श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर

श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर

श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर उर्फ नाना महाराज यांचे अल्प चरित्र

” थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या मान व्हावे, हाची घ्यावा बोध खरा,” असे संतांच्या बाबतीत बोलले जाते .श्री संत नाना महाराजांच्या कार्याबाबत मी अनेक वर्ष फक्त ऐकले होते .बाळ सामंत यांनी ऑगस्ट १९५९ साली प्रकाशित केलेले चरित्र वाचले तसेच सौ .आशा गडकरी यांनी लिहिलेल्या श्री संत राम मारुती महाराज यांच्या चरित्रात नाना महाराज यांच्या बद्दलची माहिती वाचली . त्याच प्रमाणे प्र .ल. मोकाशी यांच्या ” चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा इतिहास ” या ग्रंथात नाना महाराज व त्यांनी स्थापन केलेल्या संस्थे संदर्भात माहिती वाचली . २० जुलै १९५२ रोजी नाना महाराजांनी यां जगाचा निरोप घेतला. त्यापूर्वी दहा वर्ष त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे कार्य बंद पडले .परंतु नाना महाराज यांची महती आणी त्यांच्या कार्याची माहिती अनेकांना नाही . २०२६ साली नाना महाराजांची १५० वी जयंती आणी २०२७ साली महाराजांची ७५ वी पुण्यतिथी आहे . त्यापूर्वी जास्तीत जास्त जणांना महाराजांची व त्यांच्या कार्याची माहिती व्हावी व त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण पुढे यावेत या उद्देशाने मी अल्पचरित्र लिहायचे ठरवले आहे . हे अल्पचरित्र जास्तीत जास्त जण वाचतील व महाराजांचे कार्य येत्या पाच वर्षात पूर्ण होईल ही अपेक्षा.


बालपण

रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे श्री बळवंतराव नाचणे रहात होते .त्यांचे लग्न मुरुडच्या आत्माराम सबनीस यांची कन्या सुंदरा यांच्याबरोबर झाले .सुंदराबाई यांचा कल धार्मिक प्रवृत्तीकडे होता . बळवंतराव सुध्दा भाविक होते .त्यांची श्रध्दा नांदगावच्या गजाननावर होती .कालांतराने ते अक्कलकोट स्वामींच्या सेवेसाठी संसाराचा त्याग करून अक्कलकोट येथील आश्रमात राहू लागले . दीड वर्षांनंतर अक्कलकोट स्वामींनीच त्यांना आशीर्वाद दिला आणी घरी परतण्याची आज्ञा दिली. बळवंतराव घरी आले व संसार करू लागले .त्यांना शके १७९८ भाद्रपद शु. १० म्हणजे १० सप्टेंबर १८७६ रोजी पुत्ररत्न झाले . त्याचे नांव नारायण ठेवण्यात आले . हेच नारायण बळवंतराव नाचणे पुढे श्रीसंत नारायण महाराज श्रीगोंदेकर उर्फ नाना महाराज म्हणून प्रसिध्द झाले . नाना महाराज अवघे आठ वर्षाचे असतांना त्यांच्या वडिलांचे व थोड्या वर्षात आजोबांचे निधन झाले. त्यांच्या आत्याने सर्व कुटुंबाला आधार दिला. नाना महाराजांचे मुरुड येथील शाळेत शिक्षण सुरू झाले. ते अत्यंत बुध्दीमान होते. ते वयाच्या अकराव्या वर्षी सातवीची परीक्षा पास झाले . त्यांना पुढील शिक्षण पुणे येथे घेण्याची इच्छा होती . परंतु ते शक्य न झाल्याने मुरुड येथेच इंग्रजी तीन ईयत्ते पर्यंतचे शिक्षण घेतले . अधिक शिकायची इच्छा असूनही वयाच्या तेराव्या वर्षी महाराजांवर प्रपंचाचा भार पडला . नोकरीसाठी ते १८९१ साली मुरुडहून मुंबईला दोन लहान भावंडांसह मामाकडे राहू लागले . महाराज पंचवीस वर्षाचे असतांना त्यांच्या आईचे निधन झाले . नंतर ते धाकटे भाऊ केशव व शंकर यांच्यासह ठाणे येथे महागीरीत राहू लागले . ठाणे येथे जम बसत असतानाच प्लेगच्या साथींमुळे त्यांनी ठाणे सोडून पुन्हा मुरुड येथे राहण्यास सुरुवात केली . १९०२ मध्ये ठाण्याच्या राजारामभाऊ वासकर गुप्ते यांच्या कन्येबरोबर नाना महाराजांचे लग्न झाले . लग्न झाल्यानंतर महाराज संसारात रमले नाहीत . नोकरीच्या निमित्ताने ते मद्रास व तेथून पुणे येथे राहू लागले . त्यांचा कल देवधर्मा कडे झुकला. त्यांनी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला . दरम्यान त्यांचा भाऊ केशव याचे निधन झाल्यामुळे त्याची पत्नी व लहान मुलगी यांची जबाबदारी महाराजांवर पडली . ज्योतिष शास्त्रात पारंगत असल्यामुळे महाराजांकडे अनेकजण येऊ लागले . केशवच्या निधनानंतर त्यांनी ज्योतिष बघणे सोडून दिले व दुसरे बंधु शंकरराव यांच्यासह तीर्थयात्रेला जाण्याचे ठरविले . *संत समागम* तीर्थयात्रेला निघाल्या नंतर पुणे येथे नाना महाराजांची व श्रीकृष्णानंद महाराजांची भेट झाली . काही काळ एकत्र घालवल्यानंतर नाना महाराजांनी श्रीकृष्णानंद महाराजांचे शिष्यत्व पत्करले. ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्यात श्रीकृष्णानंद महाराजांची विशेष ख्याती होती. त्यांच्याकडून नाना महाराज यांनी ज्ञानेश्वरीचे धडे घेतले . त्याकाळात त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले .उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ते शिंपीकाम करत .श्रीकृष्णानंद महाराजांनाच्या निर्वाणानंतर नाना महाराज हेच त्यांचे आध्यात्मिक वारस झाले . १९१४ मध्ये श्रीसंत नाना महाराज आणी श्री राममारुती महाराजांची दादर येथे प्रथम भेट झाली . कालांतराने त्यांच्यात घनिष्ठ संबध निर्माण झाले .त्यांच्यात विचारांचे आदान प्रदान होऊ लागले .अशावेळेस श्री राममारुती महाराजांनी आपले समाज सुधारणा व शिक्षण यां विषयीचे विचार मोठ्या कळकळीने नाना महाराजांना सांगितले . श्री राममारुती महाराजांना देशाची व समाजाची अवनती थांबवण्यासाठी तरुण पिढी सुशिक्षित, स्वावलंबी, सुदृढ, व सुसंस्कारी असावी असे वाटत होते . त्यासाठी असे शिक्षण देणाऱ्या शिक्षणसंस्था समाजात निर्माण व्हाव्यात व त्यामार्फत समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थ्याना असे शिक्षण मिळावे अशी त्यांची उत्कट इच्छा होती . त्यांनी हे शिवधनुष्य उचलण्याची विनंती नाना महाराज यांना केली . नाना महाराज यांनी श्री राममारुती महाराज यांची विनंती स्विकारली . श्री संत राममारुती महाराज यांच्या महानिर्वाणा नंतर १९३१ साली अविश्रांत परिश्रम, आंतरिक तळमळ, सत्यनिष्ठा यांच्या बळावर नाना महाराज यांनी मुंबई येथे ” कृष्णानंद प्रासादिक चां.का. प्र . शिक्षणोत्तेजक परस्पर सहाय्यक शिक्षण संस्था ” व स्त्रियांसाठी ” मातृवात्सल्य सेवा मंडळ ” या दोन संस्था व विठ्ठल नगर येथे ” कृष्णानंद राममारुती विद्याश्रम ” अशा संस्था स्थापन केल्या व कालांतराने त्या सर्व समाजासाठी खुल्या केल्या . अशा प्रकारे त्यांनी श्री राममारुती महाराजांचे समाज सुधारणे साठी उत्तम व सर्वांगी शिक्षण हे ध्येय साकार करण्यासाठी पाहिले पाऊल उचलले.

श्री कृष्णानंद राममारुती विद्याश्रम, विठ्ठल नगर श्री संत राममारुती महाराजांचे स्वप्न साकार करण्यासाठी नाना महाराज यांनी फक्त योजना आखली नाही तर प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ” श्री कृष्णानंद राममारुती विद्याश्रम ” ही संस्था स्थापन करून २० मार्च १९३१ रोजी भीमा नदीच्या काठी दौंड-सोलापूर रेल्वेच्या दरम्यान मलठण स्टेशन पासून दोन मैलावर तीनशे पन्नास एकर जागा खरेदी केली . येथे विद्यार्थ्याना राहण्याची सोय व्हावी म्हणून दहा खोल्या बांधल्या . पंचाहत्तर गुरे ठेवण्यात आली . त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दुधाची सोय झाली . शेतीसाठी बैल घेतले . इंग्रजी पाचवी पर्यंत शिक्षणाची सोय करण्यात आली . दरवर्षी ऐंशी मुले शिक्षण घेउन बाहेर पडत असत . त्यांपैकी पस्तीस जण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातील मुले असत . १९४२ च्या दरम्यान सर्वत्र स्वातंत्र्यासाठी जोरदार आंदोलन सुरू झाली . ह्या शाळेत क्रांतिकारकांना प्रशिक्षण दिले जाते असा इंग्रज सरकारला संशय आला व त्यांनी ही संस्था बंद केली . भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर ही संस्था सुरू व्हावी यासाठी महाराजांनी पुन्हा प्रयत्न केला परंतु निधी अभावी ही संस्था बंद पडली . मोठ्या कष्टाने मांडलेला खेळ मोडल्याने नाना महाराज विषण्ण झाले . सामाजिक उध्दाराचे त्यांचे प्रात्यक्षिक पैशाच्या पाठबळाच्या अभावी फसले . प्रेम, निष्ठा, कष्ट आणी त्याग याची समाजाला परवा नव्हती . उत्तम शिक्षणाचे समाजाला सोयरसुतक नव्हते , संस्कृतीची चाड नव्हती, आत्मीयतेची क्षिती नव्हती . त्यामुळेच त्यागाच्या आणि कष्टाच्या भावनेवर उभारलेले हे विद्यामंदिर आर्थिक अडचणीमुळे कोसळले . ते कोसळू नये म्हणून महाराजांनी भगीरथ प्रयत्न केले . धरू नये त्यांचे पाय धरले . ज्यांच्याकडे जाऊ नये त्यांच्या घराचे उंबरठे झिजवले . ज्यांच्याशी एक शब्दही बोलू नये त्यांच्याशी चर्चा केली . पण या चर्चेचा, संवादाचा आणि विनवणीचा काहीही फायदा झाला नाही . कारण समाजालाच आपल्या कल्याणाची काळजी नव्हती, स्वतःच्या प्रगतीची आस नव्हती, स्वतःच्या उध्दाराची तळमळ नव्हती म्हणून अशी तळमळ आणि निष्ठा असणाऱ्यांचे स्वप्न भंगले . नाना महाराजांच्या अंतर्यामी ही गोष्ट फार लागून राहिली . संत राममारुती महाराजांना दिलेल्या आश्वासनांची आपण पूर्ती करू शकलो नाही याचे दुःख त्यांना वाटले . २० जुलै १९५२ रोजी नाना महाराजांनी या जगाचा निरोप घेतला.

संस्थेची सद्यस्थिती आणी भवितव्य नाना महाराजांच्या पश्चात त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अनेकांनी आपले तन, मन, धन अर्पण करून प्रयत्न केले . परंतु त्यांत कोणालाही यश आले नाही . जो अनुभव महाराजांना आला तोच त्यांना आला . याउलट अनेक खाजगी शैक्षणिक संस्थांनी गेल्या पन्नास वर्षात शेकडो एकर जागा खरेदी करून संस्था नावारूपाला आणल्या व अनेक संस्था स्थापन करणारे शिक्षण सम्राट म्हणून करोडो रुपयांची उलाढाल करत आहेत . नाना महाराजांचे स्वप्नं साकार करणे म्हणजे गोवर्धन पर्वत उचलण्यासारखे आहे . श्रीकृष्णाने एकट्याने नुसत्या करंगळीने पर्वत उचलला होता . संस्थेच्या नावात कृष्णाचे नांव असले तरी एकट्याने जबाबदारी उचलावी अशी कोणीही एक सक्षम व्यक्ती कृष्णा ची भूमिका पार पाडू शकत नसल्यामुळे समाजातील उद्योगपती, राजकारण, समाजकारण , अध्यात्म, शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणारे हजारो हात एकत्र आले तर महाराजांचे स्वप्नं साकार होण्यास वेळ लागणार नाही . सध्या संस्थेचे पदाधिकारी दर दोन वर्षांनी निवडणुका घेण्याचा फार्स करत आहेत . फारच थोड्या नव्या सभासदांना निवडून येण्याची संधी मिळते .जरी ते निवडून आले आणी त्यांनी काही उपयुक्त सूचना केल्या तरी जुन्या सभासदांचा कंपू त्या सूचनांची दखल घेत नाहीत . तसेच सूचना करणारे अथवा मनापासून काम करू इच्छिणाऱ्या कमी वयाच्या उत्साही व्यक्ती पुन्हा निवडून येणार नाहीत याची खबरदारी हा कंपू घेतो . हया संस्थेत अनेक वर्ष काम करणाऱ्या व्यक्ती सत्तरीच्या पुढे वय असणाऱ्या आहेत . त्यांना प्रवास करणे शक्य नसल्याने ते फक्त दोन वर्षानी मतदानासाठी जातात व निवडून आले की दोन वर्ष आराम करतात . संस्थेच्या निवडणुकीत हमखास निवडून येण्यासाठी हा कंपू फक्त त्यांच्या मर्जीतील व्यक्तींना सभासद करून घेतात . त्यामुळे संस्थेची स्थापना होऊन अनेक वर्ष झाली तरी फारच थोड्या व्यक्तींना श्री संत नाना महाराज यांची महती आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेची माहिती नाही . ही परिस्थिती अशीच राहिली तर महाराजांनी विकत घेतलेल्या संस्थेच्या मालकीच्या तीनशे पन्नास एकर जमीनीवर अतिक्रमण होण्याची शक्यता आहे . असे झाले तर नाना महाराजांचे स्वप्नं कायमचे भंग झाल्याशिवाय राहणार नाही .

नाना महाराजांचे स्वप्नं पुरे करण्यासाठी 2026, 2027 साल महत्वाचे:- २०२६ साली नाना महाराजांची १५० वी जयंती आहे . तसेच २०२७ साली महाराजांची ७५ वी पुण्यतिथी आहे . त्यामुळे येत्या पाच वर्षात काही ठोस निर्णय घेउन नाना महाराजांचे व संत राममारुती महाराजांचे स्वप्नं साकार करण्यासाठी दोन्ही महाराजांच्या शिष्यांनी, भक्तांनी एकत्र येऊन तीनशे पन्नास एकर जमिनीवर नाना महाराजांच्या नांवे भव्य शैक्षणिक संस्था सुरू करावी तसेच लहान मोठे उद्योग सुरू करावेत . अर्थात त्यासाठी संस्थेत ” नामधारी पदाधिकारी ” असून चालणार नसून ज्यांना मनापासून महाराजांचे स्वप्न साकार करायचे आहे, जे त्यासाठी खास वेळ देऊ शकतील, संस्थेला वारंवार भेट देऊ शकतील, ज्यांचे आरोग्य ठीक आहे, ज्यांचा जनसंपर्क चांगला आहे अशा शक्यतो सत्तर वर्षापर्यंतच्या अनुभवी व्यक्तींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे . योगायोगाने सध्या कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांची मुदत ९ सप्टेंबर २०२० ला संपत आहे . त्यांना लवकरात लवकर निवडणुका घ्याव्या लागतील .कम्पुशाही जाऊन सुयोग्य व्यक्ती जर पदावर आल्या तरच नाना महाराज व श्री संत राममारुती महाराज यांचे स्वप्न साकार होईल . संस्थेच्या सभासदांनी यासाठी जागृत राहून श्री संत राममारुती महाराज आणि श्री संत नाना महाराज यांची मोठी चरित्र वाचावी . सर्व जागृत सभासदांनी योग्य व्यक्तींना संधी दिली तरच येत्या पाच वर्षात योग्य निर्णय घेतले जातील . महाराजांचे स्वप्न साकार व्हावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

संकलन:-

दिलीप प्रभाकर गडकरी कर्जत – रायगड 


श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर माहिती समाप्त.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *