भैरवनाथ मंदिर किकली ता. वाई जि.सातारा

भैरवनाथ मंदिर किकली ता. वाई जि.सातारा – bhairavanath mandir kikli ta. wai dist. satara

भैरवनाथ मंदिर किकली ता. वाई जि.सातारा

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या किकली गावात हेमाडपंती पद्धतीचे एक भैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे. भैरवनाथ मंदिर किकली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पासून ६ किलोमीटर अंतरावर आहे. तिथेच डावीकडे चंदनगड तर उजवीकडे वंदनगड किल्ल्यांची जोडी नजरेस पडते. किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर भव्य असे प्रवेशद्वार दिसते. १८-२० पायऱ्या चढून प्रवेशद्वारात पोहचताच समोर शिवमंदिराचे संकुल दिसते.

संकुलातील एक मंदिर सुस्थितीत तर दोन मंदिरे भग्नावस्थेत आहेत. मुख्य मंदिर भैरवनाथाचे असून मंदिरावरती नक्षीकामाची रेलवेल आढळते. या मंदिरात मुखमंडपातच नंदी आहे. वेदिकेवरील व्यालपट्टी, मुखमंडपावरील छतावर अनेक प्रकारची झुंबरे कोरलेली आहेत. प्रवेशद्वारावर नक्षीकाम हा शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. या प्रवेशद्वारावर प्रतिहारी, गज शरभ, व्यात, देवीशक्ती असून, उबल्यावर कीर्तिमुख तसेच उबऱ्यासमोर शंखावर्त अर्धचंद्र पहावयास मिळतो.

सभामंडपातील रंगशिळेवर चार भरजरी खांब असून त्यावर संपूर्ण रामायण कोरलेले आहे. असे रामायण कोरलेले हे मंदिर महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे मंदिर होत. काही ठिकाणी शिवतांडव, वामन बतार, सुरसुंदरी, क्षेत्रपाल अशी शिल्पे आहेत. मंदिराचा गाभारा त्रिदल पद्धतीचा आहे. भैरवनाथासमोरिल अंतराळगृह इतर दोन अंतराळगृहापेक्षा रेखीव आहे. या गृहात दोन देवड्या असून त्यात शिवपार्वती आणि एक ऋषीमुनी (स्थानिक कथेनुसार बहुधा मच्छिंद्रनाथ) आहेत. गाभाऱ्यात उग्र अशी भैरवनाथाची मूर्ती आणि शिवलिंग आहे.

किली हे पाचशे सहाशे उंबरा असलेले गाव असले तरी मंदिराप्रमाणेच या गावात शंभर दीडशे वीरगळी पहावयास मिळतात. त्यामुळे गावाला वीरगळीचे गाव” हे विशेषण शोभून दिसेल. येथे अगदी सर्वसामान्य व्यक्तींपासून ते राजांच्या वीरगळी आणि त्याही सुस्थितीत आहेत.

ref: discovermh

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *