Sant savta mali : संत सावता माळी

Sant savta mali : संत सावता माळी

Sant savta mali : संत सावता माळी


संत सावता माळी – कुटुंब

सावता माळी हे एक मराठी संतकवी होते सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्या मध्ये अरण हे सावतोबांचे गाव होय. दैवू माळी हे सावता महाराजांचे आजोबा होते, ते पंढरीचे वारकरी होते त्यांना दोन मुले होती पुरसोबा आणि डोंगरोबा पुरसोबा हे धार्मिक वळणाचे होते शेतीचा व्यवसाय सांभाळून ते भजन-पूजन करीत असत, पंढरीची वारी करीत असत. त्यांचा विवाहही त्याच पंचक्रोशीतील सदू माळी यांच्या मुलीशी झाला. या दांपत्याच्या पोटी सावतोबांचा जन्म झाला. या घराण्याचे मूळ गाव मिरज संस्थानातले औसे होय. दैवू माळी (आजोबा) अरण या गावी स्थायिक झाले. भेंड हे गाव जवळच दोन मैलांवर आहे.

सावता माळी यांनी भेंड गावचे ‘भानवसे रूपमाळी’ हे घराणे असलेल्या जनाई नावाच्या मुलीशी लग्न केले. तिने उत्तम संसार केला. त्यांना विठ्ठल व नागाताई अशी दोन अपत्ये झाली. सावता माळी यांनी सेना न्हावी नरहरी सोनार यांच्याप्रमाणेच त्यांनीही आपल्या व्यवसायातील वाक्प्रचार, शब्द अभंगात वापरले आहेत. तत्कालीन मराठी अभंगाच्या भाषेत नव्या शब्दांची, नव्या उपमानांची त्यामुळे भर पडली. सावता माळ्याचे अभंग काशीबा गुरव हा लिहून ठेवत असे.

संत सावता माळी यांच्या बद्दल संत नामदेव म्हणतात:-
धन्य ते अरण, रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।।
सावता सागर, प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।।


संत सावता माळी – जीवनी (sant savta mali information in marathi)

‘साव’ म्हणजे खरे तर शुद्ध चारित्र्य, सज्जनपणा. सावता हा भाववाचक शब्द होय. सभ्यता, सावपणा असा याचा अर्थ होतो. सावता महाराज लहानपणापासून विठ्ठलभक्तीमध्ये रममाण झाले. फुले, फळे, भाज्या आदी पिके काढण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता.

‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’ असे ते एका अभंगात म्हणतात.

ऐहिक जीवनात कर्तव्यकर्मे करीत असतानाच काया-वाचे-मने ईश्र्वरभक्ती करता येते, हा अधिकार सर्वांना आहे. ‘न लगे सायास, न पडे संकट, नामे सोपी वाट वैकुंठाची’ असा त्यांचा रोकडा अनुभव होता. त्यांनी जनसामान्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविला. यांना केवळ ४५ वर्षांचे आयुष्य लाभले. धार्मिक प्रबोधनाचे व भक्तिप्रसाराचे कार्य त्यांनी निष्ठेने व्रत म्हणून आचरिले. समरसता आणि अलिप्तता यातील विलक्षण समतोल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रकर्षाने जाणवतो. त्यांचे केवळ ३७ अभंग उपलब्ध आहेत. अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले. आजही पंढरपूरच्या श्री विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

अरण येथे आषाढ वद्य चतुर्दशी, शके १२१७ (दि. १२ जुलै, १२९५) रोजी संत सावता महाराज अनंतात विलीन झाले असे मानले जाते. परंतु या दिनांकाविषयी भेद् आहेत असे कळते. कालनिर्णय दिनदर्शिकेत सावता माळी यांची पुण्यतिथी २५ जुलै अशी दर्शवली आहे.

सावता माळी हे कर्तव्य आणि कर्म करीत राहणे हीच खरी ईश्वारसेवा अशी प्रवृत्तिमार्गी शिकवण देणारे संत आहेत. वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ संत म्हणून त्यांचा लौकिक आहे. श्री विठ्ठल हेच त्यांचे परमदैवत होते. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते. ‘कर्मे ईशु भजावा’ हीच त्यांची वृत्ती होती.पंढरपूरच्या विठ्ठलाची पालखी वर्षातून एकदा खास त्यांना भेटावयास येत असते.

अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड त्यांनी घातली. धर्माचरणातील अंध:श्रद्धा, कर्मठपणा, दांभिकता व बाह्य अवडंबर याबाबत त्यांनी कोणाचीच भीडभाड ठेवली नाही. त्यावर सतत कोरडे ओढले. अन्त:शुद्धी, तत्त्वचिंतन, सदाचार, निर्भयता, नीतिमत्ता, सहिष्णुता इत्यादी गुणांची त्यांनी भलावण केली. ईश्र्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये या साधनांची बिलकूल आवश्यकता नाही. केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे.


हे पण वाचा:- संत सावता माळी मंदिर माहिती 


संत सावतामाळी – गाजलेले अभंग (sant savta mali abhang)

‘आमची माळियाची जात, शेत लावू बागाईत’

‘कांदा मुळा भाजी अवघी |विठाबाई माझी’’

’’लसण मिरची कोथंबिरी | अवघा झाला माझा हरि ||’

अनासक्त वृत्तीने ईश्र्वरार्पण बुद्धीने केलेला प्रपंचच परमार्थ होतो, हीच त्यांची जीवननिष्ठा होती. त्यांना मोक्ष-मुक्ती नको होती. ‘वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी’ ही त्यांची प्रतिज्ञा होती

‘स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातो हात।’
‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’
या ओळींतून त्यांची जीवननिष्ठाच स्पष्ट होते. त्यांच्या अभंगांत नवरसांपैकी वत्सल, करुण, शांत, दास्य-भक्ती हे रस आढळतात. सावतोबांची अभंगरचना रससिद्ध आहे.

‘योग-याग तप धर्म । सोपे वर्म नाम घेता।।
तीर्थव्रत दान अष्टांग। याचा पांग आम्हा नको।।
हाच विचार त्यांनी आग्रहाने मांडला. नामसंकीर्तनावर त्यांनी जास्त भर दिला. सर्वसंगपरित्याग करण्याची जरुरी नाही. प्रपंच करता करता ईश्वर भेटतो.
‘प्रपंची असूनि परमार्थ साधावा। वाचे आळवावा पांडुरंग मोट, नाडा, विहीर, दोरी। अवघी व्यापिली पंढरी.


संत सावतामाळी आणि बालरुपी पांडुरंग

एकदा ज्ञानदेव, नामदेव आणि पांडुरंग असे कूर्मदास नावाच्या एका संताच्या भेटीला चालले होते. वाटेत सावता माळी यांचे गाव अरणभेंडी लागले. तेव्हा पांडुरंगाने ‘तुम्ही येथेच थांबा, मी सांवत्यास भेटून येतो’ असे सांगितले. पांडुरंगाला गंमत करण्याची लहर आली. तो धावत धावत सावता माळयाकडे गेला आणि म्हणाला, ‘माझ्या मागे दोन चोर लागले आहेत, मला कुठेतरी लपव.’ सावत्याने बालरूप घेतलेल्या पांडुरंगाला आपल्या पोटावर बांधले आणि वरून उपरणे किंवा कांबळे बांधले. ज्ञानदेव आणि नामदेव पांडुरंगाची वाट पाहून थकले आणि पांडुरंगाला शोधत सावता माळयाच्या मळयापर्यंत आले.

त्यांनी पांडुरंग कुठे आहे, याची चौकशी केली. ज्ञानदेव आणि नामदेव दोघेही ज्ञानी होते. त्यांना सावत्याच्या पोटापाशी पांडुरंग आहे हे समजले आणि मग सावता माळी यांना बरोबर घेऊनच हे तिघेही कूर्मदासाला भेटायला गेले. ह्या कथेत एक असा अतिरंजित भाग आहे की, सावता माळी यांनी आपले पोट चिरून आत पांडुरंगाला ठेवले. ही कथा सत्य-असत्याच्या कसोटीवर तपासून पाहणे शक्य नसले तरी पोट चिरून आत पांडुरंगाला ठेवण्याइतपत ताणण्याची काही गरज आहे, असे वाटत नाही. सावता माळी आणि पांडुरंग यांचे अगदी जवळचे संबंध होते, एवढे जाणता आले तरी पुष्कळ झाले.

सावता माळी हे आपल्या दैनंदिन कामकाजात विठ्ठलाचेच रूप पाहात असत. त्यांच्या सासुरवाडीचे लोक एकदा त्यांच्याकडे आले. सावता माळी भजनात रंगून गेले होते. त्यांनी सासुरवाडीच्या लोकांकडे लक्ष दिले नाही. पत्नी संतापली, त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला जो उपदेश केला तो पुढीलप्रमाणे –

प्रपंचीं असूनि परमार्थ साधावा । वाचे आठवावा पांडुरंग ॥

उंच नीच कांही न पाहे सर्वथा । पुराणींच्या कथा पुराणींच ॥

घटका आणि पळ साधीं उतावीळ । वाउगा तो काळ जाऊं नेदी ॥

सावता म्हणे कांते जपें नामावळी । हृदयकमळी पांडुरंग ॥

आपल्या कामात परमेश्र्वर पाहणारे, काम हाच परमेश्र्वर अशी दृढ श्रद्धा बाळगणारे आणि स्वतःच्या पत्नीसही अधिकारवाणीने परमार्थाचा उपदेश करणारे सावता माळी त्यांच्या काळात महाराष्ट्राच्या भक्तीच्या मळयाची मनोभावे जपणूक करीत होते, हे आपले भाग्यच नाही काय?

source wikipedia

संत सावंत माळी यांचे अँप डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा 

इथे दाबा

14 thoughts on “Sant savta mali : संत सावता माळी”

  1. ह भ प पुरुषोत्तम महाराज थेटे - ओतुर

    संत श्री सावता माळी यांची गुरु परंपरा कुणास माहिती असेल तर त्या विषयी प्रबोधन झाल्यास ऋणी राहीन.

  2. भाऊसाहेब बोराटे

    खूपच भारी माहीती आहे जय हरी

  3. Krushan bandu patip

    जय सावता

    खुप छान आहे चरित्र मस्त

    मज ते ही प्राणा परौते | आवडते जी निरुते| जे भक्त चरित्राते |प्रशंशीति ||

  4. आम्हाला सावता महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी जन्म तारिक हवी आहे

  5. तुकाराम माळी

    माऊलींच्या वंशज आहेत ती माहिती मिळेल का अशी अपेक्षा आहे.संत सावतामाळी खूपच छान माहिती आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *