रामदासांची आरती

पंचीकरण – संत रामदास

।। श्री रामदास्वामीं विरचित – पंचीकरण अभंग ।।

अभंग  ॥१॥
ओवीचे आरंभी वंदूं विनाय
बुद्धिदाता एक लोकांमध्यें ॥१॥
लोकांमध्यें बुद्धिविण कामा नये ।
बुद्धीचा उपाये सर्वत्रांसी ॥२॥
सर्वत्रांसी बुद्धि देतो गणनाथ ।
करितो सनाथ अनाथासी ॥३॥
अनाथा नाथाचा नाथ केला जनीं ।
तो हा धरा ध्यानीं लंबोदर ॥४॥
लंबोदर विद्यावैभवापरता ।
दास म्हणे माता सरस्वति ॥५॥


अभंग  ॥२॥

नमूं योगेश्वरी शारदा सुंदरी ।
श्रोता प्रश्र करी वक्तयासी ॥१॥
वक्तयासी पुसे जीव हा कवण ।
शिवाचें लक्षण सांगा मज ॥२॥
सांगा मज आत्मा कैंचा परमात्मा ।
बोलिजे अनात्मा तो कवण ॥३॥
कवण प्रपंच कोणें केला संच ।
मागुता विसंच कोण करी ॥४॥
कोण तें अविद्या सांगे जो जी विद्या ।
कैसें आहे आद्य स्वरूप तें ॥५॥
स्वरूप ते माया कैसी मूळमाया ।
ईसीं चाळावया कोण आहे ॥६॥
आहे कैसें शून्य कोणतें चैतन्य ।
समाधान्य अन्य तें कवण ॥७॥
कोण तो जन्मला कोणा मृत्यु आला ।
भ्रममुक्त झाला तो कवण ॥८॥
कवण जाणता कवणाची सत्ता ।
मोक्ष हा तत्त्वतां कोण सांगा ॥९॥
सांगा ब्रह्मखूण सगुण निर्गुण ।
पंचवीस प्रश्र दासें केले ॥१०॥


अभंग  ॥३॥  
नमूं वेदमाता नमूं त्या अनंता ।
प्रश्र सांगों आतां श्रोतयाचे ॥१॥
श्रोतयाचे प्रश्र जीव हा अज्ञान ।
जया सर्व ज्ञान तोची शिव ॥२॥
शिवपर आत्मा त्यापर परमात्मा ।
बोलिजे अनात्मा अनिर्वाच्य ॥३॥
वाच्य हा प्रपंच माईक जाणावा ।
घडामोडी देवा-पासूनियां ॥४॥
विषय अविद्या त्यागावी ते विद्या ।
निर्विकल्प आद्या तेंचि रूप ॥५॥
कल्पना हे माया सत्त्वमूळमाया ।
ईसी चाळावया चैतन्यची ॥६॥
नकार तें शून्य व्यापक चैतन्य ।
ईश्वर अनन्य समाधान ॥७॥
जीव हा जन्मला जीवा नृत्यु झाला ।
बद्ध मुक्त झाला तोही जीव ॥८॥
ईश्वर जाणता ईश्वराची सत्ता ।
मोक्ष हा तत्त्वतां ईश्वरची ॥९॥
ईश्वर निर्गुण ईश्वर सगुण ।
हेची ब्रह्मखूण दास म्हणे ॥१०॥


अभंग  ॥४॥
सत्य राम एक सर्वही माईक ।
जाणा हा विवेक योगियांचा ॥१॥
योगियांचा देव तया नाहीं खेव ।
जेथें जीव शिव ऐक्यरूप ॥२॥
ऐक्यरूप जेथें तें पीठ ब्रह्मांड ।
ब्राह्म तें अखंढ निराकार ॥३॥
निराकार ब्रह्म बोलताती श्रती ।
आदि मध्य अंतीं सारिखेंची ॥४॥
सारिखेचि ब्रह्म नभाचियेपरी ।
बाह्य अभ्यंतरीं कोंदाटलें ॥५॥
कोंदाटलें परी पाहतां दिसेना ।
साधूवीण येना अनुभवा ॥६॥
अनुभवा येतां तेम ब्रह्म निश्वळ ।
जाय तळमळ संसाराची ॥७
संसाराचें दु:ख सर्वही विसरे ।
जरी मनों भरे स्वस्वरूप ॥८॥
स्वस्वरूपीं नाहीं सुख आणि दु:ख ।
धन्य हा विवेक जयापासीं ।\९॥
जयापासीं ज्ञान पूर्ण समाधान ।
त्याची आठवण दास करी ॥१०॥


अभंग  ॥५॥
मन हें विवेकें विशाळ करावें ।
मग आठवावें परब्रह्म ॥१॥
परब्रह्म मनीं तरीच निवळे ।
जरी बोधें गळे अहंकार ॥२॥
अहंकार गळे संताचे संगतीं ।
मग आदि अंतीं समाधान ॥३॥
समाधान घडे स्वस्वरूपीं राहतां ।
विवेक पहातां नि:संगाचा ॥४॥
संग नि:संगाचा दृढ तो धरावा ।
संसार तरावा दास म्हणे ॥५॥


अभंग ॥६॥
तुम्ही आम्ही करूं देवाचा निश्चय ।
जया नाहीं लय तोची देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर ।
व्यापूनि अंतर देव राहे ॥२॥
देव राहे सदा सबाह्य अंतरीं ।
जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
विसंबेना परी जीवासी नेणवे ।
म्हणोनियां धांवे नानामतीं ॥४॥
नानामतीं देव पहातां दिसेना ।
जंव तें वसेना ज्ञान देहीं ॥५॥
ज्ञान देहीं वसे तया देव दिसे ।
अंतरीं प्रकाशे ज्ञानदृष्टि ॥६॥
ज्ञानदृष्टि होतां पाविजे अनंता ।
हा शब्द तत्त्वतां दास म्हणे ॥७॥


अभंग ॥७॥
रात्रंदिवस मन राघवीं असावें ।
चिंतन नसावें कांचनाचें ॥१॥
कांचनाचें ध्यान परस्रीचिंतन ।
जन्माचें कारण हींच दोन्हीं ॥२॥
दोन्हीं नको धरूं निंदा नको करूं ।
तेणें हा संसारू तरसील ॥३॥
तरसील भवसागरीं बुडतां ।
सत्येंचि अनंताचेची नामें ॥४॥
नामरूपातींत जाणा तो अनंत ।
दास म्हणे संतसंग धरा ॥५॥


अभंग ॥८॥
ब्रह्मा विष्णु रुंद्रे जयाचे अवतार ।
तोचि देव थोर जाण बापा ॥१॥
जाण बापा देव देहासी निर्मिता ।
तो देव तत्त्वतां ठाईं पाडीं ॥२॥
ठाईं पाडीं देव साधूचे संगतीं ।
दास म्हणे गति पावशील ॥३॥


अभंग ॥९॥
चंदनासंगतीं चंदनचि होती ।
होय काळी माती कस्तूरिका ॥१॥
कस्तूरिका होय कस्तुरीच्या योगें ।
साधुच्यानीं संगें साधुजन ॥२॥
साधुजन होती संगाति धरितां ।
मिळवणीं मिळतां गंगाजळीं ॥३॥
जेवितां अमृत अमर होइजे ।
अचळ पाविजे साधुसंगें ॥४॥
साधुसंगे देव आपणचि होय ।
लक्षण अद्वय बाणलिया ॥५॥
बाणलिया तया नि:संगाचा संग ।
होइजे नि:संग आपणचि ॥६॥
आपणचि ध्यानीं बैसला आसनीं ।
जनीं आणि वनीं देव भासे ॥७॥
देव भासे तेणें आपण भुलला ।
तेणें गुणें झाला देव अंभें ॥८॥
देवाचे संगतीं देवचि होइजे ।
चतुर्भुंजराजे वैकुंठींचे ॥९॥
वैकुंठींचे राजे ध्याती अहर्निशीं ।
वंदिती साधूती दास म्हणे ॥१०॥


अभंग ॥१०॥
दुर्जनसंगति कदा धरूं नये ।
घडती अपाय बहुविध ॥१॥
बहुविध झाले अपाय बहुतां ।
तेचि सांगे आतां सावकाश ॥२॥
कुसंग हे माया धरितां संगति ।
गेले अधोगती नेणों किती ॥३॥
चांडाळासंगतीं होइजे चांडाळ ।
होय पुण्यशीळ साधुसंगें ॥४॥
कुरुंदासंगतीं झिजला चंदन ।
कुसंगे जीवन नासतसे ॥५॥
खाराचेसंगतीं नासे मुक्ताफळ ।
होतसे तात्काळ कळाहीन ॥६॥
लाखेच्या संगतीं सोनें होय उणें ।
दुग्ध हें लवणें नासतसे ॥७॥
दुर्जनासंगतीं सज्जन ढांसळे ।
क्तोध हा प्रबळे अकस्मात ॥८॥
दास म्हणे संगत्याग दुर्जनाचा ।
धरा सज्जनाचा आदरेंसी ॥९॥


अभंग ॥११॥
साधुसंगें साधु भोंदुसंगें भोंदु ।
वादुसंगें वादु होत असे ॥१॥
होत असे लाभ भल्याचे संगतीं ।
जाय अधोगतीं दुष्टसंगें ॥२॥
दुष्टसंगें नष्ट झाला महापापी ।
होतसे नि:पापी साधुसंगें ॥३॥
संग जया जैसा लाभ तया तैसा ।
होतसे आपैसा अनायासेम ॥४॥
अनायासें गति चुके अधोगति ।
धरितां संगति सज्जनांची ॥५॥
सज्जनांची कृपा जयालागीं होय ।
तयालागीं सोय परत्रींची ॥६॥
परत्रींची सोय भक्तीचे उपाय ।
चुकती उपाय दास म्हणे ॥७॥


अभंग ॥१२॥
दुर्जनाचे संगें होय मनोभंग ।
सज्जनाचा योग सुख करी ॥१॥
सुख करी संग संतसज्जनाचा ।
संताप मनाचा दूरी ठाके ॥२॥
दूरी ठाके दु:ख होय सर्व सुख ।
पाहो जातां शोक आढळेना ॥३॥
आढळेना लाभ तेथें कैंचा क्षोम ।
अलभ्याचा लाभ संतसंगें ॥४॥
संतसंगीं सुख रामीं रामदासीं ।
देहसंबंधासी उरी नाहीं ॥५॥


अभंग ॥१३॥
साधु आणि भक्त व्युत्पन्न विरक्त ।
तपोनिधि शांत अपूर्व तो ॥१॥
अपूर्व तो जनीं शुद्धसमाधानी ।
जनाचे मिळणीं मिळूं जाणे ॥२॥
मिळों जाय जना निर्मळ वासना ।
अंतरीं असेना निंदाद्बेष ॥३॥
निदाद्वेष नसे जनिं लय असे ।
तेथें कृपा वसे सर्वकाळ ॥४॥
सर्वकाळ जेणें सार्थकीं लाविला ।
वंश उद्धरिला नामघोषें ॥५॥
नामघोष वाचे उच्चारी सर्वदा ।
संताच्या संवादा वांटेकरी ॥६॥
वांटेकरी झाला सायुज्यमुक्तीचा ।
धन्य तो दैवाचा दास म्हणे ॥७॥


अभंग ॥१४॥
ऐसा कोण संत जो दावी अनंत ।
संदेहाता घात करूं जाणे ॥१॥
करूं जाणे साधकांचें समाधान ।
जया भिन्नाऽभिन्न आढळेना ॥२॥
आढळेना जया आपुलें पारिखें ।
ऐक्यरूपें सुखें सुखावले ॥३॥
सुखावला ज्याचे संगतीं साधक ।
साधु तोचि एक धन्य जगीं ॥४॥
धन्य तेचि जगीं जे गुण बोलिले ।
दास म्हणे झाले पुरुष तेचि ॥५॥


अभंग ॥१५॥
संतांचेनि संगें देव पाठीं लागे ।
सांडूं जातां मागें सांडवेना ॥१॥
सांडवेना सदा देवसमागमीं ।
बाह्म अंतर्यामीं सारिखाची ॥२॥
सारिखाचि कडे कपाट-शिखरीं ।
गृहीं वनांतरीं सारिखाची ॥३॥
सारिखाचि तीर्थीं सारिखाचि क्षेत्रीं ।
दिवस आणि रात्री सारिखाची ॥४॥
सारिखाचि अंत नाहीं तो अनंत ।
रामदासांकित मावळला ॥५॥


अभंग ॥१६॥
दिसे तें नासेल सर्वत्र जाणती ।
या बोला वित्पत्ति काय काज ॥१॥
कार्य कारण हा विवेक पाहिजे ।
तरीच पाहिजे शाश्वतासी ॥२॥
शाश्वतासी येणें जाणेंचि न धडे ।
साकार हें मोडे दास म्हणे ॥३॥


अभंग  ॥१७॥
निर्गुणस्वरूपीं मूळमाया झाली ।
तिच्या पोटीं आली गुणमाया ॥१॥
गुणमायेपोटीं झाला सत्त्वगुण ।
सत्त्वी रजोगुण उद्भवला ॥२॥
उद्भवला रजोगुणीं तमोगुण ।
तमोगुणीं जाण व्योम झालें ॥३॥
व्योमापोटीं तेज वायुवायु पोटीं ।
तेजीं तें सहज आप झालें ॥४॥
आपापासूनियां भूमंडळ होणें ।
शास्त्रींचीं वचनें दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥१८॥
मायेचें स्वरूप ब्रह्मीम उद्भवलें ।
तिच्या पोटा आलें महत्तत्त्व ॥१॥
महत्तत्त्वीं प्तत्त्व सत्त्वीं रजोगुण ।
तिजा तमोगुण रजापोटीं ॥२॥
पोटीं पंचभूतें तमाचिया आलीं ।
दास म्हणे झाली सृष्टि ऐसी ॥३॥


अभंग  ॥१९॥
शून्यापासूनियां जन्म आकाशामी ।
आकाश वायूसी प्रसवलें ॥१॥
प्रसवला वायु तया तेज झालें ।
तेजाचिया आलें पोटा आप ॥२॥
आपापासूनियां सृष्टि ते जन्मली ।
ऐसी विस्तारली मायादेवी ॥३॥
मायादेवी वेळे शून्याकडे पळे ।
ते काळीं खवळें पंचभूत ॥४॥
जें जें जया व्यालें तें तेणें भक्षिलें ।
अंतीम तें उरलें शून्य एक ॥५॥
शून्याचें स्वरूप पाहातां कांहीं नाहीं ।
तें शून्य सर्वही जेथे आटे ॥६॥
आहे हें आटलें त्यांचें शून्य झालें ।
शून्यहि विरालें जे स्वरूपीं ॥७॥
स्वरूप पाहातां काळ वेळ गेली ।
निज ठेवी लाधली प्राणीयासी ॥८॥
प्राणीयांचें हित आहे संतांपायीं ।
वेगीं शरण जाई आलियातें ॥९॥
आलिया रे संतसंगें मुक्त होसी ।
रामीं रामदासीं हेंचि वर्म ॥१०॥


अभंग  ॥२०॥
पृथ्वीतळीं व्याळ व्याळांतळीं जळ ।
त्यातळीं अनळ सत्य जाण ॥१॥
सत्य जाण तया तळीं तो अनिळ ।
त्यातळीं पोकळ व्योम आहे ॥२॥
व्योमातळीं अहंकार तो केवळ ।
तेणें ब्रह्मगोळ धरियेला ॥३॥
धरियेला पुढें महत्तत्त्व असे ।
सप्तावरण ऐसें निरो-पिले ॥४॥
दशगुणीं थोराहुनि थोर एक ।
हे सप्त कंचुक दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥२१॥
अनावृष्टि धरा शत संवत्सर ।
तेणें जीवमात्र संहरती ॥१॥
संहरती कोणी नसे भूमंडळीं ।
सूर्य बारा कळीं तपवील ॥२॥
तपवील तेणें जळेल वरणां ।
काद्रवेयाची फणी पोळवील ॥३॥
पोळवील तेणें विषाचे हळाळ ।
मार्तंडाचे ज्वाळ एक होती ॥४॥
होती गिरिश्रृंगें सर्व भस्मरूप ।
तयांलागीं आप बुडवील ॥५॥
बुडवील धरा जळचि निखळ ।
तयासि अनळ विझवील ॥६॥
शोषियेलें जळ उरला अनळ ।
तयासि अनिळ शोषूं पाही ॥७॥
विझविता होय वायु त्या वन्हीसी ।
विश्रांति वायूसी नभापोटीं ॥८॥
नभापोटी चारी भूसें मावळलीं ।
नभाकार झाली वृत्ति तेव्हां ॥९॥
वृत्ति नभें ऐसा नटला अन्वय ।
पांचवा प्रळय दास म्हणें ॥१०॥


अभंग  ॥२२॥
म्हणे हें जाणावें आकाशासारिखें ।
माया ही ओळखें वायुऐसी ॥१॥
वायु-ऐसी माया चंचळ चपळ ।
ब्रह्म तें निश्चळ निराकार ॥२॥
निराकार ब्रह्म नाहीं आकारलें ।
रूप विस्तारिलें मायादेवीं ॥३॥
मायादेवीं झालीं नांव आणि रूप ।
शुद्ध चित्स्वरूप वेग-ळेंची ॥४॥
वेगळेंचि परी आहे सर्वांठायीं ।
रितां ठाव नाहीं तयाविण ॥५॥
तयाविण ज्ञान तेंचि तें अज्ञान ।
नाहीं समाधान ब्रह्मविण ॥६॥
ब्रह्माविण भक्ति तेचि पैं अभक्ति ।
रामदासीं मुक्ति ब्रह्मज्ञान ॥७॥


अभंग  ॥२३॥
ब्रह्म हे निर्गुण मुळीं निराकार ।
तेथें चराचर कैसें झालें ॥१॥
झालें निरा-कारीं अहंतास्फुरण ।
एकीं एकपण प्रगटलें ॥२॥
प्रगटलें कैसें आकार नसतां ।
निर्गुण अहंता कोणें केली ॥३॥
कोणीं नाही केली सर्वही मायिक ।
निर्गुण तें एक जैसें तैसें ॥४॥
जैसें तैसें सर्व मायिक रचिलें ।
निराकारीम झालें कोणेपरी ॥५॥
परी हीं नाथिलीं साच मानूं नये ।
नाहीं त्यासि काये पुसशील ॥६॥
पुसशील काय वांझेचीं लेंकरें ।
मृगजळ पूरें भांबावसी ॥७॥
भांबावसी काय मूळाकडे पाही ।
मूळीं तेथें कांहीं झालें नाहीं ॥८॥
नाहीं कां म्हणतां प्रत्यक्ष दिसतें ।
सत्यत्वें भास तें चराचर ॥९॥
चराचर सत्य हें कवीं घडेल ।
अंधारी बुडेल रविबिंब ॥१०॥
बिंबतें हें मने दिसतें लोचनीं ।
तें कैसें वचनीं मिथ्या होय ॥११॥
मिथ्या होय स्वप्र जागृति आलिया ।
तेंचि निजलिया सत्य वाटे ॥१२॥
सत्य वाटे मिथ्या मिथ्या वाटे सत्य ।
ऐसें आहे कृत्य अविद्येचें ॥१३॥
अविद्येचें कृत्य तुम्हीच सांगतां ।
मागुतें म्हणतां झालें नाहीं ॥१४॥
नाहीं झालें कांहीं दृष्टीचे बंधन ।
तैसें हे अज्ञान बाधितसे ॥१५॥
बाधितसे परी सर्वथा नाथिलें ।
कांहीं नाहीं झालें ज्ञानियांसी ॥१६॥
ज्ञानियांसी दृश्य दिसतें कीं नाहीं ।
देहींच विदेही कैसे झाले ॥१७॥
झालेती विदेही देहींच असतां ।
दिसतें पहातां परी मिथ्या ॥१८॥
मिथ्या हें सकळ मज कां वाटेना ।
संशय तुटेना अंतरींचा ॥१९॥
अंतरींचा संशय तुटे संतसंगें ।
कृपेचेनि योगें दास म्हणे ॥२०॥


अभंग  ॥२४॥
दश हे काशाचे कोणें उभारिले ।
मज निरोपिले पाहिजे हे ॥१॥
पाहिजे हे दश भूतपंचकाचे ।
उभारिले साचे मायादेवीं ॥२॥
मायादेवी कोण कैसी ओळखावी ।
जाणोनि त्यागावी ज्ञानबोधें ॥३॥
परी हे मायेची मिथ्या ओळखावी ।
आणि ती त्यागावी कोणेपरी ॥४॥
ज्ञानबोधें माया जाणोनि त्यागिली ।
परी नाहीं गेली काय कीजे ॥५॥
कीजे निरूपण संतांचे संगतीं ।
तेणें शुद्ध मति होत असे ॥६॥
होत असे परी तैसीच असेना ।
निश्चल वसेना मनामध्यें ॥७॥
मनामध्यें सदा विवेक धरावा ।
निश्चय करावा येणें रीतीं ॥८॥
रीती विवेकाची पाहतां घडीची ।
जातसे सवेंचि निघोनियां ॥९॥
निघोनियां जाय विवेक आघवा ।
तो संग त्यागावा साधकानें ॥१०॥
साधकानें संग कोणाचा त्यागावा ।
दृढ तो धरावा कोण संग ॥११॥
संग हा आदरें धरी सज्जनाचा ।
त्यागीं दुर्जनाचा दास म्हणे ॥१२॥


अभंग  ॥२५॥
कुमारीच्या पोटा ब्रह्मचारी आला ।
विचारता झाला बाप तिचा ॥१॥
वापचि पुरुष ते तों माया राणीं ।
शब्द विचक्षणीं विचारावा ॥२॥
विचारितां होय नातुहि जामातु ।
प्रपिताही मातू मिथ्या नोहे ॥३॥
मिथ्या नव्हे कदा हा देहसंबंधु ।
विस्तारे विविधु सोयरीका ॥४॥
सोयरे संबंधु नाहीं त्या निर्गुणा ।
शाश्वताच्या खुणा दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥२६॥
हिरियाच्या पोटीं मांदुसाच्या कोटी ।
सुवर्णाच्या ताटीं काचखडे ॥१॥
काचखडे हेमी तैसें दृश्य रामीं ।
स्वरूपविश्रामी श्रमु माया ॥२॥
माया हे असार स्वरूपें तेम सार ।
पाहिला निर्धार रामदासीं ॥३॥


अभंग ॥२७॥
ताकहि पांढरें दूधहि पांढरें ।
चवी जेवणारें जाणिजेते ॥१॥
जाणिजे ते चवी गुळासाखरेची ।
पाहा तो तेथेंची भेद आहे ॥२॥
भेद आहे तैसा अभेदाचे परी ।
जाणिजे चतुरीं दास म्हणे ॥३॥


अभंग  ॥२८॥
वृक्षाविण छाया गुणाविण माया ।
बिंबाविंण वायां प्रतिबिंब ॥१॥
प्रतिबिंब भासे सिंधुविणें लहरी ।
सोन्याविण परी अळंकार ॥२॥
अळंकार कृत्य कृत्याविणें केंवी ।
कैंची गदा गोवी निर्गुणाची ॥३॥
निर्गुणासि गुण हेंचि मूर्खपण ।
दृश्याविण खूण दृष्टांताची ॥४॥
दृष्टांताची खूण परब्रह्मीं घडे ।
वेदा मौन्य पडे कासयासी ॥५॥
कासयासी तेव्हां अद्वैत पाहावें ।
द्वैतचि स्वभावें ब्रह्म झालें ॥६॥
झाले परब्रह्म अत्यंत सुगम ।
ब्रह्म आणि भ्रम एक रूप ॥७॥
एकरूप आहे दूध आणि ताक ।
हंसेविण काक बोलताती ॥८॥
बोलताती सर्व ब्रह्म ऐसें बंड ।
सवंही थोतांड सत्य जाणा ॥९॥
सत्य जाणा ब्रह्म निर्मळ निश्चळ ।
मायेचा विटाळ जेथें नाही ॥१०॥
जेथें नाही गुण त्या नांव निर्गुण ।
गुरुमुखें खूण ठांई पडे ॥११॥
ठाईं पडे सत्य शाश्वत स्वरूप ।
मग आपेंआप बुझसील ॥१२॥
बुझसील साच धरितां विश्वास ।
ओवी रामदास सांगतसे ॥१३॥


अभंग  ॥२९॥
रत्नपारखिया रत्नचि परीक्षी ।
अलक्षातें लक्षी ऐसा नाहीं ॥१॥
ऐसा नाहीं कोणी देवाचा पारखी ।
आपली ओळखी ठाईं पाडी ॥२॥
ठाईं पाडी निजस्वरूप आपुलें ।
असोनि चोरिलें जवळीच ॥३॥
जवळी ना दुरी पाताळीं ना वरी ।
सबाह्य अभ्यं-तरीं कोदलेंची ॥४॥
कोंदलेंचि असे परि तें न दिसे ।
जवळिच कैसें आढळेना ॥५॥
आढळेना अंगीं असोनि सर्वांगीं ।
जयालागीं योगी धुंडिताती ॥६॥
कडाकपाटीं शिखरीं ।
समागमें हरी चोजवेना ॥७॥
चोजवेना एका सद्‍गुरुवांचूनी ।
निश्चय हा मनीं पाविजेती ॥८॥
पाविजे निश्चयो दृढ स्वरूपाचा ।
तिहीं प्रचीतीचा एकभाव ॥९॥
एकभाव भक्ति रामीं रामदासीं ।
विभक्ति विश्वासी दुरी ठेली ॥१०॥


अभंग  ॥३०॥
बाह्य नारिकेळ भीतरीं नरोटी ।
तैशापरी दृष्टि स्वस्वरूपीं ॥१॥
स्वस्वरूपीं माया जैसी दुमीं छाया ।
कां तें भासे वायां मृगजळ ॥२॥
मृगजळ भासे मार्तंडाकरितां ।
स्वरूपीं पहातां बिंब नाहीं ॥३॥
बिंब नाहीं जेथें कैंचें प्रतिबिंब ।
एकचि स्वयंभ स्वस्वरूपीं ॥४॥
स्वस्वरूपीं भास नाथिला आभास ।
धरिजे विश्वास दास म्हणे ॥५॥


अभंग ॥३१॥
जडत्व कठिण ते ते पृथ्वी जाण ।
मृदु ओलेपण असे आप ॥१॥
आप नाना रस धातु नाना रस ।
उष्णता तैजस तेंचि तेज ॥२॥
वायु स्तब्ध चळ आकाश निश्चळ ।
माईक सकळ दास म्हणे ॥३॥


अभंग  ॥३२॥
पृथ्वी आणि तेज वायु आणि आकाश ।
पांचांचे हे ऐसे पंचवीस ॥१॥
अस्थि मांस त्वचा नाडी आणि रोम ।
पांचांचें हें वर्म सांगईन ॥२॥
शुक्लित शोणित लाळ आणि मूत्र ।
मज्जा हीं निश्चित पंच तत्त्वें ॥३॥
क्षुधा तृषा जाण आळ्स शयन ।
पांचवें मैथुन तेजाचेंची ॥४॥
चळण वळण आणि प्रसरण ।
वायुनिरोधन आकुंचन ॥५॥
काम क्रोध शोक मोह आणि भये ।
स्थूळदेहाचिये पंचवीस ॥६॥
पंचवीस त्त्वीं स्थूळदेह वर्तत ।
ऐक साविचित लिंगदेह ॥७॥
अंत:करण मन बुद्धि आणि चित्त ।
पांचवा निश्चित अहंकार ॥८॥
प्राण आणि अपान व्यान आणि उदान ।
समान हे जाण पांच वायू ॥९॥
चक्षु श्रोत्र जिव्हा आणि घ्राण त्वचा ।
अंश हा तेजाचा ज्ञानेंद्रियें ॥१०॥
वाचा पाणि पाय शिश्र आणि गुद ।
पांच हीं प्रसिद्ध कमेंद्रियें ॥११॥
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ।
पांचही प्रसिद्ध विषय हे ॥१२॥
ऐसे पंचवीस लिंगदेहीं ऐसें ।
ऐसीं पंचवीसें तस्त्रें झाली ॥१३॥


अभंग  ॥३३॥
काम क्रोध शोक मोह आणि भय ।
पंचधा अन्वय आकाशाचा ॥१॥
धावन चळण आणि आकुंचन ।
वायुप्रसरण निरोधन ॥२॥
चक्षु श्रोत्र जिव्हा मैथुन आळस ।
तेजाचे हे अंश पंचविधा ॥३॥
लाळ मूत्र शुक्र रक्त आणि मज्जा ।
आप जाण वोजा पंच-विधा ॥४॥
अस्थि त्वचा मांस नाडी रोम अंश ।
दास म्हणे वास देहातीत ॥५॥


अभंग  ॥३४॥
अंत:करण मन बुद्धि आणि चित्त ।
पुढें सावचित अहंकार ॥१॥
व्यानु तो समानु उदानु तो प्राणु ।
पांचवा अपानु वायु जाण ॥२॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा आणि घ्राण ।
तेजाचेहि गुण पंचविधा ॥३॥
वाचा पाणि पाद शिश्र आणि गुद ।
आपाचे प्रसिद्ध पांच गुण ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ।
पृथ्वीचे हे विशद दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥३५॥
विष्णु चंद्र ब्रह्मा नारायण रुद्र ।
आकाशाचे थोर अंश पाहे ॥१॥
ब्रह्मांडीं व्यापक लोकांक वरुण ।
रुद्र वायु जाण चाळक तो ॥२॥
दिशा वायु रवि वरुणाचा हेत ।
अश्र्विनी दैवत तेज अंश ॥३॥
वन्हि इंद्र तिजा जाणावा उपेंद्र ।
ब्रह्मा आणि सार नैरृती तो ॥४॥
शब्द स्पर्श रूप रस आणि गंध ।
तन्मात्रा विशद दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥३६॥
विष्णु चंद्र जाण ब्रह्मा नारायण ।
पार्वतीरमण सदाशिव ॥१॥
दिशा वायु सूर्य ज्ञानेंद्रियान्वये ।
वरुण निश्चयें अरुण तो ॥२॥
तोचि इंद्र वन्हि वामन प्रजापती ।
पांचवा नैरृती गुदस्थानीं ॥३॥
स्थानीं वायु एक विषयहि एक ।
जाहालें कौतुक विषयांचें ॥४॥
सूक्षमी सूक्षम एक आत्माराम ।
रामदासीं वर्म सांपडलें ॥५॥


अभंग  ॥३७॥
भूतपंचकाचे पंचवीस गुण ।
त्यांचें स्थूळ जाण उभारलें ॥१॥
उभारलें स्थूळ पांचा पंचकांचें ।
तेंचि तूंहि साचें घडे केवीं ॥२॥
घडे केवीं द्रष्टा दृश्य एकरूप ।
द्रष्टयाचें स्वरूप वेगळेंची ॥३॥
वेगळची जाण अस्थि मांस त्वचा ।
विस्तार भूतांचा जाणताहे ॥४॥
जाणताहे द्रष्टा स्थूळाचा जाणता ।
विदेही तत्त्वतां दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥३८॥
कर्ण मनादिक सूक्ष्म पंचक ।
याचा साक्षी एक तूंचि जाण ॥१॥
जाणें पंच प्राण साक्षी विलक्षण ।
विषयाचा जाण तूंचि एक ॥२॥
तूंचि एक साक्षी दश इंद्रियांचा ।
पांचा पंचकांचा लिंगदेह ॥३॥
लिंगदेह दृश्य द्रष्टा तूंचि एक ।
बोलिला विवेक सूक्षमाचा ॥४॥
सूक्षमाचा साक्षी सूक्षमावेगळा ।
दास अवलीळा देहातीत ॥५॥


अभंग  ॥३९॥
देहद्बयसाक्षी नेणे आपणासी ।
कारण तयासी बोलिजेते ॥१॥
देहद्बय जाणे आपणासी नेणे ।
पुसों जातां म्हणे कळेना कीं ॥२॥
कळेना कीं मज झालेंचि स्वरूप ।
झाला साक्षीरूप सहजची ॥३॥
सहजचि झाला करणाचा साक्षी ।
स्वयें नेणण्याची जाण-ताहे ॥४॥
जाणताहे सूक्ष्म स्थूळासि कारण ।
साक्षा विलक्षण दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥४०॥
विदेहासी कैचें देहाचें बंधन ।
बोलिलें अज्ञान निरसावया ॥१॥
निरसोनि माया वांजेची कुमारी ।
मृगजळपूरीं उतरावें ॥२॥
उतरावें विष स्वप्रींच्या सर्पाचें ।
आणि नि:संगाचें संगदु:ख ॥३॥
मग दु:ख तुटे अजन्माचा जन्म ।
नाथिलचि भ्रम बाधितसे ॥४॥
बाधितसे भ्रम संतसंगेंविण ।
रामदासीं खूण साधुसंगें ॥५॥


अभंग ॥४१॥
स्वरूप सांडोनि देह मीच भावी ।
तो जीव रौरवीम बुडवील ॥१॥
बुडवील नरकीं देहाचे संबंधें ।
सज्जनाच्या बोधें सांडवले ॥२॥
सांडोनि विवेक भेद महावाक्य ।
जीवशिवऐक्य जयाचेनी ॥३॥
जयाचेनि तुटे संसारबंधन ।
तयाचेम वचन दृढ धरा ॥४॥
दृढ धरा मनीं अहंब्रह्म ऐसें ।
सांगतो विश्वासें रामदास ॥५॥


अभंग  ॥४२॥
मुक्त नि:संदेहो बाधतो संदेहो ।
संदेहाचा देहो कामा नये ॥१॥
कामा नये चित्त दुश्चित सर्वदा ।
लागती आपदा संशयाच्या ॥२॥
संशयाच्या संगें समाधान भंगें ।
खेद आंगीं लागे अकस्मात ॥३॥
अकस्मात सुखीं दु:ख कालवलें ।
साधकासि केलें संदेहानें ॥४॥
संदेहाचा घात होय एकसरा ।
दास म्हणे करा निरूपण ॥५॥


अभंग ॥४३॥
चारी देह पिंडीं चत्वार ब्रह्मांडीं ।
अष्टदेह प्रौढी बोलिजेल ॥१॥
बोलिजेल श्रोता सावधान व्हावें ।
दुश्चित नसावें निरूपणीं ॥२॥
निरूपणीं अष्ट देह ते कवण ।
स्थूळ लिंग जाण कारण तो ॥३॥
चौथा देह जाण तो महाकारण ।
पांचवें लक्षण विराटाचें ॥४॥
हिरण्यगर्भ हे आणि अव्याकृत ।
आठवी निश्चित मूळमाया ॥५॥
जन्म अष्ट देहीं साक्षी तो विदेही ।
रामदासा नाहीं जन्ममृत्यु ॥६॥


अभंग  ॥४४॥
मीच ब्रह्म ऐसा अभिमान धरीं ।
जाणावा चतुरीं चौथा देह ॥१॥
चौथा देह सर्वसाक्षी आणि अवस्था ।
ऐसी हे व्यवस्था चौदेहांची ॥२॥
चौदेहांची गांठी सुटतां सुटली ।
विवेकें तुटली देहबुद्धि ॥३॥
देहबुद्धि नाही स्वरूपीं पाहतां ।
चौथा देह आतां कोठें आहे ॥४॥
कोठें आहे अहं ब्रह्म ऐसा हेत ।
देहीं देहातीत रामदास ॥५॥


अभंग  ॥४५॥
कल्पनेचे पोटीं अष्टविधा सृष्टि ।
तेंचि आतां गोष्टी सांगईन ॥१॥
सांगईन गोष्टी एक काल्पनिक ।
दुजी ती शाब्दिक शब्दसृष्टि ॥२॥
शब्दसृष्टि दुजा तिजी ती प्रत्यक्ष ।
चौक्षी जाण लक्ष चित्रलेप ॥३॥
चित्रलेप चौथी पांचवी स्वप्रींची ।
सृष्टि गंधर्वाची साहावी ते ॥४॥
साहावी ती सृष्टि गंधर्वनगर ।
सातवी नवज्वर सृष्टि जाणा ॥५॥
सृष्टि जाणा दृष्टिबंधन आठवी ।
सर्वहि मानवी काल्पनिक ॥६॥
काल्पनिक – अष्टसृष्टीचें स्वरूप ।
शुद्ध सत्स्वरूप निर्विकल्प ॥७॥
निर्विकल्प देह कल्पनरेहित ।
जाणिजे स्वहित तेंचि बापा ॥८॥
तेंचि बापा तुझे संतांचे संगतीं ।
चुके अधोगति दास म्हणे ॥९॥


अभंग  ॥४६॥
पांचहि प्रळय सांगईनं आतां ।
जाणिजे तत्त्वतां दोनी पिंडीं ॥१॥
दोनी पिंडीं दोनी ब्रह्मांडप्रळय ।
पांचवा अन्वय विवेकाचा ॥२॥
विवेंकाचा पंथ विवेकें जाणावा ।
योगियांचा ठेवा निरूपण ॥३॥
निरूपणीं निद्राप्रळय बोलिला ।
दुजा मृत्यु झाला प्राणियासि ॥४॥
प्राणियासि पिंडीं हे दोनी प्रळयो ।
ब्रह्मनिद्राक्षयो ब्रह्मयाचा ॥५॥
ब्रह्मयाचा क्षयो तो ब्रह्मप्रळयो ।
व्यतिरेकान्वयो विवेकाचा ॥६॥
विवेकाचा अर्थ माईक सर्वही ।
स्वस्वरूपीम नाहीं चराचर ॥७॥
चराचर मूर्ति मायिक x प्रसिद्ध ।
हा विवेक सिद्ध सज्जनाचा ॥८॥
सज्जनाचा भाव सर्व दृश्य वाव ।
दृश्यातीत देव जैसा ॥९॥
जैसा देव आहे तैसा ओळखावा ।
प्रळ्य पांचवा दास म्हणे ॥१०॥


अभंग  ॥४७॥
कण सांडोनियां घेऊं नये भूस ।
गभविण फणस घेऊं नये ॥१॥
घेऊं नये नारिकेळाची नरोटी ।
सालपटें खोटीं डाळिंबाचीं ॥२॥
डाळिंबाचि त्वचा चवड उसाचा ।
स्तंभ कर्दलीचा कामा नये ॥३॥
खातां नये नाना फळाची आटोळी ।
असो हे वाचाळी वाउगीच ॥४॥
वाउगें सांडोनि सार तेंचि घ्यावें ।
येर तें सांडावें मिथ्याभूत ॥५॥
मिथ्याभूत जें जें तत्त्व दृष्टि पडे ।
म्हणोनियां घडे त्याग त्याचा ॥६॥
त्याग त्याचा कीजे तें मनीं कल्पावें ।
मग अनुभवें जाणिजेल ॥७॥
जाणिजेल सार त्यागितां असार ।
बोलावा विस्तार काय यासी ॥८॥
काय यासी आतां धरावा संदेहो ।
कल्पनेचा देहो नाशिवंत ॥९॥
नाशिवंत आहे नांव आणि रूप ।
पाहे आपेंआप दास म्हणे ॥१०॥


अभंग  ॥४८॥
खोटें निवडितां खरें नाणें ठरे ।
तैसेंचि विस्तारे तत्त्वज्ञान ॥१॥
तत्त्वज्ञान खोटें जाणोनि सांडावें ।
मग ओळखावें परब्रह्म ॥२॥
परब्रह्म बरवें संतसंगें कळे ।
विवेकें निवळे मार्ग कांहीं ॥३॥
मार्ग कांहीं कळे परीक्षा जाणतां ।
दिशाभूली होतां वाट चुक ॥४॥
वाट चुके मीन ऐसें न करावें ।
सार्थक करावें दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥४९॥
जें जें कांहीं दिसे तें तें सर्व नासे ।
अविनाश असे आत्मरूप ॥१॥
आत्मरूपीं दृषि घालितां निवळे ।
आपेआप कळे मिथ्या माया ॥२॥
मिथ्या माया वाटे साचाचसारखी ।
स्वरूपा ओळखी जंव नाहीं ॥३॥
जंव नाहीं झाली संदेहनिवृत्ति ।
तंव हे प्रचीति जाणवेना ॥४॥
जाणवेना मनीं निश्चयावांचूनी ।
निश्चयो श्रवणीं दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥५०॥
देहबुद्धि बहु काळाची जुनाट ।
नवी आहे वाट सार्थकाची ॥१॥
सार्थकाची वाट भ्रांतीनें लोपली ।
जवळी चुकली असोनियां ॥२॥
असोनियां देव जवळी चुकला ।
प्राणी भांबावला मायाजाळें ॥३॥
मायाजाळ दृश्य तुटे एकसरें ।
जरी मनीं धरे स्वस्वरूप ॥४॥
स्वरूपनिश्चये समाधान होय ।
रामदासीं सोय स्वरूपाची ॥५॥


अभंग  ॥५१॥
बहुकाळ गेले देवासी धुंडितां ।
देव पाहों जातां जवळीच ॥१॥
जवळीच असे पाहतां न दिसे ।
सन्निधचि असे रात्रंदिवस ॥२॥
रात्रंदिवस देव सबाह्याभ्यंतरीं ।
जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
विसंबेना परी जीव हे नेणती ।
जाती अधोगाति म्हणोनियां ॥४॥
म्हणोनियां सदा सावध असावें ।
विन्मुख नसावें राघवासी ॥५॥
राम पूर्वपुण्यें झालिया सन्मुख ।
मग तो विन्मुख होऊं नेणे ॥६॥
होऊं नेदी राम सर्वांगीं सुंदर ।
नित्य निरंतर मागें पुढें ॥७॥
मागें आणि पुढें सन्मुख चहूंकडे ।
भेटी हे निवाडे राघवाची ॥८॥
राघवाचि भेटी झाल्या नाहीं तुटी ।
मग कल्पकोटी चिरंजीव ॥९॥
चिरंजीव होय राघवीं मिळतां ।
जेथें पाहों जातां मृत्यु नाहीं ॥१०॥
नाहीं जन्म मृत्यु नाहीं येणें जाणें ।
स्वरूपीं राहणें सर्वकाळ ॥११॥
सर्वकाळ मन तदाकार होय ।
जरि राहे सोय श्रवणाची ॥१२॥
श्रवणाची सोय संताचेनि संगें ।
विचारेंचि भंगें अहंभाव ॥१३॥
अहंभावें राम भेटला नवजाय ।
जवळचि होय दुरी कैसा ॥१४॥
दुरि कैसा होय अहंभावें करी ।
जवळीच चोरी आपणासी ॥१५॥
आपणासी चोरी सबाह्य अंतरीं ।
आणि सृष्टिभरी नांदतसे ॥१६॥
नांदतसे अंत नाहीं तो अनंत ।
जाणतील संत अनुभवी ॥१७॥
अनुभावी जाणे तेथींचिये खुणे ।
येर विटंबणें वाढवील ॥१८॥
वाढवील सुख संतसज्जनांसी ।
रामीं रामदासीं भेटी झाली ॥१९॥


अभंग  ॥५२॥
योगियांचा देव मज सांपडला ।
थोर लाभ झाला एकाएकीं ॥१॥
एकाएकीं देव त्रैलोंक्यनायक ।
देखिला सन्मुख चहूंकडे ॥२॥
चहूंकडे देव नित्यनिरंतर ।
व्यापूनि अंतर समागमें ॥३॥
समागम मज रामाचा जोडला ।
वियोग हा केला देशधडी ॥४॥
देशधडी केला विवेकें वियोग ।
रामदासीं योग सर्व काळ ॥५॥


अभंग  ॥५३॥
जेथें जावें तेथें राम समागमीं ।
आतां कासया मीं खंती करूं ॥१॥
खंती करूं ज्याची तो समागमेंची ।
पाहतां सुखाची घडी होय ॥२॥
अहो देव खरा भूमंडळवासी ।
जातां दिगंतासी सारिखाची ॥३॥
सारिखाचि जनीं वनीं वनांतरीं ।
तो गिरिकंदरीं सारिखाची ॥४॥
सारिखाचि देव कदा पालटेना ।
राहे त्रिभुवना व्यापुनियां ॥५॥
व्यापुनियां दासा सन्निधची वसे ।
विचार विलसे रामदासीं ॥६॥


अभंग  ॥५४॥
रामोंविण देश तोचि तो विर्दश ।
विदेशाचा देश राम करी ॥१॥
राम भेटे ज्यासी तो नव्हे विदेशी ।
सर्व देश त्यासी आपुलेचि ॥२॥

आपुलेची देश या रामाकरितां ।
होय सार्थकता जेथे तेथें ॥३॥
जेथें तेथें राम देखतां विश्राम ।
संसारींचा श्रम आठवेना ॥४॥
आठवेना तेथें आठव विसर ।
दास निरंतर जैसा तैसा ॥५॥


अभंग  ॥५५॥
कल्पनेचा प्रांत तो माझा एकांत ।
तेथें मी निवांत बैसवीन ॥१॥
बैसवीन सुखरूप क्षण एक ।
पाहेन विवेक राघवाचा ॥२॥
राघवाचा पार अनंत अपार ।
नाहीं पारावार स्वरूपासी ॥३॥
स्वरूप रामाचें अत्यंत कोमळ ।
जेथें नाहीं मळ मायिकाचा ॥४॥
मायिकाचा मळ जाय ततक्षणें ।
रामाचें दर्शने दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥५६॥
विश्रांतीचें स्थळ स्वरूप केवळ ।
द्बत तळमळ जेथें नाहीं ॥१॥
जेथें नाहीं काया नाहीं मोहमाया ।
रंक आणि राया सारिखाची ॥२॥
सारिखेचि सदा सर्वदा स्वरूप ।
तेंचि तुझें रूप जाण बापा ॥३॥
जाण बापा स्वयें तूंचि आपणासि ।
सोहंस्मरणासी विस-रतां ॥४॥
विसरतां सोहं स्मरण आपुले ।
मन गुंडाळल मायाजाळीं ॥५॥
मायाजाळीं तुझा तूंच गुंतलासी ।
यातना भोगिसी म्हणूनियां ॥६॥
म्हणूनियां होई सावध अंतरीं ।
सोहं दृढ धरीं दास म्हणे ॥७॥


अभंग  ॥५७॥
स्वरूपाची भेटी तेथें नाहीं तुटी ।
वायांचि हिंपुटी होत आशा ॥१॥
होतसां हिंपुटी नसतां वियोग ।
असतां संयोग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ ऐक्यस्वरूपीं आलिंगन ।
जेथें मी तूंपण हारपलें ॥३॥
हारपले दु:ख द्बैताचें पाहतां ।
सुखरूप आतां समाधान ॥४॥
समाधान चळे ऐसें न करावें ।
विवेके भरावें स्वस्वरूपीं ॥५॥
स्वस्वरूपीं नाहीं संयोग वियोग ।
सर्वकाळ योग सज्जना चा ॥६॥
सज्जनाचा योग सर्वकाळ आहे ।
विचारूनि पाहे अनुभवें ॥७॥
अनुभवें झाली आम्हाम तुम्हां भेटी ।
तुटीविणें भेटी दास म्हणे ॥८॥


अभंग  ॥५८॥
तुम्हां आम्हां मुळीं झाली नाहीं भेटी ।
तुटीविण भेटी इच्छितसां ॥१॥
इच्छितसां योग नसतां वियोग ।
तुम्हां आम्हां योग सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ तुम्ही आम्ही एक स्थळीं ।
वायां मृगजळीम बुडू नका ॥३॥
बुडू नये आतां सावध असावें ।
रूप ओळ्खावें जवळीच ॥४॥
जवळीच आहे नका धरूं दुरी ।
बाह्य अभ्यंतरीं असोनियां ॥५॥
असोनि सन्निध वियोगाचा खेद ।
नसोनियां भेद लावूं नये ॥६॥
लावूं नये भेद मायिक संबंधीं ।
रामदासीं बुद्धि भेटी झाली ॥७॥


अभंग  ॥५९॥
नमन लंबोदरा शारदा सुंदरा ।
सद्रुरुमाहेरा संतजना ॥१॥
संतसंग करी नि:संग होईजे ।
स्वरूप पाविजे आपुलेंची ॥२॥
आपुलें स्वरूप आपणा नेणवे ।
तयासि जाणवे राम केवीं ॥३॥
राम केवीं कळे नाकळे वेदासी ।
संगें तयापाशीं पाविजेना ॥४॥
पाविजेना जंव हा देहसंबंधू ।
राघवाचा बोधू देहातीत ॥५॥
देहातीत संत जाणती अनंत ।
प्रकृतीचा प्रांत निजानंद ॥६॥
निजानंद पूर्वक्षाचें  बोलणें ।
सिद्धांतासि उणें आणविलें॥७॥
आणविलें उणें शब्दसमुद्रासी ।
नि:शब्द ते ग्रासी मौन्यमुद्रा ॥८॥
मौन्यमुद्रा ध्यान आणि ती समाधि ।
अविद्या उपाधि मावळली ॥९॥
मावळली सर्व दासाची आशंका ।
ज्ञान विनायका देखतांची ॥१०॥


अभंग  ॥६०॥
प्रथम ते नमूं संत साधुजन ।
जयां आत्मज्ञान प्रांजळीत ॥१॥
प्रांजळीत ज्ञान आत्मनिवेदन ।
हेंचि समाधान योगियांचें ॥२॥
योगियांचें गुज तेंचि सर्व बीज ।
एकचि सहज आदि अंत ॥३॥
आदिअंत सदा निर्मळ निश्चळ ।
जैसें ते केवळ चिदाकाश ॥४॥
चिदाकाश बाह्य अंतरीं कोंदलें ।
तैसें तें एकलें स्वस्वरूप ॥५॥
स्वस्वरूपीं मिथ्या मायेचें पडळ ।
जैसें तें आभाळ नाथिलेंची ॥६॥
नाथिलोंचि दिसे साचाचिये परी ।
ऐसी बाजि-गिरी सत्य वाटे ॥७॥
सत्य वाटे स्वप्र जैसें निजलिया ।
तेंचि चेवलिया मिथ्याभूत ॥८॥
मिथ्याभूत माया साच तो ईश्वर ।
श्रोतीं हा विचार विवरावा ॥९॥
विवरावा ऐसें राम-दास म्हणे ।
सद्रुरुवचनें चोजविलें ॥१०॥


अभंग  ॥६१॥
प्रथम नमन संत साधूजना ।
संवादाचे ज्ञाना बोलावया ॥१॥
बोलावया सार वस्तूचा विचार ।
जेणें निरंतर सुख वाटे ॥२॥
सुख वाटे मनीं संवाद सज्जनीं ।
तेणें ध्यानीं मनीं स्वस्वरूप ॥३॥
स्वस्वरूप मना कदा आकळेना ।
सुलभ सज्जनाचेनि संगें ॥४॥
संगें साधूचिया समाधान झालें ।
स्वस्वरूप लाधलें रामदासीं ॥५॥


अभंग ॥६२॥
सरस्वति विद्या लक्षुमी अविद्या ।
दोहीं अतीत आद्याचें स्वरूप ॥१॥
स्वरूपीं लक्षुमी नाहीं सरस्वति ।
संपत्ति विपत्ति दोनी नाहीं ॥२॥
नाहीं शिव शक्ति नाहीं नर नारी ।
अंतरीं विचारी दास म्हणे ॥३॥


अभंग  ॥६३॥
आमुचे सज्जन संत साधुजन ।
होय समाधान तयांचेनि ॥१॥
तयांचेनि संगें पाविजे विश्रांति ।
साधु आदि अंतीं सारखेची ॥२॥
सारखेची सदा संत समाधानी ।
म्हणोनियां मनीं आवडती ॥३॥
आवडती सदा संत जिवलग ।
सुखरूप संग सज्जनांचा ॥४॥
सज्जनांचा संग पाप तें संहारी ।
म्हणोनियां धरी रामदास ॥५॥


अभंग  ॥६४॥
संतसंगें जन्म चुकती यातना ।
आणि जनार्दना भेटी होय ॥१॥
भेटी होय संतसंगें राघवाची ।
आणिक भवाची शांति होय ॥२॥
शांति होय काळ शांति होय वेळ ।
मन हें निर्मळ जरी राहे ॥३॥
जरी राहे भाव राघवीम सर्वदा ।
संसारा आपदा तया नाहीं ॥४॥
तया नाहीं दु:ख तया नाहीं शोक ।
दास म्हणे एक राम ध्यातां ॥५॥


अभंग  ॥६५॥
संतसंगें तुज काय प्राप्त झालें ।
सांग पां वहिलें मजपाशीं ॥१॥
मजपाशीं सांग कोण मंत्र तुज ।
काय आहे गुज अंतरींचें ॥२॥
अंतरीचें गुज काय समाधान ।
मंत्र जप ध्यान कैसें आहे ॥३॥
कैसें आवाहन कैसेम विसर्जन ।
कैसें पिंडज्ञान सांगें मज ॥४॥
सांगें मज आतां काय उपासनें ।
मुद्रा ते आसनें सांग आतां ॥५॥
सांग पंचीकरण चित्तचतुष्टय ।
कैसे ते अद्वय जीव शिव ॥६॥
जीवशिव ऐक्य झालें कोणे रीतीं ।
सांग मजप्रति अष्ट देह ॥७॥
अष्ट देह पिंडब्रह्मांडरचना ।
तत्त्वविवंचना सांग मज ॥८॥
सांग मज भक्ति कैसी ती विरक्ति ।
सायुज्यतामुक्ति ते कवण ॥९॥
कोणतें साधन कोणाचें भजन ।
ऐसे केले प्रश्र रामदासा ॥१०॥


अभंग  ॥६६॥
संतसंगें मज काय प्राप्त झालें ।
सांगतों वहिलें तुजपाशीं ॥१॥
मंत्र हा तारक रामनाम एक ।
गुज हरादिक चिंतिताती ॥२॥
ज्ञानें समाधान सगुणाचें ध्यान ।
निर्गुण अभिन्न आपणचि ॥३॥
दृश्य आवाहन दृश्य विसर्जन ।
तेथें पिंडदान आढळेना ॥४॥
जपासना हरि मुद्रा अगोचरी ।
सिद्धासनावरी समाधान ॥५॥
पंचीकरणें पिंडब्रह्मांड आवरण ।
साक्ष तो आपण एकलचि ॥६॥
जीवशिवऐक्य झालें येणें रीतीं ।
प्रकृतीचे प्रांतीं द्वैत कैंचें ॥७॥
अष्ट देह स्थूळ सूक्ष्म कारण ।
चौथा महाकारण जाणिजे हा ॥८॥
विराट हिरण्य आणि अव्याकृत ।
आठवी प्रकृति मूळमाया ॥९॥
एक तत्त्व जाणे त्याचें नांव भक्ति ।
जाणावी विरक्ति संगत्याग ॥१०॥
सायुज्यता मुक्ति तेचि ते अचळ ।
साधनाचें फळ गुरुदास्य ॥११॥
गुरुदास्यें चुके संसारयातना ।
अनुभवें खुणा जाणतील ॥१२॥
अनुभवेंवीण होय सर्व शीण ।
निरसले प्रश्र दास म्हणे ॥१३॥


अभंग  ॥६७॥
रिसाचिये परी व्हावें एकचित्त ।
ध्यानीं भगवंत सोडूं नये ॥१॥
सोडूं नये सर्वकाळ निजव्यास ।
श्रवण अभ्यास असों द्यावा ॥२॥
असों द्यावा सदा सन्निध विवेक ।
तेणें देव एक चोजवेल ॥३॥
चोजवेल देव श्रवणें मननें ।
कुबद्धि साधनें पालटावी ॥४॥
पालटावी सर्व हे चि हे अहंता ।
शोधावी तत्त्वतां देहबुद्धि ॥५॥
देहबुद्धि सर्व ज्ञानें शोधूं जातां ।
नि:संग अनंता भेटी होय ॥६॥
भेटी होय ज्ञानें निर्गुण देवाची ।
मग नाहीं छीछी संसाराची ॥७॥
संसाराची छीछी यातना यमाची ।
चुकवील तोचि धन्य एक ॥८॥
धन्य एक जनीं तोचि तो पाहातां ।
मुक्ति सायुव्यता जया लाभे ॥९॥
जया लाभे मुक्ति सगुणाची भक्ति ।
दास म्हणे शक्ति आगळा तो ॥१०॥


अभंग  ॥६८॥
तुम्ही आम्ही करूं देवाचा निश्चय ।
जया नाहीं लये तोचि देव ॥१॥
देव हा अमर नित्य निरंतर ।
व्यापुनी अंतर देव आहे ॥२॥
देव आहे सदा सबाह्याभ्यंतरीं ।
जीवा क्षणभरी विसंबेना ॥३॥
विसंबेना परी जीवासी नेणवे ।
म्हणउनी धांवे नानामतीं ॥४॥
नानामतीं देव पाहतां दिसेना ।
जंव तेम वसेना ज्ञान देहीं ॥५॥
ज्ञ न देहीं वसे तया देव दिसे ।
अंतरीं प्रकाशे ज्ञानदृष्टि ॥६॥
ज्ञानदृष्टि होतां पाविजे अनंता ।
हा शब्द तत्त्वतां दास म्हणे ॥७॥


अभंग  ॥६९॥
ब्रह्म हें जाणावें निर्मळ निश्चळ ।
व्यापक पोकळ व्योमांकारें ॥१॥
व्योमाकार ब्रह्म बोलताती श्रुती ।
पाहों जातां मती तदाकार ॥२॥
तदाकार मती श्रवणें होईल ।
संदेह जाईल अंतरींचा ॥३॥
अंतरींचा भाव निर्मळीं लागतां ।
होईजे तत्त्वतां निर्मळची ॥४॥
निर्मळचि होणें निर्मळाचे गुणें ।
श्रवणमननें दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥७०॥
नमोजी अनंता तूंचि माता पिता ।
तुझी सर्व सत्ता तूंचि एक ॥१॥
तूंचि एक ऐसा निश्चय मानसीं ।
झालिया मुक्तीसी काय उणें ॥२॥
काय उणें मुक्ति जया तुझी भक्ति ।
संसारीं विरक्ति सर्व काळ ॥३॥
सर्वकाळ जया श्रवणीं आवडी ।
साधका तांतडी तुझी देवा ॥४॥
तुझी देवा चाड त्यासि नाम गोड ।
पुरे सर्व कोड दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥७१॥
जोडलसि बापा धरिलासी भावें ।
आतां तूज जीवें विसंबेना ॥१॥

विसंबेना देवा नित्य निरंतर ।
मेलिया विसर पडो नेदी ॥२॥
पडों नेदी वाचा रामनामा-विण ।
देव हा सगुण रामदासीं ॥३॥


अभंग  ॥७२॥
ओवीचेनि मिसे देव आठवावा ।
हदयीं धरावा सर्वकाळ ॥१॥
सर्वकाळ मनीं स्वरूपाचा छंद ।
तेणें भवकंद तुटतील ॥२॥
तुटेल ती व्याधि या जन्मकर्माची ।
जरी राघ वाची भक्ति घडे ॥३॥
भक्ति घडे भावें सगुणा देवाची ।
संगति देवाची जंव आहे ॥४॥
आहे देव तंव सगुणीं भजावें ।
स्वस्वरूपीं व्हावें आपणचि ॥५॥
आपणचि देव आपणचि भक्त ।
संतसंगें मुक्त आपणची ॥६॥
आपणचि सर्व आपणचि वाव ।
मीपणाचा ठाव आप-णचि ॥७॥
आपण तूंपण जयाचे अंतरीं ।
तंव भक्ति करी सगुणाची ॥८॥
सगुणाची भक्ति लोभाची विरक्ति ।
निर्गुणाची भक्ति सायुज्यता ॥९॥
सायुज्यता मुक्ति फिटला संदेहो ।
बंधनचि वावो रामदासीं ॥१०॥


अभंग  ॥७३॥
ओविचेनि मिसें स्वरूपासि जावें ।
सत्वर पावावें समाधान ॥१॥
समाधान नाहीं स्वरूपावांचोनी ।
म्हणोनियां मनीं तेंचि असो ॥२॥
तेंचि असो रूप निर्गुण रामाचें ।
सुख विश्रामाचें समाधानीं ॥३॥
समाधानी योगी तो हें सुख भोगी ।
मनीं वीतिरागी याचि सुखें ॥४॥
याचि सुखें नर जो नाहीं निवाला ।
तोचि आहाळला दु:खशोकें ॥५॥
दु:ख शोक नाहीं राम आठवीतां ।
अमृत सेवितां मृत्यु नाहीं ॥६॥
नाहीं जन्ममृत्यु अभेद भक्तासी ।
रामीं रामदासीं अनुभव ॥७॥


अभंग  ॥७४॥
सगुण हा देव धरावा निश्चित ।
तरी नाशवंत विश्व बोले ॥१॥
विश्व बोले एका भजावें निर्गुणा ।
परी लक्षवेना काय कीजे ॥२॥
काय कीजे आतां निर्गुण दिसेना ।
सगुण असेना सर्वकाळ ॥३॥
सर्वकाळ गेला संदेहीं पडतां ।
कोणे वेळे आतां मोक्ष लाभे ॥४॥
मोक्ष लाभे एका सद्रुरूपासून ।
आत्मनिवेदन रामदासीं ॥५॥


अभंग  ॥७५॥
जें पंचभूतिक तें सर्व मायिक ।
बोलती विवेक संतजन ॥१॥
संतजनीं सर्व मायिक बोलावें ।
तरी कां फिरावें तीर्थाटणा ॥२॥
तीर्थाटणें देव मायिकाचे पोटीं ।
तरी आटाआटी कां करावी ॥३॥
कां करावी पूजा सांडूनि परमात्मा ।
मूर्खस्य प्रतिमा हें वचन ॥४॥
हें वचन मिथ्या कैसें हो करावें ।
काय हो धरावें आतां आम्हीं ॥५॥
आतां आम्हीं वाक्य मिथ्या म्हणों नये ।
देवधर्म काये मोकलावा ॥६॥
मोकलावा देव ऐसें म्हणों नये ।
तरी वाक्य काये मिथ्या आहे ॥७॥
मिथ्या नव्हे वाक्य मिथ्या नव्हे देव ।
पडिला संदेह काय कीजे ॥८॥
कीजे दृढ भाव सगुण देवासी ।
जंव कल्पनेसी उरी आहे ॥९॥
कल्पनेचें रूप विवेके विरालें ।
मग सर्व झालें गंगाजळ ॥१०॥
गंगाजळ झालें निर्विकल्प केलें ।
सगुण राहिलें सहजचि ॥११॥
सहजचि कीजे उपाधि न कीजे ।
एकांतीं बोलिजे गुरुगम्य ॥१२॥
गुरुगम्य आहे कल्पनेवेगळें ।
कल्पनेच्या मुळें वाद उठे ॥१३॥
वाद उठे जनीं ऐसें न करावें ।
त्रिकाळ भजावें वेदवाक्य ॥१४॥
वेदवाक्य बोले कर्म उपासना ।
अंतीं शुद्ध ज्ञाना बोलियेला ॥१५॥
बोलियेला पूर्वक्ष तो सिद्धांत ।
केला निश्चयार्थ संतजनीं ॥१६॥
संतजनीं दृढ विश्र्वास धरावा ।
मग विसरावा संदेह तो ॥१७॥
संदेह धरिते कल्पना आपुली ।
निर्विकल्प केली साधुजनीं ॥१८॥
साधुजनीं केला निश्चयो धरावा ।
तेथें अहंभावा उरी नाहीं ॥१९॥
उरी नाहीं संतसंगें संदेहासी ।
रामीं रामदासीं नि:संदेह ॥२०॥


अभंग  ॥७६॥
दृश्यहि दिसेना अंधासि पाहातां ।
परी तया ज्ञाता म्हणों नये ॥
म्हणों नये तैसें अज्ञाना विज्ञान ।
पूर्ण समाधान वेगळेंची ॥२॥
वेगळेंचि कळे क्षीर नीर हंसा ।
दास म्हणे तैसा अनुभव ॥३॥


अभंग  ॥७७॥
ज्ञानाचें लक्षण क्तियासरंक्षण ।
वरी विशेषण रामनाम ॥१॥
रामनाम वाचें विवेक अंतरीं ।
अनुताप वरी त्यागावया ॥२॥
त्यागावया भोग बाह्य लोंलगता ।
पाविजे तत्त्वतां अनुतापें ॥३॥
अनुतापें त्याग बाह्यात्कारीं झाला ।
विवेकानें केला अंतरींचा ॥४॥
अंतरींचा त्याग विवेकीं करावा ।
बाह्य तो धरावा अनुतापें ॥५॥
अनुतापें भक्ति विवेक वैराग्य ।
घडे त्याचें भाग्य काय सांगो ॥६॥
काय सांगों भाग्य अचळ चळेना ।
महिमा कळेना ब्रह्मादिकां ॥७॥
ब्रह्मादिकां लाभ ज्ञानाचा दुर्लभ ।
तो होय सुलभ साधुसंगें ॥८॥
साधुसंगें साधु होईजे आपण ।
सांगतसे खूण रामदास ॥९॥


अभंग  ॥७८॥
मुक्तपणें रामनामाचा अव्हेरू ।
करी तो गव्हारू मुक्त नव्हे रे ॥१॥
मुक्त नव्हे काय स्वयें शूलपाणि ।
राम नाम वाणीं उच्चारितो ॥२॥
उच्चारितो शिव तेथें किती जीव ।
बापुडे मानव देहधारी ॥३॥
देहधारी नर धन्य तो साचार ।
वाचें निरंतर रामनाम ॥४॥
रामनाम वाचें रूप अभ्यंतरीं ।
धन्य तो संसारीं दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥७९॥
नाम घेतां रामरूप ठायीं पडे ।
गूज तें सांपडे योगियांचें ॥१॥
योगियांचे गुज सर्वांटायीं असे ।
परी तें न दिसे ज्ञानाविण ॥२॥
ज्ञानाविण योग ज्ञानाविण भोग ।
ज्ञानाविण त्याग वाउगाचि ॥३॥
वाउगाचि धर्म वाउगोंचि कर्म ।
गर्भगीता वर्म बोलि-येली ॥४॥
बोलियेली वर्म ज्ञान हें सार्थक ।
येर निरर्थक सर्व धर्म ॥५॥
सर्व धर्म त्यागी मज शरण येई ।
अष्टादयाव्यायीं बोलियेलें ॥६॥
बोलियेलें ज्ञान आगमनिगमीं ।
ज्ञानें-विण ऊमीं निरसेना ॥७॥
निरसेना ऊर्मी आत्मज्ञानेंविण ।
ज्ञानाचें लक्षण निरूमणें ॥८॥
निरूपणे ज्ञान अंतरीं प्रकाशे ।
विवेकें निरसें मायाजाळ ॥९॥
मायाजाळी जन आत्मज्ञानी झाले ।
दास म्हणे गेले सुटोनियां ॥१०॥


अभंग  ॥८०॥
नानारंग शेखीं होताती वोरंगे ।
सर्वदा सुरंग रामरंग ॥१॥
रामरंगें कदा-काळीं वोरंगेना ।
तेथें राहें नाना रंगोनियां ॥२॥
रंगोनियां राहे तद्रूप होवोनी ।
मग वनीं जनीं समाधान ॥३॥
समाधान घडे राघवीं मिळतां ।
मग दुर्मिळता कदा नाहीं ॥४॥
कदा नाहीं खेद सर्वहि आनंद ।
सुखाचा संवाद संतसंगें ॥५॥
संतसंगें जन्म सार्थक होईल ।
राम सांपडेल जवळीच ॥६॥
जवळीच राम असोनि चुकलों ।
थोर भांबावलों मायिकासी ॥७॥
मायिकासी प्राणी सत्यचि मानिती ।
सत्य ते नेण ती जाणपणें ॥८॥
जाणपणें मनीं अज्ञान थारलें ।
तेंचि विस्तारलें ज्ञानरूपें ॥९॥
ज्ञानरूपें भ्रांति समावली चित्तीं ।
संशय-निवृत्ति नव्हे तेणें ॥१०॥
नव्हे तेणें रूप टाउकें रामाचें ।
जें कां विश्रामाचें माहियेर ॥११॥
माहेयेरें घडे संशयनिवृत्ति ।
रामसीतापतीचेनि नामें ॥१२॥
रामनाचें रूप सर्वहि निरसे ।
जो कोणी विश्वासे रामनामीं ॥१३॥
रामनामीं चित्त ठेवूनि असावें ।
दुश्चित नसावें सर्व-काळ ॥१४॥
सर्वकाळ गेला सार्थकीं जयाचा ।
धन्य तो दैवाचा दास म्हणे ॥१५॥


अभंग ॥८१॥
दर्पणी पाहातां दिसे सर्व अंग ।
परी पृष्ठीभाग आढळेना ॥१॥
आपुलाच पाठी आपणा न दिसे ।
ऐसें बोलतसे सर्व जन ॥२
आपशुद्धि नेणे त्या काय करावें ।
म्हणोनि जाणावें आपणासी ॥३॥
आपणासी जाणें संतांचे संगतीं ।
जया अधोगति जन्म नाहीं ॥४॥
जन्म नाहीं मृत्यु नाहीं येणें जाणें ।
स्वरूपीं राहणें दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥८२॥
भयानक स्वप्र जया वाटे भयें ।
तेणें निजो नये सर्वकाळ ॥१॥
सर्वकाळ जागा विवेकसंगतीं ।
तयासी कल्पांतीं भय नाहीं ॥२॥
भय उठे देहीं तूं तंव विदेहीं ।
देहातीत पाही आपणासी ॥३॥
आपणा नेणतां वाटे नाना चिंता ।
म्हणोनि दुश्चिता राहु नये ॥४॥
राहूं नये कदा या देहसंबंधीं ।
मनी धरी शुद्धि स्वरूपाची ॥५॥
स्वरूपाची शुद्धि जया ठांई पडे ।
तया नरा घडे समाधान ॥६॥
समाधान घड देवा आठवितां ।
राम-दासीं चिंता दूर ठेली ॥७॥


अभंग  ॥८३॥
जंव आहे तुज हा देहसंबंध ।
तंद नव्हे बोध राघवाचा ॥१॥
राघवाचा बोध या देहावेगळा ।
देह कळवळा तेथें नाहीं ॥२॥
नाहीं सुख दु:ख नाहीं येणें जाणें ।
चिरंजीव होणें रामरूपीं ॥३॥
रामरूपीं होय जन्म मृत्यु वाव ।
विश्रांतीचा ठाव राम एक ॥४॥
राम एकरूपीं सर्वरूपीं आहे ।
अनुभवीं पाहे आपुलिया ॥५॥
आपुल्या अंतरीं बाह्य निरंतरीं ।
सर्वसृष्टिभरी नांदतसे ॥६॥
नांदतसे सदा जवळी कळेना ।
कदा आकळेना साधुविण ॥७॥
साधुविण राम धांडोळितां श्रम ।
नव्हेचि विश्राम साधुविणें ॥८॥
साधुविणें राम कदा आकळेना ।
संदेह तुटेना कांहीं केल्या ॥९॥
कांहीं केल्या नव्हे साधुसंतांविण ।
रामदासी खूण सांगतसे ॥१०॥


अभंग  ॥८४॥
लागतसे मुळीं हा देहसंबंधु ।
करितसे खेदु अहंभावें ॥१॥
अहंभावें कदा नये पुरवला ।
भवभ्रम झाला दु:खराशी ॥२॥
दु:खराशी झाल्या देहाचे संबंधें ।
सर्व ज्ञानबोधें तुटतील ॥३॥
तुटती संबंध संतांचे राहाणीं ।
होईल झाडणी पंचभूतां ॥४॥
पंचभूतां लयो स्वरूपअन्वयो ।
तुटला संशयो संबंधाचा ॥५॥


अभंग  ॥८५॥
पाहातां दिसेना तेंचि बरें पाहें ।
तेथें रूप आहे राघवाचें ॥१॥
राघवाचें रूप जाणावें अरूप ।
शुद्ध तत्स्वरूप निराकार ॥२॥
निराकार राम देखतां विश्राम ।
दुरीं ठाके श्रम संसारींचा ॥३॥
संसारींचा श्रम राघवीं असेना ।
परि तो दिसेना राम डोळां ॥४॥
राम डोळां आहे अनुभवें पाहें ।
मीपण न साहे रामरूपीं ॥५॥
रामरूपीं नाम रूप दोनी नाहीं ।
तेथें मना राहीं सर्वकाळ ॥६॥
सर्वकाळ रामदर्शन होतसे ।
निर्गुणीं विश्वासे मन माझें ॥७॥
मन माझें रामस्वरूपीं संचरे ।
तेणें देहीं भरे विदेहता ॥८॥
विदेहता देहीं अलक्ष लक्षावें ।
नि:शब्दा बोलावें संतसंगें ॥९॥
संतसंगें घडे नि:संगाचा संग ।
राघवीं संयोग रामदासीं ॥१०॥


अभंग  ॥८६॥
ओळखतां ज्ञान ओळखी मोडली ।
भेटी हे जोडली आपणासी ॥१॥
आपणासी भेटी झाली बहुतां दिसा ।
तुटला वळसा मीपणाचा ॥२॥
मीपणाचा भाव भावें केला वाव ।
दास म्हणे देव प्रगटला ॥३॥


अभंग  ॥८७॥
प्रगटला देव जयाचे अंतरीं ।
तया नाहीं उरी मीपणाची ॥१॥
मीपणाची उरी तूंपणा भेटतां ।
आपणा पहातां वाव झाली ॥२॥
वाव झाली देव देखतां दाटणी ।
दास म्हणे वाणी वेडावली ॥३॥


अभंग  ॥८८॥
वेडावली वाणी देवचि बोलतां ।
देव बोलूं जातां अनिर्वाच्य ॥१॥
अनिर्वाच्य देव वाचा बोलूं गेली ।
जिव्हाहि चिरली भूधराची ॥२॥
भूधराची जिव्हा झालीसे कुंठित ।
दास म्हणे अंत अनंता़चा ॥३॥


अभंग  ॥८९॥
नित्य निरंतर सर्वांत्ते अंतरीं ।
तोचि निराकारी बोलिजेतो ॥१॥
बोलिजतो संत महंत जाणती ।
खुणेसि बाणती विवंचितां ॥२॥
विवंचितां रामनामचि होईजे ।
ये गोष्टीची कीजे विचारणा ॥३॥
विचारणा सार विचारें उद्धार ।
साधु योगेश्वर विचारेंची ॥४॥
विचारेचि जनी होतसे सार्थक ।
धन्य हा विवेक दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥९०॥
करीं घेतां नये टाकितां न जाये ।
तैसें रूप आहे राघवाचें ॥१॥
राघवाचें रूप पाहतां न दिसे ।
डोळां भरलेंसे सर्वकाळ ॥२॥
सर्वकाळ भेटी कदा नाहीं तुटी ।
रामदासीं लुटी स्वरूपाची ॥३॥


अभंग  ॥९१॥
तत्त्वमसि जाण अहंब्रह्म ऐसें ।
जाण हें विश्वासें महावाक्यें ॥१॥
अहं आत्मा ब्रह्म आणि ब्रह्मज्ञान ।
दास म्हणे वर्म वेदवाक्यें ॥२॥
वेदवाक्यें रामीं रामदास पाहे ।
मुख्य पद लाहे निवेदनें ॥३॥


अभंग  ॥९२॥
तूंचि ब्रह्म ऐसें वेदाचें वचन ।
तेचि संतजन दृढ करी ॥१॥
दृढ करी साधु तूंचि ब्रह्म ऐसें ।
तरि कां विश्वासेम धरिजेना ॥२॥
धरिजेना मनीं साधूचें वचन ।
विदेही अमान्य कां करावा ॥३॥
कां करावा निश्चय स्वयें स्वरूपाचा ।
तिहीं प्रतीतीचा ऐक्यभाव ॥४॥
ऐक्यभावें जरि संतांचे वचनीं ।
तरी समाधानीं पाविजेल ॥५॥
पाविजेल निजस्वरूप आपुलें ।
जरी विश्वासलें मन तेथें ॥६॥
मनाचा विश्राम तोचि आत्माराम ।
रामदासीं वर्म संतसंगें ॥७॥


अभंग  ॥९३॥
गीताभागवतीं उपदेश केला ।
अर्जुना दाविला देव कृष्णें ॥१॥
कृष्णें दाखविला देव तो वेगळा ।
बोलिजे आगळा सर्वांहूनी ॥२॥
सर्वाहून सार देव तो साचार ।
दास म्हणे पार कल्पनेचा ॥३॥


अभंग  ॥९४॥
कल्पनेचा देव कल्पनेची पूजा ।
तेथें कोणी दुजा आढळेना ॥१॥
आढळेना देव आढळेना भक्त ।
कल्पनेरहित काय आहे ॥२॥
आहे तैसें आहे कल्पना न साहे ।
दास म्हणे पाहे अनुभवें ॥३॥


अभंग  ॥९५॥
अनुभवें वाचें बोलिला न जाय ।
भाव नेंणें काय भावूं आतां ॥१॥
भावूं आतां देव कैसा निरावेव ।
म्हणोनियां भाव सगुणासी ॥२॥
सगुणासी भाव लवितां स्वभाव ।
पालटे अभाव दास म्हणे ॥३॥॥९६॥
भावनेचा देव भावार्थे भाविला ।
देवभक्त झाला भावनेचा ॥१॥
भावनेचा देव भावनेचा भक्त ।
भावनेनें मुक्त भावीतसे ॥२॥
भावीतसे मन त्याहूनि तें भिन्न ।
दास म्हणे ज्ञान ओळखावें ॥३॥


अभंग ॥९७॥
माझा स्वामी असे संकल्पापरता ।
शब्दीं काय आताम स्तुति करू ॥१॥
स्तुति करूं जातां अंतरला दुरी ।
मीतूंपणा उरी उरों नेदी ॥२॥
उरो नेदी उरी स्वामिसेवापण ।
एकाकीं आपण काय केलें ॥३॥
केलें संघटण कापुर अग्रीसी ।
जैसी भिन्नत्वासी उरी नाहीं ॥४॥
तैसा नाहीं उरी रामीं रामदासा ।
स्वयें होय ऐसा तोचि धन्य ॥५॥


अभंग  ॥९८॥
प्रवृत्ति सासुरें निवृत्ति माहेर ।
तेथें निरंतर मन माझें ॥१॥
माझें मनीं सदा माहेर तुटेना ।
सासुर सुटेना काय करूं ॥२॥
काय करूं मज लागला लौकिक ।
तेणें हा विवेक दुरी जाय ॥३॥
दुरी जाय हित मजचि देखतां ।
प्रयत्न करूं जातां होत नाहीं ॥४॥
होत नाहीं यत्न संतसंगाविण ।
रामदासीं खूण सांगतसे ॥५॥


अभंग ॥९९॥
अर्थाविणें पाठ कासया करावें ।
व्यर्थचि मरावें घोकोनियां ॥१॥
घोकोनियां काय वेगीं अर्थ पाहे ।
अर्थरूप राहें देखोनियां ॥२॥
देखोनियां अर्थ सार्थक करावें ।
रामदास भावें सांगतसे ॥३॥


अभंग  ॥१००॥
वस्तूचा निर्धार होय अपरंपार ।
साधनाचें सार निरूपण ॥१॥
निरूपणा ऐसें सार नाहीं दुजें ।
जेणें सर्व बीजें हाता येती ॥२॥
हाता येती बीजें ज्ञानाचीं सहजें ।
नि:संदेह भोजें नाचतसे ॥३॥
नाचतसे सदा विवेक अंतरीं ।
मायामोहपूरीं बूडों नेदी ॥४॥
वुडों नेदी कदाकाळीं निरूपण ।
रामदासीं खूण संतसंगें ॥५॥


अभंग   ॥१०१॥
निरूपण सार अद्बैत करावें ।
तेणें उद्धरावें निश्चयेंसी ॥१॥
निश्चयेंसि पाहे आपुली वोळखी ।
तोचि एक सुखी जनांमध्यें ॥२॥
जनांमध्यें सुखी परत्रसाधनें ।
संसारबंधनें तया नाहीं ॥३॥
तया नाहीं देहबुद्धीची अहंता ।
देहीं विदेहता वस्तुरूप ॥४॥
वस्तुरूप होय मीपण त्यागितां ।
शाश्वत भावितां दास मुक्त ॥५॥


अभंग  ॥१०२॥
निरूपणें भक्ति निरूपणें ज्ञान ।
अनुताप पूर्ण निरूपणें ॥१॥
निरूपणें योग योगाचा संयोग ।
निरूपणें त्याग घडतसे ॥२॥
घडतसे सर्व कांहीं निरूपणें ।
बाणती लक्षणें सज्जनांचीं ॥३॥
सज्जनांचीं मतें सज्जन जाणती ।
येर ते नेणती जाणपणें ॥४॥
जाणत्या नेणत्या होय समाधान ।
करावें मनन दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥१०३॥
पूर्ण समाधान होय निरूपणें ।
परी जाणपणें बुडविलें ॥१॥
बुडविलें देहातीत समाधान ।
देह अभिमान वाढविला ॥२॥
वाढविला तर्क वायां निरूपणीं ।
जाणावें पापिणी काय केलें ॥३॥
केलें काय ऐसें जाणत जाणतां ।
स्वरूपीं अहंता कामा नये ॥४॥
कामा नये देहबुद्धीचें जाणणें ।
दास निरूपणें सावधान ॥५॥


अभंग  ॥१०४॥
गीतेचें लक्षण हेंचि हें प्रमाण ।
श्रवण मनन सर्वकाळ ॥१॥
सर्वकाळ सारासारविचारणा ।
वस्तूची चाळणा निरंतर ॥२॥
निरंतर ध्यास लागला अंतरीं ।
धारणाहि धरी निर्गुणाची ॥३॥
निर्गुणासंगतीं निर्गुण होईजे ।
प्रत्त्यावृत्ति कीजे निरूपणें ॥४॥
निरूपणें होय अलभ्याचा लाभ ।
साधन सुलभ दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥१०५॥
निरूपणाऐसें नाहीं समाधान ।
आणिक साधन आढळेना ॥१॥
भक्ति ज्ञान घडे वैराग्य आतुडे ।
भावार्थ सांपडे निरूपणें ॥२॥
शांति दया क्षमा नैराश्यता मनीं ।
आतुडे जन्मनी तेणें गुणें ॥३॥
रिद्धि सिद्धि दासी होती निरूपणें ।
श्रवण मननें निजध्यासे ॥४॥
भ्रांतीचा संदेह तुटे एकसरां ।
दास म्हणे करा निरूपण ॥५॥


अभंग  ॥१०६॥
निरूपणें निज लाभे सर्व काहीं ।
दुजें ऐसें नाहीं पाहीं जातां ॥१॥
साराचेंहि सार मना अगोचर ।
तें लाभे साचार निरूपणें ॥२॥
दाखवितां नये बोलिलें न जाय ।
त्याची कळे सोय निरूपणें ॥३॥
मनासी न कळे मीपणा नाढळे ।
तें गुज निवळे निरूपणें ॥४॥
व्युत्पत्तीचें कोडें तर्काचें सांकडें ।
तें जोडे रोकडे निरूपणें ॥५॥
मन हें चंचळ तें होय निश्चळ ।
साधनाचें फळ दास म्हणे ॥६॥


अभंग  ॥१०७॥
केलेचि करावें पुन्हां निरूपण ।
तरी बाणे खूण कांहींएक ॥१॥
कांहीं-एक काळ निरूपणें गेला ।
तोचि एक भला समाधानी ॥२॥
समाधानी भला निरूपणीं राहे ।
पाहिलेचि पाहे निरूपणें ॥३॥
निरूपणें पाहे श्रवण मनन ।
होय समाधान निजध्यास ॥४॥
निजध्यास निजवस्तूचा धरावा ।
संसार तरावा दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥१०८॥
एकदा जेवितां नव्हे समाधान ।
प्रतिदिनीं अन्न खाणें लागे ॥१॥
तैसें निरूपण केलेंचि करावें ।
परा न करावे उदासीन ॥२॥
प्रतिदिनीं अन्न प्रत्यहीं जीवन ।
देहसंरक्षण करावया ॥३॥
प्रत्यहीं संसारीं बोलावें लागतें ।
कांहींकेलिया तें सुटेना कीं ॥४॥
प्रतिदिनीं देह पाळावा लागतो ।
शुद्ध करावा तो रात्रंदिवस ॥५॥
प्रत्यहीं देहाने भोगिलें भोगावें ।
त्यागिलें त्यागावें दास म्हणे ॥६॥


अभंग  ॥१०९॥
आपुल्या भोजनीं पोट हें भरेना ।
लागे उपार्जना दुसर्‍याची ॥१॥
दुसर्‍याची सेवा करितां वेतन ।
पविजे तें अन्न लोकांमध्यें ॥२॥
लोकांमध्ये उपासितां देह दारा ।
मागावा मुशारा कोणापाशीं ॥३॥
कोणापाशीं कोणें काय हे सांगावें ।
कैसोंनि मागावे वेतनासी ॥४॥
वेतनासी जनीं तरीच पाविजे ।
जरी सेवा कीजे स्वामीयाची ॥५॥
स्वामीयाची सेवा करिताम उत्पन्न ।
स्वामी तो प्रसन्न होत असे ॥६॥
हेत असे देव संतुष्ट भजतां ।
मुक्ति सायुज्यता तेणें लाभे ॥७॥
लाभे नवविधा तेणें चतुर्विधा ।
पुसावें सुबद्धा सज्जनासी ॥८॥
सज्जनासी पूजा देहासी भजतां ।
भार भगवंता कैसा पडे ॥९॥
कैसा भार पडे देहाचे भजनें ।
भक्तीचेनि गुणें देव पावे ॥१०॥
देव पावतसे भजतां देवासी ।
सेवितां देहासी देव कैंचा ॥११॥
देव कैंचा देव सेविल्यावांचुनी ।
तत्त्वविवंचनीं दास म्हणे ॥१२॥


अभंग  ॥११०॥
शौच केलें तेणें सुचिर्भुत झाला ।
जळस्नानें गेला मळ त्याचा ॥१॥
मळ त्यागें झालें शरीर निर्मळ ।
अंतरींचा मळ कैसा जातो ॥२॥
कैसा जातो कामक्तोधलोभ-दंभ ।
नांदती स्वयंभ अंतर्यामीं ॥३॥
अंतयीमीं आधीं होईजे निर्भळ ।
तेणें तुटे मूळ संसाराचें ॥४॥
संसाराचें मूळ सूक्ष्मीं गुंतलें ॥
मनहि गुंतलें विभ्रमासी ॥५॥
विभ्रमासी बरें शोधोनि वहावें ।
अंतरीं रहावें निष्ठावंत ॥६॥
निष्ठावंत ज्ञान पूर्ण समाधान ।
मग संध्या स्नान सफळित ॥७॥
सफळित संध्या संदेह नसतां ।
नि:संदेह होतां समाधान ॥८॥
समाधान नाहीं स्नान संध्या कांहीं ।
लैलिककाचे ठांई लोकलाज ॥९॥
लोकलाजे सर्व कौकिकचि केला ।
देव दुरावला वरपणें ॥१०॥
वरपणें देव कदा सांपडेना ।
निष्ठेचा घडेना भक्तिभाव ॥११॥
भक्ति ते भावेंचि भाव तो जायांचा ।
कर्मलैकिकाचा खटाटोपें ॥१२॥
खटाटोपें देव कदा पाविजेना ।
निश्चय घडेना शाश्वताचा ॥१३॥
शाश्वताचा शोध अंतरीं असतां ।
सर्व कांहीं पहातां निरर्थक ॥१४॥
निरर्थक तीर्थे निरर्थक व्रतें ।
दास म्हणे जेथें ज्ञान नाहीं ॥१५॥


अभंग  ॥१११॥
अनंताचा अंत पहावया गेलों ।
तेणें विसरलों आपणासी ॥१॥
आपणा आपण पहातां दिसेना ।
रूप गवसेना दोहींकडे ॥२॥
दोहींकडे देव आपणचि आहे ।
संग हा न साहे माझा मज ॥३॥
माझा मज भार जाहला बहुत ।
देखत देखत कळों आला ॥४॥
कळों आला भार पाहिला विचार ।
पुढें सारासारविचारणा ॥५॥
विचारणा झाली रामीं रामदासीं ।
सर्वहि संगासी मुक्त केली ॥६॥
मुक्त केली मोक्षा मुक्तीची उपेक्षा ।
तुटली अपेक्षा कोणी एक ॥७॥


अभंग  ॥११२॥
पहिलें प्रथम मूळीं परब्रह्म ।
व्यापक सूक्ष्म जेथें तेथें ॥१॥
जेथें तेथें वस्तु आहे निरकार ।
शुद्ध व्योमाकार प्रगटित ॥२॥
प्रगटित असे दिसेना ना भासे ।
विचार विलसें ज्ञानियासी ॥३॥
ज्ञानियासी ज्ञान कळे निरंजन ।
आणि जन वन सारिखेंचि ॥४॥
सारिखेचि आहे देव ओळखतां ।
जेथें तेथें जातां देव भासे ॥५॥
देव भासे मनीं नित्य निरंतर ।
बाह्म अभ्यंतर व्यापुनियां ॥६॥
व्यापुनियां आहे सर्वांचे अंतरीम ।
अनुभवें हरी ओळखावा ॥७॥
ओळखावा परी ओळखतां नये ।
म्हणोनि उपाये साधुसंग ॥८॥
साधुसंग धरी श्रवण विवरी ।
सारासार करी विचारणा ॥९॥
विचारणा करी देवा निर्गुणाची ।
आणि सगुणाची उपासना ॥१०॥
उपासना कर्म हो आधीं पाळावें ।
मग सांभाळावें ब्रह्म-ज्ञान ॥११॥
ब्रह्मज्ञान नसे ते जन आंधळे ।
सन्मानीं पांगुळे क्रियाभ्रष्ट ॥१२॥
क्रियाभ्रष्ट कर्मउपासनेविण ।
नेणतां निर्गुण सर्व मिथ्या ॥१३॥
सर्व मिथ्या जंव ब्रह्मज्ञान नाहीं ।
क्रियाकर्म कांहीं सोडविना ॥१४॥
सोडविना कर्म या कर्मापासांनी ।
भगवंतावांत्तोनी तारांबळी ॥१५॥
तारांबळी झाली देवास नेणतां ।
कमी गुंडाळितां देव कैंचा ॥१६॥
देव कैंचा भेटे कर्म उरे पुढें ।
संशयचि वाढे सर्वकाळ ॥१७॥
सर्वकाळ गेला संदेहीं पडतां ।
नित्य चोखाळितां कळिवर ॥१८॥
कळिवर काय नित्य धूत गेला ।
लवितो कोणाला उप- ॥१९॥
उपकार कैंचा सेवक देहाचा ।
आणि कुटुंबाचा भारदाही ॥२०॥
भारवाही ला देवासी चुकला ।
लैकिकचि केला जन्मवरी ॥२१॥
जन्मवरी केलें अंतीं व्यर्थ गेलें ।
कासाविस झालें वायाविण ॥२२॥
वायाविण काळ गेला कीं निर्फळ ।
कर्म हें सबळ सुटेना कीं ॥२३॥
सुटेना कीं कर्म कोण सोडविता ।
सोडूनि अनंता कमै केलीं ॥२४॥
कमे केलीं देह चालतां निर्भळ ।
खंगतां ओंगळ देह झाला ॥२५॥
देह झाला क्षीण सदा हगवण ।
मृत्तिकेचा शीण कोण करी ॥२६॥
कोण करी तेव्हां कर्माचें पाळण ।
झाली भण-भण शरीराची ॥२७॥
शरीराची जेव्हां झाली भणभण ।
तेव्हां नारायण भजों पाहे ॥२८॥
भजो पाहे तेव्हां नारायण कैचा ।
गेला अभाग्याचा व्यर्थ काळ ॥२९॥
व्यर्थ काळ गेला देवा न भजतां ।
देह चोखाळितां चोखाळेना ॥३०॥
चोखाळिला देहो वाढला संदेहो ।
अंतकाळीं पाहो दैन्यवाणा ॥३१॥
दैन्यवाणा पाहे देवा न भजतां ।
पाहा तुला आतां कोण सोडी ॥३२॥
कोण सोडी देव धुंडिल्या वांचुनी ।
म्हणोनि भजनीं सावधान ॥३३॥
साव-धानपणें देवासि शोधावें ।
तेणेंचि साधावे परलोक ॥३४॥
परलोक साधे संतांचे संगतीं ।
चुके अधोगति गर्भवास ॥३५॥
गर्भवास चुके ज्ञान अभ्यासितां ।
वस्तूसि पाहतां वस्तुरूप ॥३६॥
वस्तुरूप होणें विवेकाच्या गुणें ।
नित्य निरूपणें सारासार ॥३७॥
सारासारें घडे असाराचा त्याग ।
योगिया नि:संग सहजचि ॥३८॥
सहजचि कर्मापासूनि सुटला ।
बोधें विनटला परब्रह्मीं ॥३९॥
परब्रह्मीं हेतु लागतां अहेतु ।
देहे देहातीतु रामदास ॥४०॥


अभंग  ॥११३॥
कर्मै चित्तशुद्धि होऊ नियां गेली ।
मग उपासली उपासना ॥१॥
उपासना-मिसें देव ठांई पडे ।
संदेहचि उडे एकसरा ॥२॥
एकसरा पंथें सांपडे सुगम ।
जैसे विहंगम फळावरी ॥३॥
फळावरी झड जातां अनायासीं ।
निर्फळ असोनी वायावीण ॥४॥
वाया-वीण शीण कासया करावा ।
निर्फळ जाणावा संसार हा ॥५॥
संसाराचा सोस कर्मीं निज-ध्यास ।
तेणें जगदीश अंतरला ॥६॥
अंतरला देव अंतरीं न द्यावा ।
विवेक पाहावा सज्जनांचा ॥७॥
सज्जनाचा योग सर्वांचा वियोग ।
आणि त्याचा त्याग चमत्कारें ॥८॥
चमत्कारें त्याग तत्त्वविवरणें ।
शीघ्रचि पावणें मोक्षपदीं ॥९॥
मोक्षपदीं ज्ञान रामदासीं झालें ।
बंधन तुटलें संशयाचें ॥१०॥


अभंग  ॥११४॥
संशयाचें कर्म संशयीं पडिलें ।
तें कोणें सोडिलें ज्ञानेंविण ॥१॥
ज्ञानेंविण देव कैंचा ठायीं पडे ।
अज्ञानें बापुडें गुंडाळलें ॥२॥
गुंडाळलें सर्व लैकिकाकरितां ।
लैकिक पाहतां उद्धरेना ॥३॥
उद्धरेना लोक हे कोणी कोणासी ।
व्यर्थचि देवासी अंतरावें ॥४॥
अंतरावें व्हावें बहुत आधींन ।
बहुतांचें मन राखवेना ॥५॥
राखवेना मन बहुतां जनांचें ।
आणि सज्जनांचें वर्म चुके ॥६॥
वर्म चुके कर्म आडवेंचि आलें ।
नाहीं ओळखिलें आत्म-यासी ॥७॥
आत्मयासी जाणे तोचि एक भला ।
संसारीं सुटला विवेकानें ॥८॥
विवेकानें लाभ पावावा आपुला ।
लैकिकें देवाला सोडूं नये ॥९॥
सोडूं नये ज्ञान सगुणीं भजणें ।
भक्ति निवेदनें ओळखावी ॥१०॥
ओळखावी भक्ति सायुज्यता मुक्ति ।
येणें होय गति दास म्हणे ॥११॥


अभंग  ॥११५॥
अस्थीचा विटाळ होतां स्नान केलें ।
चुडे दांतवलें कासयासी ॥१॥
आच मन करावें शूद्राच्या विटाळे ।
हाटाचे चौढाळे कोण जाणे ॥२॥
नदीचे प्रवाहीं आंत पाहों नये ।
स्नान संध्या होये अग्रोदकीं ॥३॥
ओले चर्मीं सिद्ध होत आहे हिंग ।
स्वयंपाकी सांग सेविताती ॥४॥
रामदास म्हणे हें कोणी न पाहे ।
देह मूळीं आहे विटाळाचा ॥५॥


अभंग  ॥११६॥
विटाळाचा देह विटाळें वाढला ।
तुवां शुद्ध केला कोणेपरी ॥१॥
पातकाचा देह पातकें वाढला ।
विचारतां आला प्रत्ययासी ॥२॥
अस्थीचा पंजर चर्मै गुंडाळिला ।
विष्ठेनें भरला मळमूत्रें ॥३॥
जंत किडे ओक आंतडीं कांतडीं ।
बाह्यात्कारीं वेडीं भादरलीं ॥४॥
भादरले केश मागुती निघती ।
पुन्हां भादरती लागवेगें ॥५॥
भादरली डोई घेत प्रायश्चित ।
अपानीं घासित मृत्तिकेसी ॥६॥
भादरिली डोई पळाला विटाळ ।
मागुता चांडाळ भादरितो ॥७॥
बरा शुद्ध केला पुन्हां पापी झाला ।
पुन्हां भादरिला सावकाश ॥८॥
सावकाश कांहीं विचार पाहावा ।
जेणें करीं देवा पाविजे तो ॥९॥
पाविजेतो देवा भक्तिनिवेदनें ।
शुद्ध ब्रह्मज्ञानें रामदासीं ॥१०॥


अभंग   ॥११७॥
पोट भरावया मांडिला उपास ।
झाला कासाविस रामाविणें ॥१॥
राजा पहावया प्रजा धुंडाळितो ।
कासाविस होतो वाउगाची ॥२॥
द्रव्य साधावया निर्द्रव्याचा संग ।
तेथें कैंचें मग द्रव्य मिळे ॥३॥
ब्रह्म साधावया कर्मामागें गेला ।
तंव कर्मै केला कासाविस ॥४॥
सुटका व्हावया बंधनचि केलें ।
तेणें ते सुटले केवीं घडे ॥५॥
केवीं घडे दृढरोगें आरोग्यता ।
कुपथ्यानें व्यथा वाढतसे ॥६॥
एका व्यथा एकीं औषध घेतलें ।
दास म्हणे झालें तयापरी ॥७॥


अभंग  ॥११८॥
चित्त आहे कैसें मळिण तें कैसें ।
शुद्ध होतें कैसें विचारावें ॥१॥
वैद्य ओळखीना रोगहि कळेना ।
औषध मिळेना प्रचितीचे ॥२॥
अनुमानें देव अनुमानें भक्त ।
अनुमानें मुक्त अनुमानी ॥३॥
अनुमानें केलें अनुमाने कल्पिलें ।
निर्फळ जाहलें सर्व कांहीं ॥४॥
सर्व कांहीं बरें प्रचीति आलिया ।
दास म्हणे वायां अप्रचीति ॥५॥


अभंग  ॥११९॥
प्रचीतीचा देव प्रचीतीचा भाव ।
करावा उपाव सप्रचीत ॥१॥
प्रचीतीचा वैद्य प्रचीतीची मात्रा ।
प्रचीतीच्या मंत्रा पाठ कीजे ॥२॥
प्रचीतीनें कोणी एक ते पहावेम ।
जन ओळखावे प्रचीतीनें ॥३॥
प्रचीतीनें इष्ट प्रचीतीनें मित्र ।
प्रचीतीनें सूत्र कोणीएक ॥४॥
कोणी एक काय प्रचीति उपाय ।
दास म्हणे सोय प्रचीतीची ॥५॥


अभंग   ॥१२०॥
प्रचीतीवेगळें मिथ्या सर्व कांहीं ।
निर्फलचि पाही अप्रचीती ॥१॥
अप्रचीति जेथ फळ कैंचें तेथ ।
निर्फळचि व्यर्थ कासाविस ॥२॥
प्रचीतीची रीज जया अंगीं नसे ।
व्यर्थ हेंचि पिसें लोभाविणें ॥३॥
लोभाविणें लाभ मानिला सुलभ ।
लाभ नाहीं क्षोभ प्रगटला ॥४॥
प्रगटला लोभ केलें निरर्थक ।
प्रचीति सार्थक दास म्हणे ॥५॥


अभंग  ॥१२१॥
होते आठवण तेंचि अंत:करण ।
आतां सावधान मन ऐका ॥१॥
संकल्प विकल्प होय नव्हे वाटे ।
तेंचि मन खोटें काल्पनिक ॥२॥
होय नव्हे ऐसा अनुमान झाला ।
निश्चयचि केला तेचि बुद्धि ॥३॥
निश्चयचि केला तयाचेम चिंतन ।
तेंचि चित्त जाण निश्चयेंसी ॥४॥
अहंकारासवे देह चालताहे ।
दास म्हणे पाहे अनुभवें ॥५॥


अभंग  ॥१२२॥
करावें तें काय तेणें होतें काय ।
अनुमाने काय प्रत्यय होतो ॥१॥
प्रत्यय होतो काय ऐसेंहि कळेना ।
नये अनुमाना सर्व कांहीं ॥२॥
सर्व कांहीं एका आत्मज्ञानाविण ।
दिसताहे शीण वाउगाची ॥३॥
वाउगाचि लाभ प्रचीति केवळा ।
उगाचि आगळा दिसताहे ॥४॥
दिसताहे फळ लोकचि म्हणती ।
आपुले प्रचीति कांहीं नाहीं ॥५॥
कांहीं नाहीं पूर्वजन्मींचें स्मरण होय विस्मरण ।
सर्व कांहीं ॥६॥
सर्व कांहीं मागें जाहाले कळेना ।
म्हणोनि फळेना केलें कर्म ॥७॥
केलें कर्म केणें कोणासीं पुसावें ।
अनुमानें व्हावें कासाविस ॥८॥
कासाविस झाला कर्मै जाजावला ।
व्यर्थ श्रम गेला अंतकाळीं ॥९॥
अंतकाळीं गेला सर्व सोडूनियां ।
भ्रमला प्राणिया विस्मरणें ॥१०॥
विस्मरण जाय सदुरु-करितां ।
दास म्हणे आतां गुरु करी ॥११॥


अभंग  ॥१२३॥
प्रत्ययाचें ज्ञान तेंचि तें प्रमाण ।
येर अप्रमाण सर्व कांहीं ॥१॥
सर्व कांहीं धर्म आणि कर्माकर्म ।
चुकलिया वर्म व्यर्थ जाती ॥२॥
व्यर्थ जाती जन्म ज्ञाना-वांचूनियां ।
केले कष्ट वायां निरर्थक ॥३॥
निरर्थक जन्म पशूचिया परी ।
जंव ते अंतरीं ज्ञान नव्हे ॥४॥
ज्ञान नव्हे सोपे तें आधीं पहावें ।
शा श्वत शोधावे दास म्हणे ॥५॥


अभंग ॥१२४॥
आईआधीं पुरुष हेंचि विचारावें ।
आपुलें करावें समाधान ॥१॥
समाधान होय देव देखिलिया ।
देवाविण वायां शिणों न ये ॥२॥
शिणो नये देव असोनि सर्वत्र ।
हें तों देहयंत्रं नाशिवंत ॥३॥
नाशिवंत देहो ना हीं त्या संदेहो ।
दास म्हणे पाहा हो परब्रह्म ॥४॥


अभंग ॥१२५॥
ज्याचें नाम घेसि तोचि तूं आहेसी ।
पाहे आपणासि शोधोनियां ॥१॥
शोधितां शोधितां मीपणाचि नाहीं ।
मीपणाचें पाळी मूळ बरें ॥२॥
मूळ बरें पाही न रानीं या राहा ।
आहा तैसे आहा सर्वगत ॥३॥
सर्वगत आत्मा तोचि तूं परमात्मा ।
दास अहमात्मा सांगतसे ॥४॥


अभंग ॥१२६॥
सर्वांहोनि थोर देव निराकार ।
मग हा विस्तार विस्तारला ॥१॥
विस्तारिला जन त्वां नानापरीचा ।
निर्गुण पूर्वींचा देव आहे ॥२॥
देव आहे सत्य येर हें असत्य ।
जाणितल्या नित्य विचारणा ॥३॥
विचारणा करी धुंडी नानापरी ।
दास म्हणे तरी तरशील ॥४॥


अभंग ॥१२७॥
पतित म्हणिजे वेगळा पडिला ।
पावन तो झाला एकरूप ॥१॥
एकरूप देव आरोप ठांईचा ।
तेथें दुजा कैंचा कोण आहे ॥२॥
कोण आहे दुजा स्वरूपीं पहातां ।
विचारें पाहतां सुख आहे ॥३॥
सुख आहे मूळ आपुलें शोधितां ।
मनासी बोधितां रामदास ॥४॥


अभंग ॥१२८॥
तुकाई यमाई नमूं चंडाबाई ।
जाखाई जोखाई सटवाई ते ॥१॥
सटवाई बगदंबा आदिशक्ति अंबा ।
तुम्ही त्या स्वयंभा दाखवावे ॥२॥
दाखवावें तुम्हीं सर्व पैलीकडे ।
देखतांचि घडे मोक्षपद ॥३॥
मोक्षपद घडे मोक्षासी पाहतां ।
तद्रूपचि होतां दास म्हणे ॥४॥


अभंग ॥१२९॥
नमूं रामकृष्णा आदिनारायणा ।
तुम्हीं त्या निर्गुणा दाखवावें ॥१॥
दाखवावें निज स्वरूप आपुलें ।
दिसेनासें झालें काय करूं ॥२॥
काय करूं आतां देवा नाहरी ।
पुढारी माझारी पांडुरंगा ॥३॥
पांडुरंगा देवा अगा महादेवा ।
तुम्हीं मज द्यावा ठाव ब्रह्मीं ॥४॥
ब्रह्मीं ब्रह्मरूप तें मज करावे ।
रामदास भावें प्रार्थितसे ॥५॥


अभंग ॥१३०॥
सूर्यनारायणा देवा नमस्कार ।
तुवां निराकर दाखवावें ॥१॥
दाखवून द्यावें निज जीववावें ।
चंद्रा तुज भावें प्रार्थि तसे ॥२॥
प्रार्थितसे मही आणि अंतरिक्षा ।
आम्हां त्या अलक्षा लक्षवावे ॥३॥
लक्षवावें मज आपोनारायणें ।
ब्रह्मप्राप्ति जाणें तें करावें ॥४॥
करावें सनाथ आजि प्रभंजनें ।
नक्षत्रें वरुणें दास म्हणे ॥५॥


अभंग॥१३१॥
तुम्हीं सर्व देवीं मिळोनि पावावें ।
मज वेगीं न्यावें परब्रह्मीं ॥१॥
परब्रह्मीं न्यावें संत अनुभवें ।
मज या वैभवें चाड नाहीं ॥२॥
चाड नाहीं एका निर्गुणावांचुनी ।
माझे ध्यानीं मनी निरंजन ॥३॥
निरंजन माझा मज भेटवावा ।
तेणें होय जीवा समाधान ॥४॥
समाधान माझें करा गा सर्वहो ।
तुम्हांसि देह हो विसरेना ॥५॥
विसरेना देहो चालतो तंववरी ।
बाह्य अभ्यंतरीं दास म्हणे ॥६॥


अभंग ॥१३२॥
तूं काय झालासी अगा निरंजना ।
आम्हां भक्तजनां सांभाळावें ॥१॥
सांभा-ळावें सदा सबाह्याभ्यंतरीं ।
आम्हां क्षणभरी सोडूं नको ॥२॥
सोडूं नको वायां गुप्त कां झालासी ।
देवा देखलासी संतसंगें ॥३॥
संतसंगें गुप्त होऊनि पाहिला ।
संतत्याग झाला दर्शनेंची ॥४॥
दर्शन जाहलें तेंचि तें जाणलें ।
नसोनि असलें कल्पकोडी ॥५॥
कल्पकोडी जोडी झाली निर्गुणाची ।
दास म्हणे कैंची देहबुद्धी ॥६॥


अभंग ॥१३३॥
देवेंविण आतां मज कंठवेना ।
कृपाळु तो नाना ठाईं वसे ॥१॥
नाना ठांई देव आहे जेथें तेथें ।
तयाविण रितें स्थळ नाहीं ॥२॥
स्थळ नाहीं रितें ब्रह्म तें पुरतें ।
जेथें जावें तेथें मागें पुढें ॥३॥
मागें पुढें ब्रह्म सर्वत्र व्यापक ।
दास तो नि:शंक तेणें गुणें ॥४॥


अभंग ॥१३४॥
देव निर्विकार त्या नाहीं आकार ।
तरी हा विस्तार कोणें केला ॥१॥
कोणें केला ऐसा शोधूनि पाहावें ।
पाहोनि राहावें समाधान ॥२॥
समाधान घडे विचारपाहतां ।
बुजोनि राहतां सर्वकाळ ॥३॥
सर्वकाळ पूर्वपक्ष हो सिद्धांत ।
वेदांत धादांत संप्रचीत ॥४॥
सप्रचीती तरी विकारीं विकार ।
देव निर्विकार जैसा तैसा ॥५॥
जैसा तैसा आहे विवेक पहावा ।
पडों नये गोंवा दास म्हणे ॥६॥


अभंग ॥१३५॥
नमूं वेदमाता जे कां सर्व सत्ता ।
ब्रह्मज्ञान आतां बोलूं कांहीं ॥१॥
बोलूं कांहीं ब्रह्म जेणें तुटे भ्रम ।
आणि सुखें वर्म ठायीं पडे ॥२॥
ठायीं पडे देव आणि भावा-भाव ।
प्रकृति स्वभाव सर्व कांहीं ॥३॥
सर्व कांहीं कळे संदेह मावळे ।
अंतर निवळे साधकाचें ॥४॥
साधकाचें हित होय निरूपणें ।
श्रवण मननें दास म्हणे ॥५॥


अभंग ॥१३६॥
श्रवण करावें जें तें ब्रह्मज्ञान ।
ज्ञानेंविण शीण कामा नये ॥१॥
कामा  नये येथें सारासार नाहीं ।
कथेच्या प्रवाहीं कोण साध्य ॥२॥
साध्य तेंचि घ्यावें येर तें सोडावें ।
विचाराचे नांवें जेथें शून्य ॥३॥
जेथें शून्य ज्ञान सर्व अनुमान ।
अनुमानें धन्य होईजेल ॥४॥
होइजेना धन्य निरंजनंविण ।
रामदास खूण सांगतसे ॥५॥


अभंग ॥१३७॥
राम कैसा आहे हें आधीं पाहावें ।
मग सुखें नांवें दास्य करूं ॥१॥
दास्य करूं जन देव ओळखेन ।
देवासि चुकोन दास्प कैसें ॥२॥
दास्य कैसें घडे देवासी नेणतां ।
वाउगें श्रमतां शीण उरे ॥३॥
शीण उरे साध्य तें कांहीं साधेना ।
अंतरीं वसेना समाधान ॥४॥
समाधान देव पाहतां घडेल ।
येर विघडेल रामदास ॥५॥


अभंग ॥१३८॥
शोधूनि पाहावें देवऋषिमूळ ।
निर्माण सकळ कोठूनियां ॥१॥
कोठूनियां झाली सर्वहि उपाधि ।
वरी घ्यावी शुद्धि शाश्वताची ॥२॥
शाश्वताची शुद्धि घेतां दृढबुद्धि ।
होवोनि समाधी हाता चढे ॥३॥
हाता चढे सर्व वेदशास्राबीज ।
मुख्य गुह्य गूज योगियांचें ॥४॥
योगियांचें गूज सहजीम सहज ।
दास म्हणे निज ठायीं पडे ॥५॥


अभंग ॥१३९॥
देव तो कळेना राहिला चुकोनी ।
संसारा येऊनि काय केलें ॥१॥
काय केलें बापा आपुलें अनहित ।
देखत देखत चुकलासी ॥२॥
चुकलासी धनी या भूमंडळींचा ।
सर्वहि देवांचा मुख्य देव ॥३॥
मुख्य देव आहे तो तुज कळेना ।
शाहाणा आपणा म्हणविशी ॥४॥
म्हणविशी परी दसर्‍याचे सोनें ।
उणे कोटिगुणें दास म्हणे ॥५॥


अभंग ॥१४०॥
शाहणें दिसताम ब्रह्मज्ञानेंविण ।
संसाराचा शीण करोनियां ॥१॥
करोनियां संसार रांत्रदिवस धंदा ।
कैसे हो गोविंदा चुकलेती ॥२॥
चुकलेति वायां तुम्हीं कां बंधे हो ।
अंतरीं संदेहो जन्मवरी ॥३॥
जन्मवरी ओझें वाहिल वाउगें ।
व्यर्थ कामरंगें रंगोनिया ॥४॥
रंगोनिया कामीं अंतरावें रामीं ।
दास म्हणे ऊर्मि कामा नये ॥५॥


अभंग ॥१४१॥
नवस पुरवी तो देव पूजिला ।
लोभालागीं झाला कासावीस ॥१॥
कासा-वीस झाला प्रपंचाकरितां ।
सर्वकाळ चिंता प्रपंचाची ॥१॥
प्रपंचाची चिंता करितचि मेला ।
तो काय देवाला उपकार ॥३॥
उपकार केला पूर्वजांलागुनी ।
ते गेले मरोनि पहातसे ॥४॥
पाहतसे पुढे आपणचि मेला ।
देवासी चुकला दास म्हणे ॥५॥


अभंग॥१४२॥
लोभ नवसांचा तो देव बद्धाचा ।
आणि मुमुक्षाचा गुरु देव ॥१॥
गुरु देव जाण तया मुमुक्षाचा ।
देव साधकाचा निरंजन ॥२॥
निरंजन देव साधकाचे मनीं ।
सिद्ध समाधानी देवरूप ॥३॥
देवरूप झाला संदेह तुटला ।
तोचि एक भला भूमंडळीं ॥४॥
भूमंडळीं रामदास धन्य आहे ।
अनन्यता पाहे शोधोनियां ॥५॥


अभंग ॥१४३॥
तुजला तूं थोर मजला मी थोर ।
तूं थोर मी थोर कामा नये ॥१॥
कामा नये कोणालागीं मीतूंपण ।
पाहा थोरपण ईश्वराचें ॥२॥
ईश्वराचें रूप पाहतां निवावे ।
मीतूंपण जावें सांडूनियां ॥३॥
सांडूनियां जाय ते काय आपणा ।
शाश्वताच्या खुणा पाहे बापा ॥४॥
पाहे बापा देव कोण निरावेव ।
दास म्हणे भाव तेथें ठेवी ॥५॥


अभंग ॥१४४॥
भाविला न जाय तेथें भाव ठेवी ।
परि हो गोसावी सांगतसों ॥१॥
सांग-तसों परि नये अनुमाना ।
हें कांहीं कळेना आम्हांलागीम ॥२॥
आम्हांलागीं कळे तें कांहीं सांगा हो ।
गोसावी आहां ही भले तुम्ही ॥३॥
भले तुम्ही आहां मज उमजावें ।
उकलुनी द्यावें सर्व कांहीं ॥४॥
सर्व कांहीं कळे सदुरुकरितां ।
दास म्हणे आतां गुरु करी ॥५॥


अभंग ॥१४५॥
गुरुविण प्राणी त्या होय जाचणी ।
सत्य माझी वाणी मिथ्या नव्हे ॥१॥
मिथ्या नव्हे सत्य सांगतों तुम्हांला ।
अंतीम यमघाला चुकेना की ॥२॥
चुकेना कीं यम यातना बा जनब ।
वेगीं निरंजना ठायीं पाडा ॥३॥
ठायीं पाडा वेगीं देव निरंजन ।
लावा तनमन सद्रुरूसी ॥४॥
सद्रुरू सी नाहीं जयाला ओळखी ।
तया झोकाझोकी यातनेची ॥५॥
यातनेचि चिंता तुटे एकसरी ।
वेगीं गुरु करी दास म्हणे ॥६॥


अभंग॥१४६॥
ज्याचेनि जितोसि त्यासि चुकलासी ।
व्यर्थचि झालासी भूमिभार ॥१॥
भूमिभार जिणें तुझें गुरुविणें ।
वचनें प्रमाणें जाण बापा ॥२॥
जाणे तूं हें गति गुरुविण नाहीं ।
पडसी प्रवाहीं मायाजाळीं ॥३॥
मायाजाळीं वांया गुंतलासी मूढा ।
जन्मवरी ओढा तडातोडी ॥४॥
कांहीं तडातोडी कांहीं देव जोडी ।
आयुष्याची घडी ऐसी वेची ॥५॥
ऐसी वेंची बापा आपुली वयसा ।
दास म्हणे ऐशा काळीं घाली ॥६॥


अभंग ॥१४७॥
सर्व काळ गेला संसार करितां ।
तरी सार्थकता कैसी होय ॥१॥
कैसी घडे मुक्ति कैसी घडे भक्ति ।
म्हणोनिया चित्तीं गोष्टि धरी ॥२॥
गोष्टी धरी मनीं स्वहिता-लागून ।
बैसे देवध्यानीं क्षणएक ॥३॥
क्षण एक गेला सुखाचा बोलतां ।
तेणें कांहीं चिंता वोसरेल ॥४॥
वोसरेल चिंता संसाराची माया ।
भजे रामराया दास म्हणे ॥५॥


अभंग॥१४८॥
प्रपंचीं असोनि परमार्थ करावा ।
बरा विवरावा निरंजन ॥१॥
निरंजन देव प्रगटे अंतरीं ।
मग भरोवरी करीना कां ॥२॥
करीना कां परि संसार बाधीना ।
परि तो साधेना काय करूं ॥३॥
काय करूं देव लैकिका उपाय ।
धरवेना सोय शाश्वताची ॥४॥
शाश्वताची सोय समाधान होय ।
मोक्षाचा उपाय सद्रुरुचि ॥५॥
सद्रुरुचि गति चुको अधोगति ।
दास म्हणे मति पालटावी ॥६॥


अभंग ॥१४९॥
संसार करावा सुखें यथासांग ।
परी संतसंग मनीं धरा ॥१॥
मनीं धरा संतसंगतिविचार ।
येणें पैलपार पाविजेतो ॥२॥
पाविजेतो याची प्रचीति पाहावी ।
निरूपणी व्हावी अतिप्रीति ॥३॥
अतिप्रीति तुम्ही निरूपणीं धरा ।
संसारीं उद्धरा असोनियां ॥४॥
असोनियां नाहीं हे माया सर्वही ।
विवंचनि पाही दास म्हणे ॥५॥


अभंग ॥१५०॥
करूनि अकर्ते होऊनियां गेले ।
तेणें पंथें चाले तोचि धन्य ॥१॥
तोचि धन्य जनीं पूर्ण समाधानी ।
जनीं आणि वनीं सारिखाची ॥२॥
सारिखाचि जेथे तेथे पालटेना ।
नये अनुमाना कोणीएक ॥३॥
कोणीएक लोक देहासि पाहाती ।
अंतरींची गति कोण जाणे ॥४॥
कोण जाणे काय परावे मनीचेम ।
जनास जनींचें कळतसे ॥५॥
कळतसे परी अंतरीं शोधावें ।
मनासि बोधावें दास म्हणे ॥६॥


अभंग ॥१५१॥
समाधान व्हावें विवेकें पाहावें ।
वायूच्या स्वभावें सर्व कांहीं ॥१॥
सर्व कांहीं घडे वायुचिकरितां ।
वायु पाहों जातां आढळेना ॥२॥
आढळेना वायु आकाशीं विराला ।
कर्ता काय झाला अंतरींचा ॥३॥
अंतरींचा सर्व विवेकें पाहतां ।
ब्रह्मरूप आतां सहजचि ॥४॥
सहजचि झालें विचारानें केलें ।
माणूस पाहिले शोधूनियां ॥५॥
शोधूनियां नीत माणूस पाहावें ।
वर्म पडे ठावें दास म्हणे ॥६॥


अभंग  ॥१५२॥
शरीराचीं तत्त्वें तत्त्वांचें शरीर ।
पहावा विस्तार विस्तारूनि ॥१॥
विस्तारूनि गुणीं तत्त्वांची मांडणी ।
सिद्धांतें जावोनी आरंभावी ॥२॥
आरंभावी तंत्त्वें तत्त्वें वेगळालीं ।
मीपणा गळालीं विवेकानें ॥३॥
विवेकें पाहतां कोणीचा नाढळे ।
समजतां कळे सर्व कांहीं ॥४॥
सर्व कांहीं लाभ होतो निरूपणें ।
श्रवणमननें दास म्हणे ॥५॥


अभंग ॥१५३॥
माणुसाचें ब्रह्म शोधितां होईल ।
प्रचीत येईल रोकडीच ॥१॥
रोकडी प्रचीति होती गुरुमुखं ।
फुका सर्व सुखें हाता येती ॥२॥
हाता येती बीजें सज्जनाच्या गूजें ।
प्रचीतीच्या भोजें आनंदला ॥३॥
आनंदला प्राणी सद्रुरु सेवितां ।
क्षुधार्थी जेवितां जेवीं तृप्त ॥४॥
तृप्त झाली बुद्धि निर्गुणाची शुद्धि ।
लागली समाधि रामदासीं ॥५॥


अभंग ॥१५४॥
आतां कांहीं बोलों धालों ।
तृप्त झालों विवेकें राहिलों परब्रह्मीं ॥१॥
परब्रह्मीं जातां ब्रह्मचि तत्त्वता ।
विचारें पाहतां आपणचि ॥२॥
आपणचि असे कोणीहि न दिसे ।
संसाराचें पिसें वाव झालें ॥३॥
वाव झाल भय सर्व संसारींचें ।
लाधलें हरीचें निजधाम ॥४॥
निजधाम बोधें विवेकें पाहावें ।
दास जीवें भावें सांगतसे ॥५॥


अभंग ॥१५५॥
आकाराचें सुख निराकारा नये ।
निराकारीं काये पाहशील ॥१॥
पाहशील सुख सुखामागें दु:ख ।
शोक आवश्यक अंगीं वाजे ॥२॥
अंगीं वाजे शोक एखादिये वेळीं ।
सुख सर्वकाळीं सगुणाचें ॥३॥
सगुणाचें सुख नासोनि जाईल ।
सगुण होईल नाहीं ऐसें ॥४॥
नाहीं ऐसें एक निर्गुण दिसतें ।
रोकडेंचि तेथें कांहीं नाहीं ॥५॥
कांहीं नाहीं कैसें आहे घनदाट ।
सर्वांचें शेवट परब्रह्म ॥६॥
परब्रह्म परी पाहतां दिसेना ।
नये अनुमाना कांहीं केल्या ॥७॥
कांहीं केल्या नोहे पाषाणाचें सोनें ।
तैसें हें अज्ञानें जाणिजेना ॥८॥
जाणिजेचि जनीं निज परब्रह्म ।
तंत्र कैंचा श्रम जाउं पाहे ॥९॥
जाऊं पाहे मन ब्रह्मासी पहाया ।
तंव तेथें माया दिसताहे ॥१०॥
दिसताहे माया तंव निरूपासी ।
येरवीं मायेसी ठाव कैंचा ॥११॥
कैंचा ठाव तया मायाज्ञानियासी ।
रामीं रामदासीं संतसंग ॥१२॥


अभंग ॥१५६॥
ऐसा कोण आहे मुआकेयाचा जाण ।
कळे ओळखण न सांगतां ॥१॥
न सांगतां जाण अंतरींचा हेत ।
पुरवी आरत सर्व कांहीं ॥२॥
सर्व कांहीं जाणे चतुराचा राणा ।
धन्य नारायणा लीला तुझी ॥३॥
लीला तुझी जाणे ऐसा कोण आहे ।
विरिंचि तो राहे चाकटला ॥४॥
चाकटला मनु देवासी पाहतां ।
दास म्हणे आतां हद्द झाली ॥५॥


अभंग ॥१५७॥
स्वप्रीं देखिलें तें स्वप्रावरी गेलें ।
जागृतीनें केलें तेंचि खरें ॥१॥
तेंचि खरें होतें येर सर्व जातें ।
तैसें ज्ञानियातें संसारिक ॥२॥
ससारमायेचा होईल विलय ।
वांया चिंता काय दास म्हणे ॥३॥


अभंग ॥१५८॥
चिंता काय आतां स्वप्रींचे सुखाची ।
सर्व चाले तोचि ब्रह्म दिसे ॥१॥
बरें दिसे तरी ज्ञाते न मनिती ।
दास म्हणे चित्तीं पालटेना ॥२॥


अभंग ॥१५९॥
देव निराकार त्या नाहीं आकार ।
आकारसंहार होत आहे ॥१॥
होत आहे जें जें सर्वहि जाणारे ।
जाणारें होणारें सर्व माया ॥२॥
सर्व माया दिसे हें पांचभौतिक ।
आत्मा आहे एक निरंजन ॥३॥
निरंजनीं जन वन कांहीं नसे ।
दृश्यभार भासे कल्पनेसी ॥४॥
कल्पनेसी भासे तें सर्व कल्पित ।
कल्पनेरहित परब्रह्म ॥५॥
परब्रह्म नाहीं ऐसा ठाव कैंचा ।
धन्य तो दैवाचा आत्मज्ञानी ॥६॥
आत्मज्ञानी नर पाहे सारासार ।
पुढें तदाकार होत आहे ॥७॥
होत आहे जन्म सार्थक तयाचा ।
जेथें सज्जना़चा अनुग्रह ॥८॥
अनुग्रह घडे बहुता सुकृतें ।
साक्षात्कार जेथें रोकडाची ॥९॥
रोकडाची मोक्ष साधूचे संगतीं ।
चुके अधोगति आत्मज्ञानें ॥१०॥
आत्मज्ञानें होतें आत्मनिवेदन ।
भक्तीचें लक्षण । नवविधा ॥११॥
नवविधा भक्ति श्रवण करावी ।
धारणा धरावी श्रवणाची ॥१२॥
श्रवणाची स्थिति ब्रह्म निरूपण ।
श्रवण मनन निदिव्यास ॥१३॥
निदिव्यास निजवस्तूचा धरावा ।
विचार करावा आपुलाही ॥१४॥
आपुलहि ठाव ज्ञानें होतो वाव ।
जाण ते सपाव श्रवणाचे ॥१५॥
श्रवणाचे भाव जाणते जाणती ।
तिनीची प्रचीति ऐक्यभाव ॥१६॥
ऐक्यभाव देवभक्तनामांकित ।
अनन्य अनंत जैसा तैसा ॥१७॥
जैसा आहे लाभ श्रवण-भक्तीचा ।
तेथें विभक्तीचा ठाव नाहीं ॥१८॥
ठाव नाहीं ऐसा श्रवणें जाणावें ।
कीर्तन करावें हेचि आतां ॥१९॥
हेचि हें कीर्तन नित्य निरंतर ।
ग्रंथाचें अंतर विवरावें ॥२०॥
विवरावें जेणें तोचि तो जाहला ।
रंक तो पावला राज्यपद ॥२१॥
पदीं पद प्राप्त झालें संतसंगें ।
सद्बय अंतरंगें समाधान ॥२२॥
समाधान झालें श्रवणें कीर्तनें ।
रामाच्या स्मरणें चित्तशुद्धि ॥२३॥
चित्तशुद्धि झाली जेणें तें धरावें ।
सेवन करावें सद्रुरूचें ॥२४॥
सद्रुरु करावा तें पादसेवन ।
सन्दुरूनें ज्ञान होत असे ॥२५॥
होत आहे ज्ञान सद्रुरूकरितां ।
हांय सार्थकता गुरूचेनी ॥२६॥
गुरूचेनी पदे लोक ठायीं पडे ।
सार तें निवडे प्रत्ययासी ॥२७॥
प्रत्ययासी बोले तेंचि तें बोलणें ।
अर्चन करणें गुरुदेवा ॥२८॥
गुरुदेवालागीं कीजे नमस्कार ।
सहावा विचार भक्ति ऐसी ॥२९॥
सर्वदास्य कीजे ते भक्ति सातवी ।
सख्य ते आठवी मक्ति जाणा ॥३०॥
नववीचें लक्षण आत्मनिवेदन ।
सर्वदा अभिन्न परब्रह्मीं ॥३१॥
परब्रह्म स्वयें आपणचि होणें ।
ऐसीं हीं लक्षणें सार्थकाचीं ॥३२॥
सार्थक भजन आत्मनिवेदन ।
विवेकें अभिन्न देवभक्त ॥३३॥
देवभक्त ऐसें हें आधीं पहावें ।
स्थितीनें रहावें सर्वकाळ ॥३४॥
सर्वकाळ वस्तु आहे जैसी तैसी ।
देह प्रारब्धासि समपिला ॥३५॥
समर्पिला त्यासि होणार होईल ।
जाणार जाईल पंचभूत ॥३६॥
पंचभूत माया मायिक दिसते ।
होते आणि जाते स्वप्राकार ॥३७॥
स्वप्राकार माया आपण वेगळा ।
असोबिं निराळा सर्वांमध्यें ॥३८॥
सर्वांमध्यें परि सर्वा बाह्य आहे ।
आहे तैसें आहे सदोदित ॥३९॥
सदोदित वस्तु तेंचि तें आपण ।
रामदासीं खूण सांगतसे ॥४०॥


अभंग ॥१६०॥
विटाळाचा देह विटाळे जाणतां ।
शुद्ध करूं जातां कोणेतरी ॥१॥
कोणेपरी आतां देह शुद्ध होईल ।
विटाळ जाईल कैसा याचा ॥२॥
याचा अर्थ घेतां या नये शुद्धता ।
शुद्ध करूं जातां पुन्हां पापी ॥३॥
पुन्हां पापी झाले पुन्हां शुद्ध केले ।
आयुष्य वेंचलें ऐशापरी ॥४॥
ऐशापरी देह सर्वदा सुंडिला ।
दास म्हणे झाला कासावीस ॥५॥


अभंग॥१६१॥
मृत्तिकेचा ऐसा करी नानापरी ।
मागुता टवकारी नर्क तेथें ॥१॥
नर्क तेथें आहे कैसा हा काढावा ।
व्यर्थ वाढवावा लोकाचार ॥२॥
लोकाचार केला लैकिकीं देखतां ।
अंतरी शुद्धता आढळेना ॥३॥
आढळेना ज्ञान पूर्ण समाधान ।
सर्वदा बंधन संदेहाचें ॥४॥
संदेहाचे पाप झालें वज्रलेप ।
विचार निष्पापर रामदासीं ॥५॥


अभंग ॥१६२॥
प्रपंचीं तें भाग्य परमार्थीं वैराग्य ।
दोनी यथासांग दोहींकडे ॥१॥
दोहींकडे सांग होतां तो समर्थ ।
नाहींतरी व्यर्थ तारंबळीं ॥२॥
तारंबळी होतां विचार नसतां ।
दास म्हणे आतां सावधान ॥३॥


अभंग ॥१६३॥
बंधाचा मुमुक्षें प्रबोध करावा ।
मग उद्धरावा ज्ञानमार्गें ॥१॥
ज्ञानमार्गें द्यावें सत्य समाधान ।
तरी मग जन पाठीं लागे ॥२॥
पाठीं लागे त्याचें अंतर जाणावें ।
आपुलें म्हणावें दास म्हणे ॥३॥


अभंग ॥१६४॥
पतित हे जन करावे पावन ।
तेथें अनुमान करूं नये ॥१॥
करूं नये गुणदोष उठाठेवी ।
विवेकें लावावी बुद्धि जना ॥२॥
बुद्धि सांगे जना त्या नांव सज्जन ।
पतितपावन दास म्हणे ॥३॥


अभंग ॥१६५॥
महापापी लोक पूर्वींचे आहेती ।
तेचि पालटती जयाचेनी ॥१॥
जयाचेनि योगें होतसे उपाय ।
तुटती अपायें नानाविध ॥२॥
नानाविध जन सुबुद्धचि होती ।
साधूचे संगतीं दास म्हणे ॥३॥


अभंग ॥१६६॥
लोखंडाचें सोनें परिसाचें गुणें ।
साधूचेनि होणें बद्ध सिद्ध ॥१॥
बद्ध सिद्ध होती देखतां देखतां ।
होय सार्थकता तात्काळची ॥२॥
तात्काळचि झाला वाला तो वाल्मीक ।
दास पुण्यश्र्लोक रामनामीं ॥३॥


अभंग ॥१६७॥
पावन असतां पतित झालासी ।
सोय चुकलासी पावनाची ॥१॥
पावनाची सोय धरितां अंतरीं ।
स्वरूप विवरी समाधान ॥२॥
समाधान झालें केलें पावनानें ।
आत्मनिवंदनें दास म्हणे ॥३॥


अभंग ॥१६८॥
आत्मनिवेदन नववें भजन ।
येणें संतजन समाधानी ॥१॥
समाधानी संत आत्मनिवेदनें ।
ज्ञान मीतूंपण सांडवलें ॥२॥
सांडवलें सर्व मायिक संगासीं ।
रामीं रामदासीं नि संगता ॥३॥
नि:संगता झाली विव्वेकानें केली ।
मुक्तीहि लाधली सायुज्यता ॥४॥


अभंग ॥१६९॥
आतांचि हे मुक्ति देहीं पावे जना ॥
तरी कां सज्जना शरण जावें ॥१॥
शरण जातां भावें सज्जनचि व्हावें ।
शीघ्र उद्धराचें  निरूपणें ॥२॥
निरूपणें निजवस्तु ते सांपडे ।
गुज ठायीं पडे अकस्मात ॥३॥
अकस्मात ठान न दिसे आपुला ।
निरंजनीं झाला निंरजन ॥४॥
निरंजन झाला ये जनीं असोनी ।
जन्मनी गिन्मनीं नाढळती ॥५॥
नाढळती तेथे कांहीं देहभाव ।
तत्त्वज्ञान वाव देहबुद्धि ॥६॥
देहबुद्धि गेली देखतां देखतां ।
मी कोण हे आतां सांपडेना ॥७॥
सांपडेना शुद्धि मीपणें पाहतां ।
तें मीपण जातां वस्तुरूप ॥८॥
वस्तुरूप बोधें अरूप होईजे ।
विवेकाची काजे विचारणा ॥९॥
विचारणा झाली रामीं रामदासीं ।
आतां या जन्मासी ठाव नाहीं ॥१०॥
ठाव नाहीं ऐसें  राघवाचें देणें ।
थोराहूनि होणें थोर स्वये ॥११॥


अभंग ॥१७०॥
माझें थोरपण देव वाखाणिती ।
ऐसी हे प्रचीति सिद्ध आतां ॥१॥
सिद्ध आतां बोध देखत ।
होय सार्थकता शीघ्रकाळें ॥२॥
शीघ्रकाळें काळ सर्व संहारिला ।
अनुभव आला रोकडाची ॥३॥
रोकडाचि आतां तुम्ही तरी पाहा ।
विवेकानें आहा काय नेणों ॥४॥
नेणों महिमान विवेकीं जनाचें ।
होय सज्जनाचें मूळस्थान ॥५॥
मूळ-स्थान मूळ होइजे केवळ ।
कोण रे चांडाळ मिथ्या बोले ॥६॥
मिथ्या बोलवेना पाहा विवंचना ।
सिद्ध अनुमाना कैसी येते ॥७॥
कैसी येते आत्मप्रचीति आपण ।
मी तूं ऐसें कोण सांग बापा ॥८॥
सांग बापा मनीं बरें विचारूनी ।
तत्त्वाची झाडणी करूनियां ॥९॥
करूनियां पंचीकरणविवरण ।
पुढें मीतूंपण कोठें आहे ॥१०॥
आहे तैसें आहे प्रत्यक्ष जाणावें ।
कोणासी म्हणावें काय आतां ॥११॥
काय आतां होतें बहु बोलेनियां ।
घेतलेसे जाया सर्व कांहीं ॥१२॥
सर्व कांहीं ऐसें दृश्य जाइजेणें ।
माझें मीच जाणे कोणा सांगों ॥१३॥
कोणा सांगों आतां हें कोण घेईल ।
वायाची जाईल अभिमानें ॥१४॥
अभिमानें सत्य राम कोणता हें ।
सिद्धचि न राहे आत्मरूप ॥१५॥
आत्मरूप स्वयें आपण नव्हिजे ।
तरी वांया कीजे रामदास ॥१६॥
कदाकाळीं राम दासा उपेक्षीना ।
राम उपासनना ऐसी आहे ॥१७॥
ऐसी आहे सार राघोबाची भक्ति ।
भक्तीची विभक्ति जेथें नाहीं ॥१८॥
जेथें नाहीं कांहीं वाउगें मायिक ।
रामउपासक दास म्हणे ॥१९॥


अभंग ॥१७१॥
मायिकाची भक्ति उधाराची मुक्ति ।
तैसी नाहीं स्थिति राघवाची ॥१॥
राघवाची कृपा सद्य मोक्षफळ ।
तुटे तळमळ चमत्कारें ॥२॥
चमत्कारें आतां जो कोणी पाहीना ।
त्याचा पंथ उणा कोटिगुणें ॥३॥
कोटिगुणें उणें जिणें त्या नराचें ।
तेथें विचाराचें वोस घर ॥४॥
वोस घरीं कोण कासयासि धांवे ।
वयर्थचि शिणावें कामाविण ॥५॥
कामा विण काम राहे आत्माराम ।
जेथेंचि विश्राम पाविजेल ॥६॥
पाविजेल परी विवरीत जावें ।
सर्वहि सांडावें ओळखोनी ॥७॥
ओळखतां त्याग सर्वंचा घडेल ।
मार्ग सांपडेल योगियांचा ॥८॥
योगियांचा पंथ योगीच जाणती ।
तिन्हींची प्रचीति एक जेथें ॥९॥
एक जेथें आत्मा शास्र गुरुवाक्य ।
पाहे महावाक्य विवरूनी ॥१०॥
विवरूनि ब्रह्मीं ब्रह्म अहमस्मि ।
राम आहे रामीं रामदास ॥११॥


अभंग ॥१७२॥
सप्रचीत वल्ली मिथ्या कोण करी ।
धन्य जो विवरी विवेकानें ॥१॥
विवेकानें जन भेटतां संकट ।
त्याची खटपट सुखरूप ॥२॥
सुखरूप संत सत्या साभिमानी ।
तयांसीच मनीं येरां नाहीं ॥३॥
येरां नाहीं गति सत्यावांचुनियां ।
असत्याचे पायां कोण पडे ॥४॥
कोण पडे आतां संदेहाच्या डोहीं ।
कोणाविण नाहीं चाड आम्हां ॥५॥
आम्हां नाहीं चाड ते कोणाएकाची ।
दृढ राघवाची कास धरूं ॥६॥
कास धरूं जेणें पावन हो केलें ।
तेथें माझें झालें समाधान ॥७॥
समाधान झालें प्रत्ययासीं आलें ।
धन्य तीं पाउलें राघवाचीं ॥८॥
राघवाचीं पदें मानसीं धरीन ।
विश्व उद्धरीन हेळामात्रें ॥९॥
हेळामात्रें मुक्त करीन हा जन ।
तरीच पावन राघवाचा ॥१०॥
राघवाचा दास मी झालों पावन ।
पतित तें कोण उरों शके ॥११॥
उरों शके ऐसें कल्पांतीं घडेना ।
जो कोणी पुसेना त्यासि उणें ॥१२॥
उणें न सांगतां माझ्या सूर्यवंशा ।
कोणाची दुराशा नाहीं आम्हां ॥१३॥
नाहीं आम्हां उणें राघवाच्या गुणें ।
ब्रीदचि राखणें पावनाचें ॥१४॥
पावनाचेंबीज आम्हां प्राप्त झालें ।
प्रचीतीस आलें कांहींएक ॥१५॥
कितीएक जन ज्ञानें उद्धरिले ।
कृतकृत्य झाले तात्काळचि ॥१६॥
तात्काळचि मोक्ष हें ब्रीद रामाचें ।
होत आहे साचें येणें काळें ॥१७॥
येणें काळें मोक्ष जरि मी देईन ।
दास म्हणवीन राघवाचा ॥१८॥
राघवाचा वर पावलों सत्वर ।
जनाचा उद्धार करावया ॥१९॥
करावया समर्थ राम सूर्यवंशीं ।
मज कासयासिंरोग जातां ॥२०॥
रोग जातां राग येईल समर्था ।
हे तों कांहीं सत्ता माझी एक ॥२१॥
माझी सर्व सत्ता जानकीजीवना ।
आतां मी लेखिना ब्रह्मादिकां ॥२२॥
ब्रह्मादिक मायें जनकापासूनी ।
तयासी व्यापूनी राम आहे ॥२३॥
राम आहे जनीं राम आहे वनीं ।
राम निरंजनीं सारिखाची ॥२४॥
सारिखाचि राम सृष्टि पाहों जातां ।
तोचि पाहा आतां निरंजन ॥२५॥
निरंजन रामा कां हो अंतरतां ।
मोहुनियां जातां एकीकडे ।
एकीकडे जातां तेथें तोहि राम ।
सांडोनियां राम बरें पाहा ॥२६॥
बरें पाहा तुम्ही आतांचि पावाल ।
पावनचि व्हाल रामरूपें ॥२७॥
रामरूपें सर्व रूपें निवारिलीं ।
आसतचि झालीं नाहीं ऐसीं ॥२८॥
नाहीं ऐसीं रूपें भिंती चित्राकार ।
तैसा हा आकार स्वप्र जैसा ॥२९॥
स्वप्रींचा आकार कल्पनेसी भासे ।
रामरूप ऐसें निर्विकल्प ॥३०॥
निर्विकल्प राम कल्पितां होईजे ।
मिळोनि जाईजे रामरूपीं ॥३१॥
रामरूपीं सर्व साधन जाहलें ।
पावनचि केलें पावनानें ॥३२॥
पावन हो राम जो कोणी पावेल ।
रामचि होईल निजव्यासें ॥३३॥
निजव्यास निजवस्तूचा धरावा ।
श्रवण करावा साक्षात्कार ॥३४॥
साक्षात्कार होतां सत्य निर्गुणाचा ।
मग या गुणाचा पांग नाहीं ॥३५॥
पांग नाहीं ऐसें नेमस्त जाणावें ।
शीघ्रचि सुटावें संवसारीं ॥३६॥
संसारीं सुटिजे संसार करितां ।
सर्वहि भोगितां भोगातीत ॥३७॥
भोगातीत जैसा श्रीकृष्ण दुर्वासा ।
आत्मज्ञानी ऐसा सर्वकाळ ॥३८॥
सर्वकाळ देही असतां विदेही ।
रामदासीं नाहीं जन्ममृत्यु ॥३९॥


अभंग ॥१७३॥
जाणे सुख दु:ख राम माझा एक ।
येरें तीं मायिक वैभवाचीं ॥१॥
वैभवाची सखीं वोरगोनी जाती ।
आत्माराम अंतीं जिवलग ॥२॥
जीवलग नाहीं श्रीरामावांचूनी हाचि माझे मनी दृढ भाव ॥३॥
भाव अनन्याचा आहे वरपंगाचा ।
रामेंविण कैंचा अंत-रंग ॥४॥
अंतरींची व्यथा श्रीराम सर्वथा ।
जाणवल्या चिंता दूर करी ॥५॥
करितां प्रतिपाळ शरण आलियाचा ।
राम त्रैलोक्याचा मायबाप ॥६॥
मायबाप बंधु सज्जन सोयरा ।
एका रघुवीराविण नाहीं ॥७॥
नाहीं मज कोणी श्रीराम असतां ।
सत्वर वाहतां उडी घाली ॥८॥
उडी घाली मज अनाथाकारणें ।
राम सर्व जाणें अंतरींचे ॥९॥
अंतरींचे गुज राम सर्व बीज ।
रामदाजीं निज प्रगटलें ॥१०॥


अभंग ॥१७४॥
छत्रसिंहासनीं अयोव्येचा राजा ।
नांदतसे माझा मायबाप ॥१॥
माझा मायबाप त्रैलोकीं समर्थ ।
सर्व मनोरथ पूर्ण करी ॥२॥
पूर्ण प्रतापाचा कैवारी देवांचा ।
नाथ अनाथांचा स्वामी माझा ॥३॥
स्वामी माझा राम योगियां विश्राम ।
सांपडलें वर्म थोर भाग्य ॥४॥
थोर भाग्य त्याचें राम ज्याचे कुळीं ।
संकटीं सांभाळी भावबळें ॥५॥
भावबळें जींहीं धरिला अंतरीं ।
तया क्षणभरी विसंबेना ॥६॥
विसंबेनां कदा आपुल्या दासासी ।
रामीं रामदासीं कुळस्वामी ॥७॥


अभंग ॥१७५॥
सोडवी जो देव तोचि देवराव ।
येरें सर्व नांव नाथिलेंची ॥१॥
नाथिलेंचि नांव लोकांमध्यें पाहें ।
ठेवी जेथ आहे प्रतापाचें ॥२॥
प्रतापाचें नांव एका राघवासी ।
रामीं रामदासीं देवराव ॥३॥


अभंग ॥१७६॥
पुण्याचें माहेर साधकाचें घर ।
बहुतांचें छत्र स्वामी माझा ॥१॥
स्वामी माझा राम रायाचें मंडण ।
संसार खंडण महाभय ॥२॥
महाभय कैसें अभेदभक्तासी ।
रामीं रामदासीं धन्य बोला ॥३॥


अभंग ॥१७७॥
धन्य सूर्यवंश पुण्यपरायण ।
सर्वही सगुण समुदाय ॥१॥
समुदाय काय सांगूं या रामाचा ।
अंतरीं कामाचा लेश नाहीं ॥२॥
लेश नाहीं मनीं तया भरतासी ।
सर्वहि राज्यासी त्यागियेलें ॥३॥
त्यागियेलें अन्न केलें उपोषण ।
धन्य लक्षुमण ब्रह्मचारी ॥४॥
ब्रह्मचारी धन्य मारुति सेवक ।
श्रीरामीं सार्थक धन्य केलें ॥५॥
धन्य केला जन्म वाल्मीकि ऋषीनें ।
धन्य तीं वचनें भविष्याचीं ॥६॥
भविष्य पाहात धन्य बिभीषण ।
राघवीं शरण सर्वभावें ॥७॥
सर्वभावें रामीं सर्वहि वानर ।
शरण अवतार विबुघांचें ॥८॥
विबुधमंडळीं राम सर्वगुण ।
अनन्यशरण रामदास ॥९॥


अभंग॥१७८॥
मनुष्याची आशा तेचि पैं निराशा ।
एका जगदीशावांचुनियां ॥१॥
वांचुनियां राम सर्वहि विराम ।
नव्हे पूर्ण काम रामेविण ॥२॥
रामेविण नव्हे हे कोणी कोणाचे ।
सर्वहि मायेचें जायजणें ॥३॥
जायजणें ऐसें कोणासि नेणवे ।
वेळेसी जाणवे संकटींच्या ॥४॥
संकटाचे वेळे निजाचा सांगाती ।
राम आदिअंतीं रामदासी ॥५॥


अभंग ॥१७९॥
काय ते करावे संपत्तीचे लोक ।
जानकीनायक जेथें नाहीं ॥१॥
जेथें नाहीं माझा श्रीराम समर्थ ।
त्याचें जिणें व्यर्थ कोटीगुणें ॥२॥
कोटीगुणें उणें जिणें त्या नराचें ।
जानकीवराचें नाम नाहीं ॥३॥
नाम नाहीं मनीं नाहीं जो कीर्तनीं ।
तया कां जननी प्रसवली ॥४॥
प्रसवली जरी झाला भूमिभार ।
दुस्तर संसार उल्लंघेना ।\५॥
उल्लंघेना एका रामनामावीण ।
रामदासीं खूण प्रेमभावें ॥६॥


अभंग ॥१८०॥
दासाची संपत्ति राम सीतापति ।
जीवाचा सांगाती राम एक ॥१॥
राम एक माता राम एक पिता ।
राम एक भ्राता सहोदर ॥२॥
सहोदर विद्या वैभव कांचन ।
सर्वहि स्वजन राम एक ॥३॥
राम एक ज्ञान राम एक ध्यान ।
राम समाधान रामदासीं ॥४॥


अभंग ॥१८१॥
अनाथाचा नाथ देव तो कैवारी ।
सिंहासनावरी शोभतसे ॥१॥
शोभतसे राम प्रतापी आगळा ।
दिसे सौम्य लीळा सत्वगुणी ॥२॥
सत्वगुणी होय सात्विकाकारणें ।
कोपें संचारणें दुर्जनासी ॥३॥
दुर्जन संसार सज्जनां आधार ।
भाविकासी पार पाववितो ॥४॥
पाववितो पार या मवसिंधूचा ।
राघव दीनाचा दीनानाथ ॥५॥
दीनानाथ नाम पतित-पावन ।
योगियां जीवन योगलीळा ॥६॥
लीळावेवधारी भक्ताचें माहेर ।
ध्वानीं गौरीहर चिंतीतसे ॥७॥
चिंतीतसे नाम राम पूर्ण काम ।
पावला विश्राम रामनामें ॥८॥
रामनामीं हरु विश्रांति पावला ।
हें तें समस्तांला श्रत आहे ॥९॥
श्रुत आहे व्योमयोगाचे मंडण ।
संसारखंडण महाभय ॥१०॥
महाभय कैंचें रामासी भजतां ।
हें जाणे अन्यथा वाक्य नव्हे ॥११॥
नव्हे सोडवण रामनामाविण ।
रामदास खूण सांगतसे ॥१२॥


अभंग ॥१८२॥
रामाचें चरित्र सांगतां अपार ।
जाहाला विस्तार तिहीं लोकीं ॥१॥
तिही लोकीं हेंच बाहूनी दिधलें ।
तें आम्हां लाधलें कांहींएक ॥२॥
कांहींएक पुण्य होतें पूर्वजाचें ।
पापीयासी कैचें रामनाम ॥३॥
रामनामें कोटी कुळें उद्धरती ।
संशय धरिती तेचि पापी ॥४॥
पापीयाचें पाप जाय एकसरी ।
जरी मनीं धरीं रामनाम ॥५॥
रामनाम काशी शिव उपदेशी ।
आधार सर्वांसी सर्व जाणे ॥६॥
सर्व जाणे अंतीं रामनामें गति ।
आणि वेदश्रुती गर्जताती ॥७॥
गर्जती पुराणें आणि संतजन ।
करावें भजन राघवाचें ॥८॥
राघवाचें व्यान आवडे कीर्तन ।
तोचि तो पावन लोकांमांजीं ॥९॥
लोकांमाजीं तरे आणि जना तारी ।
धन्य तो संसारीं दास म्हणे ॥१०॥


अभंग ॥१८३॥
क्षण एक चित्तीं राम आठविती ।
तेणें उद्धरती कोटी कुळें ॥१
कोटी कुळें वाट पहाती तयाची ।
आवडी जयाची रामनामीं ॥२॥
रामनाचें तुटे कुळाचें बंधन ।
पुत्र तो निधोन हरिभक्त ॥३॥
हरिभक्त एक जन्मला प्रर्‍हाद ।
जयाचा गोविंद कयवारी ॥४॥
कयवारी हरी राखे नानापरी ।
ऐसा भाव धरी आत्मयारे ॥५॥
आत्मयारे हित विचारी आपुलें ।
सर्व नाथियेलें मायाजाळ ॥६॥
मायाजाळ दिसे दृष्टीचें बंधन ।
जाणती सज्ञान अनुभवी ॥७॥
अनुभवी संत सज्जन देखसी ।
तेथें राघवासी ठांई पाडी ॥८॥
ठांई पाडी राम जीवाचा विश्राम ।
जेणें सर्व काम पूर्ण होती ॥९॥
पूर्व होती तुझे मनोरथ सर्व ।
राघवाचा भाव मनीं धरी ॥१०॥
मनीं धरी सर्व देवांचा कैवारी ।
व्यातसे अंतरीं महादेव ॥११॥
महादेव सर्वजानां उपदेशी ।
रामीं रामदासीं दृढभाव ॥१२॥


अभंग॥१८४॥
सोपें सुगम हें नाम राघोबाचें ।
सर्वकाळ वाचें येऊं द्यावें ॥१॥
क्षण एक राम हदयीं धरिजे ।
तेणे तें पाविजे निजसुख ॥२॥
येऊं द्यावें वाचें नाम निरंतर ।
तेणें हा संसार तरीजेल ॥३॥
तरीजेल रामीं रामदास म्हणे ।
सावधान होणें रामनामीं ॥४॥


अभंग ॥१८५॥
प्रात:काळ झाला राम आठवावा ।
हदयीं धरावा क्षणएक ॥१॥
क्षणएक राम हदयीं धरिजे ।
संसारीं तारिजे हेळामात्रें ॥२॥
हेळामात्रें रामनामें होय गति ।
भाग्यवंत घेती सर्वकाल ॥३॥
सर्वकाळ राम मानसीं धरावा ।
वाचें उच्चारावा नामघोष ॥४॥
नामघोष वाचे श्रवण कीर्तन ।
चरणीं गमन देवालयीं ॥५॥
देवालयीं जातां सार्थक जाहलें ।
कारणीं लागलें कलिवर ॥६॥
कलिवर त्वचा जोडूनि हस्तक ।
ठेवाबें मस्तक राम पायीं ॥७॥
रामपायीं शिळा झाली दिव्य बाळा ।
तैसाचि सोहळा मानवांसी ॥८॥
मानवांसी अंतीं रामनामें गति ।
सांगे उमापति महादेव ॥९॥
महादेव सांगे जप पार्वतीसी ।
तोचि तो विश्वासीं रामदासीं ॥१०॥


अभंग ॥१८६॥
विश्वासिला जेथें कैलासाचा राव ।
तेथें एक भाव दृढ धरी ॥१॥
दृढ धरी भाव वाल्मिकाचे परी ।
सर्व ऋषीश्वरीं जाणिजेती ॥२॥
जाणिजे वाल्मीकऋषिरामायण ।
तारिले पाषाण रामनामें ॥३॥
रामनामें उद्धरिली ती गणिका ।
नेली दिव्यलोका येचि देहीं ॥४॥
येचि देहीं गति पावली कुंटणी ।
रामनाम वाणी उच्चारितां ॥५॥
उच्चारित राम पूर्ण सर्वकाम ।
संसारींचा श्रम दूरी जाय ॥६॥
दुरी जाय श्रम आनंद मानसीं ।
रामीं रामदासीं दृढ भाव ॥७॥


अभंग ॥१८७॥
हरिभक्ति करी धन्य तो संसारीं ।
जयाचा कैवारी देवराणा ॥१॥
देवराणा सदा सर्वदा मस्तकीं ।
तयासी या लोकीं चाड नाहीं ॥२॥
चाड नाहीं जनीं राघवाचा दास ।
सार्थक वयेस रामदासीं ॥३॥


अभंग॥१८८॥
धन्य त्याचें कुळ धन्य त्याचा वंश ।
जे कुळीं हरिदास अवतरे ॥१॥
धन्य ते जननी धन्य तेचि कुशी ।
जे हरिप्रियासी प्रसवली ॥२॥
धन्य ते संबंधीं संतांचे सोईरे ।
सत्संगें उद्धरे कुळ त्यांचें ॥३॥
धन्य पैं तो ग्राम धन्य पैं तो देश ।
जेथें रहिवास वैष्ण – वांचा ॥४॥
धन्य त्यांचें सख्य वैष्णवीं सर्वदा ।
त्ते संगें गोविंदा जीवलग ॥५॥
धन्य ते भाविक वंदिती हरिदासा ।
तया हषीकेशा वंदितसे ॥६॥
धन्य ते निंदक निंदिती सज्जन ।
येणें भावें व्यान घडे त्यांसीं ॥७॥
धन्य दासी दास सज्जनसेवेसी ।
ते सुरवरांसी वंद्य होती ॥८॥
धन्य पशु श्र्वान वैष्णव घरींचें ।
कळिकाळ त्याचे पाय वंदी ॥९॥
रामदास म्हणे तरी धन्य होणें ।
जरी संग लाधणें वैष्णवांचा ॥१०॥


अभंग॥१८९॥
हरिभक्तिवीण जाऊं नये क्षण ।
या नांव लक्षण सार्थकाचें ॥१॥
सार्थकाचें जिणें कथानिरूपणें ।
श्रवण मननें काळ गेला ॥२॥
काळ गेला हरिभक्तीचेनि योगें ।
साधू-चेनि संगें दास म्हणे ॥३॥


अभंग ॥१९०॥
सुपुत्र संसारीं कुळाचें मंडण ।
वंशउद्धरण हरिभक्त ॥१॥
भक्ति तरताति बेताळिस कुळें ।
भक्तीचेनि गुणें जगोद्बार ॥२॥
जगोद्धार करी सुपुत्र संसारीं ।
येरें अना -सारी पापरूप ॥३॥
पापरूपी नर अभक्त जाणावे ।
तयांसी नेणवे देवराणा ॥४॥
देवराणा वळे देखोनियां भआव ।
दास म्हणे माव कामा नये ॥५॥


अभंग॥१९१॥
धाकुटाचि धुरू तो नव्हे लेंकरूं ।
जया सर्वेश्र्वरू प्रगटला ॥१॥
प्रगटला देव तया उपमन्या ।
भावार्थ अनन्या क्षीरसिंधू ॥२॥
क्षीरसिंधुवासी स्वयें नारायण ।
प्रर्‍हादरक्षण करितसे ॥३॥
करितो रक्षण दासासी संकटीं ।
त्याचें नाम कंठीं असों द्यावें ॥४॥
असो द्यावें सदा देवाचें चिंतन ।
गजेंद्र पावन नामघोषें ॥५॥


अभंग॥१९२॥
आलिया देवासी वाट चुकलासी ।
म्हणोनि आळसी संवसारीं ॥१॥
संसा-राचें दु:ख करिसी रुदन ।
चुकलें भजन राघवाचें ॥२॥
राघवाची भक्ति नेणव्युतां व्युत्पत्ति ।
तुज अधोगति जन्म झाला ॥३॥
जन्म झाला परी वेगें सोय धरी ।
सत्वर संसारीं मोक-ळिक ॥४॥
मोकळिक होय भक्तिपंथें जातां ।
वाक्य हें तत्त्वतां दास म्हणे ॥५॥


अभंग ॥१९३॥
विषयरुदन सोडूनियां द्यावें ।
नित्य नित्य जावें संतसंगें ॥१॥
संतसंगें बापा होंई रे निश्चळ ।
मग तळमळ विसरसी ॥२॥
विसरसी दु:ख संताचे संगतीं ।
चुके अधोगति गर्भवास ॥३॥
गर्भवास आतां चुकवी आपले ।
धरावीं पाउलें राघवाचीं ॥४॥
राघवाचे भक्त राघवीं मिळती ।
भेटे सीतापति दास म्हणे ॥५॥


अभंग॥१९४॥
माता पिता जन स्वजन कांचन ।
मिया पुत्रीं मन गोवूं नये ॥१॥
गोवूं नको मन राघवावांचूनी ।
लोकलाज जनीं लागलीसे ॥२॥
लागलीसे परि तुवाम न धरावी ।
स्वहितें करावी रामभक्ति ॥३॥
रामभक्तींवीण होशील हिंपुटी ।
येकलें शेवटीं जाणें लागे ॥४॥
जाणें लागे आतां बाळा सुलक्षण ।
व्यांई रामराणा दास म्हणे ॥५॥


अभंग ॥१९५॥
माझे मनीं सर्व सुख व्हावें तुज ।
म्हणोनियां गुज सांगतसें ॥१॥
सांग-तसें हित तें जीवीं धरावें ।
भजन करावें राघोबाचें ॥२॥
राघोबाचें प्रेम तें करी विश्राम ।
येर सर्व श्रम जाण बापा ॥३॥
जाण बापा वचन हें माझें प्रमाण ।
वाहतसें आण राघवाची ॥४॥
राघवाची भक्ति ते माझी विश्रांति ।
असों द्यावी चित्तीं दास म्हणे ॥५॥


अभंग ॥१९६॥
राघवाचें नाम राखशील जरी ।
तुज राखे तरी रामराणा ॥१॥
रामराणा माझे जिवींचें जीवन ।
आवडीनें खूण सांगतसें ॥२॥
सांगतसें खूण माझे अंतरींची ।
सर्वहि सुखाची सुखमूर्ति ॥३॥
सुखमूर्ति राम सांडूं नको कदा ।
तुज तो आपदा लागों नेदी ॥४॥
लागों नेदी कष्ट आपुल्या दासासी ।
रामीं रामदासीं साहाकारी ॥५॥


अभंग ॥१९७॥
रानीं मनीं वनी राम असो द्यावा ।
करील कुडावा सेवकाचा ॥१॥
सेव-काचा भार घेतसे साचार ।
म्हणोनि अंतर पडों नेदीं ॥२॥
पडों नेदी शब्द माझा भूमी-वरी ।
दृढ चित्तीं धरीं देवराणा ॥३॥
देवराणा सर्व देवां सोडविता ।
लागलीसे चिंता त्यास तुझी ॥४॥
तुझी चिंता करी राजा अयोध्येचा ।
कृपाळु दीनाचा दास म्हणे ॥५॥


अभंग॥१९८॥
कोणाचें हें घर कोणाचा संसार ।
सांडुनी शरीर जाणें लागे ॥१॥
जाणें लागे अंतीं एकलें एकटें ।
व्यर्थ खटपटें जन्मवरी ॥२॥
जन्मवरी देह संसारीं गोविलें ।
नाहीं कांहीं केलें आत्माहित ॥३॥
आत्महित केलें संसाराचे वोढीं ।
अंतीं कोण सोडी रामाविण ॥४॥
रामाविण कोणी सोडविना अंतीं ।
वायांचि रडती जीवलगें ॥५॥
जीवलग राम दूरी दुरावला ।
विचार आपुला जाणवेना ॥६॥
जाणवेना पूर्व सुकृतावांचुनी ।
पापियाचे मनीं राम कैंचा ॥७॥
राम कैंचा जया लैकिकाची चाड ।
पुरविती कोड संसाराचें ॥८॥
संसाराचें कोड तेंचि वाटे गोड ।
जया नाहीं चाड अनुतापीं ॥९॥
अनुतापीं जाले संसारीं सुटले ।
राजे राज्य गेले सांडोनियां ॥१०॥
सांडोनियां गेले वैभव संपत्ति ।
पुढें यातायातीचेनि भेणें ॥११॥
भेणे ते शरण निघाले देवासी ।
नेले वैकुंठासी भक्तराज ॥१२॥
भक्तराज भावें भेटले देवासी ।
रामीं रामदासीं धन्य वेळ ॥१३॥


अभंग ॥१९९॥
आपुलीं पारखीं सर्व पारखिलीं ।
नाहीं कामा आलीं रामविणें ॥१॥
रामविणें जाण सर्वहि पिसुण ।
मायेचें कारण नाथिलेची ॥२॥
नाथिलेंचि आहे जनाचें साजणें ।
तृणाचें तापणें तयापरी ॥३॥
तयापरि ऐसा निश्चय जाणावा ।
सतीचा बोलावा लोक आहे ॥४॥
लोक बहु रंग जाणुनि वोरंग ।
रामदास संग सांडियेला ॥५॥


अभंग ॥२००॥
सुखाचे सांगाती सर्वही मिळती ।
दु:ख होतां जाती निघोनियां ॥१॥
निघोनियां जाती संकटाचे वेळे ।
सुख होतां मिळे समुदाय ॥२॥
समुदाय सर्व देहाचे संबंधीं ।
तुटली अपाधि रामदासीं ॥३॥


अभंग॥२०१॥
मूर्ख तो संसारीं माझे माझें करी ।
मृत्यु बरोबरी हिंडतसे ॥१॥
हिंडतसे काळ सांगातीसरिस ।
मनीं भरवंसा नेणोनियां ॥२॥
नेणोनियां प्राणी संसारासी आला ।
आला तैसा गेला दैन्यवाणा ॥३॥
दैन्यवाणा गेला सर्वही सांडूनी ।
ठेवील जोडूनि जनालागीं ॥४॥
लागहि लागले दोषचि सुटेना ।
अभक्ति तुटेना अंतरींची ॥५॥
अंतरींची मूर्ति अंतरली द्बारीं ।
कदाकाळीं हरी आठवीना ॥६॥
आठवीना अंतकाळीं रामाविण ।
धन्य तें मरण दास म्हणे ॥७॥


अभंग ॥२०२॥
काया हे काळाची घेवोनी जाणार ।
तुझेनी होणार काय बापा ॥१॥
काय बापा ऐसें जाणोनी नेणसी ।
मी मी म्हणतोसि वायांविण ॥२॥
वायांविण शीण केला जन्मवरी ।
केली लोकाचारी नागवण ॥३॥
नागवण आली परलोका जातां ।
स्वहिताची चिंता केली नाहीं ॥४॥
केली नाहीं चिंता नामीं कानर्कारडें ।
अंतीं कोण्या तोंडें जात असे ॥५॥
जात असे सर्व सांडोनि करंटा ।
जन्मवरी ताठा धरूनियां ॥६॥
धरूनियां ताठा कासया मरावें ।
भजन करावें दास म्हणे ॥७॥


अभंग ॥२०३॥
चंद्रासी उद्बेग सर्वकाळ मनीं ।
माझें पद कोणी घेईना कीं ॥१॥
घेईना कीं कोणी बळिया दानव ।
घालिना कीं देव कारागृहीं ॥२॥
कारागृह देवादिकांचें चुकेना ।
तेथें काय जना चुकवेल ॥३॥
चुकवेल भोग हें कांहीं घडावें ।
लागेल भोगावें केलें कर्म ॥४॥
केलें कर्म सुटे जरी भ्रांति फिटे ।
दास म्हणे भेटे संतजनां ॥५॥


अभंग ॥२०४॥
रावणासारिखी कोणाची संपत्ति ।
तोहि गेला अंतीं एकलाची ॥१॥
एकलचि गेला वाळि तो वानर ।
कपि थोर थोर तेहि गेले ॥२॥
गेले चक्रवर्ती थोरा वैभवाचे ।
फार आयुष्याचे ऋषेश्वर ॥३॥
ऋषेश्वर गेले मार्कंडासारिखे ।
इतरांचे लेख कोण करी ॥४॥
कोण करी सर्व शाश्वत आपुलें ।
सर्व राज्य गेलें कांरेवांचें ॥५॥
कौख निमाले पांडव गळाले ।
यादवहि गेले एकसरें ॥६॥
एकसरें गेजे राजे थोर थोर ।
आणिक श्रीधर भाग्यवंत ॥७॥
भाग्यवंत गेले एकामागें एक ।
हरिश्चंद्रादिक पुण्यशीळ ॥८॥
पुण्यशीळ गेले कीर्ति ठेऊनियां ।
पापी गेले वायां अधोगतीं ॥९॥
अधोगतीं गेले देवां न भजतां ।
संसारीं म्हणतां माझें ॥१०॥
माझें माझें करी साचाचिये परी ।
अति दुराचाची एकलाची ॥११॥
एकलाची येतां एकलाची जातां
ध्येंचि दुश्चिता माया-जाळ ॥१२॥
मायाजाळीं पापीजन गुंडाळले ।
पुण्यशीळ गेले सुटोनियां ॥१३॥
सुटोनियां गेले सायुज्यपदासी ।
रामीं रामदासीं चिरंजीव ॥१४॥


अभंग ॥२०५॥
स्वप्र हा संसार मायिक वेव्हार ।
म्हणोनि सा़चार मानूं नये ॥१॥
मानूं नये सर्व जायाचें आपुलें ।
त्याचें त्याणें नेलें दु:ख काय ॥२॥
दु:ख काय आतां स्वप्रसुख जातां ।
साच तें तत्त्वतां दृढ धरा ॥३॥
दृढ धरा मनीं जानकीजीवन ।
तेणें समाधान पावशीध ॥४॥
पावशील सुख स्वरूप आपुलें ।
जरी तें घडलें रामदास ॥५॥


अभंग ॥२०६॥
रामदासा घडे बहुतां सुकृतें ।
कांहीं पुण्य होतें पूर्वजांचें ॥१॥
स्वप्रींच्या सुखानें सुखावला प्राणी ।
थोर झाली हाणी जागृतीसी ॥२॥
जागृतीस नाहीं स्वप्रींचें तें सुख ।
तेणें झालें दु:ख बहुसाल ॥३॥
बहुसाल खेद मानिला अंतरीं ।
वायां झडकरी जागा झाला ॥४॥
जागा झाला म्हणे वायां अवचिता ।
निजोगी मागुता सुख पाहे ॥५॥
सुख पाहे पुन्हां स्वप्रीं तें ना दिसे ।
भयानक दिसे प्राणीयासी ॥६॥
प्राणीयासी दु:ख जाहलें मागुतें ।
जागा जालिया तें सर्व मिथ्या ॥७॥
मिथ्या सुख दु:ख स्वप्रींचा वेव्हार ।
तैसा हा संसार नाथिलचि ॥८॥
नाथिलचि जाय क्षण आनंदाचा ।
सर्वेची दु:खाचा क्षण एक आहे ॥९॥
क्षण एक मन राघवीं सावध ।
तेणें नव्हे खेद दास म्हणे ॥१०॥


अभंग ॥२०७॥
सुख पाहो जातां कांहींची ना दिसे ।
संसार हा असे दु;खमूळ ॥१॥
दु:खामुळें जन्म नरा आणि नारी ।
पाहतां संसारीं सुख नाहीं ॥२॥
सुख नाहीं कदा शाश्वतावांचोनी ।
जाणतील ज्ञानी दास म्हणे ॥३॥


अभंग॥२०८॥
स्त्रियांचें हो जिणें पराधीन झालें ।
पुरुषें विकीलें आपणासी ॥१॥
आपण विकीलें या पोटाकारणें ।
पराधीन जिणें सहजची ॥२॥
सहजची झालें सर्व पराधीन ।
सत्यचि वचन दास म्हणे ॥३॥


अभंग ॥२०९॥
वासनेची झाडी कुबुद्धि वांकुदी ।
वाजे हुडहुडी ममतेची ॥१॥
वैराग्याचा वन्ही विझोनियां गेला ।
संचित खायाला पुण्य नाहीं ॥२॥
भक्ति पांघरूण तें माझें सांडलें ।
मज वोसंडीलें संतजनीं ॥३॥
नामसंजीवनी मुखिं नाहीं पाणी ।
निंदेची पोहोणी प्रबळेची ॥४॥
रामदास म्हणे ऐसियाचें जिणें ।
सदा दैन्यवाणें रामोंविण ॥५॥


अभंग ॥२१०॥
लोभाचे बिराडीं कामी घाली उडी ।
वायांची वेंगडी वळतसे ॥१॥
सदा भक्तीवीण जालें उपोषण ।
झड घाली अन्न खावयासी ॥२॥
माय़ाजाळें आगी सुटली अंतरीं ।
पराघरीं चोरी करीतसे ॥३॥
अंगही चोरितां अंगही सुजलें ।
नाहीं झिजविलें रामालागीं ॥४॥
रामदास म्हणे प्राणी भक्ति उणे ।
तयालागीं सुणें आतळेना ॥५॥


अभंग ॥२११॥
रात्रंदिवस मन राघवीं असावें ।
चिंतन नसावें कांचनाचें ॥१॥
कांचनाचें ध्यान परस्रीचिंतन ।
जन्मासी कारण हेचि दोनी ॥२॥
दोनी नको धरूं नको निंदा करूं ।
तेणें हा संसारू तरसील ॥३॥
तरसील भवसागरीं बुडतां ।
सत्य या अनंताचेचि नामें ॥४॥
नामरूपातीत जाणावा अनंत ।
दास म्हणे संतरांग धरा ॥५॥


अभंग ॥२१२॥
ब्रह्मा विष्णु रुद्र जयाचे अवतार ।
तोचि देव थोर जाण बापा ॥१॥
जाण बापा देव देवासी निर्मिता ।
देव तो तत्त्वतां ठाइ पाडी ॥२॥
ठांई पाडी देव संताचे संगतीं ।
दास म्हणे गति पावशील ॥३॥


अभंग ॥२१३॥
मर्यादा सागरा आणि दिनकरा ।
अंतरिक्ष तारा जयाचेनी ॥१॥
जयाचेनी मेघ पडे भूमंडळीं ।
पिके यथाकाळीं वसुंधरा ॥२॥।
वसुंधरा बहु रंग विस्तारिली ।
जीवसृष्टि झाली जयाचेनी ॥३॥
जयाचेनी सर्व सृष्टि चालताहे ।
तयालागीं पाहे शोधूनियां ॥४॥
शोधूनियां पाहे देव सर्व कर्ता ।
तरिजे आवर्ता जयाचेनी ॥५॥
जयाचेनी भक्ति जयाचेनी मुक्ति ।
जयाचेनी युक्ति वाढतसे ॥६॥
संतसंग जया मानवा आवडे ।
तेणें गुणें घडे समाधान ॥७॥
समाधान घडे सज्जनाचे संगें ।
स्वरूपाच्या योंगें रामदासीं ॥८॥


अभंग ॥२१४॥
ज्याच्या निरूपणें संदेह फिटती ।
त्या गति संगति सज्जनाची ॥१॥
दुर्जनाची कळा सज्जनाचे परी ।
मयिंदाची सरी ब्राह्मणासी ॥२॥
ब्राह्मणासी नाहीं सर्वदा मत्सर ।
शुद्ध निरंतर दास म्हणे ॥३॥


अभंग ॥२१५॥
जया जैशी गति तया तैसी संगति ।
समागमें रिती सर्व कांहीं ॥१॥
सर्व कांहीं घडे सगतीच्या गुणें ।
साधूंचीं लक्षणें साधुसंगें ॥२॥
साधुसंगें साधु होईजे आपण ।
रामदास खूण सांगतसे ॥३॥


अभंग ॥२१६॥
दुर्लक्ष हा जन्म विषय नरदेह ।
याहीवरी सोय राघवाची ॥१॥
राघवाची सोय सद्भावें भजन ।
आणि संतजन समागमीं ॥२॥
समागमीं संत श्रवणीं निवांत ।
अनंताचा अंत ठांई पडे ॥३॥
ठांई पडे देव संतसमागमें ।
आपल्या स्वधर्मे पुण्यशीळ ॥४॥
पुण्यशीळ देह ज्ञानी नि:संदेहें ।
सर्वकाळ राहे स्वस्वरूपीं ॥५॥
स्वस्वरूपीं मन गेलिया जन्मन ।
मन मिथ्या भान आढळेना ॥६॥
आढळेना कदा मिथ्या मायाजाळ ।
तोचि तो केवळ समाधानी ॥७॥
समाधानी साधु जेथें ज्ञानबोधू ।
रामदासीं वेधू निर्गुणाचा ॥८॥

पंचीकरण ओवी संख्या ॥१४३८॥


पंचीकरण-संत-रामदास समाप्त 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *