संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (करुणापर अभंग व देवापाशीं मागणें)

संत निळोबाराय (करुणापर अभंग व देवापाशीं मागणें)

५३८

अगाध महिमा तुमचा देवा । काय म्यां वाणावा मूढमति ॥१॥

उगाचि म्हणवीं तुमचा दास । करुनियां आस पायांची ॥२॥

शब्दचातुर्य कांहींचि नेणें । बोबडें बोलणें घ्या कानीं ॥३॥

निळा म्हणे आपुला म्हणावा । भलतैसा ठेसा भलतेथें ॥४॥

५३९

अगा ये भूवैकुंठपीठा । सकळां वरिष्ठा देवांचिया ॥१॥

अनाथ मी शरणांगत । करा स्थापित निज सेवे ॥२॥

षडगुण ऐश्वर्य भागयवंता । अहो रमाकांता श्रीविठठला ॥३॥

निळा म्हणे विश्वंभरा । करुणाकरा मज तारी ॥४॥

५४०

अथवा विनंती परिसा देवा । मज या निरवा संतजना ॥१॥

राहेन त्यांचिया सहवासेसी । सेवा मिरासी करुनिया ॥२॥

देतील तो सेवीन ग्रास । होईल सपोश तेणें तनु ॥३॥

निळा म्हणे ते सांगती गोष्टी । धरीन कर्णपुटीं अर्थ त्यांचे ॥४॥

५४१

अनाथाची कोण पाववील हांक । तुम्ही तो नाइ्रक ब्रम्हांडाचे ॥१॥

मी एक दुर्बळ येतों काकुलती । नेणाची श्रीपती काय करुं ॥२॥

कोण तुम्हांपासी जाणवील मात । होऊनि कृपावंत मजवरी ॥३॥

तुम्हांसी तो धंदा बहुत बहुतांचा । तयामाजिं कैसा आठव माझा ॥४॥

जेथें थोर थोर संत मुनीश्वर । सनकादिक सुरवर भीड त्यांची ॥५॥

निळा म्हणे व्यर्थ गेलों वांयांविण । केला उरला शिण जन्मवरी ॥६॥

५४२

अवघ्यांचि दु:खाचा परिहार । चरणीं थार झालिया ॥१॥

आतां देवा नुपेक्षावें । आश्वासावें प्रीतीनें ॥२॥

बहुत श्रमित होऊनी आलों । वांयां धाडिलों न पाहिजे ॥३॥

निळा म्हणे कृपावंता । चरणीं आतां मज रक्षा ॥४॥

५४३

अवलोकुनियां माझिया भावा । करावा देवा अंगीकार ॥१॥

जेणें तुमची घडेल सेवा । होईन दैवा पात्रभूत ॥२॥

धरील्या जन्माचें सार्थक । घडेल लोक मानवती ॥३॥

निळा म्हणे ऐसें करा । अहो दातारा पंढरीच्या ॥४॥

५४४

असतें उत्तम सुकृत जरी गांठी । तरी कां ऐसी आटी पडती देवा ॥१॥

लाजोनियां आजि पळतसा माघारे । ऐकोनी उत्तरें करुणेचीं हीं ॥२॥

नये कांही मना सेवा माझी भक्ति । तरिच धरिलें चित्तीं उदासीन ॥३॥

निळा म्हणे माझा पुरता आला वीट । देखोनी आदटकर्म बळी ॥४॥

५४५

असाधारण माझे बोल । तुमचे फोल कृपेंवीण ॥१॥

म्हणोनियां धांवा करी । करा समोरी दृष्टी आतां ॥२॥

काय करुं तैशा व्युत्पत्ति । तुम्हां जल्पती नेणोनियां ॥३॥

निळा म्हणे नामोच्चारीं । तुमचीये मोहरी कृपेतें ॥४॥

५४६

अहो अज्ञानतिमिरनाशा । जगदाधीशा आदिसूर्या ॥१॥

देवा विठोजी कृपाघना । लेववा अंजना निज नेत्रीं ॥२॥

आपुलिये रुपीं सौरसु करा । हातीं धरा मज आतां ॥३॥

निळा म्हणे चित्तीं । हेंचि दिवस रातीं राहिले ॥४॥

५४७

अहो निर्विकल्पतरु देवा । फळें पुरवा इच्छिलीं ॥१॥

तरी दया हो चतुर्भुज । स्वरुप निज निजाचें ॥२॥

करीन पूजा समाधान । निश्चळ मनें आपुलीया ॥३॥

निळा म्हणे आवडी ऐसी । पायांपाशीं जाणविली ॥४॥

५४८

अहो देवा कृपामूर्ती । गुणसंपत्तीनिधाना ॥१॥

पिंड पदीं समर्पिला । आम्ही आपुला जीवभाव ॥२॥

न मागों कांही अणुमात्र । कृपापात्र करावें  ॥३॥

निळा म्हणे विज्ञापना । परिसा दीना रंकाची ॥४॥

५४९

अहो देवा कृपावंत । करा मज अनाथा सनाथ ॥१॥

निरवूनियां संतजना । करा मना बोध माझया ॥२॥

आरुष वाणी बोंबडी वचनें । केलीं स्तवनें परिसावीं ॥३॥

निळा म्हणे आवडीं जाणा । करी विज्ञापना म्हणउनी ॥४॥

५५०

आठवितां तुमची लिळा । करितां दासाचा सोहळा ॥१॥

ऐसा स्वाभाविक गुण । वसे तुम्हां अंगीं पूर्ण ॥२॥

शरणागताचिया नांवे । तुम्हां उत्साह दुणावे ॥३॥

निळा म्हणे वत्सा धेनु । जेंवि पान्हावें देखोनु ॥४॥

५५१

आतां कधी सांभाळाल । आम्हां ठेवाल चरणापें ॥१॥

दिवसरात्रिं खंति वाटे । हदय फुटे वियोगें ॥२॥

येउनी आतां भेटी दयावी । यावरी गोसावी प्रीतीनें ॥३॥

निळा म्हणे चरणीं माथा । कृपावंता ठेवितो ॥४॥

५५२

आतां पुरवा मनींचा हेत । करा हे उदित भेटीसी ॥१॥

रुप पहावया डोळे । माझे भुकेले बहु काळ ॥२॥

चरण वंदावया भाळ । करी तळमळ अखंड ॥३॥

निळा म्हणे पुरवा कोड । जाणा चाड अंतरीची ॥४॥

५५३

आतां याचा घेऊनी त्रास । आलों तुम्हांस शरण हरि ॥१॥

घ्याल तरी सोडवून  या काळापासून पुण्य तुमचें ॥२॥

आम्हासी तो न कळे गती । कैसी निर्गती करावी तें ॥३॥

निळा म्हणे घ्या हो धर्म । काढा अकर्म कर्मातुनी ॥४॥

५५४

आतां यावरि संदेहपुरीं । नका श्रीहरी लोटूं मज ॥१॥

लाऊनियां आपुलिये कासे । न्या भलतैसे परपारा ॥२॥

कर्माची तो न कळे गती । नेणो पावविती कोण्या ठाया ॥३॥

निळा म्हणे तुमचे हातीं । आहे श्रीपति मोकळिक ॥४॥

५५५

आतां येऊनि सांभाळीं । केला माझा लळा पाळी ॥१॥

होशिल तूं कृपावंत । तरि कां ऐसें विपरित ॥२॥

बाळकासी मोहे । नीति पाळाविसी आहे ॥३॥

निळा म्हणे आतां । नाही धीर माझया चित्तां ॥४॥

५५६

आतां माझा अंगिकार । करा थार पायापें ॥१॥

लाउनिया आपुल्या गुणीं । माझी वाणी रंजवा ॥२॥

बाळी भोळी करीन सेवा । तुमची देवा ते घ्यावी ॥३॥

निळा म्हणे विनवूं नेणें । तरी पोसणें मी तुमचें ॥४॥

५५७

आपुलिया मनोगतें । गाईन तुमतें गुण वाणी ॥१॥

अहो देवा कृपानिधी । माझिये बुध्दी साह्य व्हावें ॥२॥

का येऊं देऊं आड । मतिवाद नाड बुडवणा ॥३॥

निळा म्हणे नावडो मात । आणखी हा हेत वाड करा ॥४॥

५५८

आपुलें तुम्हीं न संडावें । कर्म स्वाभावें आहे तें ॥१॥

सांभाळावें नामधरका । निरसुनी पातका भेटी दयावी ॥२॥

सूर्य न संडी प्रकाश जेवीं । रक्षी पदवी जे आहे ॥३॥

निळा म्हणे त्यापरी देवा । आमुचा करावा प्रतिपक्ष ॥४॥

५५९

आशाबध्द देखोनियां विटताती लोक । दयावयासी भीक नाहीं म्हणुन ॥१॥

तैसे तुहमी नव्हे लक्ष्मीचे कांत । सदा भाग्यवंत औदायेंसी ॥२॥

आपुल्या संसारिं आपणचि दु:खी । करिती काय सुखी इतरांसी ते ॥३॥

निळा म्हणे येतों तुम्हा काकुळती । नुपेक्षितील श्रीपती म्हणोनियां ॥४॥

५६०

आम्हा ताराल जरि श्रीहरि । कीर्ति तुमची वाढेल तरी ॥१॥

पुढेंहि चोखाळती वाटा । भाव भक्तिचा चोखटा ॥२॥

पुढेंहि चोखाळती वाटा । भाव-भक्तिचा चोखटा ॥३॥

विश्वासें त्या दृढवती । आमुचि देखोनि उत्तम गति ॥४॥

निळा म्हणे जी सर्वजाणा । हातीं तुमचे अवघ्या खुणा ॥५॥

५६१

आम्ही तों आपुलें निवेदिलें पायीं । अंतरीचे नाहीं वंचियेलें ॥१॥

तुम्ही सर्वजाणा जाणतां अंतर । काय परिहार वाउगाची ॥२॥

सोडविलीं ऐसीं बहुतें अनाथें । अनुसरतां नामातें तुमचीया ॥३॥

निळा म्हणे मीही झालों शरणागंत । ऐकोनियां मात मागिलांची ॥४॥

५६२

आम्हीं दासी कीजे दास्य । सहसा उपहास न करा वो ॥१॥

नेणों कां हे पडिलें दृष्टीं । आली गोष्टी वाचेते ॥२॥

निरोपाधि तुमचे लेणें । निर्विकार गुणें संपन्न ॥३॥

निळा म्हणे गुणातीता । रुपमंडिता विठोबा ॥४॥

५६३

आम्ही देवा भक्तीहीन नेणो ज्ञान योगाचें ॥१॥

म्हणोनि येतों काकुळती । पुढतोपुढतीं तुम्हासी ॥२॥

भाव नाहीं नकळे ज्ञान । कैसें साधन करावें तें ॥३॥

निळा म्हणे दिवसराती । उव्देग चितीं राहिला हा ॥४॥

५६४

चिंतितों मी चिंतनीं । रुप तुमचें अनुदिनीं ॥१॥

कराल कृपा म्हणोनियां । विठो पंढरीच्या राया ॥२॥

मागें उध्दरिले बहुत । लहान थोरले पतीत ॥३॥

नेले वैकुंठासी । महापापीमहा दोषी ॥४॥

ऐसी ऐकोनियां मात । चरणीं विगुंतला हेत ॥५॥

निळा म्हणे याचि लागीं । घेतो लाहो करितों सलगी ॥६॥

५६५

जरी अवगुणी अन्यायी । बाळा नुपेक्षी कीं आई ॥१॥

झाल्या अपराधांच्या कोटी । घालुनियां साहे पोटीं ॥२॥

कुरवाळुनी मोहें । तया पाजी प्रेमपेहें ॥३॥

निळा म्हणे अंकीं । घेउनी पहुडे परियंकीं ॥४॥

५६६

जाणे पाळूं लळा । आदि अवसान सोहळा ॥१॥

आपुलिया बाळकातें । मोहें प्रतिपाळी त्यांतें ॥२॥

खाऊं जेऊं घाली । ऐसी कृपाळु माउली ॥३॥

निळा म्हणे दुरी । न वचे सांडूनियां क्षणभरी ॥४॥

५६७

जाणे पाळूं लळा । माता स्नेहातुर बाळा ॥१॥

ऐसें जाणतसां सकळ । तरि कां लावियला वेळ ॥२॥

उपेक्षिलें ये परदेशीं । एकलेंचि मज उपवासी ॥३॥

निळा म्हणे यावरी करा । समाधान ह्रदयीं धरा ॥४॥

५६८

जाणोनियां मनोगत । ठेवा हात मस्तकीं ॥१॥

करा माझें समाधान । देऊनि वचन अभयाचें ॥२॥

आहे देवा तुम्हां हातीं । उगवूं गुंती जाणतां ॥३॥

निळा म्हणे वचनाधीन । नारायण तुमचिया ॥४॥

५६९

जिहीं भाव धरिला ठायीं । बुडी दिधली तुमच्या पायीं । त्यासी करुणेची करुनी साई । आपणापाशीं बैसविले ॥१॥

प्रल्हादा संकटीं रक्षिलें । ध्रुवासी अढळपदीं बैसविलें ॥ उपमन्या नेउनियां रक्षिलें । क्षीराब्धी वैभव देउनी ॥२॥

उध्दवासी ब्रम्हरस पाजिला । अर्जुना निजबोध अर्पिला । दौपदीचा लळा पाळिला । वस्त्राभरणें पुरविली ॥३॥

गौळणींचे प्रिय संवाद । नित्य भक्षणें त्यांचे दुग्ध । गोवळांसवें हुंबरी साद । हमामा हुतुतु खेळणें ॥४॥

जिहीं तुमचें धरिलें प्रेम । आवडीं वदनीं गाईलें नाम । त्यांचा करुनियां संभ्रम । निजानंदा पात्र केलें ॥५॥

नामदेवा ज्ञानदेवा । निवृतित्तनाथा चांगदेवा । एकोबा तुकोबाचिया भावा । तैसेंचि वर्ता श्रीहरी ॥६॥

निळा म्हणे मी तो दीन । सकळ संतांचा चरणरेण । तुमच्या स्तवनीं ठेविलें मन । येईल चित्ता तैसें करा ॥७॥

५७०

जे जे तुम्हां शरण आले । ते ते नेले निजधामा ॥१॥

पुढें जे आणिक भजती नवे । त्यांच्या भावें त्यां देसी ॥२॥

ऐसे अपार युगायुगीं । करितां जगीं उपकार ॥३॥

निळा म्हणे माझी चिंता । असों दया अनंता विनवितों ॥४॥

५७१

तुमचे चरणीं राहों मन । करा हें दान कृपेचें ॥१॥

नामीं तुमचे रंगो वाचा । अंगीं प्रेमाचा अविर्भावो ॥२॥

ह्रदयीं तुमची राहो मूर्ती । वाचें कीर्ति पवाडे ॥३॥

निळा म्हणे ठेवा ठायीं । जीवभाव पायीं आपुलीये ॥४॥

५७२

तुमचीं नामें गाऊं मुखें । तुम्हीं तीं सुखें ऐकावीं ॥१॥

नका यासी व्यवधान । मेळवा नयन नयनासी ॥२॥

हाकेसवें धांवोनि यावें । नुपेक्षावें सर्वथा ॥३॥

निळा म्हणे ह्रदयीं वास । करा सावकाश आमुचिये ॥४॥

५७३

दंभ मान नका । देऊं वैकुंठनायका ॥१॥

तुमचीं गाऊं दया निश्चळ । गुणनामें सर्वकाळ ॥२॥

शांती क्षमा दया । त्यांहि नका पंढरीराया ॥३॥

निळा म्हणे निरुपाधी । ठेवा माझी चरणीं बुध्दी ॥४॥

५७४

दृष्टी देखावासाचि वाटे । हदय फुटे त्यालागीं ॥१॥

उभा कटावरी कर । मूर्ती सकुमार गोमटी ॥२॥

भेटीलागीं मन व्याकूळ । न लोटे पळ युग वाटे ॥३॥

निळा म्हणे न तुटे आधी । कृपानिधी न भेटतां ॥४॥

५७५

धर्म तरी आहे ऐसा । मार्ग सहसा रक्षावा ॥१॥

नाहीं तरी भांबावती । अवघी भरती आडरानें ॥२॥

म्हणोनियां माझा करा । विश्वभरां सांभाळ ॥३॥

निळा म्हणे येतां लोकां । अनुभव शंका फिटेल ॥४॥

५७६

धांवोनि मी येतो परि नेणें मारग । तूंचि लागवेग करीं आतां ॥१॥

अनाथ मी दीन रंक शरणांगत । म्हणूनियां त्वरित सांभाळावें ॥२॥

अहो दीनानाथा दीनबंधु देवा । मनींचा हा उगवावा हेत माझा ॥३॥

तुम्हां तों येविशीं न लगती सायास । प्रगटावया दिवस मास पळ ॥४॥

मी तों सर्वभावें आहे बुध्दिहीन । नेणें करुं ध्यान स्तवन पूजा ॥५॥

निळा म्हणे तुम्ही कृपेचे सागर । जाणता अंतर सर्वसाक्षी ॥६॥

५७७

धांवोनियां येसी । प्रेम पान्हा तूं पाजिसी ॥१॥

तरीच वांचतील प्राण । नाहीं तरी आलें मरण ॥२॥

मायेवीण बाळा । वरी कोणाचा कळवळा ॥३॥

निळा म्हणे निज निगुती । पाळण पोषण तुझया हातीं ॥४॥

५७८

धावोनियां वाडेंकोडें । आलों भेटी तुम्हांपुढे ॥१॥

झडकरी उठोनियां आतां । क्षेम दया हो पंढरिनाथा ॥२॥

न करितां उदास । वाटेल आगळा हा रस ॥३॥

निळा म्हणे प्रेमा । न खंडावा पुरुषोत्तमा ॥४॥

५७९

नको पाहों अंत । उडी घालीं वो त्वरित ॥१॥

माझे वांचतील प्राण । क्षुधे तृषें बोळवण ॥२॥

बाळा जाणसी उचित । माउली तूं कृपावंत ॥३॥

निळा म्हणे गंगे । माये माझे पांडुरंगे ॥४॥

५८०

नाही भजन पूजन केलें । पूर्वी हें आलें स्वानुभवा ॥१॥

तुम्ही अव्हेरिलें देवा । करितां धांवा नाईका ॥२॥

कैसेनि करुणा कराल आतां । मजवरी अनंता मी नेणें ॥३॥

निळा म्हणे गेलों वांयां । आजी या ठाया पावोनि ॥४॥

५८१

नाहीं तुम्हांपाशीं कवणेविशीं उणें । नांदतसां गुणें संपत्तीच्या ॥१॥

न करावा अव्हेर तुम्ही अनाथाचा । बडिवार तुमचा हाचि असे ॥२॥

देऊं म्हणाल तरी ब्रम्हांड तुमचें । अंगी ऐश्वर्याचें सामर्थ्यही ॥३॥

निळा म्हणे भेटी न लावाल उशीर । क्षणेंची अवतार धरोनी ठाका ॥४॥

५८२

नाहीं कोणा उपेक्षिलें । बहुतां केलें सनाथ ॥१॥

माझेचि विशीं आळस केला । कां जी विठठला मी नेणें ॥२॥

प्रालब्धाचा ठेवा जैसा । आम्हां तैसा ओढवला ॥३॥

निळा म्हणे गेलों वायां । तुमच्या पायां न देखतां ॥४॥

५८३

नाहीं घडली कमाई तैसी । मागें जैसी संतांची ॥१॥

म्हणोनियां उपेक्षिलें । ऐसिये लोटिलें भवार्णवीं ॥२॥

जे काम कोधा ऐसे । कवळती भासे जलचर ॥३॥

निळा म्हणे काढील कोण । येथें धांवोन मज आतां ॥४॥

५८४

नेणसी अव्हेरु । तरि कां केला वो उशिरु ॥१॥

माझे विकळ झाले प्राण । वियोग न साहे दारुण ॥२॥

किती करुं शोक । तहान लागली भूक ॥३॥

निळा म्हणे वेगें । धांव घाली पांडुरंगें ॥४॥

५८५

पाचारितां धांवोनि यावें । ऐसें दयावें वरदान ॥१॥

मग मी तेणें राहेन सुखें । चिंतन मुखें करीं तुमचें ॥२॥

आळवील आवडी नामें । गाईन प्रेमें गुण गीर्ती ॥३॥

निळा म्हणे उदारपणें । करा हो देणें कृपेचें ॥४॥

५८६

पोटींचेंचि परि नेणतें बाळ । नेणें काळ वेळ मागतां ॥१॥

आळी त्याची देखानियां । पुरविती थाया मायबापें ॥२॥

जरी उदंड आहेतीं पोरें । तरी ते थोरे जाणतींचि ॥३॥

निळा म्हणे मी निपटणें वेडें । बोलणें बोबडें कानीं घ्यावें ॥४॥

५८७

पांडुरंगे पांडुरंगे । वेगीं येंई माझे गंगे ॥१॥

तुजवांचूनि मजला । कोण सांभाळी दयाळा ॥२॥

तूंचि आमुचा आधार । धांवूनि येंई बा सत्वर ॥३॥

निळा म्हणे पांढुरंगा । घेंई बाळा तूं वोसंगा ॥४॥

५८८

ब्रम्हादिकां न लभे तुमचें दर्शन । तेथें काय दीन अनाथ मी ॥१॥

रुसोनी इच्छितों भेटीचें गौरव । भक्तहीन भाव अपुरता ॥२॥

काजवे पाचारी जेंवि दिनकरा । निज परंपरा नाठवुनी ॥३॥

निळा म्हणे तैसे अपराध हे माझे । न धरावे श्रीराजें मनावरीं ॥४॥

५८९

भक्तप्रिये ये वो आई । विठाबाई कृपाळे ॥१॥

न साहे वियोग प्राण फुटे । उदास वाटे तुजविण ॥२॥

कोणा जीवनभोजन मागों । कोणा सांगों जडभारी ॥३॥

निळा म्हणे धांवोनि यावें । मज हें दयावें जीवदान ॥४॥

५९०

भोळा भाव माझा । जाणा तुम्ही गरुडध्वजा ॥१॥

काय जाणे वेद नीती । योगकळा आत्मस्थिती ॥२॥

करितो कीर्तन । नामीं तुमचें अनुसंधान ॥३॥

निळा म्हणे कराल कृपा । म्हणेनियां वैकुंठभूपा ॥४॥

५९१

भोगायतन शरीर माझें । व्यर्थचि ओझें वागविलें ॥१॥

सार्थक होय याचें तैसें । कराचि सौरसें आपुलिया ॥२॥

करुनियां कृपादान । सांभाळा दीन अनाथा ॥३॥

निळा म्हणे चरणीं ठेवा । स्मरणीं देवा नामाचे ॥४॥

५९२

माझी पूजा हेंचि अर्चन । तुमचें नामसंकीर्तन । नेणें करुं वेदाध्ययन । नेणें आसन योगाचें ॥१॥

म्हणोनि येतों काकुलती । अत्यंत मूढ आहे माझी मती । नेणें करुं तुमची स्तुती । अहो जगत्पती पुराणपुरुषा ॥२॥

कैसें होईल तें मी नेणें । भूत भविष्य वर्तमानें । अल्पबुध्दी माझें जिणें । मूढपणें वर्तणूक ॥३॥

यालागीं तुमचें धरिलें नाम । तुमचे स्तवनीं ठेविलें प्रेम । न कळे आणिक न चले नेम । साधन दुर्गम मज वाटे ॥४॥

नेणें तीर्था पलाटण । नेणें मंत्राचें पुरश्चरण । नेणें योगयाग सांख्यज्ञान । नेणें करुं ध्यान तुमची पूजा ॥५॥

नेणें कैसी माझी करुणा । येईल तुम्हां नारायणा । नेणें वर्णू तुमच्या गुणा । नेणें धारणा व्रतनिष्ठा ॥६॥

नाहीं वाचासंस्कार । नाहीं घोकिलें जी अक्षर । नेणें करुं यज्ञाचार । स्वधर्म तोहि विधियुक्त ॥७॥

निळा म्हणे सर्वांपरी । आहें मूर्ख मी श्रीहरी । ताराल ऐसिया नवल तरी । तुमची थोरी प्रगटेल ॥८॥

५९३

माझीया मना समाधान । दयावें वचन अभयाचें ॥१॥

निर्भय तेणें राहेन सुखें । हरिनाम मुखें आळवित ॥२॥

नलगे महिमा मान प्रतिष्ठा । न म्हणे वैकुंठा मज न्या हो ॥३॥

निळा म्हणे आपुल्या पायीं ॥ ठेवाल ठायीं राहेन ते ॥४॥

५९४

माझिया भावाचें खंडण । नव्हे ऐसें करा दान । मुखी नाम तुमचें स्‍मरण । राहो चरणावरीं दृष्टी ॥१॥

आणखी मी न मागें कांहीं । वसो प्रेम तुमच्या ठायीं । करुनि कृपा आठव देई । आवडी कीर्तनीं सर्वदां ॥२॥

सुखें भोगीन प्रारब्धठेवा । येईल तैसा वोढवोनि देवा । मानामान न करीं हेवा । विसर न पडावा तुमचाची ॥३॥

काय करतील निंदक जन । आसना ठायीं सावधान । तुमचें करितां नित्य चिंतन । कैंचें बंधन आम्हां दासां ॥४॥

गाईन गुण तुमचे गीतीं । विषय-वासना-दिकां शांती । तुमच्या पायीं जडतां प्रीती । निळा विनंति करी ऐसी ॥५॥

५९५

माझे बोल नव्हती फोल । जाणें विठ्ठल  अंतरींचे ॥१॥

पुरवील तोचि मनींचा हेत । येईल धांवत करुणाब्धी ॥२॥

वागवितो दया पोटीं । आम्हांसाठी कृपाळु ॥३॥

निळा म्हणे भरंवसेनि । नामें वदनीं आळवितां ॥४॥

५९६

माझे मस्तक तुझया पायीं । ऐसें करी गा विठाबाई ॥१॥

अहर्निशीं तुझें ध्यान । मुखें नामसंकीर्तन ॥२॥

ह्रदयीं वसावें येऊन । करीं माझें समाधान ॥३॥

निळा म्हणे हे वासना । माझी पुरवीं नारायणा ॥४॥

५९७

मी तों दीन नेणें रंक । परि तुम्ही चाळक ब्रम्हांडा ॥१॥

केले अपराध क्षमा करा । काय म्यां दातारा विनवावें ॥२॥

येवढेंचि आहे माझे हातीं । यावें काकुळती तुम्हांसी तें ॥३॥

निळा म्हणे उचिता जागा । आपुल्या हो श्रीरंगा पंढरीच्या ॥४॥

५९८

येउनी केव्हां भेटी दयाल । समोखाल मज आतां ॥१॥

वाट पाहे दिवसरातीं । नलगे चित्तीं अन्न गोड ॥२॥

धन मान गोत वित्त । न रुचे मात मज त्याची ॥३॥

निळा म्हणे जीवदान । दया मज भेटोन आतां ॥४॥

५९९

राहोनियां संत्संगतीं । गावी कीर्तीं तुमचीच ॥१॥

हेंचि देंई नलगे दुजें । अंतर माझें जाणोनी ॥२॥

धन मान नलगे देवा । अवघा ठेवा गुंडुनी ॥३॥

निळा म्हणे जगदाधीशा । हेचि आशा बहुकाळ ॥४॥

६००

वाचा नामसंकीर्तनीं । मानस तुमच्या निश्चयें ध्यानी । नेत्र हे तुमच्या अवलोकनीं । चालावें चरणीं तीर्थयात्रे ॥१॥

करीं करावें तुमचें पूजन । श्रवणीं करावें गुणांचे श्रवण । चित्तें सदां तुमचें चिंतन । घ्राणी अवघ्राण निर्माल्य तुळसी ॥२॥

बुध्दीसी तुमची बोधकता । जीवीं तुमचीं राहो आस्था । तुमचे चरणीं निश्चळ माथा । अखंडता अखंड ॥३॥

सकळ इंद्रियां तुमची प्राप्ती । भगव्दावना राहो भूतीं । व्देषाव्देष तो नुमटो चित्तीं । दयावें श्रीपतीं हें दान ॥४॥

कांमक्रोधाचें न व्हावें दर्शन । नका आशेतृष्णेचें बंधन । ठेवा आपुल्या पायीं जीवन । दयावें समाधान सर्वदा मना ॥५॥

कीर्तन नित्यकाळ देवा तुझें । उतरीं मी हें माझें ओझें । आपुल्या गुणीं नाचवी भोजें । जिव्हा नामीं रंगों दया ॥६॥

निळा म्हणे कृपानिधी । माझी मोडावी व्दैतबुध्दि । अवघी तोडुनिया उपाधी । स्थापा निजपदीं शरणांगता ॥७॥

६०१

विश्वास अंतरींचा जाणोनी । नाम ठेवा माझया वदनीं । रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥

रुप मनाचे आसनीं । कृपा करुनी बैसवा ॥१॥ करीन तैसी घ्यावी सेवा । विश्वास पालटों न दयावा ॥ आईका विनविलें तें देवा । अहो पंढरीनिवासा ॥२॥

माझिये बुध्दीसी धैर्य दयावें । सेवेसी इंद्रियां राबवावें ॥ आपुलिये कीर्तनीं राखावें । प्रेम माझें सर्वदा ॥३॥

गर्व अभिमान दवडावा । आळस निद्रा परती ठेवा । विसर तुमचा न पडे देवा । देई सेवा हें दान ॥४॥

निळा म्हणे कृपासिंधु । तुम्ही साचार दीनबंधु । आहा म्हणोनि घेतला छंदु । येवढें आर्त पुरवावें ॥५॥

६०२

विश्वास माझा जतन करा । विश्वंभरा पायापें ॥१॥

मग मी तुम्हां न वजे दुरी । ठेवीन वरी जीवभाव ॥२॥

आळवीन उत्तम नामें । तुमचीच प्रेमें सन्मुख ॥३॥

निळा म्हणे कूर्मदृष्टी । करा वृष्टी अमृतें ॥४॥

६०३

वियोगाच्या दु:खें । आळवितो करुणा मुखें ॥१॥

कृपावंते माझे आई । धांव घालीं वो विठाई ॥२॥

देऊनियां भेटी । आतां अवलोकावें दिठी ॥३॥

निळा म्हणे प्रेमपान्हा । पाजी लावूनियां स्तना ॥४॥

६०४

सर्वकाळ चित्त ठायीं । राहों पायीं तुमचिये ॥१॥

ऐसे करा कृपादान । कर जोडून विनवितों ॥२॥

सर्वकाळ ध्यानीं मनीं । न पडो चिंतनी विसर ॥३॥

निळा म्हणे पंढरीराजा । करा हो अंगीकार माझा ॥४॥

६०५

सर्वगुणीं गुणमंडिता । सर्वरुपीं रुपशोभिता । सर्वी सर्व तूं अनंता । यश वागवितां निज कीर्ति ॥१॥

ऐसी असोनियां शक्ति । दवडतां कां माझी आतीं । चरण पहावया चित्तीं । वर्ते चिंता अनिवार ॥२॥

काय नाहीं तुमच्या हातीं । सकळ ब्रम्हांडाच्या व्यक्ती । घडामोडा निमिषाप्रती । धरा आवडतीं रुपें तैसीं ॥३॥

मासा कांसव डुकर होणें । नृसिंह वामन रुप ठेगणें । ब्रम्हचर्य आणि फरश धरणें । वंशनिपातनें क्षत्रियांचा ॥४॥

परमात्मा आणि राज्य करी । एकपत्नीव्रत शिळा तारी । सत्यवचनी एक बाणधरी । रावणारी मदनमूर्ति ॥५॥

नंदानंदन गुणातीत । लीलाविग्रही ऐश्वर्यनाथ । कामिनी भोगुनी कामातीत । उच्छिष्टें स्वीकारीत गौळियांचीं ॥६॥

बौध्य कलंकिया =ह्यग्रीवा । नामें रुपें नटलेति देवा । निळा म्हणे माझिया भावा । रुप भेटवा चतुर्भुज ॥७॥

६०६

सत्य आणि मिथ्या जाणा अंतरींचे । तुम्ही सकळांचे सर्वजाणा ॥१॥

म्हणऊनियां करा अनाथचा धांवा । उठाउठीं देवा पाचारितां ॥२॥

न चले झांकिलें तुम्हांपुढे कांहीं । असा अंतर्बाहीं व्यापूनियां ॥३॥

जिवीं एक दावी बोलोनि आणीक । तरि मज सकळिक दुषिति संत ॥४॥

निळा म्हणे माझें सबाह्य अंतर । तुम्ही निरंतर जाणतसां ॥५॥

६०७

सांगावें उगउनी न कळे तयासी । तुम्ही तो मानसीं साक्ष माझें ॥१॥

विश्वाचे व्यापक चाळक चित्ताचें । साक्षी अंतरींचें जेथें तेथें ॥२॥

ब्रम्हादिक देव तेहि आज्ञाधार । तुमचे किंकर काळ काम ॥३॥

निळा म्हणे माझा करा अंगिकार । हेंचि निरंतर विनवितसे ॥४॥

६०८

सेल दिली मागा ऐसी । जें जें तुम्हांसी आवडे ॥१॥

तरी दयाहो आपुलें नाम । अखंडित प्रेम नैसर्गिक ॥२॥

सर्वकाळ राहो चित्तीं । सगुण मूर्ति तुमची हे ॥३॥

निळा म्हणे नित्य नवी । कीर्तनीं दयावी निज आवडी ॥४॥

६०९

सोरत आलों तुमच्या नामें । पुरें ग्रामें ठाकित ॥१॥

आंतां चरण दावा दिठी । घाला कंठी निर्माल्य ॥२॥

उसंतितां रानें वनें । पुरलें पेणें येथवरीं ॥३॥

निळा म्हणे आलिंगन । दया हो घालून कर कंठीं ॥४॥

६१०

पाळोनिया लळे । बहुतें वाढविलीं बाळें ॥१॥

मजचि कां वो मोकलिलें । विउनी उदासचि टाकिलें ॥२॥

नाहीं दिलें स्तनपान । नेणें खाऊं जेऊं अन्न ॥३॥

निळा म्हणे दुजें कोण । करील सांगा प्रतिपाळण ॥४॥

६११

हेचि चिंता दिवस रातीं । राहिली चितीं न ढळे ते ॥१॥

कराल माझा अंगीकार । किंवा दूर भोवंडाल ॥२॥

बहुत जन्म घेतां कष्टी । झालों हिंपुटी दु:ख शोकें ॥३॥

निळा म्हणे यावरी आतां । राख अनंता चरणापें ॥४॥

६१२

तुमच्या पायीं माझें हित । होईल निश्चित हेंचि वाटें ॥१॥

आणखी कोणा शरण जाऊं । आहे उपाऊ तुम्हां हातीं ॥२॥

सहज कृपा अवलोकाल । तरी पाववाल निजठाया ॥३॥

निळा म्हणे संचित माझें । आड श्रीराजे न घालावें ॥४॥

६१३

तुम्ही देवा प्रत्यक्ष असा । परि मी कैसा ओळखों ॥१॥

जेव्हां प्रगटोनि भेटी दयाल । तेव्हांचि फावाल सुरवाडें ॥२॥

निर्धना निक्षेप असोनि धन । जेंवि तें न देखोन दैन्य भाकी ॥३॥

निळा म्हणे झाली परी । तैसीच मज हरि नेणतां ॥४॥

६१४

तूंचि पंढरीनाथ । संचर तत्वतां हदयांत ॥१॥

ऐसा प्रताप आणिका आंगीं । नाहीं ये युगीं विवरितां ॥२॥

संगती अन्यत्र देवते भुतें । अशालोलिंगते ते काये ॥३॥

निळा म्हणे जन्ममरणा । करी निवारणा एक हरी ॥४॥

६१५

तुमचे पायीं आमुचें निज । नाहीं काज लौकिकीं ॥१॥

रिध्दिसिध्दी फुकासाठीं । नेघों गोठी नाईकों त्या ॥२॥

लेववा भक्तिचीं लक्षणें । तींहि भूषणें आवडती ॥३॥

निळा म्हणे कृपानिधी । फेडा आधि हे माझी ॥४॥

६१६

त्रिभुवनपति अहो देवा । दीनबांधवा विठोजी ॥१॥

भावा माझया दया जी थार । आपुल्या निरंतर चरणापें ॥२॥

तेणें सार्थक होईल काळ । सुमंगळ देह माझा ॥३॥

निळा म्हणे सुफळ जिणें । होईल स्मरणें नामाचिया ॥४॥

६१७

दीन मी अनाथ तुमचें रंक । मागतों भीक मज दयावी ॥१॥

नेऊनि घाला पायांवरी । निरवा श्रीहरी कृपाघना ॥२॥

नुपेक्षावें शरणांगतां । जरी मी नेणता दास तुमचा ॥३॥

निळा म्हणे अवघे संत । मिळोनि स्वहित करा माझें ॥४॥

६१८

दोहीं डोळां घालुनी वाती । पाहे वाट दिवसरातीं ॥१॥

केव्हां येशील बा धांवोनी । प्रेमपान्हा पाजिसी स्तनीं ॥२॥

पांचहि प्राण ठेविले कंठीं । तुजचि भेटावयासाठीं ॥३॥

निळा म्हणे माझी आई । न धरी निष्ठुर वा विठाबाई ॥४॥

६१९

आम्ही नेणतीं नेणतीं । सुजाण तुम्ही कमळापती ॥१॥

अवघे अंतरीचें जाणा । सर्वसाक्षी तूं देखणा ॥२॥

माझें करितां समाधान । लाभ कोणी होईल मान ॥३॥

कांहे बोलियेला निळा । तुम्हीं जाणतां कळवळा ॥४॥

६२०

आम्हीं न मागों ऐसा कधीं । कृपानिधी वर दयाल ॥१॥

आपुल्या पायीं वसवा चित्त । माझें अखंडित दुजें न मार्गो ॥२॥

युर्गे जातां कल्प कोडी । न करुं जोडी आणिक ॥३॥

निळा म्हणे राहो ध्यानीं । तुमचें मनीं रुपडें ॥४॥

६२१

आम्ही नेणों भाव कैसा भक्तिरस । म्हणवूं तुमचे दास एक्या गुणें ॥१॥

मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । मुखें गाऊं नाम पवाडे श्रीहरी । उभे महाव्दारीं ठाकोनिया ॥२॥

नेणों ज्ञान ध्यानमंत्र योगकळा । आसन मुद्रा डोळा लक्ष कैसें ॥३॥

तत्व संख्या नेणो नित्यानित्यज्ञान । आठऊं चरण सकुमार ते ॥४॥

निळा म्हणे अगा रुक्मादेविवरा । आतां उचित करा आपुलें तें ॥५॥

६२२

गोपीवल्लभा कमलाकान्ता । अनाथनाथा श्रीविठठला ॥१॥

तुमचा दास झालों आतां । करा जी सरता पायापें ॥२॥

गाऊनियां नामावळी । नाचेन टाळी वाजवित ॥३॥

निळा म्हणे घ्याल सेवा । पात्र दैवा तैं झालों ॥४॥

६२३

गोपाळपुरनिवासिया । अगा ठाकलिया विटेवरीं ॥१॥

पदयनाभा शेषशयना । अगा ये सूदना दैत्यकुळा ॥२॥

चतुर्दशभुवना व्यापका देवा । माझिया भक्तिभावा चित्त दयावें ॥३॥

निळा म्हणे अपरिमिता । अगा ये अनंता महदादी ॥४॥

६२४

एकदां तरी दाखवा डोळां । तोचि वेळोवेळां आठवीन ॥१॥

सवरुप तुमचें पुरुषोत्तमा । अहो मनोरमा विश्वाचिया ॥२॥

मग ती तुम्हां न करीं पीडा । संदेह येवढा निवारिल्या ॥३॥

निळा म्हणे अंतर जाणा । यदर्थी कृपणा नये होऊं ॥४॥

६२५

एकदां तरी देखिल्याविण । कैसेनि मी कोण ओळखें ॥१॥

अमृताचि ऐकिल्या गोडी । रसने ते फुडी केंवि लाभे ॥२॥

क्षीराब्धी हे शेषश्यन । जगीं न देखोन अनोळखा ॥३॥

निळा म्हणे त्यापरि देवा । नये स्वानुभवा काय करुं ॥४॥

६२६

एक देशी आम्ही एकट एकले । आशेचे बांधले जन्मोजन्मीं ॥१॥

म्हणउनी इच्छुं तुमचा आश्रय । पाहविसे पाय वाटताती ॥२॥

बहुकाळवरी वियोगें पीडलों । जराव्याधी केलों कासाविस ॥३॥

निळा म्हणे न या सोडवणें हरि । तरि मज संसारी हेंचि भवे ॥४॥

६२७

कराल सांभाळ तरी ते तुमची कीर्ति । मी तों बाळमति नेणें दुजें ॥१॥

बैसलों विश्वासें आळवित नांवा । तुमच्या दयार्णवा निरंतर ॥२॥

नुपेक्षाल मज हा वाटे भरंवसा । आहे कीर्तिठसा तुमचा जगीं ॥३॥

निळा म्हणे नेणें दुजी परी आतां । येईल तें चित्ता सुखें करा ॥४॥

६२८

कराल तरी कृपा देवा । हात ठेवा मस्तकीं ॥१॥

मग मी राहेन निश्चितें । तुमच्या दानें वरदाच्या ॥२॥

धरुनियां राहेन कंठी । नामें पोटीं उच्चार ॥३॥

निळा म्हणे ऐसा हेत । उत्कांठित मानसीं ॥४॥

६२९

काय नेणों आचरण केलें । जया आलिंगिलें हदयेंसी ॥१॥

हें तों न कळे माझिये मती । याचिलागीं चित्ती व्याकुळ ॥२॥

कोण्या भजनें पसन्न व्हाल । आपुला म्हणवाल शरणागत ॥३॥

निळा म्हणे दिवाभीता । जेंवि कां सविता उबगला ॥४॥

६३०

कीर्ति ऐकोनि आलों दारा । माझा करा सांभाळ ॥१॥

जतन करीन तुमचें नाम । धरुनी प्रेम निज कंठी ॥२॥

भाव माझा वोलेसी ठेवा । घ्या हो सेवा दिननिशीं ॥३॥

निळा म्हणे संकल्पेसी । पायांपासीं कंठीन ॥४॥

६३१

केव्हां भेटी देसी जिवाच्या जीवना । सुखाच्या निधाना पांडुरंगा ॥१॥

वोरसलें मन नित्य वाट पाहे । नयनीं नीज नये दिवसरात्रीं ॥२॥

आला जातो दिवस मास घटिका पळ ।  प्राण हा विव्हळ तुजलागीं ॥३॥

हुरहुरी चित्त सदा उत्कंठित । न पुरोचि हा हेत चितां वाटे ॥४॥

केव्हा येईल सार्थकाची वेळ । येसी कृपाळ धांवोनियां ॥५॥

निळा म्हणे आतां न लावावा उशीर । भेटोनी अंतर निववारें ॥६॥

६३२

कोठें विगुंतली । नेणों कोणें गोंवियेली ॥१॥

माझी न करीं आठवण । गेली बाळका विसरोन ॥२॥

न लावावा उशीर । नेणों कां झाली निष्ठुर ॥३॥

निळा म्हणे काय माझें । भार मानियलें ओझें ॥४॥

६३३

कृपावंता दया मोठी । आदर पोटी दासाचा ॥१॥

म्हणोनियां सांभाळ करा । नेदा अविचारा आतळों ॥२॥

आपुलीये सेवेवीण । न ठेवा क्षण पळ एक ॥३॥

निळा म्हणे प्रेमरसें । जेववा सरिसें सांगातें ॥४॥

६३४

कृपा करुनि माझी मती । वाढती केली तुम्हीं प्रीति ॥१॥

तरी पाववा जी पार । केलिये कथेचा विस्तार ॥२॥

वदवावी वैखरी । देहा अवसान तोंवरी ॥३॥

निळा म्हणे न सांडावा । अभिमान आपुला जी देवा ॥४॥

६३५

गाईन कीर्तनीं गुण नाम पवाडे । तुमचे तुम्हां पुढे आवडीनें ॥१॥

भावा ऐसे माझया व्हा जी पांडुरंगा । मग मी आलें भागा करीन तें ॥२॥

नाचेन सन्मुख चराणावरी दृष्टी । धरुनि प्रेम पोटीं आळवीन ॥३॥

निळा म्हणे तुम्हीं चरित्रे अपार । केलीं ते प्रकार आठविन ॥४॥

६३६

करुं येईल अंगिकार । तरी करा फार काय बोलों ॥१॥

नाहीं घोंकिलें ऐकिलें कांहीं । सेवा घडली नाहीं वैष्णवांची ॥२॥

स्वधर्म विधी न कळें आचार । कैसा तो प्रकार साधनाचा ॥३॥

निळा म्हणें आहें मूढ दगड । ठायींचीच जड बुध्दी माझी ॥४॥

६३७

कळासूत्रीं तुम्ही नाटका नटक । देव ब्रम्हादिक आज्ञाधार ॥१॥

न सांगतां कळे सर्व अंतरींचें । सकळही जीवाचें मनोगत ॥२॥

माझेविशीं कां हा मांडिला आळस । भेटीचा वोरस वांयां धाडा ॥३॥

जिवित्वाची ऐशी मांडिली फरारी । झालें भूमीवरीं भार वृथा ॥४॥

श्रलाघ्यची न वाटे जिणें झालें ओस । धरिलें उदास तुम्ही देवा ॥५॥

निळा म्हणे धीर नुपजेची आतां । तुम्हीं तो अनंता मोकलिलें ॥६॥

६३८

पांडुरंगा दयाघना । गुणनिधाना सुखसिंधु ॥१॥

भाव माझा जाणोनियां ठेवा जी पायां जवळिकें ॥२॥

भक्तवत्सल मनमोहना । राजीवनयना निजात्मया ॥३॥

निळा म्हणे करुणाकरा । विश्वंभरा विश्वजनित्या ॥४॥

६३९

पहावीं पाउलें नयनीं हेंचि आर्त । देखिलिया चित्त्‍ा समाधान ॥१॥

क्षणभंगुर हा येथींचा पसारा । याचिलागीं करा त्वरा आतां ॥२॥

पाहोनि श्रीमुख धरीन ह्रदयीं । मग हो भलतें कांही देहा प्राणा ॥३॥

आल्याचें सार्थक हेंचि नरदेहा । नाहीं तरि हाहाभूत सर्व ॥४॥

म्हणोनि लवलाहो करितों याचिसाठीं । तुमच्या व्हावी भेटी पायापाशीं ॥५॥

निळा म्हणे आतां विलंब न करावा । येऊनियां देवा सांगावे ॥६॥

६४०

हा तों तुमचा सहज गुण । करावें पाळण दासाचें ॥१॥

नेणपणें म्यां विनविलें । पाहिजे क्षमा केलें तें ॥२॥

धीर नाहीं माझे मनीं । केली हमणोनि विज्ञान ॥३॥

निळा म्हणे रमावरा । क्षमा करीं  अपराध ॥४॥

६४१

तुम्हांवीण कोणा सत्ता । आहे अनंता यदर्थी ॥१॥

जन्ममरणा हरुनियां । करी निज छाया कृपेची ॥२॥

कोण ऐसा आहे त्राता । भयभवहर्ता तुजवीण ॥३॥

निळा म्हणे म्हणोनि आलों । तुमचा झालों शरणागत ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | देवाची स्तुतिकरुणापर अभंग व देवापाशीं मागणें ।

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *