संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

संत निळोबाराय (आपल्या स्थितीसंबंधानें देवाशीं उद्गार)

संत निळोबाराय (आपल्या स्थितीसंबंधानें देवाशीं उद्गार)

६४२

आवडोन रुप मनीं । धरिलें वदनीं हरिनाम ॥१॥

न लगे आणिक कांही चिंता । गोडचि आतां यावरी ॥२॥

काय करुं ते आसनमुद्रा । कृपासमुद्रा तुजविण ॥३॥

निळा म्हणे दिधलें संती । नाम एकंतीं तेंचि गोड ॥४॥

६४३

आबध्द वाचा मतिहीन । बुध्दी मळीण विषय लोभें ॥१॥

परि तुम्ही कृपावंत । कां हें वदवितां मी नेणें ॥२॥

न कळे अर्थप्रमेय तंतु । हेतु मातु दृष्टांतही ॥३॥

निळा म्हणे पुरुषोत्तमा । जाण महिमा तुमचा तुम्ही ॥४॥

६४४

आहे आरुप बोलणें । नव्हे नाणें टांकसाळी ॥१॥

नका घेऊं खयासाठीं । येईल तुटी एखादी ॥२॥

आहतां ठसा कळे वरी । अभ्यंतरीं गैरसाळ ॥३॥

निळा म्हणे निवडुनी ठेवा । आतां देवा एकीकडे ॥४॥

६४५

आंधळिया उगवोनी रवी । न दिसेचि तेंवि मज झालें ॥१॥

तेंवी तुम्ही स्वत:सिध्द हरी । परि मी माझारी भ्रांतीतमा ॥२॥

रोग्यारसने कैंची गोडी । जे ते निवडी रसस्वाद ॥३॥

निळा म्हणे वेडिया गोत । नाढळे धन वित्त दरिद्रिया ॥४॥

६४६

इतर साधनीं उपाव । करिती ते ते आम्हां देव ॥१॥

काय जाणितलें तिहीं । पडिले साधनांचे वाहीं ॥२॥

कोण लाभ कैसी गती । काय पावती ते अंतीं ॥३॥

निळा म्हणे नेणों आम्ही । तुमच्या नामेंविण स्वामी ॥४॥

६४७

उगाचि वदवितां कां गा । वाचा माझी पांडुरंगा ॥१॥

कोणा न रुचे ऐकतां । हांसों लागती तत्वतां ॥२॥

म्हणती रचिलें हें पाखांड । सैरा वाजविलें तोंड ॥३॥

निळा म्हणे आतां ठेवा । दिला दयोकार तो हा देवा ॥४॥

६४८

उदंडाचें धांवणे केलें । तुम्हीं तें ऐकिलें पुराणीं ॥१॥

म्हणोनियां विश्वास झाला । संतींही सांगितला बहुतांपरि ॥२॥

माझेंहि मज हिताचि वाटे । करितां गोमटें कीर्तन ॥३॥

निळा म्हणे न सोडीं पाय । होईल काय हो तें सुखें ॥४॥

६४९

एकचि अक्षर वाचेसि येतां । पुढें वाढवितां विस्तारें ॥१॥

कां हे चेष्टविली वाणी । माझी चक्रपाणी मी नेणें ॥२॥

आईता जोडूनियां रस । लावितां सारांश निवडुनी ॥३॥

निळा म्हणे आतां तर जाणा । तुम्ही सुजाणा कृपाब्धी ॥४॥

६५०

एवढासा माझा भाव तो कायी । तेवढाचि तुमचिये ठेविला पायीं ॥१॥

परी तुमचें अगाध देणें । जाणवलें यावरी उदारपणें ॥२॥

एवढिसी माझी मति ते किती । तेवढीचि वाढवुनि केली सरती ॥३॥

एवढेंसे तुम्हां गाइंलें जी देवा । तेवढेंचि स्वीकारुनी तोषलेति भावा ॥४॥

एवढीशी माझी वाचा ते किती । तेवढीचि आपुलिये लाविली स्तुति ॥५॥

एवढासा निळा एवढीसी भक्ती । अपारचि तुम्ही मानिली प्रीती ॥६॥

६५१

ऐशा परि नमन माझें पंढरीनाथा । तूंचि होऊनि तुजमाजि झालों मी सरता ॥१॥

नये कळों कांहीं आतां एकानेक भाव । तुज माजीं मीहीं मजमाजि तूं सर्व ॥२॥

नाम रुप तूंचि माझे क्रिया कर्तव्य । कायिक वाचिक मानसिक जे निपजती भाव ॥३॥

निळा म्हणे मी तूं उपाधी सारुनियां परती । राहों जैसे होतों तैसे निजरुप एकांतीं ॥४॥

६५२

ऐसा निळा नित्यानंदी निमग्न केला । देऊनियां नामस्मरण चरणीं स्थापिला ॥१॥

तेणें ब्रम्हानंदे गर्जे नाम वैखरी । आठवूनि रुप तुमचें हदयमंदिरीं ॥२॥

नेणें आपपर नेणे जन विजन । नेणोनियां कांहीचि नुरवी देहाचें भान ॥३॥

निळा म्हणे हाचि माझा ऐश्वर्य भोग । काया वाचा मानस अवघा पांडुरंग ॥४॥

६५३

ऐसिया बेगडी नका गोवूं आम्हांसी । अनुसरलों सेवेसी तुमचे नामचिंतनी ॥१॥

नाना मतांतरें त्यांचे अर्थ विपरीत । नेऊनियां घालित मुखीं काळाचे सर्व ॥२॥

नाना तर्कवाद भेदबुध्दी जल्पन । कैंचें समाधान तेथें दर्शन तुमचें ॥३॥

निळा म्हणे देखोनी ऐसें वाटतसे भय । न सोडूं ते पाय तुमचे सांपडले विटे ॥४॥

काय करुं तैसें ज्ञान । जेणें अभिमान खवळे तें ॥५॥

राहो भाव तुझया चरणीं । गर्जो वाणी अहंकार वाढे । न लगे वेडें वैराग्य तें ॥६॥

६५४

ऐसिये सांपडलों संदीं । सर्वदा व्दंव्दीं काळाचे ॥१॥

कैसी सुटका होईल आतां । न लक्षेचि सत्ता कर्मगती ॥२॥

नैष्कर्म्य ऐसें भासे । परि तें नेतुसे सकामीं ॥३॥

निळा म्हणे देखोनि भ्यालों । म्हणोनि आलों शरण तुम्हां ॥४॥

६५५

करीन कैवाड हाचि अनुदिनीं । तुमच्या चिंतनीं पांडुरंगा ॥१॥

नेदीं जाऊं  वांयां घटिका एकी पळ । करुं सर्वकाळ हेचि चर्चा ॥२॥

संतसमागमें गाऊं नित्य नामें । आपुलिया प्रेमें आवडिच्या ॥३॥

आठवूं सुंदरु रुप मनोहर । कटावरी कर ठेविले ते ॥४॥

निळा म्हणे माझी मनींची आवडी । दाविली उघडी करुनियां ॥५॥

६५६

कवण्या योगें तल्लिनता । ऐशी जडोनी ठेली चित्ता ॥१॥

हें मी नेणें गा श्रीपती । तुमची करणी तुम्हां हातीं ॥२॥

बुध्दि इंद्रियांचे कोड । पुरवुनी वाचा केली वाड ॥३॥

निळा म्हणे दिवसरतीं ।  कळे केव्हां जाती येती ॥४॥

६५७

कवळूनियां कृपामोहें । माझे संदेह निरसिले ॥१॥

लांचाविली माझी वाणी । आपल्या गुणीं वळुनियां ॥२॥

नाचों शिकवितां पुढें । धरुनियां कोडें करकमळीं ॥३॥

निळा म्हणे माझीं गात्रें । तुम्हीं सूत्रें चेष्टविलीं ॥४॥

६५८

काय द्याल तुम्हीं देवा । घ्यावी सेवा आमुचीच ॥१॥

पूवीपासूनि करीत आलों । कळासलों अभ्यासें ॥२॥

दयाल तें तें अवघें मिथ्या । आम्ही सत्या न संडूं ॥३॥

निळा म्हणे जीवन आम्हां । पुरुषोत्तमा दास्यत्व ॥४॥

६५९

काय सांगों सुखानंद । झाला अंतरीं तो बोध ॥१॥

भजतां तुम्हांसी विठठला । मनीं प्रेमा ओसंडल ॥२॥

नाठवेची कांहीं आतां । ऐसा वेध झाला चित्तां ॥३॥

निळा म्हणे ऐशी परी । झाली नवलाचि वाटे हरी ॥४॥

६६०

कांहीं मानदंभासाठीं । नाहीं केली म्यां हे अटी ॥१॥

तुम्ही तों जाणतां अंतर । काय तेथें परिहार ॥२॥

लोकनिंदा वाटे बरी । आम्हां भूषण तें श्रीहरी ॥३॥

निळा म्हणे वहाती करा । वाट पुढें जगदोध्दारा ॥४॥

६६१

कांही चमत्कार देखती । विश्वासें तरी वाटे प्रीति ॥१॥

ऐसा विपरीत आहे भोळा । जाणा येथींचा जी गोपाळा ॥२॥

येहवीं कोणी फुकासाठीं । नाम नुच्चारिती ओठीं ॥३॥

निळा म्हणे नारायणा । म्हणोनि दाविली सूचना ॥४॥

६६२

कोटी जन्म घेईन देवा । करीन सेवा तुमचीच ॥१॥

भक्ति मुक्ति नका आड । घालूं सांकड मज वाटे ॥२॥

काय करुं ते आत्मस्थिति । खंडन करिती भजनाचे ॥३॥

निळा म्हणे राहो ठायीं । विश्वास पायीं तुमचिये ॥४॥

६६३

चित्त्‍ा ठेवूनि पायावरीं । रुप धरुनियां अंतरी ॥१॥

सुखें याच्या नामावळी । आठवीन नित्य काळीं ॥२॥

करीन ऐसाची कैवाड । शंका येऊं नेदी आड ॥३॥

निळा म्हणे दिवसरातीं । तुम्हां आठवीन श्रीपती ॥४॥

६६४

चुबकळूनि काढिलीं । अक्षरें घोळिलीं ब्रम्हरसें ॥१॥

ऐसे तुष्टलेती देवा । माझिया भावासारिखे ॥२॥

अर्थचातुर्य तें मी नेणें । तुमचें करणें तुम्ही जाणा ॥३॥

निळा म्हणे सर्वत्र साक्षी । यालागीं कैपक्षीं दीनाचें ॥४॥

६६५

जाणतसां जरी अंतरींचें । तरी कां हो वाचे वदवितां ॥१॥

केविलवाणे तुमचे दास । देखतां उपहास होतील ॥२॥

जग निंदय आधीं करा । मग तुम्ही धरा निज करीं ॥३॥

निळा म्हणे ऐशी रीत । नाहींचि शोभत संतांसीं ॥४॥

६६६

जाणों जातां तुम्हा जाणीवचि विरें । तुमच्या निजध्यासें मनचि मुरे । तुमचिये भेटीं अंगचि नुरे । वाचाहि वोसरे स्तवितां तुम्हां ॥१॥

ध्यानें तुमच्या जीवचि हारपे । तुम्हांसी जाणतां बुध्दीचि करपे । तुमच्या चिंतनें चित्तहि विसर्पें । मिसळें चिद्रुपें चैतन्येंसी ॥२॥

तुमच्या आठवें निळाची नाहीं । तुम्हीचि अवघे अंतर्बाहीं । तुम्हाविण दुसरें नुरेचि कांहीं । नाम रुप तेंहि आवघे तुम्ही ॥३॥

६६७

जाणोनियां मनोभाव । केला सर्व परिपूर्ण ॥१॥

ऐसेचि तुम्ही कृपासिंधु । दीनबंधु सर्वदां ॥२॥

करुनियां कृपादृष्टी । केली वृष्टी अमृतें ॥३॥

निळा म्हणे देउनी वर । मतिविस्तार वाढविला ॥४॥

६६८

जीवाचा ही जीव तूंचि प्राणांचा प्राण । नयनाचेहि नयन तूंचि घ्राणाचे घ्राण ॥१॥

सर्वही इंद्रियभाव तूंचि माझे श्रीहरी । तुजविण न दिसे पाहतां मज मी माझारी ॥२॥

चित्ताचेंहि चित्त तूंचि मनाचें मन । श्रवणाचेंहि श्रवण तूंचि रसनेची रसना ॥३॥

निळा म्हणे तूंचि माझा सर्वहि व्यापक । देहादेहीं शोधूनि पाहतां न दिसे आणिक ॥४॥

६६९

अनुसरलों जिवें भावें । नेणों आपुलें पावें ॥१॥

तुम्हांविण पंढरीनाथा । नाठवे कांहींच सर्वथा ॥२॥

चित्तें मनें काया वाचा । जिवीं संकल्प हा तुमचा ॥३॥

निळा म्हणे दिवस रातीं । नाहीं विसराची भ्रांती ॥४॥

६७०

अमृताहुनि गोड हरी । नाम उच्चारितां वैखरी ॥१॥

घेतां न विटेचि हे रसना । अधिक् अधिक् आवडी मना ॥२॥

चित्तासि विश्रांति । इंद्रियें सुखावलीं ठाती ॥३॥

निळा म्हणे गोडागोड । सेवितां सरे अवघी चाड ॥४॥

६७१

अवघा काळ हेंचि ध्यान । तुमच्या चिंतन नामाचें ॥१॥

करुं देवा हे सूदना । ठेवुनी चरणांवरी दृष्टी ॥२॥

गुणचरित्रें श्रवण करुं । अर्थ विवरुं मानसीं ते ॥३॥

निळा म्हणे अवघा धंदा । कीर्तन गोविंदा तुमचें तें ॥४॥

६७२

आणखी उपाय । सांडीयले ते अपाय ॥१॥

तुमच्या नामाविण हरी । नेणों दुजी कांहीं परी ॥२॥

सांगती साधनें । परी तीं वाटतीं बंधनें ॥३॥

निळा म्हणे देवा । जैसी तैसी घ्या हो सेवा ॥४॥

६७३

आतां माझिया भक्तिभावा । पालटा देवा नेदावा ॥१॥

मग मी नाचेन कीर्तनमेळीं । नामावळी आळवित ॥२॥

ओवाळूनि सांडीन काया । वरुनि पायां जीवप्राण ॥३॥

निळा म्हणे वाढतां प्रेमा । पुरुषोत्तमा करावा ॥४॥

६७४

आठवितांचि रुप मनीं । जाय कल्पना विरोनी ॥१॥

आतां तूंचि तूं आवघा । मी हें नुरे माझिया भावा ॥२॥

बुदबुद आपुला उगम पाहे । तंव सिंधूचि होऊनि राहे ॥३॥

निळा म्हणे बोलवा बोली । बोला तुम्ही ते आपुंली ॥४॥

६७५

जीवें भावें जोडिलें होतें । पूर्व फळा तें आजी आलें ॥१॥

अंगीकार तुम्ही केला । मुखींचा दिधला प्रसाद ॥२॥

अभयदानें सुखी केलें । दाविलीं पाउलें सतेज ॥३॥

निळा म्हणे चरणीं थारा । दिधला किंकरा अनाथ ॥४॥

६७६

जें जें बोलवितां बोल । अर्थ सखोल त्यांमाजीं ॥१॥

आवडीं ऐसें आपुलें देवा । वदवा रंजवा आपणिया ॥२॥

सारुनियां लौकिक लाज । नाचवा भोज कवतुकें ॥३॥

निळा म्हणे कृपातरणी । प्रकाशवाणी करुनियां ॥४॥

६७७

जेववाल तेंचि जेवीन मुखें । पांघरवाल सुखें पाघरेन ॥१॥

बैसवाल तेथे बैसेन उगा । निजवाल जागा न सोडीं तो ॥२॥

जैसें कराल मी होईन तैसा । न करुनियां आशा आणिकांची ॥३॥

निळा म्हणे जें कराल तें तें । होईन आज्ञेतें नुलंघीं ॥४॥

६७८

ठेवा पायांपाशी । राहेन मी सावकाशी ॥१॥

करुनियां तुमचें ध्यान । मुखीं नामाचें चिंतन ॥२॥

नेदीं कांही आड येऊं । आशा कल्पनेचा भेऊं ॥३॥

निळा म्हणे तुमची करुं । सेवा चरण ह्रदयीं धरुं ॥४॥

६७९

ठेवाल तेथें राहेन सुखें । यावरी हरिखें आपुलिया ॥१॥

न वंची मी हे सेवेसी काया । धाडाल ठायां जाईन त्या ॥२॥

दयाल ग्रास तो घालिन मुखीं । न करीं आणखी सोस कांही ॥३॥

निळा म्हणे कराल आज्ञा । न मोडीं प्राज्ञा तुमची ते ॥४॥

६८०

दुरी ठेलीं कर्माकर्मे । तुमच्‍या धर्मे विठोबा ॥१॥

आळवितां मुखीं नाम । सकळही काम परिपूर्ण ॥२॥

होतें संचित जोडलें कांहीं । ठेविलें पायीं तुमचे तें ॥३॥

निळा म्हणे माझें मज । वाटे गुज आतुडलें ॥४॥

६८१

न सांडाल तुम्ही आपल्या विहिता । परी  मी करितों चिंता मूर्खपणें ॥१॥

रवि केवीं सांडीं आपला प्रकाश । अमृता मिठांश जीवविता ॥२॥

परी मी अधीर न धरितां धीर । करीं करकर रुसोनियां ॥३॥

निळा म्हणे झाले अपराध ते क्षमा । करा पुरुषोत्तमा विनवूं काय ॥४॥

६८२

नाम वाचे आठविलें । रुप मनीं सांठविलें ॥१॥

आतां फिरुनियां घरां । येशी आपणचि माघारा ॥२॥

लाविला मोकळा । भाव मागें सर्वकाळ ॥३॥

निळा म्हणे आतुडलें । बरें वर्म हातां आलें ॥४॥

६८३

आनंदमय सर्वकाळ । जडली निश्चळ वृत्ती पायीं ॥१॥

गाईलेची गावे गुण । करावें श्रवण केलेंची ॥२॥

धणी न पुरे घेतलें घेतां । आवडी चित्ता पुढें पुढें ॥३॥

निळा म्हणे न वीटे रसना । तुमचे गुण वाणीतां ॥४॥

६८४

नित्य नूतन तुम्ही नवे । आम्हीं तों जिवें वेंचतो ॥१॥

जाणें येणें आम्हा आटी । कल्पकोटीं तुम्हां जिणें ॥२॥

सुखदु:ख आम्हां भोग । तुम्ही तों अनंग निजरुपें ॥३॥

निळा म्हणे जगदाधीशा । आम्ही आशा बांधलों ॥४॥

६८५

नित्य नूतन गाऊं गुण । करुं जागरण कीर्तनीं ॥१॥

तेणें तुमची होईल कृपा । निरसन तापा भवरोगां ॥२॥

जाती खंडोन जन्मांतरें । पुढेंही फेरे खावें तें ॥३॥

निळा म्हणे विश्वास चित्तीं । हाचि श्रीपती मानियेला ॥४॥

६८६

निंदील कोणी मज तो निंदूं । अथवा स्तुतिवादु करोत सुखें ॥१॥

परि मी गाईन पंढरीनाथा । गुण तत्त्वतां तुमचेचि ॥२॥

आवडी आईक तूं कानीं । अथवा त्यागुनी वोसंडीं तूं ॥३॥

निळा म्हणे देऊनि बळ । वदवितो कृपाळ विश्वजनिता ॥४॥

६८७

निरंतर तुमच्या नामाचें स्मरण । आठवीन गुण वेळोवेळां ॥१॥

रुप दृष्टीं पाय ध्याईन मानसीं । हाचि अहर्निशी निजध्यास ॥२॥

आवडी बैसली अवीट अंतरीं । नव्हे क्षणभरी विसरु ते ॥३॥

निळा म्हणे चित्ता चिंतनाचा लाहो । रुक्मादेवीनाही साह्य झाला ॥४॥

६८८

निराश्रित वाटे मनीं । पडिलों जनीं एकला ॥१॥

कृपेंविणे तुमच्या देवा । हळहळ जीवा बहु वाटे ॥२॥

आजींचा दिवस उदयां नये । आयुष्य जाय क्षणाक्षणां ॥३॥

निळा म्हणे करुं काय । न दिेसे उपाय प्राप्तीचा ॥४॥

६८९

निवेदिलें पायांपाशीं । जें जें मानसीं होतें तें ॥१॥

आतां उचित तैसें करा । आम्ही तों ससारा आचवलों ॥२॥

काय नाहीं तुमच्या हातीं । वचनीं तिष्ठती महासिध्दी ॥३॥

निळा म्हणे तुमच्या संगें । पांडुरंगें वर्तिजे ॥४॥

६९०

पायांपाशीं जीव । ठेवियला तुमच्या भाव ॥१॥

न्याल म्हणोनियां सदना ।  विठ्ठल  देवा कृपाघना ॥२॥

आळवितों नामें । लाहो करुनियां प्रेमें ॥३॥

निळा म्हणे दिवसरातीं । दुजे नेणोनियां चित्तीं ॥४॥

६९१

मूढमती परि मी वाचें । नाम तुमचें उच्चारीं ॥१॥

नेणें कांहीं न कळे हित । परि मी भक्त म्हणवितों ॥२॥

अज्ञानचि परि मी दास । धरिली कास न सोडीं ॥३॥

निळा म्हणे भलत्या परि । अंगिकारी विठोबा ॥४॥

६९२

म्हणोनियां विटलें मन । आलें परतोन माघारिया ॥१॥

तुमचिया नामस्मरणीं । रतलें चरणी सुखावलें ॥२॥

नाहीं येथे घातपात । पावती निभ्रांत निजठायां ॥३॥

निळा म्हणे ऐसिया आशा । राहिलें भरंवसा मानू‍नियां ॥४॥

६९३

यावरी बोलती गोवळ । तूंचि सकळ जाणतां ॥१॥

कैसें जाणें येणें आम्हां । पुरुषोत्तमा तुजवीण ॥२॥

धन वित्त आमुचें गोत । तुंचि सतत जीवप्राण ॥३॥

निळा म्हणे वरदळ बोली । केली साहिली पाहिजे ते ॥४॥

६९४

रुप राहिलें चिंतन । सर्वकाळ ध्यानीं मनीं ॥१॥

वाचा गुणीं लांचावली । मती विस्तारें फांकली ॥२॥

ऐसी केली तुम्ही दया । कृपाळुवा पंढरीराया ॥३॥

निळा म्हणे भूक तहान । गेली ठायीं हरपोन ॥४॥

६९५

वाचा गुणीं लांचावली । मति विस्तारें फांकली ॥१॥

ऐशी केली तुम्ही दया । कृपाळूवा पंढरीराया ॥२॥

सर्वकाळ ध्यानीं मनीं । रुप राहिलें चिंतनीं ॥३॥

निळा म्हणे भूक तहान । गेली ठायीचि हरपोन ॥४॥

६९६

विजयध्वज उभारला । तुमचा मिरवला तिहीं लोकीं ॥१॥

करितां दासाचें धांवणे । एकाचि स्मरणें नामाच्या ॥२॥

संतहि बडिवार वर्णिती । हाचि श्रीपती नित्यानीं ॥३॥

निळा म्हणे ऐकोनि वचनें । धरिला मनें विश्वास ॥४॥

६९७

विठ्ठल  विठ्ठल  म्हणोनी छंदें । ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥

धरुनियां दृष्टीपुढें । रुप चोखडें सुरेख ॥२॥

वारंवार क्षणक्षणां । ठेवीन चरणांवरी माथा ॥३॥

निळा म्हणे पुरवा कोड । जाणेनी चाड हे माझी ॥४॥

६९८

वेडें वांकुडें बोलिलें । निळा पाहिजे उपसाहिलें ॥१॥

देवा तुम्ही रमाकांत । भक्त तुमचे चरणांकित ॥२॥

सूर्य जेवीं नव्हे किरण । सागर लहरीं तो समान ॥३॥

निळा म्हणे तूं व्यापक । भक्त एकदेशी क्षुल्लक ॥४॥

६९९

ओवाळूनियां सांडीन काया । वरुनी पायां तुमचीया ॥१॥

जीवभाव ठेवुनी वरी । राहेन व्दारीं तिष्ठत ॥२॥

जोडूनियां कृतांजुळी । नामावळी आठवीन ॥३॥

निळा म्हणे करीन सेवा । अहोरात्रीं देवा चरणांची ॥४॥

७००

सत्याक्षरें माझी वाणी । प्रवर्तली गुणीं तुमचिया ॥१॥

दाविले ते तुम्हीं अर्थ । वोळी यथार्थ मांडियेले ॥२॥

नाहीं कांहीं मतांतरीं । वदली वैखरी हे माझी ॥३॥

निळा म्हणे हे वाकयपूजा । गरुडध्वजा प्रत्यर्थ ॥४॥

७०१

सत्व कैंचें गांठीं । जेणें संवसाटी तुम्हांसी ॥१॥

म्हणोनि देवा वाटे भय । कैसेनि अपाय चुकती हे ॥२॥

यज्ञें स्वर्ग न चुके कदा । अध्ययनें संपदा सत्य लोक ॥३॥

निळा म्हणे रजतमें योनी । भोगा यतनीं चौर्‍यांयशी ॥४॥

७०२

सर्वकाळ जागवीन । आळवीन सुस्वरें ॥१॥

नामें तुमचीं अहो देवा । श्रीमाधवा गोविंदा ॥२॥

करीन हेचि दास्य कोडें । कीर्तन पुढें आवडी ॥३॥

निळा म्हणे येईल मना । दया हो वरदाना तेव्हां मज ॥४॥

७०३

संत कैसेनि भेटती । कैसेनि होती कृपावंत ॥१॥

सांगा निगुती हे आम्हांसी । तुमच्या पायांसी लागतों ॥२॥

काय तें करावें पूजन । काय तें धन समर्पावें ॥३॥

निळा म्हणे शरण जावें । कैसें विनवावें कोण युक्ती ॥४॥

७०४

सांपडला ठेवा । आतां पात्र झालों देवा ॥१॥

माझया वडिलांची हे जोडी । होती पुरातन चोखडी ॥२॥

जुगादीचें जुनें । टांकसाळी खरें नाणें ॥३॥

निळा म्हणे माझया देवें । हातीं लागलें पडिलें ठावें ॥४॥

७०५

हरिकीर्तनाच्या योगें । आम्हांसी जगें जाणिजे ॥१॥

नाहीं तरी होतों ठावा । कोठें देवा कोणासी ॥२॥

जेवीं वोहळासी प्रतिष्ठा । पावतां तटा गंगोदका ॥३॥

निळा म्हणे प्रकाशदिप्ती । चंद्रज्योती वन्हिसंगें ॥४॥

 

७०६

स्फूर्ति माझी चेतविली । गुणीं लाविली आपुलिये ॥१॥

आणखी दुजें नावडे कांहीं । येचि प्रवाहीं सुखावली ॥२॥

नानापरींचे अर्थभेद । वाचे विद्रद उमटती ॥३॥

निळा म्हणे मांडितों वोळी । वदवा मुखकमळीं तुम्ही ते ॥४॥

७०७

बरवा ओढवला हा रंग । भक्तिप्रसंग तुमचा ॥१॥

तेणें सुखें मातली वाचा । नित्य कीर्तनाचा नटनाच ॥२॥

गाऊं वानूं आपुल्या छंदें । तुमचीं पदें आवडीं ॥३॥

निळा म्हणे गळती नयन । प्रेमें स्फुंदन सद्रद ॥४॥

७०८

बरा केला अंगिकार । माझा तुम्हीं घेतला भार ॥१॥

नाहीं तरी जातों वायां । नाना योनि भोगावया ॥२॥

गाईन यावरीं चोखडे ॥३॥

निळा म्हणे ध्यानीं चित्तीं । धरुनि राहें तुमची मूर्ति ॥४॥

७०९

बहुतां दिवसां भेटीं आलों । सांभाळिलें पाहिजे ॥१॥

आलिंगने निवती प्राण्‍ । सुफळ जिणें मग माझें ॥२॥

हेत मनींचा होईल पूर्ण । दृष्टीं चरण देखतां ॥३॥

निळा म्हणे हरेल शीण । बोळवण जन्माची ॥४॥

७१०

बुध्दि जिहीं अढळ केली । चरणीं तुमचे निक्षेपिली ॥१॥

तया विसंबाल कैसे । कवळिलेति निजमानसें ॥२॥

प्राणपानांची  ही गती । कुंठित केल्या इंद्रियवुत्ती ॥३॥

निळा म्हणे कायावाचा । नेमूनि निर्धारीं तुमचा ॥४॥

७११

बैसलें आसनीं । रुप चित्ताचे चिंतनीं ॥१॥

दुजें नाठवे सर्वथा । आण तुझी पंढरीनाथा ॥२॥

डोळियां आवडी । रुपीं तुमच्या तयां गोडी ॥३॥

निळा म्हणे जीवनकळा । वेधीं वेधल्या त्या सकळा ॥४॥

७१२

मागण्याची न करुं गोष्टीं । तुम्हां पोटीं भय वाटे ॥१॥

नामचि तुमचें पुरे देवा । न करुं हेवा आणिक ॥२॥

माझें आहे स्वाधीन मन । न इच्छी मान धन कांहीं ॥३॥

निळा म्हणे सत्य साचा । हाचि संकल्पाचा निर्धार ॥४॥

७१३

मागें उदंड जोडी केली । कोठें आली सांगातें ॥१॥

आतां पुरे नाम वाचें । सार्थकाचें कारण ॥२॥

कोठे जाऊं खाऊं फेरे । मतांतरें अनेकें ॥३॥

आतां पुरे नाम वाचे । सार्थकाचें कारण ॥४॥

कोठें जाऊं खाऊं फेरे । मतांतरें अनेक ॥५॥

निळा म्हणे नारायणा । भाव जाण अंतरींचा ॥६॥

७१४

मागें उदंड साधनें केलीं । उत्तीर्ण तीं झालीं कर्मफळें ॥१॥

परि तुमचें नेदितीच प्रेम । वाढविती श्रम संसारींचा ॥२॥

जया नाहीं मार्गाची ठावा । काय तें गांवा पावविती ॥३॥

निळा म्हणे काटवणीं । घालती घालणीं जाणिवेच्या ॥४॥

७१५

मन माझें बैसलें ध्यानीं । तुमचे चिंतनीं नामाचिये ॥१॥

ऐक्यासनिं स्थिरावलें । आठवी पाऊलें निरंतरत ॥२॥

तैसीच नामीं रंगली वाणी । करीत घोकणी सर्वदा ॥३॥

निळा म्हणे नेणति करणें । तुम्हाविण भूषणें दुजीं लेऊं ॥४॥

७१६

प्रेम देऊनि सरतें केलें । आपुल्या नामें गौरविलें । माझिये वाचे श्रुंगारिले । गुणरत्नीं अमोघां ॥१॥

सर्वगुणीं गुणभरिता । सर्व रुपीं रुपमंडिता । सर्वकळा तूं कुशळता । साजती अनंता ब्रीदें चरणीं ॥२॥

सर्व गोमटा धरीत्या नामें । सर्व गोमटा करीत्या कर्मे । गोमटा जाणत्या वर्मे । सर्वी सर्व गोमटा तूं ॥३॥

मुख सुंदर अंगकांति । रुपसुंद मदनमूर्ति । यश सुंदर तुमची कीर्ती । अहो जगपती जगदानिया ॥४॥

निळा तुमचा शरणागत । तुमचे नामीं ठेविलें चित्त्‍ा । तुमच्या ब्रिदावळी पढत । करावा सनाथ म्हणउनी ॥५॥

७१७

नका पाहू माझे क्रियाआचरित । भक्त भागवत नव्हे ज्ञानी ॥१॥

आठवितां नाम नेणें दुजी परी । मी माझे श्रीहरि नाहीं गेलें ॥२॥

गुंतलोसे पाशीं मोह ममता आशा । अहो जगदाधीशा पांडुरंगा ॥३॥

निळा म्हणे करा यावरी कैवार । अहा करुणाकर म्हणोनियां ॥४॥

७१८

न धरे धीर धरितां मनीं । न संटे वदनीं गुणनाम ॥१॥

आटाहास्यें गर्जना करि । खवळली वैखरी नाटोपे ॥२॥

चरित्राचें उठती भार । जीव्हे अक्षर न संडे ॥३॥

निळा म्हणे लाविला चाळा । न कळे कळा हे तुमची ॥४॥

७१९

तुमच्याचि चरणाचा महिमा । नेणा तुम्ही पुरुषोत्तमा ॥१॥

आम्हा दासांचें जीवन । घडे अमृताचेचि पान ॥२॥

वृक्ष नेणति फळाची गोडी । भोक्तेचि जाणती ते आवडी ॥३॥

निळा म्हणे जाणति संत । भक्त तुमचे ते भाग्यवंत ॥४॥

७२०

तुझीये संगतीं । आम्ही लागलों नेणतीं ॥१॥

परि तूं कृपावंत हरि । सांभाळिसी सर्वांपरि ॥२॥

शहाणे तूंतें चोजवितीं । उदासी तूं तयांप्रती ॥३॥

निळा म्हणे भाविकाचा । म्हणवी अंकित मी त्याचा ॥४॥

७२१

तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम ॥१॥

कळिकाळ तोही वंदी माथा । तुमच्या शरणागता भिऊंनियां ॥२॥

नुपेक्षी त्या पंढरिनाथा । जाणोनि स्थपित संतांचा ॥३॥

निळा म्हणे भूमंडळीं । संत महाबळी विदीत ॥४॥

७२२

तुमच्या पायीं जडतां मन । नाहीं प्रयोजन शब्दांचें ॥१॥

तरी हे कां जी चेतविली । गुणीं प्रवर्तविली मति माझी ॥२॥

दिवस रात्रीं न पुरे लिहितां । उठती चळथा अक्षरांच्या ॥३॥

निळा म्हणे लाविला धंदा । न कळे गोविंदा लीला तुमची ॥४॥

७२३

तुमच्या पायीं ठेवितां चित्त । पुरले हेत सकळही ॥१॥

बरवें वर्म हें हाता आलें । संतीं दिधलें दाखवूनि ॥२॥

बरवें उच्चारिलें नाम । जिव्हें काम मारुनी ॥३॥

निळा म्हणे आठवण धरिला । बरवा सांगितला तो संतीं ॥४॥

७२४

तुम्हां आम्हां नित्य भेटी । नाहीं तुटी कल्पांती ॥१॥

प्रभा केवि सांडी भानु । हुताशनु दीपनातें ॥२॥

मृतिकेतें सांडुनि घटु । कैचा पटु तंतुविण ॥३॥

निळा म्हणे आम्हावीण । नाहींच देवपण तुम्हांसी ॥४॥

७२५

तैसे तुमच्या योगें थोर । आम्ही पामर जीवजंतु ॥१॥

गाऊं वानूं तुमच्या गुणा । तेणें भूषणा वाढलों ॥२॥

कस्तुरीसंगे मृतिका जैसी । विकें कनकेसी समान ॥३॥

निळा म्हणे पुरुषोत्तमा । अपार महिमा हा तुमचा ॥४॥

७२६

दोन्ही डोळां अवलोकितां । धणी न पुरे पंढरीनाथा ॥१॥

चित्त वेधलें चिंतनें । मनहि तदाकारध्यानें ॥२॥

वाचा कुंठित राहिली । बुध्दिहि निमग्मचि ठेली ॥३॥

निळा म्हणे अवघींच अंगें । रंगली त्याची विठ्ठल रंगें ॥४॥

७२७

दोरीचाचि सर्प परि होय मारक । संदेहकारक नोळखतां ॥१॥

तैसी परी केली तुम्हां माझया कर्मे । सांडविलें नेमें स्वधर्मासि ॥२॥

लटक्याचि झकवणें दचक बैसला । परि तो प्राण गेला हरुनियां ॥३॥

निळा म्हणे तुम्हां कुंठितचि केलें । ऐसें माझें झालें कर्म बळी ॥४॥

७२८

धाडाल तेथें जाईन देवा । सांगाल सेवा तेचि करीन ॥१॥

लेवलाव तें लेईन लेणें । मिरवीन भूषणें कराल तें ॥२॥

सांगाल तेंचि ऐकेन गोष्टी । धरुनियां पोटीं राहेन अर्थ ॥३॥

निळा म्हणे येईन मागे । तुम्ही न्याल संगें त्याचि स्थळां ॥४॥

७२९

ध्यानीं रंगले मानस । जिव्हें नावांचा उल्हास । कीर्तन आवडे श्रवणांस । नेत्रही स्वरुपास भाळलें ॥१॥

वाचा लांचावली गुणा । तुमच्या नामसंकीर्तना । देह घाली लोटांगणा । मस्तक चरणां सोकावला ॥२॥

ऐसीं अवघीच अवघ्या ठायीं । पडलीं तुमचिये प्रवाहीं । तुम्हावीण दुजें कांही । कोणा नाठवे सर्वथा ॥३॥

देखिलें तें विटेवरी । राहिलें डोळियांभीतरीं । तें अवघिया एकचि सरी । वेधूनियां ठेविलें ॥४॥

निळा म्हणे नव्हे आतां । पालट केलियाही सर्वथा । नामें रुपें पंढरीनाथा । लाविले पंथा आपुलिया ॥५॥

७३०

न घालीं मी सांकडें । तुम्हां संसाराचें कोडें ॥१॥

नामें गाईन आवडीं । पुढें नाचोनी बागडी ॥२॥

ध्यांईन मानसीं । रुप तुमचें अहर्निशीं ॥३॥

निळा म्हणे यावरि करा । कृपा रुक्‍मादेवीवरा ॥४॥

७३१न

पडे आतां दिवसरातीं । विसर तुमचा श्रीपती  । झाली इंद्रियां विश्रांति । रंगलीं नामचिंतनें ॥१॥

वदनीं सुंदर तुमचें नाम । डोळिया रुप मेघश्याम । श्रावणीं ऐकतां उत्तम । गुण तुमचे गोविंदा ॥२॥

हातें वाजवितां टाळी । चरणें नृत्य कथाकाळीं । गोजिरें ध्यान हदयकमळीं । तेंचि ठसावोनि राहिलें ॥३॥

मस्तक म्हणे चरणांवरीं । माझा ठाव निरंतरीं । जिव्हा रंगली नामोच्चारीं । न राहे क्षणभरीं आठवितां ॥४॥

निळा म्हणे माझा हेत । होउनी ठेला मुद्रांकित । सदा सर्वदा गावें गीत । हेंचि चिंतूनि राहिला ॥५॥

७३२

न विसंबेचि माउली बाळा । अदभुत स्नेहाचा कळवळा ॥१॥

तुम्ही तो जाणतसा नीत । तरि कां ऐसें विपरित ॥२॥

आजि निष्ठुर मानसे । आम्हा पिडीयले उपवासें ॥३॥

निळा म्हणे शोकें शिण । झाला जाऊं पाहे प्राण ॥४॥

७३३

नेणों कांहीं तुम्ही आपुलियां सुखें । इतरांचि दु:खें पिडिति तें ॥१॥

यातना बहुवस संसारकाचणी । जाचति जाचणि जन्म जरा ॥२॥

व्याधिचे वळसे दरिद्राचि पीडा । मृत्यूची देव्हडा होता मार ॥३॥

निळा म्हणे सांपडली काळाहाती । नुगवति गुंती उगवितां ॥४॥

७३४

ठेउनी चित्त पायांवरीं । करीन चाकरी मनोभावें ॥१॥

भोगवाल ते भोगीन भोग । न वंची अंग तिळतुल्य ॥२॥

आज्ञा तुमची वंदीन शिरीं । धरीन अंतरीं सांगितलें ॥३॥

निळा म्हणे अखंड निरत । राहेन सतत सेवेचिये ॥४॥

७३५

येथें तुजलागीं बोलाविलें कोणी । प्रार्थिल्यावांचूनि आलासी कां ॥१॥

प्रल्हादा कैवारी दैत्यांशीं दंडाया । स्तंभीं देवराया प्रगटोनी ॥२॥

तैशापरी मजला नाहीं बा संकट । तरीं कां फुकट श्रम केला ॥३॥

निळा म्हणे आम्ही नोळखुचि देवा । तुकयाचा धांवा करीतसों ॥४॥

७३६

तप साधन हेंचि माझें । गाईन तुझें नाम हरी ॥१॥

आणिकां साधनीं उबग आला । विश्वास उपजला येचिविशीं ॥२॥

कळाकुसरीं न येती मना । वांचूनीं चिंतना तुमचिया ॥३॥

निळा म्हणे वाचें बोली । पडिली चाली याची परी ॥४॥

७३७

नामें तुमची गाउनि छंदें । ब्रम्हानंदें नाचेन ॥१॥

धरुनियां दृष्टी पुढें । पाहीन रुपडें सुरेख ॥२॥

वारंवार क्षणक्षणां । ठेवीन चरणांवरीं माथा ॥३॥

निळा म्हणे पुरवा कोड । तुम्हीचि चाड जाणोनीं ॥४॥

७३८

नामें तुमचीं गाऊं मुखें । राहों सुखे चितंनीं ॥१॥

आणखी नेघों दयाल तरी । पढों वैखरीं गुण तुमचे ॥२॥

ठाको उभा संतमेळीं । करुं धुमाळी हरिकथा ॥३॥

निळा म्हणे नित्य नवी । सेवा घ्यावी कृपाळुवा ॥४॥

७३९

नावडें तें जना देवा । कां हो वदवा मज हातीं ॥१॥

आइते प्रसाद संतवाणी । अमृतझरवणी सुस्वाद ॥२॥

सत्यस्वानुभव बोलिलें जें जें । प्रगटूनि सहजें सिध्दांत ॥३॥

निळा म्हणे तुमच्या वरदें । यथानुवादें वचनें तिये ॥४॥

७४०

नावडे आणिक । बुध्दि झाली तादात्मक ॥१॥

तेचि बैसलें रुपडें । माजी डोळियां निवाडें ॥२॥

लांचावली वाणी । न निघे ते तुमच्या गुणीं ॥३॥

निळा म्हणे श्रवणीं कीर्ति । ह्रदयीं अखंड सगुणमूर्ती  ॥४॥

७४१

नाहीं उरविलें दुजें । तुमच्या तेजें झांकोळिलें ॥१॥

माझीचि मज न दिसतीं । निजांगें दीप्ति प्रकाशें ॥२॥

मी माझें हें नाढळेंचि कांहीं । देहादेही विसर ॥३॥

निळा म्हणे एकींएक । भोंदितां लेख पूर्णत्वें ॥४॥

७४२

नाहीं लौकिकासी काम । गाईन नाम सर्वदा ॥१॥

हेंचि माझें भांडवल । विठ्ठल  विठ्ठल  खरें नाणे ॥२॥

नेघों भुक्ति नेघों मुक्ति । प्रेम विरक्ति हरिनामीं ॥३॥

निळा म्हणे साधन सार । तुमच्या उच्चार नामाचा ॥४॥

७४३

संत ऐकती निवाडें । बैसोनि पुढें गुणतुमचे ॥१॥

तैसेचि गाऊं तयांपासीं । आर्त मानसीं धरुनियां ॥२॥

जया जेथें पडेल रुची । बोलों तैसेचि सारांश ॥३॥

निळा म्हणे अपार पेणें । वोळलें देणें तुमचें हरी ॥४॥

७४४

शुध्द सत्त्व कैंचा गांठी । जेणें संवसाटीं तुम्हासी ॥१॥

म्हणोनि देवा वाटे भय । कैसेनि आपाय चुकती हे ॥२॥

यज्ञें स्वर्गे न चुके कदा । अध्ययनें संपदा सत्यलोक ॥३॥

निळा म्हणे रजतमें योनी । भोगा यतनी चौर्‍यांशी ॥४॥

७४५

माझिये वाचेसी नाहीं धीर । प्रसवते भार अक्षरांचे ॥१॥

तुमचे कृपेचा हा महिमा । पुरुषोत्तमा अगाध ॥२॥

काय नेणों वदवा वाणी । वळूनियां गुणीं आपुला ॥३॥

निळा म्हणे ल्याली लेणें । प्रसाद भूषणें तुमची ॥४॥

७४६

सांभाळिलें बहुता ऐकिली प्रशंसा । तुम्ही जगदाधीशा युगायुगीं ॥१॥

म्हणऊनियां आशे लागलों नेणता । बुडवूनि थितां संवसार ॥२॥

आतां माझी कोण करील बुझावण । तुम्ही उदासीन झाल्यावरी ॥३॥

कोणीये ब्रम्हांडीं रहिवास तुमचा । लाग माग त्याचा न पडे ठायीं ॥४॥

अंतरलों बहू दूरदूददेशीं । कोण सांगायासी येईल तेथें ॥५॥

निळा म्हणे माझें प्रारब्धचि खोटें । म्हणुनि वैकुंठें त्याग केला ॥६॥

७४७

झाले ते ते चमत्कार । निरंतर आठवती ॥१॥

काय सांगो कोणापासी । अभाविकासी सत्य न वाटे ॥२॥

ज्या ज्या काळें जें जें झालें । तुम्ही जें केलें कौतुक तें ॥३॥

निळा म्हणे धरुनी ध्यानीं । राहिलों तें मनिं आठवीत ॥४॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav | आपल्या स्थितीसंबंधानें देवाशीं उद्गार ।

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *