श्री ज्ञानेश्वर स्तोत्र

श्री ज्ञानेश्वर स्तोत्र

देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.


श्री ज्ञानेश्वर स्तोत्र – प्रभु सद्गुरुसी करुनी प्र…

प्रभु सद्गुरुसी करुनी प्रणाम ।
करी मानसा, शुद्धता शांतिधाम ॥
मग ज्ञानदेव-स्तवा । मी प्रवृत्त ।
नमो ज्ञानिया तूं महा श्रेष्‍ठ संत ॥१॥
श्री पैठणासन्निध दिव्य भूला ।
आपेगांविं, साधूचि जन्मासि आला ॥
सुपुत्र, मातेसि संतोष व्हावा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥२॥
संन्याशि यासीच सुपुत्र झाला ।
म्हणूनि वाळींत द्विजांनीं ठेला ॥
परी योग्यता पाहतां मान द्यावा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥३॥
रेडयामुखीं वेदचि बोलवीला ।
द्विजसंघ सगळाहि संतुष्‍ट झाला ॥
म्हणूनि देवासम हा स्तवावा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥४॥
भावंड चारी, समवेत बैसे ।
भिंतीवरी ओपचि घेत भासे ॥
भेटे अशा कालिंच चांगदेवा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥५॥
चांगाची व्याघ्रावरुनी, किं आला ।
सर्पासि आसूड करिं घेववीला ॥
जडभिंति चालेचि, होई सजीवा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥६॥
निवृत्ति ज्ञानदेव, सोपानकाका ।
मुक्ताई, चत्वारि भावंड, ऐका ॥
अवतारि पुरुषांसम, मानिं देवा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥७॥
इंद्राहुनी वैभविं फार थोर ।
इंद्रायणी दिव्य सरित्-सुतीर ॥
तटीं तियेचे चिरवास ठेवा ।
नमोदेव-देवा, तुम्हां ज्ञानदेवा ॥८॥
आषाढ कार्तीक या दोन मासीं ।
पाहा कृष्ण पक्षींच एकादशीसी ।
विठू पंढरीचा अकस्मात् यावा ।
नमस्कार माझा तुला ज्ञानदेवा ॥९॥
समाधीसि वंदी प्रभू पंढरीचा ।
असा भक्त प्रेमाहि अन्यत्र कैचा ॥
वर्णूं कसा मी अतुल प्रभावा ।
नमस्कार माझा तुला ज्ञानदेवा ॥१०॥
जयाचे सभा-मंडपीं, घोषवीणा ।
अखंड ध्वनी ईश-नामासि जाणा ।
असा छंद आळंदि भक्तस्वभावा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥११॥
ज्ञानेश्वरी ही कृति थोर ज्याची ।
’अमृतानुभव’ ही रचना तशीची ॥
ग्रंथ द्वयीं त्या प्रगटीं सुभावा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१२॥
अजाना-तरुचेंचि ऐश्वर्य फार ।
अशा कल्पवृक्षासि थारा समोर ॥
सिद्धेश्वरा संमुख वास व्हावा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१३॥
महाद्वारिं सौवर्ण अश्वत्थ डोले ।
“सेवा, सुपुत्रासि देईंच” बोले ॥
अशा वैभवा योग्य, तो पूर्ण व्हावा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१४॥
समाधी नव्हे, पाहिं साक्षात् सुदेव ।
दिसे त्यांसि ऐसा जयांचें सुदैव ॥
समर्पीं तयाला उपचार सर्व ।
नमो संतवर्या तुम्हां ज्ञानदेवा ॥१५॥
ज्ञानेश विष्णूचि साक्षात् पहावा ।
आळंदि वैकुंठ कीं, भाव ठेवा ॥
श्रीपंढरी तुल्य महिमाची गावा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥१६॥
महोदार तूं घातलीसे गवांदी ।
भक्तां सुभक्तांचि मोक्षाचि, आदि ॥
तिथें वैष्णवांची मिनलीच मांदी ।
नमो ज्ञानराया अनंता अनादि ॥१७॥
सिद्धेश्वराचें स्वयंभूचि स्थान ।
म्हणूनी तदाज्ञाचि देवां प्रमाण ।
“वसा येथ, सांभाळित ज्ञान देवा” ।
परब्रह्म सांगे, नमो त्यां सुदेवां ॥१८॥
शंकर प्रभू तो निवृत्तीच झाला ।
भगवान् विष्णूचि, ज्ञानेश बनला ।
सोपान ब्रह्माचि, मुक्ताई माया ।
अशा सगुण ब्रह्मा, नमो, शीरपायां. ॥१९॥
“चांग देव पासष्‍टि” चांग्यासि सांगे ।
इतरां सुभक्तां “हरिपाठ” जागे ॥
अभंगावली योग ज्ञानासी ठेवा ।
नमो संतवर्या, नमो ज्ञानदेवा ॥२०॥
आळंदि क्षेत्रीं प्रतिव्यक्ति देव ।
उपतिष्‍ठती जेथ देवाधिदेव ॥
सदा, वा,सुपर्वींच भेटीसीं जावें ।
नमो ज्ञानराया, नमो भक्तिभावें ॥२१॥
ज्ञानेश्वरांनीं सहनाम देवा ।
तीर्थाटणें केलिं सुभक्ति भावा ॥
’द्वारका प्रभासादि’ अनेक क्षेत्रें ।
पाहून केलींच पवित्र गात्रें ॥२२॥
बिकानेर प्रांतीं ’कोलादगी’ त्या ।
ग्रामीं जला काढिति, आत्मशक्‍त्या ॥
नामाकरी विठ्ठल प्रेमधावा ।
ज्ञानेश दावी किं, योगप्रप्रभावा ॥२३॥
दोघेही ज्ञानचि सुभक्त होते ।
परंतु ज्ञानेशयोगीहि ज्ञाते ॥
भक्तद्वयांचा अशिर्वाद व्हावा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥२४॥
“बाप रखुमादेवीवरु विठ्ठलू” हा ।
अभंगासी ’पालूपदा’ तुम्हि पाहा ॥
नमी शंकरा पार्वती दोन्ही देवां ।
प्रकृती पुरुषात्मकां आदिदेवा ॥२५॥
ही खूण ज्यांच्या अभंगासि व्हावी ।
अशा ज्ञानदेवां प्रणती करावी ॥
प्रार्थीं किं दे भक्ति, मुक्तीच देवा ।
नमस्कार माझा तुम्हां ज्ञानदेवा ॥२६॥
’ज्ञानेश नाम् देव’ काशीसि जाती ।
विश्वेश्वरीं, त्यांसि सामोरे येती ॥
प्रेमें धरीला कर, विश्वनाथें ।
हें प्रेम वर्णूं किती म्यां अनाथें ॥२७॥
नामदेव गुरु संत विसोबा ।
खेचरुं जरि वालि विठोबा ।
ज्ञानदेवचि दाखवि हा गुरु ।
ज्ञानिया नमिंच, मोक्षदसद्गुरु ॥२८॥
काशीचि यात्रा करुनी निघाले ।
खानदेशिं तापी तिरिं सर्व आले ।
वाळुवंटिं नाचूनि भजनीं सुरंगीं ।
पंढरपुरा, मागुति येति मार्गीं ॥२९॥
निवृत्ति, ज्ञानेश, सोपान, नामा ।
विसोबाचि, परिसा निष्काम प्रेमा ॥
पंढरीं, सुक्षेत्रीं आनंद केला ।
नमो त्याच ज्ञानेश्वरा सद्गुरुला ॥३०॥
निवत्तिनाथांसि गुरु ज्यांनिं केला ।
वडील बंधूचि बहुवंद्य झाला ॥
अद्भूत प्रेमें बहुपूज्य भावा ।
दावी तया, मी नमिं, ज्ञानदेवा ॥३१॥
श्रीआदिनाथें कीं, मच्छिंद्रनाथा ।
मच्छिंद्र्नाथेंचि गोरक्षनाथा ॥
गोरक्षनाथें गहिनीचनाथा,
गहिनीहिनाथें निवृत्तिनाथा ॥३२॥
एकैक सोडूनि परंपरेनें ।
महेश विष्णूची अवतार सगुणें ॥
परस्परांसी उपदेश केला ।
परब्रह्म तत्त्वासिच बोधीयेला ॥३३॥
म्हणुनी निवृत्ती गुरु शंभू झाला ।
ज्ञानेश विष्णूसि सद्बोध केला ।
ऐशी गुरुशिष्य जोडीच कोठें ।
नमो ज्ञानदेवा, तव भाग्य मोठें ॥३४॥
अशा गौरवाचें रमणीय स्तोत्र ।
जयाचेंही गाई बहुपुण्य वक्त्र ॥
तो साधुसंतामधिं हो पवित्र ।
द्या केशवा या बहु ’दिव्यमंत्र’ ॥३५॥

श्रीज्ञानेश्वर महती – अजान वृक्षासि महत्त्व ऐसे…

अजान वृक्षासि महत्त्व ऐसें ।
तत्पर्ण भक्षील, अज्ञान नासे ॥
त्वग्रोम होतील बरे क्षणांत ।
देहात्मबुद्धीहि लयासी जात ॥१॥
भूमीवरी गलितपर्ण असे जरी ।
घेईं तरीच न तोडिं तरुवरी ।
तोडीनवें तरि ज्वरादि बहू विकार ।
दुष्‍टाहि व्याधि जडती शरिरींच फार ॥२॥
सुवर्ण-अश्वत्थ तरुसि घाली ।
प्रदक्षिणा, लक्ष तरीच वाली ॥
ज्ञानेश, त्यासीच सुपुत्र देतो ।
तो भक्त-संकल्प संपूर्ण होतो ॥३॥
सिद्धेश्वर प्रभु असेचि स्वयंभु स्थान ।
प्रत्यक्ष शंकर तिथें वसतोच जाण ॥
तत्रैक घेतलि समाधि गुरुनीं म्हणून ।
नान्या स्थला वचति हे चि, तयाचि खूण ॥४॥
ज्ञानेश-भगवंत-समाधि वास ।
तत्स्थान पावित्र्य कळे जनांस ।
श्रीविष्णु लक्ष्मीसि जिथें निवास ।
वैकुंठ तें येथ उभेंचि खास ॥५॥

आर्या
डोळे भरुनी पाही, समाधिही भक्तवर्य तूं आतां ।
म्हणजे वाटे येथुनि हालवेंना मुळींच बा ताता ॥६॥
श्र्लोक
प्रदक्षिणापंथिं बसेचि मुक्ता ।
ही आदि माया, परि, व्यक्त भक्तां ॥
इजशीं करीं तुं विनय प्रणाम ।
“ज्ञानेश ज्ञानेश” वद संत नाम ॥७॥
आर्या
बुक्का वाहि समाधीवरि,
कर्पुर लाविं, सन्निधिं समोर ।
देवा सुगंध घ्याया, ज्ञान-प्रकाशा,
तमासि ना, थार ॥८॥
श्र्लोक
श्रीफळा सुमनें तुलसीदल ।
दक्षिणा मग अर्पुनि, निर्मळ ॥
अंतरंग, मग प्रार्थिंच “दर्शना ।
नित्य देईं मला शुचि भावना ” ॥९॥

श्रीमध्वमुनीश्वराचें पद – शुकसनकादिक महिमा ज्याचा व…

शुकसनकादिक महिमा ज्याचा वर्णिती वेदपुराणींरे ।
गोकुळीं गोवळ होउनि गाई, चारी चक्रपाणीरे ।
जो हा पांडव घरिं हरि सारथि, पाजी तुरगा पाणीरे ।
तो हा सद्गुरु ज्ञानेश्वर हरि स्मरणें तारी प्राणी रे ॥१॥
ज्यानें केली भगवद्गीतेवरतीं सुंदर टीका रे ।
सादर परिसति होती त्यांची संसारांतुनि सुटकारे ।
प्राकृत भाषा रुचिकर रचिली करुनि सुधारस फिकारे ।
विरक्ति भक्ति ज्ञानाचाही पोषितो रस निकारे ॥२॥
दगडाची ही भिंति जयानें चालविली जड मातीरे ।
पैठणीं दिधली वेद परीक्षा वेडया रेडया हातींरे ।
सुवर्णाचा पिंपळ ज्याच्या द्वारी वैष्णव पहातीरे ।
अजान वृक्षाखालीं शांभव आसन घालुनि राहातीरे ॥३॥
मुक्तीपुरिहुनि श्रेष्‍ठ सनातन पाहतां क्षेत्र आळंदीरे ।
इंद्रायणीचें जळ जो सेवी, इंद्रपदासी निंदीरे ।
ज्याचे सन्निध सिद्धेश्वर तो सन्मुख शोभे नंदीरे ।
कार्तिक मासीं पंढरपुरपति, समाधि ज्याची वंदीरे ॥४॥
’ज्ञानेश्वर’ या नामाचा जो जप करि अनुदिनीं वाचेरे ।
त्याचे हृदयीं परमेश्वर तो, लक्ष्मी घेऊनि नाचेरे ॥
ज्याची टीका श्रवणीं पडतां, भवभय पर्वत कांचेरे ।
अगणित गुणागण मध्वमुनीश्वर वर्णीतो हे वाचेरे ॥५॥

श्रीविठ्ठलवर्णन – नमो चंद्रभागातटीं-संनिवेश…

नमो चंद्रभागातटीं-संनिवेशा ।
नमो पुंडलीकार्पित प्रेमपाशा ॥
नमो रुक्मिणीप्राणदा, पंढरीशा ।
नमो विठ्ठला, पांडुरंगा परेशा ॥१॥
नमो विठ्ठला रुक्मिणीच्या सुरंगा ।
नमो राधिका सत्यभामा वरांगा ॥
परब्रह्म तूं पंढरीनाथ गंगा ।
करी शुद्ध दासा उठीं पांडुरंगा ॥२॥
नमो विठ्ठला, पंढरीनाथ, देवा ।
शिरीं वाहसी शंकरा आदिदेवा ॥
सदा चंद्रभागातटीं वास व्हावा ।
महा पुंडलीकासमेत स्मरावा ॥३॥
“विठोबा रखूमाई” घोषमात्रें ।
भरे दिव्य मंदीरही, भक्त-वक्त्रें ।
कुपात्रा सुपात्रा मिळे मुक्ति स्तोत्रें ।
अशा त्या कटी-हस्तिं, सामर्थ्यमंत्रें ॥४॥

श्रीविठ्ठलवर्णन – भैरवी ( माधवे सखि माधव…

भैरवी
( माधवे सखि माधवे )
(विठ्ठल पद)
( केशवकृत )
विठ्ठला, प्रभु, विठ्ठला,
पाळिसि भक्तजनां सकलां ॥धृ०॥
उभा विटेवरी, कटींकर ठेवुनी,
दावी सुंदर तवरुपाला ॥१॥
शिरीं वाहसी शंकर प्रभूला,
दाविसी अनंत चमत्कृती लीला ॥२॥
भीमरथीच्या तटीं राहुनी,
भक्तां मोहिसी त्रिभुवनपाला ॥३॥
पुंडलिकाची आज्ञामानुनी,
तिष्‍टसी, नंद सुबाला ॥४॥
गोपाळपुरीं गोपांसम जाऊनि,
खेळसी तूं दहिकाला ॥५॥
भजनी दिंडया जमुनी अर्पिती,
’रामकृष्णहरी’ सुपुष्प माला ॥६॥
गरुड हनूमान् सन्मुख असती,
कवटाळिति जन, गरुड खांबाला ॥७॥
सुमनें तुळसी दलसमृद्धी ।
पाहुनि तोष मनाला ॥८॥
राधा रुक्मिणी सत्यभामा,
दूर उभ्या, रुसुनी गोपाला ॥९॥
कान धरुनी गिरकी घेऊनी ।
प्रेमें मारिती उंच उडीला ॥१०॥
नामदेवाची पायरी स्पर्शुनी,
प्रवेश करीं मंदिरद्वाराला ॥११॥
पंढरिला वैकुंठ बनवीसी, विष्णु,
कृष्ण, तो विठ्ठल सजला ॥१२॥
पांडुरंगदेवाला प्रार्थी,
अखंड दे दर्शन दासाला ॥१३॥
नगर प्रदक्षिणा पुण्य बहुतची,
शक्यतरी साधि योगाला ॥१४॥
नामदेव तुकाराम, भक्त शिरोमणी,
प्रसन्न होसी या जोडीला ॥१५॥
चंद्रभागेच्या एका स्नानें,
भक्त जन उद्धरला ॥१६॥
(श्र्लोक)
एके दिनीं अद्भुत होई मोठें,
राऊळिंचा देवचि जाय कोठें ।
आळंदिसी जाऊनी तो प्रतिष्‍ठे,
मानी तसें वांढचि स्वप्रतिष्‍ठें ॥१७॥
(भैरवी)
कार्तिक मासीं कृष्ण हरि दिनी,
इंद्रायणिचे तीरीं गेला ॥१८॥
श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या,
समाधि दर्शनीं गढला ॥१९॥
स्वग्रामाहुनी आळंदि येऊनी,
संतागौरव केला ॥२०॥
देव स्वयें हा असुनी विठ्ठल,
संतदर्शनीं रमला ॥२१॥
आषाढमासीं असाच येई ।
धरुनी त्या हेतूला ॥२२॥
’विठ्ठल, विठ्ठल’ ऐसें जपुनी ।
मुक्तिलाभ हा झाला ॥२३॥
विठ्ठला प्रभु विठ्ठला ।
श्री.
धन्य धन्य पुंडलीका,
तरणोपाय केला लोकां
एका दर्शनें उद्धार,
केले पावन चराचर ॥१॥
चंद्रभागा पंढरपूर,
भक्त आणि हरिहर ॥२॥
निळा म्हणे सुलभ केलें ।
भूमि वैकुंठा आणिलें ॥३॥
अचळ धरा जैसे पीठ ।
पायांखालीं मिरवे वीट ॥१॥
दोन्ही पाऊलें समान ।
योगियांचे जैसे नयन ॥२॥
जानुजंघ ते स्वयंभ ।
जैसे कर्दळीचे स्तंभ ॥३॥
कशियेलें पीतवसन ।
झळके विद्युल्लतेसमान ॥४॥
शेष बैसला वेटाळा ।
तैसा कटी-बंध, मेखळा ॥५॥
समुद्र खोलीये विशाळ ।
तैसें नाभीचें मंडळ ॥६॥
तुळशी मंजरिया गळां ।
जैशा सुटल्या मेघमाळा ॥७॥
दिग्गजाचे शुंडादंड ।
तैसें कटीं, कर-प्रचंड ॥८॥
पूर्णिमेचा उदो केला ।
तैसा मुखचंद्र शोभला ॥९॥
जैशीं नक्षत्रें झमकती ।
तैशीं कुंडलें चमकती ॥१०॥
सूर्य मिरवे नभमंडळा ।
तैसा केशराचा टिळा ॥११॥
क्षीराब्धींचे चंचळ मीन ।
तैसे नेत्रीं अवलोकन ॥१२॥
जैसें मेरुचें शिखर ।
तैसा माथां मुकुट स्थिर ॥१३॥
इंदुप्रकाशें वेढीला ।
तैसा क्षीरोदकें वेष्‍टिला ॥१४॥
तृप्तिलागीं चातक पक्षी ।
निळा तैसा ध्यानलक्षीं ॥१५॥
चला पंढरीसी जाऊं ।
रखुमादेवीवर पाहूं ।
डोळे निवतील कान ।
मना तेथें समाधान ।
संता महंता होतील भेटी ।
आनंदें नाचूं वाळुवंटीं ।
तेथें तीर्थांचें माहेर ।
सर्व सुखांचें भांडार ।
जन्म नाहीरे आणीक ।
तुका म्हणे माझी भाक ॥
सुंदर तें ध्यान उभा विटेवरी ।
कर कटीवरी ठेवोनियां ॥
मकर कुंडलें तळपती श्रवणीं ।
कंठीं कौस्तुभमणी विराजित ॥
गळां तुळशीहार । कांसे पितांबर ।
आवडे निरंतर ध्यान तेंचि ॥
तुका म्हणे माझें हेंचि सर्व सुख ।
पाहीन श्रीमुख आवडीनें ॥
पांडुरंग श्रीरंग, भजोरे मना ।
भजोरे मना बा भजोरे मना,
पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥ध्रु०॥
अमोलिक जाते वय,
आतां तरी धरी सोय ।
ऐसा कैसा मानव देह,
येईल पुन्हां बा येईल पुन्हा ॥
पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥१॥
रात्रंदिन करिसी मजा ।
केव्हां येईल यमराजा ।
घेऊन जाईल प्राण तुझा यमसदना, बा यमसदना ॥
पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥२॥
विषयाचें सुख द्वाड ।
येथें वाटे बहु गोड ।
पुढें आहे अवघड ।
यमयातना, बा यमयातना ।
पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥३॥
नामा म्हणे एक करा ।
हरिचरण दृढ धरा ।
चुकेल चौर्‍याशींचा फेरा ।
तुझीया प्राणा ।
बा तुझीया प्राणा ।
पांडुरंग श्रीरंग भजोरे मना ॥४॥
उभा चला पाहूं ।
तुलसी माळ गळां वाहूं ।
विठोबा उभा ॥
उभा विटेवरी दोन्ही कर कटेवरी ।
विठोबा उभा ॥
उभा राऊळांत ।
विठोबा पंढरपुरांत ।
विठोबा उभा ॥
उभा वाळुवंटीं त्याचे चरणीं घालुं मिठी ।
विठोबा उभा ॥१॥

भजन – लक्ष्मी शार्ङ्गधर सीतापति…

लक्ष्मी शार्ङ्गधर सीतापति रघुवीर, राधे गोविंद ।
रखुमाई पांडुरंग, रखुमाई पांडुरंग रखुमाई पांडुरंग ॥१॥
रामसीता कृष्ण राधा विठ्ठल रखुमाई,
गोपीजनमनमोहन व्यापक हरि सर्वांठायीं ॥२॥
विठोबा रखुमाई, जयजय विठोबा रखुमाई,
सांवळ्या विठोबा रखुमाई ॥३॥
शिव शंकर हर, गिरिजावर शशिशेखर गणपतितात शिवा ।
हर हर हर हर महादेव शिव सांब सदाशिव सांब शिवा ॥४॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ॥५॥
नारायण विधि अत्रिनाथ । दत्तजनार्दन एकनाथ ॥६॥
श्रीपुंडलीक वरदा हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय ।
श्री एकनाथ महाराज की जय ।
श्री सबसंतान की महाराज की जय ।
श्रीगुरुदेवदत्त


ज्ञानेश्वर स्तोत्र समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *