भारुड

भारुड

भारुड – आंधळा – आधि देखत होतो सकळ । मग ह…

आधि देखत होतो सकळ ।
मग ही दृष्टी गेली आले पडळ ।
चालत मार्ग न दिसे केवळ
आता मज करा कृपा मी दीन तुम्ही दयाळ ॥१॥
दाते हो दान करा तुम्ही संत उदार ।
चालता मार्ग दाखवा मज निर्धार ।
गुंतलो, लोभ आशा न कळे विचार ।
दृष्टी ते फिरवूनी द्या मुखी नामाचा उच्चार ॥२॥
त्रैलोक्यात तुमची थोरी पुराणे वर्णिती साचार ।
वेदही गाती तया नकळे निर्धार ।
कीर्ती गाती सनकादिक तो दाखवा श्रीधर ।
म्हणोनि धरिला मार्ग नका करू अव्हेर ॥३॥
अंधपण सर्व गेले श्रीगुरुचा आधार ।
तेणे पंथे चालताना फिटला मायामोह अंधार ।
एका जनार्दनी देखिला परे परता पर ।
श्री गुरु जनार्दन कृपेने दाविले निजघर ॥४॥


आशीर्वादपत्र – चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार…

चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद ।
पत्र लिहिणे कारण जे तुम्हास देहगावची सनद शंभर वर्षांनी देऊन पाठविले ।
कलम तपसील । गावची आबादी करावी ॥ १ ॥
कामक्रोध हे रयत त्यांचे ऎकू नये । कलम तपसील ॥ २ ॥
आशा मनषा यांची संगत धरू नये ।कलम० ॥ ३ ॥
सदा स्वधर्मे वागणूक ठेवणे ।कलम तपसील ॥ ४ ॥
शांतिक्षमादया असो देणे ।कलम तपसील ॥ ५ ॥
ज्ञान वैराग्य – भजनपूजनी आदर ठेवणे ।कलम तपसील ॥ ६ ॥
ही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले । तुम्ही तों ते विसरून सदरींचे कलमास न अनुसरून । वाईट वागणुकीचा रस्ता काढला । तो तुम्हास परिणामी बाधक होईल । सावध रहाणे । एका जनार्दनी शरण । हे आशीर्वादपत्र


भारुड – अंबा – सत्वर पाव गे मला । भवानी …

सत्वर पाव गे मला । भवानी आई रोडगा वाहिन तुला ॥ १ ॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥ २ ॥
सासू माझी जाच करिते । लौकर निर्दाळी तिला ॥ ३ ॥
जाऊ माझी फडफड बोलति । बोडकी कर गं तिला ॥ ४ ॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे तिला ॥ ५ ॥
दादला मारून आहुति देईन । मोकळी कर गं मला ॥ ६ ॥
एका जनार्दनि सगळेच जाऊ दे । एकलीच राहू दे मला ॥ ७ ॥


भारुड – अयोध्येचा हो देव्हारा

अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा ।
डोळे फिरवी गरगरा ॥ १ ॥
मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ धृ. ॥
रामाबाईचा घरचारू । चौघाजणांचा व्यापारू ।
सहा अठराचा पडिभारू ॥ २ ॥
रामाबाईचा वो शेला । ब्रह्म शेटिने विणिला ।
तुजलागी पांघुरविला ॥ ३ ॥
येथोनि जालासे सोहळा । रामाबाईला वोवाळा ।
एका जनार्दनी मुळा ॥ ४ ॥


भारुड – माझे कुळीची कुळस्वामिनी

माझे कुळीची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी ।
येई वो पंढरपूरवासनि । ठेवीले दोन्ही कर जघनी ।
उभी सखी सजनी ॥ १ ॥
येई पुंडलिक वरदायिनी ।विश्वजननी । रंगा येई वो ॥ धृ. ॥
मध्ये सिंहासन घातले । प्रमाण चौक हे साधले ।
ज्ञान कळस वर ठेवले ।
पूर्ण भरियले । धूप दाविले दंड । सुवासे करूनि ॥ २ ॥
सभा मंडपो शोभला । भक्‍ती चांदवा दिधला ।
उदो उदो शब्द गाजला ।रंग माजला ।
वेद बोलला । मूळचा ध्वनि ॥ ३ ॥
शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेऊनी संबळी ।
गाती हरीची नामावळी
मातले बळी । प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥ ४ ॥
ऎसा गोंधळी घातिला । भला परमार्थ लुटिला ।
एका जनार्दनी भला । ऎक्य साधिला ।
ठाव आपुला । लाभ त्रिभुवनी ॥ ५ ॥


भारुड – बहिरा जालो या या जगी

बहिरा जालो या या जगी ॥धृ. ॥
नाही ऎकिले हरिकीर्तन ।
नाही केले पुराण श्रवण ।
नाही वेदशास्त्रण पठण ।
गर्भी बहिरा झालो त्यागुन ॥१॥
नाही सन्तकीर्ति श्रवणी आली ।
नाही साधूसेवा घडियेली ।
पितृवचनासी पाठ दिधली ।
तीर्थे व्रते असोनी त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता ।
शब्द नाही दिला मागुता ।
बहिरा जालो नरदेही येता ।
एका जनार्दनी स्मरे न आता ॥३॥


भारुड – संसार नगरी बाजार भरला भाई

संसार नगरी बाजार भरला भाई ।
कामक्रोध लोभ याचे गिर्‍हाइक पाही ॥ १ ॥
यात सुख नाही त्यात सुख नाही ।
या हाटाचे सुख कोठे नाही ॥ २ ॥
या हाटासी थोर थोर मेले ।
नारद शुक भीष्म उमगले ॥ ३ ॥
आणिक संती बाजार पाहिला ।
व्यर्थ जाणोनि निराश भाविला ॥ ४ ॥
या बाजारी सुख नाही भाई ।
माझे माझे म्हणॊ वोझे वाही ॥ ५ ॥
एका जनार्दनी बाजार लटिका ।
संतसंगावाचुनी नोहे सुटिका ॥ ६ ॥


भारुड – अलक्ष लक्ष मी भिकारी

अलक्ष लक्ष मी भिकारी ।
म्हणोनी आलो सद्‌गुरुद्वारी ।
भिक्षा मागतो नाना परी ।
कोण्ही वाचे स्मरा मुरारी ॥१॥
बाबा बाळसंतोष ॥धृ. ॥
चार युगे करुनी फेरी ।
हिंडो सद्‌गुरुचे द्वारी ॥२॥
भिक्षा मागो अलक्षपुरी ।
तेणे तुटेचौर्‍याऎंशी फेरी ॥३॥
शरण एका जनार्दन ।
तुटले देहाचे बंधन ।
कर्माकर्माचे खंडन ।
गेले विलया जीवपणा ॥४॥


भारुड – आम्ही परात्पर देशी

आम्ही परात्पर देशी ।
कोणी नोळखती आम्हासी ।
टाकून आलो संतापाशी ॥१॥
बाळसंतोष बाबा ॥धृ. ॥
जीर्ण स्वरूपाचा शेला ।
विषय भोगीता विटला ।
तो मज द्याव दाते वहिला ॥२॥
ऎकत्वाचे बिरडे जोडी ।
त्रिगुणासी कसणी फेडी ।
जुनी कांसणी रोकडी ॥३॥
पूर्णत्वाची पुरणपोळी ।
स्नेहावरील तेलवरी ।
प्रबोध लाडू तयावरी ॥४॥
एका जनार्दनी मागतादान ।
जिताची जाण जीवपण ।
शेखी दिले शिवपण ॥५॥


भारुड – नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशी संन्याशी

नाहं जोगी नाहं भॊगी नाहं जोशीसंन्याशी ।
नाहं कर्मी नाहं धर्मी उदासी ना घरवासी ॥ १ ॥
बाबा अचिंत्य रे बाबा अचिंत्यरे ब्रह्मी स्फुरे सो माया ।
नाम नाही ना रूप रेखा सो भई हमारी काया ॥ ध्रु. ॥
नाहं सिद्धा नाहं भेदा नाहं पंडित ज्ञानी ।
नाहं जपी नाहं तपी नाहं ध्येय ध्यानी ॥ २ ॥
नाहं पीडा ना ब्रह्मांडा नाहं जीव शीव कोई ।
नाहं पुरूषा नाहं नारी नाहं देव विदेही ॥ ३ ॥
नाहं सद्‌रूप नाहं चिद्‌रूप नाहं आनंद भोगे
जनार्दन पुता अभिन्न एका निर्विकल्प भये अंगे ॥ ४ ॥


भारुड – भूत जबर मोभूत जबर मोठे गं बाई ।

झाली झडपड करूं गत काई ॥ १ ॥
झाली झडपड करूं गत काई ।
सूप चाटूचे केले देवऋषी ॥
या भूताने धरिली केशी ॥ २ ॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा ।
त्या भूताने धरिला थारा ॥ ३ ॥
भूत लागले नारदाला ।
साठ पोरे झाली त्याला ॥ ४ ॥
भूत लागले ध्रुव बाळाला ।
उभा अरण्यात ठेला ॥ ५ ॥
एका जनार्दनी भूत ।
सर्वांठायी सदोदित ॥ ६ ॥ठे गं बाई


भारुड – आंधळा पांगळा

असोनिया दृष्टी जाहलो मी आंधळा ।
आपंगिले जिद्दी जाहलो त्या वेगळा ।
मायबाप माझे म्हणती मज माझ्या बाळा ।
शेवटी मोकलिती देती हाती काळा ॥१॥
संत तुम्ही मायबाप माझी राखा काही दया ।
लागतो मी वारंवार तुमचिया पाया ॥धृ. ॥
इंद्रीये माझी न चलती क्षणभरी ।
गुंतलो मायामोहे या संसाराचे फेरी ॥
अंथरूण घातले इंगळाचे शेजेवरी ।
कैशी येईल निद्रा कोण सोडवील निर्धारी ॥२॥
मायबाप संत तुम्ही उपकार करा ।
जगी जो नांदतो जनीं जनार्दन तो खरा ॥
तयाचिया चरणावरी मस्तक निर्धारा ।


भारुड – आंधळा पांगळा झालो मी अंधपंगु

ॐकार निजवृक्ष त्यावरी वेधलो प्रत्यक्ष ।
दान मागी रामकृष्ण जनार्दना प्रत्यक्ष ॥१॥
झालो मी अंधपंगु । माझा कोणि न धरती संगु ॥धृ. ॥
चालता वाट मार्गा मज काही दिसेना ।
उच्चारिती नाम संतमार्गे चाललो जाणा ॥२॥
पाहुनी पंढरी पेठ अंधपणा फिटलो ।
एका जनार्दनी संतपायी लीन झालो ॥३॥


भारुड – आंधळा पांगळा दाते बहु असती परि

दाते बहु असती परि न देती साचार ।
मागत्याची आशा बहु तेणे न घडे विचार ।
सम देणे सम घेणे या नाही प्रकार ।
लाजिरवाणे जिणे दोघांचे धर्म अवधा असार ॥१॥
तैसा नोहे दाता माझा जनार्दन उदार ।
तुष्टला माझ्यादेही दिधले त्रक्षय अपार ।
न सरेची कल्पांती माप लागले निर्धार ।
मागणेपण हारपले दैन्य गेले साचार ॥२॥
देऊनी अक्षय दान पदा बैसविला अढळ ।
माया मोह तृष्णा हाचि चुकविला कोल्हाळ ।
एका जनार्दनी एकपणे निर्मळ ।
शरण एका जनार्दनी कायावाचा अढळ ॥३॥


भूत्या – भवानी मी तुझा भुत्या खरा …

भवानी मी तुझा भुत्या खरा ॥ धृ॥
आनुहात चवडंक वाजत डुगडुग । होतो घोष बरा ॥१॥
बोधाची परडी ज्ञानाचा संबळ । आज्ञान तो पोत खरा ॥२॥
एका जनार्दनी भुत्या मी झालो । तुझे पायी मी खरा ॥३॥


भारुड – पंधरा सतरांचा सतरांचा हा …

पंधरा सतरांचा सतरांचा हा मेळा । कारखाना झाला गोळा ।
वाजविती आपुल्या कळा । प्रेम बळा आनंदे ॥ १ ॥
झडतो नामाचा चौघडा ॥धृ. ॥
झडतो नामाचा चौघडा । ब्रह्मी ब्रह्मरूपींचा हुडा ।
संत ऎकताती कोडा । प्रेमबळा आनंदे ॥ २ ॥
जनाबाई घड्याळ मोगरी । घटिका भरिता टोलामारी ।
काळ व्यर्थचि गेला तरी । गजर करी आनंदे ॥ ३ ॥
नामा दामा दोन्ही काळु । नारा विठा दमामे फैलु ।
चौघीसुना चारी हेळु । कडकडा बोल उमटती ॥ ४ ॥
गोंदा महादा करणी करी । नामे दुमदुमली पंढरी ।
आडबाई तुतार ।मंजुळ स्वर उमटती ॥ ५ ॥
गोणाबाई नौबत पल्ला । नाद अंबरी कोंदला ।
राजाई झांज मंजुळ बोला । मंजुळस्वर उमटती ॥ ६ ॥
तेथे चौका बारी दार । काटवन विजन जाळीचे सार ।
अवघे झाडवणीमहार । एका जनार्दनीपार उतरविला ।
झडतो नामाचा चौघडा ॥ ७ ॥


चोपदार – चोपदार आला चोपदार आला ॥धृ…

चोपदार आला चोपदार आला ॥धृ॥
माझे चोपदाराचे राहणे ।
आकाश स्वर्ग पाहणे ।
चतुर्मुख ब्रह्मा चकित होऊन ।
निराकारींची वस्ती दिधली विष्णूने ॥ १ ॥
शंख चक्र गदा घेऊन ।
महादेवी शून्य द्वारपाळ जाण ।
कळिकाळा टाकिन छेदून ।
रंडी चंडीशक्‍ती टाकीन भेदून ।
चोपदार आहे मी जाण ॥ २ ॥
आम्हांस नाही उपाय ।
आम्हांस नाही बाप ना माय ।
खरी चाकरी कोठे करावी ।
एका जनार्दनी दृढ धरावी ॥ ३ ॥


दादला – मोडकेसे घर तुटकेसे छप्पर …

मोडकेसे घर तुटकेसे छप्पर ।
देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकेच लुगडे तुटकिसी चोळी ।
शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर अंबाड्याची भाजी ।
वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार ।
नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने ।
राज्यात लेणे नाही ॥५॥
एका जनार्दनी समरस झाले ।
पण तो रस येथे नाही ॥६॥


डाका – सुंदरे, चिद्‌‍घने, माझे र…

सुंदरे, चिद्‌‍घने, माझे रंगा येई वो माते ।
वाजविली डाक सत्वर पावे दीनानाथे ॥ १ ॥
भरिला ह्रदयी चौक भोग आनंदा घातला ।
सोहं सुमन माळा घट पूर्णत्वे भरला वो ॥ २ ॥
अहं धूप जाळुनि भावे केली धूपारती वो ।
लावूनी त्रिगुण वाती केली चिन्मय आरती वो ॥ ३ ॥
छेदूनि भेदवचन षड्‌रस पक्वान्ने वो ।
पूर्ण पात्रे भरून केले आत्मनिवेदन वो ॥ ४ ॥
नाचती वैष्णव रंगी करती जयजयकार वो ।
भावाचे दर्शन गळा तुळशीचे हार वो ॥ ५ ॥
ऎसे स्तवन करिता अंबा आलिसे रंगणी वो ।
काया वाचा मने शरण एका जनार्दनी वो ॥ ६ ॥


एडका – एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥ …

एडका मदन तो केवळ ॥ध्रु॥
धडक मारिली शंकरा । केला ब्रह्मयाचा मातेरा ।
इंद्र चंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो केवळ पंचानन ॥ १ ॥
धडक मारिली नारदा । केला रावणाचा चेंदा ।
दुर्योधना मारिली गदा ।घेतला प्राण । तो केवळ पंचानन ॥ २ ॥
भस्मासुर मुकला प्राणांसी । तेचि गति झाली वालीसी ।
विश्वामित्रासारिखा ऋषि । नाडिलाजेणे । तो केवळ पंचानन ॥ ३ ॥
शुकदेवानी ध्यान धरोनी ।एडका आणिला आकळो नि ।
एका जनार्दनी चरणी । बांधिला जेणे ।तो केवळ पंचानन ॥ ४ ॥


फकीर – सफेद कलंदर फकीर ।बाबा सफे…

सफेद कलंदर फकीर ।बाबा सफेद कलंदर फकीर ॥ध्रु॥
काम क्रोध मद मत्सर काटो । उन्मनी ज्याघर बैठ ।
मारो आसन बैठो । त्रिकुटपर करनार जिकीर ॥ १ ॥
अंदर भगवा कियो रे बाबा । जोग जुगत भरपाई ।
अल्लाके नामपर मुहर लगाई । चुकी कलमपर लिखीर ॥ २ ॥
ऎशी फकीरकी थोरी । बाबा जात कूल सब तारी ।
जनार्दनका एक कहत है । साधो सिताराम गुरु पीर ॥ ३ ॥


भारुड – फकीर – दिलमें याद करो रे । जनम …

दिलमें याद करो रे ।
जनम का सार्थक करो रे ॥ १ ॥
सारे दीन करत पेटखातर धंदा ।
विठ्ठल नाम लेवत नही केंवरे तू गधा ॥ २ ॥
जमका सोटा बाजे पीठपर कोई आवे नही सात ।
एका जनार्दन नाम पुकारे करो हरिनाम बात ॥ ३ ॥


भारुड – फकीर – हजरत मौला मौला । सब दुनिय…

हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥ १ ॥
सम घटमो सांई विराजे । करत है बोलबाला ॥ २ ॥
गरीब नवाजे मैं गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥ ३ ॥
अपना साती समझके लेना । सलील वोही अल्ला ॥ ४ ॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥ ५ ॥
एका जनार्दनी निजवद अल्ला । असल वोही विट पर अल्ला ॥ ६ ॥


भारुड – फकीर – देखोरे सांई देखोरे सांई ।…

देखोरे सांई देखोरे सांई ।
विटपर खडा रहीया भाई ॥ १ ॥
फकीर मौला सबदुनिया का नाम विठ्ठल साचा ।
बडे बडे भगत आवे बोलबालावाच्या । सिध्दन
साधन कोई नही जाणॊं विठ्ठलसाई । एका जनार्दन
होरी पुकारे गावो थाके पायीं ॥ ३ ॥


भारुड – गाय – संत नाम गाय संत नाम गाय ।…

संत नाम गाय संत नाम गाय ।
संत नाम गाय कामधेनु ॥ १ ॥
सदा सर्वकाळ दुभे भक्‍तालागी ।
उणे पाहता अंगी धाव घाली ॥ २ ॥
नाम मुख स्तना लागला पान्हावे ।
अभक्‍त न पाहे धाव पाठी ॥ ३ ॥
जनी जनार्दन दुहिला आवडी ।
उभविली गुढी एकनाथे ॥ ४ ॥


भारूड – अगा ते परम शुभ ऐक । लाभ द…

अगा ते परम शुभ ऐक । लाभ दिसे तो एक । नांदतें धर्माचें घर । सद्विविकाचें विवर । विवरांत विश्रांती थोर । अपार सुख तें ॥१॥
ऐसा नरदेह परम सुखाचा । घे मज पिंगळ्याची वाचा । मी संदेह सांगेन साचा । ऐका गा राजकुमार हो ॥२॥
डुग डुग डुग शंभु महादेवा । काशी विश्वानाथा । पंढरीच्या विठोबा । कानड्या खंडेराया । दिगंबरा दत्तात्रया । इतुकें बोलतां ठाया । परी ते एकची यती ॥३॥
लडबड लडबड । नवनाथ सोरटी सोमनाथ । श्रीहिंगळजा भगवती । वीणापुस्तकधारिणी । ये मूळ पीठींची । जिचेनी वस्तु महिमा साची । आदि अंत भरले स्वतंत्र । म्हणोनि कारण वाचेसी । अत्यंत बोलत आहे ॥४॥
नमो परम पुरुष । जो भाष ना आभास । जो स्वयंप्रकाश । अखिल मूर्ति ॥५॥
जो वर्ण व्यक्तिहीन । दृश्यादृश्य दरुशन जाण । जो आदिमायेचें आवरण । अनादिसिद्ध ॥६॥
धन्य धन्य तो सदगुरु । जो साक्षात परब्रह्म अवतारु । नामस्मरणें जगदुद्धारु । करी सदा ॥७॥
आतां समस्तां नमीत स्वानंदें । देहीं स्फुरलें स्वात्मसुख छंदें । डुल्लतां आपुलेनी आनंदें । सहजीं सहज ॥८॥
आधीं एकाग्र करुनी मन । सांडी बद्ध मुक्तीचा अनुमान । वृत्ति सदा समाधान । स्वरुपीं असावी ॥९॥
हजार गोष्टींचीये परी । मज सरोद्याचा विश्वास धरीं । अंतीं बोलणें वचन वरी । गोड लागे ॥१०॥
एक खटपट एक तळमळ । एक वळवळ एक कळकळ । परि तो अवघाचि कोल्हाळ । करिताती ॥११॥
तैसा नोहे मी पिंगळा । शब्दासहित बोध सकळां । एका अनेकी नोहे वेगळा । शोधोनि पाहे ॥१२॥
दिसे बावन्नाची कडसणी । एका सूत्रें वोविले मणी । जैसें गंगेचें पाणी । निर्मळ पाहे सर्वदा ॥१३॥
पूर्व उत्तर दोन प्रत्यक्ष । अक्ष होते कां नेणा ॥१४॥
एक तृप्ति व्हावया । आणिक ग्रास घ्यावया । तरी ते आन ठाया । गेले न म्हणा ॥१५॥
तरी त्याचे मुखें अर्थ कांहीं । ज्ञात्यासी सांगतां भरला नाहीं । विवेक संचुनी ठायीं । ऐका गा राजेनु ॥१६॥
नावं काय रायाचें । मेष कीं वृषभ कीं मिथुन कीं कर्क कीं सिंह कीं कन्या कीं तूळ कीं वृश्चिक की धन कीं मकर कीं कुंभ कीं मीन । ऐका गा राजकुमर हो ॥१७॥
येवो मेष तो कैसा । हुरळक हुसके थल तैसा । बुद्धिमंद विवेकलेशा । दैन्यवाणा सदाचा ॥१८॥
आतां वृषभ बोलावा । प्रकृति बुद्धि आम्हां सवा । हानी लाभ नोहे ठावा । या गर्वराशी ॥१९॥
माया ईश्वर मिळोनी । जैसे सुखावती दोन्ही । तरंग तेंचि पाणी । ज्ञानप्राप्ति मिथुन जाणावा ॥२०॥
अहं बुद्धीचे सर्वक । तोचि ओळखावा कर्क । देहाभिमान गर्क । कुवृत्ती सदाचा ॥२१॥
मद गज वनांतरीं । धूर्त सिंहाचिये परी । मोहे महिमा विस्तारी । ऐसी कन्या जाणावी ॥२२॥
बुद्धी सत्त्वाची साम्यता । प्रपंच परमार्थ ऐक्यता । स्थूळधारी देखता । तो सत्त्वाचा ओतिला ॥२३॥
जो कुर्वाळील कृपा करी । विषयशक्ति नांगी मारी । फणका लागतां दुःख करी । तो मळीन वृश्चिक जाणावा ॥२४॥
शब्द कैसा तीक्ष्ण । ह्रदयीं जैसा लागे बाण । मोडी भलत्याचें समाधान । तोचि धन ओळखावा ॥२५॥
एक होटीं एक पोटीं । सदा भोंवयासी घाली गांठी । मळीन देखें सर्व सृष्टी । तो मकर जाणावा ॥२६॥
नुचंबळे पूर्ण कुंभ । जो आत्मसाक्षात्कार स्वयंभ । तो प्रत्यक्ष जाणावा थोंब । ऐशी वृत्ती जाणावी ॥२७॥
सदा चंचळ चपळ स्थिति । दृष्टी झेपावे ती विवृत्ती । ऐसी मीनाची गती । आपुलेनि वर्ते ॥२८॥
एवं स्थिति मतिद्वये । प्रेमळें मनीं वोळखोनी घ्यावें । ऐके सत्यव्रती भावें । नांव काय रायाचें ॥२९॥
तुझिया बाळा देखी न शके काळा । भुरळ डोळ्याचा आंधळा । झडपोनी जातो त्याला ।
भिऊं नको घरीं येऊं देऊं नको । मन मुष्टीमाजीं धरी । मी सांगेन तैसेंचि करी रे राया ॥३०॥
एक वोवाळुनी देई । साबण सरकी गाईचे शेण । तांबड्या गुंजा मुष्टिये एक लोन । तांबे नाणें कालवून । तिहीं ठायीं टाकी ॥३१॥
एक मती बोलून जातो । जळीं राख स्थळीं राख । आपुला शेजार राख । बाजार राख । आब्रह्मस्तंभपर्यंत रखरक्ष हुं फट स्वाहा ॥३२॥
ही नंददेशीची विद्या खरी । तुझ्या बाळाचें विघ्न निवारी । काळकंटक दूर करीं । मग नांदलीस स्वानंदें ॥३३॥
आतां बाळाचें नांव सांगें स्पष्ट । तुझिया पोटींची आत्मनिष्ठ । जेव्हां झाली ॐ प्रतिष्ठ । जांवई तो सुलक्षणी साळंकृत ॥३४॥
परि तो सत्त्वगुणाची राशी । सप्रेमता लावीं रुची । निजवाक्यार्थ परम साची । महिमा इची देवगणी ॥३५॥
देवगणी असे । प्रकृत गुणीं विषमशमा नसे । राक्षसगणीं आशेषे । वोळखोनी घ्यावें ॥३६॥
आतां घरधन्याचें नांव काय । केशव कीं माधव कीं गोविंद । कीं विष्णु कीं प्रद्युम्न । कीं पुरुषोत्तम । कीं अधोक्ष कीं रामु । देवबुद्धीसंगें घटवावा । उतरलें नांव घरधन्याचें ॥३७॥
जरीं तो म्हणू काळानिळा । परि तो वर्णव्यक्ती वेगळा । दिठीचा चुकवोनी डोळा । दिसतो सोहळा घरधन्याचा ॥३८॥
नामें व्युत्पत्ति बोध । आपणा घेतां शोध । उरला तो सोहं बोध नामरुपें ॥३९॥
अगा बायको एक आहे । उगीच आदळीं हातपाय । चोरुनी परघर जाये । ती मोठी जगभ्याड होई राया ॥४०॥
प्रसिद्ध जो अविवेक । तोचि जाण तिचा लेक । सरळ वाढलासे फोक । महा ठकु ॥४१॥
चउथ पंचमीचे आइतवारीं । एक हळदीचा मुटकुळा करी । ओवाळूनि टाकीं बाहेरी । तिहींसांजा ॥४२॥
एक घरचा माणुस वाकडे पायाचा । पिचक्या डोळ्याचा । लटक्या बोलाचा । त्यास झणी पतकरसील तर ॥४३॥
बापुडा नारदु पाहिला । घडीमध्यें गाभणा केला । चंद्रासी कलंक लाविला । तयाचेनी ॥४४॥
शंकराचा जाला वीर्यपात । रावणाचा करविला घात । विष्णु विचकुनी दांत । वृंदा वृंदा वोसणतसे ॥४५॥
ब्रह्मा धांवे सरस्वतीमागें । इंद्र जाला सहस्त्रभगें । भस्मासुर भस्म जाला वेगें । वाली निमाला रामबाणें ॥४६॥
आतां धनघट दे कण । एक तोळा दे दान । दे मज नको करुं अनुमान । घे मज पिंगळ्याची वाचा ॥४७॥
काय देतील कुडें । रितें अवघेंचि उघडें । खोटें नाटें जटे मुटे । अविवेकी ॥४८॥
अतिताची आशा हरे । दात्यांचे तो दुणे भरे । जें दिधलें तें कल्पांतीं न सरे । ऐसें कांहीं देइजे ॥४९॥
आजी धन्य पावलों सभा । जीवें जन्माची आली शोभा । कर जोडूनि राहीन उभा । महाद्वारीं देवाचें ॥५०॥
एक छत्रांचें राणिव । मोक्ष मोकाशी दिला गांव । जगविख्यात विश्वासी नाम । वाचेन आवडी गाउनी ॥५१॥
एका जनार्दनीं संतांचा लडिवाळ । पोटीं रिघोनि जाला बाळ । कृपा केली सर्वकाळ । अभय वर देउनी ॥५२॥


भारूड – आरता येरे धाकुट्या मुला ।…

आरता येरे धाकुट्या मुला । कशानें थोरपण तुला ।
उलीसेंच कीं रे दिसतें पोर । ब्रह्मीं नाहीं लहान थोर ।
तुला ब्रह्म ठाऊकें आहे । सर्वांघटीं तेंचि पाहे ।
ब्रह्मीं नाहीं भेदाभेद । ऐसें बोलती चारी वेद ।
तुझा भेद गळाला । सदगुरुनें बोध केला ।
भेद म्हणजे काय रे गड्या । आत्मस्वरुप पाहीं रे वेड्या ।
उलीसेच पोर चावट मोठे । थोरपण असून चहाड खोटें ।
माझें मन चहाड झालें । ज्ञानामुळें गर्वासी आलें ।
गर्व जाईल कैशापरी । सदगुरुचें दास्य करी ।
सदगुरुकृपा तुलाच झाली । भूतमात्रें भरुनि उरली ।
तरी काय एक एक नेलें । अविश्वासीं बुडूनि मेले ।
विश्वास काय साच केला । हा तो निश्चय पुराणीं झाला ।
सदगुरुविना तरेना प्राणी । सांगें तरला आहे कोण ।
भजन तरी करावें केव्हां । सोहं मंत्री नाहीं गोंवा ।
जपावें तरी कोणे दिवशीं । नेम नाहीं दिवसनिशीं ।
सदगुरुसी शरण जाईना तरी । चौर्‍यांयशींचे पडशील फेरीं ।
म्हातारपणीं भक्ति करुं । आयुष्य काय तुझें आज्ञाधारु ।
धाकटेपणीं भक्ति केली । सदगुरुची संगत जाहली ।
संगतीनें कोण कोण तरले । महापातकी उद्धरिले ।
पहिलें तें कोवळ्याचें पोर । अजामेळ चोखा महार ।
ऐसे तरले किती एक पोरा । मिती नाहीं रे गव्हारा ।
जाबास जाब फार देतोस । बोलूं नये तें बोलतोस ।
उगाच रहा नाहीं तर देईन दोन काठ्या । अहंकारा होशील खोट्या ।
तुझा माझा वाद झाला कीं रे फार । पांच पोरांनीं घेतलें घर ।
पांच पोरें कोणाचीं । आत्माराम गड्याचीं ।
सारा खेळ त्याचाच काय रे । खेळ खेळुन निराळाच कीं रे ।
हा खेळ तुला कशानें कळला । एका जनार्दन कृपें फळाशीं आला ॥१॥


भारूड – संचित बरवें लिहिलें । भाग…

संचित बरवें लिहिलें । भाग्यवंता भाग्य चांगलें । कन्यापुत्र पोट पिकलें । वेल मांडवा जाईल ॥१॥
फार देव दुणावेल । पोटभर दोंद सुटेल । गाईम्हशीनें वाडे भरवील । उत्कृष्ट दुभतें होईल ॥२॥
आहे सदैव तुमचा वाडा । रोग जाईल तुमची पीडा । सज्ज जोड्या बसवाया घोडा । विघ्नें जातील देशोधडा ॥३॥
यांत भुलूं नका जाईल नेट । रामनाम भजे झटपट । आहार निद्रा काम लटपट । लोभाची भारी खटपट ॥४॥
मायेचा बाजार हाट । पुढें अवघड घांट नीट । चित्त देऊनि ऐका खुण गा ॥५॥
आया बाया सांगतों नाणी । तुम्ही अवघिया धरा ध्यानीं । उठतां बैसतां शयनीं । कांडितां दळण कांडीन ॥६॥
मातापिता बंधु बहिणी । बाळ भ्रतार सुखाची मांडणी । अंतकाळीं येईना कोणी । एकलें जावें स्वर्गाशीं ॥७॥
कोणी संत येतील घरा । त्यांचा आदरमान करा । अतीत अभ्यागत येती द्वारा । त्यांला कांहीं तरी दान करा । ह्रदयीं आठवा पंढरीनाथ ॥८॥
लगबगा जलदीला मोल । देहगांवचा होरा जाईल । हे डोळेगांवीं दिवस मावळेल । कानपूरचे कवाडे लागतील ॥९॥
तोंडापुर ओस पडेल । दांतवाडीचा मार्ग मोडेल । नाक गांवीं गळती लागेल । सुरतीचा डौल बिघडेल ॥१०॥
मग सरेल अवघी हवा । कांहीं विचार आपल्या जिवा । काहीं घडली नाहीं सेवा । शुद्ध हरपेल गाळ वेडगांवा । बैसली जागा उठवेना ॥११॥
जेणें अंधळे भोळे अज्ञान । यांना गुरुसंत देती ज्ञान । दिला मंत्र तो घर बुडवून । आपल्या स्वहिताकारणें । साठ सहस्त्र ऋषीजन दुर्वास श्रेष्ठ भोजन ॥१२॥
ह्या कंसाचे घरीं । सहा महिने अवद भारी । मिष्टान्न नानापरी अंतीं गेले यमपुरीं । सेवकिला दुर्योधना ॥१३॥
महा संकटें आलीं थोर । यमपुरींची ऐका खबर । ऐशी हजार कोस चौफेर । तेथें नरककुंड अघोर । भारी दुःखाचे डोंगर । समर्थ राजा इंद्र गरीबाचा पाड काय बरें ॥१४॥
तळमळ व्यथा भोगिती । ऐकावयाची गती । वडील करुणा भाकिती । वैश्य कल्याण चिंतिती । दया नाहीं उपाय चालेना गा ॥१५॥
सांगतों अनुसंधान । हित होईल तुमचें कारण । संतांचे संगतीनें । पंगती पवित्र पावन ॥१६॥
द्वारीं तुळसीवृंदावन । एकादशी व्रत नेमानें । हरिदासाचे संगतीनें । हरिकथा पुराण श्रवणा ॥१७॥
कोटी कुळ्या होतील पावन । वैकुंठी त्याचें पेण । एका जनार्दन सांगतो प्रसन्न । नाम श्रेष्ठ पतीत पावन गा ॥१८॥


भारूड – जोहार मायबाप जोहार । सकळ …

जोहार मायबाप जोहार । सकळ संतांशीं माझा जोहार ।
मी अयोध्या नगरीचा महार । रामजीबावाचे दरबारचा की जी मायबाप ॥१॥
रामजीबावाचा कारभार । राज्य करीं अयोध्यापुर । मी तेथील नफर सारासार । कारभार करतों की० ॥२॥
सकाळीं समयीं उठतों । सीताबाईस जेवाया मागतों । झाडूनि दरबार काढतों । केर बाहेर टाकितों की० ॥३॥
सभेसी रामजीबावा येतां । मी पुढें जाऊनि सांगें वार्ता । एकाजनार्दनीं तत्त्वतां । जोहार करतों कीं जी मायबाप ॥४॥


भारूड – जोहार मायबाप जोहार । मी स…

जोहार मायबाप जोहार । मी सकळ संतांचा महार । सांगतो दृढ विचार । तो ऐका की जी मायबाप ॥१॥
माझा विचार नारदें ऐकिला । तो पुनः रुपा नाहीं आला । भीष्म ध्रुव प्रल्हाद आगळा । या विचारें बांधिलें की० ॥२॥
उपमन्यु बिभीषण । सर्वामाजीं अर्जुन । आणिकही ऋषी सांगेन । सावध ऐका की० ॥३॥
पराशर विश्वामित्रादि जाण । या विचारें पावले समाधान । हरिश्चंद्र शिबी सुखसंपन्न । जाले की० ॥४॥
ऐशा विचारें चालले । ते पुनरपि नाहीं आले । एका जनार्दनीं भले । ऐक्यपणें की जी मायबाप ॥५॥


भारूड – अयोध्येचा हो देव्हारा । आ…

अयोध्येचा हो देव्हारा । आला अहंकाराचा वारा । डोळे फिरवी गरगरां ॥१॥
मानवी रामाबाई मानवी कृष्णाबाई ॥ध्रृ०॥
रामाबाईचा घरचारु । चौघा जणांचा व्यापारु । सहा अठराचा पडिभारु ॥२॥
रामाबाईचा वो शेला । ब्रह्म शेटीनें विणिला । तुजलागीं पांघुरविला ॥३॥
येथोनि जालासे सोहळा । रामाबाईला वोवाळा । एका जनार्दनीं मुळा ॥४॥


भारूड – चल चल चल । निरंजन जंगलका …

चल चल चल । निरंजन जंगलका आया खिलारी । लिया हातमो खेल पेटारी ।
कालीकल वाहामो डारी । सबका मुसासाब घुसारी ।
हा हा हा हा । चुप बैठ चुप बैठ ।
हा नहीं हूं नहीं । कछुं नाद बिंदु कला जोती ।
आदी मदी अंतीं कछुं नहीं । चुप बैठ चुप बैठ ।
आपने जागा चुप बैठ । कहना तो कहना मनही बैठे आराम ।
आलखमो लख लखमो आलख । तो होना एक लख लख ।
ऐ हुन्नर मेरे गुरुपरनें बताया । आहां ब्रह्म मैदान छोटेमें बडा मारी ।
और बाजेगार खडा । ढो ढो ढो ढो सोहो साहो ।
ढोल पीटते है । नाथ गारुडी बीर पुरा है ।
ओ खेलका वो खेल करत है । ओ प्रेम पोगडा हांडीबाग बडा हार्द है ।
आबे हांडीबाग तूं क्या बाता शीका है । बाबा मैने तो खेलका खेल गट करा है ।
आरे तेरे नानीका शीर काला । आरे हांडीबाग ।
तो आहाजी । तूं क्या क्या खेल सीका है ।
और कछु खेल खेले गा । तो आहाजी ।
गुरु पीर पैगंबरकी याद कर । तो आहाजी ।
नजर कर नजर कर । ज्याके व्हां सबके आखेर होत है ।
उसमें सबकी पैदास है । चल चल चल ये देख तेरेसे नाचत है ।
क्या क्या खेल तेरेसे करत है । ले इसेवे डरु ।
और ऐसा खेल खेलूंके । हमारे बडे बडे खेलते हैं ।
ये देखो हीरेकी खानी निकालत है । आवल्ल फतरा ।
फेर हिरा । फेर देखो तो फतरा का फतरा ।
तीन लोककुं बुजे नहीं । समज पडके गत्या होत नाहीं ।
सौंसारकें बाजारमें बडे बडे डुबते हैं । ये देखो रुपया बनते है ।
आधल एक । एकके दोन ।
दोनके तीन । तीनके चार ।
चारके पांच । पांचके पचीस बनाया ।
पांच पांच मिल गये । हाम आकेलका आकेला रह्या ।
चल चल चल । निरंजन जंगलसे बडा आया ।
ब्रह्म भवजोवडा निखारत है । फडाके मजथसे धुस धुस फुस फुस करत है ।
ले इसेबे डारु और ऐसा खेल खेलू । ओ खेलकू बडे बडे दाता देखते हैं ।
चल चल चल चीपडीके पोगंडे । बड्या बड्या बाता करत है ।
बडे बडे तो भागये । तेराही ब्रीद छीन लेउंगा ।
तेरे मूंपर मारुंगा । तेरी म्हतारी रोवेगी ।
येहु भेदर तो देख भला । आलललल । सब जगोमे उज्याला ।
मैं आप आपनेंसे भुला । ये कछु नहीं देख ।
ये हुन्नेर तो सबसे अच्छा है । चल चल चल ।
अव्वल एक । एकके दो । दोके तीन ।
तीनके चार । चारके पांच । पांचके पच्चीस ।
पचीससे छत्तीस । छत्तीसके चालीस ।
चालीसके ऐशी । ऐ कछु नहीं देख ।
एका जनार्दनके पांव पकडकर बैठा है । सदोदित नाम गावत है ॥१॥


भारूड – पलखम्यानें चार जुग ज्यावे…

पलखम्यानें चार जुग ज्यावे । तनकी नहीं भाई बात  ॥१॥
देख मुंडे देख । आपना नफा मुंडे देख ॥ध्रृ०॥
कृत त्रेत द्वापार कलयुग मोठा । चारा युग मुफत गमावे आया मुद्दलसे तोटा ॥२॥
कलजुगमो रामबीना तरला कोई देखो । आलख आलख सब पुकारे आलख नाहीं कुई देखो ॥३॥
जपी तपी संन्यासी पेट खातर फिरत । आसन छांड आलख पुकारे पेटसे सब मरते ॥४॥
फकीर मौला ब्रह्मन गुंसाई सबही आलख पुकारे । आलखमें लख नहीं केंव आलख पुकारे ॥५॥
एका जनार्दन साच्या कहे आलख बिटल सार । देख मुंडे आपना नफा करो नामउच्चार ॥६॥


भारूड – संसार बाजेगिरी देख । दुरल…

संसार बाजेगिरी देख । दुरलग आंदेशा आकर देख ।
जो कुच होनारा सो कदा न चुके । वल्ले वस्तादकी पदनामी ।
आखर जमानी । यादी निकसो बुरे हाल होवेगे ।
दुनयामे बडा बडा तमाशा बडे बडे हुन्नेर लगे ।
विद्या अविद्या बोलना एक । वल्ले वर्तणूक अनेक ।
ईस काममें बडे बाजी । जीस अंत न पाया ॥१॥
अरे देख देख देख देख । पीर पैगंबर अवलिया ।
सय्यद सादात बशियाकू झटे । वासना उटे ना हाटे ।
अरे देख देख देख । दौड दौड दौड । जब लग उजाडा तब लग दौड ।
अंधारा पडेगा पिछे कछुरन चले । आपसु आप बाजींदे बुरे सटदेना धंदे ।
हारीदासके प्यारे । रघुनाथके बंदे ।
कह्या न भावे फाड फाड खावे । बांदरामें रान हुवे ॥२॥
तमाशा देख तो अलमसुख होये । दील बांदरा रज्या पाले तो मुखचना बाहेर मैले ।
उठे उठे उठे । बैठे बैठे बैठे । लेटे लेटे लेटे ।
कहुं तो चुपकाची लेटे । दील बांदरा रज्या तलब बाजेगिरी येही खले ।
तो मेरे नामकी पुछेगी बाता । तो मेरे नाम क्या है अजबता ।
अवल मुजे नामचि नथा । दरम्यान पैदा हुवा ।
सलखन सुखाद बैठा । वांहा मुथी उठा नाठा ॥३॥
उसथे बैठा निरखनका मार चलाया । सलेखन उस देखती सलेखन बडे माहाजन ।
राजद्वारीं कहने लगे । सलेखनका तमाशा देख ।
वसले मुजेले नीलखनका तमाशा देख । ज्या हा हा हा हा ।
आ बा बा बा बा । आ ल ल ल ल ।
आ त त त त त । वोही है वोही है । जोर है जोर है ।
लढेगा लढेगा । लढेगा तो पडेगा । पडेगा तो चढेगा ।
हुशार भाई हुशार । भीतरती हुशार तो सुखी ।
बाहेरी ती हुशारी तो बहु हुशारी ॥४॥
गुरु बडा क्या चेला बडा । बाप बडा क्या बेटा बडा ।
बुढा बडा क्या जवान बडा । तो जवान बडा ।
कुत्ती ककवा चिटी चिडी । उदभौकू भौमानें ।
गुरु बडा वा चेला बडा । तो चेला पनामें पडा ।
गुरुके बढाईसे चेला बडा । बाप बडा वा बेटा बडा ।
तो बाप का नाम बेटा धरे । बेटेकी चाकरी बाप करे ।
बापके शीरपर बेटा चढे । उस बद्दल बेटा बडेपना घडे ।
जवान बडा या बुढा बडा । बुढा जागे मर ज्याये ।
जवान बहुत तवाना होय । बुढा पडे जवान चढे ।
ईसबद्दल जवान बडे पनामें पडे ॥५॥
नजर कर नजर कर नजर कर । यारो हो नजर कर ।
नजर करेगा सो जीतेगा । न नजर करेगा सो हरेगा ।
हारीया देना जीता लेना । हुशार भाई हुशार ।
हुशार होकर समाल । मैं कैसी चोंदी ल्यावुंगा ।
मैंने भलेकू चोंदी दिया । मैंने बडे बडेकू बेडाल लाया ॥६॥
देख देख देख तमाशा मेरा । मैंनें विभांडीकू चोंदी दिया ।
वो मुर्गीके चोंदने लाया । ऋषीश्रृंशकू चोंदी दिया ।
वो नाचनीका दुमाल लाया । वो पाराशरकूं चोंदी दिया ।
वो दुर्गंधीका ख्याल लाया । एक घडीमें तप गमाया ।
दुर्गंधासो सुगंधा किया । उसके जगामें व्यास नीफजाया ।
तो महादेवकुंबी चोंदी दिया । वो मोहनी का दुमाला लाया ।
ब्रह्माकु चोंदी दिया । वो आपने बेटीका ख्याल लाया ।
मना कर्ता याद न पाया । वो स्वरस्वतीसे हायीयाल हुवा ।
तुमारे विष्णुकुबी चोंदी दिया । वो वृंदाके स्मशानमें लढाया ।
आयारे नारद । उस नारदकुबी चोंदी दिया ।
आंगूल करते पेट बढाया । साठ बेटेका हुकूम जनाया ।
वो तुमारा अस्सल देव । जिसे नामरुप नहीं ।
उस बडे दुवकुबी बतलाया । वो चोंदीमें जगत्र भुलाया ॥७॥
रहे रहे रहे । चीपरीके रहे जा । आपने जगोमें रहे ज्या ।
जगा छोडकर जायगा तो जान जायगी । तो येतां मार मारुं ।
मारत मारते मारलेडा पडेगा । डांगा उपर पिछ कुटेगा ।
दात निकसकर पसरेगा । डांगा तुमारें पेटमेंकु जावेगा ।
इसबद्दल गुमरपना दूर कर मैंजुदकु याद धर ।
बिशयाकु मुसादलम बीसर । देख देख देख लढूं नको लढूं नको ।
चोंदीके जगा लढूं नको । वाहाली आपडूं नको ।
उस जगा लेंड पडेगा तो कालका फांसा पडेगा ।
आ तुजे कैंव चुप छोडेगा । इसबद्दल विसयाकुं लढूं नको ॥८॥
हमारा दाता कुच देता नहीं । इसबद्दल बिसयाकुं लढत हैं ।
व्हां बडे बडे जन राजद्वार बैठे हैं । कुच देना सो आज दिनेका दिन है ।
दिल चहासो देव । कुच मथी नाम बोलें । दीलकी गांठ खोले ।
आख बतक काम आवेगा । उस खैरात पर हात चले ।
चुप बैठ मुंडी हालावे । कुच काम नहीं ।
जासो दिल देवेगे तो निज मौजक पावेगे ॥९॥
सुख शांति सुख छायेगा । भीस्तीकेती मेवे खावेगा ।
बड्या बड्याली बालै बढाई । ऐसा कुच काम नहीं ।
ऐसा कुच देवोना । चिप बैठे मुंढी हालावे ।
कुच काम नहीं । ऐसा कुच देवो ना जो खात पीत भरे ।
भरीयासो कबहु ना सरे । पोंगड्या टींगड्याकु खाना पुरे ।
सब लिया जमकु बस कर । ऐसा कुच देवोना ।
एक्या देवेगे बिच्यारे । यितला दिया भीक मागनेकु गया ।
उसकी दौलत कही हाकाले लंडानें लिया । ईगानी पर दुगानी ।
दुगानी पर तिगानी । जिसके तिसके घर दुगानी ।
परती रुका । ए क्या देवेगे बिच्यारे ।
तो मेरा दाता कैसा है । हा सा रातसा देखना ।
तो हमारा कुच नहीं । भोजराजा देशका नहीं ।
इंद्र देशका नहीं बुरेर देशका । इतना देवे तो पेट भरा भर लेव ।
ए क्या देवेगे बिचारे ॥१०॥
तो मेरा दाता कैसा है । उनके शतकथमें । मेरा जित मेरब चलता ।
उन्हेथीमें राजना बाक । उसकी खेलता ।
उनकी मेरा जीवता । उनकूं मग नावयाबाता ।
काट सक्या । नजर कर नजर कर । यारोहो नजर करों ।
नजर करे गा सो जितेगा । न नजर करेगा सो हारेगा ।
हारीया देना जीता लेना । अद्दल एक एक के दो ।
दोके तीन । तीनके पांच । पांचके पच्चीस ।
गाफल कहते दस बारा पंधरा बीस ।
वल्ले सही जान पांचके पंचीस । डालीका साप किया ।
भलेभलेकु बडेबडेकु । उन्ने लायी माया ।
बीन लढेगा उन्ने जगत्र भुलाया ॥११॥
गाफल कहते मेरी माया । गुरु बोध ऐसा पाया ।
ऐसी हमारी शांति गाये । वो क्रोध बागकूं खाये ।
अहंकार साप लढेना चढे । मुवा जैसा चीपका चीप पडे ।
पर परका खबुतर । खबुतरकाबी घर ।
ये बाता सबही दूर कर । पंखबिना हौस किया ।
उडे चढे बिन सत्य लोककू गया । सनकादिककी काढी माया ।
मुख्य मूळ ब्रह्म हुषार किया । उन्ने हौसनें बडा तमाशा किया ।
ब्रह्मसनती मूंड मुंडाया । आपबी व्हा छपी खाया ।
हुषार देखे तो नजीक छुपाया । एक एकमो अनेक ।
अनेकमो एक । येही देखनामें हुशारीमें देख ।
वांहा नहीं देखना दुःख । येही खेल खेळे तैं समाधि सुख ।
एका जनार्दनीं जग समस्त । इसके बाजीमें भिस्त दस्त ।
देखो फेरिस्तो अजब बात । पैंगबर कहे सदर आमत ।
येही तमाशा सिद्ध । देखे सो जुदा नहीं देख ।
एका जनार्दनीं । बैसक बाजेगिरी । ऐन लहक ॥१२॥


भारूड – चल चल चल । याद करो गुरु ग…

चल चल चल । याद करो गुरु गारुडकी ।
और आदिपुरुषकी । संत महंतकी । गुणी गुणवंतकी ।
और बडे बडे महाजनकी । बडे बडे सरदारकी ॥१॥
चल चल चल । ये देखो कैसा खेल होता है ।
नग्र कटारी निकाली । सप्त सागर उनके सेवेकूं लगाया है ।
उसमें पांच मुखका नाग देखो है । नागके फणी उपर ऋषेश्वर बैठे है ।
सो उनोनें व्हां होम किया है । उसके मुखमें एक निकल सिरपर बैठी एक कामिनी ॥२॥
चल चल चल । नारीके मुखमें बहोत । बनचर व्यासनेकी इननत ।
चार लक्ष नऊ हजार । एक एकके मुखमें लक्ष लक्ष घोडेस्वार ।
हाती घोडे बहोत निकाल । गिन्नत नहीं लगती है ॥३॥
चल चल चल । निर्गुणा पुरसे मुंगी आई ।
सो सब खेल खा गई । वो स्वरुप देखणे आये ।
सो मर गये ॥४॥
चल चल चल मुंगीके मुखमें । ब्रह्मा विष्णु महादेव बैठे हैं ।
छोडा सब ये खेल । शून्यगिरीपरसे बडा नाम है ।
नामबिना कछु नहीं ॥५॥
चल चल चल । हांडीबाग अवल खेळ कैसा पाया है ।
गुरुके पावके प्रतापसे याद है । अवल क्या है उसे गाम नहीं नाम नहीं ।
रुप रेखा कछु नहीं ॥६॥
चल चल चल । व्हासो धूणी पैदा हुयी है ।
सो ठकडी नाम पाई । भले भले खुटका कर गई ।
स्वर्ग मृत्यु पाताळ । किसीकु छोडा नहीं ॥ अरे हांडीबाग ॥
और कुछ याद हो गया तो बोल । अवल तो ब्रह्म नाम था ॥७॥
चल चल चल । हा तो एक एकके दो ।
दोके तीन । तीनके चार । चारके पांच ।
पांचके पंचीस । पचीसके छत्तीस । छत्तीसके एक ।
सोही ब्रह्म नाम पाया है । सब खेल उसके पाससे हुवा है ॥८॥
चल चल चल । एक दो तीन । त्रिगुण नाम पाया है ।
चार तो चार देह है । पांच तो पंचभूत आत्मा है ।
छे तो षडविकार है । सात तो सप्त धातु है ।
आठ तो अष्ट पाकोळी है । नऊ तो नऊ नाडी नवविध भक्ति है ।
दस तो दस इंद्रियें हैं ॥९॥
चल चल चल । इन्नोने बडे बडे जपी तपी ।
संन्यासी जोगी दिगंबर व्याघ्रांबर और । बहुत जनोकी खोड तोडी है ॥१०॥
चल चल चल । दस पांच पंधरा । छे एकवीस सात अठ्ठावीस ।
आठ छत्तीस तो गुरुके याद है । गुरुनाम सबसे बडा है ।
उन्नोके प्रतापसे ये खेल पाया है ॥११॥
चल चल चल । छत्तीस उपर नऊ पंचेचाळीस ।
पांच दशक कहते है । दशका आकडा एक एक पांच उपर पांच है ।
आवल आख पंचाण्णवका सो बरोबर है । पांच पांच उड गये ।
सो कछु नहीं रह्या । पिछे रह्या एक । उसे नाम नहीं ।
निर्गुण ब्रह्म कहते हैं । शून्य तो एक है ।
व्हांसे माया भयी । सो नामरुप माया है ।
शून्य नहीं तो माया एक नहीं । माया नाम तो रग है ॥१२॥
चल चल चल । वो मायेकू पूज लटका है ।
माया रंग तोड दाली है । सो कछु नहीं ।
सब खेल मायाका है । मायाके रंगमें सब बांध डाले हैं ।
कोई झूटा रह्या नहीं । ऐसी माया सबसी बडी है ।
वोई सब खेल करती है । उसबिना पान हाले नहीं ।
उसका झोला बहुत बुरा है । सो नजर नहीं आवे ॥१३॥
चल चल चल । हांडीबाग । हाहाजी ।
मायासे पार कैसा पडेगा । चौर्‍यांयशी लक्ष फेरी कैसी चुकोंगी ॥१४॥
चल चल चल । नाम अल्लाका बडा है ।
वो अल्ला ब्रह्म नाम बिटपर खडा है ।
सो पंढरपुरमें विठ्ठल ब्रह्म नाम है ।
सर्व साधुसंत रात और दिन ध्यान करत है ।
इसे पार पडेगा । ये नामसे चौर्‍यांयशी लक्ष फेरी नहीं आवेगी ।
इस जागे माया लवंडी है । ये नाम भूल जायगा तो ।
माया डंखीण झोल मारेगी ॥१५॥
चल चल चल । बाबा बाबा आलालाला । मायाका खेल बहुत बूरा है ।
सो कबी नजर न आवे ॥१६॥
चल चल चल । बडे बडेसे लढत है ।
बडे बडे कीं पाव पढत है । सोई बडे आप एकसो सब एक ।
दुजा देखने गया । सो मायेनें घेरलिया ।
एक रह्या सो पार पड गया । वोही अलक्षनाम पाया ।
जनार्दन नाम एक पाया । सो विठ्ठल रुप हो गया ॥१७॥


भारूड – सुनो संत सज्जन भाई । हम त…

सुनो संत सज्जन भाई । हम तो निराकारके गारुडी आया है ।
हमारे उप्पर संतकी नवाई । इस कलजुगमें पैदा हुवे ॥१॥
ये देखो खेल खेलत रस्तेमें । सब आलम दुनिया देखत है ।
आबे चल अहां हांडीबाग । जरा प्रेमका ढोल बजाव ।
लग लग लग लग ॥२॥
पहिले तो छे साप निकालू मैदानमें ।
बडे बडे अजगर उसके नाम बताउ ।
काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार ॥३॥
अबे चल ये साबने बडे बडेकूं डंक मारा ।
भस्मासुर तो भसम कर दिया । पराशर तो ढीवरनके पिछे लगा ।
इंद्रकी तो भगांकित हो गई काया ।
महादेव तो भिल्लिनके पिछे लगा । विष्णु तो वृंदा देखकर घबराया ।
ब्रह्मदेव तो सरस्वतीपर ख्याल किया । ऐसे साप कठिण है ॥४॥
अ ब ब ब । अज्ञानके पेटीमें भरे है ।
निकालु समाल बे डंक मारे गा । ये हात डाला ॥५॥
डंक माराबे डंक मारा । हाय बडी वेदना होती है ।
आबी जान जाती है । तुजकू क्या बताऊं ।
आबी उतारनेवाला कोण बुलावूं । सुनो मेरे पास सदगुरुका मोहरा है ।
प्रेमका बनाऊ सान । बोधका बनाऊ पानी ।
भक्तीके बैठु दरबारमें । आबी लगाऊ घसके ।
तो सबे जहर उतारु ॥६॥
अबी भक्ती नागीन निकालु । इस नागनसे बडे बडे खेल खेलत ते ।
शुक याज्ञवल्क्य दत्त कपिलमुनि ऐसें खेल खेलते ते ॥७॥
आबे हांडीबाग । आहांजी तेरेकु कुच याद है ।
हांजी । ये देखो पहिले ता मारु फुक ।
आबी बनाऊ एक । एक क्या है ।
एक तो निराकार भगवान है । दो क्या है ।
ब्रह्ममें माया । मायामें ब्रह्म । तीन क्या है ।
तीन तो ब्रह्मा विष्णु महेश हैं ।
चार क्या है । चार तो बेद है । पांच क्या है ।
पांच तो पंचभूत आत्मा है । छे क्या है ।
छे तो शास्त्र है । सात क्या है ।
सात तो सप्तपाताल है । आठ क्या है ।
आठ तो आठ प्रकृती है । नऊ क्या है ।
नऊ तो नवविधा भक्ती है । दस क्या है ।
दस तो दस अवतार है । ग्यारा क्या है ।
ग्यारा क्या है । ग्यारा तो रुद्र है ।
बारा क्या है । बारा तो सूर्यकी कला है ।
तेरा क्या है । तेरा तो कछपक्या रान्या है ।
चवदा क्या है । चवदा तो तल है ।
पंधरा क्या है । पंधरा तो तिथी है ।
ऐसा एका जनार्दनीं खेल । भक्ती पुरस लगाया मेल ॥८॥


भारूड – प्राप्ती एक भजन विरुद्ध ।…

प्राप्ती एक भजन विरुद्ध । दोहींचा संवाद परिसावा ॥१॥
हिंदुक तुरक कहे काफर । तो म्हणे विटाळ होईल परता सर । दोहींशीं लागली करकर । विवाद थोर मांडला ॥२॥
तुर्क:- सुनरे बह्मन मेरी बात । तेरा शास्तर सबकु फरात । खुदाकु कहते पाऊ हात । ऐशी जात नवाजे ॥३॥
हिंदु:- ऐक तुर्का परम मूर्खा । सर्वांभूतीं देवो देखा । हा सिद्ध सांडूनि आवांका । शून्यवादका झालासी ॥४॥
तुर्क:- सुन रे बह्मन पानबुडे । बुडक्या मारे पान कुकडे । तुम्हारा शास्त्र जो कोई पढे । वो बडे नादान ॥५॥
कमाखलोको शास्त्र चलाया । खुदाकु कहते भीक मंगणे गया । बलीनें पकड द्वारपाल किया । लोक भुलाया हिकाकतसे ॥६॥
तुम्हारा शास्त्र सबही ढिला । अल्लापर लेते हिल्ला । क्या भारुवलविल्ला । कम अकलोके ये बात ॥७॥
हिंदु:- तुमचा किताब तुम्हासी नाठवे । सुलखनमो मीन पढा देवे । प्रथम अबदुल्ला हुवे । तो म्हणे भीक भिस्तके मेवे । ही भीक तुमचीया देवें उपदेशिली ॥८॥
फकर अफजुल्ला खुदाकु भावे । भीक देता लेता भिस्तकु जावे । भिक्षा पावन परप्रभवे । हे दीक्षा देवें दाविली ॥९॥
फकीर साक्ष बोलतो । फकर फजतारी खुदानें नवाजा है । फकर आकरीब खुदाकूं । फकर भावता खुदाकूं । फकरन्या खुदाकूं । फकर लाहिला खुदाकूं । फकर अल्ले खुदाकूं । फकर लोडे खुदाकूं ॥१०॥
बय तत्त्व कलिहा जीयादर हाजरत । गाजाया दरगाज । मोंकी दरभिस्तरल्फ । गाफील दरदोकु जा ।
अल्ला येर खालीकी । गाफीला दरदोकु जा । अल्ला येर खालीकी । गाफीला दर दोगखी ।
फकीर मागतो भीक । अल्ला दोश नेला । अल्ला वलकलतांतील तूं अल्ला । हारसीर मौजूद तूं अल्ला ।
खालीफ तूं अल्ला । नजर नाजीर तूं अल्ला । पोट भरावया भीक तूं अल्ला । दोष नेला ।
आणा तूप रोटी कानवला । अल्ला दूधभात दे मला । अल्ला मांडे पुरी घारी दे मला । अल्ला वडेवडुचे दे मला ।
अल्ला क्षीर साखर दे मला । ब्राह्मण श्लोक बोलतो भिक्षाहारी निराहारो भिक्षा नैव प्रतिग्रहः ।
असंतुष्टः सदा पापी संतोषी सोमपः स्मृतः । बळी खुदाचा खासा बंदा । त्याच्या भुलला भक्तिवादा ।
त्यापासें देव तिष्ठे सदा । तुम्ही कां निंदा करितसा ॥११॥
तुर्क:- तुम्हारा ब्रह्मा बेटी चोद । वो पढे सब झूठे बेद । तुम्हारा शास्त्र बेद । ब्रह्म नाद लतीफ ॥१२॥
झूठे लतीफें कैंव कैंव चलाये । खुदाकी औरत चोर लेगये । उसे बांदरे मदत हुवे । ओ शास्त्र पढ पढ मुवे । गफलत खाय गुमार ॥१३॥
हिंदु:- जीस म्हणा बीबी आई । सोबन करा तीयो ठायीं । तुर्काची निष्ठाई पाही । ब्राह्मणाच्या ठायीं निंदिती ॥१४॥
बाबा आदम माया हुवा जोडा । हे किताब तुम्ही पढा । आपुलें शास्त्र नेणा धडफुडा । आम्हांसी झगडा कां करितां ॥१५॥
बाबा आदम माया हवा जाली । त्यापासुनी दुनिया अदमी झालीं । आदम नामें सांगा आपुली । बोलतां भुली तुमची तुम्हां ॥१६॥
बाबा आदम माया हवा जाहली । ती म्हणतां तुम्ही सैतानें नेली । सीता रावणें चोरिली । ते का बोली उपहासा ॥१७॥
तेव्हां फिरस्ते बेठे केले । जबराईल । ईजराईल । मनकाईल । नसकाईल । मितकाईल । फत्ते माया हवा घेउनी आले ।
रामे जत्पती बोलाविले । सीता शुद्धी करावया ॥१८॥
तुर्क:- सुन रे बह्मन अक्कल गधडे । जबा दराजी जबा जोडें । तुमारा शास्त्र जो कोई पढे । ओ बडे गाफील ॥१९॥
गाफिलो खुदा बंदखानो लाया । उसे कंसासुर मारणें आया । देवकीनें खुदा छुपाया । ओ शास्त्र भुलाया नादान ॥२०॥
छपे छपे बंद खुलास किया । इन्ने बातपर बोध लाया । खुदाकूं कहे जेहेर पिलाया । या हिल्ला या सालीम ॥२१॥
आपने मुसे आप फजिते होते । खुदाकूं कहते गोरुरखते । वो बाता सुन सुन रोते खुदाकू कहते ढोरकी ॥२२॥
काफरनें अक्कल छोडी । खुदाकी बढाई साली तोडी । क्या मारुंका थपडी । जबा जोडीभी करतां ॥२३॥
हिंदु:- तुमचे मुसाफ पहा बोलो कांहीं । खुदा मौजूद सर्वांठायी । तो काय बंदखानीं नाहीं । हा विरोध वायां तुम्ही माना ॥२४॥
जहां मनकी बढाई । तहां खुदा एकलासा नहीं । गैबमा खुदा छापा भाई । हे फारसी पाही तुम्ही पढा ॥२५॥
दील खुदाकू मुष्किल धरे । तो दीलम्यानें खुदा भरे । बंदका बंद खुलास करे । हे हादी पैगंबर बोले जे ॥२६॥
आवलीया । आवलीया शाहामोदीन आली । आली अपरसून बोली । गाय गज बांदरे । समस्त रक्षिजे परमेश्वरें । ही तुमचीये किताबे उत्तरें । तुम्ही त्या कां रे मानाना ॥२७॥
कुत्ता कव्वा चुवडे चिचडे । वोही रक्षने खुदाकडे । आपुलें शास्त्र नेना धडफुडे । आम्हासी झगडे कां करितां ॥२८॥
तुर्क:- तूं रहे रहे बह्मन जोकांडी । तूं क्यां क्यां हा हीकात मांडी । बंदगी करना सालीम लंडी । सीर दाढी मुंडी खुदानें ॥२९॥
तुम्ही हिंदु अस्सल बुरे । फत्तर पुतले राज करे । उसका नाम खुदा धरे । एक तारी करे उस जगा ॥३०॥
उसके हुजूर पुराना पडे । औरत मर्द सब खडे । उसके आगे लिडीलिडी पडे । नव्हे बडे नादान ॥३१॥
जिस फत्तरपर शेंदूर चढे । उसके आगे औरता खडे । निंव पहेरनें नंगे खडे । मागें पोंगडे उनके पास ॥३२॥
तुम्हारा बेद सबही ढिला । तमाम बैता नामाकु ला । पनर बंदगी करो गलबला । खुदा गाफिल गफलती ॥३३॥
हिंदु:- जळीं स्थळीं काष्ठीं पाषाणीं देव । हा तुमचे किताबाचा मुख्य भाव । तुमचे तुम्हांसी न कळे पाहा हो । पूर्ण अभाव तुर्काचा ॥३४॥
थिजलें विघुरलें तूप एक । तैसें सगुण निर्गुण एकत्र देख । तुम्ही प्रतिमेचा करितां द्वेष । परम मूर्ख अविवेकी ॥३५॥
जी जी नेत करी बंदा । ती ती पूर्ण करी खुदा । तुमचे किताबाचा बांधा । तुमचे बोधा कां नये ॥३६॥
तुमचा अभाव तुम्हांसी प्रगट केला । जवळील खुदा दूर बोभाइला । एकबार अल्ला एकबार अल्ला । बाकी हैराण झाला । नाहीं भेटला अद्यापी ॥३७॥
दुरिलासी हांक मोठी । जवळिलासी कानगोष्टी । तुम्हांसी निकट झाली भेटी । ओरडोनि उठी मुख्य मुलांना ॥३८॥
खुदा माना पश्चिमेकडे । येर अवघे कां वोस पडे । मौजूद म्हणा चहूंकडे । हेही धडफुडे तुम्ही नेणां ॥३९॥
पाच वख्त खुदाचे झाले । बाकी वख्त काय चोरी नेले । तुमचें शास्त्र तुम्ही भुलले । देवासी केले एकदिशी ॥४०॥
आम्हांसी म्हणतां पूजितां फत्तरें । तुम्ही कां मुडद्यावर ठेवितां चिरे । दगडाचे पूजितां हाजीरे । पीर खरे ते माना ॥४१॥
केवळ जे का मेले मढें । त्यांचीं जतन करतां हाडें । फुल गफल फतरियावरी चढे । ऊदसो पुढें तुम्ही जाळा ॥४२॥
तुर्क:- गंगा न्हावो तुम सबके पाक । तों केंव कर्ते जुदा जुदा सैंपाक । बीटाल बीटाल कर मारे हाक । सब नापाक दो जखी ॥४३॥
कहो सर्वांभूतीं भगवद्भावो । बोले एक जगे खाना कोन खावो । एक एकीसकू हात न लावो । जुदा जुदा ठावो अलाहिदा ॥४४॥
खाना खाते उसका दाना उसपर चढे । तो उसकी नरडी लेने दवडे । आध किया मत छोडे । दोनो रौत खडे जमातमो ॥४५॥
औरत आपकी घर खाना खावे । उसे सैंपाकमें ती बाहेर करावे । रात ज्याकर उसपास सोवे । तव ना कहे नापाक ॥४६॥
जीसकी बेटी लवंडी लावे । उस संबंधीके घर खाना न खाये । बेटी भावे खाना न भावे । बडे किताब बह्मनके ॥ आमचा सैंपाक परम निष्ठा । त्याचा सैंपाक परम खोटा । समंधीमें समंधिष्ठा । शास्त्र झूटा तुमारा ॥४८॥
बेटी पाक बाप नापाक । तुम्हारे शास्त्र की हुवी राख । कर्म धर्मकु पडे खाक । हीला दोजक बह्मनकू ॥४९॥
हिंदु:- तुम्ही तुरक परम मूर्ख । नेणां सदोष निर्दोष । प्राणी प्राण्यातें देतां दुःख । भिस्तीमुख तुम्हां कैंचें ॥५०॥
खुदा मारितो मुरदाड देख । तुम्ही मारा ते पवित्र चोख । खुदा परीस तुम्ही झालात पाक । यवन हाल्लक दोजकी ॥५१॥
जबे करुनी तुम्ही सांडा कुकडे । फडफडीत तुम्हांपुढें । येणें तुम्हांस काय सबब जोडे । पढत वेडा मुलाना सालीम ॥५२॥
जबे केलिया भिस्त पावे बकरा । तरी तुम्ही निमाज रोजे कां करा । आपली जबे आपण कां न करा । भिस्तीच्या घरा जावया ॥५३॥
हाजार जबे करी एकला । एक उठवितां तरी मुलाणा भला । भिस्ती श्रम व्यर्थ पडला । दोष घडला प्रत्यक्ष ॥५४॥
हिंदु मुसलमान दोई । खुदानें पैदा किया भाई । तुर्ककी निष्ठा पाई । हिंदुकू पकड कर मुसलमान करो ॥५५॥
हिंदुकरितां खुदा चुकला । त्याहूनि थोर तुमच्या अकला । हिंदुस मुसलमान केला । गुन्हा लाविला देवासी ॥५६॥
तुर्क:- जबे करणारकू परम दोख । तुरक कहे वो सच्या देख । गुना लाया इनें एक । झगडा नाहाकी करना ॥५७॥
जबे करितां मुलाना बैयत बोले । कभी उठावनकूं जीभ न हाले । वो खुदा बिगर किसका न चले । बह्मन बोले वो सही बाता ॥५८॥
नरडी काटे भिस्ती दस्त । वो जातका मगन मस्त । आगलेकू करितां खस्त । खुदा शास्त करेगा ॥५९॥
हिंदु:- ब्राह्मण म्हणे अहोजी स्वामी । वस्तुता एक आम्ही तुम्हीं । विवाद वाढला न्याति धर्मी । जातां परब्रह्मीं असेना ॥६०॥
तुर्क:- तुरुक कहे वो बात सही । खुदाकू तो ज्यात नहीं । बंदे खुदाकू नहीं जदाई । वो कह्या रसुलील्ला हाजरत परदे ॥६१॥
हिंदु:- सर्व धर्म ज्याचा निमाला । मनोधर्म तुरुकें ऐकिला । आनंद परम जाहला । मंत्र केला उपदेश ॥६२॥
ते वेळीं केलें नमन । येरें आदरें दिधलें आलिंगन । दोघांसि जाहलें समाधान । आनंदें संपूर्ण निवाले ॥६३॥
आम्हीं तुम्हीं केला झगडा । तो परमार्थाचा बांध उघडा । प्रबोधावया महा मूढा । कर्म जडा उदबोध ॥६४॥
शब्दीं मीनला शब्दार्थ । दोहींसी बाणला परमार्थ । परमार्थ मनोरथ । झाले तृप्त दोहींसी ॥६५॥
ऐक्यवाक्य विवाद । विवादीं जाहला अनुवाद । एका जनार्दनीं निजबोध । परमानंद दोहींसी ॥६६॥


भारूड – सगरमें बाजी पतालमें बाजी …

सगरमें बाजी पतालमें बाजी । जीत देखो उत बाजी । धीम धीम चलत । थय थय नाचत ।
ये दील बांदरा रज्या तल बुडके चने । बार बार उठ उठ लेट लेट । कहूं तो चुपीच लेट । तैं मेरा नाम क्या पूछे गा भाई ।
नाम कहूं तो अजप । अवल मुजे नाम नथा । दरभ्यान सौ पैदा हुवा । आलेखनकु बाल पलटाया ।
सलेखनकु मार चलाया । तुटा फाटा न्हाये । उस शेहेरमें हैं पेटा । व्हाबी बडे बडे महाजन बेटे हैं ।
कछु देवे कछु दिलावे । आजका दिन देनेका । आजका दिन लेनेका । दिल जाने सो देख ।
सरजावती सो देख । मुसो नाम बोल । दृष्टीकी गांठ खोल । तूं ग्यानी तूं ग्यानी । उपर दुगानी ।
तीन दमडीया तीन कवडीया । किस लंडीनें लेना । मेरा साहेब तो ऐसा है । दिल दरीयाव ।
महजूत भरीयाव । उभे तो मेरी मागनेकी बाट । काट काट कर छांडी है । हारा देना जाता लेना ।
जो अंदर सोहंसारा । जो बाहेर सोहंसारा । फिर तेरे तैं चोंदी कैसी देउंगा । चोंदी कहे तो बडेबडेकु दियी है ।
भले भलेकु दियी है । तेरे पराशरकूबी चोंदी दियी है । जो दुरगंधसो ख्याल विया है । वेद व्यास पैदा हुवा है ।
तेरे नारदकुबी चोंदी दियी है । पलखम्याने नारदकी किया है । घुसल करते पेट बढाया है । हुकूम करते साठ पोंगडे जनाया है ।
तरे ब्रह्मेकू चोदी दियी है । जो सरस्वती हैंयाल हुवा हैं तो ब्रह्मा बेटी चोद कहला है । तेरे विष्णुकू चोंदी दियी है ।
जो वृंदाके स्मशानमें रह्या । तेरे महादेवकुबी चोंदी दियी है । जो जंगलमे मोहनीके सात हैया हुवा है ।
तेरे बडे देवकूबी चोंदी दियी है । जो आदि औरत आधा मर्द किया है । रहे रहे रहे मुर्गीके । आपने जगाच रहे ।
ज्यगा छोडकर जायगा तो मारते मारते मार खायगा । उपर जबरायेल काटेंगा । दात नीकसकर पसरेगा टांगा ।
फिर क्या माकेपेठ आवेगा । ईसबदल मगरुरपना दूर कर । महजुदसी याद धर । धरेगा तो कैसी धर ।
धरेगा तो जूदा न कर । परका खबुतर किया । टालीका साप बनाया । उडा ना उड जावे ।
सत्यलोककूबी न जावे । सनकादिककी काढी माया । कहे का जनार्दन भस्ति दोज्यक सही बाजेगिरी अल्ल ही अल्ला ॥१॥


भारूड – संचित बरवें लिहिलें । भाग…

संचित बरवें लिहिलें । भाग्यवंता भाग्य चांगलें । कन्यापुत्र पोट पिकलें । वेल मांडवा जाईल ॥१॥
फार देव दुणावेल । पोटभर दोंद सुटेल । गाईम्हशीनें वाडे भरवील । उत्कृष्ट दुभतें होईल ॥२॥
आहे सदैव तुमचा वाडा । रोग जाईल तुमची पीडा । सज्ज जोड्या बसवाया घोडा । विघ्नें जातील देशोधडा ॥३॥
यांत भुलूं नका जाईल नेट । रामनाम भजे झटपट । आहार निद्रा काम लटपट । लोभाची भारी खटपट ॥४॥
मायेचा बाजार हाट । पुढें अवघड घांट नीट । चित्त देऊनि ऐका खुण गा ॥५॥
आया बाया सांगतों नाणी । तुम्ही अवघिया धरा ध्यानीं । उठतां बैसतां शयनीं । कांडितां दळण कांडीन ॥६॥
मातापिता बंधु बहिणी । बाळ भ्रतार सुखाची मांडणी । अंतकाळीं येईना कोणी । एकलें जावें स्वर्गाशीं ॥७॥
कोणी संत येतील घरा । त्यांचा आदरमान करा । अतीत अभ्यागत येती द्वारा । त्यांला कांहीं तरी दान करा । ह्रदयीं आठवा पंढरीनाथ ॥८॥
लगबगा जलदीला मोल । देहगांवचा होरा जाईल । हे डोळेगांवीं दिवस मावळेल । कानपूरचे कवाडे लागतील ॥९॥
तोंडापुर ओस पडेल । दांतवाडीचा मार्ग मोडेल । नाक गांवीं गळती लागेल । सुरतीचा डौल बिघडेल ॥१०॥
मग सरेल अवघी हवा । कांहीं विचार आपल्या जिवा । काहीं घडली नाहीं सेवा । शुद्ध हरपेल गाळ वेडगांवा । बैसली जागा उठवेना ॥११॥
जेणें अंधळे भोळे अज्ञान । यांना गुरुसंत देती ज्ञान । दिला मंत्र तो घर बुडवून । आपल्या स्वहिताकारणें । साठ सहस्त्र ऋषीजन दुर्वास श्रेष्ठ भोजन ॥१२॥
ह्या कंसाचे घरीं । सहा महिने अवद भारी । मिष्टान्न नानापरी अंतीं गेले यमपुरीं । सेवकिला दुर्योधना ॥१३॥
महा संकटें आलीं थोर । यमपुरींची ऐका खबर । ऐशी हजार कोस चौफेर । तेथें नरककुंड अघोर । भारी दुःखाचे डोंगर । समर्थ राजा इंद्र गरीबाचा पाड काय बरें ॥१४॥
तळमळ व्यथा भोगिती । ऐकावयाची गती । वडील करुणा भाकिती । वैश्य कल्याण चिंतिती । दया नाहीं उपाय चालेना गा ॥१५॥
सांगतों अनुसंधान । हित होईल तुमचें कारण । संतांचे संगतीनें । पंगती पवित्र पावन ॥१६॥
द्वारीं तुळसीवृंदावन । एकादशी व्रत नेमानें । हरिदासाचे संगतीनें । हरिकथा पुराण श्रवणा ॥१७॥
कोटी कुळ्या होतील पावन । वैकुंठी त्याचें पेण । एका जनार्दन सांगतो प्रसन्न । नाम श्रेष्ठ पतीत पावन गा ॥१८॥


भारूड – लगे ढोल लगे ढोल । जरी तुझ…

लगे ढोल लगे ढोल । जरी तुझा वस्ताद खोल । तरीच मशीं बोल । नाहीं तरी वांया फोल । जाई जाई रे गव्हारा ॥१॥
मी निराकाराचा डोंबारी । तीहीं लोकीं माझी फेरी । चार युगांच्या खबरी । तुज सांगेन रे गव्हारा ॥२॥
प्रथम खेळ कैलास गिरीं । वेळु रोविला निर्धारी । शंभु राजा राज्य करी । त्याचें उदारत्व भारी । तुज सांगेन रे गव्हारा ॥३॥
आत्मलिंग आणि पार्वती । ती दिधली दशकंधराप्रती । त्याच्या उदारत्वाची ख्याती । नाहीं नाहीं त्रिजगतीं । धन्य त्या शंभूची याद कर ॥४॥
दुसरा खेळ वैकुंठी । श्रीमंत महाराज विष्णु जगजेठी । तेणें दैत्य मारिले कपटी । क्षीरसागर तटीं । रहिवास केला । धन्य त्या विष्णूची याद कर ॥५॥
अवतार धरिले मच्छ कच्छ वराह नारसिंह वामन फरशधरा । तिसरा खेळ अयोध्यापुरा । धाक दरारा शत्रूशीं । धन्य त्या विष्णूची याद करा ॥६॥
सूर्यवंशीं राजे भले । शिभ्रीनें मांसदान केलें । वैकुंठनाथा संतोषविलें । नगर नेलें मोक्षाप्रती ॥७॥
धन्य त्या शिभ्रीची याद कर । तैसाची हरिश्चंद्रराजा पुण्यराशी । राज्य देउनी ब्राह्मणासी । आपण जाउनी वाराणशीं । पुत्रपत्नीशी विकलें । धन्य त्या हरिश्चंद्राची याद कर ॥८॥
दैत्यवंशीं राजा बळी । तेणें तृप्त केला वनमाळी । देहवान देऊनि पाताळीं । देव आपणा जवळी ठेविला । धन्य त्या बळीची याद कर ॥९॥
राजा अजपाल भगीरथ । दशरथ वंशीं जन्मले रघुनाथ । त्याच्या औदार्याची मात । पहातां वेदशास्त्र शिणलें । धन्य त्या रामाची याद कर ॥१०॥
त्या खेळाचा नवलाहो । देवां न कळे अभिप्रावो । वेदा श्रुतीशीं जव लावो । अगम्य पहा हो सनकादिकां । धन्य त्या श्रीकृष्णाची याद कर ॥११॥
ऐसा गुलाबराव महाबळी । तेणें भल्याभल्याशीं केली रळी । खेळ मांडिला गोकुळीं । कृष्ण वनमाळी खेळत । धन्य त्या कृष्णाची याद कर ॥१२॥
तसरीपा दिधल्या अमूप । त्यासी नाहीं पुनरावृत्तीचें माप । आपण राहुनी साम्यप । रुपारुप मेळविलें । धन्य त्या महाराजाची याद कर ॥१३॥
पुढें द्वापारयुगाचा उदयो । म्यां बरोबर घेतिला कामाजी गुलाबरावो । तेणें ठकविलें मोठे मोठे पहा हो । तुज सांगेन रे गव्हारा ॥१४॥
नारदासी डोळा घातिला । विश्वामित्र फारच नागविला । पराशर वस्त्र टाकूनि पळाला । लबाडी नव्हे माझिया बोला । तुज सांगेन रे गव्हारा ॥१५॥
ब्रह्मयाची घेतली लंगोटी । इंद्र पळाला कपाटीं । चंद्रासी काळोखी मोठी । अद्यापि जन दृष्टी । पहाती कीं रे गव्हारा ॥१६॥
पुढें कलियुगामाझारीं । भूवैकुंठ श्रीक्षेत्र पंढरी । पुंडलीक पाटलाचे द्वारीं । खेळ जोडिला लवकरी । मागितला धन्य त्या पुंडलिक पाटलाची याद कर ॥१७॥
नगरांत डोंबारी आले । उदंड खेळ खेळोनि गेले । परि पुंडलिका भाग्य श्रीविठ्ठलें । न कळें ऐश्वर्य कोणासी । धन्य त्या पुंडलिक पाटलाची याद कर ॥१८॥
खेळ खेळतां अंग हारपलें । चित्त मन उन्मल झालें । कीर्तन सुखें निवालें । एका जनार्दनी ऐसें केलें । धन्य त्या श्रीविठ्ठलरायाची याद कर ॥१९॥


भारूड – श्रीकृष्ण माया जी पाहे । …

श्रीकृष्ण माया जी पाहे । तैं मी झालें कैकाय । कैकाय देवाचें अंग । कैकाय झालें जग । कर्म ब्रह्म रे विभाग । त्यापासोनि कळों आम्या ॥१॥
गोरी आई ओ आम्या । सावळाई ओ आम्या । बरव्या रुपाची ओ आम्या । शूळगुळाई ओ आम्या ॥२॥
मत्साई कत्साई वो वराई वो नरसाई वो । वामनाई वो ठेंगणाई वो । परसाई वो रामाई वो । कृष्णाई वो बोधाई वो । काळकाई वो आम्या ॥३॥
गंगाई वो । भागाई वो । रेणुकाई वो गडबडाई वो । चागुणाइ वो तुकाई वो आम्या ॥४॥
काय तुझ्या भयाचें साद पाहे । सांगणें बोलणें न चले वो माये । तुझ्या जीवीचें सांगेन । जें सप्त पाताळाखालीं तें तूंच तूजमाजीं । तेंच मजमाजीं । काय धमक घेऊनि बसलीस गे धमकटी । तुझ्या धन्याची आस करीन । कीं कांकडाची चाड धरीन । थुः तुझ्या तोंडावरी । थुः तुझ्या लोभावरी । शकुन सांगेन तें एक । काळीकाई वो आम्या ॥५॥
मागूं त्या बुरगुंडा । नीट केल्या बहुत रांडा । तैसी नव्हे मी कैकाय । निजज्ञान करंडा । काळीकाई वो आम्या ॥६॥
नमो कानडी भाषा । केळीव शीघ्रता । शकुन केळी शकुन केळी साइयो नमो आर । सीड बीड आशा । बीड ह्याळावा । गन्मोड होऊंगे आम्या ॥७॥
गंदिने धनान्ने तमिन्ने गवीनें हाड व्याण । आडाव्याडा मोहो शाई तुडा । काळा आई ओ आम्या ॥८॥
नमो तैलंग दिशा । कच्छ कच्छ भाषा । सरावें मुसळ ल्लोपे आम्या ॥९॥
मित्ति खन्नाळू कडयाळू । इनयाळू । खखठाये । काळी आई ओ आम्या ॥१०॥
कैकाय कैकाय । शकुन सांगेन ते ऐक कैकाय कैकाय । न कळे ब्रह्मादिकां । कैकाय वृत्ति खोटी । कैकाय कैकाय । सत्य सांगेन गोष्टी । जीवशिवा पडली मिठी एका जनार्दनाच्या कोटी । काळीकाई वो आम्या ॥११॥


भारुड – गौळण – ऎक ऎक सखये बाई । नवल मी स…

ऎक ऎक सखये बाई । नवल मी सांगू काई ।
त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेस म्हणतो आई ।
देवकीने वाहीला गे यशोदेने पाळिला ।
पांडवांचा बंधुजन होऊनीया राहिला ॥ १ ॥
ब्रह्माडांची साठवण योगीयांचे निजध्यान ।
चोरी केली म्हणोनिया उखळाशी बंधन ॥ २ ॥
सकळ तीर्थे ज्याचे चरणी । सुलभ हा सुलभ पाणी ।
राधिकेस म्हणतो तुझी करितो मी वेणी फणी ॥ ३ ॥
एका जनार्दनी कैवल्याचा मोक्षदानि
गायी गोप गोप बाळा मिळविली आपुलेपणी ॥ ४ ॥


भारुड – गौळण – वारीयाने कुंडल हाले । डोळ…

वारीयाने कुंडल हाले । डोळे मोडीत राधा चाले ।
राधेला पाहूनि भुलले हरी । बैल दोहितो आपुल्या घरी ॥ १ ॥
फणस गंभीर कर्दळी दाटा । हाती घेउनी सारंग पाट ॥ २ ॥
हरी पाहून भुलली चित्ता । मंदिरी घुसळी डेर रिता ॥ ३ ॥
मन मिळालेसे मना । एका भुलला जनार्दना ॥ ४ ॥


भारुड – गौळण – असा कसा देवाचा देव बाई ठक…

असा कसा देवाचा देव बाई ठकडा देव एका पायानी लंगडा ॥ धृ. ॥
गवळ्याघरी जातो । दहीदूश चोरूनी खातो। करी दुधाचा रबडा ॥ १ ॥
शिंकेची तोडितो । मडकेचि फोडितो । पाडी नवनीताचा सडा ॥ २ ॥
वाळवंटी जातो । कीर्तन करतो । घेतो साधूसंतांशी झगडा ॥ ३ ॥
एका जनार्दनी । भिक्षा वाढा बाई । देव एकनाथाचा बछडा ॥ ४ ॥


भारुड – होळी – देहचतुष्ट्याची रचोनि होळी…

देहचतुष्ट्याची रचोनि होळी ।ज्ञानाग्नि घालुनि समूळ जाळी ॥ १ ॥
अझुनि का उगवलाची । बोंब पडू दे नामाची ॥ २ ॥
मांदी मेळवा संतांची । तुम्ही साची सोडवण्या ॥ ३ ॥
धावण्या धावती संत अन्तरंग ।संसार शिमगा सांग निरसती ॥ ४ ॥
एका जनार्दनी मारली बोंब । जन वन स्वयंभ एक झाले ॥ ५ ॥


भारुड – जागल्या – रात्रंदिवस घोकितो तुम्ही ..

रात्रंदिवस घोकितो तुम्ही सावध असा ।
तुमच्या नगरीचा आम्हा नाही भरवसा ।
उजेड पडताना गळा पडेल फासा ॥ १ ॥
उठा की जी मायबाप ।कशी लागली झोप ।
हुजुर जाऊनीया । एवढी चुकवा खेप ॥ धृ. ॥
तुमच्या नगरीची नाही नांदणूक बरी ।
तुमच्या शेजेला दोन लोभिष्ट नारी ।
त्यांच्या योगे दु:ख तुमच्या नगरात भारी ॥ २ ॥
हिंडता देशांतरी चौर्‍याऎंशी जग ।
अजून सापडला नाही नीट सुमार्ग ।
कोणते हित केले बापा सांग ॥ ३ ॥
जुन्या ठेवण्याचा तुम्ही पूर्जा काढा ।
त्याच्या आधारे बोलेन घडाघडा ।
एका जनार्दनी घरा बळकट मेढा ।
चाकर हुजुराचा घेईन अवघा झाडा ॥ ४ ॥


भारुड – जागर – हरिजागरणी दिवस आनंदे सौरस…

हरिजागरणी दिवस आनंदे सौरसे ।
गावया उल्हास वैष्णवासी ॥ १ ॥
गाता पै नाचता तया जाला पै बोधु ।
त्यामाजी गोविंदु क्रीडतसे ॥ २ ॥
चला चला रे भाई हरिजागरा वेगी ।
वैष्णव हे रंगी नाचताती ॥ ३ ॥
स्वानंदे लवलाह्या उभवोनी श्‍सात्विका बाह्या ।
आलिंगू कान्ह्या अष्टभावी ॥ ४ ॥
दुजेपणाविण खेव पडिलेंस्शे मिठी ।
सांगणे पुसणे गोष्टी हारपली ॥ ५ ॥
यापरि वैष्णव रंगी करिताती आल्हाद ।
उसळला आनंद साठवेना ॥ ६ ॥
एकाएकी हो मिनला जनार्दन ।
तेणे सुखे मना उमजु नाही ॥ ७ ॥


भारुड – जंगम – भाव तोचि भगवा चिरा । मुळ…

भाव तोचि भगवा चिरा ।
मुळीचा तंतू शिव दोरा ।
आत्मलिंग पूजू बरा ।
मी आलो तुझिया द्वारा बापांनो ॥१॥
गुरुधर्म कोरान्न भिक्षा ।
परात्पर आमची दीक्षा रे बापांनो ॥धृ. ॥
देहदंड काठी हाती ।
आशा जाळुनी लाविल्या विभूती ।
दया क्षमाआणि शांती ।
आम्ही जंगम ऎशा रिती रे बापांनो ॥२॥
हरिनामाच्या घालुनि माळा ।
गुरुदीक्षेचा सोहळा ।
साधुसंत जाणती कळा ।
एका जनार्दनी भॊळा रे बापांनो ॥३॥


भारुड – जोगवा – अनादि निर्गुण प्रगटली भवानी…

अनादि निर्गुण प्रगटली भवानी ।
मोह महिषासुरमर्दना लागुनी ।
भक्‍ता लागोनि पावसि निर्वाणी ॥ १ ॥
आईचा जोगवा जोगवा मागेन ।
द्वैत सारूनी माळ मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन ।
भेदरहित वारीसी जाईन ॥ २ ॥
नवविध भक्‍तिच्या करीत नवरात्रा ।
करून पोटी मागेन ज्ञानपुत्रा । धरीन सद्भाव अंतरीच्या मित्रा ।
दंभ संसार सांडीन कुपात्रा ॥ ३ ॥
पूर्ण बोधाची घेईन परडी ।
आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कुर्वण्डी ।
अद्‌भुतरसाची भरीन दुरडी ॥ ४ ॥
आता साजणी झाले मी नि:संग ।
विकल्प नवर्‍याचा सोडियेला संग ।
काम क्रोध हे झोडियेले मांग ।
केला मोकळा मारग सुरंग ॥ ५ ॥
ऎसा जोगवा मागुनि ठेविला ।
जाऊनि महाद्वारी नवस फेडिला ।
एकपणे जनार्दन देखिला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ॥ ६ ॥


भारुड – जोहार – जोहार मायबाप जोहार । मी न…

जोहार मायबाप जोहार । मी निराकाराचा महार ।
सांगेन अवघा विचार । जिवाजीचा की मायबाप ॥ १ ॥
जिवाजीने सारा गाव बुडविण्याची धरली हाव ।
त्यासी मिळाले कामाजीराव । मग अन्याय सहजचि की. ॥ २ ॥
कामाजी बाजीस मिळाले । क्रोधाजी गावात सहज शिरले ।
लोभाजीचे ठाणे जोडले । मग विसरले धन्यासी की. ॥ ३ ॥
मदाजीबाबा तो जाहले मस्त । त्यांनी गाव पांगविला दरोबस्त ।
मत्सर बाबा उन्मत्त । आपआपणात मिळाले की. ॥ ४ ॥
दंभाजी म्हणविती चौधरी । सदा बसती आपुले घरी ।
धन्याची तलब आलियावरी । गांडीवर टोले की. ॥ ५ ॥
अहंकार पोतनीस कारभारी । ते जिवाजीस ठेविती धाब्यावरी ।
त्याची भरोवरी कोण करील की. ॥ ६ ॥
याची नका धरू संगती । तेणे तुमचीन चुके पुनरावृत्ति ।
एका जनार्दनी करी विनंती ।संती ऎकावी की जी मायबाप ॥ ७ ॥


भारुड – जोशी – येथुनि पुढे बरें होईल । भ…

येथुनि पुढे बरें होईल । भक्‍तिसुखे दोंद वाढेल ।
फेरा चौर्‍यांशीचा चुकेल । धन मोकाशी ॥ १ ॥
मी आलो रायाचा जोशी । होर ऎका दादांनो ॥ध्रु॥
मनाजी पाटील देहगावचा । विश्वास धरु नका त्याचा ।
हा घात करील नेमाचा । पाडील फशी ॥२॥
वासना बायको शेजारिण । झगडा घाली मोठी दारुण ।
तिच्या पायी नागवण । घर बुडविसी ॥३।
एका जनार्दन कंगाल जोशी । होरा सांगतो लोकांसी ।
जा शरण सद्‌गुरुंसी । फेर चुकवा चौर्‍याऎंशी ॥४॥


भारुड – जोशी – आम्ही अलक्षपुरीचे जोशी । …

आम्ही अलक्षपुरीचे जोशी । शकुन सांगू निश्चयेसी ।
तेणे चुकतीचौर्‍याऎंशी । मी निर्गुणपुरींचा जोशी ॥१॥
होरा ऎका दादांनो ॥ध्रु॥
नका जाऊ मना मागे । थोर थोरा जाहले दगे ।
मी बोलत नाही वाउगे । सावध रहा दादांनो ॥२॥
वासना वाईट ही बा थोर । पुरविले लहान थोर ।
फिरतीचौर्‍याऎंशी लक्ष घर । पडाल फशी दादांनो ॥३॥
एका जनार्दनी जोशी । सांगेन शकुन सर्वत्रांसी ।
रामनाम वाचेसी । तेणे तरती विश्वासी दादांनो ॥४॥


भारुड – जोशी – माझा शकुन ऎका भाई । चार व…

माझा शकुन ऎका भाई । चार वेद देती ग्वाही ।
सहा शास्त्रेंवदती पाही । तेचि धरूनी रहा ॥ १ ॥
सावध नाना सावधनाना । समज काही तरी धरी मना ॥ध्रु॥
नका जाऊ आडवाटे । तेथे लागती चपेटे ।
दात विचकुनी पडसी नेटे । उगेच पहा ॥२॥
गेले सरले मागील फेरे । आता दिवस आले बरें ।
विघ्न नाहीसे जाले सारे । सावध रहा ।३॥
एका जनार्दनींचा जोशी । होरा सांगतो संताशी ।
ऎकता जातील मोक्षच दासी ।
नायकता पडतीलचौर्‍याऎंशी । हेचि पहा ॥४॥


भारुड – अष्टपदी – वांकडा म्हणे कृष्णजी बापा…

वांकडा म्हणे कृष्णजी बापा मीं एक देखिलें भूत रे ।

त्याचें विष जळुनी गेलें शेष राहिलें किंचित रे ।

देहाविण छळितो तेथेंचि पीडितो त्या ठायां असें मळमूत्र रे ।

त्यांनीं जिंकिले कोण कोण ते त्यासी जिंकिल कोण तो रे ॥ १ ॥

धोंगडें माझें बोलणें कान्होबा धोंगडें माझें बोलणें ॥ध्रुव०॥

जुनाट जोगडा काळाचा काकडा डोंगरीं रहातो भोंडा रे ।

झडपिला हांवे नागवाचि धांवे पाठीसी लागला भिलगोंडा रे ।

कर्दळी खोपा नेटका रूपा पाहूनि भुलला तोंडा रे ।

जग अंधारी महा भ्यासुरी अपार चालिला वीर्याचा लोंढा रे ॥ २ ॥

कुल्लाळ हाडाचा बाप चहाडाचा अखंड घडतो मडकीं रे ।

त्यासी एक भूत संचार जाला हिमालयाच्या खडकीं रे ।

भूत वर्‍याची नोवरी पाहूनि जिवास भरली धडकी रे ।

कोणी एके वेळीं पाठीशी लागला भेडसाविती लेक लाडकी रे ॥ ३ ॥

नंगाचे दंदी नंगाचि खांदी अति हाडाचा ढेंगा रे ।

त्यासी एक भूतसंचार जाहला येऊनि जडला अंगा रे ।

सुत अंधाचा परांगनेचा चिरे फेडितो कांगा रे ।

त्यासी एक वृक्ष पुढें भेटला डांगानें मोडिला टांगा रे ॥ ४ ॥

गंगामाझारी संग ढोवरीसी रमला तपो गर्वे रे ।

त्यासी एक पुत्र जळींजन्मला ।

त्यानें केलीं अठरा पर्वे रे ।

तो एक साक्षात वेदो नारायण ।

बोलणें त्याचें बरवें ।

कुरंगीचें पाडस दुबकिलें अयुघ्यापूर मिळविलें रे ॥ ५ ॥

डोळीयाचे जळीं एक द्विज जन्मला तेंचि त्याचें वाहन रे ।

बापापरीस एका तोंडानें आगळा तारका केलें हनन रे ।

शैल्यात्मजेच्या सवतीचा तनय तुझ्या हातीं त्याचें दहन रे ।

दिवा अंधारीं जो कां रमला नातवंड त्याचें गहन रे ॥ ६ ॥

लंगोटबंदा ढुंगासी शेपूट अझुन जीत काळतोंडा रे ।

रात्रींतून ज्यानें शेपुटी बांधोनि संकटीं आणिला धोंडा रे ।

त्रिभुवनासी तो देवऋषी बाप जयाच्या तोंडा रे ।

सोळा सहस्त्र नारी भोगुन ब्रह्मचारी तूं एक म्हणविसी लंडा रे ॥ ७ ॥

वांकड्यानें आहाणा घातला जाण उकलील तो विरळागत रे ।

पदापदाचे अर्थ करी जो तो एक असे बहुश्रुत रे ।

आठा कडव्याची अष्टपदी गाइली तो एक जाणा अद्‌भुत रे ।

एका जनार्दनीं विनवित असे भूत ।

नव्हे कान्होबाचा सूत रे ॥ ८ ॥


भारुड – भटीण – अगे ऐके भटणी । कां बोलसी …

अगे ऐके भटणी । कां बोलसी चावटनी । जन्मांतरी पाळिलें म्हणोनि । उपकार फेडिसी ॥ १ ॥

काय बोललीस बोल । अवघा सारा फोल । अंगीं नाहीं भक्तीची बोल । भटणी तुझ्या ॥ २ ॥

कामक्रोध माजली । विषयानें भुलली । गुरुकृपा नाहीं जाली । भटणी तुजला ॥ ३ ॥

अहंकार सोडोनी देई । सद्‍गुरूसी शरण जाई । भक्तिसुखें तूं राही । हो भटणी ॥ ४ ॥

भट बोलला बोली । भटणीची अहंता गेली । भटणी ती स्थिर जाली । एका जनार्दनाचे पायीं ॥ ५ ॥


भारुड – भटीण – मी भटीण आलें रे भटा । नको…

मी भटीण आलें रे भटा । नको करूं रिकाम्या चेष्टा ।

काय बोलतोसि चावटा । उगीच चेष्टा करूं नको ॥ १ ॥

म्यां भटणीनें तुज पाळिलें । पाळिल्याचे बरेच उपकार फेडिले ।

माझें मज आणुन दिलें । त्यांत तुझें काय गेलें रे भटा ॥ २ ॥

मजपासूनि वेद कीं रे झाले । ते म्यां तुझ्या हातीं दिधले ।

शंकासुरानें चोरून नेले । माझ्याच भयानें ते परत आणिले रे भटा ॥ ३ ॥

त्याच्याच आधारानें मी बोलत आहें । काय रे मस्ती तुसीं आली आहे ।

मस्ती तुझी भटा ठाऊक आहे । आपले अंतरीं शोधुनी पाहे रे भटा ॥ ४ ॥

लहानाचा थोर तुला म्यां कीं रे केला । नव अवताराच्या हातीं मला ।

दहावा कलंकी राहिला । तोही जाइल विलया रे भटा ॥ ५ ॥

एका जनार्दनीं कारण । भटाचें हरपलें मीपण ।

उगाच गेला मौन धरून । चैतन्यरूप पाहिलें रे भटा ॥ ६ ॥


भारुड – बैल – अरुता ये बैला । कां रे वे…

अरुता ये बैला । कां रे वेड्या बैला ॥ १ ॥

काय बोले वेडी । कोण उपडितो पेंढी ॥ २ ॥

पेंढी उपटणार तूंचि झाला । पुरता विचार करुनी बोला ॥ ३ ॥

काय बोलतें पशु भांड । देवद्वारीं काय पुजिसी आंड ॥ ४ ॥

काय बेटा बेकूब ढोरगा । हा मोठा शहाणा पोरगा ॥ ५ ॥

असें ढोर नसावें घरीं । आम्हांवाचून तूं भिकारी ॥ ६ ॥

सभाग्यासी काय करावयाचे बैल । यात्रेला कशानें जाईल ॥ ७ ॥

आम्ही ब्राह्मण अनुष्ठानी । नित्य गांजा सुरापानी ॥ ८ ॥

आम्ही नित्य करितों स्नान । वरवर धुतों अंतरीं बकध्यान ॥ ९ ॥

तरी अधिक आमुचा महिमा । शेण सारवावया नाहीं तुम्हां ॥ १० ॥

उगा राहे नाहीं तरी हाणीन रागें । माझीं तिखट आहेत शिंगें ॥ ११ ॥

उठोनी वोझें तुजवर घालीन । वोस रानांत नेऊन पाडीन ॥ १२ ॥

एका जनार्दनीं भलें । तेणें आपुलें स्वहित केलें ॥ १४ ॥


भारुड – छापा – अजब है त्रिकुटका घाट । जो…

अजब है त्रिकुटका घाट । जोत लगी घनदाट । धुंडले ना ओही बात । पलख जोत लगी ॥ १ ॥

उडवत चवरंग गुलाल । झमकर हे जोत ही लाल । महाकरण महाल । बिचमे लाल चमकत है ॥ २ ॥

चमक लगी दिनरात । नहीं कुछ आदि अंत । समजलेना ओही बात । सहज संग बतावे ॥ ३ ॥

खिजमत करले कछु काम । अजमत पावोगे राम । भ्रमर गुंफामें राम । रामनाम सुमरले ॥ ४ ॥

सुमरलेना नहीं मंत्र । छांडदे सब तंत्र । अनुहात जंत्र । धिमक मृदंग बजावे ॥ ५ ॥

बजावे धन् धन् धन् स्वरका बीन । भजन करले संगीन । नयन जागे रातदीन । ब्रह्म ताल लगावे ॥ ६ ॥

लगावे जो है तयार । करले दिलमों करार । हो जा भवजल पार । मेरे सद्‍गुरु साहेबकी ॥ ७ ॥

साहेब सद्‍गुरु जनार्दनके प्रतिपाल । एकनाथ तुम्हारे । फकीर में रहता है ॥ ८ ॥


भारुड – डोहो – डोहो डोहो डोहो । कान्होबा…

डोहो डोहो डोहो । कान्होबा डोहो । चला जाऊं डोहांत पोहों रे कान्होबा ॥ध्रु०॥

त्या डोहाचें अमूप जीवन । डोहो पहातां अति गहन । तया नाहीं चळण वळण । सर्व जीवांचें निधान ॥ १ ॥

डोहो ज्याला हें जीवन । डोहो व्यालासे पवन । डोहो गिळिला पर्वत । डोहो कार्य करी कारण ॥ २ ॥

डोहो न कळे साचार । डोहो क्षर ना अक्षर । एका जनार्दनीं निर्धार । तरिच पावाल पैलपार ॥ ३ ॥


भारुड – गाय – चहूं सडीं दुभे ब्रह्मीयाच…

चहूं सडीं दुभे ब्रह्मीयाचे मुंजी । बळीदान खुजी तीर्थ पायीं ॥ १ ॥

पैल मोहरी मोहरी । पैल मोहरी मोहरी ॥ २ ॥

सिंह वदन गाय प्रल्हादा घरीं । पंढरी पंढरी पुंडलिका ॥ ३ ॥

गुणागुण गुणी जनीं विजनीं । एका जनार्दनीं दुभतसे ॥ ४ ॥


भारुड – गोपाळ – माझे वासनेची दृढ जाळी । आ…

माझे वासनेची दृढ जाळी । आंत विषयाची गुळपोळी । आम्हां निजवूनि बोधाचे पाळी । ते त्वां गट केली रे वनमाळी ॥ १ ॥

कान्होबा सांडी पां आपुली खोडी । तुझे स्वरूपीं आमुची गोडी ॥ध्रु०॥

माझ्या अवघ्या अकरा गाई । त्या बा ठेविल्या तुझ्या पायीं । आम्हां निजऊनि निजवस्तु ठायीं । त्याचें दुभतें त्वां केलें काई रे ॥ २ ॥

जीवा बैसती माझी चौघडी । नेली चोरुन लिंगदेह घोंगडी । केली सबाह्य नग्न उघडी । तुझ्या संगतीची कोण गोडी रे ॥ ३ ॥

माझा सुंदर सुरस वेणु । त्याचा नाद त्वां नेला चोरुनु । गुणी निःशब्द केलासे गुणू । सखी वाचा नेली खुंटुनु रे ॥ ४ ॥

वेधीं बांधलें आमुचें मन । त्वां चोरिले जीवचैतन्य । एका पावला जनार्दन । तेणें खेळे मेळें समाधान रे ॥ ५ ॥


भारुड – हळदुली – हळदुली वाटुनी वाटिला पाटा…

हळदुली वाटुनी वाटिला पाटा । अगुणाचा नोवरा हळदुली उटा ॥ १ ॥

नागवा नवरा नागवी नोवरी । दोघें बैसलें चराचरीं ॥ २ ॥

नागवा नवरा नवरी नेसला । नागव्या नवरीनें नवरा वेढिला ॥ ३ ॥

सभामंडपीं दोघे ते दोघे । एका जनार्दनीं नाचती भोगें ॥ ४ ॥


भारुड – कहाणी – तुम्हां आम्ही सांगतों कहा…

तुम्हां आम्ही सांगतों कहाणी । सोळा बारा मिळोनी गढणी । कहाणी सांगती बैसोनी वनीं । जो ऐके तो परपुरुष धनी ॥ १ ॥

चित्त द्यावें आमुच्या बोला । सांडा वायां गलबला । विसरुनी प्रपंचाच्या मुळा । शब्दाचा लागों द्या चाळा ॥ २ ॥

एक अघटित वर्तलें । एक नारीस पांच पती देखिले । एका पुरुषा गरुवार केलें । साठ पुत्र जन्मले बळे ॥ ३ ॥

एका ब्राह्मणें कुत्रें खादलें । ग्रामजोशा प्रायश्चित्त दिलें । एका नारीनें कवसाल केलें । बापाभावांसी लग्न लाविलें ॥ ४ ॥

आई होउनी करवली । लेक वांटितसे हळदुली । पती विव्हळ म्हणोनी जाकळी । आमुच्या कहाणीची हे मुळी ॥ ५ ॥

कहाणी सांगे शिवशक्ति । तेणें एका जनार्दनीं तृप्ति । संत महंत आनंदती । अभाविकां न कळे गती ॥ ६ ॥


भारुड – कंजारीण – होहोरी होहोरी हो । लेवरे …

होहोरी होहोरी हो । लेवरे रसी । लेनेवाला है पर देनेवाला नहीं ॥हो०॥

देनेवाला है पर लेनेवाला नहीं ॥हो०॥ नीसंग आडाती केतान तोडा ।

अंकारी पडावा । आधा सान जोडा ॥हो०॥१ ॥

तेलंगी वाढवा । पुलान पुलवा । साधन करावा मन आशा फेडावा ॥हो०॥२॥

कुलवान नवरा । अडा तीन तंगी । नीतंग कोडता । तंगीन हाडी ॥हो०॥३॥

जनार्दनीं पडवा । कंजारीण लढवा । कोकनीक करवा । दातारू बरवा ॥हो०॥४ ॥


भारुड – कोल्हाटीण – आनंदी सद्‍गुरु पूर्ण परात…

आनंदी सद्‍गुरु पूर्ण परात्पर अभेद नमियेला । कायावाचामनें शरण गेलो मी त्याला । मूळचा सर्व ठाव तेणें मज दाखविला ज्ञानांजन घालूनि प्रवृत्ति मार्ग खुंटविला । पूर्ण बोध पाठविला ॥ १ ॥

कोल्हाटीण झाले बाई मी कोल्हाटीण झाले ॥ध्रु०॥

प्रवृत्तीचे वस्त्र फेडुनी सुखा सुखी रिझलें । परात्पर पर पुरुष पाहूनि त्यापाशीं मी गेलें । अंग संगती करून त्याचें सुख म्यां हरविलें । अधरामृत म्या सेविलें । कोल्हाटीण झालें ॥ २ ॥

आशा मनशा तृष्णा ह्या तिन्ही मेळविल्या रांडा । भाव चोहटा वेळू तेथें लावियेला झेंडा । करून उलट प्राणाचा क्रोध तो मारिला मेंढा । ब्रह्मरंध्री मिसळलें आला अमृत लोंढा । मग तो अहंकार मेंगा त्यांनी या भुलविलें सोंगा ॥ को० ॥ ३ ॥

मागें सारून कामें मारिली उफराटी उडी । भ्रांति लुगडें फिटुनि गेलें काया झाली उघडी । पूर्ण अनुभव कळुनी त्यासी मांडिली फुगडी । मदन मोहना दादुला घेउन झाले ते हिजडी ॥को०॥ ४ ॥

परद्वार म्यां केलें जन्मसार्थक झालें । पंचवीस दादुले हातीं धरुनी उठविले । अंतरगृह सावलींत येऊनि निश्चळ बैसलें । एका जनार्दनीं एकी एकपण मुरालें । जन्मजरामरण हरलें ॥को०॥ ५ ॥


भारुड – कुंटीण – सद्‌गुरुमाय कुंटीण झाली म…

सद्‌गुरुमाय कुंटीण झाली माझी । व्यभिचारा ठेविलें साये आजी ॥ध्रु०॥

अद्वैताचा मज पांघरविला शेला । एकान्तासी तिणें चालविलें मला ॥ १ ॥

परपुरुषाचे शेजेवरी नेउनी घातली । मागल्याची सोय सोडविती झाली ॥ २ ॥

भ्रांति पदर काढुनी ओढिती झाली । आलिंगन घ्यावया सरसावली ॥ ३ ॥

वासनेचे कंचुक सोडियेले । मायामय कुच हे मर्दियेले ॥ ४ ॥

जीवशिव मिठी घाली धरी आवळून । करून ऐक्यता माझें चुंबिलें वदन ॥ ५ ॥

अलक्ष पदातींत घातलें आसन । देहातीत भोगिला भोग त्याणें ॥ ६ ॥

एका जनार्दनीं भोळी नारी । परपुरुष भोगी निरंतरीं ॥ ७ ॥


भारुड – कुत्रें – ये रे कुत्तु ये । आम्हां …

ये रे कुत्तु ये । आम्हां विटाळ करूं नको । आपली भाकर घे । दे रे धन्या दे । विटाळ राहिला तुज खालीं । आवरून आपला घे । आतां हें कुत्रें मातलें । मीच म्हणूनी गुंतलें । फार कूस मोठी केली । जीवी तुझी खोटी झाली । उपाशीं मरतों पाहीं बरे । अमृताचें सारें । घर एक सकाळ काय खासी । तूंच मुद्दल कोठें राहसी । एवढे ज्ञान झालें कोठें । सद्‍गुरूचें देणें मोठें । सद्‍गुरु तुला आहे का रे । सर्वांघटी तोच कीं रे । आम्ही तर म्हणतों कुत्रा तुला । अविद्येनें धतोरा दिला । ब्राह्मणाशीं अविद्या म्हणशी । देहें ब्राह्मण कैसा होशी । श्रेष्ठ जन्म वेद बोलती । येवढे भले तरी कां मरती । हरिभक्त अमर होती । तें कळें कैसें । आपण व्हावें तैसें । होईनासी कां रे । जात गोत पाहिनाशी कीं रे । हें तुला ज्ञान कशानें झालें । एका जनार्दनीं गुरुकृपें कळों आलें ॥ १ ॥


भारुड – लग्न – एका जनार्दनाचे लग्नसिद्धी…

एका जनार्दनाचे लग्नसिद्धीसी । घटितार्थ पहावया मिनले चवदा । भुवनांचे ज्योति ज्योतिषी ॥ १ ॥

योग तोही एक तीथ तीहि एक । राशी तेंही एक नक्षत्र तेंही एक । सद्‍गुरुचरणीं एकाएक तोही जाला ॥ २ ॥

वर्ष तेंही एक मास तोही एक । बारा योगे पाहतां एकाएक जाले ॥ ३ ॥

घटिका तेहीं एक पळ तेहीं एक । शोधितां सूक्ष्म एका एकचि जाले ॥ ४ ॥

पहातां जनीं जनार्दनीं उभविली गुढी ॥ ५ ॥


भारुड – मुलगी – आरते ये ग धाकुटी मुली । ह…

आरते ये ग धाकुटी मुली । हिच काय तुमची बोली ॥ १ ॥

घरादाराचे हितकर्ते । फुटक्या मडक्याचें भोंक बुजवितें ॥ २ ॥

अटकमटक नऊ वाटा । येऊन बसे दहा दारवंटा ॥ ३ ॥

दहा दारवंटा तें कोण । तुझ्यांत गेलें दोन ॥ ४ ॥

फटक माझे सवती । तुला सहाजण झोंबती ॥ ५ ॥

पडले षड्‍विकाराच्या हातीं । सद्‌गुरूचे पाय धर चित्तीं ॥ ६ ॥

सद्‌गुरु काय देईल ग मला । तन मन धन अर्पण करील त्याला ॥ ७ ॥

संसार जाईल सारा । उद्यां येईल काळाचा फेरा ॥ ८ ॥

आम्ही नर नारी पतिव्रता । विष्णूवर करूं सत्ता ॥ ९ ॥

एका जनार्दनीं केला संग । योगी खेळविला पांडुरंग ॥ १० ॥


भारुड – नीति – नीति सांगतों ऐका एक । दास…

नीति सांगतों ऐका एक । दास सभेचा सेवक । मन टाळूं नका एक । कोणी एक ॥ ध्रु०॥

सांडावरून जाऊं नये । लांच खाऊं नये । चोहट्यांत राहूं नये । कोणी एक ॥ १ ॥

अक्रीत घेऊं नये । इमान सोडूं नये । बैमान होऊं नये । कोणी एक ॥ २ ॥

सज्जनाशी विटूं नये । नीचासवें बाटूं नये । तस्कराशीं पुसूं नये । कोणी एक ॥ ३ ॥

भक्तिमार्ग खंडूं नये । कुभांड्यासी तंडूं नये । खळासंगें भांडू नये । कोणी एक ॥ ४ ॥

सत्पुरुषाशीं छळूं नये । शिवेचा गुंदा ढाळूं नये । केला नेम टाळूं नये । कोणी एक ॥ ५ ॥

सद्‍गुरुसेवा सोडूं नये । कुळधर्मासी मोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । कोणी एक ॥ ६ ॥

संपत्ति आलिया माजूं नये । अभिमानें फुंगू नये । सभा देखून लाजूं नये । कोणी एक ॥ ७ ॥

असत्य वाद करूं नये । खोटा संग धरूं नये । मोचकाशीं मैत्री करू नये । कोणी एक ॥ ८ ॥

भलते भरीं पडूं नये । अनाचार करूं नये । कपट मनीं धरूं नये । कोणी एक ॥ ९ ॥

जन्माआलीया स्वभावें । कांही सार्थक करावें । ऐसें मनीं विचारावें । कोणी एक ॥ १० ॥

एका जनार्दनीं भावें । संतचरणीं लीन व्हावें । सदा हरिनाम उच्चारावें । कोणी एक ॥ ११ ॥


भारुड – पांखरू – कृष्णा एक पांखरूं आहे । त…

कृष्णा एक पांखरूं आहे । तें मुखावीण चारा खाय रे । डोळे नाहीं परि तें पाहे । वाचेविण स्वयें गाय रे ॥ १ ॥
सख्या त्याचें नांव कान्होबा । कृष्ण म्हणती सर्व रे । त्याचें वास्तव्य कोठें आहे । पर नाहीं परि तें उडे रे ॥ २ ॥
तिहीं लोकीं हिंडतें । त्रिभुवन त्याला थोडे रे ॥ ३ ॥
त्याचे नखांत आकाश बुडे । तो सन्मुख चहूंकडे रे ॥ ४ ॥
अहो त्याला मायबाप दोन्ही नाहीं रे । एकपणेविण पहाती जनार्दनाचेपायीं रे ॥ ५ ॥


भारुड – पिंगळा महाद्वारीं बोली बो…

पिंगळा महाद्वारीं बोली बोलतो देखा । डौर फिरवितो डुगडुग ऐका ॥ध्रु०॥
वरल्या आळीला तुम्ही सावध रहावें । पाटीलबुवाला मग लावून सवें । चिठी येईल बा मग पडेल ठावें ॥ १ ॥
मधल्या आळीला एक बायको फिरे । तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरें । नाहीं तरी पाटलोबा तिचीं पळतील गुरें ॥ २ ॥
आणिक एक वारे सुटेल तांतडी । पाटीलबुवाची मग पडेल माडी । तिचीं पांच पोरें लागतील देशोधडी ॥ ३ ॥
आणिक एक ऐका कैंचें नवल झालें । गांवच्या पांड्यानीं पाटलास नागविलें । सार्‍या कागदाचे शून्य एकच केलें ॥ ४ ॥
हिंडतां फिरतांना एक शकुन सांग । त्याच्या सत्तेनें ह्या आळीस वागे । संतांघरचा बा एक तुकडा मागे ॥ ५ ॥
हें जरी न ऐकाल तरी दुसरा येईल । सरते शेवटीं या काळ बांधुन नेईल । एका जनार्दनीं बा आमुचें काय जाईल ॥ ६ ॥


भारुड – पिंगळा – पिंगळा महाद्वारीं । बोली …

पिंगळा महाद्वारीं । बोली बोलतो देखा । शकुन सांगतों तुम्हां हा एक ऐका ॥ १ ॥
डुग डुग ऐका डुग डुग ऐका ॥ध्रु०॥
पिंगळा बैसोनि कळसावरी । तेथोनि गर्जतो नानापरी । बोल बोलति अति कुसरी । सावध ऐका ॥ २ ॥
किलबिल किलबिल । चिलबिल चिलबिल । तुलमिल तुलमिल । तुलबिल तुलबिल ॥ ३ ॥
तुमचें गांवींचा एक ठाणेदार । गांवच्या पाटलाची एक थोरली नार । तिसी रतला तो करा विचार । एका जनार्दनीं बोले सारासार विचार ॥ ४ ॥


भारुड – पिंगळा – वरल्या आळींच्यांनो दादा स…

वरल्या आळींच्यांनो दादा सावध ऐका । गांव हा पांचांचा यासी भुलुं नका । पिंगळा बोलतो बोला । तुम्ही सांडा गलबला ॥ १ ॥
डुग डुग डुग दादा डुग डुग डुग दादा ॥ध्रु०॥
चिलबिल चिलबिल । बोली बोलतो बोल । अर्थ पहातां दिसे सखोल । ब्रह्माविष्णुमहेश भुलले सकळ ॥ २ ॥
चिल्यापिल्याच्या भारा । हाचि सांडा पसारा । गुंतले याची हावा धरुनी विचारा । तुलमिल तुलमिल करती नारी आणि नर ॥ ३ ॥
विचक्षण तोचि जाणे येथील अर्थ । येरां न कळे आपआपुला स्वार्थ । शरण एका जनार्दनीं न सांडी हा पंथ । तुटेल खुंटलें अवघें जाहलें एक येथ ॥ ४ ॥


भारुड – पिंगळा – डुग डुग डुग डुग । डुगडुगो…

डुग डुग डुग डुग । डुगडुगोनि गेले चार युग । कामक्रोधाचेनि लागवेगें । या मनामागें धांवत ॥ १ ॥
हित नोहे गा सर्वथा । गेले हरपोनी पाहतां । भुललें मायेनें सर्वथा । यमपंथासी जाती ॥ २ ॥
यमपुरीच्या वाटे । जीवासी आघात आहेत मोठे । संचित -क्रियामाणाचे सांठे । ते वांया जाऊं पाहे ॥ ३ ॥
जे भले सात्त्विक संत । जे निशिदिनीं हरिभक्त । त्यांसी माझा नमस्कार येत । गुरूसी शरण जा वेगीं ॥ ४ ॥
गुरुसी गेलिया शरण । काय करील जन्ममरण । स्वरूपीं लागेल अनुसंधान । निज निधान प्रगट होय ॥ ५ ॥
आतां एक सांगतों शकुन मोठा । तुज लागला एक्या बायकोचा चपेटा । तिच्या चांगुलपणाला सुभटा । भुलूं नका सर्वथा ॥ ६ ॥
आणीक ऐक तिची करणी । विष्णूस लाविलें वृंदेच्या स्मशानीं । नारदाची नारदी करुनी । साठ पुत्र जन्मविले ॥ ७ ॥
यालागीं तिचा पदरू नोहे बरा । अंती दगा देईल सारा । अजून तरी हित विचारा । दान करा पीडा टळे ॥ ८ ॥
तिनें बहुतांसी दगा दिधला । ईश्वरासारिखा भुलविला । ब्रह्मयासी वेध लाविला । रत झाला कन्येशीं ॥ ९ ॥
नवा ठायीं फाटला झगा । तो न ये उपयोगा । विषय भोगीत अंगा । तो मज दान पिंगळिया ॥ १० ॥
काळीमीच काळें चिरगुट । पदरा बांधून मीतूंपणाचें मीठ । त्रिवर्ग करोनी रोकडें नीट । ओंवाळून टाकी आतां ॥ ११ ॥
तेणें टळेल तुझी पीडा । चुकेल मीतूंपणाचा झगडा । स्वरूपीं होईल आनंद गाढा । श्रीजनार्दन प्रसादें ॥ १२ ॥
एका जनार्दनीं प्रेमबोध । पिंगळा भाकीतसे प्रबोध । प्रगट होय सोहं बोध । श्रीजनार्दन प्रसादें ॥ १३ ॥


भारुड – पोपट – पढो माझ्या आत्मारामा । रा…

पढो माझ्या आत्मारामा । राधा कृष्णाचें हे ध्यान । पिंजर्‍यामध्यें गुंतलासीं । तुज सोडवील कोण ॥ध्रु०॥
चौर्‍यांयशी लक्ष योनी । वनीं तूं तरी हिंडसी । प्रमदा विष फळीं अति त्वरें धांव घेसी । घेऊनियां दोही पक्षी । पाहती तुज न्यावयासी ॥ १ ॥
पिंजरा घडविला पंचभूतांचा कुसरी । नव द्वारें सोळा सांधे । प्रभा पडली भीतरीं । लाविली प्राचीनाची दोरी । बांधिला निज मंदिरीं ॥ २ ॥
हिरवा तुझा रंग । गुंज वर्ण दोन्ही डोळे । चोंच आहे तुझी लाल । बोल तुझा हा मंजुळ । राघवा तूं बोल माझ्या सख्या अमोलिक बोल ॥ ३ ॥
अचळ तूं चंचळ मोठा हिंडे तीनही ताळ । तुला जपला काळ । बोका केव्हां घालिल गळ । जरी जाशी उडोनियां । पूर्व सुकृताचें फळ ॥ ४ ॥
सत्य गुरु दत्त दाता । तारक मंत्र तुज देई । तोच तुला सोडवील । यम करील काई । पावशील चिंतामणी । एका जनार्दनीं पायीं ॥ ५ ॥


भारुड – रहाट – हुंडगी निघाली बाजारा । बा…

हुंडगी निघाली बाजारा । बारिक माझा जुना ॥ध्रु०॥
दारची गोधन कां तोडना । मजल रहाट करून कां द्याना । माझे रहाटाकडे कां पहाना ॥ १ ॥
तुमचा बैल कां माराना । मजला तात करून कां द्याना । माझे तातांकडे कां पाहना ॥ २ ॥
तुमची तलवार कां मोडाना । मजला चात करून कां द्याना । माझ्या चाताकडे कां पहाना ॥ ३ ॥
तुमचा टाळ कां मोडाना । मजला भिंगरी करून कां द्याना । माझ्या भिंगरीकडे कां पहाना ॥ ४ ॥
तुमचीं वस्त्रें कां फाडाना । मजला पिंजून कां द्याना । माझ्या पिंजण्याकडे कां पहाना ॥ ५ ॥
पिंजून पिंजून केला पिळू । नव इंद्रियां खेळू । एका जनार्दनीं पिळू ॥ ६ ॥


भारुड – सासुरवास – विषयांचे सासुरें दुश्चित …

विषयांचे सासुरें दुश्चित बोळवण । भ्रांतीचें पांघरूण बुंथी मज ॥ १ ॥
अविवेक अंबुला अहंकार सासुरा । अविद्येच्या घरामाजीं नेलें ॥ २ ॥
तेथें कल्पना हे सासु सदा सासुरवास । घेऊं नेदी उमसु आठवण ॥ ३ ॥
आठवणे सवें आठवण आठवत । तेणें पैं फुटत ह्रदय माझें ॥ ४ ॥
कामक्रोध देख भावे आणि दीर । मज आटिताती थोर स्वभाव त्यांचे ॥ ५ ॥
मोह म्हातारा सदा द्वारीं असे । धडासी वो पिसें लावितसे ॥ ६ ॥
वरीवरी साबडा पोटीच पै कुडा । दंभ घाली खोडा प्रलोभाचा॥ ७ ॥
इच्छा आणि निंदा सासुरे दासटे । ते मज चिमटे घेपिताती ॥ ८ ॥
ममता वोहिणी नंदुला चिंता । ती भेणे एकांता मज ठाव नाहीं ॥ ९ ॥
कामाहातीं मज नाहीं हो उगडु । निष्कामासी दंडु क्रोध करी ॥ १० ॥
द्वेषाची जाचणी सदा पैं खोचणी । कोणे घरीं पापिणी बोळविलें ॥ ११ ॥
माझा भोळा भावो त्यासी नाहीं ठावो । त्यापाठीं संदेहो श्वान लागे ॥ १२ ॥
त्या भेणें पळाला मागुता नाहीं आला । देशधडी जाला भावो माझा ॥ १३ ॥
सखी माझी भक्ति भावासवें जाती । कोणा काकुळती येऊं माये ॥ १४ ॥
आर्तीचे निढळीं ठेउनी बाहुली । पहातसे वाटुली माहेराची ॥ १५ ॥
माहेराचे वाटे कोणी न भेटे । मावलीये पैठेंकोण करी ॥ १६ ॥
अक्रुरा प्रल्हादा धांव रे उद्धवा । माझ्यासाठीं धांव तुम्ही करा ॥ १७ ॥
नारदा माझ्या धाव रे लवलाही । लागेन तुझ्या पायीं जीवेंभावें ॥ १८ ॥
सत्वर हनुमंता उडी घालीं आतां । मजलागीं सर्वथा मूळ यावो ॥ १९ ॥
पृथु चक्रवर्ती जिवलग सांगाती । तुम्ही या निश्चिती मज मूळ ॥ २० ॥
पैल पुंडलीकाजवळी बापमाया । हर्शे नांदताहे भीमातीरीं ॥ २१ ॥
तेथीचे वारकरी त्याचे पाय धरी । नेउनी घाला माहेरीं पंढरीसी ॥ २२ ॥
एका जनार्दनीं सासुरचि केलें । तेंचि माहेर झालें गुरुकृपें ॥ २३ ॥


भारुड – सासुरवास – वृद्धपणीं शांती धरा तुम्ह…

वृद्धपणीं शांती धरा तुम्ही सासुबाई । नरम गरम मागूं नका अंतीं सुख नाहीं ॥ १ ॥
रात्रंदिवस विचारितां जीव दिक् जाला । मायलेंकी राहा तुम्ही मज नेऊन घाला ॥ २ ॥
प्रपंचाचें ताक तुम्ही सांचविलें घरीं । संचिताचें दुग्ध लोणी गमाविलें चोरी ॥ ३ ॥
वासनेच्या बिडालीक कोंडुनी बाहेर ठेवा । नवहीं द्वारें गुप्त करा ज्ञानदीप लावा ॥ ४ ॥
प्राप्त भूमी चारी तुम्ही हात करा वेगीं । कल्पनेची रहाटी होड धन्य तोचि योगी ॥ ५ ॥
चारी मुक्ती त्याचे माथां काळ झेंप घाली । विश्वासानें जाऊं नका जीव मुक्ति झाली ॥ ६ ॥
अहेवमणी गळां तुम्ही व्यर्थ बांधियेला । बारा सोळा पुत्र जाले दादला नाहीं केला ॥ ७ ॥
वांझ तुम्ही पुत्र व्याले तुमचें तुम्हां साजे । इतर स्त्रिया करूं म्हणती मरती लोकलाजे ॥ ८ ॥
क्षणिक तुम्ही वृद्ध पहा क्षणिक तरुण बोले । एका जनार्दनीं शरण त्यानें रूप केलें ॥ ९ ॥


भारुड – शंखीण डंखीण – बाहात्तर कोटी कात्यायनी ।…

बाहात्तर कोटी कात्यायनी । त्यांत शंखिणी डंखिणी । तृष्णा वासना पापिणी । जन्मो जन्मीं गोविती ॥ १ ॥
मोही कुंकुम कपाळी लावून । विशाल स्वरूप अवगुण लोकांलागी भय दावून । भाविक जन भेडसावी ॥ २ ॥
तृषासन विशाळ । जग मोहियेलें अनुमाळ । घालुनियां मायाजाळ । जग थईथई नाचवी॥ ३ ॥
जग पडलें भ्रांतींत । विसरलें आपुलें स्वहित । यांत आहे आपुला घात । हे तो कदा न समजती ॥ ४ ॥
वर बेगडाचा रंगा । काय भुललासी जगा । होय गुरूपदीं जागा । याच लागीं प्रवृत्ती ॥ ५ ॥
एकनाथाचें विंदान । एकाजनार्दनीं । जोडे ज्ञान । ग्यागूनी गुण अपमान चरणीं लविलें ध्यान ॥ ६ ॥


भारुड – शंखीण डंखीण – हाट करूनि घरासी आणली बैसल…

हाट करूनि घरासी आणली बैसली वसरीच्या काठी रे । घरची बाईल बाहेर निघाली वसवसून लागे पाठी रे ॥ १ ॥
शंखीण बाबा डंखीण । त्या घरी शंखीण बाबा डंखीण रे ॥ध्रु०॥
चौ शेरांचा वरणभात केला वर भाजीचा गोळा रे । मोठे मोठे घास घेती भुरळ फिरवी डोळा रे ॥ २ ॥
आठ भाकरी बारा पोळ्यां धिरडी खादली सोळा रे । पाणी पिउनी ढेकर दिला मराठी तिचा मोळा रे ॥ ३ ॥
बारा सोळा लुगडीं नेसली येइना पाठिपोटीं रे । नव खणांची चोळी शिवली उराशीं येईना गाठीं रे ॥ ४ ॥
एका जनार्दनीं म्हणे बाबा ऐशी बाइल केली रे । तिच्या भयानें सर्व पळूनियां गेली रे ॥ ५ ॥


भारुड – शिमगा – सत्त्व गांठीं उमगा । तेणे…

सत्त्व गांठीं उमगा । तेणें सफळ होईल शिमगा । तुम्ही हेंच गाणें गा । तुम्ही हसूं नका ॥ १ ॥
भूत सभेची कारटीं । विषय गोवर्‍या चोरटी । उतरी कुकर्माची राहाटी । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ २ ॥
जागोजागीं थांबा । अवघ्या मिळोनी मारा बोंबा । न जळे एरंडाच्या कोंबा । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ ३ ॥
गांवचा पाटील कोळी । काळोबाची पिकली पोळी । तुमची पाजाळूं द्या होळी । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ ४ ॥
ओटींत घेउनी गुलाल । सख्या मेहुणीसंगें भुलाल । तिचा नवरा मोठा जलाल । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥५ ॥
एका जनार्दनीं पोस्त । गाणें गातां हालमस्त । नाहीं तर भडवे समस्त । तुम्ही हसूं नका हसूं नका ॥ ६ ॥


भारुड – सौरी – हुली गाय हुली शिंगें वासर…

हुली गाय हुली शिंगें वासरूं जालें कोसें । प्रकृतीपुरुषा भांडण जालें खाटलें जालें वोसें ॥ १ ॥
चाल रामराया । लागे तुझ्या पायां ॥ध्रु०॥
अनकाई वरिष्ठकाई त्यावरी बैसला खुभा । मिसकीन मामी फुसकून पादली जांवाई हागे उभा ॥ २ ॥
नाहीं नर नाहीं नारी नाहीं तेथें योनी । हुसकून गेलें सावलें तेथें परतले दोन्ही ॥ ३ ॥
वेणी फणी काजळ कुंकू केला टाकमटीका । पाठीची बाल प्रकृति भली संसार करी निका ॥ ४ ॥
चांग भांग करुनी गेली केतकी वनां । सोळा जणें लेंकुरें जालीं दादुला न ये मना ॥ ५ ॥
कार्यास्तव सौरी जालें डौर उजवे करीं । मातापुरीं यात्रा भरली उदो रेणगिरी ॥ ६ ॥
जाती वर्ण कुळधर्म नुरेचि आम्हां कांहीं । एका जनार्दनीं शरण सुमन तनुमन तयापायीं ॥ ७ ॥


भारुड – सौरी – सहा दादुले केले परि म्यां…

सहा दादुले केले परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । काया वाचा रमलें त्याशीं परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ १ ॥
सौरी झालें सौरी सखेबाई झालें त्याची नवरी ॥ध्रु०॥
नग्न होउनि भोगिला पुरुष म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । देतो गोड गोड खाया परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ २ ॥
केला संसार गोड परि म्यां ऐसा नाहीं देखिला दादुला । याचे मनाची पुरविली खोड परि म्यां ऐसा नाही देखिला दादुला ॥ ३ ॥
ऐसी सौरी झालें परि म्यां नाहीं देखिला दादुला । एका जनार्दनीं नमिलें पायीं ऐसा नाहीं देखिला दादुला ॥ ४ ॥


भारुड – सौरी – जातिभ्रष्ट जाली सौरी हिंड…

जातिभ्रष्ट जाली सौरी हिंडे दारोदारीं । सांवलें उचकुनी जगासी दावी डौर वाजवी करीं ॥ १ ॥
चाल सख्या रामा । सुख होईल आम्हां ॥ध्रु०॥
हागरा दादल्या पादरी बायकु जावई देखोनी हांसे । घरची सून नागवी नाचे पोटीं पोर पिसें ॥२ ॥
शेंबडा व्याही चिपडी विहीण दोघां प्रीत मोठी । विहीण लाजून हळुच पाहे व्याही नाक चाटी ॥ ३ ॥
बाईल बाहीरख्याली दादला तिचा भोळा । पर पुरुष पाहूनियां खुणाविती डोळा ॥ ४ ॥
ऐशी सौरी गमजा करी डौर छंदें नाचे । एका जनार्दनीं पायीं अखंड नाम वाचे ॥ ५ ॥


भारुड – सौरी – सांड रांड गमजा नको करूं ब…

सांड रांड गमजा नको करूं बोल । भक्तीविण ज्ञान गेलें कीती करिसी फोल ॥ १ ॥
जन्मा आली व्यर्थ गेली भक्ति नाहीं केली । माझें माझें म्हणोनियां गुंतोनिया मेली ॥ २ ॥
टिळा टोपी घालुनी माळा म्हणती आम्ही संत । परस्त्री देखोनियां चंचळ झालें चित्त ॥ ३ ॥
जगालागीं ज्ञान सांगे म्हणती आम्ही साधु । पोटीं दया धर्म नाही ते जाणावे भोंदु ॥ ४ ॥
संत म्हणतील निंदा केली निंदा नोहे भाई । शरण एका जनार्दनीं लागतसे पायीं ॥ ४ ॥


भारुड – सौरी – न करी वो चाळा स्वैरीचिया …

न करी वो चाळा स्वैरीचिया बोला । वेधला जीव निसंगपणें खाती नवा गोळा ॥ १ ॥
ऐसे नव्हे भले कोणा मानवले । जग जगीं हांसती मोडिताती डोळे ॥ २ ॥
फुकटचि संग स्वैरीयेचा बरा । दिवाण दारीं फजिती थोरी वहातसे वारा ॥ ३ ॥
पडलें मोकळें ढुंगण आतां कैसा संग । मागें पुढें फजिती झाली अठरा झाले दंग ॥ ४ ॥
एका जनार्दनीं स्वैरी झाली संतपाय धरा । नाहीं तरी उभ्या बाजारीं फजितीचा थारा ॥ ५ ॥


भारुड – सौरी – होउनी स्वैरी लुगडें फेडी …

होउनी स्वैरी लुगडें फेडी भलत्या सवें हांसे । हांसत हांसत घर घेतलें कोण मज पुसे ॥ १ ॥
लागला मज चाळा कां हो घालता डोळा । फजितीचा वाटा आला नित्य नवा गोळा ॥ २ ॥
मागें पुढें न पाहे कांहीं म्हणेल कोणी । एका जनार्दनीं शरण कायावाचामनीं ॥ ३ ॥


भारुड – सौरी – भोळा दादुला बाई म्यां केल…

भोळा दादुला बाई म्यां केला । संसार सारा नागविला ॥ १ ॥
सौरी होऊन गेलें सुख नाहीं झालें । पुनरपि संसारी मी हो आलें ॥ २ ॥
चार पांच साहा अठरांसी रतलें । त्यांचे संग मन चावट हो झालें ॥ ३ ॥
एकाएकीं संतसंग झाला । एका जनार्दनीं संसार तुटला ॥ ४ ॥


भारुड – स्वप्न – बैसोनी स्वप्न सांगे लोका …

बैसोनी स्वप्न सांगे लोका । नवल आजी पाहिलें तृषा लागली उदका ।
अग्नि जो खादाड न मिळे तया इंधन देखा । पनवु पालाणीं बांधिला देखा ॥ १ ॥
स्वप्नाचें नवल जागृती ऐका । जागृती स्वप्न दोन्ही मिथ्या जाहले देखा ॥ ध्रु० ॥
पंचभूतांची मिळणी जाहली परस्परीं । विसरुनी द्वैतभावा समरसले एकसरीं ।
कर्दमीं रुतलें नवल विंदान परोपरी । काय सांगू या स्वप्नाची नसे आज दुरी॥ २ ॥
एक नारी एक पुरुष उभयतां देखिले । विवाहमंडप चौबारा घातलें ।
सोहळा औट प्रकार न दिसोनी देखिलें । वर्तन करूं सांगू जातां जागृत मी जाहलें ॥ ३ ॥
ऐसें स्वप्न देखिलें जनार्दन दृष्टि । मिथ्यामय सर्व भासलें उघडली सृष्टी ।
एका जनार्दनीं पायीं पडली मिठी । अहंता ममता यांची सुटलीसे गांठी ॥ ४ ॥


भारुड – थट्टा – अशी ही थट्टा । भलभल्यासी …

अशी ही थट्टा । भलभल्यासी लाविला बट्टा ॥ध्रु०॥
ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी । थट्टेनें हरविली बुद्धी । केली नारदाची नारदी । अशी ही थट्टा ॥ १ ॥
थट्टा दुर्योधनाने केली । पांचळी सभेमाजीं आणिली । गदाघायें मांडी फोडिली । अशी ही थट्टा ॥ २ ॥
थट्टा गेली शंभोपाशीं । कलंक लाविला चंद्रासी । भगें पाडिलीं इंद्रासी । बरी नव्हे थट्टा ॥ ३ ॥
थट्टेने मेला दुर्योधन । भस्मासुर गेला भस्म होऊन । वालीही मुकला आपुला प्राण । अशी ही थट्टा ॥ ४ ॥
थट्टा रावणाने केली । नगरी सोन्याची बुडविली । थट्टा ज्याची त्यास भोवली । बरी नव्हे थट्टा ॥ ५ ॥
अरण्यांत होता भृगु ऋषी । थट्टा गेली त्याचेपाशीं । भुलवुनी आणिला अयोध्येस । बरी नव्हे थट्टा ॥ ६ ॥
विराटराजाचा मेहुणा । नाम तयाचें कीचक जाणा । त्याणें घेतलें बहुतांचे प्राणा । बरी नव्हे थट्टा ॥ ७ ॥
थट्टेपासून सुटेले चौघेजण । शुक भीष्म आणि हनुमान । चौथा कार्तिकस्वामी जाण । त्याला नाही बट्टा ॥ ८ ॥
एका जनार्दन म्हणे सर्वांला । थट्टेला भिऊनी तुम्ही चाला । नाहीं तर नेईल नरककुंडाला । अशी ही थट्टा ॥ ९ ॥


भारुड – टिटवी – एक ग्रामावरी जाऊन । एक नद…

एक ग्रामावरी जाऊन । एक नदीतीर पाहून । तेथें टिटवी करी शयन । दोन्ही पायांत खडा धरून गा ॥ १ ॥
टिटवी यमाची तराळीण । टिटाव टिटाव टिटाव । तीड तीड तीड जाणगा ॥ध्रु०॥
मरेल चौगुल्याची सून । पाटलाचे चौघेजण । कुळकर्ण्याची लाडकी सून । आतां गांवांत राहिलें कोण गा ॥ २ ॥
देशमुख देशपांडे चौधरी जाण । शेटे महाजन नेईन । चौगुल्याचे जवळ मरण । आतां गांवांत नाहीं कोण गा ॥ ३ ॥
नाईक वाड्यासी धरी । शेलकी देशमुखाची पोरी । याची गणना कोण करी । आतां गांवांत नाहीं थोरी गा ॥ ४ ॥
आतां गांवा वचनें हीन सारा । केवढा टिटवीचा दरारा । गांवांत हिंडतां चुकेल फेरा । महारामांगांचा तुला आसरा गा ॥ ५ ॥
लव्हार सुतार बलुते बारा । माळी तेली वाण्यास दरारा । सुनेकरासी दिधला थारा । म्हणोनि हरिभजन करा गा ॥ ६ ॥
आतां नाहीं कोणासी कोण । शेवट मारीन मी नेऊन । माझे संगतीं मांगीण । एका जनार्दनीं लहान थोरपण गा ॥ ७ ॥


भारुड – विंचू – सहजीं सहज स्वयें स्थिती ।…

सहजीं सहज स्वयें स्थिती । स्वभावें भावना आर्तक आली स्थिती ।
अलक्ष लक्षणा विकार उत्पत्ती । हां हां मज विंचवें खादलें अवचितीं ॥ १ ॥
अहं विंचवें खादलें करू काय । किती मीपणा ब्रह्मांडीं भरला माय ।
अष्टांगीं चढला तेणें तळमळी होय । कर्मभोग आद्ळीतो हातपाय ॥ २ ॥
जीव शिवाचिये संधींमाजीं होता । तो मज झोंबिता मी काय करूं आतां ।
धरी मारी तंव रिघाला आतवता । कांहीं केलिया वो नुतरे सर्वथा ॥ ३ ॥
अतिंचिंतेच्या थोर येताती तिडका । वित्तहानीच्या वेगीं उठती भडका ।
द्वंद्वबाधेचा न साहे धडका । विषयलोभाच्या आदळती थडका ॥ ४ ॥
बहुमन ते थोर तळमळ । कामिनीकामाची नित्य जळजळ ।
पुत्रलोभाचे लागती इंगळ । लोकलाजेची अंगीं लागे कळ ॥ ५ ॥
नित्यनिंदेची खरस येत तोंडा । कर्मस्वेदाचा सर्वांगीं चाले लोंढा ।
त्याचा उतारु नव्हे नव्हे उदंडा । जेथें झोंबला तें नेती जे निधाना ।
माझी मज न साहे उदरवेदना । वेगीं पाचारा निजगुणीं जनार्दना ।
त्याचे नामें निरसे व्यथा नाना ॥ ७ ॥
ऐसिये अनुतापें तापली अनुदिन । भाव सद्‍गुरूजी पातला आपण ।
अनन्यगतीं धरितां तयाचे चरण । तेणें हस्तक मस्तकीं रक्षा केली पूर्ण ॥ ८ ॥
भावें लागतां गे मज त्याचिया पाया । त्यानें कळ सोडोनि मोकळी केली काया ।
ब्रह्माहमस्मि विंचु आणिला गे ठायां । थोर तळमळ माझी गेली विलया॥ ९ ॥
विंचु उतरतां मीपणामाजीं ठक । तेणें सहित उतरिलें विषय विख ।
बंधमोक्ष अहं सोहं सुखःदुख । वेदनें सहित उतरविलें देख ॥ १० ॥
एका जनार्दनीं आलागे निजगुणी । विष उतरुनी तेणें केलें अगुणी ।
स्वानंद कोंदला आनंद गिळुनी । देहविदेह गेले विसरुनी ॥ ११ ॥


भारुड – व्यापार – त्रैलोक्याचा स्वामी जनार्…

त्रैलोक्याचा स्वामी जनार्दना । केला व्यापार ह्यापासून ॥ १ ॥
मोठा लागला व्यापार । रामनाम निरंतर ॥ २ ॥
सोहं कर्जखत दिधलें । तें म्यां मस्तकीं वंदिलें ॥ ३ ॥
महा प्रेमाची लुगडीं दिधलीं । निजमुक्तपणें प्राप्त झालीं ॥ ४ ॥
अनुभवाची तहसील समस्त । स्वामीस करुणा पाठविली रिस्त ॥ ५ ॥
धर्म खर्डा जमा । खर्चीं घातलें पूर्वकर्मा ॥ ६ ॥
संतांसंगें वसूल बाकी । भक्ताहूनि अति नेटकी ॥ ७ ॥
कैवल्यपुरीं बांधलें तोरण । चैतन्य चावडी बैसलों जाण ॥ ८ ॥
ऐसा व्यापार सिद्ध झाला । एका जनार्दनीं केला ॥ ९ ॥


भारुड – आडबंग – आडबंग आडबंग । सदा विषयामध…

आडबंग आडबंग । सदा विषयामध्यें दंग । मदमस्त डोले भुजंग । प्रेमकीर्तनाचा रंग । मोडून झाला निःसंग ॥ १ ॥
बैसे वेश्याघरीं जाऊन । तिशीं करी हास्यवदन । स्वकरें विड्या देऊन । वेश्या करी त्याचें छळण गा ॥ २ ॥
ज्ञान नाहीं मूढ तो जन । स्वस्त्री टाकून । उकिरडा ओतीरे रतिरेतजन । आपुली स्त्री नेली मांगनं गा ॥ ३ ॥
त्याचें न पाहावें काळें वदन । पशु गाढवासमान । नरतनु व्यर्थ बुडवून । नाहीं साधिलें साधन गा ॥ ४ ॥
मागें केलें देई टाकुन । करी हरींचें चिंतन । येणें साधिलें बहु साधन । केला जामीन जनार्दन ॥ ५ ॥


भारुड समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *