कराल सांभाळ तरी ते – संत निळोबाराय अभंग – ६२७
कराल सांभाळ तरी ते तुमची कीर्ति ।
मी तों बाळमति नेणें दुजें ॥१॥
बैसलों विश्वासें आळवित नांवा ।
तुमच्या दयार्णवा निरंतर ॥२॥
नुपेक्षाल मज हा वाटे भरंवसा ।
आहे कीर्तिठसा तुमचा जगीं ॥३॥
निळा म्हणे नेणें दुजी परी आतां ।
येईल तें चित्ता सुखें करा ॥४॥