संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

निळोबाराय (देवाशीं प्रेमाचें भांडण)

निळोबाराय (देवाशीं प्रेमाचें भांडण)

१११४

आणिक तों युक्ति नाहीं माझया हातीं । आहें मूढमति म्हणूनियां ॥१॥

वारंवार तुम्हां करितों सूचना । नामें दयाघना उच्चारुनी ॥२॥

पतितपावन ऐसी ब्रिदावळी । रुळते पायांतळीं प्रतिज्ञेची ॥३॥

निळा म्हणे तिचा प्रताप दाखवा । माझा हा निरसावा अहंभाव ॥४॥

१११५

आम्ही तों जिवें वेंच केला । तुमच्या बोलावरी देवा तंव तें तुम्हासी ठावे ॥ १॥

किती वेळ दावावें बोलोनि ॥२॥

जैसी असो तैसींचि तरी । कायसी थोरी मग तुमची ॥३॥

निळा म्हणे वांयांचि शीण । केला यावरुन दिसतसें ॥४॥

१११६

ऐकिला तुमचा अगाध महिमा । दोषियां अधमां तारितसां ॥१॥

म्हणोनियां जी  आलों शरण । सत्य मानूं संतवाणी ॥२॥

यावरी कराल अव्हेर तरी । लागेल श्रीहरी बोल तुम्हां ॥३॥

निळा म्हणे आमुचें जिणें । आहें हें वांया ये ठायींचेंचि ॥४॥

१११७

अंतरींचे जाणा वर्म । कर्माकर्म फळदातें ॥१॥

तरि कां माझा अव्हेर केला । काय तो देखिला स्वभाव दुष्ट ॥२॥

नेणें करुं तुमची सेवा । परि मी देवा नाम जपें ॥३॥

निळा म्हणे यावरी आतां । येईल चित्ता तैसें करा ॥४॥

१११८

करा माझा अंगिकार । पतीतपावन थोर ब्रीदा ॥१॥

उपेक्षितां हांसती लोक । म्हणती सेवक जड झाले ॥२॥

मग ते तुम्हां होईल लाज । अंतरेल काज पुढील ही ॥३॥

निळा म्हणे अपकीर्ती अंगा । न ये पांडुरंगा करावें तें ॥४॥

१११९

कां जी कृपावंत झालेति निष्ठूर । नाईका उत्तर करुणेचें ॥१॥

काय अजामेळा होती पुण्यरासी । नेला वैकुंठासी नामोच्चारें ॥२॥

गणिका ते वेश्या काय आचरली । राम म्हणतां नेली निजधामा ॥३॥

जराव्याधें पायीं विधीयला बाण । तो तुम्ही आपण तारियेला ॥४॥

निषाद तो कोळी श्रीरामासन्मुख । येतां दिलें सुख निवविला ॥५॥

पूतना ते पाजी विष स्तनपानीं । ते सायोज्यसदनीं बैसविली ॥६॥

गजेंद्र तो काय तप आचरला । धांवा म्हणतां नेला सोडवुनी ॥७॥

वैरियाचा बंधु केला लंकापती । चिरंजीव पध्दती बैसउनी ॥८॥

निळा म्हणे माझा नाहीं पुरविला । हेतचि राहिल दर्शनाचा ॥९॥

११२०

किती तरी चिंता करुं । धीर धरुं कोठवरी ॥१॥

आला दिवस बुडोनी जातो । अतिशयचि राहतो केला तो ॥२॥

निश्चयें माझा अव्हेर केला । यावरी विठठला कळों आलें ॥३॥

निळा म्हणे आधार नेदा । कांहिचि गोविंदा चित्तसी ॥४॥

११२१

गेलेती आपुल्या ब्रिदातें विसरोनी । ऐसें धरिलें मनी निष्ठुरपण ॥१॥

येरवी ऐकोनि धांवतसां धांवा । तें आजि केशवा काय झालें ॥२॥

आटाहास्य तुम्हां मारितां आरोळी । नाईकाची टाळी बैसउनी ॥३॥

निळा म्हणे माझें कर्म आलें आड । न चलेचि कैवाड तुमचा देवा ॥४॥

११२२

गेलें वेंचोनियां वय याचिपरी । चिंता महापुरीं वाहवलों ॥१॥

धरियेला होता तो विश्वास मानसीं । येणें काळें त्यासीं क्षय आला ॥२॥

आतां कोठवरीं धरावा तो धीर । न दिसे पायीं थार तुमचिये ॥३॥

मागें कित्येकांसी तुम्ही उठाउठी । येऊनि धरिलें पोटीं निवविलें ॥४॥

माझे वेळे कांहो पडिला ऐसा फेर । कर्म बलोत्तर ओढवलें ॥५॥

निळा म्हणे करुं किती तरी शोक । वचनाचाहि एक आश्रय नये ॥६॥

११२३

गोमटा म्हणती मानवदेहो । केला उपाव फळ देतो ॥१॥

तरी कां माझा विफळ गेला । धांवा केला तुमचा तो ॥२॥

कांहीच न करा आश्वासन । उध्दिग्न मन यासाठीं ॥३॥

निळा म्हणे यावरी काय । किजे उपाय तो नेणें ॥४॥

११२४

जया जो वाटां भागा आला । पाहिजे केला जतन तोचि ॥१॥

आम्हीं कराव्या पापराशी । निरसन तयासी तुम्ही कीजे ॥२॥

लोहें न संडितां लोहपणा । परिसें तत्‍क्षणा पालटावें ॥३॥

निळा म्हणे अंधार निशीं । रवी त्या प्रकाशी निजतेजें ॥४॥

११२५

तुम्ही जाणा अंतरींचे । लटिकें साचें श्रीहरी ॥१॥

आतां माझी कांहीं नका । मनीं शंका वागवूं ॥२॥

नाहीं पदरा घालित पिळा । दया जी गोपाळा म्हणउनी ॥३॥

निळा म्हणे वदनीं राहो । नाम अहो विठठला ॥४॥

११२६

तुम्ही तों कृपेचे सागर । परि दुस्तर कर्म माझें ॥१॥

म्हणेनियां नये करुणा । माझिया दुर्गुणा देखोनी ॥२॥

नेणें जप तप ध्यान कांहीं । पडिलों प्रवाहीं प्रपंचा ॥३॥

निळा म्हणे केली सेवा । माझी हे देवा न पावेचि ॥४॥

११२७

तुम्ही देवा कृपावंत । आम्ही अनाथ दुर्बळें ॥१॥

म्हणोनियां थोरपण तुम्हां । येतें पुरुषत्तमा आमुचेनि ॥२॥

समानपणें असतों तरी । तुमची थोरी न दिसती ॥३॥

निळा म्हणे लोखंडें जैसा । दिधला परिसा बडिवार ॥४॥

११२८

देवपण तुम्ही गमाविलें देवा । नाईकोनी धांवा येणें काळें ॥१॥

न करा धांवणे केल्या कंठस्फोट । क्रीया ऐशी नष्ट धरियेली ॥२॥

प्रेतापाशीं हाकां देतां तें नाईके । थोठाववला ठाके शोक नाना ॥३॥

निळा म्हणे नये करुं आतां आस । तुमची हे चित्तास कळों आलें ॥४॥

११२९

दाटलिया धुई आच्छादी रवितेजा । त्याचिपरी माझा दोष बळी ॥१॥

न चलेचि पुढें तुमची ही युक्ति । सुदर्शन हातीं असोनियां ॥२॥

काय चाले बळ सागराचें वडवानळीं । करित उठी होळी जीवनाची ॥३॥

निळा म्हणे तैशापरी जी अनंता । माझिया संचिता न जिंकावें ॥४॥

११३०

नसता गुण स्वाभाविक । वस्तूचि तरि निरर्थक ॥१॥

तेवीं देवा देवपण । नसतां अंगीं तो पाषाण ॥२॥

विना परिमळें । कस्तुरी मृतिकाचि तें निजनिर्धारीं ॥३॥

निळा म्हणे न मारी जिवा । तरी तें विषचि नव्हे तेव्हां ॥४॥

११३१

नाहींचि केलें समाधान । माझें म्हणवून क्षिती वाटे ॥१॥

आतां कधीं समोखाल । हातीं धरा प्रीतीनें ॥२॥

मागें बहुतां सांभाळिलें । आजीं तें केलें ब्रिद मिथ्या ॥३॥

निळा म्हणे निवडलें खोटें । माझेंचि वोखटें अदृष्ट ॥४॥

११३२

बरें होणार ते झाली माझी गती । हळहळ किती वाढवावी ॥१॥

परी तुमच्या ब्रीदा लागला कळंक । दुराविल्या एक मशक मी ॥२॥

होती वाढविली कीर्ति तिहीं लोकीं ।  ते आजी निष्टंकीं वाहविली ॥३॥

म्हणती शरणांगत येणें उपेक्षिला । लौकिक हा झाला भला काय ॥४॥

समर्था चुकल्या भला कोणीही हांसे । अनाथासी नसे शंका कांहीं ॥५॥

निळा म्हणे जागा आपुल्या उचिता । आम्ही तो संचिताधीन झालों ॥६॥

११३३

बोलिलों तें तुम्हां उणें । कीजे क्षमा नारायणें ॥१॥

आपुलिये मी तळमळें । दु:खें चावळलों तें कळे ॥२॥

समर्थाची गतिमति । कोण जाणें कैसी रीति ॥३॥

निळा म्हणे उचित करा । जैसें आपुलें तें दातारा ॥४॥

११३४

बोलिलों तें क्षमा करा । विश्वंभरा अपराध ॥१॥

सेवकांनीं कीजे सेवा । तुम्ही तों देवा देवोचि ॥२॥

चावळलों ते सलगी केली । उपहासिली पाहिजे ॥३॥

निळा म्हणे न कळे लीला । अकळ कळा तुमची ते ॥४॥

११३५

भक्तिपंथें न चले कोणी । वाट जाईल मोडोनी ॥१॥

जरि अनाथा धांवणें । न कराल तुम्ही थोरपणें ॥२॥

आमचा जन्म वायां गेला । शब्द तुम्हांसी लागला ॥३॥

निळा म्हणे नव्हे भली । पुढें वाट खोळंबली ॥४॥

११३६

भाव भक्ति विलासिया । परिसा विनंती पंढरीराया ॥१॥

आम्हां दासां सांभाळिजे । देउनी प्रेम गौरविजे ॥२॥

जैसी तुमची आहे ख्याती । तैसीचि चालों दया जी पुढती ॥३॥

नाहीं तरि होईल हांसें । लोकीं ब्रीद लटिकें दिसे ॥४॥

तुम्ही आम्हां उपेक्षिलें । तरी हीनत्व सांगा कोणा आलें ॥५॥

निळा म्हणे पुढीला चाली । वाट पाहिजे रक्षिली ॥६॥

११३७

मागें पाळिलीं पोशिली । अपत्यें त्वां वाढविलीं ॥१॥

ऐसें बोलियले संत । लटिकी वाटे ते ते मात ॥२॥

हें गे मजचि उपेक्षिलें । नाहीं समाधान केलें ॥३॥

निळा म्हणे येऊनियां । भेटें पुरवीं माझा थाया ॥४॥

११३८

मोकलितां धाय । नाईकसी कैसी माय ॥१॥

सांडियले दूर देशीं । नये करुणा कांहीं ऐशी ॥२॥

वेष्टीलें श्वापदीं । अहंकार मोहमदीं ॥३॥

निळा म्हणे यावरी आई ॥ धांव घालीं वो विठाई ॥४॥

११३९

मृत्युची अवस्था नेणेंचि अमृत नेणेचि अमृत । पीडा भाग्यवंत दरिद्राची ॥१॥

तैसें तुम्ही नेणा आमुचे तळमळे । भोगितां सोहळे आपुलेचि ॥२॥

सिंधु काय जाणे तहानेचि बाधा । पयोनिधि क्षुघा कैसी असे ॥३॥

निळा म्हणे रवी न देखे अंधारें । उष्मा सुधाकारें कवणे काळीं ॥४॥

११४०

येईल चित्तासी तें तुम्हां उचित । आपुलें संचित भोगूं आम्ही ॥१॥

काय समर्थासी विनवावें रंकें । कोण त्याचें ऐके वचन तेथें ॥२॥

थोरा घरीं थोरा होतो बहुमान । कोण पुसे दीन याचकासी ॥३॥

निळा म्हणे आम्हीं मानिला विश्वास । तो दिसे निरास अवघी येथें ॥४॥

११४१

येईल चित्तासी तें करा । तुम्ही आतां विश्वंभरा ॥१॥

आमुचें वायां गेलें जिणें । नांदा तुम्ही देवपणें ॥२॥

केली आम्ही तोंडपिटी । फजिती व्हावया शेवटीं ॥३॥

निळा म्हणे निजाभिमान । तुम्हीं सांडिला इमान ॥४॥

११४२

राग आला तरी । माय बाळातें नाव्हेरी ॥१॥

राखे त्याची भूक तान । न मारी कापूनियां मान ॥२॥

शांतवुनी स्तनी । लावी तया न्याहाळुनी ॥३॥

निळा म्हणे धरी । अंकी तया माया करी ॥४॥

११४३

लाटिक्या भूताची लटिकी भूतबाधा । झाली करवी खेदा जाणतिया ॥१॥

तैसें तुम्हां केलें माझिया संचितें । देवपणहि थितें ही रचिलें ॥२॥

लटिकीचि जळीं दाऊनियां छाया । झकविलें राया श्वापदाच्या ॥३॥

निळा म्हणे स्वप्नीं सिहांचें रुपडें । देखोनियां पडे मदोन्मत्त ॥४॥

११४४

लाजविली सेवा लाजाविली भक्ति । वैराग्य विरक्ति लाजविली ॥१॥

ऐसाचि घडोनि आला हा प्रसंग । हांसविलें जग आपुल्या ब्रीदा ॥२॥

आमुचें होणार तेंचि वाढविलें । तुमचें कीर्ति आलें हीनपण ॥३॥

कैसे दीनानाथ म्हणवाल जी आतां । आम्हां उपोक्षितां अनाथांसी ॥४॥

शिणलों भागलों संसारें गांजिलों । म्हणोनियां आलों शरण तुम्हां ॥५॥

निळा म्हणे काय जाणोनि नेणते । झालेति यशातें दवडूनियां ॥६॥

११४५

लाज वाटे जीव करी तळमळ । चिंते वक्षस्थळ व्यापियेलें ॥१॥

पडिलों निढळ न सुचेचि विचार । तुम्हीं तों निष्ठुर धरियेलें ॥२॥

कैसेनि भेटी होईल पायांसी । उघडल्या त्या राशी पापाचिया ॥३॥

काय नेणों पूर्वी केलें आचरण । तें आलें मोडोन फळभारें ॥४॥

नामाच्या चिंतनें नव्हे त्याची शांती । ऐशी काळगती विपरित ॥५॥

निळा म्हणे नेणें आपुलिया मती । परी तुम्ही श्रीपति सर्व जाणा ॥६॥

११४६

लाभ अथवा हानी करितां व्यवसाय । आम्हां कते विपाय फळां आले ॥१॥

एका लाभा पात्र  केलें तिहीं लोकीं । आम्हां नेलेंशेखीं ऐशा थरा ॥२॥

फजितीसी उणें नाहीं लोकांमाजी । अंतरविलें काजीं संसारिकां ॥३॥

नव्हता कळों आला निश्च्‍याचा भावो । येणें काळें देवो निष्ठुरसा ॥४॥

गेलें होऊनियां न चले या युक्ति । होणार ते गती हो कां सुखें ॥५॥

निळा म्हणे लाजे झाली प्राणसंधी । न ये करुणानिधी कृपा तुम्हां ॥६॥

११४७

लोभियानें धन केलें भूमिगत । दगडही थित घालूनी वरी ॥१॥

तैसे तुम्हीं देवा केलें आपणांसी । कळंक यशासी लावियला ॥२॥

बुडविलें राज्य रायें सुरापानें । नसतां सावधान राज्यकार्या ॥३॥

निळा म्हणे आळसें बुडविला संसार । न गमतां व्यवहार साउकारें ॥४॥

११४८

वांयां संतांची ही बोली । वचनें त्यांचीं लाजविलीं ॥१॥

लटिकाचि केला कीर्तिघोष । येथें तो अवघीच निरास ॥२॥

माझाचि मज अनुभव झाला । नाहीं सावाधांवा केला ॥३॥

निळा म्हणे पालट बुध्दि । दिसे तुमची कृपानिधी ॥४॥

११४९

शोकार्णवीं पडलें मन । तुमचें न देखोन स्वागत ॥१॥

उदासीन धरिलें देवा । तुम्ही बांधवा दीनांच्या ॥२॥

माझेंचि कर्म बलवोत्तर । नेघा समाचार म्हणोनी ॥३॥

निळा म्हणे पडलों सांदीं । संसारबंदी न सुटेची ॥४॥

११५०

सहजचि तुमचीं वंदिली पाऊलें । तवं मी माझें हें हिरोनि घेतलें ॥१॥

आतां कोण दर्शना येईल सांगा । स्वभाव कळल्यावरी तुमचा पांडुरंगा ॥२॥

हें काय तुम्हांसी बोलिलें विहीत । चोरोनियां घ्यावें आमुचें संचित ॥३॥

प्रारब्धें भोग जे दयावयासी येती । अभिलाषूनि तेहि भोगितां श्रीपती ॥४॥

आतां क्रियमाण संग्रह जो करावा । तोही वरिच्यावरी तुम्हांचि हरावा ॥५॥

अवघेंचि आमुचें घेऊनियां अंतीं । जीवभाव तेहि बुडवावें पुढती ॥६॥

निळा म्हणे सर्वस्वें उघडाच केला । तुमचिये संगतीं दैव हा लाधला ॥७॥

११५१

संतवचनें खरीं होतीं । वाढेल जगीं तुमची कीर्ति ॥१॥

जरी माझे समाधान । कराल देउनी आलिंगन ॥२॥

नाहीं तुम्हां जाणें येणें । कांहीं कोठूनियां धांवणें ॥३॥

निळा म्हणे विश्वंभरा । प्रकटा ह्रदयीं वास करा ॥४॥

११५२

सांडियलें बाळा । कैसी निष्ठुर वेल्हाळा ॥१॥

ऐसीं बोलतील सकळें । नारी नर हांसती बाळें ॥२॥

माय नव्हे म्हणती लांव । ऐसें उपहासिती सर्व ॥३॥

निळा म्हणें सर्व जनीं । ऐसी होईल टेहणी ॥४॥

११५३

हरुनियां घ्यावें चित्त । आवघेंचि वित्त धन माझें ॥१॥

हें तों नव्हे उचित तुम्हां । पुरुषेत्तमा विचारा ॥२॥

दर्शनाचें हेंचि फळ । सोडावें निढळ करुनियां ॥३॥

निळा म्हणे हाईल टीका । माजीं या लोका तुमचीच ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | देवाशीं प्रेमाचें भांडण |

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

निळोबाराय (देवाशीं प्रेमाचें भांडण) निळोबाराय (देवाशीं प्रेमाचें भांडण) निळोबाराय (देवाशीं प्रेमाचें भांडण)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *