संत निळोबाराय अभंग

ऐशिया सुखामाजीं राहेन – संत निळोबाराय अभंग – २११

ऐशिया सुखामाजीं राहेन – संत निळोबाराय अभंग – २११


ऐशिया सुखामाजीं राहेन सुखरुप ।
दुजा वागों नेदी आड येऊं संकल्प ।
भोगिन याचोंचि वो सर्वदा पडप ।
करुनि भावना अखंड तद्रूप वों ॥१॥
ऐशी ये निश्चयाची सांगितली मात ।
तुम्हीही आयका हो कृपावंत संत ।
नकळे माझा मज सत्याचा इत्यर्थ ।
तुम्हीचि दावाल तो मानीन हितार्थ ॥२॥
येईल चित्तासी ते सांगा विचारुनी ।
माझे निजहित तेंचि विवरुनी ।
मी तो नेणोंचि वो याचिये वाहाणी ।
हेंचि कळासलें हदयभुवनीं वो ॥३॥
हाचि निजानंद आवडला मना ।
करुं सर्व काळ हेचि विवंचना ।
रुप दृष्टीपुढें धरुनि गाऊं गुणा ।
करुनि तदाकार वृत्तीची भावना वो ॥४॥
यावीण नावडे चित्ता ऐसें झालें ।
दिवसरात्रीं हें ध्यानचि लागलें ।
सांगती इतरें तें न मानेचि भले ।
नेणों कोण ऐसें कर्म उभें ठेलें वो ॥५॥
हेंचि राहेन वो धरुनियां दृष्टी ।
रुप नागर वो मुरली वाजे ओटीं ।
खांदिये घोंगडें वो घेऊनि वेताटी ।
चाले गाईमागें सवें गोवळथाटी वो ॥६॥
ऐसिये आवडीचें पुरविलें आर्त ।
येऊनी एकांतीं वो भेटले गोपिनाथ ।
तेणें मानस वो माझें झालें स्वस्थ ।
निळा म्हणे वो भोगिन एकचित्त वो ॥७॥


राम कृष्ण हरी आपणास या अभंगाचा अर्थ माहित असेल तर खालील कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

ऐशिया सुखामाजीं राहेन – संत निळोबाराय अभंग – २११

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *