संत नामदेवांचे पाळणे

संत नामदेवांचे पाळणे


पाळणा – स्त्री गरवार पति उदरीं । …

स्त्री गरवार पति उदरीं । पतिव्रता पण साजे तिये नारी ॥१॥
अबला खेळवी मोहें । कडीये घेवो देतसे पाहे ॥२॥
समस्तीं मिळोनी पाळणा घातळा । विष्णुदास नामयानें अनुभव गाइला ॥३॥


पाळणा – कान्होबा निवडीं आपुलीं ग…

कान्होबा निवर्डी आपुलीं गोधनें ॥धु०॥
पांच पांच पोळ्या तीन भाकरी । दीड कानिवला एक पुरी । आम्हा धाडिलें वैल्या दुरी । आमुची ठकवून खाल्ली शिदोरी ॥ कान्हो० ॥१॥
परियेसी शारंगधरा । तुझा बैल चुकला मोरा । सांगूं गेलों तुझ्या घरा । पाठीं लागला तुझा म्हातारा ॥ कान्होबा० ॥२॥
परियसीं हृषीकेशी । गाई म्हशीचें दूध पिशी । वासरें प्यालीं म्हणून सांगशी । उद्यां ताक नाहीं आम्हासी ॥ कान्हो० ॥३॥
कान्होबा ओढाळ तुझ्या गाई । होत्या नव्हत्या कळंबा ठायीं । शिव्या देती तुझी आई ॥ कान्होबा० ॥४॥
विष्णुदास नामा साहे । देवा तूंचि बाप माये । अखंड माझे ह्रदयीं राहें ॥ कान्होबा० ॥५॥


पाळणा – कान्होबा निवडीं आपुलीं गो…

कान्होबा निवडीं आपुलीं गोधनें ॥धु०॥
पांच पांच पोळ्या तीन भाकरी । दीड कानिवला एक पुरी । आम्हा धाडिलें वैल्या दुरी । आमुची ठकवून खाल्ली शिदोरी ॥ कान्हो० ॥१॥
परियेसी शारंगधरा । तुझा बैल चुकला मोरा । सांगूं गेलों तुझ्या घरा । पाठीं लागला तुझा म्हातारा ॥ कान्होबा० ॥२॥
परियसीं हृषीकेशी । गाई म्हशीचें दूध पिशी । वासरें प्यालीं म्हणून सांगशी । उद्यां ताक नाहीं आम्हासी ॥ कान्हो० ॥३॥
कान्होबा ओढाळ तुझ्या गाई । होत्या नव्हत्या कळंबा ठायीं । शिव्या देती तुझी आई ॥ कान्होबा० ॥४॥
विष्णुदास नामा साहे । देवा तूंचि बाप माये । अखंड माझे ह्रदयीं राहें ॥ कान्होबा० ॥५॥


पाळणा – अरे अरे कान्हया वेल्हाळा …

अरे अरे कान्हया वेल्हाळा । तूंरे बरविया गोपाळा । तुज देखियेलें डोळां । रे धेनुवा हुंबरती ॥१॥
माते देवो शिदोरी । ऐसें म्हणतसे मुरारी । मी जाईन वो दुरी । धेनु चारावयालागीं ॥२॥
अलें बेलें चिलें मेकें । सुरण मिरगोडी पैं तिखें । दह्यावांचोनी नव्हे निकें । शिदोरी ताकें कालऊं निकें ॥३॥
वडजा वाकुडा पेंदा सुदामा । हेचि पांतिकर आम्हां । तेथें विष्णुदास नामा । उच्छिष्ट शितें वेंचितसे ॥४॥


पाळणा – मुक्ताफळ नथ नाकीं । चरणीं…

मुक्ताफळ नथ नाकीं । चरणीं ल्याली वाळे वांकी । पितांबरें अंग झांकी । कृष्णाई माझी ॥१॥
खांद्यावरी कांबळी । पायघोळ लांबली । पांघरली धाबळी । कृष्णाई माझी ॥२॥
गाई पाठी लागली । पळतां नाहीं भागाली । मायबहिण चांगली । कृष्णाई माझी ॥३॥
देहुडा पावली । उभी माझी माउली । विश्रांतीची साउली । कृष्णाई माझी ॥४॥
कर ठेवुनी कटावरी । उभी भीरवचे तीरीं । नामयाची कैवारी । कृष्णाई माझी ॥५॥


पाळणा – अच्युता अनंत गोविंद । अरे…

अच्युता अनंत गोविंद । अरे मेघ:शामा तूं आत्मया रामारे । आत्मया तूं रामारे । म्हणा म्हणा गोविंद नामरे ।
ऐसें तुझें ध्यान लागो आम्हांरे । नामयाचा स्वामि पंढरिराणारे ॥१॥


पाळणा – हरिनाम गोड झालें काय सांग…

हरिनाम गोड झालें काय सांगूं गे माय । गोपाळ वाहताती वेणु आर्ते पाहें ॥१॥
गेलें होतें वृंदावना तेथें भेटला कान्हा । गोपाळासी वेध माझा छंद लाला मना ॥२॥
आणिक एक नवल कैचें ब्रम्हादिकांलागीं पिसें । उच्छिष्टा लागोनियां देव जाहले जळीं मासे ॥३॥
आणिक एक नवल चोज गोपाळांसी सांगे गुज । आजळ जळीं चोजवेना पाहतां नेत्र ते अंबुज ॥४॥
आणि एक नवलपरि करीं धरिली सिदोरी । गोपाळासी वाढीतसे नामयाचा स्वामी हरि ॥५॥


पाळणा – रावणा मारून माझे माये गे …

रावणा मारून माझे माये गे । बिभीषण लंकेस स्थापिलास कायगे । अयोध्येसी आलीस कायगे ।
माझे ह्रदयमंदिरीं राहेंगे । विठ्ठल मायगे ॥१॥
रुसुनी आली रखुमाबाईगे । तिच्या मागें तूं धांवलीस कायगे ।
संगें घेऊनियां गोपाळ गायगे । मम ह्रदयमंदिरीं राहेंगे ॥२॥
सत्ये राधिकेचे पायींगे । सोडूनी द्वारकेचा ठावगे ।
आलीस कायगे । माझे ह्रदयमंदिरीं राहेंगे ॥३॥
धन्य पुंढलीक भक्त मायगे । त्याणें विटेवर उभा केला कायगे ।
नामा म्हणे माझे मायगे । माझे ह्रदय-मंदिरा राहेंगे ॥४॥


पाळणा – संपूर्ण विश्चाचा आत्म्याच…

संपूर्ण विश्चाचा आत्म्याचा जो निज आत्मा । तोचि हा परमात्मा विटेवरी ॥१॥
द्वादश लिंगांचें जें कां आत्मलिंग । ते हे पांडुरंग विटेवरी ॥२॥
अनंत सूर्याची ज्योतीची नीजज्योती । तीही उभी मूर्ती विटेवरी ॥३॥
अनंत शक्तींची जी निजशक्ती । ती ही उभी मूर्ती विटेवरी ॥४॥
अनंत ब्रम्हांचें जें का निजब्रम्हा । तें हें परब्रम्हा विटेवरी ॥५॥
अवघ्या चैतन्यांचें जें कां निज चैतन्य । तें हे समाधान विटेवरी ॥६॥
अनंत विराटाचें स्वरूपाचें निजरूप । तें हें चिद्‌स्वरुप विटेवरी ॥८॥
अनंट शास्त्रांचें पुराणांचें सार । त्याचेही जिव्हार विटेवरी ॥९॥
अनंत सिद्धींची जी कां निज सिद्धी । ते हे महासिद्धि विटेवरी ॥११॥
भक्तीची नीज भक्ति मुक्तीची निज मुक्ति । शांतीची निज शांती विटेवरी ॥१२॥
क्रोधाचा मह अक्रोध बोधाचा महा बोध । शुद्धाचाही शुद्ध विटेवरी ॥१३॥
काळाचा महा काळ वेळेची महावेळ । फळाचें महाफळ विटेवरी ॥१५॥
अनंत सत्त्वाचें जें कां निज सत्त्व । तत्वाचें निज तत्व विटेवरी ॥१६॥
सर्व संबंधाच जो काम निज संबंध । आनंदाचा कंद विटेवरी ॥१७॥
नामा म्हणे सर्व सुखाचा आराम । धामा परम धाम विटेवरी ॥१८॥


पाळणा – जो भक्तजन करुणाकर क्षीरसि…

जो भक्तजन करुणाकर क्षीरसिंधुचा दानी । तो चोरोनी खाये लोणी नवल देखा ॥१॥
जो न माये भूतळीं वेदार्थाहिन कळे । तो बांधिला उखळे नवल देखा ॥२॥
एका पादें करुनी आक्रमी मेदिनी । त्यासी चालूं सिकविती गवळणी नवल देखा ॥३॥
ज्याचे मायेचेनी कुवाडे ब्रम्हादिकां वेडे । तो बागुल म्हणतां दडे नवल देखा ॥४॥
दानवांची कोटी हेळांचि निवटी । त्यातें माता भयें दावी सीपटी नवल देखा ॥५॥
नामा म्हणे हरी विश्वीं विश्वंभरी । तो म्हणती नंदाघरीं नवल देखा ॥६॥


पाळणा – योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्र…

योगी ब्रम्हचारी सिद्ध ब्रम्हज्ञानी । तो तों तुज कोणी नयेति कामा ॥१॥
कोंडुनि इंद्रियें बैसती समाधि । हळुच तुझ्या पदीं झेपावती ॥२॥
एवढें विश्वरूप नाहीं ऐसें केलें । सकळ होउनी ठेलें आपणचि ॥३॥
एसियाचा विश्वास न धरिसी देवा । नामा तुज केशवा विनवीतसे ॥४॥


पाळणा – राजसी तामसी जें गाणें । त…

राजसी तामसी जें गाणें । तोडी ताल मोडी मान ॥१॥
ख्याल गाये कंपस्वर । रिझवी दात्याचें अंतर ॥२॥
हे तों प्रीति धनावरी । अर्था अनर्थ तो करी ॥३॥
नामा म्हणे शास्त्रार्थ । अर्थ तोचि होय स्वार्थ ॥४॥


पाळणा – तळीयाचे पाळी वृक्षावरी बै…

तळीयाचे पाळी वृक्षावरी बैसुनी । कैसा चातक बोभाई तोरे । तहाना फुटे परी उदक नेघे । मेघाची वाट पाहेरे ॥१॥
तिसा येईं बा कान्हया येईं बा कान्हा । जीवींच्या जीवना केशीराजारे ॥ध्रु०॥
टाळघोळ कल्लोळ नानापरीचीं वाद्यें वाजतीवोजारे । रानींच्या मयुरा नृत्या पैं नये तुजवीण मेघराजोर ॥२॥
जलेविण जळचर पक्षीवीण पिलीयासी तैसें झालें नामयासीरे । शंख चक्र गदा पद्म पीतांबर धारी आझूनि कां न पवसीरे ॥३॥


पाळणा – भक्त आवडता भेटला । बोलूं …

भक्त आवडता भेटला । बोलूं चालूं विसरला ॥१॥
बरवें सांपडलें वर्म । करी भागवत धर्म ॥२॥
संत संगतीं साधावें । धरूनि ह्रदयीं बांधावें ॥३॥
हा भावाचा लंपट । सांडूनि आलासे वैकुंठ ॥४॥
नामा म्हणे केउता जाये ॥ आमचा गळा त्याचे पाय ॥५॥


पाळणा – अहो त्रिभुवना माझारीं । भ…

अहो त्रिभुवना माझारीं । भूवैकुंठ पंढरी । चंद्रभागा सरोवरीं । विटेवरी नीट उभा ॥१॥
उभा कैवल्य नायक । द्दष्टी सन्मुख पुंडलीक । ज्याचे ब्रम्हादिक सेवक । इतरां कोण पाड ॥२॥
सुरंग रंगें चरणतळें । रातलीं रातोत्पळें । जिंकिलीं माणिक निळें । मज पाहतां बाई ॥३॥
पद अंकुश पताका । ध्वज वज्रांकित रेखा । तेथें लक्ष्मी रतली देखा । सिंधुतनया बाई ॥४॥
अनुपम्यगे माय अनुपम्य सार । परब्रम्ह वो साकार । मंत्रमय त्रिअक्षर । विठ्ठलनाम बाई ॥५॥
तें गा प्रत्यक्ष ध्यान । सर्व सुखाचें निधान । द्दष्टीं पाहतांचि मन । माझें परतेना ॥६॥
न लोगे पातयासी पातें । लक्ष लागलें निरुतें । सुख झालें बा मनातें । तें मी काय सांगों वो माय ॥७॥
मन इंद्रयें वेधलीं । घर वृत्तिचें रिघालीं । काय स्वानंदा मुकलीं । वेगळेपणें ॥८॥
पदद्वयाची ठेवणी । इंद्रनीळ गुल्फमणी । गंगा मिरवत चरणीं । वांकी तोडर पायीं ॥९॥
सरळ अंगोळियावरी । नखें वर्तुळ साजिरीं । चंद्र देखोनि अंबरीं । झाला कळाहीन ॥१०॥
पोटरीया जानु जंघ । मर्गजमणीचे ते स्तंभ । कैसें वोळलें स्वयंभू । ओघ जैसे कालिंदीचे ॥११॥
पितांबर माळ गांठीं । रत्नकिळा बरवंटीं । विद्युल्लतेच्या थाटीं । जैशा मेघमंडळीं ॥१२॥
वीरकंकणें मनगटीं । काडोवांडीं मुद्रिका दाटी । माज सामावे जो मुठीं । वरी कटी कटिसूत्र ॥१३॥
नाभीं सरोज गहन । ब्रम्हयाचें जन्मस्थान । वरी त्निवळी लक्षण । कैसें शोभे रोमराजीं ॥१४॥
काय वाणूं तें उदर । सांठवलें चराचर । ब्रम्हगोळ निरंतर । जया रोमरंध्रीं ॥१५॥
तनु मृदु शाम निर्मळ । प्रभा दिसती सोज्वळ । जेवीं ओळलेंसे जळ । जैसें घनमंडळीं ॥१६॥
शुद्ध चंदन पातळ । आंगीं चर्चिला निर्मळ । जेवीं इंद्रनीळ किळ । गुल्फ मोतियांचे ॥१७॥
पदक बाहुभूषणें । नवरत्नांचें खेवणें । कैसें सर्वां झालें पणें । लेणें लेणियासी ॥१८॥
कौस्तुभ मिरवे कंठीं । माजी रत्नांचिये दाटी । तेथें सुरवरांच्या द्दष्टी । भाळलिया ॥१९॥
श्रवणीं कुंडलें झळती । जैशा विजुवा तळपती । कंठींमाळ वैजयंती । सह तुळसी दळेसी ॥२०॥
विशाल नयन द्दष्टी । ठेऊनियां नासापुटीं । दावी योग कसवटी । योगीयांसी गे माये ॥२१॥
लिंग स्वयंभू शीर स्थळीं । रश्मी मुगुट झळाळी । वेटी मोरपिसातळीं । मृग नाभी तिळक ॥२२॥
स्मित अधर सुरेख । कैसनी मासूर मुख । तेथें मदन पर्यंक । कोटी कुरवंडया ॥२३॥
विष्णुदास नामा जिवें । ओंवाळी सर्व भावें । अनुभव अनुभवें । अनुभविजें सदा ॥२४॥


संत नामदेवांचे पाळणे समाप्त .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *