दासबोध दशक विसावा

दासबोध दशक अठरावा

दासबोध दशक अठरावा विडिओ सहित



॥ श्रीमत् दासबोध ॥
॥ दश अठरावा : बहुजिनसी

समास पहिला : बहुदेवस्थाननाम
॥ श्रीराम ॥

तुज नमूं गजवदना । तुझा महिमा कळेना ।
विद्या बुद्धि देसी जना । लाहानथोरांसी ॥ १ ॥
हे गजवदना, तुला मी नमस्कार करतो. तुझा महिमा अगाध असल्याने तो कळत नाही. सर्व लहानथोर लोकांना तूच विद्या, बुद्धी देतोस. (१)

तुज नमूं सरस्वती । च्यारी वाचा तुझेन स्फूर्ती ।
तुझें निजरूप जाणती । ऐसे थोडे ॥ २ ॥
हे सरस्वती, तुला नमस्कार असो. तुझ्यामुळेच चारी वाचा स्फुरतात. तुझे निजरूप जाणणारे लोक फार थोडे आहेत. (२)

धन्य धन्य चतुरानना । तां केली सृष्टीरचना ।
वेद शास्त्रें भेद नाना । प्रगट केले ॥ ३ ॥
हे ब्रह्मदेवा, तू खरोखर धन्य आहेस. तूच सर्व सष्टीची रचना केलीस. वेद, शास्त्रे आणि नाना भेद तूच प्रगट केलेस. (३)

धन्य विष्णु पाळण करिसी । येकांशें सकळ जीवांसी ।
वाढविसी वर्तविसी । जाणजाणों ॥ ४ ॥
– हे विष्णु त धन्य आहेस. तच सर्वांचे पालन करतोस. तुझ्या एका अंशाने तु सर्व जीवांना त्यांचे अंतरंग जाणून वाढवतोस आणि वागवतोस. (४)

धन्य धन्य भूळाशंकर । जयाच्या देण्यास नाहीं पार ।
रामनाम निरंतर । जपत आहे ॥ ५ ॥
भोळा शंकर खरोखरच धन्य आहे. त्याच्या देण्याला मर्यादा नाही. तो निरंतर रामनाम जपत असतो. (५)

धन्य धन्य इंद्रदेव । सकळ देवांचाहि देव ।
इंद्रलोकींचें वैभव । काये म्हणौनि सांगावें ॥ ६ ॥
सर्व देवांचा जो देव तो इंद्रदेव धन्य आहे. इंद्रलोकीचे वैभव एवढे आहे की, त्याचे वर्णन करता येत नाही. (६)

धन्य धन्य येमधर्म । सकळ जाणती धर्माधर्म ।
प्राणीमात्राचें वर्म । ठाईं पाडिती ॥ ७ ॥
सर्व धर्म-अधर्म यांना जाणणारा यमधर्म धन्य आहे. तो सर्व प्राणिमात्रांचे वर्म जाणतो. (७)

वेंकटेंसीं महिमा किती । भले उभ्यां अन्न खाती ।
वडे धिरडीं स्वाद घेती । आतळस आपालांचा ॥ ८ ॥
व्यंकटेशाचा महिमा फार आहे. त्याच्या स्थानी भली भली माणसेही उभ्याने अन्न खातात. वडे, धिरडी आणि स्वादिष्ट घारग्यांचा स्वाद घेतात. (८)

धन्य तूं वो बनशंकरी । उदंड शाखांचिया हारी ।
विवरविवरों भोजन करी । ऐसा कैंचा ॥ ९ ॥
हे बनशंकरी, तू धन्य आहेस. तुझ्या नैवेद्याला खूप भाज्या लागतात. त्या सर्वांची चव घेऊन भोजन करील असा भेटणे कठीण आहे ? (९)

धन्य भीम गोलांगुळा । कोरवड्यांच्या उदंड माळा ।
दहि वडे खातां सकळां । समाधान होये ॥ १० ॥
गायीसारखे पुच्छ असणारा बलभीम धन्य आहे. त्याला उडदाच्या वड्यांच्या उदंड माळा घातल्या जातात. दह्याबरोबर वडे खाऊन सर्वांना समाधान वाटते. (१०)

धन्य तूं खंडेराया । भंडारें होये पिंवळी काया ।
कांदेभरीत रोटगे खाया । सिद्ध होती ॥ ११ ॥
हे खंडेराया, तू धन्य आहेस. तुझा जो भंडारा उधळला जातो, त्यामुळे शरीर हळदीने पिवळे होते. मग कांदे, भरीत आणि रोडगे खायला सर्व सिद्ध असतात. (११)

धन्य तुळजाभोवानी । भक्तां प्रसन्न होते जनीं ।
गुणवैभवास गणी । ऐसा कैंचा ॥ १२ ॥
भक्तांना प्रसन्न होणारी तुळजाभवानी धन्य आहे. तिच्या गुणवैभवाची गणना करील असा कोण आहे ? (१२)

धन्य धन्य पांडुरंग । अखंड कथेचा होतो धिंग ।
तानमानें रागरंग । नाना प्रकारीं ॥ १३ ॥
जेथे अखंड कथेचा गदारोळ चाललेला असतो, नाना प्रकारे तानमान, रागरंग यांसह जेथे नित्य कीर्तन होत असते, तो पांडुरंग खरोखरच धन्य होय. (१३)

धन्य तूं गा क्षत्रपाळा । उदंड जना लाविला चाळा ।
भावें भक्ति करितां फळा । वेळ नाहीं ॥ १४ ॥
हे क्षेत्रपाला, तू धन्य आहेस. अनेक लोकांना तू तुझे प्रेम लावले आहेस. मनापासून तुझी भक्ती केली असता फळ मिळायला वेळ लागत नाही. (१४)

रामकृष्णादिक अवतार । त्यांचा महिमा अपार ।
उपासनेस बहुत नर । तत्पर जाले ॥ १५ ॥
भगवंताचे जे रामकृष्णादिक अवतार झाले त्यांचा महिमा अपार आहे. त्यांची उपासना अनेक लोक अत्यंत तत्परतेने करतात. (१५)

सकळ देवांचे मूळ । तो हा अंतरात्माचि केवळ ।
भूमंडळीं भोग सकळ । त्यासीच घडे ॥ १६ ॥
सर्व देवांचे मूळ केवळ अंतरात्माच आहे. या भूमंडळावर सर्व भोग त्यालाच प्राप्त होतात. (१६)

नाना देव होऊन बैसला । नाना शक्तिरूपें जाला ।
भोक्ता सकळ वैभवाला । तोचि येक ॥ १७ ॥
तोच नाना देवांचे रूप घेऊन बसतो. नाना शक्तींच्या रूपाने तोच प्रगटतो. सर्व वैभवाचा भोक्ता तो एकटा आहे. (१७)

याचा पाहावा विचार । उदंड लांबला जोजार ।
होती जाती देव नर । किती म्हणोनि ॥ १८ ॥
याचा नीट विचार करावा. सर्व देवांचे वर्णन करायचे म्हटले तर फारच लांबड लागेल. किती देव आणि किती नर होतात आणि जातात. त्यांचे वर्णन किती करावे ? (१८)

कीर्ति आणि अपकीर्ति । उदंड निंदा उदंड स्तुती ।
सर्वत्रांची भोगप्राप्ती । अंतरात्म्यासीच घडे ॥ १९ ॥
कीर्ती आणि अपकीर्ती, उदंड निंदा आणि उदंड स्तुती हे सर्व भोग अंतरात्म्यालाच घडतात. (१९)

कोण देहीं काये करितो । कोण देहीं काये भोगितो ।
भोगी त्यागी वीतरागी तो । येकचि आत्मा ॥ २० ॥
कोणत्या देहात काय करतो, कोणत्या देहात काय भोगतो हे सांगता येत नाही. पण भोगी. त्यागी आणि वीतरागी सर्वांच्या देही असणारा अंतरात्मा मात्र एकच आहे. (२०)

प्राणी साभिमानें भुलले । देह्याकडे पाहात गेले ।
मुख्य अंतरात्म्यास चुकलें । अंतरीं असोनी ॥ २१
प्राणी देहाच्या अभिमानाने भलतात. देहाकडेच पाहात बसतात आणि मुख्य अंतरात्मा त्यांच्या अंतरी असूनही त्याला जाणत नाहीत. (२१)

आरे या आत्मयाची चळवळ पाहे । ऐसा भूमंडळीं कोण आहे ।
अगाध पुण्यें अनुसंधान राहे । कांहींयेक ॥ २२ ॥
अरे, या अंतरात्म्याचे कर्तृत्व जाणेल असा या भूमंडळावर कोण आहे ? अगाध पुण्याचा संग्रह असेल, तरच एखाद्या माणसाला त्याचे थोडेफार अनुसंधान राहते. (२२)

त्या अनुसंधानासरिसें । जळोनी जाईजे किल्मिषें ।
अंतरनिष्ठ ज्ञानी ऐसे । विवरोन पाहाती ॥ २३ ॥
ते अनुसंधान राहिले असता त्याच्या योगाने सर्व मलिनत्व, पाप जळून जाते. जे अंतरनिष्ठ ज्ञानी असतात, ते याप्रकारे विवरून पाहातात. (२३)

अंतरनिष्ठ तितुके तरले । अंतरभ्रष्ट तितुके बुडाले ।
बाह्यात्कारें भरंगळले । लोकाचारें ॥ २४ ॥
अंतरनिष्ठ असतात ते तरतात. अंतरभ्रष्ट असतात ते सर्व बुडतात, कारण ते बहिर्मुख असल्याने लोकाचाराच्या नादी लागून भरकटत जातात. (२४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
बहुदेवस्थाननिरूपणनाम समास पहिला ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘बहुदेवस्थाननिरूपणनाम’ समास पहिला समाप्त.


समास दुसरा : सर्वज्ञसंगनिरूपण
॥ श्रीराम ॥

नेणपणें जालें तें जालें । जालें तें होऊन गेलें ।
जाणतेपणें वर्तलें । पाहिजे नेमस्त ॥ १ ॥
नेणतेपणाने जे झाले ते झाले. झाले-गेले होऊन गेले, पण आता तरी जाणतेपणाने वागले पाहिजे. (१)

जाणत्याची संगती धरावी । जाणत्याची सेवा करावी ।
जाणत्याची सद्‍बुद्धि घ्यावी । हळुहळु ॥ २ ॥
जाणत्याची संगत धरावी, जाणत्याची सेवा करावी आणि हळूहळू जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी. (२)

जाणत्यापासीं लेहों सिकावें । जाणत्यापासीं वाचूं सिकावें ।
जाणत्यापासीं पुसावें । सकळ कांहीं ॥ ३ ॥
जाणत्यापाशी लिहायला शिकावे. जाणत्यापाशी वाचायला शिकावे. जाणत्यालाच सर्व काही विचारावे (३)

जाणत्यास करावा उपकार । जाणत्यास झिजवावें शरीर ।
जाणत्याचा पाहावा विचार । कैसा आहे ॥ ४ ॥
जाणत्यावर उपकार करावा, त्याच्यासाठी आपले शरीर झिजवावे आणि त्याचा विचार काय आहे हे जाणून घ्यावे. (४)

जाणत्याचे संगतीनें भजावें । जाणत्याचे संगतीनें झिजावें ।
जाणत्याचे संगतीनें रिझावें । विवरविवरों ॥ ५ ॥
जाणत्याच्या संगतीने भगवद्भजन करावे. त्याच्या संगतीने कष्ट सोसावेत. जाणत्याच्या संगतीत विवरण करीत संतुष्ट व्हावे. (५)

जाणत्याचे गावें गाणें । जाणत्यापासीं वाजवणें ।
नाना आळाप सिकणें । जाणत्यापासीं ॥ ६ ॥
त्याच्यापाशी गाणे गावे, वाद्य वाजवावे. जाणत्यापाशी संगीत कलेतील विविध आलाप वगैरे शिकावे. (६)

जाणत्याचे कासेसी लागावें । जाणत्याचें औषध घ्यावीं ।
जाणतां सांगेल तें करावें । पथ्य आधीं ॥ ७ ॥
जाणत्याच्या नादी लागावे. जाणत्याचेच औषध घ्यावे आणि तो सांगेल त्याप्रमाणे आधी पथ्यही करावे. (७)

जाणत्यापासीं परीक्षा सिकणें । जाणत्यापासीं तालिम करणें ।
जाणत्यापासीं पोहणें । अभ्यासावें ॥ ८ ॥
जाणत्यापाशी परीक्षा कशी करावी हे शिकावे. जाणत्यापाशी तालीम करावी आणि जाणत्यापाशीच पोहण्याचा अभ्यास करावा. (८)

जाणता बोलेले तैसें बोलावें । जाणता सांगेल तैसें चालावें ।
जाणत्याचें ध्यान घ्यावें । नाना प्रकरीं ॥ ९ ॥
जाणता जसे बोलेल तसे आपण बोलावे. जाणता सांगेल तसे चालावे. जाणता करतो तसेच ध्यान करण्यास आपण नाना प्रकारे शिकावे. (९)

जाणत्याच्या कथा सिकाव्या । जाणत्याच्या युक्ति समजाव्या ।
जाणत्याच्या गोष्टी विवराव्या । सकळ कांहीं ॥ १० ॥
जाणत्यापासून कथा सांगण्यास शिकावे. त्याची युक्ती नीट समजून घ्यावी आणि त्याच्या सर्व गोष्टींचे विवरण करावे. (१०)

जाणत्याचे पेंच जाणावे । जाणत्याचे पीळ उकलावे ।
जाणता राखेल तैसे राखावे । लोक राजी ॥ ११
जाणत्याचे डावपेच जाणून घ्यावेत. जाणत्याचे पीळ उकलावेत आणि तो ज्याप्रमाणे लोकांना राजी राखतो, तसे आपणही लोकांना राजी राखावे. (११)

जाणत्याचे जाणावे प्रसंग । जाणत्याचे घ्यावे रंग ।
जाणत्याचे स्फूर्तीचे तरंग । अभ्यासावे ॥ १२ ॥
जाणता माणूस कोणत्या प्रसंगात कसा वागतो, ते जाणून घ्यावे. जाणता रामरंगात जसा रंगून जात असेल, तसे आपण रंगून जावे. जाणत्याच्या स्फूर्तीचे सर्व साहित्य याचा चांगला अभ्यास करावा. (१२)

जाणत्याचा साक्षेप घ्यावा । जाणत्याचा तर्क जाणावा ।
जाणत्याचा उल्लेख समजावा । न बोलतांचि ॥ १३ ॥
जाणत्याप्रमाणे आपणही उद्योगी व्हावे. त्याची तर्क करण्याची पद्धती समजून घ्यावी. त्याने न बोलताच त्याच्या अंतरंगातील विचार जाणून घ्यावेत. (१३)

जाणत्याचें धूर्तपण । जाणत्याचें राजकारण ।
जाणत्याचें निरूपण । ऐकत जावें ॥ १४ ॥
जाणत्याचे चातुर्य, त्याचे मत्सद्देगिरीने वागणे, तसेच त्याचे अध्यात्मनिरूपण या सर्वांचे श्रवण करून ते जाणून घ्यावे. (१४)

जाण्त्याची कवित्वें सिकावीं । गद्यें पद्यें वोळखावी ।
माधुर्यवचनें समजावीं । अंतर्यामीं ॥ १५ ॥
जाणत्यांनी केलेल्या काव्याचा अभ्यास करावा. गद्य, पद्य नीट जाणून घ्यावे आणि त्यांची समधुर वचने अंतर्यामी समजून घ्यावीत. (१५)

जाणत्याचें पाहावे प्रबंद । जाणत्याचे वचनभेद ।
जाणत्याचे नाना संवाद । बरे शोधावे ॥ १६ ॥
जाणत्याचे प्रबंध पाहावेत, तो नाना लोकांशी सुखसंवाद कशा प्रकारे करतो याचा शोध घ्यावा. (१६)

जाणत्याची तीक्षणता । जाणत्याची सहिष्णता ।
जाणत्याची उदारत । समजोन घ्यावी ॥ १७ ॥
जाणत्याची तीक्ष्ण बुद्धी, त्याची सहनशीलता आणि उदारता समजून घ्यावी. (१७)

जाणत्याची नाना कल्पना । जाणत्याची दीर्घ सूचना ।
जाणत्याची विवंचना । समजोन घ्यावी ॥ १८ ॥
जाणत्याच्या नाना कल्पना, त्याची दूरदृष्टी तसेच त्याची विवंचना समजून घ्यावी. (१८)

जाणत्याचा काळ सार्थक । जाणत्याचा अध्यात्मविवेक ।
जाणत्याचे गुण अनेक । आवघेच घ्यावे ॥ १९ ॥
जाणता आपल्या काळाचे सार्थक कसे करतो, त्याची अध्यात्मविवेक समजन देण्याची पद्धती व त्यानुसार त्याचे आचरण आणि आणखीही त्याचे अनेक गुण आपण सर्वच आत्मसात करावेत. (१९)

जाणत्याचा भक्तिमार्ग । जाणत्याचा वैराग्ययोग ।
जाणत्याचा अवघा प्रसंग । समजोन घ्यावा ॥ २० ॥
जाणत्याचा भक्तिमार्ग, त्याचा वैराग्ययोग, एकूण त्याचे सर्वच चरित्र आपण जाणून घ्यावे. (२०)

जाणत्याचें पाहावें ज्ञान । जाणत्याचें सिकावें ध्यान ।
जाणत्याचें सूक्ष्म चिन्ह । समजोन घावें ॥ २१ ॥
जाणत्याचे ज्ञान पाहावे; त्याच्याकडून ध्यानयोग शिकावा, त्याच्या ठिकाणच्या सूक्ष्म खुणाही समजून घ्याव्या. (२१)

जाणत्याचें अलिप्तपण । जाणत्याचें विदेहलक्षण ।
जाणत्याचें ब्रह्मविवरण । समजोन घ्यावें ॥ २२
जाणत्याचे अलिप्तपण, विदेहलक्षण आणि ब्रह्मविवरण समजून घ्यावे. (२२)

जाणत येक अंतरात्मा । त्याचा काये सांगावा महिमा ।
विद्याकळागुणसीमा । कोणें करावी ॥ २३ ॥
खरे तर एक अंतरात्मा हा एकच जाणता आहे. त्याचा महिमा किती वर्णन करून सांगणार ? त्याच्या ठिकाणी असलेल्या अमर्याद विद्या, कला आणि गुण यांची गणना कोण करू शकेल ? (२३)

परमेश्वरांचे गुणानुवाद । अखंड करावा संवाद ।
तेणेंकरितां आनंद । उदंड होतो ॥ २४ ॥
परमेश्वराच्या गुणानुवादांचे वर्णन परस्परांमध्ये अखंड करून संवाद साधावा. त्यामुळे उदंड आनंद होतो. (२४)

परमेश्वरें निर्मिलें तें । अखंड दृष्टीस पडतें ।
विवरविवरों समजावें तें । विवेकी जनीं ॥ २५ ॥
जे जे परमेश्वराने निर्माण केले आहे, ते ते सतत आपल्या दृष्टीस पडत असते. विवेकी लोकांनी वारंवार विवरण करून त्याचे खरे स्वरूप जाणून घ्यावे. (२५)

जितुकें कांहीं निर्माण जालें । तितुकें जगदेश्वरें निर्मिलें ।
निर्माण वेगळें केलें । पाहिजे आधीं ॥ २६ ॥
जितके काही निर्माण झालेले आहे ते ते सर्व जगदीश्वरानेच निर्मिलेले आहे. कार्य आणि त्याचा कर्ता हे निराळे असतात हे आधी ओळखले पाहिजे. (२६)

तो निर्माण करतो जना । परी पाहों जातां दिसेना ।
विवेकबळें अनुमाना । आणीत जावा ॥ २७ ॥
तो सर्व लोकांना निर्माण करतो, पण त्याला पाहावयाचा प्रयत्न केला तर तो दिसत नाही. म्हणून सूक्ष्म दृष्टीने विचार करून अनुमानाने त्याला जाणण्याचा प्रयत्न करावा. (२७)

त्याचें अखंड लागतां ध्यान । कृपाळुपणें देतो आशन ।
सर्वकाळ संभाषण । तदांशेंचि करावें ॥ २८
त्याचे अखंड ध्यान लागले की तो कृपाळूपणे खायला, प्यायला देतो. योगक्षेम चालवतो. सर्व काळ साधकाने त्या जगदीश्वरासंबंधीच संभाषण करावे. (२८)

ध्यान धरीना तो अभक्त । ध्यान धरील तो भक्त ।
संसारापासुनी मुक्त । भक्तांस करी ॥ २९
जो सतत अनुसंधान करतो, ध्यान धरतो तो भक्त जाणावा. जो ध्यान धरीत नाही तो अभक्त जाणावा. त्याचे ध्यान धरले असता तो ध्यान करणा-या, भक्ताला संसारापासून मुक्त करतो. (२९)

उपासनेचे सेवटीं । देवां भक्तां अखंड भेटी ।
अवुभवी जाणेल गोष्टी । प्रत्ययाची ॥ ३० ॥
उपासनेच्या शेवटी म्हणजे जेव्हा उपासकाचा वेगळेपणाचा भाव नष्ट होतो अर्थात त्याचे आत्म्याशी पूर्ण तादात्म्य होते, तेव्हा देवाची आणि भक्ताची अखंड भेट होते. या अनुभवाच्या गोष्टी अनुभवीच जाणतो. (३०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
सर्वसंगनिरूपणनाम समास दुसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘सर्वज्ञसंगनिरूपणनाम’ समास दुसरा समाप्त.


समास तिसरा : निस्पृहशिकवण
॥ श्रीराम ॥

दुल्लभ शरीरीं दुल्लभ आयुष्य । याचा करूं नये नास ।
दास म्हणे सावकास । विवेक करावा ॥ १ ॥
सर्व शरीरात नरदेह हा अत्यंत दुर्लभ आहे. त्यात आयुष्य मिळणे हे आणखीच दुर्लभ आहे. म्हणून याचा नाश करू नये. श्रीरामदास म्हणतात की, म्हणून सावकाश विवेक करावा. (१)

न पाहातां उत्तम विवेक । अवघा होतो अविवेक ।
अविवेकें प्राणी रंक । ऐसा दिसे ॥ २ ॥
जर उत्तम प्रकारे विवेक केला नाही, तर सर्व अविवेक होतो. अविवेकाने प्राणी रंकासारखा म्हणजे भिकाऱ्यासारखा दीन दिसतो. (२)

हें आपलें आपण केलें । आळसें उदास नागविलें ।
वाईट संगतीनें बुडविलें । देखत देखतां ॥ ३ ॥
असे करणे म्हणजे आपले आपणच नुकसान करणे आहे. आळसाने आणि उदासीन वृत्तीमुळे माणूस नागवला जातो आणि वाईट संगत जर मिळाली तर त्याचा बघता बघता नाश होतो. (३)

मूर्खपणाचा अभ्यास जाला । बाष्कळपणें घातला घाला ।
काम चांडाळा उठिला । तरुणपणीं ॥ ४ ॥
मूर्खपणा अंगवळणी पडतो. त्यातच स्वच्छंदपणाने हल्ला चढवला आणि त्यात तरुणपणी कामविकाररूपी चांडाळ बळावला, तर मग काय होणार ? (४)

मूर्ख आळसी आणि तरुणा । सर्वांविषीं दैन्यवाणा ।
कांहीं मिळेना कोणा । काये म्हणावें ॥ ५ ॥
एखादा माणूस मूर्ख, आळशी आणि तरुण, पण सर्व बाबतीत दैन्यवाणा असतो आणि तरी कोणाशीही त्याचे पटत नाही. अशाला काय म्हणावे ? (५)

जें जें पाहिजे तें तें नाहीं । अन्नवस्त्र तेंहि नाहीं ।
उत्तम गुण कांहींच नाहीं । अंतर्यामीं ॥ ६ ॥
जे जे प्रपंचात आवश्यक असते, ते ते त्याच्याजवळ नसते. कमीत कमी अन्न-वस्त्र असावे तर तेही नाही आणि अंतर्यामी काही उत्तम गुणही नाही. (६)

बोलतां येना बैसतां येना । प्रसंग कांहींच कळेना ।
शरीर मन हें वळेना । अभ्यासाकडे ॥ ७ ॥
त्याला धड बोलता येत नाही, धड बसता येत नाही. कुठल्या प्रसंगी कसे वागावे हेही कळत नाही आणि शरीर आणि मन अभ्यासाकडे वळत नाही. (७)

लिहिणें नाहीं वाचणें नाहीं । पुसणें नाहीं सांगणें नाहीं ।
नेमस्तपणाचा अभ्यास नाहीं । बाष्कळपणें ॥ ८ ॥
लिहायला येत नाही, वाचायला येत नाही, कुणाला काही विचारायला येत नाही अथवा कुणी काही विचारले तर सांगायला येत नाही. स्वच्छंदपणामुळे नियमितपणाचे वळण नाही. (८)

आपणांस कांहींच येना । आणी सिकविलेंहि मानेना ।
आपण वेडा आणि सज्जना । बोल ठेवी ॥ ९ ॥
आपल्याला तर काही येत नाही, पण कुणी शिकवू लागले तर तेही त्याला मान्य होत नाही. आपण तर वेडा असतो, पण सज्जनांना नावे ठेवतो. (९)

अंतरी येक बाहेरी येक । ऐसा जयाचा विवेक ।
परलोकाचें सार्थक । कैसें घडे ॥ १० ॥
आत एक असते, बाहेर दुसरेच काही दाखवतो. असा विवेक ज्याच्या ठिकाणी असतो, त्याचे परलोकी सार्थक कसे होईल ? (१०)

आपला संसार नासला । मनामधें प्रस्तावला ।
तरी मग अभ्यास केला । पाहिजे विवेकाचा ॥ ११ ॥
अशा माणसाच्या संसाराची दैना, दुर्दशा होते. अशा वेळी जर त्याला मनामध्ये पश्चात्ताप झाला, तर मग त्याने विवेकाचा अभ्यास करणे आवश्यक असते. (११)

येकाग्र करूंनिया मन । बळेंचि धरावें साधन ।
येत्‍नीं आळसाचें दर्शन । होऊंच नये ॥ १२ ॥
अशा माणसाने मन एकाग्र करून बळेच साधन करण्यास आरंभ करावा. आळसाचे दर्शनसुद्धा होणार नाही यासाठी त्याने कसून प्रयत्न करावा. (१२)

अवगुण अवघेचि सांडावे । उत्तम गुण अभ्यासावे ।
प्रबंद पाठ करीत जावें । जाड अर्थ ॥ १३ ॥
सर्व अवगुणांचा त्याग करावा. उत्तम गुणांचा अभ्यास करावा. अर्थगंभीर असे प्रबंध पाठ करीत जावेत. (१३)

पदप्रबंद श्लोकप्रबंद । नाना धाटी मुद्रा छंद ।
प्रसंगज्ञानेंचि आनंद । होत आहे ॥ १४ ॥
पदप्रबंध, श्लोकप्रबंध, नाना धाटी, मुद्रा, छंद वगैरे पाठ करावेत व त्यांचा प्रसंगानुसार उपयोग केल्याने ऐकणाऱ्यांना आनंद होतो. (१४)

कोणे प्रसंगीं काये म्हणावें । ऐसें समजोन जाणावें ।
उगेंचि वाउगें सिणावें । कासयासी ॥ १५ ॥
कुठल्या प्रसंगी काय म्हणावे, हे नीट समजून जाणून घ्यावे व त्याप्रमाणे करावे. अन्यथा उगीच व्यर्थ शिणण्यात काय अर्थ आहे ? (१५)

दुसयाचें अंतर जाणावें । आदर देखोन म्हणावें ।
जें आठवेल तें गावें । हें मूर्खपण ॥ १६ ॥
दुसयाचे मनोगत जाणून घ्यावे. आपल्या म्हणण्याविषयी आदर आहे की नाही, हे पाहून आदर असेल तरच म्हणावे. उगीच जे आठवेल ते कुणी न सांगताच गाणे हे मूर्खपणाचे आहे. (१६)

जयाची जैसी उपासना । तेंचि गावें चुकावेना ।
रागज्ञाना ताळज्ञाना । अभ्यासावें ॥ १७ ॥
ज्याची जी उपासना असेल, त्या देवतेसंबंधीच गावे. तेथे चूक करू नये. रागज्ञान, तालज्ञान यांचाही अभ्यास करावा. (१७)

साहित संगीत प्रसंग मानें । करावीं कथेंचीं घमशानें ।
अर्थांतर श्रवणमननें । काढीत जावें ॥ १८ ॥
साहित्य, संगीत यांचा प्रसंगानुसार मेळ साधून धडाक्याने कथेची लयलूट करावी. वारंवार श्रवण-मनन करून अर्थांतर काढीत जावे. (१८)

पाठ उदंडचि असावें । सर्वकाळ उजळीत जावें ।
सांगितलें गोष्टीचें असावें । स्मरण अंतरीं ॥ १९ ॥
पाठांतर भरपूर असावे आणि वारंवार त्याची उजळणी करावी. आपण काय सांगितले याचे अंतरात स्मरण असावे. (१९)

अखंड येकांत सेवावा । ग्रन्थमात्र धांडोळावा ।
प्रचित येईल तो घ्यावा । अर्थ मनीं ॥ २० ॥
अखंड एकांत सेवावा आणि सद्ग्रंथांचा सखोल अभ्यास करावा. ज्याचा अनुभव येईल, तोच अर्थ मनात निश्चित करावा. (२०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
निस्पृहशिकवणनिरूपणनाम समास तिसरा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘निःस्पृहसिकवणनाम’ समास तिसरा समाप्त.


समास चौथा : देहदुर्लभनिरूपण
॥ श्रीराम ॥

देह्याकरितां गणेशपूजन । देह्याकरितां शारदावंदन ।
देह्याकरितां गुरु सज्जन । संत श्रोते ॥ १ ॥
या देहात अंतरात्मा असतो, म्हणूनच त्याला उद्देशून गणेशपूजन, शारदावंदन, तसे गुरु, सज्जन, संत, श्रोते यांना वंदन वगैरे केले जाते. (१)

देह्याकरितां कवित्वें चालती । देह्याकरितां अधेनें करिती ।
देह्याकरितां अभ्यासिती । नाना विद्या ॥ २ ॥
देह आणि देहात राहाणारा जो अंतरात्मा त्याच्यासाठीच कवित्व निर्माण होते. अध्ययन केले जाते. नाना विद्यांचा अभ्यास केला जातो. (२)

देह्याकरितां ग्रंथलेखन । नाना लिपीवोळखण ।
नाना पदार्थशोधन । देह्याकरितां ॥ ३ ॥
याच्याकरिताच ग्रंथलेखन, लिपीचे ज्ञान, नाना पदार्थांचे शोधन घडते. (३)

देह्याकरितां माहांज्ञानी । सिद्ध सधु ऋषी मुनी ।
देह्याकरितां तीर्थाटणीं । फिरती प्राणी ॥ ४ ॥
त्याच्याकरताच महाज्ञानी, सिद्ध, साधू, ऋषी, मुनी साधना करतात. तीर्थाटने करीत हिंडतात. (४)

देह्याकरितां श्रवण घडे । देह्याकरितां मननीं पवाडे ।
देह्याकरितां देहीं आतुडे । मुख्य परमात्मा ॥ ५ ॥
अंतरात्म्यामुळेच श्रवण घडते, मनन केले जाते, आणि याच देहात मुख्य परमात्म्याची प्राप्ती होते. (५)

देह्याकरितां कर्ममार्ग । देह्याकरितां उपासनामार्ग ।
देह्याकरितां ज्ञानमार्ग । भूमंडळीं ॥ ६ ॥
अंतरात्म्यामुळेच या भूमंडळावर कर्ममार्ग, उपासना मार्ग आणि ज्ञानमार्ग प्रचलित झाले आहेत. (६)

योगी वीतरागी तापसी । देह्याकरितां नाना सायासी ॥
देह्याकरितां आत्मयासी । प्रगटणें घडे ॥ ७ ॥
अंतरात्म्यामुळेच योगी, तापसी, वैराग्यसंपन्न लोक नाना सायास करतात आणि त्याच्यामुळेच आत्मारामास प्रगट व्हावे लागते. (७)

येहलोक आणि परलोक । देह्याकरितां सकळ सार्थक ।
देहेंविण निरार्थक । सकळ कांहीं ॥ ८ ॥
इहलोक आणि परलोक यांचे सार्थक अंतरात्म्यामुळेच होते. तो नसेल, तर सर्व काही निरर्थक ठरते. (८)

पुरश्चरणें अनुष्ठानें । गोरांजनें धूम्रपानें ।
सीतोष्ण पंचाग्नी साधणें । देह्याकरितां ॥ ९ ॥
अंतरात्म्यामुळेच पुरश्चरणे, अनुष्ठाने, गोरांजने, धूम्रपाने, शीतोष्ण सहन करणे, पंचाग्निसाधन इत्यादी केली जातात. (९)

देह्याकरितां पुण्यसीळ । देह्याकरितां पापी केवळ ।
देह्याकरितां अनर्गळ । सुचिस्मंत ॥ १० ॥
पुण्यशील अथवा अत्यंत पापी, अनाचारी किंवा सदाचारी या सर्वांत अंतरात्माच वर्तत असतो. (१०)

देह्याकरितां अवतारी । देह्याकरितां वेषधारी ।
नाना बंडें पाषांडें करी । देह्याकरितां ॥ ११ ॥
अवतारी आणि वेषधारी, अनेक प्रकारची बंडे आणि पाखंडे करणारे यांतही अंतरात्माच कर्ता असतो. (११)

देह्याकरितां विषयभोग । देह्याकरितां सकळ त्याग ।
होती जाती नाना रोग । देह्याकरितां ॥ १२ ॥
अंतरात्माच निरनिराळे विषयभोग करतो. तोच सर्वस्वाचा त्यागही करतो किंवा नाना रोगही त्याच्यामुळेच येतात आणि जातात. (१२)

देह्याकरितां नवविधा भक्ती । देह्याकरितां चतुर्विधा मुक्ती ।
देह्याकरितां नाना युक्ती । नाना मतें ॥ १३ ॥
अंतरात्म्यामुळेच नवविधा भक्ती, चतुर्विधा मुक्ती तसेच नाना मते आणि नाना युक्ती केल्या जातात. (१३)

देह्याकरितां दानधर्म । देह्याकरितां नाना वर्म ।
देह्याकरितां पूर्वकर्म । म्हणती जनीं ॥ १४ ॥
अंतरात्म्यामुळेच दानधर्म केला जातो. त्याच्यामुळेच नाना रहस्ये उलगडतात आणि लोक पूर्वजन्मातील कर्मासंबंधी अनुमान करू लागतात. (१४)

देह्याकरितां नाना स्वार्थ । देह्याकरितां नाना अर्थ ।
देह्याकरितां होईजे वेर्थ । आणी धन्य ॥ १५ ॥
अंतरात्म्यामुळेच नाना प्रकारे स्वार्थ साधला जातो, नाना पदार्थ मिळवले जातात, मनुष्यजन्म व्यर्थही जाऊ शकतो अथवा धन्यही होऊ शकतो. (१५)

देह्याकरितां नाना कळा । देह्याकरितां उणा आगळा ।
देह्याकरितां जिव्हाळा । भक्तिमार्गाचा ॥ १६ ॥
अंतरात्म्यामुळेच नाना कला शिकता येतात, मनुष्य उणा किंवा आगळा ठरतो. त्याच्यामुळेच भक्तिमार्गासंबंधी जिव्हाळा उत्पन्न होतो. (१६)

नाना सन्मार्गसाधनें । देह्याकरितां तुटती बंधनें ।
देह्याकरितां निवेदनें । मोक्ष लाभे ॥ १७ ॥
अंतरात्म्यामुळेच नाना सन्मार्गाची साधने करता येतात, त्यामुळेच बंधने तुटतात आणि अंतरात्म्यामुळेच आत्मनिवेदन घडून मोक्ष लाभतो. (१७)

देहे सकळामधें उत्तमु । देहीं राहिला आत्मारामु ।
सकळां घटीं पुरुषोत्तमु । विवेकी जाणती ॥ १८ ॥
मानवदेह सर्व देहांत उत्तम आहे. त्यातच आत्माराम राहातो. विवेकी पुरुष असतात ते सर्व प्राणिमात्रांत पुरुषोत्तम आहे, हे जाणतात. (१८)

देह्याकरितां नाना कीर्ती । अथवा नाना अपकीर्ती ।
देह्याकरितां होती जाती । अवतारमाळिका ॥ १९ ॥
अंतरात्म्यामुळेच कीर्ती मिळते अथवा अनेक प्रकारे अपकीर्ती होते. त्याच्यामुळेच अवतारांच्या मालिका म्हणजे अनेकानेक अवतार होत असतात. (१९)

देह्याकरितां नाना भ्रम । देह्याकरितां नाना संभ्रम ।
देह्याचेन उत्तमोत्तम । भोगिती पदें ॥ २० ॥
अंतरातत्यामुळेच नाना भ्रम, अथवा नाना संभ्रम उत्पन्न होतात आणि त्याच्यामुळेच उत्तमोत्तम पदांची प्राप्तीही होते. (२०)

देह्याकरितां सकळ कांहीं । देह्याविण कांहीं नाहीं ।
आत्मा विरे ठाईं ठाईं । नव्हताच जैसा ॥ २१ ॥
देहधारी अंतरात्म्यामुळेच सर्व काही घडते. तो नसेल तर काहीच होऊ शकत नाही. आत्मा जेथल्या तेथे जणू काही नव्हताच अशा प्रकारे विरून जातो. (२१)

देहे परलोकींचें तारूं । नाना गुणांचा गुणागरु ।
नाना रत्नांचा विचारु । देह्याचेनी ॥ २२ ॥
मनुष्यदेह हे परलोक प्राप्त करून देणारे तारू आहे. तो नाना गुणांचे आगर आहे. पण अंतरात्म्यामुळेच नाना रत्नांचा विचार केला जातो. (२२)

देह्याचेन गायेनकळा । देह्याचेन संगीतकळा ।
देह्याचेन अंतर्कळा । ठाईं पडे ॥ २३ ॥
अंतरात्म्यामुळेच गायनकला, संगीतकला आणि अंतर्कला म्हणजे ज्ञान प्राप्त होते. (२३)

देहे ब्रह्मांडाचें फळ । देहे दुल्लभचि केवळ ।
परी या देह्यास निवळ । उमजवावें ॥ २४ ॥
देह (मानव देह) हे ब्रह्मांडाचे फळ आहे. मानवदेह हा केवळ अत्यंत दुर्लभ आहे, पण यात असलेल्या देहीला म्हणजे अंतरात्म्याला हे उमजवावे. (२४)

देह्याकरितां लहनथोर । करिती आपुलाले व्यापार ।
त्याहिमधें लाहानथोर । कितीयेक ॥ २५ ॥
अंतरात्म्यामुळे सर्व लहान-थोर आपापले व्यवहार करतात. त्या व्यवहारातही लहानथोर असे कित्येक प्रकार असतात. (२५)

जे जे देहे धरुनी आले । ते ते कांहीं करून गेले ।
हरिभजनें पावन जाले । कितीयेक ॥ २६ ॥
जे जे मानवदेह धरून आले ते काही ना काही कार्य करून गेले. कित्येक हरिभजनाने पावन झाले. (२६)

अष्टधा प्रकृतीचें मूळ । संकल्परूपचि केवळ ।
नाना संकल्पें देहेफळ । घेऊन आलें ॥ २७ ॥
अष्टधा प्रकृतीचे मूळ केवळ संकल्परूपच आहे. तसेच नाना संकल्पच देहरूप फळ घेऊन येतात. (२७)

हरिसंकल्प मुळीं होता । तोचि फळीं पाहावा आतां ।
नाना देह्यांतरीं तत्वता । शोधितां कळे ॥ २८ ॥
‘एकोऽहं बहु स्याम्’ हा हरिसंकल्प मुळात स्फुरला, तीच मूळ माया होय. आपल्या देहातही तोच मूळचा मीपणाचा संकल्प अंशरूपाने आहे. नाना देहांतील तत्त्वांचा शोध घेतला की हे कळून येते. (२८)

वेलाचे मुळीं बीज । उदकरूप वेली समज ।
पुढें फळामधें बीज । मुळींच्या अंशें ॥ २९ ॥
एखाद्या वेलाच्या मुळात बीज असते. नंतर ती वेल पाण्यामुळेच वाढते. म्हणन वेल ही उदकरूप समजावी. वेलीला फळ लागले की त्यात मुळाच्या अंशामुळे बीज आढळून येते. (२९)

मुळाकरितां फळ येतें । फळाकरितां मूळ होतें ।
येणेंकरितां होत जातें । भूमंडळ ॥ ३० ॥
मूळ असते, म्हणून फळ येते आणि फळामळे म्हणजे त्यातील बीजामुळे मूळ उत्पन्न होते. याप्रमाणे भूमंडळातील सर्व पदार्थ होत- जात असतात. (३०)

असो कांहीं येक करणें । कैसें घडे देह्याविणें ।
देहे सर्थकीं लावणें । म्हणिजे बरें ॥ ३१ ॥
असो. हे राहू दे. काहीही क्रिया देहाशिवाय आणि देहीशिवायही कशी घडणार ? म्हणून देह सार्थकी लावावा हे बरे. (३१)

आत्म्याकरितां देहे जाला । देह्याकरितां आत्मा तगला ।
उभययोगें उदंड चालिला । कार्यभाग ॥ ३२ ॥
आत्म्याकरिता देह उत्पन्न झाला आणि देहामुळेच आत्मा टिकू शकला. याप्रमाणे देह आणि अंतरात्मा या उभयतांच्या एकत्र येण्याने उदंड कार्यभाग चालतो. (३२)

चोरून गुप्तरूपें करावें । तें आत्मयासी पडे ठावें ।
कर्तुत्व याचेन स्वभावें । सकळ कांहीं ॥ ३३ ॥
चोरून गुप्तरूपाने काही करू म्हणावे, तर ते अंतरात्म्यास लगेच कळते. अंतरात्म्यामुळेच स्वाभाविकरीत्या सर्व कार्य घडते. (३३)

देह्यामधें आत्मा असतो । देहे पूजितां आत्मा तोषतो ।
देहे पीडितां आत्मा क्षोभतो । प्रत्यक्ष आतां ॥ ३४ ॥
देहामध्ये अंतरात्मा असतो. देहाची पूजा केली की तो प्रसन्न होतो. देहाला पीडा केली तर अंतरात्मा क्षोभतो. हे आपल्याला प्रत्यक्ष दिसून येते. (३४)

देह्यावेग्ळी पूजा पावेना । देह्याविण पूजा फावेना ।
जनीं जनार्दन म्हणोनी जना । संतुष्ट करावें ॥ ३५ ॥
देहाशिवाय आत्म्याला पूजा पावत नाही. देहाशिवाय पूजा करताही येत नाही. सर्वजनांमध्ये अंतरात्म्याच्या रूपाने जनार्दन राहतो. म्हणून सर्व जनांना संतुष्ट करावे. (३५)

उदंड प्रगटला विचार । धर्मस्थापना तदनंतर ।
तेथेंच पूजेस अधिकार । पुण्यशरीरीं ॥ ३६ ॥
पुण्यशरीराच्या ठिकाणीच प्रथम उदंड विचार प्रगटतो. त्यानंतर त्यांच्याकडूनच धर्मस्थापना होते. अशा पुरुषांनाच पूजा घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. (३६)

सगट भजन करूं येतें । तरी मूर्खपण आंगीं लागतें ।
गाढवासी पूजितां कळतें । काये त्याला ॥ ३७ ॥
सरसकट सर्वांचे भजन-पूजन करू म्हटले, तर ते मूर्खपणाचे ठरते. गाढवाची पूजा केली, तर त्याला त्यात काहीच कळत नाही. (३७)

पूज्य पूजेसी अधिकार । उगेचि तोषवावे इतर ।
दुखऊं नये कोणाचें अंतर । म्हणिजे बरें ॥ ३८ ॥
जे पूज्य आहेत, त्यांनाच पूजा घेण्याचा अधिकार आहे. पण इतरांनाही उगीच मान देऊन संतुष्ट करावे. कोणाचेही मन दुखवू नये म्हणजे बरे. (३८)

सकळ जगदांतरींचा देव । क्षोभता राहाव्या कोठें ठाव ।
जनावेगळा जनास उपाव । आणीक नाहीं ॥ ३९ ॥
सर्व जगाचा देव अंतरात्मा व्याप्त आहे. तो जर क्षोभला तर राहण्यास जागाच कोठे मिळणार ? माणसांच्यावाचून माणसांचे चालणारच नाही. म्हणून त्यांना संतुष्ट करण्याशिवाय दुसरा उपाय नाही. (३९)

परमेश्वराचे अनंत गुण । मनुष्यें काये सांगावी खूण ।
परंतु अध्यात्मग्रंथश्रवण । होतां उमजे ॥ ४० ॥
परमेश्वराचे गुण अनंत आहेत. माणसाला त्याचे गुणवर्णन संपूर्णपणे करताच येणार नाही. पण अध्यात्मग्रंथाचे श्रवण केल्याने त्या परमात्म्याच्या स्वरूपाचे थोडे फार ज्ञान होते. (४०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
देहदुर्लभनिरूपणनाम समास चौथा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘देहेदुल्लभनिरूपणनाम’ समास चौथा समाप्त.


समास पाचवा : करंटपरीक्षानिरूपण
॥ श्रीराम ॥

धान्य उदंड मोजिलें । परी त्या मापें नाहीं भक्षिलें ।
विवरल्यविण तैसें जालें । प्राणीमात्रासी ॥ १ ॥
मापाने उदंड धान्य मोजले जाते, पण माप त्यातील काहीच खाऊ शकत नाही. त्याप्रमाणे जे श्रवण केले जाते, त्याचे माणसाने जर मनन केले नाही, तर त्याचा त्याला काही उपयोग होत नाही. (१)

पाठ म्हणतां आवरेना । पुसतां कांहींच कळेना ।
अनुभव पाहातां अनुमाना- । मधें पडें ॥ २ ॥
एखाद्याचे पाठांतर इतके असते की, तो म्हणू लागला की आवरतच नाही. पण त्याला अनुभव काहीच नसतो. तो नुसती अनुमाने करीत असतो. (२)

शब्दरत्नें परीक्षावीं । प्रत्ययाचीं पाहोन घ्यावीं ।
येर ते अवघीं सांडावीं । येकीकडे ॥ ३ ॥
म्हणून पाठांतर करतानाही शब्दरूपी रत्नांची नीट परीक्षा करावी. जे अनुभवाचे बोल असतील ते निवडून घ्यावेत. इतर सर्व एकीकडे सोडून द्यावे. (३)

नावरूप आवघें सांडावें । मग अनुभवास मांडावें ।
सार असार येकचि करावें । हें मूर्खपण ॥ ४ ॥
नामरूपात्मक सर्व दृश्य मायिक असल्याने ते बाजूस सारावे आणि मग सारासारविवेकाने अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. सार आणि असार सर्व एकच करणे हा मूर्खपणा आहे. (४)

लेखकें कुळ समजवावें । किंवा उगेंच वाचावें ।
येणें दृष्टांतें समजावें । कोणींतरी ॥ ५ ॥
कुळकाने खत, पत्रे वगैरे निरक्षर शेतकरी वगैरेंना नीट समजावून द्यावे हे बरे, की न समजावता उगीच वाचणे बरे ? या दृष्टांतावरून माणसाने काय ते समजून घ्यावे. (५)

जेथें नाहीं समजावीस । तेथें आवघी कुसमुस ।
पुसों जातां वसवस । वक्ता करी ॥ ६ ॥
जेथे लोकांना नीट समजावून सांगणे वक्त्याला जमत नाही, तेथे लोक नाराज होऊन कुसमुस करू लागतात. आणि ते विचारू लागले की वक्ता मात्र चिडचिड करू लागतो. (६)

नाना शब्द येकवटिले । प्रचीतीवीण उपाव केले ।
परी ते अवघेचि वेर्थ गेले । फडप्रसंगीं ॥ ७ ॥
नाना ग्रंथांतील शब्दभांडार एकत्र केले आणि स्वत:ला अनुभव नसताना लोकांपुढे मोठेपणा मिरविण्यासाठी प्रस्तुत केले, तर ते सर्व सभेत व्यर्थ ठरते. (७)

पसेवरी वैरण घातलें । तांतडीनें जातें वोडिलें ।
तेणें पीठ बारीक आलें । हें तो घडेना ॥ ८ ॥
जात्यात पशापेक्षाही अधिक धान्य एकाच वेळी घालून तातडीने घाईघाईने जाते ओढले आणि बारीक पीठ दळले गेले, असे तर कधी घडूच शकत नाही. (८)

घांसामागें घांस घातला । आवकाश नाहीं चावायाला ।
अवघा बोकणा भरिला । पुढें कैसें ॥ ९ ॥
किंवा जेवताना जर चावायला अवसरन देता घासामागे घास घेऊन तोंड भरले, तर पुढे कशी फजिती होईल ! (९)

ऐका फडनिसीचें लक्षण । विरंग जाऊं नेदी क्षण ।
समस्तांचें अंतःकर्ण । सांभाळीत जावें ॥ १० ॥
आता फडणीशीचे (हिशेबी कारभाऱ्याचे) लक्षण ऐका ! फडणीसाने एक क्षणही व्यर्थ जाऊ देऊ नये. सर्व लोकांचे अंत:करण त्याने सांभाळीत असावे. (१०)

सूक्ष्म नामें सुखें घ्यावीं । तितुकीं रूपें वोळखावीं ।
वोळखोन समजवावीं । श्रोतयांसी ॥ ११ ॥
वक्त्याने अध्यात्माचे निरूपण करताना सूक्ष्म तत्त्वांची नावे खुशाल घ्यावीत, पण त्याने त्यांचे रूपही स्वतः नीट ओळखावे आणि नंतर श्रोत्यांनाही ते नीट समजवावे. (११)

समशा पुरतां सुखी होती । श्रोते अवघे आनंदती ।
अवघे क्षणक्षणा वंदिती । गोसावियांसी ॥ १२ ॥
आपापल्या शंकांचे किंवा समस्यांचे समाधान झाले की श्रोते सुखी होतात. सर्व श्रोत्यांना आनंद होतो आणि ते सर्व वारंवार वक्त्याला वंदन करू लागतात. (१२)

समशा पुरतां वंदिती । समशा न पुरतां निंदिती ।
गोसांवी चिणचिण करिती । कोण्या हिशेबें ॥ १३ ॥
समस्यांचे समाधान झाले, तर सर्व वंदन करतात. समस्यांचे समाधान झाले नाही, तर निंदा करू लागतात. मग वक्त्याने उगीच तक्रार का बरे करावी ? (१३)

शुध सोनें पाहोन घ्यावें । कसीं लाउनी तावावें ।
श्रवणमननें जाणावें । प्रत्ययासी ॥ १४ ॥
सोने घेताना ते शुद्ध आहे ना, हे पाहून घ्यावे. कसाला लावून, तापवून त्याची परीक्षा करावी. त्याप्रमाणे जे श्रवण-मनन केलेले असेल, ते अनुभवाच्या कसोटीवर पारखून घ्यावे. साक्षात अनुभव घेऊन त्यासंबंधी निश्चय करावा. (१४)

वैद्याची प्रचित येना । वेथा परती होयेना ।
आणी रागेजावें जना । कोण्या हिशेबें ॥ १५ ॥
वैद्याने औषध दिले, पण त्याची प्रचीती येत नसेल आणि व्यथा दूर होत नसेल, तर त्या रोग्याने इतर लोकांवर राग काढावा हा कुठला हिशोब ? (१५)

खोटें कोठेंचि चालेना । खोटें कोणास मानेना ।
याकारणें अनुमाना । खरें आणावें ॥ १६ ॥
खोटे कोठेच चालत नाही. खोटे कुणालाही मान्य होत नाही. म्हणून अनुमान अनुभवास आणावे. तरच ते खरे म्हणावे. (१६)

लिहिणें न येतां व्यापार केला । कांहीं येक दिवस चालिला ।
पुसता सुरनीस भेटला । तेव्हां खोटें ॥ १७ ॥
एखाद्या माणसाला लिहिणे-वाचणे येत नसता व्यापार केला. तो काही दिवस चालला. पुढे त्यास हिशेबतपासनीस भेटला आणि त्याने चौकशी केली, तेव्हा व्यापार खोटा आहे हे कळले. (१७)

सर्व आवघें हिशेबीं ठावें । प्रत्यय साक्षीनें बोलावें ।
मग सुरनीसें काये करावें । सांगाना ना ॥ १८ ॥
हिशोब पाहिला की व्यापाराबद्दल खरे-खोटे सर्व काही कळून येते. त्यावरून वक्त्याने बोध घ्यावा आणि अनुभवावरून त्याच्या साक्षीने आपले म्हणणे मांडावे. हिशोब जर नीट ठेवलेले नसतील तर हिशेबतपासनीस तरी काय करू शकतो ? सांगा ना ! (१८)

स्वये आपणचि गुंते । समजावीस कैसे होते ।
नेणतां कोणीयेक ते । आपदों लागती ॥ १९ ॥
आपल्या स्वत:लाच जर विषय समजलेला नसेल, स्वत:चाच जर गोंधळ होत असेल, तर तो श्रोत्यांना काय समजावू शकणार ? असे जे नेणते वक्ते असतात, ते कष्टी होतात. (१९)

बळेंविण युद्धास गेला । तो सर्वस्वें नागवला ।
शब्द ठेवावा कोणाला । कोण कैसा ॥ २० ॥
ज्याच्या ठिकाणी पराक्रम नाही, तो युद्धासाठी गेला, तर सर्वस्वी नागवला जातो. मग लोकांना दोष कोणी आणि कसा द्यावा ? (२०)

जे प्रचीतीस आलें खरें । तेंचि घ्यावें अत्यादरें ।
अनुभवेंविण जें उत्तरें । तें फलकटें जाणावीं ॥ २१ ॥
जे आपल्या प्रचीतीला खरे म्हणून ठरते, त्याचा आदराने स्वीकार करावा. अनुभवाशिवायच जे बोलणे, ते फोलपटाप्रमाणे त्याज्य समजावे. (२१)

सिकऊं जातां राग चढे । परंतु पुढें आदळ घडे ।
खोटा निश्चय तात्काळ उडे । लोकामधें ॥ २२ ॥
अशी बिनबुडाची वचने बोलणाऱ्यांना शिकवायला जावे, तर त्यांना राग येतो. परंतु पुढे मात्र त्यांना अद्दल घडते. लोकांमध्ये खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून कितीही निश्चयपूर्वक मांडल्या, तरी त्या टिकू शकत नाहीत. (२२)

खरें सांडुनी खोटें घेणें । भकाधेस काये उणें ।
त्रिभुवनीं नारायणे । न्याय केला ॥ २३ ॥
जो खरे सोडून खोटे घेतो, त्याच्या फजितीस काय उणे ? त्रिभुवनात नारायणानेच हा न्याय केला आहे की, खोटे कधी टिकून राहत नाही. (२३)

तो न्याय सांडितां सेवटीं । अवघें जगचि लागे पाठीं ।
जनीं भंडभांडों हिंपुटीं । किती व्हावें ॥ २४ ॥
तो न्याय जाणून घेतला नाही आणि खोटेच उचलून धरले तर शेवटी सर्व लोक त्याच्या पाठीस लागतात आणि लोकांशी भांडता भांडता तो अगदी बेजार होतो. (२४)

अन्यायें बहुतांस पुरवलें । हें देखिलें ना ऐकिलें ।
वेडें उगेंचि भरीं भरलें । असत्याचे ॥ २५ ॥
अन्यायाने कुणाचे भले झाले आहे. असे कधी पाहिलेही नाही वा ऐकलेलेही नाही. पण वेडे लोक उगीचच असत्याच्या भरीस लागतात. (२५)

असत्य म्हणिजे तेंचि पाप । सत्य जाणावें स्वरूप ।
दोहींमधें साक्षप । कोणाचा करावा ॥ २६ ॥
असत्य हेच पाप होय आणि सत्य हेच स्वस्वरूप जाणावे. या दोन्हीमध्ये कोणाचा साक्षेप करावा ? (२६)

मायेमधें बोलणें चालणें साचें । माया नस्तां बोलणें कैंचें ।
याकारणें निशब्दाचें । मूळ शोधावें ॥ २७ ॥
आपले बोलणे-चालणे हे सर्व मायेमध्ये खरे असते म्हणजे याला केवळ व्यावहारिक सत्ता आहे. मायाच नाहीशी झाली की बोलणे- चालणे कुठले ? पारमार्थिकदृष्ट्या विचार केला की जग झालेलेच नाही हे पारमार्थिक सत्य आहे. मग जे झालेलेच नाही, त्यातील व्यवहार तरी सत्य कसा असणार ? म्हणन नि:शब्दाचे म्हणजे शब्दातीत अशा परब्रह्माचे मूळ शोधावे. (२७)

वच्यांश जाणोनि सांडावा । लक्ष्यांश विवरोन घ्यावा ।
याकारणें निशब्द मुळाचा गोवा । आढळेना ॥ २८ ॥
अध्यात्मनिरूपणातील वाच्यांश जाणून घ्यावा व मग त्याचा त्याग करावा. लक्ष्यांशाचे विवरण करून तो घ्यावा. म्हणजे मग निःशब्द जे मूळ परब्रह्म, त्याविषयी काही घोटाळा उरत नाही. (२८)

अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष । सांडून अलक्षीं लावावें लक्ष ।
मननसीळ परम दक्ष । तोचि जाणे ॥ २९ ॥
अष्टधा प्रकृती पूर्वपक्ष म्हणजे लटकी किंवा मिथ्या समजून तिचा निरास करावा आणि अलक्ष जे परब्रह्म त्याच्याकडे लक्ष लावावे. अशा रीतीने जो अत्यंत सावधपणे मनन करतो, तोच स्वानुभवाने त्या परब्रह्मास जाणतो. (२९)

नाना भूस आणि कण । येकचि म्हणणें अप्रमाण ।
रस चोवडिया कोण । शाहाणा सेवी ॥ ३० ॥
अनेक प्रकारचे भूस आणि धान्याचे कण एकच होत हे म्हणणे अप्रमाण आहे. रस सोडून चोयट्या कोणता शहाणा सेवन करील ? (३०)

पिंडीं नित्यानित्य विवेक । ब्रह्मांडीं सारासार अनेक ।
सकळ शोधूनियां येक । सार घ्यावें ॥ ३१ ॥
माणसाने नित्यानित्यविवेकाने पिंडाचा निरास करावा आणि नाना प्रकारे सारासारविवेक करून ब्रह्मांडाचा निरास करावा. सर्व गोष्टींचा शोध घेऊन एकच सार जे परब्रह्म ते घ्यावे. (३१)

मायेकरितां कोणीयेक । अन्वय आणि वीतरेक ।
ते माया नस्तां विवेक । कैसा करावा ॥ ३२ ॥
माया आहे म्हणून अन्वय म्हणजे उभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी अशा प्रकारे दोहोंचा विचार करावा लागतो. जेथे मायाच नाहीशी होते तेथे अन्वयव्यतिरेकाच्या विवेकाचे प्रयोजनच उरत नाही. मायाच नाहीशी होऊन जीवबौक्य झाल्यावर विचार करणाराच कुणी राहत नाही. तर विवेक कसा राहणार ? (३२)

तत्वें तत्व शोधावें । माहांवाकीं प्रवेशावें ।
आत्मनिवेदनें पावावें । समाधान ॥ ३३ ॥
एका तत्त्वाने दुसऱ्या तत्त्वाचा निरास करीत सर्व तत्त्वांचा शोध घ्यावा आणि महावाक्यात प्रवेश करावा म्हणजे ‘अहं ब्रह्मास्मि’ चे निरंतर अनुसंधान करावे आणि शेवटी अनन्य आत्मनिवेदनाने परब्रह्माशी ऐक्य पावून शाश्वत समाधान प्राप्त करावे. (३३)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
करंटपरीक्षानिरूपणनाम समास पांचवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘करंटपरीक्षानिरूपणनाम’ समास पाचवा समाप्त.


समास सहावा : उत्तमपुरुषनिरूपण
॥ श्रीराम ॥

नाना वस्त्रें नाना भूषणें । येणें शरीर श्रृंघारणें ।
विवेकें विचारें राजकरणें । अंतर श्रृंघारिजे ॥ ११ ॥
अफझलखानाच्या वधानंतर श्री शिवाजीराजे श्री समर्थांच्या दर्शनास आले असता हा समास सांगितला. ) श्रीसमर्थ म्हणतात की, अनेक प्रकारची वस्त्रे, नाना आभूषणे यांनी माणूस शरीर शंगारतो. तसेच विवेकाने, विचाराने आणि राजकारणाने त्याने आपले अंतरंगही शृंगारले पाहिजे. (१)

शरीर सुंदर सतेज । वस्त्रें भूषणें केले सज्ज ।
अंतरीं नस्तां च्यातुर्यबीज । कदापि शोभा न पवे ॥ २ ॥
एखाद्याचे शरीर सुंदर, सतेज असेल, ते वस्त्रे, आभूषणे यांनी सजविलेलेही असेल, पण त्याच्या अंतरात चातुर्याचा लेशही नसेल, तर ते शोभून दिसत नाही. (२)

तुंड हेंकाड कठोर वचनी । अखंड तोले साभिमानी ।
न्याय नीति अंतःकर्णीं । घेणार नाहीं ॥ ३ ॥
तोंडाळ, हेकेखोर आणि कठोर शब्द बोलणारा माणूस अखंड अभिमानाने, गर्वाने जणू डोलत असतो. त्याच्या अंत:करणात न्याय, नीती यांना प्रवेश नसतो. (३)

तर्ह्हे सीघ्रकोपी सदा । कदापि न धरी मर्यादा ।
राजकारण संवादा । मिळोंचि नेणें ॥ ४ ॥
तहेवाईक, सदा शीघ्रकोपी माणूस कुणाचीही मर्यादा ठेवत नाही. राजकारणात तो संवाद जोडूच देत नाही. कुणाशी जुळवून घेतच नाही. (४)

ऐसें लौंद बेइमानी । कदापि सत्य नाहीं वचनीं ।
पापी अपस्मार जनीं । राक्षेस जाणावें ॥ ५ ॥
असे दुष्ट बेइमान लोक कधीही खरे बोलत नाहीत. असे पापी आणि पिशाच्चवत दुष्ट म्हणजे भूतलावरील राक्षस जाणावेत. (५)

समयासारिखा समयो येना । नेम सहसा चलेना ।
नेम धरितां राजकारणा । अंतर पडे ॥ ६ ॥
एका प्रसंगासारखा दुसरा प्रसंग येत नसतो, म्हणून कधी कधी एकच नियम लागू पडत नाही. एकाच नियमाचा हट्ट धरला तर राजकारणात अंतर पडते. (६)

अति सर्वत्र वर्जावें । प्रसंग पाहोन चालावें ।
हटनिग्रहीं न पडावें । विवेकीं पुरुषें ॥ ७ ॥
म्हणून सर्वत्र अति वर्ण्य मानावे. जसा प्रसंग असेल त्याला अनुसरून योग्य त्याप्रमाणे वागावे. विवेकी पुरुषाने कुठल्याही गोष्टीचा हट्ट धरू नये. (७)

बहुतचि करितां हट । तेथें येऊन पडेल तट ।
कोणीयेकाचा सेवट । जाला पाहिजे ॥ ८ ॥
एखाद्या गोष्टीविषयी फार हट्ट, दुराग्रह धरला तर आपसात फूट पडते. वेगवेगळे पक्ष निर्माण होतात. त्यांतील कोणता तरी एकच निर्णायक होणे आवश्यक असते. (८)

बरें ईश्वर आहे साभिमानी । विशेष तुळजाभोवानी ।
परंतु विचार पाहोनी । कार्ये करणें ॥ ९ ॥
एक गोष्ट बरी आहे की ईश्वराची आपल्यावर कृपा आहे, तो आपला कैवारी आहे. शिवाय तुळजाभवानीची आपल्यावर विशेष कृपा आहे, पण तरीही आपण विचारपूर्वक कार्य करणे आवश्यक आहे. (९)

अखंडचि सावधाना । बहुत काये करावी सूचना ।
परंतु कांहीं येक अनुमाना । आणिलें पाहिजे ॥ १० ॥
जो अखंडच सावधान असतो, त्याला विशेष सूचना देण्याची, आवश्यकता नसते. परंतु तरीही काही गोष्टीची कल्पना करून त्याप्रमाणे वागणे आवश्यक असते. (१०)

समर्थापासीं बहुत जन । राहिला पाहिजे साभिमान ।
निश्चळ करूनियां मन । लोक असती ॥ ११ ॥
सामर्थ्यसंपन्न पुरुषाजवळ अनेक लोक गोळा होतात. त्यांचा अभिमान राखला पाहिजे, म्हणजे न डळमळणाऱ्या निष्ठेने ते बरोबर राहातात. (११)

म्लेच दुर्जन उदंड । बहुतां दिसाचें माजलें बंड ।
याकार्णें अखंड । सावधान असावें ॥ १२ ॥
दुर्जन, म्लेंच्छ उदंड झाले आहेत आणि दीर्घकाळ त्यांनी बंड माजवले आहे. म्हणून अखंड सावधान राहणे आवश्यक आहे. (१२)

सकळकर्ता तो ईश्वरु । तेणें केला अंगिकारुं ।
तया पुरुषाचा विचारु । विरुअळा जाणे ॥ १३
सर्व गोष्टींचा खरा कर्ता ईश्वरच आहे. त्याने ज्याचा अंगीकार केलेला असतो, त्याने ज्याला आपला असे मानलेले असते, त्या पुरुषाची थोरवी क्वचित एखाद्यालाच कळते. (१३)

न्याय नीति विवेक विचार । नाना प्रसंगप्रकार ।
परीक्षिणें परांतर । देणें ईश्वराचें ॥ १४ ॥
अशा पुरुषाच्या ठिकाणी न्याय, नीती, विवेक, विचार, नाना प्रकारचे प्रसंगावधान आणि लोकांच्या अंतरंगाची अचूक परीक्षा असे गुण असतात. ही ईश्वराची देणगी असते. (१४)

माहायेत्‍न सावधपणें । समईं धारिष्ट धरणें ।
अद्‍भूतचि कार्य करणें । देणें ईश्वराचें ॥ १५ ॥
असा पुरुष सावधपणे महान प्रयत्न करीत असतो, कठीण प्रसंगीही त्याचे धैर्य टिकून राहते आणि त्याच्या हातून अद्भुतच कार्ये घडतात. हे सर्व ईश्वराच्या कृपेने होत असते. (१५)

येश कीर्ति प्रताप महिमा । उत्तम गुणासी नाहीं सीमा ।
नाहीं दुसती उपमा । देणें ईश्वराचें ॥ १६ ॥
त्याचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप आणि महिमा आणि उत्तम गुण यांना सीमा नसते. त्याला द्यावयास दुसरी उपमा नसते. हे सर्व ईश्वराचे देणे असते. (१६)

देव ब्रह्मण आचार विचार । कितेक जनासी आधार ।
सदा घडे परोपकार । देणें ईश्वराचें ॥ १७ ॥
असा पुरुष देव आणि ब्राह्मण यांचा आदर करतो. आचार, विचार संभाळतो. त्याचा कित्येक लोकांना मोठा आधार असतो. त्याच्या हातून सदैव परोपकार घडत असतो. ही सर्व ईश्वराची कृपा होय. (१७)

येहलोक परलोक पाहाणें । अखंड सावधपणें राहाणें ।
बहुत जनाचें साहाणें । देणें ईश्वराचें ॥ १८ ॥
इहलोक आणि परलोक दोन्हींचा विचार असा पुरुष करतो. तो अखंड सावधपणे राहतो आणि अनेक लोकांचे वागणे, बोलणे सहन करीत असतो. ही ईश्वराची देणगी होय. (१८)

देवाचा कैपक्ष घेणे । ब्रह्माणाची चिंता वाहाणें ।
बहु जनासी पाळणें । देणें ईश्वराचें ॥ १९ ॥
असा पुरुष देवांचा कैवार घेतो. ब्राह्मणांची चिंता वाहतो आणि अनेक लोकांचे पालन-पोषण करतो. कारण तो ईश्वराच्या कृपेस पात्र झालेला असतो. (१९)

धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
जाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥ २० ॥
असे धर्माची स्थापना करणारे पुण्यपुरुष हे ईश्वराचेच अवतार असतात. आतापर्यंत असे अवतार झालेले आहेत. सांप्रतही आहेत आणि पुढेही होतच राहतील. असे पुरुष उत्पन्न होणे हे ईश्वराचेच देणे आहे. (२०)

उत्तम गुणाचा ग्राहिक । तर्क तीक्षण विवेक ।
धर्मवासना पुण्यश्लोक । देणें ईश्वराचें ॥ २१ ॥
जो पुरुष उत्तम गुणांचा चाहता असतो, जो तर्कनिष्ठ आणि कुशाग्र बुद्धीचा विवेकी असतो आणि ज्याला धर्माविषयी आवड असून जो पुण्यश्लोक असतो, त्याच्यावर ईश्वराची पूर्ण कृपा आहे, असे समजावे. (२१)

सकळ गुणांमधें सार । तजविजा विवेक विचार ।
जेणें पाविजे पैलपार । अरत्रपरत्रींचा ॥ २२ ॥
ज्या विवेकामुळे आणि विचारपूर्वक आखलेल्या योजनांमुळे इहलोक आणि परलोक दोन्हीतून उत्तम प्रकारे पैलपार होता येते, तो विवेक आणि ते नियोजन जवळ असणे हे सर्व गुणांचे सार आहे. (२२)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
उत्तमपुरुषनिरूपणनाम समास सहावा
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘उत्तमपुरुषनिरूपणनाम’ समास सहावा समाप्त.


समास सातवा : जनस्वभावनिरूपण
॥ श्रीराम ॥

जनाचा लालची स्वभाव । आरंभीं म्हणती देव ।
म्हनिजे मला कांहीं देव । ऐसी वासना ॥ १ ॥
लोकांचा स्वभावच फार लोभी आणि स्वार्थी असतो. आरंभीच ‘देव’ असा शब्द उच्चारतात, तेव्हाच ‘मला काही देव (द्यावे)’ अशीच वासना त्यांच्या मनात असते. (१)

कांहींच भक्ती केली नस्तां । आणी इछिती प्रसन्नता ।
जैसें कांहींच सेवा न करिता। स्वामीस मागती ॥ २ ॥
ते काहीच भक्ती करीत नाहीत आणि त्यांना देवाची प्रसन्नता मात्र हवी असते. जसे एखाद्या नोकराने काहीच सेवा न करता मालकाकडे पगार मागावा, तसे त्यांचे वागणे असते. (२)

कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं ।
केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ३ ॥
जगात कष्ट केल्याशिवाय फळ कधी मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय राज्यही मिळत नाही. कष्ट केल्याशिवाय जगात कुठलेही कार्य सिद्ध होत नाही. (३)

आळसें काम नसतें । हें तों प्रत्ययास येतें ।
कष्टाकडे चुकावितें । हीन जन ॥ ४ ॥
आळसाने कार्याचा नाश होतो ही गोष्ट तर प्रत्यक्ष अनुभवाला येते. आणि तरी हीन माणसाची कष्ट चुकविण्याकडे प्रवृत्ती असते. (४)

आधीं कष्टाचें दुःख सोसिति । ते पुढें सुखाचें फळ भोगिती ।
आधीं आळसें सुखावती । त्यासी पुढें दुःख ॥ ५ ॥
जे आधी कष्टाचे दु:ख सोसतात, ते पुढे सुखरूपी फळ भोगतात. जे आधी आळसाचे सुख भोगतात, ते पुढे दु:खी होतात. (५)

येहलोक अथवा परलोक । दोहिंकडे सारिखाच विवेक ।
दीर्घ सूचनेचें कौतुक । कळलें पाहिजे ॥ ६ ॥
इहलोक आणि परलोक दोन्हीकडे हा विचार सारखाच लागू पडतो म्हणून दूरदृष्टीचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे. (६)

मेळविती तितुकें भक्षिती । ते कठीण काळीं मरोन जाती ।
दीर्घ सूचनेनें वर्तती । तेचि भले ॥ ७ ॥
जे लोक जितके मिळवतात ते सर्व खर्च करून टाकतात. ते कठीण काळ ओढवला असता मरून जातात. जे लोक दूरदृष्टीने वागतात, तेच भले होत. (७)

येहलोकींचा संचितार्थ । परलोकींचा परमार्थ ।
संचितेंविण वेर्थ । जीत मेलें ॥ ८ ॥
इहलोकातील धनधान्याचा संग्रह आणि परलोकीचा पुण्याईचा संग्रह ज्यांच्याजवळ नसतो, ते जिवंत असूनही मेल्यासारखेच होत. (८)

येकदां मेल्यानें सुटेना । पुन्हा जन्मोजन्मीं यातना ।
आपणास मारी वांचविना । तो आत्महत्यारा ॥ ९ ॥
आणि एकदा मेल्यानेही सुटका होत नाही. पुन्हा पुन्हा जन्मास येऊन यातना भोगाव्या लागतात. याप्रमाणे जो स्वतः आपले नुकसान करून घेतो, स्वत:च स्वत:स न वाचवता उलट मारतो तो आत्महत्यारा जाणावा. (९)

प्रतिजन्मीं आत्मघात । कोणें करावें गणीत ।
याकारणें जन्ममृत्य । केवी चुके ॥ १० ॥
याप्रमाणे जो प्रत्येक जन्मात आत्मघात करून घेतो, त्याच्या जन्ममरणाचे गणित कोण करणार ? म्हणून माणसाने जन्ममृत्यू कसा चुकेल, याबद्दल विचार करावा. (१०)

देव सकळ कांहीं करितो । ऐसें प्राणीमात्र बोलतो ।
त्याचे भेटीचा लाभ तो । अकस्मात जाला ॥ ११ ॥
सर्व प्राणिमात्र असे म्हणतात की, देवच सर्व काही करतो. पण त्याच्या भेटीचा लाभ होण्याची संधी अकस्मात प्राप्त झाली आहे. (म्हणजे मनुष्यदेह लाभला आहे. ) (११)

विवेकाच लाभ घडे । जेणें परमात्मा ठाईं पडे ।
विवेक पाहातां सांपडे । विवेकीं जनीं ॥ १२ ॥
नरदेहात विवेकाचा लाभ झाला तर तत्काळ परमात्म्याची प्राप्ती होते. आणि विवेकी लोकांची संगत लाभली तर विवेकाची प्राप्ती होते. (१२)

देव पाहातां आहे येक । परंतु करितो अनेक ।
त्या अनेकास येक । म्हणों नये कीं ॥ १३ ॥
वास्तविक देव एकच आहे. पण लोक अनेक देव मानतात. त्या अनेकांना एक म्हणू नये. (१३)

देवाचें कर्तुत्व आणि देव । कळला पाहिजे अभिप्राव ।
कळल्याविण कितेक जीव । उगेच बोलती ॥ १४ ॥
देवाचे कर्तृत्व आणि देव याचा अभिप्राय कळला पाहिजे. तसा तो कळला नसताना कित्येक जण उगीचच बोलत असतात. (१४)

उगेच बोलती मूर्खपणें । शाहाणपण वाढायाकारणें ।
त्रुप्तिलागीं उपाव करणें । ऐसें जालें ॥ १५ ॥
आपला शहाणपणा दाखविण्यासाठी काही लोक उगीच देवासंबंधी, त्याच्या कर्तृत्वासंबंधी मूर्खपणाने बोलतात. पण तृप्तीसाठी उपाय केले पाहिजेतच. (१५)

जेहीं उदंड कष्ट केले । ते भाग्य भोगून ठेले ।
येर ते बोलतचि राहिले । करंटे जन ॥ १६ ॥
ज्यांनी उदंड कष्ट केले त्यांना भाग्याने भोगांची प्राप्ती झाली. इतर जे काही न करता उगीच नुसते बोलतच राहतात ते अभागी असतात. (१६)

करंट्याचें करंट लक्षण । समजोन जाती विचक्षण ।
भरल्याचें उत्तम लक्षण । करंट्यास कळेना ॥ १७ ॥
विचक्षण म्हणजे विवेकसंपन्न लोक असतात ते करंट्या माणसाचे करंट लक्षण समजून जातात. पण भल्या माणसाचे उत्तम लक्षण करंट्या माणसाला कळत नाही. (१७)

त्याची पैसावली कुबुद्धी । तेथें कैंची असेल शुद्धी ।
कुबुद्धी तेचि सुबुद्धी । ऐसी वाटे ॥ १८ ॥
त्याची कुबुद्धी वाढल्याने त्याला शुद्धी म्हणजे भानच नसते. त्यामुळे कुबुद्धीच त्याला सुबुद्धीसारखी वाटते. (१८)

मनुष्य शुद्धीस सांडावें । त्याचें काये खरें मानावें ।
जेथें विचाराच्या नावें । सुन्याकार ॥ १९ ॥
ज्याची मनुष्यत्वाची जाणीवच नाहीशी झाली आहे, त्याचे बोलणे खरे कसे मानावे ? त्याच्या ठिकाणी विचाराच्या नावाने शून्याकार झालेला असतो. (१९)

विचारें येहलोक परलोक । विचारें होतसे सार्थक ।
विचारें नित्यानित्य विवेक । पाहिला पाहिजे ॥ २० ॥
विचारामुळेच इहलोकी, परलोकी कल्याण होते. विचारानेच मनुष्यजन्माचे सार्थक होते. म्हणून माणसाने विचारपूर्वक नित्यानित्यविवेक केला पाहिजे. (२०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
जनस्वभावनिरूपणनाम समास सातवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘जनस्वभावनिरूपणनाम’ समास सातवा समाप्त.


समास आठवा : अंतर्देवनिरूपण
॥ श्रीराम ॥

ब्रह्म निराकार निश्चळ । आत्म्यास विकार चंचळ ।
तयास म्हणती सकळ । देव ऐसें ॥ १ ॥
ब्रह्म हे निराकार आणि निश्चळ आहे. अंतरात्मा हा चंचळ आणि विकारी आहे. त्यालाच सर्व देव असे म्हणतात. (१)

देवाचा ठावचि लागेना । येक देव नेमस्त कळेना ।
बहुत देवीं अनुमानेना । येक देव ॥ २ ॥
देवाचा थांगपत्ताच लागत नाही. एक देव कोणता हे निश्चयपूर्वक कळत नाही. अनेक देवांमध्ये खरा एक देव कोणता, याची कल्पना येत नाही. (२)

म्हणोनी विचार असावा । विचारें देव शोधावा ।
बहुत देवांचा गोवा । पडोंचि नये ॥ ३ ॥
म्हणून माणसाच्या ठिकाणी विचार असावा. त्याने विचारपूर्वक देवाचा शोध घ्यावा. अनेक देवांच्या गोंधळात पडूच नये. (३)

देव क्षत्रीं पाहिला । त्यासारिखा धातूचा केला ।
पृथ्वीमधें दंडक चालिला । येणें रीतीं ॥ ४ ॥
क्षेत्राच्या ठिकाणी देव पाहिला आणि तसाच धातूचा देव केला. याप्रमाणे जगामध्ये रूढी पडली आहे. (४)

नाना प्रतिमादेवांचें मूळ । तो हा क्षत्रदेवचि केवळ ।
नाना क्षत्रें भूमंडळ । शोधून पाहावें ॥ ५ ॥
नाना प्रतिमारूपी देवांचे मूळ तीर्थक्षेत्रातील देवच असतात. जगात अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. तेथे शोध घेऊन पाहावा. (५)

क्षत्रदेव पाषाणाचा । विचार पाहातां तयाचा ।
तंत लागला मुळाचा । अवताराकडे ॥ ६ ॥
क्षेत्रातील देव पाषाणाचा असतो. त्याच्यासंबंध विचार केला की त्याच्या मुळाचा तंत् अवताराकडे आहे. असे दिसून येते. (६)

अवतारी देव संपले । देहे धरुनी वर्तोन गेले ।
त्याहून थोर अनुमानले । ब्रह्मा विष्णु महेश ॥ ७ ॥
अवतारी देव आले, देह धरून त्यांनी कार्य केले. आणि ते परत गेले. त्यांच्यापेक्षा ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे थोर आहेत असे अनुमान केले. (७)

त्या तिही देवांस ज्याची सत्ता । तो अंतरात्माचि पाहातां ।
कर्ता भोक्ता तत्वता । प्रतक्ष आहे ॥ ८ ॥
ह्या तिन्ही देवांच्या ठिकाणी ज्याची सत्ता आहे, तो अंतरात्मा हाच तत्त्वतः कर्ता, भोक्ता आहे, हे प्रत्यक्ष दिसून येते. (८)

युगानयुगें तिन्ही लोक । येकचि चालवी अनेक ।
हा निश्चयाचा विवेक । वेदशास्त्रीं पाहावा ॥ ९ ॥
युगानुयुगे तिन्ही लोकांतील अनेक कार्ये तो एकाच चालवतो असा निश्चयात्मक विवेक वेदांत आणि शास्त्रग्रंथात सांगितला आहे, तो पाहावा. (९)

आत्मा वर्तवितो शरीर । तोचि देव उत्तरोत्तर ।
जाणीवरूपें कळिवर । विवेकें वर्तवी ॥ १० ॥
अंतरात्माच शरीर चालवितो. तोच उत्तरोत्तर जीवात्मा, शिवात्मा, विश्वात्मा आणि निर्मळात्मा म्हणून ओळखला जातो. तोच जाणीवरूपाने विचारपूर्वक देह चालवतो. (१०)

तो अंतर्देव चुकती । धांवा घेऊन तीर्था जाती ।
प्राणी बापुडे कष्टती । देवास नेणतां ॥ ११ ॥
माणसे त्या अंतर्देवास चुकतात आणि धावाधाव करून तीर्थक्षेत्रास जातात. खरा देव न कळल्याने प्राणी बापडे व्यर्थच कष्ट सोसतात. (११)

मग विचारिती अंतःकर्णीं । जेथें तेथें धोंडा पाणी ।
उगेंचि वणवण हिंडोनि । काये होतें ॥ १२ ॥
अशा रीतीने कष्ट सोसल्यावर ते अंत:करणात विचार करतात की क्षेत्रांच्या ठिकाणी तर सर्वत्र धोंडा आणि पाणी आहे. उगीच वणवण हिंडून काय होणार आहे ? (१२)

ऐसा ज्यासी विचार कळला । तेणें सत्संग धरिला ।
सत्संगें देव सांपडला । बहुत जनासी ॥ १३ ॥
ज्यांच्या मनात असा विचार येतो, ते सत्संग धरतात आणि सत्संगाच्या योगाने अनेक लोकांना देवाची प्राप्ती झाली. (१३)

ऐसीं हे विवेकाचीं कामें । विवेकी जाणतील नेमें ।
अविवेकी भुलले भ्रमें । त्यांस हें कळेना ॥ १४ ॥
अशी ही विवेकाची कामे आहेत. ती विवेकी लोकच निश्चयपूर्वक जाणतील. अविवेकी लोक भ्रमाने भुललेले असतात. त्यांना हे कळत नाही. (१४)

अंतरवेधी अंतर जाणे । बाहेरमुद्रा कांहींच नेणें ।
म्हणोन विवेकी शाहणे । अंतर शोधिती ॥ १५ ॥
अंतरवेधी म्हणजे अंतर्मुखी अंतरात शोध घेणारा असतो. तो अंतरात असलेल्या अंतरात्म्यास जाणू शकतो. वेषधारी किंवा बहिर्मुख वृत्ती असणारा काहीच जाणत नाही. म्हणून जे शहाणे असतात, विवेकी असतात, ते अंतरात देवाचा शोध घेतात. (१५)

विवेकेंविण जो भाव । तो भावचि अभाव ।
मुर्खस्य प्रतिमा देव । ऐसें वचन ॥ १६ ॥
विचाराशिवायचा भाव हा मुळी भावच नाही. म्हणूनच ‘मूर्खाला प्रतिमा देव’ असे वचन म्हटले जाते. (१६)

पाहात समजत सेवटा गेला । तोचि विवेकी भला ।
तत्वें सांडुनी पावला । निरंजनीं ॥ १७ ॥
देवाचा शोध घेत घेत जो शेवटास जातो, तो विवेकी माणूसच उत्तम होय. तो तत्त्वाने तत्त्वाचे निरसन करीत निरंजन परब्रह्मास प्राप्त होतो. (१७)

आरे जें आकारासी येतें । तें अवघेंच नासोन जतें ।
मग गल्बल्यावेगळें तें । परब्रह्म जाणावें ॥ १८ ॥
समर्थ म्हणतात की, अरे, जे जे आकाराला येते ते सर्व नाश पावते. म्हणून या मायेच्या गलबल्यावेगळे ते परब्रह्म होय, हे जाणून घ्यावे. (१८)

चंचळ देव निश्चळ ब्रह्म । परब्रह्मीं नाहीं भ्रम ।
प्रत्ययज्ञानें निभ्रम । होईजेतें ॥ १९ ॥
अंतरात्मा म्हणजेच देव हा चंचळ असतो, तर परब्रह्म हे निश्चळ असते. परब्रह्माच्या ठिकाणी भ्रम नसतो. म्हणून परब्रह्माशी स्वानुभवाने ऐक्य पावून भ्रमरहित व्हावे. (१९)

प्रचीतीविण जें केलें । तें तें अवघें वेर्थ गेलें ।
प्राणी कष्टकष्टोंचि मेलें । कर्मकचाटें ॥ २० ॥
अनुभवाशिवाय जे जे केले जाते, ते सर्व व्यर्थच जाते. कर्माच्या कचाट्यात सापडून कष्ट करून प्राणी शेवटी मरून जातो. (२०)

कर्मावेगळें न व्हावें । तरी देवास कासया भजावें ।
विवेकी जाणती स्वभावें । मूर्ख नेणे ॥ २१ ॥
कर्मावेगळे व्हावयाचे नसेल, तर देवाचे भजन कशासाठी करावे ? विवेकी पुरुष स्वाभाविकरीत्या हे जाणतात. मूर्ख लोक जाणत नाहीत. (२१)

कांहीं अनुमानलें विचारें । देव आहे जगदांतरें ।
सगुणाकरितां निर्धारें । निर्गुण पाविजे ॥ २२ ॥
विचाराने काही अनुमान केले, तर देव सर्व जगाच्या अंतर्यामी भरून राहिला आहे हे कळते. त्या अंतरात्म्याला सगुणाला भजल्याने निश्चयाने निर्गुणाची प्राप्ती होते. (२२)

सगुण पाहातां मुळास गेला । सहजचि निर्गुण पावला ।
संगत्यागें मोकळा जाला । वस्तुरूप ॥ २३ ॥
सगुणाचे निरंतर अनुसंधान केले तर मूळमायेच्या मुळास पोहोचता येते आणि तेथे वृत्तीचा लय झाला की अगदी सहज निर्गुण प्राप्त होते. त्याच्या संगाचाही त्याग घडला की, तो मुक्त होऊन वस्तुरूप होतो. (२३)

परमेश्वरीं अनुसंधान । लावितां होईजे पावन ।
मुख्य ज्ञानेंचि विज्ञान । पाविजेतें ॥ २४ ॥
परमेश्वराच्या ठिकाणी अनुसंधान लावल्याने ज्ञान होते. ज्ञानाग्नीमुळे पापे भस्मसात होऊन साधक पावन होतो आणि मग ज्ञानाच्या योगेच विज्ञानाची प्राप्ती होते. (२४)

ऐसीं हे विवेकाचीं विवर्णें । पाहावीं सुचित अंतःकर्णें ।
नित्यानित्य विवेकश्रवणें । जगदोधार ॥ २५ ॥
अंत:करण एकाग्र करून नित्यानित्यविवेकाच्या श्रवणाने, विवेकाने याप्रकारे विवरण करावे, म्हणजे जगाचा उद्धार होतो. (२५)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
अंतर्देवनिरूपणनाम समास आठवा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘अंतर्देवनिरूपणनाम’ समास आठवा समाप्त.


समास नववा : निद्रानिरूपण
॥ श्रीराम ॥

वंदूनियां आदिपुरुष । बोलों निद्रेचा विळास ।
निद्रा आलियां सावकास । जाणार नाहीं ॥ १ ॥
आदिपुरुषास वंदन करून आता निद्रेच्या विलासाचे वर्णन करू एकदा झोप आली की, मग ती आवरत नाही. (१)

निद्रेनें व्यापिली काया । आळस आंग मोडे जांभया ।
तेणेंकरितां बैसावया । धीर नाहीं ॥ २ ॥
एकदा निद्रेने शरीराचा ताबा घेतला की आळस, सुस्ती येते, अंग मोडून येते, जांभया येऊ लागतात, बसवत नाही, अशी स्थिती होते. (२)

कडकडां जांभया येती । चटचटां चटक्या वाजती ।
डकडकां डुकल्या देती । सावकास ॥ ३ ॥
कडकडा जांभया येऊ लागतात. चटचट चुटक्या वाजविल्या जातात. डकडका डुलक्या येऊ लागतात. (३)

येकाचे डोळे झांकती । येकाचे डोळे लागती ।
येक ते वचकोन पाहाती । चहुंकडे ॥ ४ ॥
एखाद्याचे डोळे मिटतात, एखाद्याचे डोळे अर्धवट मिटतात, तर कोणी दचकून चहूकडे पाहू लागतो. (४)

येक उलथोन पडिले । तिहीं ब्रह्मविणे फोडिले ।
हुडकाचे टुकडे जाले । सुधी नाहीं ॥ ५ ॥
एखादा कीर्तन ऐकायला आलेला श्रोता झोप अनावर झाल्यामुळे एकदम उताणा पडतो. तो बुवांच्या ब्रह्मवीणेवर पडल्यामुळे ब्रह्मवीणा फुटते किंवा वाद्याचे तुकडे होतात, तरी त्याला शुद्धी नसते. (५)

येक टेंकोन बैसले । तेथेंचि घोरों लागले ।
येक उताणे पसरलें । सावकास ॥ ६ ॥
एखादा टेकून बसलेला श्रोता तेथेच घोरायला लागतो. एखादा बसल्या जागीच सावकाश उताणा पसरतो. (६)

कोणी मुर्कुंडी घालिती । कोणी कानवडें निजती ।
कोणी चक्रीं फिरती । चहुंकडे ॥ ७ ॥
कुणी मुरकुंडी घालून झोपतो, तर कुणी कुशीवर पाय पोटाशी घेऊन झोपतो, तर कुणी झोपेतच गोल गोल चहूकडे फिरतो, लोळतो. (७)

येक हात हालविती । येक पाये हालविती ।
येक दांत खाती । कर्कराटें ॥ ८ ॥
कुणी झोपेत हात हलवतो, तर कुणी पाय हलवतो, तर कुणी करकरा दात खातो. (८)

येकांचीं वस्त्रें निघोनि गेलीं । ते नागवींच लोळों लागलीं ।
येकाचीं मुंडासीं गडबडलीं । चहुंकडे ॥ ९ ॥
कुणाच्या अंगावरचे कपडे जाग्यावर राहात नाहीत आणि तो नागवाच लोळू लागतो. एखाद्याचे डोक्याचे मुंडासे सगळीकडे पसरले जाते. (९)

येक निजेलीं अव्यावेस्तें । येक दिसती जैसीं प्रेते ।
दांत पसरुनी जैसीं भूतें । वाईट दिसती ॥ १० ॥
कुणी अस्ताव्यस्त झोपतात, तर काही जण प्रेतासारखे दिसतात. तर कुणी झोपेतच तोंड उघडे राहिल्याने दात विचकलेल्या भूतासारखे वाईट दिसतात. (१०)

येक वोसणतचि उठिले । येक अंधारीं फिरों लागले ।
येक जाऊन निजेले । उकरड्यावरी ॥ ११ ॥
एखादा बडबडतच उठतो, तर एखादा झोपेत अंधारातच फिरू लागतो. एखादा कुणी उकिरड्यावर जाऊन झोपतो. (११)

येक मडकीं उतरिती । येक भोई चांचपती ।
येक उठोन वाटा लागती । भलतीकडे ॥ १२ ॥
एखादा शिंकाळ्यावरची मडकी-गाडगी उतरवू लागतो, तर एखादा जमीन चाचपू लागतो, तर कुणी झोपेतच उठून रस्त्याने भलतीकडेच चालायला लागतो. (१२)

येक प्राणी वोसणाती । येक फुंदफुंदों रडती ।
येक खदखदां हासती । सावकास ॥ १३ ॥
कुणी एखादा उगीचच ओरडतो, तर दुसरा एखादा स्फुदून स्फुदून रडायला लागतो, तर कुणी हळूच खदखदा हसायलाच लागतो. (१३)

येक हाका मारूं लागले । येक बो।म्बलित उठिले ।
येक वचकोन राहिले । आपुले ठाईं ॥ १४ ॥
कुणी हाका मारू लागतात, तर कुणी बोंबलत उठतात, तर कुणी जागच्या जागीच दचकतात. (१४)

येक क्षणक्षणा खुरडती । येक डोई खाजविती ।
येक कढों लागती । सावकास ॥ १५ ॥
कुणी एखादा क्षणाक्षणाला खुरडतो, तर कुणी डोकेच खाजवतो, तर कुणी हळूहळू कण्हू लागतो. (१५)

येकाच्या लाळा गळाल्या । येकाच्या पिका सांडल्या ।
येकीं लघुशंका केल्या । सावकास ॥ १६ ॥
कुणाच्या तोंडातून लाळ गळू लागते, तर कुणी थुकी टाकतो, तर कुणी लघुशंकाही करतो. (१६)

येक राउत सोडिती । येक कर्पट ढेंकर देती ।
येक खांकरुनी थुंकिती । भलतीकडे ॥ १७ ॥
कुणी झोपेत अपानवायू सोडतात, तर कुणी करपट ढेकर देतात, तर कुणी खाकरून भलतीकडेच थुकतात. (१७)

येक हागती येक वोकिती । येक खोंकिती येक सिंकिती ।
येक ते पाणी मागती । निदसुया स्वरें ॥ १८ ॥
कुणी हगतात, तर कुणी ओकतात, कुणी खोकतात तर कुणी शिंकतात, तर कुणी अर्धवट झोपेत पाणी प्यायला मागतात. (१८)

येक दुस्वप्नें निर्बुजले । येक सुस्वप्नें संतोषले ।
येक ते गाढमुढी पडिले । सुषुप्तिमधें ॥ १९ ॥
कुणाला दु:स्वप्न पडल्याने ते घाबरतात, तर कुणाला चांगले स्वप्न पडल्याने संतोष वाटतो, तर काही सुषुप्तीमध्ये गाढ झोपेत स्वस्थ पडतात. (१९)

इकडे उजेडाया जालें । कोण्हीं पढणें आरंभिलें ।
कोणीं प्रातस्मरामि मांडिलें । हरिकिर्तन ॥ २० ॥
इकडे उजाडायला आले की माणसे जागी होतात. मग कुणी नित्यपाठ करायला आरंभ करतो, तर कोणी प्रात:स्मरामि म्हणून प्रात:स्मरण करू लागतो, तर कुणी हरिकीर्तन करू लागतो. (२०)

कोणीं आठविल्या ध्यानमूर्ति । कोणी येकांतीं जप करिती ।
कोणी पाठांतर उजळिती । नाना प्रकारें ॥ २१ ॥
कोणी मूर्तीचे ध्यान करू लागतात, तर कुणी एकांतात जप करू लागतात. तर कुणी अनेक प्रकारे पाठांतराची उजळणी करू लागतात. (२१)

नाना विद्या नाना कळा । आपलाल्या सिकती सकळा ।
तानमानें गायेनकळा । येक गाती ॥ २२ ॥
आपापल्या आवडीप्रमाणे लोक नाना विद्या, नाना कला शिकायला आरंभ करतात, तर काही तानमान, गायनकला यांचे ज्ञान असणारे गाऊ लागतात. (२२)

मागें निद्रा संपली । पुढें जागृती प्राप्त जाली ।
वेवसाईं बुद्धी आपुली । प्रेरिते जाले ॥ २३ ॥
रात्रीची झोप झाली आणि उजाडल्यावर जागृती प्राप्त झाली की प्रत्येकजण आपापल्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागतात. (२३)

ज्ञाता तत्वें सांडून पळाला । तुर्येपैलिकडे गेला ।
आत्मनिवेदनें जाला । ब्रह्मरूप ॥ २४ ॥
जो ज्ञाता, ज्ञानी पुरुष असतो, तो या दृश्याचा, तत्त्वांचा निरास करून तुर्येपलीकडे जातो, म्हणजे साक्षित्वाची जाणीव सोडून, आत्मनिवेदन करून केवळ सत्स्वरूप, ब्रह्मरूप होतो. (२४)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
निद्रानिरूपणनाम समास नववा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘निद्रानिरूपणनाम’ समास नववा समाप्त.


समास दहावा : श्रोताअवलक्षणनिरूपण
॥ श्रीराम ॥

कोणीयेका कार्याचा साक्षप । कांहीं तर्‍ही घडे विक्षेप ।
काळ साहे तें आपेंआप । होत जातें ॥ १ ॥
आपण कुठल्याही एखाद्या कार्यासाठी प्रयत्न सुरू केला की, त्यात काही ना काही विघ्न उत्पन्न होते. काळ अनुकूल असेल तर कार्य आपोआप होत जाते. (१)

कार्यभाग होत चालिला । तेणें प्राणी शोक जाला ।
विचारहि सुचों लागला । दिवसेंदेवस ॥ २ ॥
कार्यभाग होऊ लागला की, त्यामुळे माणूस उल्हसित होतो. त्याला हौस वाटू लागते आणि दिवसेंदिवस नवीन विचारही सुचू लागतात. (२)

कोणीयेक प्राणी जन्मासी येतो । कांहीं तर्‍ही काळ साहे होतो ।
दुःखाउपरी सुख देतो । देव कृपाळुपणें ॥ ३ ॥
कोणीही माणूस जन्माला येतो, तेव्हा काही काळाने त्याला अनुकूलता लाभते, दु:ख सोसल्यावर देव त्याला कृपाळूपणे सुख देता. (३)

अवघाचि काळ जरी सजे । तरी अवघेचि होती राजे ।
कांहीं सजे कांहीं न सजे । ऐसें आहे ॥ ४ ॥
सर्वच काळ जर अनुकूल होईल, तर सर्वच राजे होतील. पण काही अनुकूल, काही प्रतिकूल असेच होत राहते. (४)

येकलोक अथवा परलोक । साधतां कोणीयेक विवेक ।
अद्‍भूत होये स्वाभाविक । देणें ईश्वराचें ॥ ५ ॥
कुणी एखाद्याने विवेकाने जर इहलोक आणि परलोक साधला तर त्याच्या हातून ईश्वराच्या कृपेने स्वाभाविकच काही अद्भुत कार्य घडते. (५)

ऐकल्याविण कळलें । शिकल्याविण शहाणपण आलें ।
देखिलें ना ऐकिलें । भूमंडळीं ॥ ६ ॥
या जगात ऐकल्याशिवाय कळले आणि शिकविल्याशिवायच शहाणपण आले, असे कधी पाहिलेले वा ऐकलेले नाही. (६)

सकळ कांहीं ऐकतां कळे । कळतां कळतां वृत्ति निवळे ।
नेमस्त मनामधें आकळे । सारासार ॥ ७ ॥
ऐकल्याने सर्व काही कळते, कळता कळता वृत्ती निवळते आणि सार काय आणि असार काय हे मनामध्ये निश्चितपणे कळते. (७)

श्रवण म्हणिजे ऐकावें । मनन म्हणिजे मनीं धरावें ।
येणें उपायें स्वभावें । त्रयलोक्य चाले ॥ ८ ॥
श्रवण म्हणजे ऐकावे आणि मनन म्हणजे ते मनात उत्तम प्रकारे धारण करावे. याच प्रकारे त्रैलोक्यात स्वाभाविकरीत्या ज्ञानाची देवाणघेवाण होत असते. (८)

श्रवणाआड विक्षेप येती । नाना जिनस सांगो किती ।
सावध असतां प्रत्यय येती । सकळ कांहीं ॥ ९ ॥
श्रवणाच्या आड नाना विक्षेप येतात. किती म्हणन सांगावेत ? सावधपणे पाहिले असता, अनुभवाने सर्व काही कळते. (९)

श्रवणीं लोक बैसले । बोलतां बोलतां येकाग्र जाले ।
त्याउपरी जे नूतन आले । ते येकाग्र नव्हेती ॥ १० ॥
लोक श्रवणाला बसलेले असतात. वक्ता बोलत असतो. तो जसजसा बोलतो, तसे श्रोत्यांचे मनही एकाग्र होते. इतक्यात काही नवीन लोक ऐकायला येतात. त्यांच्या येण्यामुळे श्रोत्यांच्या श्रवणात विक्षेप येतो व मग त्यांचे मन एकाग्र होऊ शकत नाही. (१०)

मनुष्य बाहेर हिंडोनी आलें । नाना प्रकारीचें ऐकिलें ।
उदंड गलबलूं लागलें । उगें असेना ॥ ११ ॥
मनुष्य बाहेरून हिंडून येतो. त्याने नाना प्रकारच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यामुळे त्याच्या मनात एकच गोंधळ माजतो व त्याला स्वस्थ बसवत नाही. (११)

प्रसंग पाहोन चालती । ऐसे लोक थोडे असती ।
श्रवणीं नाना विक्षेप होती । ते हे ऐका ॥ १२ ॥
प्रसंग पाहून योग्य प्रकारे वर्तन करणारे लोक फार थोडे असतात. त्यामुळे श्रवणात नाना विक्षेप येतात. ते ऐका. (१२)

श्रवणीं बैसले ऐकाया । अडों लागलीसें काया ।
येती कडकडां जांभया । निद्राभरें ॥ १३ ॥
ऐकायला म्हणून येऊन बसतात. पण काही लोकांचे अंग अवघडू लागते आणि झोपेच्या भराने कडाकड जांभया येऊ लागतात. (१३)

बैसले सुचित करूनि मना । परी तें मनचि ऐकेना ।
मागें होतें ऐकिलें नाना । तेंचि धरुनी बैसलें ॥ १४ ॥
काही लोक मन एकाग्र करून श्रवण करायला येतात. पण त्यांचे मनच त्यांना आवरत नाही. पूर्वी जे काही ऐकलेले असते तेच मनात सारखे आठवू लागते. (१४)

तत्पर केलें शरीर । परी मनामधें आणीक विचार ।
कल्पना कल्पी तो विस्तार । किती म्हणौनि सांगावा ॥ १५ ॥
श्रवणास शरीर तत्पर केले, पण मनामध्ये आणखी दुसरेच विचार येतात आणि मन नाना कल्पना करू लागते. त्याचा विस्तार किती म्हणून सांगावा ? (१५)

जें जें कांहीं श्रवणीं पडिलें । तितुकें समजोन विवरलें ।
तरीच कांहीं सार्थक जालें । निरूपणीं ॥ १६ ॥
जे जे काही ऐकले असेल, तितके नीट समजून घेऊन त्याचे विवरण केले, मनन केले, तरच त्या निरूपणाने काही सार्थक होऊ शकते. (१६)

मन दिसतें मां धरावें । ज्याचें त्यानें आवरावें ।
आवरून विवेकें धरवें । अर्थांतरीं ॥ १७ ॥
मन जर दिसले असते, तर त्याला धरून ठेवता आले असते. पण ते तर दिसत नाही, म्हणून ते ज्याचे त्यानेच आवरायला हवे आणि आवरून धरून विवेकाने अर्थावर मन एकाग्र करावे. (१७)

निरूपणीं येऊन बैसला । परी तो उदंड जेऊन आला ।
बैसतांच कासाविस जाला । त्रुषाकांत ॥ १८ ॥
एखादा माणूस निरूपण श्रवण करायला येऊन बसतो, पण उदंड जेवून आल्याने बसल्याबरोबर तो तहानेने कासावीस होतो. (१८)

आधीं उदक आणविलें । घळघळां उदंड घेतलें ।
तेणें मळमळूं लागलें । उठोनी गेला ॥ १९ ॥
मग आधी तो पाणी आणायला लावतो आणि ते गटागटा भरपूर पितो. त्यामुळे मग त्याला मळमळू लागते आणि तो उठून जातो. (१९)

कर्पट ढेंकर उचक्या देती । वारा सरतां मोठी फजिती ।
क्षणक्षणा उठोनी जाती । लघुशंकेसी ॥ २० ॥
काही लोक करपट ढेकरा देतात, तर कुणाला उचक्या लागतात, तर कुणाचा वारा सरून त्याची मोठीच फजिती होते, तर काही लोक क्षणाक्षणाला लघुशंकेसाठी उठून जातात. (२०)

दिशेनें कासाविस केला । आवघेंचि सांडून धांविला ।
निरूपणप्रसंगीं निघोन गेला । अखंड ऐसा ॥ २१ ॥
काहींना वरचेवर शौचास जावे लागल्याने ते कासावीस होतात आणि सर्व सोडून धावत जातात. अशा प्रकारे निरूपणप्रसंगी सारखे त्याला निघून जावे लागते. (२१)

दृष्टांती कांहीं अपूर्व आलें । अंतःकर्ण तेथेंचि राहिलें ।
कोठवरी काये वाचिलें । कांहीं कळेना ॥ २२ ॥
काही लोक श्रवण करीत असता वक्त्याने दृष्टांतात काही अपूर्व सांगितले, तर त्यांचे अंतःकरण तेथेच अडकून पडते व पुढील वाचानाकडे त्यांचे दुर्लक्ष होते. (२२)

निरूपणीं येऊन बैसला । तो विंचुवें फणकाविला ।
कैचें निरूपण जाला । कासाविस ॥ २३ ॥
एखादा निरूपण श्रवण करायला येऊन बसतो आणि तेवढ्यात त्याला विंचू डंख करतो. त्यामुळे तो कासावीस होतो. मग तो कसले निरूपण ऐकणार ? (२३)

पोटामधें तिडिक उठिली । पाठीमधें करक भरली ।
चालक चिखल्या पुळी जाली । बैसवेना ॥ २४ ॥
कुणाच्या पोयत कळा येऊ लागतात, तर कुणाच्या पाठीत उसण भरते, तर कुणाला पायाचे सांधे धरणारा रोग असतो. तर आणखी कुणाला चिखल्या होतात, पुळ्या येतात. अशा विविध कारणामुळे त्यांना श्रवणाला बसवत नाही. (२४)

पिसोळा चाऊन पळाला । तेणें प्राणी दुश्चीत जाला ।
कोणें नेटें गल्बला केला । तेथेंचि धावें ॥ २५ ॥
कधी पिसवा चावून पळतात, त्यामुळे माणूस अस्वस्थ होतो, तर बाहेर कुणी गलबला केला की तेथे एखादा धाव घेतो. (२५)

विषै लोक श्रवणीं येती । ते बायेकांकडेच पाहाती ।
चोरटे लोक चोरून जाती । पादरक्षा ॥ २६ ॥
विषयी लोक श्रवणाला आले की ते स्त्रियांकडेच पाहात बसतात. तर चोरटे लोक लोकांची पादत्राणे चोरून नेतात. (२६)

होये नव्हे वादवेवाद । तेणें उदंड जाला खेद ।
सिव्या गाळी अप्रमाद । होतां चुकला ॥ २७ ॥
कधी कधी निरूपणात ‘अस्ति आणि नास्ति’ असा वादविवाद होऊन उदंड खेद होतो आणि कधी कधी शिवीगाळ, मारामारी इत्यादी गोंधळ होऊन श्रवण बाजूलाच राहाते. (२७)

कोणी निरूपणीं बैसती । सावकस गोष्टी लाविती ।
हरिदास ते रें रें करिती । पोटासाठीं ॥ २८ ॥
कोणी निरूपणाला म्हणून येतात आणि सावकाश आपापसातच गोष्टी करीत बसतात आणि हरिदास पोटासाठी रेंरें करीत रटाळपणे कथा करीत राहतो. (२८)

बहुत जाणते मिळाले । येकापुढें येक बोले ।
लोकांचे आशये राहिले । कोण जाणे ॥ २९ ॥
एखाद्या वेळी अनेक विद्वान लोक श्रवणास येतात आणि एकापुढे एक स्वत:चेच मत सांगत राहतात. श्रोत्यांचे आशय कोणी जाणतच नाही. (२९)

माझें होये तुझें नव्हे । ऐसी अखंड जयास सवे ।
न्याये नीति सांडून धावे । अन्यायाकडे ॥ ३० ॥
माझेच म्हणणे खरे, तुझे नव्हे; असे करायची अखंड सवय ज्यांना असते म्हणजे जे आपलेच म्हणणे खरे करू पाहतात, लोकांचे ऐकूनच घेत नाहीत, ते न्याय-नीतीचा विचार न करता अन्यायाकडे धावतात. (३०)

आपल्या थोरपणासाठीं । अच्यावाच्या तोंड पिटी ।
न्याये नाहीं ते सेवटीं । परम अन्याई ॥ ३१ ॥
आपला थोरपणा सिद्ध करण्यासाठी ते अवाच्यासवा वाटेल तसे अनिबंधपणे बोलत सुटतात. त्यामुळे त्यांचे बोलणे न्यायाचे नसते. अखेर परम अन्यायच होतो. (३१)

येकेकडे अभिमान उठे । दूसरेकडे उदंड पेटे ।
ऐसे श्रोते खरे खोटे । कोण जाणे ॥ ३२
एखादा गर्वाने बोलत सुटतो, तर दुसरा एखादा भयंकर संतापतो. अशा प्रकारच्या श्रोत्यांत कोण खरा आणि कोण खोटा हे कळत नाहीसे होते. (३२)

म्हणोन जाणते विचक्षण । तें आधींच धरिती नेणेपण ।
मूर्ख टोणपा आपण । कांहींच नाहीं ॥ ३३ ॥
म्हणून जाणते विचारवंत श्रोते असतात ते आधीच नेणतेपण धरतात. म्हणजे आपल्याला काही कळत नाही, आपण मूर्ख अडाणी असून आपण म्हणजे काहीच नाही, असे ते दाखवतात. (३३)

आपणाहून देव थोर । ऐसा जयास कळला विचार ।
सकळ कांहीं जगदांतर । तेहिं राखावें ॥ ३४ ॥
आपल्यापेक्षा देव थोर आहे हे त्यांना स्वानुभवाने कळलेले असते आणि तो देवच जगात सर्वांच्या अंतर्यामी आहे हे ते जाणत असतात, म्हणून ते सर्वांचे अंत:करण सांभाळतात. कोणालाही दुखवत नाहीत. (३४)

सभेमधें कळहो जाला । शब्द येतो जाणत्याला ।
अंतरें राखों नाहीं सिकला । कैसा योगी । ३५ ॥
सभेमध्ये जर कलह झाला, तर त्याचा दोष जाणत्याकडे येतो. जो लोकांचे अंत:करण राखू शकत नाही, तो योगी म्हणवून घेण्यास पात्र नसतो. (३५)

वैर करितां वैरचि वाढे । आपणास दुःख भोग्णें घडे ।
म्हणोनि शाहाण्याचे कुकडे । कळों आलें ॥ ३६ ॥
वैर केल्याने वैरच वाढते आणि आपल्याला दुःख भोगावे लागते. यावरून शहाण्या माणसाचे गूढ विचार कळून येतात. (३६)

अखंड आपणा सांभळिती । क्षुल्लकपण येऊं नेदिती ।
थोर लोकांस क्ष्मा शांति । अगत्य करणें ॥ ३७ ॥
आपला थोरपणा ते अखंड सांभाळतात. स्वतः कडे क्षुल्लकपणा येऊ देत नाहीत. थोर लोक असतात, त्यांच्या ठिकाणी क्षमा आणि शांती हे गुण अवश्य असतातच. (३७)

अवगुणापासीं बैसला गुणी । आवगुण कळतो ततक्षणीं ।
विवेकी पुरुषाची करणी । विवेकें होते ॥ ३८ ॥
अवगुणी माणसाजवळ गुणी माणूस बसला की, तुलनेने त्वरित अवगुण स्पष्ट कळून येतो. विवेकी पुरुष नेहमीच विचाराने वागतो. (३८)

उपाये परियाये दीर्घ प्रेत्‍न । विवेकबळें नाना येत्‍न ।
करील तयाचें महिमान । तोचि जाणे ॥ ३९ ॥
जो पुरुष उपाय, त्यांचे पर्याय म्हणजे इतर मार्ग आणि दीर्घ प्रयत्न तसेच विवेकाच्या बळावर अनेक प्रयत्न करणे जाणतो त्याची थोरवी लोकांना कळणे कठीण असते. ती ज्याची त्यालाच कळते. (३९)

दुर्जनीं वेवदरून घेतला । बाश्कळ लोकीं घसरिला ।
विवेकापासून चेवला । विवेकी कैसा ॥ ४० ॥
जो दुर्जनांनी वादविवादात बेजार केल्याने, मूर्ख लोकांनी डिचवल्यामुळे विवेकभ्रष्ट होतो, त्याला विवेकी कसे म्हणता येईल ? (४०)

न्याये परियाये उपाये । मूर्खास हें कळे काये ।
मूर्खाकरितां चिवडा होये । मज्यालसीचा ॥ ४१ ॥
न्याय म्हणजे काय, पर्याय म्हणजे काय, उपाय कुठला व कसा करावा हे मूर्खाला काय कळणार ? मूर्खामुळे सभेचा विचका होतो. (४१)

मग ते शाहाणे नीट करिती । स्वयें साहोन साहविती ।
स्वयें करून करविती । लोकांकरवीं ॥ ४२ ॥
असा प्रसंग आला की, शहाणे लोक स्वतः त्रास सोसून परत सर्व काही सुरळित करतात. ते स्वतः त्रास सोसतात आणि लोकांकडूनही सोसवितात. स्वतः सर्व कार्य सुरळितपणे करतात आणि लोकांकडूनही करवितात. (४२)

पृथ्वीमधें उदंड जन । जनामधें असती सज्जन ।
जयांकरितां समाधान । प्राणीमात्रासी ॥ ४३ ॥
पृथ्वीवर असंख्य लोक आहेत. त्यांमध्ये सज्जनही असतात. त्यांच्यामुळेच प्राणिमात्रांना समाधान लाभते. (४३)

तो मनोगतांचीं आंगें जाणे । मान प्रसंग समये जाणे ।
संतप्तालागीं निवऊ जाणे । नाना प्रकारें ॥ ४४ ॥
सज्जन पुरुष लोकांचे अंत:करण बरोबर जाणतो. मान, प्रसंग, काळवेळ याचे त्याला अचूक ज्ञान असते आणि जे लोक संतप्त झालेले असतात, त्यांना नाना प्रकारे कसे निववावे, हेही तो जाणतो. (४४)

ऐसा तो जाणता लोक । समर्थ तयाचा विवेक ।
त्यचें करणें कांहिं येक । जनास कळेना ॥ ४५ ॥
असा जो ज्ञानी पुरुष असतो, त्याचा विवेक सामर्थ्यसंपन्न असतो. त्याच्या वर्तनाचा लोकांना काहीच उलगडा होत नाही. (४५)

बहुत जनस चलवी । नाना मंडळें हालवी ।
ऐसी हे समर्थपदवी । विवेकें होते ॥ ४६ ॥
अनेक लोकांना तो कामास लावतो. नाना लोकांचे समुदाय तो कार्यप्रवण करतो. ही समर्थ पदवी त्याला विवेकामुळे प्राप्त झालेली असते. (४६)

विवेक एकांती करावा । जगदीश धारणेनें धरावा ।
लोक आपला आणी परावा । म्हणोंचि नये ॥ ४७ ॥
एकांतात बसून विवेक करावा. भगवंताला, जगदीशाला धारणेच्या बळावर अंत:करणात दृढ धरून ठेवावे लोकांमध्ये आपला आणि परका असे म्हणू नये. (४७)

येकांती विवेक ठाईं पडे । येकांतीं येत्‍न सांपडे ।
येकांतीं तर्क वावडे । ब्रह्मांडगोळीं ॥ ४८ ॥
एकांतातच विवेक योग्य प्रकारे करता येतो. एकांतातच योग्य दिशेने प्रयत्न करण्यासंबंधी प्रेरणा मिळते. एकांतात आपण तर्काच्या बळावर सर्व ब्रह्मांडाच्या गोलकाचा वेध घेऊ शकतो. (४८)

येकांती स्मरण करावें । चुकलें निधान पडे ठावें ।
अंतरात्म्यासरिसें फिरावें । कांहीं तरी ॥ ४९ ॥
एकांतात स्मरण करण्याने चुकलेले निधान म्हणजे ठेवा जी आत्मवस्तू तिची प्राप्ती होते. एकांतात ज्याप्रमाणे अंत:स्फूर्ती होईल, त्याप्रमाणे कार्य करावे. (४९)

जयास येकांत मानला । अवघ्या आधीं कळे त्याला ।
त्यावेगळें वडिलपणाला । ठवचि नाहीं ॥ ५० ॥
ज्याला एकांत मानवतो, त्यालाच सर्वांच्या आधी ज्ञान होते. ज्याला मोठेपणा मिळवायचा असेल, त्याला एकांताशिवाय दुसरा पर्याय नाही. (५०)

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
श्रोताअवलक्षणनिरूपणनाम समास दहावा ॥
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ‘श्रोताअवलक्षणनिरूपणनाम’ समास दहावा समाप्त.

॥ दशक अठरावा समाप्त ॥


ref: satsangdhara

दासबोध दशक अठरावा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *