येई अभंग | वर्णन करिती स्वामी ||
उठे विठ्ठल सावळा | झाली पहाटेची वेळा |
सडा घाली चोखामेळा | नाम घेई विठूचे ||१ ||
आरास रांगोळी फुले | मंडपी तोरणे झुले |
संत सखु शुद्ध जले | स्नान घाली विठूला ||२ ||
संत नामदेवे शेला | पीतांबर आणियेला |
अर्पिले शुभ वस्त्राला | विणे नामाचे धागे ||३ ||
श्री नरहरी सोनार | अर्पी गोफ आणि हार |
रूप सगुण साकार | सुखवी लोचनासी ||४||
श्री संत सावता माळी | आणी फळे भाज्या केळी |
प्रेम आरती ओवाळी | विठाई माऊलीची ||५||
संत श्रेष्ठ रोहिदास | वंदी विठू चरणास |
देई चर्मपादुकांस | विठ्ठलाचे चरणी ||६||
बनवी गोरा कुंभार | मडकी विविधाकार |
विठू जयजयकार | ऐकू येई सर्वांना ||७||
संत जनाबाई संगे | धान्य दळण्यात रंगे |
विठूराया जनी सांगे | दर्शन दे मजला ||८||
संत तुकाराम देहू | देह चरणासी वाहू |
कान्होपात्रा नृत्य पाहू | पांडुरंगासी ध्याऊ ||९||
एकनाथ ज्ञानेश्वर | भेटला ज्यांना ईश्वर |
पहावा परमेश्वर | सर्वभूतांठाई हा ||१०||
प्राप्तीसाठी नारायण | संत देती शिकवण |
करावे नामस्मरण | नित्यनेमाने सदा ||११||
ह्या विठ्ठलमंदिराचा मालक | छोटू पटेल असे अर्चक |
यज्ञी जैसा पावक | तैसे शुद्ध अंतःकरण ||
मंदिरी यावे विनंती करी | छोटू पटेल वरचेवरी |
स्वामी करिती इच्छा पुरी | बऱ्याचवेळा जाती मंदिरात ||
एके दिनी मंदिरात | स्वामी बैसले असत |
दोन युवती तेथे येत | रडती स्वामींसमोरी बैसून ||
स्वामी वदले तयांलागून | का तुमचे मुख म्लान |
किमर्थ हे रुदन | सांगावे मजलागी सत्वरी ||
दोघी वदती स्वामींसी | जाणून घेण्या भविष्यासी |
पुसले आम्ही ज्योतिष्यासी | कधी होईल पुत्रोदय || २० ||
तेव्हा तो ज्योतिषी म्हणे | पाहूया कुंडलीचे काय सांगणे |
न दिसती पुत्रलक्षणे | एक युवती होई वांझ ||
दुसऱ्या युवतीसी | न होईल कधी पुत्रासी |
परंतु एका कन्येसी | अवश्य जन्म देईल ती ||
स्वामी हसले प्रसन्नतेने | श्रीफळ दिले स्वहस्ताने |
आशीर्वचपर वचने | वदती स्वामी युवतींना ||
काळजी करु नका | माझे शब्द तुम्ही ऐका |
वांझ युवतीसी नेटका | होईल पुत्र प्राप्त ||
त्यानंतर दुसऱ्या युवतीस | प्राप्त होई कन्येस |
निश्चिंत करावे संसारास | आशीर्वाद माझे तुम्हांस ||
स्वामीवाणीनुसार | दोघी राहिल्या गर्भार |
झाले कन्यापुत्र मनोहर | आजही वंश असे त्यांचा ||
खांडवा विठ्ठल मंदिरात | स्वामी चमत्कार करत |
होवोनी सावधचित्त | ऐका कथा श्रोतेहो ||
विठुराऊळी एका शुभतिथीस | मध्याह्नी भोजनास |
बहु अतिथी जमले खास | अन्नदान सदावर्त चालतसे ||
सर्व अतिथी यजमानांनी | स्वामींसी केली विनवणी |
बैसावे आपण आता भोजनी | कृपा करावी गुरुराया ||
विहीर असे मंदिराजवळ | करण्यास्तव शरीर निर्मळ|
पाण्याने भरले घंगाळ | स्वामींनी स्नानासाठी ||३ ०||
स्वामींचे स्नान सुरु होत | यजमान विविध पदार्थ वाढत |
चटणी कोशिंबीरी असत | ताटात अन्न षड्रसाचे ||
तुपाने होतसे अन्नशुद्धी | तूप वाढावे ऐसी बुध्दी |
यजमानांची आर्थिक समृद्धी | असे बहुत त्या वेळी ||
पाकशाळेत यजमान जाती | आज्यपात्र रिकामे पाहती |
मनी बहुत चिंतित होती | भोजन कैसै घृताशिवाय ||
इकडे स्वामी स्नान करिती | कौपिन भस्म धारण करिती |
तात्काळ यजमान धाव घेती | स्वामींपाशी तेधवा ||
स्वामींना वदती यजमान | थोर असे तुमचा महिमान |
करावे संकट निवारण | तूप संपले काय करु ||
स्वामी मिटती दिव्य नेत्र | हाती धरुनी घृतपात्र |
विलंब न करिती क्षणमात्र | पाणी ओतती विहिरीचे ||
घृतपात्र जलाने भरले | स्वामींनी यजमानासी दिधले |
ह्यातील तूप वाढा वदले | सुरू करा आता भोजन ||
घृतपात्रातील ते घृत | त्यावेळी सतत वर्धित होत |
त्याचा क्षय न कदापि होत | कितीही वाढले तरीही ||
ऐसा स्वामींचा चमत्कार | अष्टसिद्धी तयांच्या चाकर |
दादाजी मंडलोई साक्षीदार | असती ह्या घटनेचे ||
ऐश्या लीला करुन | बऱ्हाणपूरी जाऊन |
तापीकाठी पर्णकुटी बांधून | त्यात राहती स्वामी || ४० ||
सातपुड्याच्या पायथ्यावरी |तापीच्या नदीकिनारी |
स्थापन दत्तपीठ मनोहारी | ही दत्तात्रेयांची इच्छा ||
यास्तव बऱ्हाणपूरास | भक्त आणि संत दत्तस्वामींस |
एकत्र आणूनी लीलेस | दाविले श्रीदत्तप्रभूंनी ||
तेथे एका देवालयात | पूजा – अर्चा करित |
उत्तम भजन गात | सुस्वर असे स्वामींचा ||

||अभंग ||

चला घालू हो प्रदक्षिणा श्रीदत्तस्थानाला |
मुखी घोळवत ठेऊ सदा श्रीदत्तनामाला ||धृ ||
टाळ मृदुंग वीणा घेऊ नृसिंह वाडीसी जाऊ ||
भजनानंदी तल्लीन होऊ भक्तीरसात न्हाऊ ||१ ||
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ऐसा गजर ऐकला ||
दर्शनासी भक्त येती पीठापूर *कुरवपुराला ||२ ||
औदुंबर गिरनार माहूर असे श्रीदत्त तीर्थक्षेत्र
सद्भक्तांवर नित्य असे श्रीदत्तगुरु कृपाछत्र ||३||
चला चला रे सर्व मिळून जाऊ गाणगापुरासी |
खांद्यावरी घेऊया श्रीदत्ताच्या पालखीसी ||४||
प्रदक्षिणा करुनी भक्ता पुण्य लाभतसे
हात जोडोनी दत्तदास चरणी नमितसे ||५||

||ओवी ||

बऱ्हाणपुरी भाविक जन | घेती स्वामींचे दर्शन |
परगांवाहूनी भक्तजन | येती बहु दर्शनासी ||
तेथे एक भट दांपत्य | तयांसी नव्हते अपत्य |
स्वामी दर्शनासी नित्य | येई दांपत्य नेमाने ||
दत्तस्वामी प्रसन्न होत | श्रीफलाचा प्रसाद देत |
भटांसी अपत्यप्राप्ती होत | अजूनही चाले वंश ||
प्रसादरूपी श्रीफलास | पूजूनी करिती दत्तजन्म उत्सवास |
आजही त्या परंपरेस | चालू ठेविले भट वंशाने ||
ह्या बऱ्हाणपुरात | शेषाद्रीबुवांची भगिनी राहात |
स्वामी तिच्याकडे जात | बऱ्याचदा निवासास्तव
रावेरचे शेषाद्रीबुवा असती | ते बऱ्हाणपुरी जाती |
स्वामीदर्शने कृतार्थ होती | स्वभगिनीगृही त्यावेळी ||
रावेरमधील ग्रामस्थांत | सुपडू शेट गृहस्थ असत |
शेषाद्रीबुवा तयांसी वदत | माझ्या मनीची इच्छा सांगतो ||
दत्तमहाराज नावे एक स्वामी | असती बऱ्हाणपूरी ग्रामी |
व्यक्तिमत्त्व बहुआयामी | आणावे आपुल्या रावेरी ||
घनःश्यामशेट अग्रवाल असती | मुजुमदारही सवे येती |
चितोडे बनिया सांगाती | विचार करती तैसा ||
रावेरमधील ग्रामस्थांनी | विचार केला सर्वांनी |
उत्तम बैलगाड्या शृंगारूनी | आले सर्व बऱ्हाणपुरात ||
त्यावेळी स्वामी बैसले असती | तापी नदीकाठावरती |
गाती स्वामी तापी स्तुती | अतिशय तन्मयतेने ||५०||
तुझ्या दर्शने जाहलो धन्य तापी
तुझ्या जलस्पर्शे उद्धरती पापी
सूर्यकन्या स्वसा शनैश्चराची तू
गंगा नर्मदा इतकी पवित्र तू
मास आषाढ शुक्ल सप्तमी तिथी
भूवरी प्रगट तू अवतीर्णतिथी
तुला वंदिता होई सौम्य शनीची दृष्टी
जीवन देसी जगी मुदित होतसे सृष्टी
सकलांवरी कृपा असे तुज विनवणी
दत्तदास नमितो तापी तुझ्या चरणी
दत्तस्वामींचे तेज पाहूनी | दंडवत घालती साश्रू नयनी |
हस्तक मस्तक जोडोनी | विनवीती रावेरकर ||
आपुल्या पदस्पर्शाने | यमुनेसी पूनित केले कृष्णाने |
त्रिपाद ठेऊनी वामनाने | पावन केले त्रैलोक्य ||
रामस्पर्श जेव्हा जाहला | तेव्हा उद्धरिले अहल्येला |
पावन केले पर्णकुटीला | सेवूनी बोरे प्रेमभरे ||
भारत असे देवभूमी | महाराष्ट्र असे संतभूमी |
पावन होवो रावेरभूमी | आपुल्या चरणस्पर्शाने ||
आम्ही बालके अनाथ | करावे आम्हांसी सनाथ |
तुम्हीच श्रीसद्गुरूनाथ | आमुची विनंती परिसावी ||
पुरवावे आमुचे मनोरथ | पहा हे सजविले वृषभरथ |
आम्ही करितो सारथ्य | न्यावयासी आलो आम्ही ||
ऐकूनी रावेरकरांची स्तुती | स्वामी तयांसी वदती |
साजशृंगार कासया लागती | आम्ही आहोत निःसंग ||
घेऊनी साजशृंगार सारा | तुम्ही जावे पुढारा |
आम्ही अवश्य येऊ रावेरा | शब्द देतो तुम्हांसी ||
रावेरकर झाले खिन्न | तेव्हा पडली मते भिन्न |
काय करावे आता अन्य | उपाय काही सुचेना ||
रावेरकर दुःखी भक्तजन | निघाले बैलगाडीत बैसून |
बैल गेले बहुत दमून | आले रावेर वेशीवरी ||६० ||
जैसी काशीत वाहे गंगा | पवित्र करी जी अंगप्रत्यंगा |
तैसीच नदी पाताळगंगा | पुनीत करीतसे रावेर ||
पाताळगंगेचा पवित्र तीर | तेथे पुरातन मारुती मंदिर |
त्या मंदिराजवळील विहीर | असे पाण्याने भरलेली ||
बैलगाड्या विहीरीजवळ | थांबल्या तेथे अंमळ |
प्राशन केले शुद्धजळ | तृषार्त रावेरकर मंडळींनी ||
त्या मारुती मंदिरात | सहज डोकावून पाहत |
एक सिद्धपुरुष दिसत | रावेरकर मंडळींना ||
मंडळी होती अचंबित | साक्षात दत्तस्वामी असत |
मंडळी स्वामींना विचारत | केव्हा आलात रावेरी ||
हास्यमुख स्वामी वदत | तुमच्या आधी आलो म्हणत |
रावेरकरांसी खात्री पटत | स्वामी साक्षात दत्तप्रभू ||
मुख्य मंडळी गावात जाती | ग्रामस्थांसी सांगती |
परब्रह्म आले वेशीवरती | करा तयारी स्वागताची ||
ध्वज तोरणे उभारली | उत्तम रांगोळी रेखाटली |
रावेर नगरी सजली | पालखी आणली ग्रामस्थांनी ||
दत्तस्वामी पालखीत बैसले | ढोल नगारे वाजू लागले |
दत्तनामाचा गजर चाले | पालखीच्या पुढती ||
पालखी चाले वाजत गाजत | रावेरवासी फुले उधळत |
दत्तस्वामी पालखी थांबवत | म्हणती येथे थांबतो मी ||
त्या जागी असे उकिरडा | वास येतसे घाणेरडा |
नाल्यात असे राडिरोडा| सांडपाणी वाहतसे ||
रावेरकर विनविती स्वामींसी | येथे न करावे वस्तीसी |
येथे नाल्याच्या काठासी | राहू नये स्वामी आपण ||
दत्तस्वामी वदले ग्रामस्थांसी | येऊ द्यावे दुर्गंधीसी |
मी राहीन ह्याच स्थानासी | नाही कुठे जाणार ||
होईल हे स्थान सुगंधी | जावा लागेल थोडा अवधी |
दत्तभक्तीचा जलधी | उचंबळून येईल येथे ||
दत्तस्वामींचे आगमन रावेरास | ह्या अध्यायी कथा सुरस |
वर्णून आता देतो विरामास | ह्या चौथ्या अध्यायासी ||
हे बुद्धीच्या दातारा | नमन श्रीसद्गुरूवरा |
गोड मानूनी कृपा करा | चौथा अध्याय अर्पण || ७६||

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते चतुर्थोSध्यायः


अध्याय – ५

मागील अध्यायी पाहिले | स्वामी रावेरग्रामी आले |
नाल्याजवळी वस्ती राहिले | पावन झाली ती जागा ||
उभारावे येथे राऊळासी | आले स्वामींच्या मानसी |
लाकडाचे मंदिर बांधायासी | लाकडे पाहिजेत चांगली ||
शेषाद्रीबुवांची स्वामीसेवा | म्हणती मज अनुग्रह द्यावा |
मला चरणासी ठेवा | शेषाद्रीबुवा प्रार्थिती स्वामींना ||
स्वामी देती अनुग्रहास | ठेविती वरदहस्तास |
पावन करिती शेषाद्रीबुवास | शेषाद्रीबुवा शिष्योत्तम ||
एकदा आले स्वामींच्या मनास | जावे आता माहूरास |
हा विचार शेषाद्रीबुवांस | सांगितला स्वामींनी ||
बुवांनी बैलगाडी जोडली | स्वामींची स्वारी निघाली |
वाहती शब्दसुमनांजली | दत्तस्वामी दत्ताला ||
शेषाद्रीबुवा आणि दत्तस्वामी | रंगून गेले दत्तनामी |
आले दोघे निबिड काननी | माहूरगडाच्या पायथ्याशी ||
मातृतीर्थ कुंड असे | परशुरामांनी तयार केलेसे |
तीर्थ बहुत पावन असे | स्नान करिता मिळे पुण्य ||
दत्तस्वामी वदले बुवांस | मी आता करितो स्नानास |
बैस तू ह्या स्थानास | मी येतोच झडकरी ||
स्वामी बोलले वैखरी | सूर मारिला कुंडाभीतरी |
शेषाद्रीबुवा चातकापरि | वाट पहात बसले ||
एक प्रहर उलटला | सूर्य अस्तास गेला |
भीती वाटली बुवांच्या मनाला | कुठे गेले स्वामी ||
स्नानासाठी उतरले कुंडात | कुठे गेले स्वामी तीर्थात |
कां अदृश्य झाले जळांत? | चिंता करिती बुवा ||
हाय माझ्या दुर्दैवा | स्वामींचा ठिकाणा कसा कळावा |
सांगावा काय धाडावा | रावेरासी आता मी ||
बुवांच्या मनी असे चिंता | स्वस्थता नसे तयांच्या चित्ता |
कुठे शोधू स्वामींसी आता | शेषाद्रीबुवा संकटात ||
स्वामींसी हाका मारिती | शेषाद्रीबुवा गडावरी जाती |
दत्तशिखरावरी पोहोचती | तेथे असती हिंस्र प्राणी ||
काही द्विज दिसती आसपास | त्या कण्वशाखी विप्रांस |
विचारावे ऐसे मनांस | आले शेषाद्रीबुवांच्या ||
कण्वशाखी विप्र सांगती | परंपरा असे भारती |
तेथे काही महंत असती | विचारावे तयांना ||
शेषाद्रीबुवा भ्रमण करिती | एक चौथरा पाहती |
दत्तस्वामी तेथे दिसती | संतांसवे बसलेले ||
पाहिले स्वामींचे हास्यवदन | शांत झाले बुवांचे मन |
बुवा करिती साष्टांगनमन | दिसे अनसूयागर्भरत्न ||
पाहुनिया ते दिव्य तेज | साक्षात अनसूयाअत्रिज |
शेषाद्रीबुवा द्विज | स्तुती गाऊ लागले ||

||अभंग ||

चाल – ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले
दत्तस्वामी दत्तात्रेय नव्हेत दोन्ही भिन्न
सेवा करिता तिन्ही देव होती प्रसन्न ||धृ||
रावेरग्रामी वसती आजानुबाहू दत्तस्वामी |
दत्तावतारी स्वामी वाणी रत दत्तनामी || १||
दत्तशिखरावरी आजि पाहिले मी डोळा
दत्तस्वामी फुलवीती दत्तभक्तीचा मळा ||२ ||

|| ओवी ||

साक्षात दत्तमूर्ती दिसली | शेषाद्रीबुवांची खात्री पटली |
दत्तस्वामी माउली | साक्षात दत्तावतारी ||
श्रेष्ठ असती सद्गुरू | साक्षात ईश्वराचा अवतारू |
नेती भक्तांसी पैलपारू | भवनदी पार करूनिया ||
त्रिगुणात्मक अवतार | संतांचा सगुण साकार |
तयांना करावा नमस्कार | देवाहून श्रेष्ठ संत ||
ईश्वरासी कैसे जाणावे | ईश्वरासी कैसे भजावे |
ईश्वरासी कैसे स्तवावे | संत देती शिकवण ||
ईश्वराहूनी श्रेष्ठतम | संत निवारिती अज्ञानतम |
नसे दुजा संतांसम | पवित्र कोणी संसारी ||
दत्तस्वामी बुवांसी म्हणती | आता थांबवावी फिरस्ती |
रावेरी करावी वस्ती | आदेश दत्तप्रभूंचा ||
पवित्र असे तापीकाठ | स्थापन करावे दत्तपीठ |
कण्वप्रदेश असे सुभट | मार्ग दाविती दत्तप्रभू ||
शेषाद्रीबुवांसमवेत | दत्तस्वामी आले रावेरांत |
घडलेला सर्व वृत्तांत | सांगितला बुवांनी ग्रामस्थांना ||
नित्य ब्राह्ममुहूर्ती उठावे | तापीस्नानासी जावे |
असे नित्यनेमे करावे | परिपाठ दत्तस्वामींचा ||
पांढऱ्याशुभ्र अश्वावरी | बैसूनी जाती तापी किनारी |
दत्तस्वामी वरचेवरी | स्नानसंध्यादि करावयासी ||
किल्ला असे बऱ्हाणपूरास | आला तो मोडकळीस |
वार्ता येतसे दत्त स्वामींस | योजना असे दत्तांची ||
किल्ल्याची लाकडे बहुत | कलाकुसर असे मजबूत |
आणूनिया रावेरांत | मंदिर उभारणी करावी ||
ह्या संकेतानुसार | लाकडे आणली सत्वर |
दत्तस्वामींनी उभारले मंदिर | रावेर ग्रामी तेधवा ||
तेथील एक कासार | बोलाविले तयासी सत्वर |
करावी दत्तमूर्ती तयार | स्वामी आज्ञापिती कासारासी ||
पंचप्राण पंचमहाभूते | पंचधातूंच्या प्रमाणाते |
स्वमुखे सांगितले कासाराते | दत्तस्वामींनी संकेताने ||
मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी तिथी | रावेर नगरी सोहळा करिती |
दत्तमूर्ती स्थापन करिती | दत्तस्वामी स्वहस्ते ||
स्वहस्ते दत्तस्वामींनी | दत्तात्रयांचे यंत्र तयार करुनी |
ठेविले ते पूजनी | विजयादशमीस पूजा होत ||
दत्तस्वामींचे असे वचन | अर्पावे चमेली पुष्प अन् चंदन |
हेचि दत्तात्रयांचे स्थान | बहुत पवित्र यंत्र असे |*
तेजस्वी दत्तमूर्ती पाहूनी | भक्तिभाव दाटे नयनी |
दत्तस्तुती स्फुरली वदनी | गाती दत्तस्वामी ||

|| दत्तस्तुती ||

चला घालू हो प्रदक्षिणा श्रीदत्तस्थानाला |
मुखी घोळवत ठेऊ सदा श्रीदत्तनामाला ||धृ ||
टाळ मृदुंग वीणा घेऊ रावेरासी जाऊ ||
भजनानंदी तल्लीन होऊ भक्तीरसात न्हाऊ ||१ ||
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ऐसा गजर ऐकला ||
दर्शनासी भक्त येती पीठापूर *कुरवपुराला ||२ ||
औदुंबर गिरनार माहूर असे श्रीदत्त तीर्थक्षेत्र
सद्भक्तांवर नित्य असे श्रीदत्तगुरु कृपाछत्र ||३||
चला चला रे सर्व मिळून जाऊ गाणगापुरासी |
खांद्यावरी घेऊया श्रीदत्ताच्या पालखीसी ||४||
प्रदक्षिणा करुनी भक्ता पुण्य लाभतसे
हात जोडोनी *दत्तस्वामी*चरणी नमितसे ||५||

||ओवी ||

अनंतराव कुलकर्णी नाम | तांदलवाडी असे ग्राम |
दत्तस्वामींवर श्रद्धा निष्काम | येती ते रावेरासी ||
अनंतरावांचे दोन सुत | सीताराम आणि नाना असत |
पित्यासवे रावेरी येत | दर्शनासी दत्तस्वामींच्या ||
दत्तस्वामी म्हणती अनंतरावांसी | तुझा ज्येष्ठ पुत्र द्यावा मजसी |
माझ्यासाठीच घेतले जन्मासी | सीतारामाने मर्त्यलोकी ||
अनंतरावांनी पुत्रासी अर्पण केले | दत्तस्वामींनी नामकरण केले |
माधव ऐसे नाम ठेविले | हेच असती माधवदास ||
जैसी सूर्य आणि छाया | दिसती एकाच ठाया |
तैसी माधवदासांसी काया | झिजली स्वामीसेवेत ||
तन मन धन अर्पून | दत्तस्वामींची सेवा करून |
सार्थक केले आपुले जीवन | माधवदासांनी ||
माधवदासांचे चरित्रसार | सांगता होय ग्रंथविस्तार |
माधवदास कथासार | पाहूया योग्य अध्यायी ||
जैसी मूर्ती विजयी पांडुरंगाची | नाथांघरी आली साची |
तैसीच मूर्ती गोपाळाची | येतसे दत्तस्वामींच्या मंदिरी ||
घेऊनी मलंग वेषास | दत्तात्रयदर्शन नाथांस |
तैसेचि दर्शन दत्तस्वामींस | दिधले अनसूयात्मजाने ||
परंपरा दत्तस्वामींची | असे संत एकनाथांची |
पुनरावृत्ती होतसे घटनांची | एकाच परंपरेत ||
देवही येती मूर्तीरूपात | दत्तस्वामींच्या मंदिरात |
चमत्कार घडती रावेरात | ऐका श्रोतेहो आता ||
मध्यप्रदेश प्रांत खरगोन ग्राम | रायरीकर असे कुलनाम |
तेथे असे कृष्णधाम | गोपाळकृष्णाची मूर्ती ||
रायरीकर विप्रासी दृष्टांत | पंधरा दिवस होई सतत |
विप्रासी सांगे भगवंत | मला नेई तू रावेरासी ||
विद्वत् सभा विप्राने बोलाविली | सर्वांसी दृष्टांत वार्ता सांगितली |
सर्वांसी सल्लामसलत केली | न्यावे का कृष्णासी रावेरी ||
सर्व द्विजवृंद सांगत | पुनश्च दृष्टांत जरी होत |
तरी न्यावा देवकीसुत | रावेरी निश्चयेसी ||
त्याच रात्री पुन्हा दृष्टांत | भगवंत होई क्रोधित |
का व्हावे तुझे दुमत | आज्ञा पाळ तू रायरीकरा ||
दुसरे दिनी रायरीकराने | कृष्णमूर्ती बांधली धोतराने |
दुःखी अंतःकरणाने | बैलगाडी जोडली ||
आपल्या सहकाऱ्यांसमवेत | बसला बैलगाडीत |
आला रावेरच्या वेशीत | रायरीकर विप्र ||
अचानक गाडीचे बैल बसले | उठविण्याचे यत्न झाले |
परंतु ते नाही फळले | रायरीकर विप्र चिंतित ||
रावेर ग्रामस्थ आले | रायरीकर विप्रासी पुसले |
धोतरात बांधून काय आणिले | ह्या मूर्तीचे काय प्रयोजन ||
तेव्हा रायरीकर म्हणती | आम्हांस श्रीकृष्ण आज्ञापिती |
दत्तस्वामींकडे न्यावे म्हणती | रावेर ग्रामात ||
तेव्हा रावेरकर गावकरी | म्हणती चला दत्तमंदिरी |
तेथे दत्तमूर्ती गोजिरी | सवे आहेत दत्तस्वामी ||
ऐसे ऐकून बैल उठती | सर्व गावकरी जमती |
दत्तमंदिरापाशी येती | गावकरी मूर्तीसमवेत ||
ह्या घटनेआधी काही दिन | दत्तस्वामींजवळी भक्तजन |
करावया ज्ञानामृत प्राशन | माधवदासांसवे बैसले ||
दत्तस्वामी म्हणती माधवदासांसी | चला उठा आता वेगेसी |
करावे आता व्यवस्थेसी | गोपालजी आ रहे है ||
त्यावेळी माधवदासांना | स्वामींचे बोलणे उमगेना |
आता पाहिली ही घटना | माधवदासांसी सर्व कळले ||
मूर्ती घेऊनी गावकरी | आले दत्तमंदिराचे द्वारी |
दत्तस्वामींची स्वारी | स्वये आली द्वारात |
कथिला रायरीकर द्विजाने | सर्व वृत्तांत प्रामाणिकपणे |
दत्तस्वामींनी बहु हर्षाने | मूर्ती स्वीकारली श्रीकृष्णाची ||
दत्तस्वामींचा जयजयकार होत | मूर्तीसी गोपालजी संबोधत |
सर्व भक्त भजन करीत | राधा राधाकृष्ण राधा ||
पंचामृताचा अभिषेक करून | सुंदर महिरप सजवून |
विधीवत पूजा करुन | गोपालजींची स्थापना झाली ||
दत्तस्वामींच्या मंदिरी | स्वये येई गिरिधारी |
सत्पुरुष असती अधिकारी | अध्यात्ममार्गाचे ||
दत्तस्वामी करिती नमन | गोपालजींचे गुणगान |
तेव्हा स्फुरतसे स्तवन | वाचा भाविकजन हो ||

|| श्रीगोपालजी स्तवन ||

मथुरेच्या कारागृही
बंदी वसुदेव देवकी
श्रीविष्णू अवतरला
श्रीकृष्णजन्माष्टमीला ||१||
उघडली दारे गळली बंधने
कृष्ण डोईवरी वसुदेव चाले
यमुनाईचा पूर ओसरे
शेष नाग हा मस्तकी डोले ||२||
आनंदोत्सव गोकुळासी
नंदाघरी सौख्यपर्वणी
यशोदा खेळवी केशवाला
जमले सारे देव अंगणी ||३||
गोपाळांसवे खेळे मुरारी
गौळणींच्या हृदयी राही
यमुनाडोही कालियामर्दन
सामर्थ्य दावी जना लवलाही ||४||
दही दूध लोणी चोरूनी खाई
गोपिकांची वस्त्रे लपवुनी नेई
पूतना राक्षसी दैत्य संहारी
कंसासुर हा भयभीत होई ||५||
कृष्णा तुझ्या मुरलीने
गुंग होती गोपबाला
वृंदावनी रासक्रीडा
राधा म्हणे कान्हा आला ||६||
राधेच्या वत्सल प्रेमात न्हाऊनी
रासक्रीडा खेळी कृष्ण
हृदयी अढळपद देऊनी तिजला
मथुरेसी जाई श्री कृष्ण  ||७||
चाणूर मल्ल कंसासुर मर्दूनी
राज्य दिधले उग्रसेनाला
सोबत राही बलराम प्रभूच्या
बंदीमुक्त केले वसुदेव देवकीला ||८||
सांदिपनींचा शिष्य होऊनी
गुरुगृही केला विद्याभ्यास
द्रौपदीने धांवा करिता
झडकरी तारि पांडवांस ||९||
कुरुक्षेत्री धर्मयुद्ध होई
पार्थ न धरी धनुष्यबाण
भगवद्गीता उपदेशी त्यासी
चराचरव्यापी मला तू जाण  ||१० ||
सोळा सहस्र पत्नी असुनी
म्हणती तुला सदा ब्रह्मचारी
मीरा के प्रभू गिरीधर नागर
पावा वाजवी कृष्ण मुरारी  ||११||
गोकुळासी होई गोपाळकाला
पूजिती तुजला हे गोपाला
दत्तस्वामी नमितो तव चरणाला
देई तू निरंतर स्वात्मसुखाला ||१२||
गोपाळजींची शाळिग्राम मूर्ती | पसरली चहूकडे कीर्ती |
जन्माष्टमीचा उत्सव करिती | प्रतिवर्षी दत्तस्वामी ||
रावेर नजिक एक ग्राम | रसनपूर असे नाम |
एका परिवाराचे ते धाम | आनंदाने राहती तेथे ||
होई सतत दृष्टांतास | गृही असे देवीचा वास |
केले कुटुंबाने सायास | दृष्टांताचे प्रयोजन काय ||
त्या घराची भिंत एक | झाली होती पडीक |
बोलावून कारागीर एक | कुटुंबाने भिंत उतरविली ||
तेव्हा घडला चमत्कार | मूर्ती सगुण साकार |
भिंतीमध्ये मिळाली सत्वर | रामवरदायिनी रूप ||
रामवरदायिनी कथा आता | सांगतो स्वस्थचित्ता |
त्रेतायुगात वनांत शोध घेता | चालले होते श्रीराम ||
एके दिनी माता पार्वती | प्रगट झाली श्रीरामांपुढती |
सीतेचे रूप घेऊन सती | वदली श्रीरामांना ||
मीच असे तुमची सीता | माझा स्वीकार करा आता |
श्रमलात मला शोधता शोधता | प्राणनाथा श्रीरामा ||
किंतु श्रीरामांनी ओळखले | विनम्रपणे ते वदले |
पार्वतीमाते का कष्ट घेतले | मजसमोरी यावयाचे ||
तेव्हा मूळ रूप प्रगटले | पार्वतीने आशीष दिधले |
मन आनंदित ठेवा आपुले | कार्य सिद्धीस जाईल ||
श्रीरामांना वरदा पार्वती | रामवरदायिनी असे जगती |
आशीर्वाद मुद्रा हाती | ऐसे रूप तियेचे ||
परिवार गेला आनंदून | मूर्ती दिली घरी ठेवून |
परंतु पुन्हा दृष्टांत देऊन | देवी वदली परिवारासी ||
हे नव्हे माझे स्थान | संतांजवळी माझा मान |
न करावा माझा अवमान | मजला न्यावे संतांकडे ||
दृष्टांताचे नाही पालन | काकुळतीला आले परिवारजन |
परिवारास झाले अनशन | न पाळली देव्याज्ञा ||
परिवारावरी आले संकट | अवस्था झाली बिकट |
आर्थिक चिंता कटकट | अनिष्ट गोष्टी घडू लागल्या |
परिवार आला दत्तस्वामींकडे | परिवार प्रमुख रडे |
दत्तस्वामींस घातले साकडे | निवारण करा व्यथेचे ||
रामवरदायिनी देवीची | इच्छा संतांकडे जावयाची |
पूर्ण करा ती साची | स्वामी वदले परिवारास ||
परिवार म्हणाला स्वामींस | तुम्हांसारख्या संतांस |
अर्पण करतो मूर्तीस | घ्यावी आमुची सेवा ||
स्वहस्ते स्थापली रामवरदायिनी | दत्तावतारी दत्तस्वामींनी |
पंचामृताचा अभिषेक करूनी | सुंदर स्तुती गायिली ||
कृपा करी अंबे कृपा करी अंबे
कृपा करी जगदंबिके
नवरात्र उत्सव जाहला सुंदर
पूजितो रामवरदायिके ||धृ ||
सरळ भांग सर्पाकृती वेणी नि
बिंदी कुंकुम शोभे भालावरी
जाई जुई बटमोगरा मालती
पुष्पे सुगंधी डोईवरी ||१||
कर्ण भूषणे कानी नथ शोभे नाकी
हेमहार रुळे वक्षावरी
सरी ठुशी मोहनमाळ अलंकार
सोनपट्टा दिसे कमरेवरी ||२||
दंडाला वाकी अन् हाती कंकण साजे
डोळ्यांत साठवू रूप तुझे
पायी पैंजण नाद करिती किणकिण
ध्यानी तल्लीन राहो मन माझे ||३||
हंसवाहिनी सरस्वती तूंचि गे
कमळात उभी तू पद्मिनी
विक्राळ रूप धारण करिसी तू
कालीमाता सिंहवाहिनी ||४||
शुंभनिशुंभांचा नाश तू करिसी
संहारिसी तू महिषासुरा
जगन्माता जगज्जननी असे तू
जोडतो तुज दोन्ही करा ||५||
नवरात्री जागरण भारूड गोंधळ
रासखेळ जोगवा मागती
दैवी अंश येई मानवी देहात
अष्टमी ला घागरी फुंकिती ||६||
नवरात्र नवरंग नवविधा भक्तीने
ध्यातो तुजला आम्ही आदिमाता
संकटहरिणी भक्त वरदायिनी
नसे तुजवीण कोणी दुजा त्राता ||७||
साडेतीन शक्तीपीठे सप्तशृंगी
तुळजाभवानी अंबा रेणुका
तुजसी लीन दत्तस्वामी आजि
कृपा असावी मम साधका ||८||
सुरू केला नवरात्रोत्सव | श्रावणात कृष्णजन्मोत्सव |
मार्गशीर्षात दत्तजन्मोत्सव | सुरु केले दत्तस्वामींनी ||
एक नागर ब्राह्मण असत | तो महालक्ष्मीमुखवटे देत |
रावेरी दत्तस्वामी स्थापित | भाद्रपदी उत्सव मुखवट्यांचा ||
विठ्ठल रखुमाई मूर्ती | एक संत दत्तस्वामींस देती |
नित्यपूजेत ती ठेविती | दत्तस्वामी सर्वदा ||
दत्तस्वामी एका पर्वकाळी | स्नान करिती चंद्रभागाजळी |
मातीने भरती झोळी | संतचरणरज असती ते ||
विठुरायाचे दर्शन घेती | रावेरी प्रयाण करिती |
झोळी जड झाली म्हणती | श्रीदत्तस्वामी तेधवा ||
झोळीत घालती आपुले कर | होई तेव्हा चमत्कार |
विठुरायाची मूर्ती सुंदर | प्रगटली झोळीमाजी ||
झोळीतील संतचरणरजांची | मूर्ती घडली विठ्ठलाची |
रखुमाईवराच्या कृपेची | साऊली असे दत्तस्वामींवरी ||
अति भाग्याचे संतचरण | त्याहूनही मोठे रजकण |
सांब ब्रह्मा नारायण | पावन होती कणस्पर्शाने ||
ह्या संतचरणांवरती | सर्व सुखे लोळण घेती |
चारी मुक्ती साधती | संतचरणरजस्पर्शे ||
जंव भवतापाने जीव पोळला | तंव संतचरणरज हाती लागला |
देह अभिमान सुटला | स्वस्वरूपाची होई जाणीव ||
कथिले सर्व संतांनी | शरण जावे मुमुक्षूंनी |
पुनीत व्हावे संतचरणरजांनी | मोक्षप्राप्ती होईल ||
गोपालजी विठ्ठल देवी | दत्तस्थानी शोभा वाढवी |
दत्तस्थानास पुनीत करवी | प्रासादिक दत्तपादुका ||
दत्तस्वामींचा अधिकार जाणून | सर्व मूर्ती आल्या आपणहून |
भांडारातून पैसे खर्चून | नाही आणिल्या मूर्ती ||
श्रीदत्तमंदिराची कथा | एकता दूर होती व्यथा |
श्रीदत्तस्वामींची लीलागाथा | वर्णिली पुढील अध्यायी ||
तू बुद्धीच्या दातारा | नमन माझे सद्गुरूवरा |
चुकवी जन्ममरण फेरा | पाचवा अध्याय पूर्ण ||

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते पंचमोSध्यायः


अध्याय – ६

साधू जरी असती वेगळाले | परि ते स्वस्वरूपी मिळाले |
श्रीसद्गुरूतत्वाशी जोडले | अनुसंधान तयांनी ||
रावेरनजिक वाघोड ग्राम | संत कुंवरस्वामी नाम |
दत्तस्वामींवरी निष्ठा निष्काम | महायोगी कुंवरस्वामी ||
दत्तस्वामींची आज्ञा पाळती | दत्तमंदिरात भोजन घेती |
दतमंदिरात कधी वस्ती करिती | कुंवरस्वामी ||
कुंवरस्वामींचा एक सेवक असे | तयांच्या बरोबरी नित्य राहतसे |
गांजाची गोळी देतसे | कुंवरस्वामी महाराजांना ||
ती गोळी चिलीमीत ठेवून | चिलीम टाकिती पिऊन |
अनेकदा दिवसातून | चिलीम ओढती कुंवरस्वामी ||
आकार न कमी होई | गोळी जशीच्या तशी राही |
कुंवरस्वामींची असे नवलाई | जन्मभर पुरली एक गोळी ||
रावेर दत्तमंदिरालगत | एक नाला असत |
मलमूत्र त्यातून वाहत | फिरती साप आणि जनावरे ||
कुंवरस्वामी जाती नाल्यावरी | साप धरून आणिती मंदिरी |
असती साप विषारी | चावती ते कुंवरस्वामींना ||
अंगी असे बहुत सामर्थ्य | सर्पदंश होतसे व्यर्थ |
ह्या कृतीतील मथितार्थ | सांगती कुंवरस्वामी ||
षड्रिपू हे सर्प असती | क्षणोक्षणी दंश करिती |
बुद्धीसी भ्रमित करिती | कलियुगाचा महिमा ||
ईश्वरी चित्त लावावे | षड्रिपूसर्पभय नसावे |
सतत अनुसंधान ठेवावे | जागृत असावे मनुष्याने ||
दत्तमंदिराच्या जमिनीवरती | सर्प सभोवताली फिरती |
भक्तजन बहुत घाबरती | घाबरू नका कुंवरस्वामी म्हणती ||
जेव्हा दत्तस्वामी आज्ञापिती | कुंवरस्वामी सर्पांसी घेती |
नागझिरी नदीकाठी सोडती | कुंवरस्वामी महाराज ||
एक विहीर दत्तमंदिरालगत | तेथे कुंवरस्वामी उभे राहत |
काही माणसे सोबत असत | कुंवरस्वामी महाराजांच्या ||
कुंवरस्वामी माणसांना सांगत | विहिरीतून पाणी काढा म्हणत |
माझ्या अंगावर ओता म्हणत | मी पुरे म्हणेपर्यंत ||
माणसे पाणी ओतती | अनेक बादल्या रित्या होती |
कुंवरस्वामी म्हणती | अजून ओता पाणी ||
शेवटी माणसे थकली | पाणी ओतायची शक्ती नुरली |
कुंवरस्वामींना दया आली | माणसांना सांगती जा आता |
एक कांबळे घेऊन | ओले अंग पुसून |
दत्तमंदिरात जाऊन | वरच्या माळ्यावर झोपले कुंवरस्वामी ||
कांबळे घेऊन अंगावरती | तीन दिवस आणि राती |
कुंवरस्वामी निद्रा घेती | कळजी वाटे माधवदासांना ||
तिसरे दिवशी माधवदास | विचारती जवळील माणसांस|
कुंवरस्वामींच्या तब्येतीस | काय झाले तीन दिन ||
जवळील माणसे म्हणाली | कुंवरस्वामींची प्राणज्योत विझली |
पुढची तयारी करू लागली | इतक्यात झाला चमत्कार ||
कुंवरस्वामींनी कांबळे काढले | मैं जिंदा हूँ ऐसे वदले |
सर्वजण चकित जाहले | ऐसी लीला कुंवरस्वामींची ||
रावेर दत्तमंदिरालगत | नाल्यात बहुत कचरा असत |
कुंवरस्वामी पळत जात | एके दिनी नाल्यावरी ||
तेथील सर्व कचरा आणून | दत्तमंदिरात ढीग करून |
कचऱ्याला आग लावून | शेकत बसती कुंवरस्वामी ||
प्रचंड मोठा जाळ करत | ज्वाला छतासी जाऊन भिडत |
सर्वांना भय वाटत | मंदिराचे छत काळे होणार ||
परंतु जेव्हा अग्नी शांत झाला | काही न होई छताला |
कुंवरस्वामींची अगम्य लीला | असती बहुत रहस्यमय ||
संत मस्तानशहावली | दत्तस्वामींशी भेट झाली |
दत्तमहाराजांशी मैत्री केली | बहुवेळा येती मंदिरात ||
मस्तानशहांचे कर्णभेदन | करिती ते रुद्राक्ष धारण |
हिंदू आहेत की मुसलमान | न कळे भक्तांना ||
मस्तानशहांच्या मस्तकावरती | एक जखम झाली होती |
काही औषधोपचार न करती | मस्तानशहावली जखमेसी ||
कालांतराने ह्या जखमेत | अनेक अळ्या वळवळत |
जनतेसी किळस येत | दिसता मस्तानशहावली ||
ह्या अळ्या मरू नयेत | काळजी मस्तानशहा घेत |
अळ्यांसी साखर देत | डोक्यावरील जखमेत ||
जखमेतूनी जरी अळी खालती |अरे मर जाएगी मस्तानशहा म्हणती |
पुन्हा उचलोनी ठेविती | जखमेमध्ये अळीला ||
ह्यात दडला आहे परमार्थ | तो जाणून घ्यावा यथार्थ |
न घ्यावा चुकीचा अर्थ | मस्तानशहावलींच्या कृतीचा ||
जे जे दिसे भूत | ते ते मानिजे भगवंत |
ऐसी धारणा निश्चित | होती मस्तानशहांची ||
श्रीसद्गुरूतत्व व्यापक असे | पंचमहाभूतांतही वसे |
आपपरभाव नसे | कधीही संतांच्या ठिकाणी ||
स्वहृदयी जो भगवंत | तोच प्राणिमात्रांच्या अंतरात |
संत असती कृपावंत | सर्वव्यापी परमेश्वर ||
तान्हे बाळ जोराने रडते | कोSहं ऐसे विचारते |
जर श्रीसद्गुरू कृपा होते | त्या बाळावरी ||
सद्गुरूकृपा होता बाळावरी | चित्तवृत्ती पालटती |
सो हं चे ज्ञान होय भीतरी | बाळाच्या अंतरंगात ||
जैसे भ्रमराच्या ध्यासाने | भ्रमररूप घ्यावे सुरवंटाने |
तैसे ईश्वराच्या ध्यासाने | ईश्वररूपी होती संत ||
मस्तानशहावली दत्तस्वामी | एकत्र येती कुंवरस्वामी |
सत्संग होतसे बहु नामी | सदा भगवंताची चर्चा ||
कुंवरस्वामी विचारिती | भक्ताची लक्षणे कैसी असती |
सांगावीत ती आम्हाप्रती | म्हणती मस्तानशहावली ||
दत्तस्वामी उपदेश करित | तुकोबांचा अभंग सांगत |
विविध दृष्टांत देत | मांडिती ते सिद्धांत ||
पाणी आवश्यक मानवास | तैसे ते आवश्यक मत्स्यास |
जरी पाणी न मिळे तयास | मृत्यू पावतो तत्काळ ||
जरी भक्तासी देव आवडतो | परि खरा भक्त तो असतो |
ज्याचा जीव व्याकूळ होतो | भगवंताच्या विस्मरणाने ||
जैसे सूर्यप्रकाश मिळे सर्वांसी | परि आवश्यकता कमळासी |
तैसे योग्य भक्तासी | नामस्मरण महत्त्व कळते ||
सुंदर बाळ गोजिरवाणे | रूप अतिशय लोभसवाणे |
आनंद होतो त्याकारणे | सर्व नातेवाईकांना ||
परंतु बाळाची काळजी मातेसी | तैसेच नाते ईश्वरासी |
जो ठेवितो निश्चियेसी | तोचि खरा भक्त जाणावा ||
ज्याच्या मनी जैसा भाव | तैसा तेथे राहतो देव |
देवाचा अंश असे जीव | महत्त्वाचा असे सिद्धांत ||
कुंवरस्वामी पुन्हा विचारिती | नाममहिमा सांगावा म्हणती |
दत्तस्वामी महिमा वर्णिती | आपुल्या रसाळ वाणीतुनी ||
नाम सदा स्मरावे | नाम सदा मुखी घ्यावे |
स्वतःचे विस्मरण व्हावे | नामरंगी तल्लीन होता ||
नामस्मरण करता सद्गुरूंचे | सार्थक होईल जन्माचे |
काळ वंदितो पाय त्याचे | असे नामाचा महिमा ||
नामाने तारिले प्रल्हाद बाळा | रामनामे तरल्या जडशीळा |
नामाने प्राप्त कृष्णसांवळा | झाला मीराबाईस ||
सद्गुरूंच्या स्मरणात | स्वतःच्या विस्मरणात |
रंगून जावे नामस्मरणात | मोक्षपद प्राप्त होईल ||
नामसंकीर्तन होतसे | मुखातुनी वाक्सुधा वाहतसे |
अध्यात्मज्ञान मिळतसे | दत्तस्वामींकडून संतांसी ||
दत्तस्वामींच्या समकालीन | कुंवरस्वामी मस्तानशहा दोन |
संत एक होत्या अजून | रामबाई नाव तयांचे ||
संत रामबाई असे नाम | मध्यप्रदेश खेडीघाट ग्राम |
सदा मुखी रामनाम | असे रामबाईंच्या ||
रामबाईंचा निवर्तला धव | आता ध्यास रमाधव |
रामनामाचा अर्णव | उसळे निरंतर हृदयी ||
खेडीघाट ग्रामात | रामबाईंचा दरबार असत |
एका पातेल्यात धान्य घेत | वाटावयासी गरिबांना ||
शेवटचा भिक्षुक येईपर्यंत | पातेल्यातील धान्य न संपत |
पातेले सदा भरलेले राहत | परमहंस योगिनी राम बाई ||
रामबाई येती रावेरी | निष्ठा तयांची दत्तस्वामींवरी |
भेट होतसे वरचेवरी | दत्तस्वामी आणि रामबाईंची ||
रावेर दत्तमंदिरालगत | एक विप्र होते राहत |
अग्निहोत्री उपनाम असत | होते बहुत शंकेखोर ||
दत्तस्वामी आणि रामबाई | कधी एकांतात भेट होई |
अग्निहोत्री विप्रामनी विकल्प येई | संशयपिशाच्च मानेवरी ||
अग्निहोत्री म्हणे विप्रांना | का पूजिता तुम्ही दत्तस्वामींना |
शुद्ध चारित्र्य मुळीच ना | ढोंगी आहे दत्तस्वामी ||
रामबाई मंदिरात येते | दत्तस्वामींसवे गोष्टी करिते |
एकांतात तयाजवळी बसते | दांभिक असती हे दोघे ||
ह्यांसी कैसे म्हणावे संत | शुद्धता नसे हृदयांत |
कैसा भेटला भगवंत | भोंदू दत्तस्वामी अन् रामबाई ||
जरी अग्निहोत्री बोल लाविती | दत्तस्वामी शांत असती |
जरी कोणी सूर्यावर थुंकती | सूर्यासी काय त्याचे ||
दत्तमंदिरी एके दिनी | येती रामबाई योगिनी |
दत्तस्वामींसी नमस्कार करूनी | बैसल्या त्या पाटावरी ||
भोजनाची वेळ झाली | नैवेद्याची ताटे मांडली कुंवरस्वामी मस्तानशहावली | उपस्थित होत तेथे ||
तेव्हा दत्तस्वामी म्हणती | रमाबाई, अर्पण करा नैवेद्याप्रती |
रामबाई भिंतीस टेकती | घेती मुखाने रामनाम ||
नेत्रकमले मिटली | रामबाईंची समाधी लागली |
जाणीव काही नुरली | आत्मानंदमग्न रामबाई ||
रामबाई ज्या भिंतीसी टेकती | तेथे लाकडी फळ्या असती |
फटीतून ढेकूण येती | चावती रामबाईंना ||
रामबाईंचे रक्त पिऊनी | ढेकूण जाती टम्म फुगुनी |
नवीन ढेकूण येती फळीतूनी | ढेकणांची रांग तेथे ||
दत्तस्वामी आज्ञापिती | अग्निहोत्री द्विजासी बोलविती |
अग्निहोत्री स्वतः पाहती | दृश्य ते रामबाईंचे ||
अग्निहोत्रींसी चूक उमगली | म्हणती व्यर्थ निंदा केली |
योग्यता नाही मी जाणली | परमहंस योगिनी रामबाई ||
आळंदीचे नृसिंहसरस्वती | दत्त स्वामींचे दर्शन घेती |
ऐशा भेटी वारंवार होती चालती | मोठा अधिकार दत्तस्वामींचा ||
श्रीसद्गुरूतत्वाची रूपे अनंत | त्याचा कधी कळेना अंत |
अनेक रूपे घेतसे भगवंत | अज्ञानी आपणास कसे ज्ञात ||
संतांसी ओळखण्यासी | हवे शुद्ध अंतःकरणासी |
लोळण घ्यावी संतपदासी | लीन शुद्ध भाव ठेऊनी ||
संतांच्या बाह्यरूपावरूनी | न घ्यावे तयांसी जाणूनी |
बुद्धीचे वजन लावूनी | न मोजावे तराजूत ||
सहाव्या अध्यायात जाणून | घेतला संत महिमान |
भक्तांचे होवो कल्याण | प्रार्थितो वैभव संतचरणी ||

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते षष्ठमोSध्यायः


अध्याय – ७

जेथे घडतो चमत्कार | तेथे होतो नमस्कार |
प्रेरणा देतो ईश्वर | संतांच्या चमत्कारासी ||
न घडे तो कधीही ठरवून | येतो तो आपोआप घडून |
प्रसंगानुरूप शिकवून | जाती संत आपणासी ||
रावेरी एक ज्योतिषी | स्वतःसी म्हणवी सिद्धांत ज्योतिषी |
ग्रामस्थ जाती त्याच्यापाशी | भविष्य जाणून घ्याया ||
एक गुजराथी कासार | त्यासी दुःख अपार |
असे तो बिजवर | राही दोन पत्नींसमवेत ||
जरी द्विभार्या असती | परी नसे तयासी संतती |
कैसी होईल पुत्रप्राप्ती | सदा चिंता तयाच्या मनी ||
दोन कलत्रांसी घेऊनी | आला तो ज्योतिषसदनी |
सांगावे पत्रिका पाहूनी | वदे तो ज्योतिषासी ||
ज्योतिषाने पत्रिका पाहिली | दोन्ही पत्नींची हस्तरेषा वाचली |
थोडी आकडेमोड केली | केला चेहरा गंभीर ||
ज्योतिषी म्हणे कासारासी | देतो मी आता उत्तरासी |
पुत्र न होणार तुम्हांसी | ग्रहस्थिती प्रतिकूल ||
पत्नींची पाहिली पत्रिका | अभ्यासली मी हस्तरेखा |
माझे सांगणे ऐका | पुत्रप्राप्ती योग नसे तुम्हासी ||
परंतु केले अनुष्ठान जपतपा | झाली विधात्याची कृपा |
जन्म देई कन्यारूपा | तुमची कनिष्ठ भार्या ||
कासार बहु दुःखित | मनाशी विचार करित |
म्हणे मी जाईन नरकात | पुत्राविना कैसे जीवन ||
अतिशय खिन्न मनाने | कासार चाले वाटेने |
अचानक त्याच्या दृष्टीने | पाहिले तेथे दत्तस्वामी ||
दत्तस्वामी म्हणती कासारासी | काय रे झाले तुजसी |
का खिन्नता तव मानसी | उपजली असे व्यर्थ ||
घडलेला सर्व वृत्तांत | कासार कथन करित |
पुत्रसुख नाही नशीबात | सांगे तो दत्तस्वामींना ||
ऐकूनी तयाचे आर्जव | दत्तस्वामींचे शब्द मार्दव |
असती साक्षात दयार्णव | देती आशीष कासारासी ||
जेव्हा संपतील बारा मास | पुत्र होईल प्रथम भार्येस |
जन्म देईल द्वितीय पुत्रास | कनिष्ठ भार्या त्यानंतर ||
स्वामी वचनाप्रमाणे | प्रसविला पुत्र प्रथम भार्येने |
हे घडले एक वर्षाने | दत्तस्वामींचा शब्द असे ||
कासार गेला आनंदुनी | द्वितीय भार्येपासूनी |
पुत्र कन्या प्राप्त होवोनी | सुखी जाहला मानसी ||
श्रीसद्गुरू असे दयावान | नसे त्यावीण आन |
न करावा कधी अनमान | श्रीसद्गुरू आज्ञेचा ||
श्रीसद्गुरूंचे वचन | असे ब्रह्मदेवाचे कथन |
दृढ श्रद्धा ठेवून | नाम घ्यावे श्रीसद्गुरूंचे ||
दत्तस्वामी चमत्कार करिती | दूर पसरे तयांची कीर्ती |
दूरदूरोनी भक्त येती | दत्तस्वामींच्या दर्शनासी ||
वालचंद शेट श्रीमंत | रावेरातील लक्ष्मीवंत |
आले तयांच्या मनांत | दत्तस्वामींची पूजावे ||
सुंदर मेणा करविला | त्यावरी मोत्यांच्या माला |
उत्तम सुशोभित केला | वालचंद शेट यांनी ||
आले वालचंद मेणा घेऊनी | नमन दत्तस्वामींलागुनी |
करिती विनंती हात जोडोनी | चलावे मम गृहासी ||
गृहासी आपुले लागता चरण | धन्य होईल माझे जनन |
होईल भवसागरतरण | कृपा करावी दत्तस्वामी ||
वालचंदाची ऐकूनी विनंती | दत्तस्वामी देती सहमती |
मेण्यात बैसोनी जाती | वालचंदाच्या गृही ||
वालचंद करी अन्नसंतर्पण | करितसे नैवेद्य अर्पण |
निष्ठा तयाची असे पूर्ण | दत्तस्वामींवरी बहुत ||
त्याची श्रद्धा पाहून | दत्तस्वामींचे संतुष्ट मन |
नित्य षोडशोपचारे पूजन | भजन चाले दत्तस्वामींचे ||
त्या परिसरातील न्यायालयात | एक शिरस्तेदार असत |
त्याचा एक मुलगा असत | पिशाच्च बाधा असे ||
मांत्रिक केले पुष्कळ | यत्न होती निष्फळ |
शिव्या देई अमंगळ | पिशाच्च बाधित मुलगा ||
शिरस्तेदारासी वार्ता कळली | दत्तस्वामी सामर्थ्यशाली |
पावले त्याची वळली | दत्तस्वामींच्या दर्शनासी ||
दत्तस्वामी आसनी बैसले | दत्तभजन होते चालले |
भक्तजन रंगूनी गेले | होते भजनानंदात ||
शिरस्तेदार मुलासहित | आला वालचंदाच्या घरात |
दत्तस्वामी दृष्टी ठेवत | पिशाच्चबाधित मुलावरी ||
तो मुलगा उड्या मारित | जोरजोरात ओरडत |
दत्या दत्या ऐशा शिव्या देत | करितसे थयथयाट ||
काठी हाती घेतली स्वामींनी | दिधली जी दत्तप्रभूंनी |
दत्तनाम घेऊनी मुखानी | मारिली जोरात मुलावरी ||
त्या काठीच्या आघाताने | अंग टाकिले मुलाने |
सोडून दिले पिशाच्चाने | त्या मुलाचे शरीर ||
काठीचा जेव्हा स्पर्श झाला | मुक्ती मिळाली पिशाच्चाला |
गेले ते दत्तलोकाला | दत्तस्वामींच्या कृपेने ||
दत्तभजन झाल्यावरी | तो मुलगा आला शुद्धीवरी ||
प्रसाद देऊनी पाठविले घरी | दत्तसावामींनी तयासी ||
जोवरी नसे गभस्ती | नभी चंद्राची वसती |
जंबूक वनी गर्जती | जोवरी नसे मृगेंद्र ||
भूत पिशाच्चांची मस्ती | न चाले दत्तप्रभूंपुढती |
भूतयोनीतून मुक्त करती | दत्तप्रभूं दुष्ट शक्तींना ||
दत्तस्वामींची अशी थोरवी | कोणाची बाधा घालवी |
कोणास देवदर्शन घडवी | दत्तावतारी दत्तस्वामी ||
रावेरी असे कासार बाई | दत्तस्वामींच्या दर्शनासी जाई |
निष्ठा तिची स्वामींच्या पायी | शिष्य ती दत्तस्वामींची ||
दत्त दर्शनाचा तिचा नेम | मुखी असे दत्तनाम |
दत्तमंदिर तिचे सुखधाम | नित्य येई रावेरी मंदिरात ||
ऐसे अनेक मास लोटले | डोईवरील केस पिकले |
मुखातील दात गळले | वृद्ध कासार बाई ||
एके दिनी रोजच्याप्रमाणे | झाले तिचे मंदिरात येणे |
केले तिने एक मागणे | दत्तस्वामींच्या पुढती ||
म्हणे ती दत्तस्वामींस | जायचे आहे मज काशीस |
वृद्धत्व आले शरीरास | कैसे जाऊ मी आता ||
प्रवास मी करु कैसा | मजकडे नाही पैसा |
अळीस भ्रमरध्यास जैसा | मन धावते काशीस ||
दत्तस्वामी तियेसी वदले | हेच काशीस्थान आपुले |
रावेरी विश्वनाथ बैसले | का जायचे तुज काशीस ||
परि तिची समजूत पटेना | आपुला हट्ट ती सोडीना |
म्हणे दत्तस्वामींना | सांगा काशीस कैसे जाऊ ||
दत्तस्वामी स्मितहास्य करिती | कासार बाईच्या डोईवरती |
आपुला वरदहस्त ठेविती | म्हणती तिजला ध्यान लाव ||
बाई बंद करी डोळे | चित्र पालटले सगळे |
जी अभिषिक्त गंगाजळे | शिवपिंडी दिसे तिजला ||
दर्शन होई विश्वनाथाचे | सार्थक होतसे जन्माचे |
शिवस्तुती ती करी वाचे | समाधी अवस्था अनुभवली ||

|| शिवस्तुती ||

मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ||धृ ||
समुद्रमंथनातून हलाहल विष येई
प्राशूनी तयाला नीलकंठ तो होई
स्वये सांब धरी डोईवरती निशिकांता
मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ||१ ||
व्याघ्रचर्म पांघरी चिताभस्म अंगा
मस्तकावरी वाहते जटागंगा
नंदी भृंगी रुद्रगण नमिती पशुपतीनाथा
मज मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ||२ ||
डमडमडम डमरू उच्चरवे वाजती
नटराज ताडव नृत्य तदा करिती
नमू सांब शिवासी सकल जगत त्राता
मज दर्शन द्या हो शंकरा भोलेनाथा ||३ ||

|| ओवी ||

कासार बाई भानावरी येई | विश्वनाथाचे दर्शन होई |
बहुत असे ते सुखदायी | दत्तस्वामींची कृपा ||
ब्रह्मा विष्णू शिवाचे | असे रूप दत्ताचे |
दत्तात्रेयाच्या अवताराचे | पूर्णरूप दत्तस्वामी ||
ह्याच शिवाच्या अंशाचे | विश्वनाथाच्या रूपाचे |
दर्शन घडविले साचे | दत्तस्वामींची कासार बाईस ||
पवित्र असे काशीपुरी | दत्तात्रेयांची तेथे होय फेरी |
दत्तस्वामी संचार करी | जरी असले रावेरात ||
दत्तस्वामींसी सर्व शक्य | तयांचे असे ब्रह्मवाक्य |
पंचमहाभूतांशी ऐक्य | सहज साधती दत्तस्वामी ||
ऐका आता पुढची कथा | वानू दत्तस्वामी समर्था |
कळोन येईल सर्वथा | अधिकार दत्तस्वामींचा ||
रावेर ग्रामाजवळ | असे एक धरणगाव |
तेथील जोशी कुटुंबाचा भाव | असे दत्तस्वामींवरी ||
रावेरी मंदिरी येवोनी | जोशी करिती विनवणी |
चलावे अमुच्या सदनी | धरणगावी स्वामी हो ||
दत्तस्वामी तेथे जाती | भक्त पूजन करिती |
दत्तस्वामी प्रसन्न होती | दत्तनामस्मरणाने ||
जेव्हा असे परधाम | तेव्हा दोन दिन करावा मुक्काम |
दत्तस्वामींचा असे नियम | कुठेही न राहती तिसरे दिनी ||
होतसे दत्तनामसंकीर्तन | दत्तमय होती भक्तजन |
दत्तस्वामींना न मोडवे मन | वस्ती केली दुसरे दिनी ||
तिसरे दिनी भानू उदित | नरवेल ग्रामी स्वामी निघत |
धरणगाव भक्त म्हणत | जाऊ नका स्वामी हो ||
दत्तस्वामी समजूत घालत | भक्तांचा निरोप घेत |
बैलगाडीत बैसत | संध्याकाळ जाहली ||
सूर्यप्रभा लया गेली | पर्जन्यवृष्टी सुरु झाली |
माती वाहून आली | नरवेलच्या मार्गात ||
बैलगाडीचे चाक घसरत | बैलांचे पाय सटकत |
भक्तमंडळी विनवित | माघारी फिरावे दत्तस्वामी ||
दत्तस्वामी म्हणती भक्तांसी | काळजी कासयासी |
भजा तुम्ही दत्तासी | तोचि तारून नेईल ||
दत्तस्वामी डोळे मिटती | दत्ताचे स्मरण करिती |
दत्तनामाचा जयघोष करिती | श्रीगुरुदेव दत्त दत्त ||
आणि चमत्कार जाहला | सर्वांसी प्रकाश दिसला |
बैलगाडीचे बाजूला | दोन मशाली दिसू लागल्या ||
त्या मशालींच्या प्रकाशात | सर्व बैलगाड्या धावत |
दत्तरूपाचे दर्शन होत | दत्तस्वामींमध्ये भक्तांना ||
नरवेल ग्रामस्थ वेशीवर येत | दत्तस्वामींची वाट पाहत |
दुरून बैलगाड्या दिसत | मशाली दोन्ही बाजूंस ||
नरवेलची वेस जवळ आली | गुप्त झाल्या मशाली |
भक्तमंडळी चकित झाली | पाहूनी हा चमत्कार ||
दत्तस्वामींचे स्वागत | झाले नरवेल गावात |
भक्तमंडळी स्वामींसी पुसत | मशाली कश्या लागल्या ||
दत्तस्वामी स्मितहास्य करिती | काहीही न बोलती |
सर्व भक्त जाणती | ही असे दत्तप्रभूंची किमया ||
जैसे नाथांचे चोपदार | झाले दत्त दिगंबर |
तैसै दत्तप्रभूंचे कर | धरिती मशाली स्वामींकारणे ||
अनेक चमत्कार घडत | दत्तस्वामींच्या अवतारात |
भक्तांनी घ्यावा ध्यानात | दत्तस्वामींचा अधिकार ||
दत्त आणि दत्तस्वामी | भिन्नरूपे एक नामी |
रूपे असती बहुआयामी | श्रीसद्गुरूतत्व एक असे ||
भक्तांना भुलविण्यासी | कधी न करिती चमत्कारासी |
संत महिमा वाढविण्यासी | होती ऐसे चमत्कार ||
संतांसी ह्याची नाही जरूर | चमत्कार घडवितो ईश्वर |
सामर्थ्य असे अपार प| ईश्वरशक्तीचे संतांमध्ये ||
गेलो आपण मंदिरात | ईश्वरसेवा घडत |
परि पाहिजे पूर्वसुकृत |श्रीसद्गुरू सेवेसाठी ||
सोपे ईश्वराचे दर्शन | कठीण संतचरणसेवन |
जर पवित्र असे प्राक्तन | तर श्रीसद्गुरू भेटतील ||
जरी ईश्वर आला सामोरी | तरी सद्गुरूसी जो नमस्कारी |
ऐसा श्रीसद्गुरू अधिकारी | ईश्वराहून श्रेष्ठ असे ||
श्रीसद्गुरू सेवा ज्याची घडली | त्याची पापे गळाली |
मोक्षप्राप्ती तयासी झाली | जन्ममृत्यू चक्र संपले ||
न अडकावे चमत्कारांत | अडकावे चमत्कार करणाऱ्यांत |
म्हणजेच श्रीसद्गुरूंत | अडकवावे आपुले मन ||
अनुभवामृताची गोडी | चाखावी भक्तांनी आवडी |
दासवैभव हात जोडी | सातवा अध्याय पूर्ण ||

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते सप्तमोSध्यायः


अध्याय – ८

दत्तस्वामी लीला करिती | दत्तात्रेय प्रेरणा देती |
भक्तांचे भवभय हरती | कृपा करिती भक्तांवरी ||
मुका बोलू लागत | पांगळा चालू लागत |
निपुत्रीकासी पुत्र होत | दत्तस्वामींच्या कृपेने ||
एकदा खरगोण भिकणगावी | स्वामींची स्वारी बरवी |
येऊनी स्थिरावे अटवी | भक्तमंडळी जमली शेकडो ||
दर्शनार्थी भक्तांसी | द्यावे स्वहस्ते श्रीफलासी |
दत्तस्वामींच्या मनासी | ऐसा येई विचार ||
नारळ थोडेच कोठीत | कोठीवाला होई चिंतित |
वदे तो स्वामींसी त्वरित | नारळ कमी आहेत ||
दत्तस्वामी प्रसन्नतेने | वदले त्यास निश्चयाने |
का ग्रासिले तुज चिंतेने || दत्तप्रभूंवरी ठेव निष्ठा ||
नारळ ठेव माझ्या पडशीत | दत्तप्रभू सांभाळून घेत |
विश्वासंचालन तेच करित | कासया काळजी करावी ||
दत्तस्वामींनी छाटी घेतली | ती पडशीवरती टाकली |
दत्तस्वामींची करूणा भाकली | स्मर्तृगामी दत्तप्रभू ||
जो जो येई दर्शनासी | त्यासी स्वामी देती श्रीफलासी |
शेकडो भक्त येती त्या दिवशी | दत्तस्वामी देती नारळ ||
नारळ नाही कमी पडले | सर्वांना देऊन उरले |
दत्तस्वामींचे सामर्थ्य समजले | भक्त करिती स्तुती ||
ज्याचा सखा असे हरी | त्यावरी विश्व कृपा करी |
न भ्यावे कधी अंतरी | दत्तप्रभूंची किमया असे ||
एके दिनी दत्तमंदिरात | भक्तजन होते सेवा करित |
अचानक तेजःपुंज साधू येत | भगवी कफनी परिधान ||
दत्तस्वामी तयांना पाहती | आपल्या आसनावरून उठती |
साधूंचे चरण वंदिती | बसविती आपुले आसनी ||
चरणप्रक्षालन करिती | षोडशोपचार पूजा करिती |
नैवेद्य अर्पण करिती | दत्तस्वामी साधूंना ||
प्रथम साधूंसी भोजन द्यावे | पश्चात स्वये भोजन करावे |
ऐसे प्रतिदिनी करावे | दत्तस्वामींचा नेम असे ||
ऐसे बरेच दिन सरती | एके दिनी दत्तस्वामी म्हणती |
साधू महाराज मजप्रती | द्यावा काहीतरी प्रसाद ||
दत्तस्वामींना परभाषा येत | संवाद चाले फारशी भाषेत |
भक्तांसी नाही उमगत | अर्थ दोघांच्या संवादातील ||
दत्तस्वामी प्रार्थिती साधूंसी | प्रसाद द्यावा मजसी |
साधू देती स्वामींसी | पांढरे निशाण ||
गंधयुक्त पूजा करावी | धूपारती ओवाळावी |
निशाणावरी श्रद्धा ठेवावी | दसऱ्याच्या दिवशी पूजा ||
नाथ महाराजांच्या परंपरेत | निशाणांचे पूजन होत |
दत्तस्वामींची परंपरा असत | नाथ संप्रदायाची ||
हे साधू म्हणजे साक्षात | प्रभू दत्तात्रेय असत |
स्वामींवरी पुनश्च कृपा करित | पांढरी निशाणे देऊनिया ||
एकदा रावेरी दत्तमंदिरात | संत हरिदास येत |
दत्तस्वामींचे श्रीसद्गुरू असत | वर्णिले मी द्वितीय अध्यायी ||
शिष्य आरूढ सिद्धपदासी | मीलन तयाचे परब्रह्मासी |
ते सुख पहावयासी | आले संत हरिदास ||
गुरु शिष्याची भेट झाली | दत्तस्थानाची महती वाढली |
दत्तस्वामींनी सेवा केली | सद्गुरू हरिदासांची ||
उत्तम घोडा सद्गुरूंसी दिला | वेशीपर्यंत जाऊनी निरोप दिला |
पुनःपुन्हा नमस्कार केला | दत्तस्वामींनी हरिदासांना ||
सद्गुरू हरिदासांचे रावेरागमन | ह्याची कथा केली कथन |
आता ऐका चित्त स्थिर करून | कथा दत्तस्वामीशिष्याची ||
दत्तस्वामींचे करिती सेवाकाम | गोपाळदास जोशी नाम |
कधीही नाही केला आराम | कुचराई नाही सेवेत ||
स्वामींच्या घोड्याची काळजी घेणे | गाई वासरांना सांभाळणे |
पहाटे घोडा तयार ठेवणे | तापीस्नानास्तव जाती दत्तस्वामी ||
गोपाळदासांची सेवा सुंदर | शुद्ध असे तयांचे अंतर |
मुखी दत्ताचे नाम निरंतर | वयाने ते तरूण ||
धरणगावची कन्या उपवर | मंडळी येती रावेरी सत्वर |
गोपाळदास असे सुयोग्य वर | योजिला मंडळींनी मनात ||
मंडळी आली स्वामी दर्शनासी | स्वामी पुसती तयांसी |
का येणे केले रावेरासी | सांगावे धरणगाव मंडळींनो ||
कन्यादान करावे गोपाळदासांसी | ऐसा विचार आमुचे मानसी |
द्यावे आपण आशीर्वादासी | निर्विघ्न होवो विवाह ||
दत्तस्वामी क्षणभर स्तब्ध झाले | सर्व मंडळींसी वदले |
आत्ता योग नाहीत चांगले | नको लग्न गोपाळदासासी ||
धक्का बसला सर्वांस | काय झाले दत्तस्वामींस |
का न देती अनुमतीस | लग्न नको असे का म्हणती ||
दत्तस्वामींची आज्ञा प्रमाण | मंडळी परतली स्वस्थान |
सरले काही मास अन् दिन | गोपाळदासांसी मृत्यू आला ||
दत्तस्वामींनी आज्ञा दिली | गोपाळदासांची समाधी बांधली |
गोपाळदासांना मुक्ती मिळाली | दत्तस्वामींच्या कृपेने ||
सामर्थ्य असे दूरदृष्टीचे | वैधव्य टळले मुलीचे |
भूत वर्तमान भविष्याचे | ज्ञान असे दत्तस्वामींना ||
पवित्र श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर | तेथे निर्मिला शिष्यपरिवार |
दत्तस्वामी श्रीसद्गुरूवर | मठ स्थापिती तेथे ||
अनेक रंजले गांजले येत | दत्तस्वामींचे दर्शन घेत |
एक गृहस्थ रावेरात | पुंडलिकबुवा नाव असे ||
तयांची पत्नी गर्भार | स्वामींच्या दर्शनासी येई सत्वर |
स्वामी देती तिजला वर | मुलगी होईल म्हणती ||
तुला होईल जी संतती | देई माझ्या माधवाप्रती |
स्नुषा माझी होईल निश्चिती | माधवाची भार्या ||
वैद्यकशास्त्र नव्हते प्रगत | गर्भातील कन्या स्वामींसी दिसत |
योगदृष्टीने स्वामी पाहत | दत्तस्वामींचे सामर्थ्य थोर ||
जानकी नाव ठेविले ऐसे | जेव्हा वयात येतसे |
स्वामी आज्ञेनुसार लग्न होतसे | जानकी माधवदासांचे ||
स्वतः स्वामी संन्यस्त असती | परि माधवदासांचे लग्न करविती |
मानसपुत्र शिष्य असती | माधवदास दत्तस्वामींचे ||
जानकीबाईमाधवदास | उत्तम करिती संसारास |
परंतु दुःख होते मनास | नसे तयांसी पुत्र ||
जर न होई पुत्रप्राप्ती | तर नरकात जावे निश्चिती |
ऐसी समजूत होती | त्या काळी समाजाची ||
दत्तस्वामींसी करावी प्रदक्षिणा | नमस्कार करावा चरणा |
करावे स्वामींच्या ध्याना | जानकीबाईंचा नेम असे ||
रोजच्याप्रमाणे एके दिवशी | घातले जानकीबाईंनी प्रदक्षिणेसी |
केले साष्टांग नमस्कारासी | मनोभावे दत्तस्वामींना ||
आशीर्वादपर उंचावला हात | हात घातला झोळीत |
जानकीबाईंच्या ओटीत | एक श्रीफळ ठेविले ||
स्वामी म्हणाले जानकीबाईंस | चिंता तुज कासयास |
ओटीत दिधले मी प्रसादासी | होशील तू पुत्रवती ||
जानकीबाईंसी पुत्र जाहला | केशव ठेविले अभिधानाला |
दत्तस्वामींचा आशीष लाभला | कुलकर्णी वंश पिढ्यांना ||
कनिष्ठ बंधू माधवदासांचे | नाना असे नाव तयांचे |
खांडवा विठ्ठलमंदिराचे | प्रमुख ते असती ||
नागर द्विजे असे खांडव्यात | त्यास दत्तस्वामींचे दर्शन होत |
स्वामींपायी त्याची श्रद्धा असत | शिष्य जाहला तो स्वामीचा ||
तो जातसे जयपूरात | असे ते राजस्थान राज्यात |
सुंदर दत्तमूर्ती त्यासी दिसत | बांधून घेई तो पाठीवरी ||
पाठीवरी मूर्ती घेऊन | खांडवा विठ्ठलमंदिरी येऊन |
दत्तस्वामींसी हात जोडून |प्रार्थना करी नागर विप्र ||
दत्तप्रभूंच्या संकेतानुसार | करावा ह्या मूर्तीचा स्वीकार |
दत्तप्रभू सगुण साकार | मूर्तीस्वरूपात अवतरले ||
खांडवा विठ्ठलमंदिरात | दत्तस्वामी स्वहस्ते स्थापना करित |
मुखाने दत्तस्तुती गात | भावविभोर होऊनिया ||

|| दत्तस्तुती ||

जा शरण दत्ताचे दरी चरण रे ||धृ||
पुनरपि जनन पुनरपि मरण
जन्ममृत्यू फेऱ्यातूनी सुटशील रे || १ ||
बालक होऊनी चरणी लोळण घे तू
दत्तमाय पाजी तुजला प्रेमपय रे ||२ ||
षड्रिपूंपासूनी मुक्त करतील ते
घेई हाती दत्तनामाची माळ रे ||३||
कृपा करी दीनावरी दत्तभक्तसदया
दत्तदास मी असे चरणरज रे ||४||

||ओवी ||

ह्या खांडव्याच्या मंदिरात | दत्तस्वामींची खुर्ची असत |
अजूनही आहे सुस्थितीत | स्वामींच्या चर्मपादुका असती तेथे ||
माधवदास सेवा करिती | तन मन धन अर्पिती |
दत्तस्वामींवरी बहु प्रीती | पट्टशिष्य ते दत्तस्वामींचे ||
हनुमान सेवा करी श्रीरामांची | माधवदास सेवा करिती स्वामींची |
आठवण येई पुंडलिकाची | माधवदासांकडे पाहता ||
एकदा माधवदास जाती स्नानासी | दत्तस्वामी मारिती हाकेसी |
माधवा, माधवा ध्वनीसी | ऐकती माधवदास ||
स्नान अर्धवट सोडोनी | ओला पंचा गुंडाळूनी |
माधवदास आले धावोनी | दत्तस्वामींजवळी ||
देहधर्म करण्यास्तव | स्वामींनी हाक मारली माधव |
लघुशंकेसी नेले जंव | तंव दत्तस्वामी म्हणती ||
किती सेवा करितोस माधवा | तुजला मोक्ष मिळावा |
आशीष माझा सदा रहावा | तुझ्याजवळी माधवा रे ||
दत्तस्वामींचे थकले शरीर | माधवाचा धरोनी कर |
स्वामी करिती व्यवहार | वार्धक्य येतसे स्वामींना ||
शंभर वर्षे पूर्ण होत | दत्तस्वामी शतायुषी होत |
दाढी जटा काढून टाकत | मुखात येती दात पुनश्च ||
ज्ञानेश्वरीत वर्णिती माउली | योग्यांची लक्षणे सांगितली |
वृत्ती स्वरूपानंदी रमली |लक्षण असे हे योग्याचे ||
योग्यांची सर्व लक्षणे | दत्तस्वामींसी लागू होणे |
आता संन्यासदीक्षा घेणे | विचार करिती दत्तस्वामी ||
मीपणाचा सागर आटावा | अंतःकरणातील मी विसरावा |
तोचि संन्यासी जाणावा | ऐसे संन्यासी लक्षण ||
होवो अंतःकरणाची शुद्धी | होवो निःस्पृहतेची वृद्धी |
दत्तचरणी जडो बुद्धी | हेचि संन्यास लक्षण ||
षड्रिपूंपासूनी होवो अलिप्त | मन असावे सदा तृप्त|
ज्यास नसे कोणीही आप्त | त्यास संन्यासी म्हणावे ||
चतुर्थाश्रमाची महती | माधवदासांसी सांगती |
दत्तस्वामी म्हणती | करा तयारी दीक्षेची ||
दीक्षेची तयारी सुरू केली | विप्रांची मांदियाळी जमली |
गोत्राची विचारणा केली | संन्यासदीक्षा देणाऱ्या द्विजाने ||
आम्ही कण्वशाखीय | आहोत शुक्ल यजुर्वेदीय |
गोत्र आमुचे दत्तात्रेय | सांगती दत्तस्वामी सर्वांना ||
विधी संपन्न जाहला | घेतले संन्यासदीक्षेला |
सच्चिदानंद नावाला| धारण केले स्वामींनी ||
पूर्वाश्रमीचे दत्तस्वामी | आता श्रीसच्चिदानंद सरस्वती स्वामी |
रावेरी दत्तमंदिरधामी | राहती ते संन्यस्तवृत्तीने ||
केला संन्यासग्रहण | केले शास्त्रोक्त आचरण |
एकशे दोन वर्षे आयुर्मान | संन्यासग्रहण समयी ||
श्रीसच्चिदानंद स्वामी सांगती | अन्नदान श्रेष्ठ असे जगती |
संतुष्ट होतो श्रीपती | सदा अन्नदान करावे ||
करावा अन्नदानाचा संकल्प | मनी आणू नये विकल्प |
अन्नदान केले जरी अल्प | मोधधाम पावतो अन्नदाता ||
माधवदास नित्य करिती अन्नदान | श्रीसच्चिदानंद स्वामींचा शब्द प्रमाण |
नाही केला कधी अनमान | माधवदासांनी गुर्वाज्ञेचा ||
श्रीसच्चिदानंदस्वामींच्या सेवेत | माधवदास वाहून घेत |
प्रभाती तयांसी उठवीत | स्वामींची भूपाळी गाऊनी ||

||भूपाळी ||

उठा सच्चिदानंद स्वामी उषःकाल जाहला
वंदन करण्या तुजला गगनी भास्कर अवतरला ||
पहाट झाली जाते आता विलया तमरजनी
अष्टसात्विक भाव दाटले भक्तांच्या हृन्मनी ||१ ||
सनई चौघडे वाजती भक्त भूपाळी गाती
कोटी सूर्यतेज विलसे तव मुखकमलावरती ||२ ||
सप्तसागर सप्तनद्या तव चरणाशी येती
पापक्षालन करण्यास्तव तव चरणप्रक्षाळिती ||३||
भक्तांचे मन गुंतले श्रीसच्चिदानंदचरणी
श्रीसच्चिदानंदस्वामी वसो हृदयसिंहासनी ||४||

|| ओवी ||

स्वामी करिती मुखमार्जन | पश्चात करिती दुग्धप्राशन |
माधवदास घालिती स्नान | नित्यनेमे स्वामींना ||
श्रीसच्चिदानंद महाराजांसी | माधवदास नेसविती वस्त्रांसी |
करूनिया मृदू आसनासी | बसविती स्वामींसी प्रेमाने ||
जेव्हा होई मध्यान्ह | माधवदास करिती पूर्णान्न |
अर्पिती नैवेद्यान्न | श्रीसच्चिदानंद स्वामींसी ||
श्रीसच्चिदानंदस्वामींचे चाले भोजन | माधवदास म्हणती कवन |
अश्रूंनी भरूनी येती नयन | माधवदासांचे त्या वेळी ||

|| कवन ||

नैवेद्य स्वीकारा स्वामी हो, श्रीसच्चिदानंदा ||धृ ||
मध्याह्न झाली आले सूर्यबिंब डोईवरी
भोजनाची वेळ झाली सेवन करा भाकरी ||१ ||
गोडवरणभात त्यावरी शुद्ध लिंबूरस
मेळवूनी लवण त्यावरी सेवा स्वामी षड्रस || २||
पंचपक्वान्नांचा प्रसाद अर्पितो आम्ही सुग्रास
सेवन करा पदार्थ जे आवडती तुम्हा खास ||३ ||
नैवेद्य सेवन करूनी द्यावा तृप्तीचा ढेकर
भक्तजन नमिती तुम्हा जोडोनिया दोन्ही कर ||४||

||ओवी ||

ऐसी प्रार्थना करूनी | स्वामींचे हस्तप्रक्षालन करुनी |
विडा देती बनवूनी | माधवदास स्वामींना ||
विड्याने होई मुखशुद्धी | तैसेची होई आत्मशुद्धी |
होय भक्तीची वृद्धी | माधवदासांच्या अंतरात ||

|| विडा ||

विडा घ्या श्रीसच्चिदानंदा सर्व दुःखाच्या हन्ता
मुखशुद्धी करा आता तांबूल देतो भगवंता ||१||
षड्रिपूंची सुपारी मी फोडिली अडकित्ते दुर्गुण
सद्भक्तीचा गुलकंद एकजीव केले मिश्रण ||२||
सद्गुणांचे वेलदोडे नवविधा भक्ती कात
द्वेताद्वैताचा चुना क्षमा खोबरे तयात ||३ ||
क्रोधरहित जायफळ बडिशेप अंतरंग
त्रिगुणाचे बदाम घालू तांबूल शोभे लालरंग ||४||
एकादश इंद्रियांचा आता विडा बनवला
श्रीसच्चिदानंदस्वामींच्या चरणी माथा ठेविला ||५||

|| ओवी ||

मध्यान्ह भोजन झाल्यावरी | स्वामींची विश्रांती प्रहरभरी |
स्वामींच्या शरीरावरी | माधवदास वारा घालिती ||
जेव्हा अस्तासी जाई तमारी | चंद्रबिंब येई नभावरी |
श्रीसच्चिदानंद स्वामींची स्वारी | निद्रा शयन करितसे ||
स्वामींच्या शेजेभोवती | माधवदास उभे राहती |
पंख्याने वारा घालती | शेजारती म्हणती मुखाने ||
श्रीसच्चिदानंद स्वामींना फुलांची शेज |
दीपले आमुचे डोळे तुमचे पाहुनिया तेज || धृ ||
दिनरात्र भक्त येती तुमच्या दर्शना
पुरविती मनोरथ तुम्ही भक्तकामना ||
संसारत्रस्तांसाठी तुम्ही कृपेची साऊली
भक्त म्हणती श्रीसच्चिदानंद माऊली ||
देह अहंभाव पंखा वारा घालितो
सद्गुणांची शाल तुमच्या देही पांघरतो ||
दया क्षमा शांती दासी चरण सेविती
षड्रिपूंचा अग्नी पेटवूनी हुक्का तुम्हा देती ||
भक्तकृपेस्तव धावूनी स्वामी देह शिणलासे
वेळ झाली निजावयाची भक्त नमितसे ||
अशाप्रकारे माधवदास | स्वामीसेवा करिती खास |
श्रीसच्चिदानंदस्वामींचा ध्यास | सदा लागे माधवदासांसी ||

अध्याय असे हा आठवा | समाप्त होत असे बरवा |नमन श्रीसद्गुरूवरा | वैभव करितो श्रद्धेने ||

इति श्रीदासवैभवविरचिते श्रीसच्चिदानंदचरिते अष्टमोSध्यायः |


अध्याय – ९

संन्यासाश्रम स्वीकारला | काळ मागे सरला |
कंपवात शरीरास झाला | श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ||
सदा दत्तनाम चित्ती | पूर्वस्मृती जागृत होती |
श्रीसच्चिदानंद स्वामी सांगती | माधवदासांसी अनेक गोष्टी ||
रेवापरिक्रमा केली तरुणपणी | तेव्हा स्नानासी थंडपाणी |
कडुलिंबाचे सेवन प्रतिदिनी | केले मी माधवा रे ||
कडुलिंबाचे अतिसेवन | सदा शीतजलाने स्नान |
त्यामुळे आता शरीरास कंपन | भोग आहेत शरीराचे ||
स्वामी म्हणती माधवदासास | माझ्या आलिया भोगास |
परंतु त्रास होतो तूस | परि तू सेवा करतोस माझी ||
कंपवाताने क्षीण प्रकृती | परि साधनातेज मुखावरती |
भगवन्नामी रंगून जाती | सदासर्वकाळ स्वामी ||
शरीर झाले जर्जर | परि दत्तनामाचा निर्झर |
स्वामीमुखातूंनी वाहे भरभर | दत्तप्रभू देती संकेत ||
देहाची खोळ सांडावी | संजीवन समाधी घ्यावी |
अवतार समाप्ती करावी | ऐसी दत्ताज्ञा होय स्वामींसी ||
वार्धक्याने थकून | गेल्या भुवया पडून |
त्याखालील मांसल भाग गळून | खाली आला स्वामींचा ||
मांसल भाग येई डोळ्यावरी | त्यामुळे न दिसे समोरी |
कोण भेटाया आले सत्वरी | सांगू शक्ती स्वामी ||
स्वामींसी असे दिव्यदृष्टी | त्यांना दिसे सर्व सृष्टी |
स्वामी करिती अमृतवृष्टी | आपुल्या प्रिय भक्तांवरी ||
सहावा महिना हिंदू वर्षाचा | असे तो भाद्रपदाचा |
गणपती गौरी उत्सवाचा | अन् स्वामींच्या निर्वाणाचा ||
माधवदासांसी स्वामी वदले | अवतारकार्य आता संपले |
आता थोडेच दिन उरले | आम्ही संजीवन समाधी घेणार ||
दत्तभजनी घालवा काळ | सेवा दत्तप्रभूंसी सर्वकाळ |
तेच करतील प्रतिपाळ | माधवा तुझ्या वंशजांचा ||
सर्वस्व अर्पण केलेस मजला | माधवा, मम आशीष तुजला |
ह्या मंदिराच्या व्यवस्थेला | आता पुढे चालवावे ||
ऐकूनी ही स्वामीवाणी | माधवदासांच्या डोळा येई पाणी |
त्यांची चर्या दीनवाणी | सद्गतित झाले माधवदास ||
जैसा मासा जळावीण | पाडसाविना अस्वस्थ हरिण |
जैसी गाय वासरावीण | तैसी अवस्था माधवदासांची ||
परंतु श्रीसद्गुरूंची इच्छा प्रमाण | स्वये माधवदास आपण |
शोकाकुल अंतःकरण जाण | करू लागले सर्व तयारी ||
बोचरे नाम ब्राह्मण | नित्य करिती भागवत पठण |
संस्कृत मूलपाठ वाचन | श्रीसच्चिदानंद महाराजांपुढे ||
सुरू होई भगवद्गीतापठण | आणि दत्तनामस्मरण |
स्वामींच्या आवडीचे भजन | सुरू होई मंदिरात ||
सकाळ अन् संध्याकाळ | पायात बांधूनी चाळ |
भजननेम सदासर्वकाळ | श्रीसच्चिदानंद स्वामींचा ||
गळ्यात वीणा चाळ पायात | दत्तगायत्री संकीर्तनात |
समाधीयोगाच्या सकाळ प्रहरात | कीर्तन केले स्वामींनी ||
ही वार्ता रावेरात पसरली | मंडळी दर्शनासी येऊ लागली |
श्रीसच्चिदानंदमाऊली | आशीष देतसे सर्वांना ||
मातेशिवाय तान्हे कैसे | हरिणीविना पाडस कैसे |
दत्तमाऊलीस सोडून कैसे | राहतील श्रीसच्चिदानंद स्वामी ||
स्वामींचे माधवदासांसी आज्ञापन | दत्तचरणासी समाधीस्थान |
संन्यासाचे जरी पूर्वेसी आनन | परि पश्चिमुखी मी होणार ||
समाधीव्यवस्था झाली | श्रीसच्चिदानंद स्वामींनी हाक मारली |
माधवा, अरे दत्तमाऊली | बोलविते आहे आज मजला ||
वद्य पक्ष नवमी भाद्रपद मास | घातले स्वामींनी पद्मासनास |
शुचिर्भूत होवोनी दत्तास | प्रार्थिती श्रीसच्चिदानंद स्वामी ||
अनंत जन्मीचे सुकृत फळले | श्रीदत्ताचे दर्शन झाले |
आता हे शरीर थकले | द्यावा विसावा चरणापाशी ||
केली दत्तप्रभूंची सेवा | चाखला दत्तभक्तीचा मेवा |
आता चरणी ठाव द्यावा | आला समाधीक्षण जवळी ||
नेसली होती धाबळ सुंदर | भस्मांकित कांती मनोहर |
श्रीसच्चिदानंद यतिवर | चालले आता निजधामी ||
स्वामी म्हणती माधवासी | कोणी न यावे माझ्यापाशी |
श्रीदत्ताच्या चरणासी | रहावयासी चाललो आम्ही ||
तेवढ्यात जानकीबाई येती | केशवदास सोबत असती |
म्हणती त्या स्वामींप्रती | लेकरासी आशीर्वाद द्यावा ||
उचलावे माझ्या हस्तकी | ठेवावा केशवाचे मस्तकी |
शरीर माझे थकले की | स्वामी सांगती जानकीसी ||
स्वामी म्हणती जानकीबाईंसी | माझा आशीष केशवासी |
सेवा तुम्ही श्रीदत्तासी | योगक्षेम तोचि चालवेल ||
श्रीसच्चिदानंद स्वामींनी हात जोडले | श्रीगुरुदेव दत्त उच्चारिले |
नेत्रकमल मिटले | देहासी समाधीअवस्था ||
चित्ताचा होय लय | प्राणाचा पंचमहाभूंतांत होय विलय |
देह होतसे चैतन्याचा आलय | अशी समाधीअवस्था ||
दत्तात्रय अवधूता | जनार्दन स्वामी एकनाथा |
श्रीसच्चिदानंद स्वामी कृपा करा | ऐसा होतसे जयघोष ||
घेतली मोठी परात | स्वामींसी ठेविले त्यात |
श्रीदत्तमूर्ती लगत | ठेविले श्रीसच्चिदानंद स्वामींना ||
जैसी सुंदर वेल उपटावी गजाने | आकाश व्यापावे काळोखाने |
तैसी मनोवस्था झाल्याने | सर्व भक्तांसी होती क्लेश ||
ज्यांनी बालपणी सांभाळ केला | ज्यांनी लाविले भक्तीमार्गाला |
ज्यांनी दाविल्या अनंत लीला | त्यांचा विरह सहन न होय ||
माधवदासांनी घट्ट केले मन | केले और्ध्वोदेहिक तर्पण |
जैसे सांगती विद्वान | तैसे केले संन्यासी स्वामींचे कार्य ||
श्रीदत्तचरण हेचि गेह | श्रीसच्चिदानंद स्वामीदेह |
मनी न उरे संदेह | संजीवन समाधी जाहली ||
वय वर्षे अष्टोत्तर शत | इसवीसन अठराशे अठ्ठ्यांशी असत |
उत्सवप्रसंगी अन् प्रतिदिनी | समाधीपूजा होते सुगंधी द्रव्यांनी |
चैतन्यमय अद्वितीय सुगंधांनी | क्वचित वातावरण भरते ||
ह्या सुगंधाची अनुभूती | क्वचित प्रसंगी येते प्रचिती |
तपश्चर्येत सामर्थ्य असती | श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ||
संजीवन समाधी आहे का खरी | शंका येई परोपरी |
ऐसे बोलती वैखरी | अतिशहाणे विप्र समाधी आधी ||
त्यावेळी स्वामी बोलिले | विद्वत्तेचे नको दाखले |
ज्ञानेश्वर अन् नाथांनी केले | तैसेच सत्य दावीन मी ||
समाधीवेळी चमत्कार घडला | बजाज कुटुंब होते खांडव्याला |
‘श्रीगुरूदेव दत्त ध्वनी’ आला | घरातील खांबांतूनी ||
समाधी योगावेळी स्वामीयती | श्रीगुरुदेव दत्त म्हणती |
त्याचवेळी खांबातूनी येती | श्रीगुरुदेव दत्त एसे ध्वनी ||
बजाज कुटुंब खांबाची महती | ह्याच ग्रंथांत वर्णिली यथामती |
पुन्हा नको पुनरावृत्ती | ग्रंथ विस्तारभयास्तव ||
खांडवा भक्तजन रावेरी येती | हा वृत्तांत सांगती |
संजीवन समाधी प्रचिती | चूक मान्य केली विप्रांनी ||
आमुच्या मनी आला संशय | संजीवन समाधी विषय |
आता दुःख अतिशय | क्षमा करावी विप्र म्हणती ||
स्वामींचे लाडके कुत्रे दोन | त्यांचेही अस्वस्थ झाले मन |
एका कुत्र्याने सोडला प्राण | समाधीवरी मस्तक ठेवूनिया ||
कालांतराने दुसरा श्वान | नीरस झाले त्याचे जीवन |
भागवत सप्ताह ऐकून | त्यानेही केला प्राणत्याग ||
कुत्रे दोन्ही बहुत निष्ठावंत | कृपा करिती भगवंत |
जाहला तयांचा देहांत | मोक्षपद प्राप्त जाहले ||
श्रीसच्चिदानंद स्वामींनी | संजीवन समाधी घेऊनी |
मोक्षप्राप्ती दिली करूनी | जडमूढ अज्ञजनांसी ||
श्रीसच्चिदानंदस्वामींचे रूप | झाले सर्वांसी ते अरूप |
भक्तांनी जाणावे स्वस्वरूप | भक्त प्रार्थिती एकमुखाने ||

|| प्रार्थना ||

श्रीसच्चिदानंद स्वामीराया, आतुरलो रूप पहाया ||
आजानुबाहू शरीर टोपी मुकुटाकार
रूप तुझे सगुण साकार ||
रावेर दत्तमंदिर तुमचे स्थान
गातो आम्ही तुमचे गान ||
श्रीसच्चिदानंद स्वामी हो, धरितो पाय
माय तुम्ही वत्सा जैसी गाय ||
विश्वावरी तुमची सत्ता ब्रह्मांड नायका
आशीष द्यावा आम्हा बालका ||
भवनदी तरण्यासाठी आळवू स्वामी
वैभव तल्लीन तव नामी ||
ऐसी प्रार्थना करुनिया | सांगता करितो अध्याया |
श्रीसच्चिदानंद स्वामींच्या पाया | साष्टांग नमस्कार करितो ||

इति श्रीसच्चिदानंदचरितामृते श्रीदासवैभव विरचिते नवमोSध्यायः


अध्याय – १०

श्रीसच्चिदानंद स्वामींची | कथा समाधी योगाची |
वर्णिली बहुत साची | मागील अध्यायी ||
स्वामींच्या समाधीनंतर | माधवदासांनी निरंतर |
न पडू दिले कधी अंतर | भजनपूजनी दत्ताच्या ||
गोपाळमूर्तीसी पूजिती | विठ्ठलमूर्तीसी भजती |
मुखाने संवाद साधती | कोणीच नसे तयांजवळी ||
आजूबाजूला कोणी नसे | स्वामीवियोगाने लागले का पिसे |
माधवदास का बोलती ऐसे | प्रश्न पडे भक्तांना ||
माधवदास तयांसी वदती | श्रोतेहो ऐका सावचित्ती |
श्रीसच्चिदानंद स्वामी साधती | संवाद समाधीतूनी ||
वार्तालाप चाले सतत | माधवदास स्वामींसह बोलत |
विविध चर्चा करीत | श्रीसच्चिदानंद स्वामींच्या समाधीपुढे ||
स्वामींची समाधी पाहून | माधवदासांसी वैराग्य येऊन |
गेले माहूरास निघून | रावेराहून माधवदास ||
माहूरगडावर संत असती | परंपरा असे भारती |
माधवदासांसी ते वदती | येथे कासया आलात ||
साक्षात दत्त आहे रावेरी | न यावे आपण गडावरी |
परतून जावे माघारी | दत्तगादी सांभाळावी ||
ऐसे संतांनी समजावले | माधवदास पुनश्च आले |
रावेरी सेवा करु लागले | स्वामींच्या समाधीची ||
यावल तालुक्यात | त्यातील अंजाळे ग्रामात |
लक्ष्मीनारायण मूर्ती स्थापित | माधवदास त्यास्थानी ||
श्रीसच्चिदानंद स्वामी पुण्यतिथी अन् मत्स्य जयंती | दोन उत्सव सुरू करिती |
स्वामीपादुका स्थापन करिती | माधवदास त्या मंदिरात ||
अंजाळे गावातील गावकरी | रावेर परंपरेचे पालन करी |
तेथील मंदिरांचे अधिकारी | येती रावेरी मंदिरात ||
ग्रामस्थ अंजाळे गावाचे | शिष्य ते रावेर परंपरेचे |
कीर्तन करिती काल्याचे | दत्तमंदिरी रावेरी ||
दूरदुरनी भक्त येती | स्वामींच्या समाधीचे दर्शन घेती |
दत्तावतारी टेंब्ये स्वामी येती | रावेरी समाधी दर्शनासाठी ||
जैसा वृक्षावरी फलभार होय | तैसा वृक्ष झुकूनी जाय |
जैसे संत भगवंतमय | तैसी नम्रता तयांची वाढतसे ||
संत घेती संतांचे दर्शन | बंधुत्वाचे असे तयांचे वर्तन |
भगवन्नामाचे आवर्तन | होतसे संतांमध्ये सदा ||
संत दर्शने लाभ जाहला | हृदयामाजीं मोद दाटला |
देव सदेह अवतरला | असे ही संतांची किमया ||
प्रवासाची साधने नसती | तरीही संतभेटी होती |
पायी प्रवास करिती | संत एकमेकांना भेटावया ||
असे भारतवर्षातची रीती | जी मूर्ती संत स्थापिती |
धार्मिक क्षेत्र संतांची निर्मिती | महिमा तयाचा विशेष ||
अनेक संतमहंत | समाधीचे दर्शन घेत |
श्रीसांईबाबा शिर्डीतून येत | समाधीच्या दर्शनासाठी ||
मागील आठव्या अध्यायात | नानांचा उल्लेख असत |
माधवदासांचे ते अनुज होत | खांडवाचे मंदिर सांभाळिती ||
भगवद्भक्त असती नाना | करिती अनेक रचना |
अष्टक स्तोत्र प्रार्थना | रचिती श्रीसच्चिदानंद स्वामींवरी ||
गृहस्थाश्रमाची कर्तव्ये करिती | चतुर्थाश्रम स्वीकारिती |
नाना नाव धारण करिती | आनंदानंद स्वामी महाराज ||
ज्ञानेश्वरांचे सहोदर निवृत्तीनाथ | ते असती श्रीसद्गुरूनाथ |
कृपा करोनी करिती सनाथ | नानांचे सद्गुरू माधवदास ||
ह्या बंधू – सद्गुरूंवरती | नाना अनेक रचना करिती |
प्रासादिक अष्टक रचिती | भक्तांनी अवश्य वाचावे ||

|| अष्टक ||

गुरुभक्त तुम्हा असा कोणी नाही
म्हणोनी तुम्हा वर्णिती भक्त तेही
गुरूच्या अनुज्ञेकरी उत्सवाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
संसार साधोनि विरक्ती मोठी
अभिमान तोही असे नाचि पोटी
सदा शांतवृत्ती असे हो मनाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
सदा सर्वदा नाम वाचेसी घेई
सदा लक्ष्य ठेवी गुरुचेचि पायी
सदा सद्गुरू नाम घेऊनी ध्याला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
सदा शिष्यवर्गावरी प्रीतीपाही
उणे ते कुणाचे पहाणेचि नाही*
*सद्गुरूकृपेची आस नित्य सेवकाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
एक नाम जो सर्व जनांसि सांगे
गुरुदेव संतांसि सेवी निजांगे
श्रीगुरुदेव दत्त ऐसा निजबोध केला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
मजवरी पूर्ण कृपा असू दे
कुर्वडुनी टाकू तनू सिवाटे
गुरुकृपेने परिपूर्ण झाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
मना तूंचि रे श्रीगुरुसीच भावे
तया चिंतुनी नाम त्याचेचि घ्यावे*
अशा अल्पमतीने करी मी स्तुतीला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला
जया पाहता शंकर मूर्ती भासे
कुबुद्धी दर्शनेहोताचीच नासे
करी नाना ह्या अष्टकाला
नमस्कारितो श्रीगुरू माधवदाजीला

|| ओवी ||

श्रीसच्चिदानंद स्वामी वृंदावनात | एकदा होते निवास करित |
तेथे हस्तलिखित मिळत | भक्तमाल ग्रंथाचे ||
ग्रंथमहिमा असे बहुत | श्रीसच्चिदानंद स्वामी जवळी ठेवत |
असे ग्रंथ नित्य उपासनेत | श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ||
भक्तमाल ग्रंथाचे नित्यपठण | खांडवा मंदिरी करिती भक्तजन |
करावे नित्य अध्ययन | प्रथा सुरू करिती नाना महाराज ||
भगवद्दर्शनाचि दाखवी वाट | कठीण असो कर्माचा घाट |
संतचरित्र करिते सपाट | संतचरित्राने देव भेटतो ||
ऐसा नानांचा दृढ विश्वास | भक्तमाल ग्रंथ आवडतो देवास |
लावावा तो मस्तकास | समाधीचे वेळी ||
नाना महाराज ऐसे सांगती | माधवदास उपस्थित असती |
केशवदासही सवे येती | नानांच्या समाधीयोगावेळी ||
माधवदासांच्या आधी | नाना घेती समाधी |
भक्तमाल ग्रंथ डोईवरी आधी | ठेवा म्हणती नाना ||
श्रीसच्चिदानंद स्वामींचे नाव घेतले | शरीर भूवरी ठेविले |
नाना समाधिस्थ झाले | अक्षय्य तृतिया सन एकोणीसशे सहा ||
वैशाख तृतीया जी अक्षय्य | नानांची भक्तीसुद्धा अक्षय्य |
हीच पुण्यतिथी होय | नाना महाराजांची ||
नानांच्या समाधीनंतर | खांडवा दत्त मंदिर |
माधवदास पाहती व्यवहार | कुशलतेने मंदिराचा ||
ह्या संपूर्ण चरित्रात | माधवदासांचा उल्लेख असत |
भक्त तयांना भाऊ संबोधत | शिष्यपरिवार मोठा असे ||
गुरुमंत्र देण्याचा अधिकार | परंपरेचे सर्वाधिकार |
खांडवा रावेर मंदिर | दिले होते श्रीसच्चिदानंद स्वामींनी ||
चतुर्थाश्रम स्वीकारला | आचरिले संन्यास धर्माला |
नृसिंहसरस्वती स्वामी नावाला | धारण केले तयांनी ||
अंतकाळ समीप आला | चैत्र वद्य नवमीला
सन एकोणीसशे तेराला | समाधी घेती माधवदास ||
समाधी बांधावी दूर | नको स्वामींच्या समाधीसमोर |
माधवदास असती थोर | दुर्मिळ ऐसे शिष्य ||
रावेर बऱ्हाणपूर मार्गात | माधवदासांची समाधी असत |
खांडवा भक्तमंडळी बांधत | सुंदर समाधी तयांची ||
माधवदासांनंतर | दत्तपीठ रावेर |
तयाचा पूर्ण अधिकार | प्राप्त होई केशवदासांना ||
सुरू करिती नमसप्ताहास | बांधिती विठुमंदिराच्या मंडपास |
केशवदास पाहती व्यवस्थेस | रावेर खांडवा दत्तमंदिर ||
स्वामींचा वरदहस्त | केशवदासांवरी असत |
विविध सुधारणा करित | केशवदास दत्तमंदिरात ||
दत्तमंदिर फैजपुरात | केशवदास बांधत |
नामसप्ताह सुरू करीत | श्रीगुरुदेव दत्त नाम ||
केशवदास खांडव्यात | नानांची समाधी बांधत |
एक यवन जागा देत | समाधी बांधायासी ||
केशवदासांची माता | जानकीबाई पतिव्रता |
अनंतकाळ समीप येता | चाहूल लागे जानकीबाईंना ||
एक धाबळ अंथरती | जानकीबाई त्यावर निजती |
मुखी दत्तनाम घेती | करिती चित्त शांत ||
म्हणती त्या केशवदासांसी | मी चालले निजधामासी |
घेते भगवन्नामासी | आता पुन्हा नको जन्म ||
माझी इहलोकीयात्रा संपेल | त्यानंतर तुज पुत्र होईल |
मंदिराचा महिमा वाढेल | जानकीबाईंचा आशीष केशवदासांसी ||
दत्तभक्तीत झाले रममाण | दत्तावीण न काही आन |
दत्तरथाच्यामागे धावून | केशवदास सेविती रथोत्सवात ||
अनवाणी पायाने चालती | रथोत्सवात धांवती |
दत्तात्रेयांस नवस करिती | तेणे होय पुत्रप्राप्ती ||
नाव ठेविले पुत्राचे | असे नाथांच्या पणजोबांचे |
भानुदास नाम बाळाचे | जन्म गोकुळाष्टमीस ||
कथा तयांच्या जन्माची | असे विलक्षण अनुभूतीची |
येथे वर्णिली साची | ऐकावे सावचित्त होऊनी ||
चंद्रशेखरानंद सरस्वती | ओंकारेश्वरी राहती |
आपुल्या शिष्यांसी पाठविती | खांडवा दत्तमंदिरात ||
म्हणती ते धाडावा | सत्वर रावेरी सांगावा |
जन्म जो पुत्र नवा | रावेरच्या दत्तपरंपरेत ||
माझा आशीष त्या पुत्रासी | कळवावे रावेरी भक्तांसी |
द्यावे ह्या निरोपासी | वदले चंद्रशेखरानंद सरस्वती ||
रावेरकर जन अचंबित | पुत्रजन्मवार्ता कैसी पोहोचत |
चंद्रशेखरानंदसरस्वती कैसे जाणत | ओंकारेश्वरी राहूनी ||
दूरध्वनी साधने नव्हती | परि भानुदासांची कीर्ती |
चंद्रशेखरानंद सरस्वतींप्रती | पोहोचली असे सर्वथा ||
केशवदास पत्नीसमवेत | भानुदासांसी सवे घेत |
ओंकारेश्वरी पोहोचत | चंद्रशेखरानंद सरस्वतींकडे ||
भस्म धुनीतील चिमूटभर | भानुदासांच्या मस्तकावर |
चंद्रशेखरानंद यतीवर | आशीष देती बाल भानुदासांना ||
पंचेचाळीस वर्षे गुरुगादी सांभाळत | रावेर पंचक्रोशीत शिष्य निर्मित |
खांडव्यासी शिष्यपरंपरा स्थापित | केशवदासांचे कार्य मोठे ||
महिमा वाढविती मंदिराचा | प्रसार करिती दत्तभक्तीचा |
श्रीसच्चिदानंद स्वामींचा | आशीष असे केशवदासांवरी ||
सर्वसिद्धांत त्रयोदशी | म्हणजेच चैत्र वद्य त्रयोदशी |
केशवदास ह्या तिथीसी | देह ठेविती रावेरी ||
केशवदासांनतर | दत्तगादीचे सर्व अधिकार |
भानुदास करिती स्वीकार | सेवा करिती समाधीची ||
संतकृपा ज्यावरी | त्यावरी कृपा करी हरी |
नामदेवांची कृपा जनीवरी | विठू दळितो जनीघरी ||
श्रीसच्चिदानंद स्वामींचा वरदहस्त | ह्या कुटुंबावरी असत |
सद्भाग्य घेऊनी जन्मा येत | ह्या परंपरेतील सत्पुरुष ||
जो धरितो पाय संतांचे | काळ वंदी पाय त्याचे |
सुटतो जन्ममरण फेरा | तयासी मिळतो मोक्ष खरा ||
संतचरणरजाचा स्पर्श जाहला | षड्रिपूंनी पोबारा केला |
सात्विक भाव मनी जागला | शुद्ध होतसे अंतरंग
संतांसी पाहता सुखाविती नेत्र | संतध्यान करिता निवतात गात्र |
आनंद भरोनी राहे सर्वत्र | सर्वभूतांठायी परमेश्वर ||
भानुदास नित्य श्लोक म्हणत | श्लोक सच्चिदानंद स्वामींचा असत |
तो अपूर्ण आहे ऐसे भासत | श्लोक वाचावा भक्त हो ||

||श्लोक ||

श्रीसच्चिदानंद राजागुरुदत्तमूर्ती |
महाराज योगी सखा चक्रवर्ती ||
तुझिया कृपेने मूढ सूज्ञ झाले |
तुझे नाम घेता मन हे निमाले ||

||ओवी ||

भानुदास दत्तभक्तीत लीन | श्रीसच्चिदानंद स्वामी प्रगटती समाधीतून |
घ्यावा एक श्लोक सुधारून | वदले स्वामी भानुदासांना ||
म्हणूनी ज्याचा पूर्ण अवतार झाला |
नमस्कार श्रीसच्चिदानंदजीला ||
ऐसे लिहावेत दोन चरण | श्लोक पूर्ण होईल जाण |
करावा तो मजसी अर्पण | ऐसे सांगती महाराज ||
पवित्र मार्गशीर्ष महिन्यात | मोठा रथोत्सव असत |
प्रचंड पर्जन्यवृष्टी होत | एक दिवस आधी ||
भानुदास होती चिंतित | सच्चिदानंद स्वामी दृष्टांत देत |
उद्या रथोत्सव छान होत | चिंता करू नकोस ||
काळे मेघ जाती पळूनी | आकाश स्वछ दिसे नयनी |
रथोत्सवाची पर्वणी | उत्तम साजरी होतसे ||
चैत्र अमावास्या तिथी | भानुदासांची पुण्यतिथी |
धरेसी देह अर्पण करिती | दत्तभक्त भानुदास ||
भानुदासांचा सुत | नाम श्रीपाद असत |
खांडवा रावेर मंदिर सांभाळत | विद्यमान गादीपुरूष ते ||
श्रीपाद महाराजांचे दोन सुत | दतातमंदिरमहिमा वाढवत |
सदा दत्तनामी रत | असती परंपरेचे अधिकारी ||
श्रीसच्चिदानंद स्वामींनी लाविला | दत्तनामवेलु गगनी गेला |
निजभक्तकल्याणाला | करिती श्रीसच्चिदानंद स्वामी ||
दत्त-नाथ परंपरा माहिती | दिधली मी यथामती |
येथे आता शब्द थांबती | पूर्ण जाहला दहावा अध्याय ||

इति श्रीदासवैभवविरचिते श्रीसद्गुरू सच्चिदानंदचरितामृते दशमोSध्यायः |


अध्याय ११

विविध संतांची जयंती पुण्यतिथी | विविध उत्सव साजरे होती |
रावेरी दत्तमंदिरी येती | भक्तजन उत्सवासाठी ||
साजरे होती तिथीवार | तसैचि पवित्र सणवार |
आनंद होतसे अपार | रावेरकर भक्तांसी ||
भाद्रपदात मोठे उत्सव | भाद्रपद पौर्णिमा अन् वद्य नवमी उत्सव |
हेचि श्रीसच्चिदानंद स्वामींचे उत्सव | साजरे होती उत्साहात ||
दत्तजयंती सोहळ्याचे | त्यातील विविध पर्वणींचे |
प्रसिद्ध रथोत्सवाचे | आकर्षण असे भक्तांना ||
संपूर्ण भारतवर्षांत | एकमेव रथोत्सव असत |
दत्तपादुका रथांत | ठेवोनी परिक्रमा करिती ||
नागदिवाळी तिथीस | श्रीसच्चिदानंद स्वामींस |
प्रथम देऊनी निमंत्रणास | इतरांस निमंत्रण उत्सवाचे ||
मस्तनशहावली कुंवरस्वामी | अन्य संत रामबाई स्वामी |
जे जे रंगले दतातनामी | तयांसी निमंत्रण जाते ||
निमंत्रण दिंडी सोहळा असे | सर्वधर्मीय जनांचा सहभाग असे |
सर्व जातींचाही वाटा असे | एकोपा सर्वधर्मसमभावाचा ||
मोक्षदा एकादशी पासून | दत्तजन्मोत्सव सुरू होऊन |
पंचमीसी प्रक्षाळपूजन | सात दिवस कीर्तन असे ||
श्रीसच्चिदानंद स्वामींच्या ध्वजाचे | श्रीसद्गुरूंच्या पोथीचे |
श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे | पूजन होतसे उत्सवात ||
मार्गशीर्ष वद्य प्रतिपदेसी | भक्त जमती रथोत्सवासी |
लाकडाच्या ह्या रथासी | ओढती श्रद्धेने भक्त ||
काष्ठाचे अश्व सुंदर | रथासी छान कलाकुसर |
रथात बैसे योगेश्वर | सारथ्य करी अर्जुन ||
असे चित्र कल्पून | रथ दिला भेट म्हणून |
उत्तमप्रकारे सजवून | बेटावदच्या रतनबाईंनी ||
श्रीसच्चिदानंद स्वामींसी | अग्रवालशेट देती रथासी |
रतनबाई देती नवीन रथासी | तोच आता उपयोगी ||
जेव्हा दत्तात्रेयांची इच्छा होय | तेव्हा रथ ओढला जाय |
थकती सर्व उपाय | जर नसे देवाची इच्छा ||
ह्या घटनेची प्रचिती | आजही अनेक भक्त घेती |
रथ हाताने ओढती | रथ मार्ग आठवडीबाजारातून ||
प्रचंड मोठा रथ चालत | छोट्या मार्गातून जात |
भक्त होती अचंबित | पाहून हा चमत्कार ||
भक्तजन हंडी फोडती | विविधरंगी फटाके फोडती |
आतषबाजी त्यास म्हणती | भक्त तालावरी नाचती ||
दत्तपादुका प्रासादिक | तयांचे होतसे कौतुक |
दत्तपादुकांचे अर्चक | करिती प्रक्षाळपूजा ||
दत्त गुरू पालखीत बैसती | नगरपरिक्रमा करिती |
मंदिरी पुन्हा येती | पाऊलांच्या ठश्यांची प्रक्षाळपूजा ||
तीळगूळ मिश्रित | रेवडीचा प्रसाद असत |
सेवन करूनी तृप्त होत | भक्तजन रथोत्सवात ||
मार्गशीर्ष वद्य द्वितीया | पालखीत बैसे विठुराया |
पालखीचे भोई व्हाया | आवडे बहुत भक्तांना ||
सजवलेल्या पालखीत | दत्तपादुका असत |
विठ्ठलमूर्ती समवेत | गोपालजी असती तेथे ||
नगरपरिक्रमा करून | दत्तमंदिरासी प्रदक्षिणा घालून |
पालखी येई मंदिरी परतून | अतिरम्य तो सोहळा ||
पंचमी तिथीसी अन्नदान | होतसे सहस्रभोजन |
भक्तांसी वाटे समाधान | होय उत्सवाची सांगता ||
असाच उत्सव खांडव्याला | श्रीसच्चिदानंद स्वामींनी सुरू केला |
गुरूपौर्णिमा उत्सवाला | तेथे असती गादीपुरूष ||
रावेरच्या भक्तांचा | उत्सव गुरूपौर्णिमेचा |
उत्सव दत्तजयंतीचा | हाचि असे एकमेव ||
नमूनिया दत्तपादुका | उत्सव करिती निका |
आता येथे अवतरणिका | लिहविली मजकडूनी ||
पहिल्या अध्यायात | श्रीसच्चिदानंदस्वामी जन्मकथा असत |
स्वामींपित्यासी दत्तदर्शन होत | ते सविस्तर वर्णिले ||
श्रीसद्गुरूंची होई प्राप्ती | श्रीदत्तगुरू दर्शन देती |
छडी प्रसादपादुका मिळती | कथिले दुसरे अध्यायी ||
स्वामींची नर्मदापरिक्रमा | ज्ञानपटाचा महिमा |
स्वामी घेती दत्तनामा | वर्णिले तिसरे अध्यायी ||
पुढील चौथ्या अध्यायात | रावेरी आगमन होत |
स्वामी दत्तपीठ स्थापित | वाचावी ही कथा ||
पाचवे अध्यायी वर्णिले | कैसे गोपालजी अवतरले |
मूर्तीरूपी प्रगटले | दत्त विठ्ठल आणि देवी ||
संत असती समकालीन | कैसे ते स्वामींचरणी लीन |
सहावे अध्यायी केले कथन | वाचावे भक्तहो ||
असे अध्याय सातवा | वर्णिले स्वामींच्या अनुभवा |
अवतार दत्ताचा जाणावा | श्रीसच्चिदानंद स्वामी ||
कथा दत्त दर्शनाची | कथा पांढऱ्या निशाणाची |
स्वामींच्या चतुर्थाश्रमाची | कथा असे आठवे अध्यायी ||
कथा नवव्या अध्यायात | समाधी योगाची असत |
संजीवन समाधी घेत | वाचावे लक्षपूर्वक ||
श्रीसच्चिदानंद स्वामींचे उत्तराधिकारी |
परंपरा तयांची सारी |
स्वामींची कृपा वंशजांवरी | वर्णिली दहावे अध्यायी |
दत्तमंदिर रावेर | साजरे होती सणवार |
उत्सवास भक्त थोर | कथिले अकरावे अध्यायी ||
ऐसे वर्णिले चरित्राला | भाद्रपद वद्य नवमीला |
एकोणिसशे पंचेचाळीस शकाला | ग्रंथराज पूर्ण जाहला ||
ह्या ग्रंथाची होतसे पूर्ती | दिगंती जाईल ग्रंथकीर्ती |
मज होय काव्यस्फूर्ती | नयनी अश्रू दाटले ||

|| काव्य ||

श्रीसच्चिदानंद स्वामींनी आजि कृपा केली
स्वामीस्तुती लिहिण्याची सेवा मज दिधली || धृ ||
श्रीसच्चिदानंद नाम राहे शब्दे भरोनिया
अक्षररूपे स्वामीमूर्ती साकार झालीया
स्वामीगुणगान मी आवडीने गातो
चराचरी सर्व जगती स्वामींना मी पाहतो
सप्तसागराची शाई असे कागद धरणी
स्वामीस्तुती लिहावयाला न पुरे लेखणी
मज पामराकडूनी घडली स्वामीचरित्र सेवा
वैभवासी ठाव द्यावा हीच इच्छा देवा ||
श्रीदासगणू विरचित | श्रीसच्चिदानंदलीलामृत |
हाचि पाया ग्रंथाचा असत | त्यावरी चरितामृत कळस ||
श्रीआनंदानंदस्वामी म्हणजेच नाना | करिती अष्टकांच्या रचना |
उपयोग त्याचा चरित्रलेखना | बहुत झाला उत्तम ||
श्रीसच्चिदानंदस्वामींचे हस्ताक्षर | ज्ञानपट जो रचिती ज्ञानेश्वर |
गुरूपरंपरेचे सार | उपलब्ध आहे रावेरी ||
इंग्रज सरकारने काढला | नंतर केशवदासांनीसुद्धा काढला |
अतिशय जपोनी ठेविला | श्रीसच्चिदानंदस्वामींचा फोटो ||
श्रीसच्चिदानंद चरितामृताचा | विधी ऐका पारायणाचा |
एक दिन अथवा तीन दिन वाचा | पुण्यप्रद हा ग्रंथराज ||
घेऊनी गहू मूठभरी | पसरून ते चौरंगावरी |
कलश ठेऊनी त्यावरी | कलशांत पाणी ठेवावे ||
शेजारी कलशाच्या | फोटो सच्चिदानंद स्वामींचा |
नसल्यास श्रीदत्ताचा | ठेवावा बहुत आदराने ||
कलश आणि फोटो पुजून | चमेलीची फुले वाहून |
नसल्यास उपलब्ध फुले अर्पून | करावे ग्रंथाचे पूजन ||
शुद्ध तुपाचा दिवा लावणे | धूतवस्त्र धारण करणे |
स्वच्छ आसनावरी बसणे | पवित्र असावे मन |
पहिले दिनी चार अध्याय | दुसरे दिनी चार अध्याय |
तिसरे दिनी तीन अध्याय | वाचोनी आरती करावी ||
देवासी नैवेद्य अर्पून | विप्रासी दक्षिणा देऊन |
ब्राह्मणभोजन घालून | करावी पारायण समाप्ती ||
ऐसे करिता पारायण | प्रसन्न होईल अत्रिनंदन |
सुखसमृद्धीने भरेल जीवन | श्रीसच्चिदानंद स्वामींच्या कृपेने ||
देवाहून श्रेष्ठ श्रीसद्गुरू | ठेविला त्यांनी कृपाकरू |
बुद्धिवैभवाचा दातारु | एकमेव श्रीसद्गुरूराव ||
श्रीसद्गुरूंनी जे लिहवीले | ते येथे प्रगट जाहले |
माझे काही न उरले | ग्रंथ अर्पण करितो आता ||
श्रीसद्गुरू आनंदकंद | स्वामी श्रीसच्चिदानंद |
दासवैभव पदारविंद | शत शत नमन करितो ||

इति श्रीदासवैभवविरचिते श्रीसद्गुरू सच्चिदानंदचरितामृते एकादशोSध्यायः |

 

 


शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांती ला भेट द्या 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *