रामदासांची आरती

करुणाष्टकें – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – करुणाष्टकें

करुणाष्टकें – अष्ट

अनुदिनिं अनुतापें तापलों रामराया । परम दिनदयाळा नीरसी मोहमाया । अचपळ मन माझें नावरे आवरीतां । तुजविण शिण होतो धांव रे धांव आतां ॥१॥
भजनरहित रामा सर्वही जन्म गेला । स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला । रघुपति मति माझी आपलीसी करावी । सकळ त्यजुनि भावें कास तूझी धरावी ॥२॥
विषयजनितसूखें सूख होणार नाहीं । तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं । रघुकुळटिळका रे हीत माझें करावें । दुरित दुरि हरावें स्वस्वरूपीं भरावें ॥३॥
तनु मन धन माझें राघवा रूप तूझें । तुजविण मज वाटे सर्व संसार ओझें । प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी । अचळ भजनलीला लागली आस तूझी ॥४॥
चपळपण मनाचें मोडितां मोडवेना । सकळस्वजनमाया तोडितां तोडवेना । घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरींचा । म्हणवुनि करुणा हे बोलतों दीनवाचा ॥५॥
जळत हदय माझें जन्म कोटयानुकोटी । मजवरि करुणेचा राघवा पूर लोटी । तळमळ निववी रे राम कारुण्यसिंधू । षडरिपुकुळ माझें तोडिं यांचा समंधू ॥६॥
तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी । शिणत शिणत पोटीं पाहिली वाट तूझी । झडकरि झड घाली धांव पंचाननारे । तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥७॥
सबळ जनक माझा राम लावण्यकोटी । म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी । दिवस गणित बोटीं ठेवुनि प्राण कंठीं । अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥८॥
जननिजनक-माया लेंकरूं काय जाणे । पय न लगत मूखीं हाणितां वत्स नेणे । जलधरकण आशा लागली चातकासी । हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥९॥
तुजविन मज तैसें जाहलें रामराया । विलग विषमकाळीं सांडिती सर्व माया । सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं । विषय वमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥१०॥
स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे । रघुपतिविण आताम चित्त कोठें न राहे । जिवलग जिव घेती प्रेत सांडून जाती । विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥११॥
सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे । जिवलग मज कैंचे चालतें हेंचि साचें । विलग विशमकाळीं सांडिती सर्व माळी । रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥१२॥
सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकोनि आलें । भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत झालें । भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना परम कठिण देहो देहबुद्धी गळेना ॥१३॥
उपरति मज रामीं जाहली पूर्ण कामीं । सकळजनविरामीं राम विश्रामधामीं । घडि घडि मन आतां रामरूपीं भरावें । रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥१४॥
जळचर जळवासी नेणती त्या जळासी । निशिदिनिं तुजपाशीं चूकलों गूणराशी । भुमिधरनिगमांसी वर्णवेना तयांसी । सकळभुवनवासी भेटि दे रामदासीं ॥१५॥
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥


करुणाष्टकें – अष्टक २

असंख्यात ते भक्त होऊन गेले । तिहीं साधनांचे बहू कष्ट केले । नव्हे कार्यकर्ता भुमीभार झालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलों ॥१॥
बहू दास ते तापसी तीर्थवासी । गिरीकंदरी भेटि नाहीं जनासी । स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालोएं । तुझा दा० ॥२॥
सदा प्रेमळासी तया भेटलासी । तुझ्या दर्शनें स्पर्शनें पुण्यराशी । अहंतामदें शब्दज्ञानें बुडालों । तुझा दा० ॥३॥
तुझ्या प्रीतिचे दास निर्माण झाले । असंख्यात ते कीर्ति बोलेनि गेले । बहू धारणा थोर चक्कीत झालों । तुझा दा० ॥४॥
बहूसाल देवालयें हाटकाचीं । रसाळा कळा लाघवें नाटकाचीं । पुजा देखतां जाड जीवीं गळालों । तुझा दा० ॥५॥
कितीएक देहे त्यागिले तूजलागीं । पुढें जाहलों संगतीचा विभागी । देहेदु:ख होतांच वेगी पळालों । तुझा दा० ॥६॥
किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती । किती धर्मसंस्थापना अन्नशांती । पस्तावलों कावलों तप्त झालों । तुझा दा० ॥७॥
सदा सर्वदा राम सोडोनि कामीं । समर्था तुझे दास आम्ही निकामी । बहू स्वार्थबुद्धी नुरे कष्ठवीलों । तूझा दा० ॥८॥
जयजय रघुवीर समर्थ ॥


करुणाष्टकें – अष्टक ३

नसे भक्ति ना ध्यान ना ज्ञान कांहीं । नसे प्रेम हें राम विश्राम नाहीं । असा दीन अज्ञान मी दास तूझा । समर्था जनीं घेतला भार माझा ॥१॥
रघूनायका जन्मजन्मांतरींचा । अहंभाव छेदोनि टाकी दिनाचा । जनीं बोलती दस या राघवाचा । परी अंतरीं लेश नाहीं तयाचा ॥२॥
रघूनायका दीन हातीं धरावें । अहंभाव छेदोनियां उद्धरावें । अगूणी तयालगिं गूणी करावें । समर्थें भवोसागरीं ऊतरावें ॥३॥
किती भार घालूं रघूनायकाला । मजकारणें शीण होईल त्याला । दिनानाथ हा संकटीं धाव घाली । तयाचेनि हे सर्व काया निवाली ॥४॥
मला कायसा राम कैवल्यदाता । तयाचेनि हे फीटली सर्व चिंता । समर्था तया काय उत्तीर्ण व्हावें । सदा सर्वदा नाम वाचें वदावें ॥५॥
दिनाचें उणें दीसतां लाज कोणा । जनीं दास दीजे तुझा दैन्यवाणा । शिरीं स्वामि तं राम पूर्णप्रतापी । तुझा दास पाहे सदा शीघ्रकोपी ॥६॥
जयजय रघुवीर समर्थ ॥


करुणाष्टकें – अष्टक ४
उदासीन हे वृत्ति जीवीं धरावी । अती आदरें सर्व सेव्वा करावी । सदा प्रीति लागो तुझे गुण गातां । रघूनायका मागणें हेंचि आतां ॥१॥
तुझें रूपडें लोचनीं म्यां पहावें । तुझे गूण गातां मनेंशी रमावें । उठो आवडी भक्तिपंथेंचि जातां । रघूनाय० ॥२॥
मनीं वासना भक्ति तूझी करावी । कृपाळूपणें राघवें पूरवावी । वसावें मदीयांतरीं नाम घेतां । रघूनाय०॥३॥
सदा सर्वदा योग तूझा घडावा । तुझे कारणीं देह माझा पडावा । उपेक्षूं नको गूणवंता अनंता । रघूनाय०॥४॥
नको द्रव्य दारा नको येरझारा । नको मानसीं ज्ञान-गर्वें फुगारा । सगूणीं मला लविं रे भक्तिपंथा । रघूनाय०॥५॥
भवें तापलों प्रीतिछाया करावी । कृपासागरें सर्व चिंता हरावी । मला संकटीं सोडवावें समर्था । रघूनाय०॥६॥
मनीं कामना कल्पना ते नसावी । कुबुद्धी कुडी वासना नीरसावी । नको संशयो तोडि संसारवेथा । रघूनाय०॥७॥
समर्थापुढें काय मागों कळेना । दुराशा मनीं बैसली हे ढळेना । फुटे संशयी नीरसी सर्व चिंता । रघूनाय०॥८॥
ब्रिदाकारणें दीन हातीं धरावें । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरावें । सुटे ब्रीद आम्हांसि सोडोनि जातां । रघूनाय०॥९॥
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥
————————————————————————————————————————————————————

करुणाष्टकें – अष्टक ५

युक्ति नाहीं बुद्धि नाहीं विद्या नाही विवंचितां । नेणता भक्त मी तूझा बुद्धि दे ॥ रघूनायका ॥१॥
बोलतां चालतां येना कार्यभाग कळेचिना । बहू मी पीडिलों लोकीं बुद्धि दे रघुनायका ॥२॥
तुझा मी टोणपा झालों कष्टलों बहुतां परी । सौख्य तें पाहतां नाहीं बुद्धि दे रघुनायका ॥३॥
नेटकें लिहितां येना वाचितां चूकतों सदा । अर्थ तो सांगतां येना बुद्धि दे रघुनायका ॥४॥
प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घसूचना । मैत्रिकी राखितां येना बुद्धि दे रघुनायका ॥५॥
संसार नेटका नाहीं उद्वेग वाटतो जिवीं । परमार्थ हा कळेना बुद्धि दे रघुनायका ॥६॥
उदास वाटतें जीवीं आतां जावें कुणीकडे । तूं भक्तवत्सला देवा बुद्धि दे रघुनायका ॥७॥
कायावा चामनोभावें तूझा मी म्हणवीतसें । हे लाज तूजला माझी बुद्धि दे रघुनायका ॥८॥
मुक्त केल्या देवकोटि भूभार फेडिला बळें । भक्तासि आश्रयो मोठा बुद्धि दे रघुनायका ॥९॥
उदंड भक्त तुम्हाला आम्हांला कोण पूसतें । ब्रीद हें राखणें आधीं बुद्धि दे रघुनायका ॥१०॥
उदंड ऐकिली कीर्ती पतीतपावना प्रभो । मी एक रंक निर्बुद्धी बुद्धि दे रघुनायका ॥११॥
आशा हे लागली मोठी दयाळूवा दया करी । आणखी न लगे कांही बुद्धि दे रघुनायका ॥१२॥
रामदास म्हणे माझा संसार तुज लागला । संशयो वाटतो पोटीं बुद्धि दे रघुनायका ॥१३॥
जयजय रघुवीर समर्थ ॥


करुणाष्टकें – अष्टक ६

समाधान साधूजनाचेनि योगें । परी मागुतें दु:ख झालें वियोगें । घडीनें घडी शीण अत्यंत वाटे । उदासीन हा काळ कोठें न कंठे ॥१॥
घरें सुंदरें सौख्य नानापरीचें । परी कोण जाणेल तें अंतरीचें । मनीं आठवीतांचि तो कंठ दाटे । उदा० ॥२॥
बळें लवितां चित्त कोठें जडेना । समाधान तें कांहीं केल्या पडेना । नव्हे धीर डोळां सदा नीर लोटे । उदा० ॥३॥
अवस्था मनीं लागली काय सांगूं । गुणीं गुंतलों हेत कोणासि सांगूं । बहूसाल भेटावया प्राण फूटे । उदा० ॥४॥
कृपाळूपणें भेटरे रामराया । वियोगे तुझ्या सर्व व्याकूळ काया । जनांमाजिं लौकीक हाही न सूटे । उदा० ॥५॥
अहारे विधी हें असें काय केलें । पराधीनता पाप माझें उदेलें । बहूतांमधें तूकतां तूक तूटे । उदा० ॥६॥
समर्था मनीं सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी । घडेना तुझा योग हा प्राप्त कोठें । उदा० ॥६॥
समर्था मनीम सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिंता असावी । घडेना तुझा योग हा प्राप्त कोठें । उदा० ॥७॥
अखंडीत हे सांग सेवा घडावी । न होतां तुझी भेट काया पडावी । दिसेंदीस आयुष्य हें व्यर्थ लोटे । उदा० ॥८॥
भजों काय सर्वा परी हीन देवा । करूं काय रे सर्व माझाचि ठेवा । म्हणों काय मी कर्मरेखा न लोटे । उदा० ॥९॥
म्हणे दास मी वास पाहें दयाळा । रघूनायका भक्तपाळा भुपाळा । पहावें तुला हें जिवीं आर्त मोठें । उदा० ॥१०॥
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥


करुणाष्टकें – अष्टक ७

उदासीन हा काळ जातो गमेना । सदा सर्वदा थोर चिंता शमेना । उठे मानसी सर्व सोडोनि जावें । रघूनायका काय कैसें करावें ॥१॥
जना बोलतां वीट वाटे । नसे अंतरीं सूख कोठें न कंठे । घडीनें घडी चित्त कीर्तीं धरावें । रघूनाय० ॥२॥
बहू पाहतां अंतरीं कोंड होतो । शरीरास तो हेत सांडोनि जातो । उपाधीस देखोनि वाटे सरावें । रघूनाय० ॥३॥
अवस्था मनीं होय नानापरींची । किती काय सांगूं गती अंतरींची । विवेकेंचि या मानसा आवरावें । रघूनायका० ॥४॥
म्हणे दास ऊदास झालों दयाळा । जनीं वयर्थ संसार हा वायचाळा । तुझा मी तुला पूसतों प्रीय भावें । रघूनायका० ॥५॥
॥ जयजय रघुवीर समर्थ ॥


करुणाष्टकें – अष्टक ८

तुझीया वियोगें जीवत्व आलें । शरीरयोगें बहु दु:ख झालें । अज्ञान दारिघ्र माझें सरेना । तुजवीण रामा मज कंठवेना ॥१॥
परत्रीं जिणें दीन कंठूं किती रे । उदास माझ्या मनि वाटतें रे । लल्लाटरेखा  तरि पालटेना । तुजवी० ॥२॥
जडली उपाधी अभिमान साधी । विवेक नाहीं बहुसाल बाधी । तुझिया वियोगें पळही गमेना । तुजवी० ॥३॥
विश्रांति नाहीं अभिमान देहीं । कुळाभिमानें पडलों प्रवाहीं । स्वहीत होतां मजला दिसेना । तुजवी० ॥४॥
विषयी जनानें मज लाजवीलें । प्रपंचसंगें आयुष्य गेलें । समयीं बहू क्रोध शांती भरेना  । तुजवी० ॥५॥
संसारसंगें बहू पीडलों रे । कारुण्यसिंधू मज सोडवी रे । कृपाकटाक्षें सांभाळि दीना । तुजवी० ॥६॥
सदृढ झाली देहबुद्धि पाही । वैराग्य कांहीं हे नांव नाहीं । अपूर्ण कामीं मन हें विटेना । तुजवी० ॥७॥
निरूपणीं हे सद्‍बुद्धि होती । फलत्याग होतां सवेंचि जाती । काय करूं रे क्रिया घडेना । तुजवी० ॥८॥
जयजय दयाळा त्रैलोक्यपाळा । भवसिंधुहारी मज तारि हेळा । स्वामीवियोगें दासा मनीं आठव वीसरेना । तुजवी० ॥१०॥
जयजय रघुवीर समर्थ ॥
॥ करुणाष्टकें श्लोकसंख्या ॥७६॥


करुणाष्टकें – सवाया

तुझा भाट मी वर्णितों रामराया । सदा सर्वदा गाय ब्रीदें सवाया । महाराज दे अंगिंचें वस्त्र आतां । बहू जीर्ण झाली देहबुद्धिकंथा ॥१॥

॥ सवाई ॥१॥
रामदूत वायुसूत भीमगर्भ जुत्पती । जो नरांत वानरांत भक्ति प्रेम वित्पत्ती । दास दक्ष स्वामिपक्ष नीजकाजसारथी । वीरजोर शीरजोर धक्कधिंग मारुती ॥१॥ म्हणावा जयजयराम ॥

॥ सवाई ॥२॥
मारुतीची ॥ जब हनुमंत जनकदुहिता शुद्ध लेनेकू गभार दौर दौर आये है । तब कंठ गुरगुरगुरीत नेत्र गरगरगरीत रोम थरथरथरीत पुच्छ झारे । तब लंका घरघर-घरीत बनमो दरदरदरीत सीता शोक हस्त झरझरझरीत बन उफारे । तब कंठ कुचकुचकुचीत इंद्रजीत चकचकचकीत रावण थकथकथकीत कर नगर ज्यार ज्यार मखमखमखीत दास लियो जय तु राम मिले तब कपि भु:भु: कारे ॥१॥ म्हणावा जयजयराम ॥

॥ जोहार ॥१॥
परमसुंदररूप श्यामल । इंद्रनीलकीलकांतिकोमल । भयनिवारण भक्तवत्सल । वरपराक्रम कीर्तिविमल । भुवनकंटकदैत्यमारक । अमरमोचक दैन्यहारक । दुरितनाशक पुण्यकारक । हरित संकट दासतारक । विकटविषतालछेदक । वरनखर दैत्य भेदक । दशमुखादिकशिरच्छेदक । ऋषिजनमुनिचित्तवेधक । अमरभूषण उत्तमोत्तम । भुवन-पालक हा रघूत्तम । वीर वीरांतक हा वीरोत्तम । असुरांतक हा सुरोत्तम । बुहतपीडक-दैत्यभंजन । ऋषिमुनिजनयोगिरंजक । दुरितदानवदुष्टगंजन । अतुलकीर्तिव्यक्तव्यंजन । जयजय मार्तंडवंशावतंस । जयजय कैवल्यधाम । जयजय भरताग्रज । जयजय सीताराम । जयजय सिंहासनाधीश्वर । जयजय सुरराजविराजितपद । नमस्ते नमस्ते ॥१॥ सीताकांतस्मरण जयजयराम ॥ ॥४॥


करुणाष्टकें – संत रामदास  समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *