सदाचा हा धाला सदाचा – संत निळोबाराय अभंग – ८२८
सदाचा हा धाला सदाचा भुकेला ।
सदाचा निजेला जागा सदा ॥१॥
ऐसिये परिचा अंबुला साजणी ।
वरिला सुवासिणी सदाचि मी ॥२॥
सदाचा बोलिका सदाचा हा मुका ।
सदाचा हा लटिका खरा सदां ॥३॥
सदाचा हा वेडा सदाचा हा कुडा ।
सदाचा हा निर्भिडा भीड सदा ॥४॥
सदाचा हा दाता सदाचा मागता ।
सदाचा हा रिता भरला सदा ॥५॥
निळा म्हणे सदा जवळी ना हा दुरी ।
सदा सर्वांतरीं नसोनि वसे ॥६॥