संत निळोबाराय गाथा (मंगलाचरण)

निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण १ ते २)

निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण १ ते २)

१५६४

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ति उदारा सोपान देवा ॥१॥

नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी । आदित्रय जननी देवाचिया ॥२॥

जगदोध्दारालागी केला अवतार । मिरविला बडिवार सिध्दाईच ॥३॥

निळा शरणागत म्हणवी आपुला । संती मिरविला देऊनि हातीं ॥४॥

१५६५

(प्र.१)

ओम नमो सिध्दासी नमस्कार केला । ग्रंथारंभ झाला ज्याचे कृपें ॥१॥

त्याचिये कृपेचें अदभुत सामर्थ्य । दावी सिध्दपंथ चालावला ॥२॥

चालविला ग्रंथ ज्ञानदेवाभेटी । आले उठाउठी चांगदेव ॥३॥

चांगदेव जन्मविदयेचा आयास । आणि योगाळयास मूळकथा ॥४॥

कथा हे विचित्र करितां श्रवण । पुण्यपरायण होती श्रोते ॥५॥

नारायणडोहो पुण्यक्षेत्र ग्राम । वस्ती गृहस्थाश्रम मुधोपंत ॥६॥

ग्रामलेखनवृत्ति यजुर्वेदी ब्राम्हण । पंचमहायज्ञ कुळशीळ ॥७॥

धर्मपत्नी झाली गर्भातें धरिती । गर्भाधाम रीती संस्कारे ॥८॥

आणूनि कुळगुरु केलें पुंसवन । आले मरुदगण उदरासी ॥९॥

होतां नवमास प्रसूतीचा काळ । उपजला बाळ कुळदीप ॥१०॥

स्वरुपें सुंदर सभार लक्षणी । देखतां लोचणीं मनोहर ॥११॥

अनुलोभन केलें सीमंतनयन । जातीकर्म विधान नामकरण ॥१२॥

बहुतचि चांगलें चांगा म्हणउनी । जनिता जननी नाम ठेवी ॥१३॥

निष्क्रमण आणि अन्नप्राशन झालें । पुढें आरंभिले चौलोपनयन ॥१४॥

व्रतबंध दीक्षा अनुग्रह गायत्री । संध्या वेदमंत्रीं संपादिलीं ॥१५॥

प्रज्ञाशीळ बुध्दि गुरुमुखें ऐकतां । संध्या संपादिलें ॥१६॥

चारी वेद साही शास्त्रें अभ्यासिलीं । अर्थे विचारिलीं स्वानुभवें ॥१७॥

उपवेद आणि उपशास्त्रें घोकिलीं । पुराणे अवगमिलीं अष्टादश ॥१८॥

व्रतें उदयापनें कथानकें वो वसे । अध्यात्में इतिहासें निपुण जाला ॥१९॥

क्षुल्लकादिकमंत्र क्षुल्लकादिक विदया । आभ्यासिल्या सध्या चमत्कृता ॥२०॥

चौदा विदया आणि चौसष्टीही कळा । अध्ययनीं आगळा दुजा नाहीं ॥२१॥

अतीथि ब्राम्हण येती दर्शनासी । वंदुनी चांगयासी करिती पूजा ॥२२॥

म्हणती विदयासिध्द अवतार जाहला । नेणों ब्रम्हा आला येणें वेषें ॥२३॥

सकळांसी हा पूज्य सकळांसी वंदय । सकळांसी हा अदय गुरु होय ॥२४॥

ऐसा स्तुतिवाद करिती ब्राम्हण । समर्पिती धन कनक वस्त्रें ॥२५॥

अमर्याद धन चांगया बहुमान । म्हणती कन्यादान दयावें यासी ॥२६॥

सत्पात्र जोडलें निज भाग्ययोगेसी । करिती मुधोपंतासी विज्ञापना ॥२७॥

वरासी दक्षिणा देऊं शें होन । तंव दुजा म्हणे व्दिगुण देईन मी ॥२८॥

एक म्हणती सहस्त्रमुद्रांचा संकल्प । करितों तरी अल्प्‍ यथाशक्त्या ॥२९॥

महानाम्नी व्रत महाव्रत गोदान । जाहलें उपनयन चतुर्दश ॥३०॥

तंव वेदमूर्ती गुरु बैसवुनी पंगती । पूजन करुनि स्तविती चांगदेव ॥३१॥

या उपरी करा लग्नाचा विचार । हमणती लहान थोर आप्तवर्ग ॥३२॥

विनवित अती नम्र पुसती सकळांसी । उदईक प्रारंभासी ग्रळा कोण ॥३३॥

विनवीत अती नम्र पुसती सकळांसीं । उदईक प्रारंभासी ग्रंथ कोण ॥३४॥

तंव ते विस्मित होउनी बोलती ब्राम्हण । कुळासी मंडण जन्म तुझा ॥३५॥

आतां नाहीं पहावया उरला । एक तो रहिला योग्याभ्यास ॥३६॥

तरी उपदेशा म्हणती चांगदेव । दयावा अनुभव त्याचा स्वामी ॥३७॥

तेवढीच विदया राहातें तें काय । पुरुष प्रश्ना नव्हे श्लाघ्यपण ॥३८॥

तंव ते म्हणती आम्ही नेणों योगमार्ग । नाहीं तो प्रसंग विचारिला ॥३९॥

काय आम्हां चाड तया योगेवीण । करुं संध्यास्नान जपादिपत ॥४०॥

युक्त आहारी जे कां इंद्रियांचे जती । तेचि योग्य होती मार्गी ॥४१॥

मितलें बोलणें मितलें चालणें । मितलें ज्यार घेणें  अन्नरसा ॥४२॥

नैराश्य निर्लोभ लौकिकाविरहित । तेचि प्रवर्तत अभ्यासीं या ॥४३॥

हठयोगें करितां प्राणनिरोधन । तो आव्हाटा भरोन विटंबी देहा ॥४४॥

मग हा ना तोसा ठावो नपवोनि साधक । पावती निष्टंक क्षीणता देहे ॥४५॥

काळासी वंचन करितां क्षोभे काळ । मग तो नेदी स्थळ विश्रांतीचें ॥४६॥

नाना विघ्नें लय विक्षेप कशाय । रसस्वादनें अपाय रची त्यासी ॥४७॥

सिध्दीचा संभ्रम घालूनियां आड करी त्याचा नाड स्वहिताचा ॥४८॥

ऐशिया संकटी बळिया तोचि पावे । इतरांसी नागवे दुर्जय पवन ॥४९॥

तरी म्हणती सुज्ञा ऐकावें वचन । आहे तें कारण निस्पृहाचें ॥५०॥

जे अखंड एकांती शुचिष्मंत चित्तीं । तेचि दृढावती योगासनीं ॥५१॥

तरी ते योगी कोठें आहेती स्वामीया । सांगा जाईन पायां शरण त्यांच्या ॥५२॥

तंव व्दिज हमणती योगी नाहींत स्वदेशीं  । असती वाराणसीमाजी विरुळे ॥५३॥

तरी म्हणती चांगदेव जाऊं महाक्षेत्रा । योग आणि यात्रा उभय कार्यी ॥५४॥

मग तीर्थरुपा आज्ञा मागोनि यात्रेसी । करिती मुहूर्तेसी स्वस्त्ययन ॥५५॥

क्षौरादिक विधी केलें घृतस्नान । दक्षिणा भोजन देउनी व्दिजां  ॥५६॥

गणपती पूजन पुण्याहवाचन । केलें आवाहन पूर्वजांचें ॥५७॥

पूजियेलीं मातापिता उभयतां । आप्तवर्गा गोता गौरविलें ॥५८॥

समर्पिले तयां पुरे ऐसें धन । होय पुनरागमन आपुलें तों ॥५९॥

क्षेत्र प्रदक्षिणा पूजिंलें ब्राम्हणां । वंदिलें चरणां शिष्टांचिया ॥६०॥

निघाले बाहेरी मुहूतें प्रस्थान । आले बहुत जन बोळवित ॥६१॥

ऐकोनि प्रांतवासी आखमदीन जने । विनविती स्तवनें चांगयासी ॥६२॥

म्हणती आम्हां नाहीं घडली वाराणसी । आणि हेत तो मानसी बहूत काळ ॥६३॥

तरी चला समागमें क्षणती चांगदेव । होईल निर्वाहो सर्वांविशीं ॥६४॥

मग अनाथें दुर्बळें निघालीं बाहेरी । चालिलीं परिवारीं लक्षावत ॥६५॥

खर्चा वेंचा तया देती चांगदेव । आणि सांभाळिती सर्व मागें पुढें ॥६६॥

सुसंग जोडला म्हणती सकळ जन । नलगे घेणे ऋण संगे याच्या ॥६७॥

भागल्या श्रमल्या जाणे हा उपाय । रोगें येऊं नये याचे दृष्टी ॥६८॥

चालतां मारगी सामोरे जन येती । ऐकोनि कीर्ति अलौकिक ॥६९॥

महाव्याधी हरी अंधळयासी डोळे । वांझा पुत्रफळें पंगुसी पाय ॥७०॥

जे जे रोगी येती तयांसी उपाय । करिती तया काय उणें मग ॥७१॥

प्रार्थनी करिती पूजा समर्पिती धनें । तोषविती स्तवनें नारीनर ॥७२॥

भरिल्या गाडया धनें वस्त्रांच्या समृध्दी । जाती राजपदीं मिरवत ॥७३॥

ऐसे आले वाराणसी एकोनि व्दिजवर । क्षेत्रवासी भार पाहों आले ॥७४॥

देखोनि योग्यता सकळिकीं पूजिला । बहुमान जाहला महाक्षेत्रीं ॥७५॥

केला तीर्थविधी यथाशास्त्रन्यायें । पूजिलें समुदाये ब्रम्हवृंदा ॥७६॥

ग्रहप्रवृत्तिदानें मठभिक्षा दिधली । अष्ट तीर्थां केली प्रदक्षिणा ॥७७॥ म

ग गंध अक्षता व्दिजां करुनी पूजन । आर्तीचें वचन अनुवादती ॥७८॥

म्हणेती कोणा आहे योगाची धारणा । ते म्हणती आपणा गम्य नाहीं ॥७९॥

वेदाध्ययनीं आम्ही स्वधर्मी निरत । नेणों कैसी मात योगाची ते ॥८०॥

यज्ञाचार आम्हां षटकर्मांचा धंदा । नेणो उदावादा पवनाभ्यास ॥८१॥

महा विवरीं एक आहे योगिराज । ऐकतसों सहज कर्णोकणीं ॥८२॥

परी तें स्थळचि परम गुप्त अवघड भयंकर । करवे संचार कोणा तेथें ॥८३॥

तरी म्हणती चांगदेव जाऊं दर्शनासी । केलें स्तंभनासी व्याघ्रसर्पां ॥८४॥

पंचाक्षरी विदया भारियेली भूतें । केलीं शरणागतें वेजाळादी ॥८५॥

तंव प्रार्थिती व्दिजवर नवजावें आपण । काय त्या योगेविण खेळंबलें ॥८६॥

सर्व विदया तुम्हा आहेती स्वाधीन । कोणेविशीं न्युन पडिलें सांगा ॥८७॥

तया म्हणती चांगदेव जी एवढीच उणीव । येते येर सर्व आलोटिलें ॥८८॥

तरी म्हणती देवा ऐकावें वचन । जीवासी येतन तेथें जातां ॥८९॥

दरकुटी विशाळ आहे भयानक । जातां सकळ लोक मुकती प्राणा ॥९०॥

पिशाचें बहुवस असती विंचु सर्प । माजी गडदधुप अंधकार ॥९१॥

घरामाजी घरें व्दारामाजी व्दारें । विवरांत विवरें लक्षवरी ॥९२॥

गेलीया निर्गम नव्हेचि कोणासी । वर्जितों स्वामीसी याचिलागीं ॥९३॥

समागमी सर्व येती काकूलती । अहो कृपामूर्ती चांगदेवा ॥९४॥

नवजावें आपण कदा विवरांत । सांगती आघात सर्व तेथे ॥९५॥

परी चांगदेवा साधणें हदगत । ते नाईकती मात कोणाचीही ॥९६॥

म्हणती आम्हां आहे खर्चावया धन । एक मास पाहेन जावें मार्ग ॥९७॥

करुनियां संचार शोधिलें विवर । गेले योगेश्रवर जेथें होता ॥९८॥

लागोनियां चरणां वेदाक्षरीं स्तविला प्रसन्न तो केला तपोराशी ॥९९॥

तो म्हणे बाळका कैसा तूं आलासी । संचार पवनासी नसतां येथें ॥१००॥

येरु म्हणे स्वामी आपुल्रूा प्रसादें । आला आशिर्वादें चरणांपाशीं ॥२॥

संसारे पीडिलां जहलों खेदक्षीण । म्हणोनि शरण आलों देवा ॥३॥

स्वामीच्य वचनें कजन्मांतरें फेरे । चुकती आणि दुस्तरें हरती कर्मे ॥४॥

करोनियां कृपा म्हणावा जी आपुला । सेवक धाकुला नेणता मी ॥५॥

नुपेक्षावा कदा आला शरणागत । हे तों धर्मनीत स्वमी खरी ॥६॥

हदगत हें माझें पाववावें सिध्दी । अहो कृपानिधी गुरुराया ॥७॥

मज शरणागता करावा उपदेश । सांगा योगाभ्यास करीन मी ॥८॥

विचारिती गुरु आपुल्या मानसीं । म्हणती अनुतापेसी शरण आला ॥९॥

अव्हेरितां यासी येईल दृशण । विरक्त हा पूर्ण् मुमुक्षू जाला ॥१०॥

अनुतापाचें लेणें लेऊनियां अंगी । जाहालासे विरागी देहगेहा ॥११॥

वयें तो लहान दिसतो सगुण । अध्ययनें संपन्न वेदवेत्ता ॥१२॥

सच्छिष्य विरळा जोडे भाग्ययोगें । महिमा ज्याच्या संगे गुरुत्वासी ॥१३॥

देउनी आलिंगन आश्रवसिला कृपा । म्हणती केला बापा अंगिकार ॥१४॥

यथा सांप्रदायें आज्ञा समावेश । दावियेल सौरस परंपरे ॥१५॥

बैसउनी सन्मुख घालविलें आसन । कळा स्थान मान उपदेशिती ॥१६॥

कृपावंत गुरु म्हणती यमनियम । करीं प्राणायाम प्रत्याहार ॥१७॥

ध्यान हे धारणा आसन हे मुद्रा । साधवी शिष्येंद्रा सिध्दीलागीं ॥१८॥

रेचक पूरक कुंभक त्राहाटक । पवनाभ्यास ऐक स्थिरबुध्दि ॥१९॥

सगर्भ अगर्भ दिविले प्रकार । करी पवन स्थिर मनेजयें ॥२०॥

देह शीतल पडतां करी अग्निधारण । सोमधारण उष्णें पडितां देह ॥२१॥

प्राणनिरोधन सोहंमंत्रे जाण ॥ करी प्राणापान ऐक्य दोघां ॥२२॥

षटचक्रांचे भेद दाविले विषद । मुक्त ब्रम्हरंघ्र जेणें ॥२३॥

काकीमुख अग्निचक्र औटपी॥ गोल्हाट । सहस्ऋदळ श्रीहट पावावया ॥२४॥

नाद बिंदू कळा ज्योतीचा अनुभव । जेणें साधे सर्व तें तें आंगे ॥२५॥

जालंधर भेद आंताळी अभ्याळी । भ्रमरगुंफा कंकाळी पावे जेणें ॥२६॥

ऐकतां सादर मुद्रा ठसावली । समाधि लागली चांगयासी ॥२७॥

सद्गुरुच्या वचनें ऐके ज्या ज्या खुणा । पावे त्या त्या स्थाना तेचि क्षणीं ॥२८॥

परी ते सविकल्प समाधी काष्ठा म्हणती तीसी । नावडे संतांसी मूर्च्छा म्हणोनी ॥२९॥

वासनेचा क्षय नव्हे ऐशा रीती । न चुके पुनरावृत्ति जडत्व तें ॥३०॥

देखोनि त्याची प्राप्ति विस्मय करिती गुरु । म्हणती हा चमत्कारु थोर झाला ॥३१॥

एकाचि क्षणें कैसा झाला या अनुभव । प्रज्ञा अभिनव बाळकाची ॥३२॥

बहुत दिवस मीही करितों अभ्यास । परी न लभेचि सौरस याच्या ऐसा ॥३३॥

नवल हें देखिलें एकाचि उपदेशें । भेदियेलीं निमिषें चौदा चक्रें ॥३४॥

भ्रमरगुंफेमाजी केला रहिवास । गिळोनि नि:शेष दशहि प्राण ॥३५॥

ऐशी सप्त वरुषें समाधि भोगिली । सत्रावी शोषिली अमृतकळा ॥३६॥

जिंकोनियां काळ घातला तोडरीं । उभविली गुढी विजयाची ॥३७॥

झाली योगसिध्दि मांडिलें व्युत्थान । केलें उन्मज्जन इंद्रियांचे ॥३८॥

देखोनि गुरुदेव आलिंगन देती । आणि अनुभव मागती समाधीचा ॥३९॥

वचनें तयासी अवस्था लाविली । कसोटी दाविली सिध्दाईची ॥४०॥

घेऊनि अनुभव निघाले बाहेरी । ते आले घाटावरी मनकर्णिके ॥४१॥

तंव त्या देखियेलें तीरींच्या ब्राम्हणीं । ते लागले चरणी्र धवोनियां ॥४२॥

म्हणती समागमी बहू झाले चुकूर । नव्हतां सत्वर तुमचें येणें ॥४३॥

क्षेत्रवासी ब्राम्हणीं करुनियां खेद । म्हणती प्रमाद थोर झाला  ॥४४॥

गेले तें सांगती तुमचे ग्रामासी । न येतां तुम्ही रुदन करित ॥४५॥

नेले क्षेत्रामाजी वादयांच्या गंजरीं । घोष जयजयकारीं करुनि हर्षें ॥४६॥

बाणली असुमाई आंगी योगकळा । गुरुत्वें आगळा भसे लोकां ॥४७॥

उपरम झाला सकळ इंद्रियां । स्वरुपी विलया मन गेलें ॥४८॥

ऐसिया स्वानंदे बुझाविवलें चित्त  । राहिली अवचित वदनीं वाचा ॥४९॥

अष्टही आविर्भाव उरले आंगी । प्राणी प्राणरंगीं निजवासें ॥५०॥

वेदत्रयी ठसा पडिला शरीरा । वृत्ती गेली घरा निजाचिया ॥५१॥

निमोनियां गेले शब्दाचें बोलणें । पवनुची प्राणें शोषियेला ॥५२॥

ऐसा सुखासुखी पावला विश्रांती । पदपिंडा समाप्ती करुनियां ॥५३॥

देशोदेशीं वार्ता विस्तारली ऐसी ॥ ते येती दर्शनासी सिध्दाचिया ॥५५॥

राजे भेटी येती अनुग्रहीत होती । आशीर्वाद इच्छिती लहानथोर ॥५६॥

जया जे जे पाहिजे ते ते विदया देती । म्हणोनी शरण येती प्राणीमात्र ॥५७॥

नाना उपासना शिकती बीजें न्यास । मंत्रादि यंत्रांस करिती साध्य ॥५८॥

वेदांचीं अध्ययनें शास्त्रांची परिज्ञानें । शिकती रसायनें चिकित्सा नाडी ॥५९॥

ज्योतिष आयुर्वेद निघंट घेकिती । कोश विचारित पंचाक्षरा ॥६०॥

जारणमारणादि सप्तही प्रयोग । एक ते आगम योग करिती साध्य ॥६१॥

गारुडाचे दंश नृत्य संगीतास । घेती बहुत शिष्य विदया ॥६२॥

असो आतां ऐसे शिष्य लक्षवत । झाले शरणागत करिती सेवा ॥६३॥

यावरी व्दितीय प्रकरणींची कथा । परिसावी ते श्रोता देउनी चित्त ॥६४॥

निळा म्हणे पुढें ज्ञानेश्वर आख्यान । अदभुत महिमान सिध्दाईचें ॥६५॥

॥ इति श्रीचांगदेवचरित्रे जन्मकर्म विदयायोगाभ्यासकथनं नाम प्रथम प्रकरणं समाप्तम ॥

 

१५६६

(प्र.२)

ऐसा बहुत काळ क्रमिला क्षेत्रांत । मग धरिला पृथ्वी हेत पलाटणीं ॥१॥

उत्तरदक्षीण मानस करावें । तीर्थां अवलोकावें आणि क्षेत्रां ॥२॥

प्रांतोप्रांतीं शिष्यसांप्रदाय आपुला । वाढवावा हा धरिला उददेश मनें ॥३॥

मना आलें तेथें समाधी बैसोनी । प्रगट व्हावें कजनीं दुजीये स्थळीं ॥४॥

सिध्दीसी खेळणें गगनेसी बोलणें । पवनेसी धांवणे अदृष्यगती ॥५॥

सत्यवाचासिध्दी मनेजयसिध्दी । प्राणज्योबुध्दी निश्चयेसी ॥६॥

सर्वही पाहिलें सवही शोधलें  । सर्व अभ्यासिलें विदयाजात ॥७॥

वरिष्ठ  सकळां व्याकरणीं आगळा । गायनाची कळा सप्तस्वरी ॥८॥

नृत्य करुं जाणे थैमानें संगीत । अनुकारें दावित हावभाव ॥९॥

दशावतार खेळे सोंगें नानापरी । विदया  नाहीं उरी ठेवियली ॥१०॥

चौदाशें वरुर्षे काळाचा अतिक्रम । करुनि मठ आश्रम तप्तीतीरीं ॥११॥

जेवीं मोरासी सर्वांगीं विछावरी डोळे । परी एक आंधळे दृष्टावीण ॥१२॥

तयापरी विदयासिध्दीचा सोहळा । परी अपरोक्ष आंधळा आत्मज्ञानी ॥१३॥

नेणे  भक्तीप्रेम सुखाचें साधन ।सीगे चढला मान सर्वज्ञेचा ॥१४॥

चौदांशे वरुषांचे सिध्द चांगदेव । स्वीकारिती भांव पूजकाचे ॥१५॥

विदयेचे मूळपीठ साधनी वरिष्ठ । स्वधर्मेकनिष्ठ व्रतधारी ॥१६॥

आरोग्य शरीर आंगी दिव्य कांती । नामें विराजती चतुर्दश ॥१७॥

चांगदेव चांगा वटेश्वर चांगा । चक्रपाणी चांगा चांगसिध्द ॥१८॥

शिवयोगीचांगा मणीसिध्दचांगा । अनकरचांगा नाहमानामें ॥१९॥

मागेश नामें चांगा । सत्येसिध्द चांगा निश्चळदास ॥२०॥

चिंधादेवी चांगा म्हणवी बुटीचांगा । चौदानामें चांगा वर्तामान ॥२१॥

राजे प्रजालोक अनुग्रहीत झाले । विदया अभ्यासिले बहुसाल ॥२२॥

सिध्दीचा साधक वास तप्तीतीरीं । पुजिती नरनारी भावयुक्त ॥२३॥

नित्य नूतन यात्रा येउनी लक्षावत । पावोनी मनोरथ फिरोनी जाती ॥२४॥

वसविले बाजार भोवतें सवदागर । विकिताती संभार केणीयाचे ॥२५॥

त्रिकाळ पूजन त्रिकाल भोजन । करिती शिष्यजन आरतीया ॥२६॥

तंव आला अतिथी पांथीक व्दिजवर । सांगे समाचार पैठणींचा ॥२७॥

देखीलें अपूर्व चरित्र लोचनीं । विस्मय तो मनीं नित्य वाटे ॥२८॥

म्हणे जी सिध्दिराया  नवलाची वर्तलें । प्रतिष्ठानीं देखिलें सर्व जनीं ॥२९॥

म्हैशीपुत्रामुखें बोलविल्या श्रुती । येउनी बाळमूर्ति  महासिध्द ॥३०॥

आणूनि स्वर्गवासी पितर जेवविले । ते पुढती बोळविले निजस्थाना ॥३१॥

तें ऐकोनियां सकळही धि:कारिती त्यासी । म्हणती जाला यासी बुध्दीभ्रंश ॥३२॥

कैसा हा बोलीयेला भयचि न धरितां अजागळी वार्ता अघटीतची ॥३४॥

म्हणती या मूर्खासी भोवंडा बाहेरी । पिशाच निर्धारी बरळे भलतें ॥३५॥

तंव तो म्हणे स्वामी निजनेत्रीं देखिलें । आणि तुम्हां हें वाटलें मिथ्या वाक्य ॥३६॥

तंव सिध्द म्हणती त्यासी येऊनियां जवळी । सांगावी समुळी वितली कथा ॥३७॥

न वाटेचि हें सत्य अनुमानें सांगतां । केंवी झाला वदता पशू मुखें ॥३८॥

काय त्यांची नांवे जीहीं बोलवीला । म्हैसा पढविला निगमे केंवी ॥३९॥

तरि तो म्हणे स्वामी परिसावें सादर । सांगेन सविस्तर वर्तमान ॥४०॥

तेथें चौघेंजणें बाळें अकस्मात आलीं । अंगी विराजली योगमुद्रा ॥४१॥

प्रायश्चितालागी आलीं तया स्थळा । परि दाखविली लीळा असुमाई ॥४२॥

निवृती ज्ञानदेवा सोपान मुक्ताई । नांवाची नवाई विप्रीं केली ॥४३॥

सातवें वरुष विरजे निवृत्ती । साहा वरुषांची मूर्ति ज्ञानेश्वर ॥४४॥

पांचवें वरुष सोपानदेवासी । बाळकें म्हणती  नानीरगोंडी ॥४६॥

म्हणविती पतीत नाहीं वडीलधारें । पातित्य कवण्या व्दारें पुसावयासी ॥४७॥

तंव ते म्हणती स्वामी धाडिलें ब्राम्हणीं । तीहीं दिधलें लिहूनि सविस्तर ॥४८॥

मग त्या दाविती वंशावळी पत्रिका । आणि म्हणती कीजो रंकां पावन आहमां ॥४९॥

पत्र तें वाचिती सादर मानसें । ऐकती विन्यास विप्रकुळें ॥५०॥

आपेगांवकर गोविंदपंत निराई । आणि सिदोपंत गिरजाई आळंकापुरी ॥५१॥

ते श्रीगैरनीनाथाची शुध्द सांप्रदायी । परी येरयेरा नाहीं परिचय कदा ॥५२॥

त्या गोविंदपंता उदरीं वंशाचा उध्दार । उपजला कुमर विठ्ठल  नामें ॥५३॥

केला व्रतबंध पढविला अक्षर । वेदातादि सारसांख्ययोग ॥५४॥

परमार्थिक ग्रंथ पाहिले गुरुमुखें । अध्यात्मी निजमुखें विराजला ॥५५॥

परम विरक्त ज्ञानाया सात्विक । ब्रम्हचर्य निष्टंक व्रत चाळी ॥५६॥

मातृपितृभक्त परम सुशीळ । नेदी अहंतामळ लागों अंगी ॥५७॥

परी जावें रामेश्वरा उत्कंठीत मनीं । मग तीर्थरुपा पुसोनि निघते झाले ॥५८॥

ब्रम्हचर्य व्रत त्रिकाळ साधन । स्त्रानअर्ध्यदान करित चाले ॥५९॥

गोदा उभय  तीरें अवलोकिलीं । पुढें चालीं भीमातीरें ॥६०॥

मधुकरभिक्षा अनुतापें अथीला । तो आळंकापुरा आला अकस्मात ॥६१॥

तंप तेथें गिरजाई होते सिदोपंत । परम भागवत स्वधर्मशीळ ॥६२॥

तीहीं विठोबाची देखोनियां स्थिती । कन्या दिधली हाती संकल्पुनी ॥६४॥

करुनियां लग्न शुध्द कन्यादान । केली समर्पण रुक्माई त्या ॥६५॥

मग ते तीर्थवासु गेल रामेश्वर । करुनियां इतरा दक्षिण तीर्था ॥६६॥

सवेंची तेथुनी गेले वाराणसी । तंव ऐकिलें वार्तेसी गांविचीये ॥६७॥

गयावर्जनाचा श्रीगोविंदप्रतासी देवआज्ञा झाली । मग उत्तरकार्य करुनी गयेसी गेले ॥६८॥

गयावर्जनाचा संपादिला विधी । जाले शुध्दबुध्दी विरक्ती बळें ॥६९॥

ऋणत्रयापासुनी झाला तोहि मुक्त । मग आले ते पुनरक्त महाक्षेत्रा ॥७०॥

विरक्त मानसीं अनुतापाचें बळ । वैराग्य निर्मळ अंतरनिष्ठ ॥७१॥

मठी नृसिंहाश्रमासी जाऊनियां शरण । केलें विसर्जन गृहस्थाश्रमा ॥७२॥

सर्व प्रायश्चितें केला प्रषोच्चार । नशिले विकार साही वैरी ॥७३॥

पूर्व आश्रमाचें त्यागूनियां नाम  । जाले चैतन्याश्रम सतीधर्मे ॥७४॥

शिरीं नारायण उदरीं नारायण । गायात्री नारायण सर्व संधी ॥७५॥

जनीं नारायण विजनीं नारायण । वंदनीं नारायण सर्वकाळ ॥७६॥

सद्गुरुसेवनीं राहीले सतत । ते ऐकिीयेली मात सिदोपंती ॥७७॥

करुनियां खेद उभय दंपत्य । ह्रदयीं रुक्माईतें आलिंगिती ॥७८॥

म्हणती सर्वोविसीं तुझें वो अनहीत । आम्हीचि तें नेणत केलें मूर्खी ॥७९॥

पांथिाक विरक्त आला तीर्थवासु । तो देखोनियां उदासू दिधलें तुज ॥८०॥

होणार ते बळीवंत होऊनियां गेलें । पूर्वार्जिता न चले कांही ॥८१॥

जिता अन्न तुज देऊं चीर चोळी । तुंचि आमुचे  कुळीं कन्यापुत्र ॥८२॥

यावरी तुळसीवृंदावनीं पूजन । करुनि प्रदक्षिणा सारी काळ ॥८३॥

मग तेंचि दृढ व्रत धरियेलें रुक्माई । नेणे दुजें कांही सेवेवीण ॥८४॥

तव नृसिंहाश्रमासी निजस्वप्नीं दृष्टांत । झाला अकस्मात महाक्षेत्री ॥८५॥

चैतन्याश्रमासी आहे भार्या घरीं प्रतिव्रता माहेरीं मार्ग लक्षी ॥८६॥

तरी तुम्ही  जाऊनियां आणावी ते येथें । आणी दयावें संन्याशातें तिचिये हातीं ॥८७॥

उभयतां एकत्र नांदवावी ऐक्यें । जंव होती बाळकें चौघे पोटीं ॥८८॥

इंद्रायणीतीरीं आहे ते सुंदरा । माजी आळंकापुरा प्रतिव्रता ॥८९॥

तरी तुम्हीं अनुमान न करितां सदथीं । जावें शीघ्रगती आणवी ते ॥९०॥

मग नृसिंहाश्रम आले आळंकापुरासी । आणी नेलें वाराणसी सिदोपंत ॥९१॥

गिरजा बाई सवें रुक्माबाई घेतली । त्या उभयां भेटी केली वधुवरां ॥९२॥

आज्ञापिलें तेव्हा चैतन्याश्रमासी । रहावें सहवासी स्त्रियेचिये ॥९३॥

जंव चवघे अपत्यें होती ईचे कूसीं । तंव तुहमी उदासी नये होऊं ॥९५॥

दंड कमंडलु घेतला हातीं । आणि केला उभयतांचा मेळा पाक ॥९५॥

करुनियां यात्रा आले आळंकापुरासी । कन्या जामातेसी सिदोपंत ॥९६॥

त्यां देखोनि प्रांती उपहासिलें बहूत जनी । म्हणती यातें नयनीं पाहों नये ॥९७॥

संन्यासी होऊनी भाग्येशी संबध । स्वप्नीं हें निषिध्द न देखावें ॥९८॥

वनिता आणी घरीं आणि बाहेरी संन्यासी ।  आतळतां यासी प्रंत्यवाय ॥९९॥

कामलोभी तरी कां झाला संन्यासि । नेलें पूर्वजांसी अध:पाता ॥१००॥

हरिलें शिखा सूत्र वर्ण याति गोत्रा । ग्रहदारादी सर्वत्र त्यजूनियां ॥१॥

आणी घेऊनियां पत्नी पहुडे हा शेजेसी  । पापात्मा संन्यासी पापरुपी ॥२॥

विटाळ मानिती सर्वही दर्शनाचा । म्हणती हा पतीतांचा शिरोमणी ॥३॥

बुडविले स्वधर्म चतुर्थश्रमासी । इहलोक परत्रासी आंचवला ॥४॥

विटंबिली काया नासीला परमार्थ् । वेदबाह्य अनर्थ केला येणें ॥५॥

धिक् ऐसें जिणें म्हणती स्त्रियाबाळें । नेली उभय कुळें निरयवासा ॥६॥

उबगोनी षटकर्मा त्याजिलें शिखासूत्र । आणि अपंगिले कलत्र परिग्रहो ॥७॥

परि तो कोणासीहि न बोले वचन । सर्वदा लपोन वसे गुंफे ॥८॥

नैवेदय वैश्वदेव नाही स्मार्ताध्यान । श्राध्द ब्रम्हयज्ञ विवर्जित ॥९॥

तयाची संतती मुलें चौघें जणें । प्रायश्चित कोणें कैसे दयावें ॥१०॥

वडील निवृत्तह दुजा ज्ञानदेवो । तिजा सोपानदेवो मुक्ताबाई ॥११॥

वाचिलीया पत्र हांसती सकळ । म्हणती यातिकुळ नाही यांसी ॥१२॥

नव्हतें जें ऐकिलें तें नेत्रीं देखिलें । अपूर्व ही मुलें श्रीपादाचीं ॥१३॥

चतुर्थाश्रम आणि भार्येसी संबध । ऐकतां हें निषिध्द घडती दोष ॥१४॥

ठेवियेलीं नांवे बरवी विचारुनी । केलीं उपजवोनी पतित पोरे ॥१५॥

ज्ञानदेवा अर्थे ज्ञानाचा दिवस । आणि होता पतित वेष बाळकाचा ॥१६॥

यातिचिये पोटीं जन्मले पतीत । नामें विपरीत ठेवियेलीं ॥१७॥

जेविं छत्रपति म्हणती घरींच्या बाळका । परी कैंचा गज सिक्का राज्या त्यासी ॥१८॥

निवृत्ति नाम आणि प्रवृत्ति बांधला । सोपान अवघडला प्रत्यवाई ॥१९॥

मुक्ताबाई आणि मुक्तीची सुराणी । ज्ञानदेवो आणि पातित्य भोगी ॥२०॥

तंव एक म्हणती होता नामापासीं काय । राजा आणि वाहे मोळया शिरीं ॥२१॥

रवी नाम आणी दधी मंथन करीत । फणी विचंरीत वनित वनिता केश ॥२२॥

इंद्रधनुष्य आणि क्षणामात्रेंची विरे । मेरु आणि फिरे माळेसवें ॥२३॥

पैल तो गे म्हैसा पखाले वाहती । आणि र्याना तया म्हणती विश्वजनीं ॥२४॥

म्हैसीपुत्र आणि नामें म्हणती ग्याना । तरी काय तो हाईन प्रज्ञाशीळ ॥२५॥

हे ऐकोनि ज्ञानदेव बोलती तयांसी । होती ज्ञानरासी आत्मा माझा ॥२६॥

आज्ञानासी ठावो नाहींची पाहतां । विचारावें आतां देईल साक्ष ॥२७॥

म्हणती व्दिज हे पूर्णाची बोलणी । बोलती वायाणी मूर्खे पोरें ॥२८॥

उपवासी उदार देती णाल्या ऐसे । परि ते फोस कजैसें भुकेल्याचें ॥२९॥

श्रीपाद बोलता ऐकिलीं जीं वचनें । तेची धरुनि मने बैसलीं हे ॥३०॥

कुपथ्य हें यासी झालें सर्वोपरी । प्रायश्चित्तावरी पडिला धोंडा  ॥३१॥

वासुदेव सर्वांभूतीं हे बोलती । परी बहुत जन्माते प्रतीती ज्ञाननिष्ठे ॥३२॥

शुका सनकादिकाचे हे स्वानुभव द पावती मानव कैशापरी ॥३२॥

शुका सनकादिकाचे हे स्वानुभव । पावती मानव कैशापपरी ॥३३॥

शब्दज्ञानी सर्वहि कथनीं हेंचि कथिती । परी तैसा न पवती स्वानुभव ॥३४॥

ऐशा करुनियां खीक्या धि:कारें बोलती । नाश केला म्हणती वृथा ज्ञानें ॥३५॥

पुसा यासि कैसा तुझा आत्मा पशू । हा दावी सौरसु बोलिल्याचा ॥३६॥

त्याचीया ताडणें तुज येती वेदनपा । कीं पावसी घातना त्याच्या घातें ॥३७॥

हा दाविशी चमत्कार तरी तूं ज्ञानेश्वर । ऐसें व्दिजवर बोलियेलें ॥३८॥

म्हणती ज्ञानदेव संदेह निरसावा । म्हैसा आणवावा जवळीके ॥३९॥

मग आणूनि टोणगा मारिती शिपुटी । तव तोचि उठी ज्ञानदेवा ॥४०॥

देखोनि आश्चर्य येरयेरां दाविती । आसुमाई हें म्हणती नवल थोर ॥४१॥

बोलिल्या सारखी कर्तृत्वाची शक्ती । आंगी तोचि विभूति ईश्वराची ॥४२॥

उदंडें बोलतो हावभाव दाविती । परी ते प्रतिष्ठाची मिरविती ॥४३॥

आजी हें अपूर्व देखिलें लोचनीं । जें परदु:ख लेऊनि दाविलें अंगी ॥४४॥

तंव ते कुटील म्हणती हे सर्व ही बाजीगिरी । दावितीती परी विदयाचिया ॥४५॥

गौड बंगाली हे विदया प्रसिध्द । शिकवूनि प्रबध्द केलीं पोरें ॥४६॥

चतुर्थाश्रमांत करिती तीर्थाटणें । शिकला टाणेटोणे क्रियाभ्रष्ट ॥४७॥

पतीत संन्यासी पत्तिताचे मंत्र । पढविलें अपत्रि अर्भकांसी ॥४८॥

सर्वांविशीं तेणें नाश केला यांचा । जें प्राश्चित वाचा न वदे श्रुती ॥४९॥

गुरु आज्ञेवरी हाकऊनि सोकाळ । लावियेला विटाळ चतुर्याश्रमा ॥५०॥

अभिचार पूजा कापटयाचीं बीजें । घोकविलीं बोजें मूर्खा पोरां ॥५१॥

या अर्भकांसी थार नाही ऐसी केली । आणि उभकुळें नेलीं पतनव्दारा ॥५२॥

तंव सात्विक प्रबुध्द बोलती तयांसी । नये गुणदोषी चित्त ठेवूं ॥५३॥

दीक्षादानी ऐसे भासती लोचनीं । पैशून्य वचनीं काय काज ॥५४॥

न कळेचि महिमा कदाहि कोणचा । नये बोलों वाचा हेळसुनी ॥५५॥

जानकी स्वयंवरीं श्रीराम बाळरुप । भंगूनियां चाप पर्णिली सीता ॥५६॥

बटूरुपी वामन तीन पादभूमी । मागोनि आक्रमी अवनी सर्व ॥५७॥

तैसाचि प्रल्हाद दैत्याचिया वंशी । झाला वैष्णवांशी अग्रगण्य ॥५८॥

मर्कट योनीसी जन्मला हनुमंत । प्रताप अध्दूत आंगी त्याचे ॥५९॥

घटामाजी जन्म आणि प्राशिला सागर । पहा तो व्दिजवर अगस्तीमुनी ॥६०॥

असो हें न झांके सुवर्ण कसवटी लावितां । भानू आच्छादितां अभ्रछाये ॥६१॥

याहिवरी यासी युक्ति एकी आहे । जेणें नि:संदेह फिटे भ्रांती ॥६२॥

जरी हा बोलवील पशु निजमुखें । तरी याचे श्रुतिकें आत्मज्ञान ॥६३॥

तरी मानूं म्हैसा याचा आत्मा खरा । करुं परिहारा दोषमुक्त ॥६४॥

ऐकोनियां सकळ मानवले व्दिज । म्हणती हेचि वोज बरवी युक्ति ॥६५॥

येहवी पध्दती नाहीं ग्रंथांतरीं । प्रायश्चित्तावरी वचन याच्या ॥६६॥

यतीधर्मामाजी पत्नी आपंगिली । नाहीं हे ऐकिली शिष्टाचारीं ॥६७॥

कैचें प्रायश्चित्त श्रीपादाच्या पोरां । कीजे परिहारा दंडूनि दोषां ॥६८॥

न करवे सर्वथा याचा अंगिकार । बरवा हा विचार काढियेला ॥६९॥

वरी म्हणे निळा पुढीलीये प्रकर्णी  । वेद घोषे वाणी गर्जेल पशू ॥७०॥

॥ इति श्री चांगदेव चरित्रे ज्ञानेश्वर जन्मकर्म निरुपणं व्दितिय प्रकरणं समाप्त ॥


संत निळोबाराय गाथा । संत निळोबाराय अभंग । निळोबा अभंग । निळोबा गाथा । सर्व गाथा । निळोबाराय माहिती । पिंपळगाव मंदिर निळोबाराय । sant nilobaray gatha | sant nilobaray abhang | niloba abhang | niloba gatha | sarv gatha | nilobaray mahiti | nilobaray mandir pimpalgav । निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण १ ते २)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण १ ते २)निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण १ ते २) निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण १ ते २) निळोबाकृत चांगदेव चरित्र (प्रकरण १ ते २)

तुमच्या शेतमालाची जाहिरात करण्यासाठी कृषी क्रांतीला भेट द्या .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *