रामदासांची आरती

निरनिराळ्या वारांची गीतें – संत रामदास

श्री रामदास्वामीं विरचित – निरनिराळ्या वारांची गीतें

वारांची गीते – रविवार

॥ अभंग ॥ धन्य सूर्ववंश पुण्यपरायण । सर्वही सगूण समुदाव ॥१॥
समुदाव काय सांगूं श्रीरामाचा । अंतरीं कामाचा लेश नाहीं ॥२॥
लेश नाहीं तया बंधू भरतासी । सर्वहि राज्यासी त्यागियेलें ॥३॥
त्यागियेलें अन्न केलें उपोषण । धन्य लक्षूमण ब्रह्मचारी ॥४॥
ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक । श्रीरामीं सार्थक जन्म केला ॥५॥
जन्म केला धन्य वाल्मीक ऋषीनें । धन्य तीं वचनें भविष्याचीं ॥६॥
भविष्य पाहतां धन्य बिभीषण । राघवीं शरण सर्व भावें ॥७॥
सर्व भावें सर्व शरण वानर । धन्य ते अवतार विबुधांचे ॥८॥
विबुधमंडण राम सर्वगुण । अनन्या शरण रामदास ॥९॥
॥ भजन ॥ रामा रामा हो रामा ॥
॥ अभंग ॥ दासाची संपत्ति राम सीतापती । जिवाचा सांगती राम एक ॥१॥
राम एक माता राम एक पिता । राम एक भ्राता सहोदर ॥२॥
सहोदर विद्या वैभव कांचन । सर्व हा स्वजन राम एक ॥३॥
राम एक स्वामी राम हा कैवारी । लाभ या संसारीं राम एक ॥४॥
राम एक ध्यान । राम समाधान रामदासीं ॥५॥
॥ भजन ॥ तूं माय मी लेंकरूं । राघवा नको विसरूं रे नको विसरूं ॥
आरत्या
॥ आरती रामाची ॥ किरटि कुंडलें माला वीराजे । झळझळ गंडस्थळ घननीळ तेनू साजे । घंटा किंकिणी अंबर अभिनव गति साजे । अंदू वांकी तोडर नूपुर ब्रिद गाजे । जयदेव जयदेव जय रघुवीरेशा । आरती निर्जरवर ईशा जगदीशा । जय० ॥१॥
राजिवलोचन मोचर सुरवर नरनारी । परतर पर अभयंकर शंकरवरधारी । भूषण मंडित उभा त्रिदशकैवारी । दासा मंडण खंडण भवभय अपहारी ॥२॥ जयदेव० ॥
॥ आरती बहिरोबाची ॥ दक्षिणदेशामाजीं भैख तो देव । क्षेत्रपाळ वंदी लोकत्रय भाव । भक्तासी देखूनि चरणीं दे ठाव । देवाचा तारक भैरव देव । जयदेव जयदेव जय भैरव देवा । सद्भावें आरती करितों मी देवा । जय० ॥१॥
वामांगीं जोगेश्वरि शोभे सुंदर । कासे पीतांबर वाद्यांचा गजर । भक्तासि देखोनि हरि कृपाकर । रामदास चरणीं त्या मागे थार । जयदेव० ॥२॥
॥ आरती खंडोबाची ॥ पंचानन हयवाहन सुरभूषण लीला । खंडामंडित दंडित दानव अवलीळा । मणिमल्ल मर्दूनी धूसर जो पिंवळा । करिं कंकण बाशिंगें सुमनांच्या माळा । जयदेव जयदेव जय जय मल्हारी । वारी दुर्जन वारी निंदक अपहारी । जय० ॥१॥
सुरवर सैवर दे मज नाना देवा । नाना नामें गाइन घडे तुझी सेवा । अगणित गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर स्मरला जेथें नर पामर केवा । जय० ॥२॥
रघुवीरस्मरणें शंकर हदयीं नीवाला । तो हा मदनांतक अवतार झाला । यालागीं आवडीं भावें वर्णीला । रामीं रामदासा जिवलग भेटला ॥ जयदेव० ॥३॥
॥ आरती कृष्णाची ॥ करुणाकर गुणसागर गिरिवरधर देवें । लीलानाटक वेष धरिला स्वभावें । अगणितगुणलाधव हें कवणा ठावें । व्रजनायक सुखदायक काय वर्णावें । जयदेव जयदेव जय राधारमणा । आरती ओवाळूं तुज नारायणा ॥ धृ० ॥ जय० ॥१॥ वृंदावन हरिभुवन नूतन तनु शोभे । वक्रांगें श्रीरंगें यमुनातटिं शोभे । मुनिजनमानसहारी जगजीवन ऊभे । रविकुळटीळकदास पदरज त्या लाभे ॥ जय० ॥२॥
॥ आरती केदाराची ॥ जयदेव जयदेव जयजी केदारा । दासा संकट वारा भवभय अपहारा ॥धृ०॥ भागीरथिमूळ शीतळ हिमाचळवासी । न लागत पळ दुर्जन खळ संहारी त्यासी । तो हा हिमकेदार करवीरापाशीं । रत्नागिरिवरि शोभे कैवल्यरासी ॥१॥
जयदेव० ॥ उत्तरेचा देव दक्षिणे आला । दक्षिणकेदारसें नाम पावला । रत्नासुर मर्दुनि भक्तां पावला । दास म्हणे थोरा दैवें लाधला ॥२॥ जयदेव० ॥ ॥२५॥


वारांची गीते – सोमवार

दंडडमरूमंडित पिनाकपाणी ॥ धृ० ॥ पांच मुखें पंधरा डोळे । गळा साजूक सिसाळें ॥ दंड० ॥१॥
हिमालयाचा जामात । हातीं शोभे सरळ गात । दंड० ॥२॥
मस्तकीं वाहे गंगाजळ । कंठीं शोभे हळाहळ ॥दंड०॥३॥
माथां मोठा जटाभार । अंगीं फुंकती विखार ॥ दंड० ॥४॥
रामीं रामदास स्वामी । चिंतितसे अंतर्यामीं ॥५॥
॥ आरती सांबाची ॥ लवथवती विक्राळा ब्रह्मांडमाळा । विषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा । लावण्य सुंदर मस्तकीं बाळा । तेथूनियां जळ निर्मळ वाहे झुळझुळां । जयदेव जयदेव जय श्रीशंकरा । आरती ओवाळूं तुज विश्वभरा ॥ जय० ॥१॥
कर्पुरगौर भोळा नयनीं वीशाळा । अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा । भस्माचें उधळण शितिकंठ नीळा । ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय० ॥२॥
व्यांघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी पंचानन मुनिजनमनमोहन सुखकारी । शतकोटीचें बीज वाचें उच्चारी । रविकुळटीळक रामदासा अंतरीं ॥ जय देव० ॥३॥ ॥८॥


वारांची गीते – मंगळवार

॥ अभंग ॥ सदां आनंदभरीत । रंगसाहित्यसंगीत ॥१॥
जगन्माता जगदीश्वरी । जगज्जननी जगदुद्धारी ॥२॥
त्रिभुवनींच्या वनिता । बाळ तारुण्य समस्तां ॥३॥
बसे आकाशीं पाताळीं । सर्वकाळ तिन्हीकाळीं ॥४॥
जिच्या वैभवाचे लोक । हरिहर ब्रह्मादिक ॥५॥
सर्व देहा हालविते । चालविते बोलविते ॥६॥
मूळमाया विस्तारली । सिद्ध साधकाची बोली ॥७॥
भक्ति मुक्ति योगस्थिति । आदि मुक्ति सहजस्थिति ॥८॥
मुळीं राम वरदायिनी । रामदास ध्याता ध्यानीं ॥९॥
॥ पद ॥ सुंदर रामाबाई । सबराभरित सर्वांठायीं हो । निगमा पार नाहीं । ते म्यां वर्णावी ते काई हो । सुंदर रामाबाई ॥धृ०॥
शरयूतीरवासिनी वेधक मुनिमानसमोहिनी हो । सुरवर संजीवनी कैसी शोभत पद्मासनीं हो । उदार एकवचनी दुर्लभ तापसी तपसाधनीं हो । दशरथनृपनंदिनी प्रगटे ऋषिवचनालागुनी हो ॥ सुंदर० ॥१॥
निजमस्तकीं वीरजगुंठी त्रिपुंड्र रेखिला लल्लाटीं हो । सुरेख सदटा । भ्रुकटी तेणें सतेज नासापुटी हो । नव वानर गोमटी श्रवणीं कुंडलांची थाटी हो । लावण्याची पेटी उपमे न पुरे मन्मथकोटी हो ॥ सुंदर ॥२॥
कटितटीं सोनसळा माजीं सौदामिनीचा मेळा हो । सुवास नाभीकमळा तेणें पडे मधुकरपाळा हो । वामे धरणीबाळा वनितामंडित ते वेल्हाळा हो । चरणस्पर्शें शिळा अहिल्या उद्धरिली अवलीला हो ॥ सुंदर० ॥३॥
विशाळ वक्षस्थळीं विराजित उटी चंदन पातळी हो । कंठीं एकावळी माजीं कौस्तभमणी झळफळी हो । अधरीं प्रवाळपाळी मध्यें
शोभे दंतावळी हो । रसना रसकल्लोळीं वाचा बोलत मंजुळी हो ॥ सुंदर० ॥४॥
आजानुबाह सरळ सुनीळ गगनाहुनी कोमळ हो । सुपाणि रम्य स्थळ देखुनि रवितेज सोज्ज्वळ हो । मुद्रिका फांकती कीळ सतेज ग्रहमंडळ हो । शरकार्मूक सह मेळे शोधित असुर तरुचीं मुळें हो ॥ सुंदर० ॥५॥
चिद्‍गगनाचा गाभा तैसी सुनीळ अंगप्रभा हो । देखोनि चिद्‍घनशोभा जैसी कांति चढली नभा हो । रतिनायकवल्लभा देखुनि नागर सांडी दंभा हो । प्रथमारंभ स्तंभाभरणें भूषित शामल शोमा हो ॥ सुंदर० ॥६॥
भरत बिभीषण पृष्ठीं सविता गुण मानित उत्कंठीं हो । जोडोनि करसंपुष्टी ध्यानीं मारुतीगानवेष्टी हो । देखुनियां सुखपुष्टी झाली प्रेमरसाची वृष्टी हो । सुख संतुष्टें हर्षें परमेष्टी कोंदे कमळा सृष्टि हो ॥ सुंदर० ॥७॥
नव पंकजलोचनी विस्मित करुणामृतसिंचनी हो । शिवसंकटमोचनी दुर्धर रजनीचरभंजनी हो । भवभयसंकोचनी भक्तां निर्भयपदसूचनी हो । रघुकुळउल्हासिनी भोजें विलसत चंद्राननी हो ॥ सुंदर० ॥८॥
अव्यक्त पार जीचा विचार खुंटे सहा अठरांचा हो । सुकाळ स्वानंदाचा याचा अंतरला दु:खाचा हो । जगदुद्धार मातेचा उत्तीर्ण नव्हे मी हे वाचा हो । रामदासीं भेदतरंग तुटोनि गेला साचा हो ॥ सुंदर० ॥९॥
॥ चाल भुत्याची ॥ ब्रह्मीं माया उदो । त्रिगुण काया उदो । तत्त्वच्छाया उदो । चारी खाणी उदो ॥१॥
चारी वाणी उदो । अनंत योगी उदो । विद्या बुद्धि उदो । नाना विधि उदो ॥२॥
कारण सिद्धि उदो । आगम निगम उदो । साधन सुगम उदो । ज्ञान संगम उदो ॥३॥
देवां भक्तां उदो । योगी मुक्तां उदो । अनंत सिद्धां उदो । उदो दासा उदो ॥४॥
॥ आरती ॥ अजरामर पन्नगधर वैश्वानर भाळीं । रसाळवदनें विशाळ नयनांजन भाळीं । शूळी वेष्टित सुरवर किन्नर ते कालीं । हाटक करुणाटक करुणाकल्लोळीं । जयदेवी जयदेवी जय वेदमाते । आरती ओवाळूं तुळजे गुणसरिते ॥ जय० ॥१॥
हंसासन जगजीवन मनमोहन माता । पवनाशन चतुरानन थक्कित गुण गातां । अमृतसंजीवनी अंतसुखसरिता । दासा पालन करितां त्वरिता गुनभरिता ॥ जय० ॥२॥
रामाबाई माझे आई । करुणा तुला येऊं दे ॥ ॥२४॥


वारांची गीते – बुधवार

॥ अभंग ॥ येथें उभा कां श्रीरामा । मनमोहन सेघश्यामा ॥धुर०॥ काय केली सीताबाई । येथें राही रखुमाई ॥१॥
काय केली अयोध्यापुरी । तेथें वसविली पंढरी ॥२॥
काय केली शरयू गंगा । येथें आणिली चंद्रभागा ॥३॥
धनुष्य बाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥४॥
काय केलें वानरदळ । येथें मिळविले गोपाळ ॥५॥
रामीं रामदासीं भाव । तैसा होय पंढरिराव ॥६॥
॥ अभंग ॥ राम कृपाकर विठ्ठल साकार । दोघे निराकार एकारूपें ॥१॥
आमुचिये घरीं वस्ती निरंतरीं । हदयीं एकाकारी । राहियेलें ॥२॥
रामदास म्हणे धरा भक्तिभाव । कृपाळू राघव पांडुरंग ॥३॥
जयजय पांडुरंग हरी ॥
॥ अभंग ॥ रामचरणाचा हाचि भावो । भक्तां दाखवावया ठावो । उभें राहाया अभि-प्रावो । भक्त खांद्या ध्यावया ॥१॥
विठोबा हे आमुची जननी । भीमातरिनिवासिनी । भक्त पुंडलिकालागुनी । वैकुंठींहुनि पातली ॥२॥
श्रीवत्साची हे खूण । तें भक्ताचें कृपा.
दान । आजानुबाहू यालागृन । भक्तां आलिंगन द्यावया ॥३॥
शोभे सुहास्यवदन । नाभी नाभी हें वचन । पूर्ण आकर्णनयन । साधुजन पहाया ॥४॥
मुकुटी मयूरपत्रें त्रिवळी । विट नीट असे ठाकली । रामदासाची माउली । भक्तालागीं उभी असे ॥५॥
॥ आरती ॥ निर्जरवर स्मरहरधर भीमातिरवासी । पीतांबर जघनीं कर दुस्तर भव-नाशी । शरणागत वत्सल पालक भक्तांसी । चाळक गोपीजनमनमोहन सुखरासी । जयदेव जयदेव जय पांडुरंगा । निरसी मम संगा नि:संगा भवभंगा ॥ जय० ॥१॥
आणिमा लधिमा गरिमा नेगति तव महिमा । नीलोत्पलदलविमला घननिलतनु श्यामा । कंटकभंजन साधू-रंजन विश्रामा । राघवदासा विगलितकामा नि:कामा ॥ जय० ॥२॥ ॥१६॥


वारांची गीते – गुरुवार

॥ अभंग ॥ आदिनारायण सद्नुरु आमुचा । शिष्य झाला त्याचा महाविष्णू ॥१॥
तयाचा जो शिष्य तो जाणावा हंस । तेणें ब्रह्मयास उपदेशिलें ॥२॥
ब्रह्मदेवें केला उपदेश वसिष्ठा । तेथें धरा निष्ठा शुद्ध भावो ॥३॥
वसिष्ठ उपदेशी श्रीरामरायासी । रामें रामदासीं उपदेशिलें ॥४॥
॥ अभंग ॥ उपदेश देवोनि दिधला मारुती । स्वयें रघुपती नीरवीता ॥१॥
निरवितां तेणें झालों रामदास । संसारीं उदास म्हणोनियां ॥२॥
म्हणोनी आमुचे कुळीं कुळदैवत । राम हनूमंत आत्मरूपीं ॥३॥
आत्मरूपीं झाला रामीं रामदास । केला उपदेश दीनोद्धारा ॥४॥
॥ अभंग ॥ भाविका भजना गुरुपरंपरा । सदा जप करा राममंत्र ॥१॥
राममंत्र जाणा त्रयोदशाक्षरी । सर्व वेदशास्त्रीं प्रगटचि ॥२॥
प्रगटचि राममंत्र हा प्रसिद्ध । तारीतसे बद्ध जडजीवां ॥३॥
जडजीवा तारी सकळ चराचरीं । देह काशीपुरीं येणें मंत्रें ॥४॥
येणें मंत्रें जाणा बद्ध तो मुमुक्षु । साधक प्रसिद्धु सिद्ध होय ॥५॥
सिद्ध होय रामतारक जपतां । मुक्ति सायुज्यता रामदासीं ॥६॥
॥ भजन ॥ नारायण विधि वसिष्ठ राम रामदासकल्याण धाम ॥
॥ पद ॥ श्रीगुरुचें चरणपंकज हदयीं स्मरावें ॥ध्रु०॥ निगम निखिल साधारण सुलभा-हूनी सुलभ बहू । इतर योग याग विषम पंथिं कां शिरावें ॥१॥
नरतनुदृढनावेसी बुडवूनि अति मूढपणें । दुष्ट नष्ट कुकर सूकर तनु कां फिरावें ॥२॥
रामदास विनवी तुज अझुनि तरी समज उमज । विषवीष पेउनिनां फुकट कां मरावें । श्रीगुरु० ॥३॥ ॥१७॥


वारांची गीते – शुक्रवार

॥ अभंग ॥ कांहो राममाये दुरि धरियेलें । कठीण कैसें झालें चित्त तूझें ॥१॥
देऊनि आलिंगन प्रीतिपडीभरें । मुख पीतांबरें पुसशील ॥२॥
घेऊनि कडिये धरुनि हनुवटी । कईं गुजगोष्टी सांगसील ॥३॥
रामदास म्हणे केव्हां संबोखिसी । प्रेमपान्हा देशी जननिये ॥४॥
॥ भजन ॥ येईं धांवत रामाबाई । दासासी दर्शन देंई ॥
॥ पद ॥ येंई हो रामाबाई । माझे येईं हो रामाबाई ॥धृ०॥ अनंतरूपें व्यापें दानव-दर्पे पूर्णप्रतापें । तव नामें कळिकाळ कांपे ॥१॥
तुझा छंद लागलागे माये निशिदिनिं या जीवासी । तुजविण मी परदेशी ॥२॥
रामीं रामदासीं आराम करणें हेंचि तुला उचित । झणीं उपेक्षिसी काय आतां उरला माझा अंत ॥३॥
॥ पदो । लो लो लागला लो । आदिशक्तीचा लागला लो । अंतरिं लो बहिर लो । जिकडे तिकडे लागला लो ॥१॥
अंडज लो जारज लो । स्वेदज लो उद्भिज लो । देवा लो दानवा लो । सिद्ध साधका लागला लो ॥२॥
दास म्हणे तोचि जाणे । सद्रुरुवचनीं सुख बाणे ॥३॥
॥ आरती व्यंकटेशाची ॥ अवहरणी पुष्करणी अगणित गुणखाणी । अगाध महिमा स्तवितां न बोलवे वाणी । अखंद तीर्थावळी अचपळ सुखदानी । अभिनव रचना पाहतां तन्मयता नयनीं ॥ जयदेव जयदेव जय व्यंकटेशा । आरती ओवांळू स्वामी जगदीशा ॥ जय० ॥१॥
अति कुसुमालय देवालय आलय मोक्षाचें । नानानाटकरचना हाटकवर्णाचें । थक्कित मानस पहातां स्थळ भगवंताचें । तुळणा नाहीं तें हें भूवैकुंठ साचें ॥ जय० ॥२॥
दिव्यां-बरधर सुंदरतनु कोमल नीला । नाना रत्नें नाना सुमनांच्या माळा । नानाभूषणमंडित वामांगीं बाळा । नाना वाद्यें मिनला दासांचा मेळा ॥ जय० ॥३॥
॥ आरती कृष्णेची ॥ सुखसरिते गुणभरिते दुरितें नीवारी । नि:संगा भवभंगा चिदू-गंगा तारी । श्रीकृष्णे अवतार जलवेषधारी । जलमय देहें निर्मल साक्षात हरी ॥ जयदेवी जयदेवी जय माये कृष्णे । आलों तुझिया उदरा निरसी मम तृष्णे ॥ जय० ॥१॥
हरिहर सुंदर ओघ ऐक्याची आले । प्रेमानंदें बोधें मिळणी मीळाले । ऐशिया संगमीं मिसळोनि गेले । रामदास त्यांचीं वंदी पाऊलें ॥ जय० ॥२॥ ॥१५॥


वारांची गीते – शनिवार

॥ अभंग ॥ बाप माझा ब्रह्मचारी । मातेपरी अवघा नारी ॥१॥
उपजतां बाळपणीं । गिळूं पाहे वासरमणी ॥२॥
अंगीं सिंदुराची उटी । जया सोन्याची कासोटी ॥३॥
रामकृपेची साउली । रामदासाची माउली ॥४॥
॥ भजन ॥ सीताशोक विनाशन चंद्रा । जय बलभीमा महारुद्रा ॥
॥ पद ॥ मारुतीचें ॥ मारुती सख्या बलभीमा हो ॥धृ०॥ अंजनीचें वचनांजन लेऊनि । दाखविशी बलसीमारे ॥१॥
वज्रतनु बलभीमपराक्रम । संगितगायनसीमारे ॥ मा० ॥२॥
दास म्हणे हो रक्षी आम्हां । त्रिभुवनपालनसीमारे ॥ मा० ॥३॥
॥ भजन ॥ मारुतिराया बलभीमा । शरण आलों मज द्या प्रेमा ॥
॥ पद ॥ सामर्थ्याचा गाभा । अहो भीम भयानक उभा । पाहतां सुंदर शोभा । लांचावे मन लोभा ॥१॥
हुंकारे भुभु:कारे । काळ म्हणे अरे बारे । विघ्र तगेना थारे । धन्य हनुमंतारे ॥२॥
दा्स म्हणे वीर गाढा । घसरित घनसर दाढ । अभिनव हा़चि पवाडा । न दिसे जोडा ॥३॥
॥ पद ॥ कैंपक्षी भीमराया । निगमांतर विवराया । ब्रह्मानंद वराया । चंचळ मन आदराया ॥१॥
संकट विघ्र हराया । मारकुमार कराया । गुरुपदरेणु धराया । भाविकजन उद्धराया ॥२॥
रघुपतिचा कैवारी । संकट विघ्र निवारि । भजन पूजन मंदवारीं । कल्याण जनहितकारी ॥३॥
॥ आरती मारुतीची ॥ जयदेव जयदेव जय महारुद्रा । आरत भेटीचें दीजे कपींद्रा ॥ जय० ॥धृ०॥
कडकडित ज्वाळा भडका विशाळ । भुभु: करेंकरुनी भोंवडि लांगूळ । थोर हलकल्लोळ पळती सकळ । वोढवला वाटे प्रळयकाळ ॥ जय० ॥४॥
तृतीय भाग लंका होळी पैं केली । जानकीची शुद्धी श्रीरामा नेली । देखोनी आनंदें सेना गजजली । रामीं रामदासा निजभेटी झाली ॥ जय० ॥५॥
ही आरती भजनाच्या आधीं किंवा धुपारती-नंतर म्हणावी.
॥ अभंग ॥ मुकुट किरीट कुंडलें । तेज रत्नांचें फांकलें ॥१॥
ऐसा राम माझे मनीं । सदा आठवे चिंतनीं ॥२॥
कीर्तिमुखें बाहुवटे । दंडी शोभती गोमटे ॥३॥
जडितरत्नांचीं भूषणें । दशांगुलीं वीरकंकणें ॥४॥
कासे शोभे सोनसळा । कटीं सुवर्णमेखळा ॥५॥
पायीं नूपरांचे मेळे । वांकी गर्जती खळाळें ॥६॥
राम सर्वांगीं सुंदर । चरणीं ब्रीदाचा तोडर ॥७॥
सुगंधपरिमळ धूसर । झेपावती मधूकर ॥८॥
गळां पुष्पांचिया माळा । वामे शोभे भूमीबाळ ॥९॥
स्वयंभ सुवर्णाची कास । पुढें उभा रामदास ॥१०॥ ॥२८॥

॥ एकूण वार – गीतें गीतसंख्या ॥१३३॥


वारांची गीते – अभंग ज्ञानपर

॥ अभंग ज्ञानपर ॥१॥
एक देव आहे खरा । माया नाथिला पसारा ॥२॥
हेंचि विचारें जाणावें । ज्ञान तयासी म्हणवें ॥२॥
साच म्हणों तरि हें नासें । मिथ्या म्हणों तरि हें दिसे ॥३॥
पाहों जातां आकारलें । मुळीं कांहीं नाहीं झालें ॥४॥
कैसा देहीं देहातीत । कैसें अनंत अनंत ॥५॥
रामदासाचें बोलणें । स्वप्रामाजिं जाईजेणें ॥६॥
॥ अभंग ॥२॥ पूर्वीं पाहतां मी कोण । धुंडूं आपण आपण ॥१॥
स्वयें आपुला उगव । जाणे तोचि महानुभाव ॥२॥
कोण कर्म आचारला । कैसा संसारासी आला ॥३॥
आले वाटे जो मुरडे । देव तयासी सांपडे ॥४॥
आली वाट ती कवण । मायेचें जें अधिष्ठान ॥५॥
रामदासाची उपमा । ग्राम नाही कैंची सीमा ॥६॥
॥ अभंग ॥३॥ गेला संदेहाचा मळ । तेणेम नि: संग निर्मळ ॥१॥
बाह्य गंगाजळस्नान । चित्तशुद्धि ब्रह्मज्ञान ॥२॥
सर्वकाळ कर्मनिष्ठ । सर्वसाक्षित्वें वरिष्ठ ॥३॥
रामदासीं स्नानसंध्या । सुत करी माता वंध्या ॥४॥
॥ अभंग ॥४॥ सृष्टी दृष्टीसी नाणावी । आत्मप्रचीत जाणावी ॥१॥
दृश्यविरहीत देखणें । दृश्य नुरे दृश्यपणें ॥२॥
सृष्टीवेगळा निवांत । देवभक्तांचा एकांत ॥३॥
राम अनुभवा आला । दासा विवाद खुंटला ॥४॥
॥ अभंग ॥५॥ आत्मारामाविण रितें । स्थान नाहीं अणुपुरतें ॥१॥
पाहतां मन बुद्धि लोचन । रामेंविण नदे आन ॥२॥
संधि नाहीं तीर्थगमना । रामें व्यापिलें भूवना ॥३॥
रामदासीं तीर्थ भेटी । तीर्थ रामेंहूनी उठी ॥४॥
॥ अभंग ॥६॥ रूप रामाचें पाहतां । मग कैंची रे भिन्नता ॥१॥
द्रष्टा दृश्यासी वेगळा । राम जीवींचा जिव्हाळा ॥२॥
वेगळीक पाहतां कांहीं । हें तों मुळींच रे नाहीं ॥३॥
रामदासीं राम होणें । तेथे कैचें रे देखणें ॥४॥
॥ अभंग ॥७॥ देव जवळी अंतरीं । भेटि नाहीं जन्मवरी ॥१॥
मूर्ति त्रैलोकीं संचली । दृष्टि विश्वाची चुकली ॥२॥
भाग्ये आले संतजन । झालें देवाचें दर्शन ॥३॥
रामदासीं योग झाला । देहीं देव प्रकटला ॥४॥
॥ अभंग ॥८॥ कल्पनेचा देव कल्पनेचा पूजा । तेथें कोणी दूजा आढळेना ॥१॥
आढळेना देव आढळेना भक्त । कल्पनेरहित काय आहे ॥२॥
आहे तैसें आहे कल्पना न साहे । दास म्हणे पाहे अनुभव ॥३॥
॥ अभंग ॥९॥ करीं घेतां नये टाकितां न जाये । ऐसें रूप आहे राघवाचें ॥१॥
राघवाचें रूप पाहतां न दिसे । डोळां भरलेंसें सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ भेटी कदा नाहीं तूटी । रामदासीं लुटी स्वरूपाची ॥३॥
॥ अभंग ॥१०॥ स्वानुभवाचे पालवें । शून्य गाळिलें आघवें ॥१॥
सघनीं हरिलें गगन । सहज गगन सघन ॥२॥
शुद्धरूप स्वप्रकाश । अवकाशाविण आकाश ॥३॥
रामीं रामदास म्हणे । स्वानुभवाचिये खुणे ॥४॥
॥ अभंग ॥११॥ संतलक्षण ॥ पांचां लक्षणीं पूरता । धन्य धन्य तोच ज्ञाता ॥१॥
विवेकवैराग्य सोडिना । कर्ममर्यादा सांडिना ॥२॥
बाह्य बोले शब्दज्ञान । अंतर्यामीं समाधान ॥३॥
रामीं रामदास कवी । न्यायनीतीनें शीकवी ॥४॥
॥ अभंग ॥१२॥ अंतर्यामीं समाधान । बाह्य सगुणभजन ॥१॥
धन्य धन्य तेंचि ज्ञान । अंतर्यामीं समाधान ॥२॥
निरूपणें अंतरत्याग । बाह्य संपादी वैराग्य ॥३॥
रामीं रामदास म्हणे । ज्ञान स्वधर्म रक्षणें ॥४॥
॥ अभंग ॥१३॥ जीवन्मुक्त प्राणी होवांनियां गेले । तेणें पंथें चाले तोचि धन्य ॥१॥
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । नि:संदेह मनीं सर्वकाळ ॥२॥
मिथ्या देहभान प्रारब्धाअधीन । राहे पूर्णपणें समाधानीं ॥३॥
आवडीनें करी कर्म उपासना । सर्वकाळ मना ध्यानारूढ ॥४॥
पदार्थाची हानि होतां नये कानीं । जयाची करणी बोलाऐसी ॥५॥
धन्य तेचि दास संसारीं उदास । तयां रामदास नमस्कारी ॥६॥
॥ अभंग ॥१४॥ भाव धरी संतांपायीं । तेणें देव पडे ठायीं ॥१॥
नाना देवांचें भजन । तेणें नव्हे समाधान ॥२॥
सकळ देवांमध्यें सार । आहे अनंत अपार ॥३॥
रामीं रामदास म्हणे । अवघे देव केले जेणें ॥४॥
॥ अभंग ॥१५॥ शरण जावें संतजनां । सत्य मानावें निर्गुणा ॥१॥
नानामतीं काय चाड । करणें सत्याचा नीवाड ॥२॥
ज्ञानें भक्तीसी जाणावें । भक्त तयासी म्हणावें ॥३॥
रामीं रामदास सांगे । सर्वकाल संतसंगें ॥४॥
॥ अभंग ॥१६॥ सगुणाकरितां निर्गुण पाविजे । भक्तिविणें दुजें सार नाहीं ॥१॥
साराचें हे सार ज्ञानाचा निर्धार । पाविजे साचार भक्तियोगें ॥२॥
वेदशास्त्रीं अर्थ शोधोनि पाहिला । त्यांहि निर्धारिला भक्तिभाव ॥३॥
रामीं रामदासीं भक्तिच मानली । मनें वस्ती केली रामपायीं ॥४॥
ज्ञानपर अभंग संख्या ॥६८॥


वारांची गीते – अभंग वैराग्यपर

॥ अभंग वैराग्यपर ॥
अंतीं एकलेंचि जावें । तरी राघवीं भजावें ॥१॥
माता पिता बंधु जन । कन्या पुत्रही सोडून ॥२॥
जन्मवरी केला भार । सेखीं सांडोनि जोजस ॥३॥
म्हणे रामीं रामदास । सर्व सोडोनियां आस ॥४॥
॥ अभंग ॥२॥ काम क्रोध खवळले मद मत्सर मातले ॥१॥
त्यांचे आधींनची होणें । ऐसें केलें नारायणें ॥२॥
लोभ दंभ अनावर । झाला गर्व अहंकार ॥३॥
दास म्हणे सांगों किती । पडली ऐशीयांची संगती ॥४॥
॥ अभंग ॥३॥ देवें जन्मासि घातलें । नाना सुख दाखविलें ॥१॥
त्यासि कैचें विस-रावें । पुढें कैसेनी तरावें ॥२॥
कुळ समूळ सांभाळिलें । नाना प्रकारीं पाळिलें ॥३॥
दास म्हणे देवावीन । दुजा सांभाळीतो कोण ॥४॥
॥ अभंग ॥४॥ पुढें होणार कळेना समाधान आकळेना ॥१॥
मना सावधान व्हावें । भजन देवाचें करावें ॥२॥
ऋणानुबंधाचें कारण । कोठें येईल मरण ॥३॥
रामीं रामदास म्हणे । भजनें अमरचि होणें ॥४॥ ॥ वैराग्यपर अभंगसंख्या ॥१६॥


वारांची गीते – अभंग करुणापर

कष्टी झाला जीव केली आठवण । पावलें किरण मारुतीचें ॥१॥
संसारसागरीं आकांत वाटला । भुभु:कार केला मारुतीनें ॥२॥
मज नाहीं कोणी मारुती-वांचूनी । चिंतितां निर्वाणी उडी घाली ॥३॥
माझें जिणें माझ्या मारुती लागलें । तेणें माझें केलें समाधान ॥४॥
उल्हासलें मन पाहातां स्वरूप । दास म्हणे रूप राघोबाचें ॥५॥
॥ अभंग ॥२॥ ठकाराचें ठाण करीं चापबाण । माझें ब्रह्मज्ञान ऐसें असे ॥१॥
मुखीं रामनाम जीवीं मेघश्याम । होताहे विश्राम आठवीतां ॥२॥
रामरूपीं देहो झाला नि:संदेहो । माझे मनीं राहो हाचि भावो ॥३॥
रामदास म्हणे रामरूपावरी । भावें भक्ती चारी ओवाळीन ॥४॥
॥ अभंग ॥३॥ ध्यान लागलें रामाचें । द:ख हरपलें जन्माचें ॥१॥
रामपदांबुजावरी । वृत्ति गुंतेच मधुकरी ॥२॥
रामवदनमयंकीं । चक्षुचकोर झाले सुखी ॥३॥
तनु मेघश्याम मेळें । चित्तचातक निवाले ॥४॥
कीर्तिगंधतरूवरी । कुजे कोकिळा वैखरी ॥५॥
रामीं रामदासस्वामी । चिंतिताहे अंतर्यामीं ॥६॥
॥ अभंग ॥४॥ रामा तुझ्या स्वामीपणें । मानीं ब्रह्मांड हें ठेंगणें । तुजवीण कोण जाणे । अंतर आमुचें ॥१॥
तुजवीण मज माया । नाहीं नाहीं रामराया । आम्हां अनाथां कासया । उपेक्षिसी ॥२॥
तुज समुदाय दासांचा । परी आम्हां स्वामी कैंचा । तुजसाठीं जिवलगांचा । संग सोडिला ॥३॥
सगुण रघुनाथ मुद्दल । माझें हेंचि भांडवल । दासा धरूनि पारपैल । टाकीं या भवाचे ॥४॥
॥ अभंग ॥५॥ पतीतपावना । जानकीजीवना । अरविंदनयना । रामराया ॥१॥
आका गांवा गेली । मज व्यथा झाली । कृपाळा राहिली । नवमी तुझी ॥२॥
आका गांवा जातां । निरविलें समर्था ।भाक रघुनाथा । साच करीं ॥३॥
नवमीचा उत्सव । होऊं द्या बरवा । मग देह राघवा । जाऊं राहूं ॥४॥
ऐकोनि करुणा । अयोध्येचा राणा । मूतींच्या नयना अश्रु आले ॥५॥
ऐकोनि वचन । जानकीजीवन । कृपेचें पावन । वेणेवरी ॥६॥
॥ पद ॥ निदान पहाशी किती । दयाळा निदान पाहासी किती । रामराया निदान-॥ध्रु०॥
धांव धावगा सीतापति । तुजवेगळी नाहीं गति । नानाशास्त्रें मौनावती । नाम तारक वेद बोलती ॥१॥
जळीं पाषाण तारिले जड । मी काय तुज त्याहूनि जड । आतां पुरवीं जीवींचे कोड । मनीं घेतला विषयीं मोड ॥२॥
तुझ्या भेटीचें आर्त मोठें । मज न गमे कांहीं केल्या कोठें । तुजवांचोनि सर्वहि खोटें । दीन बालक तुझें धाकुटें ॥३॥
वृत्ति जडली पायांपाशीं । जेवीं गुळाशीं गुंतली माशी । देहीं असोनि गुप्त कां होशी । दास उदास देहभावाशीं ॥४॥ ॥ करुणापर अभंगसंख्या ॥२९॥


वारांची गीते – धांवा

॥ धांव रे रामराया किती अंत पाहाशी । धांव रे रामराया० ॥ धृ० ॥ प्राणांत मांडि-लासे नये करुणा कैसी । पाहीन धणिवरी चरण झाडीन केशीं । नयन शीणले बा आतां केधवां येथी । धांव रे ० ॥१॥
मीपण अहंकारें अंगीं भरला ताठा । विषयकर्दमांत लाज नाहीं लोळतां । चिळस उपजली ऐसें झालें बा आतां ॥ धांव रे० ॥२॥
मारुतीस्कंधमागीं शीघ्र बैसोनि यावें । राघवें वैद्यराजें कृपाऔषध द्यावें । दयेचे पद्महस्त माझे शिरीं ठेवावे ॥ धांव० रे० ॥३॥
या भवीं रामदास थोर पावतो व्यथा । कौंतुक पाहातोसी काय जानकी-कांता । दयाळा दीनबंधु भक्तवत्सला आतां ॥ धांव रे० ॥४॥


वारांची गीते – भजनांचा उपसंहार

॥ समर्थ निर्याण अभंग ॥१॥ आज्ञेप्रमाणें परमार्थ । केला जाण म्यां यथार्थ ॥१॥
आतां देहाचा कंटाळा । आला असे जी दयाळा ॥२॥
आतां एकचि मागणें । कृपा करू-नियां देणें ॥३॥
ज्याची दर्शनाची आशा । त्याची पुरवावी इच्छा ॥४॥
ऐक सखया वचन । त्याशीं देईन दर्शन ॥५॥
तेरा अक्षरी मंत्राचा । जप करील जो साचा ॥६॥
गणना होतां तेरा कोटी । त्यासी भेटेल जगजेठी ॥७॥
भय न धरावें मनीं । बहु बोलिलों म्हणुनी ॥८॥
नलगे आसगें आसनीं बैसावें । नलगे अन्नही त्यागावें ॥९॥
येतां जातां धंदा करितां । जप संख्या मात्र होतां ॥१०॥
तेरा कोटी गणना तेची । पापें निरसती जन्मां-तरिंचीं ॥११॥
त्यासी देईन दर्शन । तात्काळचि मुक्त होणें ॥१२॥
ऐसा वर होतां जाण । दास झाला सुखसंपन्न ॥१३॥
॥ अभंग ॥२॥ उतावेळ चित्त भेटीची आरत । पुरवी मनोरथ मायबापा ॥१॥
रात्रंदिस मज लागलासे सोस । भेटी द्यावी असे उच्चाट हा ॥२॥
पराधीन जिणें नको करूं रामा । नेई निजधामा आपुलीया ॥३॥
तुजवीण रामा मज कोण आहे । विचारूनि पाहें मायबापा ॥४॥
रामीं रामदास बहु निर्बुजला । मीतूंपणा ठेला बोळवूनी ॥५॥
॥ अभंग ॥३॥ माझा देह तुजदेखत पडावा । आवडी हे जीवा फार होती ॥१॥
फार होती परी पुरली पाहतां । चारी देह आतां हारपले ॥२॥
हारपले माझे सत्य चारी देह । आतां नि:संदेह देहातीत ॥३॥
नि:संदेह झालों देवा देखतांचि । चिंतिलें आतांचि सिद्ध झालें ॥४॥
सिद्ध झालें माझे मनीचें कल्पिलें । दास म्हणे आलें प्रत्ययासी ॥५॥
॥ अभंग ॥४॥ जन्मोनियां तुज भयों याच बुद्धीं । प्राणत्यागसंधि सांभाळीशी ॥१॥
उचीत न चुके अचिंत्य श्रीरामा । स्वस्वरूपीं आम्हां ठाव देई ॥२॥
जन्मवरी तूज धरिलें हदयीं । आतां या समयीं पावे तूं बा ॥३॥
निष्काम ती तूज सेवायाची आशा । अंतीं रामदासा सांभाळावेम ॥४॥
॥ अभंग ॥५॥ अपराधी अपराधी । आम्हां नाहीं दृढबुद्धि ॥१॥
माझे अन्याय अगणीत । कोण करील गणीत ॥२॥
मज सर्वस्वें पाळावें । प्रतीतीनें सांभाळावें ॥३॥
माझी वाईट करणी । रामदास लोटांगणीं ॥४॥
॥ अभंग ॥ सज्जनगडनिवासी माझे रामदास माये ॥ नंतर सर्वांनीं प्रदक्षिणा करून यथाशक्ति करण्याचें भजन ॥ जयजय राम राम राम ॥ सीताराम राम राम ॥
॥ आरती ॥ जयदेव जयदेव आत्मया रामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ जय० ॥१॥
नाना देहीं देव एक विराजे । नाना नाटकलीला सुंदर रुप साजे । नाना तीर्थीं क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे ॥ धृ० ॥२॥
बहुरूपी बहुगूणी बहुता काळाचा । हरिकर ब्रह्मादिक देव सकळांचा । युगानयुगीं आत्माराम आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ॥३॥ जय० ॥
कायेन वाचा मनसा इत्यादि पासून जयजयकार केल्यावर महारुद्र हनुमाननकी जय म्हणून बसावें व प्रार्थनेचे श्लोक म्हणावे ते:-
॥ श्लोक ॥ दु:खानळें मी संतप्त देहीं । तुजवीण रामा विश्रांति नाहीं । आधार तूझा बहू मी विदेशी । श्रीरामराया कधिं भेट देशी ॥१॥
प्रारब्ध खोटें अभिमान आला । स्वामी समर्थासि वियोग झाला । तेणें बहू खेद वाटे जिवासी । श्रीरामराया० ॥२॥
तुझिया वियोगें बहू वेदना रे । विवेक नाहीं आम्हां दिना रे । पडिला समंधया दुर्जनासी । श्रीरामराया० ॥३॥
संसारचिंता मज वाटती रे । रामा प्रपंचीं मन जातसे रे । संसर्ग आहे इतरां जनांसी । श्रीरामराया० ॥४॥
॥ हिनाहूनि मी हीन जैसें भिकारी । दिनाहूनि मी दीन नानाविकारी । पतीतासि रे आणि हातीं धरावें । समर्था तुझें काय उत्तीर्ण व्हावें ॥१॥
समर्थें दिलें सौख्य नानापरीचें । सदा सर्वदा जाणसी अंतरींचे । लळे पाळिले त्वां कृपाळुस्वभावें । समर्थां तुझें काय० ॥२॥
जनीं भक्ति नाहीं नमीं भाव नाहीं । मला युक्तिना बुद्धि कांहींच नाहीं । कृपाळूपणें राज्य रंकासि द्यावें । समर्था तुझें काय० ॥३॥
बहूसाल अभ्यास कोटयानकोटी । रघूनायकें घातले सर्व पोटीं । किती काय गूणासि म्यां आठवावें । समर्था तुझें काय० ॥४॥
दिनानाथ हें ब्रीद त्वां साच केलें । म्हणे दास भक्तांसि रे उद्धरीलें । सुखें सांडणें या देहाचें करावें । समर्था तुझें काय० ॥५॥
॥ पद ॥ अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणें कांहीं । तुजविण मज या जगीं पाहतां कोणीच नाहीं ॥१॥
ज्ञान कळेना ध्यान कळेना मन वळेना देवा । विद्या नाहीं वैभव नाहीं ऐसा पूर्विंल ठेवा ॥२॥
युक्ति असेना बुद्धि असेना शांति वसेना अंगीं । रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी ॥३॥
॥ ओवी । हनुमंत आमुची कुळवल्ली । राममंडपीं वेला गेली । श्रीरामभक्तीनें फळली । रामदास बोले ॥१॥
आमुचे कुळीं हनुमंत । हनुमंत आमुचें दैवत । तया-वीण आमुचा परमार्थ । सिद्धीतें न पावे कीं ॥२॥
साह्य आम्हांसी हनुमंत । आराध्यदैवत श्रीरघुनाथ । गुरु श्रीराम समर्थ । उणें काय दासायी ॥३॥
दाता एक रघुनंदन । वरकड लंडी देई कोण । हे त्यागोन आम्ही जन । कोणाप्रती मागावें ॥४॥
म्हणोनि आम्ही रामदास । रामचरणीं विश्वास । कोसळोनि पडो हें आकाश । आणीकाची वास न पाहूं ॥५॥
स्वरूपसंप्रदाय अयोध्या मठ । जानकी देवी रघुनाथ दैवत । मारुती उपासना नेमस्त । वाढविला परमार्थ रामदासीं ॥६॥
॥ अभंग ॥ ध्यान करूं जातां मन हारपलें । सगुण तें झालें गुणातीत ॥१॥
जेथें पाहे तेथें राघोबाचें ठाण । करीं चापबाण शोभतसे ॥२॥
राम माझे मनीं राम माझे ध्यानीं । शोभे सिंहासनीं राम माझा ॥३॥
रामदास म्हणे विश्रांति मागणें । जीवींचें सांगणें हितगूज ॥४॥
जयजय रघुवीर समर्थ ॥
॥ आरती ॥ बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी । आरत्या घेवोनियां करिं आल्या त्या नारी ॥१॥
श्यामसुंदर रामा चरणकमळीं । ओवाळूं आरती कनकगंगाळीं ॥२॥
चौघी म्हणती शेजे चला मंदीरा । नव त्या इच्छिति सेवा श्याम सुंदरा ॥३॥
दास म्हणे सुमनशेजे चला श्रीहरी । क्षण एक विश्रांति घ्याहो अंतरीं ॥४॥
॥ अभंग ॥ सकळां तांबूल पुष्पमाळा । भक्तांचा सोहळा पुरविला ॥१॥धृ०॥
स्वामी चलाहो निजमंदिरा । रघुवीरा सुखशेजेसी ॥२॥
॥ अभंग ॥ भक्तासि पालक ब्रह्मांडनायक । श्रीरघुटिळक स्तविती दास ॥१॥
जनकात्मजा अहो रघुराजा । तिष्ठतसे तुझा मार्ग लक्षी ॥२॥
झाली वाढराती अहो रघुपती । मार्ग सोडविती बंदीजन ॥३॥
उठले जगज्जीवन सिंहासनींहून । वेगीं लिंबलोण ऊतरीलें ॥४॥ ॥ भजन उपसंहार गीतसंख्या ॥६६॥


वारांची गीते – विडा

॥ विडा घ्यावो रामराया । महाराज राजया ॥धृ०॥ रत्नजडित पानदान । आली जानकी घेवोन । विडा देती करोनियां । दीनबंधू रामराया । विडा घ्या० ॥१॥
सुगंध रंगेरी पानें । मुक्त मोतीयाचा चूना । सुपारी कातगोळ्या । भक्तिभावें मेळविल्या । विडा घ्या० ॥२॥
जायपत्री जायफळ । विडा जाहला सूफळ । सीता रामालागीं देत । केशर-कस्तुरीयुक्त । विडा घ्या० ॥३॥
सीता राम विडा घेतां । ऐक्यभावें एकात्मता । रंगली ऐक्यरंगीं । रामदास पायांलागीं । विडा घ्या० ॥४॥


वारांची गीते – सेजारती

॥ आतीं आरत ऐक्यभावें ओवाळूं । प्रकाश स्वयंज्याती निजतेजें बंबाळूं ॥धृ०॥
परमात्मा श्रीराम महामाया जानकी । विश्रांति पावली गजर न कीजे सेवकीं ॥१॥
स्नेह ना भाजन नाहीं वाती पावक । सबाह्यांतरीं अवघा निघोट दीपक ॥२॥
ऐक्याचे सुमनसेजें आत्मा रघुपति राजाराम रघुपति । वाचा पारुषली शब्द न बोलवे पुढती ॥३॥
राम आणि दास चैतन्य पहुडले रामीं । हेंही बोलाया दुजा नुरे धामीं ॥४॥
रामा रामा रामा रामा रघुनंदना रघुनंदना । रामा रामा रामा रामा कुळभूषणा ॥१॥
रामा रामा रामा रामा जानकीपते जानकीपते । रामा रामा रामा रामा विमळमते ॥२॥
रामा रामा रामा रामा दीनवत्सला भक्तसत्सला । रामदास म्हणे तुझी अगम्य लीला ॥३॥
रामा रामा रामा रामा हो रामा हो । तारी तारी तारी तारी आम्हां हो ॥४॥
तोडी तोडी तोडी तोडी भवपाश भवपाश । अनन्यशरण रामीं रामदास ॥५॥
राम राम राम जप सिताभिराम सिताभिराम । राम राम राम जप सिताभिराम ॥१॥


वारांची गीते – श्लोक प्रार्थनेचे

कृपाळूपणें भेटि दे रामराया । वियोगें तुझ्या सर्व व्याकूळ काया । जनामाजिं लौकीक हाही न सूटे । उदासीन हा काळ कोटें न कंठे ॥१॥
सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी । दुखाची स्वयें सांड जीवी करावी । देहदु:ख तें सूख मानीत जावें । विवेकें सदा स्वस्वरूपीं भजावें ॥२॥
सदा चक्रवाकासि मार्तंद जैसा । उडी घालितो संकटीं स्वामि तैसा । हरी भक्तिचा घाव घाली निशाणी । नुपेक्षी कदा रामदासाभिमानी ॥३॥
भवाच्या भयें काय भीतोसि लंडी । धरींरे मना धैर्य धाकासि सांडीं । रघूनायकासारिखा स्वामि शीरीं । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥४॥
स्वधामासि जातां महाराजराजा । हनुमंत तो ठेविला याचि काजा । सदा सर्वदा रामदासासि पावे । खळें गांजिल्या ध्यान सोडोनि धांवे ॥५॥
राम राम राम राम सितारम सिताराम । नंतर जयजयकार 


वारांची गीते – श्रीरामनवमीची उत्सवपद्धति

१. पूर्वदिवशीं सर्व तयारी करावी.
२ पहांटेस भूपाळ्या झाल्यावर दार उघडावें, तिलकधारण, कांकडआरती हुद्यांसहित, कांकडआरती झाल्यावर सुवासिनीमकडून पंचारती करणे. हुद्यांचा तपशील : – मोरचेलें २, चवर्‍या २, रुमाल २, धनुष्यें २, दिवटया २, काठया २, अबदागिरी २, छत्र १ याप्रमाणें मध्यान्हकाळीं, सायंकालीं व कथेचे अंतीं.
३ पूजेचे आरंभीं ध्वज लावावा व उत्साहमूर्ति मारुतीची आणावी व गांवांत नऊ दिवस अक्षत देणें, नैवेद्याचें सामान दररोज रुजूं करणें, रांगोळी गालिचा काढणें.
४. नित्य पूजा, रामायण संहिता वाचणें, आरती छबीना, गांवच्या मारुतीस नेणें व प्रदक्षणा तेरा करणें. त्या करते वेळीं आरत्या तेरा म्हणाव्या त्या १ गणपतीची, २ वेदमातेची, ३ सद्‍गुरूची, ४ श्रीरामाची, ५ मारुतीची, ६ शंकराची, ७ राधारमणाची, ८ नारायणाची, ९ विठोबाची, १० कृष्णेची, ११ विश्वभरितेची, १२ व्यंकटेशाची, १३ मारुतीची याप्रमाणें आरत्या करणें.
नंतर तीर्थ व पुराण, वसंतपूजा, महानैवेद्य, ब्राह्मणभोजण.
५ सायंकालीं करुणाष्टकें, पंचपदी, सवाया, आरती, छबीना, कौल, मनाचे श्लोक २१ व दासबोध दशक चवथा यांतील एक समास क्रमानें वाचणें. कीर्तन झाल्यानंतर प्रसाद वाटणें, व पुढें मानाचे विडे प्रत्येक दिवशीं वाटणें.
६ जन्मदिवशीं पुराण, पुराण झाल्यानंतर कीर्तनाचा जन्म करावा.
७ दशमीस आरतीच्या पूर्वी भिक्षा करावी.
८ एकादशीस सूर्योदयीं रथोत्सव नंतर लळित, राज्याभिषेक वर्णन करणें, तीर्थप्रसाद उभें राहून घ्यावा.
९ माघ वद्य नवमीस याप्रमाणेंच पुराण सुंदरकांड, दशमीस रथ.
१० हनुमानजयंतीस सूर्योदयीं जन्म व पूजा नैवेद्य गूळ फुटाणे.
यांचा व महानैवेद्य दहीं वडे यांचा.


वारांची गीते – कौल

॥ श्लोक ॥
दिली भेटि भर्तासि उत्साह गाजे । रघूराज राज्याभिषेकीं विराजे । पहाया सुखें लोक भूपाळ आले । रघूराज आज्ञें महीपाळ गेले ॥१॥
नमस्कार केला सुरेंद्रें महेन्द्रा । प्रभूनें अनुज्ञा दिली देव इंद्रा । पुजामान पावूनी संतुष्ट झाले । सवें देव तेतीस कोटी मिळाले ॥२॥
तया रावणाचे भयें लोक गेले । सुवर्णाचळाचे दरीं वास केले । पथीं देखिलें दैन्यवाणें प्रजाशीं । उभा राहिला इंद्र सांगे तयांशीं ॥३॥
प्रजाही पळाल्या जयाच्या भयानें । तया रावणा मारिलें राघवानें । सुरांच्या बळें फोडिल्या बंदिशाळा । गुढी रामराज्यीं जना सौखबेळां ॥४॥
पटीं बैसला राम कल्याणराजा । दुराही फिरे रे गरीबा नवाजा । अरे लोकही जाहली एक छत्री । रघूराज राजा विराजे धरित्रीं ॥५॥
जनाची पिडा पाप संता प गेला । प्रभूराम हा भाग्यसूर्यो उदेला । खडाणा* गऊ जाहल्या कामधेनू । वनीं वेलि कल्पतरू काय वानूं ॥६॥
खडे सर्व चिंतामणी तेचि गोटे । मला देखतां थोर आश्चर्य वाटे । प्रजा हो तुम्हीं शीघ्र आतांचि जावें । समस्तांसि कल्याण राजा पहावें ॥७॥
तुम्हीं भोगिले कष्ट आरण्यवासीं । तयासीं फळें प्राप्त झालीं त्वरेशीं । अपेक्षेहुनी आगळें सर्व जें जें । सुखें रामराजीं जना सामरा जें ॥८॥
महोत्साह उत्साह पाहोनि आलों । अयोध्यापुराहूनि आतां निघालों । समस्तां जनां थोर आनंद झाला । सुरीं मानवीं जयजयोकार केला ॥९॥
अरे लोक क्लेश सांडूनि द्यारे । रघूराजपादांबुजीं जा पहारे । स्थळा आपुल्या इंद्र सांगोनि गेला । गुरे वासुरें लोक सैरा निघाला ॥१०॥
प्रजा कष्टल्या चालिल्या शीण सांगो । अयोध्याधिशा राघवा कौल मागों । गुरें वासरें लेंकरें गर्द झाला । अयोध्यासमीपे बहू लोक आला ॥११॥
रघूनाथजी सांगती दूतवार्ता । प्रजालोक बाहेर आले समर्था । रघूनायकें सर्वही आणवीले । सभामंडपीं ते असंभाव्य नेले ॥१२॥
प्रभू देखिल जय्‍जयोकार केला । नमस्कार साष्टांग घालूं निघाला । कृपासागरें पाहिलें त्या प्रजांशीं । उठारे उठा राम बोले तयांशीं ॥१३॥
रघूराज सिंहासनीं सौख्यदाता । प्रजा कौल मागावया त्या उदीता । प्रभू बोलिला रे अपेक्षीत मागा । नका हेत ठेवूं समस्तांसि सांगा ॥१४॥
बहू कष्टलों पावलों जी स्वदेशा । प्रजा बोलती कौल दे राघवेशा । भुमीनें कदा पीक सांडूं नयेरे । वदे राम लक्षूमणा हें लिहीं रें ॥१५॥
मनासारिखी मेघवृष्टी न व्हावी । जया पाहिजे ते प्रसंगीं पडावी । समर्था प्रभू रोगराई नको रे । वदे राम लक्षूमणा हें लिहीं रें ॥१६॥
पिके देखतां सर्व चिंता निवाली । असावीं गृहीं संग्रहीं पेंव पालीं । बिजें बीज कोणाशिं मागूं नये रे । वदे राम लक्ष्‍० ॥१७॥
मनाची अपेक्षा गुरें बौल गाडे । घरीं दूभती कामधेनूच पाडे । रघूनाथजी भाग्य येथेष्ट देरे । वदे राम लक्ष‍० ॥१८॥
मनासारिखीं पुत्रकन्याकलत्रें । अभीवृद्धि वाढो पवित्रें । सखीं पारखीं सोयरीं प्रीति देरे । वदे राम लक्ष्० ॥१९॥
कुरूपी विरूपी कदांही नसावें । नको वृद्ध काया तरूणी असावें । दिनानाथजी सर्व सौख्यास देरे । वदे राम लक्ष्० ॥२०॥
नको दु:ख आम्हां नको शोक आम्हां । तुझें राज्य तों मृत्यु नकोचि आम्हां । रघूनाथजी शक्ति ऊदंड देरे । वदे राम लक्ष्० ॥२१॥
ग्रह सर्व रासीं शुभाईक व्हावे । सखे मित्र तैसेचि तेही असावे । दिनानाथजी विघ्रवार्ता नको रे । वदे राम लक्ष्० ॥२२॥
सदा वासना धर्मपंथीं असावी । दयाशीळ चातुर्यता श्रेष्ठ द्यावी । समर्था प्रभू पापबुद्धी नको रे । वदे राम लक्ष्० ॥२३॥
प्रितीनें प्रजा पाळि रे रामराया । नको दैन्यवाणें करीं दिव्य काया । शरीरीं कदा रोगराई नको रे । वदे राम लक्ष्० ॥२४॥
कुडें खोडि कापटय कांहीं नसावेम । सबाह्य शुचिष्मंत तैसें असावें । तुझ्या दर्शना आडकाठी नको रे । वदे राम लक्ष्० ॥२५॥
प्रभू क्लेश घेऊनि विश्रांति द्यावी । देहे तोंवरी भक्ति तूझी घडावी । विणी स्वामिणी कौल ऐसाचि देरे । वदे राम लक्ष्० ॥२६॥


वारांची गीते – नवविधाभक्तीचे अभंग

॥ श्रवणपर अभंग ॥ ॥ रामनाम कथा गंगा । श्रवणें पावन करी जगा ॥१॥
तिशीं प्रेमपूर आला । शंकरह्लदयीं समावला ॥२॥
रामदासाची माउली । आळशावरीं गंगा आली ॥३॥

॥ कीर्तनपर अभंग ॥  ॥ धन्य धन्य तें नगर । जेथें कथा निरंतर ॥१॥
गुण गाती भगवंताचे । तेचि मानावे दैवाचे ॥२॥
स्वयें बोले जगजीवन । थोर कलियुगीं कीर्तन ॥३॥
रामदास म्हणे भले । हरिभक्तीं उद्धरिले ॥४॥

॥ स्मरणपर अभंग ॥  ॥ रात्रंदिवस मन राघवीं असावें । चिंतन नसावें कामचनाचें ॥१॥
कांचनाचे ध्यान परस्त्रीचिंतन । जन्मासी कारण हींचि दोन्ही ॥२॥
दोन्ही नको धरूं नको निंदा करूं । तेणें हा संसारू तरसील ॥३॥
तरसील भवसागरीं बुडतां । सत्य या अनंताचेची नामें ॥४॥
नामरूपातीत जाणावा अनंत । दास म्हणे संतसंग धरा ॥५॥

॥ अर्चनपर अभंग ॥  ॥ पूजा देवाची प्रतिमा । त्याची नकळे महिमा ॥१॥
देव भक्तांचा विश्राम । त्यासि नेणे तो अधम ॥२॥
नाना स्थानें भूमंडळीं । कोणिं सांगांवी आगळीं ॥३॥
ज्याचे चरणींचे ऊदकें । धन्य होती विश्वलोकें ॥४॥
याचीं चरितें ऐकतां । जनीं होय सार्थकता ॥५॥
रामीं रामदास म्हणे । धन्य होईजे स्मरणें ॥६॥

॥ वंदनपर अभंग ॥  ॥ प्रेमाचिया सन्निधानें । देव आले साभिमानें ॥१॥
आतां आनंद आनंद । देवभक्तां नाही भेद ॥२॥
मुख्य पूजापरंपरा । केला दासासि अधिकारा ॥३॥
दास पाउल वंदितो । पदासन्निध रहातो ॥४॥

॥ दास्यपर अभंग ॥  ॥ रामदास्य आणि हें वायां जाईल । ऐसें न घडेल कदाकाळीं ॥१॥
कदाकाळीं रामदासा उपेक्षीना । रामउपासना ऐशी आहे ॥२॥
ऐशी आहे सार राघोबाची भक्ति । विभक्तीची शक्ति जेथें नाहीं ॥३॥
जेथें नाहीं कांहीं वाउगें मायिक । रामउपासक दास म्हणे ॥४॥

॥ सख्यपर अभंग ॥  ॥ देव असतां पाठीराखा । त्रेलोक्याचा कोण सखा ॥१॥
नाना उद्योग वाढती । नाना चिंता उद्भवती ॥२॥
स्वस्थ वाटेना अंतरीं । नाना व्यवधान करी ॥३॥
रामदास म्हणे भावें । भजन देवाचें करावें ॥४॥

॥ आत्मनिवेदनपर अभंग ॥  ॥ आत्मनिवेदन नववें भजन । जेणें संतजन समा-धा धी ॥१॥
समाधानी संत आत्मनिवेदन । ज्ञानें मीतूंपण सांडवलें ॥२॥ सांडवलें सर्व मायिका संगासी । रामीं रामदासीं नि:संगता ॥३॥
नि:संगता झाली विवेकानें केली । मुक्तिहि लाधली सायुज्यता ॥४॥


वारांची गीते – न्हाणी

न्हाणी न्हाणी रामातें । अरुंधती । ऋषिपत्न्या पाहुनी संतोषती । रामलीला सर्वत्र मुनी गाती । स्नान उदक यमुना सरस्वती ॥१॥
ज्याच्या चरणीं कावेरी कृष्णा वेणी । ज्याच्या स्नेहें कपिलदि ऋषी मुनी । त्या रामाते म्हणिलें प्रीतिकरूनी ॥२॥
ज्याच्या नामें उपदेश विश्वजना । ज्याचा स्मरणें काळादि करिती करुणा । ज्याच्या प्राप्तीस्तव करिती अनुष्ठाना । त्या रामातें म्हणूनी फुंकी कर्णा ॥३॥
रमती योगी स्वरूएपें आत्माराम । निशिदिनीं चरणीं असावा नित्यनेम । त्या रामाचा पाळख विश्वघाम । दास म्हणे भक्तीचें देंई प्रेम ॥४॥ न्हाणी०॥


वारांची गीते – पाळणा

हळूहळू गाई निजरे बाळा । मोठा जटाधारी गोसावी आला । खरचरभूजा जारे फकीरा । निजला माझा पालखीं हीरा । हळूहळू गा० ॥१॥
नको येउंरे बागुलबावा । निजला माझा पालखीं रावा । सगुण गुणाचें बाळक माझें । कोणी दावा हो यासम ये दुजें । हळूहळू गा० ॥२॥
लागली दृष्टि कोण्या पापिणीची । उतरे प्रभा मुखचंद्राची । हालवी कौसल्या प्रेमपान्हा । दास म्हणे आला वैकुंठराणा । हळूहळू गा० ॥३॥
॥ जोजोजोजोरे श्रीरामा । निजसुखगुण विश्रामा । जोजो० ॥ध्रु०॥ ध्याती मुनि योगी तुजलागीं । कौसल्या वोसंगीं । जोजो० ॥१॥
वेदशास्त्रींची मति जाण । स्वरूपीं झाला लीन ॥ जोजो० ॥२॥
चारी मुक्तींचा विचार । चरणीं पाहाती थोर ॥ जोजो० ॥३॥
भोळा शंकर निशिदिनीं । तुजला जपतो मनीं । जोजो० ॥४॥
दास गातसे पाळणा । राम लक्षुमणा ॥ जोजो० ॥५॥


निरनिराळ्या वारांची गीतें – संत रामदास समाप्त .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *