संत सखू

संत सखू

संत सखू 

कृष्णा नदीच्या तीरावर करवीर नावाचे तीर्थक्षेत्र आहे. फार वर्षांपूर्वी तेथे सखूचे सासर होते. तिच्या पतीचे नाव होते दिगंबर. तिच्या घरी तिची सासूही रहात असे. तिची सासू फार खाष्ट होती. ती सखूला फार त्रास देत असे. तिचा हरप्रकारे छळ करत असे. तिला उपाशी ठेवत असे, मारहाणही करत असे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिची सासू तिला कामाला जुंपून ठेवी. सारे काम करूनही सासूची बोलणी ही नित्याचीच असत. सखू मात्र हे सारे निमूटपणे सहन करी. भोळी-भाबडी सखू काम करतांना नेहमी विठ्ठलाचे स्मरण करी. तिच्या मुखी सारखे पांडुरंगाचेच नाम असे.


संत सखू अँप डाउनलोड करा 


एकदा काय झाले, आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीला जाणारी दिंडी तिच्या गावी आली. दिंडी कृष्णेच्या तीरावर थांबली. तेथे वारकऱ्यांचे भजन चालू झाले. महाराज कीर्तन करायला उभे राहिले. नेमकी त्याच वेळी सखू नदीवर पाणी भरण्यासाठी आली होती. कीर्तनकार पंढरीचा महिमा वर्णू लागले. पांडुरंगाची थोरवी गाऊ लागले. विठ्ठलनाम कानावर पडताच सखूचे लक्ष तिकडे गेले. महाराजांचे कीर्तन ऐकण्यात ती तल्लीन झाली. सर्व वारकऱ्यांना पाहून तिलाही पंढरीला जावेसे वाटू लागले. तिला विठ्ठलदर्शनाची अनिवार ओढ लागली. काही झाले तरी आपण पंढरपुरला जायचेच, असे तिने ठरवले. त्या निश्चयाच्या भरात सखूने आपली घागर शेजारणीजवळ दिली आणि घरी नेऊन देण्यास सांगितले. ती दिंडीसमवेतच पुढे निघाली. विठ्ठलनामाच्या जयघोषात सखू अगदी दंग झाली.

इकडे शेजारणीने सखूच्या घरी घागर नेऊन दिली. सासूने शेजारणीला विचारले, ”सखू कुठे गेली ?” शेजारणीने सारे वृत्त कथन केले. ते ऐकून सासूला फारच राग आला. संतापाने ती लाल झाली. तिने लगेच आपल्या मुलाला बोलावून घेतले आणि ताबडतोब सखूला घेऊन येण्यास सांगितले. दिगंबराने भराभर चालत जाऊन दिंडी गाठली आणि सखूला मारझोड करतच घरी घेऊन आला. दोघांनी मिळून तिला एका खोलीत कोंडून ठेवले. तिला अन्नपाणीही द्यायचे नाही, असे त्यांनी ठरवले.

सखूला वाईट वाटले ते या गोष्टीचे की, आता पांडुरंगाचे दर्शन होणार नाही. तिने पांडुरंगाचा धावा चालू केला. व्याकुळ होऊन ती पांडुरंगाला आळवू लागली.

बा रे पांडुरंगा । केव्हा भेट देसी ।।

झाले मी परदेसी । तुजविण ।।

तुजविण सखा । मज कोणी नाही ।।

वाटते चरणी । घालावी मिठी ।।

ओवाळावी काया । चरणावरोनी ।।

तेव्हा चक्रपाणी । भेटशील ।।

सखूची निस्सीम भक्ती आणि भोळया भावामुळे पांडुरंग तिच्यावर प्रसन्न झाला. पांडुरंगाने रुक्मिणीला सारी खरी गोष्ट सांगितली आणि स्त्रीवेष घेऊन तो सखूपाशी आला. सखूच्या बंद खोलीत जाऊन त्या स्त्रीने तिची विचारपूस केली आणि आपणही पंढरपुरचे वारकरी असल्याचे तिने सांगितले. तेव्हा सखूने आपली सारी व्याकुळता तिच्यासमोर व्यक्त केली. त्या स्त्रीने तिला सांगितले की, तू पंढरीला जाऊन ये. पांडुरंगाचे दर्शन घेऊन ये. तोपर्यंत मी इथे राहीन. हे ऐकून सखूचा आनंद गगनात मावेनासा झाला.

सखू पंढरपुरास आली. पांडुरंगाचे रूप बघून धन्य धन्य झाली. तिला जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले आणि तिथेच तिने आपले प्राण ठेवले. दिंडीस आलेल्या तिच्या गावकऱ्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले.

इकडे एकादशी झाल्यावर दिगंबराने सखूच्या खोलीचे दार उघडले. सखूच्या रूपातील पांडुरंग सखूची सारी कामे करू लागला. तिच्या सासूने सांगितलेली सारी कामे पांडुरंग निमूटपणे करत असे.

इकडे रुक्मिणीला चिंता वाटू लागली की, सखू पुन्हा गेलीच नाही, तर विठ्ठल तिच्या घरीच अडकून राहील. रुक्मिणीने सखूची राख आणि अस्थी एकत्र केल्या आणि सखूला जिवंत करून घरी पाठवून दिले. सखू घरी पोहोचतांना वाटेतच तिला पांडुरंगाच्या वेषातील सखू भेटली.

इकडे ज्या गावकऱ्यांनी सखूचे अंत्यसंस्कार केले होते, ते सखूच्या घरी आले, तर सखू त्यांना घरकाम करतांना दिसली. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी सखूच्या नवऱ्याला आणि सासूला सारा वृत्तांत सांगितला. तो ऐकून त्यांनी सखूला खरा प्रकार काय आहे, ते विचारले. सखूने सारी घटना कथन केली. ती ऐकून गावकरी स्तब्ध झाले. तिच्या नवऱ्याला आणि सासूला पश्चात्ताप झाला.


Krushi kranti

लेख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *