संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (देवभक्त यांची एकरुपता)

संत निळोबाराय (देवभक्त यांची एकरुपता)

११८०

आमोद न सोडी कर्पुर । किंवा प्रभेतें रविकर ॥१॥

तैसेचि देव आणि भक्त । येरयेरीं विराजित ॥२॥

जेंवि साखरेतें गोडी । चंदन सौरभ्या न सोडी ॥३॥

निळा म्हणे अवकाश नभ । दोन्ही एकचि ते स्वयंभ ॥४॥

११८१

ठायींचा हा ऋणानुबंध । प्रीतिवाद उभयतां ॥१॥

म्हणोनि एक एकाधीन । जाणती उणखूण येरयेरां ॥२॥

देव जाणे अंतरींचे । केलें भक्ताचें प्रतिपादी ॥३॥

निळा म्हणे भिन्न भाव । नाहीं देवभक्तांचा ॥४॥

११८२

देव घरा आला । भक्तिं सन्मानें पूजिला ॥१॥

पाहुणेर पंगती । संत व्दिजवृंदें शोभती ॥२॥

पुढें आरंभूनी कथा । बुका माळा गंधाक्षता ॥३॥

निळा म्हणे ब्रम्हानंदें । नाचती उभयतां आनंदें ॥४॥

११८३

देव चालिला सांगातें । भक्त जाती ज्या ज्या पंथे ॥१॥

परम आनंद उभयतांसी । देवभक्तां सुखाच्या रासी ॥२॥

चालतां मारगीं । कथा कीर्तन प्रसंगीं ॥३॥

निळा म्हणे देवभक्तां । परमविश्रांती चालतां ॥४॥

११८४

सदगदित झाले कंठ । नेत्री अश्रु चालती लोट ॥१॥

एकचि परि देवा भक्तां । बाधी वियोगाची व्यथा ॥२॥

देव स्फुंदे भक्त रडे । एक पाहति एकाकडे ॥३॥

निळा म्हणे न सुटे मिठी । येरेयेरां पडली गांठी ॥४॥

११८५

देवचि झाले अंगे । देवा भजतां अनुरागें ॥१॥

शुक प्रल्हाद नारद । अंबरिष रुकमांगद ॥२॥

निवृत्ति ज्ञानेश्वर सोपान । नामा सजना आणि जाल्हाण्‍ ॥३॥

कूर्मा विसोबा खेचर । सावता चांगा वटेश्वर ॥४॥

कबीर सेना सूरदास । नरसीमेहता भानुदास ॥५॥

निळा म्हणे जनार्दन एका । देवचि होउनी ठेला तुका ॥६॥

११८६

ध्यानीं चिंतनी मानसीं । हरितें ध्याता अहर्निशीं । तोचि होऊनिया भक्तरासी । झाले विठठलिं विठ्ठल  ॥१॥

कीटकी भृंगी ऐशी रुप । तीव्र ध्यानें ते तद्रुप । विष्णु जेवीं शिवस्वरुप । शिवहि विष्णु चिंतनें ॥२॥

नर तोचि नारायण । अर्जुनरुपें विलसे कृष्ण । येरे येरे विराजमान । करितां ध्यान तद्रुपता ॥३॥

निरसोनियां अविदयाजात । देव तैसेचि झाले भक्त । मोहममता कामातीत । जाले सतत निजध्यासें ॥४॥

निळा म्हणे अर्धनारी । रुप विलसें नटेश्वरीं । दोनि दाउनी एक शरीरीं । दोघां नाहीं दोनिपणें ॥५॥

११८७

देव तोचि भक्त नाहीं वेगळीक । जल गार उदक जयापरि ॥१॥

येरयेरामाजिं येकपणीं भिन्न । करुनि सौजन्य भोगिताती ॥२॥

सौरभ्य चंदन परिमळ सुमन । नव्हति ते भिन्न्‍ येक येका ॥३॥

निळा म्हणे रत्ना जेंवि रत्न कीळ । दोंनावी निर्मळ एकी शिळा ॥४॥

११८८

सोडुनी तया न वचे दुरी । त्यांचा करी प्रतिपक्ष ॥१॥

म्हणे मी त्यांचा तेही माझे । नव्हती दुजे कल्पांतीं ॥२॥

मी तूं म्हणतां वेगळे न हों । मुळींचे आहों एकाएकीं ॥३।

निळा म्हणे देवभक्तां । एकात्मता ठायींची ॥४॥

११८९

देवां भक्तां भिन्नपण । देखती जन मूर्ख ते ॥१॥

सविता तोचि नारायण । वेदप्रमाण हा अर्थ ॥२॥

व्यासोनारायण म्हणती । मिथ्या वदंती हें काय ॥३॥

निळा म्हणे अर्जुन कृष्ण । नरनारायण भिन्न तनु ॥४॥

११९०

देवाभेटीं संतपण विरे । देवपण नुरे संतभेटीं ॥१॥

ब्रम्हानंदे निमग्न झाले । आप विसरले आपणां ॥२॥

भक्तीचे आवडीं झाले भिन्न । एकचि जीव प्राण उभयतां ॥३॥

निळा म्हणे स्वसुखा लोभा । एकचि प्रभा दो ठायीं ॥४॥

११९१

देवामाजीं भक्त असे । भक्ता अंगीं देव दिसे ॥१॥

ऐशी परस्पंरे मिळणी । जेवीं प्रभा आणि तरणी ॥२॥

भक्त देवातेंचि भजती । देवें भक्तीं ठेविली प्रीती ॥३॥

निळा म्हणें एकवंकीं । जैसा अळंकार कनकीं ॥४॥

११९२

भक्त्‍ देवालागीं झुरे । देव भक्तातेंचि स्मरे ॥१॥

जेंवि माउलियेतें बाळ । माय बाळातें स्नेहाळ ॥२॥

येरेयेरां नव्हती भिन्न । सर्वकाळीं सन्निधान ॥३॥

निळा म्हणें लवणा नीरा । जेवि सोनें अळंकारा ॥४॥

११९३

भक्त् पूजिती भगवंता । भगवंत पूजी आपुल्या भक्तां ॥१॥

ऐसा प्रीतीचा कळवळा । परस्परें हा सोहळा ॥२॥

भक्ता देवातेंचि उमगी । देवहि धांवे तयालागीं ॥३॥

निळा म्हणे एकीं एक । वसोनि भिन्नत्वाचें बीक ॥४॥

११९४

भक्तीं देवातें पूजिलें । देवें भक्तां सन्मानिलें ॥१॥

ऐसें भजती येरयेरां । जैसें जळ आणि जळगारा ॥२॥

भक्त देवाजवळी बैसे । देव भक्तां घरी वसे ॥३॥

निळा म्हणे देवा भक्तां । सर्वकाळीं एकात्मता ॥४॥

११९५

भिन्न दावूनियां एक । एकीं भिन्नत्वाचें बीक ॥१॥

जेंवि बिंब प्रतिबिंब । दोन्हीं एकचि ते स्वंयभ ॥२॥

जैसी गोडी आणि गूळ । कापूर तोचि परिमळ ॥३॥

निळा म्हणे देवां भक्ता । निवडी कोण भिन्न आतां ॥४॥

११९६

म्हणवूनि तुम्हा नित्य आठविती । या हो या हो म्हणती पांडुरंगा ॥१॥

तुम्हीं धांवोनियां येतां वरावरी । पुरवितां श्रीहरि आर्त त्यांचें ॥२॥

न साहे वियोग तुम्हां उभयतां । देवां आणि भक्तां एकवंकी ॥३॥

निळा म्हणे दोन्ही पिंड एक जीव । जाणती हा भाव निगमादिक ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav |देवभक्त यांची एकरुपता |

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *