श्री नवनाथ भक्तिसार १ ते ४०

नाथ संप्रदाय

नाथ संप्रदाय

नाथ संप्रदाय हा शिवाचा उपासक असून शिव हाच सर्वांचा गुरु आहे अशी या पंथाची श्रद्धा आहे. हा शिवच मानवी गुरूत प्रवेश करून जगदुद्धाराचे कार्य रतो असे ते म्हणतात. हा आदिनाथ शिव ‘शक्तियुक्त शिव’ आहे असे गोरक्षनाथांनी सांगितले आहे. म्हणजेच शक्ती ही शिवाहून भिन्न नाही, ती तदन्तर्गतच आहे व तीच विश्वाच्या उत्पत्ति-स्थिती व लयाला कारणीभूत आहे. या शक्तीने युक्त असा शिवच पिण्ड-ब्रह्माण्डाचा आधार आहे आणि शक्तीविना शिव हा केवळ ‘शव’ आहे, म्हणजेच, ‘शिवा’तील इकार हा शक्तिवाचक आहे. चंद्र चंद्रिकेप्रमाणे त्यांचा अन्योन्यसंबंध आहे.
‘सिद्धसिद्धांतपद्धति’ या गुरु गोरक्षनाथांच्या ग्रंथात याविषयी पुढील श्लोक आढळतोः

शिवस्याभ्यन्तरे शक्तिः शक्तेभ्यन्तरे शिवः॥
अन्तरं नैव जानीयात्‌ चन्द्रचन्द्रिकयोरिव ॥

यासाठीच ‘सिद्धसिद्धान्तपद्धति’ या आपल्या ग्रंथाच्या सुरवातीलाच श्रीगोरक्षनाथ म्हणतात-

आदिनाथं नमस्कृत्यं शक्तियुक्तं जगद्‌गुरूम्‌।
वक्ष्ये गोरक्षनाथोऽहं सिद्धसिद्धान्तपद्धतिम्‌॥

ज्याप्रमाणे दोन टिपर्‍यांचा नाद एकच, दोन फुलांचा गंध एकच, दोन ज्योतींचा प्रकाश एकच, दोन नेत्रांतील दृष्टी एकच त्याचप्रमाणे या विश्वपसार्‍यात ‘शिवशक्ति’ या नामद्वयाने नटलेले तत्त्व एकच आहे.

हा पंथ शिवाचा उपासक असल्याने नाथपंथीय योगी ‘जयशंकर भोलेनाथ’ किंवा ‘अलख निरंजन’ अशी गर्जना करीत भिक्षा मागतात. त्यांचे अनेक आखाडे भारतभर असून त्याठिकाणी अंगाला भस्म लावून धुनीसमोर चिलीम ओढत बसलेले साधू आपल्याला पुष्कळदा दिसतात. यातील कानात कुण्डले असलेले साधू ‘कानफाटे’ म्हणून ओळखले जातात. हे कानफाटे हातात किनरी किंवा कोक्यासारखे वा घेऊन गोपीचंद, मैनावतीची गाणीही गातात. अर्थात्‌ या साधूत खडतर साधना व अलक्ष्याचे चिंतन करणारे साधू अपवादानेच दिसतात, हे तितकेच खरे!
असो. ‘नाथसंप्रदाय’ या शब्दातील ‘नाथ’ म्हणजे स्वामी किंवा धनी. हा धनी कोण? तर या चराचरसृष्टीचा निर्माता व पालनकर्ता असा ईश्वर किंवा नाथपंथीयांच्या भाषेत सांगायचे तर ‘शिव’. ‘गोरखबानी’ या गुरुगोरक्षांच्या प्रसिद्ध ग्रंथात हा शब्द ‘ब्रह्म’ किंवा ‘परमतत्त्व’ या अर्थाने वापरला आहे. तर संस्कृत टीकाकार मुनिदत्त हा शब्द ‘सदगुरु’ या अर्थाने वापरताना दिसतो. थोडक्यात, ‘अध्यात्ममार्गातील श्रेष्ठ किंवा आदरणीय व्यक्ती’ असा ‘नाथ’ या शब्दाचा अर्थ सांगता येईल.
नाथसंप्रदायात ज्ञान, धर्म, कर्म आणि भक्ती या चारही वाटा एकत्र येऊन मिळतात व साधक सिद्ध बनून पावलोपावली मोक्षाची खाण उघडते आणि आपणास ज्या गावास जावयाचे ते गावच आपण होऊन जातो, असा हा ‘पंथराज’ आहे. (श्रीज्ञानेश्वरी ६-१५२-१६०) संत ज्ञानेश्वरांनी या पंथाचे माहात्म्य लोकांना समजावून दिले; म्हणूनच संत निळोबाराय म्हणतात-


* नाथ संप्रदायाची थोरी।
प्रकट केली ज्ञानेश्वरी॥

या पंथाचा उल्लेख संत रामदास व संत तुकाराम यांनीही मोठ्या आदराने केलेला आढळतो.

जाईन सिद्धपंथे अवघ्या चुकतील खेपा॥

अशी त्यांची थोरवी तुकोबा गातात, तर आपल्या ‘सकल संतांच्या’ आरतीत समर्थ नाथसिद्धांचा अंतर्भाव मोठ्या आदराने करतात. अशा या सिद्धपंथात शैव, बौद्ध तसेच तांत्रिक पंथांतील अनेक सिद्ध समाविष्ट झाले व त्यांना ‘सिद्धयोगी’ किंवा ‘नाथसिद्ध’ असे नाव मिळाले, त्याचप्रमाणे हा पंथ ‘अवधूतपंथ’ किंवा ‘अवधूतमार्ग’ अशा वेगवेगळ्या नावांनीही प्रसिद्धीस आला.
‘सिद्धसिद्धान्तपद्धती’, ‘गोरखबानी’ तसेच कबीरांच्या अनेक पदात ही नावे आलेली दिसतात. भगवान्‌ दत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना जो उपदेश केला तो देखील ‘अवधूतगीता’ या नावानेच प्रसिद्ध आहे.
या नाथपंथाचा उदय नेमका केव्हा झाला हा प्रश्नही महत्वाचा आहे. महाराष्ट्रात नाथसंप्रदाय कानाकोपर्‍यात पोचला तो निवृत्तीनाथ व ज्ञानेश्वरांमुळे. निवृत्तीनाथ १२७३ साली व ज्ञानदेव १२७५ साली जन्मास आले. यापैकी निवृत्तीनाथांना गहिनीनाथांचा उपदेश होता आणि हे गहिनीनाथ गोरक्षनाथांचे शिष्य होते. याचाच अर्थ, गोरक्षनाथांचा काल अकराव्या शतकातील असला पाहिजे. तसेच गोरक्षांचे गुरू व नाथसंप्रदायातील आद्य मानवी गुरू श्रीमच्छिंद्रनाथ यांचा काल हा नवव्या किंवा दहाव्या शतकातील मानावयास हरकत नाही. (मात्र, नेहमीप्रमाणेच याबाबतही विद्वानात मतभेद आहेतच!)
राहुल सांकृत्यायन यांच्यासारखे काही संशोधक ही सिद्ध परंपरा थोडी वेगळ्या प्रकारे मानतात व त्यानुसार नाथपंथाचे संस्थापक श्रीमच्छिंद्रनाथांऐवजी सरहपाद हे ठरतात. (ही सहजयानी सिद्धांची तिबेटी परंपरा होय.)
हे झाले ऐतिहासिक दाखले. परंतु या परंपरेला दुसरी पौराणिक बाजूही आहे. तीत शिवाने पार्वतीला केलेला उपदेश मच्छिंद्रनाथ मत्स्यीच्या पोटातून ऐकतात अशी एक कथा प्रचलित आहे. ती खरी मानली तर नाथांचा उदय ऐतिहासिक कालाऐवजी पुराणकालात जाऊन पोचतो.
अशा या पंथात मूर्तिपूजा, वेद, स्मृति यांना महत्व नसून जातिभेद व धर्मभेद यांनाही स्थान नाही. अलक्षाचे चिंतन करीत मोक्षमार्गाची वाटचाल करणार्‍या कुणालाही इथे प्रवेश आहे.
‘जे जे ब्रह्माण्डात आहे ते ते सारे पिण्डात आहे’ असे हा पंथ मानतो. तसेच कुण्डलिनी जागृतीला येथे फार महत्व आहे. अग्रिचक्रांत सुप्तावस्थेत पडलेली ही कुण्डलिनी शक्ती ज्यावेळी सहस्रारचक्रातील शिवाशी समरस होते तेव्हा योग्यांना कैवल्यावस्था किंवा सहजसमाधि प्राप्त होते. या कुण्डलिनीचे तेज ‘बालार्ककोटिसदृश’ आहे असे गोरक्षनाथ ‘सिद्धसिद्धान्दपद्धती’त सांगतात. हठयोगाच्या द्वारे ही कुण्डलिनी जागृत होते व सहस्रारचक्रात पोचते असेही ते सांगतात.
या पंथातील योग्याने म्हणजेच नाथयोग्याने आपला आचार (ज्याला गोरक्षनाथ ‘रहनी’ म्हणतात) कसा ठेवावा याबाबत ते म्हणतात- ‘कठोर ब्रह्मचर्य, वाक्‌संयम, शारीरिक व मानसिक शुद्धी, ज्ञाननिष्ठा, बाह्यावडंबराविषयी अनादर, मद्यामांसाविषयी आत्यंतिक तिरस्कार हे नियम नाथयोग्यांनी कटाक्षाने पाळणे आवश्यक आहे.’
या पंथात गुरूचे महत्व अपरंपार आहे, म्हणूनच ‘निगुरा न रहिबा’ (गुरुशिवाय राहू नये) असे ते सांगतात.
नाथपंथ कर्मकाण्ड, सगुणपूजा, वर्णाश्रमपद्धती, होमहवन, संन्यासाश्रम, अग्रिहोत्र इ. हिंदुधर्मातील परंपरागत विषयांना भ्रामक मानतो. मात्र प्रत्येक धर्मातील वा संप्रदायातील चांगल्या गोष्टींचा स्वीकारही तितक्याच सहजतेने करतो.
नाथपंथातील महत्वाच्या गोष्टींबाबत एवढी माहिती पुरेशी आहे. पुढे श्रीगुरुगोरक्षनाथांचे तत्त्वज्ञान सांगताना हीच माहिती काहीशा विस्ताराने आली असल्याने हा विषय इथेच थांबवून आपण आता नाथपंथाच्या वेशभूषेकडे वळू, कारण एका विशिष्य प्रकारची वेशभूषा हे नाथपंथाचे आगळे वैशिष्ट्य आहे.


नाथपंथीयांची वेशभूषा

नाथपंथाचे उपास्य दैवत भगवान्‌ शिव असल्याने त्यांच्या वेशभूषेची छाप नाथपंथीयांवर पडणे स्वाभाविक आहे
. नाथपंथीयांच्या या वेशभूषेचे वर्णन ‘नवनाथ भक्तिसार’, ‘सिद्धसिद्धान्तपद्धती’, महानुभवांचा प्रसिद्ध ग्रंथ ‘लीळाचरित्र’, तसेच चिंतामणिनाथ विरचित ‘नाथकैवल्य’ या सर्वमान्य ग्रंथात वर्णिलेली आढळते. त्यावरून त्यांच्या वेशभूषेत, भस्म, रुद्राक्ष, मुद्रा, मेखला, कंथा, शिंगी, त्रिशूळ, धंधारी, दण्डा, किंगरी, खापर, अधारी, कमण्डलू, जानवे, चिमटा व शंख या गोष्टी प्रामुख्याने असतात असे दिसते. याशिवाय खडावा, डमरू, कुका अथवा कोका नावाचे वाद्य अशासारख्या वस्तूही आढळून येतात.
आता या वस्तूंचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊया-


भस्म – भस्माला ‘बभूत’ असेही एक नाव आहे. काही ठिकाणी याचा उल्लेख ‘क्षार’ असाही आढळतो. भस्म हे योग्याच्या वेशभूषेचे एक आवश्यक अंग आहे. ‘पद्मावत’ आणि ‘चित्रावली’ या दोन ग्रंथात भस्म सर्वांगाला लावण्याबाबत उल्लेख आहे, परंतु’चंद्रायन’ आणि ‘मधुमालती’ या ग्रंथात ते फक्त तोंडाला लावावे अशा प्रकारचा उल्लेख आढळून येतो. ते काहीही असले तरी नाथपंथीयाने भस्म हे लावलेच पाहिजे. ‘सर्व देहाचे अखेर असे भस्मच होणार आहे, यासाठी देहावरील प्रेम कमी करून आत्म्याकडे मन केंद्रित करा’ असा संदेशच जणू हे भस्म देते. शिवाय, भस्मधारणेमुळे त्या त्या ठिकाणची शक्ति-केंद्रही जागृत होतात. थंडीपासूनही हे भस्म संरक्षण करते, भस्माचे असे माहात्म्य असल्यानेच नाथपंथीयांनी त्याचा अगत्याचे स्वीकार केल्याचे दिसते.


रुद्राक्ष- रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ असून रुद्र+अक्ष म्हणजे शिवाचा नेत्र असा या शब्दाचा अर्थ आहे. साधनामार्गात रुद्राक्षाचे महत्व अपार आहे. तो अत्यंत पवित्र मानला जातो. तंत्रशास्त्राच्या दृष्टीनेही रुद्राक्षाची माळ अत्यंत पवित्र मानली जाते. हे रुद्राक्ष विविध मुखांचे असतात, त्यांना १ पासून १४ मुखे असतात. एक एकवीसमुखी रुद्राक्षही प्रस्तुत लेखकाच्या संग्रही असून तो आकाराने मोठ्या आवळ्याइतका आहे. ही मुखे त्याच्या अंगावर असलेल्या खोलगट रेषांवरून मोजली जातात. सर्वसामान्यतः पाचमुखी रुद्राक्ष विपुल संख्येने आढळतात, तर एकमुखी रुद्राक्ष बराचसा दुर्मिळ आहे. नाथपंथी लोक या रुद्राक्षांची माला बनवितात, ही २८, ३२, ६४ वा १०८ मण्यांचीअसते. मुद्रा – मुद्रा हे नाथपंथी योग्यांचे एक आवश्यक अंग आहे. ही मुद्रा कानाला भोक पाडून तीत घातली जाते व बहुधा वसंतपंचमीच्या शुभ दिवशीच ती धारण करतात, अशा मुद्राधारक योग्यांनाच ‘कानफाटे योगी’ असेही म्हणतात. कारण ते कान फाडून (कानाला भोक पाडून) ती धारण करतात. ही मुद्रा धातूची किंवा हरणाच्या शिंगाची असते. काही धनिक महंत सोन्याची, हस्तिदंताची वा स्फटिकाची मुद्राही धारण करतात.


मुद्रा (कुण्डल)- कोणत्या धातूची असावी यासंबंधी नाथपंथीय वाङ्‌मयात स्पष्ट उल्लेख कुठेच आढळत नाही. भगवान्‌ शंकरांच्या कानातील कुण्डले पाहून मच्छिंद्रनाथांनी ती प्रथा आपला संप्रदायात सुरू केली असावी असे म्हणतात, तर काहींच्या मते नाथपंथाचे इतर पंथांपेक्षा काही वेगळेपण असावे अशी गोपीचंदाने इच्छा व्यक्त केल्यावरून जालंदरनाथांनी कान फाडून कुंडले घालण्याची प्रथा सुरू केली, तरी काही ठिकाणी गोरक्षनाथांनी राजा भर्तृहरीचे कान फाडून त्यात ही कुण्डले घातली असाही उल्लेख आढळतो.


मेखला- मेखला ही कमरेला बांधतात. ही २२ ते २७ हात लांबीची, दोरखंडासारखी दोरी असून ती कमरेपासून छातीपर्यंत एका विशिष्य पद्धतीने बांधतात. ही मोळाच्या दोरीची वा लोकरीची असते. तिच्या शेवटच्या टोकाला घुंगरू बांधलेले असते. मेखला ‘नागीण’ म्हणूनही ओळखली जाते. ‘हाल मटंगा’ हा मेखलेचाच एक प्रकार आहे.


कंथा – कंथा म्हणजे फाटलेली वस्त्रे जोडून बनविलेला चोळणा. हा गळ्यातून घातला की सर्व शरीरालाच झाकून टाकतो. याला ‘गुदरी’ असेही दुसरे नाव आहे. याचा रंग भगवा किंवा लाल असतो व तो गेरूने रंगविण्याची पद्धत आहे. हा रंग ब्रह्मचर्याला पोषक आहे. कारण त्यायोगे वीर्यस्तंभन होते. असे म्हणतात की पार्वतीने आपल्या रक्ताचा रंग लावून असा चोळणा प्रथम गोरक्षनाथांना दिला व तेव्हापासून नाथपंथात त्याचा वापर सुरू झाला.


शिंगी (शृंगी)- ही हरणाच्या शिंगापासून बनवतात. ही तोडांने वाजवितात, व योगीजन ती जानव्याला बांधतात. विशेषतः संध्याकाळी उपासनेच्या वेळी वा भोजनापूर्वी ही शिंगी वाजविण्याची प्रथा आहे. काहीजण भिक्षा घेतल्यानंतर शृंगी वाजवितात.


त्रिशूळ- भगवान्‌ शिव त्रिशूळ वापरतात हे सर्वप्रसिद्धच आहे, आणि शिव हेच नाथपंथीयांचे आद्य दैवत असल्याने या नाथपंथातील योगी त्याचाही वापर करतात, त्रिशूलाच्या योगे दुष्ट शक्ती जवळ फिरकत नाहीत असे म्हणतात.


धंधारी – यालाच धण्डोर किंवा धंधोरा अशीही नावे आहेत. हे एक प्रकारचे चक्र असून ते लाकडाचे वा लोखंडाचे बनविलेले असते व त्याला एक छिद्र असते. या छिद्रात कवडी अथवा मालाकार धागा घालतात व मंत्र म्हणून तो बाहेर काढतात. लोकभाषेत यालाच ‘गोरखधंधा’ असे नाव आहे. गोरखपंथी लोकांचा असा विश्वास आहे की मंत्र म्हणून धागा बाहेर काढला की गोरक्षनाथांच्या कृपेने परमेश्वर प्रसन्न होतो आणि भवसागरात अडकलेल्या प्राण्याला मुक्त करतो.


दण्डा – यालाच दण्ड असेही नाव आहे. याचा उल्लेख ‘वैशाखी’ असाही काही ठिकाणी करण्यात आला आहे. हा दण्डा गोल आणि काळ्या रंगाचा असून तो हात-दीड हात लांबीचा असतो. योगी लोक याला ‘भैरवनाथाचा दण्डा’ किंवा ‘गोरथनाथांचा सोटा’ असे म्हणतात.


किंगरी- यालाच सारंगी असेही नाव आहे. हे एक प्रकारचे तंतुवाद्य असून त्यातून धनुष्याच्या साहाय्याने आवाज काढला जातो. आजही भर्तृहरीचे गीत गाणारे योगी ही सारंगी घेऊन हिंडताना दिसतात.


खापर- खापर म्हणजे सामान्यतः फुटलेल्या मातीच्या घड्याचा तुकडा. याचा उपयोग नाथपंथातले योगी भिक्षापात्र म्हणून करतात. काही योगी लोक हे भिक्षापात्र नारळीच्या करवंटीचेसुद्धा बनवितात. काही वेळा काशाची वाटीची यासाठी वापरली जाते.अधारी- अधारी म्हणजे आसन. योगी लोक यावर बसतात किंवा झोपतात. हे आकाराने छोटे असते.कमण्डलू – याचा उपयोग पाणी पिण्यासाठी जलपात्र म्हणून होतो.


जानवे- हे सुताचे असते व ते गळ्यात सरळपणे घातलेले असते. हे लोकरीच्या पाचसात पदरांचे असून त्यात शंखाची चकती अडकविलेली असते. चकतीच्या भोकात तांब्याच्या तारेने एक रुद्राक्ष बसविलेला असतो.


चिमटा – अग्रिदीक्षा घेतलेला साधक आपल्या जवळ चिमटा बाळगतो. याची लांबी २७, ३२ वा ५४ इंच इतकी असते. चिमट्याच्या टोकाला गोल कडे असते. त्यात आणखी नऊ कड्या असतात. नाथपंथी लोक या चिमट्याच्या विशिष्य नादात वा धुंदीत आपले मार्गक्रमण करतात. धुनीतील अग्री फिरवून प्रज्वलित करण्यासाठी या चिमट्याचा उपयोग होतो.


शंख- भिक्षा मागताना व शिवाचे दर्शन घेताना नाथपंथी लोक शंख वाजवितात. शंखनाद हे ओंकाराचे प्रतीक मानले जाते. नाथपंथीयांच्या या वेशभूषेचे वर्णन नाथपंथीय योग्याचे चित्र वाचकांच्या डोळ्यासमोर उभे करण्यास पुरेसे आहे. आता आपण नाथसंप्रदायातील श्रीगुरु मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य श्रीगुरुगोरक्षनाथ या दोन महासिद्धांचा परिचय करून घेऊ. कारण नाथसंप्रदायाचे ते आधारस्तंभच आहेत.


श्रीगुरुमच्छिंद्रनाथ

नाथसंप्रदायाचे आद्य दैवत आदिनाथ म्हणजेच शिवशंकर हे असून त्यांच्याकडूनच मच्छिंद्रनाथांना अनुग्रह मिळाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवनाथांपैकी मानवी रूपातील हे पहिले नाथ होत. (काहींच्या मते मात्र नाथसंप्रदायाची परंपरा वज्रयानी परंपरेतील सरहपाद यांच्यापासून सुरू होते.) नाथसंप्रदायाला आकार देऊन त्याला जोपासण्याचे व फुलविण्याचे महान्‌ कार्य मच्छिंद्रनाथ व त्यांचे शिष्य श्रीगोरक्षनाथ यांनीच नेटाने केले. त्यामुळे या दोघांचा परिचय थोड्याशा विस्तारानेच आपण करून घेऊ या.
मच्छिंद्रनाथांना मत्स्येंद्र, मच्छेंद्रपाद, मच्छंदर, मच्छिंदर इ. वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते व त्यांचा अवतार साधारणतः दहाव्या शतकाच्या आरंभी झाला असावा असे विद्वानांचे मत आहे.
मच्छिंद्रनाथांच्या संदर्भात पुढील श्लोक प्रसिद्ध आहे.:

आदिनाथो गुरुर्यंस्य गोरक्षस्य च यो गुरु।
मत्स्येन्द्रं तमहं वन्दे महासिद्धं जगद्‌गुरुम्‌॥

भाषा सोपी असल्याने वेगळा अर्थ देण्याची आवश्यकता नाही.
अशा या मच्छिंद्रांचा जन्म मच्छीच्या पोटातून झाला व मच्छीच्या पोटात असतानाच त्यांनी भगवान्‌ शिवांनी पार्वतीला केलेला उपदेश ऐकला अशी एक आख्यायिका प्रचलित आहे.
मच्छिंद्रनाथांच्या कथा ‘श्रीनवनाथ भक्तिसार’,’नाथलीलांमृत’, ‘भक्तिविजय’, ‘सिद्धचरित्र’ इ. ग्रंथातून वाचावयास मिळतात. त्यातील माहितीवरून ते भृगुवंशी ब्राह्मण असावेत असे वाटते, परंतु काहींच्या मते ते कैवर्तक. म्हणजे कोळी जातीचे असावेत.
लहान वयातच स्वतःच्या तपःसिद्धीच्या जोरावर त्यांनी हनुमान, वेताळ, वीरभद्र, भद्रकाली व चामुण्डा इ. देवदेवतांचा पराभव केला असे म्हणतात.
मच्छिंद्रनाथ हे कविनारायणाचे अवतार समजले जातात. बालपणी कामिक नावाच्या एका कोळ्याने त्यांचे पालनपोषण केले. परंतु कोळ्याचा मासे पकडण्याचा उद्योग त्यांना न आवडल्याने ते तेथून पळून जाऊन थेट बद्रिकाश्रमी आले व तेथे त्यांनी बारा वर्षे घोर तप केले. त्यांचे ते विलक्षण तप पाहून अत्रिसुत भगवान दत्तात्रेय व भगवान शिव तेथे प्रकट झाले. त्यावेळी श्रीदत्तात्रेयांनी त्यांच्या कानात मंत्र सांगून त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. त्यायोगे त्यांना सर्वत्र एक ब्रह्मच दिसू लागले. पुढे मच्छिंद्रांनी शाबरी विद्या प्राप्त करून घेतली व या विद्येला अनेक देवदेवतांकडून वरदाने मिळवली. वेताळाकडूनही त्यांनी असेच वर मिळविले. पुढे मारुतीच्या विनंतीवरून ते मैनाकिनीसह स्त्रीराज्यात सुखविलासात राहू लागले. अर्थात्‌ त्यामागे कामवासना नव्हती तर मारुतीला दिलेल्या वचनाची पूर्तीकरण्याचाच उद्देश होता. पुढे गोरक्षांनी त्यांना तेथून आपल्याबरोबर परत नेले. परंतु जाताना मैनावतीने एक सोन्याची वीट मच्छिंद्रांच्या झोळीत टाकली. ती गोष्ट लक्षात आल्यावर गोरक्षांनी ती वीट रस्त्यातच फेकून दिली. वीट गेल्यामुळे मच्छिंद्रनाथ अतिशय दुःखी झाले, तेव्हा गोरक्षांनी सिद्धमंत्र जपून सगळा पर्वतच सोन्याचा करून दाखविला. ही कथा वाचल्यावर मच्छिंद्रांना सर्वसामान्य माणसाप्रमाणेच सुवर्णाचा मोह पडला की काय अशी शंका कुणाच्या मनात निर्माण होईल, परंतु या संदर्भात गोरक्षांनी विचारल्यावर त्यांनी असा खुलासा केली आहे की, सिद्धयोग्यांना भोजन देण्यासाठीच त्यांनी ती वीट जपून ठेवली होती. नि हा खुलासा सहज पटण्यासारखा आहे. कारण ज्यांचा शिष्य संपूर्ण पर्वत सोन्याचा बनवू शकतो त्या महासिद्ध मच्छिंद्रांना एका यःकश्चित विटेचा मोह कसा पडेल? ही गोष्ट असंभवच वाटते. असो. नाथसंप्रदायात मच्छिंद्रनाथांना फार मानाचे स्थान असून त्यांना प्रत्यक्ष शिवाचाच अवतार समजण्यात येते.
‘सिद्धचरित्र’ व ‘नाथलीलामृंत’ अशा ग्रंथातून आलेल्या मच्छिंद्रनाथांबद्दलच्या कथा सर्वसाधारणतः ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथातील कथांप्रमाणेच आहेत. फक्त, काही ठिकाणी पात्रांची नावे थोडी वेगळी आहेत.नेपाळ, बंगाल, मारवाड इ. अन्य प्रांतातील सांप्रदायिक ग्रंथात मात्र त्यांच्यासंबंधी आलेल्या कथा थोड्या वेगळ्या आहेत. परंतु परकायाप्रवेश, सिद्धींचे चमत्कार, विविध अस्त्रांचा वापर यासारख्या गोष्टी या कथांतही आढळून येतात. असे हे नाथसंप्रदायाचे पहिले मानवी गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले मच्छिंद्रनाथ हे कौलमार्गाचे प्रवर्तक मानले जातात. हा कौलमार्ग भोगातून त्यागाकडे जाण्याचा संदेश देतो. काही विद्वान मच्छिंद्रनाथांना शैव मानतात, तर काही वैष्णव समजतात. काहींच्या मते ते बौद्ध तांत्रिक होते तर काही त्यांना कौलमार्गी म्हणूनही ओळखतात. परंतु खरे सांगायचे तर ते या सर्वांत असूनही या सर्वांच्या पलीकडचे होते!

श्रीगुरु गोरक्षनाथ

श्री गोरक्षनाथांबद्दल असे म्हटले जाते की, ‘आद्य शंकराचार्यांनंतर इतका महान्‌ व प्रभावशाली पुरुष भारतवर्षांत दुसरा झाला नाही’ आणि या विधानात कसलीही अतिशयोक्ती वाटत नाही. त्यांची महान्‌ गुरुभक्ती, घोर तप, उज्ज्वल चारित्र्य आणि धगधगीत वैराग्य सारेच कसे अतुलनीय होते!
श्रीगोरक्षनाथांचा जन्म ब्राह्मणकुळात झाला याविषयी बहुतेक सर्वच विद्वानांचे एकमत आहे. तथापि, ते अयोनिसंभव होते असेहीकाही कथांवरून दिसते. या संदर्भात, ‘हा अजन्म अयोनिसंभ। विष्णु अवतार स्वयमेव। तो मानवगर्भ नव्हे की’ असे ‘नाथलीलामृतकार’ म्हणतात. (३.१८७) काहीजण त्यांना साक्षात्‌ विष्णूचा अवतार मानतात. या संदर्भात आदिनाथ भैरवाच्याच नाथलीलामृतात एक-दोन ठिकाणी असे उल्लेख आहेत. (अध्याय २-४५, अ. ३/१८७) तर ते शिवाचा अवतार होते असे शिवपुराणात सांगितले आहे. ते अयोनि संभवही समजले जातात. कारण त्यांचा जन्म उकिरड्यातून झाला होता.
श्रीगोरक्षनाथ हे अत्यंत देखणे होते. त्यांचा वर्ण गौर होता व ते भरपूर उंच होते असे त्यांचे वर्णन वाचावयास मिळते. परंतु देखणे असूनही ते कधी मायामोहात फसले नाहीत नि म्हणूनच त्यांना ‘विषयविध्वंसक वीर’ असे म्हटले आहे. त्यांना नाना सिद्धी अवगत होत्या, परंतु त्यांचा उपयोग त्यांनी सर्वसामान्यांचे दुःख दूर करण्याकडेच केला.
त्यांना योगमार्गाची दीक्षा त्यांचे गुरु श्रीमच्छिंद्रनाथ यांच्याकडून मिळाली. त्यानंतर त्यांनी हाटकेश्वरी घोर तपश्चर्या केली व ते सिद्ध बनले. पुढे त्यांनी नाना तीर्थयात्रा केल्या व अनेक सच्छिष्यांना नाथपंथाची दीक्षा देऊन भारतभर पाथपंथाचा प्रसार केला. त्यांनी कापालिक, शाक्त, कौल, गाणपत्य इ. अनेकांना नाथपंथात सामावून घेतले. ते ज्ञानाचे पूजक होते. गरीबांबद्दल त्यांच्या मनात अपार कणव होती. आसेतुहिमाचल संचार करून त्यांनी सतत लाकोद्धाराचे कार्य केले. त्यांनी अखेरपर्यंत आपले चारित्र्य स्फटिकाप्रमाणे धवल ठेवले व प्रत्येक स्त्रीकडे केवळ माता म्हणूनच पाहिले. महापुरुषाची सर्व बत्तीस लक्षण त्यांच्यामध्ये होती. भांग, मद्य, मांस इ. च्या सेवनापासून ते सतत अलिप्त राहिले.
श्रीगोरक्षनाथांचा निश्चित काल कोणता याविषयी विद्वानांत मतभेद आहेत, त्यामुळे त्यांचा काल आठ ते चौदा या शतकापर्यंत मागेपुढे खेचला जातो. त्यांच्या जन्मस्थानाविषयीही विद्वानांत एकमत नाही. त्यांचा जन्म पेशावर, गोरखपूर, हरगंज यापैकी कुठेतरी झाला असावा एवढाच निष्कर्ष आपल्याला काढता येतो.
केवळ भारतातच नव्हे, तर तिकडे दूर नेपाळातही त्यांना ‘देवत्व’ प्राप्त झाले होते, म्हणूनच नेपाळात काठमांडू येथे गोरक्षमंदीर आहे. भारतात त्यांचे आश्रम, मठ, गुंफा व मंदिरे अनेक ठिकाणी पहावयास मिळतात.
त्यांचा शिष्यवर्ग फार मोठा होता. प्रसिद्ध अशा ८४ सिद्धांमध्ये त्यांचे बरेच शिष्य आहेत.
आजही गुप्तरूपाने ते खर्‍या साधकांना मदत करतात व त्यावरून ते चिरंजीव असावेत असे वाटते.
आता गुरु गोरक्षनाथांनी निर्माण केलेल्या वाङ्‌मयसंपदेचा कानोसा घेऊ.

गोरक्षनाथांची वाङ्‌मयसंपदा

आज गोरक्षनाथांनी निर्माण केलेल्या २८ संस्कृत व ४० हिंदी ग्रंथांचा शोध लागला असून ते वाचल्यानंतर गोरक्षांच्या तत्त्वज्ञानाचा सहज परिचय होतो. या ग्रंथात सिद्धसिद्धांतपद्धती, गोरखबानी, महार्थमंजरी, अवधूतगीता, योगमार्तंड, अमरौघप्रबोध, गोरक्षशतक इ. ग्रंथ प्रमुख मानले जातात.
यापैकी ‘सिद्धसिद्धान्तपद्धती’ हा गोरक्षांचा सर्वांत महत्वाचा असा संस्कृत ग्रंथ समजला जातो. यात नाथांनी लोकल्याणासाठी योगमार्गातील गुह्य ज्ञान प्रकटकरून सांगितले असून बद्ध जीवांना मोक्ष मिळवून देणारा असा हा अत्यंत श्रेष्ठग्रंथ आहे. तर ‘गोरखबानी’ मध्ये योग्याने सदासर्वदा आत्म्याचेच चिंतन करायला हवे व त्यासाठी पंच ज्ञानेंद्रियांना अंतर्मुख करणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले आहे. अशाच साधकाला अलख निरंजन परब्रह्माचा साक्षात्कार होऊन तो जीवन्मुक्त होईल असे ते सांगतात.
त्यांच्या ‘अमनस्कयोग’ या ग्रंथात जीवन्मुक्तीचे रहस्य विशद करून सांगितले असून हा योग मंत्रयोग, ध्यानयोग, जपयोग यांच्यापेक्षाही श्रेष्ठ असल्याचे म्हटले आहे. हा योग जाणणारा योगी सुख-दुःख,शीत-उष्ण, स्पर्श, रस, रूप गंध यांच्या पलीकडे गेलेला असतो. पाण्यात टाकलेले मीठ ज्याप्रमाणे विरघळून जाते त्याचप्रमाणे या लययोगाने मन ब्रह्मतत्त्वामध्ये लीन होते व योग्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात. परंतु योगाने या सिद्धींच्या लोभात न अडकता आपली पुढची प्रगती साधायला हवी. हा अमनस्क योग केवळ ‘गुरुमुखैकगम्य’ म्हणजे केवळ गुरुच्या मुखातूनच प्राप्त होणारा आहे.
नाथांचा ‘अवधूतगीता’ हा ग्रंथ नाथपंथीयांमध्ये प्रमाणग्रंथ मानला जातो इतकी त्याची योग्यता मोठी आहे. ह्या गीतेत श्रोता आहे कार्तिकेय आणि उपदेशक आहे भगवान्‌ श्रीदत्तात्रेय. या ग्रंथात सर्वव्यापक असा केवळ आत्माच असून तेथे कसल्याही प्रकारचा भेदाभेद असू शकत नाही हे वेदान्ताचे सार सांगितले आहे. (‘आत्मैव केवलं सर्वं भेदाभेदो न विते।’) आत्मा हा शुद्ध, निर्मळ, अव्यय, अनंत, शुद्ध ज्ञानस्वरूप आणि सुखदुःखातीत असा आहे. तो आतून व बाहेरून चैतन्यरूपाने नटलेला आहे. साकार व सगुण हे सर्व खोटे असून निराकार, शुद्ध, नाशरहित व जन्मरहित असा एक आत्माच सत्य आहे. त्याला आदि, मध्य व अंत अशा अवस्था नाहीत. तो पुरूष नाही की स्त्री वा नपुंसकही नाही. तो षडंगयोगाने वा मनोनाशाने शुद्ध होत नाही. कारण तो स्वभावतःच शुद्ध आणि निर्मळ आहे. अशाप्रकारे या ‘अवधूतगीते’त आत्मतत्त्वाचा ऊहापोह असून सर्व नाथसिद्धांना गुरुस्थानी असलेल्या भगवान्‌ दत्तात्रेयांच्या मुखातूनच या गीतेचा उदय झालेला असल्यामुळे समस्त नाथपंथात या ‘अवधूतगीते’ला फार महत्वाचे व मानाचे स्थान प्राप्त झाले असल्यास नवल नाही.
गोरक्षनाथांच्या ६८ उपलब्ध ग्रंथांपैकी सर्वच ग्रंथांचा असा परिचय स्थलाभावी करून देणे केवळ अशक्यच आहे. मात्र या सर्वच ग्रंथात गोरक्षनाथांनी योग, आत्मा, पिण्डब्रह्माण्ड, अजपा जप, जीव आणि परमात्मा यासारख्या महत्वाच्या विषयांची मौलिक चर्चा केलेली दिसून येते.

गोरक्षनाथांचा उपदेश व तत्त्वज्ञान

गोरक्षनाथांनी हिंदी, संस्कृत भाषेत हे ग्रंथ लिहिले. या ग्रंथांतून त्यांनी साधकांना जो मौलिक उपदेश केला आहे त्या उपदेशाचे सार किंवा तत्त्वज्ञान साधारणतः पुढीलप्रमाणे सांगता येईल-
ते म्हणतात, ‘ज्याने जिभेवर नियंत्रण मिळविले त्याने सर्व काही जिंकले. फाजील आहार घेतल्याने इंद्रिये प्रबल होऊन ज्ञान नष्ट होते. जो मनुष्य आसन, आहार व निद्रा यांच्या संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करतो तो वृद्धावस्थेवरच नव्हे, तर मृत्यूवरही मात करतो. मांस, मदिरा भक्षण करण्यापासून जोआनंद मिळतो त्यापेक्षा कितीतरी पट अधिक आनंद योगसाधना करून मिळतो. जीवाची हत्या कधीच करू नका. त्यांच्यावर दया करा. कारण सर्व योगसाधनेचे व अध्यात्माचे मूळ दया हेच आहे. आपले आचार-विचार शुद्ध राखण्यासाठी साधकाने काम, क्रोध, अहंकार, विषयविकार, तृष्णा आणि लोभ यांचा त्याग करायला हवा. हसा, खेळा परंतु ब्रह्माला विसरू नका. रात्रंदिवसस ब्रह्मज्ञानाचीच चर्चा चालू असायला हवी. अल्प-स्वल्प आहार हाच शरीररक्षणाचा उत्तम उपाय आहे. त्यायोगे नाड्यांमध्ये मलाचा संचय होणार नाही व प्राणायाम सोपा होऊन नाड्यांमध्ये होईल, व चक्रांचा भेद होईल आणि योग्याला अनाहत ध्वनी ऐकू येईल. कमी खाण्याप्रमाणेच साधकाने कमी बोलायला हवे. योग्याने वादविवादात कधीही भाग घेऊ नये. तसेच मूर्खांशी मैत्री करू नये. योग्याने हे सर्व नियम पाळून आपल्या कुंडलिनीला जाग आणून त्या महाशक्तीला ब्रह्मारंध्रामध्ये नेऊन बसवायला हवे. तसेच योग्याने आत्मस्थ होऊन प्राणायामाची साधना नियमितपणे करायला हवी. तसेच, शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी दर तीन-चार महिन्यांच्या अंतराने त्याने कायाकल्पही करायला हवा, इत्यादी.
श्रीगोरक्षनाथांच्या ग्रंथांवरून त्यांच्या अशा तत्त्वज्ञानाची आपल्याला ओळख होते. हा विषय फार मोठा असला तरी वाचकांना त्याची येथे थोडक्यात ओळख करून दिली आहे.
गोरक्षनाथांच्या काळात भारतातील बौद्धादी धर्मसंप्रदायांमध्ये वामाचार सुरू झाला होता आणि पंचमकरांना (मांस, मद्य, मैथुन इ.) प्रमाणाबाहेर महत्व प्राप्त झाले होते. स्वतःला साधक म्हणविणारे आपल्या वासनापूर्तीसाठी याचा सर्रास उपयोग करीत होते. याला पायबंद घालण्यासाठी गुरु गोरक्षनाथांनी साधनांची पवित्रता, शुद्ध चारित्र्य आणि संयमपूर्ण नीतिमान जीवनाचे महत्व आपल्या ग्रंथाद्वारे व उपदेशाद्वारे साधकांना पटवून देण्याचे फार मोठे कार्य केले, व स्वतःचाच आदर्श त्यांच्यापुढे ठेवला.
त्यांचे दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी शैव संप्रदायाचे संघटन करून तो संप्रदाय बलशाली केला, व त्यात नीतिमान, सदाचारी व संयमी साधक निर्माण केले. तसेच, त्यांनी या पंथात जातिभेद वा धर्मभेद कधीही मानला नाही. त्यांनी यवनांनाही तितक्याच मुक्तपणे आपल्या पंथात प्रवेश दिला.
आद्य शंकराचार्यांनी मोक्षासाठी जसे ज्ञानमार्गाला प्राधान्य दिले तसेच गोरक्षनाथांनी त्याच ध्येयपूर्तीसाठी योगमार्गाला महत्व दिले.
त्यांच्या तत्त्वज्ञानाचा मूळ आधार ‘सांख्यमत’ हा असून ‘पिण्डी ते ब्रह्माण्डी’ या गोष्टीवर त्यांचा मुख्य भर आहे.आपल्या शरीरात सारे ब्रह्माण्डसूक्ष्म रूपाने वसत आहे असे त्यांच्या ‘सिद्धसिद्धान्तपद्धती’ या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे.
मृत्यूनंतरची मुक्ती ही गोरक्षांच्या तत्त्वज्ञानात बसत नाही. मंत्रयोग, लययोग, हठयोग आणि राजयोग यांच्या साहाय्याने नाथयोगी आपल्या देहालाच शिवस्वरूप बनवून याच देही मुक्त होऊ शकतो नि यासाठीच षट्‌चक्रे, पंचआकाश, नवद्वारे इ. चे सम्यक्‌ ज्ञान नाथयोग्याला असणे आवश्यक आहे.
कुण्डलिनी जागृतीलाही नाथसंप्रदायात विशेष महत्वाचे स्थान आहे. कारण या कुण्डलिनीशक्तीच्या द्वारेच जीवशिव सामरस्याचा अनुभव नाथयोग्याला येतो.
मात्र हा अनुभव गुरुकृपेवाचून मिळणे दुरापास्त असल्यामुळे नाथपंथात गुरुला अपरंपार महत्व आहे. अशा गुरुच्या ठिकाणी ३६ लक्षणे वा गुण असावयास पाहिजेत. एवढेच नव्हे, तर शिष्यातही ३२ लक्षणे वा गुण असल्यावाचून त्यास शिष्य होता येत नाही.
या संप्रदायात शरीर हेच मोक्षप्राप्तीचे किंवा कैवल्यप्राप्तीचे साधन असल्यामुळे ते उपेक्षणीय समजले जात नाही. आमच्या उपनिषदांतही याचसाठी शरीररक्षणाला महत्व दिलेले आढळून येते. हठयोगाच्या साहाय्याने साधकाला याचि देही याचि डोळा हा मुक्तीचा सोहळा अनुभवता येतो असे नाथांचे तत्त्वज्ञान सांगते.
नाथांचे हे तत्त्वज्ञान हे द्वैत अद्वैताच्या पलीकडचे आहे. एकच अद्वितीयय असे परमतत्त्व शिव आणि शक्ती अशा दोन अवस्थांमधून प्रकट होते व शिव हाच शक्तिरूप बनून सर्व दृश्यसृष्टीमध्ये प्रकटतो असे हे तत्त्वज्ञान सांगते.
गोरक्षनाथांनी सांगितलेला योगमार्ग हा ‘हठयोग’ आहे. ह=सूर्य आणि ठ-चंद्र. म्हणजेच हा सूर्यचंद्रांचा योग आहे. सूर्य प्राणवायू आणि चंद्र अपानवायू . या दोहोंचा योग तो हठयोग.
श्रीगोरक्षनाथांच्या तत्त्वज्ञानात योग, ज्ञान आणि भक्ती यांना सारखेच महत्व असून शिवाकडून योगविद्या, ब्रह्माकडून ज्ञान आणि विष्णूकडून भक्ती यांची प्राप्ती होते असे हा संप्रदाय मानतो. तसेच, ह्या तिन्ही दैवतांच्या शक्ती श्रीदत्तात्रेयांमध्ये एकवटल्या आहेत असेही या संप्रदायात सांगितले आहे.
श्रीगोरक्षनाथांच्या महान तत्त्वज्ञानाची ही एक ओझरती ओळख असून ज्यांना त्यांचे संपूर्ण तत्त्वज्ञान जाणून घेण्याची इच्छा असेल त्यांनी त्यांचे ‘सिद्धसिद्धान्तपद्धति’, ‘गोरखबानी’ इ. ग्रंथ मुळातून अभ्यासणेच योग्य ठरेल.
श्रीगोरक्षनाथांची थोरवी वर्णन करताना एका अभ्यासकाने लिहिलेले एक वाक्य खरोखरच लक्षात ठेवण्यासारखे आहे. तो म्हणतो,

‘आंतरिक शुद्धीवर भर, अनुभूतीला प्रमाणमानणारे मुक्तचिंन, तपःपुनीत तेजस्वी व्यक्तिमत्त्व आणि प्रखर

आत्मविश्वास या गुणांमुळे गोरक्षनाथांनी औपनिषदिक ऋषींचा वारसा समृद्ध बनविला.’

त्यांच्या एकंदर कार्याची थोडक्यात ओळख पुढीलप्रकारे करून देता येईल.
‘गोरक्षनाथांच्या धर्मसाधनेत निगम, आगम, मंत्र-तंत्र, वज्रयान, हनियान, सिद्धयोगी इ. चा समावेश होत असला तरी तिचे शुद्धीकरण करण्याचा जास्तीतजास्त प्रयत्न त्यांनी केला. वैदिकांचे शुष्क व नीरस कर्मकाण्ड त्यांनी वगळले. तांत्रिकांचा व शाक्तांचा वामाचार त्यांनी त्याज्य मानला. जारण, मारण, उच्चाटन यांच्यापेक्षा देहशुद्धी, ध्यानयोग, कुंडलिनीजागृती यांनी त्यांनी आपला साधनेत महत्वाचे स्थान दिले. वैदिक कर्मकाण्डाला व तांत्रिकांच्या वामचाराला विरोध करून त्यांनी आपली योगसाधना कर्मयोग व भक्तियोग यांच्याद्वारे समाजाभिमुख केली. इंद्रियनिग्रह, आत्मसाधना, मनोविकास यांना महत्व देऊन धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद यांचा विचार न करता त्यांनी भारतीय धर्मसाधनेची बैठक अधिक विस्तृत केली.
एका चिंतनशील अभ्यासकाने गोरक्षनाथांच्या संपन्न वारशाबद्दल असे म्हटले आहे की, ‘आद्य शंकराचार्यानंतर त्यांच्याइतका प्रभावशाली महापुरुष भारतवर्षात दुसरा झाला नाही. ते आपल्या युगातील सर्वात थोरनेते होते’

गुरु गोरक्षनाथांची महती गाण्यासाठी कित्येक ग्रंथ लिहिले तरी ते अपुरे पडतील, इतके ते महान होते!


नाथ संप्रदाय समाप्त.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *