रामदासांची आरती

जनस्वभाव गोसावी

जनस्वभाव गोसावी

॥ श्रीराम समर्थ ॥
अनीति अविवेकी अन्यायी । अभक्त अधम लंडाई । वेदशास्त्र करील काई । तया मूर्खासी ॥१॥
कर्माच्या ठायीं अनादर । नाही सगुण साक्षात्कार । ज्ञान पाहतां अंधार । निश्चय नाहीं ॥२॥
उग्याच गोष्टी ऐकिल्या । मना आल्या त्या धरिल्या । रत्नें सोडून एकवटिल्या । शुभा जैशा ॥३॥
फाल्गुनमासींचा खेळ । जैसा अवघा बाष्कळ । तेथें पाहोनि निर्मळ । काय घ्यावें ॥४॥
प्रत्ययज्ञानेंविण । करी अनुमा-नाचा शीण । शत्रु आपणासी आपण । होऊन राहे ॥५॥
त्यासी कोणें उमजावें । मानेल तिकडे न्यावें । आंधळें गुरूं स्वभावें । धांवें चहूंकडे ॥६॥
जिकडे तिकडे ज्ञान झालें । उदंड गोसावी उतले । तयांचे संगती झाले । बाष्कळ प्राणी ॥७॥
भ्रष्ट ओंगळ अनाचारी कुकर्मी अनुपकारी । विचार नाही अविचारी । जेथें तेथें ॥८॥
गभाधा कैंची परीक्षा । दीक्षहीनासि दीक्षा । प्रमाण मानी प्रत्यक्षा । विवेकहीन ॥९॥
कशापासून काय झालें । ब्रह्मांड कोणें निर्मिलें । कांहीं न कळतां भुंकलें गाढव जैसें ॥१०॥
जें वेदशास्त्रीं मिळेना । अध्यात्म कांहीं कळेना । माजला बोका आकळेना । रेडा जैसा ॥११॥
कोण दीक्षा कैसी । अविवेक स्थिति ऐशी । न पहातां वसवसी । श्वान जैसें ॥१२॥
ऐसे प्रकारींचे जन । चित्तीं अवघा अनुमान । प्रतीतिवीण ज्ञान । उगेंच बोले ॥१३॥
लक्षण नेणे अवलक्षण । भाग्य नेणे करंटण । ज्ञान नेणे अज्ञान । परम अन्यायी ॥१४॥
एक उप-देश घेती । देवतार्चन टाकून देती । धर्मनीति बुडविती । महापाषांडी ॥१५॥
म्हणती आमुचा गुरु । तयाचा अगाध विचारू । तेथें अवघा एकंकारू । भेद नाहीं ॥१६॥
एक म्हणती गुरु आमुचा । करी अंगिकार विष्ठेचा । तयासारिखा दुजा कैंचा । भूमंडळीं ॥१७॥
एक म्हणती एकचि तो । अखंड ओक वर्पितो । बरें वाईट पाहे तो । गोसावी कैंचा ॥१८॥
अंगिकार करी सौंख्याचा । तो गोसावी कशाचा । पाहा गोसावी आमुचा । गुहाडींत लोळे ॥१९॥
वोक नरक आणि मूत । नि:शंक घटघटा घेत । लोकांमध्यें मोठा महंत । तया म्हणावें ॥२०॥
वोंगळपणाची स्थिति । स्वयें ओंगळ करिती । शुचिष्मंत महापंडितीं । मानि-जेना ॥२१॥
बरें जैसें जैसें मानलें । तैसें तैसें घेतलें । येथें आमुचें काय गेलें । होईना कां ॥२२॥
एक म्हणती अर्गळा । भूताळा आणि देवताळा । जनांमध्यें आग्या वेताळा । चेतऊं जाणे ॥२३॥
म्हणती आमचा गुरू । जाणे चेटकचा विचारू । भूतें घालून संहारू । समर्थ असे ॥२४॥
म्हणती आमुच्या घरीं । मोठी विद्या पंचाक्षरी । चेडे चेटकी नानापरी । लोकांमध्यें ॥२५॥
अखंड राहे स्मशानीं । सटवी मेसकी मायराणी । नाना कुजंत्रें येथुनी । शिकोनि जावीं ॥२६॥
एक म्हणतीए गोसावी । गारुडयास वेड लावी । त्याचे सर्पची पळवी । चहूंकडे ॥२७॥
कुसळी विद्या दृष्टिबंधन । तत्काळ सभामोहन । उच्चाटन आणि खिळण । मोहनी विद्या ॥२८॥
आमुचे गोसावी महायोगी । औषधें देती जगालागीं । नपुंसक वनिता भोगी । चमत्कारें ॥२९॥
आमुचे गोसावी साक्षेपें । अखंड करिती सोनें रुपें । अजंन साधन त्यापें । काय उणें ॥३०॥
मोठा बडिवार गुरूचा । विंचू उतरी ठांईचा । तैसाचि उतार सर्पाचा । ठांईचा होय ॥३१॥
जंबुक मुसके खिळवी । चोरटीं करावीम वोणवीं । अखंड भूतें राबवावीं । नानाजिनसीं ॥३२॥
आमुचा गुरु गुप्त होतो । दुजे दिवशीं उमठतो । अचेतन चालवितो । मोठा ज्ञानी ॥३३॥
व्याघ्रावरी नि:शंक । हातीं सर्पाचा चाबूक । वांचले होते सहस्त्र एक । सामर्थ्यबळें ॥३४॥
दांत पडोनि निघ ले । पांढरे केश काळे झाले । किती आले आणि गेले । गोसाव्या देखतां ॥३५॥
धारबंद नजरबंद । नाना घुटके कामबंद । पारे मोहरे नाना बंद । नाना प्रकरेम ॥३६॥
अग्नीमध्यें परी जळेना । लोकामध्यें परी कळेना । देखतां देखतां अस्माना । वेघून जाय ॥३७॥
जाणे दुसर्‍याचे जीवींचे । वांझपण फेडिलें वांझेचें । मन विघडी दंपत्याचें । एकही करी ॥३८॥
त्याचें मोठें नवल कीं गा । मृत्तिकेच्या करी लवंगा । ब्राह्मण समंध अंगा । आणून दावी ॥३९॥
मातीची साखर केवळ । ढेंकळाचा करी गूळ । धोत्र्याच्या बोंडांचीं केवळ । वाळकें करी ॥४०॥
श्र्वास कोंडी दिशा कोंडी । पाडी तिडकेनें मुरकुंडी । धडा माणसाची मान वांकडी । करून मोडी ॥४१॥
ऐशापरीच्या करामती । भोंपळे पोटांत चढविती । मनुष्याचे पशु करिती । निमिषमात्रें ॥४२॥
गुरु भविष्य सांगती । रेडयाकरवीं वेद म्हणविती । गधडयाकरवीं पुरावें सांगविती । सामर्थ्य-बळें ॥४३॥
कुतर्‍याकरवीं रागोद्धार । कोंबडयाकरवीं तत्त्वविचार । खेचर आणि भूचर । सकळ बाधी ॥४४॥
घुटका घटकेनें करावा । फुटका कवडा वेचों न द्यावा । उदंड वचनाग साधावा । एकाएकीं ॥४५॥
बाळलीं काष्ठें हिरवाळलीं । आंधळीं । डोळसें झालीं । पांगुळें धांवों लागलीं । चहूंकडे ॥४६॥
गर्भिणीस कन्या कीं पुत्र । हें ठाऊकें आहे यंत्र । गोसाव्यांनीं विद्या मात्र । अभ्यासिली ॥४७॥
भांडविद्या अभ्यासिली । तस्करविद्या कळों आली । विचारें पाहिली । वसुमधरा ॥४८॥
आमुचा गुरु अधिक गुणें । डोईचें करी रांधणें । लोकांचें नवस पुरविणें । नाना प्रकारें ॥४९॥
मेले प्राणी उठविले । साकरेचे मीठ केलें । गटगटा अग्नीस गिळिलें । काय सांगों ॥५०॥
गोसावी समाधीस बैसला । दुसरे वेळे उघडून पाहिला । पूर्वेचा पश्चिमेस गेला । अकस्मात ॥५१॥
लिंगाचे तुकडे तोडिती । कोटिलिंगें एकचि करिती । मोजवून दाळी चारिती । पाषाणनंदी ॥५२॥
आसन घातलें जळावरी । पाहातां तो पैलतीरीं । आमुचा गुरु समुद्रावरी । चालत जातो ॥५३॥
पुरुषाची करी वनिता । वनितेचा पुरुष मागुता । अन्न खाऊन तत्त्वतां । दिशा नाहीं ॥५४॥
नानाजिनसी अन्न खाणें । परी उदक नाहीं घेणें । शापूनि भस्मचि करणें । ऐसा गुरु ॥५५॥
अन्न उदंडची खाणें । किंवा उपवास करणें । गोमुखतोंडें जेवणें । यथासांग ॥५६॥
गुरु वाघासी भेटला । वाघें चराचर चाटिला । वस्त्रें बांधोनि आणिला । घरास वाघ ॥५७॥
गोसावी वाघ होतो । दुसर्‍या वाघासि मारितो । भुंकभुंकोचि मरतो । उतार नाहीं ॥५८॥
साधी बाळंतिणीची खापरी । वोहरें साधी नानापरी । तूप घे घागरीच्या घागरी । गुरु आमुच्या ॥५९॥
मेल्या माशा उठिवती । तुळसी देवावरी पाडिती । ऐशा नाना करामती । भूमंडळीं ॥६०॥
आमुच्या गुरूची मोठ महंती । नाना अभक्ष भक्षिती । लोकांदेखतां फुलें करिती । मद्यमांसाचीं ॥६१॥
एक गोसावी पृथ्वीवरी । त्याची कोणी न पवे सरी । जेथें बैसे तेथें वोहरी । सावकाश करी ॥६२॥
एक गोसावी महा भला । पोरीं वाळवंटीं पुरिला । एक तो पडोनिच राहिला । कित्येक दिवस ॥६३॥
एक गोसावी भाग्य देता । एक गोसावी पुत्र देती । गोसाव्यानें नवस चालती । नानाप्रकारें ॥६४॥
जें जें मनामध्यें चिंतावें । तें तें गोसाव्यांनीं जाणावें । चुकलें ठेवणें काढून द्यावें । नानाप्रकारें ॥६५॥
सुडक्यामध्यें लाह्या भाजिती । थोडया द्रव्याचें उदंड करिती । पराचीं खबुत्रें नाचविती । नाना प्रकारें ॥६६॥
हरपलें सांपडून द्यावें । चोरटें तात्काळ धरावें । थोडें अन्न पुरवावें । बहुत जनांसी ॥६७॥
ऐसें वर्ततें लोकीं । येणें सार्थक नव्हे कीं । अध्यात्मविद्या विवेकीं । जाणिजेते ॥६८॥
पिंडज्ञान तत्त्वज्ञान । आत्मज्ञान ब्रह्मज्ञान । पिंडब्रह्मांड सकळ शोधून । राहिले जे ॥६९॥
पदार्थज्ञानाचा बडिवार । त्याहून थोर ईश्वर । ऐसे प्राणी लहान थोर । सकळ जाणिती ॥७०॥
इति श्रीजनस्वभाव गोसावी ग्रंथ संपूर्ण ॥ ओवीसंख्या ॥७०॥

श्रीमत् दासबोध दशक ४ यांतील श्रवण, मनन, निरूपण भोजनोत्तर करावें. नंतर सायंसंध्येचे पूर्वी किंवा मग श्रीहनुमद्दर्शन घेऊन श्रीसमर्थकृत भीभरूपी स्तोत्र म्हणत अकरा प्रदक्षिणा घालाव्या. नंतर आरती म्हणावी.


जनस्वभाव गोसावी समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *