संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय देवभक्तांचा संवाद

संत निळोबाराय देवभक्तांचा संवाद

११५४

भक्त म्हणती अहो देवा । वियोग न व्हावा तुम्हां आम्हां ॥१॥

इतुकेनिचि दोघेहि सुखी । मिसळतां एकाएकीं संतुष्ट ॥२॥

आम्ही गाऊं तुमचे गुण । करावें श्रवण सादर तुम्हीं ॥३॥

निळा म्हणे कमळापती । आहे हातीं तुमच्या हें ॥४॥

११५५

पासुनी तुम्हां न वेजे दुरी । क्षण घटिकाभरी वेगळा ॥१॥

चालातां तुम्हां धांवे पुढें । मागेंही वोढे सरिसाचि ॥२॥

निजल्या जवळी तुम्हां उभा । भक्तिलोभा गुंतलों ॥३॥

निळा म्हणे करुनि साठी । तुम्हां कल्प कोटी न विसंबें ॥४॥

११५६

सनकादिक म्हणती देवा । भुललेति भावा भक्तांच्या ॥१॥

तरी जे येथें दर्शना येती । दयावी त्यां मुक्ति सायुज्यता ॥२॥

देव म्हणती बहुत बरें । करुं आदरें मान त्यांचा ॥३॥

निळा म्हणे ऐशी मात । ऐकिली सादयंत संतमुखें ॥४॥

११५७

निरंतर नाम वदनीं । निजरुप ध्यानीं आठवितों ॥१॥

आणीक देवा कांही नेणें । मिरवूं भूषणें भक्तीचीं ॥२॥

योगसाधन न कळें मंत्र । निगमशास्त्र व्युत्पत्ती ॥३॥

निळा म्हणे अज्ञान हरि । आहे परी सर्व मी ॥४॥

११५८

ऐकोनियां दासवाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥

म्हणे तुम्ही प्राणसखे । बोलतां मुखें प्रीतीवादें ॥२॥

सर्वही काळ माझीचि चाड । तरि मजहि कोड तुमचेंचि ॥३॥

निळा म्हणे न फिटे धणी । भक्ता आणि देवाची ॥४॥

११५९

नामें आळवितां आठी । तुम्हां पोटीं भय वाटें ॥१॥

नेणों कांहीं मागतील । किंवा येतील वैकुंठा ॥२॥

काय वाटूं किती देऊं । म्हणोनियां जिऊ निर्बुजला ॥३॥

ऐसें जाणोनी लपालेती । घेतलें चित्तीं भय वाटे ॥४॥

याचि लागीं उत्तर न दया । कळलें गोविंदा मनोगत ॥५॥

निळा म्हणे सुखी असा । न मागों सहसा आण तुमची ॥६॥

११६०

ऐकोनि संत हांसतील । तुम्हांसी येईल मग लाज ॥१॥

कौल दिला राहे सुखें । न म्हणो मुखें दे ऐसें ॥२॥

मागावें तें आम्हांचि जवळी । आहे नामावळीं पढों सुखें ॥३॥

आणिखी तुमची नाहीं आशा । ठेवा कैशा मुक्तिहि त्या ॥४॥

निळा म्हणे आपुल्याचि सुखें । असों हरिखें अखंडित ॥५॥

११६१

ऐसें ऐकोनियां उत्तर । देव म्हणे उदर धीर तुम्ही ॥१॥

तुमच्याचि काजा रुपासि येणें । मजलागीं धरणें अवतार ॥२॥

तुम्ही माझें मी तुमचा । आहेचि ठायींचा ऋणनुबंध ॥३॥

निळा म्हणे देवभक्तां । ऐसी एकात्मका हो सरली ॥४॥

११६२

देव म्हणे भक्तराजा । अव्हेर माझा न करावा ॥१॥

भोजनकाळीं  पाचारावें । मजही घ्यावें सांगातें ॥२॥

भोजनीं तुमच्या तृप्ती मज । काजें काज तुमचिया ॥३॥

निळा म्हणे अंतर नका । असो एकएका माझारीं ॥४॥

११६३

राहेन आतां तुमच्या संगें । हेंचि मागें भक्तांसी ॥१॥

हेंचि दया आतां उदारपणें । माझें करणें रुप नांव ॥२॥

विश्रांतीचें माझें घर । तुम्हीं जें शरीर धरिलें तें ॥३॥

निळा म्हणे भक्तांपाशीं । भाकी ऐशी कींव देव ॥४॥

११६४

तुम्ही दिधलें वैकुंठभुवन । शेषशयन मजलागीं ॥१॥

नाहीं तरी जाणता कोण । होतों निर्गुण निराभास ॥२॥

नामरुप कैचें मज । तुम्ही चित्तें सहज वाढविलें ॥३॥

निळा म्हणे आपुल्या दासां । देतो ऐसा बडिवार ॥४॥

११६५

पुसे क्षेम भक्तांलागीं । म्हणतसे मार्गी श्रमलेती ॥१॥

प्रतिवरुषीं भेटी देतां । सांभाळितां येउनी ॥२॥

नाहीं तुमचे उत्तीर्ण झालों । कधीं आलों गांवासी ॥३॥

निळा म्हणे आभारला । प्रसन्न झाला दासासी ॥४॥

११६६

म्हणे मी येईन तुम्हांसवें । गावा न्यावें आपुलिया ॥१॥

ठाकेल ते करीन सेवा । माझा न करावा अव्हेर ॥२॥

राहेन तुमचिये संगतीं ।  सुख विश्रांती कारणें ॥३॥

निळा म्हणे येणें रुपा । तुमची कृपा देव म्हणे ॥४॥

११६७

भक्ति भाव बळकाविला । देव धंविला सोडवणें ॥१॥

म्हणे मज घ्या पाटलासी । सोडा भावासी जाऊं दया ॥२॥

ते म्हणती तूं लटिका देवो । आम्ही धरिला भावो न सोडूं ॥३॥

निळा म्हणे भावासाठीं । पडली मिठी देव न सुटे ॥४॥

११६८

भ्याला देव देखोनि भक्तां । म्हणे मी आतां केउता पळों ॥१॥

जीवेंसीचि इहीं केली साठी । सांडवितां मिठी न सोडिती ॥२॥

भुक्ति मुक्ति देतों यासी । परि हे उदासी न घेती त्यां ॥३॥

निळा म्हणे भक्तीं मोकलितां आशा । देवचि फांसा पडिलों म्हणे ॥४॥

११६९

देव म्हणे भक्तहो कांही तरी घ्यारे । ते म्हणती उरे शीणचि घेतां ॥१॥

याल तरि नेईन वैकुंठलोकां । ते म्हणती नका बंदीखान तें ॥२॥

रिध्दिसिध्दी देईन तुम्हां । ते म्हणती आम्हां विटाळ तो ॥३॥

विचारी देव करावें कैसें । कैवल्याही ऐसें नेघों म्हणती ॥४॥

आतां आवडेल तरी तें मागा । देईन सांगा जीवींचें तें ॥५॥

निळा म्हणे ह्रदयीं ध्यान । दयाहो जीवन नाम तुमचें ॥६॥

११७०

भक्तिं भावचि बांधिला गांठी । आला उठाउठीं देव तेथें ॥१॥

म्हणे मज घ्या सोडायसी । ते म्हणती ठकिसी नेघों तुज ॥२॥

लटिकीच माया धरिशील रुपें । लपशील खोपें रिघोनियां ॥३॥

न सोडूं भाव जांई तूं आतां । विनवी देवभक्तां काकुळती ॥४॥

भावही घ्यारे भक्तिही घ्या रे । मजही घ्यारे तुमचाचि मी ॥५॥

निळा म्हणे साधिलें काज । भक्तिं आपुली पैज जिंकियेली ॥६॥

११७१

हो तुम्ही कृपावंता । किती आतां विनवावें ॥१॥

न दयाचि कांही प्रत्युतर । ऐसे निष्ठुर केवि तरी ॥२॥

नेणों दासाचा त्रास आला । दिसे मांडिला अव्हेर ॥३॥

काय करुणाचि हारविली । विपरीत झाली दशा दिसे ॥४॥

निळा म्हणे म्हातारपण । आलें दारुण नुठवेसें ॥५॥

११७२

एकोनियां संतवाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥

म्हणे यारे भिऊं नका । माझिया सेवका भय नाहीं ॥२॥

नाम मुखीं न संडावें । भजा भावें संतोशीं ॥३॥

निळा म्हणे ऐसी हरी ।आज्ञा करी निजदासा ॥४॥

११७३

निभर्य असा माझया बळें । कळिकाळें ती रंकें ॥१॥

सुखें करा हरिची कथा । तुमची चिंता मज आहे ॥२॥

पाचाराल तेचि घडीं । येईन तांतडीं धांवत ॥३॥

निळा म्हणे अमृतवंचनें । दे वरदानें दासांसी ॥४॥

११७४

मग हळूचि बोले अमृतवाणी । मागा म्हणोनी निजभक्तां ॥१॥

मुक्त होईन सेवाऋणा । घ्या हो वरदाना इच्छेच्या ॥२॥

तुम्हांसी जें जें वाटे गोड । मागा कोड पुरतें ॥३॥

निळा म्हणे भक्त त्या म्हणती । आम्हांसी प्रीति तुमचीच ॥४॥

११७५

भक्त उत्तीर्णत्वालागीं । राहिला युगीं युगें जातां ॥१॥

न फिटेचि तरी त्यांचे ऋण । भक्त संपन्न वैभवें ॥२॥

देती अन्न आच्छादन । म्हणती येथून नव जावें ॥३॥

निळा म्हणे केला उभा । जो या नभ व्यापका ॥४॥

११७६

देव आदरें म्हणे भक्तां । घ्या हो भुक्ति मुक्ति आतां ॥१॥

भक्त म्हणती नेघों देवा । पुरे आम्हां तुझीचि सेवा ॥२॥

रिध्दिध्दी तरी घ्या रे । भक्त त्यागिती धिक्कारें ॥३॥

निळा म्हणे करुनी साठीं । बैसलें चरणीं घालुनी मिठी ॥४॥

११७७

भक्तीं आराधिला देव । जाणवला भाव देवासीं तो ॥१॥

बहुत बरवें म्हणती भक्ता । न वजे परता जवळूनियां ॥२॥

सुखी असा माझया बळें । पुरवीन लळे इच्छाल ते ॥३॥

निळा म्हणे कृपाळु हरी । भक्तावरी तुष्टमान ॥४॥

११७८

कांही कार्य मांडेल जेव्हां । मजचि प्रगट होणें तेव्हां ॥१॥

जवळिच आहे भेऊं नका । माझिया बळें दुर्जन लोकां ॥२॥

तुम्हां गांजिती व्देषिती । त्यांची समूळ विनशति ॥३॥

निळा म्हणे भगवदवाणी । ऐसी प्रविष्ट झाली श्रवणीं ॥४॥

११७९

ऐकोनियां भक्तवचनें  । देव संतोषलें मनें ॥१॥

म्हणती आहे नामापासीं । संदेह न धरावा मानसीं ॥२॥

संत बोलिले ते खरें । साचचि मानावें उत्तरें ॥३॥

निळा म्हणे संतोषविलें । कृपावचनीं  या विठठलें ॥४॥

११८०

देव हांसोनि बोलती । नको येऊं काकुलती ॥१॥

आम्ही रंजवु आपणीयां । तुझिये वाचे चेतवूनियां ॥२॥

नलगें कांहीं परिहार । देणें तुज धरीं धीर ॥३॥

निळा म्हणे चरणांवरी माथा । ठेवूनी करी पुढें कथा ॥४॥


तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

संत निळोबाराय देवभक्तांचा संवाद | संत निळोबाराय देवभक्तांचा संवाद

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *